19 Aug 2018

मटा संवाद लेख


नवीस्लँग्वेज’...
----------------

अरे, लवकर सेंडव ना मला ती फाइल...’

अगं ऐक ना, तुझी ती पोस्ट परत पोस्टवतेस का इथं? माझ्याकडून चुकून डिलिटली...’

काय लोक्स आहेत... एकदम तुचिया पीपल...’

काय राव, हल्ली ती एमसी, बीसीशिवाय बोलतच नाही... शिट!’

, J1 झालं का?’

‘मी तुला लौ यू आहे हं...’

....

हल्ली आपल्याला अनेकांच्या तोंडी, विशेषत: तरुणाईच्या, अशी भाषा ऐकायला मिळते. (खरं तर वाचायला मिळते!) ही अशी भाषा आजच्या सोशल मीडियानं आपल्याला भेट दिली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळं संवादाचे नवे मार्ग खुले झाले. वैयक्तिक संवादाच्या नव्या पद्धती समजल्या. त्यातून आपल्या सगळ्यांच्याच प्रतिभेला धुमारे फुटले आणि त्यातून ही अशी वेगळीच भाषा जन्माला आली. अशा अत्यंत अनौपचारिक, विशिष्ट समूहापुरत्या मर्यादित असलेल्या आणि केवळ बोलताना वापरल्या जाणाऱ्या भाषेला इंग्रजीतस्लँगम्हणतात. पण हल्ली सोशल मीडियावर लिहितानाही ही भाषा सर्रास वापरली जाते. त्यामुळं ही एक नवीस्लँग्वेजजन्माला आली आहे, असं म्हणायला हरकत नाही
अशी खास कोडवर्डसारखी वापरली जाणारी भाषा ही काही आत्ताच्याच पिढीची मक्तेदारी नाही. फार पूर्वीपासून कॉलेजांत अशी भाषा वापरली जाते, हे अगदी आपले आजोबा आणि त्यांच्या पिढीतीललोक्सपण सांगतील. विशेषत: मुलींना चिडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा तर एक वेगळा शब्दकोश तयार होईल. मुलींच्या गटातही मुलांसाठी खास शब्द वापरले जात असतीलच; पण तुलनेनं त्याचं प्रमाण मर्यादित आहे. शिवाय त्या पिढीचे असे शब्द आणि आत्ताची पिढी वापरत असलेल्या या नव्या शब्दांमधला महत्त्वाचा फरक आहे तो प्रमाणाचा. तेव्हाच्या काळात या विशिष्ट शब्दांचा वापर आणि प्रसार त्या त्या वर्तुळापुरताच मर्यादित असायचा. फार तर एखाद्या लोकप्रिय लेखकाने, कादंबरीकाराने त्यातला एखादा शब्द वापरला, तरच तो आम जनतेपर्यंत पोचायचा. हल्ली सोशल मीडियाचा वापर बहुसंख्य जनता करीत असल्यामुळं हीस्लँग्वेजएखाद्या विषाणुजन्य आजाराचा संसर्ग व्हावा, तद्वत पसरते - म्हणजेचव्हायरलहोते! त्यामुळंच सध्या आपल्याला अनेकांच्या तोंडी ही नवी भाषा ऐकायला मिळते आणि ती वाचताना एक वेगळीच गंमत जाणवते.
कुठल्याही पिढीतील तरुणाईची मानसिकता पाहिली, तर अशा स्लँग्वेजचा जन्म का कसा होतो, हे सहज कळेल. तरुणांना सहसा मळलेल्या वाटेवरून चालायला आवडत नाही, हे एक कारण. त्यामुळं आपल्या आधीची पिढी वापरत असलेली भाषाच ते वापरतील, ही शक्यता कमी होते. दुसरं म्हणजे तरुणाईला सदैव एखाद्याथ्रिलचं किंवाएक्साइटमेंटचं आकर्षण असतं. त्यांचं हेथ्रिलम्हणजे ज्येष्ठांच्या मते बहुतांश वेळाथिल्लरपणाअसला, तरी तरुणांना ती गोष्ट करण्याबद्दल वाटणारं आकर्षण कमी