30 Sept 2020

व्यंगचित्रांवरील लेख

वक्ररेषेच्या मिषाने...

----------------------

माणसाला वाचायच्या आधी पाहायला येतं. म्हणजेच एखादा लेख वाचण्यापूर्वीच तो एखादं चित्र पाहू शकतो आणि त्याचा अर्थही जाणू शकतो. त्या अर्थानं व्यंगचित्रकला ही लेखनाच्याही आधीची कला आहे, असं म्हणावं लागेल. शिवाय हजार शब्दांचा लेख जे काम करू शकणार नाही, ते एक व्यंगचित्र करू शकतं. 

लहानपणी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या माध्यमातून व्यंगचित्रांची आपली पहिली ओळख होते. कित्येकदा पानावरची मुख्य बातमी कोणती हे वाचण्यापूर्वी आपण अनेकदा हे कार्टून पाहतो आणि मगच इतरत्र वळतो. याचं कारण म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित एखादा मुद्दा त्यात हलक्याफुलक्या रीतीनं मांडलेला असतो. आदल्या दिवशी घडलेल्या एखाद्या घटनेवर काही टिप्पणी असते. ती वाचून आणि ते व्यंगचित्र पाहून आपल्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटतं. दिवसाची सुरुवात प्रसन्न होते, सकारात्मक होते. व्यंगचित्रातून अगदी मोजक्या शब्दांत फार मोठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली असते. अनेकदा ती सर्वसामान्य माणसाच्या मनातलंच काही तरी सांगणारी असते आणि त्यामुळंच ती प्रत्ययकारक ठरते. 

व्यंगचित्राची कला म्हणजे विसंगती टिपण्याची कला! यासाठी फार उच्च दर्जाची बुद्धिमत्ता लागते. अवतीभोवती काय चाललंय, याचं भान असावं लागतं. विसंगती टिपायची म्हणजे आधी संगती माहिती असावी लागते. घरातील गृहिणी जसं धान्य निवडून त्यातले खडे फेकून देते, तसंच व्यंगचित्रकाराला समाजातलं जे जे काही टोचणारं, बोचणारं आहे, ते चित्राद्वारे मांडून ते दूर करण्याचं आवाहन समाजाला करावं लागतं. ही प्रक्रिया आपोआप होते. चित्र पाहताना आपल्या अबोध मनात त्यातली विसंगती ठसत जाते आणि प्रत्यक्ष जगण्यात अशी विसंगती न ठेवण्याकडं आपला कल वाढतो. 

व्यंगचित्रकाराची चित्रकला आणि शब्दांवर सारखीच हुकूमत असावी लागते. व्यंगचित्रात चित्र श्रेष्ठ की त्यासोबत लिहिलेले संवाद जास्त श्रेष्ठ, असा वाद कधी कधी उपस्थित केला जातो. माझ्या मते, त्यातलं चित्र हेच श्रेष्ठ! याचं कारण या प्रकाराचं नावच मुळी व्यंग'चित्र' असं आहे; व्यंग'शब्द' किंवा व्यंग'वाक्य' नाही! म्हणजे व्यंगचित्रात शब्द नसतील, तर चालतं. एकही शब्द नसलेलं व्यंगचित्र असू शकतं आणि ते अनेकदा असतंही... आणि ते सर्वश्रेष्ठही असू शकतं. पण चित्र नसेल आणि केवळ संवाद किंवा एखादं विनोदी वाक्य असेल, तर त्याला आपण व्यंगचित्र म्हणू शकणार नाही. तो केवळ शाब्दिक विनोद झाला. अनेक व्यंगचित्रकार शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरतीवर भर देताना दिसतात. पण ती दुय्यम गोष्ट आहे, हे वाचकांनीही सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. एकही शब्द सोबत नसेल, तरी ते व्यंगचित्र तुमच्याशी बोललं पाहिजे. जगातील सर्वोत्तम व्यंगचित्रकारांची उदाहरणं घेतली तर ती केवळ चित्रांतूनच अधिक बोलतात, हे आपल्या लक्षात येईल. अर्थात आपल्याकडं बोलक्या व्यंगचित्रांची परंपरा आहे. तीही चांगलीच असतात. पण शब्दांना चांगल्या रेषांची जोड मिळणं मात्र आवश्यक असतं. खरं तर हे सूर आणि ताल यांच्यासारखं आहे. दोन्हींच्या मिलाफातून अजोड संगीत तयार होतं. तसं चित्र आणि शब्द यांच्या संयोगातून एक दर्जेदार व्यंगचित्र तयार होऊ शकतं, असं म्हणायला हरकत नाही.

आपल्याकडं दिवाळी अंकांमध्ये व्यंगचित्रं देण्याची परंपरा आहे. माझ्या माहितीनुसार, अगदी पहिल्या दिवाळी अंकातही व्यंगचित्र होतंच. त्यामुळं व्यंगचित्रांना दिवाळी अंकांत हक्काची जागा असते. व्यंगचित्रांच्या उपस्थितीमुळं दिवाळी अंकांचा दर्जा उंचावण्यास मदतच झाली आहे. 'आवाज'सारख्या दिवाळी अंकातल्या 'त्या खिडक्या' हे एके काळी फार आकर्षण होतं. त्या 'खिडकीच्या आड' दडलंय काय, हे पाहण्याची उत्सुकता असे. अनेक घरांत तर हा अंक जणू काही प्रौढांसाठीच असल्यासारखा चोरून वाचला जाई. सूचक व चावट लैंगिक संदर्भ असल्यानं ते तसं होत असावं. (आजच्या पिढीला ती चित्रं दाखवली तर कदाचित त्यांच्या दृष्टीनं ती बालिश ठरतील. तर ते असो.) आमच्या लहानपणी मात्र गोल, घाटदार आणि सौष्ठवपूर्ण सौंदर्यवती स्त्रिया पाहण्याची ती नामी संधी असायची. व्यंगचित्रकारही फार प्रेमानं त्या बायकांच्या पडलेल्या पदराचे आणि आतल्या ऐवजाचे चित्र रंगवीत असत. हा व्यंगचित्रांचा एक प्रकार झाला. बाकी आत पानोपानी समोर येणाऱ्या इतर विनोदी व्यंगचित्रांचं वाचन करणं हाही निश्चितच आनंदाचा भाग असायचा. या व्यंगचित्रांना कुठलेही विषय वर्ज्य नसत. साधारणतः महागाई, संसारी माणसांचे व्याप-ताप, नट-नट्या आणि राजकारण हे तर हातखंडा विषय! एखादे शहर, तिथल्या लोकांचे स्वभाव, सवयी हेही व्यंगचित्रांचे विषय असतात. पुण्यातल्या मिठाईच्या एका प्रसिद्ध दुकानाविषयी एका दिवाळी अंकात पाहिलेलं व्यंगचित्र अद्याप माझ्या स्मरणात आहे. हे दुकान दुपारी एक ते चार बंद असण्याबद्दल फेमस आहे. तेव्हा व्यंगचित्रकारानं थोडं नाव बदलून या दुकानाचं चित्र काढलं. समोर फायर ब्रिगेडचा माणूस आग विझवायला आत चालला आहे, असं दाखवलं. घड्याळात दुपारचा एक वाजलेला दिसतो आहे आणि दुकानाचे मालक दारात उभे राहून त्या फायर ब्रिगेडच्या माणसावर खेकसत आहेत - 'आग विझवायची एवढी हौस होती तर एकच्या आत यायचं!' हा अर्थातच अतिशयोक्ती अलंकार वापरून केलेला विनोद होता. पण तो कायमचा लक्षात राहिलाय तो व्यंगचित्रकारानं या घटनेतलं व्यंग नेमकं हेरल्यामुळं. 

