30 Apr 2015

परिक्रमा आकाशवाणीची... १

दोन-अडीच वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणीवरचे निर्माते प्रदीप हलसगीकर यांनी परिक्रमा हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम सुरू केला होता. पुण्यातले आम्ही काही पत्रकार त्यासाठी लेखन करीत होतो आणि आकाशवाणीवरचे आमचे मित्र सिद्धार्थ बेंद्रे, संजय भुजबळ आदी मंडळी ते सादर करीत. आज सहज ते लिखाण सापडलं. आकाशवाणीसाठी मी प्रथमच अशा पद्धतीचं लेखन केलं होतं. मी असे चार भाग लिहिले... त्यातला हा पहिला...
-------परिक्रमा ११-१२-१२
--------------------

रसिक श्रोते हो, नमस्कार...

डिसेंबरचा दुसरा आठवडा म्हटलं, की पुण्यासह जगभरातील संगीत रसिकांना एकाच गोष्टीची आठवण होते... ती म्हणजे सवाई गंधर्व संगीत महोत्सव. ख्यातनाम गायक, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरुजींच्या - म्हणजे रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्या - स्मरणार्थ पुण्यात हा महोत्सव सुरू केला. देशभरातील अनेक नामवंत गायक-गायिकांनी, वादक कलाकारांनी, नृत्य कलाकारांनी या महोत्सवात हजेरी लावलीय. खुद्द पंडित भीमसेन जोशी यांच्या स्नेहपूर्ण आदरातिथ्यामुळं बहुतेक बड्या कलाकारांना या महोत्सवाला येणं हा फार मोठा बहुमान वाटतो. यंदा या महोत्सवाचं हीरकमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळंच आयोजकांनी यंदा हा संगीत सोहळा भव्य प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. एरवी चार दिवस चालणारा हा महोत्सव या वर्षी सहा दिवस चालणार आहे आणि तो आज सुरू होतोय. आता म्हणजे आणखी तीन-साडेतीन तासांनी रमणबागेच्या मैदानातील भव्य शामियान्यात सनईचे सूर निनादतील आणि तिथं जमलेल्या जगभरातील संगीत रसिकांसाठी आणखी एक सुरेल पर्वाचा आरंभ होईल. या महोत्सवाचे सर्वेसर्वा होते पंडितजी. मात्र, दोन वर्षांपूर्वी अण्णांचं निधन झालं आणि सर्वांनाच एक पोरकेपणाची भावना जाणवू लागली. अण्णांच्या अनुपस्थितीतही संयोजकांनी गेल्या वर्षी हा महोत्सव तेवढ्याच ताकदीनं, उत्साहानं साजरा केला आणि सवाईच्या चाहत्यांनीही त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला. गेल्या वर्षीच या महोत्सवाच्या नावात पंडितजींचं नाव समाविष्ट करण्यात आलं. आता हा महोत्सव सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव म्हणून ओळखला जातो. अर्थात पंडितजींच्या तासन् तास चाललेल्या मैफली ऐकलेल्या श्रोत्यांना त्यांची उणीव भासतेच. वर्षानुवर्षं चाललेल्या या महोत्सवामुळं काही परंपरा पुण्यात तयार झाल्या आहेत. सवाईत गायला मिळणं हा जसा प्रत्येक कलाकाराला आपला सन्मान वाटतो, तसंच सवाई गंधर्व ऐकायला जाणं हेही एका अर्थानं स्टेटस सिम्बॉलच मानलं जातं. तिथलं ते खास वातावरण अनुभवावं असंच असतं. शाली पांघरून, कानटोप्या घालून, कॉफीचे थर्मास, एवढंच नव्हे, तर उशा-चटया, रजयांसह अंथरूण-पांघरूणांचा जामानिमा घेऊन घेणारी संगीतवेडी माणसं, गायकाच्या समोरच्या जागेवर कोंडाळं करून बसणारी आणि नेमक्या जागी दाद देणारी, फर्माईशी करणारी तरुण, पण जाणकार मंडळी, मंडपाच्या सभोवती लागलेल्या स्टॉलमधून आवडत्या गायकांच्या सीडी खरेदी करणारे हौशी रसिक, मागच्या बाजूला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गरमागरम वडापाव खातानाच त्या वडापावाच्या चवीला आणि जोडीला गायकाच्या एखाद्या चांगल्या तानेला एकाच वेळी व्वा म्हणून दाद देणारे अस्सल पुणेकर रसिक प्रेक्षक... असा तो सगळा खास सवाई टच असलेला माहौल असतो. म्हणूनच तर वर्षानुवर्षं पंढरीला जाणाऱ्या भाविकांच्या निष्ठेनं सवाईचीही वारी करणारे शेकडो रसिक आहेत. आपल्या विठोबाला म्हणजेच भीमण्णांना आठवत आठवत ते यंदाही ही स्वरांची पालखी खांद्यावरून वाहत नेतील, यात शंकाच नाही...

गाणं - शिफारस - माझे माहेर पंढरी... किंवा पंडितजींचे कोणतेही...
https://www.youtube.com/watch?v=vmFqQseBtxk

मंडळी, शब्देविण संवादु साधण्याचं काम स्वर करीत असले, तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना रोजच्या दैनंदिन संवादासाठी लागतात ते शब्दच. या शब्दांतूनच बनते ती भाषा. शब्दांची ही अनिवार ओढ अनेकांना पुस्तकांकडं खेचत घेऊन जाते. पुण्यात हल्ली बाराही महिने कुठं ना कुठं पुस्तकांची प्रदर्शनं चालू असतात. या प्रदर्शनांमध्ये सहज जरी डोकावलं, तरी लक्षात येतं, की पुस्तकांना अजूनही चांगली मागणी आहे. आवडीनं वाचन करणारी भरपूर माणसं आहेत. बालगंधर्व रंगमंदिरात नुकत्याच पार पडलेल्या भाषा महोत्सवानंही शब्दांतून साधल्या जाणाऱ्या संवादाची गरज अधोरेखित केली. तिथं रंगलेल्या गोष्टीच्या स्पर्धेवरूनही ही बाब स्पष्ट होईल. असेच एक गोष्ट सांगणारे, थोर कथाकार म्हणजे जी. ए. कुलकर्णी. रसिकहो, जी.एं.चं नाव घेतलं, की आपल्यासमोर येतात त्या त्यांच्या काहीशा अनवट, वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या गूढरम्य गोष्टी. शब्दांची ताकद जाणणारा हा कथाकार होता. त्यामुळं अतिशय वेगळ्या शैलीतल्या, नादमधुर शब्दांची लय त्यांच्या कथांच्या ओळीओळींमध्ये जाणवते. या वरवर गूढरम्य वाटणाऱ्या कथांमध्ये अंतर्बाह्य निर्मळ असा माणुसकीचा एक आदिम झरा खळाळताना आपल्याला दिसतो. अशा या जी.एं.च्या नावे दिला जाणारा प्रिय जी. ए. पुरस्कार यंदा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना काल पुण्यात प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना एलकुंचवार यांनी तथाकथित आत्मचरित्रांवर टीका केली. काही लेखक घटना, ऐकीव माहिती, आठवणी लिहितात आणि त्याला आत्मचरित्र म्हणतात. स्वतःला सोलून काढणे माहितीच नसते. त्यामुळं आत्मचरित्र  लिहिणं अशक्यच आहे. अर्थात जी. ए. त्याला अपवाद आहेत. कारण त्यांचं संपूर्ण लेखन हेच त्यांचं आत्मचरित्र आहे, असं सडेतोड प्रतिपादन एलकुंचवार यांनी या वेळी केलं. प्रामाणिकपणे जगणाऱ्या लेखकालाच प्रश्न पडू शकतात. बेइमान लेखकाला प्रश्न पडणारच नाहीत. घटना आणि सत्य यातील फरक लेखक समजून घेत नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.
यंदा या पुरस्काराचं पाचवं वर्ष होतं. या वर्षापासून हा पुरस्कार थांबविण्यात येत असल्याचं जी. एं.च्या भगिनी नंदा पैठणकर यांनी जाहीर केलं. असं असलं, तरी जी. एं.च्या साहित्याविषयीचे उपक्रम यापुढंही सुरूच राहतील, अशा शब्दांत त्यांनी जी. ए. प्रेमींना दिलासाही दिलाय...

गाणं - शिफारस - ना मैं धर्मी ना ही अधर्मी (मीरा सूर कबिरा)
https://www.youtube.com/watch?v=VQpHE6xDEoA

रसिक हो, करायला गेलो एक आणि झालं भलतंच असा अनुभव आपल्याला जगण्यात हरघडी येत असतो. दर वेळी मनासारखं झालं, तर ते आयुष्य कसलं? अहो, आपल्यासारख्या सामान्यांचं एक वेळ ठीक आहे. पण शास्त्रज्ञांसारख्या बुद्धिमान माणसांच्या बाबतीतही असं घडलं तर! त्यातून वेगळं का होईना, काही तरी संशोधनच तयार होतं, बरं का! आज वृत्तपत्रात आलेली एक गमतीशीर बातमी अशीच आहे. ऑस्ट्रेलियातील शेती संशोधकांनी केलेला एक प्रयोग फसला आणि त्यातून चक्क नारळाच्या चवीचं अननस तयार झालं. दहा वर्षांहून अधिक काळ संशोधक पीक उत्पादनातील बदलाबाबत एक संशोधन करीत होते. त्यातून झालेली ही शब्दशः फलनिष्पत्ती... या नव्या फळाचं नाव पायना कोलाडा पाइनॅपल असं नाव देण्यात आलंय. क्वीन्सलँडच्या डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरचे ज्येष्ठ संशोधक गार्थ सानेस्की यांनी सांगितलं, की ज्या वेळी आम्ही अननसाच्या पैदाशीचा कार्यक्रम हाती घेतला, तेव्हा ते नारळाच्या चवीचं होईल, असा विचार आमच्या स्वप्नातही आला नव्हता. येथील मागणीनुसार अधिक गोड आणि नवा स्वाद असलेली जात विकसित करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आमचा प्रयोग फसला असला, तरी त्यातून तयार झालेलं नारळाच्या चवीचं अननस भन्नाटच आहे. त्याची चव जगातील अन्य अननसांपेक्षा अधिक गोड असून, आम्लाची तीव्रताही कमी आहे. त्याचा ज्यूसही अर्थात अफलातून स्वादाचा आहे...
तेव्हा रसिक हो, आपण एखादं काम एका वेगळ्या हेतूनं सुरू करतो आणि त्याचा शेवट भलताच होतो, असं कधीकधी होऊ शकतं. पण त्यासाठी सतत काही तरी क्रिएटिव्ह करत राहणं, नवनिर्मितीचा ध्यास कधीही न सोडणं अतिशय आवश्यक आहे, नाही का!

