29 Apr 2022

एसटी लेख

‘लालपरी’ नावाची कादंबरी
---------------------------------------------

आपल्या सगळ्यांच्या आठवणीतले पहिलेवहिले प्रवास जिच्यामधून केले ती एसटी! आपल्या सगळ्यांच्या स्मरणरंजनाचा एक हळवा आणि फार महत्त्वाचा भाग या एसटीनं आणि तिच्यातून केलेल्या प्रवासानं व्यापला आहे, यात वाद नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असं भारदस्त नाव असलेल्या, पण ‘एसटी’ याच सुटसुटीत आणि प्रेमाच्या नावानं सर्वांना परिचित असलेल्या या एसटीचा सुमारे सहा महिने चाललेला संप अखेर एप्रिलमध्ये संपला. या काळात रस्त्यावरून एसटी गाड्या धावत नव्हत्या, तेव्हा अगदी चुकल्याचुकल्यासारखं होत होतं. खरं तर गेल्या दहा-पंधरा वर्षांत मध्यमवर्गीयांनी स्वत:च्या चारचाकी गाड्या घेण्याइतपत ऐपत नक्कीच मिळविली. त्यामुळं माझ्यासकट या वर्गातले अनेक लोक आता एसटीनं प्रवास करतातच, असं नाही. मात्र, एसटी प्रवासाचा धागा आपल्या बहुतेकांच्या बालपणीच्या आठवणींशी घट्ट जोडला गेला आहे. त्यामुळं या काळात एसटीच्या आठवणी सतत येत राहिल्या. या एसटीविषयी लहानपणापासूनच मला अतिशय आपुलकी. याचं साधं कारण म्हणजे माझे वडील एसटीत नोकरीला होते. एवढंच काय, माझे आजोबाही एसटीतच होते. शिवाय त्यांचे चुलतभाऊ, त्यांची मुलं असे आणखी काही नातेवाइकही एसटीतच होते. त्यामुळं एसटीत भांडताना कुणी ‘एसटी काय तुझ्या बापाची आहे का?’ असं विचारलं, तर मी शांतपणे ‘हो’ असं म्हणू शकत असे. त्यानंतर भांडण संपतच असे.
माझे आजोबा शिरूर येथे डेपो मॅनेजर होते. त्यापूर्वी ते जामखेड येथे छोटी-मोठी कामं करत असत. त्यांना एक अशी नोकरी नव्हती. विम्याची एजंटगिरीही त्यांनी केली होती. एसटीची स्थापना होण्यापूर्वी आपल्याकडं गावोगावी खासगी बससेवा होत्या. त्यांना ‘सर्व्हिस मोटारी’ म्हणत. जामखेडला होशिंग मंडळी हे बडं प्रस्थ होतं. त्यांपैकी लक्ष्मण नारायण होशिंग यांची अशी खासगी बससेवा होती. ती जामखेड ते नगर अशी सेवा देत असे. (याच लक्ष्मणराव होशिंगांनी जामखेडच्या देशमुख मंडळींनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जनता हायस्कूलला जागा आणि तेव्हा, म्हणजे १९५१ मध्ये २० हजार रुपये देणगी दिली होती व तेव्हापासून आमची ही शाळा ‘ल. ना. होशिंग विद्यालय’ म्हणून ओळखली जाऊ लागली.) तर सांगायचा मुद्दा, आमचे आजोबा या होशिंगांच्या सर्व्हिस बससेवेत कामाला लागले. नंतर स्वातंत्र्यानंतर एक जून १९४८ रोजी जेव्हा एसटीची स्थापना झाली आणि पहिली एसटी बस नगर ते पुणे या मार्गावर धावली तेव्हा खासगी बससेवेतले कर्मचारीही एसटीत सामावून घेण्यात आले. अशा रीतीने आमचे आजोबा एसटीत दाखल झाले. त्यानंतर एकेक पायरी चढत ते निवृत्तीच्या वेळी शिरूर (घोडनदी) इथले डेपो मॅनेजर झाले. आजोबांचं नाव रामचंद्र होतं. त्यांना ‘रामभाऊ’ म्हणून ओळखायचे. आजोबा जगन्मित्र होते. बाळासाहेब भारदे, भा. द. खेर असे नगर जिल्ह्यातले तत्कालीन दिग्गज त्यांच्या मित्रमंडळात होते. आजोबा निवृत्त झाल्यानंतर जामखेडला आले. काही काळानंतर माझे वडीलही एसटीतच नोकरीला लागले. एसटी कर्मचाऱ्यांना पास मिळतो. त्या पासवर कुटुंबीयांना फुकट प्रवास करता येतो. अर्थात साध्या गाडीने! लहानपणी आम्ही एक तर मोठ्या आत्याकडं पुण्याला यायचो किंवा आजोळी लातूरला जायचो. गंमत म्हणजे दोन्ही ठिकाणी एकच तिकीट दर होता - २३ रुपये १० पैसे! (हे मी साधारण १९८२-८३ ते १९९० पर्यंतचं सांगतो. माझ्या आठवणी साधारण १९८१ पासून, म्हणजे माझ्या वयाच्या पाच-सहाव्या वर्षापासून सुरू होतात. त्यापूर्वीचं मला फारसं आठवत नाही.) जामखेडहून नगरला नऊ रुपये दहा पैसे तिकीट होतं. नगर ते पुणे १४ रुपये. धाकट्या आत्याकडं साकरवाडीला (कोपरगाव तालुक्यातलं गाव) जाण्यासाठी आम्ही नगरला यायचो आणि तिथून दौंड-मनमाड पॅसेंजर पकडून कान्हेगाव स्टेशनला उतरायचो. या स्टेशनजवळ वारी नावाचं मोठं गाव होतं आणि पलीकडं आमच्या आत्याचं साकरवाडी. याव्यतिरिक्त नैमित्तिक लग्नकार्यादी कारणांसाठी इतर गावांना प्रवास व्हायचा. 
पुण्याला जाण्यासाठी सकाळी सात वाजता जामखेड-पुणे अशी एक गाडी असे. तेव्हा बहुतेक गाड्यांना मागे दार असे. मात्र, या गाडीला पुढे दार होतं. याशिवाय जातेगाव-मुंबई अशी एक गाडी सकाळच्या वेळी असे. जामखेडचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्या नगर-जामखेड मार्गे जातात. त्यामुळं फार पूर्वीपासून पुण्याहून किंवा नगरहून जामखेडला जायला जवळपास २४ तास एसटी गाड्या उपलब्ध असायच्या. त्यामुळं रिझर्व्हेशन वगैरे भानगडीत आम्ही कधीच पडायचो नाही. त्यात वडील एसटीत असल्यानं डेपोतूनच गाडीत बसून येणं वगैरे माज असायचा. एसटी फलाटाला लागली, की एकच झुंबड करून गाडीत घुसणाऱ्या लोकांना आम्ही आधीच आत बसलेलो दिसलो, की धक्का बसायचा. त्यांच्या नजरेत ती असूया जाणवायची. आम्हाला काहीच फरक पडायचा नाही. पुढच्या आडव्या सीटवर गुडघ्यावर बसून, ड्रायव्हरच्या मागच्या जाळीतून समोर दिसणारा रस्ता पाहणं ही इतर अनेक मुलांसारखी माझीही आवड होती. आपली एसटी सर्वांत फास्ट पळते आणि आपला ड्रायव्हर सर्वांत भारी आहे, असं ठामपणे वाटायचं. जामखेड डेपोला सगळ्या गाड्या ‘टाटा’ मेकच्या असत. याउलट मराठवाड्यातल्या सगळ्या गाड्या ‘अशोक लेलँड’च्या असत आणि जरा भारदस्त दिसत. गाडीच्या समोरची जाळी कशी बसविली आहे, यावर माझ्या मते ती गाडी देखणी दिसते की नाही, हे अवलंबून असतं. त्या ‘लेलँड’च्या काही गाड्यांची समोरची काळी जाळी फारच अवाढव्य आणि जरा ओबडधोबड, मधे गॅप असलेली दिसायची. त्यामुळं ती एसटी बघितली, की नात्यातल्या काही दातांत फटी असलेल्या आत्याबाई, मावशा आठवायच्या. मी तर कित्येक गाड्यांना एकेका नातेवाइक बाईंचं नावही देऊन टाकलं होतं. ‘पुणे-गंगाखेड’ ही गाडी माझ्या मते, सर्वांत भारी होती. अतिशय स्वच्छ, देखणी आणि जोरात पळणारी अशी ही गाडी होती. आम्ही कायम जामखेड डेपोच्या गाडीनं प्रवास करत असल्यानं कधी कधी ही गंगाखेड गाडी आमच्या गाडीला मागं टाकून पुढं वेगात निघून जात असे. तेव्हा फक्त मला त्या गाडीचा राग येई. त्यातही हेवा जास्त वाटे. एखाद्या गाडीनं आपल्या गाडीला मागं टाकलं, म्हणजे त्या गाडीनं आपल्या गाडीला ‘डारलं’ असा एक (आता अनाकलनीय वाटणारा) शब्दप्रयोग आमच्या शाळासोबत्यांत प्रचलित होता. आमच्या शाळेच्या सहली जात. तेव्हा ‘प्रासंगिक करार’ करून एसटी गाड्याच आणल्या जात. या एसटीमधूनही आम्ही असाच पुढच्या सीटवर उलटे पाय ठेवून, गुडघ्यावर बसून प्रवास करत असू. जामखेड डेपोचे साळुंके ड्रायव्हर आमच्या मते जगात सर्वांत भारी ड्रायव्हर होते. त्यांनी गाडी जोरात दामटावी म्हणून आम्ही पोरं मागून ‘साळुंके ड्रायव्हर झिंदाबाद’ अशा घोषणा दात-ओठ खाऊन देत असू. आमच्या या आवेशामुळं साळुंके ड्रायव्हरनी खरोखर एखाद्या गाडीला ‘डारलं’, तर आम्हाला जग जिंकल्याचा आनंद होत असे. 
उन्हाळ्याच्या सुट्टीतला प्रवास हा एक स्वतंत्र अध्याय असे. एक तर या अत्यंत उकाड्याच्या सीझनमध्ये आपल्याकडं लग्नकार्यं का काढतात, कोण जाणे. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी ठेवलेली उन्हाळी सुट्टी आपण काही बदलली नाही.  त्यामुळं रणरणत्या उन्हात मुलांना सुट्टी साजरी करावी लागते. पूर्वी खासगी वाहनं फारच कमी आणि जे खरोखर श्रीमंत होते त्यांच्याकडंच होती. एरवी सगळी जनता एसटीनं प्रवास करत असे. एशियाड (निमआराम) ही गाडीही १९८२ च्या आशियाई स्पर्धेनंतर आली. (अर्थात म्हणूनच त्या गाड्यांना ‘एशियाड’ हे नाव पडलं म्हणा!) त्या गाडीतून प्रवास करायला मिळणं हेही एक स्वप्न असे. एके काळी पुणे-दादर या मार्गावर या गाडीनं सम्राज्ञीसारखं राज्य केलं. आमच्याकडं काही या गाड्या फारशा येत नसत. आल्या तरी आमचा फुकटातला पास तिला चालत नसल्यानं आमची यात्रा साध्या गाडीतूनच व्हायची. कुठलीही गाडी असली, तरी प्रचंड गर्दीनं भरलेलं एसटी स्टँड, तिथले नानाविध आवाज, रसवंतिगृहांच्या घुंगरांचा आवाज, पार्सल टाकणाऱ्या हमालांच्या आरोळ्या, वडापावपासून ते आलेपाकापर्यंत नानाविध पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे आवाज, ‘चौकशी’ अशी खिडकी असलेल्या केबिनभोवती असलेला लोकांचा घोळका आणि त्यांची एकत्र चाललेली कलकल, ‘संकटकाळी बाहेर पडायचा मार्ग’ असं लिहिलेल्या मागच्या खिडकीतून पोरं घुसवणाऱ्यांची गर्दी, तिथला एकुलता एक बुकस्टॉल आणि तिथं ‘मायापुरी’पासून ते ‘स्टारडस्ट’पर्यंत आणि ‘श्री’पासून ‘लोकप्रभा’पर्यंत टांगलेली मासिकं-साप्ताहिक, त्यावरचे बच्चन-मिथुन चक्रवर्ती-जॅकी श्रॉफ-अनिल कपूर किंवा श्रीदेवी-माधुरी-जूही चावला-संगीता बिजलानी-किमी काटकर यांचे मोठमोठे ब्लोअप (त्यातले गौतम राजाध्यक्षांनी काढलेले एकाच साच्याचे फोटो नंतर ओळखू यायला लागले...) असं ते एसटी स्टँडवरचं सगळं चैतन्यशील जग होतं. मुळात हे सगळं भिरभिरत्या, उत्सुक नजरेनी न्याहाळणारं एक निरागस मन आपल्या तेव्हाच्या निरागस लहानपणात होतं, म्हणून हे सगळं आजही तितकंच ताजंतवानं आणि मन एकदम आनंदित करून टाकणारं वाटतं. 
पुढं आम्ही नगरला राहायला गेल्यावर एसटीचा नियमित प्रवास घडायला लागला. माझ्या आठवणीनुसार, मी आठवीत असताना पहिल्यांदा नगर ते जामखेड असा एसटीचा प्रवास एकट्याने केला. त्यानंतर पुढं अनेक प्रवास घडले. पुण्याला आल्यानंतर नगर-पुणे एसटी प्रवास सर्वाधिक घडला. पुढं पुढं तर झोपेतही कुठलं गाव आलं, कुठलं वळण आलं हे ओळखू शकायचो. अर्थात मला प्रवासात झोप फारशी लागत नाही. पण बरेचदा ‘सकाळ’मध्ये रात्रीची ड्युटी करून शिवाजीनगर स्टँडवर यायचो. ऑफिसमधले एक-दोन सहकारीही यायचेच. मग तिथं मिसळ-चहा वगैरे व्हायचा. तेव्हा पहाटे तीन वाजता पुणे-कन्नड गाडी असायची. मी कायम या गाडीनं नगरला यायचो. पहाटे साडेपाच वाजता ती नगरला यायची. मग तिथल्या स्टँडवर जरा वेळ वाट बघून सहा किंवा सव्वासहाला निघणाऱ्या सिटीबसनं मी घरी जायचो. 
त्यापूर्वी म्हणजे १९९१-९२ च्या सुमारास एसटीनं ‘प्रेस्टिज सर्व्हिस’ नावाची एक गाडी काढली होती. गोविंदराव आदिक एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते, त्यांच्या कल्पनेतून ही विशेष सेवा सुरू करण्यात आली होती. अशी एक ‘प्रेस्टिज’ एसटी नगर-पुणे मार्गावरही अर्थात सुरू झाली. ही बस नॉनस्टॉप पुण्याला जायची. (अर्थात रांजणगावला ती शू-ब्रेकला पाच मिनिटं थांबायची...) सकाळी साडेसहा वाजता निघणाऱ्या या एसटीच्या ड्रायव्हर व कंडक्टरला पांढरा पोशाख असायचा. याही गाडीच्या ड्रायव्हरचं नावही साळुंके असंच होतं, तर वैकर आडनावाचे कंडक्टर होते. हीच दुक्कल अनेक दिवस या गाडीवर कायम असायची. मी तेव्हा पुण्याला डिप्लोमा इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला होता. नगर-पुणे अंतर फार नसल्यानं बहुतेक वीकएंडला मी नगरला यायचोच. मग सोमवारी सकाळी सहा-सव्वासहाला स्टँडवर पोचून या ‘प्रेस्टिज’ सेवेनं बरोबर सव्वानऊ किंवा ९.२० ला मी शिवाजीनगरला पोचायचो. ही गाडी कुठल्या वेळेला कुठे असेल याचं गणित आम्हा त्या गाडीनं नियमित प्रवास करणाऱ्यांना अगदी पाठ झालं होतं. आठ वाजून पाच मिनिटांनी ही गाडी बरोबर रांजणगावला थांबायची. तिथून बरोबर ५० मिनिटांत ती येरवडा गाठायची, तर सव्वानऊ ते ९.२० ला शिवाजीनगर! तिथून मी पाच ते दहा मिनिटांत पीएमटीनं जीपीपी होस्टेलवर पोचायचो आणि कँटीनला वडापाव-चहा घेऊन आरामात दहाचं लेक्चर गाठायचो. तेव्हा नगर-पुणे रस्ता चौपदरीही नव्हता. पण साळुंके भन्नाट गाडी चालवायचे. ही गाडीही ‘प्रेस्टिज सेवा’ असल्यानं अगदी स्वच्छ असायची. सुरुवातीला वैकर कंडक्टर उदबत्ती वगैरे लावायचे. गाडीत स्पीकर होते आणि साळुंकेंच्या आवडीची हिंदी गाणी लागायची. पेपरही ठेवलेले असायचे. आणि हे सगळं साध्या बसच्या दरात... ‘एमएच १२ (मधल्या सीरीजचं अक्षर आता लक्षात नाही) ४००७’ असा त्या गाडीचा नंबर होता आणि तीवर पांढरा पट्टा मारलेला असायचा. गोविंदराव आदिकांचा कार्यकाळ संपला आणि ‘प्रेस्टिज सेवा’ही नंतर लवकरच संपुष्टात आली. (डिप्लोमाला असताना मी या प्रवासावर ‘नगर-पुणे नॉनस्टॉप’ या शीर्षकाचा एक दोन फुलस्केप पेपर भरून लेखही लिहिला होता. सगळे लेख जपून ठेवायची सवय असूनही हा लेख माझ्याकडून कुठं तरी गहाळ झाला. त्याचं आजही वाईट वाटतं. अन्यथा तो लेखही या लेखासोबत दिला असता. असो.)
पुढं नोकरी लागली आणि एकटा प्रवास करण्याची संधी आणि प्रसंग वाढले. एकदा तर माझ्याकडं एसटीचा पास असताना, केवळ नाशिक-मुंबई रस्ता बघायचा म्हणून मी पुणे ते मुंबई हा प्रवास नाशिकमार्गे केला होता. पुण्याहून नाशिकला गेलो. तिथल्या सीबीएसवर गेल्यावर मुंबईच्या गाड्या महामार्ग बसस्थानकावरून सुटतात, अशी माहिती समजली. मग रिक्षानं त्या स्टँडवर आलो. रात्री अकराच्या सुमारास शिर्डी-दादर अशी बस मिळाली. बसला गर्दी होती. पण पुढच्या आडव्या सीटवर बसून तो प्रवास केला. तेव्हा मी २१-२२ वर्षांचा असल्यानं लहान मुलांसारखं उलटं वळून, गुडघ्यावर बसून पुढचा रस्ता बघता येत नव्हता. पण मी मान वळवून वळवून तसाच सगळा रस्ता बघितला. इतर लोक झोपले होते म्हणून बरं. मात्र, आपण नवीन काही तरी बघतोय या आनंदात मान दुखायला लागली, याचं मला काहीच नव्हतं. मध्यरात्री तीन-साडेतीनच्या सुमारास लखलखणारी भिवंडी बघितलेली आजही आठवते आहे. माझ्यासाठी हे सगळंच नवीन! टकामका बघतच बसलो. मुंबईला पहाटे पोचलो, पण तिथं मी करणार काय? मग लगेच पुण्याची एसटी पकडली आणि घरी आलो. 
पुढं एकदा बहिणीचा एमपीएससीचा अर्ज नेऊन देण्याच्या निमित्ताने (पुन्हा पास होता म्हणून) एकटा नगरवरून मुंबईला गेलो. ती मुंबईला जाण्याची पहिलीच वेळ. त्यापूर्वी १९८९ मध्ये काका, चुलतबहीण व आजीसोबत वसईला आमच्या चुलतआजोबांकडं गेलो होतो. तोही प्रवास नीट लक्षात आहे. स्वारगेटवरून आम्ही ठाण्याला गेलो. (त्या एसटीवर ‘स्वारगेट-ठाणा’ असं लिहिलेलं मला अजून आठवतंय. इतकंच काय, ‘ठाणा काय; ठाणे असं नीट लिहायला काय होतं?’ असं म्हणून मी त्या पाटीला नाकही मुरडलं होतं. पण तेव्हाही पुढच्या सीटवर उलटं बसून मी आयुष्यात पहिल्यांदा खंडाळ्याचा घाट असाच डोळे विस्फारून बघितला होता. ठाण्याला गेलो. तिथलं एसटी स्टँड बघून माझा साफ अपेक्षाभंग झाला. एक मोठी शेड होती आणि मधोमध कमानीतून एसटी गाड्या आत जात होत्या. वास्तविक मोठ्या शहरांमधले बसस्टँड आणखी मोठे व भव्य असतील, असं मला वाटत होतं. पण तिथली जागेची अडचण हा मुद्दा त्या वयात माझ्या अर्थातच लक्षात आला नाही. कोकणातल्या सगळ्या एसटी स्टँडची रचनाही कशी असते, हे मला तिथं गेल्यावर कळलं. प्रचंड पावसाच्या प्रदेशात असे बसस्टँड का बांधले असतील, हे समजायला फार अवघड नव्हतं. असो. तर मूळ मुद्दा मी एकटा पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो त्याचा... मी तेव्हा २१ वर्षांचा होतो आणि नगरवरून पुण्याला येऊन, गाडी बदलून मी मुंबईला गेलो होतो. सेंट्रल बसस्टँडवर उतरल्यावर मला माझगावच्या एमपीएससी भवनात जायचं होतं. (मी मुंबईच्या नकाशाचा अगदी बारकाईनं अभ्यास केला होता, तेव्हा मी सहज मुंबईत फिरू शकलो.)

