27 Jul 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - किक

बसते; पण उशिरा...! 
--------------------------

सलमान खानच्या प्रत्येक सिनेमात त्याला एक टर्रेबाज संवाद असतो. ‘मेरे बारे में जादा मत सोचना; दिल में आता हूँ, समझ में नहीं...’ असा सलमान सरांचा नवा डायलॉग ‘किक’ या त्यांच्या नव्या सिनेमात आहे. ठीक आहे, म्हणून सिनेमा पाहायला सुरुवात केली, तर इंटरव्हल झाला तरी सर ‘समझ में’सुद्धा आले नाहीत आणि ‘दिल में’सुद्धा! सुदैवाने उत्तरार्धात काहीशा नाट्यपूर्ण, ‘पोलिश’ आणि ‘बालिश’ वळणांमुळं कथेला ‘किक’ बसते आणि आपल्यालासुद्धा! त्यामुळंच एकूण निकालही ‘बरा, ठीकठाक’पासून ते ‘एकदा पाह्यला चांगला’पर्यंत पोचू शकतो.
मूळ याच नावाच्या तेलगू सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘किक’चा प्रॉब्लेम झालाय तो नवं काय द्यायचं या गोंधळात! निर्माताही असलेला दिग्दर्शक साजिद नाडियादवालानं या वेगळेपणापायी सिनेमाच्या पूर्वार्धात अनेक प्रयोग केले आहेत. तरीही महानायकाच्या एंट्रीचा प्रसंग शेवटी अन्य सिनेमांत आहे, तसाच यातही आहे. (म्हणजे सलमानला त्याच्या ‘दबंग’गिरीतून बाहेर तर काढलं आहे; पण एका दृश्यात ‘पांडेजी’ दाखवण्याचा मोहही टाळता आलेला नाही.) तसंच आणखी एकदा संभाव्य हाणामारीचा प्रसंग असेल, असं दाखवताना प्रत्यक्षात नायकाला एकदम ‘यू टर्न’ करताना दाखवलं आहे. तर अन्य एका प्रसंगात असं काही होणार नाही, असं वाटताना सर एकदम त्यांच्या पठडीतली हाणामारी करताना दिसतात. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे नायकाचं सगळं दर्शन हे नायिकेच्या सहनायकाबरोबरच्या संवादातून (अर्थात फ्लॅशबॅकमधून) उलगडत जातं. नायकाचं हे पूर्वीचं आयुष्य फ्लॅशबॅकमध्ये दाखवणं म्हणजेच आताच्या काळात येणारा नायक वेगळ्या रूपात येणार आहे, हे आता हिंदी सिनेम पाहणारं शेंबडं पोरही सांगू शकेल. पोरावरून आठवलं, या सिनेमात एक गोग्गोड छकुली आहे. पूर्वार्धात दर्शन देऊन जाणाऱ्या या छकुलीमुळं उत्तरार्धात बऱ्यापैकी उतमात घडतो, एवढं सांगितलं तरी पुरे. या ‘ईक्यू’मुळं सिनेमाला शेवटच्या अर्ध्या तासात वेगळंच वळण लागतं आणि ‘किक’मागचं ‘प्रयोजन’ही कळतं. हे प्रयोजन साधारणतः ‘जय हो’च्या धर्तीवरच आहे. (लोकांना चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करणारं, अशा अर्थानं!) पण सलमान सरांची एकूण इमेज आणि त्याद्वारे काही चांगल्या गोष्टी, भले त्या फिल्मी पद्धतीनं का होईना, सांगण्याचा आणि त्यातून आपल्या चाहत्यांना काही धडे देण्याचा दिग्दर्शकाचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हटला पाहिजे.
