14 Mar 2019

प्रभाकर पणशीकर व विंदा आठवणी

१. प्रभाकरपंतांची आठवण
---------------------------------------------------

मी माझ्या आयुष्यात प्रथम मुंबईला गेलो, तो १९९६ मध्ये. तेव्हा मी २० वर्षांचा होतो. त्यापूर्वी १९८७ मध्ये वसईला आमचे एक चुलतआजोबा राहायचे, त्यांच्याकडे गेलो होतो. पण वसई म्हणजे काही मुंबई नव्हे. तर मुंबईला मी एकटाच गेलो होतो व सगळीकडं फिरलो होतो. माझगावला विक्रीकर भवनात माझं काम होतं. ते केलं. मग दिवसभर गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट असं भटकत मी संध्याकाळी शिवाजी पार्क पाहण्यासाठी दादरला आलो. तिथं चालताना अचानक शिवाजी मंदिर दिसलं. तेव्हा पाच वाजता ‘तो मी नव्हेच’चा प्रयोग लागलेला मला दिसला. तेव्हा साडेचार वाजले होते. मी तडक त्या नाटकाचं तिकीट काढलं व आत शिरलो. वीस रुपयांचं तिकीट होतं व मागून दुसरी ओळ मला मिळाली होती. नाटकाला फार गर्दी नव्हती. पण मी साक्षात प्रभाकर पणशीकरांना ‘तो मी नव्हेच’मधल्या त्या पाच गाजलेल्या भूमिका करताना पाहत होतो. आयुष्यात पहिल्यांदाच तो फिरता रंगमंच पाहिला. नाटक पाहून धन्य झालो. तेव्हा मागे जाऊन पंतांना भेटावं वगैरे काही सुचलं नाही आणि तेवढं धैर्यही नव्हतं. मग मी तिथून बसनं सेंट्रलला आलो व एसटी पकडून नगरला आलो. 
त्यानंतर प्रभाकर पणशीकर यांना थेट भेटण्याचा योग पुन्हा येईल असं मला मुळीच वाटलं नव्हतं. पण तो योग पाचच वर्षांनी, म्हणजे २००१ च्या जानेवारीत आला. आमच्या जामखेडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं ते सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं व त्या वर्षाच्या सांगता समारंभासाठी प्रभाकर पणशीकरांना निमंत्रित करण्याचा निर्णय तिथल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. विशेष म्हणजे पुण्याहून पंतांना जामखेडला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्या काकावर सोपविण्यात आली होती. तेव्हा मी ‘सकाळ’मध्ये काम करायला सुरुवात करून तीन-चार वर्षं झाली होती. पत्रकार म्हणून मी स्थिरावत होतो. त्यामुळं शाळेच्या लोकांनी मलाही जामखेडला त्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. पंतांसोबत जायची ही संधी मी सोडणार नव्हतोच. जानेवारीतला तो नक्की दिवस मला आठवत नाही, पण मी व काका सुमो की क्वालिस की अशीच कुठली तरी ट्रॅव्हल्सची जीप घेऊन सहकारनगरमध्ये पंत ज्यांच्याकडं उतरले होते, त्या पत्त्यावर गेलो. आम्ही गेलो, तेव्हा पंत तयारच होते. धोतर, तलम झब्बा व त्यावर लाल रंगाचं जाकीट त्यांनी घातलं होतं. त्यांची ती ट्रेडमार्क गोल टोपी मात्र तेव्हा त्यांनी घातली नव्हती. गाडीत मी त्यांच्या शेजारी बसलो व काका पुढं ड्रायव्हरशेजारी बसला. पुणे ते जामखेड हे अंतर पाच तासांचं आहे. या संपूर्ण प्रवासात मला पंतांशी गप्पा मारता आल्या. ‘सकाळ’मध्ये आम्ही सुरुवातीला ट्रेनी असताना कुठल्याही सेलिब्रिटी व्यक्तीला भेटायला जाताना त्यांच्याविषयीची सर्व माहिती वाचून मगच जायचं, असं आम्हाला शिकवलं होतं. त्यानुसार मी आमच्या लायब्ररीत आदल्या दिवशी जाऊन पंतांचं पाकीट काढून त्यांची सगळी माहिती (मुलाखती, कात्रणं, बातम्या, लेख) वाचून काढले होते. प्रवासात त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता मी अधूनमधून ही माहिती पेरायला लागलो. पंतांनी ते लगेच ओळखलं. ‘माझा बराच अभ्यास केलेला दिसतोय’ असं ते कौतुकानं म्हणाले. कोरेगाव भीमा इथं आमची गाडी थांबली. तिथं रस्त्याच्या कडेला असलेल्या एका साध्याशाच हॉटेलात आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो. विशेष म्हणजे गांधी टोपी घालणाऱ्या त्या थोड्या वयस्कर मालकानं पंतांना ओळखलं. त्यानं तेवढ्या गडबडीत कुठून तरी नारळ, हार आणून पंतांचा सत्कारही केला. पंतांचं सेलिब्रिटी असणं आता आम्ही अनुभवत होतो. पंतांनी नाटकांच्या निमित्तानं सगळा महाराष्ट्र कित्येकदा पालथा घातला होता. त्यामुळं त्यांना सगळी माहिती होती. पुढं सुप्याला गाडी पोचताच, त्यांनी ‘आता बर्की घेऊ या’ असं सांगितलं. मी आत्तापर्यंत शेकडो वेळा नगर-पुणे रस्त्यानं प्रवास केला असला, तरी तिथं असा काही पदार्थ मिळतो हे मला माहिती नव्हतं. (कारण तोपर्यंत एसटीनंच प्रवास व्हायचा व एसटी सुप्याला थांबत नसे.) तर नानकटाईसारखा दिसणारा तो पदार्थ त्यांना हवा होता. त्यांनी एका विशिष्ट हॉटेलपुढं गाडी थांबवायला सांगितली आणि ती बर्की घेतली. त्यांनी घेतली म्हणून मग आम्हीही घेतली. दुपारी जामखेडला पोचलो. तिथल्या डाकबंगल्यात त्यांची व्यवस्था केली होती. त्यांना तिथं सोडून आम्ही आमच्या घरी गेलो. संध्याकाळी शाळेत पुन्हा पंत भेटले. एकूण रागरंग पाहून ते मला अचानकच तिथं म्हणाले, की असं करू या.... मी भाषण करत नाही. तूच माझी मुलाखत घे. मी त्यांच्याबरोबर जरा जास्तच बोललो की काय, असं मला वाटायला लागलं. पण तेव्हा मला काही त्यांना नाही म्हणायचं कारणच नव्हतं. मग मी त्यांची मुलाखत घेतली. समोर पाचवी ते दहावीतली मुलं रांगा करून बसली होती. त्यांना पंत माहिती असायचं कारणच नव्हतं. मुलाखत चालू असताना मुलांनी दंगा करणं सोडलं नाही. मुलाखत रंगलीच नाही. अर्ध्या तासात ती आम्ही गुंडाळली. पण शाळेच्या पदाधिकाऱ्यांना पंतांचं मोठेपण माहिती होतंच. त्यामुळं कार्यक्रमानंतर पुन्हा छान गप्पा रंगल्या. संध्याकाळी डाकबंगल्यावर पंतांची पुन्हा सगळी ‘साग्रसंगीत’ सोय करण्यात आली होती. पण आपल्याच गावात (आपले शिक्षक तिथं असताना) आपल्याला अशा ठिकाणी कुणी जाऊ देत नाही. त्यामुळं त्या मैफलीला मी मुकलोच. नंतर पंत परस्पर पुण्याला गेले... आमची भेट परत झाली नाही.
मी ‘मटा’त रुजू झाल्यावर २०११ मध्ये म्हणजे मी त्यांना भेटल्यानंतर बरोबर दहा वर्षांनी एके दिवशी त्यांचं निधन झाल्याची बातमी आली. तेव्हा आमची डेडलाइन फारच लवकर, म्हणजे पावणेदहाची होती. पंत गेल्याचं साधारण सव्वानऊ वाजता कळलं होतं. मग आम्ही सगळ्यांनी फार गडबड करून त्यांच्या निधनाची व्यवस्थित बातमी आमच्या अंकात घालविली... 
आज १४ मार्च. पंतांचा जन्मदिन. ते आज असते तर ८८ वर्षांचे असते. 
त्यानिमित्त हे सगळं आठवलं, इतकंच....

