29 Jun 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ३

सुळावरची पोळी
--------------------

लेखक होणे म्हणजे महाकठीण काम असते, हे एव्हाना आम्हास समजले होते. साहित्याच्या त्या हेडक्वार्टरी गेलेल्या कोणाही इसमास ते कळतेच म्हणा. त्यानंतर आमच्या 'नव्हाळीच्या कविता' छापवून आणताना आणि एकदाचे लेखक म्हणून धन्य होताना आम्ही कितीक कळा सोसल्या होत्या, ते आमचे आम्हालाच माहिती! लेखक व्हायचे म्हणजे खायचे (वा प्यायचे) काम नाही, हे आम्हास नीटच उमजले होते. पण लेखक होणे म्हणजे सुळावरची पोळी होणे हा अनुभव यायचा होता. आपणास मनात येईल ते आपण लिहिले, ज्याला ते आवडले त्याने ते छापले आणि ज्याला वाचायचे त्याने ते वाचले, कुणाला आवडले, तर कुणाला नाही आवडले एवढ्या सरळ रीतीनं हा प्रकार संपत नाही. एक तर आपल्या मनात येईल ते लिहिणं हेच मुळी अवघड. आमच्या मनात काय काय येतं, ते सगळंच सांगण्यासारखं नसतं. त्यामुळं ते लिहिणं शक्यच नाही. मग पुढचे प्रकार तर दूरच राहिले. लिहिताना हल्ली फार धोरणीपणा करून लिहावे लागते. यांना काय आवडेल, तिला काय पटेल, तो काय म्हणेल, त्यांचं कुठे दुखेल या सगळ्याचा विचार करून लिहावं लागतं. टीआरपीचा विचार करावा लागतो. मनात येईल ते ठोकून द्यायचं हा काळ केव्हाच सरला. आता उरला फक्त मार्केटचा काळ! पण आम्हास त्याबद्दल तक्रार नव्हती. किंबहुना आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य फारच जपलं जात होतं. थोडक्यात, आम्ही काय लिहितो ते कुणीच वाचत नव्हतं. त्यामुळं कुणी आक्षेप वगैरे घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि बाजारात तर कुणाची ना कुणाची चर्चा झाल्याशिवाय माल खपतच नाही. मग आम्ही एक युक्ती केली. टीआरपी खेचण्यासाठी म्हणून असं काही तरी करणं भागच होतं. पण कुणा तरी मोठ्या माणसावर काही तरी टीका करायची आणि मग प्रसिद्धी मिळवायची हे धोरण काही आम्हाला मान्य नव्हतं. असं असलं, तरी एका कविमित्राच्या घरी सायंकाळचे 'ग्रंथवाचन' (तात्यासाहेबांना वंदन असो!) करावयास बसलो असता, मित्रानं एक 'क्लू' दिला. साहित्य संमेलनाचे चालू अध्यक्ष... अर्रर्र... क्रम चुकला... चालू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष याबाबतीत (म्हणजे टीआरपी मिळविण्याबाबतीत) खूप श्रेष्ठ दर्जा गाठून आहेत, असं त्यानं आम्हाला 'एकच प्याला' देताना सांगितलं. (सध्या आम्ही गडकऱ्यांच्या साहित्याचा अभ्यास करतो आहोत. उगाच नसत्या शंका नकोत.) मग आम्ही तडक सा. सं. अध्यक्षांच्या घरी गेलो. सकाळची वेळ असल्यानं आम्ही नुसतेच चर्चेला 'बसलो'. अध्यक्षांसोबत चर्चा म्हणजे त्यांनी बोलायचं आणि आपण ऐकायचं. या बदल्यात 'दोन कप चहा टाक गं' हे वाक्य कानी गेल्यामुळं आम्ही निश्चिंत होतो. एक कप चहावर आम्ही दीड तासाचं व्याख्यान ऐकू शकतो. त्यानंतर दुसरा कप लागतो. अध्यक्षांच्या घरी लालित्यपूर्ण चहा आणि चर्चा झाल्यावर एकच गोष्ट आमच्या लक्षात आली. प्रसिद्ध व्हायचे असेल तर मोठ्या माणसांवर दगड भिरकावल्याशिवाय तरणोपाय नाही. मग आम्ही संमेलनाध्यक्षांवरच टीका करताना एक फर्मास लेख लिहून काढला. 'शिशुपालाचे शंभर अपराध आणि आपण सारे कृष्ण' या दीर्घ शीर्षकाचा तो लेख छापायला कुणीच तयार होईना. अगदी अध्यक्षांच्या व्याख्यानाने पीडित लोकांनाही विचारून पाहिलं. पण नाही. अखेर आम्हाला फेसबुकचा आधार घ्यावा लागला. आमची पोस्ट वाचून गवताची काडीही हलली नाही, तिथं साहित्यविश्वात हलकल्लोळ वगैरे माजण्याची शक्यताच नव्हती. अखेर देव आमच्या मदतीला धावून आला. एक चळवळ्या प्रकाशक भेटला. त्याच्या खिशात लेखणी नसून, एक छोटीशी तलवारच ठेवली होती. जो मार्गात आडवा येईल, त्याला कापून काढायचं, असा त्याचा आवेश होता. मग आमचा हा लेख आम्ही त्याच्याच साप्ताहिकात छापायला दिला. तो वाचून काही लोकांचे फोन