2 Dec 2023

हंपी डायरी - भाग ३

‘अंजनाद्री’पासून तुंगभद्रेपर्यंत....
---------------------------------------

हंपीत पहिल्याच दिवशी पाहिलेल्या अद्वितीय शिल्पसौंदर्याची स्वप्नं पाहतच रविवारची रात्र सरली. आज सोमवार (२७ नोव्हेंबर) म्हणजे आमचा हंपीतला दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आजही लवकर उठून आवरलं. साडेआठपर्यंत ब्रेकफास्ट करून आम्ही मंजूबाबाची वाट पाहायला लागलो. हंपीत दक्षिण हंपी आणि उत्तर हंपी किंवा नदीच्या अलीकडील आणि पलीकडील असे दोन भाग आहेत, हे आम्हाला माहिती होतं. आदल्या दिवशी आम्ही दक्षिण किंवा नदीच्या अलीकडचं हंपी पाहिलं होतं. आता आम्हाला उत्तरेला म्हणजे तुंगभद्रेच्या पलीकडे जायचं होतं. मंजूबाबा साधारण नऊ वाजता हॉटेलवर आला. आम्ही लगेच निघालो. पहिला टप्पा होता अंजनाद्री. इथं हनुमानाचा जन्म झाला, असा स्थानिकांचा दावा आहे. (असाच दावा नाशिकजवळील अंजनेरी पर्वताबाबतही केला जातो.) हा सर्व परिसर विरुपाक्ष मंदिर केंद्रस्थानी धरल्यास १२-१३ किलोमीटरच्या परिघात असावा, असा माझा समज होता. प्रत्यक्षात अंजनाद्री आमच्या हॉटेलपासून तब्बल ३२ किलोमीटर दूर होतं. आम्ही बराच काळ रिक्षातून प्रवास करत होतो म्हटल्यावर मी मंजूला विचारलं, तेव्हा त्यानं हे अंतर सांगितलं.
आम्ही साधारण दहा वाजता अंजनाद्री पर्वताच्या पायथ्याशी पोचलो. एखाद्या देवस्थानाजवळ असतात तशी इथंही दोन्ही बाजूंना दुकानं, खाण्याचे स्टॉल आदी होतं. साधारण पर्वतीच्या दीडपट आकाराची ती टेकडी होती.  एकूण ५७५ पायऱ्या होत्या. वर चढून जायचं की नाही, याचा आम्ही विचारच केला नाही. जायचंच हे ठरलं होतं. स्वत:ला आव्हान देण्याचा एक प्रकार करून पाहू, असाही जरा एक विचार होता. सकाळची आल्हाददायक वेळ होती. सुदैवानं ऊन नव्हतं. ढग आले होते. आम्हीही इतरांप्रमाणे ‘जय श्रीराम’ म्हणून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. सुरुवातीला उत्साहाने शंभर पायऱ्या चढल्यावर मात्र दम लागला. इथं या पायऱ्या उंच होत्या. मात्र, त्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी शेड घातलेली होती आणि मधे मधे बसायला बाकही होते. आम्ही थोडं थांबत, थोडं बसत हळू हळू ती टेकडी चढून वर गेलो. नंतरच्या टप्प्यात तर ढग दूर होऊन सूर्य तळपू लागल्यानं घामाघूम व्हायला झालं. मात्र, शेवटचा टप्पा पार केल्यावर स्वत:च स्वत:ला शाबासकी दिली. आपण स्वत:ला अनेकदा कमी लेखतो. मात्र, प्रत्यक्षात वेळ आल्यावर आपण किती तरी मोठ्या गोष्टी सहज करू शकतो. याचाच हा एक छोटा नमुना होता. मी व धनश्री सर्वांत आधी पोचलो. थोड्या वेळानं साई व वृषाली आले. इथं अनेक स्थानिक भाविक हा पर्वत अनवाणी चढताना पाहिले. खाली एक चप्पल स्टँड दिसलाही होता. मात्र, आम्हाला स्पोर्ट शूज घातल्याशिवाय इथं चढणं अवघड वाटलं होतं. आम्हाला वर येतानाही अनेक स्थानिक मंडळी शूज का घातले आहेत, असं खुणेनं विचारत होती. मात्र, आम्ही इतर काही पर्यटक आमच्यासारखेच शूज घालून उतरतानाही पाहत होतो. तेव्हा अनवाणी चालणं हे ऐच्छिक असावं, अशी आपली आम्ही सोयीस्कर समजूत घालून घेतली आणि तसेच वर चालत राहिलो. वर देवळाच्या शेजारी शूज अर्थातच काढून ठेवले. इथं माकडं भरपूर आहेत. देवळाच्या थोड्याशा सावलीखेरीज तिथं सावली कुठंही नव्हती. आम्ही तिथंच थोडा वेळ टेकलो. जरा काही तरी खावं, म्हणून जवळची राजगिरा वडी काढून खाल्ली. वृषालीनं ती लगेच न खाता हातातच ठेवली होती. त्यामुळं एक माकडाचं पिल्लू टुणकन उडी मारून तिच्या पायावरच येऊन बसलं. त्याबरोबर आम्ही सगळेच दचकलो आणि थोडासा आरडाओरडा झाला. अर्थात मी लगेच तिला सांगितलं, की हातातली वडी देऊन टाक. तिनं ती वडी त्या पिल्लाला दिल्याबरोबर ते लगेच उडी मारून तिथून पसार झालं. नंतर पुन्हा आम्ही उतरेपर्यंत एकही खाण्याचा पदार्थ सॅकमधून बाहेर काढला नाही. नंतर मंदिरात गेलो. शेजारी नारळाच्या तुकड्यांचा ढीग पडला होता. समोर एक मोठी घंटा टांगली होती. त्यापुढे संरक्षण म्हणून लावलेल्या जाळीला अनेक नवसाचे कापडाचे तुकडे बांधलेले दिसत होते. त्यापलीकडे मोठी दरी होती. तिथं भन्नाट वारा येत होता. खाली तुंगभद्रेचं विशाल पात्र (सध्या जरा रोडावलेलं) आणि हिरवीगार भातशेती, त्यात डुलणारे माड असं देखणं निसर्गचित्र दिसत होतं. मी किती तरी वेळ तिथं उभं राहून ते न्याहाळत होतो. समोरचे डोंगर आपल्यासारखे नव्हते. तिथं सगळीकडं फक्त मोठमोठ्या शिळाच पडलेल्या दिसत होत्या. लहानग्या हनुमानानेच बालपणी खेळ म्हणून खेळून ही सगळी रचना केली आहे, हे मंजूबाबानं आम्हाला येतायेताच सांगितलं होतं. आम्हीही त्यावर भक्तिभावाने माना डोलावल्या होत्या. मला त्या सगळ्या परिसराचीच भौगोलिक रचना (टोपोग्राफी) अतिशय विलक्षण, वेगळी वाटत होती. आम्ही मारुतीरायाचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मला ‘भीमरूपी महारुद्रा’ सगळ्यांनी एकत्र म्हणावंसं वाटू लागलं. सलीलनं केलेलं या स्तोत्राचं नवं गाणंही आठवलं. नंतर त्या टेकाडावर मंदिराच्या विरुद्ध बाजूला केलेल्या पॉइंटवर जाऊन फोटोसेशन केलं. अजून थोडं वर चढून गेलं, की त्या सगळ्या शिळा दिसत होत्या. तिथंही जाऊन आलो. आता ऊन वाढलं होतं. आम्ही आता उतरायला लागलो. उतरणं तुलनेनं सोपंच होतं. वर येताना धनश्रीला एक जर्मन तरुणी भेटली होती. इतरही काही परदेशी पाहुणे दिसत होते. आम्ही उतरताना अनेक लोक वर येताना दिसत होते. मात्र, आता उन्हामुळं त्यांची बऱ्यापैकी दमछाक होतानाही दिसत होती. आम्ही टणाटण उड्या मारत आता उतरत होतो. वीस-एक मिनिटांत आम्ही खाली आलोही.

