29 Aug 2020

रिव्ह्यू - महानटी

‘सावित्री’चं वाण

-------------------


बरेच दिवस पाहायचा राहिलेला ‘महानटी’ हा तेलगू सिनेमा आत्ता ‘अमेझॉन प्राइम’वर बघितला. जिवंतपणीच दंतकथा झालेल्या तेलगू व तमिळ चित्रपटसृष्टीतील महानायिका सावित्री यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटसृष्टीत एखाद्या धूमकेतूप्रमाणे अवचित आलेल्या आणि नंतर आपल्या कर्तृत्वाने ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळविलेल्या सावित्रीची ही कहाणी पडद्यावर बघताना शेवटी डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. दिग्दर्शक नाग चैतन्य यांचं अभिनंदन यासाठी, की ही केवळ एका नटीची गोष्ट राहत नाही. ती त्याहून किती तरी मोठी होत ‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी...’ या दर्जापर्यंत पोचते. कितीही मोठी झाली, तरी प्रत्येक स्त्रीच्या नशिबी स्त्री म्हणून येणारी विटंबना, मानहानी, अवहेलना आणि अन्यायाचं दर्शन घडविते आणि पुढच्या पिढीला सावित्रीपासून मिळणारी अखंड प्रेरणा दाखवत सकारात्मक शेवटही करते. अत्यंत देखणं रूप लाभलेल्या कीर्ती सुरेश या अभिनेत्रीनं सावित्रीचं काम केवळ कमाल केलं आहे. तिच्यासाठी तरी हा सिनेमा एकदा सर्वांनी पाहावाच. 

सावित्रीचं आयुष्य सर्वार्थानं वादळी होतं. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी तिनं चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. वडील लहानपणीच गेलेले. काकानं वाढवलेलं. तत्कालीन मद्रास इलाख्यात येणाऱ्या तेलगू भाषक प्रदेशात (गुंटूर जिल्हा) तिचा जन्म झाला. मद्रासमध्ये तेव्हा तमिळ‌ चित्रपटसृष्टी बहरली होती. सावित्रीला तिचे काका मद्रासला घेऊन आले. तिला धड तमिळही बोलता येत नव्हतं. सुरुवातीला सिनेमा मिळणंही अवघड गेलं. एखादा सिनेमा मिळाला, तर तमिळ संवाद म्हणताना तिची धांदल उडायची. इथपासून ते तमिळ चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी होण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा चित्रपट दोन तास ५० मिनिटांत दाखवतो. या सगळ्यांत जेमिनी गणेशन यांच्यासारख्या बड्या अभिनेत्यासोबत झालेलं सावित्रीचं (दुसरं) लग्न आणि त्या दोघांमधले ‘अत्यंत मधुर ते अत्यंत कडवट’ या रेंजमधले सर्व संबंध हा महत्त्वाचा भाग ठळकपणे येतो. 

