23 Feb 2018

बडोदा डायरी ३

इये संमेलनाचिये नगरी...
------------------------------
शुक्रवारपासून संमेलन सुरू होणार होतं आणि आदल्या दिवशीच्या ग्रंथदिंडीमुळं झकास वातावरणनिर्मिती झाली होती. गुरुवारी रात्री ग्रंथदिडी आणि संमेलनस्थळावरचं वातावरण पाहून आम्ही बाहेर पडलो. विद्यापीठाच्या समोरच एक छोटी चौपाटी दिसली. तिथंच थोडंफार खाऊ या, असं ठरवलं. एका डोशाच्या गाडीपुढं भरपूर गर्दी होती. तो माणूस डोसाही जरा वेगळ्या पद्धतीनं करत होता. भरपूर मिक्स भाज्या, चीज असं एकत्र मिश्रण दिसत होतं. त्या डोशालाच डिमांड होती. गर्दीमुळं आम्ही पुढं गेलो. एक पावभाजीची गाडी होती, पण तिथं कुणीच नव्हतं. बाकी भेळ, सँडविच असलं काही नको होतं. मग एक फ्रँकीज विकणारी गाडी दिसली. मग त्याच्याकडून तिघांनीही मस्त मिक्स व्हेज चीज फ्रँकीज घेऊन खाल्ले. रिक्षा करून हॉटेलवर गेलो. दिवसभर चांगलीच पायपीट झाली होती आणि पाय वाईट दुखायला लागले होते. कधी झोप लागली ते कळलंच नाही. शुक्रवारी सकाळीही फार घाई नव्हती. निवांत आवरलं. अकरा वाजता सयाजीरावांच्या महाराष्ट्र सरकारतर्फे प्रकाशित होणाऱ्या बारा खंडांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन होणार होतं. मग आवरून तिकडं निघालो. आमच्या हॉटेलवर 'संदेश' हा गुजराती पेपर आणि 'टाइम्स ऑफ इंडिया' असे दोन पेपर येत असत. त्यातही 'संदेश'मध्ये मराठी साहित्य संमेलनाचं कव्हरेज कसं येतंय हे पाहण्यात मला रस होता. त्यांनी पान १ ला दिंडीचे भरपूर फोटो वगैरे देऊन चांगलं कव्हरेज दिलं होतं. नंतर समोरच्या मावशींकडं चहा घेऊन आम्ही रिक्षानं संमेलनस्थळी गेलो. आम्ही प्रतिनिधी शुल्क भरलेलं असल्यामुळं सकाळचा नाश्ता-चहा, दुपारचं जेवण, दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण एवढं सगळं संमेलनस्थळीच मिळणार होतं. त्याची कुपन्स त्या लोकांनी आदल्या दिवशीच हॉटेलमध्ये आमच्यापर्यंत पोचविली होती. त्या कापडी पिशवीत कार्यक्रमपत्रिका होती. एका कागदावर 'गुजरातमध्ये मद्यपानास बंदी आहे. परिणामांची जबाबदारी वैयक्तिक राहील' असं ठळक चौकटीत छापलं होतं. ते वाचून मला हसू आलं. साहित्य संमेलनाला गेल्यानंतर रात्री साग्रसंगीत मैफली जमतात. पण इथं हे अवघड होतं. जिथं बंदी असते, तिथं बेकायदेशीररीत्या ती वस्तू मिळते, हा आपला अनुभव आहे. गुजरातही त्याला अपवाद नाही. इथंही सर्रास दारू मिळतेच. पंचतारांकित हॉटेलांत तर ती कायदेशीररीत्या मिळते. पण बाकी ठिकाणी राजरोस चालत नाही, हे खरं. अधिक माहिती घेता, असं कळलं, की काही लोकांना फारच अनावर इच्छा झाली, की ते हॉटेलवाल्यांना दारू मिळवून द्यायला सांगतात. इथं एक कॅच असतो. तुमचं नशीब असेल, तर तो हॉटेलवाला तुम्हाला देईल. पण इथं बहुतेक हॉटेलवाल्यांचं पोलिसांशी साटंलोटं आहे. त्यामुळं पाहुण्याला पकडून देण्याचं काम हे लोक आनंदानं करतात. मग जो काही मजबूत दंड भरावा लागतो, त्यातला एक हिस्सा हॉटेलवाल्यांना मिळतो वगैरे वगैरे. आम्ही कायदेशीरपणेच वागायचं ठरवलं असल्यामुळं बाकी काही प्रश्न उद्भवलेच नाहीत. तर ते असो.
