20 Jun 2017

जत्रा - योग दिवस लेख

काही नवी योगासने...
-------------------

मोदी सत्तेवर आले आणि २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर झाला, हा काही योगायोग नव्हे! अनेक वर्षांची तपश्चर्या त्यामागं असणार, यात मला तरी काही शंका नाही. हल्लीच्या जगात आपण चारचौघांसारखे राहायचे, त्यांच्यासोबत टिकायचे, तर प्रत्येक गोष्ट चारचौघांसारखी केली पाहिजे, यावर माझा दृढ विश्वास आहे. किंबहुना आपण चारचौघांत राहण्यासाठी जे प्रयत्न करतो, तेही चारचौघांसारखेच असले पाहिजेत; त्यात उगाच काही वेगळेपणा असता कामा नये, यावर माझा कटाक्ष असतो. असं केल्यानंच माझं (हळूहळू उच्च होत जाणारं) मध्यमवर्गीयपण शाबूत राहील, याची मला खात्री वाटते. केवळ याच एका कारणासाठी मी योगासनं करायचा घाट घातला. व्यायाम या प्रकाराशी आमचे पूर्वज पूर्वापार फटकून राहिले आहेत आणि याचे पुरावे त्यांच्या जुन्या फोटोंवरून अगदी जाहीर दिसतात. पूर्वजांची परंपरा मोडण्याची परंपरा आमच्या घराण्यात नसल्यानं मीही व्यायामाशी फटकूनच राहत होतो. मध्यमवर्गीयाला रोजचं जगणं जगताना जी कसरत करावी लागते, ती त्याच्या टीचभर आयुष्यासाठी पुरेसा व्यायाम असते, असं आपलं माझं पारंपरिक मत होतं. मात्र, योग दिवस जाहीर झाला आणि मी माझ्या वैचारिक शवासनातून खडबडून जागा झालो. व्यायामाच्या कल्पनेनं माझं मन मयुरासन केल्याप्रमाणं फुलून आलं. त्या आनंदाच्या भरात माझ्याकडून कुक्कुटासन केलं गेलं आणि हात-पाय सोडवून घेण्यासाठी शेवटी कोंबडीप्रमाणंच फडफड करावी लागली. सुरुवातीला वज्रासन, पद्मासन आदी सोपी आसनं करून मगच उत्तानपादासन, धनुरासन वगैरे बड्या मंडळींकडं वळावं, असं मला वाटू लागलं. (बाय द वे, अंगाची कशीही मुटकुळी केली, तरी ती अल्लाद सोडवून दाखवणाऱ्या आसनाला 'श्रीनिवा-सन' का म्हणू नये?) प्रारंभी घरातल्या घरातच सराव करा, या अर्धांगाच्या आज्ञेला नेहमीप्रमाणं मान तुकवून (हे आमचं फेवरिट आसन आहे. 'वामांगपरोक्षनतमस्तकासन' असं त्याचं नाव आहे!) आम्ही चटई ओढली. टीव्हीवर पहाटे साक्षात रामदेवबाबांची योगासनं सुरू असतात, अशी वार्ता कानी आली होती. कारण एवढ्या पहाटे मी गेल्या कित्येक वर्षांत उठलो नसल्यानं, मला हे काहीच ठाऊक नव्हतं. आपल्या बेडवर देहरूपी होडीची अर्धवर्तुळाकृती गुंडाळी करून 'आंतर्रजईगुडुप्पासन' करण्याची माझी सवय होती. पण हे शवासनाच्या बरंच जवळ जाणारं आसन करण्याची सवय मोडून मला भल्या पहाटे उठावं लागलं. समोर रामदेवबाबा कपालभांती आणि भस्रिका की कायसंसं करीत होते. त्यांचं ते लोहाराच्या भात्याप्रमाणे सटासट आत-बाहेर करणारं पोट पाहून मला तर आकडी आली. मी पोट होता होईल तेवढं आत ओढण्याचा प्रयत्न केला आणि तिथंच चटईवर कोलमडासन केलं. माझ्या लत्ताप्रहारानं कोपऱ्यातला एक फ्लॉवरपॉट शहीद झाला. तो हिच्या माहेरून खास गिफ्ट मिळालेला फ्लॉवरपॉट असल्यानं पुढचा अर्धा तास फक्त 'कर्णरंध्रआघातासन' सहन करावं लागलं. कान हा अवयव देवानं माणसाला ऐच्छिक का नाही ठेवला, हा एकच विचार त्या वेळी मनात आला. हिचे संतापाने फुललेले डोळे पाहून माझी आसनं करायची इच्छा तिथंच मटकन खाली बसली. तो दिवस तसाच गेला. मात्र, आंतरराष्ट्रीय योग दिनी आपण एक तरी योगासन यशस्वीपणे करायचं आणि पूर्वजांच्या कीर्तीला बट्टा लावायचा हा माझा निर्धार कायम होता. धीर धरून एका योगा क्लासमध्ये चौकशीला गेलो. रिसेप्शनिस्ट सुदैवानं फक्त 'खुर्चीउबवासन' करीत होत्या. त्यामुळं काम सोपं झालं. त्यांनी मला आत जायला सांगितलं. मुख्य गुरुजी आत होते, असं कळलं. आत गेलो, तर तिथं कुणीच नव्हतं. मग एकदम समोर एका कोपऱ्यात गुरुजी दिसले. ते कुठलं तरी आसनच करीत होते, बहुतेक. त्यांची लांबलचक दाढी लोंबत होती. चेहरा कुठं आहे, याचा साधारण अंदाज घेऊन मी जवळ उभा राहिलो. गुरुजींची दाढी फारच लांब होती. तिला हात लावण्याचा मला अनावर मोह झाला. त्याच वेळी 'बसा...' असा आवाज एकदम जमिनीच्या लगत आला. अरेच्चा! म्हणजे मी जे वर पाहत होतो, ते गुरुजींचं डोकं नव्हतंच तर... जमिनीलगत जवळपास झोपून मी त्या चेहऱ्याजवळ चेहरा नेला, तर मला दुसरा धक्का बसला. ते गुरुजी नव्हते, तर बाई होत्या. ते लांबलचक केस म्हणजे त्यांची वेणी होती. बाईंनी कुठलं तरी असं आसन केलं होतं, की त्यात त्यांचा चेहरा जमिनीवर आणि वेणी अवकाशात पायांवर गेली होती. (की मागं आणखी कुणी दुसरी शिष्याबिष्या होती, देव जाणे.) या आकाराला मनुष्य का म्हणायचं, एवढाच प्रश्न मला पडला. बाई काही काळानंतर मलाही हेच आसन करायला लावतील, या भीतीनं मी तिथून जो पळ काढला, तसा जर मी ऑलिंपिकमध्ये धावलो असतो, तर देशाच्या खात्यात अगदी सुवर्ण नाही, पण किमान ब्राँझ मेडलची भर निश्चित पडली असती! 
एवढं होऊनही मी हटलो नव्हतो. 'हटयोगी'च झालो होतो म्हणा ना! आता मी योगावरची पुस्तकं आणली. त्यात विविध आसनांची चित्रं दाखवली होती. याशिवाय रोजच्या वर्तमानपत्रांतसुद्धा रोज योगासनांवर काही ना काही माहिती येऊ लागली होती. त्यात नवनव्या आसनांचाही समावेश होता. ते पाहून मला आपल्या आजूबाजूला रोज काही नवी योगासनं दिसू लागली. यातली काही अशी -

