30 Apr 2020

महाराष्ट्र हीरकमहोत्सव विशेष

बहु असोत सुंदर, संपन्न....
-----------------------------


आजच्या शुक्रवारी, म्हणजे एक मे २०२० रोजी महाराष्ट्र साठी पूर्ण करतोय. साठीसोबत येणारा वाक्प्रचार फार काही चांगला नाही. पण तो व्यक्तीच्या संदर्भात असल्यानं सहज दुर्लक्षिता येईल. महाराष्ट्र हे आपलं एक राज्य असल्यानं त्याची साठी म्हणजे आपणा सर्व महाराष्ट्रवासीयांसाठी सुखाचा, आनंदाचा, जल्लोषाचा क्षण! आत्ता ‘करोना’ साथीमुळं आपल्याला हा जल्लोष एकत्र येऊन करता येत नसला, तरी या महत्त्वाच्या टप्प्याची नोंद करायलाच पाहिजे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सहजासहजी झाली नाही. त्यासाठी इथल्या जनतेला मोठं आंदोलन करावं लागलं. एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले. तो सर्व इतिहास आता नव्या पिढीला कदाचित माहितीही नसेल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी; मात्र ती मिळविण्यासाठीही इथल्या नेत्यांना रक्ताचं पाणी करावं लागलं. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे अशा नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्राणपणाने लढला. चिंतामणराव देशमुखांसारख्या महाराष्ट्रभक्त नेत्याने आपल्या केंद्रीय अर्थमंत्रिपदावर सहज पाणी सोडले. सेनापती बापट यांच्यासारखा वयोवृद्ध सेनानी या लढ्याच्या अग्रभागी उभा ठाकला. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविण राष्ट्रगाडा न चाले’ असे अत्यंत अभिमानास्पद, ज्वलज्जहाल उद्गार त्यांनी काढले आणि मराठी जनतेला स्फुरण चढले. एकदा राज्य स्थापन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने या राज्याच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली. हा सगळा इतिहास इथे पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे राज्याच्या साठीनिमित्त या सर्व कालखंडात नक्की काय घडलं, काय घडणं अपेक्षित होतं आणि पुढे काय व्हायला हवं याची किमान चर्चा तरी व्हावी.
महाराष्ट्रात बहुसंख्य जनता मराठी बोलणारी असल्यानं या लेखापुरता तरी मराठी माणसांचाच विचार केला आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले आणि इथलेच झाले असे सगळे लोक मराठीच आहेत. काहींची मातृभाषा कदाचित मराठी नसेल, पण अनेक वर्षं, अनेक पिढ्या इथं राहिल्यानं ते मराठीच आहेत. महाराष्ट्राचा स्वभाव रांगडा आहे; तिखट आहे, ग्रामीण आहे. (ग्राम्य नव्हे!) शेती करणं, कष्टाने पैसा मिळवणं, तमाशा आदी संगीत मनोरंजन प्रकारात मन रमवणं या त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातलं जीवन कसं होतं, ते आठवून पाहा. पिठलं-खर्डा-भाकरी खाणे, गणपती आणि दिवाळी हे सण मनापासून साजरे करणे, संध्याकाळी गावातल्या देवळात कीर्तनाला जाणे आणि शनिवारी रात्री फडाला जाणे यात ग्रामीण जीवन सामावलं होतं. शहरी जीवनही तसं साचेबद्धच होतं. बँक, एलआयसी किंवा सरकारी कचेरीत सकाळी दहा ते पाच नोकरी करणं, शनिवारी एखादं नाटक बघणं आणि क्वचित कधी तरी हॉटेलांत जाऊन जेवणं यात शहरी मध्यमवर्ग खूश होता. साठच्या दशकात आलेल्या अनेक मराठी चित्रपटांत या दोन्ही जगण्याचं प्रतिबिंब दिसेल. साहित्यातही सापडेल. ग्रामीण महाराष्ट्राचं व्यक्तिचित्र कुणाला हवं असल्यास व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या साहित्यात तो गवसेल. शहरी महाराष्ट्र व. पु. काळे यांच्यापासून शं. ना. नवऱ्यांपर्यंत अनेकांनी रेखाटला आहे. नैसर्गिक दुष्काळ आणि अभावग्रस्तता इथल्या जनतेच्या पाचवीला पुजली होती. पण तरी लोक असमाधानी नव्हते. अपेक्षा थोड्या होत्या, जगणं साधं-सोपं होतं.