भारतात व्यंगचित्रं म्हटलं, की काही नावं हमखास ओठांवर येतात. शंकर, आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, मारिओ मिरांडा यांच्यापासून ते मराठीत शि. द. फडणीस, वसंत सरवटे, मंगेश तेंडुलकर, खलील खान, विवेक मेहेत्रे, हरिश्चंद्र लचके, प्रभाकर झळके, चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर, विकास सबनीस आणि प्रशांत कुलकर्णींपर्यंत अनेक नावं आठवतात. पुलंच्या पुस्तकांत वसंत सरवटेंची व्यंगचित्रं असत. अपूर्वाई, पूर्वरंग, व्यक्ती आणि वल्ली, असामी असा मी आणि विशेषतः बटाट्याची चाळ या पुस्तकांत सरवटेंनी काढलेली चित्रं अफलातून आहेत. पुलंचा विनोद आणि सरवट्यांची चित्रं एखाद्या उत्तम चित्रात मिसळून आलेल्या रंगांप्रमाणे यात एकमेकांत सामावून गेली आहेत हे लक्षात येईल. गंमत म्हणजे ती व्यक्तिचित्रणं वाचून आपल्या डोळ्यांसमोर जशी व्यक्ती उभी राहील, साधारण त्याच्या अगदी जवळ जाणारं व्यंगचित्र सरवट्यांनी काढलेलं आपल्याला दिसून येतं. हा तादात्म्यभाव अपूर्व आहे. बटाट्याच्या चाळीची सरवट्यांनी काढलेली चित्रं तर अक्षर वाङ्मय म्हणून मिरवावीत एवढी अप्रतिम आहेत. लेखकाला कदाचित शब्दांच्या जंजाळातून जे सांगता येत नाही, ते व्यंगचित्रकार आपल्या रेषांनी दाखवू शकतो. लेखकाची प्रतिमासृष्टी शब्दांनी आकार घेते, तर व्यंगचित्रकाराची रेषांनी, एवढाच काय तो फरक! मात्र, जेव्हा या दोन्हींमध्ये संकल्पनाचं अद्वैत होतं, तेव्हा वाचकालाही परमानंद होतो. पुलंचे लेख आणि सरवटेंची चित्रं यांनी आपल्याला हा आनंद अपरंपार दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली राजकीय व्यंगचित्रं नंतरच्या काळात संग्रहाच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळाली. बाळासाहेबांची रेष जबरदस्त होती. इंदिरा गांधींच्या राजवटीत नऊ राज्यांत काँग्रेस सरकारांचा पाडाव झाला आणि तिथं विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री आले, तेव्हा बाळासाहेबांनी काढलेलं 'नाकी नऊ आले' हे व्यंगचित्र आजही अनेकांच्या स्मरणात असेल. यात इंदिराजींचं मूळचंच लांब नाक आणखी मोठ्ठं करून दाखवलं होतं आणि त्या नाकावर हे नऊ मुख्यमंत्री बसलेले दाखवले होते. उत्तम व्यंगचित्र कल्पना आणि शाब्दिक कोटी यांचा अचाट संगम या व्यंगचित्रात झाला होता आणि म्हणूनच ते आज जवळपास ५० वर्षांनीही लोकांच्या लक्षात राहिलंय.

वृत्तपत्रांतील कार्टून स्ट्रिप हा प्रकार पाश्चात्त्य देशांत आणि अमेरिकेत लोकप्रिय आहे. आपल्याकडं मराठीत तो जास्त रुजवला आणि लोकप्रिय केला तो चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांनी. 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणारा 'चिंटू' तमाम मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय झाला. 'चिंटू'च्या लोकप्रियतेनं अगदी लवकरच कळस गाठला. पुलं गेल्यानंतरचा निःशब्द 'चिंटू' आजही लोकांच्या लक्षात आहे. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि ऐतिहासिक यश मिळविणारी कार्टून स्ट्रिप म्हणूनच 'चिंटू'चा उल्लेख करावा लागेल. मराठी मध्यमवर्गीय लोकांची मानसिकता, वृत्तपत्राचा वाचकवर्ग, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या जगण्यातले प्रसंग यांचा एवढा जबरदस्त अभ्यास आणि निरीक्षण पंडित-वाडेकर जोडीनं केलं होतं, की हा 'चिंटू' एकदाही म्हणजे एकदाही कधी फसला नाही. प्रत्येक वेळी तो आनंदच देत गेला. यशाचं एवढं सातत्य राखणं ही कमालीची कौतुकास्पद गोष्ट आहे. मराठी वाचकांसाठी 'चिंटू' हा आता केवळ एक कार्टून स्ट्रिपमधला मुलगा नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन घरातल्या एखाद्या सदस्यासारखा झाला आहे. केवळ चिंटूच नव्हे, तर यात पंडित-वाडेकर जोडीनं तयार केलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखा फारच ठसठशीत लक्षात राहिल्या आहेत. चिंटू मालिकेवरून पुढं चित्रपटही तयार झाले. मराठीत तरी ही अभूतपूर्व गोष्ट होती. एक तर चारुहास पंडितांची रेष फारच गोड आहे. अशीच गोड रेष शि. द. फडणीसांचीही आहे. ठसठशीत आणि सामान्य प्रेक्षकांना एकदम अपील होईल, अशी ही सुंदर रेष आहे. त्यामुळंच फडणीसांची 'हसरी गॅलरी' काय, किंवा पंडित-वाडेकरांचा 'चिंटू' काय, मराठी घरांत आणि मनांत अढळ स्थान मिळवून आहेत.

