ई-धोबीघाट...
-------------
(किरण राव स्वतःचा ब्लॉग लिहिते आहे, असे कल्पून)
------
मी किरण राव. एक स्वतंत्र आणि आझाद स्त्री. हां, अगदी आमीर स्त्री म्हटलं तरी चालेल. पण आमीरची स्त्री म्हणू नका. माझं मन दुखावेल. तसंही आम्हा बायकांचं मन ही मोठी नाजूक गोष्ट आहे. एवढ्यातेवढ्या कारणानंही आमचं बिनसतं आणि आमचं हळवं मन दुखावतं. अर्थात मी फक्त माझाच विचार करते. दुसऱ्या स्त्रीचा विचार केला असता, तर माझं लग्नच झालं नसतं. पण ते जाऊ द्या. दुसऱ्याचं लग्न ही चर्चेची अन् आनंदानं गॉसिप करायची गोष्ट असली, तरी स्वतःचं लग्न ही तशी नक्कीच नव्हे. त्यातून आम्ही दोघंही पुरोगामी विचारसरणीचे असल्यामुळं आम्हाला मुळात लग्नच करायचं नव्हतं. पण एकाच घरात दोन बायका नांदणं कठीण. म्हणून मग शेवटी यांनीच काडी मोडली. मला काडीचाही फरक पडत नाही. शिवाय आपल्याकडं 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या लोकांकडं सोसायटी अजूनही त्यांना जणू पाठी एक शेपटी असावी, अशा पद्धतीनं पाहते. शेपटी सोडा, पण मला कधी केसांचा शेपटाही नव्हता. कारण... तेच. मी पुरोगामी आहे. बायकांनी अधोवदनी राहून सदैव केस विंचरत बसावं याला माझा एक स्त्री म्हणून कायमच विरोध आहे. लहानपणी आई माझी वेणी घालायची, तेव्हाही मी तिला विरोध केला होता. पण पाठीत एक धपाटा मिळायचा आणि गुपचूप वेणी घालून घ्यावी लागायची. मी घराबाहेर पडल्यावर पहिल्यांदा काय केलं असेल, तर हे केस कापून टाकले. केस धुण्याचा आणि वाळवण्याचा मला कंटाळा असला, तरी कपडे धुण्याचा, किंवा फॉर दॅट मॅटर, काहीही धुण्याचा मला विलक्षण छंद आहे. नादच आहे म्हणा ना. जमल्यास मला हा सगळा बुरसटलेला समाज धुवून स्वच्छ करायचा आहे. मला पुरुषांच्या डोक्यातली ती बायकांविषयीची वाईट नजर धुवून काढायची आहे. मला जाति-धर्मांत तेढ पसरवणारी कुठलीही विचारसरणी धोपटून काढायची आहे. मला आमीरच्या प्रत्येक सिनेमातल्या नायिकेलाही तेवढीच धुवून-पिळून काढायची आहे. (अगं बाई, आमीरच्या या ढीगभर शॉर्ट आठवड्यापासून तशाच पडल्या आहेत. त्या मशिनला लावायच्या आहेत. शांताबाई...) हे अस्सं होतं. सामाजिक अभिसरणाची माझी प्रक्रियाच ही अशी कौटुंबिक कामं खुंटित करून टाकतात. समाजात चाललेला दांभिकपणा पाहून मी आतल्या आत उकळायला लागते आणि त्या तंद्रीत गॅसवरचं दूध उतू जातं. आमीरचे सत्यमेव जयतेचे पायलट एपिसोड माझ्याकडं प्रीव्ह्यूला यायचे तेव्हा तर मी दूध तापवायचंच बंद केलं होतं. आमचं घर पुरोगामी असल्यानं तशी स्वयंपाकाची बरीचशी कामं आमीरच करतो म्हणा. खरं तर तो स्वतः काही करत नाही. घरात ढीगभर नोकर आहेत. कुक आहेत. हा फक्त त्यांना वाफ देत असतो. मी तर त्याला अनेकदा म्हणतेही, अरे, तुझ्या तोंडच्या वाफेवर आझादच्या गुरगुट्या भाताचा कुकर सहज होईल. पण काही असलं, तरी आमीर सगळं हसून घेतो. रागावत नाही. अस्सा नवरा नशिबानंच मिळतो, असं कुणी म्हणू नये. (मिळवताही येतो, हा स्वानुभव आहे!) मुळात आम्ही पुरोगामी असल्यानं आमचा नशीब वगैरे फालतू गोष्टींवर विश्वासच नाही. अगदी परवाचीच गोष्ट. पीकेच्या रिलीजच्या वेळी राजूनं (हिरानी) त्याच्या प्रॉडक्शन हाउसमधल्या लोकांच्या आग्रहास्तव सत्यनारायण घातला. आता ही गोष्ट आम्हा आतल्या गोटातल्या लोकांनाच माहिती आहे. मी विधूला हे सांगितलं, तर त्यानं डोक्याला हात लावला. आमीरचा