12 Mar 2019

चिंतन आदेश दिवाळी २०१८ लेख

जगाची 'खिडकी'
----------------

(विषय : माझे छंद)



छंद हा शब्दच किती नादमधुर आहे! हा शब्द उच्चारताच मनात आनंदाच्या लहरी उसळतात. आयुष्यात माणसाला काही तरी चांगला छंद असेल, तर त्याचं सगळं आयुष्य अगदी छान जातं. अनेक छंद असतील तर फारच बहर! वाईट छंद असतील, तर लोक 'छंदीफंदी' म्हणतात, ते वेगळं... पण चांगले छंद माणसाला जगण्याचं प्रयोजन शिकवतात. चांगला छंद कशाला म्हणावं? एक तर अर्थातच त्या छंदातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. छंद आणि आनंद या गोष्टी एकमेकांना जोडलेल्याच आहेत. आनंद येत नसेल, तर तो छंदच नव्हे! दुसरं म्हणजे त्यातून लोकांना उपद्रव होता कामा नये. कारण उद्या कुणी म्हणेल, की मला रस्त्यातून जाताना हवेत गोळ्या झाडण्याचा छंद आहे...! असला 'छंद' केला तर फाशीचा फंदा गळ्यात पडेल, हे नक्की. तेव्हा दुसऱ्याला उपद्रव न होणारा छंद हवा. या छंदाला उपयुक्तता असलीच पाहिजे, असा काही नियम नाही. पण समजा असेल, तर फारच चांगलं! उदाहरणार्थ, काही लोकांना जुनी माहिती, छायाचित्रं गोळा करण्याचा छंद असतो. त्यांच्या या संग्रहाचा समाजाला फायदाच होतो. पण अशी उपयुक्तता नसलेला छंद असेल तरी काही बिघडत नाही. त्या छंदातून तो छंद जोपासणाऱ्या माणसाला आनंद प्राप्त झाला पाहिजे, एवढीच किमान अपेक्षा असते. 
माझं लहानपण तालुक्याच्या ठिकाणी गेलं. त्या छोट्या गावात लहान मुलांसाठी बागा किंवा खेळणी वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळं आमच्या मनोरंजनाची साधनं आम्हीच शोधून काढली. माझा मित्र आणि मी खेळण्यांतले छोटे ट्रक घेऊन आमच्या अंगणात पडलेल्या कसल्या तरी बिया गोळा करत असू. आम्ही त्या बियांना 'धमुके' म्हणायचो. कुणाच्या ट्रकमध्ये जास्त बिया याचीच स्पर्धा चालायची. त्यानंतर काडेपेटीवरची कव्हर जमवायचा छंद लागला. सनफ्लॉवरचं चित्र असलेली काडेपेटी सर्रास मिळायची. आमच्या या कव्हरची किंमत असायची. सनफ्लॉवरवालं चित्र खूप उपलब्ध असल्यानं त्याला कमी भाव असायचा. 'बालक टिक्का' नावाचं एक चित्र तेव्हा दुर्मीळ होतं. त्यामुळं ते सापडलं, की कोट्यधीश असल्याचा फील यायचा. अशी किती तरी कव्हर मी जमवून ठेवली होती. नंतर नंतर ही चित्रं जमवायला आम्ही जवळच्या पानटपऱ्यांवर घिरट्या घालत असल्याच्या वार्ता घरच्यांच्या कानावर गेल्या आणि हा छंद बंदच पडला. आम्ही लहानपणी सगळे मित्र क्रिकेट खेळायचो. दुसरा मैदानी खेळच आम्हाला माहिती नव्हता. वाडा क्रिकेट, गल्ली क्रिकेट ते ग्राउंडवरचं क्रिकेट अशा एकेक पायऱ्या वर चढत क्रिकेट खेळत गेलो. यातूनच क्रिकेटपटूंची छायाचित्रं जमवायचा छंद जडला. तेव्हा घरी येणारं वृत्तपत्रं हा अशा छायाचित्रांचा एकमेव स्रोत होता. तेव्हा वृत्तपत्रं सगळी कृष्णधवल असायची. तेव्हा क्रिकेट सामन्यांचे मैदानावरचे फोटो चार चार कॉलम आकारात प्रसिद्ध व्हायचे. पण ते कापण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो पेपर रद्दी व्हायची वाट पाहावी लागायची. मग दुसऱ्या दिवशी लक्षात ठेवून हे फोटो कापून ठेवायचे. सुनील गावसकर, कपिल देव, शास्त्री, वेंगसरकर हे आमचे हिरो होते. इतर देशांतल्या क्रिकेटपटूंमध्ये डेव्हिड गॉवर, व्हिवियन रिचर्डस, रिचर्ड हॅडली, अॅलन बोर्डर आदी मंडळी आवडायची. या सगळ्यांचे फोटो माझ्या वहीत होते. गावसकरनं १०,००० कसोटी धावांचा टप्पा ओलांडल्याचा मोठा पाच-सहा कॉलम फोटो आला होता. तोही माझ्याकडं होता. अगदी अलीकडंपर्यंत ही वही माझ्याकडं होती. आता मात्र ती सापडत नाहीय. त्यामुळं एक मौल्यवान खजिना गमावला की काय, अशी भीती वाटतेय. 