१. अधोमुखासन - हे आसन हल्ली बरीच मंडळी करताना दिसतात. विशेषतः ज्यांच्या हाती स्मार्टफोन आहे त्या लोकांना तर या आसनाचं व्यसनच जडलं आहे, यात शंका नाही. कायम ही मंडळी आपलं तोंड खाली घालून, मोबाइलमध्ये काही ना काही तरी बघत असतात. 
यामुळं आपला समाज एकाएकी भयंकर नम्र वगैरे झाला आहे, असा भास होतो. हे आसन आपल्याला कुठेही करता येते. मित्रांसोबत हॉटेलमध्ये बसलो असताना, घरी पत्नीसोबत गप्पा मारीत असताना, मंगल कार्यालयात, ऑफिसात, रस्त्यावर चालता चालता, बसमध्ये, ट्रेनमध्ये, विमानात, एवढंच काय स्वच्छतागृहातही हे आसन केले जाते. हे आसन करणारा आनंदी असतो, तर त्याकडे पाहणारा त्याला खाऊ की गिळू अशा पवित्र्यात असतो. मात्र, हे आसन आवडणारी लोकं त्याकडं फार लक्ष देत नाहीत. लवकरच या आसनाला आपले राष्ट्रीय आसन जाहीर केले जाईल, अशी आशा आहे.

२. अंगुलीनर्तनासन - हे आसन दोन प्रकारांत केले जाते. एक सर्वसामान्य माणसे करतात. त्यासाठी पुन्हा स्मार्टफोनची गरज असते. हा टचस्क्रीनवाला मोबाइल असल्यानं आपला अंगठा त्यावर सतत वर-खाली नाचत राहतो. काही मंडळींना हे आसन एवढे आवडते, की त्यात त्यांचा अंगठा झिजून झिजून शेवटी फक्त नख राहिल्याचं नंतर त्यांच्या लक्षात येतं. पण मग ही मंडळी नखानं स्क्रीन खाली-वर करायला सुरुवात करतात. अंगठा काय, एक गेला, दुसरा लावता येईल; पण स्मार्टफोनवरची अपडेट्स एकदा गेली की परत कशी पाहायला मिळणार, हाच उदात्त विचार त्यामागं असतो. या आसनाचा दुसरा प्रकार विवाहित पुरुषांनाच अनुभवता येतो. यात आपल्या धर्मपत्नीच्या बोटांच्या खाली-वर होणाऱ्या हालचालींवर नृत्य करीत असल्याचा अप्रतिम आभास या मंडळींना होतो आणि ते व त्यांची पत्नी दोघेही खूश राहतात.

३. खुर्चीबूडघट्टचिकटासन - हे नाव विचित्र असलं, तरी आसन फारच लोकप्रिय आहे. विशेषतः राजकारणी आणि खेळांपासून ते शिक्षण संस्थांपर्यंत प्रत्येक खाऊवाल्या ठिकाणी आपापल्या पदांवर घट्ट चिकटून राहणाऱ्या नरपुंगवांमध्ये हे आसन खासच प्रिय आहे. यात आपल्याला मिळालेली खुर्ची सोडायची नसते. उलट वर्षानुवर्षे त्यावर आपले बूड घट्ट रोवून बसायचे असते. असे केल्याने शारीरिक फायदे काही होत नसले, तरी आर्थिक फायदे मजबूत होतात. हे आसन क्लासमध्ये शिकता येत नाही. त्यासाठी पूर्वी या खुर्चीवर बसलेल्यांच्या पोटीच जन्म घ्यावा लागतो.

४. चलनप्रियासन - हे आसन आवडणाऱ्या लोकांना कागदी नोटा खाव्याशा वाटतात. काही जण खातात, तर काही जण त्या अंथरून त्यावर झोपून हे आसन करून पाहतात. विविध सरकारी कार्यालये, विशेषतः महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम आदी खात्यांमध्ये खालच्या कारकुनापासून ते वरच्या अवर सचिवापर्यंत सर्वांनाच हे आसन अतिप्रिय आहे. या आसनात नोटा स्नानगृहात, बेडरूममध्ये, शॉवर बाथच्या वरच्या बाजूला किंवा फरशी खणून आतमध्ये अशा कुठेही लपवाव्या लागतात. त्यामुळं व्यायाम भरपूर होतो. फक्त हे आसन फॉलो करणाऱ्यांना रात्रीची झोप लागत नाही, एवढीच एक त्रुटी आहे.

५. गलितगात्रासन - हे आसन अजिबात लोकप्रिय नाही. पण या देशात अनेक नागरिकांवर ते लादलं गेलं आहे. आजूबाजूला रोज दिसणारा भ्रष्टाचार, लोकांची गैरवागणूक, बेशिस्त वाहतूक, बेकायदेशीर धंदे, शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात चालू असलेली अनागोंदी, महागाईचा राक्षस, रोजचं अवघड झालेलं जगणं हे सगळं पाहून तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला रोजच हे आसन नाइलाजानं करावं लागतं. यात आपल्याला अतोनात नैराश्य येतं आणि आता काही चांगलं होणे नाही, अशी भावना मनात दाटून येते.

