18 Feb 2019

रिव्ह्यू - आनंदी गोपाळ

केवळ नतमस्तक...
------------------------‘आनंदी गोपाळ‌’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट म्हणजे माणसाच्या जिद्दीचा अफाट प्रवास आहे. डॉ. आनंदी गोपाळ जोशी या अवघं २२ वर्षांचं जीवन लाभलेल्या मराठी मुलीची ही प्रेरणादायी, थक्क करणारी, डोळे पाणावणारी, हृदय उचंबळून टाकणारी कहाणी आहे. हातातल्या सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि तातडीने या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, एवढा सुंदर चित्रपट समीर विद्वांस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्यासमोर सादर केला आहे. पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या नामावलीपर्यंत नजरेला खिळवून ठेवणारी ही अप्रतिम कलाकृती आहे. अशा कलाकृतींना प्रेक्षकांनी उदार आश्रय द्यायला हवा.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, तेव्हाच्या कडव्या, सनातनी, पुरुषप्रधान समाजाचा रोष पत्करून; हट्टी, दुराग्रही, विक्षिप्त वाटणाऱ्या, पण अत्यंत बुद्धिमान, द्रष्ट्या, विचारी पतीच्या खंबीर पाठिंब्यावर आनंदीबाई अमेरिकेत गेल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकल्या व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. आनंदीबाईंचं आयुष्य व त्यांचा हा सगळा प्रवास मुळातच एवढा स्तिमित करणारा आहे, की अनेक लेखक-कलावंतांना त्यानं भुरळ घातली आहे. माझ्या माहितीप्रमाणे, सर्वप्रथम श्री. ज. जोशी यांनी ‘आनंदी गोपाळ’ ही कादंबरी लिहून (बहुधा १९६७) आनंदीबाईंची सर्व जीवनगाथा मराठी वाचकांसमोर आणली. त्यानंतर ‘दूरदर्शन’वरही ९० च्या दशकात ‘आनंदी-गोपाळ’ याच नावाची एक मालिका आली होती. त्यात आनंदीबाई कुणी साकारल्या होत्या, हे मला आठवत नाही; पण गोपाळरावांची भूमिका अजित भुरे यांनी केली होती, हे स्पष्ट आठवतंय. त्यानंतर अंजली कीर्तने यांनीही खूप मेहनत घेऊन आनंदीबाईंवर एक लघुपट तयार केला आहे. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. (हा लघुपट मात्र मी अद्याप पाहिलेला नाही.) आणि आता, समीर विद्वांस यांनी ‘आनंदी गोपा‌ळ’ हा पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट तयार करून, आनंदीबाईंच्या स्फूर्तिदायी जीवनाला रूपेरी पडद्यावर अजरामर करून टाकलंय.
हा चित्रपट आपल्याला एवढा का आवडतो? एवढा का हृदयाला भिडतो? मला वाटतं, चित्रपटाच्या टॅगलाइनमध्येच याचं उत्तर दडलेलं आहे. ‘सामान्य जोडप्याची असामान्य गोष्ट’ अशी ही टॅगलाइन आहे. एरवी त्या काळातल्या इतर चार जोडप्यांसारखंच या जोडप्याचंही जीवन व्यतीत झालं असतं. मात्र, इंग्रजांच्या टपाल खात्यात नोकरी करीत असलेल्या गोपाळरावांची विचारसरणी त्या काळाच्या किती तरी पुढची होती. पत्नीनं शिकलं पाहिजे, यासाठी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. आनंदी ही त्यांची दुसरी बायको. वयानं किती तरी लहान. तिला शिक्षण देण्याचा ध्यास त्यांनी घेतला. तेव्हाच्या कर्मठ, रूढीवादी समाजातून या गोष्टीला किती विरोध झाला असेल, याची आपण कल्पना करू शकतो! सावित्री आणि जोतिबांच्या नशिबी जे आलं, तेच नंतर ३५-४० वर्षं उलटली तरी आनंदी व गोपाळ यांच्याही नशिबात आलं. हेटाळणी, अवहेलना सहन करीत त्यांनी आणि आनंदीबाईंनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. हा प्रवास सोपा नव्हता. प्रसंगी गोपाळरावांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची तयारी दाखविली. मिशनरी शाळेत आनंदीला गोऱ्या मुलींकडून पदोपदी अपमान सहन करावा लागला. मात्र, कोवळ्या वयातील बाळंतपणात मुलगा जन्मताच गेल्यावर आनंदीच्या स्वप्नांना दिशा मिळाली. डॉक्टर व्हायचं! ज्या काळात भारतीय पुरुषांनाही डॉक्टर होणे अवघड होते, त्या काळात आनंदीनं हे भव्य, उदात्त स्वप्न उरी  बाळ‌गलं. गोपाळरावांच्या खटपट्या स्वभावामुळं थेट अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. तीही एकटीला... समुद्र ओलांडणं धर्मशास्त्रात निषिद्ध मानलं जायचा काळ तो! अशा त्या काळात कलकत्त्यावरून बोटीनं आनंदी एकटीच सातासमुद्रापार निघाली. मिसेस कारपेंटर नावाची एक देवदूत स्त्री तिला भेटली. तिच्या मदतीनं आनंदी पेनसिल्व्हानिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकली. मांसाहार करीत नसल्याने उकडलेले बटाटे खाऊन दिवस काढले. तिकडची प्रचंड थंडी सोसवत नसल्यानं तिला अखेर क्षयानं ग्रासलं. पण तरीही अफाट जिद्दीच्या बळावर तिनं एम. डी. पदवी मिळविलीच.