गाणं - शिफारस - जाते थे जापान पहुंच गए चीन समझ गए ना...
https://www.youtube.com/watch?v=Lv_WZGl0TkE

श्रोते हो, करायला गेले एक आणि झालं भलतंच असा अनुभव दर वेळी सुखद असतोच असं नाही. आता आपल्या क्रिकेट संघाचंच पाहा ना... फिरकीच्या जाळ्यात प्रतिस्पर्धी संघाला अडकवायला गेले आणि स्वतःच त्यात सापडले. मायभूमीत इंग्लंडविरुद्ध जवळपास तीस वर्षांनी मालिका गमावण्याची नामुष्की येऊन ठेपलेल्या या संघावर आता चहूबाजूंनी टीकेचा वर्षाव होतोय. १९८३ चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील दोन प्रमुख खेळाडू मोहिंदर अमरनाथ आणि दिलीप वेंगसरकर यांनीही या संघावर पुण्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात जोरदार टीका केली. कर्णधाराला काढून टाकावं इथपासून ते कसोटी आणि वन-डेसाठी वेगवेगळे कर्णधार असावेत, उपकर्णधारपद असूच नये, सचिननं निवृत्तीबाबत लवकर काय ते ठरवावं आदी वेगवेगळ्या सूचनांचा भडीमार त्यांनी केला. विजेतेपदाला खूप धनी असतात आणि पराभवाला फक्त एक धोनीच असतो, हेच खरं. अवघ्या पावणेदोन वर्षांपूर्वी वर्ल्ड कप उंचावणाऱ्या धोनीच्या नशिबाचे फासे उलटे पडताहेत, असं स्पष्ट दिसतंय. आता नागपूर कसोटी जिंकून किमान मालिका बरोबरीत सोडवण्याची एकमेव संधी आपल्या संघाला उपलब्ध आहे. ती संधी ते साधतील आणि विजयी होतील, अशी आशा करायला काय हरकत आहे? आपल्या कसोटी संघाच्या मालिकेची परिक्रमा विजयानं संपावी, अशी त्यांना शुभेच्छा देऊ या आणि आपली आजची परिक्रमाही इथंच थांबवू या... नमस्कार...

गाणं - तुमरे बिन हमरा कोनो नाही... (लगान)
https://www.youtube.com/watch?v=8oWElXB3XQU

---------

21 Apr 2015

पंजाब डायरी - भाग ४

संमेलनाचं सूप, वाघा सीमा अन् ‘घरवापसी’...
------------------------------------------------------
सांस्कृतिक कार्यक्रमांतील गाण्यांच्या ठेक्यावरच रात्री अमृतसरला पोचलो आणि लगेच निद्राधीन झालो. संध्याकाळी फय्याज यांनी ‘लागी कलेजवाँ कटार’चा लावलेला सूर कानात रेंगाळत होता. रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार होते. तेजासिंगजींची धावपळ सुरू होतीच. पण बस तरीही साडेअकराच्या आसपास घुमानला पोचली. ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांची मुलाखत सुरू होती मुख्य मंडपात. मंडपात शिरताना संजय नहार भेटले. धावपळीत होते. मंडपात बऱ्यापैकी गर्दी होती. काल पर्यटनाला गेलेली मंडळी परतली होती. गणेश देवींची मुलाखत चांगली झाली. म्हणजे ते चांगलं बोलत होते. पण मुलाखतकार (सुषमा करोगल आणि अरुण जाखडे) त्यांना फार लांबलचक प्रश्न विचारत होते. त्यामुळं वेळ जात होता, असं वाटलं. हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही जेवलो आणि लगेच मुख्य मंडपात परत आलो. त्या वेळी निमंत्रितांचं कविसंमेलन सुरू झालं होतं. याचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी करणार, असं पत्रिकेत छापलं होतं. पण ती आलीच नाही. अशोक नायगावकरांनीच सूत्रं सांभाळली. हे कविसंमेलनही यथातथाच झालं. नायगावकरांनीही जुनीच कविता ऐकवली. ते काही तरी मराठी आणि पंजाबी माणसं भेटल्यावर काय धमाल उडते, यावर छान कविता ऐकवतील, असं वाटलं होतं. पण साठ तासांच्या प्रवासानं त्यांच्यातला कवी ‘वीक’ झाला असावा. असो. संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संमेलनाची सांगता व्हायची होती. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादलही असणार होते. आम्ही तिथंच थांबलो मग मुख्य मंडपात. मग एकेक जण करून मीडिया सेंटरमध्ये गेलो. कारण मोबाइलचं चार्जिंग ढपायचं. सुनीतकडं पॉवर बँक होती. पण त्यावर किती वेळ (आणि किती जण) चार्ज करणार? मीडिया सेंटरमध्येही पॉवर पॉइंट सगळे कुणी ना कुणी ताब्यात घेतलेले असायचे. मग पीसीला किंवा लॅपटॉपला मोबाइल लावून थोडा थोडा चार्ज करायचा. मला यामुळंच बरेच फोटो काढता आले नाहीत किंवा रेकॉर्डिंगही करता आलं नाही. अर्थात तेलकर असल्यामुळं त्यांच्याकडून ते फोटो घेता येणार आहेत, तो भाग वेगळा. आम्ही मीडिया सेंटरमध्ये असतानाच मुख्यमंत्री आले. ते आधी पत्रकार परिषद घेणार, असं कळलं. पण तिथं फारच गर्दी होती. आणि मला चार्जिंगला लावलेला मोबाइल सोडून जाताही येत नव्हतं. तेलकरही मीडिया सेंटरमध्येच होते. शिवाय मुख्य मंडपात गर्दी वाढत होती. आमच्यापैकी एक जण जागा धरून बसायचा आणि नंतर पेंढारकरला आमच्या दोन सीट राखून ठेवण्यासाठी बराच किल्ला लढवावा लागला. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत इंदू मिलच्या जागेच्या ताब्याबाबत काही घोषणा केली, एवढं कळलं. नंतर आम्ही धावतपळत मंडपात आमच्या जागेवर आलो. समारोपाचा समारंभ राजकीय मंडळींच्या उपस्थितीत एकदाचा सुरू झाला. ठरावाचं वाचन झालं. विशेष म्हणजे यात संयुक्त महाराष्ट्राचा ठरावच नव्हता. पूर्वी हा ठराव अगदी न चुकता असायचा. आता केवळ उपचार म्हणूनसुद्धा हा ठराव वाचला गेला नाही. बाकी ठराव नेहमीचेच होते. घुमानमध्ये हे करावं, ते करावं असेही ठराव संयोजकांनी बरेच केले होते. या वेळी ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ लेखक प्रा. रहमान राही उपस्थित होते. त्यांचं भाषण झालं. मात्र, त्यांनी उर्दूतूनच सुरुवात केली. अस्खलित उर्दूतून ते बोलत होते. संजय नहारांचं त्यांनी कौतुक केलं. प्रा. राही साहेब बरेच थकलेही होते. पण त्यांनीही डॉ. मोरेंसारखं स्थळ-काळाचं भान न राखता, दीर्घ भाषण ठोकायला सुरुवात केली. तेव्हाही लोक कंटाळले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. त्यांनी सुरुवात पंजाबीतूनच केली. नेहमीप्रमाणं जोरदार भाषण ठोकलं. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादलही दोन शब्द मराठी बोलले. आमरस-पुरी आवडल्याचं त्यांनी सांगितलं. मराठी लोक आणखी आठवडाभर इथं राहिले, तर पंजाबी नागरिक पंजाबी खाणं विसरून जातील, असं ते म्हणाले. ही जरा जादाच स्तुती होती. पण भारी वाटलं. हा समारंभ संपल्यानंतर सगळ्यांची बातम्या देण्याची पुन्हा झुंबड उडाली. आम्ही मंडपापाशी जरा रेंगाळलो. आता एकदम सगळे कार्यक्रम संपल्याची जाणीव झाल्यानं काहीसं रितं रितं वाटलं. आम्ही जेवलो आणि अमृतसरच्या बसमध्ये येऊन बसलो. ही बस नेहमीपेक्षा वेगळी असणार होती. नेहमीची बस विशेष रेल्वेतील प्रवासी घेऊन बियास आणि उमरतांडा रेल्वे स्टेशनांवर जाणार होती.
 आम्ही तेजासिंगजींचा निरोप घेतला. आमची बस निघाली. अमृतसरला आणखी एखादा दिवस राहणारे आम्ही काही पत्रकार त्यात होतो. ही बस नेहमीच्या रूटनं गेली नाही. अन्य काही हॉटेलांमध्ये असणाऱ्या बसमधील पत्रकारांना सोडत ही बस चालली होती. आमचं हॉटेल सर्वांत शेवटी होतं. अमृतसर येताच बायपाससारख्या एका मोठ्या रोडनं ही बस शहरात निघाली. हा भाग आम्ही पूर्वी पाहिला नव्हता. हा भाग बराच चकाचक होता. अनेक रिसॉर्ट, मोठमोठी हॉटेलं, मॉल, बागा त्या रस्त्यावर होत्या. एखाद्या आधुनिक शहरासारखा हा भाग दिसत होता. अमृतसर फारच गलिच्छ आणि जुनाट शहर आहे, हे आमचं सुरुवातीचं मत काहीसं बदलायला या बसफेरीचा उपयोग झाला. सर्वांना सोडून शेवटी आमची बस आमच्या हॉटेलवर आली. सर्वांचा निरोप घेतला आणि रूमवर येऊन झोपलोच. दमणूक भरपूर झाली होती. शिवाय उद्या लवकर उठायची घाई नव्हती. त्यामुळं झोप तर चांगली झाली.

