28 Mar 2024

अक्षरधारा दिवाळी अंक २३ लेख - भाग २

‘हास्यजत्रा’ हेच जगणं...
---------------------------------------------------------

- सांगतोय समीर चौघुले


रसिकहो, नमस्कार! अक्षरधाराच्या दिवाळी उपक्रमात आपलं स्वागत आहे. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेछा! यंदाच्या अंकामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरच्या धमाल, विनोदी आणि लोकप्रिय अशा कार्यक्रमाच्या काही कलाकारांबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि या कार्यक्रमातील सर्वांत महत्त्वाचा अभिनेता आणि लोकप्रिय स्किटस्टार समीर चौघुले यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. 

श्रीपाद ब्रह्मे : समीर नमस्कार!

समीर चौघुले : नमस्कार!

श्रीपाद ब्रह्मे : खरं तर तुला समीरदादा म्हणायला हवं! हे विशेषण त्याला सर्वच बाबतीत लागू आहे असं मी म्हणेन. कारण तो लेखक आहे, अभिनेता आहे आणि त्याने ‘हास्यजत्रे’चा शो एकहाती पेलतोय. अर्थात हे टीमवर्क आहे हे तो सांगेलच. कलाकार आहे, दिग्दर्शक आहे पण… हा पणही महत्त्वाचा आहे कारण या पण नंतरही समीर चौघुले बरेच उरतात. तर समीर खूप खूप स्वागत आहे आणि दिवाळीच्या शुभेछा देतो. 

समीर चौघुले : खूप खूप शुभेछा!

श्रीपाद ब्रह्मे : हास्यजत्रा ही नशा आहे, असं मी म्हणतो. प्रेक्षकांना ही नशा आहे तर ती सादर करणाऱ्याला किती असेल! काय आहे ही नशा?

समीर चौघुले : तुमच्यासाठी नशा असेल, आमच्यासाठी जगणं आहे ते! दिवसरात्र ‘हास्यजत्रा’ आमच्या डोक्यात असते. एखादा कार्यक्रम तुमच्या आयुष्यात असा येतो, की तुमच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळून जाते. हा तो कार्यक्रम आहे. ज्याला प्रेक्षकांचा आश्रयसुद्धा मिळाला, फार मोठमोठ्या कलाकारांनी वाहवा पण केली. असा एखादाच कार्यक्रम असतो, की जो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. आत्ता आम्ही अमेरिकेचा दौरा केला, इतर ठिकाणी दौरे केलेत तिथे आम्ही विस्मयचकित होतो, की हा एवढा कार्यक्रम कसा पोहोचू शकतो! तर त्यामुळेच ‘हास्यजत्रा’ आमचं जगणं आहे. खाताना, झोपतानासुद्धा आमचा दुसरा मेंदू सतत ‘हास्यजत्रे’चाच विचार करत असतो. तुम्ही जे मघाशी म्हणालात की मी एकहाती सगळं पेलतो, तसं खरंच नाहीय. कुठलाही कार्यक्रम एक माणूस तारून नाही नेऊ शकत. ते टीमवर्कच असतं. मी मनाचा मोठेपणा दाखवून बोलतोय असं काही नाहीये, कारण दॅट्स अ फॅक्ट! कारण ‘हास्यजत्रे’चे सातशे एपिसोड ही खूप कठीण गोष्ट आहे आणि जी मी रोज अनुभवतो. म्हणजे एक परफॉर्मन्स झाल्यावर, सई-प्रसादने कौतुक केल्यावर तो विषय तिथेच संपतो. आम्ही त्या सोफ्यावर जाऊन बसतो आणि पुढचा विचार येतो. प्रसाद खांडेकर म्हणतो, ‘अरे, उद्या काय करायचं? उद्या पाटी कोरी आहे आपली.’ कारण दर वेळेला तुम्हाला एक पायरी चढायचीच असते. ‘हास्यजत्रा’ लोकांना एवढं आवडतंय, त्याचं एवढं नाव झालंय, की एक पायरी खाली नाही येऊ शकत तुम्ही. निदान तुम्हाला त्या पायरीवरच राहावं लागतं किंवा एक पायरी वर जायला लागतं. या ज्या अपेक्षा असतात ना त्याचं खूप मोठं प्रेशर असतं. आम्ही खूप जबाबदार झालो आहोत त्यामुळे. ‘हास्यजत्रे’ने लोकांची आयुष्यं बदललीयेत. जेव्हा तुम्ही खरंच लोकांची आयुष्यं बदलता, तेव्हा जबाबदारीही वाढते. अनेक लोकांच्या आयुष्यात खूप नैराश्य आलेलं असतं, तेव्हा ते लोक ‘हास्यजत्रे’कडे एक उपाय म्हणून बघतात. अनेक कॅन्सर पेशंट, आत्महत्येचा विचार करणाऱ्या अनेक लोकांना ‘हास्यजत्रे’ने थांबावलेलं आहे. तशी पत्रं आलेली आहेत आमच्याकडे! अशी पत्रं जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा आम्ही कलाकार, आमची कोअर टीम हाच विचार करत असते, की हे सोपं नाहीये. यासाठी खूप जास्त मेहनत केली पाहिजे. काल आम्हाला इथे  शब्दश: रात्रीचे दीड-दोन वाजले. सकाळी पाच वाजता उठलो. दोन तास झोपलो. जे स्क्रिप्ट मला थोडं कच्चं वाटत होतं ते लिहिलं. आणि आज ते उत्तम झालं. त्यामुळे मी रिलॅक्स झालो. हा आनंद मी तुम्हाला नाही सांगू शकत, की तो काय असेल! तर ही अशी ती गंमत आहे. 

