18 Apr 2015

पंजाब डायरी - भाग ३

नाचू घुमानचे रंगी...
-----------------------आमच्या बसनं उशिराच, म्हणजे दुपारी एक-दीडच्या आसपास अमृतसर सोडलं आणि दुपारी दोन वाजता निघणारी ग्रंथदिंडी मिळणार नाही, याची चिंता वाटू लागली. आमच्यासोबत तेजासिंग हे स्थानिक माहिती अधिकारी होते. आमच्या बसची जबाबदारी त्यांच्याकडं होती. अखेर तेजासिंग यांनी सुरुवातीला गाइड माहिती सांगतो, तशी आमच्या व्यवस्थेची माहिती सांगितली अन् बस एकदाची निघाली. अमृतसर शहरातून बाहेर पडायलाच अर्धा तास लागला. त्यानंतर मात्र चांगला चौपदरी महामार्ग लागला. हा रस्ता वाघा बॉर्डरकडं जात होता. आठ-दहा किलोमीटर अंतरावर हा महामार्ग सोडून आमची बस उजवीकडं वळली. मेहता चौक नावाच्या गावाचा फलक दिसत होता. घुमानचं नाव अर्थातच कुठंही नव्हतं. आता खरा ग्रामीण पंजाब दिसू लागला. सर्वदूर पसरलेली गव्हाची शेतं, म्हशींचे तांडे, पाण्याची तळी, शेतातली धाब्याची घरं असं सगळं दृश्य लागलं. गहू पिकायला आल्यामुळं शेती हिरवी न दिसता पिवळसर दिसत होती. अधूनमधून मोहरीची (याने सरसों की) शेतीही दिसत होती. पण त्याला ती पिवळी फुलं आत्ता नव्हती. हा सीझन नव्हता म्हणे. काही अंतर गेल्यावर डाव्या बाजूला संत राम दास नावाचं मोठं हॉस्पिटल लागलं.
नंतर दुतर्फा उंचच उंच झाडं (ही कसली झाडं होती, ते कळलं नाही.) आणि मधोमध दुपदरी छोटा रस्ता असं मस्त दृश्य दिसू लागलं. रस्ता नव्यानं डांबरी केलेला दिसत होता. काही ठिकाणी डांबराचे पॅचेस मारून खड्डे बुजवले होते. रस्त्यावर कर्कश हॉर्न वाजवण्याची स्पर्धा इथंही चालू होती. थोड्याच वेळात एक मोठं गाव लागलं. आम्हाला वाटलं, की घुमानच आलं. पंजाबमध्ये सर्वत्र आवर्जून गुरुमुखीत पाट्या होत्या. त्यामुळं गावाचं नाव कळत नव्हतं. अखेर हे मेहता नावाचं गाव आहे, हे कळलं. हाच भिंद्रनवालेचा प्रमुख गड होता, ही माहिती नंतर मिळाली. आता ते आपल्याकडच्या कुठल्याही तालुक्याच्या गावासारखं (इंदापूर किंवा शिरूर) मोठं गाव दिसत होतं. हे गाव ओलांडलं आणि आठ-दहा किलोमीटरवर अखेर घुमान आलं. गावात सगळीकडं मोठमोठे फलक होते. संमेलनाची माहिती देणारे मराठीतील मोठे फलक पाहून धन्य वाटलं. आमची गाडी गाव ओलांडून पलीकडं गेली आणि डाव्या बाजूला एका मोठ्या मैदानात काही बस उभ्या होत्या, तिथं आली. आम्हाला वाटलं, इथंच पार्किंग असेल. पण तसं नव्हतं. कारण संमेलनाचा मंडप कुठं दिसत नव्हता. मग आमच्या सरदारजी ड्रायव्हरनं गाडी वळवून पुन्हा गाव ओलांडून आम्ही जिकडून आलो होतो, त्या रोडला हाणली. तिथं उजवीकडं वळून एका छोट्या