मंजूला फोन लावला. तो दोन मिनिटांत आला. तोवर आम्ही उसाचा रस घेऊन जीव शांत केला. मंजू आल्यावर आता पुढचा टप्पा होता तुंगभद्रेत कोराईकल राइडचा. कोराईकल म्हणजे त्या बांबूच्या टोपल्या. एका टोपलीत साधारण पाच ते सहा लोक बसू शकतात. याला खालून डांबर लावलेलं असतं. या गोल टोपलीतून नदीत चक्कर मारतात. ही राइड हंपीत आल्यावर अगदी ‘मस्ट’ असते. मंजूबाबा आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला. समोर तुंगभद्रेचं दर्शन झालं. तिथं दगडांमुळं आपोआप एक नैसर्गिक बांध तयार झाला होता आणि पाणी त्यावरून खळाळत, धबधब्यासारखं उड्या मारत पुढं चाललं होतं. आम्ही कोराईकल राइडवाल्याकडं चौकशी केली, तर त्यानं २०-२५ मिनिटांच्या राइडचे प्रत्येकी ७५० रुपये सांगितले. हे पैसे जास्त होते आणि आम्हाला मान्य नव्हते. तेवढ्यात तिथं एक गोरा आला. आम्ही त्याच्याशी गप्पा मारायला लागलो. तो जर्मनीहून आला होता. आमचं हे बोलणं ऐकून त्या कोराईकलवाल्याला वाटलं, की आम्ही त्याच्याबरोबर ‘डील’ करतोय. एकूण आम्हाला त्याचा रागच आला आणि आम्ही तिथली राइड न घेता परत निघायचं ठरवलं. तो गोराही माघारी निघाला. 
मंजूला जरा वाईट वाटलं असावं. अर्थात आम्ही त्याच्या भावनेचा आत्ता विचार करत नव्हतो. आता जेवायची वेळ झाली होती. मग मंजू आम्हाला  जेवायला एका झोपडीटाइप ‘व्हाइट सँड’ नावाच्या रिसॉर्ट कम हॉटेलात घेऊन गेला. इथं आधीच काही गोरे तरुण-तरुणी येऊन पत्ते खेळत बसले होते. इथला पोरगा चांगला होता. हे हॉटेलही वेगळं होतं. इथं आपल्या बैठकीसारखी मांडी घालून बसायची व्यवस्था होती. तिथं काही वाद्यंही ठेवली होती. त्या पोरानं आम्ही सांगितलेली ऑर्डर घेतली. सूप, पिझ्झा, पास्ता असं सगळं कॉन्टिनेंटल फूड खाल्लं. एकूण मजा आली. लंच झाल्यावर मंजू आम्हाला अजून एका ठिकाणी घेऊन गेला. आम्ही आता कुठं चाललोय, हे माहिती नव्हतं. थोड्याच वेळात एका टेकाडावर आम्ही पोचलो, तर डाव्या बाजूला धरणासारखी छोटीशी भिंत लागली. हा सनापूर तलाव होता. इथंही कोराईकल राइड मिळते. हा तलाव अतिशय सुंदर होता. चारही बाजूंनी डोंगर आणि मधोमध बशीसारख्या आकारात हा तलाव होता आणि तोही दोन भागांत होता. मधल्या चिंचोळ्या पट्टीवर गाड्या पार्क केल्या होत्या. आम्हीही तिथं पोचलो. मगाशी आमची राइड न झाल्यानं मंजू आम्हाला इथं घेऊन आला होता. इथल्या राइडवाल्याने एक हजार रुपये सांगितले. आम्ही आनंदानं तयार झालो. चौघांनाही त्यानं त्या टोपलीत बसवलं. आधी लाइफ जॅकेट्स दिली. आधी जरा धाकधूक वाटत होती. आमचा नावाडी म्हणजे एक वयस्कर काका होते. ते फारसे बोलत नव्हते. यांचा मालक किनाऱ्यावर उभा राहून प्रत्येक ग्राहकाशी डील करत होता. आमच्या आधी एक फॅमिली राइड सुरू करून तलावाच्या आत गेली होती. मग आम्हीही निघालो. ही टोपली दोन-अडीच फूट एवढीच खोल असल्यानं आपण जवळपास पाण्याला समांतर तरंगत असतो. पाणी अगदीच जवळ असतं. त्यामुळं सुरुवातीला मला तरी जरा टरकायला झालं. मात्र, लगेच व्हिडिओ, फोटो आदी गोष्टींत मी गुंतवून घेतलं. जरा आत गेल्यावर त्या दुसऱ्या राइडच्या लोकांना त्या नावाड्यानं जोरजोरात गोल गोल फिरवायला सुरुवात केली. आम्हाला ते बघून एकाच वेळी मजा आणि थोडी भीतीही वाटली. थोड्याच वेळात आम्ही दोन्ही टोपल्या एकमेकांच्या जवळ आलो. त्या टोपलीतली फॅमिलीही मराठीच होती. मग मोबाइलची देवाणघेवाण झाली आणि एकमेकांचे व्हिडिओ वगैरे काढणं झालं. एकूण धमाल अनुभव होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही बाहेर आलो. अगदी बाहेर पडताना त्या टोपल्यांच्या मालकानं आमचे मोबाइल घेऊन पुन्हा सगळ्यांचे फोटो काढून दिले. बाहेर पडल्यावर आम्ही मंजूला धन्यवाद दिले. 