कलावंतांचं जगणं सामान्य लोकांपेक्षा वेगळं असतं. म्हणूनच ते कलावंत असतात. त्यांचं मनस्वी जगणं, स्वच्छंद-मुक्त वागणं-बोलणं, त्यांना मिळणारी अफाट लोकप्रियता आणि त्या जोडीला येणारं डोळे विस्फारून टाकणारं ऐश्वर्य या सगळ्यांबाबत आपल्याला अत्यंत कुतूहल असतं. सावित्रीला लाभलेलं अवघं ४५ वर्षांचं आयुष्यही असंच वादळी होतं. तिची ही कथा बघताना अगदी तिच्यासारख्याच समांतर चालणाऱ्या आणखी काही अभिनेत्रींच्या कथा आठवतात. काही काही बाबतींत या सगळ्या जणींचं प्राक्तन एवढं सारखं कसं, असाही प्रश्न विचारी प्रेक्षकाला पडू शकतो. हंसा वाडकरांचं ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मचरित्र आणि त्यावर बेनेगलांनी काढलेला ‘भूमिका’ हा चित्रपट (आणि त्यातली स्मिताची अजरामर भूमिका) सहजच आठवते. मराठीत अगदी अलीकडं निघालेला ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपटही आठवतो. मनस्वी कलाकारांनी दारूच्या नशेपायी करून घेतलेला आत्मनाश हा समान दुवा! शिवाय ‘सावित्री’ची कथनशैली पाहता, ओम राऊत दिग्दर्शित ‘लोकमान्य - एक युगपुरुष’ या चित्रपटाची आठवण येते. ‘लोकमान्य’प्रमाणेच इथेही आजच्या पिढीतलं कुणी तरी इतिहासात जाऊन आपल्या कथानायकाचा / नायिकेचा चरित्रशोध घेते. ‘सावित्री’त हे काम मधुरावाणी या गोड नावाची पत्रकार करते. त्यात ही भूमिका ‘जानू’मुळे अत्यंत आवडती झालेल्या समंथा रुथ-प्रभूनं केलीय. और क्या चाहिए! 

‘सावित्री’मध्ये दिग्दर्शक अत्यंत तपशिलाने नायिकेच्या व्यक्तिरेखेचा प्रवास दाखवतो. पुरेसा वेळ घेतो. तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व ठळक व्यक्तिरेखाही पुरेशा विकसित होऊ देतो. यामुळं आपण चित्रपटात आणि नायिकेच्या भावविश्वात गुंतत जातो. ‘सावित्री’ चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८१ पर्यंतचा काळ येतो. हा सर्व काळ चित्रपटात दाखवायचा म्हणजे उत्कृष्ट कला दिग्दर्शनाची जोड हवी. या चित्रपटात हे कला दिग्दर्शन अत्यंत भव्य पातळीवर आणि सुंदर योजलं आहे. तेव्हाचे स्टुडिओ, गाड्या, इमारती, कपड्यांची स्टाइल हे सगळे बारकावे अत्यंत तपशिलात नोंदविले आहेत. त्यामुळं चित्रपट पाहताना आपणही ‘टाइम ट्रॅव्हल’ करून जणू त्या काळात पोचतो. त्या काळातले राजकीय, सामाजिक तपशील माहिती असतील तर आणखी मजा येते. (उदा. श्रीरामुलू यांचं आंध्र प्रदेश राज्यासाठी झालेलं आमरण उपोषण व त्यांच्या समर्थनार्थ निघालेले मोर्चे यांचं एक दृश्य चित्रपटात येतं. त्यानंतर जेमिनी सावित्रीबरोबर बोलताना तमीळ-तेलगू वादावर काही भाष्य करतो. त्यावर सावित्रीचं उत्तर ऐकण्यासारखं आहे.) एन. टी. रामाराव यांचा तेलगू चित्रपटसृष्टीत, तर शिवाजी गणेशन यांचा तमिळ चित्रपटसृष्टीत झालेला उदय, सावित्रीच्या लहानपणी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून तिचं झालेलं कौतुक, स्वातंत्र्यलढ्यासाठी गावोगावी सुरू असलेली चळवळ असे अनेक तत्कालीन संदर्भ सिनेमात जवळपास प्रत्येक दृश्यात येत राहतात. त्यामुळं हा चित्रपट केवळ सावित्रीचीच नव्हे, तर त्या काळाचीच कहाणी सांगतो आहे, असं वाटायला लागतं. एखाद्या प्रदेशाचा भू-राजकीय इतिहास ज्यांना आवडतो, त्यांच्यासाठी तर ही ट्रीटच आहे. 