---
(अपूर्ण)

----1 Apr 2022

‘मी वसंतराव’विषयी...

कलंदराचे कैवल्यगान...
----------------------------


पं. वसंतराव देशपांडे यांना मराठी रसिक ओळखतात ते एक अवलिया, कलंदर शास्त्रीय गायक म्हणून! शास्त्रीय गायनासोबतच नाट्यसंगीतात, अभिनयातही त्यांनी नवे मानदंड प्रस्थापित केले. वसंतरावांच्या या यशामागे वसंत बाळकृष्ण देशपांडे नावाच्या एका सामान्य वाटणाऱ्या माणसाचा संघर्षपूर्ण इतिहास आहे, तो मात्र आपल्याला फारसा माहिती नसतो. काळ निघून जातो. अशी उत्तुंग माणसं देहानं आपल्यातून निघून जातात. मागे राहतो तो त्यांचा अद्वितीय वारसा... त्या वारशाकडं नवी पिढी थक्क होऊन पाहत असतानाच त्या व्यक्तीची संघर्षगाथा त्यांना पाहायला मिळाली तर? ‘मी वसंतराव’ हा निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित चित्रपट नेमकं हेच साधतो. मराठी रसिकांनी अतोनात प्रेम केलेल्या वसंतरावांचं ते ‘वसंतराव’ होण्यापूर्वीचं कष्टमय जीवन आपल्याला सविस्तर, संवेदनशीलतेनं आणि सहृदयतेनं उलगडून दाखवतो. हा प्रवास प्रेक्षक म्हणून आपल्यासाठीही सोपा नसतो. एका हाडाच्या कलावंताची होणारी तडफड बघताना अनेकदा मनात कालवाकालव होते, कित्येकदा आवंढे गिळले जातात, अनेकदा अश्रू ओघळतात... अज्ञानाचा अंधार फार मोठा असतो. रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो. वसंतरावांच्या अनवट आणि अफाट गायकीसारखाच आपल्या मनात रुंजी घालतो आणि मनोमन त्या महान कलावंताला नमन करायला भाग पाडतो...
कलाकाराला आपल्यातल्या कलेची जाणीव होणं आणि त्यानंतर त्या लख्ख उजळलेल्या वाटेनं त्याचं ते बेभान होऊन दौडत निघणं हा प्रवास निपुणनं त्यातल्या सर्व नाट्यमय शक्यता लक्षात घेऊन अतिशय सुरेख आणि सुरेल चितारला आहे. एका अर्थानं वसंतराव हे बंडखोर कलावंत होते. मा. दीनानाथांच्या गायकीचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव असला, तरी ‘तू स्वत:ची वाट शोध, माझी नक्कल करू नकोस’ हा त्यांनीच केलेला उपदेश वसंतरावांनी आयुष्यभर पाळला. त्यातून त्यांची वेगळी अशी खास ‘देशपांडे घराण्या’ची गायकी जन्माला आली. असं गाणं ऐकण्याची तेव्हाच्या रसिकांना आणि संगीत समीक्षकांनाही सवय नव्हती. परंपरेनं आलेलं चौकटबद्ध गाणं हेच खरं गाणं असं त्यांचं ठाम मत होतं. त्यात वसंतरावांचं निम्मं आयुष्य कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलण्यात एखाद्या सर्वसामान्य गृहस्थाप्रमाणे गेलं. त्यांच्यातला वेगळा गायक हेरला तो त्यांचे जीवलग मित्र पु. ल. देशपांडे यांनी! मा. दीनानाथांपासून ते लाहोरमध्ये भेटलेल्या उस्तादांपर्यंत आणि बेगम अख्तर यांच्यापासून ते वसंतरावांच्या आई व मामांपर्यंत निवडक लोकांनीही त्यांच्यातला हा ‘वेगळा’ कलावंत ओळखला होता. मात्र, स्वत: वसंतरावांना आपल्यामधल्या या असामान्य गायकाची ओळख पटेपर्यंत बराच काळ गेला. त्यांचा हा सर्व संघर्ष पाहताना आपण अनेक बाबतींत लाक्षणिक अर्थानं या संघर्षाची तुलना आपल्या स्वत:च्या आयुष्याशी करू शकतो. अनेकदा आपल्याला आपल्या क्षमतांची जाण नसते. कौटुंबिक, व्यावहारिक अडचणींचे डोंगर समोर उभे असतात. वाट सापडत नाही. जीवाची नुसती तडफड होते. कस्तुरीमृगाप्रमाणेच ही अवस्था असते. तो सुगंध आपल्याच नाभीत आहे, हे जसं कस्तुरीमृगाला ठाऊक नसतं, तद्वतच आपल्यातले असामान्य गुण आपल्याला अनेकदा कळत नाहीत. वसंतराव एका अर्थाने भाग्यवान, की त्यांना पुलंसारखा जीवलग मित्र लाभला. या चित्रपटातला हा मैत्रीचा ट्रॅक अनेक अर्थांनी खूप लोभस आणि सुंदर झाला आहे.
तब्बल तीन तासांचा हा सिनेमा तयार करताना निपुणनं वसंतरावांचा हा सर्व प्रवास अगदी तब्येतीत दाखवला आहे. अगदी लहानपणापासून विशिष्ट तऱ्हेनं वाट्याला आलेला संघर्ष, मानी आईसोबत नागपुरात एकटं राहणं, त्यानंतर मामामुळं थेट लाहोरला केलेली भटकंती आणि गाण्याचा शोध, नंतर पुण्यात आल्यावर ब्रिटिशकालीन मिलिटरी अकौंट्समध्ये केलेली नोकरी, लग्न-संसार, मुलं-बाळं, नंतर ‘नेफा’त झालेली बदली, तिकडे वेगळ्याच प्रांतात होणारी घुसमट, मग अख्तरीबाई आणि पुलंच्या प्रयत्नांनी पुन्हा पुण्यात येऊन पूर्णपणे गाणं करण्याचा निर्णय, पुण्यातल्या संगीत समीक्षकांशी उडालेला खटका, स्वतंत्र मैफली मिळण्याची मारामार अशा अडचणींतून वसंतरावांचं आयुष्य जात असतानाच मग ‘कट्यार काळजात घुसली’च्या रूपानं त्यांच्या कारकिर्दीला मिळालेली मोठी कलाटणी आणि त्यातून त्यांची उत्तुंग गायकी सर्व रसिकांसमोर प्रस्थापित होऊन त्यांना मिळालेली लोकमान्यता व राजमान्यता हा सर्व प्रवास निपुणनं अतिशय मेहनतीनं, बारीकसारीक गोष्टींच्या तपशिलाकडे लक्ष देऊन विलक्षण प्रत्ययकारक रंगविला आहे.
वसंतरावांवरील सिनेमा म्हटल्यावर वसंतरावांची मुख्य भूमिका त्यात कोण करणार, हा महत्त्वाचा प्रश्न होता. आजोबांची गायकी आत्मसात केल्यानंतर वसंतरावांचा नातू राहुल देशपांडे यानेच ही भूमिकाही करावी, असे दिग्दर्शकाला वाटले असल्यास नवल नाही. राहुलनेही या भूमिकेचे सोने केले आहे. एका अर्थाने त्याच्या रक्तातच ही भूमिका होती. अर्थात त्यामुळेच ती साकारणं अवघडही होतं. याचं कारण त्याला त्यासाठी आपल्यातून आजोबांना बाहेर काढून, समोरून त्यांच्याकडं बघावं लागलं असणार. कुठल्याही कलावंतासाठी यापेक्षा कठीण आव्हान दुसरं नसेल. वसंतरावांचं व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष बघितलेली अनेक मंडळी आजही हयात आहेत. वसंतरावांचे बरेचसे व्हिडिओही उपलब्ध आहेत. त्यांचं लोभस रूप, काहीसं सानुनासिक आणि वैदर्भीय हेलातलं बोलणं हे सगळं ज्ञात आहे. असं असताना परकायाप्रवेश करून ही भूमिका साकारणं, अगदी त्यांचा नातू असला तरी, फारच अवघड! मात्र, राहुलनं हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. मध्यमवयीन वसंतरावांची भूमिका त्यानं फारच उत्तम आणि तन्मयतेनं केली आहे. (अगदी लहान वसंताची भूमिका आरुष नंद व थोड्या मोठ्या वसंताची भूमिका गंधार जोशी यांनी केली आहे.) वसंतरावांच्या आईच्या भूमिकेत अनिता दाते चपखल बसल्या आहेत. या भूमिकेचा ठसका काही औरच आहे. एक करारी, स्वाभिमानी स्त्री ते ‘आम्हाला एक वेळ विसर, पण गाणं सोडू नकोस’ असं मुलाला सांगणारी आई हा सर्व प्रवास अनिता दाते यांनी फारच उत्तम सादर केला आहे. 

या सर्व सिनेमात अगदी छाप पाडून जातो तो पुलंची भूमिका साकारणारा पुष्कराज चिरपुटकर. वास्तविक अतुल परचुरेपासून ते सागर देशमुखपर्यंत अनेकांनी पडद्यावर पु. ल. साकारले आहेत. पण दर वेळी नवा कलाकार पु. लं.च्या भूमिकेत बघायचा म्हणजे आधी पोटात गोळाच येतो. पुष्कराजनं मात्र सुखद अपेक्षाभंग केला आहे. वसंतरावांच्या जीवनात पुलंसारख्या जीवलग दोस्ताचं स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळंच ही भूमिकाही बऱ्याच मोठ्या लांबीची आणि महत्त्वाची होती. पुलंचं व्यक्तिमत्त्व रेखाटताना ते क्वचित कॅरिकेचरकडं झुकतं की काय, अशी सारखी भीती वाटत राहते. मात्र, पुष्कराजनं तो तोल व्यवस्थित सांभाळला आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, मोठे लेखक पु. ल. देशपांडे यापेक्षा ‘वशाचा दोस्त भाई’ हा त्यातला रंग महत्त्वाचा होता आणि तो सूर नेमका पकडल्यानं पुष्कराज बाजी मारून गेलाय. वसंतरावांच्या आईचे व पुलंचे यातले चुरचुरीत संवाद अनेकदा हशा व टाळ्या मिळवतात व या सर्व सिनेमातला तो एक अतिशय सुखद रिलीफ आहे.
मा. दीनानाथांच्या छोट्याशा भूमिकेचे आव्हान अमेय वाघने समर्थपणे पेलले आहे. भूमिकेची लांबी कमी असली, तरी चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दीनानाथांचा आब राखून अमेयनं ही भूमिका वठविली आहे. इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये शंकरराव सप्रे या वसंतरावांच्या गुरूंच्या भूमिकेत सारंग साठ्ये आणि वसंतरावांच्या मामाच्या भूमिकेत आलोक राजवाडे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. लाहोरमधील उस्तादांच्या भूमिकेत कुमुद मिश्रा, तर बेगम अख्तर यांच्या भूमिकेत दुर्गा जसराज यांनी जान आणली आहे. वसंतरावांच्या पत्नीची भूमिका कौमुदी वालोकर हिने चांगली केली आहे.
चित्रपटाचं संगीत राहुलचंच आहे. हा संपूर्ण चित्रपट म्हणजे संगीताची मेजवानी आहे. तो तसा असणं स्वाभाविकच. दीनानाथांच्या गायकीपासून ते वसंतरावांच्या स्वतंत्र गायकीपर्यंत अनेकविध गायनप्रकार यात आले आहेत. चित्रपटात लहान-मोठी अशी तब्बल २२ गाणी असून, ती राहुलसह आनंद भाटे, पं. विजय कोपरकर, उस्ताद राशीद खाँ, श्रेया घोषाल, सौरभ काडगावकर, जिग्नेश वझे, ऊर्मिला धनगर, प्रियांका बर्वे, हिमानी कपूर आदी प्रसिद्ध गायकांनी गायिली आहेत. यातलं वैभव जोशींनी लिहिलेलं ‘ललना...’ हे गाणं आत्ताच सुपरहिट झालं आहे. या गाण्याचं टेकिंगही जमून आलं आहे. यात ‘कट्यार’चीही गाणी अर्थातच आहेत. याशिवाय ‘राम राम राम राम...’ ही श्रेया घोषाल व राहुल देशपांडेनं गायलेली अंगाईही अप्रतिम असून, बराच काळ डोक्यात रेंगाळते. 
‘पुनव रातीचा’ अशी एक लावणीही यात असून, ती ज्या प्रसंगात येते तो सर्व प्रसंग मुळातूनच पाहण्यासारखा आहे. या प्रसंगाच्या चपखल योजनेतून निपुणचं दिग्दर्शकीय कौशल्य दिसतं. हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक ‘म्युझिकल ट्रीट आहे’, यात वाद नाही.
वसंतरावांचा हा सर्व प्रवास १९८३ मधील पुण्यातील त्यांच्या एका मैफलीपासून सुरू होतो. तिथं झाकीरचं तबलावादन सुरू असताना वसंतरावांना भेटायला एक व्यक्ती येते. त्या व्यक्तीशी संभाषण सुरू होतं आणि ‘फ्लॅशबॅक’मधून वसंतरावांचा सर्व प्रवास उलगडत जातो. ही व्यक्ती कोण, हेही प्रत्यक्ष पडद्यावरच पाहणं इष्ट.
वसंतरावांसारखे दिग्गज कलावंत म्हणजे आपल्या समाजाची अमूल्य संपत्ती असते. ही संपत्ती जतन करायची असते. अशा व्यक्तिश्रेष्ठांच्या गोष्टी पुढील पिढीला सांगायच्या असतात. महाराष्ट्राचं सुदैव हे, की या समृद्ध भूमीत अशी अनेक व्यक्तिमत्त्वं जन्माला आली आणि त्यांच्या गोष्टी पुढल्या पिढीला सांगण्यासाठी निपुणसारखी ‘गोष्टीनिपुण’ पिढीही इथंच जन्माला आली.
या महाराष्ट्रभूमीत जन्म घेतल्याचं, मराठीसारखी मातृभाषा लाभल्याचं भाग्य मिरवावं अशा गोष्टींपैकी एक म्हणजे वसंतरावांचं गाणं... ते गाणाऱ्या कंठामागचा कठोर संघर्ष आणि त्यांची गाण्यावरची अविचल निष्ठा दाखविणारी ‘मी वसंतराव’सारखी कलाकृती म्हणून पाहायलाच हवी.

---

दर्जा - साडेचार स्टार

---

20 Mar 2022

‘काश्मीर फाइल्स’विषयी...

विच्छिन्न करणारा अनुभव...
---------------------------------


‘काश्मीर फाइल्स’ अखेर आज - २० मार्च रोजी - बघितला. डोकं सुन्न होऊन गेलं. एखाद्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याच्या मेंदूच्या ठिकऱ्या उडवता येतात, तसंच अशी एखादी कलाकृती दाखवून एखाद्याच्या मेंदूतही ठिकऱ्या उत्पन्न करता येतात. ‘काश्मीर फाइल्स’ हा तशा प्रकारचा सिनेमा आहे. प्रेक्षकाच्या डोक्याला वेगळ्या प्रकारे शॉट लावण्यात हा सिनेमा यशस्वी होतो. जनरली, कुठलाही सिनेमा बघण्यापूर्वी मी त्याविषयी काही वाचत किंवा ऐकत नाही. त्यामुळं पूर्वग्रहविरहित नजरेनं सिनेमा बघायला मदत होते. ‘काश्मीर फाइल्स’विषयी मात्र ठरवूनही काही कानावर न पडणं किंवा एकदमच अलिप्त राहणं शक्य नव्हतं एवढं त्याविषयी सर्वत्र लिहिलं जात होतं, बोललं जात होतं. तरीही माझ्या नेहमीच्या पद्धतीने जास्तीत जास्त तटस्थ राहून सिनेमा अनुभवण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही संवेदनशील माणसाचं काळीज हलून जाईल, असे अनेक प्रसंग या सिनेमात आहेत. काश्मीरमध्ये १९९० च्या १९ जानेवारी रोजी जे काही झालं, त्याचं प्रत्ययकारी चित्रण या सिनेमात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीनं केलंय. ते बघताना अंतर्बाह्य हादरून जायला होतं. आपल्याच देशात असं काही घडलं आहे आणि आपल्याला याबद्दल फार काही माहिती नाही, यामुळं एकाच वेळी शरम, अपराधगंड, चीड, संताप, उद्वेग आदी भावना मनात येऊन गेल्या.
एक सांगायला पाहिजे. मी स्वत: त्या वेळी १४-१५ वर्षांचा होतो. रोजचं वृत्तपत्र नेमानं वाचत होतो. तरी मला १९९० मध्ये काश्मीरमध्ये असं काही भयानक घडलंय याबद्दल तेव्हा तरी कुठं माध्यमात वाचल्याचं फारसं आठवत नाही. काश्मीरविषयीच्या बातम्या येत होत्या. मात्र, विशेषत: पंडितांबाबत जे काही घडलं, त्यावर फारसं कुठं काही आल्याचं किंवा कुणी काही बोलल्याचं मला तरी आठवत नाही. (हा माझा स्मरणदोषही असू शकतो.) यानंतर एकदम १६ वर्षांनी, म्हणजे २००६ मध्ये मी ‘इफ्फी’त अशोक पंडित यांनी दिग्दर्शित केलेली एक डॉक्युमेंटरी बघितली होती. त्या वेळी पंडित स्वत: तिथं आले होते आणि प्रेक्षकांशी बोलले होते. ती डॉक्युमेंटरी बघून पंडितांच्या प्रश्नाविषयी पहिल्यांदा नीट व सविस्तर कळलं होतं. पंडितांचं एकूण बोलणं, चीड, उद्वेग हा सगळा तेव्हा तरी मला ‘अरण्यरुदन’च वाटला होता. त्यानंतरही १६ वर्षं गेली आणि आता मूळ घटनेला ३२ वर्षं होऊन गेल्यानंतर हा सिनेमा आला आहे. त्याविषयीच्या कुठल्याही चांगल्या-वाईट प्रचाराला बळी न पडता, प्रत्येकानं तो स्वत: बघून काय ते मत ठरवलं पाहिजे. (या सिनेमाच्या नॅरेटिव्हला प्रतिवाद करणाराही सिनेमा कदाचित भविष्यात कुणी करील, तेव्हा तोही आवर्जून पाहिला पाहिजे.)