इथून आम्ही पंपा सरोवर बघायला गेलो. हे सरोवर सनापूर तलावासारखंच मोठं असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात ते अगदीच छोटं आणि सर्व बाजूंनी दगडांनी बारवेसारखं बांधलेलं निघालं. इथं वर एक मंदिर होतं. मी एकटाच तिथं गेलो. लक्ष्मीचं आणि आणखी एका देवतेच्या मूर्ती होत्या. मी लांबूनच नमस्कार करून निघालो. वर ‘शबरीची गुहा’ आहे, असं काही जण बोलताना ऐकलं. मात्र, तशी कुठलीही माहिती तिथं लिहिलेली नव्हती. त्यामुळं मी तिकडं वर गेलो नाही. याही ठिकाणी भरपूर वानरं होती. इथं थोडा वेळ रेंगाळून आम्ही पुढं निघालो. आता आम्ही हंपीत जाऊन काल राहिलेली दोन मंदिरं (हजारीराम व भूमिगत शिवमंदिर) बघणार होतो. जाताना मंजूबाबा आम्हाला अनेगुंदी गावात घेऊन गेला. या गावात कृष्णदेवरायांचे वंशज अजूनही राहतात. तिथला टाउन हॉल, कृष्णदेवरायांच्या वंशजांचा भलामोठा वाडा हे सगळं बाहेरूनच बघितलं. त्या गावाच्या चौकात कृष्णदेवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथं थांबून मी त्या पुतळ्याचा फोटो काढला.
यानंतर आम्ही पुन्हा हंपीकडं निघालो. अंतर बरंच होतं. पण हा रस्ता सुंदर होता. तुंगभद्रेवरचा मोठा पूल ओलांडून आम्ही ‘अलीकडं’ (म्हणजे दक्षिणेला) आलो. दोन्ही बाजूंनी भातशेती, नारळाची झाडं यामुळं कोकणाचा भास होत होता, तर काही ठिकाणी ज्वारी किंवा उसामुळं देशावर असल्याचा भास होत होता. थोडक्यात, हंपी परिसरात कोकण व देशाचं उत्कृष्ट मिश्रण पाहायला मिळत होतं. शिवाय वातावरण उत्तर भारतातल्यासारखं थंडगार, आल्हाददायक! आम्ही पुन्हा ३०-३२ किलोमीटरचा प्रवास करून हंपीत शिरलो. या वेळी सुरुवातीला पान-सुपारी बाजार नावाचा एक भाग बघितला. तिथून समोरच ‘हजारीरामा’चं मंदिर आहे. नावाप्रमाणे इथं रामायणातील अक्षरश: हजारो प्रसंग कोरले आहेत, म्हणून हा ‘हजारीराम’. आशुतोष बापटांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, ‘हजारी’ हे फारसी नाव या मंदिराला नंतर पडलं असावं. शिवाय हे मंदिर म्हणजे राजघराण्याच्या खासगी प्रॉपर्टीचा भाग होतं. त्यामुळं ते दीर्घकाळ चांगलंही राहिलं होतं. आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळचं सुंदर पिवळंधमक ऊन त्या मंदिरावर पडलं होतं. त्यामुळं त्या शिळांना अक्षरश: सुवर्णाचं लेणं चढवल्यासारखं वाटत होतं. तिथं कोणी तरी ड्रोननं त्या मंदिराचं चित्रीकरण करत होतं. त्या कर्कश आवाजानं मात्र आमचा रसभंग झाला. मंदिर मात्र फारच सुंदर होतं. मंदिराशेजारी भरपूर हिरवळ राखली आहे. आम्ही तिथं जरा वेळ शांत बसलो. सूर्य हळूहळू कलायला लागला होता. आता आम्हाला अजून एक-दोन ठिकाणं बघायची होती. त्यामुळं ‘हजारीरामा’ला ‘राम राम’ करून आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर एक पुस्तकविक्रेता होता. आमचं मराठी ऐकून तोही मोडक्या-तोडक्या मराठीत आम्हाला पुस्तक घेण्याचा आग्रह करू लागला. माझ्या एका भाचीसाठी हंपीची माहिती देणारं एक इंग्लिश माहितीपुस्तक घेतलं. तिथून निघालो.
मंजूबाबानं आता आम्हाला त्या भूमिगत शिव मंदिराकडं नेलं. काल आम्ही हे विरुपाक्ष मंदिराकडं जाताना पाहिलं होतं. आज तिथं आत गेलो, तर फार कुणी नव्हतं. मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली असल्यानं आणि हळूहळू सूर्य मावळतीकडं निघाल्यानं तिथं जरा अंधारच होता. तरी मी आत आत जात गाभाऱ्यापर्यंत गेलो. तिथं नंदी तेवढा दिसला. पण आजूबाजूला पाणी होतं. त्यापलीकडचा गाभारा दिसलाच नाही. तिथूनच माघारी फिरलो. मंदिर सुंदर होतं यात वाद नाही; पण त्या वातावरणामुळं आणि निर्मनुष्य असल्यानं उगाच काही तरी गूढ वगैरे वाटत होतं. आम्ही लगेच तिथून बाहेर पडलो. आता मंजूबाबा आम्हाला कृष्ण मंदिरात घेऊन गेला. हाही एक अप्रतिम असा शिल्पसमूह आहे. आम्ही गेलो, तेव्हा तिथं कुणीही नव्हतं. आम्ही शांतपणे ते सगळं मंदिर फिरून पाहिलं. या मंदिरासमोरच ‘कृष्ण बाजार’ आहे. इथून मंजू आम्हाला हेमकूट टेकडीकडं घेऊन निघाला. तिथं त्या टेकाडाच्या चढावरच एक गणपतीची मोठी पाषाणमूर्ती आहे. मला नगरच्या विशाल गणपतीची किंवा वाईच्या ढोल्या गणपतीची आठवण झाली. साधारण तेवढ्याच उंचीचा हा गणपती होता. त्याला नमस्कार करून आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली. हेमकूट टेकडीवरून सगळं हंपी दिसतं. शिवाय हा ‘सनसेट पॉइंट’ही आहे. नेमका त्या दिवशी सूर्य ढगांत लपला होता. त्यामुळं सूर्यास्त असा दिसलाच नाही. वरून हंपीचा सगळा नजारा मात्र अप्रतिम दिसत होता. उजव्या बाजूला विरुपाक्ष मंदिराचे गोपुर दिसत होते. आता तिथला वरचा तो पिवळाधमक दिवाही प्रकाशमान झाला होता. सहा वाजून गेले होते. तिथला सुरक्षारक्षक सगळ्या लोकांना खाली हाकलायला आला. सूर्यास्तानंतर इथली सगळी ठिकाणं पर्यटकांना बंद होतात. आम्हाला खरं तर तिथं थोडा वेळ रेंगाळायचं होतं. पण तो गार्ड आल्यामुळं मी व धनश्री लगेच खाली यायला निघालो. साई व वृषाली थोड्या वेळानं खाली आले. त्यांना तो तुंगभद्रेच्या काठी भेटलेला जर्मनीचा गोरा पुन्हा भेटला होता. म्हणून मग ते रेंगाळत त्याच्याशी गप्पा मारत आले होते.
आता आमचं ‘साइट सीइंग’ असं संपलं होतं. उगाच हुरहुर वाटत होती. मंजूबाबा आता आम्हाला घेऊन तडक हॉटेलकडं निघाला. त्यानं पावणेसातला बरोबर आमच्या हॉटेलवर आणून सोडलं. आम्ही त्याचे पैसे दिले. दोन दिवस त्यानं चांगलं ‘गाइड’ केलं, म्हणून त्याचे आभार मानले. 
आज आम्हाला संध्याकाळी होस्पेट शहरात जरा चक्कर मारायची होती. म्हणून थोडं आवरून आम्ही कार काढून बाहेर पडलो. होस्पेट शहरात दोनच प्रमुख रस्ते दिसले. त्यातला एक बसस्टँडला काटकोनात असलेला रस्ता बराच मोठा होता. इथं मोठमोठ्या ब्रँडच्या शो-रूम दिसत होत्या. ‘शानबाग’ नावाचं मोठं हॉटेल दिसलं. पलीकडंच त्यांचं रेस्टॉरंटही होतं. शानबाग, पै, कामत, कार्नाड ही सगळी चित्रापूर सारस्वत मंडळी. मूळची कारवारकडची. यांचं इकडं व्यवसायांपासून सगळीकडं मोठं प्रस्थ दिसतं. आम्ही त्या हॉटेलमध्ये शिरलो. तिथं ‘नॉर्थ इंडियन’ खाण्याचा विभाग पहिल्या मजल्यावर होता. मग तिकडं गेलो. तिथला वेटर जरा बडबड्या होता. त्याच्याशी गप्पा मारत जेवलो. जेवण चांगलं होतं. दिवसभर आमची दमछाक बरीच झाली होती. त्यामुळं आम्ही व्यवस्थित जेवलो. मी नंतर डाळिंबाचं ज्यूस घेतलं. तेही भारी होतं. 
तिथून निघालो. शहरात आणखी एक फेरफटका मारून आम्ही हॉटेलवर परतलो.