हा प्रवास जेवढा आनंदीचा आहे, तेवढाच तो गोपाळरावांचाही आहे. म्हणूनच तर या चित्रपटाचं नाव ‘डॉ. आनंदीबाई जोशी’ असं नसून, ‘आनंदी गोपाळ’ असं आहे. आज एकविसाव्या शतकातही पत्नीला समानतेची वागणूक देण्यास काचकूच करणारे समकालीन पुरुष पाहिले, की गोपाळरावांची महती कळते. पत्नीला अभ्यासाला वेळ मिळावा, म्हणून झाडलोट करण्यापासून सोवळ्यातला स्वयंपाक करण्यापर्यंत आणि नंतर टपाल खात्यातील नोकरी करण्यापासून लोकांच्या अवहेलनेला तोंड देण्यापर्यंत सगळी कामं एकहाती करणारा गोपाळरावांसारखा पुरुष तेव्हा किती दुर्मीळ होता, हे सांगायला नको. अर्थात नवरा खंबीर असला, तरी अत्यंत हट्टी, विक्षिप्त व पराकोटीचा संतापी असला, तर त्याच्या पत्नीला काय काय सोसावे लागते, हेही आपल्याला आजूबाजूला पाहिले तरी कळेल. आनंदीचा मोठेपणा हा, की तिला या वरकरणी हटवादी, चिडक्या पतीमागचा माणूस कळला. तो इतर पुरुषांसारखा नसून, वेगळा आहे, हे कळलं. त्यामुळं ती अगदी पूर्ण विश्वासानं त्याला साथ देत गेली. त्यामुळंच ‘आनंदी गोपाळ’ ही एका आदर्श जोडप्याचीही गाथा आहे. आजकाल एवढ्या-तेवढ्या कारणावरून ‘इगो’शीच संसार करणाऱ्यांनी तर जरूर पाहावी अशीच ही कथा आहे.
समीर विद्वांस या दिग्दर्शकाला या विलक्षण दाम्पत्यातील ही अजोड प्रीती अचूक कळली आहे. कुठलंही महान कार्य जेव्हा उभं राहतं, तेव्हा त्याला आधार असतो तो अशा भक्कम नात्यांचा! रूढ नातेसंबंधांपलीकडं जाणारं हे गहिरं नातं बारकाईनं टिपायला, त्यातल्या हळव्या जागा शोधायला संवेदनशील कलाकाराचं मन हवं. ते या दिग्दर्शकाकडं आहे. त्यामुळंच ‘आनंदी गोप‌ाळ’मधले या दोघांचे सर्वच प्रसंग विशेष जमले आहेत. आनंदी पहिल्यांदा ऋतुमती होते तेव्हाच्या प्रसंगापासून अगदी शेवटी दोघे समुद्रावर बसले आहेत त्या प्रसंगापर्यंत सर्व दृश्यांत दिग्दर्शकानं या उभयतांमधलं हे अत्यंत तरल, आश्वासक, ऊबदार नातं फार सुंदर रेखाटलं आहे.
या चित्रपटाचा बहुतांश भाग आनंदी अमेरिकेला जाईपर्यंतच्या प्रवासात खर्च होतो. आनंदी अमेरिकेला गेल्यानंतरचं तिचं आयुष्य फार थोडक्यात येतं. तेही जास्त करून पत्रांच्या रूपानेच. आनंदीचं अमेरिकेतील जगणं अगदी खडतर होतं. मात्र, चित्रपटाचा फोकस त्यावर नाही. हे काहीसं खटकतं. मात्र, एकूण आस्वादनात त्यानं फार उणेपणा येत नाही.
ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद या दोघांनी यात अनुक्रमे गोपाळराव व आनंदीबाईंच्या भूमिका केल्या आहेत. दोघांनीही छान कामं केली आहेत. विशेषत: ललित प्रभाकर हा ‘सरप्राइझ पॅकेज’ म्हणायला हवा. त्यानं गोपाळरावांचा तिरसटपणा, दुराग्रहीपणा, हट्टीपणा आणि पत्नीला शिकवण्याची जिद्द आपल्या देहबोलीतून नेमकी साकारली आहे. भाग्यश्री मिलिंद ही ‘बालक-पालक’मध्ये दिसलेली बालकलाकार. तिनंही यात आनंदी खूप मेहनतीनं आणि विश्वासार्ह सादर केली आहे. महत्त्वाचा उल्लेख करायचा तो गीतांजली कुलकर्णी यांचा. गोपाळरावाच्या पहिल्या पत्नीच्या आईची भूमिका त्यांनी फारच जबरदस्त केली आहे.
या चित्रपटाचं महत्त्वाचं अंग आहे ती म्हणजे यातली गाणी. हृषीकेश-सौरभ-जसराज यांनी संगीत दिलेली यातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. वैभव जोशींसारख्या सिद्धहस्त कवीच्या हातून उतरलेली यातली गाणी आधीपासूनच रसिकप्रिय झाली आहेत. ‘वाटा वाटा वाटा गं’, ‘आनंदघना’, ‘तू आहेस ना...’ ही गाणी विशेष उल्लेखनीय. चित्रपटात शेवटी नामावलीसोबत येणाऱ्या कोलाजची कल्पना खासच!

