30 Jul 2017

रविवारसाठी लेख - दाद

ही 'दाद' आहे?
-----------------


एखादा चर्चेतला सिनेमा आपण पाहत असतो. त्यात काही उत्कट दृश्यं असतात. रूढार्थानं ती सहजतेनं पाहायला मिळणारी दृश्यं नसतात. ती पाहत असताना अचानक कुठून तरी हशा ऐकू येतो... किंवा अगदीच अनाठायी अशी टिप्पणी ऐकू येते... आपण त्या दृश्यात गुंगून गेलो असताना या हशामुळं वा त्या बोलण्यामुळं आपला रसभंग होतो... मूडच जातो...
हल्ली असं बऱ्याचदा घडतं. कलाकाराला अपेक्षित असलेल्या ठिकाणी दाद न मिळणं किंवा नको त्या ठिकाणी चुकीची दाद वा प्रतिक्रिया येणं असं हल्ली वारंवार घडताना दिसतं. कशामुळं होतं हे? कुठलाही कलाकार त्याची कलाकृती तयार करतो ती लोकांनी पाहावी, समजून घ्यावी, त्याचा आनंद लुटावा यासाठी! त्याचं त्या कलाकृतीच्या माध्यमातून काही तरी एक सांगणं असतं. पण ते पुष्कळदा लोकांपर्यंत पोचतच नाही की काय, अशी शंका येते. हल्ली समाजमाध्यमांनी भावनांचं सपाटीकरण केलंय म्हणून असं होतंय की एकूणच तरल भावनांच्या जोपासनेचा अभाव दिसतोय? काही तरी चुकतं आहे हे नक्की...
कला सादर करणारा कलाकार आणि तिचा आस्वाद घेणारा प्रेक्षक एकाच प्रतलात असायला हवेत. अर्थात ही आदर्श परिस्थिती झाली. दर वेळी असं होत नाही. त्यामुळं कलाकार एका विशिष्ट संवेदनशीलतेतून काही सांगू पाहत असेल आणि प्रेक्षक त्या विशिष्ट संवेदनशीलतेतून ती कलाकृती पाहत नसेल, तर गोंधळ होतो. प्रेक्षकाची अपेक्षा काही वेगळीच असते आणि त्याला कदाचित समोर काही वेगळंच दिसत असतं. त्यातून प्रतिक्रियेची प्रक्रिया विस्कटायला सुरुवात होते. विशेषतः सामूहिक आस्वादनाच्या जागांवर हे वारंवार घडताना दिसतं. चित्रपटगृहात सिनेमा पाहताना आपण एकटे पाहत नाही. आपल्यासोबत अनेक लोक तो पाहत असतात. त्यातल्या बहुतांश जणांच्या संवेदनेची तार सिनेमाशी जुळलेली दिसते आणि नेमक्या अशाच वेळी दोन-तीन बेसूर तारा छेडल्या जातात. तो कणसूर त्रासदायक असतो.
याचा जरा विचार केल्यावर असं लक्षात येतं, की प्रेक्षक किंवा आस्वादक म्हणून आपल्या भावभावना फारच ढोबळ, भडक व बटबटीत झाल्या आहेत. आनंद, दुःख, प्रेम, विरह, माया, द्वेष, संताप, सूड आदी ढोबळ आणि ठळक भावनाच तेवढ्या कलाकृतीतून ग्रहण केल्या जातात. त्यातही हिंसा, सूड, संताप आदी भावनांच्या प्रदर्शनाला मिळणारी दाद किंवा प्रतिसाद पाहण्याजोगा असतो. या ठळक भावनांच्या अधे-मधे काही तरल भावना लपलेल्या असतात. त्या शब्दांनी सांगता येत नाहीत. अनुभवाव्याच लागतात. या भावनांना साद देण्यासारखी परिस्थिती काही कलाकृती निश्चितच निर्माण करतात. आपल्यामध्ये मात्र त्या तरल भावनांचा कदाचित नीट परिपोष न झाल्याने आपण त्या कलाकृतीला जसा हवा तसा प्रतिसाद देऊ शकत नाही. करुणा किंवा सह-अनुभूती (सहानुभूती नव्हे!) या भावनांची त्रुटी विशेषत्वाने जाणवते. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटातील ५५ वर्षांची प्रौढ स्त्री एका तरण्याबांड जलतरण प्रशिक्षकाशी फोनवर बोलून तिची लैंगिक सुखाची फँटसी अनुभवत असते. यात ती अनेकदा त्याच्याशी एरवी ज्याला चावट म्हणता येईल, अशी वाक्यंही बोलत असते. आता वास्तविक पाहता, हे काहीसे करुणात्मक दृश्य आहे. त्या महिलेच्या बाजूने जरा विचार केला, तर तिच्या आयुष्यात ती या साध्या सुखालाही पारखी झाल्याचे दिसून येते. तेव्हा तिची ती धडपड पाहताना वाईट वाटते किंवा तिच्याविषयी करुणा उत्पन्न होते. आता ही भावना समजून न घेतल्याने काही जणांकडून तिच्या त्या फोन कॉलच्या वेळी (अस्थानी) हशा येतो. आपल्याकडच्या चित्रपटांत एकूणच थेट लैंगिक दृश्यं दाखवण्याचं प्रमाण कमी आहे. हल्ली मात्र ‘प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिलेल्या बऱ्याच सिनेमांत अशी थेट लैंगिक दृश्यं दाखविली जातात. (या दृश्यांची कथानकातील गरज वा उपयुक्तता हा निराळ्या चर्चेचा विषय आहे.) अशा दृश्यांची आखणीदेखील त्या दृश्यात सहभागी असलेल्या स्त्री पात्रांच्या त्या वेळी असलेल्या भावना दर्शविण्यासाठी केल्याचं दिसून येतं. मात्र, हे समजून न घेणारा मोठा प्रेक्षकवर्ग अशा दृश्यांकडं निराळ्या नजरेनं पाहतो. त्या नजरेत दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली पात्राविषयीची ‘सह-अनुभूती’ कुठे दिसत नाही. 
आपल्याकडे एकूणच दृश्यसंस्कारांच्या बाबतीत आनंदीआनंद असल्यानं ही परिस्थिती निर्माण होते. एखादं चित्र कसं पाहावं, हे आम्हाला कुणी शिकवत नाही. आम्हाला वाचता येतं; पण लेखकाला त्या दोन वाक्यांच्या मध्ये काय म्हणायचंय हे समजत नाही. आम्हाला सिनेमा किंवा नाटकातील दृश्यांमागची प्रकाशयोजना, नेपथ्यरचना किंवा त्या दृश्याची भूमिती समजत नाही. एखाद्या कलाकृतीमधील अमूर्तता कळणं ही आपण रसिक म्हणून किंवा आस्वादक म्हणून जरा वरची इयत्ता गाठल्याचं लक्षण आहे. आपण त्या दृष्टीनं किती प्रयत्न करतो ही स्वतःला विचारून पाहण्याची गोष्ट आहे. कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय. अनेकांना तर लेखनातील उपहासही समजत नाही, असं आढळून येतं. त्यामुळं आस्वादकाकडून विशिष्ट गुणवत्तेची अपेक्षा करणाऱ्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी आपण समाज म्हणून कितपत सक्षम आहोत, असा प्रश्न अनेकदा पडतो.
आपल्या आजूबाजूचं जग फार वेगानं बदलतं आहे. नवी पिढी फार वेगानं सगळे बदल स्वीकारते आहे. अशा जगात वावरताना आणि त्या जगानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करताना आपण अनेकदा आपल्या हळुवार भावभावनांची नीट जोपासना करायला विसरतो. आयुष्यातले छोटे छोटे आनंददायक क्षण टिपायला, त्यातला आनंद लुटायला विसरून जातो. त्यातून भावनांचं प्रकटीकरण हळूहळू बंद होऊन जातं. टिपकागदासारखं मन गंजून जातं आणि जुन्या दरवाजाच्या बिजागरीसारखं सदैव कुरकुरू लागतं. अशी बधीर मनं घेऊन आपण समाज म्हणून वावरू पाहतो आहोत. त्यामुळं आपली सौंदर्यदृष्टी लोप पावली अन् जगण्यातली विसंगती खटकेनाशी झाली आहे. मग हा मुद्दा फक्त आस्वादनाच्या फरकापुरता मर्यादित राहत नाही, तर एकूणच आपल्या आयुष्याचा परीघ मर्यादित करण्याचा बनतो.
दाद देऊन शुद्ध व्हावं, असं म्हटलं जातं. दाद देण्याचं महत्त्व असं मोठं आहे. खुल्या मनानं आणि नेमक्या जागी दिलेली दाद त्या कलाकाराला आनंद देऊन जातेच; पण माणूस म्हणून आपल्यालाही समृद्ध करीत असते. अशी दाद सर्वांना देता यावी आणि सगळे कणसूर लोप पावून आनंदगाणं सुरेल व्हावं, एवढीच साधी अपेक्षा!
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, ३० जुलै २०१७) 
---