आले. काहींना छान वाटले, तर काहींना घाण वाटले. पण बस्स... एवढंच. आमचा टीआरपी काही पुढं सरकायला तयार नव्हता. अखेर कळलं, की संमेलनाध्यक्षांचाच टीआरपी घसरलाय. मग त्यांच्यावरील टीकेला तरी टीआरपी कसा मिळायचा? मग आम्ही आमच्याच काही मित्रांना या लेखावर टीका करायची विनंती केली. मित्रांनी भरपूर मोठी पार्टी उकळून अखेर आमचा बाजार उठवला. खराखुरा आणि फेसबुकवरसुद्धा! थोडी फार हालचाल झाली... पण ३८ लाइक, एक शेअर आणि चौदा कमेंट म्हणजे काहीच नव्हेत. कमेंटासुद्धा आमच्यावर टीका करणाऱ्या नसून, अभिनंदन वगैरे करणाऱ्या होत्या. आता मात्र हद्द झाली. काय करावं ते सुचेना. अखेर डोक्यात प्रकाश पडला.
आम्ही भराभर की-बोर्ड समोर ओढला आणि एक मुरलेला राजकारणी, एक नामवंत उद्योगपती, एक अतिमहान खेळाडू आणि एक लय भारी गायक या सगळ्यांवर ज्वलज्जहाल टीका करणारा लेख एकटाकी खरडून काढला. लेख एवढा तप्त-जहाल होता, की शेवटीशेवटी आमची बोटं भाजू लागली. लेख त्याच चळवळ्या प्रकाशकाकडं दिला. त्यालाही 'आ बैल मुझे मार' हाच छंद होता. त्यानं तो जपला आणि लेख छापला... आणि काय आश्चर्य! एका रात्रीत आम्ही फेमस की हो झालो... सगळीकडं 'कोण आहे हा?' अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्या एका कथित ईनोदवीराच्या मागोमाग ठोंब्यालाही अटक झालीच पाहिजे, या मागणीचा चक्क मोर्चा निघाला. (पण नंतर आम्ही जागे झाल्यावर कळलं, की ते स्वप्नच होतं. हाय हाय...) पण शनिवारवाड्यावर आमचं पोस्टर जाळून खळ्ळं खट्यॅक करण्याचा डाव काही राजकीय संघटनांनी रचला होता म्हणे. पण आमचा फोटोच न सापडल्यानं त्यांनी उगाचच एक कापडी बाहुला जाळून प्रतीकात्मक इ. निषेध केला. राजकारणी भाईंचे दत्तू आमचा पत्ता विचारू लागले. त्यातले काही घरी पण आले. पण आम्ही एव्हाना सा. सं. अध्यक्षांना आमच्या बाजूला केलं होतं. कारण ते मुरलेले राजकारणी अध्यक्षांना अजिबात विचारत नव्हते, त्यामुळं अध्यक्षमहोदयही त्यांच्यावर जरा खार खाऊनच होते. तर आमचा बचाव करण्यासाठी आम्ही साक्षात त्यांनाच आमच्या घरी बसवलं. आणि चमत्कार की हो जाहला... त्यांना घरात पाहताच लोक दारातूनच आल्या पावली माघारी फिरू लागले... एक-दोन जण धाडसानं चर्चा वगैरे करायला आत आले खरे; पण पुढच्या दीड तासांनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करायची वेळ आली. अध्यक्ष महाराजांएवढी आमची कुठली ऐपत! मग आम्हीही आमच्या परीनं खिंड लढवत होतो.
आणखी एक कल्पना सुचली. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते आहे, अशी आरोळी आम्ही ठोकली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य इ. शब्द ऐकल्यानंतर ज्यांचा आमचा कधी संबंध आला नाही, असे काही राजकीय पक्ष आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह दारात उभे ठाकले. काही इंग्रजी वृत्तपत्रांनीही आमच्यावर आपला 'टाइम' खर्च केला. हळूहळू आम्ही केवळ आमच्या जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात चांगलेच फेमस होऊ लागलो. लेखक म्हणून आपला एक वट निर्माण झाला आहे, असा आत्मविश्वास मनात जागा झाला आणि आम्हास आमचे मूळ काम आठवले. लेखक म्हणून आमच्या लेखनाचे मानधन मिळणे हा आमचा हक्क आहे, वगैरे गोष्टी लक्षात येऊन वेळी-अवेळी बाहू फुरफुरू लागले. आम्ही तडक आमच्या 'नव्हाळी'च्या प्रकाशकांकडं गेलो. तर त्यानं आमच्याकडंच काही हजार रुपयांची बाकी असल्याचं सांगून अस्मादिकांस फेफरं आणलं. 'मान मिळतोय तो घ्या; धन लागतंय कशाला लेखकाला?' असंही वर ऐकवलं. लेखक म्हणून आम्ही कितीही मोठे झालो, तरी प्रकाशक नावाची ही जी काही महान संस्था आहे ना, ती नेहमीच आमचा रथ पुन्हा जमिनीवर आणते. झालं... त्यांच्या या वाक्यासरशी आमचा टीआरपी एकदम शून्यावरच आला... आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार...!