...ही सर्व आसनं दूर करून प्रेमानं खरीखुरी योगासनं करायला मिळतील, तो दिवस माझ्या दृष्टीनं खराखुरा आंतरराष्ट्रीय योग दिवस असेल. हा दिवस पाहण्याचा 'योग' कधी येतो, ते पाहू!

---
(पूर्वप्रसिद्धी : जत्रा, जून २०१५)

13 Jun 2017

किरण राव लेख

ई-धोबीघाट...
-------------

(किरण राव स्वतःचा ब्लॉग लिहिते आहे, असे कल्पून) 
------

मी किरण राव. एक स्वतंत्र आणि आझाद स्त्री. हां, अगदी आमीर स्त्री म्हटलं तरी चालेल. पण आमीरची स्त्री म्हणू नका. माझं मन दुखावेल. तसंही आम्हा बायकांचं मन ही मोठी नाजूक गोष्ट आहे. एवढ्यातेवढ्या कारणानंही आमचं बिनसतं आणि आमचं हळवं मन दुखावतं. अर्थात मी फक्त माझाच विचार करते. दुसऱ्या स्त्रीचा विचार केला असता, तर माझं लग्नच झालं नसतं. पण ते जाऊ द्या. दुसऱ्याचं लग्न ही चर्चेची अन् आनंदानं गॉसिप करायची गोष्ट असली, तरी स्वतःचं लग्न ही तशी नक्कीच नव्हे. त्यातून आम्ही दोघंही पुरोगामी विचारसरणीचे असल्यामुळं आम्हाला मुळात लग्नच करायचं नव्हतं. पण एकाच घरात दोन बायका नांदणं कठीण. म्हणून मग शेवटी यांनीच काडी मोडली. मला काडीचाही फरक पडत नाही. शिवाय आपल्याकडं 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या लोकांकडं सोसायटी अजूनही त्यांना जणू पाठी एक शेपटी असावी, अशा पद्धतीनं पाहते. शेपटी सोडा, पण मला कधी केसांचा शेपटाही नव्हता. कारण... तेच. मी पुरोगामी आहे. बायकांनी अधोवदनी राहून सदैव केस विंचरत बसावं याला माझा एक स्त्री म्हणून कायमच विरोध आहे. लहानपणी आई माझी वेणी घालायची, तेव्हाही मी तिला विरोध केला होता. पण पाठीत एक धपाटा मिळायचा आणि गुपचूप वेणी घालून घ्यावी लागायची. मी घराबाहेर पडल्यावर पहिल्यांदा काय केलं असेल, तर हे केस कापून टाकले. केस धुण्याचा आणि वाळवण्याचा मला कंटाळा असला, तरी कपडे धुण्याचा, किंवा फॉर दॅट मॅटर, काहीही धुण्याचा मला विलक्षण छंद आहे. नादच आहे म्हणा ना. जमल्यास मला हा सगळा बुरसटलेला समाज धुवून स्वच्छ करायचा आहे. मला पुरुषांच्या डोक्यातली ती बायकांविषयीची वाईट नजर धुवून काढायची आहे. मला जाति-धर्मांत तेढ पसरवणारी कुठलीही विचारसरणी धोपटून काढायची आहे. मला आमीरच्या प्रत्येक सिनेमातल्या नायिकेलाही तेवढीच धुवून-पिळून काढायची आहे. (अगं बाई, आमीरच्या या ढीगभर शॉर्ट आठवड्यापासून तशाच पडल्या आहेत. त्या मशिनला लावायच्या आहेत. शांताबाई...) हे अस्सं होतं. सामाजिक अभिसरणाची माझी प्रक्रियाच ही अशी कौटुंबिक कामं खुंटित करून टाकतात. समाजात चाललेला दांभिकपणा पाहून मी आतल्या आत उकळायला लागते आणि त्या तंद्रीत गॅसवरचं दूध उतू जातं. आमीरचे सत्यमेव जयतेचे पायलट एपिसोड माझ्याकडं प्रीव्ह्यूला यायचे तेव्हा तर मी दूध तापवायचंच बंद केलं होतं. आमचं घर पुरोगामी असल्यानं तशी स्वयंपाकाची बरीचशी कामं आमीरच करतो म्हणा. खरं तर तो स्वतः काही करत नाही. घरात ढीगभर नोकर आहेत. कुक आहेत. हा फक्त त्यांना वाफ देत असतो. मी तर त्याला अनेकदा म्हणतेही, अरे, तुझ्या तोंडच्या वाफेवर आझादच्या गुरगुट्या भाताचा कुकर सहज होईल. पण काही असलं, तरी आमीर सगळं हसून घेतो. रागावत नाही. अस्सा नवरा नशिबानंच मिळतो, असं कुणी म्हणू नये. (मिळवताही येतो, हा स्वानुभव आहे!) मुळात आम्ही पुरोगामी असल्यानं आमचा नशीब वगैरे फालतू गोष्टींवर विश्वासच नाही. अगदी परवाचीच गोष्ट. पीकेच्या रिलीजच्या वेळी राजूनं (हिरानी) त्याच्या प्रॉडक्शन हाउसमधल्या लोकांच्या आग्रहास्तव सत्यनारायण घातला. आता ही गोष्ट आम्हा आतल्या गोटातल्या लोकांनाच माहिती आहे. मी विधूला हे सांगितलं, तर त्यानं डोक्याला हात लावला. आमीरचा प्रश्नच नव्हता. त्याला त्या दिवशी मॉडर्न आर्ट गॅलरीत कुठल्याशा तरुण मुलीच्या चित्रप्रदर्शनाला जायचं होतं. ही कामं तो निव्वळ सामाजिक उत्तरदायित्व म्हणून करतो. तर त्याचा प्रश्नच नव्हता तिकडं येण्याचा. पण मला जावं लागलं. एका पुरोगामी अन् नास्तिक स्त्रीसाठी