14 Oct 2024

दोन पुस्तकांविषयी...

रूह आणि खुलभर दुधाची कहाणी
-----------------------------------------


अलीकडं सोशल मीडिया, स्मार्टफोन या गोष्टींमुळं पुस्तकवाचन कमी झालं आहे. ही काही फार अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट नाहीय खरं; पण ही वस्तुस्थिती आहे हे मान्य करायला पाहिजे. असं असलं तरी पुस्तकं खरेदी केली जातातच. उशाशी ठेवलेला आवडत्या पुस्तकांचा ढीग कधीही कमी होत नाही. त्यातलं एखादं पुस्तक कधीही उचलून वाचावं, अशा हेतूनंच तो ढीग तिथं ठेवलेला असतो. कधी वाचली जातात, कधी नाही! मात्र, नुकतीच दोन अतिशय चांगली मराठी पुस्तकं वाचून संपविली. एरवी एखादं दोनशे पानांचं पुस्तक संपवायला मला कधी महिनाही लागू शकतो. ही दोन पुस्तकं मात्र अगदी रोज सलग वाचून आठवडाभरात संपविली. एक दोनशे पानांचं होतं, तर एक चारशे. या दोन्ही पुस्तकांविषयी आपल्यासारख्या रसिक वाचकांना सांगितलंच पाहिजे, म्हणून हा लेखप्रपंच....

(विशेष नोंद - हे या पुस्तकांंच परीक्षण नाही. फार तर आस्वादन आहे, असं म्हणू या.)

---

 १.  रूह
----------

पहिलं पुस्तकं वाचलं ते मानव कौलचं ‘रूह’. हा रोहन प्रकाशननं केलेला मराठी अनुवाद आहे. माझी मैत्रीण नीता कुलकर्णी हिनं हा अनुवाद केला आहे. हे पुस्तक म्हणजे एका अस्वस्थ कलाकारानं स्वत:ची मुळं शोधण्याचा केलेला मनस्वी प्रवास आहे.
मानव कौल मला आधी माहिती झाला तो एक अभिनेता म्हणून. ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात विद्या बालनचा ‘लो प्रोफाइल’ नायक म्हणून तो लक्षात राहिला. अगदी ‘सातच्या आत घरात’मधला मानवही आठवला. मानव अभिनेता म्हणून प्रसिद्ध असला, तरी अलीकडं लेखक म्हणूनही त्यानं त्याची ओळख प्रस्थापित केली आहे. हिंदीतील साहित्यविश्वात त्याची पुस्तकं लोकप्रिय आहेत. आपल्याकडेही त्याच्या लेखनाचे अनेक चाहते आहेत. मी स्वत: त्याचं हे पहिलंच पुस्तक वाचलं. तेही अनुवादित स्वरूपात. मात्र, आता या लेखकाची इतर पुस्तकं (मूळ भाषेतून) वाचायला हवीत, असं वाटू लागलं आहे.
‘रूह’, म्हणजेच आत्मा, ही मानवच्या स्वत:च्या मुळांचा शोध आहेच; पण त्यासोबतच तो त्याचा स्वत:चाही आत्मशोध आहे. ही कौल मंडळी म्हणजे काश्मिरी पंडित. गेल्या चार दशकांत काश्मीरमध्ये काय सुरू आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. सन १९९० मध्ये काश्मीरमधून सर्व पंडितांना भयानकरीत्या हाकलून देण्यात आले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांच्या मालमत्ता हडप करण्यात आल्या, त्यांच्या बायका-मुलींवर बलात्कार करण्यात आले, अनेकांचे खून पाडण्यात आले. चार दशकं झाली तरी अजूनही काश्मिरी पंडितांना न्याय मिळालेला नाही. मानवचं घर बारामुल्लाजवळ ख्वाजाबाग या गावी आहे. तिथल्या त्या घराच्या त्याच्या आठवणी त्याच्या लहानपणच्या आहेत आणि धूसर आहेत. त्याला आठवतो तो फक्त त्या घराचा निळा दरवाजा आणि आजूबाजूची वस्ती. हा घराच्या ओढीनं तो काश्मीरमध्ये जातो आणि तिथं त्याला काय अनुभव येतो, त्याची ही कहाणी आहे.
या कहाणीत लेखकाची नायिका आहे ‘रूहानी’ (किंवा ‘रूह’) या नावाची. ही अमेरिकेतील तरुणी, पण तिचा काश्मीरवर मोठा अभ्यास आहे. ती लेखकाची मैत्रीण/प्रेयसी आहे आणि त्याला त्याच्या घराचा शोध घेण्यास प्रवृत्त करते आहे. ही कादंबरी दोन स्तरांवर आपल्याशी संवाद साधते. एक आहे तो मानवचा काश्मीरमधल्या त्याच्या मुळांचा शोध घेणारा प्रवास आणि दुसरा आहे तो काश्मीरमधील नागरिक, तिथले स्थानिक लोक यांच्याशी त्याचा होत असलेला संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं काश्मीरचं वेगळं रूप. यापैकी त्याचा पहिला प्रवास हा बऱ्यापैकी गूढ, आत्मरत आणि स्वसंवादी असा आहे. यातली ‘रूह’ हेदेखील एक प्रतीकच म्हणून तो वापरतो आहे की काय, असंही मला काही वेळा वाटून गेलं. म्हणजे ‘रूह’ ही त्याची प्रेयसी नसून, त्याचंच एक अंतर्मन किंवा आत्मा आहे आणि त्या अद्वैताशी त्याचा संवाद होतो आहे, असंही वाटलं. विशेषत: ‘रूहानी’ आणि ‘रूह’ असे दोन वेगळे उल्लेख येतात, तेव्हा असं वाटतं. एक ‘रूहानी’ लेखकाला खरोखर भेटली असावी आणि ‘रूह’ म्हणून जो उल्लेख येतो, तो कदाचित त्याचा अंतर्मनाशी असलेला संवाद असावा. माहिती नाही. लेखकाच्या मनात तसं असेल किंवा नसेलही. तसंही एका कथनाचे अनेक अर्थ, अनेक आविष्कार होणं हे एका चांगल्या कलाकृतीचंच लक्षण मानतात. त्या अर्थानेही ‘रूह’ ही शब्दश: आपल्या आत्म्याला भिडते. 
दुसरीकडं लेखक आणि त्याच्या वडिलांचं एक विलक्षण नातं यात आपल्याला पदोपदी जाणवत राहतं. काश्मीर सोडताना वडिलांना झालेल्या वेदना ते शेवटपर्यंत विसरू शकत नाहीत. मुळापासून उखडलेलं झाड दुसरीकडं रुजू शकत नाही, तशी त्यांची अवस्था होते. लेखकाच्या संवेदनशील मनाला वडिलांची ही तगमग दिसत राहते. तो वडिलांसाठी पुन्हा काश्मीरमधलं आपलं संचित शोधायला जातो. या प्रवासात लेखकाचं मन सतत त्याचं बालपण, तेव्हाचे मित्र, तेव्हाची कॉलनी आणि तो सगळा परिसर यांचा शोध घेत राहतं. श्रीनगरमध्ये, वेगवेगळ्या शहरांत प्रवास करताना भेटणारे तिथले जुने मित्र, काही आप्त किंवा काही स्थानिक माणसं यांचं मनोगत त्याला ऐकायला मिळतं. त्यातून काश्मीरची भळभळती व्यथा-वेदना दिसत राहते. एक मात्र आहे. या सर्व परिस्थितीला लेखक कुठेही कोणालाही जबाबदार धरत नाही. कोणावरही हेत्वारोप करत नाही. आहे ते स्वीकारण्याची एक समंजस जाणीव दिसते.
अशा जवळपास काव्यात्म अनुभव असलेल्या लेखनाचा अनुवाद करणं ही कठीण गोष्ट. त्यात लेखक कधी भूतकाळ, कधी वर्तमानकाळ तर कधी भविष्यकाळ असा तिन्ही काळांत लीलया संचार करतो. मात्र, नीता अतिशय संवेदनशीलतेनं आणि सफाईनं या जाणिवेचा भावानुवाद करते. त्या लेखनातील सगळी व्याकुळता, सगळी वेदना, सगळा ‘दर्द’ तिनं अगदी व्यवस्थित मराठी रूपांतरात आणला आहे. ‘रोहन’ची निर्मिती नेहमीच देखणी असते. ‘आंतरभारती’ या विभागात ते भारतातील इतर भाषांतील पुस्तकं मराठीत आणत असतात. या मालिकेतील हे महत्त्वाचं पुस्तक आहे. ते वाचणं म्हणजे एक समृद्ध करणारा, पण त्याच वेळी मनात एक अनाम टोचणी लावणारा, तरी हवाहवासा वाटणारा अनुभव आहे.

---

२. खुलभर दुधाची कहाणी
--------------------------------

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. 
सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं.
एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर  सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे.
सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच  निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.
त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे.


------

30 Sept 2024

प्रतापराव पवार - गौरवांक लेख

कुटुंबप्रमुख
--------------

मी सकाळ संस्थेत रुजू झालो १९९७ मध्ये. प्रतापराव पवार सरांना ‘सकाळ’मध्ये बहुसंख्य लोक ‘पीजीपी सर’ किंवा नुसतं ‘पीजीपी’ या नावानं ओळखतात, हे मला तिथं गेल्यावरच कळलं. ‘सकाळ’मध्ये दर मंगळवारी सकाळी ११ वाजता संपादकीय विभागाची साप्ताहिक बैठक व्हायची. या मीटिंगला पीजीपी सर यायचे. मात्र, आम्हा नवोदितांना त्या मीटिंगला प्रवेश नसायचा. त्यामुळं पीजीपी सरांची थेट भेट व्हायचा काही प्रश्नच आला नाही. तो आला एक जानेवारीला. एक जानेवारी हा ‘सकाळ’चा वर्धापनदिन. तेव्हा या दिवशी ‘सकाळ’ला सुट्टी असायची. ‘सकाळ’च्या प्रांगणात मोठा मांडव घालून तिथं संध्याकाळी स्नेहीजनांचा, वाचकांचा मोठा मेळावा भरायचा. हा मेळावा संध्याकाळी असायचा. मात्र, सकाळी ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना जेवण असायचं. अगदी लग्नात असतात तशा रीतसर पंगती बसायच्या. पीजीपी सर एरवी कायम कोट-टाय अशा फॉर्मल वेशात असायचे. मात्र, या दिवशी ते झब्बा घालून यायचे. ते आणि त्यांच्या पत्नी भारतीताई असे दोघे मिळून पंगतीत बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिलेबीचा आग्रह करायचे. ‘कुटुंबप्रमुख’ हे त्यांचं रूप अशा वेळी फार ठळकपणे जाणवायचं.
पीजीजी सर तिसऱ्या मजल्यावर बसायचे. ‘सकाळ’मध्ये एक ऐतिहासिक, जुनी अशी लिफ्ट होती. अनेक कर्मचारी पहिल्या मजल्यावर जायलाही ही लिफ्ट वापरायचे. स्वत: प्रतापराव मात्र कधीही ही लिफ्ट वापरायचे नाहीत. कायम जिना चढून वर चालत जायचे. अशा वेळी जिन्यात अचानक ते कधी समोर आले तर आम्ही आपले जिन्यातील भिंतीला टेकून, अंग चोरून उभं राहायचो. नजरानजर झाली तर हसायचो. तेही हलके हसून पुढं जात. आम्हा ज्युनिअर कर्मचाऱ्यांना त्यांनी व्यक्तिश: ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. पुढं मंगळवारच्या मीटिंगला बसायची परवानगी मिळाली, तशी पीजीपी सरांची थेट भेट होण्याची संधी वाढली. त्या मीटिंगमध्येही ते बरोबर अकराला एक मिनिट कमी असताना हजर व्हायचे. त्यांच्या त्या काटेकोर वेळ पाळण्याची सर्व कर्मचाऱ्यांना दहशतच होती. त्यामुळं अनेक जण साडेदहा वाजताच ऑफिसमध्ये येऊन बसत. स्वत: पीजीपी त्या मीटिंगमध्ये फारसं बोलत नसत. इतकंच काय, मुख्य खुर्चीतही ते बसत नसत. तो मान संपादकांचा. शिवाय मीटिंगच्या अगदी शेवटी बोलण्याचा मानही संपादकांचा. हा संकेत पीजीपींनी कधीही मोडलेला मी पाहिला नाही. संपादकांच्या आधी ते क्वचित कधी तरी बोलायचे. त्यांचं बोलणं अतिशय मृदू आहे. आवाज अतिशय हळू. अगदी हळूवारपणे ते काही गोष्टी सांगत. त्यात गेल्या आठवड्यात तुमचं काय चुकलं वगैरे असा जाब विचारण्याचा आविर्भाव तर कधीही नसे. (ते काम संपादकांचं…) पीजीपी त्यांच्या उद्योग-व्यवसायानिमित्त जगभर फिरत. मग संपादकीय मीटिंगमध्ये ते आपले असे काही खास अनुभव शेअर करत. परदेशांत काय सुरू आहे, जग कुठं चाललं आहे, आपण नवं काय शिकलं पाहिजे असे आणि असेच त्यांच्या बोलण्याचे विषय असायचे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान ‘सकाळ’मध्ये असलं पाहिजे, याबाबत ते अतिशय आग्रही होते. ’सकाळ’मधील कर्मचाऱ्यांनी जग हिंडलं पाहिजे, नवनव्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी कित्येक संपादकीय कर्मचाऱ्यांना परदेशांत पाठवलं आहे. किंबहुना, त्यांच्यामुळे माझ्यासकट अनेकांचा पहिला परदेश दौरा झाला आहे. काही काही कर्मचाऱ्यांना तर ते वैयक्तिक त्यांच्या खिशातून डॉलर किंवा संबंधित देशाचं चलन खर्च करण्यासाठी देत असत. ‘कुटुंबप्रमुख’ हे त्यांचं रूप अशा वेळी लखलखीतपणे उठून दिसायचं.
संपादकीय कामकाजात त्यांचा हस्तक्षेप अजिबात नसे. पूर्वी अनेकांचा असा समज होता किंवा आहे, की पवार कुटुंबाची मालकी असल्यामुळं अगदी रोजची हेडलाइन पण काय असावी, हे खुद्द शरद पवार फोन करून इथं सांगतात. मी ‘सकाळ’मथ्ये १३ वर्षं होतो. या संपूर्ण कार्यकाळात शरद पवार केवळ एकदा आमच्या ऑफिसमध्ये आले. शरद पवार तर सोडाच, पण पीजीपी सरांचाही आमच्या डेस्कवर क्वचित फोन यायचा. जे काही त्यांना सांगायचं असेल ते थेट संपादकांना ते सांगत असतील. मात्र, क्वचित कधी तरी आजची हेडलाइन विचारायला किंवा अन्य कुठली माहिती कन्फर्म करायला त्यांचा फोन आला, की आमची पळापळ होत असे. टेलिफोन ऑपरेटर आधीच सांगत असे, की पीजीपी सरांचा फोन आहे. त्यामुळं डेस्कवरचा सर्वांत सीनियर सहकारीच त्यांच्याशी बोले. माझ्या आठवणीत मी एकदाच त्यांचा फोन घेतला होता. मात्र, ते एवढ्या हळू आवाजात बोलत, की ते काय बोलताहेत हे समजण्यासाठी अक्षरश: प्राण कानात आणावे लागत.
पीजीपींकडं आठवणींचा भरपूर खजिना होता. त्यांनी पुढं ‘सकाळ’मध्ये सदर लिहून त्या आठवणी शब्दबद्ध केल्या, हे अतिशय चांगलं झालं. त्यातल्या बऱ्याचशा आठवणी आम्ही मंगळवारच्या मीटिंगमध्ये आधीच ऐकलेल्या होत्या. मी ‘सकाळ’ सोडून आता १३ वर्षं होऊन गेली. मात्र, एक जानेवारीला मी आवर्जून तिथं स्नेहमेळाव्याला जातो. सगळे जुने सहकारी भेटतात. एक-दोन वर्षांपूर्वी मी पीजीपी सरांसोबत तिथं आवर्जून फोटो काढून घेतला. अगदी अलीकडं, म्हणजे जून महिन्यात राजीव साबडे सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी पीजीपी सरांना भेटण्याचा योग आला. मध्ये बराच काळ गेला होता. त्यांनी माझी ओळख ठेवण्याचा प्रश्नच येत नव्हता. मीच पुढं होऊन त्यांना सांगितलं. त्यावर ‘साहजिक आहे. मी तुमच्या विभागात फारसा येतच नसे,’ असं त्यांच्या नेहमीच्या हळुवार स्वरांत सांगितलं.
पीजीपी सरांसारखा संस्थाप्रमुख, कुटुंबप्रमुख नशिबानंच मिळतो. माझ्या नशिबात हा योग होता, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पीजीपी सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा. जीवेत् शरद: शतम्!