तेव्हा, अजिबात चुकवू नये असा हा प्रेरणापट आहे. तो पाहिल्यावर कुठलाही संवेदनशील माणूस आनंदीबाईंसमोर आपोआप नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.

----

दर्जा : चार स्टार
---

11 Feb 2019

मटा संवाद - ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त लेख

‘प्रेमळ’ आठवणींचा गुलकंद...
----------------------------


‘व्हॅलेंटाइन डे’ हे शब्द उच्चारल्यावर अंगावर गोड शिरशिरी वगैरे येण्याच्या कुठल्याही क्वालिफाइड वयात आत्ता चाळिशीत असलेले किंवा चाळिशी ओलांडलेले आम्ही कुणीच नाही. पण तरीही चाळिशीतल्या आम्हा चोरांना आमचं वय जणू काही विशीतच ‘अजुनी रुतुनी आहे’ असं वाटत असतं. वास्तविक ज्या वयात हे ‘डे’ वगैरे साजरे करायचे त्याच वयात ते रीतीनुसार साजरे केले असते, तर पुढं असे पोक‌ळ‌ आठवणींचे दिवस घालायची वेळ आली नसती. तर ते असो. मात्र, दर वर्षी १४ फेब्रुवारी जवळ यायला लागला, की आमच्या आठवणींच्या डब्यातून दिवंगत प्रेम इ. भावनांचा गुलकंद बाहेर निघतोच निघतो. आता कुणी म्हणेल, की या आठवणी काय चाटायच्या आहेत? मात्र, वाढत्या वयानुसार, अशा आठवणींचा गुलकंद चघळला असता, सद्यस्थितीतील आपली दारूण अवस्था पाहून उफाळणारे पित्त किंचितसे शांत होते, असा अनुभव आहे.
आमच्या त्या वयातील दिवसांचे वर्णन काय करावे! अहाहा!! भारत व पाकिस्तान ही शत्रुराष्ट्रे बरी, अशी फाळणी मुलगे आणि मुली या दोन मूलभूत मानवी वर्गांत झाली होती. त्यातून शाळेचे वर्ग, तुकड्या वगैरे सामान्य वर्गवारी वेगळीच! मुलांनी मुलींशी किंवा मुलींनी मुलांशी बोलणे म्हणजे अबब! त्या त्या वयातल्या नैसर्गिक भावना रूढी-रिवाजांच्या कडी-कुलपांत अशी काही बंदिस्त करून टाकल्या होत्या, की आपल्याला जे काही वाटतंय, जे काही करावंसं वाटतंय ते म्हणजे एक महाभयंकर आजार आहे, अशीच समजूत घट्ट होत गेली. अशा रोगट वातावरणात वाढलेली आमची पिढी पुढं ना मुलींशी निखळ मैत्री करू शकली, ना त्यांच्या भावभावनांना नीट साद देऊ शकली... तीच गोष्ट मुलींचीही झाली असणार, यात शंका नाही. त्यामुळेच एक मुलगा आणि मुलगी चुकून एकमेकांशी बोलले, तरी त्यांची नावं शाळेच्या चतु:सीमांवरील भिंतीवर हृदयात बाण कोरून लिहिली जायची. इतकंच काय, शिक्षक व शिक्षिकांचीही जोडी लावून त्यांना याच बदामात बंदिस्त केलं जायचं. समान वयाचे मुलगा आणि मुलगी यांच्यात एक तर बहीण-भाऊ, नाही तर थेट नवरा-बायको एवढी दोनच नाती असू शकतात, असा सार्वत्रिक आणि दीर्घकालीन समज आमच्या पिढीच्या मनावर एखाद्या शिलालेखासारखा कोरून ठेवण्यात आला होता. याच्या अधले मधले कुठलेही नाते ‘लफडे’ या एकाच कॅटॅगरीत मोजले जायचे. 