(१४ मार्च २०१९)

---

२. विंदांची आठवण
------------------------------

साहित्य संमेलन या प्रकाराविषयी मला लहानपणापासूनच भयंकर कुतूहल होतं. पण मी पहिल्यांदा संमेलन पाहिलं ते १९९७ ला नगरला. तेव्हा यशवंतराव गडाख यांनी नगरला सत्तरावं साहित्य संमेलन घेतलं होतं. साहित्य संमेलनांच्या इतिहासातलं एक प्रचंड यशस्वी, महागर्दीचं संमेलन म्हणून हे संमेलन ओळखलं जातं. तेव्हा मी नगरच्या 'लोकसत्ता'त प्रूफरीडर म्हणून काम करीत होतो. दोन ते चार जानेवारी १९९७ या काळात हे संमेलन भरलं होतं. दोन जानेवारीला नगरच्या मार्केट यार्डातून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली होती. त्या संमेलनाचे अध्यक्ष ना. सं. इनामदार होते. माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे त्यांना घोडागाडीत बसवलं होतं. ही ग्रंथदिंडी नगरच्या प्रमुख रस्त्यांवरून प्रवास करीत, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मोकळ्या मैदानात, जिथं संमेलनाचा मंडप होता, तिथपर्यंत प्रवास करणार होती. मी आणि माझे 'लोकसत्ता'तले सहकारी उत्साहानं या दिंडीत सहभागी झालो होतो. अनेक साहित्यिक नगरला आले होते. पण सगळ्यांत ठळक लक्षात राहिले ते विंदाविंदा तेव्हा ७९-८० वर्षांचे होते. पण अत्यंत उत्साहाने ते ग्रंथदिंडीत चालत होते. मी त्यांना अर्थात लगेच ओळखलं. मी त्यांच्या अवतीभवतीनं चालू लागलो. बोलण्याचं डेअरिंग नव्हतं. पण बालसुलभ उत्साहानं त्यांच्याकडं पाहत होतो. विंदा अत्यंत हसतमुख चेहऱ्यानं चालत होते. मधूनच कविता म्हणत होते. लहान मुलांना उचलून घेत होते. नगरच्या चितळे रोडवर विंदा चालत असताना त्यांच्याभोवती चाहत्यांचा मोठा गराडा तयार झाला होता, असं आठवतं. मी तेव्हा विंदांच्याच शब्दात सांगायचं तर 'बाविशीतला बुढ्ढा' होतो आणि ते अमाप चैतन्यानं सळसळत होते. साधा पायजमा, सुती सदरा, खांद्याला शबनम अशा थाटात हा मराठीतला महाकवी आमच्यासोबत हसत हसत, गाणी म्हणत निघाला होता. 'कवि तो दिसतो कसा आननी' हे मी प्रत्यक्ष पाहत होतो. या वातावरणामुळं साहित्य संमेलनाविषयी माझ्या मनात अत्यंत प्रेम उत्पन्न झालं आणि या उत्सवाला आपण दर वर्षी गेलं पाहिजे असं वाटू लागलं. नगरच्या त्या संमेलनत गिरीश कार्नाड यांनी केलेलं उद्घाटनाचं भाषण गाजलं. सांगतेला पं. हृदयनाथ मंगेशकरांचं 'भावसरगम' होतं. सोबत साक्षात गुलजार होते. 'सूरमयी शाम' होती ती... त्या संमेलनाला विंदा आल्यानं मी साहित्य संमेलन नावाच्या या साहित्योत्सवाकडं वळलो, हे निर्विवाद. पुढं अनेक संमेलनं कव्हर केली, पण नगरच्या त्या ग्रंथदिंडीसारखी मजा पुन्हा आली नाही, कारण लोकांमध्ये मिसळून गाणारा, नाचणारा विंदांसारखा कवी पुन्हा कधी दिसला नाही.

(२३ ऑगस्ट २०१८)