वृत्तपत्रांत पान १ वर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या बाबतीत आर. के. लक्ष्मण यांचं स्थान भारतीय व्यंगचित्रांच्या इतिहासात तरी ध्रुवताऱ्यासारखं आहे, असंच म्हणावं लागेल. आर. के. लक्ष्मण यांनी साकारलेला आणि सदैव अबोल असणारा 'कॉमन मॅन' ही आता एक जिवंत दंतकथा झाली आहे. लक्ष्मण यांच्या या 'कॉमन मॅन'नं पन्नास वर्षांहून अधिक काळ भारतीयांची सकाळ हसरी केली. केवळ हसरी केली असं म्हणता येणार नाही. प्रसंगी उद्विग्न केलं, असहाय केलं, हताश केलं, चीड आणली, संताप आणला, रडू आणलं... थोडक्यात, आमच्या सर्व भावभावना लक्ष्मण यांनी त्यांच्या या छोट्याशा चित्रातून मांडल्या. उत्कृष्ट व्यंगचित्रकार कसा असावा, याचं लक्ष्मण हे जितंजागतं उदाहरण होते. लक्ष्मण यांच्यानंतर ठाकरे कुटुंबाची व्यंगचित्रकला रसिकांना भावली. खुद्द बाळासाहेब आणि नंतर राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी मराठी जनांना दीर्घकाळ भुरळ घातली. बाळासाहेबांनी तर व्यंगचित्रांना वाहिलेलं 'मार्मिक' हे नियतकालिकच सुरू केलं. माझ्या माहितीनुसार, ते मराठीतलं पहिलं आणि एवढा दीर्घकाळ सुरू असलेलं एकमेव व्यंगचित्र नियतकालिक होय. 'मार्मिक'मध्ये प्रामुख्यानं राजकीय व्यंगचित्रं असतात. मात्र, तसा कुठलाही विषय या नियतकालिकाला वर्ज्य नाही. बाळासाहेबांप्रमाणंच राज ठाकरे यांचीही रेष ताकदवान, पण लयबद्ध आहे. तिच्या एका फटकाऱ्यात अनेकांना घायाळ करण्याचं सामर्थ्य आहे. अर्थात बाळासाहेबांप्रमाणंच राजही पूर्णवेळ राजकारणात उतरल्यानं त्यांच्यातील व्यंगचित्रकारावर तसा अन्यायच झाला आहे. मात्र, या राजकारणाच्या धकाधकीतही ते मधूनच एखादं व्यंगचित्र काढतात, तेव्हा त्यांच्यातला कलाकारही सुखावत असणार.

अलीकडच्या काळात 'लोकसत्ता'त येणारी प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रं अतिशय बोलकी आणि परिणामकारक वाटतात. प्रशांत कुलकर्णी यांची राजकीय, सामाजिक समज उत्तम आणि रेषांचं भान पक्कं आहे. त्यामुळं त्यांनी हाताळलेले विषय हमखास चेहऱ्यावर हसू फुलवतात. विकास सबनीस हेही माझे आवडते व्यंगचित्रकार होते. सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये नुकतीच सुरू झालेली तंबी दुराई यांची ‘असं बोललात!’ ही नवी व्यंगचित्रमालिकाही वाचकांचं लक्ष वेधून घेते आहे. मराठीत अनेक नियतकालिकांमध्ये अनेक वर्षं दिसणारं आणखी एक नाव म्हणजे खलील खान. खलील खान यांचीही व्यंगचित्रं जबरदस्त असतात. त्यांचा तो 'ट्रेडमार्क' छोटा कुत्राही अफलातून आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक नामवंत व्यंगचित्रकार आज चांगलं काम करीत आहेत. त्या सर्वांचाच नामोल्लेख माझ्या अज्ञानामुळं इथं करणं शक्य नाही. तरीही हे सर्वच कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्य सर्वांना हसवताहेत आणि आपलं मनोरंजन करताहेत, यात शंकाच नाही. 

स्वतःच्या चुकांवर किंवा व्यंगांवर किंवा विसंगतीवर हसणारा समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असतो, असं म्हणतात. याचं कारण आपल्या चुका किंवा विसंगती समजायलाही एक बौद्धिक कुवत लागते. ब्रिटिश समाजाचं उदाहरण याबाबत एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. एरवी रुक्ष असलेल्या साहेबाला स्वतःवर हसणं जमतं. मराठी समाजात हेच काम आपले व्यंगचित्रकार करीत आहेत. ते नसते, तर आपल्या सामाजिक जीवनातलं ते एक फार व्यंग ठरलं असतं, यात वाद नाही. 

---

(एका नियतकालिकासाठी दिवाळी अंकासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी लिहिलेला, पण प्रसिद्ध न झालेला हा लेख आहे.)

(वि. सू. - व्याकरणदृष्ट्या व्यंग्यचित्र हा शब्द बरोबर आहे. पण व्यंगचित्र हा शब्द रूढ आहे. म्हणून या लेखात तो तसाच वापरला आहे.)

------

18 Sept 2020

‘बंदिवासा’तली डायरी

एक डायरी ‘बंदिवासा’तली...
----------------------------------


रसिक वाचकहो, 

मी १९९१ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमाला पुण्यात ॲडमिशन घेतली आणि पहिल्याच वर्षी नापास झालो. शाळेत कधीही पहिले तीन नंबर न सोडणाऱ्या मला हा फार मोठा धक्का होता. यानंतर मी पुण्यातच आळंदी रोडला आमच्या आत्याच्या छोट्या फ्लॅटमध्ये एकटा राहिलो आणि सदाशिव पेठेत सायकलवर जाऊन डिप्लोमाचे क्लास अटेंड केले. या काळात मी लिहिलेली डायरी... मध्यंतरी ही वही गायब झाली होती. ती परत मला सापडली आणि एक खजिना सापडल्याचा आनंद झाली. त्या वहीतली ही डायरी.... माझं वय तेव्हा केवळ १७ वर्षं होतं... आयुष्यात पहिल्यांदाच अपयश पाहिलेल्या आणि त्यामुळं खचलेल्या या मुलाची, स्वत:च स्वत:ला उमेद देत राहणारी ही डायरी आज मी तटस्थपणे वाचू शकतो. हा १७ वर्षांचा मुलगा एवढा विचार करून लिहीत होता, हे बघून आश्चर्य वाटतं. बरं लिहिलंय हे सगळं, असंही वाटलं. काळानुरूप आपल्यात असलेला निरागसपणा, प्रांजळपणा, प्रामाणिकपणा हरवत जातो आणि आपण बनचुके, कोडगे होत जातो. त्या अर्थानं आज मी या मुलालाच गुरू करायला हवं त्याच्या या गुणांसाठी... असो!

ही डायरी, तेव्हा जशी लिहिली होती, तशीच्या तशी....

----

मनोगतातलं (बरंच) थोडं... (एक विचारमंथन)
-------------------------------------------------------

९/११/१९९२
...................


१.


मला काही तरी लिहायचंय. काय लिहू? खूप मनात आहे, पण ते कागदावर येताना शब्दच आटून जातात. पेनात शाई भरपूर, पण शब्दच आटलेले; काय उपयोग? माझं हे काय चाललंय? माझा अभ्यास का होत नाहीये? खरं सांग, तूच तो नीट करत नाहीयेस!