Spoiler alert

सिनेमात आपल्याला नक्की काय दाखवायचं आहे, याबाबत दिग्दर्शकाच्या मनात कुठलीही शंका नाही. त्यामुळं त्यानं घडलेल्या घटनांची एक कथामालिका गुंफून ती नाट्यमय रूपात आपल्यासमोर सादर केली आहे. पुष्करनाथ पंडित (अनुपम खेर) यांच्या घरात झालेल्या भयंकर घटनेच्या अनुषंगाने ही सर्व कथा आपल्यासमोर फ्लॅशबॅकने उलगडत जाते. कृष्णा (दर्शनकुमार) हा पुष्करनाथ यांचा नातू. तो १९९० ची घटना घडली तेव्हा अगदीच लहान असतो. पुष्करनाथ यांचे एके काळचे मित्र व सहकारी त्याला काश्मीरविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी खरं काय घडलंय ते सांगतात. तोवर कृष्णा दिल्लीतील एएनयू (थोडक्यात जेएनयू) विद्यापीठातील प्रा. राधिका मेनन (पल्लवी जोशी) यांच्या संपर्कात आलेला असतो. त्या त्याला विद्यापीठाची निवडणूक लढवायला सांगतात. ‘काश्मीर हा मुळी भारताचा भागच नाही’ यावर मेननबाईंचा ठाम विश्वास असतो. काश्मीरमध्ये पंडितांचं सगळं शिरकाण घडवून आणणारा मास्टरमाइंड फारुक बिट्टा (चिन्मय मांडलेकर) (हे पात्र सरळच जेकेएलएफचा म्होरक्या यासीन मलिकवरून घेतलेलं दिसतं, असं मला वाटलं; पण ते बिट्टा कराटे नावाच्या दहशतवाद्यावरून बेतलं आहे, अशी माहिती समजली...) याच्याशीही मेननबाईंचं संधान आहे. कथानकाच्या ओघात मेननबाईंच्या रूपानं दिल्लीतील एका विशिष्ट वर्तुळाची आणि बिट्टाच्या रूपानं काश्मिरातील फुटिरतावाद्यांची अशा दोन्ही बाजू दिग्दर्शक व्यवस्थित फुटेज देऊन दाखवतो. (उलट कधी कधी जरा जास्तच फुटेज दिलंय असंही वाटून जातं.) 
या सर्व घटनाक्रमात काश्मिरी पंडितांची व्यथा सर्वांत ठळकपणे प्रेक्षकांच्या नजरेत यावी, याची काळजी मात्र दिग्दर्शकानं व्यवस्थित घेतली आहे. अगदी सुरुवातीच्या क्रिकेटच्या प्रसंगापासून काश्मीरमधील भयावह परिस्थितीची जाणीव आपल्याला करून दिली जाते. पुढं काय होणार, याची कल्पना असूनही प्रत्येक वेळी त्या घटनेची तीव्रता किंवा तिचा आघात आपल्या मनावर होईल, अशा पद्धतीनं सर्व प्रसंगांची रचना दिग्दर्शक करतो. यातील प्रमुख पात्रांच्या तोंडून वेगवेगळ्या प्रसंगांत काश्मीरचा इतिहास आपल्याला सांगितला जातो. (तो माझ्यासकट अनेकांना फारसा माहिती नसणार, याची खातरी आहे.) या प्रकारामुळं सिनेमाला क्वचित डॉक्युमेंटरीचं स्वरूप येतंही. मात्र, लगेचच कथानक पूर्वपदावर येतं आणि त्यातील नाट्यमयता कायम राहते, हेही मान्य करायला हवं.
काश्मिरी पंडितांची यात दाखविलेली फरपट आणि होरपळ पाहून कुठल्याही सहृदय माणसाचं काळीज पिळवटून जाईल, यात वाद नाही. आपल्या स्वत:च्या मालकीचं घर, जमीन, गाव, राज्य सोडून जाण्यासाठी कुणी तरी बंदुकीच्या जोरावर धमकावतं आहे, असा प्रसंग आपल्यावर कधीही आलेला नाही. त्यामुळं आपल्याला त्या दु:खाची जाणीव होणं खरं तर फार अवघड आहे. अशा वेळी सहानुभूती ही एकच भावना मनात येऊ शकते. मात्र, हा सिनेमा पाहताना आपल्याला वंशविच्छेदाचं भयावह रूप आणि विस्थापितांची वेदना काही अंशी तरी समजू शकते, हे या कलाकृतीचं मोठं यश म्हणायला हवं.

सिनेमाची प्रदीर्घ लांबी मला खटकली. अर्धा तास तरी हा सिनेमा नक्कीच कमी करता आला असता. आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे ब्रह्मदत्त यांच्या घरात असलेल्या नकाशात काश्मीर संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये दाखवलं आहे. ब्रह्मदत्त हे तर भारताच्या बाजूचे असतात. असं असताना त्यांच्या घरात असा नकाशा कसा? आणखी एक. पंडितांच्या छावणीला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी भेट दिली, त्या प्रसंगात 'महाराष्ट्रात बाळासाहेबांनी (ठाकरे) काश्मिरी पंडित मुलांना इंजिनीअरिंग कॉलेजांत जशा जागा राखीव ठेवल्यात तशा देशभर का नाही ठेवत?' असा प्रश्न एक तरुणी सईद यांना विचारताना दाखवली आहे. सईद गृहमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात युतीचं सरकार नव्हतंच. ते नंतर १९९५ मध्ये आलं. त्यामुळं या प्रसंगात कालक्रमाची गडबड झालेली दिसते. असो.
या चित्रपटात अनुपम खेर आणि चिन्मय मांडलेकर या दोघांनीही कमाल अभिनय केला आहे. विशेषत: चिन्मयनं त्या खलनायकी भूमिकेचे सर्व कंगोरे जबरदस्त दाखवले आहेत. डोळ्यांची फडफड खासच! त्या तुलनेत ब्रह्मदत्त यांच्या भूमिकेतील मिथुन चक्रवर्ती मला तरी फार काही पटले नाहीत. पुनीत इस्सर, प्रकाश बेलवडी आणि अतुल श्रीवास्तव यांच्या रूपानं पोलिस, डॉक्टर व पत्रकार या तिघांचेही प्रतिनिधी हजर आहेत. त्यांच्यातली वाद-चर्चा कथानक पुढं नेण्यासाठी महत्त्वाची. मृणाल कुलकर्णी यांचं काम मोजकंच, पण लक्षात राहणारं आहे. सर्वांत जबरदस्त भूमिका केली आहे ती पल्लवी जोशी यांनी. राधिका मेननचं नॅरेटिव्ह पल्लवी जोशींनी ठसक्यात मांडलंय. कृष्णा झालेल्या दर्शनकुमारनं शेवटच्या त्या भाषणाच्या प्रसंगात सगळं जिंकून घेतलंय. चित्रपटाला संगीत स्वप्नील बांदोडकर यांचं आहे. पण यात गाणी हा प्रकार लक्षात राहणारा नाहीच.
चित्रपटात अर्थातच मोठ्या प्रमाणावर हिंसा आहे. (मला स्वत:ला पडद्यावर कुठलीही हिंसा बघताना फार त्रास होतो. या घटना सूचक पद्धतीनं दाखविल्यास अधिक परिणाम करून जातात, असं मला स्वत:ला वाटतं. लहान मुलांची हत्या कुठल्याही परिस्थितीत सेन्सॉरसंमत व्हायला नको खरं तर... पण असो.) या सिनेमात रक्तरंजित हिंसेला पर्याय नव्हताच हे माहिती होतं. त्यामुळं कमालीचा त्रास झाला. (तो तसा व्हावा अशीच दिग्दर्शकाची अपेक्षा आहे.) 
काश्मीरमध्ये १९९० मध्ये झालेल्या या अत्याचारांविषयी गेली ३२ वर्षं कुणीही फार बोललं नाही किंवा मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत त्याची फार चर्चा झाली नाही, अशी दिग्दर्शकाची मांडणी यात आहे. ते बऱ्याच अंशी खरंही आहे. काश्मिरी पंडितच काय, एकूणच देशातल्या कुठल्याही पीडित, शोषित वर्गाविषयी उर्वरित देशातील बहुसंख्य जनतेला फार काही पडलेलं आहे, असं मला तरी वाटत नाही. आपल्या देशात आर्थिक उदारीकरणानंतर, त्यातही २००० नंतर मध्यमवर्ग सुखासीन झाला. महानगरं गर्दीनं फुगू लागली. आपण सारेच आपल्याभोवती सुखाचा छोटासा कोष विणून त्यात रममाण झालो. वास्तविक त्यापूर्वी मध्यमवर्ग हाच देशातल्या सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज होता. तो कामगार चळवळीत होता, तो महिलांच्या हक्कांसाठी अग्रगण्य होता, तो दलित-शोषितांच्या दु:खानं कळवळत होता... मात्र, बाजार नावाच्या गोष्टीनं आपण आपल्या जवळच्या नातेवाइकांना विसरलो, तिथं काश्मिरी पंडित कोण? आपल्या या सुखासीनतेला, त्यातून आलेल्या कोमट-पांचट उदासीनतेला मारलेली ही सणसणीत चपराक आहे. शरमेनं तोंड लपवून बसावं अशा किती तरी घटना या देशात घडून गेल्या, घडत आहेत आणि घडत राहतीलही. काश्मिरी पंडितांची समस्या ही नक्कीच त्यातली एक आहे. त्याविषयी या चित्रपटानं आपल्या मनात अपराधगंडाची बारीकशी टोचणी लावली तरी ते या कलाकृतीचं सर्वांत मोठं यश ठरेल. केवळ शंभर कोटी मिळविले किंवा अनेक लोकांनी इतर अनेकांना वेगवेगळ्या माध्यमांतून हा सिनेमा बघण्याचा आग्रह धरला हे काही त्या सिनेमाचं खरं यश नव्हे. आपल्यात काय बदल होतो, देशातल्या इतर सर्व अशा लाजिरवाण्या घटनांविषयी आपण तितकेच संवेदनशील राहणार का, की केवळ निवडक घटनांमध्येच आपली संवेदनशीलता उफाळून येणार यावर आपलं माणूसपण अवलंबून असेल. ‘काश्मीर फाइल्स’नं आपल्याला त्या माणूसपणाच्या मार्गावर ढकललं आहे, हे त्याचं फार मोठं यश मला वाटतं. पुढं जायचं की नाही हा सर्वस्वी आपला निर्णय!
या देशात कुठल्याही समाजघटकावर अन्याय होता कामा नये, सर्वांना समान आणि घटनादत्त अधिकारानुसार वागणूक मिळाली पाहिजे, ही अपेक्षा अवाजवी नसावी. या सिनेमात तेच दाखवलं आहे. अन्याय झालेल्या समाजघटकाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तोच इथं दिग्दर्शकानं काश्मिरी पंडितांसाठी बजावलेला दिसतो. हा सिनेमा पूर्वग्रहविरहित नजरेनं पाहणं फार आवश्यक आहे. कुठलंही एक नॅरेटिव्ह किंवा एक मांडणी मनात ठेवून हा सिनेमा पाहायला जाणं म्हणजे त्या कलाकृतीशीही प्रतारणा केल्यासारखं होईल. (हे खरं तर सर्वच कलाकृतींना लागू आहे.)
तेव्हा ‘काश्मीर फाइल्स’ नक्की पाहा. हा सुन्न करणारा अनुभव घेताना आपण दुसऱ्यांच्या दु:खाप्रती कायम अधिक संवेदनशील झालो, तर त्यापेक्षा या चित्रपटाचं मोठं यश दुसरं नसेल.

---

15 Mar 2022

‘गंगूबाई काठियावाडी’विषयी...

हंस जैसी सफेद...
-------------------


गंगूबाई काठियावाडी हे नाव यापूर्वी ऐकलंच नव्हतं, असं नाही. पण तिच्याविषयी फार माहिती नक्कीच नव्हती. कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता. प्रसिद्ध पत्रकार एस. हुसैन झैदी यांचं ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक आल्याचं माहिती होतं. मात्र, ते अजून वाचलेलं नाही. संजय लीला भन्साळी गंगूबाईच्या जीवनावर चित्रपट तयार करतोय, हे ऐकत होतो. तो पाहायची उत्सुकताही होती. अखेर आज - १५ मार्च रोजी - तो योग आला. फर्स्ट थिंग फर्स्ट! ‘गंगूबाई काठियावाडी’ हा संपूर्ण चित्रपट आलिया भटचा आहे. तिच्या पात्राप्रमाणेच तिनं या कलाकृतीवर अक्षरश: राज्य केलं आहे. ‘भूमिका जगणं’ या वाक्प्रचाराचाही ‘क्लिशे’ झाला आहे, हे मान्य आहे; तरीही आलियाच्या बाबतीत पुन्हा हाच शब्दप्रयोग करण्याखेरीज पर्याय नाही, इतका हा तिचा सिनेमा आहे. संजय लीला भन्साळींचे चित्रपट म्हणजे भव्य-दिव्य, रंगीतसंगीत, चकाचक असा सगळा प्रकार. इथं मुंबईतल्या कामाठीपुऱ्यातलं वेश्याजीवन दाखवायचं असलं, तरी भन्साळींना तेही चकचकीत दाखवण्याचा मोह आवरलेला नाहीच. फक्त एवढंच म्हणता येईल, की त्यांनी तुलनेनं पुष्कळ संयम पाळण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो. त्याचा या सिनेमाला फायदाच झालेला आहे. 
वेश्याव्यवसाय हा जगातला सर्वांत प्राचीन व्यवसाय असं मानलं जातं. कुठलीही स्त्री स्वेच्छेने या व्यवसायात येत नाही. बळजबरीनं या व्यवसायात ढकललेल्या स्त्रीच्या यातना आणि तिचं नरकासमान जगणं यांचं वर्णन शब्दांत करणं शक्य नाही. माणसाच्या सर्व संवेदना गोठून संपून जाव्यात, असं जगणं काही स्त्रियांच्या वाट्याला येतं. ‘गंगा जमनादास काठियावाडी’ (आलिया) या नावाच्या, बॅरिस्टर पित्याच्या कन्येच्या आयुष्यातही काही वेगळं घडलं नाही. रमणिक नावाच्या एका तरुणाच्या प्रेमात पडलेली ही सुंदर तरुणी चित्रपटात नायिका होण्याच्या आशेनं मुंबईत येते. तिचा प्रियकर हा प्रत्यक्षात तिला विकणारा दलाल निघतो. अपेक्षाभंग आणि विश्वासघाताचं महाभयंकर दु:ख वाट्याला आलेल्या गंगाचं रूपांतर लवकरच ‘गंगू’ आणि नंतर ‘गंगूबाई’मध्ये होतं. हा सर्व १९५५-६० चा काळ. तेव्हाच्या मुंबईत कामाठीपुरा भागात सुमारे चार हजार वेश्या काम करत होत्या. त्यातल्या शीला नावाच्या ‘मौसी’कडं गंगाला विकण्यात येतं. आधी परिस्थितीपुढं हतबल झालेली, गांजलेली, दुबळी गंगा हळूहळू तीव्र जीवनेच्छेच्या जोरावर स्वत:ची ओळख प्रस्थापित करू पाहते. त्यातल्या त्यात शिकलेली, वाचू शकणारी असल्यानं इतर मुलींचं पुढारपण आपोआपच तिच्याकडं येतं. 
गंगूबाई हळूहळू कामाठीपुऱ्याची अनभिषिक्त पुढारीण होते. हा संघर्ष सोपा नसतो. एका भीषण प्रसंगाला तोंड द्यावं लागल्यानंतर ती मुंबईचा तत्कालीन एकमेव डॉन करीम लाला (सिनेमात रहीम लाला - अजय देवगण) याची भेट घेते. त्याच्याशी बहिणीचं नातं जोडते. कामाठीपुऱ्यातला दारूचा धंदा चतुराईनं ताब्यात घेते. तिथल्या रजियाबाई (विजयराज) या तृतीयपंथीचं वर्चस्व संपविण्यासाठी अनेक क्लृप्त्या करते. अखेर रजियाबाईला हरवून गंगूबाई निवडणूक जिंकते. या प्रवासात तिला एका अमीन फैजी पत्रकाराची (जिम सरभ) साथ लाभते. आता तिला आझाद मैदानावर भाषणासाठी बोलावलं जातं. गंगूबाई पहिल्यांदाच कामाठीपुऱ्याच्या बाहेर पडून, ‘सभ्य समाजाच्या’ मेळाव्यात भाषण ठोकते. तिचं हे भाषण म्हणजे संपूर्ण सिनेमाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. गंगूबाई आपल्या रांगड्या भाषेत समोरच्या कथित सभ्य समाजाचं निराळ्या अर्थानं वस्त्रहरण करते. कामाठीपुऱ्यातल्या महिला आणि त्यांचं हित या एकाच तळमळीनं गंगूबाई कामाला लागते. या वस्तीशेजारी असलेली शाळा आणि तिचे संचालक ही वस्ती हटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढतात. गंगूबाईला तिची वस्ती वाचवायची असते. स्थानिक पुढारी आता तिच्याकडं मदतीला येऊ लागतात. गंगूबाईला त्यातून तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना भेटण्याची संधी मिळते. गंगूबाई आणि नेहरूंची भेट हादेखील या सिनेमाचा हायलाइट म्हणावा लागेल.