23 Jul 2017

लिपस्टिक अंडर माय बुरखा - रिव्ह्यू

बाईच्या 'फँटसी'ची फँटॅस्टिक गोष्ट...
------------------------------------------




फँटसी ही गोष्टच अद्भुत... दुसऱ्या दुनियेत नेणारी... त्यात ती बाईची फँटसी असेल तर... आणि त्यातही ती तिच्या लैंगिकतेची फँटसी असेल तर..? या 'फँटसी'ची आपण कल्पनाही कदाचित करू शकणार नाही. पण जिथं कदाचित कल्पनाही पोचू शकत नाही, अशा अज्ञात जागांची सफर करणं हे तर कलाकारांचं काम असतं. त्यातूनच कलाकृती जन्माला येतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात... 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' ही अशीच एक कलाकृती आहे. वरकरणी 'ब्लॅक' कॉमेडीचा 'बुरखा' (Pun Intended) पांघरलेली, पण आतून खूप काही तरी निराळं सांगणारी ही एक फँटसीची फँटॅस्टिक गोष्ट आहे. दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तवनं ही आगळीवेगळी 'लिपस्टिक' आपल्यासमोर अशा काही तडफेनं सादर केलीय, की बस्स!
माणसाची लैंगिक प्रेरणा ही आदिम गोष्ट... पण आज २०१७ मध्येही आपण त्याविषयी नीट बोलत नाही. आपल्या दांभिक मानसिकतेचा हा क्लासिक नमुना आहे. आपली लैंगिकता किंवा ती भावना ही आपल्या हगण्या-मुतण्याइतकीच नैसर्गिक गोष्ट; पण वर्षानुवर्षं गोपनीयतेच्या बुरख्यात दडवली गेली. त्यातही बाईच्या लैंगिकतेविषयी बोलायचं तर अब्रह्मण्यम! आणि त्यातही तिनं स्वतःच बोलायचं म्हणजे तर अबबच!