----

('आमचे पीजीपी' या 'सकाळ'च्या माजी कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या लेखांवर आधारित पुस्तकात हा लेख समाविष्ट आहे. हे पुस्तक १३ ऑक्टोबर २४ रोजी पुण्यात प्रकाशित झाले. पुस्तकाची संकल्पना - प्रभाकर भोसले, संपादन - नयना निर्गुण)

----

9 Sept 2024

मटा - आइन्स्टाइन लेख ८-९-२४

आइन्स्टाइन आणि आपण...
----------------------------------

आपल्या सभोवतीच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ही प्रख्यात शास्त्रज्ञ प्रा. अल्बर्ट आइन्स्टाइनच्या ‘सापेक्षतावादाच्या सिद्धान्ता’त सापडतात, असं कुणी सांगितलं तर आपण कदाचित चटकन विश्वास ठेवणार नाही. पण खरोखरच ते तसं आहे आणि हे सतत सिद्ध होताना दिसतं आहे. कसं ते पाहू या. आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तात अनेक बाबी अंतर्भूत आहेत. त्यात ‘काळ हा सापेक्ष असतो,’ अशी एक संकल्पना आहे. (शास्त्रीय भाषेत या संकल्पना अधिक नेमक्या, व्यापक आणि सुस्पष्ट असतात. इथं त्या केवळ एका विचाराच्या आधारासाठी घेतल्या आहेत. त्यामुळे ही त्याची व्याख्या नसून, ढोबळ मांडणी आहे.) काळ सापेक्ष असतो, हे तर खरंच. ‘निरीक्षक कोणत्या चौकटीतून काळाकडं पाहतो, त्यावर त्या काळाची गती असते किंवा त्याला जाणवते,’ असा त्याचा साधारण अर्थ. आपल्याला तर अगदी रोजच्या उदाहरणांवरूनही हे सहज जाणवेल. उदा. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीची वाट पाहत असू तर काळ खूप हळूहळू सरकतो आहे, असे वाटेल. याउलट आपण आपली आवडती मालिका बघत असू किंवा गाणं ऐकत असू तर ती गोष्ट पटकन संपली, असं आपल्याला वाटतं. इतकंच कशाला, सुट्टीचा दिवस भर्रकन निघून जातो आणि कामावर असताना वेळ निघता निघत नाही, असाही बहुसंख्यांचा अनुभव असेलच. काळ मोजण्याच्या काहीएक पद्धती आपण निश्चित केल्या असल्या, तरी ब्रह्मांडाच्या अनंत पोकळीतील प्रवासात या सगळ्या पद्धती बाद ठरतात. अनेक साय-फाय चित्रपटांत आपण हे पाहिलं आहे. तर ते असो. मुद्दा काळाच्या सापेक्षतेचा आहे आणि तो आपल्याला मान्यच आहे.
आपल्या आजूबाजूला असलेली माणसं, समाज, व्यक्तिसमूह ही काळाच्या वेगवेगळ्या मितींमध्ये वावरत असतात आणि आपल्यासमोर जे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, ते त्यामुळे झाले आहेत. या दोन मितींमधली माणसं किंवा समुदाय एकमेकांसमोर आले, तरी त्यांना एकमेकांना ओळखता येत नाही किंवा त्यांचं बोलणं एकमेकांना ऐकू जात नाही. मध्यंतरी ‘डार्क’ नावाची एक जर्मन वेबसीरीज ‘नेटफ्लिक्स’वर आली होती. त्यात काळाच्या गुंतागुंतीचा हा वेधक प्रवास दाखविण्यात आला होता. त्यात काही माणसं ३३ वर्षं पुढं किंवा मागं जात असतात. ही फँटसी असली, तरी आपल्या आजूबाजूलाही नीट पाहिलं तर काळाच्या एका वेगळ्या टप्प्यावर जगणारी माणसं आपल्याला सहज दिसतील. सोप्या भाषेत सांगायचं, तर आपल्यातील काही जण मध्ययुगीन काळात जगत आहेत, काही एकोणिसाव्या शतकात, काही जण विसाव्या शतकात, तर काही बाविसाव्या! आणखी एक साधं उदाहरण पाहू. आपण रस्त्याने चालत असताना सिग्नलला उभे असतो. शेजारी काही जण जोरात पुढे निघून जातात. आपल्याला त्यांचा राग येतो. मात्र, ही माणसं अजून मध्ययुगातच जगत असल्यानं त्यांना सिग्नल ही संकल्पनाच माहिती नसते. मग ते कसे थांबणार त्या विचित्र दिसणाऱ्या तीन रंगीत दिव्यांना पाहून? त्यामुळे यापुढे आपण त्यांच्यावर न रागावता, ‘वेगळ्या काल-मितीत जगणारी माणसं पाहिली,’ याचा आनंद मानला पाहिजे. आपल्या पुणे शहरात सध्या कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. हीसुद्धा पंधराव्या शतकात जगणारी माणसं आहेत, हे आपल्या लक्षात येईल. शिवकाळाआधी आपल्या प्रदेशात पेंढाऱ्यांनी धुमाकूळ घातला होता. आपल्या शहरात सपासप माणसं कापणारी, त्यांचं मुंडकं उडवणारी, शेतातलं पीक कापावं तशी माणसं उडवत जाणारी ही  टोळी त्याच काळातील आहे. ‘डार्क’ मालिकेत वेगळ्या काळात जगणारी माणसं एकमेकांसमोर येतात खरी; मात्र ती एकमेकांना पाहू शकत नाहीत. त्यांच्या मधोमध काळ  नावाची काचेची जाडजूड भिंत असते. त्याचप्रमाणे तुम्ही या टोळीला काही सांगायला गेलात, तर त्यांना तुमचं बोलणं ऐकूच येणार नाही; कारण तुम्ही एकविसाव्या शतकात आहात आणि ते पंधराव्या...
याउलट काही माणसं बाविसाव्या शतकात राहतात. पुण्यात पोर्श कार चालविणारे अद्भुत बालक हे बाविसाव्या शतकातच वावरत होते. तेव्हा हवेतून विमानासारख्या उडणाऱ्या कार येणार आहेत, हे आपल्याला साय-फाय चित्रपट पाहून आता माहितीच झालं आहे. हे बालक त्याच काळात कार चालवीत होते. दुर्दैवाने शंभर वर्षं मागे असणारे दोघे त्याच्या त्या ‘उडत्या’ कारसमोर आले, त्याला ते काळाच्या पुढचे बालक तरी काय करणार? पुण्या-मुंबईतील (किंबहुना देशातील कुठल्याही महानगरातील) काही विशिष्ट बार, पब आदी ठिकाणी गेल्यास एकाच वेळी बाविसाव्या शतकातील आणि पाषाणयुगातील माणसांचे दर्शन होते. पाषाणयुगात माणसे जेमतेम लाज झाकायला वस्त्रं किंवा झाडांची पानं गुंडाळायला शिकली होती. इथंही तितपतच वस्त्रं अंगी असलेले मनुष्यविशेष आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी येताना ही मंडळी बाविसाव्या शतकातील उपरोल्लेखित ‘उडत्या कार’ने आलेली असतात, हे सांगायला नकोच. थोडक्यात, दोन विभिन्न युगांचे एकाच वेळी दर्शन घेण्याचा, मदहोश करणारा योग त्या विलक्षण जागी साधता येतो.

आणखी एक मुद्दा. काळ हा नेहमी पुरोगामी, पुढे जाणारा (प्रगतिशील अशा अर्थाने) असतो, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, तोही खरा नाही. इथे ख्रिस्तोफर नोलनच्या ‘TENET’ या चित्रपटाची आठवण येणं स्वाभाविक आहे. यात काळ पुढेही जात असतो आणि मागेही जात असतो. हीदेखील फँटसीच आहे. (चित्रपटाच्या नावापासून ही सुरुवात आहे. हे नाव रोमन लिपीत उलटसुलट कसेही वाचले तरी सारखेच वाचले जाते.) मात्र, आपल्या आजूबाजूला पाहिलं तर काळ हा कायम प्रगतिशील नसून, तो अधोगतीशील किंवा मागे जाणाराही असतो, हे आपल्याला सहज पटेल. उदा. आज पन्नास किंवा साठ या वयोगटातील किंवा त्याहून अधिक वयाची आणि दीर्घकाळ पुण्यात राहणारी माणसं काय बोलतात, हे ऐकू या. ‘आमच्या वेळी पुणं असं नव्हतं,’ हा अगदी सामायिक असा उद्गार! (यात ‘आमच्या वेळी पुणं अधिक चांगलं होतं,’ हेच अध्याहृत असतं.) आपल्या आजूबाजूची अनेक मध्यम आकाराची शहरं, तालुक्याची गावं किंवा त्याहून अधिक लहान अशी खेडी यांचं आपण गेली ३०-४० वर्षं तरी निरीक्षण करत आलो आहोत. आपली काय भावना आहे या शहरांबद्दल, गावांबद्दल? ती पूर्वी आजपेक्षा चांगली होती, हीच ती सर्वसाधारण भावना आहे, यात दुमत नसावं. सत्तर ते नव्वदच्या दशकात प्रगतिशील होत गेलेली अनेक गावं, जिल्ह्यांची मुख्यालयं असलेली टुमदार शहरं पुढंपुढं मुडदूस व्हावा, तशी कुपोषित होत गेली, आक्रसत गेली हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तिथं बागा होत्या, स्वच्छ बसस्थानकं होती, चिमुकली का होईना, नाट्यगृहं होती. आता सगळं कसं भकास झालेलं दिसतं! खेडी तर बघवत नाहीत. मग काळ हा सदैव ‘प्रोग्रेसिव्ह कसा? तो ‘रिग्रेसिव्ह’ही असतो. थोडक्यात, सापेक्ष असतो. आइन्स्टाइनच्या मूलभूत मांडणीवर पुन्हा शिक्कामोर्तब...

थोडक्यात, आता यापुढं आपण कळकळीनं, तळमळीनं काही तरी सांगतोय आणि एखाद्या व्यक्तीला, समाजाला किंवा समुदायाला ते ऐकूच जात नाहीय असं वाटलं तर लक्षात घ्या - ती काळाची जाडजूड काचेची भिंत मध्ये उभी आहे! काळाची मितीच वेगळी असल्यानं आपण कितीही ओरडून सांगितलं, तरी ते ऐकू जाणार नाहीय. मग यावर उपाय काय? शिक्षणाचा, नागरी सुविधांचा, हक्कांचा आणि नागरिकशास्त्रातील काही मूलभूत कर्तव्यांचा प्रसार होणं हाच यावरचा उपाय. पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीब व श्रीमंतांची मुलं एकाच गणवेशात, एकाच वर्गात शेजारी शेजारी बसायची. आपल्या घटनाकारांनी, राज्यकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी फार समजुतीनं दोघांचा काळ असा एकत्र आणला होता. पुढं सगळं विस्कटत गेलं आणि आपण वेगवेगळ्या काळाच्या मितींत फेकले गेलो. गणपती ही बुद्धीची देवता; ती सध्या आपल्या घरी वास्तव्याला आली आहे. काळाच्या या मिती तोडून पुन्हा सगळे एकाच काळात येऊ देत, हीच त्या विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना!


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - ८ सप्टेंबर २०२४)

(इमेजेस - मेटा एआयवरून)

--- 

30 Aug 2024

माळशेज ट्रिप २९-८-२०२४

निसर्गाच्या कुशीत...
-------------------------


वयाच्या, करिअरच्या एका टप्प्यावर कामाचा एक दिवसही मोकळा काढणं अशक्य व्हावं, अशी स्थिती अनेकदा येत असते. यात आपली चूक नसते. आपण कामाला आणि कामानं आपल्याला जुंपून घेतलेलं असतं. अशा वेळी हक्कानं आवाज दिला, की गोळा होतील आणि भटकायला बाहेर पडतील, असे मित्र लाभणं ही काय श्रीमंती असते, हे ती ज्यांना लाभली आहे त्यांना बरोबर समजेल. मंदार, अभिजित आणि योगेश हे माझे तीन मित्र असे आहेत. त्यातल्या त्यात मंदार व अभिजित यांच्याबरोबर अधिक भटकणं, फिरणं, भेटणं होतं, ही गोष्ट खरी आहे. मात्र, सीए असलेला आणि ‘बजाज फिनसर्व्ह’मध्ये मोठ्या पदावर असलेला आमचा चौथा मित्र योगेश जोशी जेव्हा वेळ काढून भेटतो, तेव्हा आम्हाला खरोखर फार मजा येते. आमचा चौघांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. दिवसेंदिवस त्यावर काही बोलणंही होत नाही. मात्र, मैत्री अशा पातळीवर आहे, की या सगळ्यांची गरजही पडत नाही. मागे एकदा चौघं गप्पा मारत बसलो असताना, माळशेज घाटात एखाद्या पावसाळ्यात फिरायला जाऊ या, असा विषय झाला. नेहमीप्रमाणे तो एक-दोन वर्षं बाजूला पडला. यंदा मी नेहमीप्रमाणे परत आठवण केली, तर चक्क चौघांचं एकमत होऊन २२ ऑगस्टला जाऊ या, असं ठरलंही. मात्र, नेमका दोन दिवस आधी योगेश आजारी पडला. मग तेव्हा ते जाणं स्थगित झालं आणि त्याच वेळी पुढच्या गुरुवारी, म्हणजे २९ ऑगस्टला नक्की जाऊ असं ठरलं. 
अखेर सगळं जुळून आलं, रजा वगैरे सगळ्यांना मिळाल्या आणि आम्ही सकाळी निघालो. योगेशकडं ‘टाटा हेक्सा’ ही दणकट गाडी आहे. तेव्हा तीच गाडी घ्यायची हे ठरलं होतं. गंमत म्हणजे आमच्या चौघांपैकी कुणीही यापूर्वी माळशेजला एकदाही गेलं नव्हतं. आम्हाला याचं फार आश्चर्य वाटलं आणि हे कसं काय राहून गेलं, असं आम्ही बोलूनही दाखवलं. कदाचित, हे ठिकाण आधी पाहिलं नसल्यानं आम्हाला ‘ट्रिगर’ मिळाला असावा, हेही खरं. तर, आम्ही ठरल्याप्रमाणे आठ वाजता निघायचं असं म्हणून साडेआठला निघालो. दहा वाजता आम्ही चाकण पार केलं, तेव्हा आमचे ग्रह आज उच्चीचे आहेत आणि ही ट्रिप मस्त पार पडणार, असं फीलिंग आलं. योगेशनं सकाळी काही खाल्लं नव्हतं म्हणून मग भामा नदी पार केल्यावर दोन्ही बाजूंना जी हॉटेलांची रांग आहे, त्यापैकी एका ठिकाणी थांबलो. मिसळ, पोहे, चहा असं सगळं यथासांग झाल्यावर योगेशनं गाडी भरधाव सोडली. पाऊस नव्हता, पण ढगाळ हवा होती. वातावरण उत्तम होतं. पुणे-नाशिक हायवे आता चांगला झाला आहे. बहुतेक गावांना बायपास आहे. त्यामुळं फारच लवकर आळेफाट्याला पोचलो. तिथंही आता बायपास झाला आहे. मग त्या बायपासनं वळून आम्ही नगर-कल्याण महामार्गाला लागलो. इथून पुढं आता दुपदरी रस्ता होता. हा रस्ता कसे असेल अशी आम्हाला धास्ती वाटत होती. मात्र, सुदैवानं रस्ता बरा होता. या रस्त्याला लागल्याबरोबर हवा आणि परिसर दोन्ही एकदम बदलल्याचं जाणवलं. सगळा आसमंत हिरवागार होता. समोर डोंगररांगा दिसू लागल्या होत्या. सह्याद्री दोन्ही हात फैलावून साद घालत होता. रस्त्यावर किती तरी ठिकाणी आता इथंच थांबावं, असं वाटून गेलं. मात्र, आम्हाला गाठायचा होता माळशेज घाट! 
थोड्याच वेळात ओतूर आलं. मी खूप पूर्वी या गावात आलो होतो. माझा आतेभाऊ तेव्हा इथं शिकायला होता. आता हे गाव पुष्कळ बदललेलं दिसलं. वाढलं होतं. ओतूर म्हटलं, की आमच्या ‘बाबा’ची (अनिल अवचट) आठवण होणं स्वाभाविकच. हे त्याचं गाव. शिवाय ‘साप्ताहिक सकाळ’चे दिवंगत संपादक सदा डुम्बरे यांचंही हे गाव. या दोघांचंही स्मरण त्या गावातून जात असताना होणं अगदी स्वाभाविक होतं. पुढं गेल्यावर एके ठिकाणी छोट्या खिंडीसारखा भाग ओलांडून आलो आणि समोरचं दृश्य बघून अक्षरश: स्तिमित झालो. उजव्या बाजूला पिंपळगाव जोगे धरणाचा विस्तीर्ण जलाशय पसरलेला दिसला आणि त्यामागे हिरवीगार, उंच डोंगररांग.... खरं तर तिन्ही बाजूंनी डोंगर आणि मधे बशीसारखं पसरलेलं ते धरणातलं पाणी... अहाहा! स्वित्झर्लंडपेक्षा काय कमी सुंदर होतं हे दृश्य, असं किती वेळा मनात येऊन गेलं. त्या भागात हळूहळू रिसॉर्टसारखी बांधकामंही होताना दिसली आणि मन संभ्रमात पडलं. पर्यटनामुळं विकास होणार, हे खरं; पण त्यामुळं इथला निसर्ग आत्ता आहे तसा राहील का, असंही वाटून गेलं. अर्थात फार वेिचार करायला वेळ नव्हता. एखाद्या ‘बायोस्कोप’मध्ये एकापाठोपाठ एक दृश्यांची माळ दिसत राहते, तशी ‘एक से एक’ अप्रतिम दृश्यं निसर्ग आमच्यासमोर पेश करत होता. सह्याद्रीचं हे वैशिष्ट्य आहे. कितीही वेळा तुम्ही एखादा भाग, डोंगर, किल्ला किंवा पायवाट अनुभवा; तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही. आम्हा चौघांपैकी अभ्या हा जास्त भटका जीव. मी कॉलेज काळात किंवा नंतरही अगदी बॅचलर असेपर्यंत बऱ्यापैकी भटकलेलो. नंतर मात्र, ‘लेजर ट्रिप’ जास्त झाल्या. आमची आजची ट्रिपही तशीच होती. वेळेचं बंधन नव्हतं, अमुक ठिकाण गाठायचंय, अशी घाई नव्हती, की तमुक टिकमार्क गोष्ट केलीच पाहिजे, अशी सक्ती नव्हती. उलट मजेत, गप्पा मारत, आमची आवडती ‘नाइन्टीज’ची गाणी ऐकत मस्त प्रवास सुरू होता. थोड्याच वेळात पुण्याची हद्द संपली (आणि चांगला काँक्रिटचा रस्ताही संपला) आणि ठाणे जिल्ह्याची हद्द सुरू झाली. संपूर्ण माळशेज घाट ठाण्याच्या हद्दीत येतो. मी इकडं पूर्वी कधीही आलो नसल्यानं सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीनच होत्या. मेंदू आपोआप एकेक नोंदी करत चालला होता. पुढं घाट सुरू होताना उजव्या बाजूला एमटीडीसीचं रिसॉर्ट लागलं. मात्र, मी डाव्या बाजूला बसल्यानं माझ्या ते पटकन लक्षात आलं नाही. एक वळण घेऊन आम्ही पुढं गेलो, तर मोठा धबधबा दिसला. झालं. लगेच आम्ही गाडी थांबवली. तिथं बरीच दुकानं होती. मात्र, आज आठवड्याचा मधलाच दिवस असल्यानं पर्यटक फार नव्हते. (आम्हाला तेच अपेक्षित होतं.) थबधब्यापाशी गेलो. तिथं वर जाण्यासाठी पक्क्या पायऱ्या व रेलिंग केलं होतं. धबधब्याखालून जाताना भिजलोच. मला आणि मंदारला भिजायचं नव्हतं; पण योगेश आणि अभ्यानं मनसोक्त भिजून घेतलं. आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढायचं काम केलं. इथं फारच झकास वातावरण होतं. समोर घाट आणि त्याखाली पसरलेली दरी दिसत होती. इथं बराच वेळ रेंगाळल्यावर मग खाली उतरलो. तिथल्या एका दुकानदाराला विचारलं, तर त्यानं पुढं आणखी दहा किलोमीटर घाट आहे, असं सांगितलं. एमटीडीसीचं रिसॉर्ट मागेच गेल्याचंही तो म्हणाला. (आम्हाला शक्यतो तिथं जेवायला जायचं होतं.) मग आम्ही घाटातून पुढं निघालो. एका वळणानंतर अचानक तो ‘आयकॉनिक’ बोगदा दिसला. तो ओलांडल्यावर मग व्ही आकाराचं ते लांबलचक वळण दिसलं. ‘माळशेज घाट’ म्हटलं, की जे फोटो दिसतात, ते याच पट्ट्यातले. बोगदा ओलांडल्यावर समोरच्या डोंगरावरून अक्षरश: पंधरा ते सोळा धबधबे कोसळताना दिसले. फार पाऊस नसल्यानं धबधबे खूप मोठे नव्हते, पण वाहत होते, हेही नसे थोडके. मग आम्ही त्या ‘व्ही’च्या टोकाला टर्न मारून पुढं त्याच धबधधब्यांखाली आलो. इथंच तो ‘कार वॉश पॉइंट’  दिसला. अतिशय शार्प अशा कातळांतून रस्ता काढला होता आणि एका ठिकाणी तो धबधबा थेट रस्त्यावर पडत होता. आम्ही गेलो, तर काही पोरं-पोरी त्या पाण्याखाली, ऐन रस्त्यात बसकण मारून बसले होते आणि अर्थात ‘रील्स’ काढत होते. आम्ही मोठमोठ्यानं हॉर्न वाजवून त्यांच्या बाजूनं गाडी पुढं निघाली. पुढच्या वळणावर एक मोठा पॉइंट दिसला. मात्र, आम्ही तिथं थांबलो नाही. आम्हाला तो घाटरस्ता पूर्ण बघायचा होता. एका वळणानंतर समोर एक अतिप्रचंड कातळाची भिंत अगदी अंगावर आली. खरं तर ती तिथून खूप लांब होती. मात्र, तो अवाढव्य आकार छाती दडपवून टाकत होता. तिथल्या वळणानंतर उतार सुरू झाला. मग पुढं आणखी एक पॉइंट दिसला. (त्याचं नाव लाजवंती सनसेट पॉइंट हे नंतर कळलं.) तिथं आधीच एक तरुण-तरुणी येऊन फोटो काढत बसले होते. मग आम्हीही आमचं फोटोसेशन केलं. इथून दोन्ही बाजूंनी सह्याद्रीच्या विशाल रांगा दूरवर दिसत होत्या. एक अंगठ्यासारखा सुळकाही दिसला. (हाच तो प्रसिद्ध ‘नानाचा अंगठा’ असावा का? माहिती नाही...) इथं आजूबाजूला बरेच गड, सुळके, किल्ले असणार. मात्र, आम्हाला त्याची फारशी माहिती नव्हती. त्यामुळं काही कळलं नाही. अर्थात तो निसर्ग डोळ्यांनी पिऊन घेताना मात्र आम्हाला अजिबात कंटाळा येत नव्हता. ऑक्सिजन रिफिलिंगचं काम जोरात सुरू होतं.

आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. विशेषत: योगेशला खूपच भूक लागली होती. मग आम्ही परतीचा रस्ता धरला. येताना अभ्याच्या लक्षात आलं, की त्याचं जर्किन त्या धबधब्यापाशीच राहिलं आहे. मग ते घ्यायला घाईनं पोचायला हवं, म्हणून येताना त्या मोठ्या पॉइंटपाशी थांबलोच नाही. सुदैवानं धबधब्यापाशी अभिजितचं जर्किन आणि टोपी जशीच्या तशी मिळाली. मग एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये गेलो. तिथं त्यांचं फ्लेमिंगो रेस्टॉरंट आहे. मग तिथं मस्तपैकी जेवलो. जेवण चांगलं होतं. जेवल्यावर मग एमटीडीसीच्या रिसॉर्टवर फेरफटका मारला. डोंगराच्या बाजूनं मोठं माळरान आहे. ते डोंगराच्या बाजूनं कुंपण बांधून बंदिस्त केलंय. तिथं आम्ही जरा फिरलो. फोटो काढले. अभ्यानं रील्स केले. तिथला भन्नाट वारा अगदी झिंग आणणारा होता. निसर्गाचं भव्य रूप चहूबाजूंनी दिसत होतं. उत्तुंग, बेलाग डोंगरकडे आणि त्यावर झेपावणारा सावळ्या मेघांचा महासागर हे रूप पाहून आपल्या खुजेपणाची जाणीव होत होती. पावलं रेंगाळली. मनही तिथंच घुटमळलं... पण आता निघायला हवं होतं. वातावरण असं होतं, की किती वाजले कळत नव्हतं. मगापर्यंत बडबड करणारे आम्ही सगळेच तिथं एकदम शांत, शांत होऊन गेलो होतो. काही बोलू नये, आवाज करू नये... एकमेकांच्या सोबतीनं फक्त तिथं उभं राहावं आणि ती असीम शांतता काळजात भरून घ्यावी!
असा काही वेळ गेल्यावर एका श्वानानं भौतिक अस्तित्वाची जाणीव करून दिली. अगदी जड अंत:करणानं तिथून निघालो. आता जवळपास साडेतीन वाजून गेले होते. आता परतीचे वेध लागले होते. येताना थोडं पुढं आल्यावर जुन्नरकडं जाणारा वेगळा रस्ता दिसला. मग आळेफाट्यावरून न जाता या वेगळ्या रस्त्यानं जाऊ; म्हणजे तोही जरा नवा भाग बघण्यात येईल, असं मी सुचवलं. मग योगेशनं तिकडं गाडी वळवली. जुन्नर हा पर्यटन तालुका जाहीर झाल्यानं इकडं भरपूर निधी आला आहे. अर्थात निधी आला तरी कामं होतातच असं नाही. इथं मात्र अतिशय सुंदर रस्ता तयार केलेला दिसला. साधा दुपदरीच, पण अजिबात खड्डे नसलेला, नवा रस्ता! त्यावर प्रॉपर दुभाजक, दोन्ही बाजूंनी पांढरे पट्टे आखलेले... स्पीड ब्रेकर, फलक सगळं व्यवस्थित असं... या रस्त्यानं पुढं गेल्यावर एक छोटासा घाट लागला. तो तर फारच सुंदर होता. तिथून वर गेल्यावर एक खिंड लागली. तिला ‘गणेश खिंड’ असं नाव आहे, असं तिथल्या फलकावरून कळलं. पुढं जुन्नर अगदी दहा किलोमीटरच होतं. उजवीकडं शिवनेरी किल्ला दिसू लागला. मधली छोटी छोटी गावं चार वाजताच्या कोवळ्या उन्हानं लखलखून दिसत होती. समोर पांढऱ्या अभ्रांचे पुंजके असलेलं निळं-स्वच्छ आकाश आणि खाली हिरवाईचं कोंदण ल्यायलेली धरणी... आपण इंग्लंडच्या कंट्रीसाइडचं खूप कौतुक करतो; पण आम्ही आत्ता बघत असलेला हा भाग त्यापेक्षा कुठंही कमी नव्हता. जुन्नर गावात प्रवेश करताना उजवीकडं ‘नाणेघाट ४३ किमी’ अशी पाटी दिसली. (पुढच्या ट्रिपची खूणगाठ बांधून झाली...) समोर एक भव्य प्रवेशद्वार लागलं. त्याला शहाजीराजांचं नाव होतं. मागे शिवनेरी दुर्ग दिमाखात उभा होता. जुन्नर हे एक टुमदार गाव आहे. गावाच्या मधल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. तिथून डावीकडं वळून बसस्टँडवरून आम्ही गावाबाहेर पडलो. आता नारायणगावकडं निघालो. रस्त्यात ओझर, लेण्याद्री, खोडद खुणावत होते. मात्र, आता उशीर झाला होता. मग आम्ही नारायणगावला येऊन बायपासला चहाला थांबलो.
इथं साधारण पाच वाजले होते. आता पुण्याची वाट खुणावत होती. हा नाशिक-पुणे हायवे असल्यानं इथून पुढं चाकणपर्यंत भन्नाट प्रवास झाला. पुण्यात यायला मात्र साडेसात वाजले. मग पुण्यातच जेवून सहलीची सांगता करायला हवी होती. तशी ती यथासांग, साग्रसंगीत झाली. एका दिवसाची ही नीटनेटकी ट्रिप आता आम्हाला पुढं पुष्कळ दिवस प्राणवायू पुरवत राहील, यात शंका नाही. पुढची सहल कुठं काढू या, अशी चर्चा लगेच सुरू झालीय, हेच मोठं फलित! इति!!


--------

(काही महत्त्वाच्या नोंदी -
- पुणे ते माळशेज घाट अंतर - १३० किलोमीटर
- स्वत:चं वाहन घेऊन जाणे उत्तम
- शक्यतो आठवड्याच्या अधल्या-मधल्या दिवशी जावे. वीकएंडना प्रचंड गर्दी असते. विशेषत: मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या तरुणाईमुळे गेल्या काही वर्षांत माळशेज बदनाम झाले आहे. तरी ‘फॅमिलीवाल्या’ मंडळींनी वीकएंड टाळावाच.
- एमटीडीसीच्या रिसॉर्टवर जेवणाची चांगली सोय
- थोडा वेळ काढून गेल्यास किंवा मुक्काम केल्यास याच ट्रिपमध्ये शिवनेरी, ओझर, लेण्याद्री किंवा खोडद ही ठिकाणेही पाहता येतील.
- पुण्यातून लवकर निघून, सकाळी नऊच्या आत चाकणच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. चाकणच्या पुढे भामा नदी ओलांडली, की दोन्ही बाजूंना नाश्त्यासाठी बरीच हॉटेल आहेत.)

------

9 Aug 2024

तीन गाणी, तीन आठवणी...

१. सो गया ये जहाँ...
-----------------------

आत्ता खूप दिवसांनी ‘तेजाब’मधलं ‘सो गया ये जहाँ...’ गाणं ऐकलं आणि मन भूतकाळात गेलं. हा सिनेमा आला १९८८ मध्ये. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. पौगंडावस्थेतलं वय आणि आयुष्यात पहिल्यांदा झालेलं स्थलांतर. मी माझं गाव सोडून शहरात राहायला आलो होतो. तिथल्याच थिएटरच्या अंधारात हा सिनेमा बघितला होता. तेव्हा अर्थात माधुरीच्या ‘एक दो तीन...’चं गारूड होतं. ‘सो गया ये जहाँ...’ गाण्यातला दर्द समजायला चाळिशी यावी लागली. नंतरही मी खूप वेळा हा सिनेमा पाहिलाय असं नाही. मात्र, त्यातले काही काही प्रसंग अगदी लख्ख लक्षात आहेत. महेश देशमुखचा ‘मुन्ना’ कसा झाला, याचा हा विदारक प्रवास आहे. त्या प्रवासाला ऐंशीच्या दशकातील सामाजिक, राजकीय स्थितीची पार्श्वभूमी आहे. भले सिनेमात ती नकळत आली असेल... अर्थात आता इथं तो विषय नाही.
...तर हे गाणं... लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं सगीत, शब्बीर अहमद या फारशा माहिती नसलेल्या गीतकाराचं गीत आणि नितीन मुकेश, अलका याज्ञिक व शब्बीरकुमार यांचे प्रमुख स्वर. सोबतीला कोरस. या कोरसच्या हमिंगनं गाण्याची सुरुवात होते. मुंबईतला रिकामा रस्ता, नुकताच पडून गेलेला पाऊस, त्या पावसाचं रस्त्यावर साठलेलं पाणी आणि सोडियम व्हेपरच्या प्रकाशात चमकणारे ओलसर रस्ते... मुन्नाचे मित्र मुन्ना आणि मोहिनीला घेऊन परत निघाले आहेत. गाणं चित्रित झालंय चंकी पांडे, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरवर. मित्रांमध्ये विजय पाटकर वगैरे दिसतात. ते सगळे त्या स्टेशन वॅगनसारख्या गाडीच्या छतावर आडवे पडलेले आहेत. समोरची काच फुटलेली ती गाडी चंकी चालवतो आहे आणि गातो आहे - सो गया ये जहाँ, सो गया आसमाँ, सो गयी है सारी मंज़िले, हो सारी मंज़िले, सो गया है रस्ता...
नितीन मुकेशचा प्रमुख स्वर या गाण्यात एक विलक्षण आर्त भाव घेऊन येतो. हा स्वर एकाच वेळी वेदनेचा आहे, वेदनेवर फुंकर घालणाराही आहे, आपल्या बेफिकिरीवर खूश होणारा आहे आणि त्याच वेळी आपल्या अनिकेत अवस्थेची अपरिहार्यता सांगणाराही आहे. नितीन मुकेश यांनी गायलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांत निश्चितच या गाण्याचा समावेश व्हावा. सिनेमातील मुख्य पात्रांच्या जगण्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सगळं जग, नियती विरोधात आहे. केवळ मित्रांचा भरोसा आहे. त्यांच्याच साथीत ही वाटचाल सुरू आहे. नायक-नायिका एका विलक्षण वळणावर ताटातूट होऊन अगदी वेगळ्या रूपात पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. त्यांना एकमेकांच्या संगतीत घालवलेले प्रेमाचे दिवस आठवताहेत. दोघेही त्या गाडीत मागच्या बाजूला अवघडून बसले आहेत. नायिका जखमी झाली आहे, तर नायक सिगारेटी फुंकून आपला उद्वेग शमवतो आहे. दोघांच्याही भावना गाण्यातून पार्श्वभूमीवर व्यक्त होतात. ‘क्यूं प्यार का मौसम बीत गया, क्यू हम से जमाना जीत गया’...’ ही नायिकेची व्यथा आहे, तर ‘हर घडी मेरा दिल ग़म के घेरे में है, जि़ंदगी दूर तब अंधेरे में है...’ असं नायकाला वाटतंय. मध्येच नायिकेला डुलकी लागते आणि ती बसल्या जागी पडू लागते तर नायक चटकन तिच्या शेजारी सरकून तिला आधार देतो. तीही झोपेत अगदी निश्चिंतपणे त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपते. नंतर हे मित्र कॅम्प फायरवर नाचतात. तिथं नायिकेच्या चेहऱ्यावर जरा वेळ हसू उमलतं, पण तेवढंच...
पुन्हा या गाडीचा अंधाऱ्या रस्त्यांतून प्रवास सुरू होतो. आपल्याही आयुष्यात आपण असे क्षण अनुभवलेले असतात. सगळीकडे अंधार दिसत असतो. कित्येकदा अशाच मोकळ्या रस्त्यांवरून आपणही हिंडलेले असतो. मग पडद्यावरची पात्रं आणि आपण अगदी एकजीव होऊन जातो...
चंकी पांडे या कलाकाराविषयी फार काही चांगलं बोललेलं ऐकू येत नाही. पण या देखण्या अभिनेत्यानं या एका गाण्यात कमाल केली आहे. त्यासाठी त्याला बाकीचे सगळे माकडचाळे माफ आहेत. या गाण्याचा दर्द पुरेसा समजून घेऊन, चंकीनं हे गाणं पडद्यावर अक्षरश: ‘ड्राइव्ह’ केलं आहे. माधुरी तर या गाण्यात कमाल सुंदर दिसली आहे. अनिल कपूरच्या ‘अँग्री यंग’ मुन्नाच्या तर सगळेच प्रेमात होते. ‘तेजाब’ सुपरडुपर हिट होता. अनेकांनी केवळ माधुरीसाठी या सिनेमाची अक्षरश: पारायणं केली. मात्र, हे गाणं, त्यातलं ते पावसाळी ओलं वातावरण आणि मानवी भावभावनांच्या अनोख्या परी दाखवणारं गीत व संगीत मंत्रमुग्ध करतं. विशेषत: वयाची एक मॅच्युरिटी गाठल्यावर या गाण्याला दर्द अधिकाधिक काळीज चिरत जातो. बाबा आझमीच्या कॅमेऱ्याची आणि त्या कॅमेऱ्यामागच्या एन. चंद्राच्या दिग्दर्शकीय दृष्टीचीही ती कमाल आहे. तेजाब ११ नोव्हेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झाला. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याला ३६ वर्षं, म्हणजे तब्बल तीन तपं होतील. मात्र, आज चाळिशीत-पन्नाशीत असलेल्या सगळ्यांसाठी हे गाणं आजही तितकंच ताजं, टवटवीत आणि हृदयातली एक दुखरी कळ जागवणारं राहील यात शंका नाही.