श्रीपाद ब्रह्मे : ‘हास्यजत्रा’ बाकी सर्व विनोदी कार्यक्रमांपेक्षा वेगळी कशी ठरते? 

समीर चौघुले : आम्ही सर्व जण आधी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ नावाचा कार्यक्रम करायचो. सत्तर टक्के हीच टीम होती. आम्ही हेच काम करायचो. पण त्याचे चारशे-साडेचारशे एपिसोड झाल्यावर, आपण एखादी गोष्ट रोज केल्यानंतर, काय केल्यानंतर ते इफेक्टिव्ह होईल, लोकांना काय आवडेल याचे ठोकताळे आम्हाला कळायला लागले. त्यानंतर मध्ये एक-दोन वर्षांची गॅप गेली आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आली. तेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ करताना याआधी आम्ही केलेल्या सर्वं चुकांचं आम्ही त्रैराशिक मांडलं. आमच्या लक्षात आलं, की जर आपण लोकांना सीट-कॉम (सिच्युएशनल कॉमेडी) दिलं, जिथे कोणा एकाला हीरो न करता सिच्युएशन हाच हिरो असेल, स्किट हिरो असेल! आणि ते आमच्या डोक्यातून बिलकुल खाली पडू देत नाही आम्ही. आणि म्हणूनच स्किटचे विषय लोकांना खूप आपलेसे वाटतात. ठेच लागत लागतच आम्ही सगळं शिकत गेलो. वाईटातून चांगलं होणं असं जे म्हणतात ते आमच्या बाबतीत करोनामुळे झालं. करोनात आजूबाजूला इतकं नैराश्य होतं, त्या काळात ‘हास्यजत्रे’ने लोकांसाठी नवसंजीवनीसारखं काम केलं आहे. जेवढी लोकप्रियता करोनाकाळात ‘हास्यजत्रे’ला मिळाली तेवढी आधी नव्हती. अनेक ठिकाणी ‘लाफ्टर थेरपी’ म्हणून हास्यजत्रेची स्किट्स दाखवली आहेत. संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ दरम्यान अनेक कोव्हिड सेंटरमध्ये स्क्रीन्स ‘सोनी मराठी’ने पुरवली आहेत. ‘सोनी मराठी’ने खूप मोठं काम केलंय या काळात. प्लाझ्मा आणि एलसीडी पुरवल्यात अनेक कोव्हिड सेंटरमध्ये. माणसं हसली की ती लवकर बरी होतात, हा वैज्ञानिक नियम आहे. हे कार्य नकळतपणे घडत गेलं, मुद्दाम ठरवून नव्हतं केलेलं! प्रामाणिकपणे या सर्व गोष्टी आम्ही आमच्या परीने करत गेलो. पहिल्या महायुद्धानंतरही असंच झालं होतं. त्या काळात प्रचंड गरिबी होती, दु:ख होतं. अशा परिस्थितीत चार्ली चॅप्लिनने जगाला हसवलं. तो फाटका होता म्हणून तो आपलासा वाटला. तो श्रीमंत, राजबिंडा असता तर तो आपल्यातला वाटला नसता. विशाखा आणि मी जे ऑफिसचं स्किट करायचो, तेव्हा अनेक एम्प्लॉईजना मनात असतं, की आपल्या बॉसला उत्तर द्यायचं; पण त्या हुद्द्यामुळे उत्तर देऊ शकत नव्हतो, पण त्याला मी एक वाट करून दिली. त्यामुळे लोकांना ते विषय आपलेसे वाटतात. लोकांनी जे सहसा अनुभवलेलं असतं तेच त्यांना जास्त रिलेट होतं आणि हाच फॉर्म्युला आम्ही तिकडे ‘हास्यजत्रे’त वापरतो. मी एक स्किट केलं होतं, त्यात एक लग्नाची पंगत असते. त्यात मला खायला काही मिळतच नाही शेवटपर्यंत. हे असं प्रत्येकाच्या बाबतीत झालेलं आहे. माझ्या मते हीच खासियत आहे ‘हास्यजत्रे’ची! हा एकमेव कार्यक्रम असा आहे, की दोन-तीन पिढ्या एकत्र मिळून हा कार्यक्रम बघतात. हे फार मोठं काम आहे आजच्या घडीला असं मला वाटतं. आम्ही जेव्हा अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा एक बाईने मला सांगितलं, की तिच्या मुलाने जो इंग्लिश माध्यमात शिकतो, त्याने तिला विचारलं की, 'ममा व्हॉट डू यू मीन बाय संभ्रमात?' माझ्या डोळ्यात पाणीच आलं त्यामुळे.’ हास्यजत्रेमुळे मुलं मराठी बघू लागली जी मुलं आधी फक्त इंग्लिश सीरीजच बघायची, ती मुलं आता त्यांना अडलेल्या मराठी शब्दांचे अर्थ त्यांच्या पालकांना विचारू लागली. आणि हे सगळं नकळतपणे ‘हास्यजत्रे’मुळे होतंय याचा आम्हाला आनंद आहे. लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या म्हणून आम्ही तेवढे जबाबदार झालो आहोत. या सर्व गोष्टींमागे प्रेक्षक आहेत.

