24 Feb 2018

बडोदा डायरी ४

समारोप अन् समाधान... 
----------------------------

शनिवारचा पूर्ण दिवस संमेलनांत अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. आम्ही सकाळी हॉटेलमधून नऊ-साडेनऊच्या सुमारास बाहेर पडलो. समोर मावशींकडं चहा घेऊन, रिक्षा करून संमेलनस्थळी आलो. नाश्ता केला. आलूबोंडे आणि भजी होती. सोबत कढी होतीच. नाश्ता झाल्यावर मग मेहता सभागृहात गेलो. तिथं निमंत्रितांचं कविसंमेलन चालू होतं. तेलकरांचे मित्र मंगेश विश्वासराव हेही यात कविता सादर करणार होते. पण आम्ही तिथं गेलो तोवर त्यांची कविता होऊन गेली होती. गर्दी बऱ्यापैकी होती. एक-दोन चांगल्या कविता झाल्या. मग सिकंदराबादहून आलेले एक साठीचे काका कविता वाचायला आले. त्यांची लांबलचक आणि फालतू कविता संपेचना. लोकांनी मग त्यांची हुर्यो उडविली. तरीही काका हटले नाहीत. 'कुठं चाललाय हा देशाचा गाडा' असं त्यांचं पालुपद होतं. त्यांच्या कवितेचा गाडा मात्र पूर्ण भरकटला होता. एकदा तर सूत्रसंचालक त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले. तरीही काका एकदम खमके होते. त्यांनी संपूर्ण कविता वाचलीच. त्यानंतर सूत्रसंचालक प्रत्येकाला काकुळतीनं 'अगदी छोटी कविता वाचा आणि गाऊन सादर करू नका' असं म्हणत होते. हे त्यांनी म्हटल्यावर आलेल्या कवयित्री काकूंनी पहिल्याच वाक्याला वरचा 'सा' लावला. तो ऐकून आमचा 'आ' वासला. एकूण कहर प्रकार होता. तरी एसी हॉलचं सुख सोडवत नसल्यानं आम्ही हा अत्याचार सहन करीत तिथं उगा बसून राहिलो. वास्तविक हे कविसंमेलन सकाळी नऊ ते अकरा होतं. त्यानंतर अकरा वाजता श्याम मनोहर व गंगाधर पानतावणे यांचा सत्कार होता. पण तो कार्यक्रम जवळपास साडेबाराला सुरू झाला. श्याम मनोहर चांगलं बोलत होते, पण शेवटी त्यांनीही लांबण लावली. कुठं थांबायचं याचं अचूक भान ज्याला असतं तो माझ्या मते उत्कृष्ट वक्ता. इथं सगळीच बोंब होती. दुपारी बारा वाजता काकासाहेब कालेलकर सभागृहात एक परिसंवाद होता. मी अजून या ठिकाणी गेलो नव्हतो. मग तिकडं निघालो. तेलकर, विनायक पात्रुडकर हेही सोबत आले. विद्यापीठाच्या सायन्स डिपार्टमेंटमधला एक वर्गच होता. तिथंच हा परिसंवाद सुरू झाला होता. समोर श्रोते बेंचवर बसले होते. मी इथं यायचं कारण म्हणजे सोलापूरचे सुनील शिनखेडे या परिसंवादात होते. धनश्रीचे सोलापूरचे काका-काकू यांच्या चांगल्या ओळखीचे होते आणि काकूंनी मला आवर्जून फोन करून सांगितलं होतं, की ते तिथं आलेयत तर त्यांची ओळख करून घे म्हणून. पण परिसंवाद तर सुरू झाला होता. मला व्यासपीठावर बसलेल्या तीन पुरुषांपैकी शिनखेडे कोण हेही माहिती नव्हतं. संपूर्ण परिसंवादाला थांबणं शक्यच नव्हतं. म्हणून मग आता काय करावं, असा विचार करीत होतो. तेवढ्यात त्या हॉलच्या कोपऱ्यात गडबड झाली. एक ज्येष्ठ काका पडले होते आणि त्याचा जोरात आवाज झाला होता. बोलणाऱ्या बाई थांबल्या. सगळे तिकडं धावले. काकांना डोक्याला चांगलीच खोक पडली होती व रक्त येत होतं. मला रक्त पाहून गरगरतं, त्यामुळं मी तिथून दूर झालो. तेवढ्यात मला लक्षात आलं, की आता शिनखेडेंना भेटू शकतो. मग मी सरळ व्यासपीठावरील एकांना विचारलं, की शिनखेडे कुठं आहेत म्हणून. ते त्या गृहस्थांना पाहायला गेले होते. हाक मारल्यावर आले. त्यांच्याशी तिथंच घाईत बोललो. काका-काकूंची ओळख सांगितली. काकूंची मुलगी मधुरा व जावई नीलेश गेल्या तीन वर्षांपासून इथंच असतात. तेही सांगितलं. ती व नीलेश कालच संध्याकाळी येऊन मला भेटून गेले होते. शिनखेडेंनीही 'मी तुमच्या लेखनाचा फॅन आहे,' वगैरे सांगितलं. मला बरं वाटलं. त्या काकांना तिथल्या स्वयंसेवकांनी खाली नेलं. सुदैवानं तिथं एक रुग्णवाहिका तैनात होती. तीमधून काकांना लगेच नेण्यात आलं. आम्हीही तिथून बाहेर पडलो. मग भोजन मंडपात जेवण करून, थोडा वेळ मीडिया सेंटरमध्ये जाऊन, थोडा वेळ जरा भटकून पुन्हा मेहता सभागृहात आलो. तेव्हा दुपारी दोनला संपणारं चर्चासत्र अजून सुरूच होतं. बाबा भांड बोलत होते. सयाजीरावांवरचा परिसंवाद होता. तो संपल्यावर तिथं 'कथा, कथाकार व कथानुभव' हा परिसंवाद होता. त्यात मंगला गोडबोले, रेखा बैजल व मोनिका गजेंद्रगडकर असल्यानं मला तो ऐकण्याची उत्सुकता होती. रेखा बैजल आल्या नव्हत्या. हिमांशी शेलत या गुजराती कथालेखिका होत्या. नीलिमा बोरवणकर यांनी या परिसंवादाचं बहारदार सूत्रसंचालन केलं. त्यामुळं अपेक्षेप्रमाणंच मजा आली. विशेषतः मंगला गोडबोलेंनी जोरदार बॅटिंग केली. दुपारी जेवणाच्या तिथंच त्या मला भेटल्या होत्या व त्यांनी स्वतःहून मला ओळख दिली होती. त्यामुळं मला बरं वाटलं होतं. त्यांनी हा परिसंवाद एकदम रसरशीत, जिवंत केला. हिमांशी पण छान बोलल्या. मोनिका गजेंद्रगडकर काहीशा रिझर्व्ह वाटल्या. फार मोकळेपणानं बोलल्या असं वाटलं नाही. असो. यानंतर इथंच बहुभाषिक कविसंमेलन होतं. ते ऐकण्यात आम्हाला रस नव्हता. म्हणून मग बाहेर पडलो. ग्रंथप्रदर्शनात जरा भटकलो. मी 'बेस्ट ऑफ जयवंत दळवी' घेतलं. सुहास बोकिलांनी अत्र्यांचं प्रदर्शन ठेवलेल्या स्टॉलवर जाऊन आलो. नंतर आम्हाला काही खरेदी करायची होती, म्हणून संमेलनस्थळावरून बाहेर पडलो. इथं रावपुरा म्हणून भाग आहे. तो आपल्या लक्ष्मी रोडसारखा मार्केट एरिया आहे. मग तिकडं गेलो. जरा भटकलो. तो एरिया मस्तच आहे. जाताना बडोद्याची कलेक्टर कचेरीची ब्रिटिशकालीन इमारत दिसली. एकूणच या इमारती इथं चांगल्या जतन करून ठेवल्या आहेत. तिथंच बडोदा जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाची शो-रूम होती. तिथं आत शिरलो. पण विंडो शॉपिंगच झाली. नंतर आम्हाला 'जगदीश' हे चिवड्यांचं दुकान शोधायचं होतं. बरीच पायपीट करीत पुढं गेलो, तेव्हा ते दुकान दिसलं. मग तिथं चिवडे, खारे शेंगादाणे वगैरे खरेदी केली. तिथं बाहेर गाडीवर एक कमळक नावाचं फळ विकणारा माणूस दिसला. अननसासारख्या त्याच्या फोडी करून त्या माणसानं दिल्या. त्या