सत्यनारायणाची पूजा पाहणं हा केवढा सांस्कृतिक शॉक असतो, हे तुम्हाला नाही कळायचं. अगदीच भेस्ट ऑफ टाइम... पण राजूसाठी गेले. आझादनं प्रसाद मटकावला. पण ते गोड दही देतात ना, ते हाताला चिकटतं आणि मग मला फार इरिटेटिंग होतं. असो. सांगायची गोष्ट, ही पीके चालला तो केवळ सत्यनारायणामुळं असं आता राजूच्या ऑफिसमधले काही लोक बोलताहेत. ही म्हणजे हाइट झाली. मला अशा अनेक गोष्टी सोशल नेटवर्किंग साइटवरच्या घाटावर धुवाव्याशा, बडवाव्याशा वाटतात. म्हणूनच मी सुरू केला ना हा ई-धोबीघाट ब्लॉग... यहाँ दाग भी सफेद होते है... (कशी वाटली टॅगलाइन? छान आहे ना! खरं सांगू, मीच लिहिलीय.) मी तशी बरी लिहिते. पण आमीर मला कधीच त्याच्या सिनेमात लिहायला देत नाही. अर्थात, मीही त्याच्याविना अडले आहे, असं मुळीच नाही. उलट मी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या सिनेमातही त्याला घ्यायलाच पाहिजे, असा काही माझा हट्ट नव्हता. शेवटी रीतसर ऑडिशन वगैरे घेऊन मी त्याला रोल दिला. कारण आमच्याकडं नवरा म्हणून झुकतं माप वगैरे असलं काही चालत नाही. शक्यतो आपल्या जोडीदाराला पुरेसं फाट्यावर मारल्यावरच आम्हाला समाधान लाभतं. पुरोगामित्वाचं ते एक लक्षणच आहे म्हणा ना! हल्ली तर ते मुहूर्त वगैरे कार्यक्रमांना जायलाही मला नको वाटतं. पार्ट्या आणि प्रीमिअरला, किंवा त्या पुरस्कार वितरण सोहळ्यांना जायला आम्हा दोघांनाही आवडत नाही, हे तुम्हाला माहितीच आहे. त्यापेक्षा चार गरीब माणसांना मदत केल्याचं आम्हाला अधिक समाधान मिळतं. शिवाय मुलांकडंही लक्ष द्यावं लागतं. लोकांना वाटतं, हे काय सेलिब्रिटी! यांना काय सगळं आयतं मिळतं. ते पैसा वगैरे खूप आहे, मान्य आहे. पण आम्हा दोघांनाही फार छानछोकीत राहावं, उगाच चमक-धमक करावी असं कधीच वाटलं नाही. सुदैवानं दोघांच्या घरचे संस्कारही तसेच आहेत. अर्थात चांगले संस्कार असले, तरी माणूस पुरोगामी होऊ शकतो म्हणा. पण या देशात आमीरसारख्याला पुरोगामीच राहावं लागतं. असो. तो फारच गंभीर आणि धोबीघाटाचा विषय आहे. नवरा म्हणून तो कसा अगदी लहान बाळासारखा आहे. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, आझाद लहान आहे की आमीर? मी आझादला झोपवत असले, तरी हे महाशय माझ्या मांडीत येऊन, तोंडात अंगठा घालून बसणार. मग मला दोघांनाही थापटत झोपवावं लागतं. आमीर प्रेमळ आहे. त्याला त्याच्या थोरल्या मुलाचाही खूप अभिमान आहे. जुनैद आता खूपच मोठा आहे. तो परदेशात असतो. पण दिवसातला एकही क्षण असा जात नाही, की आमीर त्याच्याविषयी बोलत नाही. रीनाविषयीही तो कधीच कडवट बोललेला मला आठवत नाही. 'लगान'च्या काळातले ते दिवस खरंच खूप अवघड होते. रीना प्रोड्यूसर होती. ती आमीरचीही बॉस होती. पण हे महाराज माझ्या प्रेमात पडले. (अर्थात मीही...) पण लगान ते लगीन हा प्रवास फारच टफ होता. मला तर कसं निभावलं याचंच आज आश्चर्य वाटतंय. पण माझ्या धोबीघाट स्टाइलमुळं असेल... मी जी जी वाईट परिस्थिती समोर आली, तिला धोपटून, पिळून, झटकून दांडीवर वाळत घातलंय. 
दहा वर्षं होतील आता आमच्या लग्नाला... पण सगळं कसं काल-परवाच घडल्यासारखं वाटतंय. मुळात मी आई-बाबांकडं राहत होते, तेव्हा स्वप्नातसुद्धा कधी मुंबईत येईन आणि आमीरसारख्या सुपरस्टारबरोबर लग्न करीन, असं वाटलं नव्हतं. पण नंतर आम्ही कलकत्त्याला शिफ्ट झालो. मी सगळं शिक्षण वगैरे तिथलंच. नंतर आई-बाबांनी कलकत्ता सोडलं आणि मग मी मुंबईत आले. परत दिल्लीत गेले शिकायला. नंतर लगानच्या वेळी मी आशुतोष सरांकडं एडी होते. तिथूनच हे सगळं सुरू झालं. असो. तो आमचा सगळा इतिहास तुम्हाला गॉसिप मॅगेझिनमधून केव्हाच माहिती झाला असेल. पण मला ना, खरंच, आमीरसारखा नवरा मिळाला याचं अजूनही कधी कधी आश्चर्य वाटतं. तो माझ्यापेक्षा आठ-नऊ नर्षांनी मोठा आहे. स्टारडम वगैरे बाबतीत तर फारच मोठा. पण आमच्या नात्यात त्यानं ते कधी आणलं नाही. इन फॅक्ट, त्यामुळंच आमचं जुळलं. कारण मी तशी