विजापूरचा गोल घुमट

येताना विजापूर (आता विजयपुरा), सोलापूरमार्गे पुण्याला जाऊ, असं आम्ही ठरवलं. वेगळा भाग बघायला मिळेल, हा उद्देश. मग मंगळवारी सकाळी लवकर आवरून साडेसहा वाजताच होस्पेट सोडलं. होस्पेट ते विजापूर रस्ता चौपदरी व उत्कृष्ट आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्हाला रस्त्यावर एकदम धुकं लागलं. ते आठ-दहा किलोमीटरपर्यंत होतं. मग पुन्हा विरलं आणि नंतर काही अंतरावर पुन्हा लागलं. रात्री तिथं पाऊस पडून गेला असावा. पण असं रस्त्यात मध्येच सुरू होणारं आणि संपणारं धुकं मी तरी पहिल्यांदाच पाहिलं. आम्ही मधे इलकल नावाच्या गावात थांबून ब्रेकफास्ट केला. पुढं रस्त्यात डाव्या हाताला मोठं अलमट्टी धरण लागतं. बरोबर दहा वाजता विजापुरात पोचलो. आम्हाला इथला गोल घुमट बघायचा होता. विजापूर हे आडवं पसरलेलं शहर आहे.

बायपासवरून आम्हाला तो घुमट लांबूनही दिसत होता. मग तिथं गेलो. प्रत्येकी २५ रुपयांचं तिकीट काढून आत गेलो. तिथं एक संग्रहालयही आहे. ते बघायला आम्हाला वेळ नव्हता, म्हणून तिकीट काढलं नाही. थेट गोल घुमटापाशी गेलो. इथं चपला, बूट बाहेर काढायला लागतात. ही विजापूरच्या आदिलशहाने बांधलेली वास्तू. शिवकाळात स्वराज्याच्या शत्रूचं प्रमुख ठाणं. मनात वेगवेगळे विचार येत होते. याच परिसरात अफजलखानाने महाराजांना मारण्याचा विडा उचलला. इथंच स्वराज्याच्या शत्रूच्या मसलती होत असणार. ती इमारत अजूनही भक्कम व बुलंद होती. आम्ही त्या छोट्या जिन्याने चार-पाच मजले चढून पार त्या घुमटापाशी गेलो. हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा घुमट आहे म्हणे. साधारण ३९ मीटर एवढा त्याचा व्यास आहे. तिथं येणारे प्रतिध्वनी, टाळ्यांचे आवाज हे सगळं अनुभवलं. व्हिडिओ केले. मात्र, आम्हाला ‌फार वेळ नव्हता. मग लगेच खाली उतरलो आणि बाहेरच पडलो. आम्ही साधारण तासभर तिथं होतो.
तिथून सोलापूर ९८ किलोमीटरवर आहे.  पुढे भीमा नदी लागते. तीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आहे. ती ओलांडून आम्ही महाराष्ट्रात प्रवेश केला. सोलापुरात आता बायपास झाल्यानं शहरात प्रवेश करावा लागतच नाही. आम्ही सोलापूर ओलांडून पुढं आल्यावर डाव्या बाजूला एका हॉटेलात थांबून जेवलो. इथून पुढं कार मी चालवायला घेतली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस साधारण १५-२० किलोमीटरच्या पट्ट्यात होता. पुढं पुन्हा ऊन. यवतला पाच वाजता चहाला थांबलो. इथून पुढं पुन्हा साईनं कार घेतली. पुण्यातलं ट्रॅफिक झेलत साडेसात वाजता घरी सुखरूप पोचलो.
हंपीची आमची ही सहल चांगली झाली. मात्र, आमचं केवळ हंपीच बघणं झालं. बदामी, पट्टदकल, ऐहोळे वगैरे राहिलं. त्यामुळं पुन्हा एकदा तिकडं जावंच लागणार. हंपीला थंडीच्या सीझनमध्येच जावं. तिथं चालण्याची तयारी ठेवावी. ‘पाय असतील तर हंपी पाहावे, डोळे असतील तर कनकपुरी आणि पैसे असतील तर तिरुपती बालाजी’ अशी एक म्हणच तिकडं आहे. तेव्हा भरपूर चालावे लागते. शक्यतो स्थानिक गाइड घ्यावा. नाही तर फार काही माहिती समजत नाही. शिवाय जेवण्यापासून ते खरेदीपर्यंत अनेक ठिकाणी हे स्थानिक लोक आपल्याला मदत करतात. हंपीला जायचं असेल, तर आता सोलापूर-विजापूर मार्गेच जावे. रस्ता सर्वत्र उत्तम आहे. या मार्गे ५४० रुपये टोल (वन वे) लागतो, तर बेळगाव मार्गे हाच टोल (वन वे) तब्बल ११२५ रुपये एवढा लागतो. स्वत:चं वाहन न्यायचं असेल तरी उत्तम; मात्र, शक्यतो दोन चांगले ड्रायव्हर असावेत. एकूण अंतर पुण्याहून ५६५ किलोमीटर आहे आणि दोन ते तीन ब्रेक (साधारण दोन ते अडीच तासांचे) धरले तर बारा ते साडेबारा तास सहज लागतात. सकाळी लवकर प्रवास सुरू करणे उत्तम. 
हंपी हे युनेस्कोने जाहीर केलेले वारसा स्थळ आहे. ते आवर्जून पाहायला हवे. आपल्या देशाचा वैभवशाली सुवर्णकाळ तिथल्या पाषाणांत कालातीत, शिल्पांकित झाला आहे. त्याचं दर्शन घेणं हा शब्दश: ‘श्रीमंत’ करणारा अनुभव आहे, यात वाद नाही.