(१५ जुलै २०२४)

----

हे गाणं बघण्यासाठी येथे क्लिक करा...

------


२. सूरमयी शाम इस तरह आये...
----------------------------------------

आज सुरेश वाडकरांचा वाढदिवस. मला त्यांचा आवाज आवडतो. काही काही गाण्यांत तर त्यांच्याऐवजी इतर आवाजाची कल्पनाच आपण करू शकत नाही, एवढी ती गाणी वाडकरांनी अजरामर करून ठेवली आहेत.  मराठीत ‘दयाघना’ तसंच हिंदीत ‘सूरमयी शाम इस तरह आये...’ ही त्यांची दोन्ही गाणी मला अतिशय आवडतात. दोन्ही गाणी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली आहेत. संगीतकारच मुळात अत्यंत आवडते असल्याने असेल, पण वाडकरांची दोन गाणी विशेष आवडतात. जयदेव यांचं ‘सीने में जलन...’ किंवा इलायराजा यांचं ‘ऐ ज़िंदगी गले लगा ले...’ किंवा रवी दातेंचं ‘आताच अमृताची बरसुन रात गेली...’ यांवरही वाडकरांचा निर्विवाद स्टॅम्प आहेच. पण आज सांगायचं आहे ते ‘सूरमयी शाम...’विषयी...
‘लेकिन’ या चित्रपटातलं हे गाणं. विनोद खन्ना आणि डिम्पलवर चित्रित झालेलं. हे गाणं मी ‘लेकिन’ चित्रपट रीलीज झाल्यापासून, म्हणजे साधारण १९९१ पासून (म्हणजे माझ्या वयाच्या १६ व्या वर्षापासून) ऐकत आलो आहे. मी हे गाणं कितीही वेळा ऐकू शकतो. सुरुवातीला वॉकमनवर ‘लेकिन’च्या कॅसेटची पारायणंच्या पारायणं झाली असल्यामुळं हे गाणं अगदी त्यातल्या प्रत्येक पॉझसकट, वाद्यमेळांसकट कानात इतकं बसलंय की ते प्रत्यक्ष ऐकलं नाही तरी सतत ऐकू येत राहतं. गुलज़ार यांचे खास शब्द, खास मंगेशकर टच असलेलं बाळासाहेबांचं संगीत आणि वाडकरांचा मखमली स्वर यांची अशी काही जादू आपल्यावर होते की बस्स! हिंदीत ज्याला ‘सुकून मिलना’ म्हणतात, तशी काहीशी तृप्तीची भावना हे गाणं ऐकल्यावर मनात येते.
मला कायम वाटतं, गावाकडची ग्रीष्मातली संध्याकाळ असावी.... उकाडा संपून, संध्याकाळची थंड हवेची झुळूक यायला सुरुवात झालेली असावी, आपण घरासमोरच्या सारवलेल्या स्वच्छ अंगणात आरामखुर्ची टाकून, जीव ओवाळून टाकावा असं काही तरी भन्नाट पुस्तक वाचत बसलेलं असावं आणि त्या आपल्या अशा कुणा खास व्यक्तीच्या येण्याची वाट बघताना हे गाणं कानावर यावं... वाट पाहण्यात एक ओढ आहे, वेगळा अनिवार आनंद आहे आणि त्याच वेळी एक हुरहुरही आहे. ‘कोई आहट नहीं बदन की कही फिर भी लगता है तू यहीं है कहीं...’ ही ओळ काय किंवा ‘दिन का जो भी पहर गुजरता है, कोई एहसान सा उतरता है’ ही खास गुलज़ार टच असलेली ओळ काय... प्रत्येक शब्द न् शब्द ऐकताना आपल्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहतात. हे असं वाट पाहणं सुसह्य होतं ते अशा सुरेल गाण्यानं... हे ‘एहसान’ काही आपण आयुष्यभर विसरू शकत नाही...

व्वा वाडकर... जियो... 

(७ ऑगस्ट २०२४)

----

हे गाणे बघण्यासाठी येथे क्लिक करा...

------

३. गंजल्या ओठास माझ्या...
---------------------------------

काही काही गाणी आपल्याला अत्यंत आवडतात, काही आपल्या भावविश्वाचा भाग होऊन जातात, तर काही आपल्या आयुष्यावरच विलक्षण परिणाम करून जातात. 'गंजल्या ओठास माझ्या, धार वज्राची मिळू दे' हे असंच माझ्या आयुष्यावर कायमचा परिणाम करून गेलेलं गाणं... जितक्या वेळा मी हे गाणं ऐकतो, तितक्यांदा माझे डोळे ओले झाले आहेत. वरकरणी दगडी कवचात जगणाऱ्या आपल्या मनातला पाषाण फोडून, आतला निर्झर वाहता करण्याची ताकद या गाण्यात आहे.
सुरेश भट, बाळासाहेब, रवींद्र साठे ऊर्फ बुवा, जब्बार आणि स्मिता हे सगळे अत्यंत दुष्ट लोक आहेत, असं माझं मत आहे. 'उंबरठा' या चित्रपटातल्या या गाण्याचं चित्रिकरण म्हटलं, तर अगदी साधं... स्मिता एका टांग्यातून तिच्या अनाथाश्रामाकडं निघाली आहे. हा सगळा देशावरचा उजाड, भकास भाग आहे. त्यातल्या धुळीच्या रस्त्यानं तो टांगा निघाला आहे. रस्ता निर्जन आहे... मधेच एक रेल्वे जाते. त्या रेल्वेलायनीच्या शेजारच्या धुळकट रस्त्यानं हा टांगा निघाला आहे. तिथं चरत असलेलं एक डुक्करही आपल्याला दिसतं. पुढंही साधारणत: अशाच भागातून हा टांगा मार्गक्रमणा करीत राहतो. कॅमेरा लाँग शॉटमध्ये एकदा हा सारा आसमंत दाखवतो, तर एकदा क्लोजमध्ये स्मिताचा करारी, निर्धारी चेहरा दाखवतो. ज्या गाण्याच्या चित्रिकरणात गाणं केवळ पार्श्वभूमीवर वाजतं, त्या ठिकाणी त्या शब्दांवर अभिनय करणं ही किती जिकिरीची गोष्ट आहे! पण स्मिताला सारं सहजसाध्य आहे. तिचा उत्कट चेहरा पाहत राहावा... त्या चित्रपटातल्या सुलभा महाजनचा सगळा संघर्ष आणि तिची जिद्द त्यात उतरली आहे...
यातला भूप्रदेश माझ्या जन्मगावाच्या भौगोलिक परिस्थितीशी मिळताजुळता आहे. म्हणून मला तो आपलासा वाटतो. आपणही इथूनच आलो आहोत आणि असाच संघर्ष करीत आलो आहोत, हे सारखं जाणवत राहतं....
भटांनी लिहिलं आहे -

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!
आंधळ्या आत्म्यास माझ्या सूर्य सत्याचा जळू दे!

पांगळा बंधिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे!

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे!

लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे!

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे!

बाळासाहेबांनी यातली पहिली चार कडवी गाण्यात घेतली आहेत. शेवटचं कडवं गाण्यात नाही. पण भटांचे हे शब्द, हृदयनाथांची चाल आणि बुवांचा आवाज हे त्रिकुट असं काही जमून आलं आहे की बस्स...
यातल्या शेवटच्या म्हणजे 'लाभू दे लाचार छाया... ' या कडव्याला माझ्या डोळ्यांत हमखास पाणी येतं. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय, पण काहीएक नीतिमत्ता मानणाऱ्या लोकांच्या आयुष्याचं हे राष्ट्रगीतच म्हणायला हवं. माझ्या आयुष्यात अगदी तरुणपणी माझ्या वाट्याला नैराश्य, संघर्ष आला होता. तो तसा कुणालाच चुकत नाही. मात्र, त्याही काळात माझं मन शांत राहिलं ते हे गाणं आणि त्यातल्या या ओळी ऐकून...
आजही हे गाणं ऐकताना माझाच तो कटू भूतकाळ सर्रकन डोळ्यांसमोरून जातो आणि त्या आठवणींनी मन आणि डोळे दोन्ही चिंब होतात...
थोर गाणी अशीच घडतात, तयार होतात... कारण ती आपल्या मनात कायमची वस्तीला येतात...

(६ जुलै २०१८)

---

हे गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

30 Jul 2024

कोथरूडवरील लेख

कोथरूड... पुण्याचं नाक!
--------------------------------

(नोंद - साधारण दहा वर्षांपूर्वी पुणे ‘मटा’त एक ‘कोथरूड प्लस’ नावाची पुरवणी सुरू झाली होती. त्या पुरवणीसाठी लिहिलेला हा लेख... २०१५ मध्ये लिहिलेला हा लेख अजून मी ब्लॉगवर कसा काय टाकला नाही, याचं आश्चर्य वाटलं. आता हा लेख शेअर करतोय....)

----


मध्य पुणे किंवा पेठांचा भाग हे पुण्याचं हृदय मानलं तर कोथरूड हे पुण्याचं नाक आहे, असं निश्चित म्हणता येईल. किंबहुना पुण्याची पंचेद्रियं म्हणजे कोथरूड असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. नाक हे जास्त ठळक, कारण पुण्याचा सगळा तोरा हे नाक आपल्या अंगावर मिरवतं. 'ऑल आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल' असं जॉर्ज ऑरवेलनं म्हटलंय, त्याच धर्तीवर 'आम्ही कोथरूडकर, जरा अधिक पुणेकर' असं कोथरूडकर अगदी अभिमानानं म्हणत असतात. हे म्हणत असताना त्यांच्या लालबुंद नाकाच्या शेंड्यावरचा तो अभिमान अगदी लखलखीतपणे दिसत असतो. 'आशियातलं सर्वांत वेगानं वाढलेलं उपनगर' अशी एके काळी विक्रमी नोंद करणारं हे उपनगर आता जवळपास मुख्य शहराचाच भाग झालंय. नळस्टॉपपासून साधारण कोथरूडची हवा सुरू होते. पौड फाट्यापासून डाव्या अंगानं कर्वेनगर, वारज्यापर्यंत जाणारा कर्वे रोड आणि उजव्या हाताला चांदणी चौकापर्यंत जाणारा पौड रोड या बेचक्यात कोथरूड नावाचं हे खास शहर वसलं आहे. हे दोन्ही रस्ते अत्यंत गजबजलेले. याउलट काही अत्यंत शांत, मस्त झाडीत लपलेल्या शांत, उच्चभ्रू सोसायट्या... असं हे सुंदर कोथरूड पाहताक्षणीच प्रेमात पडण्यासारखं. डहाणूकर कॉलनी, आयडियल कॉलनी, हॅपी कॉलनी किंवा पौड रोडच्या कडेच्या अनेक सोसायट्या अत्यंत आखीवरेखीव आणि नियोजनबद्ध आहेत. खेळाची मैदानं, छोटी उद्यानं, ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे असं सारं काही इथं आहे. काही काही भागांत तर चक्क परदेशात असल्याचाही भास होतो म्हणे. तसंही कोथरूडमध्ये साधारण घरटी एक माणूस अमेरिका किंवा युरोप किंवा ऑस्ट्रेलियात आहेच म्हणा. एके काळी कोथरूडच्या पोस्टातून सर्वाधिक 'एअर मेल' जात असत. आताही ते प्रमाण कायम असलं, तरी स्काइप वगैरे आल्यापासून थेटच संवाद सुरू झाला आहे.

मध्य पुण्यातच एके काळी राहत असलेले पुणेकर कोथरूडमध्ये एक तर बंगले बांधून किंवा मोठी घरं हवीत म्हणून शिफ्ट झाले. त्यामुळं पुणेकर नावाचं जे रसायन आहे, ते मूळच्या झऱ्यासह इथंही खळाळून वाहतंच आहे. एकविसाव्या शतकात आयटी क्रांतीनंतर पुणं चहूअंगानं विस्तारलं तसं कोथरूडही वाढत गेलं. पार वारज्याच्या पुढं बायपासपर्यंत जाऊन भिडलं. ऐंशीच्या दशकात बांधलेल्या तीन तीन मजली सोसायट्या आता ३०-३५ वर्षांनी 'रिडेव्हलपमेंट'ला आल्यासुद्धा. कोथरूड पुन्हा कात टाकू पाहतंय. कोथरूडमध्ये सिटीप्राइड मल्टिप्लेक्स सुरू झालं त्यालाही आता नऊ वर्षं झाली. हे मल्टिप्लेक्स आणि त्याच्याशेजारीच असलेला 'बिग बझार'सारखा मॉल यामुळं हा भाग एकदम हॅपनिंग स्ट्रीट होऊन गेला. कर्वे शिक्षण संस्था, एसएनडीटी किंवा एमआयटी यासारख्या मोठ्या शिक्षण संस्थांनी कोथरूड हे आपलं माहेरघर केल्यानं इथं तरुणाईची कायमच गजबज असते. बालगंधर्व आणि टिळक स्मारक लांब पडत असल्यानं कोथरूडकरांच्या आग्रहास्तव महापालिकेनं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासारखं सुसज्ज नाट्यगृह इथं बांधलं. तेव्हापासून नाट्यप्रेमी कोथरूडकरांची तीही गरज पूर्ण झाली. आता तिथंच आणखी एक मिनी थिएटर होऊ घातलंय. (हे अजूनही पूर्ण झालेलं नाही, ते सोडा...) कोथरूड स्टँड ते वनदेवी मंदिरापर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी मोठमोठ्या ब्रँडेड दुकानांनी गजबजलेला असतो. आता हौशी कोथरूडकर मंडईत किंवा लक्ष्मी रोडला सहज जातातही; पण बऱ्याचशा गरजा कोथरूडमध्येच पूर्ण होतात, यात शंका नाही. उपनगर साहित्य संमेलन भरणारं हे कदाचित देशातलं एकमेव उपनगर असावं. इथं कायमच वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम सुरू असतात. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाव्यतिरिक्त डहाणूकर कॉलनीतला कमिन्स हॉल, हॅपी कॉलनीचा हॉल, धन्वंतरी सभागृह, शैलेश सभागृह, महालक्ष्मी लॉन्स, मोरे विद्यालयातील सभागृह, पुण्याई सभागृह, मनोहर मंगल कार्यालय (इथं आता ‘व्हरांडा’ हॉटेल झालं आहे...) इथं काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं सतत सुरूच असतात आणि कोथरूडकर हौसेनं इथं भेटी देत असतात.
खाऊ गल्लीतही कोथरूड अर्थातच मागं नाही. खवय्या कोथरूडकरांना हवं ते खिलवण्यासाठी इथं कॉन्टिनेंटलपासून ते स्ट्रीट फूडपर्यंत सगळं काही उपलब्ध आहे. एमआयटी कॉलेजचा परिसर, करिष्मा सोसायटीजवळची चौपाटी किंवा डहाणूकर कॉलनीजवळचा परिसर इथं मोठ्या संख्येनं फूड जॉइंट्स आहेत आणि ती कायम खवय्यांनी हाउसफुल्ल असतात. शनिवारी तर अनेक ठिकाणी वेटिंग असतं. कोथरूडमध्ये मंगल कार्यालयंही मोठ्या संख्येनं आहेत. डी. पी. रस्त्यावरची लॉन्सही अनेकदा या लग्नसमारंभांसाठी फुल्ल असतात. मध्यमवर्गीयांपासून ते नवश्रीमंतांपर्यंतचा पैसे खुळखुळत असलेला वर्ग इथं मोठ्या संख्येनं राहत असल्यानं अनेक सेवासुविधा इथं घरपोच पोचवल्या जातात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही तयार होतो. सुसंस्कृत आणि नागरी हक्कांबाबत अत्यंत जागरूक वर्ग इथला रहिवासी असल्यानं इथल्या नगरसेवकांनाही कायम अलर्ट राहावं लागतं. सेवा बजावून घेणारे इथले नागरिक प्रॉपर्टी टॅक्स भरायलाही रांगा लावतात हेही आवर्जून सांगायला हवं.
याचा अर्थ कोथरूडमध्ये सगळंच काही आलबेल आहे, असं नाही. इथं अजूनही काही सुविधांची वानवा आहे. विशेषतः एवढ्या मोठ्या उपनगरासाठी खरं तर स्वतंत्र एसटी बसस्थानकाची गरज आहे. कोथरूडवरून मुंबईला किंवा कोल्हापूरकडं जाणाऱ्या लोकांसाठी बायपासलगत कुठे तरी मोठं बसस्टँड होण्याची गरज आहे. कोथरूडमध्ये पंचतारांकित हॉटेल नाही. खरं तर ही व्यावसायिक गरज आहे. पण अद्याप तरी कुणी असं पंचतारांकित हॉटेल कोथरूडमध्ये उभारलेलं नाही, हे वास्तव आहे. पु. ल. देशपांडे उद्यानासारखं मोठं उद्यान कोथरूडमध्ये नाही. अर्थात आता ते होणंही शक्य नाही, कारण एवढी जागाच इथं उपलब्ध नाही. पण किमान जितेंद्र अभिषेकी उद्यानासारखं चांगलं उद्यान आता तरी चालू व्हावं, ही इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे. (हेही उद्यान अद्याप सुरू झालेलं नाही...) आणि हो, आश्चर्य वाटेल, पण कोथरूडसारख्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या उपनगरात पुस्तकांचं एकही मोठं दालन नाही. मराठी व इंग्रजी पुस्तकं मिळतील असं पुस्तकांचं तीन-चार मजली दालन कोथरूडमध्ये व्हायला हवं. तसं ते झालं तर ते जोरात चालेल, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही.  (आता पुस्तकपेठ, भावार्थ आणि इतरही काही पुस्तकांची दुकानं सुरू झाली आहेत...) अर्थात या सुविधा मिळाल्या, तर कोथरूडचा मूळचा वाढीव भाव आणखीनच वधारेल आणि पुण्याचं हे नाक आणखी टेचात सगळीकडे मिरवेल, यात शंका नाही.