संजय लीला भन्साळीनं गंगूबाईचं हे सगळं जगणं अतिशय प्रभावीपणे दाखवलंय. अगदी सुरुवातीला एका लहान मुलीची ‘नथ उतरविण्याच्या’ भयंकर प्रसंगापासून चित्रपट पकड घेतो. चित्रपटाचं कलादिग्दर्शन उच्च दर्जाचं आहे. साठच्या दशकातली मुंबई उत्तम साकारली आहे. कामाठीपुरा आणि तिथल्या जुनाट गल्ल्या, अंधारे जिने, पोपडे उडालेल्या खोल्या आणि डोळ्यांतला उजेड विझलेल्या बायका हे सगळं भन्साळींच्या कॅमेऱ्यानं उत्तम टिपलंय. यात प्रमुख वाटा अर्थात आलिया भटचा. ती पहिल्या दृश्यापासूनच या भूमिकेत शिरली आहे. गंगूबाईची अवहेलना, उद्वेग, लाचारी; तिचा उद्दामपणा, करारीपणा, जिगर, प्रेमळपणा, भावूकपणा, खुनशीपणा, रंगेलपणा, नखरेलपणा हे सगळं सगळं आलियानं अतिशय जबरदस्त साकारलं आहे. या भूमिकेसाठी तिच्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव होणार हे नक्की.
यातलं रजियाबाई हे तृतीयपंथीयाचं पात्र साकारणारा विजयराज हा एक भन्नाट कलाकार आहे. मी त्याला ‘रघू रोमिओ’पासून पाहतोय. बऱ्याच काळानं त्याच्या क्षमतेला न्याय देणारी ही भूमिका त्याच्या वाट्याला आली आहे. (काही प्रसंगांत ‘सडक’मधली ‘महारानी’ साकारणाऱ्या सदाशिव अमरापूरकरांची आठवण आली.) रजियाबाईचा सगळा तोरा, नखरा विजयराजनं एकदम खास सादर केला आहे. रहीम लालाच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट! जवळपास पाहुण्या कलाकारासारखी ही भूमिका आहे, पण त्यातही अजय आपली छाप पाडतोच. याशिवाय छाया कदम, शंतनू महेश्वरी, इंदिरा तिवारी, सीमा पाहावा हे कलाकारही आपापली भूमिका चोख करतात. गंगूबाई अफसान या तरुणाच्या प्रेमात पडते, असा एक ट्रॅक सिनेमात आहे. त्यासाठी दोन गाणीही येतात. गंगूबाईमधली प्रेमाची भुकेली स्त्री दाखविण्यासाठी या ट्रॅकचा उपयोग दिग्दर्शकानं केला आहे.
या चित्रपटात नेहरूंची भूमिका राहुल वोहरा या अभिनेत्याने केली आहे. ती निवड मात्र फसली आहे. आपल्या देशात रोशन सेठ ते दलिप ताहिल अशी ‘नेहरू’ साकारणाऱ्या अभिनेत्यांची परंपरा आहे. सध्या यातले दलिप ताहिल उपलब्ध असताना त्यांनाच ही भूमिका देणे इष्ट ठरले असते. याशिवाय पंतप्रधानांच्या या भेटीत खऱ्या गंगूबाईने त्यांना ‘तुमचं आडनाव मला द्या, मग सर्व गैरधंदे सोडते,’ अशा आशयाचं काही तरी सुनावलं होतं, असा एक किस्सा ऐकण्यात आहे. मात्र, या सिनेमात गंगूबाई-नेहरू भेटीच्या दृश्यात या संवादाचा समावेश नाही. तर ते एक असो.
चित्रपटातले गंगूबाईच्या तोंडचे सर्व संवाद खटकेबाज आहेत. अनेक प्रसंगांत गंगूबाईचे संवाद टाळ्या घेतात. संवादलेखक प्रकाश कापडिया आणि उत्कर्षिणी वशिष्ठ या दोघांना त्यांचं श्रेय द्यायला हवं.
संजय लीला भन्साळीनं गंगूबाई नावाच्या कामाठीपुऱ्यातल्या एका जबरदस्त बाईवर उभा केलेला हा चित्रपट पाहायला हवा तो आलिया भटच्या अदाकारीसाठी. वेश्याव्यवसायातील महिलांचं जगणं समजून घेण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे साठच्या दशकात मुंबई महानगरात अशी कुणी तरी एक बाई होती आणि तिनं वेश्यागृहांत पिचत पडलेल्या हजारो महिलांच्या आयुष्याला आवाज दिला हे जाणण्यासाठी!
काळाच्या उदरात गडप झालेल्या अशा अनेक लढवय्या स्त्रिया असतील. त्यांचं चारित्र्य, कर्तृत्व, पेशा, वकूब याविषयी ‘जजमेंटल’ न होता, अगदी तटस्थपणे, पण संवेदनशीलतेनं त्यांचा संघर्ष समजून घेणं ही अंतिमत: आपल्या माणूसपणाची वरची यत्ता ठरते. संजय लीला भन्साळीला धन्यवाद द्यायचे ते अशा एका महिलेचं जगणं त्यानं आपल्यासमोर आणलं म्हणून! या चित्रपटात एक प्रसंग आहे. अफसान गंगूबाईला साड्या निवडायला सांगतो. सर्व साड्या पांढऱ्याच असतात. तेव्हा यात काय निवडणार, असा प्रश्न तो गंगूबाईला करतो. तेव्हा ती शुभ्र रंगाचे शंभर प्रकार सांगून हा निवडू की तो, तो निवडू की आणखी तो... असं विचारते. तेव्हा अफसान म्हणतो, हंसवाला सफेद चुनो!
गंगूबाईसारख्या बाईच्या जगण्यातलं सगळं सार यात आलं आहे!


---

14 Mar 2022

‘झुंड’विषयी...

 भिंत ओलांडताना...
------------------------


नागराज मंजुळे हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. त्याच्या बहुतेक कलाकृती मी पाहिल्या आहेत आणि त्या आवडल्याही आहेत. अगदी ‘फँड्री’पासून ते ‘वैकुंठ’पर्यंत! हा कविमनाचा दिग्दर्शक चित्रभाषेचा उत्तम वापर करून त्याला जे काही सांगायचं आहे ते नेमकं आणि स्पष्टपणे सांगत आलाय. त्याचं हे सांगणं तसं त्रासदायक आहे. ती नुसती करमणूक कधीच नसते. त्याच्या कलाकृती आपल्याला प्रश्न विचारतात - अगदी डोळ्यांत डोळे घालून प्रश्न विचारतात. त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं नसतात. ती उत्तरं आपल्याकडं नसणं हा नेहमीच आपला दोष नसतो. पण आपल्यापैकी जी संवेदनशील मनं आहेत, निदान ती तरी त्यावर विचार करू लागतात. याच कारणांमुळं नागराजच्या कलाकृती पाहणं ही कायमच वैचारिक खाद्य पुरवणारी गोष्ट असते. नागराज ‘झुंड’ नावाचा हिंदी सिनेमा करतोय आणि त्यात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहे, हे कळल्यावर मात्र मी थोडा सचिंत झालो होतो. दोन कारणं होती. एक, ‘सैराट’च्या तुफान यशानंतर हा दिग्दर्शक हिंदीत प्रवाहपतित होतो की काय, ही भीती आणि दुसरं म्हणजे भाषा हे नागराजचं महत्त्वाचं माध्यम असल्यानं ती बदलल्यानं त्याचा संदेश पातळ होतो की काय, ही दुसरी भीती! त्यातच ‘झुंड’ प्रदर्शित झाला आणि त्याविषयी वेगवेगळं कानी येऊ लागलं. मी स्वत: सिनेमा पाहीपर्यंत त्याबद्दलचं काहीही लिहिलेलं वाचणं, ऐकणं टाळतो. पूर्वग्रहविरहित नजरेनं सिनेमा पाहता यावा एवढाच त्यामागं हेतू असतो. त्यामुळं जरा निवांत, उशिरा - म्हणजे आज - १४ मार्च रोजी हा सिनेमा पाहिला. बघितल्यावर सर्वप्रथम हे सांगितलं पाहिजे, की माझ्या मनात ज्या दोन्ही भीती होत्या, त्या अगदी फोल ठरल्या आणि त्याचा मला मनापासून आनंद झाला. नागराजचा हा सिनेमाही ‘स्टार्ट टु एंड’ नागराजचाच सिनेमा आहे आणि तो हिंदी भाषेत काय, अगदी झुलू भाषेत काढला असता, तरी तो तितकाच प्रभावी ठरला असता, असंही वाटून गेलं.
ही कहाणी एका खऱ्या घटनेवर आधारित आहे, हे मी वाचलं होतं. नागपूरचे विजय बारसे यांनी झोपडपट्टीतल्या मुलांना एकत्र आणून त्यांची फुटबॉल टीम तयार केली आणि या दरम्यान या मुलांची आयुष्यंही बदलवून टाकली, अशी ही ‘वनलायनर’ कथा. नागराजला ती का आवडली असावी आणि मोठ्या पडद्यावर का मांडावीशी वाटली असावी, हे या विषयावरून सहज लक्षात येतं. समाजातील दुर्लक्षित, वंचित, उपेक्षित वर्गाचं जगणं आणि त्यांचा जगण्यातला संघर्ष मांडणं या दिग्दर्शकाला आवडतं. ती त्याची सहज प्रवृत्ती आहे. इथं या संघर्षाला कॅनव्हास आहे तो फुटबॉलचा. आता इथं खेळ क्रिकेट नसून, फुटबॉल आहे हेही फार महत्त्वाचं. फुटबॉल हा श्रीमंत खेळ नाही. कुणीही तो खेळू शकतो. त्यामुळंच दक्षिण अमेरिका, आफ्रिका येथील गरीब देशांतही हा खेळ तुफान लोकप्रिय आहे. तिथंही अगदी झोपडपट्टीतून येऊन मोठा खेळाडू झालेल्या अनेक कहाण्या आहेत. 
नागपूर शहरातल्या गद्दी गोदाम या झोपडपट्टीतून ही कथा सुरू होते. कथेतील महत्त्वाची पात्रं ही अगदी कोवळी, तरुण मुलं आहेत. ती फाटकी आहेत. अतिशय गरिबीत राहतात. चोऱ्यामाऱ्या करतात. मारामाऱ्या करतात. नशापाणी करतात. थोडक्यात, ‘गंदी नाली के क़ीडे’ असं कुणीही म्हणावं असंच त्यांचं आयुष्य आहे. या मुलांच्या आयुष्यात योगायोगानं विजय बोराडे सर (अमिताभ) येतात आणि त्यांचं आयुष्य बदलतं. नागराज अगदी तब्येतीत, सावकाशीनं हा सगळा संघर्षाचा प्रवास रेखाटतो. एखादी ठाय लयीतली शास्त्रीय बंदिश चालावी, तसं हे चित्रण येतं. त्यामुळं सिनेमाचा कालावधीही तब्बल तीन तासांचा आहे. मात्र, अगदी मोजके क्षण वगळले तर तो कुठेही कंटाळवाणा होत नाही, हे दिग्दर्शकाचं यश आहे. मला वैयक्तिकरीत्या मात्र तो अजून किमान अर्ध्या तासानं कमी करता आला असता, असं वाटलं.

या सिनेमात पहिल्या प्रसंगापासूनच या संघर्षाची बीजं दिग्दर्शक रोवतो. एकेका व्यक्तिरेखेला सावकाश प्रस्थापित करतो. यातली एक मुस्लिम तरुणी तिला सतत त्रास देणाऱ्या पतीला सोडून, आपल्या तीन मुलींना घेऊन घराबाहेर निघते आणि ‘तू क्या मुझे तलाक देगा? मै ही तुझे तलाक देती हूँ’ असं म्हणून तीनदा ‘तलाक’ म्हणते आणि तिथून निघून जाते इथूनच या बंडखोर कथेला प्रारंभ होतो. या झोपडपट्टीतली मुलं, त्यांची अतिशय शिवराळ भाषा, भडक कपडे, रंगीबेरंगी केस यांसकट त्यांचं सगळं कठीण जगणं दिग्दर्शक आरसा धरल्यासारखा दाखवीत राहतो. हे सगळं आपण आपल्या आजूबाजूला नक्कीच पाहिलेलं असतं. अनेकदा आपण अशा वस्तीतून गेलेलोही असतो. मात्र, तिथं थांबून तिथल्या माणसांकडं नीट बघणं आपल्याला कधी जमलेलं नसतं, तर त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्याशी मैत्री ही तर फार दूरची गोष्ट. बोराडे सर नेमकं हेच करतात. एका प्रसंगामुळं त्यांचा या मुलांशी सामना होतो आणि त्यांची पावलं नकळत या झोपडपट्टीकडं वळतात. एका कॉलेजमध्ये फुटबॉल प्रशिक्षक असलेल्या बोराडे सरांना या मुलांच्या पायांत असलेलं फुटबॉलचं अद्भुत कसब दिसतं. सुरुवातीला ते चक्क पैसे देऊन या मुलांना फुटबॉल खेळायला लावतात. हळूहळू मुलांमध्ये आणि त्यांच्यात मैत्री होते. अखेर त्यांच्याच कॉलेजच्या टीमला ही टीम हरवते आणि तिथून त्यांच्या एका आगळ्यावेगळ्या प्रवासाला सुरुवात होते. या प्रवासाची कथा म्हणजे सिनेमाचा उत्तरार्ध आहे. मध्यंतरात येणारं डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं गाणं आणि अमिताभचं बाबासाहेबांसमोर नतमस्तक होणं हे फार सूचक आहे.
उत्तरार्धात कथेत आणखी पात्रं येतात. संघर्ष आणखी टोकदार होतो. झोपडपट्टीतल्या प्रमुख पात्रांसोबत आता आपलीही ‘ना‌‌ळ’ जुळलेली असते. त्यांच्या ‘सैराट’पणावर आपणही फिदा होऊ लागतो. त्यांच्या जगण्यातल्या संघर्षाला हळहळतो, त्यांच्या छोट्याशा विजयाला टाळ्या पिटतो. पात्रांमधली आणि आपल्यामधली भिंत हळूहळू कोसळू लागते. उत्तरार्धात दिग्दर्शकाचा उपरोध, उपहास आणखी बोचरा होतो. या देशात सामान्य माणसाची किंमत काय, तर त्याचं ओळखपत्र असलेला एक कागद. तोच जर नसेल तर त्या माणसाचं अस्तित्वही हा देश मानणार नाही, हे उघडंवाघडं सत्य दिग्दर्शक काही प्रसंगांतून समोर मांडतो. नागराजच्या सिनेमांमध्ये क्लायमॅक्सला महत्त्व आहे. या सिनेमात तो मुंबई विमानतळावरच्या प्रसंगात येतो. हा प्रसंगही उत्तम आणि पुरेसा सूचक आहे. मात्र, नागराजच्या आधीच्या सिनेमांसारखा तो सणसणीत आणि गोळीबंद नाही. पण या सिनेमाची ती कदाचित गरजही नाही. आपल्या प्रमुख पात्रांनी भिंत ओलांडण्याची प्रतीकात्मक कृती सिनेमाला दोन्ही अर्थानं ‘उच्च’ पातळीवर नेते.
या सिनेमात अमिताभ बच्चनचं असणं वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाचं आहे. त्यात दिग्दर्शकाची काही वैयक्तिक भावना असणं हा भाग बाजूला ठेवला तरी अमिताभसारख्या पडद्याबाहेर ‘लार्जर दॅन लाइफ’, ‘महानायक’ अशी प्रतिमा असणाऱ्या मोठ्या अभिनेत्यानं यातली बोराडे सरांची भूमिका साकारणं खूपच प्रतीकात्मक ठरलं आहे. वास्तविक अमिताभचं वय त्या पात्राच्या वयापेक्षा नक्कीच अधिक असणार. मात्र, अमिताभच्या जागी अनिल कपूर किंवा जॅकी श्रॉफ किंवा अक्षयकुमार किंवा अजय देवगण अशा त्या पात्राच्या खऱ्या वयाच्या अभिनेत्याचा विचार केला तरी अमिताभचं तिथं असणं आणि प्रत्यक्षात सिनेमात त्याचं बोराडे सरांच्या रूपात दिसणं किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येईल. (त्यातल्या त्यात शाहरुख खाननं ही भूमिका उत्तम केली असती, असंही एकदा वाटून गेलं. पण ते असो.) अमिताभच्या इमेजमुळं आणि वयामुळंही त्या भूमिकेला आलेली एक गोड स्वीकारार्हता या सिनेमाच्या यशाचा मोठा घटक आहे, हे निश्चित!
बाकी इतर प्रमुख भूमिकांमध्ये किशोर कदम, छाया कदम हे नागराजचे आवडते कलाकार यात दिसतात. आमचे नाना, म्हणजे रामदास फुटाणे यांना छोट्याशा भूमिकेत अमिताभसोबत काम करताना बघणं सुखावह आहे. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूही आहेत. मात्र, त्यांना तुलनेत फार चांगल्या भूमिका मिळालेल्या नाहीत. ‘फँड्री’मधला जब्या, म्हणजेच सोमनाथ अवघडे हाही यात एका भूमिकेत दिसतो. सर्वांत कौतुक करायचं ते डॉन झालेल्या अंकुश गेडामचं. तो या सिनेमाचा सर्वार्थाने नायक आहे. अगदी पहिल्या दृश्यापासून हा मुलगा आपली नजर वेधून घेतो. प्रसंगी त्याचा रागही येतो. मात्र, सर्व सिनेमावर या डॉनची छाप आहे हे निर्विवाद. सायली पाटीलनं तिची भूमिका चोख केली आहे. तिच्यातला आणि डॉनमधला रोमँटिक ट्रॅक मस्त आहे. बाकी भूमिकांत राजिया सुहैल, अँजेल अँथनी, कार्तिक उइके, प्रियांशू ठाकूर, जसप्रीतसिंग रंधवा या सर्वच नव्या आणि ‘रॉ’ मुलांनी कमाल केली आहे. अजय-अतुलचे संगीत नेहमीप्रमाणेच ढंगदार. मात्र, सिद श्रीरामचे ‘बादल से दोस्ती’ या गाण्याव्यतिरिक्त बाकी गाणी माझ्या तरी लक्षात राहिली नाहीत. साकेत कानेटकर यांचे पार्श्वसंगीत आणि सुधाकर यंकटी रेड्डी याचं छायाचित्रण अव्वल दर्जाचं!
हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पाहायला पाहिजे. आपल्या स्वत:च्या मनात असलेल्या अनेक भयांवर, न्यूनगंडांवर मात करण्यासाठी बघायला हवा. आपल्याच आजूबाजूला असलेलं उपेक्षितांचं जग नीट जाणून घेण्यासाठी बघायला हवा. आपल्यातल्या आणि त्यांच्यातल्या अंतराची जाण आणि भान येण्यासाठी बघायला हवा. मधली ती मोठी भिंत ओलांडण्यासाठी ते आवश्यक आहे.

...