----


(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जुलै २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

फिरकीचा ठोंब्या - भाग २

आम्ही लेखक होतो...
-------------------------

आपण लेखक व्हावे, अशी खोकल्यासारखी तीव्र उबळ आमच्या मनात केव्हा आली, हे स्मरत नाही. आपणास आयुष्यातली पहिली जांभई केव्हा आली हे आठवणे जसे अशक्य तसेच हे होय. पण बहुदा मागल्या खेपेस साहित्याच्या हेडक्वार्टरी आमचा झालेला अवमान लक्षात घेता, त्याच प्रसंगी लेखक होण्याचा व्रजनिर्धार आमच्या मनी प्रकट झाला असण्याचा दाट संभव आहे. तर ते असो. लेखक व्हावयाचे तर काय काय करावे लागते, याची यादी आम्ही करू लागलो. अर्ध्या तासात फाडफाड इंग्लिश असले क्लासेस पूर्वी निघाले होते. आता ते आहेत की नाहीत, याची कल्पना नाही; पण झटपट लेखक होण्याचे क्लासेस काही कुठं दिसले नाहीत. त्यामुळं आता काय करावे, असा पेच पडला. वाचकांच्या पत्रव्यवहारात काही पत्रं पूर्वी पाठविली होती. पण केवळ त्यामुळं लेखक म्हणून सिद्ध होणं अवघड! फार तर पत्रलेखक म्हणविले जाऊ! पण लेखक म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बाबतीत 'खादाड असे माझी भूक चतकोराने मला न सुख,' अशी आमची अवस्था होती. तेव्हा काय करावे, असे प्रश्नचिन्ह पुन्हा समोर ठाकले. लेखक व्हायचे तर काही तरी लिहिले पाहिजे, असे आमच्या अचानक लक्षात आले. तत्पूर्वी आम्ही वाणसामानाच्या यादीपलीकडं फार काही लिहिले नव्हते. शाळा-कॉलेजांत असताना प्रेमपत्रं आणि 'स्वच्छतागृह साहित्य' मात्र विपुल प्रसविले होते. आता त्याचा इथं उपयोग नव्हता. आता तसल्या ईई-साहित्याचा उपयोग नव्हता. पण 'ई-साहित्य' मात्र आम्ही नक्कीच जन्मास घालू शकत होतो. ई-साहित्य म्हणजे अर्थातच इंटरनेटवरचे साहित्य हा आमच्या डाव्या माऊसचा मळ होता. (बाकी आमचा माऊस बराच मळकट आहे, हे यावरून चाणाक्ष ई-रसिकांच्या लक्षात यायला हरकत नाही.) सर्वप्रथम आम्ही फेसबुकावर दीर्घ लेखवजा स्टेटस टाकावयास सुरुवात केली. बराच सखोल विचार करून, नामवंत साहित्यिकांच्या लेखनातले उतारे वगैरेही द्यायला सुरुवात केली. एकही शायर, कवी सोडला नाही. दुसऱ्यानं टाकलेला मजकूर त्वरित शेअर करण्यात आम्ही एवढे पटाईत