फटकळ आहे आणि ज्याला त्याला त्याची जागा दाखवून द्यायला मला आवडतं. पण आमीरलाही हाच स्वभाव आवडला असावा. लगाननंतर आमीरची पुढची फिल्म यायला चार वर्षं लागली, याचं कारण मधल्या काळात त्याचा हा सगळा फॅमिली ड्रामा सुरू होता. शेवटी आम्ही लग्न केलं आणि मग आमीरनं पुढच्या फिल्म करायला घेतल्या. तो फक्त एक नट नाही. त्यानं स्वतःला खूप इव्हॉल्व्ह केलंय माणूस म्हणून. नवनव्या गोष्टी शिकायला त्याला आवडतात. मराठी शिकायचं त्यानं मध्यंतरीच्या काळात मनावर घेतलं आणि खरंच सुहास लिमये सरांचा क्लास लावून तो रीतसर ती भाषा शिकला. आता तो उत्तम मराठी बोलतो. तीच गोष्ट उर्दू वाचनाची. सत्यमेव जयतेसारखा प्रयोग करायला त्याच्यासारखी विचारसरणी असलेला माणूसच हवा. आमच्या मुलालाही आम्ही हेच संस्कार दिले आहेत. त्याचं नाव त्याच्या खापर की खापरखापर पणजोबांवरून, म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावरून आम्ही आझाद ठेवलं आहे. आमीर आणि माझ्या नात्यात कधी आमचा धर्म, जात आली नाही. मुलालाही आम्ही तसंच वाढवणार आहोत. जो काही भांडणांचा धोबीघाट आमच्यात आहे, तो तर कुठल्याही नवरा-बायकोत असतोच. पण हल्ली आमीर बऱ्यापैकी शांत असतो.
मला अनेक गोष्टी करायच्या असतात. लिखाण करायचं असतं. वाचन करायचं असतं. आमीर बऱ्यापैकी वाचतो आणि मीही. मग आम्ही एकमेकांना पुस्तकं सुचवत असतो. कधी तरी एकत्रही वाचन होतं. पण शक्यतो ते प्रसंग फार कमी. आमीर कायम त्याच्या शेड्यूलमध्ये बिझी असतो. पण आझादसाठी तो वेळ काढतोच. आमीरचे काही खास निवडक मित्र आहेत. त्यांच्यावर धमाल करायला त्याला आवडते. त्या वेळी त्याला पाहायचं. अगदी जो जिता वही सिकंदरच्या काळातला आमीर पुन्हा अवतरलाय असं वाटतं. आमीरचे सुरुवातीचे सिनेमे पाहताना मला हसूच येतं. अगदीच शामळू ध्यान होतं हे. अगदी 'राजा हिंदुस्थानी' आणि 'गुलाम'पर्यंत त्याचा प्रवास तसा सर्वसामान्य नटासारखाच होता. पण 'लगान'नं आमीरच्या आयुष्यात उलटापालट केली. आणि अर्थात माझ्याही. त्यामुळं या सिनेमाला आमच्या आयुष्यात खास स्थान आहे. 'लगान'चे ते दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. आमीर त्याच्या आयुष्यात दुसऱ्यांदा सीरियसली प्रेमात पडला होता. त्याच्याआधी अनेक नट्यांनी त्याच्यावर 'ममता' केली, पण त्यांच्यासोबत तो कधीच सीरियस नसायचा. असो. आता त्यानंही वयाची पन्नाशी गाठली आहे आणि मीही चाळिशी ओलांडली आहे. त्यामुळं आम्हा दोघांतही मुळातच असलेला एक प्रगल्भपणा, मॅच्युरिटी आता आणखी वाढली आहे. कुठलाही फालतूपणा मला नको वाटतो. पैशांचंही आम्हाला फार कौतुक नाही. माणूस म्हणून स्वतःला आणखी आणखी उन्नत करीत जावं, असं दोघांनाही प्रामाणिकपणे वाटतं. धोबीघाट गरजेचा असतो तो त्यासाठी. कपड्यांसोबत कधी कधी मनाचीही सफाई करावी लागते. ब्लॉगचं हे माध्यम मला त्यासाठी एकदम परफेक्ट वाटतं. सगळीच धुणी सार्वजनिक नळावर धुवायची नसतात, हे मला कळतं. पण काही गोष्टी अशा असतात, की त्यासाठी हा सार्वजनिक उपक्रमच बरा वाटतो. मला इथं माझ्या स्वतःविषयी जास्त लिहायचं आहे. मी सुरुवातीला म्हटलं, तशी मी एक स्वतंत्र, आझाद बाई आहे. पण आमीर हाही आता माझाच एक हिस्सा असल्यामुळं त्याच्या वाट्याचं तेवढं सगळं यात येणारच आहे. तुम्हा लोकांना आमच्या वैयक्तिक गोष्टींत इंटरेस्ट नसावा, असं मला वाटतं. पण इतर चार जोडप्यांसारखं आमच्याकडं पाहा, एवढंच माझं म्हणणं आहे. आम्ही कलाकार आहोत. आमची अभिव्यक्ती त्या कलेच्या माध्यमातून होत असते. यापलीकडं आमच्या सेलिब्रिटी स्टेटसला काही अर्थ आहे, असं मला वाटत नाही. पण आमीरसारखा उत्कृष्ट कलावंत तुमच्या आयुष्यात जोडीदार म्हणून असणं, ही गोष्ट तुम्हाला नक्कीच 'स्पेशल समवन' बनवते यात शंका नाही. 
चला, आता हा ब्लॉग वाळत घालते. सॉरी, अपडेट करते. आमच्या या स्पेशल माणसाचा ब्रेकफास्ट राहिला आहे अजून. बाईला ही कामं चुकली आहे का सांगा... बाई... आपलं... बाय... गुड बाय...