-----

13 Mar 2019

अक्षरधारा - फेब्रुवारी १९ लेख

व्यक्ती, चरित्र अन् पट...
-----------------------


सध्या आपल्याकडे धडाधड चरित्रपट येत आहेत. मराठीतही व हिंदीतही! गेल्या काही वर्षांत तर हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेलं दिसतं. सध्या पु. ल. देशपांडे यांच्यावरील 'भाई : व्यक्ती की वल्ली' या चरित्रपटावरून बराच वादंग माजलेला दिसतो. काहींना हा चित्रपट आवडला, तर काहींना अजिबात आवडला नाही. या अनुषंगाने चरित्रपट व आपल्या प्रेक्षकांची मानसिकता यांचा धांडोळा घेणं समयोचित ठरेल. 
मुळात चरित्रपट का निघतात? आणि कुणाचे निघतात? आपल्या समाजात ज्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी सर्वसामान्य लोकांना कुतूहल आहे, अशा व्यक्तीचं जगणं पडद्यावर आणणं हा अगदी ठळक हेतू सांगता येतो. याखेरीज काही लोकांचं आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा फारच वेगळं असतं. त्यांच्यात काही तरी असामान्य गोष्ट असते आणि तीविषयी जाणून घ्यायला लोकांना आवडतं. मग अशा व्यक्तींवर चरित्रपट येऊ शकतो. काही लोकांचं आयुष्य प्रेरणादायी असतं. ते पडद्यावर आणणं यात काही दिग्दर्शकांना आव्हान वाटतं. काही चरित्रपट तर राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून तयार केले जातात. काही चित्रपट तर संबंधित सेलिब्रिटींकडून स्वतःची बाजू मांडण्यासाठी मुद्दाम तयार करवून घेतले जातात. अर्थात हे उघडपणे कुणीच मान्य करत नाही. त्यामुळं चरित्रपटांचा आढावा घेताना चित्रकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपण प्रेक्षक म्हणून कुठल्या परिप्रेक्ष्यातून या सगळ्याकडे बघतो हेही महत्त्वाचं ठरतं. 
आपल्याकडं चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली ती 'राजा हरिश्चंद्र'पासून. या पौराणिक कथांचा सुरुवातीला पगडा होता. त्यानंतर संतपट आले. पण अगदी ठळक उल्लेख करावा असा आणि ज्यानं खरोखर प्रचंड यश मिळवलं असा मराठीतला पहिला चरित्रपट म्हणजे 'संत तुकाराम'! 
'प्रभात फिल्म कंपनी'च्या या चित्रपटाच्या यशाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रकर्त्यांनी तुकाराम महाराजांबाबत समाजात जी प्रतिमा आहे तिचं हनन न करता, हा चरित्रपट केला. त्यामुळं गाथा तरण्याच्या प्रसंगापासून ते वैकुंठागमनापर्यंत सगळे कथित चमत्कारही या चित्रपटात समाविष्ट होते. सगळ्यांत महत्त्वाचं होतं ते म्हणजे तुकारामांचं 'दिसणं'! विष्णुपंत पागनीस यांची या भूमिकेसाठीची निवड एवढी अचूक होती, की तुकाराम महाराज असेच दिसत असावेत, असं पुढं लोकांना वाटू लागलं. प्रभात फिल्म कंपनीनं नंतर संत ज्ञानेश्वरांपासून ते संत सखूपर्यंत अनेक संतपट काढले. पण भूमिकेसाठी अचूक कलाकाराची निवड आणि समाजमनातील संतांविषयीची प्रतिमा यांना धक्का न लावणं या दोन गोष्टींचं पथ्य त्यांनी आवर्जून पाळलं. नंतरच्या काळात भालजी पेंढारकरांनी 'छत्रपती शिवाजी' या चित्रपटातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत प्रथमच रूपेरी पडद्यावर आणलं. भालजींचं या विषयातलं समर्पण सर्वांना माहिती होतं. चंद्रकांत मांडरे यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती, तेव्हा भालजी स्वतः त्यांना नमस्कार करायचे. स्वतः चंद्रकांत चित्रिकरणाच्या काळात अपेयपानादी गोष्टींपासून दूर राहायचे. यामुळं त्यांनी पडद्यावर साकारलेल्या भूमिकेला एक सात्त्विक भाव मिळाला. हे चरित्रपट यशस्वी होण्यामागे चरित्रनायकाच्या निवडीपासून ते समाजमनावर कोरलेली त्यांची प्रतिमा जपण्यापर्यंत अनेक बाबींचा अंतर्भाव होता, असं म्हणता येईल. यानंतर दखल घेण्याजोगा चरित्रपट म्हणजे संत गाडगेबाबांवरचा 'देवकीनंदन गोपाला'! राजदत्त यांच्यासारख्या जाणत्या दिग्दर्शकाचं दिग्दर्शन आणि चरित्रनायकाच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागूंसारखा कसलेला अभिनेता यामुळं हा सिनेमा लोकांना आवडला. त्यानंतर डॉ. जब्बार पटेल यांनी हिंदीत ‘डॉ. आंबेडकर’, तर अगदी अलीकडं ‘यशवंतराव चव्हाण’ हे दोन चरित्रपट दिग्दर्शित केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा ‘दुसरी गोष्ट’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.