मग खाली उतरून समोर मावशींकडं चहा घेऊन, आम्ही रिक्षानं संमेलनस्थळी आलो. आधी भोजनमंडप शोधला. तिथं नाश्त्याला पोहेच होते, हे पाहून जरा निराश झालो. पण पोहे व चहा घेऊन चं. चि. मेहता सभागृहात गेलो. हे सभागृह चांगलं होतं. साडेतीनशे-चारशे खुर्च्या असाव्यात. मुख्य म्हणजे एसी होतं. बडोद्यात अकरानंतर जरा ऊन जाणवायचं. त्यामुळं अनेक लोक या सभागृहात टेकायला यायचे. प्रत्येक वेळी हे सभागृह अगदी हाउसफुल्ल व्हायचं. त्यामुळं संमेलनाला आणि या सभागृहात आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला अगदी जोरदार प्रतिसाद मिळतोय असं वाटायचं. पण एसीचं आकर्षण हेही मुख्य कारण असावं. (शिवाय स्वच्छतागृहाची सोयही इथंच होती. हेही एक महत्त्वाचं कारण...) अभिजितला अनेक वेळा त्याचं लिखाण पाठवायचं असायचं. त्यामुळं तो या सभागृहातील एक कोपऱ्यातील खुर्ची पकडून आपलं काम करत बसायचा. असे अनेक होते. बरेच ज्येष्ठ नागरिक दुपारचं जेवण झालं, की 'पडायला' इथं यायचे. तर सकाळचा पहिला कार्यक्रम अटेण्ड करायला आम्ही इथं आलो. आधी म्हटल्याप्रमाणं गर्दी होतीच. आम्हाला पार मागच्या खुर्च्या मिळाल्या. सभागृहातील खुर्च्यांच्या पायऱ्यांचं इन्क्लिनेशन जरा जास्त होतं. म्हणजे आपल्याकडं बालगंधर्व किंवा 'यशवंतराव'ला ते पाच अंश असेल, तर इथं ते जवळपास पंधरा अंश तरी असावं. त्यामुळं मागं बरंच उंच बसल्यासारखं वाटायचं. तर असे आम्ही वर जाऊन बसलो. आपले मुख्यमंत्री काही या कार्यक्रमाला येणार नाहीत, असं कळलं. गुजरातचे मुख्यमंत्रीही फिरकले नाहीत. मग शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सिक्कीमचे राज्यपाल 'रसिकाग्रणी' श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीतच हे बारा खंडांचं प्रकाशन झालं. बाबा भांड आणि त्यांच्या टीमनं फार कमी वेळात हे काम पूर्ण केल्याचं समजलं. तावडे आणि पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली. त्यामुळं हा प्रकाशन सोहळा चांगलाच हिट झाला. स्वागताध्यक्षा शुभांगिनीराजे गायकवाड यांचंही भाषण पहिल्यांदाच ऐकायला मिळालं. त्या काहीशा अडखळत, पण पूर्ण मराठीतच बोलल्या. (नंतर जेव्हा कळलं, की त्या मूळच्या नेपाळच्या राजघराण्यातल्या आहेत, तेव्हा तर अधिकच कौतुक वाटलं.) एकूण खानदानी आदब आणि डौल त्या वयस्कर स्त्रीच्या देहबोलीतून अगदी नीटच जाणवत होता. समरजितसिंह गायकवाड हेही व्यासपीठावर होते. पण ते काही बोलले नाहीत. नंतर कार्यक्रम संपल्यावर शुभांगिनीराजेंसोबत फोटो काढून घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. सोबत त्यांच्या देखण्या सूनबाई राधिकाराजेही होत्या. या कार्यक्रमामुळं जोरदार सुरुवात झाली असं वाटलं. आता संध्याकाळी थेट संमेलनाच्या उद्-घाटनाचाच कार्यक्रम होता. मग आम्ही ग्रंथप्रदर्शनाकडं गेलो. अजून नीट सुरू व्हायचंच होतं.
