17 Aug 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा
‘दोबारा’ देखी, तो अकल बुरा मान जाएगी...
----------------------------------------------------------------------------------------

‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई - दोबारा’ या मुळात मुंबईच्या लोकलसारख्या (आणि वर ‘दोबारा’ हा शब्द जोडल्याने आठ डब्यांऐवजी बारा डब्यांच्या लोकलएवढ्या) लांबलचक नावाचा आणि जवळपास पावणेतीन तास एवढ्या लांबलचक वेळेचा सिनेमा एकदा बघितल्यावर त्यातल्या नायकाचीच भूमिका करणाऱ्या व्हिलनचा संवाद थोडा बदलून म्हणावंसं वाटतं - अगर मैंने ये फिल्म ‘दोबारा’ देखी, तो मेरी अकल बुरा मान जाएगी!
‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ हा या सिनेमाचा पहिला भाग आणि त्यानंतर ‘डर्टी पिक्चर’सारखा ‘बुम्बाट’ सिनेमा देणाऱ्या मिलन लुथरियानं हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीला तशी पाटी येते, म्हणून असं म्हणायचं एवढंच. बाकी मिलननं या सिनेमात केवळ तीच नाही, तर पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत फक्त पाट्याच टाकल्या आहेत, हे पहिल्या रिळातच लक्षात येतं.
साठच्या दशकात मुंबईत संघटित गुन्हेगारीचा झालेला उदय, त्यानंतर एकेका डॉनची भाईगिरी, दादागिरी आणि त्यांची दहशत याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यावर अनेक दिग्दर्शकांना सिनेमे काढण्याचा मोह झाला. या भाईलोकांचा हिंदी चित्रपटसृष्टीवर असणारा वचक आणि त्यांचं ‘लव्ह-हेट’ नातं याचंही एक सुप्त आकर्षण अनेकांना आहे. दाऊद इब्राहिम हा या कुख्यात भाईलोकांमधला सर्वांत नीच, पाताळयंत्री माणूस. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आता उंदरासारखा पाकिस्तानात लपून बसलेला हा भ्याड माणूस सिनेमाचा विषय नक्कीच होऊ शकतो. मात्र, देशाचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार असलेल्या या माणसावर त्याच्या नावाने सिनेमा काढायला सिनेमावाली मंडळी घाबरतात. मग खोटं नाव देऊन आणि ‘सर्व पात्रं काल्पनिक’ असं म्हणून सुटका करून घेता येते. मिलनही तेच केलंय. या सिनेमात दाऊदचं नाव त्यानं केलं आहे शोएब. अर्थात सुरुवातीला यातली सर्व पात्रं काल्पनिक आहेत, अशी पाटी मात्र नाही. तेव्हा दिग्दर्शकाच्या मनातल्या गोंधळाला येथूनच सुरुवात होते.
‘वन्स अपॉन’चा पहिला भाग निखालस गुन्हेगारीपट होता. हाजी मस्तान, करीम लाला आणि वरदा या अट्टल तस्करांकडून मुंबईच्या अधोविश्वाची सत्ता दाऊदकडं कशी जाते, याची नीटस मांडणी मिलननं त्या सिनेमात केली होती. या सिनेमात दाऊद मुंबईत कसा जम बसवतो आणि त्यानंतर या शहरात काय काय धंदे करतो, येथपासून मुंबईच्या बॉम्बस्फोटापर्यंतचा प्रवास तो दाखवील, अशी स्वाभाविक अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षांना सुरुंग लावून दिग्दर्शक एक (कथित) प्रेमत्रिकोणाची कथा आपल्यासमोर मांडतो. अर्थात त्यात चूक काहीच नाही. त्यानं ही कथा नीट मांडली असती, तर या अपेक्षाभंगाचंही दुःख झालं नसतं. मात्र, त्यानं ही कथाही धड मांडलेली नाही. त्यामुळं अपेक्षाभंगाचं दुःख ‘दोबारा’ वाट्याला येतं.