जाता जाता - एक अगदी सूक्ष्म, पण मला खटकलेला मुद्दा. या सिनेमाच्या श्रेयनामावलीत नागराजनं त्याचं नाव ‘मंजुले’ असं का लिहिलं आहे? हिंदी सिनेमा आहे म्हणून? हिंदीने आता ‘‌‌ळ’ स्वीकारला आहे. आणि नसला स्वीकारला तरी नागराजनं त्याचं आडनाव बदलण्याचं काहीच कारण नाही. ‘आयडेंटिटी’साठी लढणारा, भांडणारा दिग्दर्शक म्हणून नागराजची ओळख आहे, त्या पार्श्वभूमीवर हा विरोधाभास गमतीशीर वाटला.

--------------------------------------------

28 Feb 2022

पासवर्ड - फेब्रुवारी २२ अंक - कथा

एक बंदर, दिल के अंदर...
------------------------------

अणंगपूरच्या अलीकडं, भणंगपूरच्या पलीकडं, डोंगराच्या उताराला, नदीच्या काठाला वसलं होतं गणंगपूर. गाव तसं नामी. नावाप्रमाणेच एक से एक गणंग लोक इथी वस्ती करून राहत होते. गावातल्या लोकांची नावंही एक से एक. कपडे शिवणाऱ्याचं नाव होतं कात्रे, तर चप्पल शिवणाऱ्याचं नाव होतं चावरे; फुलं विकणाऱ्याचं नाव होतं सुके आणि मटण विकणाऱ्याचं नाव होतं खटके. अशा गमतीदार नावांचं हे गणंगपूर. तिथं कुणालाच काहीच ना खटके ना टोचे! डोंगरावरच्या जाडजूड शिळेगत गाव नदीच्या काठाला वर्षानुवर्षं अगदी सुस्त पडलेलं होतं. गावात होती एकच सरकारी शाळा. तिथल्या मास्तरांचं नाव होतं मारके. नाव मारके असलं, तरी मास्तर मारके नव्हते. चष्मीस होते, स्वभावानं अगदी गरीब गाय होते. बदलून आले होते. एकटेच राहायचे. आणखी दोन मास्तर होते. पण त्यातले ढोले गुरुजी तर निवृत्त व्हायला आले होते, त्यामुळं ते कधी शाळेत यायचेच नाहीत. दुसरे होते सुकडे गुरुजी. ते दुसऱ्या गावी राहायचे. त्यामुळे कधी यायचे, तर कधी नाही. सगळा भार मारके मास्तरांनाच वाहायला लागायचा.
गणंगपूरच्या शाळेतली पोरंही तशीच होती. एक से एक वस्ताद! याला झाकावा, त्याला काढावा, असे सगळे. खोड्या करणे, नाना उपद्व्याप करणे, मास्तरांना त्रास देणे हे तर अगदी नेहमीचंच. गावात कुणी नवं माणूस आलं, की त्याला खुळं करून सोडायचं, हा पोरांचा आवडीचा छंद होता. गंप्या हा या सगळ्यांचा मेरुमणी. गंप्या सातवीत होता. म्हणजे शाळेतल्या सर्वांत मोठ्या वर्गात. कारण गणंगपुरात सातवीपर्यंतच शाळा होती. त्यापुढं शिकायचं तर तालुक्याच्या गावाला जावं लागे. त्यामुळं गंप्याचा सगळ्या शाळेत वट होता, दरारा होता. गंप्याच्या वाटेला कुणी जात नसे. तो रस्त्यानं निघाला, की माणसं आपोआप बाजूला होत. लहान लेकरं तर घरात लपून बसत. कारण गंप्या कधी कुणाची, काय खोडी काढील, हे कुणालाच सांगता यायचं नाही. गंप्यालाही ते सांगता यायचं नाही. त्याच्या मनात कधी काय येईल आणि तो काय उद्योग करून ठेवील, याचा अंदाज येणं ही फारच अवघड गोष्ट होती.
एकदा गावात एक मदारी आला. त्याच्याकडे एकच माकड होतं. लाल तोंडाचं. मदारी माकडाचे खेळ करू लागला. गावात माकड आलंय म्हटल्यावर गंप्याला आणि त्याच्या मित्रांना भलताच चेव चढला. मदाऱ्याचा खेळ सुरू होता, तिथं हे सगळे जाऊन गोल उभे राहिले. बारीक बारीक दगड त्या माकडाला फेकून मारू लागले. माकड उड्या मारायला लागे, त्यासरशी गंप्या आणि त्याचे मित्र खदाखदा हसत आणि आणखी दगड मारीत. मदाऱ्यानं हे पाहिलं. त्याला चांगलाच राग आला. त्याच्या लाडक्या माकडाला - बब्याला - गंप्या दगड मारत होता, हे बघून तो गंप्याला ओरडला. माकड म्हणजे महाबली हनुमानाचे वंशज. त्यांना असा त्रास देणं बरं नाही. त्यांना काय, कुठल्याच मुक्या प्राण्याला असा त्रास देऊ नये, असं मदाऱ्यानं गंप्याला सांगितलं. गावातल्या दोन जाणत्या माणसांनीही गंप्याला तसंच सांगितलं. त्यासरशी गंप्याही चिडला. तेवढ्यात कुणी तरी मागून गंप्याची चड्डी ओढली. बघतो तर काय, बब्या गंप्याच्या मागे उभा होता. मदाऱ्यानं त्याला चांगलंच सजवलं होतं. त्याच्या गळ्यात माळ होती. कपाळावर गंध होतं. अंगात एक चौकडीचा शर्टही घातला होता. बब्याच्या उजव्या कपाळावर एक तिरपा व्रण होता. कधी तरी मारामारीत बब्याला दुसऱ्या माकडानं ओरबाडलं असणार! हे असलं ध्यान मागं बघून गंप्या दोन मिनिटं जरा टरकला. पण तेवढ्यात सावध झाला. त्यानं बब्याची पुन्हा खोडी काढाची ठरवलं. शेजारची एक काटकी घेऊन बब्याला टोचायची, अशा विचारानं तो वाकला, तेवढ्यात मागून बब्यानं त्याची चड्डी पुन्हा जोरात खाली ओढली. आत्ता चड्डी पूर्णच निसटून खाली पडली. गंप्याची फाटकी अंडरपँट सगळ्यांना दिसली. सगळी मुलं खो खो हसू लागली. मुलं हसायला लागल्यावर बब्याला आणखी चेव आला. बब्यानं पाठीमागून एकदम उडी मारली आणि तो गंप्याच्या पाठुंगळीला जाऊन बसला. माकड पाठीवर बसलं म्हटल्यावर गंप्या फारच घाबरला. ''ओय, ओय... वाचवा, वाचवा,'' करत ओरडायला लागला. गंप्या उड्या मारत, नाचत त्या चौकात गोल गोल फिरू लागला. ते बघून हा मदाऱ्याचा नवाच खेळ आहे, असं समजून गावातले बरेच लोक तिथं गोळा झाले. त्यांच्यासमोर हे सगळं नाटक सुरू झालं आणि लोक टाळ्या वाजवू लागले. लोकांच्या टाळ्या ऐकून बब्याला आणखी चेव चढला. त्यानं आता गंप्याचे केस हातात धरले आणि गाडीवान कसा कासरा हातात धरून बैल पिटाळतो, तसं तो गंप्याला पिटाळू लागला. गंप्याच्या तोंडचं पाणी पळालं. त्यात बब्या त्याला मध्ये गुदगुल्या करी. त्यामुळं तर गंप्याला हसावं की रडावं हे काही कळेना झालं. मदारी हे सगळं बघत होता. बब्याला त्रास देणाऱ्या गंप्याची पुरेशी खोडी मोडली, हे बघून मग त्यानं बब्याला इशारा केला. बब्या टुणकन उडी मारून खाली उतरला. त्याबरोबर गंप्याचं धूड चक्कर येऊन तिथं चौकातच कोसळलं. सगळे लोक गंप्याला हसत हसत आपापल्या घरी गेले.
थोड्या वेळानं गंप्याला जाग आली तेव्हा सगळीकडं अंधार पडला होता. गंप्यानं आपले कपडे झटकले, केस नीट केले आणि तो पाय ओढत घरी गेला. घरचे सगळे पुन्हा गंप्याला हसले. गंप्याच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. जेवण वगैरे झाल्यावर तो पुन्हा घराबाहेर पडला. त्याच्या टोळीतल्या चार मित्रांना गोळा केलं आणि तो मदाऱ्याचा शोध घ्यायला निघाला. गावाबाहेर नदीच्या काठी मदाऱ्यानं एक झोपडी उभारली होती. बाहेर त्यानं लाकडं पेटवून जाळ केला होता. पलीकडं कुणाची तरी जुनी बाज होती. त्यावर बब्या बसला होता. स्वतःचं अंग कराकरा खाजवत बब्या मधूनच ओरडत होता. मदाऱ्यानं कोपऱ्यात चूल मांडली होती. त्यात अॅल्युमिनियमच्या मोठ्या भांड्यात काही तरी भातासारखं रटरटत होतं. जाळाचा प्रकाश मदाऱ्याच्या तोंडावर पडून त्याचा चेहरा लाल भासत होता. बब्याचा आधीचाच लाल चेहरा आता लालबुंद वाटायला लागलं होतं. शेजारीच वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या सावल्या मदाऱ्याच्या झोपडीबाहेर विचित्र पद्धतीनं हलत होत्या. एकूण मोठं चमत्कारिक दृश्य होतं ते...
गंप्या तिथं पोचायला आणि तिथल्या एक भटक्या कुत्र्यानं गंप्याच्या दिशेनं बघून भुंकायला एकच गाठ पडली. कुत्र्याचं भुंकणं ऐकून गंप्याचे चारी मित्र मागच्या मागं पसार झाले. मदारी आणि बब्या एकदम सावध होऊन कुत्र्याच्या भुंकण्याच्या दिशेनं बघू लागले. त्यांना गवतात काही तरी हालचाल जाणवली. मात्र, तो गंप्या आहे, हे काही मदाऱ्याच्या पटकन लक्षात आलं नाही. गंप्यानं एक मोठा दगड कुत्र्याच्या दिशेनं भिरकावला आणि त्याबरोबर ते कुत्रं केकाटत दूर निघून गेलं. तिथूनही ते गवताच्या दिशेनं भुंकत होतंच. बब्या आता बाजेवरून खाली उतरला होता आणि मदाऱ्यासोबत हळूहळू गवताच्या दिशेनं येत होता. गंप्या हातात दगड घेऊन सज्ज होता. मदारी व बब्या पुढं सरकले. त्यांना जाळाच्या अंधुक प्रकाशात एकदम गंप्याचा चेहरा दिसला. गंप्याची चड्डी बघून मदाऱ्याला सकाळचा प्रसंग आठवला आणि एकदम हसायला आलं. गंप्या आत्ता पूर्ण, मोठी विजार घालून आला होता आणि त्यानं चक्क सुतळीनं ती कमरेला करकचून बांधली होती. तेवढ्यात बब्या गवताकडं बघून जोरजोरात किंचाळायला लागला. गंप्यानं बब्याला परत दगड मारला की काय, म्हणून मदारी बब्याकडं बघायला लागला. मग त्यानं गंप्याकडं पाहिलं. दगड अजूनही गंप्याच्या हातातच होता. बब्याचं लक्ष मात्र गंप्याच्या पायाकडं गवतात होतं. तिथं लक्ष गेलं आणि मदारी चमकलाच. एक भला मोठा नाग गंप्याच्या पायापासून दोन फूट अंतरावर फणा काढून उभा होता. गंप्याचं लक्षच नव्हतं तिकडं. बब्यानं मात्र ओरडून ओरडून त्याला सावध करायचा प्रयत्न चालवला होता. शेवटी मदारी ओरडला, "अबे ओ शाणे बच्चे, मरना है क्या? नीचे देख, नीचे देख..."
गंप्यानं खाली बघितलं मात्र... नागाला बघून त्याची कचकचून बांधलेली विजार ओलीच झाली. काय करावं, हे त्याला सुचेचना. तो तसाच पुतळा होऊन स्तब्ध उभा राहिला. मनातून देवाचा धावा करायला लागला. तेवढ्यात बब्यानं एकदम झेप मारून नागाला एका फटक्यात दूर उडवून लावलं. मदारी आता बब्याकडं कृतज्ञतेनं बघत होता. गंप्याच्या डोळ्यात पाणीच आलं. ज्या बब्याला त्यानं दुपारी खूप त्रास दिला होता, त्याच बब्यानं त्याचा जीव वाचवला होता.
दुसऱ्या दिवशी मदाऱ्याच्या खेळाला गंप्या स्वतः बब्याला डोक्यावर घेऊन जाहिरात करत फिरत होता. त्या खेळाला खूप गर्दी झाली हे सांगायला नकोच. मदाऱ्याला भरपूर पैसे मिळाले. गंप्यानं स्वतः भेळ-चिवडा आणून मदाऱ्याला खायला दिला आणि बब्यापुढं तर केळ्यांचा घडच ठेवला. काही दिवसांनी मदारी व बब्या पुढच्या गावाला खेळ करायला निघून गेले.
त्यानंतर आता गणंगपुरातल्या मारुतीच्या देवळासमोर गंप्या दर शनिवारी दर्शनाच्या रांगेत उभा दिसतो. मारके मास्तरांनी त्याला तालमीत पण धाडलंय. रोज संध्याकाळी गंप्या आता तालमीत घुमत असतो. त्याला अजूनही नीट शड्डू ठोकायला जमत नाही. मग मागून कुणी तरी थोरला पैलवान त्याची लंगोट ओढतो... आखाड्यातले सगळे जण गंप्याला हसतात. गंप्याही हसतो. हसून हसून अगदी डोळ्यांत पाणी येतं त्याच्या... त्या पाण्यात त्याला कधी कधी बब्याचं प्रतिबिंब दिसतं असं म्हणतात.

---

(पूर्वप्रसिद्धी : पासवर्ड फेब्रुवारी २२ अंक)

---

25 Feb 2022

पासवर्ड दिवाळी अंक २१ - कथा

अपना टाइम आएगा...
--------------------------

चपक्... चपक्... चपक्... चपक्...
चिखलातून चप्पल घालून जाताना होणाऱ्या या आवाजानं राघू नादावला होता. त्याचं घर डोंगरावर आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यानं सगळीकडं हिरवंगार वातावरण झालं होतं. भाताची रोपं तरारली होती. वाफ्यांत पाणी साठलं होतं. सगळीकडं भाताच्या लोंब्यांचा खरपूर वास दरवळत होता.
राघू सातवीत शिकतो आहे. त्याचे वडील सोन्याबापू एसटीत कंडक्टर आहेत. फाट्यावर त्यांना डबा द्यायचं राघूचं रोजचं काम होतं. आजही सकाळी सकाळी तो आईनं दिलेला भाकरी-भाजीचा डबा घेऊन रायबाच्या वाडीकडं निघाला होता. राघूचं घर रायबावाडी आणि पलीकडच्या डोणेवाडीच्या मधोमध होतं. मधे एक साधीशी बैलगाडीची वाट होती. आता पावसामुळं तिथं एवढा चिखल झाला होता, की वाट कोणती आणि शेत कोणतं, ओळखू येईना झालं होतं. बैलगाडीच्या धावेमुळं तयार झालेल्या खळगीत चहाच्या रंगाचं पाणी साठलं होतं. त्यात उडी मारून तिथलं पाणी उडवायला राघूला आणि त्याचा दोस्त महादूला फार आवडायचं. आज महादू नव्हता. त्याच्या दादांना - वडिलांना - तालुक्याच्या गावी नेलं होतं. त्यांना चार दिवसांपासून ताप येत होता. सगळीकडं धुमाकूळ घालणाऱ्या करोनानं त्यांना गाठलेलं असू नये, अशी प्रार्थना महादू आणि राघू रोज शिवारातल्या मारुतीकडं करत होते. शिवारातल्या मैदानावरच राघू एरवी मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा. सध्या पावसामुळं त्यांचं 'स्टेडियम' पूर्ण भिजून गेलं होतं. पावसाळ्यात क्रिकेट खेळता आलं नाही, तर क्रिकेटवरचे लेख वाचायला राघूला आवडायचं. त्यातले क्रिकेटपटूंचे फोटो कापून, वहीत ठेवणं हा तर त्याचा छंद होता. सगळ्यांप्रमाणेच धोनी आणि विराट हे त्याचे अतिशय आवडते खेळाडू होते.
रायबाची वाडी अजून अर्धा-एक किलोमीटर असेल. राघूचे वडील रोज सकाळी सायकलनं वाडीपर्यंत जायचे आणि फाट्यावरून तालुक्याच्या गावाला जायचे. तिथून पुढं त्यांची ड्यूटी जिथं लावली असेल त्या गावाला जावं लागायचं. दोन दिवसांतून एकदा मुक्कामी पण जावं लागायचं. आज त्यांना पुन्हा मुक्कामाची ड्यूटी आली होती. त्यामुळंच राघूकडं त्यांना डबा पोचवायचं काम आलं होतं. सोन्याबापू फार सरळ आणि सज्जन माणूस होता. वाडीतल्या सगळ्या लोकांना त्यांचा फार आधार होता. त्यांचं तालुक्याच्या गावी रोजचं येणं-जाणं असल्यानं अनेक लोकांची पार्सलं पोचवण्याचं, वस्तू नेण्याचं-आणण्याचं, निरोप देण्याचं काम सोन्याबापू हसतमुखानं करत. गावातली काही मुलं शिकायला तालुक्याच्या गावी जात. ती सोन्याबापूंच्या एसटीनंच जात. त्यांच्यावर भरोसा ठेवून गावकरी आपल्या पोरांना निश्चिंतपणे त्यांच्या ताब्यात देत असत.
आज राघू विशेष खुशीत होता. त्याचे बापू त्याच्यासाठी तालुक्याच्या गावावरून एक मस्त भेटवस्तू आणणार होते. राघूला खूप दिवसांचं एक घड्याळ हवं होतं. शेतावर काम करताना, वाडीला जाताना-येताना, एसटीच्या वेळा पाळताना घड्याळ सारखंच लागायचं. राघूला सतत दुसऱ्याला वेळ विचारावी लागे. म्हणून त्यानं खूप आग्रह धरून बापूंकडं घड्याळ मागितलं होतं. अखेर खूप प्रयत्नांती बापूंनी त्याला घड्याळ आणून देण्याचं कबूल केलं होतं. आज बापूंच्या पगाराचा दिवस होता. त्यामुळं ते आज नक्की घड्याळ आणणार, याची खात्री होती.

झूम... झुइंग, झुइंग... झूम झूम...