(समाप्त)

--------------------

1 Dec 2023

हंपी डायरी - भाग २

विठ्ठल ते विरुपाक्ष...
------------------------


विठ्ठल मंदिराच्या त्या प्रांगणात आम्ही प्रवेश करताक्षणीच एक जाणवलं, की आपण एका वेगळ्या दुनियेत आलो आहोत. खरं तर समोर पर्यटकांची गर्दी होती. रविवार होता, त्यामुळे भरपूर लोक आले होते. तरीही एकदम ते सगळं चित्र धूसर होऊन समोरच्या पाषाणांतून, तिथल्या खांबांतून, कमानींतून, भिंतींतून जुना वैभवशाली काळ असा समोर येऊन ठाकलाय, असं काहीसं वाटायला लागलं. (फार सिनेमे बघितल्याचा परिणाम असावा.) खरं तर ते मंदिर खूप भव्य, प्रचंड मोठं किवा उत्तुंग असं काहीच नाही. एकच मजल्याएवढ्या उंचीचं सर्व काम. समोरच्या बाजूला एक गोपुर होतं, तेच काय तेवढं दोन-तीन मजल्यांएवढं उंच. बाकी सर्व बांधकाम साधारण दहा ते पंधरा मीटरपेक्षा उंच नसावं, तरीही त्या प्रांगणात फिरताना काही तरी भव्य-दिव्य असं आपण बघत आहोत, असं वाटत होतं. कर्नाटकात गेल्यावर तिथली लिपी आपल्याला येत नसल्याचा त्रास फार होतो. इथं विठ्ठल मंदिरातही त्या काळाशी जोडणारा लिपीसारखा एखादा धागा उणाच होता. त्याची काहीशी सलही वाटत होती. तिथल्या प्रत्येक खांबाने, त्या खांबावरच्या शिल्पाने, त्यातून न समजणाऱ्या एखाद्या आकृतीने आपल्याशी भरभरून बोलावं, असं फार वाटत होतं. मात्र, लिपी समजत नसल्यास वाचता न येण्यामुळं जी चीडचीड होते, तीच थोडीशी आधी इथं व्हायला लागली... पण काही क्षणच! नंतर ते भग्न सौंदर्य माझ्याशी लिपीपलीकडची भाषा बोलू लागलं. ती भाषा होती वास्तुशास्त्राची, प्रमाणबद्धतेची, सौष्ठवाची, कमालीच्या परिश्रमांची आणि शिल्पांतून आकार घेणाऱ्या अद्वितीय सौंदर्याची! मग माझं मन हळूहळू शांत व्हायला लागलं. आपोआप समोरचं लख्ख दिसू लागलं.
सर्वांचं लक्ष या मंदिरासमोर असलेल्या त्या सुप्रसिद्ध रथाकडं होतं. आम्हीही आधी तिथं धाव घेतली. आपल्याकडच्या पन्नासच्या नोटेवर या रथाचं चित्र छापलेलं आहे. त्यामुळं अनेक लोक हातात एक नोट घेऊन समोरच्या त्या रथाचा फोटो घेत होते. आम्ही गेलो तेव्हा स्वच्छ ऊन होतं. ती सर्व पाषाणवास्तू त्यामुळं झळाळून उठली होती. फोटो अप्रतिम येत होते. सोबतच्या पुस्तकात माहिती वाचून, आम्ही एकेक ठिकाण बघत होतो. मुख्य रथाचं वर्णन या पुस्तकातही सविस्तर दिलंं आहे. या रथासमोर दोन हत्ती आहेत. मात्र, ते नंतर तिथं आणून ठेवले असावेत. मूळ शिल्पात तिथं घोडे असावेत. त्या घोड्यांच्या शेपटीचा काही भाग मुख्य रथाला जोडलेला दिसतोही. शिवाय हत्ती त्या रथाच्या प्रमाणात मोठे नाहीत. प्रमाणबद्धता हे त्या शिल्पांचं वैशिष्ट्य असताना तिथं अशी चूक होणं शक्यच नाही. पण ते काही का असेना, सध्या ते दोन छोटेसे हत्तीच तो रथ ओढताहेत, असं दिसतं. रथाची चाकं आणि वरच्या बाजूची कलाकुसर केवळ अप्रतिम आहे. आम्ही सर्व बाजूंनी फिरून हा रथ पाहिला. भरपूर फोटो काढले. या रथासमोर मुख्य विठ्ठल मंदिर आहे. तिथे आता चौथऱ्यावर ‘रिस्टोरेशन’चे काम सुरू आहे. त्यामुळे तिथं एक सिक्युरिटी गार्ड बसला होता आणि तो कुणालाही वर येऊ देत नव्हता. या मुख्य मंदिराच्या मंडपात जे स्तंभ आहेत, त्यावर वाजवलं तर वेगवेगळे ध्वनी उमटत. आपल्या लोकांनी ते खांब वाजवून वाजवून, त्यावर जोराने आघात करून खराब करून टाकले आहेत, असं समजलं. त्यामुळंच आता तिथं वर चढायला बंदी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती नाही. आपल्या पंढरपूरला असलेली विठ्ठलाची मूर्ती मुस्लिम आक्रमकांपासून वाचविण्यासाठी काही काळ इथं आणून ठेवली होती असं सांगतात. (किंवा उलटही असेल.) ‘कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू’  हे तिथून आलं असणार. महाराष्ट्र आणि कर्नाटकला घट्ट बांधून ठेवणारा हा विठ्ठल नावाचा धागा अतूट आहे, एवढं मात्र खरं. 
विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आणखी तीन सभामंडप होते. तेही बघितले. प्रत्येक ठिकाणी सेल्फीबाजांची गर्दी होती. आम्हीही जवळपास तेच करत होतो. इथल्या मंडपांत व्यालप्रतिमा बऱ्याच दिसतात. व्याल म्हणजे एक काल्पनिक प्राणी. त्याचं धड एका प्राण्याचं आणि शिर एका प्राण्याचं, कान किंवा शेपटी आणखीन तिसऱ्याच प्राण्याची असते. अशा व्यालांच्या बऱ्याच प्रतिमा तिथं आहेत. मुख्य सभामंडपात जाता येत नसलं, तरी मागच्या बाजूनं गाभाऱ्याच्या पुढच्या बाजूला जाता येतं. आम्ही तिकडं वळलो. तिथं एक चाफ्याचं सुरेख झाड होतं. तिथं बऱ्याच जणांचं फोटोसेशन सुरू होतं. तिथला एक गाइड हिंदीत त्याच्याबरोबरच्या लोकांना ‘सोनाली कुलकर्णीसोबत मी हंपी नावाच्या मराठी सिनेमात काम केलंय,’ असं सांगत होता. मलाही २०१७ चा प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘हंपी’ सिनेमा आठवला. त्यात (धाकट्या) सोनालीसह ललित प्रभाकरनं सुंदर काम केलंय. मी ब्लॉगवर तेव्हा त्याचं परीक्षणही लिहिलं होतं. ‘डोण्ट वरी, बी हंपी’ असं त्याचं शीर्षक होतं. त्यात प्रियदर्शन जाधवनं साकारलेला गाइड कम रिक्षावाला असं म्हणत असतो. माझ्याही ते बरेच दिवस डोक्यात राहिलं होतं. त्या गाइडच्या बोलण्यामुळं एवढं सगळं आठवलं. (परत आल्यावर आवर्जून ‘हंपी’ पुन्हा बघितला. त्यात ‘हंपी’ अप्रतिम टिपलंय यात वाद नाही.)
