28 Jul 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ५

मेहुणचार
-----------

लेखक म्हणून काही कुठं लवकर बस्तान बसण्याची शक्यता दिसेना, तसे आम्ही अस्वस्थ झालो. आता वेगळ्या मार्गानं प्रसिद्ध व्हावं, असं आम्ही ठरवून टाकलं. आणि एकदा का आम्ही एखादी गोष्ट ठरवली, की ती आम्ही करतोच! मोठमोठ्या लोकांचं अनुकरण करावं, असं वाटू लागलं. मोठ्या लोकांनी अभ्यास केला होता, ग्रंथ वाचले होते आणि बरंच लिहून ठेवलं होतं. यातलं काहीही करायचं तर खूप वेळ गेला असता आणि ती गोष्ट अगदीच त्रासदायक होती. इथं फेसबुकावर पोस्ट केल्यानंतर तासाभरात किमान शंभर लाइक नाही आले, तर ती पोस्ट फेल गेली, असं समजण्याचा काळ हा! तिथं अभ्यास आदी करण्यासाठी ग्रंथ इ. वाचणं हा प्रकार फारच 'ई' होता. हल्लीच्या ई-बुकांच्या जमान्यात असले 'ईई' प्रकार करायला आम्ही काही अगदी 'हे' नव्हतो. आता काय करावे बरे, या विचारात सचिंत की कायसे होऊन आम्ही बसलो होतो. हातात चाळा म्हणून पेपर धरला होता. सहज म्हणून आमचं लक्ष एका बातमीकडं गेलं आणि आम्ही हरखलो. आनंदाच्या झोक्यावर बसून उंच उंच आभाळी गेलो. मग आम्हाला गगन ठेंगणे झाले. नंतर आनंद गगनात मावेनासा झाला आणि आभाळमाया दाटून आली. असे बरेच प्रकार झाल्यावर आम्ही पुनश्च जमिनीवर आलो. त्या बातमीकडं वारंवार पाहू लागलो. अतिआनंदानं डोळे झरू लागले. साक्षात संमेलनाध्यक्ष बोलले होते. कित्ती कित्ती दिवसांनी बोलले होते...
ते बोलत नव्हते, गप्प गप्प होते म्हणून महाराष्ट्राचं साडेतीन पेठांत पसरलेलं सांस्कृतिक विश्व गाढ झोपी गेलं होतं. झोप कसली; काळनिद्राच ती! श्रावणात फुकटचं मेहुण म्हणून, पुरणपोळीचं जेवण हाणून, तुपकट चेहऱ्याचं समाधान चेहऱ्यावर आणून, पंखा चारवर फिरवून गारेगार झोपणं म्हणजे दुसरं काय! काळनिद्राच! या पापाला क्षमा नाही... नाही, नाही! अशा या तुप्पाळ, मध्यमवर्गी सांस्कृतिक पुरुषाला गदागदा धरून, पेकाटात लाथ घालून हलवलं ते संमेलनाध्यक्षांनी... माजी संमेलनाध्यक्षांच्या पाठीत त्यांनी जाता जाता चार रट्टे घातले आणि 'केवळ मेहुण म्हणून मिरवण्यात त्यांनी धन्यता मानली,' अशी सिंहगर्जनाच त्यांनी करून टाकली. हा प्रकार घडल्यानंतर एका माजी संमेलनाध्यक्षांनी हे सगळं प्रकरण स्वतःवर ओढवून घेतलं आणि एक स्पष्टीकरण देऊन टाकलं. मग माजायची ती खळबळ माजलीच आणि माध्यमांत नेहमीप्रमाणं हे प्रकरण गाजवण्यात आलं.
एवढं सगळं झाल्यावर संमेलनाध्यक्षांच्या घरी जाऊन चहा घेणं आलंच. चहासोबत त्यांची एक फर्मास मुलाखतच घेऊन टाकू, असा विचार करून आम्ही कुमठेकर रस्त्याच्या दिशेनं कूच केलं. संमेलनाध्यक्षांच्या घरी जाणं हे कुमठेकर रस्त्यावर वाहन पार्क करण्यापेक्षा कमी धार्ष्ट्याचं आहे, असं आमच्या लक्षात आलं. आम्ही घरात पाऊल टाकताक्षणीच, 'लले, दोन कप चहा टाक' ही चिरपरिचित गर्जना कानी आली आणि आम्हास गुदगुल्या झाल्या. मागं म्हटल्याप्रमाणं एक कप चहावर एक तास व्याख्यान ऐकायची आमची तयारी असते. त्यानंतर मात्र आम्हास दुसरा कप लागतो. चहा होईपर्यंत आम्ही संमेलनाध्यक्षांचा अंदाज घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरून ते आनंदात आहेत की दुःखात, चिडले आहेत की रागावले आहेत याचा काही थांगच लागत नाही. पण चहा घेतल्यावरही ते शांत होते तेव्हा ते आनंदात असावेत, असा निष्कर्ष काढून आम्ही प्रश्नोत्तरास हात घातला. 

