28 Jul 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ४

लेखक ग्रंथांच्या घरी...
--------------------------

सध्या दिवस कठीण आहेत. लेखकासाठी तर ते आणखीनच कठीण. आधी काही तरी लिहा, मग ते छापा, मग ते खपवा, मग साहित्याच्या हेडक्वार्टरी सभासद व्हा, मग पदाधिकारी व्हा, मग पुरस्कारासाठी सेटिंग करा, मग साहित्य संमेलन भरवा किंवा संमेलनाचे अध्यक्ष व्हा... केवढे व्याप अन् केवढे ताप! या सगळ्या गोंधळात हातून लेखन होतच नाही, हा परत वेगळा मुद्दा!
चांगलं दर्जाचं वगैरे सोडा, पण किमान वाचनीय, बरं असं काही लिहिण्यासाठीही प्रतिभेची भरपूर हॉर्सपॉवर लागते म्हणे. कुणास ठाऊक! मात्र, लेखनासाठी लेखकाला निरनिराळ्या कल्पना सुचाव्या लागतात, वगैरे जुना काळ झाला, हे नक्की! तसंही चार आण्याची भांग घेतली, की वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात असं साक्षात लोकमान्यांनीच म्हणून ठेवल्यानं आम्ही त्या वाटेला फारसे जातच नाही. हल्ली आम्हास टीआरपीची चिंता असते. सुळावरच्या पोळीचे दिव्य करूनही पुस्तक खपेना, तसं आम्हाला टीआरपीच्या इतर काहीबाही कल्पना सुचू लागल्या. हल्ली आम्ही सोशल मीडियावर बराच काळ टीपी करीत असल्यानं तिथं तर या कल्पनांची अलिबाबाची गुहाच उघडलेली दिसत होती. एकदा वाटले, फेसबुकवरच पुस्तकाची वारेमाप जाहिरात करावी. पण आमचा चेहराच असा आहे, की तिथं फार काही लाइक्स वगैरे येण्याची शक्यता नव्हती. बाकी रेडिओ-टीव्ही वगैरे गोष्टी तर आमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या नव्हत्याच. मग एकदम ग्रंथालयाची आठवण झाली. ग्रंथालय म्हणजेच लायब्ररी हा एक मोठा आधार होता यात वाद नव्हता. काही मोजक्या ग्रंथालयांत आपले पुस्तक ठेवावे; किमान ते अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल, अशी आशा होती.
लेखक असल्यानं बऱ्याच दिवसांत ग्रंथालयात गेलो नव्हतो. वर आपण लेखक असल्याची जाहिरात आम्ही गावभर केलेली असल्यानं कुणाला ग्रंथालयाचा पत्ता विचारणं बरं दिसलं नसतं. अखेर एके दिवशी मंडईत भाजी आणायला गेलो असता, एका बोळात ग्रंथालयाचा बोर्ड दिसला. हे शासकीय अनुदानित ग्रंथालय दिसत होतं. आत गेलो. ग्रंथपाल महोदयांना भेटलो. पुस्तक दिलं. आधी त्यांनी खूप कामात आहोत, असं दाखवलं. मग आम्हीही 'केवढं काम पडतंय ना तुम्हाला?' असं म्हणून ग्रंथपालदादांच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवलं. त्यानंतर सुमारे एक तास अर्ध्या कप चहावर आम्ही 'ग्रंथालय सेवकांच्या समस्या' या विषयावरचं एक मोफत व्याख्यान ऐकलं. एक नवं पुस्तक लिहिता येईल, एवढा ऐवज त्यात मिळाला. सरकारी अनुदानं लाटण्यासाठी