स्टारसारख्या दिसत होत्या. त्यावर चाट मसाला टाकून ते आंबूसगोड फळ छान लागलं. मग रिक्षा करून परत मंडपात आलो. इथं संध्याकाळी साडेसातला श्रीनिवास खळे रजनीचा कार्यक्रम होता. तो वेळेवर सुरू झाला होता. सुनील बर्वे आणि मधुरा वेलणकर सूत्रसंचालनाला होते. त्यांनी नेटक्या व सुयोग्य शब्दांत खळ्यांचा संगीतप्रवास सादर केला. गायला हृषीकेश रानडे, अजित परब, माधुरी करमरकर आणि काही स्थानिक कलाकार होते. सगळ्यांनी छान गाणी म्हटली. एक तर खळ्यांची गाणी एक से एक! बुवा (रवींद्र साठे) मधेच येऊन 'लळा जिव्हाळा' गाऊन गेले, हा बोनसच. तिथल्या एका मुलीनं 'उगवला चंद्र पुनवेचा' जबरदस्त म्हटलं. तिचं नाव कळलं नाही. मला आठवतंय तसं अनिरुद्ध जोशी, आनंदी जोशी, अपूर्वा गज्जला वगैरेंच्या गाजलेल्या 'सारेगमप'मध्ये एक पटेल आडनावाची मुलगी होती, तशीच ही दिसत होती. कदाचित तीच असेलही, पण खात्रीशीर कळलं नाही. असो. हा कार्यक्रम आम्ही संपूर्ण ऐकला. मधेच जेवून आलो, पण परत येऊन शेवटपर्यंत ऐकला. एकूण मजा आली.
रविवारी सकाळी तेलकर निवांत होते. मग मी आणि अभिजितच पुढं आलो. मावशींकडं चहा घेऊन रिक्षा करून संमेलनस्थळी आलो. नाश्ता केला. आज फाफडा अन् गरम जिलबी होती. नंतर मेहता सभागृहात आलो. तिथं न्या. नरेंद्र चपळगावकरांची मुलाखत होती. मला ती ऐकायची होती. नानांचे मित्र बापू, म्हणजे सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित होते मुलाखत घ्यायला. एकूण चांगली झाली मुलाखत.
तिथून खाली आलो, तर प्राची (पाठक) भेटली. राधा भावे भेटल्या. त्यांना मी आदल्या दिवशीही भेटलो होतो. मग तिघांचा एक सेल्फी घेणं आलंच. प्राची भारी व्यक्तिमत्त्व आहे. तिला भेटून मजा आली. त्या दिवशी (रविवारी) मला मधुरा व नीलेशनं त्यांच्या घरी बोलावलं होतं. नीलेश मला घ्यायला येणार होता. मग त्याची वाट पाहण्यासाठी गेटवर आलो, तर तृप्ती (कुलकर्णी) व अमोल भेटले. चार दिवस ते इथंच होते, पण आमची भेट झाली नव्हती. मी परत आल्यावर भेटू, असं सांगून निघालो. नीलेश आलाच. त्यानं मला उत्साहानं बडोद्यातले रस्ते, ठिकाणं दाखवण्यासाठी जरा लांबून चक्कर मारली. एका ठिकाणी थांबून परत फाफडा, जिलबी, आळुवडी घेतली. त्यांच्या घरी पोचलो. मग जेवण झालं. गप्पा झाल्या. त्यांचं घर, सोसायटी व एकूण परिसर मस्तच आहे. अजून खूप वर्दळ नाहीय तिथं. त्यामुळं छान वाटतं. नीलेशनंच परत आणून सोडलं मग संमेलनस्थळी. चपळगावकरांच्या मुलाखतीनंतर मेहता सभागृहात रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोळकर, उज्ज्वल निकम यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. तोही जोरात झाला, असं कळलं. तिथंही तुडुंब गर्दी झाली होती. सभागृहात जागा नव्हती, म्हणून संयोजन समितीचे १५-१६ पदाधिकारी खुर्च्या टाकून स्टेजवरच बसले होते. त्याचीही चर्चा झाली. पण मधुराकडं गेल्यामुळं मला हा कार्यक्रम काही पाहता आला नाही. नंतर जरा मीडिया सेंटरमध्ये गेलो. आमच्या तिकिटांचं काही कन्फर्म होत नव्हतं. मग उद्याचा अहमदाबादचा प्लॅन रद्दच करावा असं ठरलं. उद्या सकाळी बसनं सुरतनं जाऊ असं ठरवलं. संध्याकाळी परत ग्रंथप्रदर्शनात भटकलो. मग योगेश नांदुरकर भेटले, तृप्ती भेटली. प्राची पाठक तिथं आली होती. मग तिची सगळ्यांशी ओळख करून दिली. सगळ्यांबरोबर सरबत झालं. नंतर कॉफी झाली. नंतर आमचा मित्र संतोष देशपांडेही भेटला.
'अक्षरधारा'च्या स्टॉलवर मला 'टी-टाइम'च्या प्रती ठेवलेल्या दिसल्या. आनंद वाटला. संध्याकाळच्या समारोपाच्या कार्यक्रमावरून पण काही गोंधळ सुरू झालेला दिसला. प्रकाशकांची बरीच नाराजी होती. त्यांचा फार व्यवसाय झाला नव्हता, हे उघडच होतं. अखेर समारोपाचं सत्र आयोजकांनी त्या मेहता सभागृहातच उरकलं. आम्ही तर तिकडं फिरकलोही नाही. मैदानात संध्याकाळी 'बडोद्याचं कलावैभव' हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. तो थोडा वेळ पाहिला, जेवलो आणि निघालो. आता परतीचे वेध लागले होते. खरं तर मधुरा सोमवारी मला शॉपिंगला न्यायला येणार होती. पण आम्हाला सकाळी हॉटेल सोडायचं होतं. मग तो बेत कॅन्सल केला. तिला तसं कळवलं. सोमवारी सकाळी 'चेक-आउट' करून निघालो. बडोद्याच्या बसस्टँडवर आलो. हे स्टँड एकदम चकाचक, एखाद्या मॉलसारखं आहे. तिथून आम्हाला शेवटी 'बडोदा-अंमळनेर' ही आपली एसटीच मिळाली. बडोद्याचा निरोप घेतला. या एसटीनं आम्ही अडीच तासांत सुरतला आलो. सुरतचं जेवढं कौतुक ऐकलं होतं, तेवढं काही हे शहर स्वच्छ वगैरे वाटलं नाही. त्या तुलनेत बडोदा खरंच चकाचक होतं. बारा वाजले होते. आम्हाला जेवायचं होतं. मग एका हॉटेलात जाऊन मस्त पंजाबी जेवण, नंतर ताक असं छान जेवलो. सुरत रेल्वेस्टेशनवर येऊन झाशी-बांद्रा ट्रेन पकडून बोरिवलीला आलो. आमच्या समोर दोन तरुण गुजराती बेन आणि त्यांची दोन छोटी पिल्लं होती. त्यामुळं प्रवास सुखाचा झाला. तिथून कर्नाटकची एसटी पकडून रात्री साडेबाराला पुण्यात पोचलो. मला थोडा शीण वाटला, पण दिवसाचा प्रवास मला आवडतो. एखाद्या प्रदेशात नुसतंच जाण्यापेक्षा तो प्रदेश नीट न्याहाळत यावं, असं मला वाटतं. मुंबईत आम्ही बोरिवली ते पनवेल असा तीन तास प्रवास करीत होतो. पण अशी निवांत मुंबई मला एरवी कधीच पाहायला मिळाली नसती. त्यामुळं मी तो ट्रॅफिक जॅम पण एंजॉय केला.
बडोद्याहून १५ तासांच्या प्रवासावरून पुण्यात पोचलो, की एकदम हलकं हलकं, छान वाटलं. आपल्या गावात, आपल्या हवेत, आपल्या माणसांत येऊन श्वास घेतला, की मन भरून येतं. पुण्यात राहून पुण्याचं कौतुक वाटत नाही, तेवढं कुठूनही बाहेरून परत पुण्यात आलं, की वाटायला लागतं. यात आपल्या सवयीचा भाग असतो हे खरं. पण हवा, पाणी, स्वच्छता अशा काही बाबतींत पुण्याला तोड नाही, यात शंकाच नाही. बडोद्याच्या या पाच दिवसांच्या मुक्कामानं खूप काही दिलं... प्रवास नेहमीच माणसाला अधिक चतुर, अधिक हुशार, अधिक शहाणं करतो. त्यासाठी या छोट्याशा ट्रिपला मनापासून थँक्यू...