श्रीपाद ब्रह्मे : ‘हास्यजत्रा’मधला विनोद निखळ आहे किंवा निर्विष आहे, असं म्हणू या. हा विनोदाचा दर्जा तुम्ही कसा टिकवता?

समीर चौघुले : याबाबत मला सर्वांत जास्त आभार मानायचे आहेत अजय (भाळवणकर) सरांचे. त्यांचं सुरुवातीपासूनच म्हणणं होतं, की हा शो आपल्याला कुटुंबासाठी करायचाय. स्किट सर्व कुटुंबाला एकत्र बघता आले पाहिजेत. त्यात कोणाला ऑकवर्ड नाही वाटलं पाहिजे. कमरेखालचे विनोद करणं किंवा द्व्यअर्थी विनोद करणं खूप सोपं असतं. निर्विष आणि निखळ विनोद करणं कठीण असतं. ते आव्हानात्मक आहे, त्यामुळे ते करण्यात जास्त मजा आहे. तुम्ही मग आखून दिलेल्या वर्तुळाच्या बाहेर निघायचा सतत प्रयत्न करत राहता आणि त्या प्रयत्नांमधून चांगल्या गोष्टी घडतात. आमच्या टीमचा सतत तोच प्रयत्न असतो. काल जे झालं ते आज नाही करायचं. आज जे झालं आहे ते उद्या नाही करायचं, असं डोक्यात सतत चालू असतं. आमची जी दोन विद्यापीठं आहेत - गोस्वामी सर आणि मोटे सर - त्यांचा वचक असतो. काय करायचं नाही हे प्रकर्षाने सांगितलं जातं. ‘सहकुटुंब हसू या’ - ही जी आमची टॅगलाइन आहे - तसाच प्रयत्न आमचा चालू असतो. 

श्रीपाद ब्रह्मे : स्किट करताना कोण जास्त वरचढ असतं? तुझ्यातला लेखक की तुझ्यातला अभिनेता?