या सिनेमाच्या सुरुवातीपासूनच सतत काही तरी बिनसल्याचा फील येतो. आधी दोन मुलांच्या रेसचं दृश्य येतं. त्यानंतर खुद्द शोएबचं (अक्षयकुमार) दर्शन होतं. या दोन मुलांना कामावर ठेवण्याचा आदेश शोएब आपल्या माणसांना देतो. ही दोन मुलं म्हणजेच अस्लम (इम्रान खान) आणि देढटांग (पितोभाष त्रिपाठी) नंतर त्याचे खास विश्वासू माणसं होतात. त्यानंतर एक-दोन रिळं इकडं-तिकडं चाचपडल्यानंतर सिनेमात नायिकेचं म्हणजेच जस्मिनचं (सोनाक्षी सिन्हा) आगमन होतं. जस्मिनची एकाच वेळी शोएब आणि अस्लमशी ओळख होते आणि दोघेही एकदम तिच्यावर प्रेम करू लागतात. स्वाभाविकच कथा एकदम या प्रेमत्रिकोणाकडं झुकते. त्यानंतर भाईची गुंडगिरी साइड-बाय-साइड आणि लव्हस्टोरी मुख्य ट्रॅकवर चालते. ती शेवटपर्यंत आपला कंटाळा घालवू शकत नाही.
अक्षयकुमारचा गेटअप आणि एकूण लूक चांगला आहे. तरीही तो ‘दाऊद’ वाटत नाही. चित्रपटातील पहिला संवाद म्हणताना त्यानं आवाजाची एक विशिष्ट पट्टी (पीच) राखली आहे. विशेष म्हणजे शेवटपर्यंत त्यानं ती सोडलेली नाही. मात्र, सदैव त्याला त्याच पीचमध्ये ऐकताना कंटाळा येतो. तीच गोष्ट संवादलेखक रजत अरोराची. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकायचा अशा इराद्याने त्यानं या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. ‘अगर मैं अच्छा इन्सान बना, तो मेरी पहचान बुरा मान जाएगी’ हे किंवा असलेच अनेक संवाद आपण प्रोमोजमध्ये पाहिले आहेत. हे सातत्यही दाद देण्यासारखे असले, तरी कुठलीही व्यक्ती सदैव टाळ्याखाऊ वाक्यांतच कशी बोलेल? आपण रोज पुरणपोळी किंवा बिर्याणी खातो का? पण मिलन-रजतची पात्रं प्रत्येक संवाद अगदी टेचात उच्चारतात. ते काही काळानं अत्यंत विनोदी वाटू लागतं. शिवाय प्रत्यक्षात विनोद म्हणून लिहिलेले संवाद अश्लीलतेकडं झुकल्यानं बऱ्याच ठिकाणी सेन्सॉरला ‘बीप’ वाजवावं लागलं आहे. तरी लोकांना व्हायचा तो ‘अर्थकोर्स’ होतोच!
सोनाक्षी सिन्हाची कामगिरी बरी असली, तरी शेवटच्या दृश्यात ती कर्कशपणे शोएबवर ओरडताना बघवत नाही. तीच गोष्ट इम्रान खानची. या चिकन्याचुपड्या हिरोला अस्लमची भूमिका शोभलेली नाही. काही काही दृश्यांत टाळ्याखाऊ संवाद बोलताना त्याची कुचंबणा झालेली स्पष्ट जाणवते. मात्र, अस्लमची प्रेमी म्हणून जी शेड आहे, ती त्यानं चांगली रंगवली आहे. पितोभाष त्रिपाठीनं साकारलेल्या ‘देढटांग’ची भूमिका लक्षात राहणारी आहे. महेश मांजरेकरचा रावल हा खलनायक लिखाणातच फार वाव नसलेला आहे. त्यामुळं जस्मिनला जखमी करण्यापलीकडं त्यानं फार काही साधलेलं नाही.
पहिल्या सिनेमातली गाणी चांगली होती. या सिनेमात मात्र प्रीतमनं काहीशी निराशा केली आहे. ‘तैयबअली प्यार का दुश्मन हाय हाय’ या ‘अमर अकबर अँथनी’त ऋषी कपूरनं साकारलेल्या जबरदस्त लोकप्रिय गाण्याचं नवं रूप या सिनेमात पाहायला मिळतं. इम्राननं या गाण्यात धमाल केली आहे.