होत नाही. शिव्या देण्याचं आकर्षण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये असतं. आता शिव्या देणं ही गोष्ट वाईट आहे, हे सरळच आहे. पण सरळ गोष्ट खाली मान खालून करतील, तर ते तरुण कसले! मग ते मित्रांबरोबर असताना एकदा या शिव्या देऊन बघतातच. त्यातलंथ्रिलअनुभवतात. बऱ्याच जणांच्या बाबतीत हेथ्रिलएकदा ती गोष्ट करून झाली, की संपून जातं. मग ती गोष्ट रुटीन होते. आता रुटीनमध्ये सोशल मीडिया वापरताना त्यावर तर शिव्याशाप देता येत नाहीत. मग या शिव्यांचे शॉर्टफॉर्म तयार होतात, नाही तर अक्षरांची उलटापालट करून नवीनच शब्द तयार केला जातो. आता हा शब्द वापरला, की वाचणाऱ्याला कुठला शब्द आहे हेही कळतं आणि मूळचा असंसदीय शब्द वापरल्याचंपापही माथी येत नाही. शिवाय नवा शब्द तयार केल्याची गंमतही अनुभवता येते, ते वेगळंच!
शाळेत किंवा वर्गात मागच्या बेंचवर बसूनऑफ पीरियडला वहीच्या मागच्या पानांवरसाहित्यप्रसवणारी मंडळीच या नव्यास्लँग्वेजला जन्म देण्यात आघाडीवर असतात. त्यातही माझं निरीक्षण असं, की मुलांपेक्षा मुलीच अशी वेगळी भाषा तयार करण्यात जरा पुढं असतात. मुळात गॉसिपची आवड मुलींना अधिक असते. त्यातही आपापसांत कोडवर्ड तयार करून बोलण्याची हौसही मुलांपेक्षा मुलीनाच जास्त असते. त्यामुळं त्यांच्याकडून यास्लँग्वेजचा सर्रास वापर होताना दिसतो. अर्थात एकदा त्यांच्याकडून विशिष्ट पद्धतीचे शब्द किंवा अक्षरं वापरायला सुरुवात झाली, की ते लवकरचव्हायरलहोतात आणि मग मुलं-मुली असे सगळेच ती भाषा वापरायला लागतात. अशी वेगळी भाषा तयार करण्यामागे आणखीही काही कारणं असतात. सध्या चाळिशीत किंवा त्यापेक्षा मोठ्या असलेल्या पिढीने त्यांच्या तरुणपणात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आलेलं संवादाचं हे नवं माध्यम कधी हाताळलं नव्हतं. मात्र, ते त्यांना आता सहजी हाताळायला मिळत आहे. ही पिढी बऱ्याच प्रमाणात त्यांच्या वडिलांच्या पिढीच्या धाकात वाढली. अनेक रुढी-परंपरा पटत नसतानाही त्या पाळतच त्यांना मोठं व्हावं लागलं. त्यामुळं आता या सगळ्यांपासून आभासी मुक्तता देणारं माध्यम हातात आल्यामुळं त्यांच्यातला तेव्हा दबून राहिलेलाबंडखोर तरुणआता उसळी मारून वर आला आहे. आता त्याला तेव्हाच्या सगळ्या राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. त्या आता पूर्ण होणं जवळपास अवघडच. मग बंडखोरीची ही स्लँग्वेज वापरून तो आपला उद्वेग तरी व्यक्त करतो किंवा आपणही आता कसेफ्री बर्डझालो आहोत, याचा एक चोरटा आनंद तरी उपभोगतो.