समीर चौघुले : आता जिथे लेखक कमी पडतो तिथे माझ्यातला अभिनेता धावून जातो मदतीला. नाही तर या दोन्ही गोष्टी पूरक असतात. लेखक म्हणून कधी कधी सुचत नाही ते अभिनेता म्हणून ‘ऑन द स्पॉट’ सुचतं. मी अभिनेता बाय प्रोफेशन आहे आणि लेखक बाय चॉइस आहे. मराठी लेखनात पैसा नाहीय; मात्र समाधान खूप आहे. पैसा नाही याची खंत आहेच. मी जे लिहीन त्याचा आनंद मला मिळाला पाहिजे. सुचणं हा प्रकार मला मी लेखक झाल्यापासून झाला. त्याच्यामागे अनेक वर्षं मी काम करतोय. २९ वर्षं मी काम करतोय. पाच हजार प्रयोग केलेत नाटकांचे. नाटकांच्या प्रयोगांनी मला खूप घडवलं. ‘यदाकदाचित’ नावाचं नाटक होतं त्याचे मी जवळजवळ तीन हजार प्रयोग केले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले आहेत. कधी कधी माइक बंद असतात. मध्येच एका माइकचा स्फोट झाला, साप आला, बैल घुसले… हे सगळं मी अनुभवलेलं आहे. तर त्यातून मी खूप तावून-सुलाखून निघालो. मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला, की नाटक पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आलं. मी नेहमी हे सांगत असतो, की नाटक तुम्हाला अलर्ट ठेवतं. नाटक हे ना एखाद्या नागमोडी वळणासारखं असतं. पुढे काय होईल हे त्या वेळेला नाही सांगत येत. पाचशेव्या प्रयोगाला तुम्ही ब्लॅंक होऊ शकता. मी स्वतः झालेलो आहे. म्हणून तर त्याला ‘प्रयोग’ म्हणतो आपण. आयुष्यात नाटक आल्याने ना माझी तयारी खूप झाली. मग पुढे चंद्रकांत कुलकर्णी, माझे गुरू विश्वास सोहोनी, सचिन मोटे-सचिन गोस्वामींसारख्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली. आणि त्यांनी माझ्यातल्या लेखकावर विश्वास ठेवला. निर्मिती सावंतमुळे खरं तर मी लेखक झालो. म्हणजे अगदी ऑफिशियली असं म्हणता येईल. एक मालिका होती ‘सतराशे साठ सासूबाई’ नावाची. त्यांना अर्जंट लेखक पाहिजे होता. मी अंग काढून घेत होतो, कारण मी मूळचा लेखक नाहीये. ते म्हणाले, ‘कर, तुला  येईल.’ मग त्याचे मी साडेतीनशे एपिसोड लिहिले. खरं सांगू, मला कोणी तयार केलं? अनेक कार्टून चॅनेल्स, जसं की निक (निकलोडिअन) - तर मी अनेक लहान मुलांच्या सीरियल्स लिहिल्या. कुरोचॅन, ऑगी अँड द कॉक्रोचेस, शिनचॅन मी लिहिलेली आहे जवळजवळ वर्षभर. अशा अनेक सीरियल मी दीड-दोन वर्षं लिहिल्यात. लहान मुलांचा विनोद खूप कठीण असतो करायला. तर या सगळ्यामुळे माझं लेखन खूप समृद्ध झालं. इतक्या वर्षांचा तो परिपाक आहे. एका रात्रीत सगळं आलं असं नाहीये ते. 

श्रीपाद ब्रह्मे : कधी असं झालंय का की दुसऱ्या एखाद्याने लिहिलेलं स्किट तुला पटत नाहीय किंवा तुला ते कन्व्हिन्स होत नाहीय?

समीर चौघुले : तसं नाही होत बिलकुल. पण कधी तरी तसं होऊ शकतं. काही काही स्किट्समध्ये असं होतं, की नाही अरे, समथिंग इज राँग! काल रात्री आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत मीटिंगमध्ये चर्चा करतो होतो, की हे ना कुठे तरी चुकतंय. हे आम्हाला माहीत होतं. मी कम्फर्टेबल नव्हतो, की सर, आपण हे नको करू यात. सर पण म्हणाले नको करू या. मग दुसऱ्या दिवशी सरांनी सांगितलं, की हे असं करून बघ, तसं करून बघ. हे आमचं सातत्याने चालू असतं. पहाटे लवकर उठून मी माझ्या मनासारखं लिहून घेतो. बऱ्याच वेळेला असं होतं की मला माझं स्किट लिहिताना माहीत असतं, की मी काय लिहिणार आहे, काय करणार आहे. म्हणजे बऱ्याचदा लोकांना कळत नाही, यात काय हसण्यासारखं! पण लिहिताना ते माझ्या डोक्यात असतं. डोअर फ्रेममध्ये कित्येकदा मी जिना चढून जातो, असं केलेलं आहे; पण अनोळखी व्यक्तीला ते वाचताना कळत नाही. स्क्रिप्टचं वाचन चालू असतानासुद्धा असं वाटतं, की हे बरोबर नाहीये. लिहिताना ते बरोबर वाटलं होतं. काही तरी चुकतंय. सूर चुकतोय कुठे तरी, असं वाटत राहतं. स्किट करताना हा सूर खूप महत्त्वाचा असतो. तो सूर चुकला ना की पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सगळं स्किट कोसळतं. हे मी अनुभवलेलं आहे अनेकदा. यशापेक्षा अपयश जास्त बघितलंय. स्किट पडताना काय होतं हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. पंधरा मिनिटं जरी असले तरी त्यामागे काही तास सुचायला लागलेले असतात. 
रिहर्सल असते तासन् तास. त्यामुळे एखाद्या अपत्याप्रमणे आम्ही त्याला वागवतो. ते नाही नीट झालं तर मी खूप नर्व्हस होतो. स्किट चांगलं झालं पाहिजे हाच विचार असतो सतत डोक्यात. जोपर्यंत एखादं स्किट मला पटत नाही  तोपर्यंत मी ते ‘ओके’ करायला पाठवत नाही. मीच कन्व्हिन्स नसेन तर मी कसा हसवणार ना तुम्हाला? मी शंभर टक्के कन्व्हिन्स असेन तर मी तुम्हाला हसवीन. मला ते आधी पटलं पाहिजे. आणि विनोद तसाच असतो. तो आधी स्वतःला पटावा लागतो. मला जर पक्का कळला ना, तर मी माझ्या स्किलने तो तुमच्यापर्यंत पोचवणार. मराठी प्रेक्षक प्रचंड सुजाण असतो. त्यामुळे तुम्ही फसवू नाही शकत त्यांना. 