आता अगदी अलीकडचा म्हणजे गेल्या आठ-दहा वर्षांचा आणि मराठी सिनेमापुरता विचार केला, तरी मराठीत दादासाहेब फाळके, बालगंधर्व, लोकमान्य टिळक, डॉ. काशिनाथ घाणेकर, पु. ल. देशपांडे यांच्यावरचे चरित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पु. लं.वरचा चरित्रपट तर दोन भागांत प्रदर्शित होत आहे. या सर्व चरित्रपटांना आपल्याकडं चांगलं यश मिळालं आहे. त्यावर भली-बुरी चर्चा झाली आहे. मात्र, ‘भाई’ला टीकेचा जरा जास्तच सामना करावा लागला आहे, असं दिसतं. पु. ल. देशपांडे २००० मध्ये आपल्यातून गेले. याचा अर्थ अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते आपल्यात होते. त्यांचा सहवास लाभलेली भरपूर माणसं आजही हयात आहेत. त्यांच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या आहेत. याहीपलीकडं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पु. ल. त्यांच्या लेखनाद्वारे बहुसंख्य मराठी माणसांच्या मनात विराजमान झाले आहेत. एवढी लोकप्रियता विसाव्या शतकात फार थोड्या साहित्यिकांच्या वाट्याला आली. त्याबाबत पुलंच्या बरोबरीला येईल असा साहित्यिक महाराष्ट्रात झाला नाही. त्यामुळंच पुलंवरील चरित्रपटावर एवढी चर्चा झाली. 
त्या तुलनेत दादासाहेब फाळके व लोकमान्य टिळक ही दोन्ही महान व्यक्तिमत्त्वे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निधन पावली. बालगंधर्वांचे निधन १९६८ मध्ये झाले असले, तरी त्यांच्या कारकिर्दीचा बहराचा काळ हा विसाव्या शतकाचा पूर्वार्धच होता. त्यामुळं या तिन्ही व्यक्तिमत्त्वांवर एकविसाव्या शतकात जेव्हा चित्रपट तयार झाले, तेव्हा या तिन्ही व्यक्तींबाबत समाजमानसावर असलेल्या स्मृती ताज्या नव्हत्या. हे चित्रपट पाहणारे लोक एका अलिप्त भावनेने ते चरित्रपट पाहू शकले. आपण अल्बममध्ये दुसऱ्याचे भराभर पाहतो, पण एखाद्या फोटोत आपण असू, तर तो फोटो जरा जास्त वेळ थांबून, निरखून पाहतो. पुलंचा चरित्रपट हा महाराष्ट्रातील आत्ताच्या जनतेसाठी ‘आपला सहभाग असलेला फोटो’ होता. त्यामुळं त्यांची इतरांचे चरित्रपट पाहण्याची दृष्टी आणि पुलंचा चरित्रपट पाहण्याची दृष्टी वेगळी होती, हे अगदी स्पष्ट आहे. या सिनेमाबाबत हे ‘निरखणं’ जास्तच प्रमाणात चाललं, हे मान्य करायला हवं. पण यामागं केवळ ‘आपण अनुभवलेले पु. ल.’ त्या चरित्रपटात दिसायला हवे होते, हीच भावना असणार.
कुठलाही चरित्रपट पाहताना प्रेक्षकांचं त्या चरित्रनायकाशी असलेलं भावनिक नातं कोणत्या प्रतीचं आहे, यावर त्यांची त्या चित्रपटातील भावनिक गुंतवणूक अवलंबून असते. पु. लं. च्या बाबतीत मराठी प्रेक्षकांचा हा भावनांक मोठा आहे. ‘भाई’ या चित्रपटापूर्वी काही महिने आधी प्रदर्शित झालेल्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या आणखी एका यशस्वी चरित्रपटाचं उदाहरण घेऊ या. डॉ. काशिनाथ घाणेकर हे कितीही लोकप्रिय अभिनेते असले, तरी त्यांच्या लोकप्रियतेचा कालावधी तुलनेनं कमी होता. डॉ. घाणेकरांचं निधन होऊन आता ३२ वर्षे होऊन गेली. त्यामुळे त्यांच्याविषयीची सार्वत्रिक आठवण पुलंच्या तुलनेत किती तरी कमी होती. शिवाय डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी प्रामुख्याने नाटकांतून भूमिका केल्या. मात्र, दुर्दैवाने त्या नाटकांच्या ध्वनिचित्रफिती आज उपलब्ध नाहीत. ते कसे काम करीत होते हे पाहण्याची आजच्या पिढीला संधी नाही. डॉ. घाणेकरांची एखादी दृकश्राव्य मुलाखतही उपलब्ध नाही. त्यामुळे ही व्यक्ती नक्की कशी दिसत होती, बोलत होती याचा आजच्या प्रेक्षकांना फारसा अंदाज नाही. त्यामुळे त्या सिनेमात डॉ. घाणेकर जसे सादर झाले, तसे प्रेक्षकांनी स्वीकारले. (याचा अर्थ ते चुकीचे सादर झाले, असा नाही.) याउलट पुलंच्या अगदी ‘बटाट्याची चाळ’पासून ते बहुतेक नाट्यप्रयोगांच्या कृष्णधवल, सिंगल कॅमेरा अशा कशा का असेना, ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. पुलंनी त्यापूर्वी दृकश्राव्य माध्यमात काम केलेलं असल्यानं त्यांना या चित्रिकरणाचं महत्त्व नक्कीच माहिती असणार. त्यांनी त्यांची सगळी नाटके त्यामुळे चित्रित करून ठेवली. आज हा सगळा अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान ठेवा झाला आहे, यात शंका नाही. याशिवाय पुलंनी स्वत: कथाकथन केल्याचे अनेक भागही आज यू-ट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे पुलंची केवळ लेखक म्हणून लेखनातून नव्हे, तर एक खेळिया व्यक्ती म्हणून दृकश्राव्य माध्यमातून भरपूर आठवण सर्वांकडे आहे. सिनेमा हेही दृकश्राव्य माध्यम असल्याने पुलंच्या चरित्राला प्रेक्षकांच्या मनातल्या या दृकश्राव्य आठवणींशी मुकाबला करावा लागला. हे आव्हान सोपे नसते. बघणारे जेवढे प्रेक्षक तेवढ्या त्यांच्या मनातल्या प्रतिमा! अशा लाखो प्रतिमांचा लसावि काढून चरित्रनायक साकारणे हे खचितच सोपे काम नाही.
