31 Dec 2017

मटा - संवाद लेख

गोइंग ऑन एटीन...
----------------------


आज इसवी सन २०१७ संपणार... सन २०१८ सुरू होणार... अव्याहत चाललेल्या कालयज्ञात आणखी एका वर्षाची समीधा पडणार... एकविसाव्या शतकातील पहिली १७ वर्षं बघता बघता संपलीसुद्धा... एकविसावं शतक येणार, त्यात असं होणार, तसं होणार असं आम्ही लहानपणी शाळेत ऐकायचो. तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी हे एक स्वप्नाळू सद्-गृहस्थ होते. त्यांच्या भाषणांत अनेकदा या ‘इक्किसवीं सदी’चा उल्लेख यायचा. हे नवं शतक उजाडलं, तेव्हा आमची पिढी ऐन गद्धेपंचविशीत होती. दोन शतकांचं स्थित्यंतर पाहणारी आमची ही पिढी अनेक अर्थांनी ‘युनिक’ आहे.
फार थोड्या काळात फार मोठी स्थित्यंतरं या २०-२५ वर्षांत घडली. आपल्या देशानं १९९१ मध्ये स्वीकारलेल्या खुल्या आर्थिक धोरणाचाही एक संदर्भ यात आहेच. या धोरणाची फळं आमच्या पिढीच्या पदरात पडायला पुढची आठ-दहा वर्षं गेली. त्यामुळं तसं पाहता बरोबर २००० सुरू होताना हे बदल खऱ्या अर्थानं जगण्यात दिसू लागले होते. पुढच्या १७ वर्षांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यांसमोर आहे. ही १७ वर्षं माझ्या मते, एका नव्या पिढीच्या जन्माची वर्षं होती. सन २०००ला जन्मलेल्या पिढीचा हा जमाना आहे. येत्या वर्षात ही पिढीही अठराव्या वर्षांत पदार्पण करते आहे. ‘साउंड ऑफ म्युझिक’मधील ‘आय अॅम सिक्स्टीन, गोइंग ऑन सेव्हन्टीन’ या प्रसिद्ध गाण्यात थोडा बदल करून ‘आय एम सेव्हन्टीन, गोइंग ऑन एटीन’ असं गाणं आता या पिढीच्या तोंडी असेल. हा जमाना या पिढीचा आहे हे खरंच; पण या पिढीबरोबर बदललेल्या इतर सर्व वयीनांचाही हा जमाना आहे. काळानुसार बदलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी वय कायमच चिरतरुण राहतं. त्यामुळंच आशा भोसलेंसारखी गायिका ही आजही आजच्या जमान्याची गायिका वाटते. आमिर खान ५२ वर्षांचा असला, तरी तो ‘दंगल’ किंवा ‘सिक्रेट सुपरस्टार’सारखा सिनेमा घेऊन येतो, तेव्हा आजच्या जमान्यातलाच नायक वाटतो. 
आजचा संदर्भ १८ या आकड्याचा आहे आणि आपल्याकडं १८ वर्षे पूर्ण झाली, की ती व्यक्ती सज्ञान, प्रौढ झाली, असं मानलं जातं. मतदानाचा अधिकार मिळतो, कार चालविण्याचा परवाना मिळतो, प्रौढांसाठीचे सिनेमे पाहता येतात, मुलींना विवाहाचा अधिकार मिळतो. थोडक्यात, आपलं ‘टीनएज’ संपून आपण ‘मोठे’ होतो, असं कायदा मानतो. त्यामुळं येणारं २०१८ हे वर्ष संपलं, की ही एकविसाव्या शतकातली पहिली पिढी सर्वार्थानं ‘प्रौढ’ होणार आहे; ‘मोठी’ होणार आहे. आधी म्हटलं, तसं काळानुसार बदलणारे सगळेच या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळं त्यांचं वय १७ असो वा नसो, त्यांनाही आपल्या ‘प्रौढत्वा’च्या दर्जाबाबत आत्मपरीक्षण करण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे.
आपल्या जगण्यात या १७ वर्षांत काय बदल झाले? सहज मागं वळून पाहिलं, तर लक्षात येतं, की आपल्या जगण्याला वेग आला आहे. आपली जीवनशैली वेगानं ‘अपग्रेड’ होत गेली आहे. आपण नाही म्हटलं, तरी सुखासीन झालो आहोत. महानगरांमधला एक मोठा वर्ग जवळपास परदेशांतील लोक जगतात, त्या धर्तीची किंवा काही बाबतींत त्याहूनही सरस जीवनशैली अंगीकारून मोकळा झाला आहे. आपल्याकडं पैसा आला आहे. त्यामुळं मोठी घरं, मोठ्या गाड्या, मोठ्या इमारती, उंची हॉटेले असं सगळं अपग्रेड होत गेलं आहे. तंत्रज्ञानातील बदल अफाट आहे. आपले मोठे टीव्ही गेले, फ्लॅट स्क्रीनचे स्मार्ट टीव्ही आले. मोबाइलची पिढी तर दर दोन