29 Mar 2015

‘मौका’... मॅच्युअर होण्याचा...


वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत परवा आपण उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाकडून हरलो आणि देशभरात जणू सुतकी कळा पसरली. कालपर्यंत ज्या खेळाडूंना डोक्यावर घेतलं त्यांची लगेच उत्तरपूजा बांधायची तयारी सुरू झाली. पूर्वीही हे व्हायचं. परंतु आता सोशल नेटवर्क नावाचा मीडिया लोकांना उपलब्ध झाला आहे. त्यामुळं असल्या वातावरणाचा व्हायरस क्षणार्धात सर्वत्र पसरतो आणि सगळीकडं त्याचीच चर्चा सुरू होते. भारतीय उपखंडातील क्रिकेटचं वेड आणि सामना हरल्यानंतर आपल्या खेळाडूंची उडणारी हुर्यो हा आता जगभरातील लोकांच्या चेष्टेचा विषय झाला आहे. किमान भारतात तरी असं व्हायला नको. आपण भारतीय उपखंडातील सर्वांत मोठा आणि त्यातल्या त्यात प्रगत देश आहोत. आपण तरी आता वेड्यासारख्या प्रतिक्रिया देण्याचं थांबवून, अधिक प्रगल्भ होण्याची गरज आहे. त्यासाठी परवाचा पराभव हाच चांगला ‘मौका’ आहे.
कुठलाही खेळ घ्या. त्यात विजय आणि पराभव जोडीनंच येतात. खेळाडूसुद्धा माणसंच आहेत. कुणी देव नाहीत. त्यामुळं त्यांच्याकडूनही चुका होणारच. प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं म्हणजे हे सारं लक्षात घेऊन हा पराभवही पचवता यावा लागतो. त्यासाठी खिलाडूवृत्ती लागते. ती जोपासावी लागते. अचानक रक्तात येत नाही. आपल्या देशात खेळाला किती कमी महत्त्व दिलं जातं, हे सांगायला नको. शरीर कमावणं, उत्तम प्रकृती राखणं, आनंदासाठी-छंदासाठी कुठला तरी खेळ खेळणं, त्यातल्या स्पर्धात्मक गोष्टी टाळून केवळ खेळाचा आनंद लुटणं या गोष्टी आपल्या रक्तातच नाहीत. मोठ्या शहरांत, विशिष्ट आर्थिक वर्गातच केवळ त्या पाहायला मिळतात. त्यापलीकडं जी शंभर कोटी जनता खेड्यापाड्यांतून, लहान शहरांतून पसरली आहे, त्यांच्यापर्यंत की अस्सल क्रीडा संस्कृती कधीच पोचलेली नाही. त्यामुळं होतं काय, की आपण खेळाकडं वेगळ्या नजरेनं पाहायला लागतो. आपल्या अपेक्षा बदलतात. त्यात आपण वैयक्तिक भावनांच्या फूटपट्ट्यांनी त्या खेळातलं यशापयश मोजायला जातो. खेळात जिंकलो, तर आपल्याला आपणच जिंकल्यासारखं वाटतं. जगण्यातल्या प्रतिकूलतांनी गांजलेल्या माणसाला ही भावना तर फार तीव्रतेनं पछाडते. असं व्हायला हरकत नाही; पण त्याच वेळी मग देशाच्या खेळातल्या पराभवानंही हा माणूस स्वतःच खचून जातो. त्या पराभवाला कुणाला तरी जबाबदार ठरवून स्वतःचं नैराश्य दाबण्याचा प्रयत्न करू लागतो. असं व्हायला नको. खेळ पाहताना मिळणारा आनंद आणि वैयक्तिक भावभावना यांच्यात अंतर राखायला हवं. एक प्रकारची तटस्थता अंगी बाणायला हवी. कदाचित त्यामुळं आपला संघ जिंकल्यानं विनाकारण अंगी येणारा उन्मादही कमी व्हायला मदत होईल. कारण तोही तितकाच वाईट...