(ता. क. सन २०१६ मध्ये भूमिपूजन झालेली वनाझ ते रामवाडी मेट्रो २०२२ मध्ये सुरू झाली आणि आता कोथरूडकरांच्या चांगली अंगवळणी पडलीय...)

----

17 Jul 2024

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख
---------------------------------------

विशेष नोंद - 

‘मटा’मध्ये दोन वर्षांपूर्वी संपादकीय पानावर ‘जाता जाता’ हे सदर ‘चकोर’ या टोपणनावाने प्रसिद्ध होत असे. वेगवेगळे संपादकीय सहकारी ते लिहीत असत. मीही अनेकदा ते लिहिले आहे. खाली दिलेला पहिला भाग मी आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्यानंतर काही मैत्रिणींनी गमतीत अशी तक्रार केली, की ही तर एकच (म्हणजे पुरुषांची) बाजू आहे. आम्ही लिहू का आमची बाजू? त्यावर मीही गमतीनं म्हटलं, की तुम्ही कशाला? मीच लिहितो. मग मी त्या ग्रुपपुरता एक मजकूर लिहिला आणि तिकडं शेअर केला. त्यात सदराचं नाव ‘येता येता’ असं ठेवलं आणि लिहिणारीचं नाव ‘चकोरी’ झालं. त्यालाही चांगला प्रतिसाद म्हणाला. स्त्रीच्या भूमिकेतून आपण तसा विचार करू शकतो का, याची ही एक चाचणी होती. हा परकाया प्रवेश अवघड असला, तरी अशक्य नव्हता. आता दोन वर्षांनंतर मला वाटलं, की ही गंमत अधिक जास्त वाचकांपर्यंत पोचावी, म्हणून दोन्ही लेख इथं ब्लॉगवर प्रकाशित करतोय. आधी मूळ सदरातील लेख, नंतर त्याला ग्रुपपुरतं दिलेलं उत्तर... एंजॉय...

-------------


जाता जाता
--------------

एक आदिम साहसी खेळ
-----------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच आम्ही वाट बघत होतो. एक दीर्घानुभवी पती असल्यानं आम्ही स्वत: ही मागणी करणं शक्यच नव्हतं, हे चाणाक्ष (अन् अनुभवी) वाचकांच्या लक्षात आलंच असेल. अखेर व्हॉट्सअप मेसेजेस स्क्रोल करता करता ‘तो’ मेसेज दिसला अन् गुदगुल्या झाल्या. ‘लग्नालाही साहसी खेळ’ म्हणून मान्यता द्या, अशी अतिसाहसी मागणी त्या कथित विनोदी संदेशात होती. आम्हाला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. या खेळाची वैशिष्ट्यं अगणित आहेत. जगातील बहुसंख्य लोक आयुष्यात किमान एकदा तरी हा खेळ खेळतात. या खेळात जोडीदार बदलण्याची संधी (सहसा) नसते. निवडण्याची जरूर असते; मात्र एकदा निवडला, की त्या जोडीदारासोबतच पुढं आयुष्यभर हा खेळ खेळावा लागतो. बहुतेकांना खूप लहानपणापासून या खेळासाठी तयार केलं जातं. घरी पालकांचा ओरडा आणि शाळेत शिक्षकांचा दणका यांतून आपण या खेळासाठी टणक होत जातो. आपल्या अंगी अधिक सोशिकता यावी, यासाठी परीक्षादी उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या खेळात भाग घेण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्तता करणं अगदी गरजेचं असतं. दर महिना काही विशिष्ट रकमेच्या दमड्या कमावणं आणि किमान चार खोल्यांचा फ्लॅट असणं, या त्या बेसिक अटी होत. या अटी पूर्ण होईपर्यंतच खेळाडूंचं निम्मं अवसान गळालेलं असतं. मात्र, अशा खेळाडूचे पालक जोशात असतात. ते कोंबड्यांची झुंज लावावी, त्याप्रमाणे आपल्या अपत्याला या साहसी खेळात भाग घ्यायला उतरवतातच. एक मन नको म्हणत असतं; मात्र काही ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ना बळी पडून खेळाडू अखेर या खेळाच्या मैदानात उतरतोच. खेळाडू एकदा तयार झाला, की लाखो रुपये खर्च करून मोठा सोहळा आयोजित केला जातो. देवा-ब्राह्मणांच्या आणि (किरकोळ आहेराच्या बदल्यात) फुकटचं जेवण झोडायला आलेल्या गावभरच्या पाहुण्यांच्या साक्षीनं खेळाडू आपल्या जोडीदाराबरोबर गळ्यात हार घालून घेतो. खेळाच्या सुरुवातीलाच त्याच्या वाट्याला ‘हार’ नावाचा हा प्रकार येतो, तो पुढं आयुष्यभर कायम राहणार असतो. बहुतेक (पुरुष) खेळाडू त्या वेळी बावळट असल्यानं, त्यांना याची काहीही कल्पना नसते. लाखो रुपये खर्च करूनही ते वेड्यासारखे हसत फोटो काढून घेत असतात. (पुढं आयुष्यभर या प्रसंगाचे हृदयद्रावक फोटो बघून त्यांना रडायचंच असतं.) अनेक पुरुष खेळाडूंचा हा बावळटपणा पुढं अनेक वर्षं टिकतो. काही गडी मात्र स्मार्ट असतात. ते पहिल्यापासून आपण बावळट किंवा येडछाप असल्याचं सोंग घेतात आणि ते आयुष्यभर निभावतात. हे सोंग एकदा जमलं, तर या साहसी खेळात त्यांना पुढं बऱ्यापैकी गंमत येऊ लागते. तसे या खेळाचे नियम अगदी सोपे असतात. आपल्या पत्नी नामक जोडीदारासमोर कायम नतमस्तक होऊन राहणं आणि तिनं काहीही विचारलं, की वरपासून खालपर्यंत मुंडी हलवणं ही एक शारीरिक क्रिया करणं, एवढं केलं की खेळ जमतोच. आयुष्यभर माणसाला ‘होय होय’ करायला लावणारा एवढा सकारात्मक खेळ दुसरा नसेल. अशा या खेळाप्रति आणि खेळाडूंप्रति समाजानं कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोर

(मटा, २३-८-२०२२)

---

येता येता...

---------------

साहसे ‘श्री.’ प्रतिवसति...
---
-------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच मी वाट बघत होते. एक दीर्घानुभवी बायको असल्यानं आपणच ही मागणी करावी, असं कालपास्नं सारखं वाटत होतं. पण मेल्या भिशी ग्रुपच्या वस्साप गप्पांतून सवड ती कशी होईना! अखेर आमच्या शाळेच्या ग्रुपवर ‘तो’ मेसेज पडलाच. खुदुखुदू हसू लागले. ‘लग्नालाही साहसी खेळ म्हणून मान्यता द्या,’ अशी मागणी त्या कथित विनोदी संदेशात करण्यात आली होती. मला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं काही म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. माझंच बघा. चांगली डिग्री होईपर्यंत सुखात होते. आई-बाबांच्या लाडाकोडात वाढत होते. ते घरी आणि कॉलेजमधले गोंडाघोळू मित्र बाहेर काही कमी पडू देत नव्हते. कॉलेजात तर ‘चकोरी कॉलेजक्वीन’ असं कुणी कुणी नालायक लिहूनही ठेवायचं भिंतीवर... तेव्हा ‘किशन कन्हैया’तलं ‘चंदा पे चकोरी क्यूं हो हो हो होती है कुरबान’ हे गाणं फेमस होतं. त्या दंताळ्या गण्यानं मला फिशपॉंड टाकला होता त्यावरून! नंतर चप्पल दाखवलीन् त्याला... असे सुखाचे दिवस चालले होते. पण आई-बाबांना हे सुख बघवेना. माझा मंगळ कडक असावा बहुतेक. पोरीनं लव्ह मॅरेज करावं, म्हणून आईनं सगळे देव पाण्यात घातले होते. पण त्यात मदनदेव नसावा. शिवाय तिला दासबोधाचं वेड! मग कसलं होतंय आमचं लव्हमॅरेज? झालं. ते ‘चहा-पोहे’ नावाचं महाबंडल प्रकरण आयुष्यात आलं. काय एकेक नग आले होते देवा... दर वेळी आमच्याकडच्या रोहिणीमावशीनं केलेले पोहे मी त्या पोरट्यासमोर नेऊन आदळायची आणि ते येडं ‘छान चव आहे तुमच्या हाताला’ म्हणत कोमट हसायचं. मी इकडं इतकी फुटायचे! सावरून घेता घेता आईची पुरेवाट व्हायची. अखेर आईचा त्रागा बघवेना आणि बाबांच्या सिग्रेटी वाढत चालल्या तसा मी एक ‘चि. श्याम’ पसंत करून टाकला. धुमधडाक्यात लग्न लागलं. हे पहिलं साहस! हनीमूनला प्रथेप्रमाणे गोव्याला गेलो. आमचा चि. श्याम खरोखर ‘चि. श्याम’ होता, हे मला पहिल्याच रात्री कळलं. तेव्हापासून आमच्या संसाराच्या ड्रायव्हिंग व्हीलवर मीच बसल्ये आहे. हे दुसरं साहस! आज १२ वर्षं झाली. श्यामरावांना हनीमूनमधली गंमत लवकरच कळली आणि आमच्या संसारवेलीवर ‘बकुळ’ फुलली. मला मुलगीच हवी होती. आमच्या ‘ललिता पवारां’ना आम्हाला अजून पोरगं व्हायला हवं होतं म्हणे. आता याला दु:साहस म्हणायचं नाही तर काय! मी बरी खमकी होते आणि ‘ललिताबाईं’ना लवकरच बाप्पानं तिकडं बोलावून घेतलं आणि आम्ही सुटलो. तेव्हापासून किराणा यादीपासून लाइट बिलापर्यंत आणि इस्त्रीच्या कपड्यांपासून ते बकुळच्या डब्यापर्यंत मीच सगळा गाडा ओढत्ये आहे. श्यामराव भिडस्त असले तरी कधी मूडमध्ये आले, की घरातल्या घरात मला ऑर्डरी सोडतात. एका कामाला हात म्हणून लावत नाहीत. त्यांच्या गादीला मी राजगादी म्हणते. श्यामरावांना त्यातही एक कोमट आनंद होतो. बाकी त्यांना एकूण ‘हे’ कमीच. एवढी दमले, तरी बाबा कधी अर्धा कप चहा विचारणार नाही. मलाही अपेक्षा नाहीच म्हणा! एकूण आमचा संसार हॉट नसला, तरी ‘कोमट’ तरी आहे. बाकी मैत्रिणींच्या संसाराचे काय धिंडवडे निघालेत ते आमच्या ‘टवाळ टवळ्या’ ग्रुपवर कळतंच. मी आपलं ध्यान पदरी पडलं पवित्र झालं म्हणत्ये आणि बकुळच्या (आगामी) संसाराची चित्रं रंगवत बसते. बकुळनं तरी प्रेमविवाह करावा अशी माझी इच्छा आहे. मी सगळ्या इच्छा मारत मारत जगले, तसं तिचं होऊ नये. थोडक्यात, बाईमाणसाची आयुष्यभर सत्त्वपरीक्षा पाहणारा हा साहसी खेळ नाही, असं कोण म्हणेल? या साहसातच आमचे ‘श्री’ वस्ती करून राहताहेत ना! ‘साहसे श्री प्रतिवसति’ ही संस्कृत म्हण तिथूनच आली असली पाहिजे. ते काही का असेना, मला वाटतं, की या खेळाप्रति आणि माझ्यासारख्या सोशिक खेळाडूंप्रति समाजाने कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोरी

---

30 Jun 2024

टी-२० वर्ल्ड कप विशेष लेख

वो ‘फॅमिलीवाला फीलिंग’...
---------------------------------

भारतीय संघाच्या विजयानंतरच्या जल्लोषात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे प्रत्येक सदस्याचे एकमेकांशी असलेले घट्ट बंध. याला कारण अर्थातच कुटुंबप्रमुख राहुल द्रविड... अशी काय जादू केली द्रविड मास्तरांनी?


शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सगळा देश जल्लोषात बुडून गेला होता. भारताने तब्बल ११ वर्षांनी आयसीसी क्रिकेट ट्रॉफी जिंकली होती. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर हार्दिक पंड्याच्या शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेने एक धाव काढली आणि भारताचा सात धावांनी विजय निश्चित झाला. कुठलीही मोठी स्पर्धा जिंकली, की खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरत नाही. प्रत्येक जण आपापल्या शैलीत तो साजरा करतो. मात्र, शनिवारी रात्रीचा भारतीय संघाचा जल्लोष काही वेगळाच भासला. तो अधिक भावनिक, अधिक सच्चा, अधिक संतुलित व म्हणून अधिक प्रगल्भ वाटला.
भारताला विजय मिळाल्याबरोबर कर्णधार रोहित शर्माने स्वत:ला मैदानात झोकून दिलं. हार्दिकही खाली बसला. पॅव्हेलियनमधील सपोर्ट स्टाफ आणि इतर राखीव खेळाडू मैदानात धावत निघाले. प्रत्येक जण अतीव आनंदानं न्हाऊन निघाला होता. सगळे जण एकमेकांना मिठ्या मारत होते, रडत होते, नाचत होते. एरवी कधीही भावनांचं प्रदर्शन न करणारा राहुल द्रविडही भावोत्कट झाला. महंमद सिराजला तर अश्रू आवरत नव्हते. विराटने त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला. त्यात तो त्याच्या लहान मुलीशी गप्पा मारताना दिसला. रोहितने भावपूर्ण पद्धतीने मैदानातील मातीची चव घेतली. अतीव कष्टाने मिळालेल्या विजयाची चव कशी असते, हेच जणू तो पाहत होता!
संघाला करंडक प्रदान करताना रोहित ऐटबाज पद्धतीने पावले टाकत आला आणि मोठ्या जल्लोषात त्याने तो करंडक स्वीकारला. नंतर संघाने केलेला आनंदोत्सव अभूतपूर्व होता. रोहित आणि विराट या दोघांवर सर्वांचं लक्ष होतं. भारताचा तिरंगा अंगावर लपेटून या दोघांनी सर्व मैदानाला फेरी मारली. प्रशिक्षक राहुल द्रविडला ते विसरले नाहीत. सर्व खेळाडूंनी मिळून राहुलला हवेत उचललं आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली. संघातले सगळे खेळाडू एकमेकांना घट्ट आलिंगन देत होते आणि अश्रू ढाळत होते. रोहित त्याच्या मुलीला खांद्यावर घेऊन सगळीकडं मिरवत होता. हार्दिक पंड्यानं अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि गेल्या तीन-चार महिन्यांत त्याच्याविरुद्ध जे ट्रोलिंग झालं, त्याविषयी सूचक बोलून मन मोकळं केलं. प्रत्येक जण एकमेकांचं कौतुक करत होता. या सगळ्यांतून या सर्व खेळाडूंमधले घट्ट बंध सहज दिसून येत होते.
हे चित्र एका दिवसात तयार झालेलं नाही. यामागे ‘राहुल द्रविड फॅक्टर’ आहे. राहुल द्रविड कसा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पटकन स्वत:कडे श्रेय न घेणारा, संयमी, शांत, अतिशय निगर्वी, कुटुंबवत्सल, साधा आणि अभ्यासू अशी त्याची प्रतिमा आपल्या मनात आहे. राहुल जसा आहे तसंच कालचं आपल्या संघाचं वर्तन होतं. दहा-बारा वर्षांपूर्वीचे रोहित आणि विराट आठवून बघा. त्यातही विराट. ‘दिल्ली का गुंडा’ अशीच त्याची प्रतिमा होती. तिथपासून ते कालच्या कुटुंबवत्सल, जबाबदार, प्रेमळ पित्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. त्याची पत्नी अनुष्का अनेकदा विनाकारण ट्रोल होते. मात्र, आपल्याला बदलवण्यात तिचा मोठा वाटा आहे, हे विराटनं अनेकदा जाहीरपणे कबूल केलं आहे. विराट आता मुंबईत राहतो, हेही लक्षणीय आहे. रोहितचा स्वभावही वेगळ्या धर्तीवर आक्रमक आहे. मात्र, काल त्याने संयमितपणे प्रदर्शित केलेल्या भावना त्याच्यातील प्रगल्भ माणूस दाखवून गेल्या. वास्तविक, गेल्या काही वर्षांत भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीत सातत्याने अपयश येत गेलेलं आहे. त्यामुळं कालच्या अंतिम फेरीत विजय हवाच होता. रोहित, विराट आणि राहुल या तिघांसाठीही तो मिळायला हवा होता. तसा तो मिळाल्यानंतर तिघांचंही वर्तन मात्र अतिशय वाखाखण्याजोगं, स्तुत्य होतं. सगळं काही मिळवून झाल्यानंतर जी तृप्तीची, समाधानाची भावना येते, तिचं प्रतिबिंब या तिघांच्या देहबोलीत दिसलं. त्यातूनच रोहित आणि विराटनं आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांतून निवृत्तीची घोषणा केली. राहुलचाही प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ कालच संपुष्टात आला. यशाचं उत्तुंग शिखर गाठल्यानंतर तिघांनीही अतिशय समाधानानं आपली जबाबदारी सोडली.
रोहित काय, विराट काय... यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आगमन ते कालचा त्यांच्या करिअरमधला महत्त्वाचा टप्पा हा प्रवास आपल्यापैकी अनेकांनी आपल्या डोळ्यांदेखत पाहिला आहे. आज वयानं ४० पेक्षा अधिक असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना हे सर्व खेळाडू अगदी आताआतापर्यंत ‘नवी पोरं’ वाटत होती. आरडाओरडा करणे, अॅटिट्यूड दाखवणे, शिव्या देणे, आक्रमक हावभाव करणे, चिडणे अशी तरुणाईची सर्व व्यवच्छेदक लक्षणं घेऊन ते वावरत होते. काल मात्र त्यांचं रूपांतर जबाबदारीनं वागणाऱ्या, संयम दाखवणाऱ्या, गप्प राहून टीका झेलणाऱ्या, आपल्या कुटुंबावर खूप खूप प्रेम करणाऱ्या, सहकाऱ्यांवर जीव लावणाऱ्या ‘बाप्या’ माणसांत झालेलं बघितलं. हे पाहून ‘सगळं नीट मार्गी लागलं बाबा’ टाइप जे एक तृप्त समाधान वाटतं ना, ती भावना अनेक रसिकांसाठी प्रबळ ठरली. आपण या पोरांचं रूपांतर ‘कम्प्लीट मॅन’मध्ये झालेलं बघितलं. हे सगळं ‘राहुल द्रविड फॅक्टर’मुळं घडलं, यात शंका नाही.
भारतात आपल्याला असं आवडतं. कुटुंबात सगळे मार्गी लागले पाहिजेत, असा आपला आग्रह असतो. त्यासाठी कुटुंबप्रमुख आपल्या जीवाचं रान करत असतो. त्याच्या या प्रयत्नांचं मोल कुटुंबातल्या सदस्यांना कळलं, तर ते कुटुंब सुखी व समाधानी होतं. कालच्या भारतीय संघात अशाच एका कुटुंबाचं दर्शन घडलं. राहुल अर्थातच कुटुंबप्रमुख होता. त्याच्या तिथं असण्याने या कुटुंबातले हार्दिकसारखे एरवी ‘टगे’ असणारे मेंबरही बदलले. आपल्या अश्रूंचं, भावनांचं प्रदर्शन करणं ही फार वाईट गोष्ट नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. करंडक मिळाल्यानंतर मैदानातील खेळाडूंपासून ते सपोर्ट स्टाफपर्यंत प्रत्येक सदस्याला ‘हा आपला विजय आहे,’ असं वाटणं हीच मोठी गोष्ट होती.
जेव्हा कुठल्याही व्यक्तिमत्त्वात आक्रमकता आणि संयम यांचा असा देखणा मिलाफ होतो, तेव्हा सर्वोच्च स्थान गाठणं फार अवघड उरत नाही. या संघानं हे ‘फॅमिलीवालं फीलिंग’ आपल्याला दिलं आहे. त्यामुळंच होणारा आनंद जरा काकणभर जास्त आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; १ जुलै २०२४)