थोडक्यात सांगायचं, तर समाजमनावर ज्या व्यक्तीच्या आठवणींचा ठसा ताजा व लख्ख आहे, अशा व्यक्तीवर चरित्रपट काढणं हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. याउलट काही काळापूर्वी होऊन गेलेल्या, समाजमनाच्या विस्मरणात गेलेल्या व्यक्तींवर चरित्रपट काढणं तुलनेनं कमी धोकादायक आहे. यातलं आव्हान हे अर्थातच समाजमनात त्या व्यक्तीची असलेली प्रतिमा जपण्याचं! या प्रतिमेला जराही धक्का लागलेला समाजमानस खपवून घेत नाही. 
याखेरीज प्रेक्षकांच्या अपेक्षा हा एक स्वतंत्र विषय आहे. कुणाच्या चरित्रपटातून काय अपेक्षा करायची, याबाबत प्रेक्षक हुशार असतात. सर रिचर्ड अॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटातून ‘शोले’सारख्या मनोरंजनाची अपेक्षा अर्थातच कुणी करीत नाही. अलीकडच्या काळात काही क्रिकेटपटूंचे चरित्रपट आले. पण ‘अजहर’ आणि ‘एम. एस. धोनी’ या दोन्ही चरित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद भिन्न होता. चरित्रनायकाची समाजात आत्ता असलेली प्रतिमा यात फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. ‘अजहर’ हा चित्रपट अजहरुद्दीनची बाजू मांडण्यासाठी तयार करवून घेण्यात आला आहे, असाच प्रेक्षकांचं मत झालं. याउलट धोनी हा आजही क्रिकेट रसिकांचा लाडका खेळाडू व कर्णधार आहे. त्यामुळं त्याच्यावरच्या चित्रपटातून प्रेक्षकांना या अवलिया खेळाडूची जडणघडण कशी झाली, हे पाहण्यात रस होता. ती अपेक्षा त्या चित्रपटानं बव्हंशी पूर्ण केल्यानं त्यांचं समाधान झालं. तीच गोष्ट ‘भाग मिल्खा भाग’ या मिल्खासिंग यांच्यावरच्या आणि ‘मेरी कोम’ या मेरी कोमवरच्या चरित्रपटांची! या दोन्ही खेळाडूंना भारतीय जनतेमध्ये आदराचं, प्रेमाचं स्थान आहे. त्यामुळं त्यांच्यावरचे चरित्रपट त्याच भावनेनं पाहिले गेले. याउलट ‘संजू’ या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद संजय दत्तच्या विलक्षण आयुष्याबाबत प्रेक्षकांच्या मनात असलेल्या कुतूहलाचं द्योतक होता. सुनील दत्त व नर्गिस या चित्रपटसृष्टीतील आदरणीय दांपत्याचा हा लाडावलेला मुलगा आधी कसा बिघडला व नंतर त्यानं स्वत:ला कसं सावरलं, पुन्हा अनेक चुका केल्या व नंतर त्याची शिक्षाही कशी भोगली हे सगळं पाहण्यात सामान्य प्रेक्षकांना एक वेगळंच कुतूहल होतं. ते शमवण्याचं काम या चित्रपटानं केलं. त्यामुळं या चित्रपटाला व्यावसायिक यशही प्रचंड प्रमाणात लाभलं. 
चरित्रपट कोण दिग्दर्शित करीत आहे, चरित्रनायकाची किंवा नायिकेची भूमिका कोण करीत आहे, याही गोष्टी प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या ठरतात. ‘संजू’च्या यशामध्ये नायकाच्या भूमिकेत रणबीर कपूरचं असणं आणि तो चरित्रपट राजकुमार हिरानीनं दिग्दर्शित करणं याही गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. ‘मेरी कोम’च्या यशात मेरी कोम साकारणाऱ्या प्रियांका चोप्राच्या ग्लॅमरचा वाटा महत्त्वाचा होताच. त्यामुळं मुळात असे चरित्रपट तयार करताना तो तयार करणाऱ्याचं चरित्रनायकावर मनापासून प्रेम हवं. त्या व्यक्तीचं जीवन जसं आहे तसं लोकांसमोर यावं, अशी निखळ, प्रामाणिक भावना हवी. चरित्रनायकाची किंवा नायिकेची भूमिका कोण करणार आहे, हेही प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं असतं. मुळात त्या व्यक्तीचं दिसणं तसं दिसणं पटायला पाहिजे. संबंधित कलाकार चरित्रनायकासारखा दिसतच नसेल, तर प्रेक्षकांना तो चित्रपट पाहावासाच वाटणार नाही.
अर्थात एवढं सगळं अनुकूल घडूनही चरित्रपट प्रेक्षकांना आवडेलच असं नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. एक मात्र आहे. प्रेक्षकांनीही काही पथ्ये जरूर पाळली पाहिजेत. एक तर, आपल्या मनात असलेला नायक पडद्यावर शोधायला जाऊ नये. चित्रकर्त्यांना ती व्यक्ती कदाचित वेगळी दिसलेली असू शकते. त्या चरित्रनायकाबाबत काही लेखन, अधिकृत आत्मचरित्र किंवा चरित्र असा काही दस्तावेज उपलब्ध असेल, तर तो जरूर आधी वाचावा. पुलंसारखा आपल्या अगदी हृदयाजवळचा चरित्रनायक असेल, तर आपल्याला त्यांच्याबाबत सगळंच माहिती असतं, असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात खरोखर तसं आहे का, याचाही विचार करायला हवा. 
काही जण असं मत व्यक्त करताना दिसतात, की चरित्रपट काढूच नयेत. मला असं वाटत नाही. चरित्रपट जरूर निघावेत. त्यातले चांगले चरित्रपट पुढच्या अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात. आता चांगला चरित्रपट म्हणजे काय, याची काही ठोस अशी व्याख्या नाही. मात्र, समाजमनावर असलेल्या प्रतिमेला फारसा धक्का न लावता, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील जडणघडण, बारकावे उलगडून दाखविणारा चित्रपट म्हणजे चांगला चरित्रपट असं ढोबळमानानं म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीविषयी उत्सुकता निर्माण करणं हेदेखील चरित्रपटांचं काम असू शकतं. ‘भाई’ हा चित्रपट नव्या पिढीमध्ये पुलंविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरला असेल, तर तेही त्या चित्रपटाचं यशच मानायला हवं. बाकी मतमतांतरे सुरूच राहतील. 