(समाप्त)
---

23 Feb 2018

बडोदा डायरी ३

इये संमेलनाचिये नगरी...
------------------------------
शुक्रवारपासून संमेलन सुरू होणार होतं आणि आदल्या दिवशीच्या ग्रंथदिंडीमुळं झकास वातावरणनिर्मिती झाली होती. गुरुवारी रात्री ग्रंथदिडी आणि संमेलनस्थळावरचं वातावरण पाहून आम्ही बाहेर पडलो. विद्यापीठाच्या समोरच एक छोटी चौपाटी दिसली. तिथंच थोडंफार खाऊ या, असं ठरवलं. एका डोशाच्या गाडीपुढं भरपूर गर्दी होती. तो माणूस डोसाही जरा वेगळ्या पद्धतीनं करत होता. भरपूर मिक्स भाज्या, चीज असं एकत्र मिश्रण दिसत होतं. त्या डोशालाच डिमांड होती. गर्दीमुळं आम्ही पुढं गेलो. एक पावभाजीची गाडी होती, पण तिथं कुणीच नव्हतं. बाकी भेळ, सँडविच असलं काही नको होतं. मग एक फ्रँकीज विकणारी गाडी दिसली. मग त्याच्याकडून तिघांनीही मस्त मिक्स व्हेज चीज फ्रँकीज घेऊन खाल्ले. रिक्षा करून हॉटेलवर गेलो. दिवसभर चांगलीच पायपीट झाली होती आणि पाय वाईट दुखायला लागले होते. कधी झोप लागली ते कळलंच नाही. शुक्रवारी सकाळीही फार घाई नव्हती. निवांत आवरलं. अकरा वाजता सयाजीरावांच्या महाराष्ट्र सरकारतर्फे प्रकाशित होणाऱ्या बारा खंडांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन होणार होतं. मग आवरून तिकडं निघालो. आमच्या हॉटेलवर 'संदेश' हा गुजराती पेपर आणि 'टाइम्स ऑफ इंडिया' असे दोन पेपर येत असत. त्यातही 'संदेश'मध्ये मराठी साहित्य संमेलनाचं कव्हरेज कसं येतंय हे पाहण्यात मला रस होता. त्यांनी पान १ ला दिंडीचे भरपूर फोटो वगैरे देऊन चांगलं कव्हरेज दिलं होतं. नंतर समोरच्या मावशींकडं चहा घेऊन आम्ही रिक्षानं संमेलनस्थळी गेलो. आम्ही प्रतिनिधी शुल्क भरलेलं असल्यामुळं सकाळचा नाश्ता-चहा, दुपारचं जेवण, दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण एवढं सगळं संमेलनस्थळीच मिळणार होतं. त्याची कुपन्स त्या लोकांनी आदल्या दिवशीच हॉटेलमध्ये आमच्यापर्यंत पोचविली होती. त्या कापडी पिशवीत कार्यक्रमपत्रिका होती. एका कागदावर 'गुजरातमध्ये मद्यपानास बंदी आहे. परिणामांची जबाबदारी वैयक्तिक राहील' असं ठळक चौकटीत छापलं होतं. ते वाचून मला हसू आलं. साहित्य संमेलनाला गेल्यानंतर रात्री साग्रसंगीत मैफली जमतात. पण इथं हे अवघड होतं. जिथं बंदी असते, तिथं बेकायदेशीररीत्या ती वस्तू मिळते, हा आपला अनुभव आहे. गुजरातही त्याला अपवाद नाही. इथंही सर्रास दारू मिळतेच. पंचतारांकित हॉटेलांत तर ती कायदेशीररीत्या मिळते. पण बाकी ठिकाणी राजरोस चालत नाही, हे खरं. अधिक माहिती घेता, असं कळलं, की काही लोकांना फारच अनावर इच्छा झाली, की ते हॉटेलवाल्यांना दारू मिळवून द्यायला सांगतात. इथं एक कॅच असतो. तुमचं नशीब असेल, तर तो हॉटेलवाला तुम्हाला देईल. पण इथं बहुतेक हॉटेलवाल्यांचं पोलिसांशी साटंलोटं आहे. त्यामुळं पाहुण्याला पकडून देण्याचं काम हे लोक आनंदानं करतात. मग जो काही मजबूत दंड भरावा लागतो, त्यातला एक हिस्सा हॉटेलवाल्यांना मिळतो वगैरे वगैरे. आम्ही कायदेशीरपणेच वागायचं ठरवलं असल्यामुळं बाकी काही प्रश्न उद्भवलेच नाहीत. तर ते असो.
मग खाली उतरून समोर मावशींकडं चहा घेऊन, आम्ही रिक्षानं संमेलनस्थळी आलो. आधी भोजनमंडप शोधला. तिथं नाश्त्याला पोहेच होते, हे पाहून जरा निराश झालो. पण पोहे व चहा घेऊन चं. चि. मेहता सभागृहात गेलो. हे सभागृह चांगलं होतं. साडेतीनशे-चारशे खुर्च्या असाव्यात. मुख्य म्हणजे एसी होतं. बडोद्यात अकरानंतर जरा ऊन जाणवायचं. त्यामुळं अनेक लोक या सभागृहात टेकायला यायचे. प्रत्येक वेळी हे सभागृह अगदी हाउसफुल्ल व्हायचं. त्यामुळं संमेलनाला आणि या सभागृहात आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला अगदी जोरदार प्रतिसाद मिळतोय असं वाटायचं. पण एसीचं आकर्षण हेही मुख्य कारण असावं. (शिवाय स्वच्छतागृहाची सोयही इथंच होती. हेही एक महत्त्वाचं कारण...) अभिजितला अनेक वेळा त्याचं लिखाण पाठवायचं असायचं. त्यामुळं तो या सभागृहातील एक कोपऱ्यातील खुर्ची पकडून आपलं काम करत बसायचा. असे अनेक होते. बरेच ज्येष्ठ नागरिक दुपारचं जेवण झालं, की 'पडायला' इथं यायचे. तर सकाळचा पहिला कार्यक्रम अटेण्ड करायला आम्ही इथं आलो. आधी म्हटल्याप्रमाणं गर्दी होतीच. आम्हाला पार मागच्या खुर्च्या मिळाल्या. सभागृहातील खुर्च्यांच्या पायऱ्यांचं इन्क्लिनेशन जरा जास्त होतं. म्हणजे आपल्याकडं बालगंधर्व किंवा 'यशवंतराव'ला ते पाच अंश असेल, तर इथं ते जवळपास पंधरा अंश तरी असावं. त्यामुळं मागं बरंच उंच बसल्यासारखं वाटायचं. तर असे आम्ही वर जाऊन बसलो. आपले मुख्यमंत्री काही या कार्यक्रमाला येणार नाहीत, असं कळलं. गुजरातचे मुख्यमंत्रीही फिरकले नाहीत. मग शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सिक्कीमचे राज्यपाल 'रसिकाग्रणी' श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीतच हे बारा खंडांचं प्रकाशन झालं. बाबा भांड आणि त्यांच्या टीमनं फार कमी वेळात हे काम पूर्ण केल्याचं समजलं. तावडे आणि पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली. त्यामुळं हा प्रकाशन सोहळा चांगलाच हिट झाला. स्वागताध्यक्षा शुभांगिनीराजे गायकवाड यांचंही भाषण पहिल्यांदाच ऐकायला मिळालं. त्या काहीशा अडखळत, पण पूर्ण मराठीतच बोलल्या. (नंतर जेव्हा कळलं, की त्या मूळच्या नेपाळच्या राजघराण्यातल्या आहेत, तेव्हा तर अधिकच कौतुक वाटलं.) एकूण खानदानी आदब आणि डौल त्या वयस्कर स्त्रीच्या देहबोलीतून अगदी नीटच जाणवत होता. समरजितसिंह गायकवाड हेही व्यासपीठावर होते. पण ते काही बोलले नाहीत. नंतर कार्यक्रम संपल्यावर शुभांगिनीराजेंसोबत फोटो काढून घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. सोबत त्यांच्या देखण्या सूनबाई राधिकाराजेही होत्या. या कार्यक्रमामुळं जोरदार सुरुवात झाली असं वाटलं. आता संध्याकाळी थेट संमेलनाच्या उद्-घाटनाचाच कार्यक्रम होता. मग आम्ही ग्रंथप्रदर्शनाकडं गेलो. अजून नीट सुरू व्हायचंच होतं.
