18 Feb 2019

रिव्ह्यू - आनंदी गोपाळ

केवळ नतमस्तक...
------------------------‘आनंदी गोपाळ‌’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट म्हणजे माणसाच्या जिद्दीचा अफाट प्रवास आहे. डॉ. आनंदी गोपाळ जोशी या अवघं २२ वर्षांचं जीवन लाभलेल्या मराठी मुलीची ही प्रेरणादायी, थक्क करणारी, डोळे पाणावणारी, हृदय उचंबळून टाकणारी कहाणी आहे. हातातल्या सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि तातडीने या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, एवढा सुंदर चित्रपट समीर विद्वांस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्यासमोर सादर केला आहे. पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या नामावलीपर्यंत नजरेला खिळवून ठेवणारी ही अप्रतिम कलाकृती आहे. अशा कलाकृतींना प्रेक्षकांनी उदार आश्रय द्यायला हवा.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, तेव्हाच्या कडव्या, सनातनी, पुरुषप्रधान समाजाचा रोष पत्करून; हट्टी, दुराग्रही, विक्षिप्त वाटणाऱ्या, पण अत्यंत बुद्धिमान, द्रष्ट्या, विचारी पतीच्या खंबीर पाठिंब्यावर आनंदीबाई अमेरिकेत गेल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकल्या व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. आनंदीबाईंचं आयुष्य व त्यांचा हा सगळा प्रवास मुळातच एवढा स्तिमित करणारा आहे, की अनेक लेखक-कलावंतांना त्यानं भुरळ घातली आहे. माझ्या माहितीप्रमाणे, सर्वप्रथम श्री. ज. जोशी यांनी ‘आनंदी गोपाळ’ ही कादंबरी लिहून (बहुधा १९६७) आनंदीबाईंची सर्व जीवनगाथा मराठी वाचकांसमोर आणली. त्यानंतर ‘दूरदर्शन’वरही ९० च्या दशकात ‘आनंदी-गोपाळ’ याच नावाची एक मालिका आली होती. त्यात आनंदीबाई कुणी साकारल्या होत्या, हे मला आठवत नाही; पण गोपाळरावांची भूमिका अजित भुरे यांनी केली होती, हे स्पष्ट आठवतंय. त्यानंतर अंजली कीर्तने यांनीही खूप मेहनत घेऊन आनंदीबाईंवर एक लघुपट तयार केला आहे. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. (हा लघुपट मात्र मी अद्याप पाहिलेला नाही.) आणि आता, समीर विद्वांस यांनी ‘आनंदी गोपा‌ळ’ हा पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट तयार करून, आनंदीबाईंच्या स्फूर्तिदायी जीवनाला रूपेरी पडद्यावर अजरामर करून टाकलंय.
हा चित्रपट आपल्याला एवढा का आवडतो? एवढा का हृदयाला भिडतो? मला वाटतं, चित्रपटाच्या टॅगलाइनमध्येच याचं उत्तर दडलेलं आहे. ‘सामान्य जोडप्याची असामान्य गोष्ट’ अशी ही टॅगलाइन आहे. एरवी त्या काळातल्या इतर चार जोडप्यांसारखंच या जोडप्याचंही जीवन व्यतीत झालं असतं. मात्र, इंग्रजांच्या टपाल खात्यात नोकरी करीत असलेल्या गोपाळरावांची विचारसरणी त्या काळाच्या किती तरी पुढची होती. पत्नीनं शिकलं पाहिजे, यासाठी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. आनंदी ही त्यांची दुसरी बायको. वयानं किती तरी लहान. तिला शिक्षण