महिन्यांनी बदलते आहे, ‘फोर जी’वरून आता ‘फाइव्ह जी’कडं प्रवास सुरू आहे. थोडक्यात, भौतिक प्रगतीच्या आघाडीवर आपली गाडी अगदी एक्स्प्रेसवर एखादी उत्तम ‘एसयूव्ही’ १४०-१५० च्या स्पीडनं पळवावी, तशी पळते आहे. त्यामुळंच आपल्या जगण्याची एक वेगळीच गोची झाली आहे. सुखासीनतेचा धबधबा अंगावर कोसळताना, ‘किती घेशील घेता दो कराने’ अशी अवस्था झाल्यानं निवडीचं स्वातंत्र्य आपण गमावून बसलो आहोत. कुठलीही नवी पिढी जन्मल्यापासून १८ वर्षांची होईपर्यंत प्रत्येक अनुभव पहिल्यांदा घेत असते. त्या नवथरपणामुळं तिच्या वागण्यात एक स्वाभाविक आवेग असतो. नव्या गोष्टीला, नव्या अनुभवाला भिडण्याची तीव्रतम असोशी असते. या एकविसाव्या शतकातील प्रत्येक नव्या गोष्टीला सामोरं जाताना आपल्या या नवथर पिढीचीही अवस्था अगदी अशीच झालीय. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं झालेल्या भौतिक सुखांच्या माऱ्यानं आपण अत्यंत उत्तेजित तर झालो आहोतच; पण याचं पुढं कसं व्यवस्थापन करायचं, हेच आपल्याला कळेनासं झालंय. आपली पिढी आता त्या अर्थानं १७ वर्षांचीच आहे, हे एकदा मान्य केलं, की मग तिच्या हातून होणारे हे गोंधळ, चुका क्षम्यच म्हणता येतात. पण आता हे महत्त्वाचं वळण आलंय. आपण १८ व्या वर्षात पदार्पण करतो आहोत. फार तर अजून हे एक वर्ष आपल्याला ‘लहान’ म्हणून माफी मिळेल; पण एकदा १८ पूर्ण झाली, की ‘प्रौढ’पणाच्या फायद्यांसोबतच ती प्रगल्भतेची अपेक्षा आणि जबाबदारीही येणार आहे.  
नव्या गोष्टींचा, पहिलेपणाचा अनुभव हा चुकांचाच असतो. तीव्र आवेगानं या अनुभवाला भिडताना अनेकदा धडपडायला होतं, जखमा होतात. पण एकदा हा आवेग ओसरला, की आपण त्या गोष्टीकडं चिकित्सक नजरेनं पाहू शकतो. ‘अच्छा, हे असं आहे का? बरं बरं, आत्ता कळलं...’ अशी भावना मनात येते. नव्यानं डाव मांडायला आपण तयार होतो. आपल्या आयुष्यात गेल्या १७ वर्षांत घडलेल्या प्रत्येक बदलाबाबत आता हा विचार करण्याची वेळ आली आहे. २०१८ या वर्षात जर आपण या दृष्टीनं विचार केला, तर पुढची वाटचाल प्रगल्भतेनं करणं सोपं होईल. पूर्वीच्या काळी सुख-सुविधांची वानवा असल्यानं अगदी छोट्या छोट्या गोष्टीही (उदा. एसी थिएटरमध्ये सिनेमा/नाटक पाहणं वा एसी टॅक्सी घरी बोलावून प्रवास करणं) आपल्या मागच्या पिढीला लाभल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आता हे सगळं मिळतं आहे; पण त्याच जोडीला तणावपूर्ण जगण्याचे आणि त्यातून येणारे बीपी, डायबेटिससारखे नवे दागिनेही आपल्याला लाभले आहेत. अनेकांच्या बाबतीत सुखलोलुपतेचा अनुभव पहिलाच असल्यानं त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हेही कळत नाही. थोडक्यात, वय वर्ष १० ते १७ या काळात आपण जेवढा वेडेपणा केला आहे, तेवढाच आपण सगळे आत्ता करतो आहोत. पण, आता हा वेडेपणा संपवून प्रौढ व्हायची संधी २०१८नं आपल्याला दिली आहे. आपल्या जगण्यातले सगळे नवथर अनुभव घेऊन झाले आहेत, अशी स्थिती आज आहे. आता या अनुभवांबाबतची आपली असोशी कमी होत जाईल आणि त्यांच्याकडं चिकित्सक नजरेनं पाहण्याची संधी मिळेल. त्या अर्थानं हे येणारं वर्ष आपल्याला ‘प्रौढ’पणाकडं घेऊन जाणारं आहे. तेव्हा ‘गोइंग ऑन एटीन’ म्हणताना आपल्याला हा ‘प्रगल्भते’चा पैलूही लाभो, इतकंच...
….
(ता. क. कवीनं ‘प्रौढत्वी निज शैशवाचा बाणा’ जपण्यास सांगितलं आहे. तेव्हा प्रौढ झालो, तरी कधी कधी लहान मुलांसारख्या निरागस चुका करायला हरकत नसावी.) 
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, संवाद पुरवणी) 
----

