नागरिकशास्त्र शिकवा...
---------------------------
---------------------------
स्वतःच्या ग्लॅमरचा, प्रसिद्धीचा अन् पैशांचा
माज असलेल्या बॉलिवूडकरांनी सुधारण्याची गरज तर सलमान प्रकरणातून दिसलीच;
पण बॉलिवूड काही आकाशातून पडलेलं नाही. त्यामुळं आपणच समाज म्हणून आपण अधिक
संवेदनशील होण्याची गरज आहे. त्यासाठी मुळात नागरिकशास्त्र हा शंभर
मार्कांचा अन् सक्तीनं पास होण्याचा विषय केला पाहिजे.
-------
-------
चित्रपटसृष्टीतली माणसं स्वतःला इतरांपेक्षा
वेगळं समजतात. तसं समजण्याचं वास्तविक काहीही कारण नाही; परंतु त्यांना
मिळणारी प्रचंड प्रसिद्धी, डोळे विस्फारतील एवढे मिळणारे पैसे आणि कलाकार
म्हणून जात्याच अंगी असलेला एक नादिष्टपणा या तीन बाबींमुळं ते बिथरतात.
आपल्याला कायम इतरांपेक्षा वेगळी वागणूक मिळाली पाहिजे; किंबहुना तो आपला
हक्क आहे, असं त्यांना वाटतं. सगळेच कलाकार असे आहेत असं नाही. मानेवर डोके
नावाचा अवयव असलेले, स्थिर बुद्धीचे, विवेकी कलाकारही आहेत. असे लोक
समाजात जसे अल्पसंख्य असतात, तसेच इथेही ते अल्पसंख्य आहेत. त्यामुळे
त्यांचा आवाज एक तर क्षीण असतो किंवा नसतोच. सध्या सर्वत्र गर्दी झालीय ती
माध्यमांतून कर्कशपणे आपली तथाकथित बौद्धिक मुक्ताफळे उधळणाऱ्या येरूंची.
अभिजित हा गायक तर वेड्यासारखंच बोलला आहे.
त्यावर भरपूर चर्चा झाली आहे. आपण काय बोलून गेलो, याचं आकलन त्याला नंतर
झालं असेल. त्यामुळं त्यानं नंतर माफी वगैरे मागून सारवासारवी करण्याचा
प्रयत्न केला. पण एकदा ‘बूंद से गई सो गई...’ त्याला ऋषी कपूरनं व्यवस्थित
सटकावला. तीच अवस्था सलमानप्रेमाचा उमाळा आलेल्या त्या कोणा फराह अली
खानची. या बाईंनी तर सलमानची तुलना लोकलच्या मोटरमनशी केली आणि
रेल्वेरुळाखाली मरणाऱ्या लोकांच्या मृत्यूबद्दल मोटरमननाही दोष धरलं
पाहिजे, असा निकाल त्यांनी दिला. सलमान एकदा कायद्याच्या समोर दोषी
ठरल्यानंतर आपण त्याच्या निर्दोषित्वाचा दाखला देणं किंवा समोरच्या
पार्टीला दोष देणं म्हणजे एका अर्थानं न्यायव्यवस्थेवरच संशय निर्माण करणं
आहे, हेही त्यांच्या लक्षात आलं नाही का? लक्षात येत नसेल तर ते आणून
द्यायला हवं. आणि मुद्दाम ते करत असतील तर त्यांनाही न्यायालयासमोर
गुन्हेगाराचे साथीदार म्हणून उभं करायला हवं.
चित्रपटसृष्टीचा व्यवहार लक्षात घेता, तिथं
असला लाळघोटेपणा करणाऱ्यांची फौज असणार, हे मान्य करायला हवं. कामं
मिळवण्यासाठी गुणवत्तेसोबतच कुणाच्या तरी ‘कंपू’त राहणं तिथं आवश्यक मानलं
जातं. एरवी हे उद्योग करणारे लोक कुणाच्या नजरेसही येत नाहीत. मग ही सवय
रक्तात भिनत जाते; पण या लोकांनी हे उद्योग आपल्या कामापुरतेच मर्यादित
ठेवले तर बरे. सलमान खानच्या खटल्यासारखा गंभीर विषय असतो, आणि त्यातही
त्याला दोषी ठरवलं जातं त्यानंतर आपण त्याचं समर्थन करू नये, एवढी साधी
गोष्ट या लोकांना कळत नसेल, तर त्यांच्या कानाखाली नागरिकशास्त्र काढून
शिकवावं लागेल.
बॉलिवूडच्या लोकांना एवढ्या डोक्यावर घेणाऱ्या
आणि प्रत्येक गोष्टीत ‘ब्रेकिंग न्यूज’ शोधणाऱ्या माध्यमांची, विशेषतः
दृक-श्राव्य माध्यमांचीही यातली जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही.