'वाघा'च्या गुहेत...
---------------------
 सकाळी आठ-साडेआठला उठलो. आवरलं. ब्रेकफास्ट झाला. आज आम्हाला वाघा बॉर्डरला जायचं होतं. त्याआधी दिवसा पुन्हा एकदा सुवर्णमंदिर पाह्यचं होतं. मग पुन्हा तिकडं गेलो. तिथंच शॉपिंग वगैरे झालं. त्यापूर्वीच वाघा बॉर्डरला जाण्यासाठी एक टमटमवजा रिक्षा बुक केली. खरेदी करण्यात प्रत्येकाचा तासभर तरी गेला. पतियाळा ड्रेसेस, खास तिकडचे दुपट्टे, फुलकारी ड्रेस, टॉप, अमृतसरी जुती, सुवर्णमंदिरात मिळणारी हातात घालायची कडी आदींची खरेदी झाली.
मग एका ठिकाणी पंजाबी लस्सी प्यायलो. मला ती पोटभर झाली. त्यामुळं दुपारी कुणीच जेवलो असं नाही. शिवाय खायचे पदार्थ सोबत होतेच. अखेर एक वाजता आमचा रिक्षावाला बोलवायला आला. एका विशिष्ट ठिकाणी उभं राह्यला त्यानं सांगितलं होतं. आमच्याखेरीज आणखी तीन मुलं त्यानं घेतली होती. रिक्षा जुन्या अमृतसरमधल्या बोळकांडांमधून बाहेर पडून एकदाची महामार्गाला लागली. मला वाटलं होतं, की वाघा बॉर्डरपर्यंतचं अंतर २०-२२ किलोमीटर आहे. प्रत्यक्षात ते थोडं जास्त, म्हणजे २९ किलोमीटर निघालं. एवढं अंतर टमटम रिक्षानं जाण्याचा निर्णय चुकला तर नाही ना, असं वाटून गेलं. त्यात थोडं अंतर गेल्यावर रिक्षावाला डिझेल भरायला थांबला. समोर एक मोठ्ठी हेरिटेज टाइप तपकिरी इमारत दिसत होती. हे अमृतसरचं प्रसिद्ध खालसा कॉलेज. रिक्षा थांबल्याचा फायदा घेऊन मामूंनी त्याचे भरपूर फोटो काढले. मीही काढले. पुढं गुरू नानक विद्यापीठाचं प्रवेशद्वारही दिसलं. रिक्षा शहराबाहेर पडल्यावर चांगला चौपदरी महामार्ग लागला. आम्ही आता लाहोरच्या दिशेनं निघालो होतो. मनात एक वेगळंच फीलिंग यायला लागलं. फाळणीच्या दिवसांविषयी कुठं कुठं वाचलेलं, ते सगळं आठवायला लागलं. पंजाबनं काय सोसलं त्या काळात! एखाद्या शरीराचे दोन भाग करावेत, तसं एका रात्रीतून रॅडक्लिफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं नकाशावर फाळणीची रेघ ओढली. पंजाबच्या हृदयावर सुराच भोसकला. कालपर्यंत एक अखंड असलेलं शेत आज दोन देशांत विभागलं गेलं. तीच जमीन, तोच गहू, तेच पाणी... पण मध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषा उभी राहिली. आपल्याला फाळणीची अशी थेट धग बसली नाही. उलट महाराष्ट्राच्या आजूबाजूला असलेले गोवा, दीव-दमण वगैरे भाग तर नंतर भारतातच समाविष्ट झाले. मराठवाडाही हैदराबाद संस्थानातून मुंबई राज्यात आला. आपलं काही तरी गमावण्याचं दुःख पंजाब आणि बंगालनं जसं सोसलं, ते कुणीही नाही. मनात हे विचार घोळत असतानाच वाघा बॉर्डर जवळ यायला लागली. अट्टारी हे आपल्या बाजूचं शेवटचं रेल्वे स्टेशन. आपल्या बाजूनं सर्वत्र अधिकृतपणे अट्टारी बॉर्डर असाच उल्लेख पुढं दिसला. तेव्हा लक्षात आलं, की वाघा हे गाव आता मुळात आपल्याकडं नाहीच. ते आंतरराष्ट्रीय सीमेपासून पाकिस्तानात एक किलोमीटरवर असलेलं गाव आहे. अट्टारीच्या एका जहागीरदाराकडं हा सगळा भाग होता. वाघा हे गावही त्याचंच होतं. ती सगळी गोष्ट पुढं आम्ही जो ध्वज उतरविण्याचा सोहळा पाहिला, त्या वेळी निवेदकानं सांगितली. तेव्हा आपण खरं तर या सीमेला अट्टारी सीमा किंवा अट्टारी बॉर्डर म्हणायला पाहिजे. तेवढ्यात सीमारेषा आलीच. अर्थात एक-दीड किलोमीटर अलीकडंच वाहनांना पार्किंगची व्यवस्था होती. पुढं पायीच जावं लागत होतं. आमचं सामान एका ठिकाणी ठेवून आम्ही पायी निघालो.
 समोरच लाहोर २३ कि. मी. असं दाखवणारी मोठी कमान होती. सीमा सुरक्षा दलाचे जवान ठिकठिकाणी तैनात होते. पर्यटकांची स्त्री आणि पुरुष अशा दोन रांगा त्यांनी केल्या. दोन ठिकाणी चेकपोस्ट होते. मोबाइल, पाण्याची बाटली सोडून बाकी मोठी बॅग वगैरे काही आत नेता येत नाही. बाहेर लॉकर असतात. त्या लोकांकडं प्रत्येक डागाला ५० रुपये देऊन आपल्या बॅगा, सॅक आदी तिथंच ठेवाव्या लागतात. तिसरी चेक पोस्ट ओलांडली आणि समोरच थेट भारत-पाकिस्तान सीमा दिसू लागली. अलीकडं आपलं स्वर्णजयंती प्रवेशद्वार आणि त्यानंतर थोड्याच अंतरावर पाकिस्तानचं तसंच प्रवेशद्वार. आपल्याकडं महात्मा गांधी, तर तिकडं बॅ. जीनांचं चित्र मधोमध लावलेलं. हे दृश्य अनेकदा पूर्वी बातम्यांमध्ये, माहितीपटांत, टीव्हीवर पाहिलं होतं. पण प्रत्यक्षात तिथं जाण्याचं थ्रिल काही औरच होतं. रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी दोन्ही बाजूंना स्टेडियमसारख्या पायऱ्या केल्या आहेत. तिथं चांगली जागा पटकावण्यासाठी तिसऱ्या चेकपोस्टनंतर लोक पळतच सुटले. आपल्या लोकांना कुठंही न्या, शिस्त म्हणून नसतेच. तरीही इथं आजूबाजूला बंदूकधारी जवान वावरत होते. पण इथं कुणालाच त्यांची काही धास्ती वाटायचं कारण नव्हतं. लोक आपले सैरावैरा धावत होते. आम्हीही पळालोच मग. तरीही आम्ही आत जाईपर्यंत पुढच्या पाच-सहा रांगा फुल्ल झाल्या होत्या आणि आम्हाला साधारण त्या स्टेडियमच्या मधोमध आणि थोडं पश्चिमेला म्हणजे सीमेच्या बाजूला बसायला मिळालं. तेव्हा तीन-सव्वातीन झाले होते आणि रिट्रीट सोहळा साडेपाच वाजता सुरू होणार होता. तोपर्यंत ढगाळ असलेलं वातावरण एकदम बदललं आणि सूर्य ढगांबाहेर आला. आता तिथं चांगलंच ऊन जाणवायला लागलं. आम्ही सकाळी लस्सीनंतर काहीही खाल्लं नव्हतं. तेव्हा भुकेची जाणीव प्रकर्षानं झाली. मग मी धडपडत बाहेर गेलो आणि तिथं एका कॅफेटेरियात मिळाल्या त्या तीन आलू टिक्क्या आणि केक घेऊन आलो. ते खाल्ल्यावर जरा बरं वाटलं. मी परत येईपर्यंत गर्दी भलतीच वाढली होती आणि मला जागेवर जाईपर्यंत मोठीच कसरत करावी लागली. तरीही त्या दिवशी सोमवार होता आणि रोजच्या मानानं ही गर्दी काहीच नाही, असं आमच्या रिक्षावाल्यानं नंतर सांगितलं. तरीही तिथं आठ-दहा हजार लोक असावेत. मी पलीकडं पाकिस्तानच्या बाजूला उत्सुकतेनं पाहत होतो.
तिथलं स्टेडियम मोकळंच होतं. समोरच्या बाजूला दोन-तीन बायका बसलेल्या दिसल्या फक्त. नंतर मग हळूहळू तिकडंही गर्दी झाली. तिकडं पुरुषांसाठी वेगळा स्टँड होता आणि समोर महिलांसाठी वेगळा. हे आमच्या नंतर लक्षात आलं. हळूहळू वातावरणात देशभक्तीचा जोर अन् ज्वर चढायला लागला. समोर स्पीकरवर मोठमोठ्यांदा देशभक्तिपर गाणी वाजायला सुरुवात झाली. मी जरा अलिप्तपणे आधी पाहत होतो. पण नंतर मीही गर्दीचा भाग होऊन घोषणा वगैरे दिल्याच. समोर रस्त्यावर काही मुलींची ओळ करण्यात आली. नंतर बीएसएफचा एक पांढरे कपडे घातलेला अधिकारी हातात माइक घेऊन आला. हा सर्व सोहळ्याचा सूत्रसंचालक होता. त्यानं आपले चार राष्ट्रध्वज आणले आणि त्या ओळीत उभ्या राहिलेल्या मुलींच्या हाती दिले. त्या मुलींनी समोर गेटपर्यंत तो झेंडा हाती घेऊन धावायचं. ही कल्पना मस्त होती आणि अगदी म्हाताऱ्या आजी, काकू यांना तिरंगा हाती घेऊन धावताना पाहताना मजा येत होती. तो सूत्रसंचालक लोकांना मोठमोठ्या घोषणा द्यायला लावत होता. फक्त भारतमाता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद आणि वंदे मातरम् या तीनच घोषणा द्यायची परवानगी होती. थोडक्यात, पलीकडच्यांना डिवचणाऱ्या घोषणा देऊ नका, असं सांगण्यात आलं. तिथलं ते वातावरण आणि जमलेले आपले उन्मादी लोक पाहून मला तर एकूण हा सगळा देशभक्तिपर पर्यटनाचा (पॅट्रिऑटिक टुरिझम) प्रकार वाटला. नंतर नंतर मी गंमत म्हणून पाहू लागलो. त्या जवानांचा तो आवेश, ते बूट थाडथाड आपटणं, वेगवेगळ्या आक्रमक पोझेस घेऊन सीमेपलीकडं आपला रुबाब दाखवणं हे सगळं झक्कासच होतं. पण हे सगळं ठरवून, घडवून आणलेलं नाट्य आहे हे माहिती असल्यानं त्यात नंतर गंमत वाटेनाशी झाली. एकूण हा प्रकार एकदाच पाहण्यासारखा आहे, यात शंका नाही. सीमेवर सदैव तैनात असलेल्या आपल्या जवानांना नागरिकांच्या अशा उपस्थितीने आणि घोषणाबाजीने प्रेरणा वगैरे मिळत असेल, तर ठीकच आहे. आम्ही आपले फोटो काढले आणि निघालो.