SPOILER AHEAD

अशा वेळी मग अलंकृता आपल्याला भोपाळच्या चार बायकांची गोष्ट सांगते. ही गोष्ट आहे या बायकांच्या लैंगिक प्रेरणांची, त्याच्या दमनाची, उद्वेगाची आणि उद्रेकाचीही! यातल्या दोन जणी मुस्लिम आहेत हा योगायोग. पण गोष्टीसाठी महत्त्वाचा... आणि मुस्लिम म्हणून त्या बायकांच्या होणाऱ्या जास्तीच्या कोंडीचं एक वेगळं परिमाण या गोष्टीला लाभतंच. उषा परमार ऊर्फ बुवाजी ऊर्फ 'रोझी' (रत्ना पाठक-शाह), शिरीन (कोंकणा सेनशर्मा), रेहाना (प्लबिता बोरठाकूर) आणि लीला (आहना कुमरा) या चार वेगळ्या वयोगटातल्या, वेगळ्या परिस्थितीतल्या बायका... त्यांच्यातला समान धागा एकच... सध्या त्या जे जगताहेत त्यात त्यांना समाधान नाही.
बुवाजी ५५ वर्षांच्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी त्या (पती निधन झालेलं असल्यानं) एक देवधर्म करणाऱ्या ज्येष्ठ महिला आहेत. असं असलं, तरी बुवाजींच्या आतली (कदाचित कित्येक वर्षं उपाशी राहिलेली) स्त्री अजून जिवंत आहे. ती आतून वेळी-अवेळी धडका देत असते. मग देवधर्माच्या पुस्तकांच्या मध्ये 'त्या' रंगीत कादंबऱ्या वाचून बुवाजी आपल्या इच्छांची अर्धीमुर्धी पूर्ती करीत असतात. अशाच एका कादंबरीची नायिका असते 'रोझी'. बुवाजी 'रोझी' वाचत जातात आणि ही गोष्टच या सिनेमाचंही निवेदन बनते. एकदा काही कारणाने बुवाजींची गाठ एका स्विमिंग ट्रेनर तरुणाशी पडते. त्या तरुणाचा कमावलेला घाटदार देह बुवाजींच्या मनातल्या दबलेल्या भावनांवर अलगद फुंकर घालतो.
रेहाना टिपिकल मुस्लिम घरातली कॉलेजवयीन मुलगी आहे. तिला इंग्लिश गाणी पाठ आहेत आणि स्पर्धेसाठी ऑडिशन द्यायचीय. एरवी सक्तीनं बुरखा वापरावा लागणारी रेहाना कॉलेजमधील 'जीन्स हटाव'विरोधी मोर्चात उत्साहानं सामील होते. तिला हव्या त्या वस्तू मिळविण्यासाठी मॉलमध्ये चोरी करायची सवय लागते. रेहानाचं एका हिंदू मुलावर प्रेम आहे. हा मुलगा तिच्याच मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे.
लीलाचं अर्शद नावाच्या एका मुस्लिम फोटोग्राफरवर प्रेम आहे. पण तिच्या घरचे तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न एका दुसऱ्या तरुणाबरोबर ठरवत आहेत. लीला ब्यूटिशियन आहे आणि तिला या छोट्या शहराचा कंटाळा आलाय. लीलाची कामभावनाही जरा जोरकस आहे.
शिरीन चोरून सेल्सचं काम करते आहे. तिला तीन मुलं आहेत आणि नवरा सौदीतील नोकरी सोडून परत आलाय. शिरीनच्या नवऱ्याचं दुसऱ्या एका बाईसोबत अफेअर चालू आहे. लैंगिक संबंधांबाबत तो इतर सनातनी भारतीय पुरुषांसारखाच आहे. त्याला काही झालं तरी कंडोम वापरायचा नाहीय आणि बायकोचे तीन गर्भपात झाले तरी त्याला फिकीर नाहीय. लैंगिक संबंध ही दोन व्यक्तींचा सहभाग असलेली क्रिया असते आणि त्यात समोरच्या व्यक्तीलाही काही 'से' असू शकतो, ही गोष्ट त्याच्या आकलनापलीकडची आहे. (त्याचे आणि शिरीनचे संबंध पाहताना प्रेक्षक म्हणून आपल्यालाच शिसारी येते, तर शिरीनचं काय होत असेल?) शिरीनला या सगळ्याचा वीट आलाय आणि तिला सेल्स ट्रेनर म्हणून आलेली ऑफर नवऱ्याची पर्वा न करता स्वीकारायची आहे.