सावित्रीची व्यक्तिरेखा हा अर्थातच या चित्रपटाचा प्राण आहे. या भूमिकेसाठी कीर्ती सुरेश या अभिनेत्रीची झालेली निवड किती सार्थ आहे, हे एंड स्क्रोलिंगला जेव्हा मूळ सावित्रीची छायाचित्रं आणि कीर्तीची छायाचित्रं शेजारी दिसतात तेव्हा लक्षात येतं. खरं तर, कीर्ती मूळ सावित्रीपेक्षा दिसायला काकणभर सरसच वाटते. चौदा वर्षांची एक अल्लड मुलगी ते वयाच्या पंचेचाळिशीत ‘महानटी’चे सगळे भोग भोगून चिरविश्रांतीआधी कोमात गेलेली सावित्री हा प्रचंड कॅनव्हास कीर्तीनं पडद्यावर अक्षरश: जिवंत केला आहे. या अभिनेत्रीचे चेहरा व विशेषत: डोळे कमालीचे बोलके आहेत. चेहऱ्यात अत्यंत गोडवा आहे. तिचे सर्व विभ्रम केवळ मोहवणारे आहेत. शेवटी मद्याच्या आहारी गेलेल्या सावित्रीचं सगळं दु:खही तिच्या डोळ्यांत साकळतं. सावित्रीचा सगळ्यांत मोठा गुण म्हणजे ती अत्यंत उदारहृदयी होती. एवढं ऐश्वर्य असूनही काळाचं दान उलटं पडल्यानं अगदी साधं जीवन जगण्याची वेळ तिच्यावर येते. तेव्हाही ती घरातली महागडी साडी विकून नुकतीच ओळख झालेल्या व तिचा फॅन असलेल्या वृद्ध टॅक्सीवाल्याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी भलीमोठी रक्कम हातात ठेवते, तो प्रसंग हेलावून टाकतो. भरपूर पैसे असताना ज्यांच्या नावे इस्टेट घेऊन ठेवली, ते सगळे ऐन वेळी कशी पाठ फिरवतात आणि त्यानंतरही सावित्री त्यांच्याविषयी कुठलीही कटुता ठेवत नाही, हे पाहून तिच्याविषयी करुणा दाटल्याशिवाय राहत नाही. मद्याच्या आहारी गेलेली सावित्री शेवटी स्वत: दारू तर सोडतेच; पण हे व्यसन असलेल्यांसाठी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याचाही निश्चय करते. अशा अनेक प्रसंगांची गुंफण या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेते. 
जेमिनी गणेशनच्या भूमिकेत दलकीर सलमान (मामुट्टीचा मुलगा) या लोकप्रिय अभिनेत्यानं जीव ओतला आहे. एवढ्या नामांकित आणि वलयांकित व्यक्तिमत्त्वाची भूमिका पेलताना त्या भूमिकेचे सर्व पैलू दाखवण्यात सलमान यशस्वी ठरला आहे. जेमिनी आणि सावित्री यांच्या नात्यात नंतर ‘अभिमान’सदृश वादळ निर्माण होतं, त्या सर्व काळात नैराश्यग्रस्त झालेल्या जेमिनीचा वावर सलमान सहजतेनं दाखवतो. तमिळ चित्रपटसष्टीतला सर्वांत रोमँटिक हिरो आपल्या दुसऱ्या पत्नीचा उत्कर्ष सहन करू शकत नाही आणि सवयीनं ‘तिसरी’कडं वळतो. त्यानंतरचा त्याचा सर्व स्खलनाचा प्रवास दलकीर सलमानने उत्कृष्टपणे पेलला आहे. या अभिनेत्याच्या कारकिर्दीतील ही महत्त्वाची भूमिका ठरावी.