आमच्या वेळी पालक व शिक्षक या दोन्ही महान संस्थांचा एवढा जबरदस्त धाक होता, की त्यातून आमची पिढी अजूनही बाहेर आलेली नाही. मुला-मुलींना एकत्र शिक्षण देण्याची पद्धत होती; पण चुकून-माकून ते बोलले, तर काही तरी महाभयंकर अनर्थ होईल, असं वातावरण सभोवती होतं. आता विचार करता, त्यामागचा त्या पिढीचा काय हेतू असेल, हे उमगू शकतं. मात्र, तरीही एवढ्या कडेकोट बंदोबस्तात त्या नात्याला कुलपं ठोकायची गरज नव्हती. 
जिथं बंधनं आली तिथं ती तोडण्याचीही ऊर्मी आलीच. त्यामुळं आमच्या पिढीतून काही अफलातून प्रेमवीर निपजले. रूपेरी पडद्यावरून आचरट चाळे करून, असल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना मार्गदर्शन करायला गोविंदापासून ते मिथुनपर्यंत आणि नंतर सलमानपासून ते शाहरुखपर्यंत समस्त नटमंडळी हजर होतीच. त्यातून मग हाताच्या नसा कापून घेण्यापासून ते रक्तानं प्रेमपत्रं लिहिण्यापर्यंत बऱ्याच रक्तरंजित ‘व्हॅलेंटाइन डें’चं साक्षीदार आम्हाला व्हावं लागलं. शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांना कसं सामोरं जायचं, याचं कुठलंही मार्गदर्शन आमच्या पिढीतल्या मुलग्यांना कुणी केलं नाही. त्यामुळं ती ऊर्जा भलत्या मार्गानं बाहेर पडायची ती पडली. निकोप नात्याचं शिक्षण न मिळाल्यानं मग ओरबाडून घेण्याची सवय जन्माला आली. त्यातूनच रिंकू पाटीलपासून ते अमृता देशपांडेपर्यंत अनेक मुली हकनाक बळी गेल्या. आज विचार करताना वाटतं, की खरंच, गंमत म्हणून एखाद्या मुलीला गुलाब देण्याइतपत निकोप वातावरण आजूबाजूला असतं, तर काय झालं असतं? त्यातून वाईट नक्कीच काही झालं नसतं. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल एवढ्या संवेदनशील वयात एक तर टोकाचं आकर्षण किंवा तिरस्कार या दोनच भावनांचं पोषण का झालं असावं? अर्धवट वयातही ‘अगर तू मेरी नही हो सकती तो किसी और की भी नहीं’ वगैरे विकृत विचार का जन्माला आले असावेत?
अस्मादिकांच्या बालमनावर एवढे ‘सुसंस्कार’ झाले होते, की लग्न होईपर्यंत कुठल्याही मुलीला काहीही ‘तसलं’ विचारायची किंवा बोलायची हिंमतच झाली नाही. मीच नव्हे, तर माझ्या संपूर्ण पिढीची जवळपास हीच कथा होती. अशा वातावरणात वाढल्यानंतर कुठला ‘व्हॅलेंटाइन डे’ आणि कसला ‘रोझ डे’? त्यातून आमच्या वेळी संस्कृतीरक्षणाची उबळ नव्यानंच जन्माला आली होती. आधीच मनात भयाचे हजार सर्प वळवळत असताना, हा संस्कृतीरक्षणाचा अजगर कोण गळ्यात घालून घेणार? त्यामुळं आम्ही जे काही गुलाब दिले (वा घेतले) ते फक्त मनातल्या मनातच! तिथं मात्र असल्या कुठल्याही जुलमी संस्कारांची मर्यादा आड आली नाही. त्यामुळं तिथं केवळ एका गुलाबानं भागायचं नाही, तर आख्खी नर्सरीच मनात वस्तीला यायची. 