परत येताना समोर 'गणतन्त्र भारत में आप का स्वागत है' असा फलक दिसला. तो फलक पाहून खूप भारी वाटलं. एकदमच आपल्या देशाविषयीचं प्रेम माझ्या मनात दाटून आलं. (मागं एकदा कन्याकुमारीला जाताना एका चढावर लँड एंड्स अशी पाटी वाचून अंगावर असाच काटा आला होता. नंतर एकदम समोर त्रिसिंधूदर्शन झालं होतं, तेही थरारक!) आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडून असा फलक अन्यत्र कुठं पाहिला नव्हता. मग आम्ही तिथंही फोटो वगैरे काढून घेतले. बाकी आपले सर्व बेशिस्त लोक पाण्याच्या बाटल्या, खाण्याच्या पदार्थांच्या पिशव्या तिथंच टाकून निघाले होते बावळटसारखे - देशप्रेमाच्या घोषणा देत! मी जमेल तेवढा कचरा उचलला आणि बाहेर असलेल्या कचरापेटीत टाकला. बाकी कुणाला तेवढा उत्साहही दिसला नाही. बीएसएफनं खरं तर लोकांना कचरा उचलल्याशिवाय बाहेर जाऊ द्यायलाच नको. आम्ही रस्ता ओलांडून पलीकडं आंतरराष्ट्रीय सीमारेषा पाह्यला गेलो. लोक हेच पुटपुटत होते, की एकच जमीन, एकच भाषा, एकच वेशभूषा, एकच शेती अन् आता उगाच हे दोन देश करून ठेवले आहेत.
 आम्ही हळूहळू तिथून निघालो. खरं तर अजून तिथं काही वेळ घालवावा असं वाटत होतं. कारण पुन्हा पुन्हा अशा ठिकाणी यायला जमेलच असं नाही. पण 'वाट माझी बघतोय रिक्षावाला' हे माहिती असल्यानं निघालो. बाहेर येऊन पुन्हा आम्ही भेळेसारखं काही तरी खाल्लं आणि परतीची वाट धरली. तासाभरात अमृतसरच्या कलकलाटात पोचलो. संध्याकाळी तर रणभेदी वाजल्यासारखे रस्त्यांवर तुफान हॉर्न केकाटत होते. माझं तर डोकंच उठलं. हॉटेलात पोचल्यावर जरा फ्रेश झालो आणि मी अन् अभिजित पुन्हा बाहेर पडलो. सुवर्णमंदिराच्या परिसरात जाऊन पुन्हा राहिलेली काही खरेदी वगैरे केली आणि परत आलो. रात्री मी अन् तेलकरांनी 'साग्रसंगीत संपूर्ण रंगीत' पार्टी करायचं ठरवलं होतं. आमच्या हॉटेल मॅनेजरनं वरच्या मजल्यावरच सर्व व्यवस्था करून दिली आणि आम्हास परमसुख प्राप्त जाहले. मॅनेजरनं खास स्थानिक स्वाद मागवला होता. बाकीही सर्व सरबराई व्यवस्थित होती. नंतर अभ्याही जेवणासाठी आम्हाला जॉइन झाला. गप्पा मारता मारता बारा केव्हा वाजले, तेही कळलं नाही. मजा आली. अखेर सकाळी लवकर उठून ट्रेन गाठायची असल्यानं आम्ही आवरतं घेतलं आणि तरंगतच खाली येऊन रूमवर येऊन, बेडवर झोकून दिलं.
सकाळी उठून भराभरा आवरलं अन् चेकआउट केलं. चहाही घेतला नाही. हलका पाऊस पडत होता. रिक्षा करून स्टेशनावर आलो. मग तिथंच चहा घेतला अन् सँडविच खाल्लं. तोवर आमची पश्चिम एक्स्प्रेस येऊन उभी राहिलीच होती. बरोबर आठ वाजून दहा मिनिटांनी ट्रेन सुटली अन् आमची टूरही संपली...
बियास स्टेशनवर एक वृद्ध दाम्पत्य आमच्या कंपार्टमेंटमध्ये आलं. ते शेवटपर्यंत म्हणजे अंधेरीला उतरेपर्यंत सोबत होते. जातानाचा प्रवास नेहमीच कंटाळवाणा होतो. तरी आम्ही आमच्या ट्रिपचे सुरुवातीपासूनचे फोटो, व्हिडिओ पाहत बराच टाइमपास केला. दुसऱ्या दिवशी अडीचला गाडी बरोबर बांद्रा टर्मिनसला पोचली. मग आम्ही टॅक्सी करून दादरला आलो. प्रगती एक्स्प्रेसचं बुकिंग होतंच. दादरला समोर उडप्याकडं खाल्लं. कैलाश मंदिरमध्ये जाऊन पंजाबी लस्सी हाणली. 'प्रगती' वेळेत आली. हाही प्रवास उत्तम झाला. शिवाजीनगरला उतरलो. निगडीपासूनचं रेल्वेतून दिसणारं पुणं पाहून भरून आलं. देशातली अनेक शहरं गाडीतून पाहिली होती. पण पुण्याएवढं स्वच्छ शहर (रेल्वेतून पाहताना) दुसरं दिसलं नाही. शिवाजीनगरला हर्षदा कार घेऊन आम्हाला न्यायला आली होती. तिच्यासोबत निमिषही आला होता. तेलकर स्टेशनला जाणार होते. मग मी अन् अभिजित त्यांच्या कारमधून त्यांच्या घरी गेलो. तिथं धनश्री अन् नील आलेच होते मला न्यायला. त्या दोघांना पाहिलं अन् प्रवासाचा सगळा शीणच गेला... पंधरा मिनिटांत घरी पोचलो. आठ दिवसांची ट्रिप संपली... पंजाबचे बल्ले बल्ले लाइफ संपले... पूर्वीचे होल्ले होल्ले आयुष्य सुरू जाहले...

                                                                                                                           (समाप्त)
----------------------------------------------
 ---------------------------------------