ग्रंथालयांच्या या जगात काय काय चालतं हे कळलं. काही काही ठिकाणी तर स्वतःच्या छोट्या घरातच अनेकांनी कथित ग्रंथालय सुरू केलंय म्हणे. आपल्याच नातेवाइकांची संचालक म्हणून वर्णी लावायची. कमी किमतीत पुस्तकं घ्यायची, मग रद्दीत विल्हेवाट लावायची... असले अनेक प्रकार ऐकायला मिळाले. ही चुरस आणि चमत्कारिक बाजू आम्हास ठाऊक नव्हती. आता ग्रंथपाल महोदय आपलं पुस्तक तिथं ठेवण्यासाठी उलट आमच्याकडूनच भाडं वगैरे घेतात की काय असं वाटू लागलं. पण तसं काही झालं नाही. ग्रंथपाल महाशयांनी आमचं पुस्तक ठेवून घेतलं. किती लोक घेतील आणि वाचतील, हे मात्र विचारू नका, असं म्हणाले. मग सरकार ग्रंथालयांना भरपूर अनुदान देतं, तर लेखकांना का देत नाही, असा भाबडा प्रश्न आमच्या मनास तरळून गेला. लेखकांना अनुदान मिळू लागलं तर, या कल्पनेनं आमच्या प्रतिभेचा अश्व चौखूर उधळू लागला. पण सध्या अनुदान मिळत नाहीय या वास्तवाची जाणीव झाल्यावर तो पुन्हा तबेल्यात जाऊन चूपचाप उभा राहिला.
पायऱ्या उतरून खाली आलो. ग्रंथालयांमधल्या कित्येक पुस्तकांवरची धूळही कधी झटकली जात नाही. ज्ञानाचा, विद्वत्तेचा सागर आपल्या पानापानांत भरून घेणाऱ्या त्या मूक सोबत्यांना वाचा फुटली तर किती गुपिते उलगडतील नाही का! आम्हाला आता इतर ग्रंथालयांत काय चालते, हे पाहण्याची फारच ओढ वाटू लागली. दुसऱ्या एका ग्रंथालयात गेलो. हे अनुदानित ग्रंथालय नसावे, हे तिथली टापटीप आणि शिस्तशीरपणा पाहून लगेच कळले. आमच्या शहरात हौसेपोटी खिशातले पैसे खर्चून करून लोकांची ज्ञानार्जनाची भूक भागविणारे काही वेडे लोक होऊन गेले. त्यातल्याच काहींनी ग्रंथालये उभारली, काहींनी सामाजिक संस्था उभारल्या, तर काहींनी इतर अनेक विधायक कामं उभी केली. हे खासगी संस्थेनं चालवलेलं शिस्तशीर ग्रंथालय पाहून इथं आपलं पुस्तक असावं, अशी तीव्र इच्छा मनी दाटून आली. संस्था शिस्तशीर असल्याचं तिथं जागोजागी लिहिलेल्या सूचनांवरून स्पष्ट दिसत होतं. नेलेलं पुस्तक धड परत आणून देण्याबाबत तर एवढ्या कडक सूचना होत्या, की बहुतेक लोक ते पुस्तक न उघडताच आहे तसं परत आणून देत असावेत, असं वाटलं. पण तरी आम्हाला हे ग्रंथालय आवडलं. इथंही आमच्या पुस्तकाची एक प्रत दिली आणि निघालो.
ग्रंथालय म्हटलं, की आमच्या मनात फारच उदात्त भावना दाटून येतात. आमच्या कॉलेजचं ग्रंथालय आठवलं, की अनेक गोड गोड आठवणीही जाग्या होतात. तिथं आम्ही पुस्तकं कमी वाचली; पण माणसं जास्त वाचली! घरात नको असलेल्या मांजराला जसं वारंवार बाहेर काढतात, तसं तिथल्या काकांनी आम्हाला कित्येकदा बखोट धरून बाहेर काढलं आहे. मात्र, मांजरापेक्षाही अधिक चिवटपणानं आम्ही पुन्हा आमचा तिथला