सध्या सोशल मीडियावर हीच पिढी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांची एक प्रकारच्या न्यूनगंडातून आलेली स्लँग्वेज आणि नव्या पिढीची अगदी सहज-उत्स्फूर्तपणे आलेली स्लँग्वेज अशा दोन भाषांची चलती सध्या बघायला मिळतेय. त्यातही आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे ही चाळिशीतली पिढी मातृभाषेत, म्हणजे मराठीत, जास्त प्रमाणात व्यक्त होताना दिसते, तर नवी पिढी इंग्लिशमध्येच लिहिताना-बोलताना दिसते. सोशल मीडियावर दोघेही स्लँग वापरतात. पण एक मराठी स्लँग असते, तर दुसऱ्या पिढीची इंग्लिश स्लँग... पण मुळात या दोन्ही पिढ्या एकाच घरात लहानाच्या मोठ्या होत असल्यानं त्यांच्यात भाषेची अशी कुठली भिंत रोजच्या व्यवहारात नाही. रोज घरी बोलताना ते मराठीच बोलतात आणि बाहेर ऑफिसमध्ये किंवा शाळा-कॉलेजांत इंग्लिश...! त्यामुळं त्यांच्या स्लँग्वेजमध्येही या दोन्ही भाषांची सरमिसळ सहजतेनं होते. त्यामुळंलोकहा मुळात बहुवचनी शब्द असतानाही इंग्लिशफोक्सच्या धर्तीवर त्याचं सहजलोक्समध्ये रूपांतर होतं. इंग्लिश शब्दाला मराठी प्रत्यय लावणं हे मराठी मातृभाषा असलेल्याला अगदीच आवडणारं आणि सोपं... मगफाइल डिलीट केलीस का?’ असं लांब वाक्य करण्याऐवजी त्याचं सहजफाइल डिलिटलीस का?’ असं होऊन जातं. ‘फाइल पाठवअसं म्हणण्याऐवजी किंवा इंग्लिशमधून थेटप्लीज सेंड फाइलअसं लिहिण्याऐवजीजरा ती फाइल मला सेंडवअसं म्हटलं, की त्या भाषेलास्लँग्वेजचा तडका तर मिळतोच; वर काही तरी नवा शब्द तयार केल्याचं किंचितथ्रिलही अनुभवता येतं
अर्थात ही फक्त काही नमुन्यादाखल उदाहरणं झाली. सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या अनेक हुशार लोकांनी किती तरी आगळे-वेगळे शब्द तयार केले असतील. काही काळानं ते सगळीकडं पसरतात आणि मग बहुसंख्य लोक ते वापरू लागतात. अर्थात लिहिणारा आणि वाचणारा दोन्ही भाषांचा (इथं मराठी इंग्रजी) किमान जाणकार असावा लागतो, ही पूर्वअट आहेच. मराठीत अनेक शाब्दिक विनोद तयार केले जातात, कोट्या तयार केल्या जातात, सिनेमांतील लोकप्रिय पात्रांचेमीम’ (उदा. ‘अशी ही बनवाबनवीमधले धनंजय माने) तयार केले जातात. इंग्रजी चित्रपटांवर विनोदी मराठी संवाद डब करून अत्यंत हास्यस्फोटक अशा व्हिडिओ क्लिप तयार केल्या जातात. या आपण सगळ्यांनी सोशल मीडियाद्वारे अनेकदा पाहिल्या असतील. यातली भाषा म्हणजे दुसरं-तिसरं काही नसूनस्लँग्वेज आहे.
गंमत म्हणून हीस्लँग्वेजठीक असली, तरी आपली भाषा त्या भाषेचं सौंदर्य, व्याकरण आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे. आपली भाषा नीट माहिती असेल, तरच त्या भाषेतल्यास्लँग्वेजची गंमत अनुभवता येते. नुसतीचस्लँग्वेजवापरायची आणि मूळ भाषा येत नाही, हे चित्र काही चांगलं नाही. तेव्हा आधी आपल्या भाषेचा नीट अभ्यास करा, तिच्यातलं सौंदर्य अनुभवा आणि मगच शब्दांची मोडतोड करून नवी भाषा तयार करा. तेव्हा त्यास्लँग्वेजची खुमारी काही औरच भासेल!

---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, पुणे; १९ ऑगस्ट २०१८)

----