'मनोविकास'च्या स्टॉलवर माझं पुस्तक ('एम. एस. धोनी - जिद्दीचा षटकार') दिसलं. मग फोटो काढणं आलंच. तेलकरांनी ते काम केलं. बाकी जरा भटकून मग मीडिया सेंटर शोधत निघालो. इथल्या विद्यापीठातील जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये हे सेंटर होतं. मग जरा शोधत, मैदानाच्या उजव्या बाजूला मागे हे डिपार्टमेंट सापडलं. तिथं तिसऱ्या मजल्यावरील ऑफिस म्हणजेच 'मीडिया सेंटर' होतं, हे कळल्यावर जरा निराशाच झाली. तिथं दोनच कम्प्युटर होते. सुदैवानं वायफाय होतं. आमच्या सहकाऱ्यांना मोबाइलवर बातम्या टाइप करून पाठवाव्या लागत होत्या. एकूण तिथं जरा यांचं जुगाड जुळेपर्यंत वेळ गेला. जरा पंख्यांत टेकायला मिळालं आणि मोबाइल चार्ज करता आला, इतकंच. या खोलीच्या समोरच डिपार्टमेंटची दुसरी खोली होती. तिथं मनस्विनी (प्रभुणे) आलीय, असं अभिजितनं सांगितलं. मग तिकडं जाऊन तिच्याशी गप्पा झाल्या. इथून आम्ही परत दोनच्या सुमारास जेवायला भोजन मंडपात गेलो. तिथं बऱ्यापैकी गर्दी होती. मांडव घातला असला, तरी त्यातून ऊन लागत होतंच. शिवाय बसायला खुर्च्याही कमी होत्या. ज्या होत्या, त्या ज्येष्ठ नागरिकांनी घेऊन टाकल्या होत्या. जेवण ठीकठाक होतं. अत्यंत ऑइली भाजी आणि प्रत्येक भाजीत शेव घातलेली... पण कढी आणि मसालेभातानं बॅलन्स साधला. जेवण झाल्यावर संमेलनाच्या मुख्य मंडपाकडं निघालो. उन्हामुळं कार्यक्रम उशिरा सुरू होणार होता. मग तिथंच जरा टाइमपास केला. तिथं असलेल्या एकमेव चहा-कॉफी स्टॉलवर कॉफी बरी मिळायची. मग ती घेतली. साधारण ऊन उतरायला लागल्यावर म्हणजे साडेपाचच्या सुमारास मुख्य कार्यक्रम सुरू झाला. तोवर गर्दीही बऱ्यापैकी झाली. मुख्यमंत्री आल्यावर मागे गडबड उडाली. या संमेलनाच्या कार्यक्रमाचा एक साचा असतो. वर्षानुवर्षे तो तोच आहे. इथं सूत्रसंचालक एक महिला व एक पुरुष आणि दोघेही स्थानिक होते. (बहुतेक!) मग इथले मराठी वाङ्मय परिषदेचे आणि संमेलनाचे सर्वेसर्वा आयोजक दिलीप खोपकर, स्वागताध्यक्षा शुभांगिनीराजे, बडोद्याचे महापौर भरत डांगर, महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी वगैरेंची भाषणे झाली.
गुजरात सरकारमधलं कुणी फिरकलं नाही. मुख्यमंत्री सोडाच, पण बाकी एखादा दुय्यम मंत्रीही आला नाही. मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे जोरदार बॅटिंग केली. संमेलनाचं अनुदान २५ वरून ५० लाख करण्याची घोषणा त्यांनी केली आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हुश्श केलं. यानंतर दिलीप खोपकर लगेच मधेच बोलायला उठले आणि म्हणाले, की ही वाढ याच संमेलनापासून द्या. हे जरी अतीच झालं. मुख्यमंत्र्यांना जायचं होतं, म्हणून त्यांचं भाषण आधी झालं. व्यासपीठावर राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. त्यामुळे सत्काराच्या वेळी प्रोटोकॉलचा प्रॉब्लेम झाला. नंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्यावर मग परत रीतसर सत्कार झाले. मुख्यमंत्री गेल्यानंतर मग मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे बोलायला उठले. तोवर आम्हाला कंटाळा आला आणि आम्ही जागेवरून उठून मैदानात फिरायला लागलो. ओळखीचे अनेक लोक भेटले. मी आधी बसलो होतो, तिथं माझ्या मागे बसलेल्या एक बाई आल्या आणि 'तुम्ही श्रीपाद ब्रह्मेच ना' असं विचारू लागल्या. त्या रोहिणी भाटे होत्या. आम्ही दोघं एका व्हॉट्सअपवर एका कॉमन ग्रुपवर होतो. पण त्या बडोद्याला असतात, हे मला माहिती नव्हतं. त्यांच्याशी बोलायला म्हणून आम्ही उठून बाहेर आलो. त्यांचे यजमानही होते. ते आता बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. नंतर त्याच ग्रुपमधले मिलिंद पुरोहितही भेटले. तेही पिंपरीला असतात, पण आम्ही भेटलो बडोद्यात! आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. तेव्हा संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचं भाषण सुरू झालं. या भाषणात त्यांनी सरकारला चार शब्द सुनावले वगैरे मला नंतर कळलं. कारण तोपर्यंत आम्ही एवढे बोअर झालो होतो, की तिथून उठून जेवायला गेलो. जेवून परत आलो, तरी देशमुखांचं भाषण सुरूच होतं. या भाषणाची छापील प्रत नंतर मिळते. त्यामुळं ते बुडाल्याची फार काही खंत वाटली नाही. साडेसात वाजता संपणं अपेक्षित असलेला हा उद्-घाटन सोहळा साडेनऊ वाजून गेले तरी सुरूच होता. बरेच लोक उठून गेले. एकूणच चांगल्या पद्धतीनं सुरू झालेला हा कार्यक्रम शेवटी मात्र पार ढपला. या उद्-घाटन सोहळ्यानंतर 'मराठी भाषासुंदरी' हा कार्यक्रम होणार होता. म्हणून आम्ही पुन्हा पुढं जाऊन बसलो. पण तो काही वेळेवर सुरू होईना. मंच व्यवस्था व ध्वनिव्यवस्था तपासणाऱ्या कलाकारांनी लोकांचा अंत पाहायला सुरुवात केली. लोक खालून आरडाओरडा करू लागले. मग कुठं साडेदहाला कार्यक्रम सुरू झाला. विघ्नेश जोशी आणि डॉ. निधी पटवर्धन यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. सुरुवातीलाच छोटी मुलं आली आणि त्यांनी श्लोक-बिक म्हटले तेव्हा घाऊक नॉस्टॅल्जिक वातावरण निर्माण झालं. कार्यक्रमाचा पुढचा प्रवास कसा असेल, याचा अंदाज आला. त्यानंतर विजय पटवर्धन आणि पुष्कर श्रोत्री यांनी 'चिमणराव-गुंड्याभाऊं'चं एक स्किट सादर केलं. म्हणजे ते आजच्या काळात असते, तर कसं बोलले असते वगैरे. चिं. वि. जोशी मूळचे बडोद्याचे, हे निमित्त. पण विजय पटवर्धन यांनी लिहिलेलं ते स्किट एवढं फालतू होतं, की काही विचारू नका. व्हॉट्सअपवर येणारे जोकच हे दोघं ऐकवत होते. एकूण फारच केविलवाणा प्रकार होता सगळा. त्याऐवजी चिं. वि. जोशींचं ओरिजिनल स्क्रिप्ट घेतलं असतं, तर पुष्कळ बरं झालं असतं. असो. त्यानंतर पुढं वेगवेगळी लोकगीतं, गाणी वगैरे झाली. पण आम्हाला साडेअकरानंतर फारच कंटाळा आला. मग आम्ही तो कार्यक्रम अर्ध्यावर सोडून, रिक्षा करून हॉटेलवर परतलो...
संमेलनात सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हा एक वेगळ्याच लेखाचा विषय होईल. माझं संमेलनाला जाण्याचं मुख्य उद्दिष्ट असतं, ते मित्र-मैत्रिणींना, प्रियजनांना भेटणं किंवा नव्या लोकांच्या ओळखी करून घेणं... तो आनंद मी मनसोक्त लुटतो. बडोद्यातही हा रिवाज पाळता आला, हे महत्त्वाचं! बाकी कार्यक्रमांची जंत्री फिजूल आहे...