ते खरंय, पण मी पूर्वी करत नव्हतो असं कधी! हे आत्ताच का होतं? ऐन उमेदीच्या दिवसांत ही निराशा कसली? कसलं मळभ दाटून आलंय? माझं इंग्रजी कच्चं आहे का? की प्राध्यापकांनी सांगितलेलं समजत नाही? पण खरं तर मला हे प्रचंड दगडी कॉलेज आणि तिथली घडीची पोरं पेललीच नाही. हे खरं का? मला परकं परकं वाटतं. एकदम ज्यावर स्वत:ला बिनधास्त झोकून द्यावं असं कोणीच भेटलं नाही - अगदी अभ्यासाची वह्या-पुस्तकं पण! फेल झाल्यानं ही निराशा वाढतेच आहे. मला भीती कसली वाटतीये? मी मनात आणलं तर खूप अभ्यास करून, चांगले मार्क्स मिळवू शकतो. पण हे मनातच का येत नाही? मला खरोखर शिकण्याची तळमळ नाही का? की माझा आत्मविश्वास पारच नाहीसा झालाय? हे अगदी नाही, पण काहीसं खरंय! जबरदस्त आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा मनात निर्माण होण्यासाठी मदत करणारे, पूरक असे सारेच घटक इथे गैरहजर आहेत. का बरं? मीच त्यांच्याकडे का जाऊ नये? पण पायात बळ नाहीये. कारण तेच. आत्मविश्वास वाटत नाही. असा का विचित्र तिढा बसलाय.
की मला, ‘घरच्यांसाठी आपण हे केलं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे,’ ह्या जबाबदारीची जाणीवच नाही? सांग ना! मी खरोखर लाडात वाढलो. अजूनही फेल झाल्यानंतर माझे लाड पुरवले जातायत. असे पालक, नातेवाईक नाही मिळायचे कुठे! खरंच, माझ्यावर त्या साऱ्यांचं खूप प्रेम आहे. पण माझंही त्यांच्यावर प्रेम आहे, ह्याचा मी त्यांना विश्वास देऊ नाही शकलो काही ठोस कृतीद्वारा - उदा. पास होऊन, चांगले मार्क्स मिळवून दाखवणं - तर ते हे प्रेम सतत चालूच ठेवतील का, ही भीती वाटते. पण ही भीती निरर्थक आहे. मग माझं मलाच हसू येतं. असो.
की मला माझ्यातल्या गुणांना पूर्णपणे ओळखता आलेलं नाहीये? मी भिडस्त स्वभावाचा मुलगा आहे. पण तरी कुठे तरी मी ठोस निर्णय घेतला पाहिजे होता किंवा अजूनही त्याची गरज निर्माण होऊ शकते.
माझा कल कुठे आहे? खरंच, मला का ऽऽ ही समजत नाही. मग मी मठ्ठ आहे का? तसंही मी म्हणू शकत नाही. मी असं म्हटलं तरी त्यावर कुणीसुद्धा विश्वास ठेवणार नाही. मग मला काय केलं पाहिजे, की आत्मविश्वास परत मिळवला पाहिजे. त्यासाठी एकाग्र चित्ताने अभ्यास केला पाहिजे; जो की मी आत्ता लगेच करणार आहे.
...मला माहित्ये की ह्या कामाचं फळ खूप खूप गोड मिळणार आहे. नाही तुम्हाला असं वाटत?

......

२.

हे सगळं खरंय हो! पण अभ्यासाला बसल्यावर त्यातलं समजत नाही का? समजतं. पण ते सगळं पेपरमध्ये आठवत नाही, असंही होऊ शकतं. माझी मानसिक ताकद खच्ची तर झालेली नाही ना! मला अजूनही आधाराची गरज का वाटते? मी स्वत:हून का नाही काही करू शकत? पण हेही खरं नाही! मी तर स्वत:हून बरंच काही करू शकतो. आता मला अधिक हुशार, धूर्त, चतुर बनावयास हवं. त्याशिवाय माझा निभाव लागणं कठीण आहे. ह्या आजच्या जगात उत्कृष्टतेचं शिखर गाठल्याशिवाय कोणी विचारत नाही अन् मला तर तिचा पत्ताच माहीत नाही! हे होता कामा नये. यू मस्ट स्टडी हार्ड! तुला हे केलंच पाहिजे, अशी मी सक्ती नाहीये करत! पण हे अशाकरता की स्वाभिमान, माझा आत्मविश्वास - जो मला आज अत्यंत हवासा आहे - तो मला फक्त ह्याच गोष्टी करून मिळवता येईल - अन्य मार्ग नाही!

.....

३.

मी इथं एकटा राहतो. तुम्हाला माहितीये का एकटा राहण्यात किती दु:ख आहे ते? माणूस हा सामाजिक प्राणी आहे. मी त्यातून ‘सोशल’ स्वभावाचा. मी अजिबात माणूसघाणा नाही. उलट मला माणसांत राहायला आवडतं. सगळ्या प्रकारची माणसं. अन् आपल्या इथं गर्दीला तोटा नाही. मग मी इथनं बाहेर पडतो. चहाच्या निमित्तानं कोपऱ्यावरची गर्दी पाहून घेतो. अहो हो, ह्या गोष्टी केल्यानंच तर मला जगात आपण आहोत, ह्याची जाणीव होते. नाही तर, मला इथे, तुरुंगात ‘एकांतवास’ नावाचा भयंकर प्रकार असतो, त्याचीच प्रचिती वारंवार येत राहते. केवढी जबरदस्त शिक्षा आहे ‘एकांतवास’ ही! हे म्हणजे पाण्यातल्या माशाला पाण्याबाहेर राहण्याची शिक्षा दिल्याप्रमाणेच होय. मी कोणाकडे बघू? ह्या निर्जीव भिंतींकडे? कुणाशी बोलू? ह्या लाकडी टेबल-खुर्च्यांशी? कुणाला आपल्या गमतीजमतीच्या गप्पा सांगू? ह्या कृत्रिम दाराखिडक्यांना? सांगा! अहो, वेड लागतं माहितीये वेड! तरी बरं, रेडिओ होता इतके दिवस! पण तो स्वत:च बोलतो, आपल्याला बोलूच देत नाही. अन् आता टीव्हीचीही भर पडलीये ह्यात! म्हणजे माझा अभ्यास आणखी न व्हायला! मोहाच्या आहारी न जायला मी कुणी ऋषी-मुनी नव्हे. मी तो टीव्ही बघतोच. उलट एकटा असल्यामुळे नेहमीच्यापेक्षा जास्तच! म्हणजे वेळ गेला का वाया? मला सारं कळतं, पण वळत कसं नाही? मी वरील कारणं सांगितली तीत माझा समर्थनाचा कोणताही हेतू नाही. समर्थन होऊच शकत नाही. मी, टीव्ही इथे नाहीच्चे, असं गृहीत धरतो. पण मग समोर तो प्रचंड खोका दिसत राहतो की! टोचतो सारखा! मग मन म्हणतं, का उगीच खोटं ठोकतोयस! दिसतो तर आहे खरा समोर! लाव बघू चटकन! तर हे सगळं असं आहे.