---
 
(पूर्वप्रसिद्धी - जत्रा, मार्च २०१५)

7 Jun 2017

यक्षनगरी - दोन परीक्षणे

१.

'यक्षनगरी'ची स्मरणीय सफर...
-----------------------------
 
श्रीनिवास भणगे
-----------------------
 
चित्रपटसृष्टी, त्या सृष्टीतल्या तारका, तारे आणि तंत्रज्ञ यांच्याविषयी (याच क्रमाने) जगभरातल्या समाजमनात कायम कुतूहल असते. त्यामुळे या विषयावर चिक्कार लेखन केले जाते. ते त्या त्या वेळी औत्सुक्याने वाचले जाते आणि नंतर विसरलेही जाते. या तात्कालिक लेखनाच्या पलीकडे जाऊन, अत्यंत गंभीरपणे, चित्रपटनिर्मिती ही एक सर्वसमावेशक कला आहे, हे लक्षात घेऊन, काही लेखकांनी टिकाऊ असे लेखन केले आहे. मराठीमध्ये अशोक राणे, बाबू मोशाय, अरुण खोपकर, अनिल झणकर ही अगदी सहजपणे सामोरी येणारी नावे आहेत. यातल्या काही लेखकांचा चित्रपटतंत्राविषयी सखोल अभ्यासच आहे आणि काही लेखकांचं ते प्रेम आहे. जगण्याचा एक भाग आहे. त्यांचे स्वतःचे विश्व चित्रपटांमुळे समृद्ध झाले आहे आणि ही समृद्धी त्यांनी मराठी वाचकांना दिलखुलासपणे वाटली आहे. अशा आस्वादक लेखन करणाऱ्या लेखकांच्या यादीत श्रीपाद ब्रह्मे हे नाव अलीकडेच समाविष्ट झाले आहे. वृत्तपत्रीय लेखन (चित्रपटांविषयी) ते गेली दहा-बारा वर्षं करीत आहेत. पण पुस्तकरूपाने त्या लेखनाचा परिचय अलीकडेच घडतो आहे. 'यक्षनगरी' हे सिनेमाविषयक लेखांचे त्यांचे दुसरे पुस्तक. ('फर्स्ट डे फर्स्ट शो' हे पहिले.) हे त्यांच्या अविचल सिनेमानिष्ठेचं दर्शन घडविणारं आहे, यात शंकाच नाही.
पुस्तकाची विभागणी दोन भागांत केली आहे. पहिला भाग 'सिनेमा ७० एमएम' अशा शीर्षकाखाली येतो, तर दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे 'नक्षत्रे'. ही दोन्ही शीर्षके आपापला उद्देश निर्देशित करतात. पहिल्या भागात एकूणच 'सिनेमा' या माध्यमाविषयी चर्चा असली, तरी श्रीपाद ब्रह्मे हे चांगले गप्पिष्ट असल्यामुळे त्यांनी ती चर्चा कुठेही जड होऊ दिलेली नाही. त्यातल्या प्रकरणांची नावे जरी वाचली (सिनेमा - एक पाहणे, माध्यमांतर : रीम ते रीळ, मराठी सिनेमा - तंत्रातून अर्थाकडे, सिनेमॅटिक कलाटणी इ.) तरी हे सिनेपंतोजींनी घेतलेले बौद्धिक असावे, असा समज होतो. पण वाचत गेल्यानंतर विषय सोपा करून मांडण्याची लेखकाची हातोटी लक्षात येते. 'सिनेमा - एक पाहणे' या लेखात ते सिनेमाच्या निर्मितीचा प्रवास, सर्व अंगांचा विचार करून, विस्तारानं मांडतात. निर्मितीच्या प्रत्येक विभागाचे (डिपार्टमेंट) महत्त्व विशद करतात. त्यात 'दिग्दर्शक' या स्थानाचे श्रेष्ठत्व प्रामुख्याने नोंदले जाते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 'आपल्याकडे चित्रपटसाक्षरता एकूणच कमी आहे' हे अत्यंत सत्य असे विधान ते परखडपणे मांडतात आणि लगेच त्याच्या सामाजिक कारणांचा उहापोहदेखील करतात. सामाजिक उलाढाल आणि चित्रपटसृष्टी यांच्या संबंधातली निरीक्षणे हे या संपूर्ण पुस्तकाचेच एक, अन्य ठिकाणी दुर्मिळ असलेले, वैशिष्ट्य आहे. या भागातले सर्वच लेख हे सिनेमासाक्षर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. 'रीम ते रीळ' या प्रकरणात साहित्यातल्या छापील अक्षरापासून ते पडद्यावर अवतीर्ण होण्यापर्यंतच्या प्रवासाची, खरे तर, 'मानसिकता'च मांडली आहे. त्यात सिनेमा कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो, याचे एक गणितच मांडून दाखवले आहे. 'तंत्रातून अर्थाकडे' या लेखात ब्रह्मे यांनी एक प्रमेय मांडले आहे. 'पूर्वी आपल्याकडे चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. तशी ती मराठी सिनेमातही होती आणि आहे. राजा परांजपे ते नागराज मंजुळे असं त्याचं थोडक्यात वर्णन करता येईल.' सिनेमाच्या अर्थकारणाचा विचार करताना, या विधानाचा परामर्ष घेतला गेलाच पाहिजे, इतके हे विधान लक्षवेधी आहे. विधानाच्या पुष्ट्यर्थ लेखकानं अनेक सामाजिक संदर्भ वापरले आहेत. थेट मल्टिप्लेक्सचा उदय आणि सिनेमाच्या अर्थकारणात झालेला फरक इथपर्यंत समग्र चर्चा या लेखात केली गेली आहे. जो भाग संबंधितांनी, मतभेद असले तरी, मुळातून वाचणे गरजेचे आहे. 'सिनेमॅटिक कलाटणी' आणि 'सांगत्ये ऐका ते सैराट' ही दोन शीर्षकेच आतल्या मजकुराविषयी बोलकी आहेत.
पुस्तकाच्या पूर्वार्धातील लेखनाशी अंमळ फटकून वागणारा लेख आहे 'लंचबॉक्स उघडून पाहताना!' असे असले तरी एक समीक्षणात्मक लेख म्हणून ते खटकत नाही. चित्रपट पाहणे हीदेखील एक कला आहे. 'लंचबॉक्स' नावाच्या हिंदी चित्रपटाची ही आस्वादक समीक्षा, चित्रपट कसा पाहावा, हे समजावून सांगते.
दुसरा 'नक्षत्रे' या नावाचा भाग चित्रपट तारे, तारकांच्या (आणि फक्त पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांच्याच) व्यक्तिचित्रणांचा आहे. त्यात (अर्थातच) अमिताभ बच्चन आणि मग अनिल कपूर, निळू फुले, माधुरी दीक्षित यांच्याविषयीचे लेख आहेत. लेखक या ताऱ्यांच्या प्रेमातच असल्यामुळे भक्तिभावाचा जास्त प्रादुर्भाव या लेखनाला झाला असावा, असे वाटते. अकाली निधन पावलेल्या मधुबाला, गुरुदत्त, मीनाकुमारी, संजीवकुमार, स्मिता पाटील यांच्यासारख्या सिनेकलावंतांवर श्रद्धांजली स्वरूपाच्या लेखांचा समावेशही याच भागात केला आहे. या सगळ्या व्यक्तिचित्रणांमध्ये नवीन असे काही नाही. पण काही निरीक्षणे मात्र उल्लेखनीय आहेत. उदा. अमिताभ बच्चन यांच्या एकंदर हिप्नॉटिझमबद्दल लिहिताना, ''कौन बनेगा करोडपती' या मालिकेतलं नव्वद टक्के यश हे केवळ त्यात बच्चन आहे यातच आहे' - असा उल्लेख येतो. निळूभाऊंच्या विषयी, 'खऱ्या आयुष्यातील माणूस नावाची भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते' - अशी सार्थ टिप्पणी सहज समोर येते. 'सौंदर्य जर पाहणाऱ्यांच्या नजरेत असेल, तर खरोखरच ते चिरतरुण राहतं' हा माधुरी दीक्षितसंबंधित उल्लेख तसाच. 'कदाचित तिचं वयोवृद्ध होणं नियतीलाच मंजूर नसावं' हा मधुबालाच्या संदर्भातला उल्लेखदेखील यथायोग्य चटका लावणारा. 'स्मिता पाटील यांनी पुण्याच्या एफटीआयआयमध्ये शिक्षण घेतलं होतं,' हे विधान मात्र तपासून घ्यायला हवं! ही सगळी व्यक्तिचित्रणे करताना सामाजिक इतिहास, तत्कालीन घडामोडी आणि त्यांचा या कलाकारांच्या कार्यकर्तृत्वावर झालेला परिणाम; तसेच त्यांच्या लोकप्रियतेच्या आलेखाचा चढ-उतार यावर लेखकाने सखोल चिंतन केले आहे. चित्रपटप्रेमींना ते मननीय वाटेल यात शंकाच नाही. 'यक्षनगरी' या पुस्तकाचे यश त्यातच आहे.
समदा प्रकाशनाने पुस्तकाला बहाल केलेल्या देखणेपणालाही पुरेसे गुण जातात. श्री. ल. म. कडूंचे मुखपृष्ठ आणि जयदीप कडूंची निर्मिती तितकीच प्रशंसनीय.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, २८ मे २०१७)
---