वाचनाचा छंद तर खूप लहानपणापासून होता. आमच्या गावी खूप जुनं, म्हणजे १८८७ मध्ये स्थापन झालेलं मोठं वाचनालय होतं. या वाचनालयामुळं मला वाचनाची गोडी लागली. अगदी तिसरी-चौथीत असल्यापासून मोठमोठी पुस्तकं वाचण्याची आवड उत्पन्न झाली. लहान मुलांच्या विभागात तर नेहमीच जायचो. ग्रंथपाल आमच्या ओळखीचे होते. त्यामुळं ते मुद्दाम चांगली पुस्तकं माझ्यासाठी राखून ठेवायचे. नीलम प्रभू यांचं 'मांजराची गोष्ट' या की अशाच नावाचं एक पुस्तक वाचल्याचं आठवतं. ती गोष्ट दिल्लीत घडते आणि ते मांजर चुकून शहादऱ्याला जातं अशी काही तरी ती गोष्ट होती. हे पुस्तक मोठ्या आकाराचं होतं व त्यात छान रंगीत चित्रं होती. याशिवाय भा. रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' लाडका होताच. पण मला विशेष आवडायची ती सुधाकर प्रभू यांनी लिहिलेली 'डिटेक्टिव्ह डीटी'ची पुस्तकं. या पुस्तकांची मी पारायणं केली. याशिवाय बाबासाहेब पुरंदऱ्यांची 'राजा शिवछत्रपती' व 'शेलारखिंड' ही दोन मोठ्ठी पुस्तकं मी तेव्हाच वाचून काढली होती. 'शेलारखिंड' वाचताना गौरा व कस्तुराच्या धाडसानं मन थरारून गेल्याचं आठवतं. याशिवाय अर्थातच चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांची पुस्तकं वाचायला मिळाली. या लेखकांच्या विनोदी लेखनाच्या मी प्रेमातच पडलो. 'असं लिहिता आलं पाहिजे' असं वाटलं ती ही पुस्तकं वाचूनच! अर्थात पुढं पत्रकारितेत गेल्यावर वाचन हा केवळ छंद न राहता, तो रोजच्या कामाचा एक भागच झाला आहे. पण तरीही मनाला विरंगुळा मिळावा म्हणून केलं जाणारं वाचन छंदासारखंच आनंद देतं.
जी गोष्ट वाचनाची तीच सिनेमाची... इतर मुलांप्रमाणेच मी लहानपणी सिनेमे पाहत होतो. गावात तंबूच्या थिएटरमध्ये अनेक सिनेमे पाहिले. सिनेमा या माध्यमाचं आकर्षण तसं जबरदस्त असतं. मलाही या माध्यमानं फार तीव्रतेनं आपल्याकडं ओढून घेतलं. पुढं या छंदाचं रूपांतर आवड आणि मग अभ्यासात झालं. पत्रकारितेत आल्यावर सिनेमा परीक्षणं लिहायला मिळाली आणि सुमारे ११ वर्षांत तीनशेहून अधिक सिनेमांची परीक्षणं लिहून झाली. आताही ब्लॉगवर परीक्षणं लिहिली जातात ती केवळ आवड, छंद आहे म्हणूनच! या आवडीतूनच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना हजेरी लावणं घडलं. 'वर्ल्ड सिनेमा' पाहता आला. याचा फायदा असा झाला, की सगळ्या गोष्टींकडं पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन मिळाला. हे सगळं जग, सगळी माणसं एकसारखीच आहेत; माणसाच्या मूलभूत प्रेरणा, प्रवृत्ती सगळीकडं सारख्याच आहेत हे समजलं आणि लहानपणापासून वेगवेगळ्या माध्यमांतून मनावर चढलेल्या अनेक समज-गैरसमजांची पुटं गळून पडली. पत्रकारिता करताना डोळे उघडे ठेवून समाजात वावरण्याची सवय लागली आणि त्यातूनच विचार करायची अन् प्रश्न विचारायचीही! एकदा विचार सुरू झाला, की विवेकाचं भान येतं. विवेक असला, की बुद्धिप्रामाण्याचं पारडं वरचढ होतं आणि बुद्धिप्रामाण्यातून निष्पक्ष विश्लेषणाची कुवत अंगी येते. वाचन आणि सिनेमा या दोन छंदांनी मला जर काही दिलं असेल तर ती ही कुवत, असं नम्रपणे सांगावंसं वाटतं.
हे झालं आयुष्यात आत्तापर्यंत जोपासलेल्या लहान-मोठ्या छंदांबाबत. यातले काही छंद लहानपणीचे आणि त्या वयाला शोभणारे असेच होते व ते स्वाभाविकच वाढत्या वयानुसार बंद झाले. काही छंद हे केवळ छंद न राहता, व्यवसायाचा किंवा पेशाचा भाग झाले, तर काही छंदांचं रूपांतर अभ्यासात झालं. त्यामुळं अगदी आजच्या घडीला मला कुणी 'तुझा छंद सांग' असं म्हटलं तर यातल्या एकाचंही नाव घेता येणार नाही. मग आत्ता आपल्याला नक्की कशाचा छंद आहे, याचा विचार करायला लागल्यावर लक्षात आलं, की आहे! आपल्याला एक छंद आहे. फावल्या वेळेत आपण तो जोपासतो आणि त्यातून एक निर्भेळ आनंद आपल्याला लाभतो. हा आनंद आहे 'जगाच्या खिडकी'त डोकावण्याचा... होय, आणि या 'खिडकी'ला आपण ओळखतो 'यूट्यूब' म्हणून...! 
इंटरनेट नावाच्या प्रकारानं आपल्या दैनंदिन आयुष्यात क्रांती आणली, त्याला आता तीन दशकं उलटून गेली. स्मार्टफोन नामक आयुध आपल्या हातात आलं, त्यालाही आता एक दशक उलटून गेलं. या तंत्रज्ञानातील क्रांतीनं आपलं आयुष्य बदलून गेलं आहे. आतापर्यंत अशक्य वाटणाऱ्या किती तरी गोष्टी आता सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणसं करू लागली आहेत. अगदी विमानप्रवासापासून ते परदेशात सेटल होण्यापर्यंत अनेक गोष्टी आता सर्वसामान्यांच्या आयुष्यातही सहज घडत आहेत. सहलीसाठी परदेशांत जाणं नियमित होऊ लागलं आहे. जगाकडं खुल्या नजरेनं पाहण्याचा एका नवा दृष्टिकोन यातून आपल्याला मिळतो आहे. जगात पाहण्यासारखं खूप काही आहे आणि आपल्याला एका आयुष्यात ते मुळीच शक्य नाही, हे लक्षात यायला लागलं आहे. अशा वेळी मदतीनं येते ती ही 'खिडकी'! बघा ना, अगदी घरबसल्या या माध्यमातून तुम्ही अक्षरशः सगळं जग पाहू शकता. 
या जगात अनेक खंड आहेत, देश आहेत, प्रांत आहेत. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं, महत्त्व वेगळं! युरोपचं सौंदर्य वेगळं, आशियाचं वेगळं... आफ्रिकेतील घनदाट जंगलांपासून ते वाळवंटापर्यंतचं भौगोलिक वैविध्य थक्क करणारं आहे. केवळ नैसर्गिक चमत्कार म्हटले, तरी किती गोष्टी आहेत. उंच उंच धबधबे आहेत, प्रचंड अवाढव्य नद्या आहेत, दरी-खोरी आहेत, महासागर आहेत, अंटार्क्टिकासारखा अफाट खंड आहे, नॉर्वेसारखा 'मध्यरात्रीच्या सूर्याचा' देश आहे, ज्वालामुखी आहेत, हिमालयासारखी उत्तुंग पर्वतराजी आहे... या सर्व ठिकाणी माणसाला जाणं एका आयुष्यात तरी शक्य नाही. पण काळजीचं कारण नाही. आपली 'खिडकी' आहे ना! याशिवाय मानवनिर्मित चमत्कार किती आहेत! चीनची भिंत आहे, सुएझचा कालवा आहे, पिसाचा मनोरा आहे, पनामा कालवा आहे, कॅलिफोर्नियाचा गोल्डन ब्रिज आहे, इजिप्तमधले पिरॅमिड आहेत... हे सगळं घरबसल्या बघता येतं आपल्या 'खिडकी'तून... अटी दोनच. उत्तम दर्जाचा स्मार्टफोन हवा आणि वेगवान इंटरनेट हवं. मग अक्षरशः सगळं जग आपल्या त्या छोट्याशा 'खिडकी'त खुलं होतं... 
मला मुळात माणसाच्या जगण्याबद्दल कुतूहल आहे. वैचित्र्यपूर्ण गोष्टी करणारे अनेक लोक असतात. मध्यंतरी एकानं पृथ्वीच्या कक्षेपर्यंत बलून नेलं आणि तिथून पृथ्वीवर उडी मारली. सुमारे ३९ हजार मीटर एवढ्या उंच अंतरावरून हा माणूस खाली आला. त्याच्या अंगावरच एक कॅमेरा लावला होता. त्यातून त्याची ही उडी चित्रित झाली. या अचाट पराक्रमाचा व्हिडिओ यू-ट्यूबवर पाहायला मिळतो. तो बघताना मी अनेकदा थक्क झालोय. परवाच आणखी एक व्हिडिओ पाहिला. आता अनेक उपग्रह रॉकेटद्वारे सहज अंतराळात सोडले जातात. आपल्याला काही हे उड्डाण होताना थेट पाहायला मिळत नाही. टीव्हीवरच पाहायला मिळतं. पण या रॉकेटवरच कॅमेरा लावून त्या उड्डाणाचं चित्रिकरण केलेला एक व्हिडिओ मी पाहिला. यात आपण जणू त्या रॉकेटच्या पाठीवर बसून अंतराळात उंच उंच उडत निघालो आहोत, असं भासत होतं. हे दृश्य एकाच वेळी अत्यंत मनोरम आणि कल्पना केली तर थोडं भयावहही होतं. ते रॉकेट एवढ्या वेगात अंतराळात झेपावत होतं, की अवघ्या दोन मिनिटांत पृथ्वीची कडा दिसायला लागली. हे अफाट दृश्य केवळ यू-ट्यूबमुळंच अनुभवता आलं. 
याशिवाय आपण सहज जाऊ शकत नाही, अशी ठिकाणं पाहायला मिळण्याचं हे हक्काचं स्थान आहे. पाकिस्तानबद्दल मला कुतूहल आहे. मी यू-ट्यूबवर आता तिथली शहरं, तिथली माणसं, तिथले कार्यक्रम सहज पाहू शकतो. मग लक्षात येतं, की आपल्यासारखंच तर आहे तिथं सगळं! आपल्यासारखीच भाषा, वेष, खाणं-पिणं... फक्त धर्म वेगळा... गंमत म्हणजे तिथल्या लोकांनाही आपल्याबद्दल असंच वाटत असतं. मग आपला या दोन्ही देशांच्या संबंधांकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. 
मला जगभरातल्या शहरांबाबत आकर्षण आहे. लंडन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, पॅरिस, टोकियो, सिडनी, मेलबर्न, लॉस एंजेलिस, बर्लिन, मॉस्को अशी किती तरी शहरं मला प्रत्यक्ष जाऊन अनुभवायची आहेत. ते कधी होईल, ते माहिती नाही. पण आज यू-ट्यूबच्या मदतीनं मी या शहरांमधून फेरफटका मारू शकतो. किती तरी हौशी लोकांनी उच्च दर्जाचं शूटिंग करून ते इथं अपलोड केलंय. ते पाहताना मस्त वाटतं. आपण त्या शहरांमधूनच फिरतोय असं वाटतं. तिथं जाण्याची ओढ आणखी वाढते. जगातल्या या शहरांप्रमाणेच मला भारतातलीही विविध शहरं पाहायला आवडतात. जयपूर, लखनौ, कोलकता, हैदराबाद, नागपूर, इंदूर, पाटणा, गुवाहाटी, मदुराई, बेंगळुरू, पणजी अशा किती तरी शहरांमधून माझा 'फेरफटका' अधूनमधून सुरू असतो. 
शहरांप्रमाणेच मला आकर्षण आहे ते जगभरातल्या विमानतळांचं आणि विमानांचं... हे एक वेगळंच आणि विलक्षण जग आहे. एकदा त्यासंबंधीचे व्हिडिओ पाहायला लागलो, की मला कधीच कंटाळा येत नाही. विमानांचं टेकऑफ आणि लँडिंग पाहणं हाही माझा आवडीचा छंद आहे. वैमानिकाच्या कॉकपिटमध्ये बसण्याची संधी आपल्याला मिळण्याची शक्यता फारच कमी! पण यू-ट्यूबवर कॉकपिटमधून चित्रित केलेले हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातून जगभरातल्या नामवंत विमानतळांवरची टेकऑफ आणि लँडिंगची अप्रतिम दृश्यं पाहायला मिळतात. टेकऑफ करताना रात्र असेल, तर ते झगमगणारं शहर आणि वर अनंताच्या पोकळीत झेपावणारं ते महाकाय विमान पाहताना काही तरी विलक्षण अनुभूती येते. माणसाच्या आणि विज्ञानाच्या प्रगतीपुढं नतमस्तक व्हावंसं वाटतं. जगभरातल्या अनेक विमानतळांवर मी अशा रीतीनं 'लँडिंग' केलंय आणि तिथून उड्डाणही केलंय. काही विमानतळांवर लँडिंग करणं अवघड असतं. भूतानमधला पारोचा विमानतळ हा असाच एक अवघड विमानतळ आहे. तिथं उतरणाऱ्या विमानांचा कॉकपिटमधून चित्रित केलेला व्हिडिओ पाहणं थरारक असतं. 
विमानांप्रमाणंच मला आवडतात ते जगभरातले रस्ते आणि त्यावरून धावताना केलेले व्हिडिओ. मला स्वतःला फिरायची प्रचंड आवड आहे. पण कामामुळं हवं तितकं फिरता येतंच असं नाही. पण 'दुधाची तहान ताकावर' या न्यायानं मी जगभरातले उत्तमोत्तम रस्ते आणि त्यावरून धावणाऱ्या वेगवान कारमधून केलेलं चित्रिकरण 'यू-ट्यूब'वर पाहत बसतो. हे मी कितीही वेळ पाहू शकतो. मला कंटाळा येत नाही. युरोपातले रस्ते, विशेषतः स्वित्झर्लंडमधले, भान हरपतं. ग्रामीण इंग्लंडही असंच कमालीचं देखणं आहे. तिथल्या रस्त्यांचे व्हिडिओ पाहत बसायला मजा येते. अमेरिकेतले भव्य एक्स्प्रेस-वे पाहताना छाती दडपते. आपल्याकडे पण आता यमुना एक्स्प्रेस-वेसारखे जबरदस्त रस्ते झाले आहेत. अगदी आपला नेहमीचा पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे यूट्यूबवर कुणीकुणी केलेल्या चित्रिकरणातून पाहताना वेगळाच आणि सुंदर भासतो. अगदी आपलंच पुणे शहर एखाद्या परदेशी माणसाच्या नजरेतून पाहायला गंमत येते.
याशिवाय जगातल्या किती तरी आश्चर्यपूर्ण, अद्भुत गोष्टी आपल्याला 'याचि देही याचि डोळा' पाहायला मिळतात. यू-ट्यूबचं वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यावर जे व्हिडिओ शोधतो, त्याचा आधार घेऊन आपल्याला आपल्या आवडीचे व्हिडिओ पाहण्याची शिफारस केली जाते. यातून आणखी नवनव्या गोष्टी कळत जातात. त्यामुळं मला कधीही थोडा जरी रिकामा वेळ मिळाला, की मी या 'खिडकी'त येऊन बसतो. 
हा छंद मला सदैव अपडेट राहण्यास मदत करतो. हे जग, विश्व, ब्रह्मांड हा पसारा किती तरी मोठा आहे! त्या तुलनेत आपण किती लहान... पण आपल्या छोट्याशा जगण्यात असतात केवढे ब्रह्मांडाएवढे अहंकार...! पण हे सारं पाहताना ही फुकाच्या अहंगंडांची पुटं गळून पडतात आणि मन स्वच्छ, ताजंतवानं होऊन जातं. आपण प्रवासाला निघालो, की आपल्याला खिडकीत बसायला फार आवडतं. का? कारण आपल्याला त्यातून बाहेरचं भलं मोठं जग दिसत असतं. हा सभोवताल, ही सृष्टी, हा निसर्ग आणि त्यात नानाविध करामती करणारा 'माणूस' नावाचा अचाट बुद्धिमत्तेचा प्राणी हे सगळे आपल्याला नम्र ठेवण्यात मदत करतात. त्यांच्याकडं पाहायला मिळण्याची संधी ही 'खिडकी' देते. त्यामुळं तिच्यात सदैव डोकावत राहणं हा माझा लाडका छंद आहे.

---

(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१८)
---

No comments:

Post a Comment