दुसरा मुद्दा सोशल प्लॅटफॉर्मवर व्यक्त होण्याचा. आपल्या देशात प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि लोकही तो पुरेपूर बजावत असतात. त्याबद्दल काही म्हणायचं नाही. मात्र, टीका करताना ती विशिष्ट पातळी सोडून नसावी, याचं भान ठेवायला काय हरकत आहे! ते भान असेल, तर आपण कुठल्याही खेळाडूला त्याच्या पत्नीवरून, मैत्रिणीवरून किंवा गर्लफ्रेंडवरून टार्गेट करणार नाही. कारण तो पूर्णतः त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुठल्याही स्त्रीवर अश्लाघ्य टीका करणं किंवा तिच्यावर अनुचित कमेंट करणं यातून आपण आपलीच लायकी दाखवून देत असतो. आपली संस्कृती काय, ते जगाला दाखवत असतो. तेव्हा सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया या सोड्यातल्या फसफशीसारख्या असतात, असं समजून त्याकडं दुर्लक्ष करणंच योग्य. त्याचा आनंद लुटायला नको आणि असे विनोद फॉरवर्डही व्हायला नकोत. किंबहुना ते जेवढं रोखता येईल तेवढं प्रत्येकानं करावं.
आणखी एक गोष्ट. आपण आपली तुलना पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेबरोबर करायला नको. विशेषतः भारताच्या संदर्भात पाकिस्तान आणि बांगलादेश ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया देतात, तशीच आपण द्यायला लागलो, तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? एकमेकांच्या अपयशानं आनंदित होणं हे बालिशच नव्हे, तर विकृत मनोवृत्तीचं लक्षण आहे. ज्याला स्वतःला सुधारण्यात, पुढं जाण्यात फार रस नाही, तोच असले उद्योग करू शकतो. पाकिस्तान आणि बांगलादेशकडं क्रिकेटशिवाय दुसरा राष्ट्रीय अभिमानाचा विषय नाही. आणि त्यांनी भारतासारख्या बड्या देशाशी स्वतःची तुलना केली तर त्यातही काही गैर नाही. पण आपण का तसं करतो? सुदैवानं भारताची स्थिती त्यांच्यासारखी नाही. आपल्याकडं राष्ट्रीय अभिमानाच्या अनेक गोष्टी आहेत. आपली समृद्ध लोकशाही, आपला अंतराळ कार्यक्रम, आपलं मंगलयान, आपली आयटी क्षेत्रातील भरारी, आपली तरुणाई अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्यामुळं आपण आपला क्रिकेटमधला अवास्तव रस कमी केला पाहिजे. किमान त्याला राष्ट्रीय अभिमानाची एकमेव गोष्ट मानणं कटाक्षानं टाळलं पाहिजे.
अर्थात सगळंच चित्र काळंकुट्टं नाही. किंबहुना आता आपल्या देशात अनेकांना याची जाणीव होताना दिसते आहे. त्यामुळंच अनेकांनी आपल्या संघाच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला सलाम करीत, आमचं तुमच्यावरचं प्रेम कायम राहील, अशी ग्वाही दिली. एका पराभवामुळं सगळं काही संपत नसतं, याची जाणीव अनेकांना असल्याचं दिसलं. आपल्या संघाच्या चांगल्या बाजू बऱ्याच जणांनी दाखवून दिल्या आणि एका दिवसाच्या वाईट कामगिरीबद्दल त्यांना झोडपून काढणं योग्य नाही, अशी योग्य भूमिका मांडली. असे आवाज वाढतील, तेव्हा आपल्यातला क्रिकेट रसिक अधिक प्रगल्भ झाला असं म्हणता येईल. त्या दिशेनं वाटचाल सुरू करण्याचा हाच चांगला ‘मौका’ आहे. 
...
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २९ मार्च २०१५)
---

8 Mar 2015

बायकांशी मैत्री करा...माझा एक मित्र आहे. लेखनाच्या सोयीसाठी आपण त्याला ‘कान्हा’ म्हणू या. बाकी हेच नाव त्याला अधिक शोभून दिसेल. कारण त्या कान्हासारख्या या कान्हालाही अगणित ‘गोपिका’ - अर्थात मैत्रिणी आहेत. खेड्यातून आलेल्या माझ्यासारख्या माणसाला कान्हाचा फारच हेवा वाटतो, यात काही शंका नाही. माझी ही जळजळ पाहूनही कान्हा ‘कूल’ असतो. वर म्हणतो, ‘अरे, त्या बायकांशी मैत्री करायला शीक. मग तुलाही कळेल, त्यातली गंमत!’ बायकांच्या मैत्रीमधली गंमत न कळण्याइतका मी काही अगदी ‘हा’ नव्हतो. पण कान्हाला ते अभिप्रेत नव्हतं. काही विशिष्ट पेये प्राशन केल्यानंतर कान्हा अध्यात्मात शिरतो. तशाच एका निशासमयी त्यानं मला त्याचं गुपित सांगितलं. कान्हा संबंधित पेय प्राशूनही नीट शुद्धीत असतो. त्यामुळं त्यानं सांगितलेले विचार सर्वांनाच सांगावेत, या हेतूने मी (कोणतेही पेय प्राशन न करता) ते आपणां समस्तांपुढं उलगडीत आहे.