मात्र, असे काही तुरळक प्रसंग सोडले, तर संपूर्ण सिनेमा अत्यंत कंटाळवाण्या वेगानं पुढं सरकतो. त्यामुळं एकदा हा सिनेमा बघणारा माणूस ‘‘दोबारा’ देखी, तो मेरी अकल बुरा मान जाएगी...’ असं म्हणणार यात शंका नाही.
---
निर्मिती : बालाजी मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : मिलन लुथरिया
लेखक, संवाद : रजत अरोरा
संगीत : प्रीतम
प्रमुख भूमिका : अक्षयकुमार, इम्रान खान, सोनाक्षी सिन्हा, पितोभाष त्रिपाठी, महेश मांजरेकर
दर्जा : **
---
(पूर्वप्रसिद्धी - १७ ऑगस्ट २०१३, महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती)

10 Aug 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - चेन्नई एक्स्प्रेस

चालो, ये पिच्चर देखेगी...
अय्यय्यो, रामा, शिवा, गोविंदा... शाहरुखा, दीपिका, रोहिता... क्या पिच्चर बनाई! क्या पिच्चर बनाई! चेन्नई एक्स्प्रस्स... हमारी गाव की नाम की पिच्चर... नंबर वन्न... फुल्ल यंटरटनमंट्ट... यंटरटनमंट्ट... और्र यंटरटनमंट्ट! हिरो कैसा यकदम चिकना... हिरोइन भा कैसा यकदम लंबा, लंबा और ब्यूटीफुल्ल, ब्यूटीफुल्ल... दोनों के गाल्ल पर डिम्पल्ल, डिम्पल्ल... और्र स्टोरी यकदम सिम्पल्ल... सिम्पल्ल... यन्ना रास्कला... मैं मीना, अपनी पूना की मीना... तुम को बोलती - चालो, हम-तुम ये पिच्चर देखेगी... फिर देखेगी... और्र फिर देखेग्गी!
...रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या नव्या हिंदी सिनेमाविषयी खरं तर याच भाषेत लिहायला हवं. 'जब तक है जान'च्या वेळी काहीसा ढपलेला वाटलेला आणि आता पुन्हा फॉर्मात आलेला शाहरुख खान, त्याला दीपिका पदुकोणच्या अप्रतिम अभिनयाची मिळालेली साथ आणि सध्या 'हात लावीन तिथं शंभर कोटी' असा परीस गवसलेल्या रोहित शेट्टी नामक हलवायानं पुन्हा एकदा जमविलेली भट्टी... यामुळं 'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक प्रेक्षणीय अनुभव ठरतो. मुख्य प्रवाहातल्या हिंदी सिनेमाकडून प्रेक्षकांच्या ज्या ज्या अपेक्षा असतात, त्या हा सिनेमा पूर्ण करतो. त्यामुळं 'अडीच तास डोक्याला नो त्रास' हा मूलमंत्र जपणाऱ्या कोणाही प्रेक्षकाला आपले (वाढीव रेटचे) पैसे वसूल झाल्याचं समाधान 'चेन्नई एक्स्प्रेस' नक्कीच मिळवून देतो.
नायक राहुल (शाहरुख) त्याच्या आजीच्या आग्रहावरून आजोबांच्या अस्थी रामेश्वरमला विसर्जित करण्यासाठी निघाला आहे. खरं तर त्यानं मित्रांसोबत परस्पर गोव्याला जाण्याची योजना आखली आहे. मात्र, स्टेशनवर सोडायला आजी आल्यानं त्याला ट्रेनमध्ये बसण्याचं नाटक करावं लागतं. इथं त्याला नायिका मीना (दीपिका) भेटते. तिचे वडील तमिळनाडूतील एका गावातील डॉन आहेत. दुसऱ्या गावातील डॉनच्या मुलासोबत तिचं लग्न ठरवल्यानं ती पळून आली आहे. मात्र, तिचे आडदांड चुलतभाऊ तिला पकडून पुन्हा गावाकडं निघालेले आहेत. राहुल मीनासोबत तिच्या गावी पोचतो. बरंच भवती-न-भवती झाल्यानंतर दोघं पळून जातात. सिनेमाच्या उत्तरार्धात मग प्रेमाचा ट्रॅक सुरू होतो. राहुल व मीना जवळच्याच एका गावात राहतात. तिथं एक लग्नसोहळा सुरू असतो. तिथं या दोघांना नवरा-बायको बनून राहावं लागतं. काही 'रस्म' (रस्सम नव्हे) पूर्ण कराव्या लागतात. त्यातून दोघांमधलं 'बाँडिंग' वाढत जातं. मग शेवटी रोहित शेट्टी स्टाइल गाड्यांची उडवाउडवी, तुफान मारामारी, शाहरुखचं एक भावस्पर्शी भाषण आणि मग गोड शेवट...
या सिनेमाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो संपूर्ण कुटुंबाला एकत्र बघून छान एन्जॉय करता येतो. कुठलीही बीभत्सता किंवा हल्लीच्या हिंदी सिनेमांत वाढलेली (नसती) फिजिकल इंटिमसी यांना या करमणूकपटात अजिबात स्थान नाही. साधारण आठ ते बारा वयोगटातील मुले (आणि त्या मानसिकतेचे कुठल्याही वयाचे प्रेक्षक) डोळ्यांसमोर ठेवून रोहितनं चेन्नई एक्स्प्रेस काढला आहे. त्यामुळं मारामारीचे काही दाक्षिणात्य शैलीचे भडक प्रसंग सोडले, तर संपूर्ण सिनेमावर फील गुड क्षणांची प्रसन्न छाप आहे. आणि हेच या चित्रपटाचं मोठं बलस्थान ठरलं आहे. शाहरुख खान अनेकदा ओव्हरअॅक्ट करतो. त्याचे ते विशिष्ट शैलीतले मॅनरिझम (तिरकं डोकं करून मान झुकवणं, किंवा ओठांची विचित्र हालचाल करणं, किंवा गाण्यात दोन्ही हात फैलावून कमरेत तिरकं वाकणं वगैरे) कधी कधी बोअर होतात. पण या सिनेमात रोहितनं शाहरुखचे हे सगळं गुण-अवगुण योग्य प्रमाणात वापरल्यानं ते कंटाळवाणे वाटत नाहीत. किंबहुना ते प्लस पॉइंट ठरतात. स्वतः शाहरुखनं अनेक प्रसंगात त्याची अभिनेता म्हणून असलेली छाप उमटवली आहे. त्यातून शाहरुख पुन्हा फॉर्मात आल्याचं जाणवतं. त्याला अतिशय अप्रतिम साथ दिलीय ती दीपिकानं. तमिळ मुलगी मीनाची भूमिका तिनं तंतोतंत साकारली आहे. (त्यात ती 'पूना'ची राहणारी आहे, हे कळल्यावर आणि मध्येच एकदा ती 'तुझ्या नानाची टांग', 'तुझ्या आयचा घो' असं शाहरुखला सुनावते, तेव्हा टाळ्याच घेते.) तिची हिंदी उच्चारणाची एक विशिष्ट शैली तिनं शेवटपर्यंत कायम ठेवली आहे. ती दाक्षिणात्य वळणाची हिंदी ऐकायला खूप गोड वाटते. तिनं या सिनेमात साकारलेला स्वप्न पडण्याचा प्रसंग पाहण्यासारखा आहे.