सावित्रीच्या या प्रवासाचा शोध घेते पत्रकार मधुरावाणी. सावित्रीचा शोध घेता घेता वाणीला तिच्या आयुष्यातही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे बळ मिळते. अँथनी या ख्रिश्चन तरुणाशी प्रेम करण्याचं धैर्य ती अखेर एकवटते. वर्षभर कोमात राहिलेली सावित्री अखेर १९८१ मध्ये हे जग सोडून जाते. मात्र, शेवटी वाणी म्हणते, तसं - सावित्री, तू फक्त देहरूपाने संपलीस. पण रूपेरी पडद्यावरच्या तुझ्या भव्य अस्तित्वाला मरण नाही. तुझ्या कर्तृत्वाची गाथा आम्ही पुढच्या पिढ्यांना सांगत राहू... बोलताना अडखळणाऱ्या, आधी एका किकमध्ये दुचाकी स्टार्ट करू न शकणाऱ्या आणि शेवटच्या सीनमध्ये एका किकमध्ये दुचाकी स्टार्ट करून हसत निघणाऱ्या मधुरावाणीची भूमिका समंथानं फारच उत्कृष्ट साकारली आहे. तसा छोटा रोल असला, तरी संपूर्ण नॅरेशन करणारा असल्यानं महत्त्वाचा आहे. त्यात समंथा लक्षात राहते. तिच्या नायकाच्या भूमिकेत विजय देवेरकोंडा हा आणखी एक लोकप्रिय अभिनेता आहे. याशिवाय सहायक भूमिकांमध्ये तेलगू व तमीळ चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची मांदियाळीच आहे.
‘महानटी’ बघताना सावित्रीच्या सुख-दु:खात आपण सहभागी होतो, तिच्याबरोबर हसतो, तिच्याबरोबर रडतो, हे दिग्दर्शकाचं यश आहे. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी आपल्याच एका राज्यात चित्रपटसृष्टीवर राज्य करणारी अशीही एक राणी होती, हे अनेकांना ठाऊक नसेल. मात्र, ‘महानटी’ बघितल्यानंतर आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सावित्रीला विसरू शकणार नाही, हे निश्चित! भारतात कमी-अधिक यश मिळविणाऱ्या बहुतेक स्त्रियांच्या भाळी हे ‘सावित्रीचं वाण’ असतंच. त्यामुळं कुणाही संवेदनशील माणसाला हा चित्रपट पाहताना या वास्तवाची दाहक व्याप्ती आणि खोली लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ‘सावित्री’ अनुभवायची ती अशा काही साक्षात्कारी क्षणांसाठी...!!

...

दर्जा - चार स्टार

---

11 Aug 2020

रिव्ह्यू - फर्स्ट मॅन

आउट ऑफ धिस वर्ल्ड....

------------------------------

गेल्या शतकात घडलेली मानवजातीच्या इतिहासातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे चंद्रावर पडलेले मानवाचे पहिले पाऊल! मला अगदी लहानपणी पहिल्यांदा जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हापासून त्या घटनेविषयीचे कुतूहल सतत वाढत गेले आहे. मानवाच्या बुद्धीची ही झेप केवळ थक्क करून टाकणारी आहे, यात वादच नाही. कितीही विशेषणे वापरली, तरी त्या घटनेचे यथार्थ वर्णन केले असे वाटतच नाही. मी १९९७ मध्ये ‘सकाळ’मध्ये जेव्हा पहिल्यांदा रुजू झालो, तेव्हा पहिल्याच दिवशी मी तेथील सुसज्ज ग्रंथालयात जाऊन कोणती गोष्ट पाहावयास मागितली असेल, तर माणूस चंद्रावर उतरला ही बातमी असलेला अंक! त्यानंतरही मी शक्य तितक्या वेळा या विषयावर वाचलं आहे, पाहिलं आहे. मात्र, कुतूहल शमण्याऐवजी वाढतच गेलं आहे. अगदी माझ्या मुलाचं नावही ‘नील’ ठेवण्यामागे नील आर्मस्ट्राँग या माणसाचं ‘एकमेवाद्वितीय’ असणं हाच भाव आहे! माणसाच्या मनाला असलेली अज्ञाताची तीव्र ओढ आणि मानवी बुद्धीची उत्तुंग झेप या दोन्ही गोष्टींचा विस्तार अनंत अवकाशाच्या पोकळीएवढाच असावा. असो.