आदल्या दिवसापासूनच मग ‘तिचे’ वेध लागायचे. हा ग्रहणाच्या आधी असतो, तसलाच काळ असायचा. ती येईल का, आली तर आपल्याला दिसेल का, भेटेल का, निदान स्माइल तरी देईल का, तिला दुसरा कोणी तर आज गुलाब देणार नाही ना अशा शंकांनी आमचं अल्लड मन पोखरायचं. स्वत: गुलाब देण्याची प्राज्ञा नव्हतीच. त्यामुळं तो विकत घेण्याचा खर्च तेवढा वाचत असे. त्या दिवशी धडधडत्या हृदयानं उगाच इकडून तिकडं शाळेत व नंतर कॉलेजात अस्मादिक हिंडत असत. ‘ती’ दिसली तरी धन्य वाटायचं. मनातल्या गुलाबाचा राजमार्ग व्हायचा आणि त्यावरून मन सुसाट दौडत कुठल्या कुठं हिंडून यायचं. तो दिवस तसाच संपून जायचा. मनातल्या मनातच सगळे आनंद मिळायचा तो काळ! त्यात हेही आलंच...
आयुष्यात कुणावर तरी मनसोक्त प्रेम करता यावं आणि ते प्रेम एवढं नि:स्वार्थी, त्यागमय वगैरे असावं असले विचारही डोक्यात येत नसत. मात्र, असं खरंच तेव्हा कुणी शिकवलं असतं तर? आमच्या सगळ्या पिढीचंच आयुष्य कदाचित वेगळंच झालं असतं. शहरी आणि ग्रामीण फरक म्हणावा तर दोन्हीकडच्या मुलग्यांना सारखेच अनुभव आल्याचं लक्षात येतं. तेव्हा प्रश्न हा नव्हताच. प्रश्न तेव्हाच्या पालक पिढीच्या मानसिकतेचा होता. सुदैवानं आजचे पालक तसे नाहीत. मुलांच्या मानसिकतेचा वगैरे हल्ली विचार केला जातो, ही चांगलीच गोष्ट आहे.
आमच्या पिढीचं तारुण्य ‘प्रेमबिम थेरं केलीत तर याद राखा’ अशा धमक्यांना तोंड देण्यातच सरलं. आता ‘जगाला प्रेम अर्पावे,’ या सानेगुरुजींच्या वचनाचा फारच आध्यात्मिक अर्थ आम्ही घेतो. पण त्या कोवळ्या वयाला जी एका प्रेमाच्या हाकेची गरज होती, ती कधीच पूर्ण होऊ शकली नाही. त्या कथित संस्कारांच्या, रुढी-परंपरांच्या अनाम बंधनानं आम्ही पार जखडून गेलो होतो. त्यामुळं मनात आलं, ते कधीच ओठावर येऊ शकलं नाही. दर वर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ आला, की आम्हाला आमचं व्यर्थ गेलेलं तारुण्य आठवतं आणि आठवणींचा गुलकंदही कडवट लागायला लागतो...
पण, अशा वेळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आठवतात. ‘प्रेम कुणावरही करावं’ हे त्यांचे शब्द आठवतात. मग आम्ही नव्यानं गुलाब शोधायला बाहेर पडतो... दहा रुपये देऊन गुलाब आणतो. डझनाहून अधिक वर्षं आमचा संसार करीत असलेल्या अर्धांगाला तो गुलाब देतो. मग ऐन फेब्रुवारीतही वातावरण जरा हिरवं झालेलं जाणवतं...