रस्त्यानं गाडी आत घेतली. बरंच आत गेल्यावर उजव्या बाजूला एक मोठा मंडप दिसू लागला. पण तो मंडप आणि आमचा रस्ता यात सर्वत्र शेतं होती. पुढं मग पुन्हा उजवीकडं जाणारा एक छोटा रस्ता लागला. तिथं काही पोलिस उभे होते. त्या चार-पाच जणांनी ड्रायव्हरशी चर्चा सुरू केली. बहुदा मंडपाच्या सर्वांत जवळ गाडी कशी नेता येईल, यावर ती चर्चा सुरू असावी. हा हेतू चांगला असला, तरी त्यांचं एकमत होईपर्यंत बराच वेळ चर्चा चालली. तोपर्यंत वास्तविक आम्ही चालत संमेलनस्थळी पोचलो असतो. अखेर बरंच भवती न भवती होऊन गाडी एकदाची त्याच रस्त्यानं आत वळली. थोडंच अंतर जाऊन ती थांबली. आम्ही उतरून मग चालत मंडपाकडं गेलो. ग्रंथदिंडी तोपर्यंत निघाली होती, असं आम्हाला कळलं. ती नक्की त्या गावात कुठं होती, हे आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. तोपर्यंत अडीच-पावणेतीन झाले होते आणि तेजासिंगजींना आमच्या जेवणाची चिंता लागली होती. अखेर आम्हाला मंडपात ढकलून खास मीडियासाठी असलेल्या भोजन कक्षात ते आले. तोपर्यंत आमच्याकडं कुठलेही पास वगैरे नव्हते. सगळीकडं पोलिस बंदोबस्त होता आणि प्रत्येक ठिकाणी पोलिस (रास्तपणे) अडवत होते. त्यामुळं पासची व्यवस्था तातडीनं करायला पाहिजे होती. अखेर संध्याकाळी आम्हा तिघांना एकदाचे ते पास मिळाले आणि पोलिसांचं आमच्याकडं थोडं संशयानं पाहणं थांबलं. जेवण चांगलं होतं.
मराठी व पंजाबी दोन्ही पद्धतीच्या जेवणाची व्यवस्था होती आणि ती उत्तम होती. अनेक पंजाबी लोकही मराठी जेवणाचा आस्वाद घेताना दिसत होते. आमचं जेवण होईपर्यंत साडेतीन झाले आणि चारला उद्-घाटनाचा कार्यक्रम होता. मग आम्ही लगेच मंडपातच जाऊन बसलो. मंडप उत्कृष्ट होता आणि लाल-बाल-पाल असं नाव दिलेलं व्यासपीठही भव्य होतं. मागच्या बाजूला मराठी व पंजाबीतून ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, घुमान (पंजाब) २०१५ असं लिहिलं होतं. मराठी ग्रंथांचे कटआउट उजव्या बाजूला केले होते. मंडपातील खुर्च्यांची व्यवस्थाही चांगली होती. महत्त्वाचं म्हणजे ढगाळ हवामान असल्यामुळं आल्हाददायक वाटत होतं. स्टेजवरची तयारी सुरू असतानाच मराठवाड्याकडचे एक टोपीवाले दादा अनाहूतपणे स्टेजवर चढले आणि माइक ताब्यात घेऊन, आपल्या ग्रुपच्या लोकांनी इकडं जमावं, तमकं करावं असल्या घोषणा करायला लागले. एकूण अनागोंदीचा हा उत्तम नमुना होता. मला तर त्या आगाऊ चुंबळ्याचा रागच आला. तेवढ्यात माधवीताई वैद्य तातडीनं व्यासपीठावर आल्या आणि अशा अनाहूत घोषणा महामंडळाच्या व्यासपीठावरून करू नयेत, असं बजावून गेल्या.