नमनाला एवढं घडाभर तेल वाहण्याचं कारण म्हणजे परवा ‘नेटफ्लिक्स’वर मी पाहिलेला ‘फर्स्ट मॅन’ हा चित्रपट. चित्रपटाच्या नावावरून विषय थेट स्पष्ट होत नसला, तरी नील आर्मस्ट्राँगच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे, असं सांगितलं, की त्या शीर्षकाची यथार्थता स्पष्ट होते. ‘ला ला लँड’ या २०१६ मध्ये आलेल्या आणि माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटाचा दिग्दर्शक डॅमियन शेझेल यानंच हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘ला ला लँड’चा नायक रायन गोसलिंग हाच इथेही नायकाच्या, अर्थात नील आर्मस्ट्राँगच्या भूमिकेत आहे. ‘द क्राउन’ या ‘नेटफ्लिक्स’वरच्या बहुचर्चित वेबसीरीजमध्ये तरुण राणी एलिझाबेथची भूमिका साकारणारी ब्रिटिश अभिनेत्री क्लेअर फॉय यात नायिकेच्या, म्हणजे नील आर्मस्ट्राँगच्या पत्नीच्या - जेनेटच्या - भूमिकेत आहे. ही नामावली पाहिल्यावर मी हा चित्रपट २०१८ मध्येच का पाहिला नाही, असा मला प्रश्न पडला. पण तेव्हा राहून गेलेला हा चित्रपट परवा पाहिला आणि माझे सव्वादोन तास सत्कारणी लागले. नील आर्मस्ट्राँग चंद्रावरून सुखरूप परत आल्यानंतर पत्रकारांनी जेनेटची मुलाखत घेताना तिच्या भावना विचारल्या होत्या, तेव्हा ती गमतीने ‘आउट ऑफ धिस वर्ल्ड’ म्हणते, अगदी तेच शब्द मला या सिनेमाच्या अनुभवाबाबत म्हणावेसे वाटतात. म्हणून या रिव्ह्यूचं शीर्षकही हेच!