'मनोविकास'च्या स्टॉलवर माझं पुस्तक ('एम. एस. धोनी - जिद्दीचा षटकार') दिसलं. मग फोटो काढणं आलंच. तेलकरांनी ते काम केलं. बाकी जरा भटकून मग मीडिया सेंटर शोधत निघालो. इथल्या विद्यापीठातील जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये हे सेंटर होतं. मग जरा शोधत, मैदानाच्या उजव्या बाजूला मागे हे डिपार्टमेंट सापडलं. तिथं तिसऱ्या मजल्यावरील ऑफिस म्हणजेच 'मीडिया सेंटर' होतं, हे कळल्यावर जरा निराशाच झाली. तिथं दोनच कम्प्युटर होते. सुदैवानं वायफाय होतं. आमच्या सहकाऱ्यांना मोबाइलवर बातम्या टाइप करून पाठवाव्या लागत होत्या. एकूण तिथं जरा यांचं जुगाड जुळेपर्यंत वेळ गेला. जरा पंख्यांत टेकायला मिळालं आणि मोबाइल चार्ज करता आला, इतकंच. या खोलीच्या समोरच डिपार्टमेंटची दुसरी खोली होती. तिथं मनस्विनी (प्रभुणे) आलीय, असं अभिजितनं सांगितलं. मग तिकडं जाऊन तिच्याशी गप्पा झाल्या. इथून आम्ही परत दोनच्या सुमारास जेवायला भोजन मंडपात गेलो. तिथं बऱ्यापैकी गर्दी होती. मांडव घातला असला, तरी त्यातून ऊन लागत होतंच. शिवाय बसायला खुर्च्याही कमी होत्या. ज्या होत्या, त्या ज्येष्ठ नागरिकांनी घेऊन टाकल्या होत्या. जेवण ठीकठाक होतं. अत्यंत ऑइली भाजी आणि प्रत्येक भाजीत शेव घातलेली... पण कढी आणि मसालेभातानं बॅलन्स साधला. जेवण झाल्यावर संमेलनाच्या मुख्य मंडपाकडं निघालो. उन्हामुळं कार्यक्रम उशिरा सुरू होणार होता. मग तिथंच जरा टाइमपास केला. तिथं असलेल्या एकमेव चहा-कॉफी स्टॉलवर कॉफी बरी मिळायची. मग ती घेतली. साधारण ऊन उतरायला लागल्यावर म्हणजे साडेपाचच्या सुमारास मुख्य कार्यक्रम सुरू झाला. तोवर गर्दीही बऱ्यापैकी झाली. मुख्यमंत्री आल्यावर मागे गडबड उडाली. या संमेलनाच्या कार्यक्रमाचा एक साचा असतो. वर्षानुवर्षे तो तोच आहे. इथं सूत्रसंचालक एक महिला व एक पुरुष आणि दोघेही स्थानिक होते. (बहुतेक!) मग इथले मराठी वाङ्मय परिषदेचे आणि संमेलनाचे सर्वेसर्वा आयोजक दिलीप खोपकर, स्वागताध्यक्षा शुभांगिनीराजे, बडोद्याचे महापौर भरत डांगर, महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी वगैरेंची भाषणे झाली.