साठच्या दशकात सहकार चळवळीनं ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या कारखान्यांच्या सभोवती समृद्धीची बेटं तयार झाली. काही मोजक्या कारखानदारांनी आणलेल्या उद्योगांमुळे छोट्या छोट्या, स्वयंपूर्ण वसाहती उभ्या राहिल्या. या बेटांवरचं जगणं उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं झालं. विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाले असले, तरी त्यांचं भौगोलिक, सांस्कृतिक वेगळेपण कायम होतं. मराठी भाषेच्या दुव्यानं हा सगळा भाग एका धाग्यात सांधला गेला. शिवाय हे राज्य अस्तित्वात येण्याआधीपासून इथं असलेली संतपरंपरा, वारकरी संप्रदाय यामुळं अंतरीचा जिव्हाळा होताच. ग्रामीण महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजत असतानाच वसंतराव नाईकांसारख्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात हरितक्रांती, धवलक्रांतीची बीजं रोवली. एके काळचा दुष्काळी, रखरखाटी महाराष्ट्र निदान काही परिसरापुरता तरी हिरवागार झाला, दुधदुभत्यानं न्हाऊ लागला. याच वेळी शहरांमध्ये, विशेषत: मुंबई व पुण्याच्या परिसरात औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. मुंबई अद्यापही गिरण्यांचं शहर होतं. इथल्या कापड गिरण्यांची आणि त्याला जोडून वस्ती असलेल्या लालबाग-परळची एक वेगळीच गिरणगाव संस्कृती त्या अवाढव्य महानगराच्या एका कुशीत सुखानं नांदत होती. मुंबई, पुण्याच्या जोडीनं नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर ही शहरंही चांगलीच विस्तारत होती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा हा दहा-पंधरा वर्षांचा काळ कदाचित सर्वोत्कृष्ट काळ असावा. या काळातलं राज्यातलं सामाजिक, सांस्कृतिक जीवन रसरशीत होतं. साहित्यातही विद्रोही, दलित, स्त्री असे विविध प्रवाह नव्याने एकत्र येत होते. पुलंच्या बहुरूपी प्रयोगांपासून ते विजय तेंडुलकरांच्या बहुस्पर्शी नाट्यप्रयोगांपर्यंत सारं काही घडत होतं. कलाकारांमध्ये, लेखकांमध्ये नवं काही सांगण्याची, करण्याची ऊर्मी होती; तसंच इथल्या सर्वसामान्य जनतेलाही ते जाणून घेण्यात रुची होती. गावोगावी ग्रंथालये होती आणि नवसाक्षरांचं प्रमाणही वाढत होतं. महाराष्ट्र हे सर्वच बाबतींत देशातलं अग्रेसर, क्रमांक एकचं राज्य अशी प्रतिमा होती.
मात्र, लवकरच या सगळ्या प्रगतीला ग्रहण लागलं. भ्रष्टाचाराचा कली भल्याभल्यांच्या अंगात शिरला. समाजकारणापेक्षा सत्तेचं राजकारण वरचढ ठरू लागलं. याच काळात विजय तेंडुलकरांच्या लेखणीतून उतरलेला ‘सामना’ हा चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक यावं, यात आश्चर्य नव्हतं. पुढच्या काळात सर्वच क्षेत्रांत ही कीड पसरू लागली आणि सामाजिक अस्वस्थतेची ठिणगी पडली. गावोगावी नांदत असलेल्या सलोख्याला सुरुंग लागला. पुढच्या काळात देशात सुरू असलेल्या मंडल आयोग वाद, बाबरी मशिदीचं पतन, जातीय दंगली या सगळ्यांचा परिणाम राज्याच्या प्रकृतीवर झालाच. गिरणी कामगार संपानं मुंबईतलं गिरणगाव उद्ध्वस्त झालं. मुंबईत वाढत असलेल्या टोळीयुद्धाला यातले काही बेरोजगार तरुण बळी पडले. तस्करी, काळा बाजार याला ऊत आला. ताप आलेल्या माणसाचं तोंड कडवट व्हावं, तसं राज्याचं तोंड कडू होऊन गेलं.