हा चित्रपट नील आर्मस्ट्राँगच्या चांद्रमोहिमेपेक्षाही त्याआधी आणि त्या मोहिमेदरम्यान एक माणूस म्हणून त्याच्या मानसिक प्रवासाविषयी आहे, असं दिग्दर्शकानं एका मुलाखतीत स्पष्ट केलंय. नील आर्मस्ट्राँगचं यान १९६१ मध्ये एका अवकाश मोहिमेदरम्यान वातावरणाबाहेर भरकटतं, पण मुश्किलीने तो सुखरूप उतरतो, या घटनेनं सिनेमा सुरू होतो. नील आर्मस्ट्राँगचं चित्त थाऱ्यावर नसतं आणि याच कारणानं त्याला काही काळ मोहिमेबाहेर बसवलं जातं. त्याची अडीच वर्षांची मुलगी कॅरन ब्रेन ट्यूमरने आजारी आहे आणि तिच्यासाठी हर प्रकारचे उपचार शोधण्यात नीलचं मन गुंतून गेलंय. मोहिमेतून बाहेर बसावं लागण्यामागचं कारण हेच आहे. त्याचे सर्व उपाय हरतात आणि एके दिवशी त्याची मुलगी हे जग सोडून जाते. दु:खातून बाहेर येण्यासाठी नील पुन्हा एकदा ‘नासा’कडे ‘प्रोजेक्ट जेमिनी’साठी अर्ज करतो आणि सुदैवानं त्याचा अर्ज मंजूर होतो. इथून पुढचा सगळा प्रवास नील आर्मस्ट्राँग नावाच्या माणसाच्या मनाचा, त्याच्या मनात सुरू असलेल्या खळबळीचा, अज्ञाताच्या ओढीचा आणि माणसाच्या मनाच्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय देणारा आहे. नील आर्मस्ट्राँग या माणसाचा मी जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा माझ्या मनात हाच विचार येतो, की हा माणूस इंग्लिशमध्ये जसं म्हणतात ना, तसा कोणत्या ‘मेटल’चा बनला असेल? काय पद्धतीने तो विचार करीत असेल? आपण कदाचित परत येऊ शकणार नाही अशा मोहिमेवर जाताना मन कसं स्थिर, शांत ठेवत असेल? हा सिनेमा पाहताना या प्रश्नांची थोडीफार उत्तरं मिळतात. चित्रपट नील आर्मस्ट्राँगचा हा प्रवास दाखवताना नेपथ्याला ‘नासा’च्या मोहिमेची १९६१ ते १९६९ या काळात झालेली आगेकूच, केनेडींचं स्वप्न, सोविएत युनियनबरोबर सुरू असलेली स्पर्धा, अमेरिकेत चांद्रमोहिमेला सुरू असलेला विरोध, तिघा अंतराळवीरांना सरावाच्या वेळी झालेला अपघात आणि आगीत त्यांचा झालेला मृत्यू हे सगळंही दिग्दर्शक दाखवत राहतो. त्यामुळं हे चित्र परिपूर्ण व्हायला मदतच होते. 
यासंबंधीचे दोन सीन मला विशेष आवडले. अमेरिकेलाही ही मोहीम यशस्वी होईल, असं वाटत नव्हतं. अनुकूल परिस्थिती नसेल, तर या चांद्रवीरांनी यानातून खाली न उतरता माघारी फिरावं आणि अपोलो १२, १३ किंवा १४ मध्ये प्रत्यक्ष चंद्रावर उतरावं अशी योजना ‘नासा’ने तयार केली होती. हे चांद्रवीर प्रत्यक्ष मोहिमेला निघाले, तेव्हाच ते मोहिमेत मरण पावले तर वाचायचं एक पत्र आधीच ड्राफ्ट केलं जातं, तो प्रसंग हेलावणारा आहे. अगदी मोहिमेला निघताना नील घरात कपड्यांची बॅग आवरत असतो. तेव्हा जेनेट त्याला मुलांशी बोलायला सांगते, तो प्रसंग तर मुळातूनच बघण्यासारखा आहे. नीलला मुलांशी बोलायचं नसतं. मात्र, मुलं त्याला प्रश्न विचारतात. तो शांतपणे सांगतो, की मी चंद्रावर चाललोय. (जगात किती मुलांना आपल्या बापाकडून हे ऐकायला मिळालं असेल?) नंतर मुलं विचारतात, की किती दिवस? मग तो सांगतो, की जायला एवढे दिवस, यायला एवढे दिवस... मग एक महिना क्वारंटाइनमध्ये राहावं लागेल वगैरे. मग धाकटा विचारतो, की आमच्या शाळेतल्या स्पर्धेला तू नसणार का बाबा? तेव्हा नील उदास चेहरा करून ‘नाही रे’ असं सांगतो. थोरला मुलगा जरा कळता असतो. तो विचारतो, की तू परत न येण्याची शक्यता आहेच ना? तेव्हा एकच सन्नाटा पसरतो. थोड्या वेळानं नील अगदी शांतपणे सांगतो, की हो. तशी शक्यता आहे. पण आम्ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. झालं. आई सांगते, मुलांनो, आता झोपायची वेळ झाली, बाबाला टाटा करा आणि झोपा. कुठल्याही अनावर भावना नाहीत, अश्रुपात नाही, कढ नाहीत, काही नाही!
नील व त्याचे सहकारी प्रत्यक्ष यानात बसायला निघतात, तेव्हा लिफ्टमधून वर जाताना नीलला समोर आकाशात चंद्राची कोर दिसते. नंतर त्याच्या हेल्मेटमधे चंद्राचे प्रतिबिंब दिसते. इथपासून ते ‘अपोलो ११’च्या उड्डाणाचा सगळा थरार केवळ अनुभवण्यासारखा आहे. (त्या वेळी मात्र तीव्रतेनं असं वाटलं, की सिटीप्राइड कोथरूडच्या एक नंबरच्या स्क्रीनवर हा सिनेमा पाहायला हवा होता. मोठ्या पडद्याची जादू काही औरच! असो.) नंतर यानाचा प्रवास, नील व बझ ऑल्ड्रिनचे यानातले विनोद, प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल टाकतानाचा थरारक क्षण, ‘ए स्मॉल स्टेप ऑफ मॅन, ए जायंट लीप ऑफ मॅनकाइंड’ हे त्याचे गाजलेले उद्गार हे सगळं बघताना अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. क्षणाक्षणाला अपयश येण्याची भीती, जीव गमावण्याचा धोका, आपली माणसं पुन्हा कधीही न दिसण्याचं भय हे सगळं विसरून ज्या धीरोदात्तपणे नील आर्मस्ट्राँग या सगळ्या मोहिमेला सामोरा गेला, ते बघून आपल्याला केवळ थक्क व्हायला होतं. (सिनेमात नील चंद्रावर एका क्रेटरजवळ जातो आणि सोबत आणलेलं आपल्या लेकीचं ब्रेसलेट तिथं टाकून देतो, असा फार भावनोत्कट प्रसंग आहे. हा प्रसंग प्रत्यक्षात घडल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे दिग्दर्शकाने तो ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ म्हणून दाखवला असावा, असं म्हणायला वाव आहे.) चित्रपटाचं साउंड डिझाइन अफाट आहे. नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरल्यानंतर चंद्रावर वातावरण नाही, म्हणजे आवाजही नाही, या वैज्ञानिक सत्याला जागून पुढची चंद्रावरची सर्व दृश्यं संपेपर्यंत पार्श्वभूमीला अजिबात आवाज वापरलेला नाही. (केवळ ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीनं सुरू असलेल्या नीलच्या श्वासोच्छ्वासाचा क्षीण आवाज येत राहतो. हा इफेक्ट अर्थात इअरफोनमुळंच कळतो. मात्र, क्रेटरमध्ये नील मुलीचं ब्रेसलेट टाकतो, तेव्हा ते थेट खाली गेलेलं दाखवलं आहे. चंद्रावरचं एक षष्ठांश गुरुत्वाकर्षण लक्षात घेता, ते ब्रेसलेट असं खाली जाणार नाही. पण एवढी चूक माफ करायला हरकत नाही.) असो.