२.
 
कहाणी शुक्रवारची : एका 'यक्षनगरी'ची!
--------------------------------------
 
- तृप्ती कुलकर्णी
लहानपणापासून आपल्याला निरनिराळ्या कहाण्या ऐकायला आवडतात. मग त्या पुराणातल्या असोत किंवा गोष्टीच्या पुस्तकातल्या असोत किंवा आणखीन कुठल्या, त्या वाचताना आपण गुंग होऊन जातो हे मात्र खरंच. अशाच गुंग करणाऱ्या कहाण्या जेव्हा संगीत, वेगवेगळे स्पेशल इफेक्ट वापरून सिनेमाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर आपल्या समोर येतात, तेव्हा साहाजिकच त्या आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यामुळे सिनेमा या गोष्टीबद्दल आपल्याला खूप अप्रूप आहे. त्यातल्या नट, नट्या, दिग्दर्शक, गायक, गीतकार ह्या साऱ्यांबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. ते प्रत्यक्षात कसे दिसतात? कसे काम करतात? त्यांची मतं काय आहेत? ते व्यक्ती म्हणून कसे आहेत? ह्या साऱ्या गोष्टी आपल्याकडे नेहमीच चर्चेचा, कौतुकाचा विषय ठरल्या आहेत. एक प्रकारचं 'ग्लॅमर' या क्षेत्रातल्या व्यक्तींना मिळतं. मग त्यामुळं प्रभावित होऊन नट, नट्यांची नावं आपल्या मुलांना देणं, निरनिराळ्या प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीत त्यांचा वापर करणं असं सर्रास चालू असतं. कपडे, हेअर स्टाइल या सगळ्यावर सिनेमा इंडस्ट्रीचा प्रभाव पडतो. रोजच्या जगण्यात इतका प्रभाव टाकणारी ही इंडस्ट्री म्हणजेच श्रीपाद ब्रह्मे यांनी सांगितलेली 'यक्षनगरी' आहे. 
जेव्हा केव्हा आपण अनोळख्या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा आपल्याला एखादा मार्गदर्शक लागतोच. त्या ठिकाणची माहिती, त्यातील सौंदर्यस्थळे, महत्त्वाच्या गोष्टी, तिथे घडणाऱ्या हकिगती त्यानं आपल्याला सांगितल्या, की तो अनोळखी प्रदेश एकदम आपल्या परिचयाचा वाटू लागतो. त्याच्याकडं आपण लक्षपूर्वक आणि आस्थेनं पाहतो. त्यामुळे त्या स्थळाचा मनापासून आस्वाद घेता येतो. अगदी त्याचप्रमाणं या यक्षनगरीची सफर श्रीपाद ब्रह्मे घडवून आणतात. आपल्याकडे दर शुक्रवारी नवनवीन चित्रपट येतात. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या चित्रपटांमधले नेमके कोणते सिनेमे बघावेत, काय दृष्टीनं ते बघावेत, असे प्रश्न आपल्याला पडतात. त्याबाबत  खूप छान मार्गदर्शन आपल्याला या 'यक्षनगरी'त मिळतं. अगदी सिनेमा बघावा कसा यापासून ते या 'यक्षनगरी'ची जडणघडण कशी झाली, कोणकोणते चित्रपट या काळात बनले, ते का बनले, त्या काळात सामाजिक परिस्थिती कशी होती, नट-नट्यांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता अशा सगळ्या हकिगती तर आहेतच, शिवाय काही अजरामर झालेल्या चित्रपट तारे-तारकांचा व्यक्तिगत परिचयही यात दिला आहे.   
'यक्षनगरी'ची निर्मिती ची कहाणी सांगताना लेखक म्हणतात, 'युरोपियन औद्योगिक क्रांतीमुळे तंत्रज्ञानाने झालेल्या बदलात सिनेमा नावाच्या तंत्रज्ञानाधारित कलेचा जन्म झाला. त्यामुळं माणसाचं जगणं पहिल्यासारखं राहिलं नाही. ल्यूमिए बंधूंनी पॅरिसमध्ये १८९६ साली जगातला पहिला सिनेमा दाखवला. त्यानंतर १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट बनवून मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. यानंतर बदल होत होत बोलपट, रंगीत चित्रं असं करता करता सिनेमानं भरपूर प्रगती केली आणि अजूनही नवं नवं तंत्रज्ञान येत आहेच. चित्रपटाच्या बदलत जाणाऱ्या यशापयशाच्या टप्प्यांचा एक आलेखच या नगरीद्वारे आपल्याला पाहायला मिळतो. 
सिनेसृष्टीनं म्हणजेच 'यक्षनगरी'नं आपलं वर्चस्व काळाच्या ओघात कायम राखण्यासाठी जे काही व्रत अंगीकारलं आहे, त्यात काळाप्रमाणे कसे बदल केले आहेत ते लेखकानं सोदाहरण सांगितलं आहे. त्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून, समाजमनाचा कल ओळखून चित्रपटांची निर्मिती झाली, असं लेखकाचं सांगणं आहे. उदाहरणार्थ, 'बिनधास्त' या सिनेमानं मराठी सिनेमाकडे बघण्याची पारंपरिक दृष्टी बदलवून टाकली. या सिनेमात एकही महत्त्वाचं पुरुष पात्र नव्हतं. ही मर्डर मिस्ट्री होती. यातील नायिका महाविद्यालयीन मुली होत्या, त्या आधुनिक होत्या, 'तुझी नि माझी खुन्नस...' म्हणणाऱ्या, नवीन पेहराव, फॅशन करणाऱ्या होत्या, 'दोन मित्रांची मैत्री जशी अतूट राहते तशी मैत्रिणींची का नाही राहत,' असं विचारणाऱ्या होत्या. त्या काळात आर्थिक सुधारणांमुळं शहरांत जे बदल घडत होते, त्याचं प्रतिबिंब या सिनेमात पडलं होतं. तसंच 'सातच्या आत घरात' या चित्रपटाबाबतही घडलं. या दोन्ही चित्रपटांनी तेव्हाची बदलती आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अचूकपणे दाखविली. त्यामुळं या सिनेमांना लोकाश्रय मिळाला आणि मराठी सिनेमानं कात टाकली.