झालो, की आम्ही स्वतःलाच 'शेअरशहा' ही पदवी बहाल करून टाकली. मात्र, एक सल कायम होती. एवढे फेबुतज्ज्ञ होऊनही हवे तसे लाइक मिळत नव्हते. मोठ्या प्रयत्नाने काही तरी वैचारिक लेख खरडावा आणि पाच तासांत अवघे सात लाइक मिळावे, या प्रकारामुळं आमच्यातल्या लेखकाची भ्रूणहत्या होतेय की काय, असे वाटू लागले. खूप विचार केला. आमच्या काही सख्या सकाळी शिंकल्या, तरी त्यांना त्यांच्या 'आक् छी' या स्टेटसला तासाभरात दोनदोनशे लाइक्स मिळत होते, हे आम्ही 'याचि देही याचि डोळा' पाहत होतो. वर पुन्हा 'टेक केअर डिअर', 'काय झालं शोना' इ. इ. प्रेमळ सल्लेही दिसत होते. फेसबुकावर अकाउंट खोलल्यापासून आम्हाला एकदाही कुणी 'टेक केअर'सुद्धा म्हटलं नव्हतं; डिअरबिअर तर लांबचीच गोष्ट राहिली. अशानं लेखक म्हणून आम्ही कसे प्रसिद्ध पावणार, हे कळेना. अचानक आरती प्रभू आठवले. आम्ही तातडीने 'भावना प्रधान' या नावाने फेबुवर एक डुप्लिकेट अकाउंट उघडले. 'तुझ्या माठाला गेलाय तडा' या फेमस अल्बममधल्या नायिकेचा फोटो प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेवला. अन् काय आश्चर्य! धपाधप फ्रेंड रिक्वेस्टी येऊ लागल्या. 'काय हा उन्हाळा! उफ्फ...' असं म्हणून वस्त्रांविषयी अप्रीती दर्शविणारी आमची सचित्र पोस्ट तर तुफान हिट झाली. अवघ्या दीड तासात तिनं हजार लाइक्सचा टप्पा ओलांडला आणि दीडशे शेअर तर सहज झाले. आम्ही लोकप्रियतेच्या शिखरावर भावना प्रधान (आणि भावनाप्रधान होऊनही) तरंगू लागलो. पण इथं एक नवाच उपद्रव सुरू झाला - इनबॉक्स नावाचा! पाच पाच सेकंदांनी इथं कुणी तरी पुरुष मित्र येऊन, सारखं 'हाय' 'हाय' करू आले आणि 'जेवण झाले का,' या निरुपद्रवी प्रश्नापासून सुरुवात करून पुढं, सांगता येणार नाही, अशा बऱ्याच नाजूक गोष्टींच्या चवकशा करू लागले. एकाने तर विविक्षित कामासाठी एका विविक्षित ठिकाणी येतेस का, असं विचारल्यावर मात्र आम्ही हाय खाल्ली. भावना प्रधानचा तिथंच अपमृत्यू झाला. तिच्या अकाउंटला मूठमाती देऊन आम्ही पुन्हा मूळ स्वरूपात प्रकटलो आणि पाच तासांत सात लाइक या जुन्या रेटनं स्टेटसू लागलो.
थोडक्यात, ई-साहित्याद्वारे सायबरविश्वात तरी नाव कमवावे, ही महत्त्वाकांक्षा आम्हाला अगदीच फॉरमॅट करावी लागली. 