----
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, संवाद पुरवणी; १० फेब्रुवारी २०१९)
----

8 Feb 2019

रिव्ह्यू : भाई - व्यक्ती की वल्ली (उत्तरार्ध)

आहे मनोहर तरी...
-----------------------

‘भाई : व्यक्ती की वल्ली (पूर्वार्ध)’ हा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला, पु. ल. देशपांडे यांचं चरित्र सांगणारा, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट मला जेवढा आवडला होता, तेवढा आज (शुक्रवार, ८ फेब्रुवारी) प्रदर्शित झालेला याच सिनेमाचा उत्तरार्ध काही तेवढा भावला नाही. हे दोन्ही भाग ज्या पुस्तकावर प्रामुख्याने आधारलेले आहेत, त्या पुस्तकाच्या लेखिकेचे - सुनीताबाईंचेच - शब्द उसने घ्यायचे तर ‘आहे मनोहर तरी...’ असेच या भागाविषयी मला म्हणावेसे वाटले.
सर्वप्रथम सकारात्मक बाबींविषयी. हा चित्रपट पु. लं.च्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतो. पुलंच्या आयुष्यात आलेल्या दोन-तीन ‘व्यक्ती व वल्ली’ (यात गटणे व बबडू) मागच्या भागाप्रमाणेच झलक स्वरूपात दाखवतो. प्रयाग हॉस्पिटलमध्ये पु. ल. अॅडमिट आहेत व त्यांना एकेक जण भेटायला येताहेत, या मागील भागातील फ्लॅशबॅक पद्धतीने याही भागात कथा पुढं सरकत राहते. पुलंच्या आयुष्यातील काही ठळक घटनांना ओझरता स्पर्श करून, तर काही घटना थोड्याफार विस्तृत स्वरूपात दाखवून कथा पुढे जाते. मात्र, हे सगळं पाहताना काही तरी ‘मिसिंग’ आहे, असं मला वाटत राहिलं.
याच्या कारणांचा विचार करताना वाटलं, की पहिल्या भागात सर्व व्यक्तिरेखांच्या आगमनाचं एक औत्सुक्य होतं. शिवाय मुळातच फारशा अपेक्षा नव्हत्या. त्यामुळं तो भाग एकदम जमून आल्यासारखा आवडून गेला होता. या भागात पु. ल. व सुनीताबाईंच्या व्यक्तिरेखांचं; तसंच याही भागात दिसणाऱ्या वसंतराव, भीमसेन, हिराबाई, कुमार गंधर्व याही व्यक्तिरेखांचं अप्रूप वाटायचं कारण नव्हतं. नवीन येणाऱ्या पात्रांबद्दल औत्सुक्य होतं. त्यात सखाराम गटणे व बबडू ही दोन पात्रं येतात. पैकी गटणे हे पात्र यात अर्धं-कच्चं असंच समोर येतं. बबडू हे पात्र गिरीश कुलकर्णीनं उभं केलंय. गिरीशच्या अभिनय कौशल्याबद्दल वाद नसला, तरी संपूर्ण सिनेमात हा बबडूचा प्रसंग अगदी ठिगळ लावल्यासारखा येतो. या उत्तरार्धाला एक सीरियस टोन लाभला आहे, त्यात तो अगदीच विसंगत वाटतो. बाकी मग अत्रे एका प्रसंगापुरते येतात, पं. नेहरूही दर्शन देऊन जातात, विजया मेहता दिसतात, बाबा आमटे येतात, बाळासाहेब ठाकरे येतात, भक्ती बर्वे येतात, अनिल अवचट दिसतात... अशी पुलंच्या आयुष्यातली त्या त्या वेळी महत्त्वाची असलेली पात्रं येतात आणि जातात. हे सगळं दर्शन ‘टिकिंग ऑल बॉक्सेस’ अशा स्वरूपाचं वाटतं. यातून पुलंच्या त्या त्या वेळच्या उत्तुंगतेची, मोठेपणाची कल्पना पूर्णांशानं येऊ शकत नाही.