गोष्ट गुंतागुंतीची किंवा वेगळी करण्याच्या नादात सलमान सरांच्या टिपिकल एंटरटेन्मेंटचे फंडे दिग्दर्शक विसरलेला नाही. त्यामुळं सरांची (या गोष्टीतली) सर्व कारकीर्द अॅनिमेशनच्या रूपात आपल्या समोर झळकते. त्यातच रेस्तराँ अॅक्शन येते. अगदी सुरुवातीला एका आमदारणीच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने (गुज्जू) गाड्यांच्या पळवापळवीची कॉमेडीही होऊन जाते. नायिका शायना (जॅकलिन फर्नांडिस) एक सायकिअॅट्रिस्ट डॉक्टर आहे. (तरीही) तिच्यासोबत सरांचं एक गाणं येतं. पिताजींबरोबरचं प्रेम (विनोद खन्नाच्या तारखा मिळाल्या नसाव्यात; मिथुनवर भागवू चला!), माताजी का (अर्चना पूरणसिंह, बस्स सिर्फ नाम ही काफी है!) प्यार... (तरी नशीब, ‘गाजर का हलवा’ नाहीय) हे सगळं सगळं एकत्र पॅकेज येतं. फ्लॅशबॅक तर सुरुवातीपासून इंटरव्हलपर्यंत सुरूच आहे. नायिकेचे वडीलही (सौरभ शुक्ला) कॉमेडीचा उर्वरित कोटा पूर्ण करतात. पूर्वार्ध हा असा हसत-खेळत संपताना लक्षात येतं, हा काही सरांचा ‘वाँटेड’ ते ‘जय हो’ व्हाया ‘दबंग’ टाइपचा सिनेमा नाही. त्यामुळंच अपेक्षाभंग होतो आणि त्या पद्धतीचा फुल्ल टाइमपास सिनेमा बघायला येणाऱ्यांना ‘किक’ बसतच नाही.
उत्तरार्धात नायक (सर), सहनायक एसीपी हिमांशू त्यागी (रणदीप हुडा) आणि ऐन वेळी प्रकट होणारा तिसराच खलनायक शिव (नवाझुद्दीन सिद्दिकी) यांच्यातला पाठशिवणीचा खेळ रंगतो. तोही थेट पोलंडमध्ये. एरवीच्या युरोपीय देशांतली आणि त्याच त्या शहरांतली दृश्यं पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांनाही या वेगळ्या (आणि कदाचित प्रमोशनल रेटमध्ये मिळालेल्या) स्थळामुळं बरंच वाटतं. तर या पोलंडमध्ये आपले सर सर्व प्रकारचा धिंगाणा घालतात. अशक्य करामती करतात, उंच बिल्डिंगीवरून उडी मारतात, डबल डेकर बस भन्नाट चालवतात (आणि लहान मुलाला घेऊन चाललेल्या एका बाईस वाचवतातही!) आणि शेवटी एका भव्य पुलावर येऊन सहनायकाची फजिती करीत ही बस स्वतःसकट नदीत पाडूनही घेतात.
शेवट तर खूपच हृदयस्पर्शी आहे. तो प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवा. सलमान सरांनी नेहमीप्रमाणेच याही सिनेमात जोरदार काम केलंय. (फक्त शेवटचा रिळात शर्ट न काढून त्यांनी चाहत्यांना फार नाराज केलंय.) 
जॅकलीन फर्नांडिसकडून जे अपेक्षित होतं, ते तिनं केलंय. सहनायकाच्या भूमिकेत रणदीप हुडा फिट्ट आहे. नवाझुद्दीन सिद्दिकी नेहमीच वेगळ‍ं काही तरी देण्याचा प्रयत्न करीत असतो. याही सिनेमात त्यानं एक अत्रंगी खलनायक झकास साकारला आहे. बाकी मिथुनदांना फार वाव नाही. सौरभ शुक्ला, संजय मिश्रा या ताकदीच्या कलाकारांना तर वाया घालवलंय. विपीन शर्मा, रजित कपूर, अर्चना पूरणसिंह छोट्या भूमिकांत दिसतात.
हिमेश रेशमियाचं कंठाळी संगीत आहे. त्यातली ‘जुम्मे की रात को’ हे मिकाचं आणि हँगओव्हर ही गाणी बऱ्यापैकी गाजताहेत. पण ती वाईटच आहेत. नर्गिस फाकरी एका आयटेम साँगमध्ये दर्शन देऊन जाते. तेव्हा उशिरा बसणारी ही ‘किक’ एकदा अनुभवायला हरकत नाही.
---
निर्माता : साजिद नडियादवाला
दिग्दर्शक : साजिद नडियादवाला
संगीत : हिमेश रेशमिया
पटकथा : रजत अरोरा, साजिद नडियादवाला, कीथ गोम्स, चेतन भगत
प्रमुख भूमिका : सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा, नवाझुद्दीन सिद्दिकी, मिथुन चक्रवर्ती, सौरभ शुक्ला इ.
कालावधी : दोन तास २६ मिनिटे
दर्जा : ***