देण्याचा ध्यास त्यांनी घेतला. तेव्हाच्या कर्मठ, रूढीवादी समाजातून या गोष्टीला किती विरोध झाला असेल, याची आपण कल्पना करू शकतो! सावित्री आणि जोतिबांच्या नशिबी जे आलं, तेच नंतर ३५-४० वर्षं उलटली तरी आनंदी व गोपाळ यांच्याही नशिबात आलं. हेटाळणी, अवहेलना सहन करीत त्यांनी आणि आनंदीबाईंनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. हा प्रवास सोपा नव्हता. प्रसंगी गोपाळरावांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची तयारी दाखविली. मिशनरी शाळेत आनंदीला गोऱ्या मुलींकडून पदोपदी अपमान सहन करावा लागला. मात्र, कोवळ्या वयातील बाळंतपणात मुलगा जन्मताच गेल्यावर आनंदीच्या स्वप्नांना दिशा मिळाली. डॉक्टर व्हायचं! ज्या काळात भारतीय पुरुषांनाही डॉक्टर होणे अवघड होते, त्या काळात आनंदीनं हे भव्य, उदात्त स्वप्न उरी  बाळ‌गलं. गोपाळरावांच्या खटपट्या स्वभावामुळं थेट अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. तीही एकटीला... समुद्र ओलांडणं धर्मशास्त्रात निषिद्ध मानलं जायचा काळ तो! अशा त्या काळात कलकत्त्यावरून बोटीनं आनंदी एकटीच सातासमुद्रापार निघाली. मिसेस कारपेंटर नावाची एक देवदूत स्त्री तिला भेटली. तिच्या मदतीनं आनंदी पेनसिल्व्हानिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकली. मांसाहार करीत नसल्याने उकडलेले बटाटे खाऊन दिवस काढले. तिकडची प्रचंड थंडी सोसवत नसल्यानं तिला अखेर क्षयानं ग्रासलं. पण तरीही अफाट जिद्दीच्या बळावर तिनं एम. डी. पदवी मिळविलीच.
हा प्रवास जेवढा आनंदीचा आहे, तेवढाच तो गोपाळरावांचाही आहे. म्हणूनच तर या चित्रपटाचं नाव ‘डॉ. आनंदीबाई जोशी’ असं नसून, ‘आनंदी गोपाळ’ असं आहे. आज एकविसाव्या शतकातही पत्नीला समानतेची वागणूक देण्यास काचकूच करणारे समकालीन पुरुष पाहिले, की गोपाळरावांची महती कळते. पत्नीला अभ्यासाला वेळ मिळावा, म्हणून झाडलोट करण्यापासून सोवळ्यातला स्वयंपाक करण्यापर्यंत आणि नंतर टपाल खात्यातील नोकरी करण्यापासून लोकांच्या अवहेलनेला तोंड देण्यापर्यंत सगळी कामं एकहाती करणारा गोपाळरावांसारखा पुरुष तेव्हा किती दुर्मीळ होता, हे सांगायला नको. अर्थात नवरा खंबीर असला, तरी अत्यंत हट्टी, विक्षिप्त व पराकोटीचा संतापी असला, तर त्याच्या पत्नीला काय काय सोसावे लागते, हेही आपल्याला आजूबाजूला पाहिले तरी कळेल. आनंदीचा मोठेपणा हा, की तिला या वरकरणी हटवादी, चिडक्या पतीमागचा माणूस कळला. तो इतर पुरुषांसारखा नसून, वेगळा आहे, हे कळलं. त्यामुळं ती अगदी पूर्ण विश्वासानं त्याला साथ देत गेली. त्यामुळंच ‘आनंदी गोपाळ’ ही एका आदर्श जोडप्याचीही गाथा आहे. आजकाल एवढ्या-तेवढ्या कारणावरून ‘इगो’शीच संसार करणाऱ्यांनी तर जरूर पाहावी अशीच ही कथा आहे.