प्रश्नच नव्हता. त्याला त्या दिवशी मॉडर्न आर्ट गॅलरीत कुठल्याशा तरुण मुलीच्या चित्रप्रदर्शनाला जायचं होतं. ही कामं तो निव्वळ सामाजिक उत्तरदायित्व म्हणून करतो. तर त्याचा प्रश्नच नव्हता तिकडं येण्याचा. पण मला जावं लागलं. एका पुरोगामी अन् नास्तिक स्त्रीसाठी सत्यनारायणाची पूजा पाहणं हा केवढा सांस्कृतिक शॉक असतो, हे तुम्हाला नाही कळायचं. अगदीच भेस्ट ऑफ टाइम... पण राजूसाठी गेले. आझादनं प्रसाद मटकावला. पण ते गोड दही देतात ना, ते हाताला चिकटतं आणि मग मला फार इरिटेटिंग होतं. असो. सांगायची गोष्ट, ही पीके चालला तो केवळ सत्यनारायणामुळं असं आता राजूच्या ऑफिसमधले काही लोक बोलताहेत. ही म्हणजे हाइट झाली. मला अशा अनेक गोष्टी सोशल नेटवर्किंग साइटवरच्या घाटावर धुवाव्याशा, बडवाव्याशा वाटतात. म्हणूनच मी सुरू केला ना हा ई-धोबीघाट ब्लॉग... यहाँ दाग भी सफेद होते है... (कशी वाटली टॅगलाइन? छान आहे ना! खरं सांगू, मीच लिहिलीय.) मी तशी बरी लिहिते. पण आमीर मला कधीच त्याच्या सिनेमात लिहायला देत नाही. अर्थात, मीही त्याच्याविना अडले आहे, असं मुळीच नाही. उलट मी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या सिनेमातही त्याला घ्यायलाच पाहिजे, असा काही माझा हट्ट नव्हता. शेवटी रीतसर ऑडिशन वगैरे घेऊन मी त्याला रोल दिला. कारण आमच्याकडं नवरा म्हणून झुकतं माप वगैरे असलं काही चालत नाही. शक्यतो आपल्या जोडीदाराला पुरेसं फाट्यावर मारल्यावरच आम्हाला समाधान लाभतं. पुरोगामित्वाचं ते एक लक्षणच आहे म्हणा ना! हल्ली तर ते मुहूर्त वगैरे कार्यक्रमांना जायलाही मला नको वाटतं. पार्ट्या आणि प्रीमिअरला, किंवा त्या पुरस्कार वितरण सोहळ्यांना जायला आम्हा दोघांनाही आवडत नाही, हे तुम्हाला माहितीच आहे. त्यापेक्षा चार गरीब माणसांना मदत केल्याचं आम्हाला अधिक समाधान मिळतं. शिवाय मुलांकडंही लक्ष द्यावं लागतं. लोकांना वाटतं, हे काय सेलिब्रिटी! यांना काय सगळं आयतं मिळतं. ते पैसा वगैरे खूप आहे, मान्य आहे. पण आम्हा दोघांनाही फार छानछोकीत राहावं, उगाच चमक-धमक करावी असं कधीच वाटलं नाही. सुदैवानं दोघांच्या घरचे संस्कारही तसेच आहेत. अर्थात चांगले संस्कार असले, तरी माणूस पुरोगामी होऊ शकतो म्हणा. पण या देशात आमीरसारख्याला पुरोगामीच राहावं लागतं. असो. तो फारच गंभीर आणि धोबीघाटाचा विषय आहे. नवरा म्हणून तो कसा अगदी लहान बाळासारखा आहे. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, आझाद लहान आहे की आमीर? मी आझादला झोपवत असले, तरी हे महाशय माझ्या मांडीत येऊन, तोंडात अंगठा घालून बसणार. मग मला दोघांनाही थापटत झोपवावं लागतं. आमीर प्रेमळ आहे. त्याला त्याच्या थोरल्या मुलाचाही खूप अभिमान आहे. जुनैद आता खूपच मोठा आहे. तो परदेशात असतो. पण दिवसातला एकही क्षण असा जात नाही, की आमीर त्याच्याविषयी बोलत नाही. रीनाविषयीही तो कधीच कडवट बोललेला मला आठवत नाही. 'लगान'च्या काळातले ते दिवस खरंच खूप अवघड होते. रीना प्रोड्यूसर होती. ती आमीरचीही बॉस होती. पण हे महाराज माझ्या प्रेमात पडले. (अर्थात मीही...) पण लगान ते लगीन हा प्रवास फारच टफ होता. मला तर कसं निभावलं याचंच आज आश्चर्य वाटतंय. पण माझ्या धोबीघाट स्टाइलमुळं असेल... मी जी जी वाईट परिस्थिती समोर आली, तिला धोपटून, पिळून, झटकून दांडीवर वाळत घातलंय.