एकदम आवाज आले, तसा राघू दचकला. त्यानं समोर पाहिलं तर चार-पाच अतिशय पॉश, खूप भारी, दणकट पांढऱ्या कार त्या कच्च्या रस्त्यानं वेगानं पलीकडच्या डोंगराकडं जाताना दिसल्या. त्या गाड्यांना काळ्या काचा होत्या. त्यात कोण बसलंय ते कळत नव्हतं. पण कुणी तरी मोठी, तालेवार माणसं असणार हे नक्की. पलीकडच्या डोंगरावर एक मोठी संस्था होती. गिर्यारोहण, साहसी खेळ यांचं प्रशिक्षण तिथं चालायचं म्हणे. त्या भागात अनेक खासगी लोकांची रिसॉर्ट पण होती. तिकडे जाणारा रस्ताही ‘खासगी मालमत्ता’ असा बोर्ड लावून बंद करण्यात आला होता. तिथं एक वॉचमन कायम असायचा. राघू व महादूची त्याची गट्टी होती. त्याला नाव विचारलं, तर तो ‘मला सुभेदार म्हणा’ एवढंच म्हणायचा. आताही राघू जरा पुढं गेला. सुभेदारकाका आलेच समोरून. राघूनं त्यांना वेळ विचारली. नऊ वाजून वीस मिनिटं झाल्याचं त्यांनी सांगितलं. बापूंच्या एसटीला अजून वेळ होता. फाटाही इथून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर होता. मग राघू सुभेदारांच्या केबिनमध्ये येऊन बसला. तिथल्या माठातलं गार गार पाणी आधी त्यानं घटाघटा पिऊन घेतलं. सुभेदारांकडं ‘टायगर’ नावाचा गावठी, पण चांगला दणकट कुत्रा होता. राघूची आणि त्याचीही दोस्ती होती. राघू आत शिरल्याबरोबर टायगर आलाच शेपटी हलवीत. राघूनं त्याला थोपटलं. त्याच्या गळ्याखाली खाजवत त्यानं सुभेदारकाकांना विचारलं, ‘कसल्या गाड्या ओ काका या? कोण लोक आलेत?’
सुभेदारकाका म्हणाले, ‘आता काय सांगू? कुणाला सांगायचं नाही, अशी मला सक्त ताकीद आहे बाबा. फार मोठे लोक आहेत. तुला कळलं, तर तू आश्चर्यानं उडशील...’
राघू म्हणाला, ‘सांगा की... सांगा की काका... मी कुण्णाकुण्णाला सांगणार नाही.’
‘बरं... इकडं ये...’ सुभेदारकाका म्हणाले. ‘कान कर इकडं...’ असं म्हणत ते राघूच्या कानात काही तरी पुटपुटले.
ते ऐकून राघूनं एवढ्ढा मोठ्ठा ‘आ’ वासला की तो लवकर मिटेचना.
‘काय सांगताय काय, काका? खरंच? कोहली आणि आपली सगळी टीम आलीय इथं?’
‘श्शू... शांत शांत शांत बस बाबा. नोकरी जाईल माझी...’
राघूला एकदम आठवलं. पुण्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक टेस्ट मॅच खेळायला आपली टीम आली होती. त्या मॅचमध्ये आपण तीन दिवसांतच वाईट हरलो होतो. पण त्यानंतर आपली टीम इकडं आलीय, हे काही त्याला खरं वाटेना. पण डोंगरावरच्या संस्थेत ते दोन दिवसांसाठी आले आहेत, असं काकांनी त्याला सांगितल्यावर मग विश्वास ठेवावाच लागला. मगाशी गेलेल्या त्या कारमधून चक्क आपले आवडते क्रिकेटपटू गेले होते, हे लक्षात येऊन राघू मनोमन हरखला. त्यांना बघायला मिळालं तर? त्याच्या डोळ्यांतले भाव वाचूनच सुभेदारकाका बोटानंच ‘नाही नाही’ म्हणाले.
राघू हिरमुसला होऊन फाट्याकडं निघाला. टायगरही त्याच्या मागे मागे थोडं अंतर हुंदडत आला. ‘टायगर, परत जा... काकांना सोबतीला थांब,’ असं राघू म्हणाल्याबरोबर जणू समजल्यासारखं टायगर मागं वळला.
राघू फाट्यावर येऊन उभा राहिला. तिथं एक पडझड झालेली शेड होती. शेजारी वडाच्या झाडाखाली एरवी फळं विकणाऱ्या मावशी बसायच्या. सध्या पावसामुळं आणि करोनाच्या निर्बंधांमुळं हल्ली त्या दिसत नाहीत. राघू उजवीकडच्या वळणाकडं बघत बसला. त्याची ही नेहमीची सवय होती. वळणावर एसटी दिसली, की तो एक ते शंभर आकडे मोजायला सुरुवात करायचा. साधारण सत्तरच्या पुढं आकडे गेले, की एसटी बरोबर समोर येऊन थांबायची.
आत्ताही तसंच झालं. वळणावर लालचुटुक रंगाची, पण आता चिखलानं माखलेली गाडी दिसली आणि राघूनं ‘एक, दोन, तीन...’ सुरू केलं. बरोबर पंचाहत्तर आकड्याच्या वेळी एसटी समोर येऊन थांबली. दार उघडलं आणि सोन्याबापू खाली उतरले. वडिलांना बघून राघूचा चेहरा उजळला. बापू आले. ‘काय राघवा, डबा आणलायस का?’ त्यांनी राघूच्या डोक्यांतील केसात हात फिरवत विचारलं. मास्कमधूनही त्यांच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव लपत नव्हते. ‘हो... हा घ्या...’ असं म्हणत राघूनं डबा दिला. ‘आणि माझं घड्याळ?’ राघूनं अधीरतेनं विचारलं.
‘थांब, थांब...’ म्हणत बापू शेडमधल्या बाकावर बसले. मानेवरचा रुमाल काढून आधी त्यांनी घाम पुसला. मग म्हणाले, ‘राघवा, मला माफ कर बेटा. या वेळी काही घड्याळ आणायला जमलं नाही.’
राघू एकदम खट्टू झाला. ‘का पण? तुम्ही मला आज घड्याळ आणणार होता ना... मग का नाही आणलं?’ असं म्हणताना त्याचा चेहरा अगदी रडवेला झाला.
‘अरे हो, ऐकतोस का जरा...’ असं समजुतीच्या स्वरात बोलत बापू म्हणाले, ‘आपल्या महादूचे दादा हॉस्पिटलात आहेत. मी आजच त्याच्याकडं जाऊन आलो. त्यांना प्लाझ्मा द्यावा लागला. आता त्यांची तब्येत सुधारते आहे हळूहळू... पण वेळ लागेल. मला त्यांच्या उपचारांसाठी पैसे द्यावे लागले राघवा... म्हणून तुझं घड्याळ राहिलं बघ. पण पुढच्या महिन्यात मी नक्की घेणार तुला... आपल्या मारुतीची शप्पथ...’
राघूला एकदम महादूचा चेहरा आठवला. त्याला मित्रासाठी एकदम भरून आलं. त्यानं मनातल्या मनात पुन्हा मारुतीरायाला हात जोडले. ‘शक्ती दे, बुद्धी दे’ हा नेहमीचा मंत्र मनातल्या मनातच परत म्हटला. तेवढ्यात ड्रायव्हर रामकाकांनी बापूंना हाक मारली. ‘राघू, सोड रे आता तुझ्या बापाला... आम्हाला लांबची ट्रिप आहे आज...’ असं ते हसत हसत गाडीतूनच म्हणाले. तशी बापू डबा आणि पैशांची कातडी पिशवी घेऊन लगबगीनं उठले. गाडीचं दार लावून घेताना राघूला म्हणाले, ‘नीट घरी जा रे...’ त्यांनी डबल बेल मारली आणि एसटी भुर्रकन पुढं निघून गेली. खंडीभर धूळ उडाली. फाट्यावर आता कुणीही नव्हतं. राघूला काही लवकर तिथून हलावंसं वाटेना. तो तिथंच बसून राहिला. समोरच्या वडाच्या झाडाकडं एकटक बघत बसला. त्या पारंब्यांतून, पानांतून वेगवेगळे आकार शोधण्याचाही त्याला नाद होता. त्याला आता तिथं सारखं घड्याळच दिसायला लागलं.
तेवढ्यात लांबून ‘झुम... झुम...’ आवाज आला. राघूचे कान टवकारले. मगाच्याच त्या मोठ्या गाड्या आल्या असणार! राघू नीट लक्ष देऊन बघू लागला. तेवढ्यात एक गाडी एकदम तिथं येऊन थांबलीच. करकचून ब्रेक मारत उभी राहिली. काळी काच खाली झाली. ‘अरे ओ बेटा, वो माची पर जानेवाला रास्ता कहाँ से है? हम रास्ता भटक गए है...’ कुणी तरी आतून बोलत होतं. राघू नीट जवळ गेला आणि तीन ताड उडाला. बघतो तो काय! साक्षात विराट कोहली होता कारमध्ये... पलीकडं ड्रायव्हर होता. काळा गॉगल आणि पांढरा टी-शर्ट घातलेला विराट राघूलाच पत्ता विचारत होता. भानावर यायला राघूला दोन मिनिटं लागली.
‘विराट ‌ऽऽऽऽऽ’ राघू किंचाळलाच. ‘हां बेटा, मैं ही हूँ... किसी को बोलना मत... हम यहाँ जरा आराम करने आए है... बताओ तो माची पर कहाँ से रास्ता है?’
‘वो... वो... यहाँ से...’ राघूनं फाट्याच्या बाजूनं बोट दाखवलं.
‘तुम्हे रास्ता पता है? एक काम करो... हमारे साथ आओ... बैठो गाडी में... रास्ता दिखाओ जरा..’
आता तर राघूला गगन ठेंगणं झालं. त्याला काय करावं ते समजेनाच. विराटनं दार उघडलं आणि त्याला आत बोलावलं. राघूला त्यानं चक्क मांडीवर घेतलं. राघूला आता चक्कर यायचीच बाकी होती. त्यानं रस्ता दाखवला. फाट्याच्या आत सुभेदारकाकांची केबिन दिसताच, ड्रायव्हर म्हणाला, ‘यही रास्ता है साब... हम आ गयें...’
रस्त्यात राघू एकटक विराटच्या हातातल्या काळ्या वस्तूकडं बघत होता. ते घड्याळ आहे का नक्की काय ते त्याला कळत नव्हतं. केबिनपाशी गाडी आल्यावर राघू खाली उतरला. न राहवून त्यानं विचारलं, ‘यह आप ने हाथ में क्या बांधा है?’
‘अरे ये स्मार्ट वॉच है... चाहिये क्या?’ असं म्हणत विराटनं चक्क ते काळं घड्याळ काढून राघूच्या हातात दिलं. न राहवून सुभेदारकाकांनी टाळ्याच वाजवल्या. ‘बहोत होशियार लडका है ये काका,’ विराट म्हणाला. त्यांची गाडी सुरू झाली आणि बघता बघता डोंगराच्या दिशेनं नाहीशी झाली.
सुभेदारकाका म्हणाले, ‘लकी आहेस गड्या...’
तेवढ्यात त्यांच्या केबिनमधल्या रेडिओवर गाणं सुरू झालं - अपना टाइम आएगा... अपना टाइम आएगा...राघू त्या तालावर उड्या मारायला लागला आणि टायगरही दोन पाय वर करून त्याला साथ देऊ लागला. सुभेदारकाकांच्या डोळ्यांत पाणी होतं...

---

(पूर्वप्रसिद्धी : युनिक फीचर्सचा ‘पासवर्ड’ दिवाळी अंक २०२१)