या चारही मुली/बायका बुवाजीच्या हवेलीत राहत असतात. जुन्या आणि नव्या भोपाळच्या नेपथ्यावर ही गोष्ट घडताना पाहणं फारच अर्थपूर्ण आहे. तिथल्या जुन्या गल्ल्यांप्रमाणे आपल्या रुढी-परंपरांची वस्ती या बायकांच्या अवतीभवती एखाद्या नागासारखी वेटोळं घालून आहे. नव्या भोपाळमध्ये मॉल आहेत. चकाचक सौंदर्यप्रसाधनं विकली जातायत. बुवाजीला स्विमिंग शिकायला जाताना नवा स्विम सूट घ्यायचा आहे तर या मॉलमध्येच जावं लागतं. तिथल्या सरकत्या जिन्यावरून वर जाताना ती अडखळते. तेव्हा छोट्या मुस्लिम मुलींचा एक घोळका सराइतपणे त्या सरकत्या जिन्यावरून वर जातो आणि त्यातली शेवटची मुलगी नकळतपणे बुवाजीचा हात धरून तिला वर नेते, हा फार सुंदर शॉट यात आहे. बुवाजी नंतर 'रोझी' बनून स्विमिंग ट्रेनर जसपालशी बोलू लागते. नंतर तर हा फोन हीच तिच्या आयुष्यातली मोठी फँटसी बनून जाते. बुवाजी आणि जसपाल फोनवरून शृंगारिक बोलत असतानाचं एक अप्रतिम दृश्य यात आहे. यात रत्ना पाठक शाहनं केलेला अभिनय जबरदस्त. कित्येक वर्षं लैंगिक भूक न भागलेल्या स्त्रीच्या सर्व भावभावना तिनं केवळ चेहऱ्यावरून व्यक्त केल्या आहेत.
कोंकणा सेनशर्माची शिरीनही अशीच जबरदस्त! लीला तिचं वॅक्सिंग करत असतानाचा शॉट व तेव्हाचे दोघींचे संवाद भारी आहेत. पती जवळपास रोज जबरदस्ती करीत असताना, तीन मुलांना वाढवताना, वेगवेगळ्या घरी घुसून वस्तू विकताना शिरीननं 'सेन्स ऑफ ह्यूमर' जपला आहे आणि तो कोंकणानं फार छान दाखवला आहे. ती अभिनेेत्री म्हणून ग्रेट आहेच. पण शिरीन साकारताना कोंकणानं खूपच मोठी मजल मारली आहे, असं म्हणावंंसं वाटतं. ती पहिल्यांदा ज्या बाईच्या घरी घुसते तेव्हाचा प्रसंग, नंतर नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत एका रेस्टॉरंटमध्ये पाहते तो प्रसंग आणि नंतर त्या बाईच्या घरी जाऊन 'मेरी मूँह की चीज तुम क्यूं इस्तेमाल करोगी?' म्हणतानाचा तिचा अॅटिट्यूड... इतर सगळं काही खल्लास करून टाकते ती!
लीला झालेल्या आहना कुमरानंही तिची तडफड फार प्रभावीपणे दाखविली आहे. काही स्त्रियांचा 'सेक्स ड्राइव्ह' खूपच जास्त असतो. लीला अशांपैकी एक. तिचं प्रेमप्रकरण कुणी समजून घ्यायला तयार नाही, तर ही भावना समजून घेणं दूरच. एरवी संधी मिळेल तिथं तिला 'घेणारा' तिचा मित्रही शेवटी तिच्या या पवित्र्यापुढं वैतागतो. मग होणाऱ्या नवऱ्यासोबत लीलाला ते हवं असताना तो हनीमूनची वाट पाहायला सांगतो, तेव्हा लीलाला त्याला काय सांगावं, हे उमगत नाही.
रेहाना वयानं अद्याप लहान आहे. पण तिला आपल्याला काय आवडतं, काय हवं हे नक्की माहिती आहे. मॉलमधून लिपस्टिकपासून ते शूजपर्यंत अनेक वस्तू चोरून नेताना तिच्या मनातल्या अभिलाषेनं तिच्या सारासार विवेकबुद्धीवर मात केल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. रेहानासारख्या अनेक मुली आज मध्यम आकाराच्या शहरांमध्ये अस्वस्थपणे आपल्याला हवा तो आनंद शोधण्यासाठी तडफड करीत आहेत.
या चारही स्त्रिया शेवटी एका मेळ्याच्या निमित्तानं एकत्र येतात. प्रत्येकीच्या गोष्टीचा (बहुतांश लॉजिकल) शेवट होतो. आपण तो शेवट गृहीतच धरलेला असतो. पण आपल्या अपेक्षेपेक्षा या बायका अधिक समजूतदार निघतात. 'रोझी' शेवटी स्वप्नातच भेटणार, हे प्रत्येकीला उमगतं... पण तरीही आपल्या इच्छा मारायच्या नाहीत, आपण स्वप्नं पाहायचं सोडायचं नाही, असा दिलासा त्या एकमेकींना देतात.
अलंकृता श्रीवास्तव हिचा हा पहिलाच सिनेमा. अनेक अडचणींनंतर तो पडदा पाहतो आहे. सिनेमाचं 'मधलं बोट'रूपी लिपस्टिक दाखवणारं पोस्टरही अर्थपूर्ण आहे. स्त्रीच्या लैंगिकतेविषयी आणि मुळातच एक व्यक्ती म्हणून स्त्रीच्या भावभावनांविषयी आपण जरा अधिक संवेदनशील झालो, तर या सिनेमाचं सार्थक होईल.
मग एकदम विचार आला, या सिनेमाविषयी आपण विचार करतोय तोही एका पुरुषाच्या अँगलनं... मुळात तिचं तिला ठरवू देत काय ते... हे चूक हे बरोबर हे सांगणारे आपण कोण?
या भावनांचं दमन होतंय, त्या भावनांचा उद्रेक होतोय, तमक्या भावनांना वाट मिळाली पाहिजे... हे सांगणारा मी कोण?
हा विचार मनात आला आणि मी 'ऑफ'च झालो...
----
दर्जा - साडेतीन स्टार
---