दहा
वर्षं होतील आता आमच्या लग्नाला... पण सगळं कसं काल-परवाच घडल्यासारखं
वाटतंय. मुळात मी आई-बाबांकडं राहत होते, तेव्हा स्वप्नातसुद्धा कधी मुंबईत
येईन आणि आमीरसारख्या सुपरस्टारबरोबर लग्न करीन, असं वाटलं नव्हतं. पण
नंतर आम्ही कलकत्त्याला शिफ्ट झालो. मी सगळं शिक्षण वगैरे तिथलंच. नंतर
आई-बाबांनी कलकत्ता सोडलं आणि मग मी मुंबईत आले. परत दिल्लीत गेले शिकायला.
नंतर लगानच्या वेळी मी आशुतोष सरांकडं एडी होते. तिथूनच हे सगळं सुरू
झालं. असो. तो आमचा सगळा इतिहास तुम्हाला गॉसिप मॅगेझिनमधून केव्हाच माहिती
झाला असेल. पण मला ना, खरंच, आमीरसारखा नवरा मिळाला याचं अजूनही कधी कधी
आश्चर्य वाटतं. तो माझ्यापेक्षा आठ-नऊ नर्षांनी मोठा आहे. स्टारडम वगैरे
बाबतीत तर फारच मोठा. पण आमच्या नात्यात त्यानं ते कधी आणलं नाही. इन
फॅक्ट, त्यामुळंच आमचं जुळलं. कारण मी तशी फटकळ आहे आणि ज्याला त्याला
त्याची जागा दाखवून द्यायला मला आवडतं. पण आमीरलाही हाच स्वभाव आवडला
असावा. लगाननंतर आमीरची पुढची फिल्म यायला चार वर्षं लागली, याचं कारण
मधल्या काळात त्याचा हा सगळा फॅमिली ड्रामा सुरू होता. शेवटी आम्ही लग्न
केलं आणि मग आमीरनं पुढच्या फिल्म करायला घेतल्या. तो फक्त एक नट नाही.
त्यानं स्वतःला खूप इव्हॉल्व्ह केलंय माणूस म्हणून. नवनव्या गोष्टी शिकायला
त्याला आवडतात. मराठी शिकायचं त्यानं मध्यंतरीच्या काळात मनावर घेतलं आणि
खरंच सुहास लिमये सरांचा क्लास लावून तो रीतसर ती भाषा शिकला. आता तो उत्तम
मराठी बोलतो. तीच गोष्ट उर्दू वाचनाची. सत्यमेव जयतेसारखा प्रयोग करायला
त्याच्यासारखी विचारसरणी असलेला माणूसच हवा. आमच्या मुलालाही आम्ही हेच
संस्कार दिले आहेत. त्याचं नाव त्याच्या खापर की खापरखापर पणजोबांवरून,
म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावरून आम्ही आझाद ठेवलं आहे. आमीर आणि
माझ्या नात्यात कधी आमचा धर्म, जात आली नाही. मुलालाही आम्ही तसंच वाढवणार
आहोत. जो काही भांडणांचा धोबीघाट आमच्यात आहे, तो तर कुठल्याही नवरा-बायकोत
असतोच. पण हल्ली आमीर बऱ्यापैकी शांत असतो.