----
(पूर्वप्रसिद्धी : अक्षरधारा मासिक, फेब्रुवारी २०१९ अंक)
----

12 Mar 2019

चिंतन आदेश दिवाळी २०१८ लेख

जगाची 'खिडकी'
----------------

(विषय : माझे छंद)छंद हा शब्दच किती नादमधुर आहे! हा शब्द उच्चारताच मनात आनंदाच्या लहरी उसळतात. आयुष्यात माणसाला काही तरी चांगला छंद असेल, तर त्याचं सगळं आयुष्य अगदी छान जातं. अनेक छंद असतील तर फारच बहर! वाईट छंद असतील, तर लोक 'छंदीफंदी' म्हणतात, ते वेगळं... पण चांगले छंद माणसाला जगण्याचं प्रयोजन शिकवतात. चांगला छंद कशाला म्हणावं? एक तर अर्थातच त्या छंदातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. छंद आणि आनंद या गोष्टी एकमेकांना जोडलेल्याच आहेत. आनंद येत नसेल, तर तो छंदच नव्हे! दुसरं म्हणजे त्यातून लोकांना उपद्रव होता कामा नये. कारण उद्या कुणी म्हणेल, की मला रस्त्यातून जाताना हवेत गोळ्या झाडण्याचा छंद आहे...! असला 'छंद' केला तर फाशीचा फंदा गळ्यात पडेल, हे नक्की. तेव्हा दुसऱ्याला उपद्रव न होणारा छंद हवा. या छंदाला उपयुक्तता असलीच पाहिजे, असा काही नियम नाही. पण समजा असेल, तर फारच चांगलं! उदाहरणार्थ, काही लोकांना जुनी माहिती, छायाचित्रं गोळा करण्याचा छंद असतो. त्यांच्या या संग्रहाचा समाजाला फायदाच होतो. पण अशी उपयुक्तता नसलेला छंद असेल तरी काही बिघडत नाही. त्या छंदातून तो छंद जोपासणाऱ्या माणसाला आनंद प्राप्त झाला पाहिजे, एवढीच किमान अपेक्षा असते. 
माझं लहानपण तालुक्याच्या ठिकाणी गेलं. त्या छोट्या गावात लहान मुलांसाठी बागा किंवा खेळणी वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळं आमच्या मनोरंजनाची साधनं आम्हीच शोधून काढली. माझा मित्र आणि मी खेळण्यांतले छोटे ट्रक घेऊन आमच्या अंगणात पडलेल्या कसल्या तरी बिया गोळा करत असू. आम्ही त्या बियांना 'धमुके' म्हणायचो. कुणाच्या ट्रकमध्ये जास्त बिया याचीच स्पर्धा चालायची. त्यानंतर काडेपेटीवरची कव्हर जमवायचा छंद लागला. सनफ्लॉवरचं चित्र असलेली काडेपेटी सर्रास मिळायची. आमच्या या कव्हरची किंमत असायची. सनफ्लॉवरवालं चित्र खूप उपलब्ध असल्यानं त्याला कमी भाव असायचा. 'बालक टिक्का' नावाचं एक चित्र तेव्हा दुर्मीळ होतं. त्यामुळं ते सापडलं, की कोट्यधीश असल्याचा फील यायचा. अशी किती तरी कव्हर मी जमवून ठेवली होती. नंतर नंतर ही चित्रं जमवायला आम्ही जवळच्या पानटपऱ्यांवर घिरट्या घालत असल्याच्या वार्ता घरच्यांच्या कानावर गेल्या आणि हा छंद बंदच पडला. आम्ही लहानपणी सगळे मित्र क्रिकेट खेळायचो. दुसरा मैदानी खेळच आम्हाला माहिती नव्हता. वाडा क्रिकेट, गल्ली क्रिकेट ते ग्राउंडवरचं क्रिकेट अशा एकेक पायऱ्या वर चढत क्रिकेट खेळत गेलो. यातूनच क्रिकेटपटूंची छायाचित्रं जमवायचा छंद जडला. तेव्हा घरी येणारं वृत्तपत्रं हा अशा छायाचित्रांचा एकमेव स्रोत होता. तेव्हा वृत्तपत्रं सगळी कृष्णधवल असायची. तेव्हा क्रिकेट सामन्यांचे मैदानावरचे फोटो चार चार कॉलम आकारात प्रसिद्ध व्हायचे. पण ते कापण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो पेपर रद्दी व्हायची वाट पाहावी लागायची. मग दुसऱ्या दिवशी लक्षात ठेवून हे फोटो कापून ठेवायचे. सुनील गावसकर, कपिल देव, शास्त्री, वेंगसरकर हे आमचे हिरो होते. इतर देशांतल्या क्रिकेटपटूंमध्ये डेव्हिड गॉवर, व्हिवियन रिचर्डस, रिचर्ड हॅडली, अॅलन बोर्डर आदी मंडळी आवडायची. या सगळ्यांचे फोटो माझ्या वहीत होते. गावसकरनं १०,००० कसोटी धावांचा टप्पा ओलांडल्याचा मोठा पाच-सहा कॉलम फोटो आला होता. तोही माझ्याकडं होता. अगदी अलीकडंपर्यंत ही वही माझ्याकडं होती. आता मात्र ती सापडत नाहीय. त्यामुळं एक मौल्यवान खजिना गमावला की काय, अशी भीती वाटतेय. 
वाचनाचा छंद तर खूप लहानपणापासून होता. आमच्या गावी खूप जुनं, म्हणजे १८८७ मध्ये स्थापन झालेलं मोठं वाचनालय होतं. या वाचनालयामुळं मला वाचनाची गोडी लागली. अगदी तिसरी-चौथीत असल्यापासून मोठमोठी पुस्तकं वाचण्याची आवड उत्पन्न झाली. लहान मुलांच्या विभागात तर नेहमीच जायचो. ग्रंथपाल आमच्या ओळखीचे होते. त्यामुळं ते मुद्दाम चांगली पुस्तकं माझ्यासाठी राखून ठेवायचे. नीलम प्रभू यांचं 'मांजराची गोष्ट' या की अशाच नावाचं एक पुस्तक वाचल्याचं आठवतं. ती गोष्ट दिल्लीत घडते आणि ते मांजर चुकून शहादऱ्याला जातं अशी काही तरी ती गोष्ट होती. हे पुस्तक मोठ्या आकाराचं होतं व त्यात छान रंगीत चित्रं होती. याशिवाय भा. रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' लाडका होताच. पण मला विशेष आवडायची ती सुधाकर प्रभू यांनी लिहिलेली 'डिटेक्टिव्ह डीटी'ची पुस्तकं. या पुस्तकांची मी पारायणं केली. याशिवाय बाबासाहेब पुरंदऱ्यांची 'राजा शिवछत्रपती' व 'शेलारखिंड' ही दोन मोठ्ठी पुस्तकं मी तेव्हाच वाचून काढली होती. 'शेलारखिंड' वाचताना गौरा व कस्तुराच्या धाडसानं मन थरारून गेल्याचं आठवतं. याशिवाय अर्थातच चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांची पुस्तकं वाचायला मिळाली. या लेखकांच्या विनोदी लेखनाच्या मी प्रेमातच पडलो. 'असं लिहिता आलं पाहिजे' असं वाटलं ती ही पुस्तकं वाचूनच! अर्थात पुढं पत्रकारितेत गेल्यावर वाचन हा केवळ छंद न राहता, तो रोजच्या कामाचा एक भागच झाला आहे. पण तरीही मनाला विरंगुळा मिळावा म्हणून केलं जाणारं वाचन छंदासारखंच आनंद देतं.