मला एकांताची सजा मिळतीये. मी पूर्ण प्रायश्चित्तलो आहे. पण हे प्रायश्चित्त अभ्यास करून, पास होऊन, घ्यायचं आहे. अन् ह्याच्याच वाटेत हा घोर एकांत येतो आहे. म्हणजे अभ्यास व्हावा म्हणून एकांत आणि एकांतामुळे अभ्यासच होत नाही? वा रे वा! काही तरी चुकतंय खरं! ह्या एकांतात माझ्यासारखा ‘सोशल’ मुलगा राहू शकत नाही. पण अरे, तुला हौसेनं कोणी ठेवलेलं नाहीच्चे! हेच तर मग प्रायश्चित्त ना! अन् मग पास होण्याचं प्रायश्चित्त ते कुठलं? की दोन दोन प्रायश्चित्तं? छे बुवा! भलताच गोंधळ उडतोय माझा! चल्! गोंधळ-बिंधळ काहीही उडत नाहीये. तू मुद्दामच घालतोयस गोंधळ! टाईमपास करण्यासाठी! अभ्यासाच्या वेळी झोपा अन् हा टाईमपास! छे छे! अभ्यासालाच फर्स्ट मान! चला, मी आता बसतोच आहे अभ्यासाला. पण हे लिहून टाकल्याशिवाय मनाची अस्वस्थता नाही शांत होत. अहो, शेवटी मी भावनाप्रधान मुलगा आहे. मी गेले दोन-अडीच महिने डोळ्यांतून टिपूसही न काढता ढसाढसा रडतोय हो! पण रडायला काय झालं, आँ? कुणी मेलंबिलं तर नाही ना? नालायक! रडतोय म्हणे! काही लाजही वाटत नाही वर सांगायला - रडण्याच्या वेळात अभ्यास केला असतास ना तरी ते चाललं असतं! असो. अहो, रागावू नका हो असं. मी करणारच आहे खूप खूप अभ्यास. खूपच खूप अभ्यास. त्या अभ्यासानं मी पास होईन. मग मला ताठ मानेनं जगता येईल. आयुष्यात एक तर ताठ मानेनं जगावं किंवा जगूच नये. मी दोन्ही करत नाहीये. मी ‘जगू नये’ हा दुसरा पर्याय अजिबात धुडकावून लावत आहे. मी ताठ मानेनं जगणार आहे. होय! इतके दिवस ताठ मानेनं जगलो अन् घरच्यांचीही मान ताठ राहिली. आता मला वाटतंय दु:ख ते फक्त याचं, की माझ्यामुळं त्यांची मान झुकली. त्यांना केवढं प्रचंड दु:ख झालं ह्या प्रकाराने! पण त्यांनी बोलून नाही दाखवलं कुणी! कारण त्यांचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. पण म्हणून मला कळत नाही असं थोडंच आहे? पण आता मी माझ्या कृतीद्वारे त्यांचा (स्वाभि)मान परत मिळवून देणार आहे. मी अभ्यास करणार आहे. ह्याच कृतीद्वारे आता मी हे करू शकतो. चला, ठरलं तर. ह्या परीक्षेत नक्की पास होणारच. माझा आत्मविश्वास हळूहळू फायदेशीररीत्या मला परत मिळतोय. चला, ह्या एवढ्या पानांच्या नासाडीचं हे फळ काय कमी आहे?

......

४. 

हे जीवन मला काही मीच प्रदान केलेलं नाही. त्यावर इतरांचाही हक्क आहे; उलट तुझ्यापेक्षा कांकणभर जास्तच! मग हे जीवन संपविण्याचा मला अजिबात अधिकार नाही. अन् मी म्हणतो, कशाला हे सगळं? आँ? खरंच, हे जग किती सुंदर आहे! टवटवीत निसर्ग आहे, नद्या आहेत, शेतं आहेत हिरवीगार, पाऊस आहे, अन् त्याहीपेक्षा ‘माणूस’ नावाच्या प्राण्यानं प्रचंड ऊतपात करून रचलेलं हे कृत्रिम जग किती सुंदर आहे! सुंदर शहरं, उंच उंच उत्तुंग, सुबक, देखण्या इमारती! रस्ते, चकचकीत गाड्या, दुकानं, ही सुखाची साधनं, हा टीव्ही, हा रेडिओ! खरंच! किती प्रचंड पसारा मांडलाय ह्या उद्योगी माणसानं. मला तो पुरता पाह्यचाय. मीही काही ना काही उद्योग करून माझा खारीचा किंवा त्याहून कमी वाटा उचलीन. पण ह्या जगाच्या सुंदरतेत कुठे तरी भर घालीन. एका स्वच्छ, सज्जन अशा व्यक्तीची माझ्या रूपाने तरी मला भर घालता येईलच ना! नक्की येईल. मी प्रतिष्ठा मिळवीन. पंचक्रोशीत का होईना, थोडंफार नाव मिळवीन. खूप इच्छा-आकांक्षा आहेत मह्या इवल्याशा जीवनात माझ्या! पण प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजेच यशस्वी होणं! मी सध्या अयशस्वी मुलगा आहे. म्हणजे पायाशीच सगळं बांधकाम अडलंय. पण मग मी यशस्वी होऊन ही धोंड दूर करायला हवी. मग मी यशस्वी व्हायला काय केलं पाहिजे? तर मी अभ्यास केला पाहिजे. त्याने तू इच्छिलेल्या साऱ्या गोष्टी पूर्ण होतील. पण अभ्यास का होत नाहीये? आत्मविश्वास जरा कमीच वाटतोय. तोही अभ्यासावरच अवलंबून आहे. आधी अभ्यास! तो केल्याने सारं मिळेल. अगदी आत्मविश्वाससुद्धा! ठीक तर. हा आता बसतोच अभ्यासाला. पार झकासपैकी करून टाकतो अभ्यास! बेस्ट म्हणजे बेस्टच होऊन जाईल मग सारं!!

......


५. 

कधी कधी वाटतं, हे सगळं फेकून द्यावं, झटकून टाकावं पालीसारखं अन् दूर दूर कुठे तरी निघून जावं. मला खरोखर ह्या साऱ्यांत रुची वाटतच का नाही? वाटत होती - आता नाही! ह्याची काही ठोस कारणं असली पाहिजेत. का बरं अशी अनासक्ती निर्माण व्हावी? तीही माझ्यासारख्या ‘सोशल’ मुलात? ह्या तरुण वयात? छे! खरं तर पुरतं असं वाटतच नाही कधी. मी मनातलं सारं खरं खरं तरी लिहितोय का इथे? हो, मला तरी तसं वाटतं. हे वाक्य इथं लिहिलंय त्यावरून तरी. नाही तर ही शंका मनातच ठेवली असती. 