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २६ जुलै २०१४)
---
---

19 Jul 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - हेट स्टोरी २ (A)

हॅट... सॉरी...
---------------

‘एक उगीचच सूडकथा’ असं ‘हेट स्टोरी २’ या नव्या हिंदी चित्रपटाचं एका वाक्यात वर्णन करता येईल. मुंबई आणि गोवा या दोन स्थळांत प्रेक्षकांना अक्षरशः नाचवून त्यांच्यावर उगीचच सूड उगवणारा दिग्दर्शक विशाल पंड्या कथेतही अशा अनेक गोष्टी उगीचच करतो. शेवटी प्रेक्षकांना स्वतःला ‘उगी उगी...’ म्हणत आणि दिग्दर्शकाला ‘हॅट... सॉरी...’ असं म्हणत बाहेर पडावं लागतं. एक मात्र आहे. पहिल्या ‘हेट स्टोरी’पेक्षा हा वाईट होता, की तो याच्यापेक्षा यावर मात्र क्विझ कन्टेस्टच घ्यावी लागेल.
खरं तर पहिल्या ‘हेट स्टोरी’ला काही तरी स्टोरी तरी होती. या ‘हेट स्टोरी’ला काहीच स्टोरी नाही. त्यामुळं यात सगळं उगीचच आहे. उदा. या सिनेमाचा खलनायक मंदार म्हात्रे (सुशांतसिंग) हा एक टिपिकल राजकारणी आहे. सोनिका प्रसाद (सुरवीन चावला) ही त्याची ‘कीप’ असते. ती तशी का असते, याला काही उत्तर नाही. असते आपली उगीचच! हा मंदार म्हात्रे मुंबईतला बडा राजकारणी दाखवला आहे. मात्र, तो बहुतेक वेळा गोव्यातच असतो. सोनिका गोव्याची असते. मंदारची तिच्यावर विलक्षण दहशत असते. पण तरी ती फोटोग्राफीचा कोर्स करायला मुंबईला जाते. का? उगीचच! तिथंच तिला नायक अक्षय बेदी (जय भानुशाली) भेटतो. का? आता विचारायचं नाही. तर बिचारी नायिका नायकाला ओरडून सांगते, की मी अशी अशी आहे म्हणून. तर महात्माच जणू असलेला नायक खांदे झटकत म्हणतो, बस एवढीशी गोष्ट. रखेलच आहेस ना तू कुणाची तरी! मला वाटलं, की काही तरी सीरियस सांगतेयस म्हणून... धन्य तो नायक, धन्य ती नायिका आणि अतिधन्य तो दिग्दर्शक... मग पुढं काय होणार हे सांगायची गरज आहे का? नायक महाराज हकनाक मरतात आणि गाडीसह धरणाच्या तळाशी जातात. नायिकेला मंदार शवपेटीत बांधून ग्रेव्हयार्डमध्ये पुरून टाकतो. संपला खेळ. पण छे! आत्ता कुठं खेळ सुरू झालेला असतो... उत्तरार्धात नायिकेची सूडकथा सुरू झाल्यावर खेळ थोडा रंजक बनतोही. नक्कीच! पण मंदारच्या एकेका साथीदाराला यमसदनी पाठवताना नायिका वापरत असलेल्या युक्त्यांमध्येही फार काही नावीन्य नसल्यानं शेवट काय होणार हे कळून चुकतं. नाही म्हणायला मंदारच्या काकाला मारायच्या वेळी एक ट्विस्ट येतो आणि तो नायिकेवरच उलटतो हेही चांगलं जमलंय. मात्र, नंतर मंदार नायिकेला किती घाबरतो हे दाखवण्यात दहा मिनिटं गेल्यानं आणि नायिकेचा प्रियकर सारखा (पांढुरक्या पार्श्वभूमीतून) प्रकट होऊन नायिकेसोबत गाणं वगैरे म्हणत बसल्यानं शेवटाबद्दलची उत्सुकता पार नाहीशी होते. शेवटी एकदाची नायिका मंदारला मारते आणि खेळ संपतो...