‘तुला बाईशी मैत्री करायची असेल, तर सर्वप्रथम ती बाई आहे हे विसर,’ कान्हा उर्ध्व पोकळीत पाहत अंतिम सत्य सांगावं तशा खर्जात उद्गारला.
‘मग काय उपयोग,’ मी म्हणालो.
‘शट अप,’ कान्हा ओरडला. त्यावर वेटरसह आजूबाजूचे चार अंतराळवीरही दचकले. पण तिथं असा आरडाओरडा नित्याचाच असल्यानं ते क्षणानं पुन्हा आपापल्या कार्यात मग्न झाले. ‘तू मूर्ख आहेस,’ कान्हानं पुन्हा एक सत्यवचन ऐकवलं. ‘तूच काय, तुझ्यासारखे अनेक मूर्ख पुरुष या जगात वावरत आहेत, म्हणूनच आपण मागं पडलोय,’ कान्हा पुन्हा खेकसला. हे तर मला माहितीच होतं. म्हणून मी निमूटपणे त्याचं प्रवचन ऐकू लागलो.
कान्होजी महाराज वदू लागले, ‘ऐक ठोंब्या, कुठलाही पुरुष बाईकडं ती केवळ ‘बाई’ आहे याच नजरेनं पाहतो, म्हणून त्याला ती नीट कळत नाही. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. मी सदैव ‘ऑनलाइन’ असतो, हे तुला माहिती आहे. पण मी त्यांच्याकडं कधीही तशा नजरेनं पाहत नाही. त्यांच्याशी माझी निखळ मैत्री आहे. हां, आणि मीपण स्ट्रेट आहे, हे तुला माहितीय. त्यामुळं तो प्रश्न नाही. अरे, तुम्ही त्यांच्याकडं फक्त वैषयिक नजरेनं पाहता आणि त्यांना ते बहुतांश वेळेला नको असल्यानं त्या आखडतात. मग तुम्ही त्यापलीकडं असलेल्या फार मोठ्या आनंदाला मुकता. अरे, बाई म्हणजे खजिना आहे खजिना...’
कान्हा सुटला होता. त्यानं ही असली वाक्यं मोठ्यानं बोलू नयेत असं मला वाटत होतं. म्हणून मीच इकडं-तिकडं पाहू लागलो. पण कान्हाला फरक पडत नव्हता. चार दाणे उचलून मुखात टाकत तो पुढं म्हणाला, ‘तुम्ही गाढवासारखं भेटेल तिला थेट नाही तर आडूनआडून ‘देतीस का, देतीस का...’ हेच म्हणत बसता. असं भिकाऱ्यासारखं मागून कुणी देत नसतं. ती गोष्ट असतेच स्त्री-पुरुषांमध्ये; नाही असं नाही. पण बायकांच्या लिस्टमध्ये ती फार प्रायॉरिटीची नसते. आणि खरं सांगू का, तिला ती हवी असेल ना, तर डायरेक्ट घेऊन टाकण्याइतपत ती बोल्ड आहे. तुमच्या असल्या भूतदयेची गरज नाही तिला. पण अहोरात्र त्याच एका गोष्टीचं भूत तुम्ही मानेवर वागवून फिरलात ना, की मग काही खरं नाही. तुम्हाला तिचं बाकी काहीच दिसणार नाही.’
मी आता जरा गंभीर झालो. कान्हाला शेकडो प्रकारच्या मैत्रिणी होत्या हे खरं होतं. त्यात कुणी लेखिका होती, कुणी कवयित्री होती, कुणी आयटीवाली होती, कुणी शिक्षिका होती, कुणी गायिका होती, कुणी घरगुती क्लासेस घेणारी होती, कुणी नुसतीच गृहिणी होती, कुणी पत्रकार होती, कुणी मॉडेल होती, कुणी नटी होती, तर कुणी पीआर होती... शिवाय त्या सगळ्या १८ ते ५० अशा वेगवेगळ्या वयाच्या होत्या. कान्हाच्या अनुभव संचिताविषयी शंकाच नव्हती.