नंतर १९९१ मध्ये देशानं जागतिकीकरणाच्या रूपानं मोठा बदल पाहिला. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. इथली शहरं महानगरं झाली आणि महानगरं लोकांच्या लोंढ्यानं फुटून मरणासन्न झाली. ग्रामीण महाराष्ट्रातून बेरोजगारांचे तांडेच्या तांडे शहरांच्या दिशेनं धावू लागले. ऐंशीच्या दशकात सडलेल्या सामाजिक व्यवस्थेचं बेंड जागतिकीकरणाच्या इंजेक्शननं ‌फुटलं. जखम मात्र वाहतच राहिली. शहरांतलं वातावरण वेगानं बदलत गेलं. कुटुंबकेंद्री व्यवस्था कधी व्यक्तिकेंद्री झाली आणि मूल्याधारित सांस्कृतिक धारणा कधी ईहवादी झाल्या, याचा अनेकांना तपास लागला नाही. कला क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत आणि शिक्षणापासून ते साहित्यापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली. एकविसाव्या शतकात तर वेगानं होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं साऱ्या समाजाचीच फरपट चालविली. अनेकांच्या मनात ‘आयडेंटिटी क्रायसिस’ निर्माण झाला. राजकारणातल्या भोंदूपणाने नवनवे तळ गाठले. समाजात द्वेषाची पेरणी झाली. आता तिला महाभयंकर विषारी फळं लगडली आहेत.
हे सगळं असलं, तरी हा महाराष्ट्र इथल्या सर्वसामान्य माणसाच्या शहाण्या समजूतदारपणावर उभा आहे आणि इथून पुढंही उभाच राहील. संत परंपरेचा वारसा आणि छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्याचा इतिहास इथल्या मातीच्या कणाकणात आहे. सह्याद्रीचे भक्कम कोट आणि गोदा-कृष्णेचे अमृततुल्य पाणी इथल्या माणसाच्या अणुरेणूत मुरले आहे. अशा भूमीवर नांदणारे राज्य आता साठ वर्षांचे होऊ घातले आहे. त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊ या. आपल्या पूर्वसूरींना यापेक्षा कोणती चांगली भेट असू शकेल?

----

9 Apr 2020

अनंत दीक्षित स्मरण लेख

दीक्षितसाहेब...
------------------आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, की आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना विसरू शकत नाही. आपल्या आयुष्याला आकार देण्यात, आपलं ‘कच्चं मडकं’ घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. दीक्षितसाहेबांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व असंच आहे. मी १९९७ मध्ये ‘सकाळ’मध्ये ट्रेनी पत्रकार म्हणून रुजू झालो, तेव्हा माझा पहिला इंटरव्ह्यू घेणाऱ्या चौघांत दीक्षितसाहेब होते. मी त्यांना प्रथम पाहिलं ते तेव्हाच.
ते तेव्हा कोल्हापूर आवृत्तीचे संपादक होते. त्यामुळे रोज भेट व्हायची नाही. मात्र, १९९९ मध्ये मला अकल्पितपणे बेळगावचं साहित्य संमेलन कव्हर करायला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा दीक्षितसाहेब पुन्हा भेटले. ते सहकुटुंब कोल्हापूरहून आले होते. अंजली मॅडम व त्यांच्या दोन्ही मुली यांना मी तेव्हाच प्रथम पाहिलं. त्या मुली तर अगदी लहान होत्या. बेळगावची प्रसिद्ध साडी खरेदी करायला त्यांच्यासोबत गेलो होतो. पुढच्याच वर्षी दीक्षितसाहेब पुण्यात संपादक म्हणून रुजू झाले. त्यांच्या संपादक म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांची ओळख आम्हाला हळूहळू पटत गेली. मी आणि माझ्यासोबत असलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांना दीक्षितसाहेबांनी कायम प्रोत्साहन दिलं. अनेक संधी दिल्या. जसपाल भट्टींची मुलाखत घेण्याची संधी त्यांनीच मला दिली. यामुळंच पुढं माझा भट्टींसोबत दीर्घकाळ स्नेह निर्माण झाला. नंतर भट्टींचा एक कॉलमही आम्ही सुरू केला. तो मराठीत भाषांतरित करायची जबाबदारी माझी होती. दीक्षितसाहेबांनी तेव्हा गुलजार यांचंही एक सदर पुरवणीत सुरू केलं होतं. दोन्ही मजकूर अनेकदा शेजारीशेजारी प्रसिद्ध व्हायचे. माझ्या मजकुरावर नाव भट्टींचं असलं, तरी तो मीच लिहिलेला आहे या जाणिवेनं सुख वाटायचं. दीक्षितसाहेबांचं आमच्यावर बारकाईनं लक्ष होतं. अनेकांना त्यांनी दौऱ्यावर पाठवलं, लिहायला प्रोत्साहित केलं. २००१ च्या विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा त्यांनी दीनदयाळ वैद्य, योगेश कुटे व सिद्धार्थ खांडेकर यांच्यासह मला या राज्यांच्या दौऱ्यावर पाठवलं. वयाच्या पंचविशीत मिळालेला हा अनुभव मोलाचा होता.