‘हेट स्टोरी’सारख्या सिनेमाला चांगल्या मजबूत कथेची आणि पटकथेची गरज होती. इथं कथेनंच मार खाल्ला आहे. पटकथाही संकलनाच्या वेड्यावाकड्या प्रयोगांत पार भरकटत गेली आहे. गोष्ट मुंबईत घडतेय की गोव्यात या कोड्यानं प्रेक्षक इतका गोंधळून जातो, की नंतर नंतर त्याचा विचारच करायचं सोडतो. अख्ख्या सिनेमात एकदा फक्त गोवा अशी पाटी येते. बाकी सर्व मामला दिग्दर्शकानं आणि संकलकानं आपल्या सोयीनुसार घेतला आहे. गोष्ट इतक्या वेळा फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि परत आत्ताच्या काळात येते, की त्याचं व्यवधान सांभाळण्यातच प्रेक्षक बेजार होऊन जातो. नायिकेसोबत आपणही (दिग्दर्शकाबाबत) सूडाच्या विचारानं पेटून उठतो, हे या चित्रपटाच्या संकलनाचं मोठंच यश मानलं पाहिजे. माधुरी बॅनर्जी यांच्या पटकथेतही अनेक कच्चे दुवे राहिले आहेत. सोनिकाची आजी गोव्यात असते की मुंबईत? ती एकाच प्रसंगात दर्शन देऊन जाते. सगळं काही उगाचच आहे. अतुल म्हात्रे या खलनायकाच्या भावाचा किंचित ट्विस्ट सोडला, तर बाकी कशाचीच तर्कसंगती लागत नाही. गोव्यातल्या इन्स्पेक्टर वर्गीसचं पात्रही असंच सोयिस्कर वापरलं आहे. तोही घटकेत गोव्यात, तर घटकेत मुंबईत हजेरी लावून जातो. सिनेमाच्या सुरुवातीलाच येणारा ग्रेव्हयार्डचा आणि नंतर हॉस्पिटलमधून नायिका पळून जाते तो, हे दोन्ही प्रसंग इतके अतर्क्य झाले आहेत, की त्यावरच आधारित पुढचा सगळा डोलारा अविश्वसनीय वाटू लागतो. नायिकेच्या सूडाबद्दल प्रेक्षकाला सहानुभूती वाटायला हवी. इथं नायिकेपेक्षा मंदार म्हात्रेच्या बायकोबद्दल जास्त सहानुभूती वाटते, याला काय म्हणावं?
 सिनेमातले संवाद मात्र खटकेबाज आहेत. विशेषतः खलनायकाच्या तोंडी असलेले ‘बाबा कहते थे...’ या प्रस्तावनेनं सुरू होणारे काही वनलायनर भारी आहेत. (ते अॅडल्ट असल्यानं इथं सांगता येत नाहीत...) अभिनयात सर्वांत भाव खाऊन जातो तो खलनायक मंदार म्हात्रे साकारणारा सुशांतसिंग. बऱ्याच दिवसांनी त्याला तोलामोलाची भूमिका मिळाली आहे आणि त्यानं ती झकास केली आहे. नायिका सुरवीन चावला हिनंही चांगलं काम केलं आहे. मात्र, तिची संवादफेक आणि बहुतांश वेळा झोपाळलेला दिसणारा चेहरा या नकारात्मक बाजू आहेत. (बाकी या सिनेमात तिला मुख्य काम जे करायचं होतं, ते तिनं व्यवस्थितच केलं आहे.) तरी पहिल्या ‘हेट स्टोरी’च्या तुलनेत यात ‘तशी’ दृश्यं कमीच आहेत. (की आता आपली नजर सरावलीय, कोण जाणे.) जय भानुशालीनंही चांगलं काम केलंय. पण त्याला फार वाव नाही. आपला शशांक शेंडे काकाच्या भूमिकेत दमदार हजेरी लावून जातो. सिनेमाचं संगीत चांगलंय. विशेषतः ‘आज फिर तुम पे प्यार आया है’ हे ‘दयावान’मधलं गाणं रिमेक म्हणून वापरलं आहे आणि त्यानं चांगलीच हवा केलीय. (त्याचं पिक्चरायझेशनही गरजूंची अपेक्षापूर्ती करणारं असंच आहे.) सनीताई लिऑन यांचं ‘पिंक लिप्स’ हे आयटेम साँग म्हणजे आइसिंग ऑन द केक! तेव्हा एकदा पाहायला हरकत नाही. अगदी नंतर हॅट आणि सॉरी म्हणायचं असलं तरी!
--
निर्माते : भूषणकुमार, विक्रम भट्ट
दिग्दर्शक : विशाल पंड्या
पटकथा : माधुरी बॅनर्जी
प्रमुख भूमिका : सुरवीन चावला, जय भानुशाली, सुशांतसिंग, शशांक शेंडे इ.
कालावधी : दोन तास नऊ मिनिटे
दर्जा : ** १/२
---




-----------------------------------------------------------------------------------