ठोंब्या : माजी संमेलनाध्यक्षांत सगळ्यांत चांगलं मेहुण कोण होतं?

संमेलनाध्यक्ष : कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे. कारण हे नवरा-बायको दोघंही अध्यक्ष होते आणि त्यामुळं त्यांना डबल मान मिळाला. विश्राम बेडेकर आणि मालतीबाई बेडेकर यांचंही नाव घातलं असतं. पण मालतीबाईंचं समांतर संमेलन होतं. समांतर मेहुणाची पद्धत आपल्यात नाही.

ठोंब्या : संमेलनाध्यक्षांनी मेहुण म्हणून काय काय तयारी करावी?

सं. अ. : त्यांनी लग्न करावं. हो, हे अगदी आवश्यक आहे. त्याशिवाय मेहुण नसतं. बिनलग्नाचे अनेक पार्टनर साहित्यिकांना असतात. ते चालणार नाही. रीतसर लग्नच व्हायला हवं.

ठोंब्या : आणि दोन कप च्या?

सं. अ. : हो, हा महत्त्वाचा निकष आहे. आल्या-गेल्याला आल्याचा चहा देता आला पाहिजे. त्यासाठी आपलं खटलं चहात तरबेज हवं. खरं तर ही प्रथा आम्ही सुरू केली आहे. आमच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची प्राज्ञा अजून कुणाची झालेली नाही. कारण हिच्या हातचा आल्याचा चहा... 

ठोंब्या : समजा, आलं नसेल तर कुणी काय करावं?

सं. अ. : मराठी साहित्यिकाच्या घरी आलंही नसेल, तर तो गेल्यातच जमा आहे. आलं नसणं हा मराठी सारस्वताचा अपमान आहे. आलं असलंच पाहिजे. आलं नसेल, तर वेलदोडा घाला. पण हे म्हणजे बायको नाही म्हणून सुपारी ठेवून सत्यनारायणाची पूजा करण्यापैकी आहे. सुपारी ही अर्धांगाला पर्याय असू शकत नाही. सुपारीची कामं निराळी; बायकोची निराळी... ती मी निराळ्या व्याख्यानात सांगीन.

ठोंब्या : सांगून टाका ना... तसाही विषय भरटकलाय... एक फरक दिसतोय. सुपारी उचलता येते; बायको...

सं. अ. : गप्प बसा. विषय मी भरकटवलेला नाही. तुम्ही याला जबाबदार आहात. तुम्हीही माजी संमेलनाध्यक्षांसारखेच अगदीच हे दिसता...

ठोंब्या : 'हे' म्हणजे?

सं. अ. : मोठा विषय आहे. व्याकरणदृष्ट्या पाह्यला गेलं तर 'हा' म्हणजे पुल्लिंगी, 'ही' म्हणजे स्त्रीलिंगी आणि...

ठोंब्या : राहू द्या, राहू द्या. 'हे' आपलं इथंच राहू द्या. मी पुढचा प्रश्न विचारतो. संमेलनाध्यक्षानं मेहुण म्हणून प्रत्यक्ष कार्यस्थळी मिरवण्यासाठी काय काय पूर्वतयारी करावी?

सं. अ. : एक तर त्यांनी घरातल्या घरात मिरवण्याची प्रॅक्टिस करावी. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यापासून सदैव एक पोझिशन घेऊन बसावं. अगदी सकाळच्या त्या महत्त्वाच्या कृत्याच्या वेळीही तुम्ही एक विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि वैचारिक पोझ घेऊन बसलं पाहिजे. त्या महत्त्वाच्या कृत्याच्या वेळेपासून ते निशासमयीच्या अतिमहत्त्वाच्या कृत्यापर्यंत सदैव तुम्ही ही पोझ घेऊन बसलं पाहिजे. रात्री तुम्ही नैमित्तिक वैषयिक पोझ पण घेऊ शकता. साहित्यिक हा संत नव्हे. या कृत्यापासून त्या कृत्यापर्यंत पोझ घेतली असेल, तरच तुम्हाला कृतकृत्य झाल्यागत वाटेल.

ठोंब्या : एक मिनिट, एक मिनिट... त्या सकाळच्या महत्त्वाच्या कृत्याच्या वेळी सगळी माणसं एकच पोझ घेतात. ही अशी...

(आम्ही सोफ्यावर ती कृती करायला आणि वैनींनी दुसरा कप आणून ठेवायला एकच गाठ पडली. आम्ही सोफ्यावरून कोलमडलो.)

सं. अ. (भिजलेल्या बकरीकडं पाहावं तशा कारुण्यपूर्ण नजरेनं पाहत) : हूं: अशी कुणालाही पोझ घेता येत नसते. हे वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आणि उन्नत माणसाचं काम आहे.

ठोंब्या : तुम्ही करून दाखवता का मग?

सं. अ. (अतीव संतापानं आणि पाय वर घेत) : मी ऑलरेडी पोझिशन घेतली आहे, घेतली आहे. 