चांद्रमोहीम फत्ते होते. नीलचं यान सुखरूप पृथ्वीवर परत येतं. अमेरिकेत आणि जगभर एकच जल्लोष होतो. ब्रिटनच्या राणीपासून ते आफ्रिकेतल्या गरीब बाईपर्यंत सगळे आनंद व्यक्त करतात. नील आणि त्याचे सहकारी शांतपणे क्वारंटाइन होतात. तिथं जेनेट भेटायला येते. मधे काच असते. सगळं जग आता जेनेटच्या बाजूला असतं आणि समोर वेगळ्याच जगात जाऊन आलेला माणूस बसलेला असतो. तो हळुवारपणे पत्नीकडे हात करतो, तीही इकडून हात टेकवते. मधे काच असते. त्यावर धुकं जमा होत जातं... या फ्रेमवर सिनेमा संपतो.
माणसाच्या विलक्षण मानसिक ताकदीची ही कथा आहे. खरीखुरी घडलेली... अगदी ५१ वर्षांपूर्वीच! आत्ताच्या वेगळ्या क्वारंटाइन काळात, लॉकडाउन काळात आपल्या जगण्याला उमेद देणारी... विजिगिषू वृत्तीने जगण्यावर प्रेम करायला लावणारी, प्रेरणा देणारी! 

----

दर्जा - साडेतीन स्टार


----