चारचा कार्यक्रम थोडा आधीच सुरू झाला. सूत्रसंचालन करणारे एक मराठी होते, तर एका कौर बाईंना पंजाबीतून निवेदन करायचं होतं. पण मराठी निवेदक बाबाच्या धडाक्यापुढं तिचं फार काही चालेना. यानं चार वाक्यं म्हटली, तर ती एकाच वाक्यात काय ते पंजाबीत सार सांगून गुंडाळायची. नंतर नंतर तर तिनं हेही सांगण्याचा नाद सोडून दिला. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, शरदचंद्रजी पवारसाहेब, नितीनभाऊ गडकरी आदी दिग्गज मंडळी व्यासपीठावर होती. त्यामुळं पंजाब पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संपूर्ण व्यासपीठाला वेढाच घातला होता. प्रेक्षकांतही ही मंडळी भरपूर संख्येनं (ड्यूटी लावल्यानं) हजर होती. पंजाबी पत्रकारही होते. स्टेजवर मराठी सुरू झालं, की ते आम्हाला त्याचा अर्थ विचारायचे. अर्थात प्रमुख नेत्यांनी हिंदीतून भाषणं केल्यानं या पत्रकारांचे संभाव्य हाल वाचले. माधवीताई नथ वगैरे घालून नटून आल्या होत्या. नंतर त्यांनी तलवार वगैरेही उपसून दाखविली, तेव्हा साहित्यिक झाशीची राणीच घुमानमध्ये अवतरली, असा भास मला झाला. बादल मात्र छान बोलले. आब राखून बोलले. त्यांच्या वयाचा मान राखून स्टेजवरची मंडळीही अत्यंत आदरानं त्यांच्यासमोर पेश होत होती. सर्वांत शेवटी अध्यक्षीय भाषण झालं. डॉ. मोरे भाषणाला उभे राहण्याच्या आधी स्टेजच्या मागं मोठ्यांदा ढोल-ताशे सुरू झाले. अखेर जाहीर निवेदन करून ते बंद करायला लावावे लागले. मोरे यांचं भाषण चांगलं होतं. मात्र, त्यांना वेळ-काळाचं तारतम्य उरलं नाही. त्यामुळं वैतागलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या भाषणाविषयी नाराजी व्यक्त केली. अर्थात मोरे सरही कसलेले मल्ल असल्यानं ते किमान ५० मिनिटं रेटून बोललेच. उद्-घाटन संपल्यावर नेतेमंडळी त्वरित निघून गेली. मग बातम्या देणाऱ्यांची धावपळ सुरू झाली. माझ्यावर तो ताण नसल्यानं आम्ही मीडिया सेंटरमध्ये उगीचच चक्कर मारून आलो. परत मंडपात आलो, तेव्हा पुढचा कार्यक्रम सुरू झाला होता. आमची गौरी त्यात निवेदन करीत होती, त्यामुळं तो कार्यक्रम बसून ऐकला. नंतर स्वाती दैठणकरांचा कार्यक्रम होता, तोही छान झाला. मात्र, आम्हाला जेवून अमृतसरची परतीची बस गाठायची असल्यानं मध्येच उठावं लागलं.
अमृतसरला हॉटेलमध्ये परतलो, तेव्हा अकरा वाजले होते. लगेच झोपलो. दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारीही सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर नऊऐवजी दहाला, पण कालच्यापेक्षा बरीच वेळेत बस सुटली. आम्ही अकरा वाजता मुख्य मंडपात पोचलो. पाकिस्तानी लेखिका सलिमा हाश्मी यांचा सत्कार होऊन गेला होता. त्या कुठं तरी पत्रकारांशीही बोलल्या, पण आम्हाला ते कळलं नाही. तेवढ्यात मुख्य मंडपात पंजाब केसरीचे संपादक विजयकुमार चोप्रा यांची मुलाखत सुरू होणार होती, म्हणून आम्ही तिथंच थांबलो. ही मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. गाडगीळांना समयसूचकता आणि एकूणच अनुभव असल्यानं त्यांनी ही मुलाखत बऱ्यापैकी रंगविली. चोप्रा फार गोष्टीवेल्हाळ नव्हते. मोजकंच बोलत होते; पण नेमकं बोलत होते. त्यानंतर याच मंडपात अभिरूप न्यायालयाचा कार्यक्रम झाला. त्यात रामदास फुटाणे, संजय मोने, मोहन जोशी, राजीव खांडेकर, राजन खान आदी मंडळी होती. हा