मला हे गणिती खेळ नाही जमत. हा दोष माझा नव्हे. मला परफेक्टनेसपेक्षा प्युअरनेस जास्त भावतो. मला सगळंच पट्टी अगर ड्राफ्टरने नाही मोजता येत. हाही दोष माझा नव्हे. पण याचा अर्थ तुला ते येतच नाही, असं नाही. एकदा त्यात शिरलं की ते यायलाच हवं. आवडत नाही म्हणजे जमत नाही, असं नाही. तर ते अभ्यासानं सहज मिळवता येतं. अन् मी ते मिळवीन. मी संगीतप्रेमी आहे. मला नाटकं आवडतात. सिनेमे, टीव्ही पाह्यला आवडतं. लिहायला तर चिक्कार आवडतं. पेन हे माझं शस्त्र आहे. मी बोलू शकत नाही. मी भिडस्त स्वभावाचा माणूस आहे. एखादी गोष्ट हॅमरिंग करून म्हणा अथवा ठासून सांगून म्हणा, दुसऱ्याच्या गळी उतरवण्याची कला नाही आपल्याला जमत! वक्तृत्वगुण नाहीचेत म्हणा ना माझ्या अंगात! शाळेतसुद्धा कधी फार भाषणं केली नाहीत. जी थोडी फोर केली, त्यातही चेहऱ्यापेक्षा हातपायच हलायचे. असो. मी त्यापेक्षा लिहिणं जास्त पसंत करतो. आपल्याला जे वाटतं ना, ते लिहून ठेवावं. दुसऱ्याला ते आवडलं तर वाचेल, नाही तर ठेवून देईल. शिवाय लिहिल्यानं एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. शिवाय अभ्यासपूर्ण मतं मांडण्याची सवय होते. तोंडची वाफ दवडण्यापेक्षा हे बरं. पण मी घुम्याही नाही. फालतू व निरुद्देश अखंड बडबड करायलाही मला आवडतं. असो.

पण मी ह्या कला क्षेत्रात काय करतूद दाखवणार? तेथे आधीच गर्दी इतकी, की प्रेक्षकांपेक्षा कलाकारच जास्त झालेले. शिवाय ह्या महागाईच्या काळात पोटापुरतं तरी मिळवावयास हवं. मला नाही वाटत, की हे कला क्षेत्र त्या दृष्टीनं योग्य आहे म्हणून! तेथे शिखरावर पोहोचलेलेसुद्धा पोटापाण्यासाठी ‘साईड बिझिनेस’ करतात. मग माझ्यासारख्या नवख्यानं तर विचारदेखील करायला नको.

हे असं निराशाजनक चित्र मला का दिसतंय सगळीकडं? मन निराशावादी म्हणून सगळंच निराशावादी, असं तर नसेल? मला हा भिकार, देशोधडीला लावणारा निराशावाद देशोधडीला लावला पाहिजे. मी निराशावादी नाही. मी आशावादी मुलगा आहे. कुठं तरी आशेचा किरण लुकलुकत असतो, आपण तोच धागा पकडून पुढं जायचं असतं. मीही तेच करणार आहे. आधी ज्यात पाऊल ठेवलंय, ते क्षेत्र तर काबीज करू. मग इतरांची चर्चा! 

म्हणजेच मला आधी हा कोर्स पूर्ण करावयास हवा. म्हणजेच छान झटून अभ्यास करायला हवा व उत्तम गुणांसह तो पूर्ण करावयास हवा. म्हणजेच मला त्यासाठी अभ्यासच करावयाला हवा. मी तो करेन. काही चुका जरून झाल्या असतील, पण त्यांची आता पुनरावृत्ती तरी मी निदान होऊ देणार नाहीये. मी आता लागतोच धडाकेबाज अभ्यासाला! छानपैकी पेपर सोडवून टाकणारे यावेळेस! ठेवणारच नाही मागे काही कटकट! चला, होऊनच जाऊ द्यात आता. दे दणादण!!!

.....

६.

‘मी यशस्वी होणारच’, ‘मी ह्यात ह्याचं शिखर गाठीन’, ‘माझ्यासारखा ह्या ह्या क्षेत्रात कुणी होणार नाही’ असं जबरदस्त आत्मविश्वासपूर्ण लिहून थोडाफार काळ मनाचं समाधान नक्कीच मिळवता येतं. पण नीट लक्षात ठेव, थोडाफार काळ! नेहमीसाठी नाही बरं! ठोस काही तरी उपाय हवाय ह्या समस्येवर! माझं मन अजून कसं हे स्वीकारत नाही की आत्मविश्वास मनात निर्माण होण्यासाठी मला काही गोष्टी करणं नितांत जरुरीचं आहे. उदा. अभ्यास करणं. ह्या गोष्टीमुळे भलताच फरक पडू शकतो बरं! ही अशी गोष्ट आहे, की जीमुळं मला माझा आत्मविश्वास नक्की परत मिळू शकतो. मी तो प्रयत्नपूर्वक मिळवावयास हवा. 

जगात काही गोष्टी अशा असतात, की त्यांच्याशिवाय तुम्ही अगदीच लुळेपांगळे होऊन जाता. तुम्हाला काहीच करता येत नाही किंवा करावंसं वाटत नाही. ती गोष्ट म्हणजे जोडीदार, मित्र. मी ह्या बाबतीत आत्तापर्यंत भलताच दुर्दैवी निघालो. मला कध्धीच चांगला मित्र मिळाला नाही. त्या त्या काळापुरते उत्तम आणि बरेच असे मित्र मला लाभले. पण ज्यांच्यावर विश्वासानं विसंबून राहावं, ज्यांच्याशी सारं मन मोकळं करावं, असं कुणीच भेटलं नाही! की मीच कुणाला शोधलं नाही? माझी पारख करण्याची क्षमता कमी आहे का? बहुदा तसं असावं. की माझा स्वभाव वाईट आहे? स्वार्थी आहे? पण मग मला काही मित्र तर उत्तम मिळाले होते, ते स्वभावाच्या बाबतीत माझ्यावर अगदी खूष होते. अन् मलाही असं कधी वाटलं नाही. मी ‘मित्र’ म्हटलं, की सगळं झोकून देतो. आजही कुणी माझा मित्र झाला तर माझी हीच स्थिती कायम राहील. कारण स्वभावच तो! कसा बदलेल?

मात्र या घडीला कुणा अत्यंत जवळच्या सुहृदाची उणीव खूप खूप जाणवतेय, हे निश्चित. मग तो कुणीही असो. मुलगा किंवा मुलगी! तरुण वयात असल्यामुळे मुलगी मैत्रीण असावी, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मला त्याबाबतीत नाही म्हणायचं. मुलगी अशाकरता, की मुलांपेक्षा मुली दुसरीचं किंवा दुसऱ्याचं दु:ख किंवा भावभावना अधिक चट्कन समजून घेतात. नुसत्या समजून घेतात असं नव्हे, तर त्या भावनांशी एकरूप होतात. ही मोठी फायदेशीर गोष्ट आहे एखादी मुलगी आपली मैत्रीण असण्यात! पण मी याही बाबतीत अजून दुर्दैवीच म्हणावा लागेल. असो. अजून खूप जीवन बाकी आहे. कोणी ना कोणी भेटेलच. त्या ‘त्याला’ किंवा ‘तिला’ शोधत राहायचं आपण फक्त! 

आज मला त्या ‘त्याने’ किंवा ‘तिने’ नक्कीच आधार दिला असता, समजून घेतलं असतं. माझा आत्मविश्वास परत मिळवून दिला असता. अशा एखाद्या ‘त्याची’ किंवा ‘तिची’ खूप उणीव भासतेय. खरंच, त्या बाबतीत मी अगदीच भिकारी कसा काय राह्यलो, काही कळत नाही बुवा! असो.