असो.
आम्ही मागच्या बाजूनं त्या गाभाऱ्याच्या पुढं असलेल्या भागात गेलो. थोडं खाली उतरून गर्भगृहाला प्रदक्षिणाही घालता येत होती. आत अंधार होता. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट सुरू केले होते. या प्रदक्षिणा मार्गावर हत्ती आणि घोड्याची व्याल टाइप प्रतिमा असल्याचा उल्लेख आशुतोष बापट यांच्या पुस्तकात होता. मी ती प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला काही ती दिसली नाही. प्रदक्षिणा मार्गावरून बाहेर आलो. इतर सभामंडप बघितले. सर्वत्र किती फोटो काढू आणि किती नको, असं होत होतं. शेवटी अगदी थकायला झालं. तिथंच एका सभामंडपात आम्ही टेकलो. रविवारमुळं गर्दीचे लोंढेच्या लोंढे येत होते. आम्हाला अजून बरंच काही बघायचं होतं. मग आम्ही बाहेर पडलो. परत जाण्यासाठीही त्या बॅटरी गाड्यांसाठी मोठी रांग होती. अखेर साधारण अर्ध्या तासानं आमचा नंबर लागला आणि आम्ही मुख्य गेटकडं परतलो. मंजूबाबाला फोन केला. तो लगेच आला. आता आम्हाला भूक लागली होती. मग तो आम्हाला कमलापुरात एक ‘काली रेस्टॉरंट’ नावाचं हॉटेल होतं, तिथं घेऊन गेला. हे पहिल्या मजल्यावर होतं आणि तिथंही भरपूर गर्दी होती. दोनशे रुपये असा एकच दर होता आणि ‘अनलिमिटेड बुफे’ होतं. मग आम्ही पैसे देऊन कुपन घेतलं आणि केळीचं पान असलेली ताटं धरली. भूक लागली होती कडाडून, त्यामुळं ती केळीची भाजी, रस्सम, नंतर भात-आमटी असं सगळं भरपूर हाणलं. इथला पापड मस्त होता. त्यामुळं जो तो तो पापड मागत होता आणि ते पटापट संपत होते. टेबलांवर जागा नव्हती. कुणीही कुठंही बसत होतं. आम्हाला ते जरा अवघडच गेलं, पण भुकेपुढं काय होय! शेवटी ‘उदरभरण’ झालं आणि आम्ही पुढं निघालो. आता आम्हाला मंजूबाबा ‘क्वीन्स बाथ’, कमलमहल आणि गजशाला हे तीन स्पॉट दाखवायला घेऊन गेला. ‘रानी का स्नानगृह’ असो, की कमल महल... तिथल्या राण्याच हे स्नानगृह किंवा तो महाल वापरत होत्या की अन्य कारणांसाठी त्यांचा वापर केला जात होता, याविषयी ठोस माहिती नाही, असं तिथल्या फलकांवर स्पष्टपणे नमूद केलं होतं. अर्थात जे सर्वमान्य नाव आहे, तेच तिथंही लिहिलं होतं. त्या स्नानगृहात पाणी सोडण्याची यंत्रणा मात्र भन्नाट होती. दगडी पाटांतून पाणी खेळवलं होतं. अर्थात सध्या ते पूर्ण कोरडं होतं. इथल्या वास्तुरचनेवर इस्लामिक प्रभावही आहे. त्यामुळं हे काम नक्की विजयनगरच्या काळात झालं असावं, की नंतर त्यात मॉडिफिकेशन झालं असावं, असा प्रश्न आहे. नंतर आम्ही कमलमहाल बघायला गेलो. इथं आत जाऊ देत नाहीत. मात्र, बाहेरूनच तो महाल अप्रतिम सुंदर दिसतो. तो अजूनही चांगला राहिला आहे, हे महत्त्वाचं. इथंच ‘हंपी’तलं सोनालीचं नृत्य चित्रित करण्यात आलं आहे. हा महाल आकाशातून कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो म्हणे. (आम्ही अनेक ठिकाणी या वास्तूंचं ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू असल्याचं नंतर पाहिलं.)
इथून पुढं आम्ही गजशाळा बघायला गेलो. कमलमहालाच्या शेजारीच ही वास्तू आहे. सलग आडव्या बांधलेल्या या इमारतीत अकरा कमानी आहेत. प्रत्येक कमानीत एकेक हत्ती मावू शकेल, अशी जागा आहे. मागल्या बाजूने माहुताला ये-जा करण्यासाठी छोटा दरवाजा आहे. शेजारीच आणखी एक इमारत आहे. ती सुरक्षारक्षकांची असावी, असा अंदाज आहे. काटकोनात असलेल्या या दोन इमारतींच्या समोर सुंदर हिरवळ होती. आम्ही तिथं जरा टेकलो. मी तर आडवाच झालो. फार बरं वाटत होतं. बरीच पायपीट झाली होती. पण आता संध्याकाळ होत आली होती. त्यामुळं हवाही आल्हाददायक होत चालली होती. इथून आम्ही ‘महानवमी डिब्बा’ (खरं तर ते तिब्बा असावं...) बघायला गेलो. हे एक भव्य प्रांगण आहे. इथं समोर एक उंच मंचासारखा चौथरा आहे. इथं राजे-रजवाडे मंडळी बसून समोर सांस्कृतिक कार्यक्रम बघत असायची म्हणे. समोर मात्र सर्वत्र सपाट नव्हतं. एके काळी खोलगट आखाड्यासारखं काही तरी होतं. तिथं प्राण्यांच्या झुंजी चालत असतील का, असा विचार आला. समोर एके ठिकाणी तळघर होतं. तिथंही आम्ही आत फिरून आलो. खजिना ठेवायची जागा असणार, असं वाटलं. त्या जागेच्या शेजारी एक अतिशय सुंदर दगडी बारव आहे. हिचं उत्खनन अगदी अलीकडे,म्हणजे १९८८ मध्ये झालंय. त्यामुळंच ती खूपच चांगल्या स्थितीत दिसली. 