---

31 Jan 2022

चपराक दिवाळी अंक २०२१ - लेख

जीपीपीचे दिवस...
----------------------

दर वर्षी १५ सप्टेंबरला इंजिनीअर्स डे साजरा होतो. हा दिवस उजाडला, की माझ्या काळजात उगाच धडधडतं. पुण्यातल्या गणेशखिंड रोडवरची गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकची भव्य इमारत दिसू लागते. त्या दगडी इमारतीचे लांबच लांब कॉरिडॉर आणि त्यात हरवून गेलेला गावाकडचा एक १६ वर्षांचा कावराबावरा मुलगाही दिसू लागतो... डिप्लोमा इंजिनीअरिंगला जाऊनही इंजिनीअर न झालेल्या त्या मुलाची, अर्थात माझीच ही कथा आहे... कथेचा काळ आहे १९९१ ते १९९५...
मी १९९१ मध्ये दहावी झालो. बरे मार्क होते. तेव्हा ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांनी एक तर सायन्सला जायचं किंवा डिप्लोमा इंजिनीअरिंगला जायचं, अशी प्रथा रूढ होती. मला ८७.२८ टक्के पडले होते. त्यामुळं मी पुण्यात गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकला येणार, हे जणू विधिलिखितच होतं. तसा मी पुण्यात आलो. माझा जन्म या शहरातला नसला, तरी फार लहानपणापासून मी आत्याकडं पुण्यात येत होतो. त्यामुळं पुणेकर मुलांसारखीच माझीही सुट्टी सारसबाग, पेशवे उद्यान, फुलराणी, शनिवारवाड्यावरची भेळ इ. इ. या प्रकारेच जायची. त्यामुळं पुणं नवीन नव्हतंच. तेव्हा संधी मिळताच इथं यायचं, याची जणू मनात खूणगाठच बांधली होती. त्याप्रमाणे आलो. जुलैतले पुण्यातले ओलेते दिवस खरं तर फार रोमँटिक... मात्र, त्या भव्य कॉलेजात पाऊल टाकताच माझी छाती जी दडपून गेली, ती शेवटपर्यंत! त्यामुळं हा पाऊस, ती ओली झाडं, चिंब दगडी भिंती यांची आणि समोरच्या लेक्चरमधलं आपल्याला काहीही कळत नाहीय, ही भीती यांची एक विचित्र सांगड माझ्या मनात बसली आहे. पुढे किती तरी वर्षं मी जुलै-ऑगस्टचा पाऊस एंजॉय करू शकलो नव्हतो. मराठी माध्यमात शिकलेला मी, इथं पहिल्या दिवसापासून इंग्लिश मीडियममध्ये चालणारा इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रम शिकताना पूर्ण बावचळून गेलो होतो. लेक्चरमधलं काही कळत नसलं, तरी आमचं वर्कशॉप मला आवडायचं. घरच्यांनी उत्साहात सायंटिफिक कॅल्क्युलेटर, मिनी ड्राफ्टर आदी आयुधं अप्पा बळवंत चौकातून आणून दिली होती. घरून पाचशे रुपये महिना पॉकेटमनी मिळायचा. होस्टेलच्या शेजारीच मेस होती. तिला अडीचशे की २६० रुपये महिन्याचे भरावे लागायचे. जेवण अर्थात अत्यंत बेचव! पण त्यामुळंच पुण्यातली हॉटेलं पालथी घालायची संधी मिळाली ती तेव्हापासून! तेव्हा युनिव्हर्सिटी चौकात फाउंटन होतं. (त्याला कारंजं नाही, तर ‘फाउंटन’ असंच म्हणायचं असतं.) आम्ही संध्याकाळी विरंगुळा म्हणून फाउंटनला जाऊन बसायचो. मेसचा कंटाळा आला, की तिथंच काही तरी खायचो. संध्याकाळी एक काकू तिथं पोळी-भाजी विकायला यायच्या. रस्त्यावरच टेबल टाकून पोळी, एक भाजी, सोबत एखादी कोशिंबीर आणि कांदा-टोमॅटो त्या द्यायच्या. किंमत पाच रुपये! आम्हाला अगदीच परवडायचं. मी आणि माझा मित्र सुमंत बऱ्याचदा मेसला दांडी मारून ही पोळी-भाजी खायचो आणि फाउंटनवर बसून राह्यचो. पलीकडे पाषाण रोडला चौपाटी होती. तिथं संध्याकाळी तुफान गर्दी व्हायची. ‘मिलाप’ नावाची पावभाजी फार फेमस होती. अगदी वेटिंग असायचं त्याच्याकडं. आम्हाला ती वीस रुपयांची पावभाजी महाग वाटायची पण तेव्हा! कधी तरी खायचो. अंडाभुर्जी पहिल्यांदा खाल्ली ती इथंच!
फाउंटनचा कंटाळा आला, की चतु:शृंगीला जाऊन बसायचो... ती मागेच होती अगदी आमच्या. फिरोदियांच्या बंगल्यावरून एक गल्ली थेट चतु:शृंगीच्या समोर निघते. पूर्वी सेनापती बापट रोड अगदी लहान होता. मला आठवतं तसं तेव्हा दुभाजकही नव्हता. (बहुतेक १९९४ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या वेळी पुणे शहरात ज्या भरपूर सुधारणा झाल्या, तेव्हा हा रस्ता रुंद करून दुभाजक बसविण्यात आला.) युनिव्हर्सिटी रोड मात्र मोठा आणि दुभाजक असलेला होता. महत्त्वाचं म्हणजे मला आवडायचे ते सोडियम व्हेपरचे दिवे त्यात मधोमध बसवलेले असायचे. सोडियम व्हेपरचे दिवे ज्या गावातल्या रस्त्यांच्या मधोमध आहेत, तेच खरं ‘शहर’ अशी माझी ठाम समजूत आहे. (आताचे पांढरे दिवे मला अॅनिमिक वाटतात. त्या सोडियम व्हेपरच्या पिवळ्याधमक दिव्यांमध्ये शहर गाभाऱ्यातल्या देवीसारखं तेजस्वी आणि ओजस्वी दिसायचं! असो.) चतु:शृंगीवरून सोडियम व्हेपरमध्ये लखलखणारं पुणं स्वर्गीय भासायचं. गर्दीतही एकांताची साधना व्हायची ती इथंच!
गणेशखिंड रोडवर रेंजहिल्स कॉर्नरला एका झाडाखाली पार आणि सार्वजनिक वाचनालय होतं. मी कित्येकदा ‘टीपी’ म्हणून तिथं जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या जोडीनं पेपर वाचत बसत असे. तिथंच एक सार्वजनिक टेलिफोन बूथ होता. त्यात एक रुपया टाकून फोन करता येत असे. एकदा मी आगाऊपणा करून थेट पु. लं.ना तिथून फोन लावला होता. हातात एक रुपयाची चार-पाच नाणी होती. सुनीताबाईंंनीच फोन उचलला. ‘भाईकाका आहेत का?’ मी विचारलं. त्यावर त्या ‘कोण बोलतंय?’ असं म्हणाल्या. मी नाव-गाव सांगितलं. पुढच्या मिनिटाला पु. ल. फोनवर आले. मी त्या रस्त्यावरच्या गोंगाटात साक्षात पुलंशी बोलत होतो. माझे सगळे प्राण कानात आले होते. पु. ल. म्हणाले, ‘काय नाव तुझं?’ मी पुन्हा नाव सांगितलं. ‘शिकतोय,’ असं सांगितलं. तुमचं सगळं साहित्य मला आवडतं, हेही सांगितलं. त्यावर ‘जे वाचलं त्यापैकी काय आवडलं?’ असंही त्यांनी विचारलं. मी ‘सगळंच’ असं म्हटल्यावर ते मंदसे हसले. पुढं काय बोलावं ते न समजून, काही निरोपाचं जुजबी बोलून मी फोन ठेवून दिला. रेंजहिल्स कॉर्नरचा तो पार आणि तो फोन अर्थातच आता तिथं नाही. पण माझ्या मनात तिथं पुलंच्या आठवणींचा स्मृतिशिला कायमची कोरली गेली आहे.
मला गाड्यांचे नंबर बघायचा आणि त्यात काही तरी सिक्वेन्स शोधण्याचा नाद होता. मी त्या पारावर बसून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे नंबर बघत असे. तेव्हा एमएच -१२, एमएच - १४ असे क्रमांक देण्याची पद्धत नुकतीच सुरू झाली होती. त्यापूर्वी ‘एमएई’, ‘एमटीएफ’ वगैरे अशा सीरियल असत. पुण्यात वाहनांची नोंदणी तुफान होत असल्यानं पुण्याची सीरियल एमएच १२ - ‘पी’पर्यंत गेली होती. नगरला तेव्हा ‘बी’ किंवा ‘सी’च सीरियल चालू होती. मी ‘पी’ सीरियलवाल्या गाड्यांकडं डोळे विस्फारून पाहत असे. भारतानं १९९१ मध्ये जागतिकीकरण स्वीकारलं होतं. त्याचे दृश्य बदल तेव्हा अजून दिसायचे होते आणि ते कळायचं माझं वयही नव्हतं. अगदी किंचित, धीम्या गतीनं जग बदलत होतं. तेव्हाचं पुणं तुलनेनं खरोखर आटोक्यात होतं आणि फार फार सुंदर होतं. सिमला ऑफिस चौकातून विद्यापीठाकडं जायला निघालं, की दोन्ही बाजूंनी वड, पिंपळ अशा मोठ्या झाडांची दाट रांग होती. अॅग्रीकल्चर कॉलेज चौकापर्यंत तर दुभाजकही नव्हता. तो त्यापुढे सुरू व्हायचा. तो रस्ताही विद्यापीठ चौकापर्यंत अगदी मर्यादित रहदारीचा आणि त्यापुढे तर अगदी शांत शांत असायचा.
‘बी-२८’ हा माझा होस्टेलचा पत्ता होता. इथंच मला शान्ताबाई शेळके आणि वसंत कानेटकरांचं पत्र आलेलं. (म्हणजे आधी मी त्यांना पत्रं पाठवली होती, त्यांची उत्तरं!) होस्टेलच्या खाली एका लाकडी फ्रेममध्ये कापडी पट्ट्यांमध्ये पत्रं लावलेली असत. अनेक मुलं रोज तिथं आपलं पत्र आलंय का हे बघायला घिरट्या घालत. मला बहुतांश कॉलेज बोअरच होत असे. मग मी तिथंच खाली पडलेले पेपर वाचत तासन्-तास बसत असे. आपल्याला दुसऱ्या कुणाची गरज नाही; आपण आपला जीव स्वत: रमवू शकतो, हा फार महत्त्वाचा शोध मला तिथंच लागला. तिथून जवळपास ‘नार्सिसस’ होण्यापर्यंत माझी मजल गेली, त्यात त्या भयाण होस्टेली वातावरणाचा फार मोठा वाटा होता. होस्टेलवर माझ्यावर रॅगिंग वगैरे झालं नाही. मी अगदीच गरीब, सोवळा नव्हतो. गावाकडच्या अत्यंत गावरान अन् सणसणीत शिव्या तोंडी असायच्या. तब्येतीनंही अगदी बारकुडा वगैरे नव्हतो. माझ्याहून बारीक दिसणारी अनेक मुलं असायची. त्यामुळं माझ्या वाट्याला कुणी फारसं जायचं नाही. रूम-पार्टनरही चांगले होते. नीलेश नगरकर आणि महेश जाधव हे माझे फर्स्ट इयरचे पार्टनर. पैकी नीलेशशी मैत्री कायम टिकली. अगदी आजही!
वर्गातली लेक्चरं मला बोअर व्हायची. म्हणजे काही कळायचंच नाही. आपण इथं काय करतोय असं वाटायचं. त्यातल्या त्यात वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिकल असायची, ती मला आवडायची. लेथ मशिनवर जॉब करणं पहिल्या वर्षी सक्तीचं होतं. मी मन लावून ते करायचो. कारपेंटरी, लोहारकाम हेही केलं. इलेक्ट्रिकलची प्रॅक्टिकल वेगळीकडं असायची. का कोण जाणे, पण इलेक्ट्रिकलला चांगल्या पोरी असायच्या. आमची मेकॅनिकल ब्रँच होती. आमच्या वर्गात केवळ दोन की तीन मुली होत्या. बाकी काही बोलायलाच नको. त्यामुळं आमचं लक्ष कॉमन प्रॅक्टिकलकडं असायचं. आम्ही गावाकडची पोरं नुसतेच त्या गोऱ्यागोमट्या पोरींकडं बघत बसायचो. डे-ड्रीमिंग की काय म्हणतात, ते हेच असावं. त्यात त्या मुली इलेक्ट्रिकलच्या असल्यानं ‘दिवास्वप्न’ हे म्हणणं शब्दश: खरं ठरायचं. तेव्हा मुलग्यांमध्ये होस्टेलची पोरं आणि सिटीतली पोरं अशी एक अघोषित फाळणी ठरलेलीच असायची. या स्मार्ट पोरी सिटीतल्या पोरांना घोळात घेऊन त्यांच्याकडून प्रॅक्टिकलमधले स्वत:चे जॉब करवून घ्यायच्या. ती पोरंही वर्कशॉपमध्ये शब्दश: रंधा मारत बसलेली असायची. आमच्या कँटीनमध्ये एक मुलगा व एक मुलगी सोबत चहा घेत बसले असले, तरी आम्ही त्यांच्याकडे टक लावून बघत बसायचो. तेव्हा एक रुपयाला चहा आणि एक रुपयाला वडापाव मिळायचा. आमच्या कँटीनमधला वडापाव बरा असायचा. आम्ही अनेकदा तो खायचो. पण एकदाही एकाही मुलीला चहासाठी विचारण्याची हिंमत झाली नाही. माझीच नव्हे, तर माझ्यासारख्या गावावरून आलेल्या कोणत्याच मुलाची... बहुदा आम्ही त्या वातावरणानंच निम्मेअर्धे दडपून गेलो होतो.
आम्हाला शिकवायला जे सर होते किंवा ज्या मॅडम होत्या ते मात्र सगळेच्या सगळे भारी होते. त्यातल्या एक मॅडम तर अत्यंत देखण्या होत्या. बॉबकटवाल्या, गोऱ्या अशा! त्यात ‘स्लिव्हलेस’ घालून शिकवायला यायच्या. त्यामुळं ‘स्लीपलेस इन जीपीपी’ अशी माझी (आणि बऱ्याच पोरांची) अवस्था व्हायची, यात शंका नाही. खरं तर आम्ही सेकंड इयरला गेल्यावर या मॅडमची मुलगी आमच्याच कॉलेजात फर्स्ट इयरला आली. पण त्या दोघींत मॅडमच उजव्या होत्या, याबाबत पोरांचं एकमत होतं.
असलं सगळं असल्यावर पहिल्या वर्षी जे व्हायचं तेच झालं. दांडी उडाली. फेल! सपशेल फेल... पुन्हा घरी नगरला जायची लाज वाटायला लागली. पुण्यातच राहिलो. ‘उद्यान प्रासाद’जवळ तेव्हा भिडे क्लासेस फेमस होते. डिप्लोमाची सगळी पोरं तिकडंच जायची. मग मीही तो क्लास लावला. होस्टेल मिळायचा प्रश्नच नव्हता. मग आळंदी रोडवर आत्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो. सदाशिव पेठ ते आळंदी रोड सायकलवर जायचो. एकटाच त्या फ्लॅटमध्ये भुतासारखा राहायचो. आता कल्पना करूनही अंगावर काटा येतो. पण तेव्हा नापास झाल्याचा गिल्ट फार होता. पहिल्या वर्षीचे पेपर सुटले आणि दुसरं वर्ष सुरू झालं. तोवर बाबरी मशीद पडली होती आणि मुंबईतल्या दंगली आणि १२ मार्चचे बॉम्बस्फोट घडून गेले होते. आमचं दुसरं वर्ष सुरू झालं आणि त्या गणपतीत लातूरचा महाभयंकर भूकंप झाला. तेव्हा ‘संध्यानंद’ पेपर नवीन सुरू झाला होता. दुपारी तो पेपर आला आणि ‘लातूर भूकंपात पाच हजार ठार’ वगैरे हेडलाइन वाचून आम्ही नेहमीप्रमाणे ‘संध्यानंद’ला हसलो. मात्र, संध्याकाळी रेडिओच्या बातम्या ऐकल्या आणि मृतांची संख्या याहूनही किती तरी जास्त असल्याचं कळल्यावर ‘संध्यानंद’च्या बातमीचं महत्त्व कळलं.
पहिल्या वर्षी फिजिक्सला उमराणी सर होते. सर्व शिक्षकांत हे माझे सर्वांत आवडते होते. ते केवळ पुस्तकी शिकवायचे नाहीत. आजूबाजूचं काय काय सांगायचे. मुलांनी चांगलं वाचावं, चांगलं पाहावं, चांगलं ऐकावं याकडं त्यांचा कटाक्ष असे. चांगले इंग्लिश सिनेमे पाहा, असं आवर्जून सांगणारे मला भेटलेले हे पहिलेच सर! अगदी ‘फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट’चं उदाहरण देताना ‘पीसीएच’मध्ये (डेक्कनवरचं तेव्हाचं प्रसिद्ध पूना कॉफी हाउस) असे नळाखाली हात धरल्यावर सुरू होणारे नळ आहेत, ते जाऊन पाहा, असं आवर्जून सांगत. मला ते ऐकून फार उत्सुकता वाटलेली; पण एकदाही तिथं जाण्याची हिंमत झाली नाही.
मॉडेल कॉलनीत तेव्हा शारंगपाणी सरांचा गणिताचा क्लास होता. मी संध्याकाळी तिथं जाऊन बसायचो. क्लास लावूनही इंजिनीअरिंगचं इंग्लिशमधलं गणित काही केल्या सुटलं नाहीच. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशननं फार डोकं खाल्लं. काहीच जमायचं नाही. पण हे सर गप्पीष्ट होते. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचे. निवृत्त झालेले, आजोबा टाइप असे ते होते. म्हणून आवडायचे. मी त्यांच्या गप्पा ऐकायलाच जायचो तिथं.

तेव्हा ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स नव्हतं. आम्हाला सर्वांत जवळ होतं ते राहुल ७० एमएम. (हे नाव असं एकत्रच उच्चारायचं!) ‘राहुल’ची फार शान होती तेव्हा. आम्ही सायकलवरून तिथं जायचो. गणेशखिंड रोडवर सगळा उतारच असायचा. चार पायडल मारले, की सायकल ‘राहुल’च्या दारात! तेव्हा अनेक लोक सायकली वापरायचे. त्यामुळे बहुतेक थिएटरमध्ये आत रीतसर सायकल स्टँड असत. तिथं सायकल लावायची. तेव्हा पार्किंगला एक रुपया घ्यायचे. आम्ही १६-१७ वर्षांची मुलं... कधी आत सोडायचे, कधी नाही! पण चुकून आत सोडलंच तर मज्जाच असे आमची... ‘प्रौढ शिक्षणा’चे खरे धडे गिरवले ते तिथं! अर्थात नेहमी तिथंच सिनेमा पाहायचो असं नाही. कधी ‘अलका’ला, तर कधी ‘प्रभात’ला ‘माहेरची साडी’ही बघायचो. ‘डेक्कन’वर आता आर डेक्कन मॉल उभा आहे तिथं पूर्वी डेक्कन टॉकीज होती. अगदीच साधी. वर बहुतेक सिमेंटचे पत्रे असावेत. छोटीशी बाल्कनी होती. तिथं मॅटिनीला कायम ‘घायल’ लागलेला असायचा. आम्हा पोरांना ती पर्वणीच. आम्ही कित्येकदा सायकली काढून तिथं ‘घायल’ला जाऊन बसायचो. सात किंवा दहा रुपये तिकीट असायचं. बाल्कनीत झुरळं फिरायची. पण चिडलेल्या सनीसमोर आम्हाला त्याची फिकीर नसायची. अनेक प्रेमीयुगुलांचंही हे हक्काचं ठिकाण होतं.
पहिल्या वर्षाची अजून एक आठवण आहे. तेव्हा म्हणजे १९९२ च्या सुरुवातीला पुणे महापालिकेच्या निवडणुका होत्या. निवडणुकीसाठी मतदानाचं वय नुकतंच १८ करण्यात आलं होतं. आमच्या मॉडेल कॉलनीचा तेव्हा ११० नंबरचा प्रभाग होता. महापौरपद भूषविलेले काँग्रेसचे एक माननीय त्यांचा नेहमीचा वॉर्ड महिला राखीव झाल्यानं या वॉर्डातून उभे होते. ते एकदा होस्टेलवर आले आणि त्यांनी सर्व मुलांना मतदान करण्यासाठी येण्याचं आवाहन केलं म्हणे. (कारण ते आले तेव्हा मी होस्टेलला नव्हतो.) आमच्यातली फर्स्ट व सेकंड इयरची बरीचशी म्हणजे ९० टक्के मुलं दहावीनंतर आली होती आणि त्या सर्वांचं वय १८ पेक्षा कमीच होतं. मात्र, गंमत म्हणजे या माननीयांनी सर्व पोरांची नावं मतदारयादीत घातली आणि बऱ्याच मुलांनीही अल्पवयातच मतदान केलंही! मी मात्र नावही नोंदवलं नाही आणि अर्थात मतदानालाही गेलो नाही.
आमचं जीपीपीचं ग्राउंड चांगलं मोठं होतं. आमच्या ए आणि बी या होस्टेलच्या समोरच हे मैदान होतं. आमच्या कॉलेजची बरीचशी मुलं या मैदानावर क्रिकेट खेळत. आमच्या वर्गात बोडस नावाचा मुलगा होता. त्याचं पहिलं नाव विसरलो. तो अप्रतिम ऑफ स्पिन टाकायचा. तो माझा मित्र होता. त्याच्यामुळंच एकदा मलाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली. तोवर मी गावाकडं भरपूर क्रिकेट खेळलो असलो, तरी प्रॉपर पॅड बांधून, इनर गार्ड लावून बॅटिंगला उतरण्याची ही पहिलीच वेळ होती. मी फार भाव मारून घेतला. बॅटिंगला उभा राहिलो आणि पहिलाच चेंडू सूं सूं... करीत कानाजवळून गेला तेव्हा खरं क्रिकेट कळलं. मी कशाबशा तीन-चार धावा केल्या आणि आउट झालो एवढंच आठवतंय. त्यानंतर पुन्हा मला टाइमपास म्हणूनदेखील संघात घेण्याचं धाडस बोडसला झालं नसावं.
खेळाचं मैदान गाजवू शकलो नसलो, तरी गॅदरिंगच्या वेळी झालेली क्विझ कॉम्पिटिशन मी गाजवली. माझं ‘जीके’ उत्तम होतं आणि त्या जोरावर मी पहिल्यांदाच मेकॅनिकलला विजेतेपद मिळवून दिलं. या प्रसंगानंतर वर्गात माझा भाव वधारला. पहिल्या वर्षाला आमच्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून द. मा. मिरासदार आले होते. त्यांच्या हस्ते मला आणि फाटकला क्विझचं पहिलं बक्षीस मिळालं. जीपीपीमधल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या सुखद आठवणींमधला हा एक प्रमुख क्षण होता. त्याच गॅदरिंगला थर्ड इयर इलेक्ट्रिकलच्या संदीप खरे नावाच्या मुलानं स्वत: पेटी वाजवत, स्वत:च लिहिलेली आणि संगीत दिलेली ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यांत’ ही भन्नाट कविता ऐकवली होती, तेव्हा आम्ही पोरं वेडेच व्हायचे बाकी राहिलो होतो. नंतरच्या वर्षी राजा गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. (किंवा उलटही असेल. आता आठवत नाही.) असो.
दुसऱ्या वर्षीही नापास झालो आणि घरी आलो. त्या काळात नगरला ‘लोकसत्ता’त प्रूफरीडर म्हणून काम मिळालं आणि आयुष्याला कलाटणी मिळाल्यासारखं झालं. त्या एका वर्षात आपल्याला काय येतंय आणि आपण काय केलं पाहिजे, याचं नेमकं आकलन झालं. तरीही थर्ड इयर सुरू झाल्यावर पुन्हा कॉलेजला आलो आणि शिकायला लागलो. आता पुन्हा नवी बॅच सोबत होती. माझ्याबरोबरची सगळी मुलं पास होऊन पुढं निघून गेली होती. पहिल्या दोन महिन्यांतच जबरदस्त फ्रस्टेशन आलं. त्यात पाऊस सुरू झाला. त्या ओल्याचिंब वातावरणात दगडी इमारती पुन्हा अक्राळविक्राळ हसत, खदाखदा फेर धरून नाचू लागल्या. दुसऱ्या दिवशी मशिन डिझाइनची टेस्ट होती. त्या मॅडम भलत्याच कडक होत्या. त्यांच्या धाकाने तर आणखीन गळून गेल्यासारखं झालं. बाहेर वेड्यासारखा पाऊस कोसळत होता. एका क्षणी मनानं ठरवलं, की बास्स! आता नाही हे शिकायचं... हे आपल्याला येणार नाही, जमणार नाही. त्यापेक्षा पेपरमध्ये काम करायचं. जिथं काम करण्यात आनंद मिळतो तेच काम करायचं. कुठून बळ आलं, कुणास ठाऊक! सरळ गादी गुंडाळली, सामान बांधलं, बादली घेतली, सायकल घेतली आणि रिक्षा करून शिवाजीनगरला आलो. तिथून एसटीनं थेट घरी! घरच्यांना धक्काच बसला. मी किमान थर्ड इयर पूर्ण करून पदविका पदरात पाडून घ्यावी, असं त्यांचं रास्त म्हणणं होतं. मात्र, मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. दुसऱ्या दिवशी जाऊन ‘लोकसत्ता’च्या ऑफिसमध्ये हजर झालो आणि सांगितलं, मला काम द्या... सगळं सोडून आलोय.
त्या दिवसापासून मी आजतागायत ‘जीपीपी’च्या आवारात पाऊलही ठेवलेलं नाही. माझं टीसी अजूनही तिथंच आहे. त्या कॉलेजपाशी काही तरी सोडून यायला हवं ना, म्हणून ते ट्रान्स्फर सर्टिफिकेट तिथंच ठेवलंय. आज २५हून जास्त वर्षं होऊन गेली. त्या कॉलेजच्या आवारात पाऊल ठेवलं नसलं तरी काय झालं! तिथं मी आयुष्यातली महत्त्वाची अशी चार वर्षं काढली आहेत. वय वर्षं १६ ते २०! ती कशी विसरणार? आणि त्या दिवसांनी मला काहीच दिलं नाही, असं म्हणणं तर फार मोठा अपराधच ठरेल. पुढच्या सगळ्या दिशा आणि मार्ग अचूक आले, याचं श्रेय या पहिल्याच चुकलेल्या वळणाला नको का द्यायला?-----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य चपराक दिवाळी अंक २०२१)