शिवाय नुसतं ‘टिकिंग ऑल द बॉक्सेस’ तरी कुठं आहे? दिग्दर्शकानं जे दाखवलं आहे, त्यावरच टिप्पणी करावी; त्यानं हे का नाही दाखवलं, ते काही दाखवलं असं म्हणू नये, असा संकेत आहे. मात्र, पुलंच्या सिनेमाच्या बाबतीत प्रेक्षकाला किमान काय अपेक्षित असणार, हे सांगायला हरकत नसावी. यात पुलंनी ‘दूरदर्शन’ची नोकरी नोकरशहांच्या जाचाला कंटाळून सोडली, असं दर्शवणारं एक दृश्य आहे. यानंतर पु. ल. मित्रमंडळींना जमवून एक मैफल करतात. त्यानंतर मग त्यांच्या बहुरूपी प्रयोगांचा जोरदार कालखंड सुरू होतो. आता त्यापूर्वी पु. ल. दूरदर्शनची नोकरी दिल्लीत करीत होते आणि ती करताना ते सपत्नीक लंडनला गेले होते, हे या चित्रपटात कुठंच येत नाही. कारण त्यांच्या या दौऱ्यानंतर त्यांनी ‘अपूर्वाई’सारखं प्रवासवर्णन लिहिलं, जे आजही पुलंच्या उत्कृष्ट लेखनापैकी एक मानलं जातं. अगदी लंडन नव्हे, पण किमान ते तिकडं जाऊन आले, याचाही उल्लेख यात नसावा, हे खटकणारंच! १९६१ ते १९८५ हा पुलंच्या कारकिर्दीतला बहराचा काळ. त्यापैकी १९६२ ते १९७४ या काळात त्यांनी बटाट्याची चाळ, असा मी असामी, वाऱ्यावरची वरात आणि वटवट असे चार बहुरूपी प्रयोग केले. त्यांची इतर नाटकेही जोरात सुरू होती. यापैकी ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रारंभी व ‘ती फुलराणी’चा शेवटी उल्लेख येतो. भक्तीबरोबर पुलंच्या तालमी फार जोरदार झाल्या, असं तेव्हाची मंडळी सांगतात. त्याची झलक या चित्रपटात जरूर दिसते. मात्र, त्यांच्या परदेश दौऱ्यांचा उल्लेखही होत नाही, ही गोष्ट खटकलीच.
तीच गोष्ट भाईंच्या बंगालीप्रेमाची. पु. ल. वयाच्या ५० व्या वर्षी बंगाली शिकायला शांतिनिकेतनात गेले व काही महिने तिथं राहिले. या गोष्टीचा साधा उल्लेखही या सिनेमात येत नाही. माझ्या मते, इतर मराठी साहित्यिक  व पु. ल. यांच्यातला फरक अधोरेखित करणारी ही गोष्ट होती. ती यात अजिबात आली नाही. खेरीज पु. ल. नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले, नंतर १९७४ मध्ये इचलकरंजीत भरलेल्या सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले... यापैकी कशाचीच नोंद हा सिनेमा घेत नाही. मात्र, एका संगीत नाटकाच्या वेळी विजय तेंडुलकरांसोबतचा त्यांचा संवाद पुलंची एकूण कलात्मक दृष्टी दाखवण्यासाठी उपयोजिला आहे, तो प्रसंग जमला आहे.