18 Apr 2015

पंजाब डायरी - भाग ३

नाचू घुमानचे रंगी...
-----------------------आमच्या बसनं उशिराच, म्हणजे दुपारी एक-दीडच्या आसपास अमृतसर सोडलं आणि दुपारी दोन वाजता निघणारी ग्रंथदिंडी मिळणार नाही, याची चिंता वाटू लागली. आमच्यासोबत तेजासिंग हे स्थानिक माहिती अधिकारी होते. आमच्या बसची जबाबदारी त्यांच्याकडं होती. अखेर तेजासिंग यांनी सुरुवातीला गाइड माहिती सांगतो, तशी आमच्या व्यवस्थेची माहिती सांगितली अन् बस एकदाची निघाली. अमृतसर शहरातून बाहेर पडायलाच अर्धा तास लागला. त्यानंतर मात्र चांगला चौपदरी महामार्ग लागला. हा रस्ता वाघा बॉर्डरकडं जात होता. आठ-दहा किलोमीटर अंतरावर हा महामार्ग सोडून आमची बस उजवीकडं वळली. मेहता चौक नावाच्या गावाचा फलक दिसत होता. घुमानचं नाव अर्थातच कुठंही नव्हतं. आता खरा ग्रामीण पंजाब दिसू लागला. सर्वदूर पसरलेली गव्हाची शेतं, म्हशींचे तांडे, पाण्याची तळी, शेतातली धाब्याची घरं असं सगळं दृश्य लागलं. गहू पिकायला आल्यामुळं शेती हिरवी न दिसता पिवळसर दिसत होती. अधूनमधून मोहरीची (याने सरसों की) शेतीही दिसत होती. पण त्याला ती पिवळी फुलं आत्ता नव्हती. हा सीझन नव्हता म्हणे. काही अंतर गेल्यावर डाव्या बाजूला संत राम दास नावाचं मोठं हॉस्पिटल लागलं.
नंतर दुतर्फा उंचच उंच झाडं (ही कसली झाडं होती, ते कळलं नाही.) आणि मधोमध दुपदरी छोटा रस्ता असं मस्त दृश्य दिसू लागलं. रस्ता नव्यानं डांबरी केलेला दिसत होता. काही ठिकाणी डांबराचे पॅचेस मारून खड्डे बुजवले होते. रस्त्यावर कर्कश हॉर्न वाजवण्याची स्पर्धा इथंही चालू होती. थोड्याच वेळात एक मोठं गाव लागलं. आम्हाला वाटलं, की घुमानच आलं. पंजाबमध्ये सर्वत्र आवर्जून गुरुमुखीत पाट्या होत्या. त्यामुळं गावाचं नाव कळत नव्हतं. अखेर हे मेहता नावाचं गाव आहे, हे कळलं. हाच भिंद्रनवालेचा प्रमुख गड होता, ही माहिती नंतर मिळाली. आता ते आपल्याकडच्या कुठल्याही तालुक्याच्या गावासारखं (इंदापूर किंवा शिरूर) मोठं गाव दिसत होतं. हे गाव ओलांडलं आणि आठ-दहा किलोमीटरवर अखेर घुमान आलं. गावात सगळीकडं मोठमोठे फलक होते. संमेलनाची माहिती देणारे मराठीतील मोठे फलक पाहून धन्य वाटलं. आमची गाडी गाव ओलांडून पलीकडं गेली आणि डाव्या बाजूला एका मोठ्या मैदानात काही बस उभ्या होत्या, तिथं आली. आम्हाला वाटलं, इथंच पार्किंग असेल. पण तसं नव्हतं. कारण संमेलनाचा मंडप कुठं दिसत नव्हता. मग आमच्या सरदारजी ड्रायव्हरनं गाडी वळवून पुन्हा गाव ओलांडून आम्ही जिकडून आलो होतो, त्या रोडला हाणली. तिथं उजवीकडं वळून एका छोट्या रस्त्यानं गाडी आत घेतली. बरंच आत गेल्यावर उजव्या बाजूला एक मोठा मंडप दिसू लागला. पण तो मंडप आणि आमचा रस्ता यात सर्वत्र शेतं होती. पुढं मग पुन्हा उजवीकडं जाणारा एक छोटा रस्ता लागला. तिथं काही पोलिस उभे होते. त्या चार-पाच जणांनी ड्रायव्हरशी चर्चा सुरू केली. बहुदा मंडपाच्या सर्वांत जवळ गाडी कशी नेता येईल, यावर ती चर्चा सुरू असावी. हा हेतू चांगला असला, तरी त्यांचं एकमत होईपर्यंत बराच वेळ चर्चा चालली. तोपर्यंत वास्तविक आम्ही चालत संमेलनस्थळी पोचलो असतो. अखेर बरंच भवती न भवती होऊन गाडी एकदाची त्याच रस्त्यानं आत वळली. थोडंच अंतर जाऊन ती थांबली. आम्ही उतरून मग चालत मंडपाकडं गेलो. ग्रंथदिंडी तोपर्यंत निघाली होती, असं आम्हाला कळलं. ती नक्की त्या गावात कुठं होती, हे आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. तोपर्यंत अडीच-पावणेतीन झाले होते आणि तेजासिंगजींना आमच्या जेवणाची चिंता लागली होती. अखेर आम्हाला मंडपात ढकलून खास मीडियासाठी असलेल्या भोजन कक्षात ते आले. तोपर्यंत आमच्याकडं कुठलेही पास वगैरे नव्हते. सगळीकडं पोलिस बंदोबस्त होता आणि प्रत्येक ठिकाणी पोलिस (रास्तपणे) अडवत होते. त्यामुळं पासची व्यवस्था तातडीनं करायला पाहिजे होती. अखेर संध्याकाळी आम्हा तिघांना एकदाचे ते पास मिळाले आणि पोलिसांचं आमच्याकडं थोडं संशयानं पाहणं थांबलं. जेवण चांगलं होतं.
मराठी व पंजाबी दोन्ही पद्धतीच्या जेवणाची व्यवस्था होती आणि ती उत्तम होती. अनेक पंजाबी लोकही मराठी जेवणाचा आस्वाद घेताना दिसत होते. आमचं जेवण होईपर्यंत साडेतीन झाले आणि चारला उद्-घाटनाचा कार्यक्रम होता. मग आम्ही लगेच मंडपातच जाऊन बसलो. मंडप उत्कृष्ट होता आणि लाल-बाल-पाल असं नाव दिलेलं व्यासपीठही भव्य होतं. मागच्या बाजूला मराठी व पंजाबीतून ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, घुमान (पंजाब) २०१५ असं लिहिलं होतं. मराठी ग्रंथांचे कटआउट उजव्या बाजूला केले होते. मंडपातील खुर्च्यांची व्यवस्थाही चांगली होती. महत्त्वाचं म्हणजे ढगाळ हवामान असल्यामुळं आल्हाददायक वाटत होतं. स्टेजवरची तयारी सुरू असतानाच मराठवाड्याकडचे एक टोपीवाले दादा अनाहूतपणे स्टेजवर चढले आणि माइक ताब्यात घेऊन, आपल्या ग्रुपच्या लोकांनी इकडं जमावं, तमकं करावं असल्या घोषणा करायला लागले. एकूण अनागोंदीचा हा उत्तम नमुना होता. मला तर त्या आगाऊ चुंबळ्याचा रागच आला. तेवढ्यात माधवीताई वैद्य तातडीनं व्यासपीठावर आल्या आणि अशा अनाहूत घोषणा महामंडळाच्या व्यासपीठावरून करू नयेत, असं बजावून गेल्या.
चारचा कार्यक्रम थोडा आधीच सुरू झाला. सूत्रसंचालन करणारे एक मराठी होते, तर एका कौर बाईंना पंजाबीतून निवेदन करायचं होतं. पण मराठी निवेदक बाबाच्या धडाक्यापुढं तिचं फार काही चालेना. यानं चार वाक्यं म्हटली, तर ती एकाच वाक्यात काय ते पंजाबीत सार सांगून गुंडाळायची. नंतर नंतर तर तिनं हेही सांगण्याचा नाद सोडून दिला. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, शरदचंद्रजी पवारसाहेब, नितीनभाऊ गडकरी आदी दिग्गज मंडळी व्यासपीठावर होती. त्यामुळं पंजाब पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संपूर्ण व्यासपीठाला वेढाच घातला होता. प्रेक्षकांतही ही मंडळी भरपूर संख्येनं (ड्यूटी लावल्यानं) हजर होती. पंजाबी पत्रकारही होते. स्टेजवर मराठी सुरू झालं, की ते आम्हाला त्याचा अर्थ विचारायचे. अर्थात प्रमुख नेत्यांनी हिंदीतून भाषणं केल्यानं या पत्रकारांचे संभाव्य हाल वाचले. माधवीताई नथ वगैरे घालून नटून आल्या होत्या. नंतर त्यांनी तलवार वगैरेही उपसून दाखविली, तेव्हा साहित्यिक झाशीची राणीच घुमानमध्ये अवतरली, असा भास मला झाला. बादल मात्र छान बोलले. आब राखून बोलले. त्यांच्या वयाचा मान राखून स्टेजवरची मंडळीही अत्यंत आदरानं त्यांच्यासमोर पेश होत होती. सर्वांत शेवटी अध्यक्षीय भाषण झालं. डॉ. मोरे भाषणाला उभे राहण्याच्या आधी स्टेजच्या मागं मोठ्यांदा ढोल-ताशे सुरू झाले. अखेर जाहीर निवेदन करून ते बंद करायला लावावे लागले. मोरे यांचं भाषण चांगलं होतं. मात्र, त्यांना वेळ-काळाचं तारतम्य उरलं नाही. त्यामुळं वैतागलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या भाषणाविषयी नाराजी व्यक्त केली. अर्थात मोरे सरही कसलेले मल्ल असल्यानं ते किमान ५० मिनिटं रेटून बोललेच. उद्-घाटन संपल्यावर नेतेमंडळी त्वरित निघून गेली. मग बातम्या देणाऱ्यांची धावपळ सुरू झाली. माझ्यावर तो ताण नसल्यानं आम्ही मीडिया सेंटरमध्ये उगीचच चक्कर मारून आलो. परत मंडपात आलो, तेव्हा पुढचा कार्यक्रम सुरू झाला होता. आमची गौरी त्यात निवेदन करीत होती, त्यामुळं तो कार्यक्रम बसून ऐकला. नंतर स्वाती दैठणकरांचा कार्यक्रम होता, तोही छान झाला. मात्र, आम्हाला जेवून अमृतसरची परतीची बस गाठायची असल्यानं मध्येच उठावं लागलं.
अमृतसरला हॉटेलमध्ये परतलो, तेव्हा अकरा वाजले होते. लगेच झोपलो. दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारीही सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर नऊऐवजी दहाला, पण कालच्यापेक्षा बरीच वेळेत बस सुटली. आम्ही अकरा वाजता मुख्य मंडपात पोचलो. पाकिस्तानी लेखिका सलिमा हाश्मी यांचा सत्कार होऊन गेला होता. त्या कुठं तरी पत्रकारांशीही बोलल्या, पण आम्हाला ते कळलं नाही. तेवढ्यात मुख्य मंडपात पंजाब केसरीचे संपादक विजयकुमार चोप्रा यांची मुलाखत सुरू होणार होती, म्हणून आम्ही तिथंच थांबलो. ही मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. गाडगीळांना समयसूचकता आणि एकूणच अनुभव असल्यानं त्यांनी ही मुलाखत बऱ्यापैकी रंगविली. चोप्रा फार गोष्टीवेल्हाळ नव्हते. मोजकंच बोलत होते; पण नेमकं बोलत होते. त्यानंतर याच मंडपात अभिरूप न्यायालयाचा कार्यक्रम झाला. त्यात रामदास फुटाणे, संजय मोने, मोहन जोशी, राजीव खांडेकर, राजन खान आदी मंडळी होती. हा कार्यक्रम ठीकठाक झाला. नेहमीचेच मुद्दे चर्चिले गेले. त्यात फुटाणेंनी हे अभिरूप न्यायालय नसून, आपण अँटिचेंबरमध्ये बसून चर्चा करतोय असं सांगून सगळी हवाच काढली. त्यातल्या त्यात संजय मोने दिलखुलास बोलले. राजन खान यांचे मुद्दे परिचितच होते. खांडेकरांना सुधीर गाडगीळांनी त्यांच्याच मुद्द्यांच्या गुगलीत अडकवलं. एक आकाशवाणीच्या बाई होत्या. त्या उद्-घोषणा देत असल्यासारखंच ठराविक बोलत होत्या. एकूण थोडीफार मजा आली. हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच घुमान गाव बघायला बाहेर पडलो. संत नामदेव महाराजांचा नामियाना हा मुख्य गुरुद्वारा आम्ही पाहिलाच नव्हता. सकाळमधली माझी जुनी सहकारी वंदना कोर्टीकर तिथं होती. ती अनेक वेळा घुमानला येते. तिथल्या लोकांशी तिचा उत्तम संपर्क आहे. तिनं आम्हा तिघांना घुमानदर्शन घडवलं. तिच्यासोबत आम्ही नामदेवांचा गुरुद्वारा पाहिला. तिथल्या लंगरला भेट दिली. नंतर समोरच्या एका हॉलमध्ये काकासाहेब गाडगीळ सभागृह केलं होतं, तिथं काही संमेलनाचे कार्यक्रम होते. तेही पाहिलं. बाहेर आलो, तर एका ट्रॅक्टरमध्ये काही लोकांना बसवत होते. आम्ही चौकशी केली, तर नामदेवांचं आणखी कार्य असलेल्या जवळच्याच भटिवाल गावात हे लोक चालले असल्याचं कळलं. त्या गावातलेच लोक ट्रॅक्टरमधून मराठी भाविकांची मोफत ने-आण करीत होते.
ट्रॅक्टरमध्ये बसायला गाद्या वगैरे टाकल्या होत्या. आम्ही लगेच त्या ट्रॅक्टरमध्ये बसून भटिवालला जाण्याचा निर्णय घेतला. गाव अगदीच जवळ म्हणजे दोन किलोमीटरवर होतं. त्या गावात पोचलो. तिथं तीन गुरुद्वारा होते. पहिल्या गुरुद्वाराच्या दारात आपली बरीच मराठी मंडळी ढोल-ताशे घेऊन नाचत होती. यात मराठवाड्यातून आलेले शिंपी समाजाचे लोक जास्त होते. त्यांचा उत्साह अफाट होता. याच गुरुद्वाराच्या बाहेर नामदेवांनी पाण्याची अडचण दूर करण्यासाठी खोदलेली विहीर होती. नंतर चालत दुसऱ्या गुरुद्वारापाशी गेलो. गावात त्या रस्त्यावर खाली पेव्हर ब्लॉक टाकून रस्ता केला होता. त्या गुरुद्वारापाशी नामदेवांनी काठी रोवली आणि तिथं बोरीचं झाड आलं, अशी गोष्ट ऐकायला मिळाली. ते झाडही अर्थातच तिथं होतं. आम्हाला जालन्यातून ४० वर्षांपूर्वी इथं आलेल्या नारायणदास यांच्याकडं जायचं होतं. पण त्यांचा गुरुद्वारा आणखी वेगळीकडंच असल्याचं सांगण्यात आलं. मग आम्ही तो शोधून काढला आणि तिथं जाऊन त्यांना भेटलो. या महाराजांची स्टोरी आमच्या रमेश पडवळनं अंकात सविस्तर दिलीच आहे. आम्ही थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या.
त्यांच्या गुरुद्वाराला मंडपाचं बांधकाम करायचं होतं. त्यासाठी मराठी माणसांनी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा होती. शिवाय ते तिथं हरिनाम सप्ताहासारखे सत्संगाचे बरेच उपक्रम करतात. त्याची माहिती आणि बातम्या महाराष्ट्रात आम्ही द्याव्यात, असंही त्यांचं म्हणणं होतं. मी आपलं हो म्हटलं आणि निघालो. आता त्या बातम्या इथं येऊन त्यांना काय उपयोग होणार होता? महाराज एवढी वर्षं पंजाबात राहिले, पण मराठी रक्ताचा गुण कायम असल्याचं पाहून भरून आलं. बाहेर पडलो. तिथं रस्त्यावर एक जण थंडाई विकत होता. मग तिघेही ती प्यायलो. त्याच्याकडं भांगही होती. ती आम्ही अर्थातच घेतली नाही. फक्त त्या भांगेचे फोटो काढून घेतले.
परत येताना ट्रॅक्टरची सेवा नव्हती. बहुदा सगळे जेवायला गेले असावेत. आम्ही तेलकरांना पुढं केलं. त्यांनी एका जीपला हात दाखवला. आतल्या प्राजींनी लगेच गाडी थांबवली. आमच्याबरोबर काही स्थानिक माणसंही त्या गाडीत बसली. प्राजींनी आम्हाला घुमानला मुख्य चौकात आणून सोडलं. घुमानमध्ये हे लोक पैसे न घेता ही सेवा सध्या देत आहेत, हे वाचलं होतं. तरीही तेलकरांनी मला ढोसलं म्हणून त्या भल्या माणसाला संकोचून विचारलं, की कितना पैसा देना है... त्यावर त्यानं छान हसून फक्त दोन्ही हात जोडले. मला गहिवरूनच आलं. मी त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन आभार मानले आणि निघालो. आता आम्ही पुन्हा मुख्य मंडपाकडं आलो. भूक लागली होती. मग आधी जेवलो. मुख्य मंडपात कविसंमेलन सुरू होतं. रामदास फुटाणे सूत्रसंचालन करीत होते. संदीप खरे आदी मान्यवर लोकांनी जुन्याच कविता वाचून दाखवल्या. एकूण फार काही दम वाटला नाही. अभिजित अन् मी मग ग्रंथप्रदर्शनात गेलो. थोडीफार पुस्तकं घेतली. चपराक प्रकाशनाच्या स्टॉलवर आमचे सगळे मित्र, घनश्याम पाटील, नेर्लेकर, सुरवसे आदी मंडळी भेटली. प्रदर्शनात पंजाबी लोक आवर्जून स्टॉलला भेटी देताना दिसले. त्यांच्यामध्ये उत्सुकता दिसत होती. त्यांना विशेषतः नामदेवांचं साहित्य हिंदीत मिळालं तर हवं होतं. पण बहुतेकांची निराशाच झाली. आपले सगळे प्रकाशक तिथं आले असते, तर... असा विचार मनात येऊन गेलाच. असो. संध्याकाळी मंडपात मराठी रांगडा, पंजाबी भांगडा हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन करायला मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावे होते. यात नेहमीची नाचगाणी तर झालीच, पण पंजाब पोलिस दलातल्या एका आयपीएस अधिकाऱ्यानी - इंदरबीरसिंग यांनी - पंजाबी सूफी स्टाइलचं एक गाणं उत्स्फूर्तपणे गाऊन मजा आणली. हा या कार्यक्रमाचा हायपॉइंट होता. मी याची बातमीही दिली नंतर. शर्वरी जमेनीसचं नृत्यही जोरदार झालं. शेवटी आम्हाला जेवून बस पकडायची घाई असल्यानं मध्येच निघावं लागलं. पण मंडपात मागेपर्यंत पाहिलं, तर संपूर्ण घुमान गाव बायाबापड्या, लेकराबाळांसह या कार्यक्रमाला लोटलेलं दिसलं. भारी वाटलं ते बघून. सगळे जण अगदी मन लावून आपले मराठी कार्यक्रम पाहत होते. शेवटी अवधूत गुप्ते रंगमंचावर आला, तेव्हा आम्ही शेवटचा भात कालवत होतो. त्यानं पंजाबी भांगडा सुरू केला आणि आम्ही बसची वाट चालू लागलो. मंडपाच्या बाहेर जत्रेसारखी गर्दी जमली होती. नाचू घुमानचे रंगी... हे आता शब्दशः खरं वाटायला लागलं होतं... एकूण झकास रंगलेल्या या संमेलन-कम-जत्रेची उद्या सांगता होणार होती...

                                                                                                                                     (क्रमशः)


---------------------------------------------------------------------------------------------

15 Apr 2015

पंजाब डायरी - भाग २


२. वाहे गुरू...
---------------
...कुरुक्षेत्र गेल्यानंतर अंबाला कैंट. आणि अंबाला शहर ही दोन स्टेशनंही मागं पडली अन् आमची पश्चिम एक्स्प्रेस थोड्याच वेळात पंजाबमध्ये शिरली. हरियाणा आणि पंजाबमध्ये वरवर पाहता काहीच फरक नाही. तसंच लँडस्केप, तशीच दूरदूर पसरलेली गव्हाची शेती... फक्त आता गुरुमुखीतून लिहिलेल्या पाट्या दिसू लागल्या. स्टेशनवर दाढी आणि पगडीधारी लोकं जास्त दिसू लागले. एखाद्या गावातून गुरुद्वारा डोकावू लागलं अन् पंजाबच्या मातीचा सुगंध जाणवायला लागला. खन्ना नावाचं एक मोठं गाव लागलं. हिंदी चित्रपटसृष्टीला समस्त खन्नांची खाण पुरवणारी हीच ती भूमी असावी, अशी मी स्वतःची समजूत करून घेतली. खन्नांपेक्षाही मला चोप्रांच्या पंजाबी लँडस्केपचा नजारा कुठं दिसतोय का, ते पाहण्यात रस होता. पण ट्रेनच्या दोन्ही बाजूंना उभं राहून पाहिलं, तर ‘तसं’ सरसों के खेतीवालं दृश्य दिसेना. आकाश अगदीच ढगाळलेलं होतं आणि भर दुपारीही अंधारल्यामुळं वातावरणात उगाचच एक उदासीनता जाणवत होती. अशा स्थितीत बल्ले बल्ले करीत भांगडा करणारा, रसिला पंजाब मी आजूबाजूला शोधत होतो. सिनेमाच्या फार प्रभावाखाली येऊन वास्तवातली लँडस्केप शोधू नयेत, हे बुद्धी वारंवार बजावत होती. पण मन ऐकायला तयार नव्हतं. जालंधर आणि लुधियाना ही पंजाबातील दोन मोठ्ठी शहरं कधी येऊन गेली ते मला कळलंही नाही. लहानपणापासून केवळ होजिअरीच्या संदर्भातच ही दोन नावं ऐकलेली. पण प्रत्यक्षात ट्रेन तिथून गेली, तेव्हा ही शहरं नीट पाहताच आली नाहीत. सिनेमावरून राज्याची अन् स्टेशनावरून गावाची परीक्षा करू नये, हे नक्की. लवकरच एक मोठ्ठी नदी लागली आणि लगेच ब्यास हे स्टेशन आलं. ही नदीही अर्थात तीच म्हणजे ब्यास उर्फ व्यास नदी होती. घुमानला येणारी स्पेशल ट्रेन याच स्टेशनवर थांबणार होती, असं कळलं होतं. आता पुढचं स्टेशन म्हणजे अमृतसर. आम्ही आवरीआवरी सुरू केली. लॅपटॉप बंद झाले. चपला आत गेल्या, पाय बुटांत गेले. साडेसातला पोचणारी गाडी पंधरा-वीस मिनिटं उशिरानं अमृतसर स्टेशनात दाखल झाली. आम्ही बाहेर पडलो. अमृतसरचं स्टेशन बाहेरून सुंदर दिसतं. 
थोडा सुवर्णमंदिरासारखा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे फोटो काढले. आम्हाला पुरी पॅलेस नावाच्या हॉटेलात जायचं होतं. रिक्षावाले फसवणार हे आधीच गृहीत धरून एकदम स्टेशनाच्या बाहेर आलो. तिथं पगडीधारी पोलिसमामांना पत्ता विचारून घेतला. स्टेशनच्या बाहेर आल्यावर खरं शहर कळतं. अमृतसर मला आधी वाटलं, तेवढं काही इम्प्रेसिव्ह वाटलं नाही. मुळात आपल्यासारख्या रिक्षा नव्हत्या. सगळ्या धूर सोडणाऱ्या सिक्स सीटर रिक्षा. त्यात स्टेशनच्या समोरचा रस्ता दुभाजकानं बंद केलेला. आम्ही रिक्षा थांबवतोय तर एकही रिक्षा थांबेना. मग पोलिसमामांनी आम्हाला रस्त्याच्या पलीकडं जाण्याचा उपदेश केला. त्यानुसार पलीकडं गेलो, तर लगेच दहा-दहा रुपये सीट घेऊन जाणारी रिक्षा मिळाली. आम्ही कदाचित जुन्या अमृतसर शहराच्या भागात होतो. दोन्ही बाजूला साधीशीच दुकानं... फारसा झगमगाट नाही. अरुंद रस्ते, वाट्टेल तशी हाकली जाणारी वाहनं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे समरांगणावर सुरू असलेल्या शंखनादासारखा सतत सुरू असलेला हॉर्नचा आवाज... अमृतसरचं हे प्रथमदर्शन फारसं सुखावह नव्हतं. किंबहुना अपेक्षाभंग करणारंच होतं. मग एकदम लक्षात आलं, आपण पुण्यासारख्या तशा मोठ्या शहरातून आलो आहोत. इथं तसं असणारच नाही. पुढं रिक्षा एका अगदी निर्जन, अंधाऱ्या भागातून गेली. हा भाग तर शहरात आहे की नाही, असा प्रश्न पडावा. अखेर पंधरा मिनिटांत आमचं हॉटेल आलं. सुदैवानं हॉटेल अन् आमची रूम चांगली होती. बाकीचे सहकारी, मित्र भेटले. आता नऊ वाजले होते. आम्हाला लगेच सुवर्णमंदिर बघायला जायची घाई झाली होती. एसीतून प्रवास झाल्यानं फारसा थकवा नव्हताच. थोडं फ्रेश होऊन आम्ही लगेच बाहेर पडलो...
आमचं हॉटेल एका अरुंद रस्त्यावर होतं. डाव्या बाजूला पाहिलं, तर तिथं एक रेल्वेचं फाटक दिसलं आणि एक गाडीही उभी असलेली दिसली. उजव्या बाजूला मुख्य रस्त्याकडं जाणारा रस्ता होता. आम्ही तिथून चौकात आलो. तिथं सिक्स सिटर रिक्षांची बरीच गर्दी होती. एका रिक्षात बसून निघालो. या वेळी मात्र आम्ही स्थानिक नसल्याचं ओळखून त्या रिक्षावाल्यानं ६० रुपये घेईन, असं सांगितलं. (पुण्याच्या बाहेर कुठंही गेलं, तरी मला सगळं स्वस्तच वाटतं.) आम्ही सुवर्णमंदिर पाह्यला आतुर झालो होतो. त्यामुळं लगेच त्या रिक्षातून निघालो. अमृतसरच्या जुन्या भागातूनच आमची रिक्षा निघाली. सुवर्णमंदिर फार लांब नव्हतं. दोन-अडीच किलोमीटर असावं. अनेक गल्ल्या-बोळकांडं पार करीत आणि सतत हॉर्न वाजवत रिक्षा निघाली. अखेर एका बॅरिकेडपाशी रिक्षा थांबवून त्यानं आम्हाला खाली उतरवलं. इथून पुढं रिक्षा जात नसल्यानं आम्हाला चालत जावं लागणार होतं. साधारण आपल्याकडं गणपतीत बुधवार चौकाकडून दगडूशेठ गणपतीकडं चालायला लागल्यावर असते, तेवढ्या गर्दीत, पण तुलनेनं रुंद रस्त्यानं आम्ही सरळ निघालो.

समोर सुवर्णमंदिर दिसत होतं. ब्लू स्टार ऑपरेशनचा सगळा इतिहास झर्रकन डोळ्यांसमोरून गेला. हे सगळं प्रत्यक्षात घडलं जून १९८४ मध्ये. तेव्हा मी नुकताच चौथीत गेलो होतो. पण पेपरमध्ये त्या संदर्भातल्या बातम्या वाचल्याचं मला चांगलंच आठवतं. अर्थात नंतर अनेक पुस्तकांतून हा सगळा इतिहास नीटच वाचायला मिळाला. तेव्हा इथं कसं वातावरण असेल, याची आत्ता कल्पनाच करता येईना. शिवाय तिथं याबाबतचा एकही शब्द जाहीर उच्चारायची चोरी. त्यामुळं मी तो विषय मनातून झटकून टाकला आणि आत्ताच्या सुवर्णमंदिरात लक्ष घालायचं ठरवलं. तेलकर आणि पेंढारकर दोघंही यापूर्वी इथं आले होते. मात्र, त्यांनाही आत्ता समोर जे संगमरवरी पटांगण केलंय, ते नवीन होतं. डाव्या बाजूच्या अनेक रॅक होत्या, तिकडं बूट काढायचे होते. तिथं अनेक पंजाबी महिला स्वेच्छेनं हे काम करीत होत्या. इथं हे काम सेवा म्हणूनच केलं जातं हे माहिती होतं. त्यामुळं अगदी चांगल्या घरांतल्या, उच्चभ्रू महिलाही आमचे बूट उचलून ठेवत होत्या. त्या वेळी कसंसंच वाटलं. पण त्या मुलीनं तत्परतेनं मला एक टोकन दिलं. ते घेऊन आम्ही मुख्य मंदिराकडं निघालो. वातावरण छान होतं. हवेत गारवा होता आणि तिथं प्रसन्न वाटत होतं. आम्ही डोईवर रुमाल बांधले आणि वाहत्या पाण्यात पाय बुचकळून आत प्रवेश केला. समोरच दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघालेलं, सुवर्णतेजानं झळाळतं ‘हरमंदिर साहिब’ दिसलं. इथंच गुरू ग्रंथसाहिब विराजमान आहेत. आत दर्शनाला जाण्यासाठी त्या समोरच्या बाजूला खूपच मोठी रांग होती. आम्ही मग आत जाण्याचा नाद सोडून निवांत तो परिसर पाहण्याचं ठरवलं. माझ्या डोक्यातून भिंद्रनवालेचा विषय जात नव्हता. अकाल तख्त मागं दिसत होतं. इथंच तो लपून बसला होता. सभोवतालच्या उंचच उंच तटबंद्यांमध्ये एके-४७ घेऊन त्याचे साथीदार भारतीय सैन्याचा घास घ्यायला टपले होते. आत्ता तिथं भजनांची रेकॉर्ड सुरू होती. कुटुंब-कबिल्यासह अनेक लोक येत होते. अत्याधुनिक मोबाइलवर शूटिंग करीत होते. भारी कॅमेऱ्यांतून फोटो काढत होते. मला एकदम ब्रार, सुंदरजी, जनरल वैद्य यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करावंसं वाटलं. ते मी मनातल्या मनात केलंही. त्या सुंदर, पवित्र देवस्थानाच्या आत रणगाडे कसे काय शिरले असतील, याची कल्पनाच करवत नव्हती. असो. मी पुन्हा वास्तव जगात आलो. सगळा परिसर फिरून पाहिला. तिथल्या त्या तळ्याकाठी शांत बसून राहिलो. फोटो वगैरे काढले. भाविकांची गर्दी कमी होत नव्हती. अनेक जण आतच बाजूला ओवऱ्यांसाठी जागा आहे, तिथं झोपले होते. अनेक पुरुष समोरच्या बाजूला त्या तळ्यात उतरून आंघोळ करीत होते. त्या बाजूला जाऊन आम्ही परत आलो. बाहेर हातातली ती प्रसिद्ध कडी मिळत होती. एका दुकानातून ती विकत घेतली. मग तिथून बाहेर पडलो.
रात्रीचे अकरा वाजत आले होते आणि आता आम्हाला सणकून भूक लागली होती. अभिजितनं येतानाच एक शुध ढाबा नावाचं हॉटेल हेरून ठेवलं होतं. मग तिथं गेलो. भरपूर गर्दी होती. टिपिकल पंजाबी माहौल होता. आम्हाला एका कोपऱ्यात जागा मिळाली. गाणी वाजत होती. लोक मनापासून एंजॉय करीत खादडी करीत होते. मला एकदम पुण्यात असल्याचा भास झाला. पण आजूबाजूची भाषा आणि सगळीकडं दिसणाऱ्या रंगबिरंगी पगड्या यामुळं लगेच मी भानावर आलो. आम्ही लच्छा पराठा आणि दाल-मखनीची ऑर्डर दिली. नंतर नान आणि दाल फ्राय आणि असंच काय काय मागवून हादडलं मनसोक्त. हे झाल्यावर बाहेर येऊन पंजाबी लस्सी पिण्याचीही आमची लालसा होती. पण एक तर तशी रस्त्यावर लस्सी विकणारी दुकानं तोपर्यंत बंद झाली होती आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं जेवण तुडुंब झालं होतं. मग लस्सीचा बेत उद्यावर ढकलून आम्ही रिक्षात बसलो... हॉटेलात आल्यानंतर लगेच आडवे झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्हाला घुमानला नेणारी बस येणार होती. म्हणून अगदी गजर वगैरे लावून लवकर उठलो. तिघांचंही वेळेत आवरून झालं. आता ब्रेकफास्टला जाणार, तेवढ्यात सुनीत (भावे) सांगत आला, की पुण्याहून येणारी रेल्वेगाडी उशिरा येत असल्यानं ग्रंथदिंडी अन् सगळेच कार्यक्रम दुपारी दोनला सुरू होणार आहेत. त्यामुळं बस आता बारा वाजता निघणार आहे. आमचं तर आवरून झालं होतं. मग आम्ही ब्रेकफास्ट झाल्यावर त्या वेळात जालियनवाला बाग पाहायला जायचं ठरवलं. सुनीत अन् रमेशही (पडवळ - आमचा नाशिकचा सहकारी) आमच्याबरोबर आले. रिक्षा करून जालियनवाला बागेत गेलो. तिथंही गर्दी प्रचंड होती.

तिथला तो ‘ऐतिहासिक गली’ हा फलक पाहताना माझ्या अंगावर काटा आला. इथूनच जनरल डायर नावाचा नरराक्षस आपले बंदूकधारी सैनिक घेऊन आत शिरला होता. आम्ही आत शिरलो. दारातच एक संग्रहालय आहे. अगदी आत शिरतानाच हे संग्रहालय का केलंय, देव जाणे. तिथंही खूपच गर्दी होती. मग आम्ही एकदम आत गेलो. मला वाटलं होतं, त्यापेक्षा हे मैदान छोटं आहे. आजूबाजूची सगळी घरं, इमारती आणि मध्ये असलेली हिरवळ व बाग पाहून मला तर थेट शनिवारवाड्याचीच आठवण झाली. उजव्या बाजूला इंडियन ऑइलनं तयार केलेली अखंड ज्योत दिसली. डोडेनियाच्या गवताचे सैनिक केलेले दिसले. समोरच एक सिमेंटचा त्रिकोण होता. त्यावर ‘गोलीयाँ यहाँ से चलाई गई’ असं लिहिलेलं होतं. 

ते वाचतानाही डोकं बधीर होत होतं. डाव्या बाजूला अजून एक संग्रहालयवजा शेड होती. तिथं गेलो. जालियनवाला हत्याकांडाचं एक मोठं पेंटिंग तिथं होतं. पुढं तो शहिदों का कुआँ दिसला. भिंतीवरच्या गोळ्यांच्या खुणा पाहिल्या. सगळा परिसर नीट जतन करून ठेवला असला, तरी एकूण मामला शनिवारवाड्यासारखाच वाटला. (म्हणजे आता काहीच महत्त्व उरलेलं नाही, अशा अर्थानं!) शिवाय अशा जागेचं स्मारक नक्की कसं असावं, हाही एक प्रश्न वाटला. म्हणजे त्या घटनेचं गांभीर्य तेवढ्या प्रमाणात जपलं जात नाहीये, असं वाटून गेलं. अर्थात अजून चार वर्षांनी या घटनेला शंभर वर्षं होतील. तेव्हा भावनात्मकदृष्ट्या आपण त्या काळाला किती अटॅच उरलो आहोत, हाही मुद्दा आहेच. शेवटी काहीशा विमनस्क स्थितीतच तिथून बाहेर पडलो... हॉटेलवर परतलो. आमची बस येऊन थांबली होती. ती आणखी एक तास उशिरा म्हणजे दुपारी एक वाजता निघाली. आता वेध लागले होते साहित्य संमेलनाचे... घुमानचे....

                                          (क्रमशः)