आता काय करावं बरं, असा विचार पुन्हा मनात पिंगा घालू लागला. अचानक लक्षात आलं, थेट एखादा प्रकाशक गाठावा आणि डायरेक्ट पुस्तक काढायची मागणी घालावी. आम्ही इयत्ता नववीच्या कोवळ्या इ. वयात केलेल्या काही कविता आठवल्या. ती जुनी वही माळ्यावरून काढून झटकली. 'तू शिशिरातली कोवळी पानगळ आहेस, तू रिमझिम वर्षा आहेस, तू ग्रीष्मातला गुलमोहोर आहेस, तू शरदातील लख्ख पौर्णिमा आहेस...' इ. इ. रोम्यांटिक ऐवज असलेली ती कळकट वही काखोटीला मारून आम्ही प्रकाशकांचं हेडक्वार्टर असलेला तो सुविख्यात चौक गाठला. इथं रस्त्यावर पुस्तकं विकणाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघूनही आम्ही टरकलो, तर प्रकाशकसाहेबांसमोर आमचा काय पाड लागणार? पण याच पुण्यनगरीचं पाणी आमच्या रक्तात खेळत असल्यानं आम्ही मोठ्या धैर्यानं पुढं झालो. एका अरुंद बोळातून आत शिरल्यावर एका पेशवेकालीन इमारतीत पहिल्या मजल्यावर प्रकाशकांचं कार्यालय होतं. प्रकाशकाचं कार्यालय आणि प्रकाशकही पेशवेकालीनच (दुसरा बाजीराव कालखंड, टु बी स्पेसिफिक) होते. त्यांनी त्यांच्या पेशाच्या नियमानुसार आधी अर्धा तास आमच्याकडं पाहिलंच नाही. नंतर आमच्या हातातील कवितांची वही पाहून, आमच्याकडं अत्यंत करुण कटाक्ष टाकून ते म्हणाले, 'आम्ही कविता छापत नाही. दुसरं काही आणा. शांततेत जगण्याचे शंभर मंत्र, कम्प्युटरचे ७५ कानमंत्र, आयटीसाठी झटपट रेसिपी, शाळा प्रवेश कसा मिळवावा, अडीच दिवसांत युरोपदर्शन, मधुमेहातील तिसोत्तरी आहार, चाळिशीतले स्मार्ट कामजीवन, ऑनलाइन प्रेमाच्या ई-उप्स-टिप्स असले काही विषय असतील, तरच या. हल्ली हेच खपतं. कळतंय ना?'
आम्ही त्यांना विचारलं, 'पुस्तक कसं काढावं आणि खपवावं यावर एखादं पुस्तक नाही का?'
यावर ते कुत्सित हसत म्हणाले, 'आहे ना... पण खपलं नाही म्हणून रद्दीत घातलं.'
यावर आम्ही तडक जिना उतरून रस्त्यावर आलो. आमची वही रद्दीत जाऊ नये म्हणून बगलेत घट्ट धरली होती.
यानंतर स्वतः पैसे देऊन पुस्तक काढता येतं, अशी एक बहुमोल माहिती आमच्या एका मित्रानं दिली. त्याच्या एका कवयित्री मैत्रिणीचे असे डझनभर संग्रह निघाले होते म्हणे. म्हणजे अगदी 'ऋतुमती' ते 'ऋतुसमाप्ती'पर्यंत बाईंनी एकही विषय सोडला नव्हता. त्यांच्या कवितेचा ऋतू बारमाही टणटणीत फुललेलाच होता. तर त्यांच्या ओळखीच्या प्रकाशकाकडं गेलो. प्रकाशकानं सर्व व्यवहार नीट सांगितला. अगदी मंडईत करतात तशी घासाघीस करून शेवटी अस्मादिकांचा 'नव्हाळीच्या कविता' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. आमच्या सोसायटीजवळच्या पालिकेच्या हॉलमध्ये आमच्या भागातल्या नगरसेविकाताईंच्या हस्ते तो प्रकाशित झाला. (कारण तरच हॉल फुकट मिळणार होता...) वेफर्स आणि चहा ठेवावा लागला. एक एफडी मोडावी लागली. पण साहित्यिक म्हणून आता मिरवता येणार होतं... साहित्याच्या त्या हेडक्वार्टरी जाऊन आम्ही आता ताठ मानेनं आणि फुलून आलेल्या छातीनं सांगणार होतो - होय, आम्हीही लेखक आहोत...!