या चित्रपटात कुमार गंधर्व आजारी असताना रामूभय्या दाते पुलंना फोन करतात व पु. ल. पुन्हा वसंतराव, भीमसेन, चंपूताई (हिराबाई बडोदेकर), माणिक वर्मा यांना घेऊन त्यांच्याकडे जातात, असा प्रसंग आहे. तिथं पुन्हा या सगळ्यांचं गाणं-बजावणं होतं व त्यानंतर कुमार पुन्हा गायला लागतात, असा तो घटनाक्रम आहे. तो ठीकच; मात्र नंतर सिनेमात उल्लेख येतो तो थेट कुमार गंधर्वांच्या निधनाचा. कुमार गेले १९९२ मध्ये. मात्र, त्यापूर्वी जवळपास नऊ वर्षं आधी पुलंचे अगदी घट्ट मित्र असलेले (व या सिनेमात ज्यांचा भरपूर वावर आहे असे) वसंतराव देशपांडे गेले, त्याचा उल्लेखही यात नाही. वसंतराव गेल्याचा पुलंना खूप जोरदार मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांनी बा. भ. बोरकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम सुरू केला. त्या कार्यक्रमाची किमान एक झलक तरी यात पाहायला मिळायला हवी होती. असो. (अर्थात हे हवं होतं, ते हवं होतं, या यादीला अंत नाही हेही खरंच.)
आणीबाणीच्या काळात पुलंनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेली जोरदार भाषणे आणि नंतर सत्तावर्तुळापासून स्वत:ला विरक्तपणे दूर करणे, युतीच्या काळात त्यांना मिळालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार व नंतर बाळासाहेब ठाकऱ्यांसोबत झालेला वाद आदी प्रसंगही सिनेमा यथास्थित दाखवतो. (बाय द वे, मनोहर जोशींचं पात्र विनोदी दाखवून मांजरेकरांनी कुठला तरी मागचा वचपा काढलाय हे नक्की!)
पुलंचा दानशूरपणा, त्यांची समाजाप्रती असलेली सद्भावना यात चांगली दिसलीय हेही सांगायला हवं. फक्त पुलंनी रक्त गोळा करणाऱ्या ज्या बाईंना ते यंत्र देण्यास मदत केली, त्या बाईंचं नावच सिनेमात समजत नाही. (माझ्या माहितीनुसार त्या बाईंचं नाव मुळगावकर असं होतं. पु. ल. गमतीनं त्यांना ‘ही काय रक्तपिपासू बाई आहे!’ असं म्हणत असत.)
पुलंच्या निधनाच्या आधी काही रात्री मी स्वत: प्रयाग हॉस्पिटलमध्ये जात होतो. तेव्हा माध्यमांच्या प्रतिक्रिया मागण्याच्या घाईचा एक प्रसंग या चित्रपटात आलाय. त्या प्रसंगाचा मी स्वत: साक्षीदार आहे. गंमत म्हणजे चित्रपटात त्या माध्यमाचे नाव ‘म्यूट’ करण्यात आले आहे. हा खरोखर कहर आहे. पुलंना यावर एक विनोदी स्फुट सुचलं असतं, यात वाद नाही.
तेव्हा ‘भाई’चा पूर्वार्ध पाहणाऱ्यांना उत्तरार्ध पाहणं मस्टच आहे, हे खरं. फक्त फार अपेक्षा ठेवून जाऊ नका. अन्यथा अपेक्षाभंगाचं दु:ख वाट्याला येईल.
.....

दर्जा : तीन स्टार
----
(पहिल्या भागाच्या परीक्षणाची लिंक )