14 Apr 2015

पंजाब डायरी - भाग १

१. पंजाबकडं प्रस्थान...
------------------------------------------मी तसा फार फिरणाऱ्यातला नाही. म्हणजे हौस भरपूर आहे, पण फिरायला वेळ आणि पैसा दोन्ही माझ्याकडं नाही. पण कधी तरी या दोन्ही गोष्टी जमवून आम्ही ट्रिपा काढतोच. काश्मीर, कन्याकुमारी ही दोन्ही टोकं घडली... बाकीही तमिळनाडू, केरळ, ओरिसा, दिल्ली, गोवा, हैदराबाद असा काही भाग बघून झालाय. एक अपघाती परदेशवारीही घडली. पण आपल्या देशातली काही महत्त्वाची राज्यं माझी अजूनही पाह्यची राहिली आहेत. पंजाब हे आत्तापर्यंत त्यातलं एक प्रमुख राज्य होतं. पण नुकतंच तेही घडलं. घुमानचं साहित्य संमेलन हे त्याचं मुख्य निमित्त. त्याला जोडूनच पर्यटनही करण्याचा विचार इतर अनेकांप्रमाणं माझ्याही मनात बळावला. मागच्या वर्षी जुलैत हे संमेलन घोषित झालं, तेव्हा फारसं काही जावंसं वाटत नव्हतं. मात्र, मागच्या डिसेंबरमध्ये मित्रवर्य अभिजित पेंढारकरसह बोलताना हा विषय निघाला आणि आम्ही दोघांनीही जायचं फायनलच करून टाकलं. ‘सकाळ’मधले माझे माजी सहकारी अरविंद तेलकर एकदा आमच्या ‘मटा’च्या ऑफिसात आले असताना, हा विषय निघाला आणि त्यांनीही आमच्याबरोबर येण्याची तयारी दर्शविली. तेलकर यांना आम्ही प्रेमानं, लाडानं ‘मामू’ म्हणतो. मामूंचा फिरण्याचा उत्साह साठी ओलांडल्यानंतरही अचाट आहे. आणि महत्त्वाचं ते आमच्यासोबत मित्रासारखंच वागतात. आम्ही त्यांना वाट्टेल ते बोलतो, चिडवतो, कामाला लावतो; पण मामू संतांना लाज येईल एवढ्या शांतपणानं सगळं सहन करतात. शिवाय ते उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. त्यामुळं आमचा तिय्या लगेच जमून गेला. मग आम्ही मसापमध्ये जाऊन तेथील प्रतिनिधी शुल्क प्रत्येकी १५०० रुपये भरून टाकलं. माधवीताईंना भेटलो. तिथंच माझी मावसबहीण गौरी (लग्नोत्तर स्नेहल दामले... ह. मु. सातारा) भेटली. ती तिथं सूत्रसंचालन करणार होती. माझी मावशी व काकाही येणार होते. एकूण भरपूर लोकं निघाली आहेत, हे कळलं. अर्थात संमेलनाच्या त्या खास रेल्वेनं जायचं नाही, असं आम्ही आधीच ठरवलं होतं. कारण आम्हाला एसी कोचच हवा होता. मग मुंबई (बांद्रा टर्मिनस) ते अमृतसर ही रोज धावणारी सुपरफास्ट पश्चिम एक्स्प्रेस आम्ही फायनल केली. आमच्याकडं (म्हणजे ब्रह्मे आणि पेंढारकर कुटुंबीय) ट्रिप ठरली, की ऑनलाइन बुकिंग वगैरे करण्याचं काम हर्षदाकडं (सौ. पेंढारकर) असतं. तिनं याही वेळी धडाक्यात आमची जाताना अन् येतानाची बुकिंग करून टाकली. शिवाय पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासाचंही बुकिंग केलं. त्याच्या प्रिंट वगैरे व्यवस्थित काढून प्रत्येकाला एक कॉपी देण्याचं मेलवर किंवा व्हॉट्सअपवर पाठवण्याचं कामही तिनं उत्साहात केलं. लग्न झाल्यापासून आम्ही, म्हणजे मी व अभिजित आमच्या कुटुंबांना सोडून पहिल्यांदाच पुन्हा एकेकटे निघालो होतो. यापूर्वी आम्ही भरतपूरच्या केवलदेव घना राष्ट्रीय अभयारण्याची ट्रिप केली होती. त्यालाही बारा वर्षं होऊन गेली होती. मध्यंतरी ऑफिसनं पाठवलं म्हणून एकदा बेंगळुरू अन् एकदा उदयपूरचा एकट्यानं प्रवास घडला होता. पण आता एवढ्या दिवसांनी मुलं आणि बायकोला सोडून जायचं ऐन वेळी आमच्या अगदी जिवावर आलं. त्यात मुलांची परीक्षा चालू होती आणि बायकोवर हा भार टाकून आपण एकटेच मजा करायला निघालोय, या विचाराचा फारच अपराधगंड आला. पण आता दोर कापले होते. शिवाय मामूही केवळ आम्ही निघालोय म्हणून आमच्यासोबत निघाले होते. त्यांचा हिरमोड झाला असता. शेवटी पुन्हा आता असं एकेकटं जायचं नाही, असा वज्रनिर्धार (माझ्यापुरता) करून, आम्ही घुमानवारीला सज्ज झालो.
एक एप्रिलला सकाळची ‘डेक्कन क्वीन’ गाठून आम्ही मुंबईला जाणार होतो. तिथून सकाळी ११.३५ ला निघणारी पश्चिम एक्स्प्रेस आम्हाला गाठायची होती. पहाटे पाचचा गजर लावून झोपलो. चार वाजून ४० मिनिटांनी माझा मोबाइल वाजायला लागला, म्हणून धनश्रीनं मला उठवलं. माझे काका अ. ल. देशमुख यांचा फोन होता. एवढ्या पहाटे त्यांनी का फोन केला असेल, या शंकेनं मी त्यांना उलट फोन लावला. मुंबईवरून येणारी गाडी लेट आहे का, असं ते विचारत होते. अर्धवट झोपेत मला काहीच कळेना. मी त्यांना सांगितलं, की अहो, मी घरी आहे. मग कळलं, की संमेलनाची स्पेशल ट्रेन अजून आलेलीच नाहीये आणि ती लेट आहे. त्यांना गौरीनं असं सांगितलं होतं, की मी मुंबईवरून येणाऱ्या संमेलनाच्या स्पेशल ट्रेनमध्ये आहे. म्हणून त्यांनी मला फोन केला होता. शेवटी आम्ही स्टेशनवर गेलो तेव्हा कळलं, की ती विशेष रेल्वेगाडी अजूनही आलेली नाहीये. घुमानवारीचे सर्व वारकरी स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. अर्थात आमची ‘डेक्कन क्वीन’ वेळेत सुटली आणि आम्ही निघालो. नंतर या ट्रेनचे अपडेट्स (आणि तिला होणारा उशीर) पुढं घुमानला पोचेपर्यंत आमच्या कानावर येत राहिले. 
मला मुंबईला जायला नेहमीच आवडतं. दर वेळी नवनवे बदल होताना दिसतात. नवे अनुभव येतात. आम्ही दादरला उतरून पश्चिमेला केशवसुत पुलावर उतरलो. तिथून एका म्हातारबुवांची टॅक्सी केली. माझा मुंबईतला टॅक्सीचा अनुभव आत्तापर्यंत फारच चांगला होता. या वेळी पहिल्यांदा या म्हाताऱ्या टॅक्सी ड्रायव्हरनं ‘नष्टर’ लावली. ‘पुढं फार गर्दी आहे. माहीमला ट्रॅफिक जॅम आहे. तुम्ही लोकलनंच का नाही गेलात, आता तुम्हाला रेल्वे कशी मिळणार...’ आदी बडबड त्यानं सुरू केली. कुठून याच्या टॅक्सीत बसलो असं झालं. हे सगळे जादा पैसे उकळण्याचे धंदे होते, हे कळत होतं. शेवटी माहीमच्या (नसलेल्या) ट्रॅफिक जॅममधून पुढं गेल्यावर म्हाताऱ्याच्या टॅक्सीचा क्लचच तुटला. त्याची बडबड एकदम थांबली आणि तोंड बारीक झालं. मग आम्ही ‘हुश्श’ करून खाली उतरलो आणि ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ या न्यायानं एक रिक्षा केली. मुंबईत मी पहिल्यांदाच रिक्षात बसलो होतो. वांद्रे स्टेशनच्या आणि बेहरामपाड्याच्या दारातून जाताना ही मुंबईच आहे का, असा प्रश्न पडला. (या बकालपणाचं अखिल भारतीय दर्शन पुढं सात दिवस होणार होतं, याची ही झलक होती.) वांद्र्यात निवडणुकीचं वारं दिसलं. राणेंची पोस्टर वगैरे दिसली. बांद्रा टर्मिनसला मी प्रथमच येत होतो. तिथल्या कँटीनमध्ये आम्ही सँडविच खाल्लं. (यापेक्षा आमचा नीलही घरी चांगलं सँडविच करतो. असो.) तिथून सब-वेतून पलीकडच्या फलाटावर जाताना मुंबईच्या पोलिसमामानं मला अडवलं. घुमानच्या साहित्य संमेलनाला निघालोय, असं मी ठणकावून सांगितलं आणि वर पत्रकार असल्याचं सांगितलं. मग सहज सुटका झाली. (पण त्यानं मलाच का अडवलं, हे कळलं नाही. कदाचित बर्म्युड्यावर असल्यानं असेल.) आमची गाडी वेळेत सुटली. आमच्या थ्री-टिअर एसी डब्यात हुबळी-धारवाडकडची वैष्णव मंडळी होती. सगळा डबा त्यांनीच भरला होता. एकजात सगळे पुरुष धोतरावर आणि गंध-शेंडीवाले! नंतर त्यांच्याशी आमची चांगली दोस्ती झाली. ही मंडळी कुरुक्षेत्रावर निघाली होती. (पण आमच्याशी भांडली नाहीत.) यांनी कुठल्याही स्टेशनवर काहीही विकत घेतलं नाही. सगळं घरून आणलं होतं. आम्ही रेल्वेतलं खाणं घेऊन खायला लागलो, की दयार्द्र नजरेनं आमच्याकडं पाह्यचे. संध्याकाळीही सात वाजताच जेवून गुडूप झोपी जायचे. सकाळी मात्र लवकर उठून कन्नडमध्ये अखंड बडबड सुरू व्हायची. आम्हीही मामूंच्या लॅपटॉपवर ‘साउंड ऑफ म्युझिक’ लावून, ‘आयाम सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हन्टीन’ हे त्यांना दाखवून दिलं. पुढं बडोद्याला गुजराती महिलांचं भजनी मंडळ डब्यात शिरलं आणि ‘आंतरभारती’ पूर्ण झाली. या महिलांनी आल्यापासून भजनं, गाण्याच्या भेंड्या सुरू करून आमचं भरपूर मनोरंजन केलं. 
रात्री रतलाम स्टेशनला गाडी बराच वेळ थांबली, तेव्हा आम्ही वरच्या जिन्यापर्यंत शतपावली करून आलो. फोटो काढले. (इथं आमच्या करिनाची आठवण येणं स्वाभाविक होतं.) दुसऱ्या दिवशी सकाळी बडोदावाल्या सगळ्या गोपी मथुरेत उतरल्या आणि आमचा टाइमपास संपला. आमच्या डब्यातल्या एका वयस्कर आजोबांनी मथुरेच्या स्टेशनवर उतरून, फलाटालाच वाकून नमस्कार केला. मला आधी काही कळलं नाही. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला. मीही किसनरावांच्या जन्मभूमीला मनातल्या मनातच वंदन केलं आणि गाडीत येऊन बसलो. 
दिल्ली येऊ लागलं, की आजूबाजूंच्या गावांतल्या भिंती पाह्यच्या. आपला सगळा देश फक्त गुप्तरोगांनी त्रस्त आहे की काय, असं वाटावं. प्रत्येक भिंत विविध गुप्तरोगांचं वर्णन करून अमुक हकीम से मिलीए, तमुक डाक्टर से मिलीए हे असले मोठ्या चुन्यात रंगवलेले संदेश सुरू होतात. ‘निःसंतान मिलीए’ हे वेगळंच असतंच. आणि प्रत्येक रोगाचा वारही ठरलेला. पूर्वी एक ‘डा. शेख’ फेमस होता. अलीकडं तो दिसत नाही. (कदाचित पलीकडं गेला असावा.) शिवाय अशा भिंतींच्या पुढं लांबलचक आडवी पसरलेली गटारं आणि अलीकडं रेल्वेतून फेकलेला प्लास्टिक कचरा अन् पलीकडं सुखेनैव त्या गटारातून फिरणारी डुकरं हे नेपथ्य पाहिजेच. आम्ही एसी डब्यात होतो; अन्यथा या सर्वांच्या जोडीला येणारा तो सुवास (अहाहा!) मिळून पंचेद्रियांची तृप्ती झाल्याशिवाय राहत नाही.
दिल्लीपर्यंत मी पूर्वी अनेकदा आलो होतो. म्हणून दिल्लीनंतर नवा प्रदेश पाहण्याच्या हेतूनं दारात जाऊन उभा राहिलो. रेल्वेतून असा नवा प्रदेश न्याहाळणं हा माझा आवडता छंद आहे. मला नुसतंच डब्यात बर्थवर लोळणं किंवा सतत पुस्तक वाचणं आवडत नाही. डब्या-डब्यांतून फिरणं आणि दारात उभं राहणं हा प्रवासातला सर्वांत आनंददायक भाग असतो. थोड्याच वेळात पानिपत आलं. 
स्टेशनवरचं ‘पानिपत जंक्शन’ हे नाव वाचलं अन् थरारलो. बराच वेळ मन ‘ट्रान्स’मध्ये गेलं. उजव्या बाजूला बघत राहिलो. त्याच बाजूला होता कुठं तरी तो काला आम! अडीचशे वर्षांपूर्वी इथं सदाशिवरावभाऊ अन् विश्वासरावांनी गाजवलेला पराक्रम आठवला. आता तिथं गव्हाची शेती लांबवर पसरली होती. मराठ्यांच्या रक्ताचं शिंपण झालेली ती पावन भूमी आजही सुपीकच होती. टनावारी धान्य उपजत होती. मी खिडकीतूनच हात जोडले...
...भराभर स्टेशनं मागं पडत होती. कुरुक्षेत्र स्टेशनावर आमचा सगळा डबा रिकामा झाला. या मंडळींचं सामान उतरवायला आम्ही मदत केली. थोड्याच वेळात गाडी पंजाबच्या सुजलाम-सुफलाम भूमीत शिरणार होती... माझं मन ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधल्या त्या सरसोंच्या शेतात जाऊन पोचलं होतं... गाणं ओठी येत होतं - तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दिवाना सनम...
ओए मेरी पंजाब दी मिट्टी.... मैं आ रहा हूँ...

                                                                        (क्रमशः)