अलीकडच्या काळात मनोरंजन क्षेत्राचं कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून या
बातम्यांमधलं ‘रंजनमूल्य’ अचानक वाढलं. त्यामुळं अनेक भटक-भणंगांना अचानक
प्रसिद्धीचा मोठाच मार्ग गवसला. अशा सोप्या प्रसिद्धीतून लायकी नसलेलेही
अनेक जण मोठे स्टार म्हणून मिरवू लागले. सिनेमांतून मोठमोठा गल्ला गोळा करू
लागले. या सगळ्यांचं मूळ काय, ते कुठून आले, कोणत्या पर्यावरणात वाढले,
त्यांच्यावर काय संस्कार झाले आहेत याचा विचारही करायची फुरसत कुणाला
नव्हती.
एके काळी लोकशिक्षणाचं माध्यम म्हणून वापरल्या
गेलेल्या या आपल्या चित्रपटसृष्टीवर ही अवस्था का आली? अर्थात, हे फक्त
चित्रपटसृष्टीतच घडलं, असं नाही. स्वातंत्र्योत्तर काळात एकूणच
समाजव्यवस्थेत उत्तम शिक्षणाच्या अभावी आणि त्याहीपेक्षा उत्तम
नागरिकशास्त्र शिकवण्याच्या अभावी जे फार मोठं स्खलन घडून आलं आहे, त्याचा
दोष एकट्या चित्रपट कलावंतांच्या माथी लादता येणार नाही. चित्रपटांत काम
करणाऱ्या लोकांची सामाजिक बांधिलकी एके काळी वादातीत होती. गोरगरीब
जनतेविषयीची कणव, प्रेम त्यांच्या कलाकृतींमधून दिसत असे. आता त्यांना
फूटपाथवर झोपणारी माणसं दोषी वाटू लागली? म्हणजे हा अधोगतीचा प्रवास फारच
वेगानं झाला. याचं कारण आपण सर्वच क्षेत्रांत दोन टोकं गाठली. एक
अत्त्युत्तमतेचं, तर दुसरं अतिदुर्गुणदोषांचं... खरं तर सर्व समाज या दोन
वर्गांत कधीच नसतो. याच्यामधली तिसरीही अवस्था असते. ती
सर्वसामान्य माणसांची असते आणि त्यांच्यावरच सगळं रहाटगाडगं सुरू असतं. आपण
याच वर्गाकडं दुर्लक्ष केलं. सामाजिक शिस्तीचे धडे आपण कायमच ऑप्शनला
टाकले. ज्या देशात नागरिकशास्त्राला केवळ २० मार्क, आणि त्यात पास नाही
झालं तरी चालेल ही अवस्था, तिथं सुशिक्षित म्हणवणारेही लाल सिग्नल दिसत
असूनही सैरावैरा गाड्या हाकत सुटणार यात आश्चर्य नाही. मग केवळ सिग्नल न
पाळण्यापुरतं हे मर्यादित राहत नाही. ‘मी माझे नियम ठरवणार, माझं कोण वाकडं
करणार, मी सर्वसामान्य नाही, मी कुणी विशेष आहे,’ असे अनेक (नाही ते) धडे
डोक्यात शिरले, की साध्या-सरळ वागण्याचं नागरिकशास्त्र विसरलं जाणारच. मग
पुढची पायरी ही प्रत्येक गोष्ट कायदेभंग करून स्वतःला हिरो सिद्ध करण्याची
असते. मग मद्य पिऊन गाडी चालवू नये, हेही लक्षात राहत नाही आणि त्या
अमलाखाली फूटपाथवर झोपलेले निरपराध नागरिकही दिसत नाहीत.
आपण प्रत्येकानंच स्वतःमध्ये वाकून पाहण्याची,
आत्मपरीक्षणाची ही वेळ आहे. बॉलिवूडवाले चुकले तर त्यांचे कान उपटायचेच; पण
त्यांच्यासोबत आपणही समाज म्हणून फार काही उच्च पातळीवर वावरतो आहोत, असं
समजण्याचं कारण नाही. एक बोट त्यांच्याकडं असेल तर तीन बोटं आपल्याकडंच
आहेत, हे लक्षात घेऊ या. या देशात नागरिकशास्त्र हा शंभर मार्कांचा आणि
सक्तीने पास होण्याचा विषय केल्याशिवाय ही परिस्थिती सुधारेल असं वाटत
नाही.
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - १० मे २०१५ - ‘नागरिकशास्त्र शिकवा’ या शीर्षकाने....)
----
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - १० मे २०१५ - ‘नागरिकशास्त्र शिकवा’ या शीर्षकाने....)
----
No comments:
Post a Comment