ठोंब्या : बरं, बरं. रागावू नका. अजून काय तयारी करायची पोझ सुटली की?

सं. अ. : येईल ती गावभरातली कार्यक्रमाची आमंत्रणं स्वीकारायची. एखाद्या फुटकळ कवीच्या पुस्तक प्रकाशनापासून (इथं त्यांनी टी-पॉयवर पडलेल्या 'नव्हाळीच्या कविता'ची कॉपी उचलली... हाय रे कर्मा!) ते 'हिप्पेटायटिस- बीवर युनानी उपचार' या विषयावरच्या परिसंवादापर्यंत कोणताही कार्यक्रम सोडायचा नाही. कार्यक्रमाला आलो तर दोघंही येऊ असं सांगायचं. जेवायची आणि नेण्या-आण्याची सोय करायला सांगायची. मानधन मजबूत सांगायचं. कमी मानधन घेणारा पुढल्या जन्मी 'नव्हाळीचा लेखक' होतो... (पॉझ घेत) तुमच्यासारखा...! हॅ हॅ हॅ... 

ठोंब्या (लाजत) : हो, हो... तसं आम्हाला सगळे ल्हानपणापासूनच ठोंब्या म्हणतात, ते त्यासाठीच. प्रकाशक तर हा हा म्हणता आम्हाला गुंडाळतात आणि खिशात ठेवतात. तर ते असो. तुम्ही बोला... 

सं. अ. : हां, तर आधी आपण मेहुण म्हणून गावभर मिरवून घ्यायचं. प्रत्यक्ष संमेलनात तर आपण आणि आपली लली - आय मीन - पत्नी या दोन व्यक्ती नसून, एकच व्यक्ती आहेत असाच भास सगळ्यांना झाला पाहिजे एवढं चिकटून राहायचं. लग्नाला तीस वर्षं झालीयत, की तीस मिनिटं असा संभ्रम पडेल, असं नवविवाहित जोडप्यागत वागायचं. खेटत राहायचं. खेटायचं सोडायचं नाही. हे पाहून काही काही लोक तर आहेराची पाकिटंही देतात. ती घालायची खिशात गपचूप...

ठोंब्या (डोळे विस्फारून) : काय सांगता? लेखकालाही पाकीट मिळतं? आम्ही तर फक्त पत्रकारांनाच मिळतं, असं ऐकून होतो.

सं. अ. (हसत) : म्हणूनच तुम्ही अगदी ठोंब्या आहात, एक नंबरचा ठोंब्या... 

(इथं सं. अ. प्रेमानं आमचा गालगुच्चा घेतील की काय, असे भय उत्पन्न झाले. आम्ही लगेच दूर पळालो.)

ठोंब्या : ते तर आहेच हो. पण एकूण संमेलनाध्यक्षांनी नुसतं मेहुण म्हणून मिरवलं असा तुमचा आरोप नाहीच्चे तर...

सं. अ. : नाही ना... तेच तर. अहो मला म्हणायचं होतं, की माजी संमेलनाध्यक्षांनी नुसतंच मेहुण मिरवलं. माझ्यासारखं 'नीट' नाही मिरवलं... कारण त्यांना शिकवायला मी नव्हतो ना तेव्हा!

ठोंब्या : अच्छा, अच्छा. आलं लक्षात. म्हणजे यापुढच्या संमेलनाध्यक्षांनी मेहुण म्हणून कसं मिरवावं हे तुमच्याकडूनच शिकावं असं म्हणता?

सं. अ. : अगदी. हे संमेलनाध्यक्षपद संपलं, की आम्ही तसा क्लासच काढणार आहोत. 'येथे उत्कृष्ट मेहुण कसे मिरवावे हे शिकवले जाईल,' असा बोर्डच टांगणार आहे खाली...

ठोंब्या : वा.. वा... क्लासला एक नाव सुचवू? मेहुणचार! कसं आहे?

सं. अ. : झक्कास... द्या टाळी...

इथं आम्ही टाळी द्यायला हात पुढं केला, तो हात कुणी तरी खस्सकन ओढला. सं. अं.नी असं का केलं, म्हणून पाहतो तो साक्षात आमचं अर्धांग समोर उभं! 'अहो, उठा. पुरणपोळ्या हादडून झोपलाय कधीचे. दोन तास झाले आता. उठा. आणि झोपेत टाळ्या कसल्या देताय हवेतल्या हवेत?..' हिचा चिरपरिचित वरचा 'सा' ऐकून आम्ही नीटच जागे झालो. काय झालं ते एकदम लक्षात आलं.
...आणि मग आम्ही हसून तिला म्हटलं, 'ठोंबे, दोन कप चहा टाक'!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, सप्टेंबर २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

2 comments:

  1. ठोंब्याची स्वप्ने कसली भारी असतात ...संपूच नयेत असे वाटत ..' मेहुणचार ' कसला मस्त शब्द 👌👌👍😊💐

    ReplyDelete