----

11 Jun 2024

पु. ल. स्मृती लेख

पु. ल. गेले तो दिवस...
--------------------------


१२ जून २०००. माझ्या आयुष्यात मी हा दिवस कधीही विसरू शकणार नाही. ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे या दिवशी हे ऐहिक जग सोडून गेले. माझ्या पिढीतील इतर अनेकांप्रमाणे माझाही पिंड पु. लं.च्या साहित्यावर पोसला गेला आहे. पु. लं.चं व्यक्तिमत्त्वच एवढं मोठं होतं, की त्यांनी विसाव्या शतकातील मराठी साहित्यविश्वावर अमीट असा ठसा उमटवला आहे. एखाद्या साहित्यिकावर एवढं मन:पूत प्रेम करणारा महाराष्ट्र तेव्हा अनुभवता आला, हे माझं भाग्य. 
मी आज सांगणार आहे, ती पु. ल. गेले त्या दिवसाची आठवण. त्याआधी थोडी पार्श्वभूमीही सांगायला हवी. मी तेव्हा ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम करत होतो. मला तिथं काम करायला सुरुवात करून जेमतेम अडीच-तीन वर्षं होत होती. विजय कुवळेकर साहेब तेव्हा संपादक होते. पु. ल. त्या काळात अर्थात अतिशय थकले होते. ‘एक होता विदूषक’ हा त्यांनी पटकथा-संवाद लिहिलेला चित्रपट एक जानेवारी १९९२ रोजी प्रदर्शित झाला. हे त्यांचं बहुतेक अखेरचं मोठं काम. त्यानंतर पु. लं.नी पार्किन्सन्समुळं सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतल्यासारखीच होती. त्यांचं दर्शन दुर्मीळ झालं होतं. मात्र, तरीही ‘ते आहेत’ ही भावनाच पुरेशी होती. मला पु.लं.ना प्रत्यक्ष कधीच बघता आलं नाही. मी त्यांना सदेह बघितलं ते थेट ‘प्रयाग’मध्ये ते शेवटच्या आजारपणात दाखल झाले तेव्हाच! अर्थात त्यांना कधी भेटलो नसलो, तरी माझ्याकडं त्यांची एक सोडून चार चार पत्रं होती. हा फार मोठा अनमोल ठेवाच ठरला आहे आता माझ्यासाठी. शिवाय मी पॉलिटेक्निकमध्ये शिकत असताना सार्वजनिक फोनवरून एकदा त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. (त्याबाबत मी यापूर्वी ब्लॉगवर लिहिलेलं असल्यानं ते अनुभव आता इथं तपशिलात लिहीत नाही.) मात्र, त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा योग काही आला नाही. आला तो असा - रुग्णालयातील बेडवर विकल अवस्थेत झोपलेल्या आणि नाकातोंडात नळ्या अशा स्थितीत... तेव्हा मनाला केवढ्या यातना झाल्या असतील याचा आता विचारही करवत नाही.
पु. ल. सार्वजनिक जीवनात तेव्हा फारसे सक्रिय नसले, तरी तेव्हा सत्तेवर आलेल्या युती सरकारने पहिला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार पुलंना देण्याची घोषणा केली. त्या कार्यक्रमाला दाढी वाढलेले पु. ल. व सुनीताबाई दोघेही उपस्थित होते. पु. लं. ना भाषण करता येण्यासारखी परिस्थिती नव्हती, म्हणून सुनीताबाईंनी त्यांचं भाषण वाचून दाखवलं. त्यात सत्ताधाऱ्यांच्या ‘ठोकशाही’वर टीका असल्यानं नंतर एकच गदारोळ झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘झक मारली आणि पुलंना पुरस्कार दिला’ असे उद्गार काढले. ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रात ‘मोडका पूल’ अशा शीर्षकानं एक व्यंगचित्रही प्रसिद्ध झालं. मात्र, पु. ल. व सुनीताबाई यांनी त्यांच्या स्वभावानुसार, नंतर या विषयाबद्दल एक अक्षरही काढलं नाही. नंतर वातावरण निवळल्यावर शिवसेनाप्रमुख पुलंना भेटायला पुण्याला त्यांच्या घरी आले. पु. ल. हे बाळासाहेबांचे एके काळचे शिक्षक. त्यामुळे खुर्चीवर बसलेल्या पु. लं.च्या पायावर डोके ठेवून त्यांनी नमस्कार केला. हा क्षण आमचे तेव्हाचे फोटोग्राफर मिलिंद वाडेकर यांनी नेमका टिपला. शिवसेनाप्रमुख म्हणाले, की माझ्या गाडीत कायम पु. लं.च्या कॅसेट असतात आणि मी कायमच त्या ऐकत असतो वगैरे.
या काळात पु. ल. पुन्हा माध्यमांत चर्चेत आले असले, तरी नंतर मात्र त्यांचं आजारपण बळावलं. पु. लं.नी ८ नोव्हेंबर १९९९ रोजी वयाची ऐंशी वर्षं पूर्ण केली, तेव्हा पुण्यात ‘आशय’ने मोठा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. माझ्या माहितीनुसार, त्यांच्या पुलोत्सवाची ती सुरुवात होती. अर्थात पु. ल. स्वत: यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. जूनच्या सुरुवातीला पु. लं.ची तब्येत बरीच खालावली आणि त्यांना डेक्कन जिमखान्यावरील प्रयाग यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या वेळचं त्यांचं आजारपण गंभीर असल्याचं समजल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पु. लं.च्या चाहत्यांचा जीव खाली-वर होऊ लागला. पु. लं.ची प्रचंड लोकप्रियता पाहता, त्यांच्या तब्येतीबाबतची प्रत्येक बातमी अतिशय महत्त्वाची होती. तेव्हा वृत्तवाहिन्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. मराठीत तर पूर्ण वेळ वृत्तवाहिनी एकही नव्हती. तेव्हा वृत्तपत्रांची जबाबदारी सर्वाधिक होती. त्यातही पुण्यात ‘सकाळ’मध्ये त्यांच्या प्रकृतीची इत्थंभूत माहिती येणं अगदी आवश्यकच होतं. 
तेव्हा आम्ही काही जण ऑफिसमधली रात्रपाळी संपली, की ‘प्रयाग’ला एक चक्कर मारायला लागलो. प्रयाग हॉस्पिटलतर्फे रोज पु. लं.च्या तब्येतीची माहिती देणारं एक बुलेटिन जारी केलं जात असे. मात्र, ते दिवसा आणि संध्याकाळी असे. रात्री-बेरात्री काही झालं तर आपल्याला कसं कळणार, असं सगळ्याच पेपरमधल्या पत्रकारांना वाटायचं. तेव्हा बरेच पत्रकार काम संपलं, की मंडईत जमायचे. त्याऐवजी आता ते ‘प्रयाग’समोर जमू लागले. रात्री तीन किंवा क्वचितप्रसंगी साडेतीन-चारपर्यंत काहीही अघटित घडल्याचं समजलं, तरी प्रत्येक वृत्तपत्र ही बातमी लगेचच देण्यासाठी तत्पर होतं. त्यासाठीच सगळे तिथं एकत्र थांबायचे. पु. लं.च्या प्रकृतीतील चढ-उतार जवळपास आठवडा किंवा त्याहून अधिक काळ सुरू होते. एकदा यातली एक बातमी ‘सकाळ’मध्ये चुकली. त्या वेळी संपादक कुवळेकर साहेब स्वाभाविकच चिडले आणि त्यांनी ‘प्रयाग’बाहेर बातमीदारांची रीतसर २४ तास ड्युटीच सुरू केली. मी डेस्कवर काम करत असलो, तरी पु. लं.विषयीच्या आत्यंतिक जिव्हाळ्यामुळं मीही रोज रात्री तिथं जाऊन थांबत असे. मुकेश माचकर यांची आणि माझी ओळख तिथंच झाली. पु. लं.च्या कुटुंबीयांच्या वतीनं डॉ. जब्बार पटेल यांनी माध्यमांना सर्व माहिती देण्याची जबाबदारी घेतली होती. दहा की अकरा जून रोजी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख पु. लं.ची प्रकृती पाहायला येणार असल्याचं कळलं, तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. विलासरावांच्या आगे-मागे बाळासाहेब ठाकरेही येऊन गेले. इतर नेत्यांची रीघ लागली, तसं आमची शंका बळावत चालली. पु. ल. जायच्या आदल्या दिवशी रात्री दीड-दोनच्या सुमारास आम्ही ‘प्रयाग’च्या मागल्या बाजूला जमलो होतो. तिथून शेजारच्या खोलीतील पु. ल. स्पष्ट दिसत होते. माझं लक्ष वारंवार त्यांच्याकडं जात होतं आणि मी निग्रहानं दुसरीकडं मान वळवत होतो. डॉ. पटेल आणि आम्ही काही लोक तिथं बोलत असताना, पलीकडंच सुनीताबाई शांत चित्तानं डोळे मिटून एका खुर्चीवर बसल्या होत्या. तेवढ्यात एका सरकारी माध्यमात काम करणाऱ्या, जरा आगाऊ अशा वरिष्ठ पदावरच्या बाईंनी एकदम जब्बारना विचारलं, ‘अहो डॉक्टर, भाई पद्मभूषण होते की पद्मविभूषण? नाही म्हणजे उद्या लागेल ना आम्हाला ते सगळं...’
त्यांच्या या उद्गारानंतर आम्ही सगळे अवाक झालो. डॉक्टर त्या बाईंवर भडकलेच. सुनीताबाई अगदी जवळ होत्या. त्यांनी हे बोलणं ऐकलं असेल का, या विचारानं आमच्या सगळ्यांचाच थरकाप उडाला. आम्ही सगळे तिथून दूर निघून बाहेर रस्त्यावर आलो. आम्ही इतर पत्रकार त्या बाईंच्या या उद्गारावर चिडलो होतो. मात्र, एकीकडं आता सगळं संपत चाललं आहे, याची एक विषण्ण जाणीवही झालीच. मी तिथून घरी जायला निघालो. पु. लं.चं मला झालेलं ते शेवटचं दर्शन...
दुसऱ्या दिवशी १२ जून. सकाळपासूनच पु. लं.च्या प्रकृतीविषयी उलटसुलट ऐकायला मिळत होतं. ‘प्रयाग’ने आदल्या दिवशीच बुलेटिन काढून ‘व्हेरी क्रिटिकल’ असं सांगितलंच होतं. पु. लं.चे लाडके भाचे डॉ. दिनेश ठाकूर व कुटुंबीय अमेरिकेतून येणार होते. ते आल्यानंतरच कदाचित बातमी जाहीर होणार होती. पु. लं.ना शेवटच्या क्षणांत कुठलाही त्रास होऊ नये, यावर सुनीताबाईंचा कटाक्ष होता. अति उपचार किंवा त्यांच्या शरीरावर नसते प्रयोग करू नयेत, असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं होतं. अखेर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी ती नकोनकोशी बातमी आलीच. ‘आपल्या लाडक्या पु. लं.नी शांतपणे हे जग सोडलं,’ असं डॉ. शिरीष प्रयाग यांनी हॉस्पिटलसमोर जमलेल्या गर्दीला सांगितलं. बातमी अपेक्षित असली, तरी मनात कल्लोळ उठला. डोळे पाण्यानं भरले. ज्या माणसानं आपल्याला एवढा आनंद दिला, एवढं हसवलं, जगणं शिकवलं तो आता शरीरानं आपल्यात नाही, ही भावनाच फार फार त्रासदायक होती. अर्थात, पत्रकारांना अशा वेळी भावनेला आवर घालून कामं करावी लागतात. मी लगेच ऑफिसला गेलो. पु. लं.संदर्भातल्या बातम्या, संदर्भ अशा गोष्टींना मदत करत राहिलो. कृत्रिमपणे सगळं काम करत राहिलो... संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर मात्र बांध आवरता आला नाही. तिथून माझ्या रूमवर जाईपर्यंत मनसोक्त रडून घेतलं. आपल्या जगण्याचा एक मोठा हिस्सा एकदम नाहीसा झाल्याची जाणीव झाली होती.
दुसऱ्या दिवशी उठल्यावर सगळे पेपर वाचले. ‘मटा’नं तर संपूर्ण अंकच पुलमय केला होता. मी तेव्हा ‘सकाळ’मध्ये असलो आणि ‘सकाळ’नेही उत्तम कव्हरेज केलं असलं, तरी मला ‘मटा’चा अंक अतिशय आवडला. विशेषत: ‘मटा’चा अग्रलेख अप्रतिम होता. ‘आपले आनंदगाणे संपले’ असं (की असंच काहीसं) त्याचं शीर्षक होतं. तो अग्रलेख वाचायला सुरुवात केल्यानंतर तीन-चार वाक्यांनंतरच माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. हा अग्रलेख कुमार केतकर यांनी लिहिला होता, हे नंतर कळलं. (याच्या दुसऱ्याच दिवशी केतकरांनी सुनीताबाईंना उद्देशून आणखी एक मोठा अग्रलेख लिहिला होता. तोही अतिशय वाचनीय होता.)
माझ्या आठवणीनुसार, पुलंवर दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जून रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव सर्वसामान्य रसिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. (ते कुठं ठेवलं होतं, हे मला आता आठवत नाही. बहुतेक ‘मालती-माधव’मध्ये असावं...) मी तिथं जाऊन त्यांचं अखेरचं दर्शन घेऊन आलो. ‘वैकुंठ’ला मात्र मी गेलो नाही. ते सगळं मी टीव्हीवर पाहिलं. 
पु. ल. गेले त्याला आज दोन तपं पूर्ण होतील. पु. ल. शरीरानं गेले असले, तरी ते आपल्यात आहेतच. त्यांनी एवढं लिहून ठेवलं आहे आणि ते बहुतेकांना आता एवढं पाठ आहे, की पुस्तक उघडायचीही गरज पडत नाही. पु. ल. इतर साहित्यिकांच्या मानानं आणखी सुदैवी, याचं कारण दृकश्राव्य माध्यमाचं महत्त्व त्यांना खूप आधी कळलं होतं. त्यामुळं पुलंचे व्हिडिओ, त्यांचं अभिवाचन, त्यांची नाटकं हे सगळं आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. पुलंवर फेसबुकवर अनेक पेजेस आहेत. त्यात हजारो लोक रोज त्यांच्या आठवणी जागवत असतात. अगदी ‘इन्स्टाग्राम’वरही पु. ल. आहेत. त्यांच्या गाजलेल्या वाक्यावाक्यांचे रील्स आहेत. मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात पु. ल. देशपांडे अकादमी आहे आणि तिथं समोर त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. पुण्यात सिंहगड रोडवर अतिशय सुंदर अशा जपानी उद्यानाला पु. ल. देशपांडे उद्यान असं नाव देण्यात आलं आहे. त्या उद्यानाबाहेर फूटपाथवर पु. लं.चे कोट्स, त्यांची पुस्तकं वगैरेंची शिल्पं लावली आहेत. तसंच फर्ग्युसन रोडवरही फूटपाथवर पु. लं.ची चित्रं लावली आहेत. रोज येता-जाता ती दिसतात. रोज रात्री घरी जाताना मी पु. ल. देशपांडे उद्यानावरून जातो. तेव्हा नकळत नजर डावीकडं त्यांच्या लफ्फेदार सहीवर जाते. मी छातीवर हात ठेवून मनोमन त्यांना नमन करतो आणि पुढं जातो. ‘ते आहेत’, ‘ते आपल्यासाठी इथंच आहेत’ ही भावना मनात दाटून येते. मन प्रसन्न होतं... दिवसाचा सगळा ताण निघून जातो... हेच तर ते करत आले आहेत आपल्यासाठी... हयात होते तेव्हाही आणि आता ऐहिक रूपात नाहीत तेव्हाही! 