(क्रमश:)

 ---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

22 Feb 2018

बडोदा डायरी २

देखणं, टुमदार शहर
------------------------


ग्रंथदिंडी राजमहालाच्या प्रवेशद्वारावर सुरू होणार असं लिहिलं होतं. हे ठिकाण संमेलनस्थळीच, म्हणजे महाराजा सयाजीराव विद्यापीठाजवळ असेल, अशा समजुतीतून आम्ही रिक्षा करून तिथं गेलो. मात्र, हे ठिकाण म्हणजे महाराजांच्या पॅलेसचं प्रवेशद्वार असं कळल्यावर त्याच रिक्षावाल्याला तिकडं घेऊन जायला सांगितलं. ते प्रवेशद्वार येण्याआधीच उजव्या बाजूला एका मोकळ्या मैदानात गर्दी दिसली. मग तिथंच रिक्षा थांबविली. रस्ता ओलांडून पलीकडं गेलो. पाच वाजून गेले होते. उन्हं उतरत होती. त्या मैदानावर ग्रंथदिंडीसाठी सज्ज अशी अनेक पथकं दिसली. बडोदेकरांचा अफाट उत्साह त्यातून दिसत होता. उंटाच्या गाड्या होत्या, लेझीम पथकं होती, रस्त्याच्या कडेला एक ढोलपथक प्रॅक्टिस करत होतं. 'सयाजीगर्जना' असं त्या पथकाचं नाव होतं. महाराणी चिमणाबाई हायस्कूल ही बडोद्यातील सध्या सुरू असलेली (बहुदा) एकमेव मराठी माध्यमाची शाळा. या शाळेचेच सगळे विद्यार्थी दिंडीत सामील झाले होते. त्यांच्या हाती मराठी भाषेविषयी लिहिलेली वेगवेगळी वचनं होती. वेगवेगळ्या मराठी संस्थांचे फलक घेऊन मंडळी उभी होती. मैदानात तीन-चार टेम्पो उभे होते. त्यात लहान मुलं निरनिराळ्या राष्ट्रपुरुषांचे पोशाख घालून, मस्त सजून बसली होती. मी तेलकरांना त्यांचे फोटो घ्यायला सांगितले. एका मुलाला विचारलं, 'कोण आहेस रे तू?' तर 'संभाजी' असं ऐटीत उत्तर त्यानं दिलं. मग 'अहल्याबाई', 'झाशीची राणी' पण भेटल्या. सगळ्यांचं कौतुक करून मागं फिरलो, तर माझे ('नगर लोकसत्ता'तले) आद्य गुरुजी सतीश कुलकर्णी दिसले. त्यांना बघून फार आनंद झाला. आम्ही खूपच दिवसांनी भेटत होतो. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं संमेलन पाहिलं ते नगरला - १९९७ मध्ये - ते सतीश कुलकर्णींच्या बरोबरच! मग त्यांच्यासोबत गप्पा मारत निघालो. थोड्याच वेळात दिंडी निघाली. ती मैदानातून मुख्य रस्त्यावर येताच मागून येणारी वाहने थांबली. मोठा ट्रॅफिक जॅम झाला. दिंडीचे संयोजक, शहर वाहतूक पोलिस आणि महापालिका यांच्यात शून्य समन्वय असावा, असं वाटून गेलं. स्थानिक नागरिकांना हे काय अचानक रस्त्यावर सुरू झालं, असं वाटत होतं, हे स्पष्ट दिसत होतं. अनेक लोक उलट्या बाजूनं घुसले. दुभाजकाच्या पलीकडच्या बाजूला अशक्य गोंधळ सुरू झाला.
इकडं या बाजूनं दिंडी मात्र आपल्याच मस्तीत छानपैकी निघाली होती. आम्हीही त्या ट्रॅफिकचा विचार न करता, दिंडीसोबत निघालो. ही दिंडी दांडियाबाजार या भागातून जाणार होती. हा सगळा मराठी वस्तीचा भाग, असं नंतर कळलं. दिंडीत अनेक महिला नटून-थटून, भरजरी साड्या, पैठण्या नेसून, नथ वगैरे घालून सहभागी झाल्या होत्या. (किरकोळ अपवाद सोडले, तर बऱ्याच जणी छान दिसत होत्या.) कीर्तन मंडळ होतं, भजनी मंडळे होती. सुमारे ८०-९० वर्षांनी या शहरात मराठीचा उत्सव होत होता. त्यामुळं स्थानिक मराठी नागरिक अत्यंत आनंदात होते. त्यांच्यासाठी जणू दिवाळी अवतरली होती. रस्त्यावर दुतर्फा रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीला हार घातले जात होते. बायका फुगड्या घालत होत्या. मी कुठल्याही साहित्य संमेलनाला गेलो, की सहसा ही दिंडी चुकवत नाही. या दिंडीतच त्या शहराचा, संयोजकांचा आणि एकूणच संमेलनाचा अंदाज येतो. इथला उत्साह अपेक्षेप्रमाणे भरपूर होता. सुमारे १८ लाख वस्तीच्या या शहरात जवळपास पाच लाख मराठी नागरिक राहतात, असं कळलं. हे प्रमाण भरपूरच आहे. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली आठ-दहा शहरं सोडली तर त्यापेक्षा जास्त मराठी लोक बडोद्यात राहतात, हे स्पष्ट आहे. शिवाय बेळगावात मराठी-कन्नड यांत जो कडवटपणा आहे, त्याचा इथं लवलेशही नव्हता. म्हणजे गुजराती मंडळींना मराठीविषयी फार प्रेम नसलं, तरी भांडणही नाही. दोघंही मिळून गुण्या-गोविंदानं राहतात. मुळात बिझनेस करणाऱ्या, तशीच मानसिकता असलेल्या या मंडळींना भाषिक अस्मिता वगैरे प्रकाराशी मुळीच देणं-घेणं नाही. धंदा नीट होतोय की नाही, याकडंच त्यांचं लक्ष असतं. तर ते असो.
ही दिंडी दांडियाबाजार भागात आल्यावर त्या भागाचं मराठीपण लख्ख दिसून आलं. एका ठिकाणी सिद्धिविनायक गणपती मंदिर होतं. अनेक ठिकाणी पाट्या मराठीत होत्या. कुणी एकबोटे ज्वेलर्स म्हणून होते, त्यांची मोठ्ठी शो-रूम होती. शेजारी एक वाडा होता. त्यावर 'भास्कर विठ्ठल यांचा वाडा' असं थेट सदाशिव पेठेतल्या पद्धतीप्रमाणं लिहिलं होतं. पुढं एका कापडाच्या दुकानावर 'श्री आणि मंडळी' असं लिहिलेलं पाहून मला हसू आलं. लगेच फोटो काढून घेतला. सोमवारी शिवजयंती असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आणि सजावटही बऱ्याच ठिकाणी दिसली. दांडियाबाजारातून ही दिंडी पुढं वडोदरा महापालिकेच्या इमारतीसमोरून गेली. दिंडी उजवीकडं वळताच ही भव्य (बहुतेक ब्रिटिशकालीन) इमारत डोळ्यांत भरली. ती महापालिका असावी, असं माझ्या मनात आलं. पुढं जाऊन पाहताच अंदाज बरोबर आल्याचं कळलंच. मग तिथं फोटो काढले. आता पाय दुखायला लागले होते. दिंडीला मी आणि तेलकर दोघंच आलो होतो. अभिजितला रिक्षानं तिथं यायला सांगितलं होतं. मग तिथंच जरा टेकून बसलो. मागून सतीश कुलकर्णीही आलेच. तेही आमच्याजवळ बसले. दाबकेकाकाही दिसले. सगळी दिंडी पुढं गेल्यावर मग आम्ही सावकाश मागून निघालो. राजमहालाच्या प्रवेशद्वारापाशीच दिंडी संपली होती. पण 'सयाजीगर्जना'वाल्यांनी त्या भव्य प्रवेशद्वारासमोर ढोल-ताशांचा मस्त डाव सुरू केला होता. सोडियम व्हेपरच्या दिव्यांचा पिवळाजर्द लखलखीत प्रकाश, भगवे फेटे आणि पिवळेच कुडते घातलेली मुलं-मुली यामुळं त्या पथकाचं रिंगण असं एकदम पेटलेल्या ज्वाळांसारखं उजळून निघालं होतं. आजूबाजूला गोल गर्दी करून बरेच प्रेक्षक हा डाव पाहत होते. त्यामुळं त्यांनाही जोर येत होता. त्यांचं कडक वादन ऐकून झाल्यावर मग आम्ही निघालो. साडेसात-आठच वाजत होते. म्हणून आम्ही संमेलनस्थळी जाऊन जरा तिथल्या परिस्थितीचा, वातावरणाचा अंदाज घ्यायचं ठरवलं. रिक्षा केली. एक मध्यमवयीन बाई अनेक रिक्षांना हात करत होत्या. पण कुठलीच रिक्षा थांबत नव्हती. आम्ही त्यांच्याजवळ गेलो. त्या विरारहून आल्या होत्या. त्यांची चप्पल तुटली होती, म्हणून दांडियाबाजारात जायला त्यांना रिक्षा हवी होती. पण बहुतेक त्या उलट्या दिशेला जायला कुणी रिक्षावाला तयार नव्हता. शेवटी आम्ही त्यांना आमच्या रिक्षात घेतलं. रिक्षावाल्यानं त्यांना त्यातल्या त्यात जवळच्या एका चौकात सोडलं आणि तिथून जायला सांगितलं. पैसेही घेतले नाहीत. (नंतर या काकू दुसऱ्या दिवशी भोजन मंडपात भेटल्या. तेव्हा कळलं, की त्यांना त्या चौकातून शेवटी चालतच जावं लागलं...) आम्ही पाच मिनिटांत विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात पोचलो. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार' अशी कमान दिसली. संमेलनाची ती एकमेव खूण होती. आम्ही आत चालत गेलो. काहीसा अंधार होता. पण विद्यापीठ परिसरात बरीच चहल-पहल होती. मुलं-मुली इकडं-तिकडं फिरत होते. तेव्हा कळलं, की इथं सध्या 'यूथ फेस्टिव्हल' सुरू आहे. शेजारी एका छोट्या मैदानात लाउडस्पीकर ऐकू येत होता आणि बरीच गर्दी दिसली. म्हणून तिकडं गेलो, तर तिथं गरबा सुरू असलेला दिसला. इथं प्रत्येक समारंभात, सेलिब्रेशन म्हणजे गरबा हवाच! हा 'यूथ फेस्टिव्हल'मधला गरबा आम्ही थोडा वेळ पाहिला आणि निघालो. संमेलनस्थळ चटकन सापडेना. समोरच्या इमारतींच्या मधून एक रस्ता जात होता. तिथून मागे गेलो. मग एक नाल्यावरचा छोटा पूल लागला. तो ओलांडल्यावर पलीकडं कनातींसारखं काही दिसलं. काही लोकांची लगबग दिसू लागली. मग तिथं गेल्यावर संमेलनाचा स्वागत कक्षच दिसला एकदम! शेजारी ते चं. चि. मेहता सभागृहही दिसलं. विद्यापीठाचं जे मोठं मैदान होतं, त्यावरच संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. आम्ही आत गेलो. तेव्हा ही वेगळी रचना लक्षात आली. इथं मुख्य मंडप वगैरे असा काही घातलाच नव्हता. सुंदर हिरवळ होती. त्याच्या टोकाला समोर भव्य व्यासपीठ उभारलं होतं. संगीत रजनी वगैरे कार्यक्रमासाठी असतं, तसं ते फिरत्या लाइट्सचं लोखंडी चौकट असलेलं स्टेज होतं. ते भव्य होतं, यात शंका नाही. समोर मैदानात खुर्च्या मांडल्या होत्या. मैदानाच्या बाजूनं गोलाकार ग्रंथप्रदर्शनाचे गाळे होते. मध्यभागी एक प्रकाशन कम् कविकट्टा होता. याशिवाय एकमेव चहा-कॉफीचा स्टॉलही तिथंच मैदानात मधोमध, पण गेटच्या बाजूला असा होता. प्रकाशक मंडळींची स्टॉल लावण्याची गडबड सुरू होती. आम्हाला तिथं रमेश राठिवडेकर भेटले. नंतर आम्ही चालत त्या मैदानात जिथं खुर्च्या ठेवल्या होत्या, तिथं गेलो. समोर स्टेजच्या सजावटीचं काम चालू होतं. पावणेनऊ-नऊचा सुमार होता. थंडगार वारं सुटलं होतं. अगदी बाजूलाच रेल्वे स्टेशन होतं. त्यामुळं मधेच गाड्यांच्या शिट्ट्या ऐकू येत होत्या.
तिथली हिरवळ एकदम खास होती. मग मी खुर्चीवर सॅक टाकली आणि चपला काढून त्या हिरवळीवर शतपावली करीत फिरू लागलो. आकाशात चांदणं दिसत होतं. एका क्षणी सगळे आवाज बंद झाले... पुण्यातल्या गर्दी-गोंगाटाची सवय झालेल्या मला ती थोडीशी शांतताही भरभरून भोगावीशी वाटली. काही क्षण एकदम ट्रान्समध्ये गेलो. शांतपणे फिरत राहिलो... बडोद्याचा श्वास आत्ता कुठं माझ्या आत आत सामावू लागला होता. आत्ता कुठं या शहराची ओळख झाल्यासारखी वाटू लागली... अचानक नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. मग एकदम वाटलं, वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचं आपलं पुणं असंच होतं. अगदी असंच! वीस लाख लोकसंख्येचं... हिरवळीचं, टुमदार बंगल्यांचं, चिमुकल्या पण स्वच्छ रस्त्यांचं... युनिव्हर्सिटी रोडला दाट झाडी असलेलं आणि विद्यापीठ चौकात कारंजं असलेलं... उशिरापर्यंत सवाई महोत्सव रंगवणारं... रामनवमीला बाळासाहेबांचं गाणं कोतवाल चावडीला पहाटे चारपर्यंत ऐकणारं...
मग वाटलं, आत्ताचं बडोदा तसं आहे. इथले स्वच्छ रस्ते, पण तुलनेनं कमी ट्रॅफिक असलेलं... पण मॉलपासून ते एअरपोर्टपर्यंत सर्व सुविधा असणारं... रात्री उशिरापर्यंत मुलं-मुली गप्पा मारत 'टी-पोस्ट'सारख्या चहाच्या आधुनिक दुकानात बसू शकतील असं वातावरण असलेलं...
हे लक्षात आलं आणि मनाला एकदम 'सुकून' मिळाला... वाटलं, आता बडोद्याचं आणि आपलं नातं जुळलं... उद्यापासून सुरू होणाऱ्या संमेलनासाठी आता मी एकदम सज्ज होऊन बसलो होतो... मैदानावरची ती मंद झुळूक तेच सांगत होती...