समीर विद्वांस या दिग्दर्शकाला या विलक्षण दाम्पत्यातील ही अजोड प्रीती अचूक कळली आहे. कुठलंही महान कार्य जेव्हा उभं राहतं, तेव्हा त्याला आधार असतो तो अशा भक्कम नात्यांचा! रूढ नातेसंबंधांपलीकडं जाणारं हे गहिरं नातं बारकाईनं टिपायला, त्यातल्या हळव्या जागा शोधायला संवेदनशील कलाकाराचं मन हवं. ते या दिग्दर्शकाकडं आहे. त्यामुळंच ‘आनंदी गोप‌ाळ’मधले या दोघांचे सर्वच प्रसंग विशेष जमले आहेत. आनंदी पहिल्यांदा ऋतुमती होते तेव्हाच्या प्रसंगापासून अगदी शेवटी दोघे समुद्रावर बसले आहेत त्या प्रसंगापर्यंत सर्व दृश्यांत दिग्दर्शकानं या उभयतांमधलं हे अत्यंत तरल, आश्वासक, ऊबदार नातं फार सुंदर रेखाटलं आहे.
या चित्रपटाचा बहुतांश भाग आनंदी अमेरिकेला जाईपर्यंतच्या प्रवासात खर्च होतो. आनंदी अमेरिकेला गेल्यानंतरचं तिचं आयुष्य फार थोडक्यात येतं. तेही जास्त करून पत्रांच्या रूपानेच. आनंदीचं अमेरिकेतील जगणं अगदी खडतर होतं. मात्र, चित्रपटाचा फोकस त्यावर नाही. हे काहीसं खटकतं. मात्र, एकूण आस्वादनात त्यानं फार उणेपणा येत नाही.
ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद या दोघांनी यात अनुक्रमे गोपाळराव व आनंदीबाईंच्या भूमिका केल्या आहेत. दोघांनीही छान कामं केली आहेत. विशेषत: ललित प्रभाकर हा ‘सरप्राइझ पॅकेज’ म्हणायला हवा. त्यानं गोपाळरावांचा तिरसटपणा, दुराग्रहीपणा, हट्टीपणा आणि पत्नीला शिकवण्याची जिद्द आपल्या देहबोलीतून नेमकी साकारली आहे. भाग्यश्री मिलिंद ही ‘बालक-पालक’मध्ये दिसलेली बालकलाकार. तिनंही यात आनंदी खूप मेहनतीनं आणि विश्वासार्ह सादर केली आहे. महत्त्वाचा उल्लेख करायचा तो गीतांजली कुलकर्णी यांचा. गोपाळरावाच्या पहिल्या पत्नीच्या आईची भूमिका त्यांनी फारच जबरदस्त केली आहे.
या चित्रपटाचं महत्त्वाचं अंग आहे ती म्हणजे यातली गाणी. हृषीकेश-सौरभ-जसराज यांनी संगीत दिलेली यातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. वैभव जोशींसारख्या सिद्धहस्त कवीच्या हातून उतरलेली यातली गाणी आधीपासूनच रसिकप्रिय झाली आहेत. ‘वाटा वाटा वाटा गं’, ‘आनंदघना’, ‘तू आहेस ना...’ ही गाणी विशेष उल्लेखनीय. चित्रपटात शेवटी नामावलीसोबत येणाऱ्या कोलाजची कल्पना खासच!

तेव्हा, अजिबात चुकवू नये असा हा प्रेरणापट आहे. तो पाहिल्यावर कुठलाही संवेदनशील माणूस आनंदीबाईंसमोर आपोआप नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.

----

दर्जा : चार स्टार
---

8 comments:

 1. अप्रतिम। आता नक्की पाहणार हा आनंदी गोपाळ

  ReplyDelete
 2. श्रीपाद , खूप छान लिहीलं आहेस. दूरदर्शन वर आनंदीबाई भाग्यश्री चिरमुले ने साकारली होती.आणि शीर्षक गीत आशा भोसलेंनी गायलं होत.

  ReplyDelete
  Replies
  1. अच्छा. धन्यवाद धनंजय या माहितीबद्दल!

   Delete
 3. नक्की पाहणार !!!👍

  ReplyDelete
 4. श्रीपाद ब्रम्हे, तुमचं परीक्षण वाचणे हीच एक पर्वणी असते नेहमी आमच्यासाठी - आणि हे वाचल्यावर तर हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता शतपटीने वाढलीये.

  तुमच्या रसग्रहणाबद्दल पुनःश्च धन्यवाद!


  श्रीकांत देव

  ReplyDelete