त्याच वर्षी जानेवारीत नगर जिल्ह्यात कोठेवाडीचं प्रकरण घडलं होतं. या बातमीचं तर संपूर्ण श्रेय दीक्षितसाहेबांना जातं. आमचे पाथर्डीचे बातमीदार अविनाश मंत्री यांना ही घटना घडल्यावर दोन-तीन दिवसांनी त्यातले भयानक तपशील समजले होते. त्यांनाही या बातमीचं गांभीर्य उमगलं. त्यांनी संपादकांना फोन केल्यावर त्यांनी मंत्रींना पुण्यातच बोलवून घेतलं. सर्व तपशील जाणून घेतले व स्वत: ती बातमी लिहिली. मी तेव्हा नेमका मित्राच्या लग्नाला लातूरला गेलो होतो. तिथल्या अंकात दुसऱ्या दिवशी ही आठकॉलमी बातमी बघितली आणि हादरलो. नंतर पुण्यात आल्यावर रीतसर या बातमीचा फॉलोअप साहेब घेताना मी बघितलंय. काही काळानंतर मीही कोठेवाडीला जाऊन आलो.
२००२ मध्ये संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत होतं. त्या वेळी दीक्षितसाहेबांनी मला दिल्लीला जाऊन या हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस जवानांच्या नातेवाइकांच्या मुलाखती करायला सांगितलं. ही माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असाइनमेंट होती. मी दिल्लीत राहून हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या या लोकांच्या नातेवाइकांना भेटून ‘सप्तरंग’मध्ये दोन भागांत ती स्टोरी केली. या संपूर्ण असाइनमेंटनं मला खूप काही शिकवलं. त्याचं संपूर्ण श्रेय सरांनाच!
मी दिल्लीहून आलो आणि माझं लग्न ठरलं. ती बातमी सांगायला मी साहेबांकडं गेलो. माझ्या सासुरवाडीच्या सर्व लोकांना साहेब दीर्घकाळ ओळखत होते. ‘जतकर’ म्हटल्यावरच ‘श्यामची मुलगी का?’ असं त्यांनी विचारताच मी खरं तर आश्चर्यचकित झालो होतो. मी ‘हो’ म्हटल्यावर सरांनी सर्वांची नावं सांगितली. बार्शीच्या ओळखी सांगितल्या. माझ्या लग्नाला साहेब आले होते आणि माझ्या सासुरवाडीच्या मंडळींसोबत बराच वेळ गप्पागोष्टींमध्ये रमले होते.
पुढे २००४ मध्येही लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मला ओडिशात पाठवलं. तिथला अनुभवही कायम लक्षात राहणारा होता. त्या काळात मी नगर आवृत्तीचं काम काही काळ बघत होतो. नगर जिल्ह्यात त्यांच्यासोबत केलेला दौराही असाच संस्मरणीय ठरला. राजस्थानमध्ये प्रिन्स चार्ल्स आले होते, तेव्हा त्यांनी सुभाष खुटवडला तिकडं पाठवलं. वीरप्पन मारला गेला, तेव्हा सुनील मानेला तिकडचं वार्तांकन करण्याची संधी साहेबांनी दिली. त्सुनामी आली होती, तेव्हा अरविंद तेलकरांना अंदमानला जाण्याची संधीही त्यांनीच दिली.
मांढरदेवीची दुर्घटना घडली त्या दिवशी मी डेस्कवर होतो. साहेब डेस्कवर आले व मला म्हणाले, काय करतोयस? मी डेस्कवर मी तेव्हा करीत असलेलं काम सांगितलं. मला म्हणाले, चल लगेच. आपल्याला साताऱ्याला जायचंय. मग साहेबांच्या गाडीतून ते, मी आणि त्यांचे पीए चंद्रकांत आणि ड्रायव्हर असे चौघे लगेच सातारा ऑफिसमध्ये दाखल झालो. आमचे सातारा प्रतिनिधी श्रीकांत कात्रे मांढरदेवीला गेले होते. पुण्याहून पराग करंदीकर, मिलिंद वाडेकर हेही थेट मांढरदेवीला पोचले होते. अशा वेळी त्या छोट्याशा ऑफिसमध्ये बसून सर्व सूत्रं हलवायला साहेब निघाले होते. रात्री आठच्या आत सर्व आवृत्त्यांना आपली मुख्य बातमी गेली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. कात्रेंकडून त्यांनी स्वत: बातमी घेतली आणि स्वत: डिक्टेट करून, मला एकदा वाचायला सांगितली. आठच्या ठोक्याला आमची बातमी सगळीकडे पोचली होती. नंतर मग आम्ही निवांत ‘राधिका पॅलेस’मध्ये जेवून पुण्याला परतलो. तोवर पुण्याच्या मुख्य आवृत्तीची वेळ झाली होती. मग ती सगळी पानं बघूनच आम्ही ऑफिस सोडलं.