(क्रमश:)

---
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

21 Feb 2018

बडोदा डायरी १

वडोदरामां आपनुं स्वागत छे...
------------------------------------------------यंदाचं साहित्य संमेलन बडोद्यात होणार, हे कळल्यावरच तिथं जायचं हे मी मनात ठरवलं होतं. भारतातील ज्या काही मोजक्या शहरांना आपण भेट दिलीच पाहिजे, असं मला वाटतं, त्यात बडोदा हे अग्रगण्य आहे. (कोलकाता हे दुसरं... अजून त्या शहराच्या भेटीचा योग आलेला नाही.) महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी लहानपणापासूनच माहिती होती. त्यांचं शहर हेही एक ओढीचं कारण होतं. एकूणच भारतातील संस्थानी शहरांविषयी मला एक वेगळं आकर्षण आहे. कोल्हापूर, म्हैसूर, जुनागड, हैदराबाद, मिरज, इंदूर, ग्वाल्हेर या शहरांमध्ये जावं, तिथल्या इतिहासाच्या खुणा पाहाव्यात, आजचं त्या शहराचं रूप पाहावं आणि हे कसं बदलत गेलं असेल याचा मनातल्या मनात एक अंदाज करत राहावा हा माझा आवडता खेळ आहे. बडोद्याला जाताना हा खेळ खेळायला मिळणार याचा आनंद बहुधा सर्वाधिक होता. पूर्वी दिल्लीला जाताना एक-दोनदा हे शहर रेल्वेतून ओझरतं पाहिलं होतं. पुणे-दिल्ली दुरांतो ट्रेन फक्त बडोद्याला थांबते. तेव्हा तिथल्या स्टेशनवर उतरूनही पाहिलं होतं. पण हे म्हणजे गाव पाहणं नव्हेच. त्यामुळं संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्या आणि मी बडोद्याचं प्रस्थान निश्चित केलं.
घुमानच्या साहित्य संमेलनाला मी, अभिजित पेंढारकर आणि अरविंद तेलकर जाऊन आलो होतो. (घुमानची डायरी या ब्लॉगवर आहे. जिज्ञासूंनी ती वाचावी.) 
यंदाही महाराष्ट्राबाहेर संमेलन आहे म्हटल्यावर आमचा तिय्या पुन्हा जमला. घुमाननंतर तीन वर्षांनी पुन्हा हा योग येत होता. (तुमचा तीन-तिघाडा आणि काम बिघाडा असं कसं होत नाही, असं कुणी विचारल्यावर मी सांगतो, की मी आणि अभ्या दीडशहाणे आहोत. त्यामुळं टोटल चार होते.) नेहमीप्रमाणं प्रवासाचं आरक्षण वगैरे जबाबदारी अभ्यानं घेतली. दोन महिने आधी रेल्वेचं बुकिंग केलं. (तरी काही उपयोग झाला नाही. तो किस्सा पुढे येईलच.) संमेलनाला जाण्याआधी एकदा तिघेही भेटू, असं ठरवलं होतं. पण ते काही जमलं नाही. तिघेही आपापल्या व्यापात... अगदी संमेलन चार दिवसांवर आल्यावर आम्ही ते तीन हजार रुपये प्रतिनिधीशुल्क वगैरे भरलं आणि आमचं हॉटेल व तीन दिवसांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था नक्की केली. चौदा फेब्रुवारीला, म्हणजे व्हॅलेंटाइन डेच्या शुभसायंकाळी मी 'उबर' बुक करून निघालो. जाताना अभिजितला घेतलं आणि सात वाजता स्टेशनवर पोचलो. तेलकरही आले. आमची अहिंसा एक्स्प्रेस दोन नंबरच्या फलाटावर लागणार होती. (मी पुणे स्टेशनला गेलो, की माझी कुठलीही गाडी एक नंबरच्या फलाटावर येत नाही. उद्या मी अगदी 'शताब्दी'चं बुकिंग केलं, तरी त्या दिवशी दौंड पॅसेंजर एक नंबरवरून सोडतील आणि माझी गाडी तीन किंवा चार नंबरवरून... असो.) तर तो फूटओव्हर ब्रिज ओलांडून आम्ही दोन नंबरच्या फलाटावर गेलो. तिथं जयश्री (बोकील), प्रज्ञा (केळकर-सिंग), माझा सहकारी चिंतामणी (पत्की), विद्याधर (कुलकर्णी) ही सगळी गँग दिसली. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडेही भेटले. आता प्रवास मजेत होणार याची खात्री पटली. एवढे दिवस आधी आरक्षण करूनही आमच्या तिघांपैकी दोनच तिकिटं कन्फर्म झाली होती. त्यामुळं अहिंसा एक्स्प्रेसमध्ये चढताना मनात हिंसक विचार येत होते. अभ्याला बरीच धाकधूक वाटत होती, पण माझा रेल्वेच्या जुगाडावर पूर्ण विश्वास होता. टीसीनं आम्हाला सुरुवातीला काही दाद दिली नाही, पण कर्जतला एक बर्थ मिळाला. त्यामुळं आम्हाला हुश्श झालं. जेवण घरूनच आणलं होतं. साडेनऊला सगळे जेवलो. समोर एक काका होते. ते संमेलनाला एकटेच निघाले होते. त्यांचं नाव दाबके असं होतं. काकांची चांगली ओळख झाली आणि पुढं चार दिवस ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला सतत भेटत राहिले. पुण्यातून खास संमेलनासाठी जाणारे बरेच लोक होते. ते सगळे नंतर बडोद्यात भेटणार होते. मला साइडचा आणि वरचा बर्थ मिळाला होता. या बर्थवर मला कायमच अवघडल्यासारखं होतं. तिथं मी पुस्तक काढून वाचण्याचा प्रयत्न केला, पण ते काही जमेना. शेवटी कशीबशी झोप आली. मध्येच गाडी स्टेशनवर थांबली आणि लोकांची ये-जा सुरू झाली की जाग यायची. मध्येच कुठल्या तरी स्टेशनवर एक गुजराती जोडपं चढलं. त्यातल्या बर्फीभाभी दिसायला बऱ्या होत्या. त्यामुळं उरलेला वेळ सुखाचा गेला. सकाळी साडेपाचचा गजर लावून ठेवला होता. उठलो, तर गाडी वेळेत बडोद्याला पोचत असल्याची शुभवार्ता दाबकेकाकांनी दिली. बरोबर पाच पन्नासला आम्ही सगळे बडोदा स्टेशनावर उतरलो. स्टेशनवरच चहा झाला. स्टेशनबाहेर आल्यावर पहाटेची किंचित थंडी जाणवली. सामान भरपूर असल्यानं रिक्षा करूनच हॉटेलला गेलो. बाकीच्या मंडळींनी पायी यायचं ठरवलं. आमचं सगळ्यांचं तुलसी रिजन्सी हॉटेल नावाचं होतं. पण अशी दोन हॉटेलं आहेत, हे हॉटेलवर गेल्यावरच कळलं. तिथं सकाळी सकाळी व्हायचे ते घोळ झालेच. आमचं बुकिंगच नाही, इथपासून सुरुवात झाली. मग तिथल्या संयोजक मंडळींना झोपेतून उठवून झालं. तिकडे दुसऱ्या हॉटेलमध्येही हाच प्रकार सुरू होता, असं कळलं. अखेर तासाभरानं सगळं निपटलं आणि आम्हाला खोली मिळाली. आधी एकच मिळाली. हॉटेल एकूण 'सो सो'च होतं. बडोद्याविषयी भ्रमनिरास होतो की काय, असं वाटायला लागलं. पण थोडा संयम ठेवला. अजून तर आम्ही शहरात नीट आलोही नव्हतो. इथल्या हवेत नीट श्वास घेतला नव्हता. इथले गल्ली-बोळ, रस्ते, दुकानं, माणसं नीट पाहिली नव्हती....
आवरून आधी नाश्ता करायला बाहेर पडलो. आमच्या हॉटेलच्या शेजारी हिमालया कॅन्सर हॉस्पिटल नावाचं एक रुग्णालय होतं. त्या आवारात कायम पेशंटची गर्दी असायची. समोर एका मावशींचा चहाचा स्टॉल होता. त्यांच्याकडं चहा घेतला. मावशी मराठीच आहेत, असं लक्षात आलं. मग आम्ही मराठीतच बोलू लागलो. तिथून पुढं रोज सकाळी त्यांच्याकडं चहाला जायचं हा रिवाजच झाला. आम्हाला आशिषनं (चांदोरकर) नाश्त्यासाठी महाकाली शेव उसळवाल्याचं नाव सांगितलं होतं. मग रिक्षा करून तिथं गेलो.
हा एक भन्नाट पदार्थ आहे. आपल्या मिसळीसारखाच. पण यात जाडी शेव आणि कांदापात घालतात. त्यानं सोबत पावाची लादीच ठेवली. इथले पावही छोटे, गोल व चवदार होते. मुख्य डिशसोबतच अजून एका डिशमध्ये जादा शेव आणि बारीक कापलेली कांदापात दिली होती. आम्ही गरमागरम शेव-उसळीवर चांगलाच ताव मारला. पोट भरून नाश्ता झाला. पैसे द्यायला गेलो, तर तो माणूस पण मराठीतूनच बोलायला लागला. साने आडनावाचा हा तरुण महाडजवळच्या पोलादपूरचा. त्याचे वडील ३२ वर्षांपूर्वी इथं आले आणि हा व्यवसाय सुरू केला. रस्त्यावरच ही टपरी होती मागे छत्रपती शिवरायांचा फोटो होता. आमचं बिल झालं केवळ १२० रुपये. मग सानेभाऊचे आभार मानून आम्ही समोरच असलेल्या बडोद्याच्या रॉयल पॅलेसकडं चालत गेलो. संमेलनाची ग्रंथदिंडी संध्याकाळी असल्यानं आम्ही लगेच स्थळदर्शन करून टाकायचा निर्णय घेतला. पॅलेसचं जे भव्य प्रवेशद्वार दिसत होतं, तिथून प्रवेश नव्हताच. शेजारीच एक गेट होतं, तिथून आत गेलो. थोडं आत चालत गेल्यावर पॅलेस लागला. या पॅलेसचं नाव लक्ष्मी-विलास पॅलेस. सयाजीरावांचा हा महाल. अजूनही त्यांचे वंशज तिथंच वरच्या मजल्यावर राहतात. पण खालचा भाग आता पर्यटकांसाठी खुला केला आहे.
पॅलेस बाहेरून जबरदस्तच दिसत होता, यात शंका नाही. पण तो पाहायला २२५ रुपये एकाला तिकीट आहे, म्हटल्यावर जरा दचकायला झालं. अर्थात तो पाहायचाच होता, त्यामुळं तिकीट काढलं. आत ऑडिओ गाइडची व्यवस्था होती. तिथली सगळी स्टाफ मंडळी मराठीच होती. आम्ही अर्थात मराठी ऑडिओ घेतला. राहुल सोलापूरकरांच्या आवाजात निवेदन होतं. सव्वा तास लागतो ते निवेदन संपायला. पण एकूण अनुभव छान होता. दरबार हॉल, भव्य चित्रं आणि शिल्पं पाहून छान वाटलं. गादी हॉल नावाच्या हॉलमध्ये रविवर्म्याची मूळ चित्रं होती. एकूणच कलासक्त राजघराण्याची छाया जागोजाग दिसत होती. पॅलेसच्या समोर गोल्फ कोर्ससारखं मोठं मैदान होतं. आता कुणी तिथं गोल्फ खेळत नसावं. पण ती जागा लग्नसमारंभासारख्या इव्हेंटसाठी भाड्यानं दिली जाते असं कळलं. नंतर जाताना बाहेर रॉयल बँक्वेटचीही जाहिरात पाहिली. ८४९ रुपयांत तिथं विशिष्ट दिवशी रॉयल डिनर सर्व्ह केलं जातं असं कळलं. हा प्रकार काय ते कळेना. नंतर स्थानिकांकडून कळालेल्या माहितीनुसार, गायकवाडांचे वंशज बऱ्यापैकी कर्जात आहेत, असं कळलं. त्यामुळं उत्पन्नासाठी हे प्रकार सुरू आहेत, ते लक्षात आलं. एकूणच पॅलेस राजेशाही असला, तरी एकूण अवस्था 'काप गेला नि भोके राहिली' अशी असावी, असं वाटून गेलं. शेजारीच फत्तेसिंह म्युझियम होतं. उन्ह झालं होतं. बरीच तंगडतोड करीत तिथपर्यंत जावं लागलं. इथं प्रत्येकी ८० रुपये तिकीट होतं. ऑडिओ गाइडचे वेगळे ३० रुपये. पण आम्ही ऑडिओ गाइड घेतला नाही. राजा रविवर्मा आणि युरोपातील उत्तमोत्तम चित्रकारांच्या कलाकृती इथं आहेत. त्या बघून भारावून गेलो. शंभर वर्षांहून जुन्या काळात हे काम कसं केलं असेल, असं वाटून गेलं. फेलिची या इटालियन शिल्पकाराचीही बरीच शिल्पं होती. म्युझियममध्ये काही थ्री-डी पेंटिंग्ज होती. आपण इकडून पाहिलं, तर रस्ता आपल्याकडं वळलेला दिसतो, नंतर घोड्याची मान आपल्याकडंच आहे असं दिसतं वगैरे. तिथला स्टाफ प्रत्येकाला आवर्जून आणि कौतुकानं हे थ्री-डी प्रकरण दाखवताना दिसला. आमचे आता पाय दुखायला लागले होते. मग जरा बाहेर येऊन टेकलो. भूक लागली होती. काउंटरवरच्या मावशींनी एक हॉटेल सुचवलं. ते आमच्या हॉटेलच्या एरियातच होतं. म्हणून मग रिक्षा करून तिकडं गेलो. पण त्या रिक्षावाल्यानं आम्हाला चक्क गंडवलं. आम्हाला एका गल्लीत सोडून, 'इथंच पुढं आहे ते हॉटेल' असं सांगून तो निघून गेला. त्याला शाळेतल्या मुलांना आणायला जायचं होतं. आम्ही चालून थोडी शोधाशोध केली, पण ते हॉटेल काही सापडलं नाही. शेवटी दुसरं एक 'आमंत्रण' नावाचं हॉटेल सापडलं. इथं गुजराती थाळी मिळत होती आणि आम्हाला तीच हवी होती. त्या हॉटेलमध्ये आम्ही तिघंच होतो. अडीच-तीन वाजले होते. त्यामुळं सगळे वेटर आमच्यावर तुटून पडले. आम्हीही मनसोक्त पुख्खा झोडला. नंतर बिल आल्यावर कळलं, की एक ताट तीनशे रुपयांना होतं. अर्थात भुकेच्या वेळी चांगलं जेवायला मिळालं, त्यापुढं पैशांचं काय? शांतपणे बिल दिलं आणि बाहेर पडलो. जबरदस्त झोप आली होती. पण हॉटेल जवळच होतं, म्हणून चालत गेलो. रूमवर जाऊन ताणून दिली. थेट पाच वाजता उठलो. मग आवरून ग्रंथदिंडीकडं निघालो... तिथं खरं संमेलन सुरू होणार होतं... खरं बडोदा, तिथली मराठी माणसं तिथंच तर भेटणार होती...