----

30 May 2024

महाबळेश्वर ट्रिप २६-२८ मे २०२४

धुक्यातून ‘सुकून’कडे....
------------------------------


महाबळेश्वरला तसं नेहमी जाणं होतं. अगदी महाबळेश्वरपर्यंत गेलो नाही, तर पाचगणी किंवा वाईपर्यंत तर नक्कीच जाणं होतं. दर वेळी तिथं काही तरी नवं गवसल्याचा आनंद मला लाभला आहे. याही वेळी निसर्ग आणि मानवनिर्मित अशा दोन्ही गोष्टींनी मोठं समाधान दिलं. वास्तविक महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलं ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ झालेलं पर्यटनस्थळ म्हणायला हवं. यामुळंच ‘महाबळेश्वरला काय जायचं?’ असं नाकं मुरडून विचारणारेही आहेत. 
परवा मी महाबळेश्वरला गेलो, तेव्हाही तो ‘फर्स्ट चॉइस’ नव्हता. उत्तरेकडं सहलीला जायचं (तिथल्या भयंकर तापमानामुळं) रद्द केल्यानंतर महाबळेश्वर हा स्वाभाविक पर्याय होता. मग लगेचच एमटीडीसीचं बुकिंग करून टाकलं. एमटीडीसीचा सरकारी खाक्या नकोसा वाटत असला, तरी त्यांची रिसॉर्ट अतिशय मोक्याच्या व शांत ठिकाणी असल्यानं ते आकर्षण नेहमीच सरकारी खाक्याबद्दलच्या तिरस्कारावर मात करतं आणि शेवटी तिथलंच बुकिंग केलं जातं. वास्तविक ऐन मे महिन्यात महाबळेश्वरच काय, पण कुठल्याही पर्यटनस्थळी जाऊ नये, हे माझं मूळ मत. सगळीकडे असलेल्या पर्यटकांच्या प्रचंड गर्दीचाच एक भाग होऊन हिंदकाळत स्थळदर्शन उरकण्याचा मला भयंकर तिटकारा आहे. यंदा मात्र सर्वांना सोयीचा हाच काळ होता. मग शेवटी निघालो. 
पसरणी घाट चढून पाचगणीच्या हद्दीत आल्यावरच हवेतील बदलानं पहिला सुखद धक्का दिला. हल्ली महाबळेश्वरचं तापमानही पुण्यासारखंच वाढलेलं असतं आणि तिथंही उकडतं, हे मी ऐकून होतो. आम्ही गेलो ते तिन्ही दिवस मात्र हवा अतिशय आल्हाददायक होती आणि कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस होतं. अपेक्षेप्रमाणे पाचगणी, महाबळेश्वर या टप्प्यात प्रचंड गर्दी लागली. ‘बंपर टु बंपर’ ट्रॅफिक होतं. रविवार असल्यानं एका दिवसासाठी महाबळेश्वरमध्ये येणाऱ्यांची गर्दी होती. शिवाय इथं मुंबईहून, गुजरातवरून प्रचंड संख्येनं पर्यटक येत असतात. यंदा ‘एमएच ०१, ०२ ते ०६’ यांच्या जोडीला ‘एमएच ४८’ (वसई-विरार) गाड्यांचीही मोठी गर्दी दिसली. महाबळेश्वरच्या हद्दीत पोचल्यानंतर प्रत्यक्ष एमटीडीसी गाठेपर्यंत आम्हाला दीड तास लागला. (या गडबडीत एंट्री टॅक्स न घेता गाडी सोडली, हाच काय तो दिलासा!) आम्ही सकाळी साडेनऊला निघालो होतो. रिसॉर्टवर येईपर्यंत तीन वाजले होते. जवळपास दीड ते दोन तास उशीर केवळ ट्रॅफिकमुळं झाला होता. आमचा प्रीमियम डीलक्स की लक्झरी (लक्झरी म्हणजे एमटीडीसी देऊ शकेल इतपतच लक्झरी) सूट ताब्यात घेतल्यावर आधी चक्क ताणून दिली. आम्ही रिलॅक्स व्हायलाच आलो होतो. फार काही टाइट, मिनिट टु मिनिट प्रोग्राम ठेवलाच नव्हता. इथं आल्यावर एमटीडीसीनं पहिला धक्का दिला. सूटमध्ये मोबाइलला शून्य रेंज येत होती. दारात आलं की फुल रेंज. इथं फक्त बीएसएनएललाच रेंज येते म्हणे. त्यामुळं आम्ही सूटमध्ये असताना एकदम आदिमानव, तर दारात आलो की लगेच आत्ताची माणसं व्हायचो. असो.
संध्याकाळी सनसेट पॉइंटला गेलो. माझ्याकडं नीलचा २००६ (किंवा ०७) मधला फोटो होता. अरमान नावाच्या घोड्यावर नील व मी बसलो होतो, असा तो फोटो होता. तिथं मला ‘स्मार्टी अरमान’ नावाचा घोडा दिसला. त्याच्या मालकाला (शारूख नाव त्याचं) मी तो जुना फोटो दाखवला. त्याबरोबर तो फारच खूश झाला आणि त्यानं आजूबाजूच्या सर्व घोडेमालकांना आणि पर्यटकांनाही बोलावून बोलावून तो जुना फोटो दाखवला. त्या आनंदात त्यानं नीलला सवलतीत राइड देऊ केली. नीलला खरं तर घोडेस्वारीपेक्षा तिथले फोटो काढण्यात रस होता. पण शारूखचा उत्साह बघून तो तयार झाला. त्याची राइड झाल्यावर घोड्याला दोन पाय उंच करून ‘स्लो मो’मध्ये शूटिंग करण्याचाही कार्यक्रम झाला. एकूण ती संध्याकाळ अतिशय प्रसन्न होती. हवा ढगाळ होती. गार वारं वाहत होतं. आता चहा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मस्त मसाला मॅगीही तिथं मिळाली. मग दोन्हीचा आस्वाद घेऊन आम्ही थेट मार्केटमध्ये गेलो. तिथं अपेक्षेप्रमाणे पहिल्या वाहनतळावर जागा नव्हतीच. मला दुसरा रस्ता माहिती होता. मग मी मार्केटच्या त्या टोकाला असलेल्या रस्त्याला जाऊन तिथल्या नव्या वाहनतळावर कार पार्क केली व मग आम्ही चालत मार्केटमध्ये आलो. (या मुख्य रस्त्याला डॉ. साबणे रोड असं नाव आहे.) तिथंच जेवलो. मला सईच्या (तांबे) पोस्टमध्ये लिहिलेल्या ‘स्ट्रॉबेरी विथ क्रीम’वाल्या नझीरभाईंची गाडीही दिसली. पण पोट एवढं भरलं होतं, की दुसऱ्या दिवशी त्यांना न्याय देऊ असं ठरवून परतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी एमटीडीसीच्या वेण्णा कँटीनमध्ये आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता. पोहे, उडीदवडा सांबार, चटणी, ब्रेड-बटर, अंडाभुर्जी आणि चहा-कॉफी असा मेन्यू होता. बुफे लावला होता. सर्व पदार्थ चांगले होते. हे कँटीनही चांगलं वाटलं. ब्रेकफास्ट करून आम्ही बाहेर पडलो. आज श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि ऑर्थर सीट पॉइंट एवढी दोनच ठिकाणं बघू, असं ठरवलं. श्री क्षेत्र महाबळेश्वरकडं गावातून जाणारा रस्ता दुरुस्तीमुळं बंद होता. त्यामुळं आम्हाला वेण्णा लेक ओलांडून नाकिंदा मार्गे जावं लागलं. इकडंही गर्दी होतीच. वातावरण मात्र फार सुरेख होतं. ढगाळ हवा, अधूनमधून धुकं आणि घनदाट झाडीतून जाणारे रस्ते हे अगदी स्वप्नवत होतं! श्री क्षेत्र महाबळेश्वरला पंचनद्यांच्या संगमाचं दर्शन घेतलं. इथं यापूर्वी अनेकदा आलो असलो, तरी दर वेळी काही तरी बदललेलं दिसतं. या वेळी बाहेरची दुकानं खूप वाढल्याचं दिसलं. गर्दी होतीच. इथं आम्ही यापूर्वी न बघितलेलं कृष्णाई मंदिर पाहायला मिळालं. मुख्य मंदिराच्या समोरूनच इकडं जायला चांगला दगडी रस्ता केला आहे. हे मंदिर पुरातन आहे आणि पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलं आहे. अभिजितनं (थिटे) मला हे मंदिर आवर्जून पाहायला सांगितलं होतं. तिथं गेल्यावर आम्ही त्याला फोन केला आणि त्यानं आणखी बरीच इंटरेस्टिंग माहिती सांगितली. हे मंदिर आणि समोर दिसणाऱ्या दरीतील कृष्णा नदीचं विहंगम दृश्य अगदी अविस्मरणीय होतं. बघितलं नसेल तर अगदी आवर्जून पाहायला जावं, असं हे ठिकाण आहे. या सर्व जागेची उत्तम निगा राखलेली आहे. 

आता जवळपास एक वाजत आला होता. मग तिथंच समोर एका हॉटेलमध्ये जेवलो आणि ऑर्थरसीट पॉइंटकडं निघालो. तिकडं जाताना तर संपूर्ण धुकं होतं. पार्किंग लाइट्स आणि हेडलाइट्स लावूनच गाडी चालवावी लागत होती. अतिशय कमाल वातावरण होतं. इथं ऐन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आल्याचं सार्थक झालं होतं. ऑर्थर सीट पॉइंटजवळ गाड्यांची लाइन होती. पण मी शेवटपर्यंत गाडी नेली आणि नशिबानं तिथं पार्किंगला जागा मिळाली. मग आम्ही तिथून पॉइंटकडं निघालो. अक्षरश: दहा फुटांपुढचं काही दिसत नव्हतं. दरीच काय, सगळा आसमंत ढगांनी भरला होता. झाडं ओलीचिंब झाली होती. वास्तविक तिथं थंड पेयं विकायला बरेच जण बसले होते. मात्र, आता त्यांच्याकडं चहा-कॉफीची मागणी व्हायला लागली होती.
पुढं टायगर पॉइंटजवळ नीलला तो एक-दोन वर्षांचा असताना, एका दगडावर बसवून फोटो काढला होता. आताही तो दगड तिथं आहे का, याची मला उत्सुकता होती. सुदैवानं तो दगड तिथंच होता. मग नीलला तिथंच, तशाच पोझमध्ये बसवून फोटो काढला. पुढं अगदी ऑर्थर सीट पॉइंटपर्यंत धुक्यातूनच सगळा प्रवास झाला. अगदी त्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन, फोटो काढले. तिथं जरा वेळ बसलो. पावसाळी हवेमुळं असेल, पण नेहमीपेक्षा माकडांचा उपद्रव जरा कमी होता. 
येताना चहासाठी एका टपरीवर थांबलो. तिथल्या मुलानं सांगितलं, की हे असं वातावरण आत्ता दोन दिवसांपासून आहे. कुठल्या तरी झाडाकडं बोट दाखवून ‘हे झाड असं ओलं दिसतंय तर यंदा जोरदार पाऊस येणार’ असं भाकीतही त्यानं वर्तवलं. ‘येऊ दे बाबा’ म्हणालो आणि परतीची वाट धरली.
आता इथून परतताना पुन्हा ट्रॅफिक जॅम लागलंच. महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताना पुन्हा तिथला माणूस पास मागणार, अशी भीती होती. तसंच झालं. मात्र, ‘कालच आलोय इथं, आज क्षेत्र महाबळेश्वरला गेलो होतो,’ असं जोरात सांगितलं. त्याला गाडीत तिथली पावती दिसली. मग लगेच सोडलं. मग थेट रिसॉर्टवर गेलो आणि ताणून दिली. संध्याकाळी तुलनेनं जवळ असलेल्या लॉडविक पॉइंट किंवा हत्तीमाथा पॉइंटला जायचं ठरवलं. मी अनेकदा इथं आलो असलो, तरी हा पॉइंट पाहायचा राहून गेला होता. आमच्या रिसॉर्टपासून हा पॉइंट अगदी दोन-तीन किलोमीटर एवढा जवळ होता. तिथं गेलो. वाहनतळापासून आत चालत जायचं होतं. मग रमत-गमत तिकडं गेलो. तिथंही तोवर पूर्ण धुक्याची चादर पसरली होती. पीटर लॉडविक हा महाबळेश्वरवर पहिलं पाऊल ठेवणारा इंग्रज माणूस. त्याच्या स्मृत्यर्थ इथं एक स्तंभ उभारला आहे. मध्यंतरी तो वीज पडून कोसळला तेव्हा महाबळेश्वर हॉटेल ओनर्स असोसिएशननं वर्गणी काढून तो पुन्हा उभारला आणि त्यावर वीज प्रतिबंधक यंत्रणाही बसवली आहे. इथून पुढं तीनशे मीटरवर हत्तीमाथा पॉइंट होता. मग तिथवर गेलो. मात्र, धुक्यामुळं आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. अर्थात वातावरण भन्नाटच होतं. आता जवळपास साडेसहा वाजून गेले होते. मग माघारी फिरलो.
पुन्हा मार्केटमध्ये गेलो. या वेळी अलीकडच्या वाहनतळावर जागा मिळाली. मग चालत मार्केट फिरलो. आज नझीरभाईंकडं ‘स्ट्रॉबेरी विथ क्रीम’ खायचंच होतं. ते खाऊन झाल्यावर थोडा वेळ परत फिरलो. मग शेजारच्या हॉटेलमध्ये साधंसं जेवलो व रिसॉर्टवर परतलो. आजचा दिवस मस्त भटकंती झाली होती आणि धुक्यामुळं जो काही ‘सुकून’ मिळाला होता, त्याचं वर्णन करणं अशक्य!
सकाळी आणि संध्याकाळी मी आमच्या सूटसमोरच्या रस्त्यावर शतपावली करायचो. वर जाणारा रस्ता ‘राजभवना’कडं जातो. मी पहिल्याच दिवशी तिथपर्यंत चक्कर मारून आलो. इतर सूटमध्ये राहणारे अनेक पर्यटक घोळक्यानं या रस्त्यावर फिरताना दिसायचे. आजूबाजूला माकडं भरपूर. ती आपल्या कारवरदेखील चढून बसतात. त्यामुळं तिथं वावरताना हे भान सतत बाळगावं लागतं. 

तिसऱ्या दिवशी आम्ही चेकआउट करणार होतो. सकाळी उपमा, इडली असा ब्रेकफास्ट झाला. बरोबर दहा वाजता रिसॉर्ट सोडलं. आम्हाला काही घाई नव्हती. येताना थांबत थांबत आम्ही येणार होतो. फक्त वरच्या ‘मॅप्रो’त न थांबता खाली वाईच्या पुढं झालेल्या त्यांच्या फॅक्टरीजवळच्या ‘मॅप्रो’त थांबायचं ठरवलं होतं. वरच्या ‘मॅप्रो’बाहेर फक्त स्ट्रॉबेरी घेतल्या. पुढं मेटगुताड इथं डोंगरावर विनीत केंजळे यांचं ‘व्हिंटेज माइल्स म्युझियम’ बघितलं. इथं सर्व प्रकारच्या दुचाकींचं अप्रतिम कलेक्शन आहे. दोन मोठ्या शेड्स आहेत. तिथं साधारण दोनशे ते तीनशे तरी दुचाकींची मॉडेल ठेवली आहेत. तिथं ‘लक्ष्मी ४८’ गाडी बघून मला फारच आनंद झाला. आमच्या जामखेडच्या घरी काकाकडं ही गाडी होती. लहानपणी या गाडीवरून चक्कर मारायची, हा माझा नेहमीचा कार्यक्रम असायचा. कोल्हापूरच्या घाटगे इंडस्ट्रीजनं ही गाडी काढली होती. तिला दोनच गिअर होते. तिचं वैशिष्ट्य म्हणजे, पायडल उलटं फिरवलं की तिचे ब्रेक लागायचे. ही गाडी ज्याला चालवायला यायची त्याला यायची. बाकी कुणाला ती चालवणं जमायचं नाही. ही गाडी दिसल्यानं मला एकदम लहानपण आठवलं. या प्रदर्शनाच्या तिकिटासाठी दिलेले शंभर रुपये तिथंच वसूल झाले. मग नंतर आमच्याकडं एके काळी असलेल्या लूना, एमटी-८०, बॉक्सर अशा सगळ्या दुचाकी गाड्या नीलला दाखवल्या. या प्रदर्शनात परदेशांतील, आपल्या देशातील विविध राज्यांतील अशा अनेक प्रकारच्या दुचाकी बघायला मिळतात. केंजळे यांना आता हे प्रदर्शन आणखी वाढवायचंय. अजून बघितलं नसेल तर अगदी आवर्जून बघा. या ट्रिपमधलं हे नवं फाइंड!
पुढं चीझ फॅक्टरीला थांबलो. पण ते प्रॉडक्शन नेमकं मंगळवारी बंद असतं म्हणे. मग तिथं जामुन शॉट घेतले. सिरप आदी खरेदी झाली. पुढं पाचगणीला टेबललँडला थांबलो. इथं घोडेवाले अगदी मागं लागले होते. त्यांचा ससेमिरा (की घोडेमिरा?) चुकवत चालत पुढं निघालो. इथं पांडव केव्हज आहेत त्या खाली उतरून कधी बघितल्या नव्हत्या. मग खाली उतरून त्या पाहून आलो. तिथं एक रेस्टॉरंट आहे. अतिशय छान जागा आहे. आत एका अरुंद जागेतून एक चक्कर मारता येते. तिथं शंकराची मूर्ती ठेवली आहे. पंधरा रुपये दरडोई तिकीट ठेवलं आहे. पण तिथंही स्कॅनर वगैरे आहे. सरबत घेतलं तिथंही स्कॅनरनं पैसे दिले. आपलं यूपीआय असं जंगलात, गुहेत पोचलेलं बघून फारच भारी वाटलं. तिथून त्या दगडी पायऱ्या चढून वर आलो. तिथं दोन वृद्ध गृहस्थ दुर्बिणी घेऊन बसले होते. ‘पन्नास रुपयांत पाच पॉइंट दुर्बिणीतून दाखवतो’ असं म्हणाले. मग मी नीलला दाखवा, म्हटलं. त्यांनी जोडीनं आम्हालाही सगळी माहिती दिली. पांढरी दाढी असलेले ते गृहस्थ माहितगार वाटत होते. इथून पुढं टायगर केव्हज नावाचा एक पॉइंट होता. मात्र, तिथं जायचा कंटाळा आला आणि आम्ही परत फिरलो. पाचगणीतून निघालो आणि घाट उतरून वाईत थांबलो. नातू फार्मला अनेकदा थांबून जेवलोय. आताही तिथंच थांबलो आणि मस्त थालीपीठ खाल्लं. मग वाईत जाऊन महागणपतीचं दर्शन घेणं मस्टच. अगदी शांतपणे, छान दर्शन झालं. तिथून मग ‘मॅप्रो फॅक्टरी’त थांबलो. इथं बरेच साहसी खेळ वगैरे आहेत. नीलला तिथं स्काय सायकल चालवायची होती. ती चालवून झाली. मग सँडविचचं पार्सल घेतलं आणि गाडी सुसाट पुण्याच्या दिशेनं सोडली.
येताना फारशी वाहतूक कोंडी लागली नाही. मात्र, सातारा रस्त्यावर अजूनही ठिकठिकाणी उड्डाणपूल, बायपास असली कामं सुरूच आहेत. हा रस्ता संपूर्णपणे एकदम दुरुस्त कधी होणार देव जाणे!
पुण्यात शिरलो आणि गरमागरम हवेनं आमचं स्वागत केलं. धुक्यातला ‘सुकून’ विरला होता आणि उन्हानं सुकून जाणं तेवढं उरलं होतं...