श्रीपाद ब्रह्मे : हल्ली समाज खूप असहिष्णू झालाय. लोकांना लगेच रिॲक्ट करायची सवय झालीये. तर याचा लेखक म्हणून ताण येतो का, की लेखक म्हणून काही गोष्टी आपल्याला लिहिता येत नाहीत?

समीर चौघुले : प्रचंड ताण येतो. कुंपण हळूहळू आकुंचित व्हायला लागलंय. लेखन दिवसेंदिवस कठीण होत चाललेलंय. कोणाची कधी काय भावना दुखावेल, याला काही लिमिटच राहिलेली नाहीये. एका स्किटमध्ये मी एक वाक्य घेतलं, 'मी हुशार होतो ना म्हणून मी सायन्सला गेलो. हा पश्या ढ होता म्हणून तो आर्ट्सला गेला.' तर मला कित्येक आर्ट्सच्या मुलांचे मेसेज यायला लागले, की आर्ट्सची ढ असतात का म्हणून? तुम्ही हे तुम्हाला का लावून घेता? हा पश्या ढ होता म्हणून तो आर्ट्सला गेला, असं म्हणतोय मी. काय झालंय, की प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेण्याची सवय लागलीये लोकांना. मी नेहमी सांगतो की ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये पु. ल. देशपांडे यांनी जी साक्ष केलेली आहे ती लिहून दाखवावी कुणी तरी. माझी तीन दैवतं आहेत -  पु. ल. देशपांडे, चार्ली चॅप्लिन आणि रोवन ॲटकिन्सन - ज्याने मिस्टर बिन साकारला आहे तो. ही तीन माझी दैवतं आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातसुद्धा अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या आत्ता तुम्ही नाही लिहू शकत. आणि ट्रोलिंग हे फुकट झालं आहे. सहजपणे ट्रोल केलं जातं सोशल माध्यमामुळे. त्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय, की ट्रोलर्सचं आम्ही वाचत नाही. एखाद्या  कामाविषयी काही सूचना आल्या, आम्हाला पटल्या तर आम्ही त्याचा नक्कीच स्वीकार करतो, कधी कधी माफीही मागतो. मागे एकदा आलं होतं की मजा येत नाहीय. म्हटलं ठीक आहे; आम्ही जास्त प्रयत्न करू; पण तुमच्या या अभिप्रायाबद्दल खरंच आभार! सरांपासून सगळे आम्ही हे फॉलो करतोय. तुम्ही टीका केलीत तुम्हाला काय कळतंय असं आम्ही करत नाही ते प्रेक्षक आहेत. ते टीव्ही लावतायत म्हणून आज हे सगळं चालतंय. पण एका ठरावीक मर्यादेनंतर मग आपल्याला कळतं, की हे ट्रोलिंग आहे ते. काही विशिष्ट माणसं सातत्याने ट्रोलिंग करतात तुम्ही कितीही काहीही करा .मग आम्ही अशा माणसांकडे सरळ दुर्लक्ष करतो. ते सोपं आहे आमच्यासाठी. त्यामुळे मी म्हटलं तसं कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही. लोक म्हणतात सतत तुमच्यावरच विनोद केले जातात, कारण दुसरीकडे करणंच बंद झालेलंय आता. कशावर करणार? ना धार्मिक, ना राजकीय! कोणावरच करू शकत नाही. मग उरले कोण? समीर चौघुले! करा माझ्यावर विनोद! माझ्या दैवतांनीसुद्धा हेच सांगितलंय, दाखवून दिलंय की स्वतःवर केलेला विनोद हा जगातला सर्वश्रेष्ठ विनोद असतो. चार्ली चॅप्लिनच्या गोल्ड रश  सिनेमात ते बूट भाजून खातात असं दाखवलं आहे. हा किती मोठा पॅथॉस आहे! कारण त्या काळी खरंच खायला अन्न नसायचं. हा एवढा मोठा पॅथॉस विनोदाच्या माध्यमातून त्यांनी पोचवला. आर. के. लक्ष्मणांचं  ‘यू सेड इट’ यायचं, ते मला खूप आवडायचं. मिस्टर बिन पण आत्ताच्या जनरेशनला आवडतोय. तो पण तेच करतो. तो गडबड- गोंधळ करतो, तो बावळट आहे म्हणून तर तो आपल्याला आपल्यातला वाटतो ना. कारण मला असं वाटतं की सीमारेषा आहेत, त्यामधनं काम करणं कठीण होतंय; पण कुडीत जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत करत राहणार विनोद. दुसरं काय करू शकतो? 