मला
अनेक गोष्टी करायच्या असतात. लिखाण करायचं असतं. वाचन करायचं असतं. आमीर
बऱ्यापैकी वाचतो आणि मीही. मग आम्ही एकमेकांना पुस्तकं सुचवत असतो. कधी तरी
एकत्रही वाचन होतं. पण शक्यतो ते प्रसंग फार कमी. आमीर कायम त्याच्या
शेड्यूलमध्ये बिझी असतो. पण आझादसाठी तो वेळ काढतोच. आमीरचे काही खास निवडक
मित्र आहेत. त्यांच्यावर धमाल करायला त्याला आवडते. त्या वेळी त्याला
पाहायचं. अगदी जो जिता वही सिकंदरच्या काळातला आमीर पुन्हा अवतरलाय असं
वाटतं. आमीरचे सुरुवातीचे सिनेमे पाहताना मला हसूच येतं. अगदीच शामळू ध्यान
होतं हे. अगदी 'राजा हिंदुस्थानी' आणि 'गुलाम'पर्यंत त्याचा प्रवास तसा
सर्वसामान्य नटासारखाच होता. पण 'लगान'नं आमीरच्या आयुष्यात उलटापालट केली.
आणि अर्थात माझ्याही. त्यामुळं या सिनेमाला आमच्या आयुष्यात खास स्थान
आहे. 'लगान'चे ते दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. आमीर त्याच्या आयुष्यात
दुसऱ्यांदा सीरियसली प्रेमात पडला होता. त्याच्याआधी अनेक नट्यांनी
त्याच्यावर 'ममता' केली, पण त्यांच्यासोबत तो कधीच सीरियस नसायचा. असो. आता
त्यानंही वयाची पन्नाशी गाठली आहे आणि मीही चाळिशी ओलांडली आहे. त्यामुळं
आम्हा दोघांतही मुळातच असलेला एक प्रगल्भपणा, मॅच्युरिटी आता आणखी वाढली
आहे. कुठलाही फालतूपणा मला नको वाटतो. पैशांचंही आम्हाला फार कौतुक नाही.
माणूस म्हणून स्वतःला आणखी आणखी उन्नत करीत जावं, असं दोघांनाही
प्रामाणिकपणे वाटतं. धोबीघाट गरजेचा असतो तो त्यासाठी. कपड्यांसोबत कधी कधी
मनाचीही सफाई करावी लागते. ब्लॉगचं हे माध्यम मला त्यासाठी एकदम परफेक्ट
वाटतं. सगळीच धुणी सार्वजनिक नळावर धुवायची नसतात, हे मला कळतं. पण काही
गोष्टी अशा असतात, की त्यासाठी हा सार्वजनिक उपक्रमच बरा वाटतो. मला इथं
माझ्या स्वतःविषयी जास्त लिहायचं आहे. मी सुरुवातीला म्हटलं, तशी मी एक
स्वतंत्र, आझाद बाई आहे. पण आमीर हाही आता माझाच एक हिस्सा असल्यामुळं
त्याच्या वाट्याचं तेवढं सगळं यात येणारच आहे. तुम्हा लोकांना आमच्या
वैयक्तिक गोष्टींत इंटरेस्ट नसावा, असं मला वाटतं. पण इतर चार
जोडप्यांसारखं आमच्याकडं पाहा, एवढंच माझं म्हणणं आहे. आम्ही कलाकार आहोत.
आमची अभिव्यक्ती त्या कलेच्या माध्यमातून होत असते. यापलीकडं आमच्या
सेलिब्रिटी स्टेटसला काही अर्थ आहे, असं मला वाटत नाही. पण आमीरसारखा
उत्कृष्ट कलावंत तुमच्या आयुष्यात जोडीदार म्हणून असणं, ही गोष्ट तुम्हाला
नक्कीच 'स्पेशल समवन' बनवते यात शंका नाही.
चला,
आता हा ब्लॉग वाळत घालते. सॉरी, अपडेट करते. आमच्या या स्पेशल माणसाचा
ब्रेकफास्ट राहिला आहे अजून. बाईला ही कामं चुकली आहे का सांगा... बाई...
आपलं... बाय... गुड बाय...
---
(पूर्वप्रसिद्धी - जत्रा, मार्च २०१५)
No comments:
Post a Comment