----

(महाबळेश्वरचे फोटो पाहण्यासाठी माझ्या फेसबुक वॉलला भेट द्या.)

-----

अशोक रानडे - कृतज्ञता

आमची ‘रानडे इन्स्टिट्यूट’
--------------------------------


शनिवारी (२५ मे) रोजी दुपारी दीडच्या सुमारास ‘सकाळ मनी’चे संपादक आणि माझे एके काळचे ज्येष्ठ सहकारी मुकुंद लेले यांचा व्हॉट्सअपवर मेसेज आला. ‘अशोक रानडे गेले’ असं त्यात लिहिलं होतं. मला हा धक्काच होता. याचं कारण अगदी एक-दोन महिन्यांपूर्वीच रानडेंची मुलगी अरुंधती आमच्या ऑफिसला आली होती, तेव्हाच रानडेंचा विषय निघाला होता. मी त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली होती. मात्र, तेव्हा ते काही खूप आजारी वगैरे असे नव्हते. त्यांना दीर्घ काळ मधुमेह होता, ही गोष्ट खरी होती. मात्र, तरीही शनिवारी त्यांच्या जाण्याने अगदीच धक्का बसला. 


दुसऱ्या दिवशी अनेकांनी रानडेंविषयी फेसबुकवर भरभरून लिहिलं. त्यात माझे अनेक सहकारी होते. ते सगळं वाचत असताना माझं मन २६-२७ वर्षं मागं गेलं. 
मी एक सप्टेंबर १९९७ रोजी ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. त्यापूर्वी अल्प काळ मी ‘लोकसत्ता’त काम केलं होतं. मात्र, ‘सकाळ’मध्ये आल्यानंतर अनेक दिग्गजांची ओळख झाली. ज्यांची नावं आपण लहानपणापासून पेपरमध्ये वाचत आलोय, अशा मंडळींसोबत आता काम करायला मिळणार, हा आनंद काही वेगळाच होता. कुवळेकरसाहेब, पाध्येसाहेब, राजीव साबडे, अशोक रानडे, वरुणराज भिडे, प्रल्हाद सावंत, शशिकांत भागवत, विजय साळुंके, मल्हार अरणकल्ले अशी सर्व मंडळी आम्हाला सीनियर होती. यातील राजीव साबडे सरांकडे आमची बॅच सोपवण्यात आली. एकेक आठवडा एकेका विभागात आम्ही काम करू लागलो. तेव्हा डेस्कवर विजय साळुंके, अशोक रानडे, मुकुंद मोघे, यमाजी मालकर, लक्ष्मण रत्नपारखे, चंद्रशेखर पटवर्धन, अनिल पवार, नवनीत देशपांडे, उदय हर्डीकर, गोपाळ जोशी, मुकुंद लेले, वर्षा कुलकर्णी, स्वाती राजे, स्वाती महाळंक, नयना निर्गुण, मीना संभू आदी मंडळी कामाला असायची. यापैकी रानडेंचा दरारा आम्ही पहिल्याच आठवड्यात ऐकला आणि पाहिला. 
रानडेंना ‘सर’ वगैरे म्हटलेलं आवडायचं नाही. आताही मी त्यांचा उल्लेख ‘रानडे’ असाच करतोय. मात्र, यात अनादर नसून, त्यांनीच घालून दिलेली शिस्त आहे. ऑफिसमध्ये संपादक आणि वृत्तसंपादक हेच दोन साहेब, असं त्यांचं म्हणणं असे. तेव्हा ‘सकाळ’मध्ये ‘सर’ असं कुणी म्हणायचंही नाही. संपादकांना ‘साहेब’ असंच म्हणण्याची पद्धत होती. रानडेंचा अचूकतेचा आग्रह, शब्दांची योग्य निवड करण्याची हातोटी, अनावश्यक अलंकृत भाषा वापरण्याची नावड, शुद्धलेखन वा प्रमाणलेखनाची त्यांची शिस्त याविषयी बहुतेकांनी लिहिलंच आहे. रानडेंची ती ओळखच होती. अगदी साप्ताहिक मीटिंगमध्ये एखाद्या शब्दाविषयी काही वाद निर्माण झाला, तर संपादकही ‘रानडे सांगतील तसं करा’ असं सांगायचे. रानडेंचा शब्द अंतिम असायचा. रानडेंचा दरारा बघून ‘असं का?’ ‘तसंच का?’ हे उलट विचारायची आमची हिंमत नव्हती. ते सांगतील ते आम्ही गुपचूप ऐकत गेलो. अर्थात विचारलं असतं, तरी त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं असतील, याबद्दल सर्वांना खात्री असायची. ‘एव्हरेस्ट सर केलेल्या हृषीकेश चव्हाण यांनी...’ अशा पद्धतीची वाक्यरचना चूक आहे, हे मला पहिल्यांदा रानडेंकडून कळलं. त्यांचं म्हणणं, हृषीकेश चव्हाण हे पुरुष आहेत तर ‘एव्हरेस्ट सर केलेले हृषीकेश चव्हाण यांनी...’ असंच लिहायला हवं. तिथं स्त्री असेल तर उदा. ‘एव्हरेस्ट सर केलेल्या बचेंद्री पाल यांनी...’ ही वाक्यरचना योग्य ठरेल. तुम्हाला अगदी ‘एव्हरेस्ट सर केलेल्या’ असंच लिहायचं असेल तर पुढं ‘हृषीकेश चव्हाण यांनी...’ याऐवजी ‘हृषीकेश चव्हाणांनी’ असे लिहा, असं त्यांनी सांगितलं होतं. थोडक्यात, एखादे वाक्य लिहिताना किती बारकाईने विचार करायचा असतो, हे आम्हाला रानडेंकडून (खरं तर त्यांच्याच सांगण्यानुसार, ‘रानड्यांकडून’) समजलं. तीच गोष्ट निधनाच्या बातमीची. ‘अमुक तमुक यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अमुक ठिकाणी अंत्यसंस्कार झाले,’ अशा क्रमाने बातमी लिहिली, की रानडे चिडायचे. ते म्हणायचे, ‘अहो, याचा अर्थ त्यांच्या पत्नी, मुले व नातवंडांवर अंत्यसंस्कार झाले असा होतो. त्यामुळे ते वाक्य संपलं, की पुन्हा अमुक तमुक यांचं नाव लिहून मग त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, असं लिहायला पाहिजे.’ 
मग वाटायचं, आपण शाळेत नक्की मराठी शिकलो की नाही?
‘सकाळ’मध्ये अनेक वर्षं रात्री ८ ते २ अशी मुख्य उपसंपादकांची ड्युटी असे. रानडे या ड्युटीला येत तेव्हा रात्रपाळीचे आर्टिस्ट आपल्याला घरी जायला तीन वाजणार आहेत, याची खूणगाठ बांधूनच ऑफिसला येत. रानडे पान १ अत्यंत बारकाईने वाचत. एकाही ओळीत, एकाही शब्दात चूक झालेली त्यांना खपत नसे. तेव्हा वेगळ्या पुरवण्या रोज नसायच्या. एक ते १६ पानी सलग ब्लॅक अँड व्हाइट अंक असायचा. प्रिंटिंग सुरू झाल्यावर ताजा ताजा अंक तेथील कर्मचारी वर आणून देत. तो अक्षरश: गरमागरम, ताजा अंक सगळा उलगडून नीट वाचावा लागे. पानांचे नंबर, तारीख-वार, वाढावे (मजकुराचे पुढल्या पानांवर दिलेले कंटिन्युएशन) हे सगळं बरोबर आहे ना, हे तपासून मग त्या अंकावर मुख्य उपसंपादकाला सही करावी लागे. तो सही केलेला अंक मग तो कर्मचारी खाली घेऊन जात असे आणि मग मशिनचा स्पीड धाडधाड वाढून अंक वेगाने छापला जात असे. अशा अंकावर सही करून झाली, की रानडे मंडईत जायला निघत. आम्हीही त्यांच्याबरोबर जायचो. रानडे टिळक रोडला राहायचे. त्यांनी कधीही वाहन वापरलं नाही. मग काही सहकारी त्यांना डबलसीट घेऊन मंडईत येत. तिथं तिखटजाळ सँपल आणि पाव खायचा त्यांचा बेत असे. रात्रपाळी करून पहाटे तीन वाजता सँपल-पाव खाणारे रानडे हे एक अचाट गृहस्थ होते. त्यांच्या अचाटपणाची कथा इथंच संपत नाही. यानंतर आम्ही २०-२२ वर्षांचे ‘तरुण’ थकल्या-भागल्या अवस्थेत कधी रूमवर जाऊन पडतो, अशा बेताला आलेले असताना रानडे मात्र ‘चला, सिंहगडावर जाऊन येऊ’ असं म्हणायचे तेव्हा आमच्या डोळ्यांसमोर अंधारीच यायची. रानडे मात्र खरोखर तिथून चालत सिंहगड वगैरे फिरून येत, अनेकदा ते चालत कोकणात उतरत आणि किनारपट्टी वगैरे भटकून मग दोन-तीन दिवसांनी परत येत. त्यांच्याबरोबर चालायला जायचा योग मला कधी आला नाही. मात्र, ज्यांना आला त्यांच्यासाठी तो कायमचा लक्षात राहणारा अनुभव ठरला असेल यात वाद नाही. ऑफिसमधले रानडे वेगळे होते आणि ऑफिसबाहेरचे रानडे वेगळे होते. कधी तरी एखादाच मिश्कील, पण मार्मिक शेरा ते असा मारायचे, की त्यातूनही त्यांच्या बुद्धिमान स्वभावाची झलक दिसायची. पं. जितेंद्र अभिषेकी गेले, तेव्हा रानडेंनी अग्रलेख लिहिला होता. ‘स्वराभिषेक थांबला...’ असं त्याचं शीर्षक होतं, हे मला आजही आठवतं. साधं-सरळ, पण नेमकं असं शीर्षक. उगाच आलंकारिक, भरजरी शब्दांचा सोस नाही. हा अग्रलेख लिहून झाल्यावर त्यांनी तो मला नजरेखालून घालायला सांगितला होता, तेव्हा ‘परुळेकर पुरस्कार’ मिळाल्याएवढा आनंद मला झाला होता!
रानडे संगीतातील मोठे जाणकार होते. ते स्वत: उत्तम तबला वाजवत. स्वाभाविकच ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची बातमी व रसग्रहण (नंतर फक्त रसग्रहण) तेच करणार, ही काळ्या दगडावरची रेघ असायची. तेव्हा सवाई गंधर्व महोत्सव रात्र रात्र चाले. उशिरातील उशिरा झालेल्या गायन वा वादनाची बातमी अंकात घालविण्याचा तेव्हा आमचा अट्टहास असे. रानडे तिथंच पत्रकार कक्षात बसून बातमी लिहीत. तेव्हा कागदावर पेननं बातमी लिहावी लागायची. मग ऑफिसबॉय ती कॉपी न्यायला तिथं यायचे. ती बातमी मग ऑफिसला जाऊन, ऑपरेट होऊन, प्रूफरीडिंग होऊन पानात लागायची आणि तो ताजा अंक पहाटे चार वाजता ‘सवाई मंडपा’त यायचा. अगदी तीन-चार तासांपूर्वी झालेल्या मैफलीची साद्यंत बातमी रसिकांना ती मैफल अजूनही सुरूच असताना वाचायला मिळायची. रानडेंचा कान अगदी तयार होता. अवास्तव, फालतू कौतुक त्यांना आवडत नसे. ‘पंडित’ ही उपाधी कुणामागे लावावी, याविषयी त्यांची ठाम मतं होती. त्यामुळं कुणाच्याही मागे पंडित लिहिताना आजही माझा हात थरथरतो आणि रानडेंची आठवण येते. 
नंतरच्या टप्प्यात रानडेंकडं सातारा आवृत्तीची जबाबदारी आली. ती त्यांनी एवढ्या तळमळीनं निभावली, की खरोखर कमाल वाटते. श्रीकांत कात्रे, चिंचकर, साळुंके, सोळसकर, बापू शिंदे आदी आमचे सर्व सीनियर-ज्युनिअर सहकारी रानडेंच्या करड्या शिस्तीत तावून-सुलाखून तयार झाले. तेव्हा या सर्वांना आम्ही चिडवायचो. ‘रानडेंचा सासुरवास सोसा’ म्हणायचो. मात्र, त्यांची कामातली कमिटमेंटही आम्ही पाहत होतो. जे काम वरिष्ठांनी सोपवलं आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने, सचोटीने करायचं हा एक मोठाच धडा त्यांनी आपल्या वागणुकीतून घालून दिला होता. रानडेंच्या शिस्तीला जुने सहकारीही वचकून असत, तर नव्या सहकाऱ्यांचा प्रश्नच नसायचा. एकेका वाक्यासाठी त्यांनी अर्धा अर्धा तास एखाद्या नव्या मुलाला पिळून काढलेलं आहे. अर्थात ती चूक पुन्हा त्या मुलाकडून आयुष्यात कधीही होत नसे, हे सांगायला नको. भाषांतर करताना एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला, तर रानडे स्वत: सांगायचे नाहीत. डिक्शनरी बघायला सांगायचे. एखादा संदर्भ विचारला, तर थेट सांगायचे नाहीत. ‘ग्रंथालयात जाऊन शोधा,’ असं म्हणायचे. तेव्हा त्यांचा राग यायचा; पण आज या शिकवणुकीचं मोल कळतं आणि नकळत डोळे पाणावतात. वास्तविक, इतर चार सहकाऱ्यांसारखे तेही ‘आपण बरं की आपलं काम बरं’ अशा पद्धतीने काम करू शकले असते. मात्र, त्यांनी पुढची पिढी घडवली. अक्षरश: मातीच्या गोळ्याला आकार द्यावा, तशी घडवली. आज मी (नेहा लिमयेसोबत) ‘लिहू या बिनचूक मराठी’सारखं पुस्तक लिहायचं धाडस केलं, त्यामागे रानडेंनी आमच्यावर घेतलेल्या त्या निरपेक्ष कष्टांचा वाटा मोठा आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यांना ते नेऊन द्यावं, अशी माझी फार इच्छा होती. मात्र, एकीकडं धीरही होत नव्हता. या पुस्तकात त्यांनी काही चुका काढल्या तर, अशी भीती वाटायची. अर्थात पुस्तकाच्या निमित्ताने त्यांना भेटायचं आणि आशीर्वाद घ्यायचे, हे नक्की ठरलं होतं. मात्र, ते आता राहूनच गेलं.
मग वाटलं, रानडे शरीरानं फक्त गेले. आपण जोवर मराठी शब्द वापरत राहू तोवर ते आता आपल्या मेंदूत, अंतर्मनात, खोल कुठे तरी असणारच आहेत.
रानडे, तुमच्याविषयी ही कृतज्ञ शब्दांजली! काही चुकलं असल्यास माफ करा...

--------

(शीर्षकाविषयी - पुण्यात विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग फर्ग्युसन रोडवर ज्या वास्तूत आहे, ती ‘रानडे इन्स्टिट्यूट’ म्हणून ओळखली जाते. पुण्यातले बहुतेक पत्रकार तिथं शिकलेले असल्यानं सर्वच जण ‘रानडे इन्स्टिट्यूट’चे विद्यार्थी आहेत. आम्ही नव्वदच्या दशकात ‘सकाळ’मध्ये काम करणारे काही सहकारी मात्र अधिक भाग्यवान; कारण आम्हाला अशोक श्री. रानडे यांच्याकडं शिकायला मिळालं. रानडे स्वत: एक इन्स्टिट्यूटच होते. त्यामुळं दोन्ही अर्थ सांगणारं हे शीर्षक...)

-----