श्रीपाद ब्रह्मे : आता पाच वर्षं झाली तुमच्या कार्यक्रमाला. तर अशा कार्यक्रमाचं आयुष्य किती असू शकतं असं तुम्हाला वाटतं?

समीर चौघुले : आता ते प्रेक्षकांच्या रुचीवर आहे आणि त्यांच्या अभिरुचीवर आहे असं मला वाटतं. पण दिवसेंदिवस हे करणं मात्र खूप कठीण होत चाललेलं आहे. कारण शेवटी विषय संपतात ना! तसेच विषय केले की ते तसेच रिपीट केल्यासारखे वाटतात. आंबे आपल्याला का आवडतात, कारण ते फक्त मे महिन्यात येतात. आंबे प्रत्येक महिन्यात यायला लागले तर त्याचं नावीन्य कमी होईल. त्यामुळे ते जेवढं कमी असेल तेव्हढं त्याचं आयुष्य वाढेल असं मला वाटतं. आता सध्या मी ‘फोर डेज अ वीक’ करतोय, पण दमछाक करणारं आहे. त्याचं आयुष्य किती आहे हे मला माहिती नाही. पण अजूनही आजतागायत लोकांचं चांगलं प्रेम मिळतं आहे. दुसरं असं, की सध्या सगळ्यांच्याच आयुष्यात ताण अतिशय वाढलाय. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की आम्हाला लगेच कौतुक मिळतं. तुम्ही एकोणीस तास मेहनत केलीत आणि त्याचं कौतुक झालं, की माणूस मानसिकदृष्ट्या खूप शांत होतो. आमच्या आयुष्यात ‘हास्यजत्रा’ आली, त्याचे खूप आभार आम्ही मानतो.

श्रीपाद ब्रह्मे : ‘लोचन मजनू’चं कॅरक्टर डेव्हलप कसं केलंस?

समीर चौघुले : नाना पाटेकरांनी मध्ये मला फोन केला होता. त्यांनी सांगितलं होतं, की असा निवेदक पुण्यात आहे. खोटं बोलू नकोस, चोरलंयस तू! मी म्हटलं त्यांना, की चोरलं वगैरे काही नाहीय. काय झालं, हे पात्र विकसित करताना मी सुचवलं, की तो तसं बोबडं बोलेल. मी सरांना म्हटलं, मी वेगळं करून बघतो. कदाचित काही तरी मिळेल. मग त्याचं कारण आहे, की तो असं का बोलतो? मग तो एक एलिमेंट मिळत गेला. त्याची मजापण आली, की हा असं का बोलतोय? यातल्या विनोदांसाठी अनेकदा ट्रेंडिंग रील्सचाही आम्ही वापर करत असतो. ‘मधुमास’ गाण्याच्या वेळची धमाल त्यातूनच आलीय.

श्रीपाद ब्रह्मे : रोजच्या जगण्यातले अनुभव स्किटसाठी कसे उपयोगाला येतात? कशी असते ती प्रक्रिया?