'चेन्नई एक्स्प्रेस' ही प्रेमकहाणीच आहे. पण तिची ट्रीटमेंट अगदी वेगळी आहे. सुरुवातीपासून या सिनेमानं एक विनोदी ढंग अंगीकारला आहे. अशा प्रसंगी नायकाला चॅप्लिनसदृश कारनामे करायला लावण्याचा मोह अगदी स्वाभाविक आहे. मात्र, शाहरुखची अभिनयप्रकृती पाहून रोहितनं तो मोह टाळला आहे, ही बाब विशेष अभिनंदनीय. त्याऐवजी त्यानं शाहरुखच्या यापूर्वीच्या लोकप्रिय भूमिकांची आठवण करून देणारे प्रसंग पेरून हा ढंग खुलवला आहे. त्या दृष्टीनं सुरुवातीला ट्रेनमध्ये शाहरुख-दीपिका शाहरुखच्या लोकप्रिय गाण्यांच्या भेंड्या खेळतात, तो प्रसंग पाहण्यासारखा आहे. याशिवाय सिनेमातले संवादही चटपटीत आहेत. शाहरुखच्या लोकप्रिय सिनेमांतल्या गाण्यांसोबत लोकप्रिय संवादही (डोण्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ द कॉमन मॅन, माय नेम इज राहुल, आय अॅम नॉट टेररिस्ट इ.) जागोजागी वापरण्यात आले आहेत. हे संवाद शाहरुखच्या फॅन्सना नॉस्टॅल्जिक करतात आणि उत्स्फूर्त टाळ्याही मिळवतात. (अर्थात एका मोबाइल हँडसेटची किमतीसकट केलेली जाहिरात, भले तो हँडसेट महागडा असला, तरी फारच 'चीप' आहे!) असो.
मुलींना अजूनही पती निवडण्याचं स्वातंत्र्य नाही, हे सांगताना शाहरुखनं शेवटाकडे जो एक लांबलचक संवाद म्हटला आहे, तो त्यानं अगदी मनापासून साकारल्याचं जाणवतं. या दृश्याला तो टाळ्या घेतो, यात आश्चर्य नाही.
सिनेमात मोजकीच गाणी आहेत. शेवटच्या टायटल्सना येणारं गाणं धरून पाच गाणी आहेत. त्यातही दुसऱ्या भागात दोन गाणी अगदी लागोपाठ येतात. ही गाणी अगदीच ग्रेट नसली, तरी सुमारही नाहीत. विशेषतः शाहरुख आणि दीपिकाचं एक रोमँटिक ड्युएट पैसावसूल आहे. पूर्वार्धात येणारं आयटेम साँगही ठेकेदार आहे. चित्रपटात दूधसागर धबधब्याचं अप्रतिम दर्शन घडवलंय. रामेश्वरम आणि तिथल्या रेल्वेपुलाचं दर्शनही छान. एकूणच रेल्वेचे सर्व प्रसंग खास चित्रित केलेयत. एकूणच, सिनेमॅटोग्राफी एक नंबर आहे.
(अर्थात कल्याणहून कर्जतला चाललेली ट्रेन सिंगल ट्रॅकवरून आणि डिझेल इंजिन लावून का धावते, हे विचारायचं नाही. सुरुवातीला म्हटलं, तसं कोणतेही तर्कसुसंगत विचार मनात न आणता फक्त करमणूक म्हणून पाहण्याची ही चीज आहे. शिवाय या हिंदी सिनेमात एवढी तमीळ वापरली आहे, की या सिनेमाची भाषा हिंदी-तमिळ अशीच लिहायला हवी होती. शिवाय सबटायटल्स नसल्यानं एवढे तमीळ संवाद झेपत नाहीत. यामागचं लॉजिकही दिग्दर्शकानं सिनेमात सूचकपणे सांगितलंय. पण तरीही हे तमिळी संवादाचे खडे कमी करायला हवे होते. असो.)
आणि हो, शाहरुखनं दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर जाहीरपणे सांगितल्यानुसार, या सिनेमापासून त्याच्या नायिकेचं नाव त्याच्याआधी पडद्यावर झळकायला सुरुवात झाली आहे. तेव्हा सुरुवातीची टायटल्स चुकवू नका आणि शेवटची तर तुम्ही चुकवू शकणारच नाही. कारण तिथं साक्षात रजनी सरांचं (भले फोटोंच्या रूपानं का होईना) दर्शन घडतं.
सो... बोर्ड ऑन धिस एक्स्प्रेस फॉर फुल्ल फन जर्नी....
वाई वेट्टिंग... चालो....
---
निर्माते - रेड चिलीज, यूटीव्ही मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - रोहित शेट्टी
संगीत - विशाल-शेखर
संवाद - साजिद-फरहाद
प्रमुख भूमिका - शाहरुख खान, दीपिका पदुकोण, सत्यराज, निकेतन धीर
दर्जा - ****

(पूर्वप्रसिद्धी - १० ऑगस्ट, महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती)
---