बातमीवर, कामावर प्रेम असणारा असा झपाटलेला संपादक आम्ही पाहिला. माणूस पाहत पाहत शिकतो. आम्हीही त्यांच्याकडून हे गुण घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझे काही सहकारी ग्रामीण भागातून आलो होतो. साहेबही ग्रामीण भागातूनच आले असल्यानं त्यांना बहुदा आमच्याबद्दल विशेष आस्था वाटत असावी. शिवाय साहेबांचं माणसांवर प्रेम होतं. माणूस जपला पाहिजे, असं ते नेहमी म्हणत. याशिवाय त्यांचं पुस्तकप्रेमही अफाट होतं. मात्र, ते खरे रंगायचे ते गप्पांच्या फडात आणि जाहीर भाषणांत. त्यांचं ओघवतं वक्तृत्व ऐकणं हा एक समृद्ध करणारा अनुभव असायचा. पुण्यात नवीन आले, तेव्हा पुण्यावर व पुणेकरांवर ते खूप टीका करायचे, टोमणे  मारायचे; पण त्यांनी आम्हा सगळ्यांना जिव्हाळाही तितकाच दिला. माझ्या लग्नात आलेल्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनी साहेबांचं आणि आमच्या सासुरवाडीच्या लोकांचं जमलेलं मेतकूट बघितलं आणि मला ‘साहेबांचा जावई’ अशी पदवी देऊन टाकली. मी ती गमतीत घेतली; कारण साहेबांनी कधीही मला विनाकारण झुकतं माप दिलं नाही. सर्वच नवीन मुलांवर त्यांचा लोभ होता. २००४ नंतर मात्र ऑफिसमधलं वातावरण बदलू लागलं. साहेबांना त्याचा त्रास होऊ लागला. साहेबांनी राजीनामा देण्याच्या काही दिवस आधी मंदारचं (कुलकर्णी) साताऱ्यात लग्न होतं. नीलचा पहिला वाढदिवसही त्याच दिवशी होता. सरांनी तोवर त्याला पाहिलं नव्हतं. नंतर माझ्या हातातल्या नीलला बघून म्हणाले, ‘त्याला सांग, मोठा होऊन काहीही हो, पण संपादक होऊ नकोस!’ साहेबांचं ते बोलणं ऐकून आम्ही तिथे उपस्थित असलेले सगळेच वरकरणी हसलो, पण मनातून चरकलो.
अखेर जे व्हायचं तेच झालं. काही दिवसांतच साहेब राजीनामा देऊन संस्थेतून बाहेर पडले. माझ्या पत्नीच्या आजोबांवर, दादांवर त्यांचा विशेष लोभ होता. काही काळानंतर दादा गेले, तेव्हा मी साहेबांना फोनवर कळवलं. त्या वेळी त्यांच्या मुलीचं आजारपण सुरू झालं होतं. त्यामुळं ते अस्वस्थ होते. पण तरीही त्यांनी समाचाराचा फोन केला.... मधल्या काळात अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं आणि कधी तरी त्यांचं टीव्हीतील चर्चेत दर्शन घडायचं. अस्मिता गेली त्या दिवशी ‘वैकुंठ’मध्ये साहेबांना पाहिलं. हातात डायलिसिसच्या सुया होत्या. दोन जणांनी आधार देऊनच साहेबांना तिथं बसवलं. साहेबांकडं बघवत नव्हतं. भडभडून आलं... मी निघताना गाडीत त्यांचा हात हातात घेतला. ते सर्वांनाच शून्यवत नजरेनं ‘थँक्यू थँक्यू’ म्हणत होते... मला फार वेळ तिथं उभं राहता आलं नाही...साहेब आठवतात ते दिलखुलास हसणारे, मोठ्यांदा गप्पांचा फड रंगवणारे, एकही शब्द न बोलता आमच्यावर माया करणारे... आमच्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी होता होईल ते सगळं करणारे... असे संपादक होणे आता दुर्मीळच...त्यांचं ऐहिक अस्तित्व संपलं, त्याला आज बरोबर एक महिना झाला... होळीच्या दिवशी सर गेले... त्या वेळी खूप जणांनी खूप काही लिहिलं... मग मी मुद्दामच मागं थांबलो... आज मात्र लिहिल्याशिवाय राहवलं नाही.साहेब, तुम्ही कायम स्मरणात राहाल... मनातल्या कृतज्ञभावासह!


---