---


(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जून २०१६)

---


फिरकीचा ठोंब्या - भाग १

वाचण्यापूर्वी
--------------

(नोंद - पाच वर्षांपूर्वी ‘साहित्य सूची’ या मासिकात संपादक योगेश नांदुरकर यांच्या सूचनेनुसार ‘फिरकीचा ठोंब्या’ नावाचं सदर मी लिहिलं होतं. राज्यातल्या, त्यातही पुण्यातल्या साहित्यविषयक घडामोडींची हलकीफुलकी दखल घेणं, टोप्या उडवणं, टपल्या मारणं असं त्याचं स्वरूप होतं. साधारण दीड वर्षं मी हे सदर चालवलं. मला लिहायला फारच मजा आली. वाचकांनाही तेव्हा हे सदर आवडलं होतं... तशा प्रतिक्रिया मला तेव्हा मिळत असत... या सदरासाठी रेश्मा बर्वे हिनं सुंदर व्यंगचित्रं काढली होती. तिनं ‘ठोंब्या’ फारच सुरेख साकारला होता. आता या सदरातले सर्व भाग मी ब्लॉगवर उपलब्ध करून देतोय... त्यातला हा पहिला भाग...)

----

१.

मसाप... साप... साप...
---------------------------

पुण्यनगरीच्या हृदयस्थानातून जाणाऱ्या टिळक रस्त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषदेची वास्तू वसली आहे. त्या ऐतिहासिक वास्तूत जावयास आम्हास नेहमीच भय वाटते. अगदी 'भय इथले संपत नाही,' अशी अवस्था होऊन जाते. साहित्य आदी निरुपद्रवी गोष्टींत रमणाऱ्या लोकांपासून कसले हो भय, असे कुणी म्हणेल. पण मग त्या कुणाला या साहित्यवास्तूची खरी ओळखच नाही, असे म्हणावे लागेल. वास्तूमधल्या खजिन्याचे संरक्षण करावयास वास्तुपुरुष कसा नागाचे वा सापाचे रूप घेऊन डौलानं त्या खजिन्यावर बसलेला असतो, तसेच दृश्य येथे नजरेस पडेल, असे भय आम्हास वाटते. साहित्याच्या खजिन्याचे संरक्षण करावयास एक नव्हे, तर चांगले पंधरा-सतरा पदाधिकारी हातात साहित्यदंडुका घेऊन बसले आहेत, हे पाहून धडकी भरेल नाही तर काय!
वास्तविक स्वतःचा वेळ आणि पैसा घालवून दुसऱ्याच्या मालाचे (सॉरी, सॉरी... साहित्याचे) संरक्षण करणे हा घरचे खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याच्या धंद्याइतकाच पवित्र धंदा होय. असे काम करावयास माणसे मिळणे मुश्कील. पण पुण्यपत्तनस्थ मसाप खजिन्याचे संरक्षण करावयास लोक निवडणूक वगैरे लढवून पुढे येतात, हे पाहून आम्हाला अश्रू आवरेनासे झाले. क्वचित प्रसंगी माधवराव पटवर्धन सभागृहात भिंतीवर मुक्कामास असलेले थोर्थोर साहित्यिकही अशीच टिपे गाळत आहेत, हे दृश्यही जाता-येता दिसू लागले. एकदा आमचा अश्रुपात आवरल्यानंतर साहित्यसेवेसाठी आपणही उभे ठाकावे, ऐसे सहज मनात आले. एखादा विचार मनात आला, की तो लगेच अमलात आणायचा हे आमचे धोरण आहे. त्यानुसार, लगेच निवडणूक लढवावयास गेलो. आधी तेथील सफारी गुरुजींनी आम्हाला आपादमस्तक न्याहाळले. आम्ही कुठल्याही अंगाने साहित्यिक, प्रकाशक सोडाच; पण चार बुके शिकलेलेदेखील वाटत नाही. चेहराच तसा आहे. आम्ही आमची मनीषा सांगितल्यावर तेथील गृहस्थ अकटोविकट हसले. इतर चार कारकून हसले. मसापच्या भिंतीही हसल्या. 