कार्यक्रम ठीकठाक झाला. नेहमीचेच मुद्दे चर्चिले गेले. त्यात फुटाणेंनी हे अभिरूप न्यायालय नसून, आपण अँटिचेंबरमध्ये बसून चर्चा करतोय असं सांगून सगळी हवाच काढली. त्यातल्या त्यात संजय मोने दिलखुलास बोलले. राजन खान यांचे मुद्दे परिचितच होते. खांडेकरांना सुधीर गाडगीळांनी त्यांच्याच मुद्द्यांच्या गुगलीत अडकवलं. एक आकाशवाणीच्या बाई होत्या. त्या उद्-घोषणा देत असल्यासारखंच ठराविक बोलत होत्या. एकूण थोडीफार मजा आली. हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच घुमान गाव बघायला बाहेर पडलो. संत नामदेव महाराजांचा नामियाना हा मुख्य गुरुद्वारा आम्ही पाहिलाच नव्हता. सकाळमधली माझी जुनी सहकारी वंदना कोर्टीकर तिथं होती. ती अनेक वेळा घुमानला येते. तिथल्या लोकांशी तिचा उत्तम संपर्क आहे. तिनं आम्हा तिघांना घुमानदर्शन घडवलं. तिच्यासोबत आम्ही नामदेवांचा गुरुद्वारा पाहिला. तिथल्या लंगरला भेट दिली. नंतर समोरच्या एका हॉलमध्ये काकासाहेब गाडगीळ सभागृह केलं होतं, तिथं काही संमेलनाचे कार्यक्रम होते. तेही पाहिलं. बाहेर आलो, तर एका ट्रॅक्टरमध्ये काही लोकांना बसवत होते. आम्ही चौकशी केली, तर नामदेवांचं आणखी कार्य असलेल्या जवळच्याच भटिवाल गावात हे लोक चालले असल्याचं कळलं. त्या गावातलेच लोक ट्रॅक्टरमधून मराठी भाविकांची मोफत ने-आण करीत होते.
ट्रॅक्टरमध्ये बसायला गाद्या वगैरे टाकल्या होत्या. आम्ही लगेच त्या ट्रॅक्टरमध्ये बसून भटिवालला जाण्याचा निर्णय घेतला. गाव अगदीच जवळ म्हणजे दोन किलोमीटरवर होतं. त्या गावात पोचलो. तिथं तीन गुरुद्वारा होते. पहिल्या गुरुद्वाराच्या दारात आपली बरीच मराठी मंडळी ढोल-ताशे घेऊन नाचत होती. यात मराठवाड्यातून आलेले शिंपी समाजाचे लोक जास्त होते. त्यांचा उत्साह अफाट होता. याच गुरुद्वाराच्या बाहेर नामदेवांनी पाण्याची अडचण दूर करण्यासाठी खोदलेली विहीर होती. नंतर चालत दुसऱ्या गुरुद्वारापाशी गेलो. गावात त्या रस्त्यावर खाली पेव्हर ब्लॉक टाकून रस्ता केला होता. त्या गुरुद्वारापाशी नामदेवांनी काठी रोवली आणि तिथं बोरीचं झाड आलं, अशी गोष्ट ऐकायला मिळाली. ते झाडही अर्थातच तिथं होतं. आम्हाला जालन्यातून ४० वर्षांपूर्वी इथं आलेल्या नारायणदास यांच्याकडं जायचं होतं. पण त्यांचा गुरुद्वारा आणखी वेगळीकडंच असल्याचं सांगण्यात आलं. मग आम्ही तो शोधून काढला आणि तिथं जाऊन त्यांना भेटलो. या महाराजांची स्टोरी आमच्या रमेश पडवळनं अंकात सविस्तर दिलीच आहे. आम्ही थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या.
त्यांच्या गुरुद्वाराला मंडपाचं बांधकाम करायचं होतं. त्यासाठी मराठी माणसांनी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा होती. शिवाय ते तिथं हरिनाम सप्ताहासारखे सत्संगाचे बरेच उपक्रम करतात. त्याची माहिती आणि बातम्या महाराष्ट्रात आम्ही द्याव्यात, असंही त्यांचं म्हणणं होतं. मी आपलं हो म्हटलं आणि निघालो. आता त्या बातम्या इथं येऊन त्यांना काय उपयोग होणार होता? महाराज एवढी वर्षं पंजाबात राहिले, पण मराठी रक्ताचा गुण कायम असल्याचं पाहून भरून आलं. बाहेर पडलो. तिथं रस्त्यावर एक जण थंडाई विकत होता. मग तिघेही ती प्यायलो. त्याच्याकडं भांगही होती. ती आम्ही अर्थातच घेतली नाही. फक्त त्या भांगेचे फोटो काढून घेतले.
परत येताना ट्रॅक्टरची सेवा नव्हती. बहुदा सगळे जेवायला गेले असावेत. आम्ही तेलकरांना पुढं केलं. त्यांनी एका जीपला हात दाखवला. आतल्या प्राजींनी लगेच गाडी थांबवली. आमच्याबरोबर काही स्थानिक माणसंही त्या गाडीत बसली. प्राजींनी आम्हाला घुमानला मुख्य चौकात आणून सोडलं. घुमानमध्ये हे लोक पैसे न घेता ही सेवा सध्या देत आहेत, हे वाचलं होतं. तरीही तेलकरांनी मला ढोसलं म्हणून त्या भल्या माणसाला संकोचून विचारलं, की कितना पैसा देना है... त्यावर त्यानं छान हसून फक्त दोन्ही हात जोडले. मला गहिवरूनच आलं. मी त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन आभार मानले आणि निघालो. आता आम्ही पुन्हा मुख्य मंडपाकडं आलो. भूक लागली होती. मग आधी जेवलो. मुख्य मंडपात कविसंमेलन सुरू होतं. रामदास फुटाणे सूत्रसंचालन करीत होते. संदीप खरे आदी मान्यवर लोकांनी जुन्याच कविता वाचून दाखवल्या. एकूण फार काही दम वाटला नाही. अभिजित अन् मी मग ग्रंथप्रदर्शनात गेलो. थोडीफार पुस्तकं घेतली. चपराक प्रकाशनाच्या स्टॉलवर आमचे सगळे मित्र, घनश्याम पाटील, नेर्लेकर, सुरवसे आदी मंडळी भेटली. प्रदर्शनात पंजाबी लोक आवर्जून स्टॉलला भेटी देताना दिसले. त्यांच्यामध्ये उत्सुकता दिसत होती. त्यांना विशेषतः नामदेवांचं साहित्य हिंदीत मिळालं तर हवं होतं. पण बहुतेकांची निराशाच झाली. आपले सगळे प्रकाशक तिथं आले असते, तर... असा विचार मनात येऊन गेलाच. असो. संध्याकाळी मंडपात मराठी रांगडा, पंजाबी भांगडा हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन करायला मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावे होते. यात नेहमीची नाचगाणी तर झालीच, पण पंजाब पोलिस दलातल्या एका आयपीएस अधिकाऱ्यानी - इंदरबीरसिंग यांनी - पंजाबी सूफी स्टाइलचं एक गाणं उत्स्फूर्तपणे गाऊन मजा आणली. हा या कार्यक्रमाचा हायपॉइंट होता. मी याची बातमीही दिली नंतर. शर्वरी जमेनीसचं नृत्यही जोरदार झालं. शेवटी आम्हाला जेवून बस पकडायची घाई असल्यानं मध्येच निघावं लागलं. पण मंडपात मागेपर्यंत पाहिलं, तर संपूर्ण घुमान गाव बायाबापड्या, लेकराबाळांसह या कार्यक्रमाला लोटलेलं दिसलं. भारी वाटलं ते बघून. सगळे जण अगदी मन लावून आपले मराठी कार्यक्रम पाहत होते. शेवटी अवधूत गुप्ते रंगमंचावर आला, तेव्हा आम्ही शेवटचा भात कालवत होतो. त्यानं पंजाबी भांगडा सुरू केला आणि आम्ही बसची वाट चालू लागलो. मंडपाच्या बाहेर जत्रेसारखी गर्दी जमली होती. नाचू घुमानचे रंगी... हे आता शब्दशः खरं वाटायला लागलं होतं... एकूण झकास रंगलेल्या या संमेलन-कम-जत्रेची उद्या सांगता होणार होती...

                                                                                                                                     (क्रमशः)


---------------------------------------------------------------------------------------------

2 comments:

  1. वा. प्रवासवर्णन बेस्टच. बाकी सगळं अनुभवलंय, पाहिलंय. पण अमृतसर-घुमान हा प्रवास बहुतांशी झोपेची थकबाकी पूर्ण करण्यात सत्कारणी लावल्यामुळे त्या प्रवासात काय काय दिसलं, हे तुझ्या लेखनातूनच कळलं. धन्यवाद.
    परिच्छेद का पडत नाहीयेत लिखाणात? काही तांत्रिक अडचण...?

    ReplyDelete
  2. परिच्छेद होते खरं तर... पाडतो परत...

    ReplyDelete