---

30 Jan 2022

दृष्टी-श्रुती दिवाळी अंक २०२१ - लेख

माझ्या तीन हिरोंची गोष्ट...
------------------------------

मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतल्यानं लहानपणापासूनच सतत मान वर करून कुठल्या ना कुठल्या आदर्शांकडं बघायची सवयच लागली. आयुष्यात त्याच्यासारखं झालं पाहिजे, याच्यासारखं दिसलं पाहिजे, अमक्यासारखं मोठं झालं पाहिजे, तमक्यासारखं कमावलं पाहिजे, ढमक्यासारखं जगता आलं पाहिजे, या आणि अशाच 'अटी व शर्ती लागू'चा स्टार जन्मापासूनच आपल्या नावापुढं गोंदला जातो. संस्कार नावाची आणखी एक फार महत्त्वाची भानगड लहान वयातच आयुष्यात उपस्थित झाली होती. 'आपल्याकडं असं करत नाहीत,' हे तर आपल्या जीवनगाण्याचं ध्रुवपदच! तेव्हा त्या काळात जे हिरो वाटले, ते नक्की आपल्याला मनापासून वाटले, की या संस्कारांमुळं हेच आपले हिरो असं वाटलं, हे आता सांगता येणं कठीण आहे.
पं. जवाहरलाल नेहरू हे अगदी लहान वयातले माझे पहिले हिरो. याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याप्रमाणेच माझा जन्मही १४ नोव्हेंबरचा. त्यामुळं अगदी लहान वयापासून वाढदिवसाच्या वेळी नेहरूंची आठवण कुणी ना कुणी काढायचंच. माझा जन्म झाला तेव्हा नेहरूंना जाऊन अवघी ११ वर्षं झाली होती. माझ्या आईचे नेहरू हे फार लाडके होते. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या व वाढलेल्या पहिल्या पिढीची ती प्रतिनिधी असल्यानं त्या पिढीबाबत हे अगदी स्वाभाविक होतं. नेहरू गेले तेव्हा आपण ती बातमी रेडिओवर कशी ऐकली आणि नंतर दिवसभर कशा रडत होतो याची हकीकत आईकडून अनेकदा ऐकली होती. नेहरूंच्या मुलीची देशात सत्ता असताना मी शाळा शिकायला सुरुवात केल्यानं इतिहासात नेहरूंबाबतचे धडे आणि एकूणच त्यांची थोरवी मी सतत वाचत आणि ऐकत होतो. नंतरही शाळेमध्ये बालदिन साजरा करताना, त्यांच्याविषयीची भाषणं करताना आणि ऐकताना 'चाचा नेहरूं'विषयीचं माझं प्रेम ओसंडून वाहत असे. मी पुढं नगरला शिकायला आलो तेव्हा १९८९ मध्ये नेहरूंची जन्मशताब्दी आली. नेहरूंचा नातू तेव्हा देश चालवीत असल्यानं देशभर अगदी जोरदारपणे ही जन्मशताब्दी साजरी झाली. शाळाशाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. 'अपना उत्सव' नावाचा एक मोठा उत्सव साजरा होत होता. लालटाकी इथं नेहरूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथं सुंदर कारंजंही होतं त्या काळी. समोरच अप्पू हत्तीचा एक पुतळा होता. तिथं झालेल्या कार्यक्रमात आम्ही नववीची मुलं सहभागी झाल्याचं आठवतंय. त्यात नगरच्या किल्ल्यात नेहरूंना ठेवलं होतं, तिथं आम्ही अनेकदा जायचो. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ नेहरूंनी तिथंच लिहिला होता. त्यांची खोली, त्यांच्या वापरातल्या वस्तू बघून भारावून जायचो. अनेकदा रडू यायचं. एकूणच शालेय वयापर्यंत नेहरूंची मोहिनी मनावर कायम होती.पुढं मी पुण्यात शिकायला आल्यानंतर इथं आयुष्यभर काँग्रेसला व त्यांच्या नेत्यांना शिव्याशाप देणारी अनेक माणसं भेटली. त्यातली तर काही माझी जवळची आप्तमंडळी होती. तोवर माझी स्वतःची अशी कुठलीही राजकीय विचारसरणी तयारही झाली नव्हती. गांधी-नेहरू, पटेल, आंबेडकर आणि सावरकर हे सर्वच मला सारखे होते. माझ्या लेखी हे भारताचे थोर सुपुत्र होते. मात्र, नेहरूंना प्रचंड शिव्याशाप देणारी माणसं भेटली आणि मी थक्क झालो. आपल्या हिरोला नावं ठेवणारे लोक आपल्याच आजूबाजूला विपुल संख्येनं आहेत, याचा धक्कादायक साक्षात्कार मला तेव्हा झाला. हळूहळू इतिहासाची वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं वाचली. आपल्या हिरोच्या कार्यकर्तृत्वाला दुसरीही बाजू असू शकते, हे लक्षात यायला लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची नेहरूंची मतं समजल्यावर स्वाभाविकच वाईट वाटलं. महाराजांबद्दलचं त्यांचं आकलन एवढं कसं चुकीचं असू शकतं, याचं आश्चर्यही वाटायचं. स्वातंत्र्यलढा, काँग्रेस, फाळणी, तेव्हाच्या नेत्यांची व नेहरूंची जीवनशैली, एडविना प्रकरण या सर्वांबद्दल वाचत गेलो आणि आपल्या हिरोचे पायही मातीचे असू शकतात, हे समजू लागलं. माणूस म्हणून त्यांच्याकडूनही काही चुका, काही चुकीचे निर्णय होऊ शकतात, हे लक्षात यायला लागलं. नेहरू मुलांवर प्रेम करीत असले, तरी त्यांचा स्वभाव शीघ्रकोपी होता आणि ते अनेकदा संतापत असत, हे वाचूनही मग आश्चर्य वाटलं नाही. एखादी व्यक्ती समजून घ्यायला ३६० अंशांतून तिच्याकडे पाहायला पाहिजे, हे शिकलो. एवढं सगळं असलं, तरी त्यांच्या चुकांसकट नेहरू आजही आवडतात. एवढ्या उंचीचा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेटसमन असलेला माणूस पहिला पंतप्रधान म्हणून आपल्या देशाला लाभला याचा अभिमानच वाटतो.

बालपणीचा माझा दुसरा हिरो होता गावसकर. द ग्रेट लिटल मास्टर सुनील गावसकर. मीच काय, माझी आख्खी पिढीच गावसकरच्या प्रेमात होती. आमच्या घरी तसा उशिरा टीव्ही आला. जानेवारी १९८६ मध्ये ब्लॅक अँड व्हाइट, शटरवाला क्राउन कॅसल टीव्ही घरात आल्यावर, तो सुरू केल्यावर टीव्हीवर सर्वांत पहिलं दर्शन झालं ते गावसकरचं. तेव्हा कुठल्या तरी कसोटी सामन्याचं दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण सुरू होतं. आमच्या गावी आम्ही क्रिकेट सोडून अन्य कुठलाही खेळ खेळलो नाही. शाळेच्या मैदानात आणि आमच्या वाड्यात अशा दोन्ही ठिकाणी आम्ही मित्र सतत फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच खेळत असायचो. तेव्हा वृत्तपत्रांमध्ये आलेले क्रिकेटपटूंचे फोटो कापून ठेवायचे हा छंद मला होता. त्यात सर्वाधिक फोटो गावसकर, कपिल देव आणि वेंगसरकर यांचे होते. गावसकरच्या दहा हजार धावा पूर्ण झाल्या, तेव्हा पेपरमध्ये आलेला फोटो मी कापून ठेवला होता. त्याची ती स्कल कॅप घातलेले तर अनेक फोटो माझ्याकडे होते. भारतीय संघ कितीही अडचणीत आला, तरी गावसकर मैदानात आहे तोवर काही भीती नाही, असं वाटायचं. मी १९८७ च्या पाकिस्तान दौऱ्यातील बंगळूर कसोटी तर आयुष्यात कधीही विसरणार नाही. पाच कसोटींची ती मालिका होती व पहिल्या चारही कसोटी अनिर्णित राहिल्या होत्या. पाचवी व निर्णायक कसोटी बंगळूरमध्ये सुरू होती. गावसकर भारताचा, तर इम्रान खान पाकिस्तानचा कर्णधार होता. बंगळूरच्या त्या आखाडा खेळपट्टीवर आपली चौथ्या डावात बॅटिंग होती. तौसिफ अहमद आणि इक्बाल कासिम यांचा फिरकी मारा दोन्ही बाजूंनी सुरू होता. एका बाजूने आपले एकेक खंदे फलंदाज बाद होऊन परतत होते आणि एका बाजूला गावसकरनं नांगर टाकला होता. पाचवा दिवस आणि सामन्याची वेळही संपत आली होती. शेवटचा फलंदाज मणिंदरसिंगला जोडीला घेऊन गावसकर खिंड लढवीत होता. त्याचं शतकही जवळ आलं होतं. मणिंदर पहिल्याच चेंडूवर बाद होण्यासाठी कुख्यात होता. इम्रान शेवटच्या चेंडूवर गावसकरला सिंगल धाव घेऊ देत नव्हता. अत्यंत टेन्स अशी ती कसोटी मी टीव्हीवर पाहत होतो. अखेर दुर्दैवानं गावसकर ९६ धावांवर स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला आणि आपण ती कसोटी हरलो. मात्र, माझ्या मते गावसकरची ती सर्वोत्कृष्ट कसोटी खेळी होती. आमच्या गावात उत्कृष्ट दर्जाचं वाचनालय असल्यानं खूप वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळायची. त्या काळात मी गावसकरची (बाळ ज. पंडित यांनी मराठीत अनुवाद केलेली) सनी डेज, रन्स अँड रुइन्स, वन डे वंडर्स, आयडॉल्स ही पुस्तकं अधाशासारखी वाचून काढली होती. 'एकच षटकार', 'चौकार' ही क्रीडाविषयक नियतकालिकं तेव्हा प्रसिद्ध होती. वाचनालयात मी ती कायम वाचायचो. त्यात गावसकरचे अनेक किस्से ऐकायला मिळाले. शाळेत गावसकरचा एक धडाही होता. त्यात वेस्ट इंडिजच्या पहिल्याच दौऱ्यात प्रचंड दाढदुखी सुरू असतानाही गावसकरनं कसं शतक ठोकलं, हा भाग होता. पुढं त्याची ओव्हलवरच्या ऐतिहासिक २२१ धावांच्या खेळीबद्दलही वाचायला मिळालं. मी प्रत्यक्ष क्रिकेट पाहायला लागल्यानंतर अगदी लवकरच गावसकर निवृत्त झाला. मात्र, १९८७ च्या भारतात झालेल्या रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये नागपूरला त्यानं न्यूझीलंडविरुद्ध ठोकलेलं शतक मी विसरू शकत नाही. त्यात त्यानं त्या काळाच्या मानानं वेगवान शतक (९४ चेंडूंत) झळकावलं होतं. ते त्याचं वन-डेमधलं एकमेव शतक. इंग्लंडमध्ये १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद ३६ धावांची कुप्रसिद्ध खेळी करणाऱ्या गावसकरचं हे ट्रान्स्फॉर्मेशन थक्क करणारं होतं. झेवियर्समध्ये शिकलेला, उत्तम इंग्लिश जाणणारा, विचक्षण बुद्धिमत्ता आणि अजोड विनोदबुद्धी असलेला गावसकर नंतर कॉमेंटरीमध्ये शिरला तो आजतागायत कॉमेंटरी करतोच आहे. पुढे १९९९ मध्ये राज ठाकरे यांनी पुण्यात शिवउद्योग सेनेतर्फे गणेश कला-क्रीडा मंच येथे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत गावसकरला प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली. ते गणेश कला-क्रीडा मंच खचाखच भरलं होतं आणि मधल्या रांगेतही लोक बसले होते. गावसकरनं तिथंही तुफान टोलेबाजी केली. नूरजहाँचा तो प्रसिद्ध किस्सा त्यानं याच व्याख्यानात सांगितला होता. आपला संघ पाकिस्तानात गेल्यावर लाहोरमध्ये आपल्या आणि पाकिस्तानच्या टीमला भेटायला नूरजहाँ आल्या होत्या. गावसकरची ओळख करून देताना, ओळख करून देणाऱ्यानं 'हे सुनील गावसकर, यांनी बरेच विक्रम केले आहेत,' वगैरे स्तुतिपर ओळख करून दिली. त्यावर नूरजहाँ यांनी जराशा आढ्यतेनं, 'हम तो सिर्फ इम्रान खान को जानते है' असं उत्तर दिलं होतं म्हणे. मग त्यांची ओळख करून दिल्यावर फटकळ गावसकरनंही, 'हम तो सिर्फ लता मंगेशकर को जानते है' असं उत्तर देऊन बाईंचा तिथल्या तिथं तुकडा पाडला होता. उत्तम नकलाकार असलेल्या गावसकरची कॉमेंटरी ऐकणं हा बौद्धिक आनंद असतो.
असं असलं, तरी या हिरोबाबत काही गोष्टी खटकतातच. एक तर मेलबर्नच्या त्या कसोटीत चुकीचं बाद दिल्यानंतर गावसकरनं चेतन चौहानला घेऊन मैदान सोडणं चुकीचंच होतं. तो गावसकरच्या कारकिर्दीवर बसलेला काळा डाग आहेच. दुसरं म्हणजे मुंबईत सरकारी भूखंड घेऊनही गावसकरनं तिथं क्रिकेट अकादमी सुरू केली नाही. याशिवाय मुंबईच्या खेळाडूंना झुकतं माप देण्याचा आरोप तर बहुतेक मुंबईच्या खेळाडूंवर होतोच. गावसकरही त्याला अपवाद नसावा. कपिल आणि त्याच्यामधलं शीतयुद्ध प्रसिद्ध आहेच. अर्थात हे सगळं जाणल्यावरही आपला हिरोही चुकू शकतो, याचाच पुन्हा प्रत्यय आला आणि त्याच्याविषयीचं प्रेम जराही कमी झालं नाही. जन्मल्याबरोबर एका कोळिणीच्या मुलाबरोबर एक्स्चेंज झालेला हा मुलगा मामाच्या तीक्ष्ण नजरेमुळं पुन्हा आईकडं येतो काय आणि जगाला अचंबित करून सोडणारा पराक्रम गाजवतो काय! गावसकरचं आयुष्य असं भन्नाट आहे. उतारवयातही तो आपल्या आवडीची गोष्ट ज्या उत्साहानं करतोय ती फार हेवा वाटावा अशी गोष्ट आहे.

माझे तिसरे आणि महत्त्वाचे हिरो आहेत अर्थातच पु. ल. देशपांडे. पुलंचा आयुष्यावर एवढा प्रभाव आहे, की ते नसते तर आपण कुणी निराळेच झालो असतो, याची खात्री आहे. पुलंनी आपल्या सगळ्यांनाच काय दिलं आणि त्यांच्यात काय काय गुण होते याची उजळणी मी करणार नाही. ते सर्वविदित आहे. फक्त या हिरोविषयी कधी भ्रमनिरास झाला का, असा प्रश्न आल्यास त्याचं उत्तर 'अजून तरी नाही आणि कदाचित कधीच नाही,' असंच असेल. एखादी व्यक्ती लेखनातून केवळ तुमच्या वागण्या-बोलण्यावर किंवा लिहिण्यावरच परिणाम करते असं नाही, तर तुमच्या एकूण जगण्यावर, जीवनविषयक दृष्टीवरही खूप सखोल परिणाम करते. पुलंनी माझ्यावर (आणि माझ्या पिढीतल्या बऱ्याच जणांवर) असा परिणाम केला आहे, असं म्हणायला जागा आहे. खूप लहानपणी पुलंची भरपूर पुस्तकं वाचल्यानंतर इतर काही पुस्तकं वाचायला गेलं तर ती बोअर होत असत. हे दीर्घ काळ टिकलं. याचा दुष्परिणाम नक्कीच झाला. वाचनातलं वैविध्य लहानपणी तितकं राहिलं नाही. पु. ल. टिपिकल मध्यमवर्गीय होते, त्यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली'त त्यांना एकही स्त्री-व्यक्तिरेखा रंगवावीशी का वाटली नाही, वगैरे आक्षेप खूप नंतर वाचण्यात आले. मात्र, मला तेव्हा आणि आत्ताही त्यात काही तथ्य वाटत नाही. पुलंची जीवनविषयक दृष्टी अतिशय विशाल आणि उदार होती. एका जागी रमणारा हा माणूस नव्हता. वयाच्या पन्नाशीत बंगाली शिकणारा आणि त्यासाठी शांतिनिकेतनला जाऊन राहणारा, वेळप्रसंगी ठोस राजकीय भूमिका घेणारा आणि वेळीच त्यातून बाजूला होणारा... या त्यांच्या गोष्टी व्यक्ती म्हणूनही खूप अनुकरणीय आहेत. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे पुलंनी आम्हाला विनोदाचं शस्त्र दिलं. आपल्या जगण्यातल्या विसंगतीवर हसत हसत बोट ठेवता आलं पाहिजे आणि तितक्याच खेळकरपणे त्या विसंगती दूर करता आल्या पाहिजेत हे त्यांनीच शिकवलं. पु. लं.चं जगणं मध्यमवर्गीय असलं, तरी विचार तसे कधीच नव्हते. त्यांच्या गंभीर लिखाणातून हे जाणवतं. डाव्या, समाजवादी विचारसरणीचे 'भाई' सर्वच विचारसरणीच्या लोकांना आपलेसे वाटत. याचं कारण, त्यांचे विचार एकांगी नव्हते. माणसाच्या विचारापेक्षा तो माणूस महत्त्वाचा, हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून ते गांधीजींवरही उत्कट लिहू शकत असत आणि सावरकरांवरही त्याच तोलामोलानं बोलू शकत असत.
वैयक्तिक माझ्या आयुष्यात त्यांचा प्रभाव केवळ लिखाणावर पडला नाही. लिखाणावर तर पडलाच. आज अनेक जण माझं एखादं लेखन वाचलं, की पुलंची आठवण येते असं म्हणतात. हा त्या प्रभावाचाच परिणाम आहे. मी त्या प्रभावातून कधी तरी बाहेर येईनही. मात्र, जगण्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो पगडा आहे तो दूर होईल, असं वाटत नाही. उत्तमोत्तम गोष्टींचा आस्वाद कसा घ्यावा, गुणग्राहकता कशी असावी, जग कसं बघावं हे पुलंनी मला शिकवलं. त्यांची दानशूरता आणि उतारवयातील ऐहिकातील विरक्ती या गोष्टी तर केवळ स्तंभित करतात. या गोष्टी अशा आहेत, की त्या आयुष्यभर जोपाव्यात. जमेल तितकं करावं. त्यांची उंची गाठणं तर केवळ अशक्यच आहे. मात्र, त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चार पावलं तर नक्कीच टाकू शकतो.
माझ्या जगण्यातल्या तीन हिरोंची ही गोष्ट. या तिघांचीही मी अगदी व्यक्तिपूजा म्हणावी, अशी केली आणि त्यातून जमेस आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांतूनच मी जो काही आहे तो आहे.

-----

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२१)

 

---