खरा प्रश्न आहे तो म्हणजे मला कुणी समजावून घेण्याचा अगर ‘माझं’ म्हणून कुणी तरी असण्याचा! जाऊ दे झालं. काही बाबतींत नशिबावरच अवलंबून राहावं लागतं. असेल माझं नशीब जोरदार तर भेटेलही अशी एखादी व्यक्ती जी खरोखर माझी अत्यंत जवळची किंवा लाडकी ‘मित्र’ होऊन जाईल. 

अरेच्चा! पुन्हा तेच? सांगितलं ना खरा प्रश्न समजावून घेण्याचा आहे म्हणून! पण समजून घेण्याची मला, कुणी तरी, आत्ताच गरज का निर्माण व्हावी? अन् मला वाटतं, तुला घरच्यांनी आत्तापर्यंत खूपच समजून घेतलेलं आहे तसं! मग आत्ताच काय आहे त्याचं एवढं? हं! खरं आहे ते! मी खरं तर एवढं एरंडाचं गुऱ्हाळ घालायलाच नको होतं ह्या बाबतीत! एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशाइतकी सत्य आणि स्पष्ट आहे की, तुला आत्मविश्वास हा परत मिळवावयासच हवा व त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे अभ्यासाचा! अभ्यास करूनच हे आत्मबित्मविश्वास परत मिळवता येतात, कळलं का? अन्य मार्ग नाहीच.

तेव्हा तू आता अभ्यासास लागावंस, हे उत्तम! उत्तम अभ्यास केला, की मला उत्तम गुण मिळतील. प्रगतीतले सारे अडथळे दूर होतील. मला पुढं जाण्यासाठी नवा उत्साह येईल. हो! मी आशावादी तरुण आहे. हे सगळं असंच होईल हे नक्की! चला तर मग. मग घरच्यांनाही उत्साह येईल, उमेद येईल. मग करतोच मी सुरुवात आता दणकेबाज अभ्यासाची!!!

......

७.

माणसाचं आयुष्य केवढंसं आहे नाही! अवघं ऐंशी-पंचाऐंशी वर्षांचं! जग तर किती जुनं आहे कोटी कोटी वर्षांचं! पण माणसाचं जीवन तसं पाहिलं तर केवढं तरी मोठंच आहे. किती उलथापालथी करतो हा प्राणी एवढ्याशा आयुष्यात! सतत पुढं जाण्याची धडपड असते त्याची! प्रगतीचं वेड आहे त्याला! ह्या जगात किती तरी बुद्धिमान माणसं होऊन गेली, ह्याची गणतीच नाही. त्यांनीच हे सुंदर जग उभं केलं. नाही नाही ते उद्योग केले. पण मजा आहे! चांगलं वाटतं, असं लढूनलढून, धडपडून पुढं जायला! साऱ्या माणसाच्या जातीचीच ही कहाणी तर मीही मग माणूसच आहे ना! प्रत्येकाला कुठे ना कुठे अपयश हे लिहून ठेवलेलंच आहे. कुठे तरी हा ‘बॅडपॅच’ लागतोच. मग मलाही तो आत्ता लागला असेल. पण मग तो कधीच समाप्त होणार नाही का? होईल ना! पण प्रयत्न करावयास हवेत. असं हातपाय गाळून नाही चालणार. पण हा अपयशाचा बट्टा अगदीच हातपाय गाळून टाकतो आपले. काही काही करावंसं वाटत नाही. पुढं जाण्यातला सुरुवातीचा उत्साह नष्ट होतो. ठेच लागलेली असते ना! पण मग ही जखम आयुष्यभर कुरवाळत बसायचे का? तिला तात्पुरती मलमपट्टी करून पुढं नाही का जाता येणार? येईल, नक्की येईल. यायलाच पाहिजे.

माणसाचं मला मोठं नवल वाटतं. म्हणजे तसा हेवा वाटतो म्हणा ना! तेवढ्यापुरत्या अपयशाला तो अजिबात भीक घालत नाही. त्याला ओलांडून पुढे जातो. आकाशाहून मोठा होतो. मग मीही माणूसच आहे ना! मलाही ही महत्त्वाकांक्षा आहे. मीही हे अपयश धुऊन टाकणार. थोडाफार असा धक्का बसल्याशिवाय मला तरी कसा अनुभव येणार ह्या जीवनाचा? पण अनुभव असाच, ह्याच पद्धतीने याला हवा होता, असं काही बंधन नव्हतं कधी! पण ठीक आहे. मी आहे ती परिस्थिती स्वीकारलीये. मला आता ह्याच्याही पुढे जायचंय - अन् मी जाईनच!!

......

८.

मला माणसाच्या स्वभावाचं गूढ उकलत नाही. त्याला उत्तुंग ठिकाणी जायचं तर असतं, पण तो कधी कधी इतका हताश होऊन जातो, की स्वत:च्या जीवनाचा अंतच करून टाकतो. पण मी भित्रा नाही. भेकड, पळपुटा नाही. मी माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगांचा, परिस्थितीचा योग्य तो सामना करू इच्छितो. यालाच तर ‘जीवन’ म्हणतात. जीवनात संघर्ष नाही लागला करावा तर ते जीवन अगदीच अळणी होऊन जाईल. नाही, मला अळणी जीवन नाही जगायचं! पण ह्या अपयशी प्रसंगांशी झगडा करीत करीतच मरायचंही नाही. शेवट कुठं तरी चांगला व्हायला हवा. तो म्हणजे यशस्वी असा व्हायला हवा.

मग त्यासाठी काय केलं पाहिजे? यशस्वी होण्यासाठी आज अनेक चांगले-वाईट मार्ग उपलब्ध आहेत. अर्थात, वाईट मार्गच जास्त! पण मला वाईट मार्गानेही यशस्वी व्हायचं नाही. कारण मला माहित्ये की ह्या मार्गाने यशस्वी होण्याचं मानसिक सुख कधीही मिळत नसतं. किंबहुना, आपण यशस्वीसुद्धा झालेलो नसतो तर फक्त वरवर तसं वाटत असतं, आपल्याला सारखं. मनाचं खोटं समाधान करून घेत कुढत अतो आपण तसल्या मार्गाने!

मग मला चांगल्या मार्गाने यशस्वी व्हायचंय. मग साहजिकच मला खूप श्रम करावे लागतील. मी तर म्हणतो, मी अजून खरे श्रम केलेलेच नाहीत. खरे श्रम म्हणजे काय, हेच मला माहीत नाही. त्याचा अनुभवच नाही. मग मी तो आता घ्यायला हवा. आता कष्ट करायला हवेत. मग त्याचा रस्ता जातो तो थेट यशस्वीतेकडे!!

......

९. 

आजूबाजूला खूप मुलं आहेत, सगळी हुशार आहेत. ह्यांच्या गर्दीत मी काय टिकणार? मला काय येतंय, ही भावना अगदी गोळ‌ी घालून ठार केली पाहिजे मला! मी म्हणजे फार भारी कुणी तरी आहे, असा थोडासा ‘ओव्हर’च, पण आत्मविश्वास असल्याशिवाय नाही मला काही करता येणार! 