इथून पुढं आम्हाला खरं तर हजारीराम आणि भूमिगत शिवमंदिरही बघायचं होतं. मात्र, विरुपाक्ष मंदिर हे मुख्य आकर्षण सूर्यास्ताच्या आत बघायला हवं होतं. त्यामुळं मंजूबाबानं आमचा कार्यक्रम बदलून ही दोन ठिकाणं उद्या करू या असं सांगितलं आणि रिक्षा विरुपाक्ष मंदिराकडं घेतली. हंपीचा तो प्रसिद्ध चढ चढून आल्यावर त्यानं आधी डावीकडं रिक्षा घेतली. इथंच ती लक्ष्मी-नृसिंहाची भव्य मूर्ती आहे. आम्ही उतरलो. त्या मूर्तीसमोर बऱ्यापैकी गर्दी होती. या मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मीची मूर्ती होती. मात्र, ती आक्रमकांनी तोडली. आता केवळ नरसिंह आहे. त्याच्या पायाला आता ‘योगपट्ट’ बांधला आहे. या नरसिंहाचे सुळे, डोळे एवढे हुबेहूब आहेत, की ते बघताना जरा भीतीच वाटते. म्हणून याला ‘उग्र नरसिंह’ असेही म्हणतात. याच्या शेजारी ‘बडीव लिंग’ आहे. एकच अखंड शिळेतून कोरलेलं हे भव्य शिवलिंग असून, भोवती पाणी आहे. नरसिंह आणि हे शिवलिंग या दोन्ही ठिकाणी समोर ग्रिलचे दरवाजे लावून जवळ जाण्यास बंदी करण्यात आली आहे. एका अर्थाने ते योग्यच आहे. याचे कारण आपल्याकडच्या पर्यटकांना कसलंही भान नसतं. फोटो काढण्याच्या नादात आपण त्या मूर्तीची झीज करतो आहोत, हेही अनेकांच्या लक्षात येत नाही. असो. आता आम्हाला मुख्य विरुपाक्ष मंदिरात जायचं होतं. पुन्हा एकदा तो चढ चढून गेल्यावर एकदम विरुपाक्ष मंदिराचं उंच गोपुर दिसलं. सभोवती भरपूर मोकळी जागा, पार्किंगसाठीची जागा अनेक गाड्यांनी व्यापलेली, शेजारी छोटे विक्रेते, पलीकडे तर एक लहानसा बाजारच, मंदिरासमोर मोठा रस्ता हे सर्व वातावरण त्या ठिकाणाचं स्थानमाहात्म्य दाखवीत होतं. एका अर्थानं हे त्या सर्व परिसराचं ‘राजधानी स्थळ’ होतं म्हणायला हरकत नाही. आता उन्हं अगदी कलायला आली होती. मंदिराच्या दारात, पण थोडंसं दूर मंजूनं आम्हाला सोडलं. तिथून आम्ही त्या भव्य गोपुराकडं बघत चालत निघालो. आत पोचल्यावर पुन्हा एक भव्य प्रांगण होतं. तिथं अनेक भाविकांची वर्दळ होती. आम्हीही फोटो काढले. इथं मात्र गाइड घ्यावा, असं वाटू लागलं. समोरच एक जण आला. त्याच्यासोबत असलेल्या लोकांना ‘बाय’ करतच होता, तेव्हाच आम्ही त्याला विचारलं. ‘श्रीनिवास’ असं त्याचं नाव होतं. पाचशे रुपयांत यायला तो तयार झाला. एका अर्थानं आम्ही गाइड घेतला, ते बरंच झालं. कारण त्यानं आम्हाला भरपूर आणि चांगली माहिती दिली. 
मंदिराच्या समोर असलेल्या गोपुरापासून ते इथल्या विरुपाक्षाच्या मूर्तीपर्यंत सर्व माहिती श्रीनिवासने अत्यंत तन्मयतेनं दिली. त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. मंदिराच्या आत आणखी एक लहान प्रांगण होतं. तिथं ते पाच स्तंभ होते आणि सभोवती स्थानिक महिला नटून-थटून, साडीत, गजरे माळून आल्या होत्या आणि सुंदर रांगोळ्या रेखाटून तिथं दिव्यांची आरास मांडत होत्या. आम्ही फारच भाग्यवान होतो. तिथं शेजारीच मंदिरातील प्रसिद्ध हत्तीण लक्ष्मी दिसली. तिला सोंडेत पैसे दिले की ती सोंड डोक्यावर ठेवून आशीर्वाद देते. आमच्यापैकी वृषालीला ते करायचा भलताच उत्साह होता. मात्र, सुरुवातीला तिथं मुलांची गर्दी होती. त्यामुळं आपण मंदिर पाहून आल्यावर ‘लक्ष्मी’कडे जाऊ या, असं श्रीनिवास म्हणाला. आम्ही श्रीनिवाससोबत ते मंदिर फिरून पाहिलं. विरुपाक्षाची भव्य मूर्ती, मागच्या बाजूला असलेल्या पंपादेवी, भुवनेश्वरीदेवी यांच्या मूर्ती हे सगळं बघितलं. पंपादेवी म्हणजेच पार्वती. मग गाइडनं ती रती व मदनाची (मन्मथ) कथा पुन्हा सांगितली. विरुपाक्ष इथे कसे आले, हे सांगितलं. आपल्या प्रत्येक मंदिराला, प्रत्येक ऐतिहासिक स्थळाला हे असं लोककथांचं, पुराणकथांचं सुंदर कोंदण असतंच. त्या भागातल्या सर्व लोकांची या कथांवर नितांत श्रद्धाही असते. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधणाऱ्या मंडळींना या मंडळींच्या श्रद्धेमागचा भाव कळणं कठीण आहे. मला स्वत:ला त्या कथांपेक्षाही ती सांगणाऱ्या माणसाच्या नजरेतला श्रद्धाभाव आवडतो. त्या भावनेचा आदर करावासा वाटतो. 