(क्रमश:)

 ---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

11 Feb 2018

मटामधील लेख - द्रविड व पृथ्वी शॉ

वीस अधिक एकवीस...
--------------------------- 
भारतानं नुकताच न्यूझीलंडमध्ये झालेला ‘अंडर १९’ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. या विजयाबद्दल सर्वत्र या मुलांचं रास्तपणे कोडकौतुक होतं आहे. मी या मुलांचे बहुतेक सर्व सामने पाहिले. त्यांच्यातला आत्मविश्वास थक्क करणारा होता. त्यांना कुठलीही भीती वाटत नव्हती. अत्यंत व्यावसायिक सफाईनं ते वावरत होते. इंग्रजीत ज्याला ‘क्लिनिकल परफॉर्मन्स’ म्हणतात, तसा पराक्रम या मुलांनी गाजवला. सहज विचार केल्यावर लक्षात आलं, की ही सगळी एकविसाव्या शतकात जन्माला आलेली मुलं. सन २००० किंवा त्यानंतर जन्माला आलेली. (एखादा अपवाद असेल...) पण खऱ्या अर्थानं ही या शतकाची पिढी. अतिशय भाग्यवान पिढी. याचं कारण या पिढीनं जन्माबरोबरच सुबत्ता, समृद्धीच पाहिली आहे. ही मुलं जन्मली तेव्हा भारतात आर्थिक खुलेपणाचं वारं सुरू होऊन दहा वर्षं झाली होती आणि देशानं या बदलाचा एक टप्पा पूर्ण केला होता. महानगरं बदलत चालली होती; मनी-मॉल-मल्टिप्लेक्स-मोबाइल अन् ‘मारुती’ (कार) या ‘म’कारांनी मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात अढळ स्थान मिळवायला सुरुवात केली होती. या काळात जन्मलेल्या मुलांनी लहानपणापासूनच या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. किंबहुना या गोष्टी नसतानाचं जग कसं होतं, हे त्यांना माहिती नाही. राजीव गांधी किंवा इंदिरा गांधी किंवा नरसिंह राव हे त्यांच्या लेखी इतिहासातले नेते आहेत. सुनील गावसकर किंवा कपिल देव हे त्यांच्या दृष्टीनं ‘ज्येष्ठ समालोचक’ आहेत. बाबरी मशिदीचं पतन किंवा मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट म्हणजे त्यांच्या दृष्टीनं भूतकाळात घडलेल्या काही गोष्टी आहेत. भारताने २०११ चा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा ही मुलं दहा-अकरा वर्षांची असणार. म्हणजे कपिलच्या संघाने १९८३ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा सचिन तेंडुलकर होता, त्याच वयाची! सचिननं तेव्हा डोळ्यांत भरून घेतलेलं हे वर्ल्ड कपचं स्वप्न पूर्ण व्हायला पुढे २८ वर्षं जावी लागली. त्या तुलनेत पृथ्वी शॉ, शुभमन गिल, मनज्योत कालरा, अनुकूल रॉय वगैरे या मुलांचा आत्मविश्वास पाहिल्यावर वाटतं, आता भारताला यापुढं एवढा दीर्घकाळ प्रतीक्षा कधीच करावी लागणार नाही.
या मुलांच्या यशामागे भिंतीसारखा भक्कम उभा होता तो आपला ‘द वॉल’ - अर्थात - राहुल शरद द्रविड. या मुलांची आक्रमकता, नव्या युगातला वावर, सकारात्मक दृष्टिकोन, विजिगिषु वृत्ती या सगळ्याला जोड मिळाली, ती राहुलसारख्या आधीच्या पिढीतल्या संयमी, अभ्यासू आणि शांत डोक्याच्या खेळाडूची. यातून जे अभेद्य असे मिश्रण तयार झाले, ते फारच सुंदर आणि अजिंक्य असे होते. राहुलची, सचिनची, म्हणजे एका अर्थाने आमची पिढी अत्यंत ‘युनिक’ म्हणता येईल. सत्तर ते ऐंशी या दशकात जन्मलेली ही पिढी विसाव्या शतकाचा शेवट जाणतेपणाने पाहणारी आणि वयाच्या पंचविशीत-तिशीत एकविसाव्या शतकात पदार्पण करणारी अशी होती. या पिढीला अगदी लहानपणी फार काही सुखसुविधा मिळाल्या, अशातला भाग नाही. खाऊन-पिऊन सुखी इतपतच महानगरांमधल्या मुलांची स्थिती होती. मध्यमवर्गीय मुलांच्या आयुष्यात अगदी अभावग्रस्तता नसली, तरी आजूबाजूला ती असल्याचे त्यांना दिसत होते. समाजातल्या सर्व वर्गांविषयी किमान सहानुभूती बाळगण्याचे शिक्षण त्यांना घरातूनच मिळत होते. नेहमी खरे बोलावे, प्रामाणिकपणे कष्ट करावेत, दुसऱ्याचे पैसे-धन-संपत्ती लुटू नये, गरिबांना फसवू नये असे बाळबोध, पण महत्त्वाचे संस्कार सर्वच घरांतून मुलांच्या अंगी झिरपत असत. समाजातील विषमता कायम असली, तरी विखाराचा लवलेश नव्हता. गुण्या-गोविंदाने, सगळ्यांनी एकत्र नांदण्याची पद्धत होती. महानगरांमधल्या चाळ संस्कृतीतून किंवा खेड्यांतील बारा बलुतेदार पद्धतीतून यांचं दर्शन घडत असे. मराठी साहित्य, नाटके, सिनेमे यांतूनही पुढची पुष्कळ वर्षं या संस्कृतीचं उदात्तीकरण केलं गेलं. (या संस्कृतीत असलेले दोषही नंतरच्या पिढीला जाणवले; पण तो वेगळ्या लेखाचा विषय होईल.) मुद्दा असा, की सचिन रमेश तेंडुलकर हा एका मराठीच्या प्राध्यापकाचा-कवीचा मुलगा आणि राहुल शरद द्रविड हा एका वास्तुविशारद प्राध्यापिकेचा आणि जॅम कंपनीत काम करणाऱ्या पित्याचा मुलगा होता. ही पार्श्वभूमी पाहिली, की या दोघांनी मिळविलेले उत्तुंग यश आणि त्यानंतरही त्यांचे जमिनीवर असलेले पाय यामागे असलेली त्यांची मध्यमवर्गीय संस्कारांची जाणीवही लक्षात येते. ‘धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती’ यासारख्या भंपक शिकवणुकीतून मध्यमवर्ग बाहेर येत असल्याचाही हाच काळ होता. कष्टाने पैसे मिळवून भौतिक सुखांनी समृद्ध जीवन जगण्यात पाप नाही, ही जाणीव भारतातल्या मध्यमवर्गाला १९९१ नंतर प्रकर्षाने झाली. आजूबाजूची परिस्थिती अनुकूल होत गेली आणि मध्यमवर्गीयांनी त्याचा रास्तपणे फायदा उठविला. राहुल द्रविडचा भारतीय संघातील प्रवेश १९९६ चा. त्यानंतर त्याची संपूर्ण कारकीर्द आणि देशाची व इथल्या मध्यमवर्गीयांची प्रगती यांचा आलेख एकावर एक ठेवला तर त्या रेषांमध्ये फार फरक येणार नाही.
कितीही भौतिक यश मिळवलं, तरी सचिन वा द्रविड यांचे मध्यमवर्गीय संस्कार चांगल्या अर्थानं कायम राहिले. संपत्तीचा उपभोग अधाशासारखा न घेण्याची ही शिकवण होती. त्यामुळेच या काळात बहुतांश मध्यमवर्गीयांना भरपूर पैसे मिळाले तरी सुखाची वखवख नव्हती. त्यात नारायण मूर्ती किंवा सुधा मूर्ती यांच्यासारख्या आकांक्षी मध्यमवर्गीयांच्या ‘आयकॉन्स’नी तर ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी’ या तुकोबांच्या शिकवणीचा आदर्श पाठच घालून दिला. यश पचविण्याची ताकद या मुलांच्या अंगी आली ती त्यांचे आई-वडील त्यांच्यामागे भक्कमपणे मध्यमवर्गीय बाळबोध संस्कारांची शिदोरी घेऊन उभे राहिल्यानेच! राहुल द्रविड वेगळा ठरतो तो इथे. गेल्या वर्षीही आयती पीएचडी नाकारून, आपण ही पीएचडी अभ्यास करून मिळविण्याला प्राधान्य देऊ, असं राहुल म्हणाला होता. इतर क्रिकेटपटूंसारखा समालोचक होण्याचा किंवा मुख्य क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा हट्ट न धरता, त्यानं हेतुतः १९ वर्षांखालील मुलांचं प्रशिक्षकपद मागून घेतलं. दोन वर्षांपूर्वी बांगलादेशात त्याची मुलं फायनलपर्यंत गेली, पण तिथं हरली. द्रविडनं त्यानंतर दोन वर्षं मान खाली घालून फक्त कठोर मेहनत केली. या मुलांना तयार केलं आणि न्यूझीलंडमध्ये सर्व स्पर्धा होऊनही आपल्या मुलांनी अत्यंत सहजरीत्या ती जिंकून दाखविली. त्यानंतरही राहुल शांत होता. या मुलांना अजून बरीच मजल मारायची आहे, असं तो सांगत होता. द्रविडची ही विरक्त वृत्ती फार महत्त्वाची आहे. तो फार कशात गुंतत नाही. आपलं काम करतो आणि नामानिराळा राहतो.
राहुलची, पर्यायाने ४० ते ५० वयाची आमची पिढी आज देशाच्या कारभारात सर्वत्र महत्त्वाच्या ठिकाणी बसली आहे. जवळपास सगळा देश चालवत आहे. अशा वेळी देशभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तमाम ‘राहुल’नी आज पुढच्या पिढीतल्या तमाम ‘पृथ्वीं’चा हात हातात घेतला पाहिजे. त्यांना जवळ बसवून अगदी लेक्चर नाही, पण अनुभवाचे चार बोल ऐकवले पाहिजेत. बॉलिवूडमध्ये हे थोडं फार होताना दिसतं. करण जोहर, अनुराग कश्यपसारखे दिग्गज आता नव्या दिग्दर्शकांवर, नव्या टॅलेंटवर विश्वास ठेवताना दिसताहेत. बाकी विज्ञान, शिक्षण, शेती ते राजकारण या सर्वच क्षेत्रांत असं घडायला हवं. ‘पिता’ पिढीचा संयम-शहाणपण आणि ‘पुत्र’ पिढीचा आक्रमक आवेश यांच्या संयोगातून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण सहज शक्य करून दाखवू शकू.
राहुल आणि पृथ्वी शॉचं अभिनंदन करताना हा आशावाद सगळ्यांनीच मनात बाळगायला काय हरकत आहे?
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ फेब्रुवारी २०१८) 
----