जी गोष्ट वाचनाची तीच सिनेमाची... इतर मुलांप्रमाणेच मी लहानपणी सिनेमे पाहत होतो. गावात तंबूच्या थिएटरमध्ये अनेक सिनेमे पाहिले. सिनेमा या माध्यमाचं आकर्षण तसं जबरदस्त असतं. मलाही या माध्यमानं फार तीव्रतेनं आपल्याकडं ओढून घेतलं. पुढं या छंदाचं रूपांतर आवड आणि मग अभ्यासात झालं. पत्रकारितेत आल्यावर सिनेमा परीक्षणं लिहायला मिळाली आणि सुमारे ११ वर्षांत तीनशेहून अधिक सिनेमांची परीक्षणं लिहून झाली. आताही ब्लॉगवर परीक्षणं लिहिली जातात ती केवळ आवड, छंद आहे म्हणूनच! या आवडीतूनच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना हजेरी लावणं घडलं. 'वर्ल्ड सिनेमा' पाहता आला. याचा फायदा असा झाला, की सगळ्या गोष्टींकडं पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन मिळाला. हे सगळं जग, सगळी माणसं एकसारखीच आहेत; माणसाच्या मूलभूत प्रेरणा, प्रवृत्ती सगळीकडं सारख्याच आहेत हे समजलं आणि लहानपणापासून वेगवेगळ्या माध्यमांतून मनावर चढलेल्या अनेक समज-गैरसमजांची पुटं गळून पडली. पत्रकारिता करताना डोळे उघडे ठेवून समाजात वावरण्याची सवय लागली आणि त्यातूनच विचार करायची अन् प्रश्न विचारायचीही! एकदा विचार सुरू झाला, की विवेकाचं भान येतं. विवेक असला, की बुद्धिप्रामाण्याचं पारडं वरचढ होतं आणि बुद्धिप्रामाण्यातून निष्पक्ष विश्लेषणाची कुवत अंगी येते. वाचन आणि सिनेमा या दोन छंदांनी मला जर काही दिलं असेल तर ती ही कुवत, असं नम्रपणे सांगावंसं वाटतं.
हे झालं आयुष्यात आत्तापर्यंत जोपासलेल्या लहान-मोठ्या छंदांबाबत. यातले काही छंद लहानपणीचे आणि त्या वयाला शोभणारे असेच होते व ते स्वाभाविकच वाढत्या वयानुसार बंद झाले. काही छंद हे केवळ छंद न राहता, व्यवसायाचा किंवा पेशाचा भाग झाले, तर काही छंदांचं रूपांतर अभ्यासात झालं. त्यामुळं अगदी आजच्या घडीला मला कुणी 'तुझा छंद सांग' असं म्हटलं तर यातल्या एकाचंही नाव घेता येणार नाही. मग आत्ता आपल्याला नक्की कशाचा छंद आहे, याचा विचार करायला लागल्यावर लक्षात आलं, की आहे! आपल्याला एक छंद आहे. फावल्या वेळेत आपण तो जोपासतो आणि त्यातून एक निर्भेळ आनंद आपल्याला लाभतो. हा आनंद आहे 'जगाच्या खिडकी'त डोकावण्याचा... होय, आणि या 'खिडकी'ला आपण ओळखतो 'यूट्यूब' म्हणून...! 
इंटरनेट नावाच्या प्रकारानं आपल्या दैनंदिन आयुष्यात क्रांती आणली, त्याला आता तीन दशकं उलटून गेली. स्मार्टफोन नामक आयुध आपल्या हातात आलं, त्यालाही आता एक दशक उलटून गेलं. या तंत्रज्ञानातील क्रांतीनं आपलं आयुष्य बदलून गेलं आहे. आतापर्यंत अशक्य वाटणाऱ्या किती तरी गोष्टी आता सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणसं करू लागली आहेत. अगदी विमानप्रवासापासून ते परदेशात सेटल होण्यापर्यंत अनेक गोष्टी आता सर्वसामान्यांच्या आयुष्यातही सहज घडत आहेत. सहलीसाठी परदेशांत जाणं नियमित होऊ लागलं आहे. जगाकडं खुल्या नजरेनं पाहण्याचा एका नवा दृष्टिकोन यातून आपल्याला मिळतो आहे. जगात पाहण्यासारखं खूप काही आहे आणि आपल्याला एका आयुष्यात ते मुळीच शक्य नाही, हे लक्षात यायला लागलं आहे. अशा वेळी मदतीनं येते ती ही 'खिडकी'! बघा ना, अगदी घरबसल्या या माध्यमातून तुम्ही अक्षरशः सगळं जग पाहू शकता. 
या जगात अनेक खंड आहेत, देश आहेत, प्रांत आहेत. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं, महत्त्व वेगळं! युरोपचं सौंदर्य वेगळं, आशियाचं वेगळं... आफ्रिकेतील घनदाट जंगलांपासून ते वाळवंटापर्यंतचं भौगोलिक वैविध्य थक्क करणारं आहे. केवळ नैसर्गिक चमत्कार म्हटले, तरी किती गोष्टी आहेत. उंच उंच धबधबे आहेत, प्रचंड अवाढव्य नद्या आहेत, दरी-खोरी आहेत, महासागर आहेत, अंटार्क्टिकासारखा अफाट खंड आहे, नॉर्वेसारखा 'मध्यरात्रीच्या सूर्याचा' देश आहे, ज्वालामुखी आहेत, हिमालयासारखी उत्तुंग पर्वतराजी आहे... या सर्व ठिकाणी माणसाला जाणं एका आयुष्यात तरी शक्य नाही. पण काळजीचं कारण नाही. आपली 'खिडकी' आहे ना! याशिवाय मानवनिर्मित चमत्कार किती आहेत! चीनची भिंत आहे, सुएझचा कालवा आहे, पिसाचा मनोरा आहे, पनामा कालवा आहे, कॅलिफोर्नियाचा गोल्डन ब्रिज आहे, इजिप्तमधले पिरॅमिड आहेत... हे सगळं घरबसल्या बघता येतं आपल्या 'खिडकी'तून... अटी दोनच. उत्तम दर्जाचा स्मार्टफोन हवा आणि वेगवान इंटरनेट हवं. मग अक्षरशः सगळं जग आपल्या त्या छोट्याशा 'खिडकी'त खुलं होतं... 
मला मुळात माणसाच्या जगण्याबद्दल कुतूहल आहे. वैचित्र्यपूर्ण गोष्टी करणारे अनेक लोक असतात. मध्यंतरी एकानं पृथ्वीच्या कक्षेपर्यंत बलून नेलं आणि तिथून पृथ्वीवर उडी मारली. सुमारे ३९ हजार मीटर एवढ्या उंच अंतरावरून हा माणूस खाली आला. त्याच्या अंगावरच एक कॅमेरा लावला होता. त्यातून त्याची ही उडी चित्रित झाली. या अचाट पराक्रमाचा व्हिडिओ यू-ट्यूबवर पाहायला मिळतो. तो बघताना मी अनेकदा थक्क झालोय. परवाच आणखी एक व्हिडिओ पाहिला. आता अनेक उपग्रह रॉकेटद्वारे सहज अंतराळात सोडले जातात. आपल्याला काही हे उड्डाण होताना थेट पाहायला मिळत नाही. टीव्हीवरच पाहायला मिळतं. पण या रॉकेटवरच कॅमेरा लावून त्या उड्डाणाचं चित्रिकरण केलेला एक व्हिडिओ मी पाहिला. यात आपण जणू त्या रॉकेटच्या पाठीवर बसून अंतराळात उंच उंच उडत निघालो आहोत, असं भासत होतं. हे दृश्य एकाच वेळी अत्यंत मनोरम आणि कल्पना केली तर थोडं भयावहही होतं. ते रॉकेट एवढ्या वेगात अंतराळात झेपावत होतं, की अवघ्या दोन मिनिटांत पृथ्वीची कडा दिसायला लागली. हे अफाट दृश्य केवळ यू-ट्यूबमुळंच अनुभवता आलं. 