'सभासद आहात काय,' असा प्रश्न मागून तीरासारखा आला. आता हे आम्हास ठाऊकच नव्हते. हे अज्ञान प्रकट करून झाल्यावर गृहस्थांशेजारच्या काकू म्हणाल्या, 'अरे बाळा, जा. पुढल्या वेळेस ये हो...' आता त्या त्यांच्या डब्यातून काढून सुंठवडी देतील, असे वाटले. त्यातला पूर्वार्ध खरा ठरला. पण उत्तरार्ध चुकला. त्यांनी सुंठवडी की आलेपाक काढला आणि स्वतःच खाल्ला. एकूणच इथं आपले खाद्य आपणच आणायचे असा प्रकार दिसतोय तर! हात हलवीत परतलो.
आम्हाला उभे राहता येणार नाही, म्हटल्यावरही आम्ही जिद्द न हरता, एका सभासद मित्राला गाठले. या मित्राच्या काकांचे पुस्तकाचे दुकान होते. काकांनी एकदा चुकून मित्राचीही पावती फाडल्यानं मित्र सदस्य झाला होता. तो सध्या डिजिटल फ्लेक्स बनवण्याच्या धंद्यात होता. त्याला अमाप बरकत होती. पण त्याला धंदा सोडून साहित्यसेवा करायची नव्हती. त्यामुळं तोही प्रश्न मिटला. पण पाहिजे तेव्हा फ्लेक्स बनवून देतो, एवढं आश्वासन या मित्रानं दिलं.
त्यानंतर आम्ही आणखी एका जाणकार मित्राकडं गेलो. हा पत्रकार होता. याची तिथं उठबस होती. त्याला विचारल्यावर तोंडातला गुटखा न थुंकता, त्यानं त्रासिक मुद्रेनं विचारलं, 'कोव्वं प्यायय'? त्याला खोबरं पाहिजे असेल असं वाटलं म्हणून धावलो, तो सन्मित्र पचकन बाजूला थुंकून विचारते जाहले - कोणते पॅनेल? हां... आत्ता कळलं त्याला काय म्हणायचंय ते. पण कार्पोरेशनच्या इलेक्शनप्रमाणं इकडंही प्यानेल वगैरे भानगड असते, हे आमच्या गावीही नव्हते. (एकूणच आमच्या गावी अनेक गोष्टींचा अभाव असल्याचा एक भावपूर्ण निष्कर्ष इथं निघू शकतो.) असो. पण मग आता आपण कोणता झेंडा घ्यावा हाती, असा प्रश्न पडला. कालांतराने असे कळले, की आमचे आणखी एक मित्र या रिंगणात उतरले आहेत. हे गृहस्थ उत्साही होते. त्यांनी ते राहत होते, त्या गल्लीच्या तोंडावर भावी उमेदवार म्हणून फ्लेक्सही लावला होता. पण त्या वॉर्डातल्या सर्व इच्छुक पैलवानांनी तो रात्रीतच शहीद केला. पण आमच्या मित्राचा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत उतरायचा कोणताही इरादा नाही, हे कळल्यावर त्यांनी पुन्हा तो उभा केला आणि मित्राला भरपूर शुभेच्छाही दिल्या.