नंतर श्रीनिवासनंं आम्हाला मंदिराच्या मागं नेऊन ते ‘पिन होल कॅमेरा’ तंत्रानं इथल्या गोपुराची आत कशी सावली पडते, ते दाखवलं. तेव्हाच्या वास्तुशास्त्रातील प्रगती बघून आपण केवळ थक्क होतो. नंतर तो आम्हाला मंदिराच्या उत्तर दिशेच्या दरवाजातून बाहेर घेऊन गेला. इथं शेजारी बारवेच्या आकाराचं चांगलं बांधलेलं तळं आहे. तुंगभद्रा नदीतील पाणी या तळ्यात आणण्याची सोय केलेली आहे. तिथंही अनेक लहान-मोठी देवळं होती. पुन्हा आत आलो, तो एका ताईंनी येऊन सर्वांना हातावर दहीभाताचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आणखी एक बाई आल्या आणि त्यांनी लेमन राइसचा प्रसाद दिला. त्या वेळी भूक लागलेली असताना केवळ दोनच घासांचा तो प्रसाद इतका सुंदर लागला म्हणून सांगू! आम्ही तसं त्यांना सांगितल्यावर त्या पण अशा काही खूश झाल्या, की बस्स! श्रीनिवास आता आम्हाला बाहेरच्या प्रांगणात घेऊन गेला. इथं आता लक्ष्मी हत्तिणीचं दर्शन घ्यायचं होतं. वृषालीनं एक नोट तिच्या सोंडेत दिली आणि श्रीनिवासनं सांगितल्याप्रमाणे ती पटकन तिच्याकडं पाठ करून वळली. त्याबरोबर ‘लक्ष्मी’नं सराईतासारखी तिच्या डोक्यावर सोंड ठेवून तिला आशीर्वाद दिला. ही हत्तीण या कामात चांगलीच प्रशिक्षित करण्यात आली आहे. पैसे दिले तरच ती सोंड डोक्यावर ठेवते. बाकी केळी किंवा अन्य काही दिलं तर नुसतंच खाते. एकूण मजेशीर प्रकार होता. बाहेर आल्यावर तिथल्या तीन तोंडांच्या नंदीचेही आम्ही फोटो काढले. त्याचीही काही तरी कथा होतीच. मी आता विसरलो. नंतर एकदम बाहेरच्या प्रांगणात आलो. तिथं अनेक लोक पथारी टाकून झोपायच्या तयारीत आलेले दिसले. श्रीनिवासनं सांगितलं, की या प्रांगणात लोक राहायला येतात. पहाटे नदीत स्नान करतात आणि ओलेत्याने विरुपाक्षाचे दर्शन घेऊन आपापल्या घरी जातात. शिवाय या प्रांगणात अनेक लग्नेही होतात. इथं श्रीनिवासनं आमच्या मोबाइल कॅमेऱ्यातील एका सुविधेचा फायदा घेऊन धनश्रीचा व माझा असा फोटो काढला, की माझ्या दोन्ही बाजूंनी ती उभी राहिलेली दिसेल. साई व वृषालीचा तसाच फोटो काढला. आम्ही खूप हसलो. एकूण श्रीनिवास हा फारच पटाईत आणि उत्तम गाइड होता, यात काही शंका उरली नाही. आम्ही आनंदानं त्याला पाचशे रुपये दिले व विरुपाक्षाला पुन्हा एक नमस्कार करून बाहेर पडलो. आम्ही फारच चांगल्या दिवशी आलो होतो. समोर त्रिपुरारी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात लखलखत होता. खाली त्या गोपुरावरचा पिवळाधम्मक दिवाही तसाच दीप्तीमान होऊन झळकत होता. वातावरणात सुखद गारवा होता. आमच्या दिवसभराच्या सर्व श्रमांचा परिहार झाला होता. तिथं शेजारी छोटं मार्केट होतं. तिथं चक्कर मारली. चहा घेतला. मंजूबाबानं आता आम्हाला हॉटेलवर सोडलं तेव्हा सात वाजत आले होते...
हंपीतला पहिला दिवस विठ्ठल ते विरुपाक्ष असा संस्मरणीय झाला होता. ‘पाषाणांतले देव’ आम्हाला पावले होते...  तिकडं त्रिपुरी पौर्णिमेच्या प्रकाशात ती मंदिरं न्हाऊन निघाली होती आणि त्यांच्या दर्शनानं इकडं आमची मनंही!

(क्रमश:)

----
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------