गुजरात सरकारमधलं कुणी फिरकलं नाही. मुख्यमंत्री सोडाच, पण बाकी एखादा दुय्यम मंत्रीही आला नाही. मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे जोरदार बॅटिंग केली. संमेलनाचं अनुदान २५ वरून ५० लाख करण्याची घोषणा त्यांनी केली आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हुश्श केलं. यानंतर दिलीप खोपकर लगेच मधेच बोलायला उठले आणि म्हणाले, की ही वाढ याच संमेलनापासून द्या. हे जरी अतीच झालं. मुख्यमंत्र्यांना जायचं होतं, म्हणून त्यांचं भाषण आधी झालं. व्यासपीठावर राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. त्यामुळे सत्काराच्या वेळी प्रोटोकॉलचा प्रॉब्लेम झाला. नंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्यावर मग परत रीतसर सत्कार झाले. मुख्यमंत्री गेल्यानंतर मग मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे बोलायला उठले. तोवर आम्हाला कंटाळा आला आणि आम्ही जागेवरून उठून मैदानात फिरायला लागलो. ओळखीचे अनेक लोक भेटले. मी आधी बसलो होतो, तिथं माझ्या मागे बसलेल्या एक बाई आल्या आणि 'तुम्ही श्रीपाद ब्रह्मेच ना' असं विचारू लागल्या. त्या रोहिणी भाटे होत्या. आम्ही दोघं एका व्हॉट्सअपवर एका कॉमन ग्रुपवर होतो. पण त्या बडोद्याला असतात, हे मला माहिती नव्हतं. त्यांच्याशी बोलायला म्हणून आम्ही उठून बाहेर आलो. त्यांचे यजमानही होते. ते आता बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. नंतर त्याच ग्रुपमधले मिलिंद पुरोहितही भेटले. तेही पिंपरीला असतात, पण आम्ही भेटलो बडोद्यात! आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. तेव्हा संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचं भाषण सुरू झालं. या भाषणात त्यांनी सरकारला चार शब्द सुनावले वगैरे मला नंतर कळलं. कारण तोपर्यंत आम्ही एवढे बोअर झालो होतो, की तिथून उठून जेवायला गेलो. जेवून परत आलो, तरी देशमुखांचं भाषण सुरूच होतं. या भाषणाची छापील प्रत नंतर मिळते. त्यामुळं ते बुडाल्याची फार काही खंत वाटली नाही. साडेसात वाजता संपणं अपेक्षित असलेला हा उद्-घाटन सोहळा साडेनऊ वाजून गेले तरी सुरूच होता. बरेच लोक उठून गेले. एकूणच चांगल्या पद्धतीनं सुरू झालेला हा कार्यक्रम शेवटी मात्र पार ढपला. या उद्-घाटन सोहळ्यानंतर 'मराठी भाषासुंदरी' हा कार्यक्रम होणार होता. म्हणून आम्ही पुन्हा पुढं जाऊन बसलो. पण तो काही वेळेवर सुरू होईना. मंच व्यवस्था व ध्वनिव्यवस्था तपासणाऱ्या कलाकारांनी लोकांचा अंत पाहायला सुरुवात केली. लोक खालून आरडाओरडा करू लागले. मग कुठं साडेदहाला कार्यक्रम सुरू झाला. विघ्नेश जोशी आणि डॉ. निधी पटवर्धन यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. सुरुवातीलाच छोटी मुलं आली आणि त्यांनी श्लोक-बिक म्हटले तेव्हा घाऊक नॉस्टॅल्जिक वातावरण निर्माण झालं. कार्यक्रमाचा पुढचा प्रवास कसा असेल, याचा अंदाज आला. त्यानंतर विजय पटवर्धन आणि पुष्कर श्रोत्री यांनी 'चिमणराव-गुंड्याभाऊं'चं एक स्किट सादर केलं. म्हणजे ते आजच्या काळात असते, तर कसं बोलले असते वगैरे. चिं. वि. जोशी मूळचे बडोद्याचे, हे निमित्त. पण विजय पटवर्धन यांनी लिहिलेलं ते स्किट एवढं फालतू होतं, की काही विचारू नका. व्हॉट्सअपवर येणारे जोकच हे दोघं ऐकवत होते. एकूण फारच केविलवाणा प्रकार होता सगळा. त्याऐवजी चिं. वि. जोशींचं ओरिजिनल स्क्रिप्ट घेतलं असतं, तर पुष्कळ बरं झालं असतं. असो. त्यानंतर पुढं वेगवेगळी लोकगीतं, गाणी वगैरे झाली. पण आम्हाला साडेअकरानंतर फारच कंटाळा आला. मग आम्ही तो कार्यक्रम अर्ध्यावर सोडून, रिक्षा करून हॉटेलवर परतलो...
संमेलनात सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हा एक वेगळ्याच लेखाचा विषय होईल. माझं संमेलनाला जाण्याचं मुख्य उद्दिष्ट असतं, ते मित्र-मैत्रिणींना, प्रियजनांना भेटणं किंवा नव्या लोकांच्या ओळखी करून घेणं... तो आनंद मी मनसोक्त लुटतो. बडोद्यातही हा रिवाज पाळता आला, हे महत्त्वाचं! बाकी कार्यक्रमांची जंत्री फिजूल आहे...

(क्रमश:)

 ---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

1 comment: