22 Mar 2023

साहित्य शिवार दिवाळी अंक लेख २०२२

राष्ट्रप्रेमाचा धगधगता अंगार
--------------------------------



शहीद भगतसिंग, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्याविषयी आपण सगळे लहानपणापासून वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल या तीन प्रांतांचा सिंहाचा वाटा होता. या तीन राज्यांतील जणू प्रतिनिधी म्हणून हे तिघे वीर ब्रिटिशांच्या सत्ताकाळात २३ मार्च १९३१ रोजी लाहोर कारागृहात फासावर गेले. या तिघांपैकी भगतसिंग हे सर्वाधिक लोकप्रिय. भगतसिंग यांचे कार्यकर्तृत्व निश्चितच मोठे. मात्र, त्या तुलनेत राजगुरू वा सुखदेव यांच्याविषयी आपल्याला फार माहिती नसते. हुतात्मा राजगुरू हे तर आपल्या मराठी मातीतले स्वातंत्र्यसैनिक. अतिशय मोठा माणूस. विशेष म्हणजे आम्हा ब्रह्मे व राजगुरू लोकांचे ते थेट पूर्वज. ही गोष्ट मला अर्थातच खूप नंतर समजली. आपल्या घराण्यात एवढा मोठा क्रांतिकारक होऊन गेला हे समजलं तेव्हा माझी छाती अभिमानानं भरून आली. आता आमचं आडनाव ब्रह्मे आणि हुतात्मा राजगुरू हे तर राजगुरू. मग आमचा आणि त्यांचा संबंध कसा आला? राजगुरूंचं मोठेपण सांगता सांगता हा वैयक्तिक नातेसंबंधही इथं सांगणं अप्रस्तुत ठरणार नाही, असं वाटतं.
हुतात्मा राजगुरू यांचं मूळ गाव चाकणजवळचं खेड. हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. संस्कृतमध्ये ते सहज संभाषण करीत असत. केवळ इतकंच नव्हे, तर शरीरही कमावलेलं होतं. कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. महत्त्वाचं म्हणजे ते अव्वल नेमबाज होते. असं सांगतात, की उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवत असत. स्वातंत्र्याच्या ध्येयानं प्रेरित झालेला हा तरुण आपला देह कणखर करण्यासाठी काय काय करीत होता? रात्रीतून धावत-धावत १५-२० मैल अंतरावरील स्मशानात जायचं, तेथील विहिरीत पोहायचं आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपायचं! आहे की नाही कमाल! इतका त्यांचा स्टॅमिना होता, की तासन् तास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत. अर्थातच मुंग्या चावा घेत. तरीही शिवरामच्या चेहऱ्यारील रेषही हलत नसे. एकदा त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली. लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला. त्यांचा हात अर्थातच खूप भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाले तरीही त्यांनी हूं की चूं केले नाही.
ज्या साँडर्सच्या हत्येबद्दल भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही फाशी झाली, त्या साँडर्सला मारले तेव्हाचा प्रसंग. साँडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे; त्याला गोळी लागणे शक्य नाही, अशी शंका भगतसिंगांना वाटत होती. राजगुरूंनी मात्र भगतसिंग नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेली गोळी साँडर्सच्या दोन भुवयांच्या बरोबर मधोमध कपाळातून आरपार गेली. राजगुरूंनी लक्ष्याकडे पाहिलेदेखील नाही.
हे बघून भगतसिंग थक्क झाले. विश्वास न बसून त्यांनी नंतर त्या प्रेताला जवळून आठ गोळ्या मारल्या.
असे होते महान क्रांतिकारक राजगुरू!
आपल्याला मात्र त्यांच्याविषयी फार फार कमी माहिती होती. मी स्वत:ही याला अर्थातच अपवाद नाही. मात्र, नशिबाने पुढं मला राजगुरूंचं कार्य जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. आपल्याच महान पूर्वजांबद्दल माझ्या मनात असलेल्या अज्ञानाचा घोर अंधार थोडा तरी दूर झाला आणि त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेचा एक नंदादीप आता माझ्या मनात कायमचा तेवत राहिला आहे.
मी राजगुरूंपर्यंत कसा पोचलो, याची पार्श्वभूमी इथं थोडीशी सांगायला हवी.
मला लहानपणापासूनच आमच्या ब्रह्मे या आडनावाविषयी कुतूहल वाटत असे. आपलं आडनाव वर्गातल्या इतर मुलांसारखं कुलकर्णी, देशपांडे, पाटील, देशमुख, पवार असं काही नसून ‘ब्रह्मे’ असं जरा (तेव्हा) अवघड वाटणारं का आहे, असा प्रश्न पडायचा. फार प्रश्न पडू न देण्याचा आणि पडले तरी न विचारण्याचा तो काळ असल्यामुळं मनातल्या या शंका आणि प्रश्न मनातच राहिले. आम्ही तेव्हा जामखेडला राहत असू. माझा जन्मही तिथलाच. त्यामुळं तेच आपलं मूळ गाव अशी माझी समजूत होती. पण कधी तरी आजोबांच्या आणि इतर चुलत आजोबा किंवा काका मंडळींच्या बोलण्यात आपलं मूळ गाव पुण्याजवळचं ‘चाकण’ आहे, असं यायचं. मी तोवर चाकण हे गाव पाहिलंही नव्हतं. चाकणच्या भुईकोट किल्ल्याचा रणसंग्राम आणि किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांचा पराक्रम याविषयी नंतर इतिहासाच्या पुस्तकांत त्रोटक वाचलं. आमचं एक कुलदैवत म्हणजे चाकणचा मुंजा. तो या चाकणच्या भुईकोट किल्ल्याच्या आतच आहे. किल्ल्याचं बांधकाम करताना ब्रह्मे घराण्यातील नऊ वर्षांच्या दामोदर नावाच्या मुलाचा बळी दिला होता आणि त्याचंच मंदिर आता तिथं आहे, अशी हकीकत घरातले जाणकार सांगायचे. त्या लहान वयातही इतक्या लहान मुलाचा बळी देण्याच्या कल्पनेनं मला प्रचंड रडू फुटलं होतं. तरीही तो किल्ला किंवा चाकणपर्यंत पोचण्याचं काही कारण दिसत नव्हतं.
मी १९९१ ला दहावीनंतर पुण्यात गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. तिथं होस्टेलवर माझा रूम पार्टनर होता नीलेश नगरकर. त्याचं गाव होतं राजगुरुनगर. अर्थात ते पुण्याहून एका तासाच्या अंतरावर असल्यानं तो दर आठवड्याला घरी जायचा. तुलनेनं मला नगरला जाणं थोडं लांब पडायचं. त्यामुळं मी पंधरा दिवस किंवा तीन आठवड्यांनी घरी जायचो. जेव्हा मी घरी जायचो नाही, तेव्हा नीलेश मला त्याच्या घरी - खेडला - येण्याचा आग्रह करायचा. मी त्याच्याबरोबर अनेकदा त्याच्या घरी जायचो. एक दिवस राहायचो आणि दुसऱ्या दिवशी दोघेही होस्टेलला परत यायचो. तर हा माझा मित्र राजगुरुनगरला जिथं राहत होता, ते हुतात्मा राजगुरूंचं घर होतं. तो एक वाडा होता. एका बाजूला राजगुरूंचं छोटंसं स्मारक होतं आणि दुसऱ्या बाजूला काही बिऱ्हाडं राहत होती. तेव्हा राजगुरूंच्या या वास्तूनं अशा रीतीनं मला तिच्याकडं वारंवार बोलावून घेतलं होतं. अर्थात तेव्हा आम्ही तसे लहान होतो आणि आमच्या नव्या अभ्यासक्रमात स्थिर होण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळं राजगुरूंची जुजबी माहिती घेण्यापलीकडं आणि त्या वाड्यात येता-जाता त्यांच्या तसबिरीला नमस्कार करण्यापलीकडं फार काही हातून झालं नाही.
पुढं अशा काही घटना घडल्या, की मी इंजिनीअरिंग डिप्लोमा सोडून पत्रकारितेत घुसलो. नगरला ‘लोकसत्ता’त काम करत असताना तिथं विलास राजगुरू हा तरुण पेजमेकिंग आर्टिस्ट म्हणून रुजू झाला. त्याच्याशी ओळख वाढली, तेव्हा कळलं, की तो हुतात्मा राजगुरूंचा थेट वंशज आहे. मला हे ऐकून सुखद धक्काच बसला. मी विलासच्या घरी गेलो, तेव्हा कळलं, की त्याचे वडील रोज घरासमोर आपला तिरंगा लावतात आणि संध्याकाळी  (नियमाप्रमाणे) उतरवून ठेवतात. तेव्हा राष्ट्रध्वजाबाबतचे नियम बरेच कडक होते आणि कुणालाही असा घरासमोर राष्ट्रध्वज लावता यायचा नाही. मात्र, विलासच्या वडिलांनी प्रशासनाकडून खास परवानगी मिळविली होती आणि राजगुरूंचे वंशज म्हणून त्यांना तशी परवानगी मिळालीही होती. त्यांच्या घरासमोर डौलानं फडकणारा तिरंगा पाहून मला काय वाटलं, हे मी खरोखर शब्दांत सांगू शकत नाही. हुतात्मा राजगुरू भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या १६ वर्षं आधीच हुतात्मा झाले होते. त्यांना स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकताना पाहायला मिळाला नव्हता. ‘इन्किलाब झिंदाबाद’ म्हणत ते कोवळे, विशीतले तीन वीर हसत हसत फासावर गेले होते. पुढं विलासकडूनच मला राजगुरू आणि ब्रह्मे हे पूर्वीचं एकच घराणं कसं होतं, याची माहिती मिळाली. विलासनं अतिशय मेहनतीनं या सर्व इतिहासावर एक पुस्तकच लिहिलं आहे. सिद्धेश्वरशास्त्री ब्रह्मे या सिद्धपुरुषापासून आमच्या घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. शहाजीराजे व छत्रपती शिवरायांकडे अनुष्ठान वा मोठा धार्मिक कार्यक्रम असल्यास ते पौरोहित्यासाठी जात असत. कचेश्वरशास्त्री हे त्यांचे चिरंजीव. त्यांना शाहू महाराजांच्या काळात ‘राजगुरू’ ही उपाधी मिळाली असं सांगतात. तेव्हापासून ब्रह्मे घराण्यातील एका शाखेचं आडनाव ‘राजगुरू’ असं झालं. 

हे कळल्यावर मला राजगुरूंविषयी वाटणारा आदर आपुलकी आणि जिव्हाळ्यात परिवर्तित झाला. त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं, अशी उत्सुकता वाटू लागली. इतिहासाच्या पुस्तकांत किंवा इंटरनेटवरही त्यांच्याविषयी तशी त्रोटकच माहिती उपलब्ध आहे. मीही हा लेख लिहिताना याच माहितीचा आधार घेतला आहे.
शिवराम हरी राजगुरूंचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी खेड इथं मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्यांच्या वडिलांचे नाव हरी नारायण राजगुरू. त्यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव पार्वतीबाई. हरी राजगुरू व पार्वतीबाई यांना एकूण पाच अपत्ये झाली. शिवराम हे त्यांचे पाचवे अपत्य. त्यांचं प्राथमिक शिक्षणही खेड इथंच झालं. शिवराम सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे मोठे बंधू व आईने केला. वयाच्या चौदाव्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशानंतर त्यांच्या भावाने आपल्या नववधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचण्याची शिक्षा केली. हा अपमान सहन न झाल्याने लहानग्या शिवरामने अंगावरील वस्त्रांनिशी घर सोडलं. नंतर शिवराम राजगुरू अमरावतीला गेले. तेथील प्रसिद्ध हनुमान व्यायामशाळेच्या वातावरणात त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या १५ व्या वर्षी ते काशीला संस्कृत शिकण्यासाठी गेले. संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवतानाच न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. ‘लघु सिद्धान्त कौमुदी’चा त्यांनी अभ्यास केला. त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मल्याळी, हिंदी व उर्दू या भाषाही चांगल्या येत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची गनिमी युद्ध पद्धती यांबद्दल त्यांना विशेष आकर्षण होतं. काही काळ राजगुरूंनी काँग्रेस सेवादलातही काढला. वाराणसीला असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिकारी नेत्यांशी ओळख झाली. मग ‘हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी’मध्ये दाखल होऊन त्यांनी उत्तर भारतात क्रांतिकार्यात भाग घेतला. ‘रघुनाथ’ या टोपणनावाने ते त्या वेळी प्रसिद्ध होते. पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिकारी सैन्याचे सैनिक बनले. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतिनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिकारी नेत्यांशी मैत्री झाली.
राजगुरू २० वर्षांचे असताना भारतात ब्रिटिशांनी सायमन कमिशन पाठवले. या सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या आंदोलनात थोर नेते लाला लजपतराय जबर जखमी झाले. त्यातच १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लालाजींचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा पंजाबी क्रांतिकारी नेत्यांनी निर्धार केला. यासाठी चंद्रशेखर आझाद, राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोघेही संयुक्त प्रांतातून आले. पंजाब आणि उत्तर प्रदेश शाखेच्या नेत्यांनी संयुक्तपणे लाहोरमध्ये ही कृती केली. या हल्ल्ल्याला जबाबदार असलेल्या स्कॉट या अधिकाऱ्याला मारायचं या क्रांतिकारकांनी ठरवलं होतं. मात्र, स्कॉटऐवजी चुकून ब्रिटिश पोलिस अधिकारी साँडर्स मारला गेला. साँडर्सवर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉलमधल्या बॉम्बबफेकीनंतर पकडले गेले; पण आझाद व राजगुरू दोन वर्षे अज्ञातस्थळी भूमिगत होते. भगतसिंग व राजगुरू दोघांनीही वेष बदलून लाहोर सोडले. भगतसिंग लाहोरवरून हावड्याला गेले, तर राजगुरू आधी लखनौला आणि तेथून वाराणसीला गेले. नंतर ते उत्तर प्रदेशातून नागपूरला आले. तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाच्या घरी त्यांनी आश्रय घेतला. तेथून पुण्याला जात असताना ३० सप्टेंबर १९२९ रोजी - म्हणजे साँडर्सच्या हत्येनंतर २२ महिन्यांनी - राजगुरूंना अटक करण्यात आली. तिघांवर खटला भरण्यात आला. निकाल काय लागणार, हे स्पष्टच होतं. त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर लाहोरच्या कोट लखपत कारागृहात फाशी चढविण्यात आलं. मृत्यूनंतर फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या किनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भगतसिंग या क्रांतिकारकांचे मुख्य होते, त्यामुळे त्यांचे नाव व लोकप्रियता तुलनेनं अधिक होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही भगतसिंग यांच्याविषयी अधिक बोलले गेले. ते अजिबात गैर नाहीच; परंतु राजगुरू व सुखदेव यांच्यावर मात्र काहीसा अन्याय झाला. राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या गावाचे नाव बदलून ‘राजगुरुनगर’ करण्यात आले. मात्र, त्यांच्या जन्मस्थळी अद्यापही त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल असे भव्य स्मारक झालेले नाही. या भागातले लोकप्रतिनिधी दर वर्षी हुतात्मा दिनाला तशी मागणी करतात. मात्र, पुढे त्याचे काहीही होत नाही. हे भव्य स्मारक होणं आणि पुढच्या पिढीला हुतात्मा राजगुरूंविषयी अधिकाधिक माहिती होणं हीच खरी या थोर क्रांतिकारकाला आदरांजली ठरेल.


(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०२२)

----

17 Mar 2023

रॉकेट बॉइज-२ - रिव्ह्यू

देशप्रेमाचं उत्तुंग यान
-----------------------



भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत देशाची जी वैज्ञानिक प्रगती झाली आहे, तीत डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. भाभा यांना ‘भारतीय अणुबॉम्बचे जनक’, तर डॉ. साराभाई यांना ‘भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचे जनक’ असंच सार्थपणे म्हटलं जातं. आपल्याला एखाद्या राजकारण्याची किंवा प्रसिद्ध नटाची जेवढी माहिती असते, तेवढी दुर्दैवाने आपल्या शास्त्रज्ञांची नसते. शाळेत एखाद्या धड्यात एखादा परिच्छेद उल्लेख असेल तर तेवढाच. बाकी त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण व्हावं, त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं असं वाटण्याजोगी परिस्थिती माझ्या बालपणी तरी सभोवती नव्हती. चित्रपट माध्यम ताकदवान असलं, तरी मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या विषयांना अंगभूत मर्यादा आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या आयुष्यावर चित्रपट तयार होतील, असं गेल्या दोन दशकांपूर्वी तरी नक्कीच वाटत नव्हतं. एकविसाव्या शतकानंतर परिस्थिती काहीशी बदलली असली, तरी ‘ओटीटी’चं आगमन झाल्यापासून ती विशेष पालटली आहे, असं म्हणता येईल. त्यामुळेच डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांचं जीवन उलगडून दाखविणारी ‘रॉकेट बॉइज’ ही वेबसीरीज आपल्याकडे तयार होऊ शकली. ‘सोनी लिव्ह’वर गेल्या वर्षी या सीरीजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला. खरं सांगायचं तर सुरुवातीचे एक-दोन भाग बघून मला ती सीरीज चक्क बोअर झाली व मी ती बघायची बंद केली. मग कुठे तरी पुन्हा या सीरीजची चर्चा कानी पडली तेव्हा मग पुन्हा बघायला घेतली आणि निग्रहानं पूर्ण केली.
सुमारे दीड वर्षानं या सीरीजचा दुसरा सीझन आला आहे. काल मी तो बघायला सुरुवात केली आणि त्यात एवढा गुंतून गेलो, की सलग आठ भाग बघूनच (बिंज वॉच) थांबलो. मी फार क्वचित सीरीज अशा ‘बिंज वॉच’ केल्या आहेत. त्यातली ही एक. साधारण ४० ते ५० मिनिटांचा एक भाग असे हे आठ भाग आपल्याला खिळवून ठेवतात, याचं कारण स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वांत महत्त्वाच्या कालखंडाचं चित्रण डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्या जीवनकथेच्या रूपानं आपल्यासमोर येतं. यात १९६४ ते १९७४ असा दहा वर्षांचा कालखंड दाखविण्यात आला आहे. इथं एक गोष्ट सांगायला पाहिजे, की पहिला सीझन पूर्ण बघितल्याशिवाय हा सीझन बघायला सुरुवात करू नये. पहिल्या सीझनमधले अनेक संदर्भ या दुसऱ्या सीझनमध्ये येतात. पहिला सीझन जरा निग्रहानं बघायला लागतो. मात्र, डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांची जडणघडण कशी झाली, याचं ते चित्रीकरण आहे. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अर्थात १९६४ पर्यंतचा काळ आहे. 

दुसऱ्या सीझनमध्ये मात्र वेगवान घटनांची ‘तुफान मेल’च आहे. कॅथरिन फ्रँक यांचं ‘इंदिरा - ए लाइफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी’ हे माझं आवडतं पुस्तक आहे. त्यात फ्रँक यांनी इंदिराजींच्या आयुष्यातल्या व त्यासोबतच भारताच्या इतिहासातल्या अनेक गोष्टींचं दस्तावेजीकरण करून ठेवलंय. ज्यांना त्या घटना, त्यांचा क्रम, राजकीय महत्त्व, सामाजिक महत्त्व माहिती आहे त्यांना ‘रॉकेट बॉइज’चा दुसरा सीझन बघायला मजा येईल. त्यामुळे माझी अशी शिफारस आहे, की या कालखंडातील महत्त्वाच्या घटना जाणून घेऊन मगच ही मालिका बघायला घ्यावी. सत्तरचं दशक नवभारतातलं ‘नवनिर्माणाचं दशक’ म्हणून ओळखलं जातं. स्वातंत्र्य मिळून दीड दशक झालं होतं. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत भारतात नवनिर्माण सुरू होतं. नवी धरणं बांधली जात होती, नवे वैज्ञानिक प्रकल्प उभे राहत होते, उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या, चांगले चित्रपट येत होते, वेगळं संगीत तयार होत होतं... याच काळात डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्यासारखे द्रष्टे शास्त्रज्ञ ५० वर्षांनंतर भारत कुठे असेल, याची स्वप्नं बघत होते. (त्यांच्या जोडीला तेव्हा कलाम नावाचा एक भरपूर केस वाढवलेला, उत्साही तरुणही सोबत असायचा.) 
भारत १९६२ च्या चीन युद्धानंतर बॅकफूटला गेला होता. दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई, भूकबळी या समस्या सार्वत्रिक होत्या. ‘रॉकेट उडवून काय करायचं? गरीब देशाला परवडणार आहे का ते?’ या आणि अशा मतांची केवळ जनतेत नव्हे, तर सरकारमध्येही चलती होती. अणुबॉम्बचं तर नावही काढायची चोरी होती. भारत हा बुद्धांचा देश होता, महात्मा गांधींचा देश होता. या देशाला अणुबॉम्ब कशाला पाहिजे? अमेरिकादी पाच नकाराधिकारप्राप्त देश अणुचाचण्या करून बसले होते आणि आता त्यांना जगात कुणीही अणुबॉम्ब बनवायला नको होता. अमेरिकेच्या ‘अरे’ला ‘का रे’ म्हणण्याची राजनैतिक हिंमत भारताच्या नेतृत्वाकडे नव्हती, याचं कारण आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगळीच होती. शीतयुद्धाचा काळ जोरात होता. शस्त्रस्पर्धा ऐन भरात होती. सीआयए, केजीबी, मोसाद यांच्या आंतरराष्ट्रीय कारवायांना ऊत आला होता. त्यांच्या कारवायांच्या दंतकथा आणि बाँडपट यांच्यात फारसा फरक उरला नव्हता. 
‘रॉकेट बॉइज’च्या दुसऱ्या सीझनला या सगळ्या आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचा विस्तृत पट लाभला आहे. त्या भव्य पटावर ही कथा बघताना डॉ. भाभा, पं. नेहरू, डॉ. साराभाई, इंदिरा गांधी या सगळ्यांचं मोठेपण ठसल्याशिवाय राहत नाही. डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्यातही मतभेद होतेच. डॉ. साराभाई थोडेसे मवाळ स्वभावाचे होते, तर डॉ. भाभा म्हणजे आयुष्य पूर्णपणे एंजॉय करणारे, मस्तमौला व्यक्तिमत्त्व! दोघांच्या स्वभावाचं प्रतिबिंब त्यांच्या कामगिरीतही दिसतं. या जोडीला दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातले चढ-उतारही आपल्याला दिसत राहतात. विशेषत: डॉ. साराभाई आणि कमला चौधरी यांच्या नात्यामुळं मृणालिनी व साराभाई यांच्यात निर्माण झालेले मतभेद आणि पुढं त्यांचं मनोमिलन हा सगळा भाग दिग्दर्शकानं फार प्रगल्भतेनं हाताळलाय. छोट्या मल्लीचंही (मल्लिका साराभाई) दर्शन यात घडतं. 
या सर्व घटनाक्रमात नाट्य निर्माण करणारे दोन फितुर म्हणजे माथूर आणि प्रसन्नजित डे हे दोघे जण. हे या कथानाट्यातले व्हिलन आहेत. मेहदी रझा या शास्त्रज्ञाचे होमी भाभांशी असलेले मतभेद व वाद पहिल्या सीझनमध्ये आले आहेत. य वादाचे पडसाद या सीझनमध्ये भयानक पद्धतीने पडतात. नेहरूंचं निधन, लालबहादूर शास्त्री पंतप्रधानपदी येणं, त्यांचा ताश्कंदमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू, इंदिरा गांधींची पंतप्रधानपदी झालेली निवड, कामराज व मोरारजी यांचं राजकारण, होमी भाभांचं नेहरूंना ‘भाई’ व इंदिराजींना ‘इंदू’ असं जवळिकीनं संबोधणं, साराभाईंच्या नियुक्तीवरून केंद्रीय मंत्रीमंडळात इंदिराजींना झालेला विरोध, सीआयएची कारस्थानं, माथूर व डे यांचे देशविरोधी उद्योग, डॉ. भाभा यांचं ‘विमान अपघाता’त झालेलं धक्कादायक निधन, इंदिराजींना बसलेला धक्का, पुढं काही विशिष्ट घटनाक्रमानंतर डॉ. साराभाईंना अणुबॉम्ब बनविण्याची जाणवलेली निकड, इंदिराजींच्या पुढाकारानं सुरू झालेला भारताचा अणुबॉम्ब तयार करण्याचा गुप्त कार्यक्रम, ‘दूरदर्शन’चे कार्यक्रम सॅटेलाइटद्वारे देशभर प्रसारित करण्याची डॉ. साराभाईंची धडपड, रॉकेटची अयशस्वी उड्डाणं, नंतर आलेलं यश, विक्रम-मृणालिनी यांचं एकत्र येणं, साराभाईंचा थुंबा येथे अचानक झालेला मृत्यू, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. कलाम, डॉ. राजा रामण्णा, अय्यंगार व इतर शास्त्रज्ञांनी जीवतोड मेहनत घेणं, अणुबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम अमेरिकेपासून गुप्त ठेवण्यासाठी केलेल्या नाना क्लृप्त्या-युक्त्या असा सगळा घटनाक्रम या सीझनमध्ये आपल्यासमोर धबधब्यासारखा आदळत राहतो. या सर्वांचा कळसाध्याय म्हणजे १९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये केलेली पहिली यशस्वी अणुचाचणी! ती चाचणी आणि ती पूर्ण करण्याआधी आलेल्या अडचणी हे सगळं प्रत्यक्षच बघायला हवं!
ही सगळी केवळ या दोन शास्त्रज्ञांची कहाणी न राहता, ही आपल्या देशाच्या प्रगतीच्या विलक्षण धडपडीची कहाणी झाली आहे, हे दिग्दर्शक अभय पन्नूचं सर्वांत मोठं यश आहे. म्हणूनच हा सीझन देशप्रेम, स्वाभिमान, जिद्द अशा अनेक भावनांवर स्वार होऊन, एका विलक्षण उंचीवर जाऊन पोचला आहे. अभय कोरान्ने यांनी या मालिकेचं लेखन केलं आहे. त्यांचं श्रेय महत्त्वाचं आहे. यातील सर्वच कलाकारांची कामं उत्कृष्ट झाली आहेत. डॉ. भाभांच्या भूमिकेत जिम सरभ या अभिनेत्यानं कमाल केली आहे. इश्वाकसिंह या अभिनेत्याने डॉ. साराभाई उत्तम उभे केले आहेत. मृणालिनी साराभाईंच्या भूमिकेत रेजिना कॅसँड्रा ही अभिनेत्री अप्रतिम शोभली आहे. विशेषत: तिचे नृत्य व मुद्राभिनय खास! नेहरूंच्या भूमिकेत रजित कपूर एकदम फिट! (एका प्रसंगात ते मद्यपान करताना व सिगारेट ओढताना दाखवले आहेत. नेहरू या दोन्ही गोष्टी करत होतेच; त्यामुळं त्यात काही गैर नाही. मात्र, वेबसीरीज नसती तर असे दृश्य कुणी दाखवू शकले असते काय, असे वाटून गेले!) रझाच्या भूमिकेत दिव्येंदू भट्टाचार्य या अभिनेत्याने अक्षरश: जीव ओतला आहे. शेवटी या व्यक्तिरेखेसाठी आपल्याला अतिशय वाईट वाटतं, त्याचं श्रेय या अभिनेत्याला नक्कीच आहे. अर्जुन राधाकृष्णन या तरुणाने डॉ. कलाम छान साकारले आहेत. (ही मालिका संपली असली, तरी डॉ. कलाम व त्यांचे सहकारी यांच्या कामगिरीवर पुढचा सीझन यावा असं वाटण्याइतपत या दुसऱ्या सीझनमध्ये डॉ. कलाम यांचा प्रेझेन्स आहे.) चारू शंकर यांनी साकारलेल्या इंदिराजी ठीकठाक. त्यांचा प्रोस्थेटिक मेकअप अगदी जाणवतो. सर्वांत खटकले ते यशवंतराव चव्हाण. यशवंतराव हे काळे-सावळे असले, तरी तेजस्वी व राजबिंडे व्यक्तिमत्त्व होते. या मालिकेत यशवंतरावांची व्यक्तिरेखा मात्र अजिबात नीट ठसली नाही. कामराज व मोरारजी मात्र जमले आहेत.
आपल्या देशात गेल्या ७०-७५ वर्षांत काहीच झालं नाही, वगैरे प्रचार हल्ली सुरू असतो. तो मनावर ठसविण्यापूर्वी ही मालिका नक्की बघावी. आपलं देशप्रेमाचं रॉकेट आकाशात उत्तुंग झेपावल्याशिवाय राहणार नाही!

---

दर्जा - चार स्टार

---