समीर चौघुले : असे प्रसंग टिपण्याचा डोळा आमच्याकडे तयार झालाय. आम्हाला आलेले विविध अनुभव आम्ही लोकांसमोर मांडतो. फॅन्स जेव्हा फोटो काढायला येतात, तर काहींचा फोटो टायमर १५-२० सेकंद असतो. इतका वेळ लाफ्टर नाही होल्ड करता येत! अनेक वेळा काय होतं, की नवरा-बायको येतात आणि त्यांच्या अचानक लक्षात येतं, की स्टोरेज फुल्ल! मग म्हणतात, नको जाऊ दे! त्यांना काही वाटत नाही, की समोरच्याचा आपण अपमान करतोय. आता त्याच्यावर काय बोलणार आपण? असे अनेक अनुभव आहेत. कधी कधी पासवर्डच विसरतात आणि आम्ही तिथे थांबलोय ते कधी फोटो काढतायत याची. हेच अनुभव तुम्हाला ‘हास्यजत्रे’त दिसतात, जे तुम्ही केलेलं असतं किंवा बघितलेलं असतं. दोन महिन्याची सुट्टी देतं चॅनेल आम्हाला. आम्ही माणसांत फिरतो. लग्न अटेंड करतो. लग्नात तर खूप किस्से मिळतात. ती बाई कशी चालतेय, तिचा आवाज कसा आहे, तिचा नवरा आणि तिचे रिलेशन कसं आहे... हे सगळं आम्ही बघत असतो. पु.लं.नी तेच सांगितलंय की जेवढी तुमची निरीक्षणशक्ती जास्त, तेवढी तुम्हाला विसंगती दिसायला लागते. आमच्या कोअर टीमला ती विसंगती टिपायची सवय झालीय. विशाखा आणि माझी जोडी लोकांना आवडण्यामागे, ही जोडी ओबडधोबड होती हेच कारण आहे. त्यात विसंगती आहे, खडबडीतपणा आहे, खरखरीतपणा आहे त्या जोडीमध्ये. दोघेही एकमेकांना विरुद्ध आहेत; पूरक नाहीयेत. त्यामुळे ती जोडी बघायला मजेशीर वाटतं. 

श्रीपाद ब्रह्मे : विनोदी अभिनेता, लेखक म्हणून तू कुठली पुस्तकं जास्त वाचतोस?