जसे चित्रपटाबाबत झालं, तसंच कलाकारांच्या आयुष्यातही या 'नगरी'नं खूप बदल घडविले. याच उत्तम उदाहरण म्हणजे राजा गोसावी. चौथीपर्यंत शिक्षण घेऊन मुंबईला मास्टर विनायक यांच्याकडे ऑफिसबॉय म्हणून त्यांनी काम केलं. पुढे सुतारकाम, मेकअपमन, प्रकाशयोजना, नंतर एक्स्ट्रा नट म्हणून काम केलं. नंतर त्यांना 'लाखाची गोष्ट'मध्ये काम मिळून ते नायक म्हणून खऱ्या अर्थाने काम करू लागले.
याचप्रमाणे सुपरस्टार अभिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचाही आढावा घेण्यात आला आहे. ज्या वेळेस अभिताभ बच्चन सिनेक्षेत्रात आले तेव्हाची परिस्थिती कशी होती, अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतला महत्त्वपूर्ण टप्पा कोणता ते विस्तारपूर्वक सांगितले आहे.
बच्चन यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा काळ म्हणजे सत्तरीचं दशक हे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात नवनिर्माणाचं दशक म्हणून ओळखलं जातं. त्या काळात देशाची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती चांगली सुखी, समाधानकारक म्हणावी अशी होती. महानगरातलं जीवन हे रसिलं असावं, असं दाखवणारे चित्रपट येत होते, त्यांना लोकप्रियता लाभत होती. परंतु १९७२ च्या दुष्काळाच्या तडाख्यानंतर मात्र देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीला वेगळीच कलाटणी मिळाली. एक असंतोषाचं, उद्वेगाचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा त्या परिस्थितीला पोषक अशा 'अँग्री यंग मॅन'चा उदय होणं, हे अपरिहार्यच होतं. प्रत्यक्षात जरी नाही, तरी चित्रपट क्षेत्रात का होईना, असा अन्यायाविरुद्ध लढणारा, आत्मविश्वास असणारा, गुंडांना शासन करणारा नायक प्रेक्षकांना हवाच होता. अमिताभनं तो संतप्त तरुण नायक साकारल्यानं चित्रपटाच्या पडद्यावर तो यशस्वी ठरला. या साऱ्या कारकिर्दीत अमिताभ यांचा कसलेला अभिनय आणि देशातील स्थिती या साऱ्याचा परिणाम चित्रपट क्षेत्रावर झाला. याचप्रमाणे बदलणाऱ्या काळात निरनिराळे चेहरे आपल्या  उत्तुंग अभिनयाने या 'यक्षनगरी'त चमकू लागले, त्यापैकी हिंदीतील अनिल कपूर, माधुरी दीक्षित, तर मराठीतील निळू फुले यांच्या कारकिर्दीचा आढावाही यात घेतला आहे.
'यक्षनगरी' ही अशी नगरी आहे, की जिथे तुमच्या कलागुणांची कदर केली जाते. अल्पावधीतच तुम्ही कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकता. समाजात तुमची एक  प्रतिमा तयार होते. तुम्ही इथे किती काळ काम करता, हे केवळ महत्त्वाचे ठरत नाही, तर तुम्ही काय दर्जाचे काम करता त्याला महत्त्व मिळते. त्यामुळे काही काळ काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलाकार जे आजही या 'नगरी'त असते, तर त्यांनी प्रेक्षकांना आनंद दिला असता, अशा अकाली निघून जाणाऱ्या कलाकारांच्या कारकिर्दीचाही वेध या पुस्तकात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात मधुबाला, गुरुदत्त, मीनाकुमारी, संजीवकुमार, स्मिता पाटील यांचा समावेश आहे. 
नित्यपाठातल्या कहाण्या ज्याप्रमाणे आपल्याला काही संदेश देऊ करतात, नीतिनियमांची जाणीव करून देतात त्याचप्रमाणे ही शुक्रवारची यक्षनगरीची कहाणी चित्रपट क्षेत्राकडे एका वेगळ्याच नजरेने बघायला शिकवते. चित्रपटक्षेत्र हे केवळ मनोरंजाचे साधन नसून ते बदलत्या काळाचे, सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब असते, ह्याची पुरेशी जाण आपल्याला करून देते.
----
 
(पूर्वप्रसिद्धी - साहित्यसूची, जून २०१७)
----