याशिवाय आपण सहज जाऊ शकत नाही, अशी ठिकाणं पाहायला मिळण्याचं हे हक्काचं स्थान आहे. पाकिस्तानबद्दल मला कुतूहल आहे. मी यू-ट्यूबवर आता तिथली शहरं, तिथली माणसं, तिथले कार्यक्रम सहज पाहू शकतो. मग लक्षात येतं, की आपल्यासारखंच तर आहे तिथं सगळं! आपल्यासारखीच भाषा, वेष, खाणं-पिणं... फक्त धर्म वेगळा... गंमत म्हणजे तिथल्या लोकांनाही आपल्याबद्दल असंच वाटत असतं. मग आपला या दोन्ही देशांच्या संबंधांकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. 
मला जगभरातल्या शहरांबाबत आकर्षण आहे. लंडन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, पॅरिस, टोकियो, सिडनी, मेलबर्न, लॉस एंजेलिस, बर्लिन, मॉस्को अशी किती तरी शहरं मला प्रत्यक्ष जाऊन अनुभवायची आहेत. ते कधी होईल, ते माहिती नाही. पण आज यू-ट्यूबच्या मदतीनं मी या शहरांमधून फेरफटका मारू शकतो. किती तरी हौशी लोकांनी उच्च दर्जाचं शूटिंग करून ते इथं अपलोड केलंय. ते पाहताना मस्त वाटतं. आपण त्या शहरांमधूनच फिरतोय असं वाटतं. तिथं जाण्याची ओढ आणखी वाढते. जगातल्या या शहरांप्रमाणेच मला भारतातलीही विविध शहरं पाहायला आवडतात. जयपूर, लखनौ, कोलकता, हैदराबाद, नागपूर, इंदूर, पाटणा, गुवाहाटी, मदुराई, बेंगळुरू, पणजी अशा किती तरी शहरांमधून माझा 'फेरफटका' अधूनमधून सुरू असतो. 
शहरांप्रमाणेच मला आकर्षण आहे ते जगभरातल्या विमानतळांचं आणि विमानांचं... हे एक वेगळंच आणि विलक्षण जग आहे. एकदा त्यासंबंधीचे व्हिडिओ पाहायला लागलो, की मला कधीच कंटाळा येत नाही. विमानांचं टेकऑफ आणि लँडिंग पाहणं हाही माझा आवडीचा छंद आहे. वैमानिकाच्या कॉकपिटमध्ये बसण्याची संधी आपल्याला मिळण्याची शक्यता फारच कमी! पण यू-ट्यूबवर कॉकपिटमधून चित्रित केलेले हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातून जगभरातल्या नामवंत विमानतळांवरची टेकऑफ आणि लँडिंगची अप्रतिम दृश्यं पाहायला मिळतात. टेकऑफ करताना रात्र असेल, तर ते झगमगणारं शहर आणि वर अनंताच्या पोकळीत झेपावणारं ते महाकाय विमान पाहताना काही तरी विलक्षण अनुभूती येते. माणसाच्या आणि विज्ञानाच्या प्रगतीपुढं नतमस्तक व्हावंसं वाटतं. जगभरातल्या अनेक विमानतळांवर मी अशा रीतीनं 'लँडिंग' केलंय आणि तिथून उड्डाणही केलंय. काही विमानतळांवर लँडिंग करणं अवघड असतं. भूतानमधला पारोचा विमानतळ हा असाच एक अवघड विमानतळ आहे. तिथं उतरणाऱ्या विमानांचा कॉकपिटमधून चित्रित केलेला व्हिडिओ पाहणं थरारक असतं. 
विमानांप्रमाणंच मला आवडतात ते जगभरातले रस्ते आणि त्यावरून धावताना केलेले व्हिडिओ. मला स्वतःला फिरायची प्रचंड आवड आहे. पण कामामुळं हवं तितकं फिरता येतंच असं नाही. पण 'दुधाची तहान ताकावर' या न्यायानं मी जगभरातले उत्तमोत्तम रस्ते आणि त्यावरून धावणाऱ्या वेगवान कारमधून केलेलं चित्रिकरण 'यू-ट्यूब'वर पाहत बसतो. हे मी कितीही वेळ पाहू शकतो. मला कंटाळा येत नाही. युरोपातले रस्ते, विशेषतः स्वित्झर्लंडमधले, भान हरपतं. ग्रामीण इंग्लंडही असंच कमालीचं देखणं आहे. तिथल्या रस्त्यांचे व्हिडिओ पाहत बसायला मजा येते. अमेरिकेतले भव्य एक्स्प्रेस-वे पाहताना छाती दडपते. आपल्याकडे पण आता यमुना एक्स्प्रेस-वेसारखे जबरदस्त रस्ते झाले आहेत. अगदी आपला नेहमीचा पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे यूट्यूबवर कुणीकुणी केलेल्या चित्रिकरणातून पाहताना वेगळाच आणि सुंदर भासतो. अगदी आपलंच पुणे शहर एखाद्या परदेशी माणसाच्या नजरेतून पाहायला गंमत येते.
याशिवाय जगातल्या किती तरी आश्चर्यपूर्ण, अद्भुत गोष्टी आपल्याला 'याचि देही याचि डोळा' पाहायला मिळतात. यू-ट्यूबचं वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यावर जे व्हिडिओ शोधतो, त्याचा आधार घेऊन आपल्याला आपल्या आवडीचे व्हिडिओ पाहण्याची शिफारस केली जाते. यातून आणखी नवनव्या गोष्टी कळत जातात. त्यामुळं मला कधीही थोडा जरी रिकामा वेळ मिळाला, की मी या 'खिडकी'त येऊन बसतो. 
हा छंद मला सदैव अपडेट राहण्यास मदत करतो. हे जग, विश्व, ब्रह्मांड हा पसारा किती तरी मोठा आहे! त्या तुलनेत आपण किती लहान... पण आपल्या छोट्याशा जगण्यात असतात केवढे ब्रह्मांडाएवढे अहंकार...! पण हे सारं पाहताना ही फुकाच्या अहंगंडांची पुटं गळून पडतात आणि मन स्वच्छ, ताजंतवानं होऊन जातं. आपण प्रवासाला निघालो, की आपल्याला खिडकीत बसायला फार आवडतं. का? कारण आपल्याला त्यातून बाहेरचं भलं मोठं जग दिसत असतं. हा सभोवताल, ही सृष्टी, हा निसर्ग आणि त्यात नानाविध करामती करणारा 'माणूस' नावाचा अचाट बुद्धिमत्तेचा प्राणी हे सगळे आपल्याला नम्र ठेवण्यात मदत करतात. त्यांच्याकडं पाहायला मिळण्याची संधी ही 'खिडकी' देते. त्यामुळं तिच्यात सदैव डोकावत राहणं हा माझा लाडका छंद आहे.

---

(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१८)
---