आणि जग तर हे असं आहे, की तुम्हाला शब्दांच्या टोची मारून मारून, घायाळ करून, तुमचा आत्मविश्वास - काही करण्याची उमेद - अगदी चेचून मारायला टपलेलेच असतात सगळे. मला ह्यांच्या तावडीत सापडलं ना, की अगदी नक्को नक्को होऊन जातं. कुठून ही नसती बिलामत ओढवून घेतली अंगावर, असं होतं. पण मला ह्या साऱ्यांचा सामना केलाच पाहिजे. अर्थात माझ्या नजरेला सगळेच असे का दिसतात? वाईट! म्हणजे माझ्या विचारसरणीतही काही तरी दोष आहे. मी पॉझिटिव्हली थिंकिंग करीत नाही का? करतो! मला तसा ह्या जगाचा राग नाही येत, कारण समोरचा चुकला की त्याचे कान उपटायला मीही सगळ्यांच्या दोन पावलं पुढंच असतो की! मग स्वत:वर शेकलं की असा राग का यावा? वा रे वा! बराच आहेस की! हे योग्य नाही. मी सगळ्यांशी असंच वागलं पाहिजे, जसं त्यांनी माझ्याशी वागावं असं मला वाटतं. म्हणजेच चांगलं वागायला पाहिजे. मग पण मी कुठे वाईट वागतोच कुणाशी? नाही रे! वाईट नाही वागत तू, पण नाही म्हटलं तरी थोडी चिडचीड होतेच की!

खरं तर दुसरे असा, माझ्याइतका विचारही करत नसतील माझ्याशी बोलताना! पण काही जण नक्कीच असेल आहेत, की जे वरीलप्रमाणे विचार करूनच माझ्याशी बोलतात. त्या ‘माझ्या’ अशा लोकांशी मी पण इतका विचार करूनच वागणार, बोलणार! तरच ते योग्य होणार आहे.

.......

१०.

मी आता मोठा झालोय! लहान नाही राहिलो! पण मला कधी कधी एकदम बालपण आठवून लहान व्हावंसं वाटतं, सगळ्यांप्रमाणेच! ‘बालपण दे गा देवा’ असं तुकाराम उगाच नाही म्हणाले काही. खरंच! बालपण किती सुंदर आहे! पण तज्ज्ञांच्या मते, आयुष्यातल्या सर्वांत सुंदर अशा काळात असताना, म्हणजेच तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, मला लहान व्हावं आपण, असं का वाटावं? हे विचार कुठे तरी ‘डिफेक्टिव्हिटी’ दर्शवतात माझ्यातली! नेमकं काय बिनसलंय? मला हे आगामी तारुण्य नकोय का? अर्थात, माझ्या हातात काहीही नाही, अन् मला ते नकोय असंही नाही.

खरोखरच, आयुष्यातल्या सर्वांत सुंदर कालखंडात प्रवेश करताना, त्याला नाकारण्याचा करंटेपणा मी कसा करीन? मला हे सळाळतं तारुण्य, उत्साह, ऐन यौवनातली ती बहारदार स्वप्नावस्था, सारं सारं हवंय. पण मग इच्छा एवढीच आहे, की ह्या उत्साहाचा, ह्या जोशाचा उपयोग माझ्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, आयुष्यात काही तरी बनण्यासाठी व्हावा.

नाही तर हे तारुण्य म्हणजे एक उत्साही, सळाळती लाटच आहे. जशी जोरात येऊन बिलगते, तशीच विरूनही जाते. ती पुरती विरण्याच्या आत मला तिचा पुरता उपयोग करून मोठं व्हायचंय. ऐन उमेदीतल्या वर्षांना माझ्या आयुष्यातली ‘गोल्डन मेमोरियल इयर्स’ बनवायची आहेत. तशी, सर्वांप्रमाणेच, माझीही इच्छा आहे. पण मग मी ती इच्छा यशस्वीतेत बदलण्यासाठी काय केलं पाहिजे तर खूप कष्ट केले पाहिजेत. 

खूप झटलं पाहिजे मला माझी स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी! आणि मी झटणार आहे!!

.......

११.

मी कोण आहे? मी कधी मलाच शोधलं आहे का? मनाच्या प्रतिबिंबात मी कधी डोकावलं आहे का? मी कधी स्वत:चा नीट असा विचार केला आहे का? माझ्यातले गुण-दोष नीट तपासले आहेत का? स्वत:चा स्वभाव मला पूर्णतया उमगला आहे का? मी इतरांशी कसं वागावं, हे मला कळतं का? आयुष्यातल्या बऱ्याचशा घडामोडींशी तू जवळजवळ परिचित झालायस का? 

मला वाटतं, बहुतेक प्रश्नांची उत्तरं नकारार्थीच येतील. खरंय ते. आत्तापर्यंत फुलांच्या ताटव्यातनं फिरत होतो मी! जीवनाच्या मुख्य महामार्गाला आताशी कुठं लागलोय मी! इथली प्रचंड रहदारी पाहून बावरलोय मी! पण मग मी कधीच हा विचार करू नये का? करावा! जरूर करावा! स्वत:ला पूर्ण ओळखावं. अगदी ‘आत्मज्ञान’ वगैरे नाही समजत, पण कुठे तरी स्वत:शीच जाऊन भिडावं, मनाशी हितगुज करावं. 

मी हे सारं करून पाह्यलंय पहिल्यांदाच! पण छान वाटतं! मनात कुठेही खळबळ माजलेली राहत नाही, विचारांना एक पूर्णत्व लाभलं जातं. मनाचा हा तलाव डहुळलेला राहत नाही, तर शांत, धीरगंभीर बनतो. अर्थात तो सतत तसाच राहू नये, हेही खरं! पण प्रश्नांचे, चिंतेचे, काळजीचे खडे त्यात पडले की विचारांचे तरंग आपोआप उमटतातच! त्यात आपल्याला स्वत:ला विशेष असं काही करावं लागत नाही. 

पण ठीक आहे. मला माझ्या मनाशी ‘संवाद’ साधण्याची प्रक्रिया - कला - जमतेय हळूहळू. कुठे तरी हा संवाद ‘टेप’ केला जातोय माझ्या मनात! कुठे तरी मी आता असा अंतर्मुख होऊन हा संवाद करतोय तरी निदान!

बरं वाटतं, असं केल्यानं मला! आता मी पूर्ण ‘क्लीन’ आहे. माझं मन ‘स्वच्छ’ झालंय. ही खळबळ, हे असंबद्ध विचार बरेचसे कागदावर उतरले आहेत, मला वाटतं. मला हे वाचून एक नवीन काही तरी जाणीव व्हायला लागलीये. मी कुठे तरी एक ‘उंची’ गाठलीय, असंही मला उगीचच वाटायला लागलंय. 

अरेच्चा! ह्यालाच तर ‘आत्मविश्वास’ म्हणत नसावेत? व्वा! आता मी यशस्वीतेच्या दिशेने जबरदस्त गरुडझेप घेईन. मी त्यात यशस्वी होईनच, असा तुफानी आत्मविश्वास मला वाटायला लागला आहे. 

हे अत्यंत चांगलं फळ मला ह्याकामी मिळालेलं आहे!!

---

लेखनसीमा.

-----




-------------------------