‘तर ऐक,’ कान्होबांचं कीर्तन सुरूच होतं... ‘अरे, किती काय काय करत असतात या मुली. त्यांना विविध क्षेत्रांत रुची आहे. करियरसाठी वाट्टेल ते कष्ट करायची त्यांची तयारी आहे. या सगळ्या महानगरी धावपळीच्या आयुष्यात त्यांना निवांत चार क्षण घालवायलाही वेळ नसतो. हल्ली मोबाइलमुळं अन् ऑनलाइनमुळं तो उपलब्ध झाला आहे. याचा अर्थ त्या सदैव चॅटवर चकाट्या पिटत असतात किंवा तुम्हाला ‘अव्हेलेबल’ असतात, असा नाही. पण तुम्ही त्यांचे खरे मित्र असाल, तर तुमच्याशी बोलून हा ताण हलका होऊन, चेहऱ्यावर हसू येईल, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांना कुठल्या वेळी काय बोलणं अपेक्षित आहे, हे कळलं पाहिजे. अनेक जणी कायम चॅटवर आल्या, की ‘जेवण झालं का,’ असा प्रश्न विचारतात. यावर लगेच बावळटासारखं ‘सारखं काय तेच विचारतेस,’ असं म्हणू नये. ती एका वेगळ्या संभाषणाची सुरुवात असते, हे ओळखावं. अर्थात आपल्या मैत्रीच्या मर्यादा ओळखूनच या गप्पा माराव्यात. म्हणजे मग ती खूश होते. तिला गाण्यांची, गझलांची आवड असते; तर आपण लगेच क्रिकेटवर येऊ नये. तिला तिच्या स्वयंपाकात, तिच्या मुलांचं कौतुक सांगण्यात रस असतो. आपणही त्यात रुची दाखवावी. उगाच नुसतं ‘हम्म, हम्म’ करू नये. तिला दिवसभर आपल्याला काम करून किती थकायला झालंय, हे सांगायचं असतं. त्यावर ‘झोप आता गुपचूप’ असे आदेश सोडू नयेत. त्याऐवजी एखादं छानसं गाणं ऐकवावं... खरं तर या बायकांना काय हवं असतं, हे अजूनही कुणाला कळलेलं नाही. पण मला वाटतं, त्यांना ना, तुमचा विश्वास हवा असतो. थोडंसं कौतुक हवं असतं आणि त्यांनी न सांगता, तुम्हाला त्यांच्या मनातलं ओळखता यावं, असं कायम वाटत असतं. त्यांना त्यांचं घर, संसार, नवरा, मुलं सगळं प्रिय असतं. पण यापलीकडं त्या त्यांच्या माहेराला, त्यांच्या वडिलांना-भावाला मिस करत असतात. त्यांच्या मित्रांनाही मिस करत असतात. प्रत्यक्ष आयुष्यातल्या या नात्यांबरोबर सगळ्याच बाबतींत खुलून बोलण्याची पद्धत आपल्याकडं नाही. तिथं मग माझ्यासारखे मित्र उपयोगाला येतात... अरे, खूप गंमत आहे त्यांच्या नजरेतून हे सगळं पाहण्यात... पण अट एकच. तिच्याकडं फक्त एक छान मित्र म्हणूनच पाहायचं...’
कान्हाच्या लोकप्रियतेचं किंवा मैत्रीणप्रियतेचं रहस्य मला उलगडू लागलं होतं. कान्हा तसा हुशार होता. एका जाहिरात कंपनीत मोठ्या पदावर होता. त्याचं भाषेवर प्रभुत्व होतं. दिसायलाही राजबिंडा, उंचापुरा वगैरे होता. शिवाय त्याची बायकोही खूप चांगली आहे. त्याला एक गोंडस पोरगीही आहे. कुटुंब म्हणून तो अत्यंत खूश आहे, हे मला माहिती होतं. कान्हाच्या या तृप्तीतच त्याच्या लोकप्रियतेचं किंवा त्याच्या ‘नजरिया’चं रहस्य लपलं होतं. त्याला कुणाकडूनही कसलीही अपेक्षा नव्हती. मात्र, त्याला बोलायची, गप्पा मारायची हौस होती. आम्हा मित्रांसोबतही तो बोलायचा; पण पोरींबरोबर अधिक खुलायचा हे नक्की. आम्ही एवढे दिवस त्याच्यावर नुसते जळायचो. पण आता त्याचा आदर वाटायला लागला.
वाचकहो, तुमच्यातल्या पुरुषांना स्वतःमधला ‘कान्हा’ सापडो आणि तुमच्यातल्या बायकांना, तुमच्या मित्रातला ‘कान्हा’ लवकर दिसो, याच महिला दिनाच्या शुभेच्छा...

------------------------------------------------