कोपरा गाठला आहे. आमच्या गावी असलेल्या ग्रंथालयाच्या आठवणीही फारच रम्य आहेत. आपणही लेखक व्हावं, हा किडा आमच्या डोक्यात घुसला तो तिथंच. अनेक नामवंत लेखकांची मोठमोठी पुस्तकं तिथं वाचली. ही पुस्तकं अनेकदा फारच मळकी, पानं दुमडलेली, कोपरे दुमडलेली, फाटलेली अशी असत. अनेकदा पुस्तकांतल्या ओळींखाली रेघा मारलेल्या असत. शेजारी मोकळ्या जागेत मनमोकळी कॉमेंटरी लिहिलेली असे. 'हे पुस्तक वाचू नका,' या बाळबोध सल्ल्यापासून सांगता येणार नाही अशा भाषेत लेखकाला व्यवसाय बदलण्याबाबत केलेल्या रोखठोक सूचना याच पुस्तकांमध्ये पाहायला मिळत. पण याचाच अर्थ तेव्हा ही पुस्तकं वाचली जात होती, अनेक लोक ती हाताळत होते, पाहत होते. कुठल्याही ग्रंथालयातल्या पुस्तकाला यापेक्षा भाग्याची गोष्ट कुठली वाटू शकेल? लेखकाप्रमाणंच त्याच्या पुस्तकालाही बोलता आलं असतं, तर त्यानंही कदाचित हेच सांगितलं असतं. आपल्या राज्यातल्या ग्रंथालयांनाही वाचा फुटली, तर त्यातल्या बहुतेकांचं मनोगतही अश्रूंसोबतच व्यक्त होईल असं वाटायला लागलं. आम्हा लेखकांसाठी पंढरीचं माहात्म्य असलेली ही ग्रंथालयं खरोखर आत्ता काय बिकट अवस्थेत आहेत, हे कळलं तर पुस्तकांबद्दल संवेदनशील असलेले समस्त रसिकजन हळवे झाल्याशिवाय राहणार नाहीत. अनेक ग्रंथालयांची अवस्था भयंकर आहे. ग्रंथालये चालवणारे लोक काय जिकिरीनं ती चालवत आहेत, हे अनेकांना माहिती नाही. फारच थोडकी ग्रंथालये उत्तम दर्जा टिकवून आहेत. पण बहुसंख्य ठिकाणी आनंदीआनंदच आहे. भ्रष्टाचारापासून ते सरकारी अनास्थेपर्यंत अनेक वाईट गोष्टींनी त्यांना खिंडीत गाठलंय. यावर उपाय कोण करणार? मन एकदम चिंताक्रांत झालं.
अशाच हळव्या अवस्थेत आम्ही आमच्या परमप्रिय पुण्यनगरीतल्या खाशा पेठेतल्या खाशा ग्रंथालयात शिरलो. 'कोण पाहिजे?' अशी केवळ या पेठेतच केली जाणारी तुच्छतादर्शक विचारणा समोरचे काका कानकोरण्यानं कान कोरत करते जाहले. त्यांच्या त्या आविर्भावानंच आम्ही गर्भगळीत झालो. 'पु.. पु... पुस्तक द्यायचंय,' हे शब्द कसेबसे फुटले. 'नव्हाळीच्या कविता' हे आमच्या पुस्तकाचं शीर्षक वाचून ते काका खेकसले, 'कविता नाही ठेवत... एक काम करा. शेजारी भेळवाला आहे. त्याला लागतात खूप कागद... तिकडं देऊन या...'
आम्ही क्षणार्धात हळव्याचे रडवे झालो. ग्रंथालयांना, त्यातही आमच्या पुण्यनगरीतल्या ग्रंथालयांना पुढील शेकडो वर्षं मरण नाही, हे सत्य उमजले. खाली येऊन पुस्तक शबनममध्ये कोंबलं आणि ओल्या भेळेची ऑर्डर दिली...

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, ऑगस्ट २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

No comments:

Post a Comment