हा मित्र फारच उत्साही निघाला. त्यानं मतदारांची यादी पैदा केली. गावात दोन-अडीच हजार मतदार आहेत, असं कळलं. मित्रानं काम-धंदा सोडला. रोज काही मतदारांना फोन करायचा, तर काहींना प्रत्यक्ष भेटायचं असा घाट त्यानं घातला. अनेक मतदारांचे फोन लागेनात, तेव्हा ते (फोन नव्हे; मतदार) स्वर्गवासी झाल्याचं कळायचं. एकदा लेखिका समजून त्यानं फोन लावला, तर तो आडते बाजारातील दलालाचा निघाला. दुसऱ्या एकाला प्रकाशक समजून फोन केला, तर त्यानं आजचा आकडा काय, असा प्रश्न विचारल्यावर याला आकडीच आली. असे सगळे चुकीचे फोन जाऊ लागल्यावर त्यानं ती मोहीम गुंडाळून ठेवली आणि प्रत्यक्ष मतदारांच्या घरीच धडक मारायची ठरवलं. एक तर पुणेकरांच्या घरी जायचं हे धाडस... त्यात हा नेमका दुपारी एक ते चार या वेळेत जायचा. अनेकांनी दारच उघडलं नाही. काहींनी दारावर दुपारी एक ते चार बेल वाजवू नये, वाजविल्यास तुमच्या कानाखाली घंटा वाजविण्यात येईल, असं स्पष्ट लिहिलं होतं. दुपारच्या वेळी झोप न येणाऱ्या काही लोकांनी दार उघडलं खरं, पण जाळीच्या दारातूनच मतदान वगैरे काही करणार नसल्याचं सांगून टाकलं. काही मूळ पुणेकर नव्हते, त्यामुळं त्यांनी दार उघडलं. पण आपण मतदार असल्याचं त्यांना माहितीच नव्हतं. तुम्हीच देऊन टाका ना आमचं मत, असं म्हणून आणि एक मारीचं बिस्कीट देऊन त्यांनी मित्राला बोळवलं. एका असहाय साहित्यिकांनी, 'आमच्या घरी चार मतं आहेत; मी एका मताचे अमुक तमुक हजार एवढे मानधन घेतो, तुम्ही किती देणार बोला,' असा रोकडा सवाल टाकून मित्रास फेफरं आणलं होतं.
असं करता करता मित्राला शेवटी डोक्यात काहीच राहिना. कोण मतदार, कोण उमेदवार काहीच लक्षात येईना. एकदा तर रात्री स्वतःच्या बायकोस झोपेत 'मलाच मत द्या बरं का, ताई,' असं म्हणाला आणि तिचा महिनाभराचा अबोला ओढवून घेतला. साहित्यसेवेचा दंडुका हाती धरण्यास कोण ही धावपळ सुरू होती. आमच्या मित्राप्रमाणेच गावातले तीस-चार लोक या कार्यी मग्न झाल्याचे कळले. करता करता निवडणुकीचा दिवस उजाडला. बारकोडवाल्या मतपत्रिका कार्यालयात येऊन पडल्या. निकालही जाहीर झाला. जुने गेले; नवे आले. ताई गेल्या; दादा आले! मॅडम गेल्या; सर आले!
आम्ही लगेच सरांना जाऊन भेटलो. सर स्वभावानं खूपच चांगले. अगदी गोड गोड! त्यांनी प्रेमानं आमचा गालगुच्चा घेतला आणि त्यांनाच आम्ही मत दिल्याबद्दल आमचे मनभरून आभार मानले. आम्ही मतदारच नव्हतो, ही गोष्ट सर विसरले. पण सध्या ते प्रत्येकालाच मतदार समजून आलिंगन देत आहेत किंवा गालगुच्चा घेत आहेत, असे कळले. छान वाटले. आता कारभार गोडीगोडीनं, जोडीजोडीनं होणार याची खात्री पटली. 'मसाप साप' म्हणून भुई धोपटण्यात काही अर्थ नसतो, हे कळले... आम्ही शांतपणे पायऱ्या उतरून बाहेर पडलो आणि शेजारच्या मिसळीकडं वळलो...

---


(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, मे २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----