1 Feb 2018

मेरिल स्ट्रीपवरचा लेख

आयर्न लेडी
---------------

 

परवा स्टीव्हन स्पिलबर्गचा ‘द पोस्ट’ हा सध्या गाजत असलेला सिनेमा पाहताना, विशेषत: त्यातली मेरिल स्ट्रीपनं रंगवलेली कॅथरिन ग्रॅहम पाहताना मन सारखं सांगत होतं, की यंदा या भूमिकेसाठी हिच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होणार! आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिला या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या वर्गवारीत नामांकन मिळाल्याचं जाहीर झालं. हे मेरिलचं विक्रमी एकविसावं नामांकन. तिनं स्वत:चाच विक्रम मोडला. तिच्यामागे दुसऱ्या क्रमांकावर कॅथरिन हेपबर्न आणि जॅक निकोल्सन आहेत. त्यांना बारा नामांकनं आहेत. मेरिल त्यांच्यापेक्षा तब्बल नऊ नामांकनांनी आघाडीवर आहे. या एकवीसपैकी तीन वेळा तिला ऑस्कर मिळालं आहे. क्रेमर व्हर्सेस क्रेमर (१९७९) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं, तर सोफीज चॉइस (१९८२) आणि आयर्न लेडी (२०११) या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं ऑस्कर तिनं पटकावलं आहे. तिच्यापेक्षा अधिक म्हणजे चार ऑस्कर फक्त ‘द’ ऑड्री हेपबर्ननं जिंकली आहेत.
यंदा कॅथरिनच्या भूमिकेसाठी नामांकन मिळताच मेरिलला विशेष आनंद झाला. ‘या चित्रपटासाठी नामांकन मिळाल्याचा आपल्याला विशेष आनंद होत आहे, याचं कारण हा चित्रपट मला आवडतो. पत्रकारितेच्या स्वातंत्र्याची बाजू हा चित्रपट घेतो. इतिहासात महिलांचा आवाज उंचावण्याचं काम हा चित्रपट करतो. या चित्रपटाचा अभिमान वाटतो आणि हा चित्रपट तयार करणाऱ्या सर्वांचाही,’ अशी प्रतिक्रिया तिनं व्यक्त केली. मेरिलची ही प्रतिक्रिया खूप काही सांगणारी आहे. यंदा हा चित्रपट अनेक महत्त्वपूर्ण योग घेऊन आला आहे. एक तर मेरिलनं पहिल्यांदाच स्टीव्हन स्पिलबर्गसोबत काम केलंय. टॉम हँक्सबाबतही तेच. या तिन्ही गुणवान माणसांना एकत्र आणणारा चित्रपट म्हणून ‘द पोस्ट’चं एक महत्त्व आहेच. पण ते तेवढंच नाही. अमेरिका व व्हिएतनाम यांच्यातील युद्धाची सत्य बाजू जनतेसमोर आणणारे ‘पेंटॅगॉन पेपर्स’ आपल्या वृत्तपत्रात, म्हणजेच ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध करताना कॅथरिन आणि संपादक बेन ब्रॅडली (टॉम हँक्स) यांना काय काय दिव्यातून जावं लागतं, याची कथा म्हणजे हा चित्रपट. या चित्रपटातील काळ १९७१ चा आहे. अमेरिका-रशिया शीतयुद्धाचा तो काळ होता. अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर यांच्या दबावाला न झुकता, न जुमानता कॅथरिननं हे ‘पेंटॅगॉन पेपर्स’ आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. पतीच्या निधनानंतर पंचेचाळिसाव्या वर्षी कॅथरिन ग्रॅहमवर या वृत्तपत्राची जबाबदारी येते. तिला या कामाचा कसलाच पूर्वानुभव नसतो. भागधारकांचा दबाव असतो. व्यवसायाची म्हणून एक जबाबदारी असते. त्यातच हे ‘पेंटॅगॉन पेपर्स’ प्रथम प्रतिस्पर्धी वृत्तपत्रात, म्हणजे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये आधी प्रसिद्ध होतात. मात्र, त्या वृत्तपत्राला सरकारच्या दडपशाहीला सामोरं जावं लागतं. अशा स्थितीत आपल्या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध करू नये, यासाठी कॅथरिनवर प्रचंड दबाव असतो. मात्र, संपादक ब्रॅडलीच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय कॅथरिन घेते आणि पुढे इतिहास घडतो. चित्रपटाच्या शेवटी ती तिच्या पतीचं एक वाक्य - न्यूज इज ए रफ ड्राफ्ट ऑफ हिस्टरी - उद्धृत करते, तेव्हा ते अगदी पटतं.
कॅथरिनची ही भूमिका मेरिलनं अगदी समरसून केलीय. वास्तविक ही भूमिका करणं मेरिलला फार अवघड गेलं नसणार, याचं कारण ती स्वत: अशीच एक वेगळ्या मुशीतून घडलेली स्त्री आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना ‘आयर्न लेडी’ म्हणत. मेरिलनं सहा वर्षांपूर्वी त्यांची भूमिका तंतोतंत साकारली. खरं तर मेरिललाही ‘आयर्न लेडी’ म्हणावं असं तिचं कर्तृत्व आहे.
मेरिल आज ६८ वर्षांची आहे. तिचा जन्म २२ जून १९४९ चा. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ती चित्रपट व्यवसायात आहे. तिच्या कुटुंबाची मुळं जर्मन आहेत. तिची विचारसरणी अमेरिकी डावी आहे. सडेतोड बोलण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी सात जानेवारीला गोल्डन ग्लोब सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना तिनं केलेलं भाषण गाजलं होतं. अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तिनं केलेल्या थेट टीकेमुळं हे भाषण गाजलं होतं. ट्रम्प यांनी एका पत्रकाराच्या व्यंगाची नक्कल केली होती. त्याबद्दल स्ट्रीपनं त्यांची चांगलीच जाहीर खरडपट्टी काढली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी ‘मेरिल स्ट्रीप ही एक ओव्हररेटेड अभिनेत्री आहे,’ अशा शब्दांत तिच्यावर टीका केली होती. मात्र, खमकी मेरिल बधली नाही. त्यानंतर तिनं हा ‘द पोस्ट’ चित्रपट केला. आपल्या चित्रपटांतून नेमकं राजकीय भाष्य करण्यासाठी स्पिलबर्ग प्रसिद्ध आहे. या काळात ‘द पोस्ट’सारखा चित्रपट येणं हे बरंच सूचक आहे. स्पिलबर्गच्या या चित्रपटात अनेक ‘बिटवीन द लाइन्स’ बाबी आहेत. सिनेमा पाहताना त्या जाणवतात. मेरिल आणि टॉम हँक्स यांनीही हा अंत:प्रवाह ओळखून आपापल्या भूमिका केल्यानं हा सिनेमा पाहणं ही एक ‘ट्रीट’ झाली आहे.
मेरिलनं अशी भूमिका प्रथमच घेतलेली नाही. ज्या ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता, त्या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबतही तिची परखड मतं होती. यातली नायिकेची व्यक्तिरेखा फारच खल स्वरूपाची दाखविली आहे आणि प्रत्यक्षात घटस्फोट घेताना व मुलांचा ताबा मिळविताना स्त्रीलाही अनेक वेदना भोगाव्या लागतात, असे तिचे मत होते. पटकथा वाचल्यानंतर तिनं हे आपलं मत दिग्दर्शक रॉबर्ट बेंटनला सांगितलं. त्यानंतर पटकथेत तसे बदल करण्यात आले. तिच्याबरोबर डस्टिन हॉफमन होता. दोन महत्त्वाच्या प्रसंगांत दिग्दर्शकानं मेरिलला तिचे संवाद तिलाच लिहायला सांगितल्यावर हॉफमनला त्याचा राग आला. मात्र, नंतर त्यानंही तिच्या मेहनतीची आणि अभिनयक्षमतेची स्तुतीच केली.
त्यानंतर आलेल्या ‘सोफीज चॉइस’ या चित्रपटातही तिनं जर्मन छळछावणीतून वाचलेल्या पोलिश तरुणीची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. यातला ‘चॉइस’चा प्रसंग - ज्यात तिला जर्मन अधिकारी तिच्या कुठल्या मुलाला गॅस चेंबरमध्ये पाठवायचं आणि कुठल्या मुलाला निर्वासितांच्या छावणीत पाठवायचं असा प्रश्न विचारतात - साकारताना मेरिलच्या अभिनयाची कसोटी लागली. हा प्रसंग तिने एकाच ‘टेक’मध्ये पूर्ण केला आणि ‘रिटेक’ करण्यास सपशेल नकार दिला होता. या भूमिकेसाठीही तिला ऑस्करनं सन्मानित करण्यात आलं होतं.
ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची ‘आयर्न लेडी’ साकारताना मेरिलनं केलेला परकाया प्रवेश बघण्यासारखा आहे. या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, मेरिलच्या अभिनयक्षमतेवर कुणीच शंका घेतली नाही. म्हणूनच या भूमिकेसाठी तिला तिसरं ऑस्कर मिळालं. ‘ज्यूली आणि ज्युलिया’मधलं तिचं कामही उल्लेखनीय. खरं तर मेरिलनं अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या. त्या सर्वांचाच उल्लेख इथं करणं शक्य नाही. पण या अभिनेत्रीच्या वेगळ्या मुशीचा अंदाज त्यातून नक्कीच येऊ शकतो.
आज ६८ व्या वर्षी सर्वार्थानं परिपक्व झालेल्या, आत्मविश्वासानं झळकत असलेल्या या अभिनेत्रीकडं पाहिलं, की सकारात्मक ऊर्जा मिळते. अमेरिकेतील खऱ्या अर्थानं लोकशाही मूल्यं जपणारा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणारा, विरोधी मतांनाही स्थान देणारा असा समाज आपल्या भारतीय लोकांना सदैव आकर्षित करीत असतो. मेरिल स्ट्रीप ही या समाजाची मूर्तिमंत प्रतीक आहे, असं वाटतं. शिवाय तिच्या कणखर भूमिकांतून तिनं साकारलेली स्त्रीची मोहक रूपं तर जगभरातील स्त्रियांना आकर्षित करणारी अशीच आहेत. त्याही अर्थानं ती गेल्या दोन पिढ्यांची ‘आयर्न लेडी’च आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, १ फेब्रुवारी २०१८)
---