समीर चौघुले : माझी भगवद्गीता काय आहे सांगू का? - 'व्यक्ती आणि वल्ली.' एका अभिनेत्याला हे पुस्तक पाठ पाहिजे, असं मला वाटतं. आधी व्यक्ती आणि वल्ली पुस्तक वाचायचं, त्यानंतर पु. लं.चं कथाकथन ऐकायचं अशी मी सुरुवात केली. त्यात तुम्हाला कळून जातं काय आहे ते! मी स्वतःला भाग्यवान समजतो, की मी पु. लं.ची दोन मोठी नाटकं केली आहेत. एक म्हणजे वाऱ्यावरची वरात, जे श्रीकांत मोघेंनी बसवलं होतं. आणि मी श्रीकांत मोघेंनी केलेले रोल केले होते. मग त्यात कडवेकर मास्तर आहे, शिरप्या आहे - जो ‘दिल देके देखो’ नाचतो ते आणि ‘परोपकारी गंपू’ केलाय ‘व्यक्ती आणि वल्ली’त. त्यामुळे पु. ल. देशपांडे यांचं लेखन माझ्यासाठी भगवद्तगीता आहे, बायबल आहे. त्यांचा विनोद मला खूप आकर्षित करून गेला. मी अचंबित व्हायचो लहानपणी की हे एका माणसाला कसं जमू शकतं. ‘गुळाचा गणपती’ तर सबकुछ पु. लं. देशपांडे! ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये जो सुरुवातीचा सीन आहे, जिथे त्याचं स्वागत होतं, आणि सगळे 'स्वागत करू या सकलजनांचे' म्हणत सगळे त्यांची विकेट उडवत असतात. आणि त्यावर पु. लं.च्या रिॲक्शन्स बघा. तिकडे मी अभिनेता म्हणून मी पु.लं. कडे खूप आकृष्ट झालो. ॲक्टिंग सगळेच करतात, पण रिॲक्शन देणारा विनोदात खूप मोठा असतो. ‘गुळाचा गणपती’ बघितल्यावर तर मी गुळासारखा चिकटलो त्या लेखकाला. त्यांची एकेक पुस्तकं बघा. शाळेत असल्यापासून पारायणं केलीत या सगळ्या पुस्तकांची. ‘सुंदर मी होणार’सारखं नाटक त्यांनी केलं कसं? त्यांनी रूपांतर केलं असेल, मग यासाठी आधीचं मूळ नाटक वाचा, पिक्चर आलाय तो चित्रपट बघा. ‘माय फेअर लेडी’ बघा, त्यावरून केलेलं एक नाटक आहे ते बघा. हा अभ्यास प्रत्येक लेखकाने केला पाहिजे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की या सगळ्या स्टेशनांवर उतरत उतरत ‘हास्यजत्रे’च्या स्टेशनवर आलो आहे. इंडस्ट्रीत येताना नेहमी शटलने आलं पाहिजे. बुलेट ट्रेनसारखे नको. नेहमी या एकेका स्टेशन्सवरून यायला पाहिजे. मला शिरीष कणेकरांनी पण खूप आकृष्ट केलं. ते खूप कनेक्टेड होते. ते ‘हास्यजत्रा’ बघायचे. त्यांनी स्वतःहून मला फोन केला होता. तेव्हापासूनचा मी त्यांचा फॅन आहे. क्रिकेट माझा धर्म आहे. फटकेबाजी, फिल्लमबाजी ही सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत. विजय तेंडुलकरांचं 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक मी केलं. त्याच्यात 'बाळू' नावाची भूमिका मी केली होती. त्या वेळेस मला कळलं की ट्रोलिंग हे किती वर्षांआधी सुरू झालंय. एक उच्चभ्रू, सुशिक्षित समाजाने केलेले एका बाईचं ट्रोलिंग आहे. हे कालबाह्य झालेलंच नाहीये नाटक. जयवंत दळवींसारखा नातेसंबंधांवर भाष्य करणारा एवढा मोठा लेखकच मी नाही बघितला. तेंडुलकरांचं ‘पहिलं पान’ वाचा तुम्ही. प्रत्येक वाचकाला अख्खा सेट डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे फटीतून एका कवडसा येत असतो, हेसुद्धा त्यांनी लिहून ठेवलेलंय. हे कोण लिहितं सध्या? हा त्या काळी आमचा अभ्यासच होता. माझे गुरू विश्वास सोहोनी यांनी खूप आम्हाला शिव्या घातल्या. आमच्या चांगल्यासाठीच! पण त्यामुळे आम्ही रंगभूमीकडे खूप गांभीर्याने बघायला लागलो. कॉमेडी इज अ सीरियस बिझनेस! एव्हढं सोप्पं नाहीय. त्याकडे गांभीर्याने बघा. रंगभूमी खूप गांभीर्याने करायची गोष्ट आहे. हे लेखक आमच्या आयुष्यात आले आणि त्यामुळेच आमचं वाचन सुरू झालं. त्याला पर्याय नाही. मी साहित्य संमेलनात गेलो आहे. सर्वांत जास्त झुंबड पुस्तकांकडेच असते. करोनाकाळात तर आम्ही मोबाइलवर स्क्रिप्ट पाठवायचो. मजाच यायची नाही. जोपर्यंत हाताला कागद लागत नाही ना, तोपर्यंत स्क्रिप्ट नाही नीट होत मग! पुस्तकाची सवय लागलीय हाताला, ती कधीही जाणार नाही आता. वाचनाची ओढ आहे ती पुढच्या पिढीपर्यंत दिली गेली पाहिजे. माझा मुलगा कुठे मॉलमध्ये गेला, की आधी क्रॉसवर्ड शोधतो. ती ओढ मी माझ्या मुलाला दिलीय. हा वारसा पुढे नेणं हे प्रत्येकाने केलं पाहिजे. मला आशा आहे, की माझा मुलगाही हा वारसा पुढे नेईल.
शेवटी सगळ्यांत खरं तर कौतुक आणि आणि आभार मानायचेत ते सोनी मराठी आणि संपूर्ण टीमचे. ‘सोनी मराठी’चे जे आमचे हेड आहेत अजय भाळवणकर किंवा अमित फाळके हे किंवा गणेश सागडे ही अख्खी टीम पीआर टीम ओंकार लीड करतो किंवा नॉन फिक्शन-फिक्शन टीम या सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नसतं झालं. विश्वास टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे. विनोदाच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही त्यात जेवढा कमी इंटरफिअरन्स ठेवाल तितका विनोद खुलतो. विनोद कधीही काट्यांमध्ये खुलत नाही. तो त्याचा त्याचा खुलतो. आज ती पाकळी खुलेल, उद्या ती पाकळी खुलेल. तीच गंमत असते, जी अनप्रेडिक्टीबिलिटी आहे त्याला कुठेही इजा नाही होऊ दिलेली. ‘सोनी मराठी’सारख्या नवीन चॅनेलवर हा कार्यक्रम सुरू झाला ही गोष्टपण आमच्या खूप पथ्यावर पडली. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार!


-------------------------------------------


No comments:

Post a Comment