22 Dec 2017

टायगर जिंदा है - रिव्ह्यू

वाघरू वांड झालंय...
-------------------------
सलमानचा नवा पिक्चर म्हणजे फुल टाइमपास असंच समीकरण गेल्या आठ-दहा वर्षांत जमलंय. विशेषतः 'वाँटेड'पासून सलमानची ही दुसरी (की तिसरी?) जी इनिंग सुरू झालीय ती बॉक्स ऑफिसवर आणि सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांवर चांगलीच गारूड करून आहे. सलमानच्या या लौकिकाला बट्टा लागला, तो याच वर्षी ईदला आलेल्या 'ट्युबलाइट' या सिनेमामुळं. हा सिनेमा अगदीच पडेल होता म्हणे! (म्हणे, कारण मी तो सिनेमा अजूनही पाहिलेला नाही... अगदी 'अॅमेझॉन'वर आलाय, तरी सुरुवात फक्त बघितली... पुढं बघवेना...) तर ते असो. सलमानच्या गेल्या आठ-दहा वर्षांतल्या सुपरहिट सिनेमांत २०१२ मध्ये आलेल्या 'एक था टायगर'चाही समावेश होता. आता याच सिनेमाचा पुढचा भाग (किंवा टायगर फ्रँचायजीचा पुढचा भाग म्हणू या...) 'टायगर जिंदा है' या नावानं आता प्रदर्शित झालाय. पहिल्या भागापेक्षा हा भाग अधिक चांगला जमून आला आहे आणि हा सिनेमा 'बॉक्स ऑफिस'वर फुल्ल कल्ला करणार, याविषयी माझ्या मनात तरी काही शंका नाही.
हा भाग दिग्दर्शित केलाय अब्बास अली जफरनं. 'सुलतान'पासून सलमानचे आणि त्याचे सूर जुळलेले दिसतात. त्यामुळंच 'एक था टायगर'चा यशस्वी आणि 'ट्युबलाइट'चा अयशस्वी दिग्दर्शक कबीर खान याला सोडून सलमाननं 'टायगर'चा हा पुढचा भाग अली अब्बास जफरकडं सोपवलेला दिसतो.
... आणि अली अब्बास जफरनं सुमारे १६१ मिनिटांचा हा थरारक खेळ चांगलाच रंगवला आहे, यात वाद नाही. हा सिनेमा पाहताना आपल्याला एक मिनिटही कंटाळा येत नाही, हे याचं यश आहे. सलमान सध्या ज्या पठडीतील सिनेमा करतोय तो आता हॉलिवूडच्या ज्या काही नामांकित फ्रँचायजी आहेत त्या डोळ्यांसमोर ठेवून करतोय, असं दिसतं. 'टायगर'च्या पहिल्या भागात त्याला 'रॉ'चा एजंट दाखवून आंतरराष्ट्रीय उचापतींना पूर्ण मोकळा वाव देण्यात आला होता. आता पुढच्या भागात अधिक मोठा आणि खिळवून ठेवणारा कॅनव्हास हवा, म्हणून इथं इराक आणि 'आयएस'चं (सिनेमातलं नाव - आयएससी) नेपथ्य घ्यावं लागलं आहे. इराकमधून काही भारतीय नर्सची सुटका करण्यात आल्याच्या सत्य घटनेचा संदर्भही या सिनेमाला आहे. मात्र, तो तेवढाच. बाकी सर्व सिनेमा हा सलमानची (अन् कतरिनाचीही) देमार फायटिंग, अॅक्शन आणि अॅक्शन दाखवत राहतो. असं असलं, तरी हा सिनेमा कंटाळवाणा होत नाही, याचं कारण प्रॉडक्शन डिझाइनवर हिंदी सिनेमा करीत असलेला खर्च. परदेशी लोकेशन्स नवी नाहीत, पण इराक, सीरियासारखी भारतीय प्रेक्षकांना तुलनेनं अनोळखी लोकेशन्स (प्रत्यक्षात शूटिंग मोरोक्को व अबुधाबी), परदेशी स्टंटमन्सची सफाईदार अॅक्शन दृश्यं, सिनेमाला तुफान गती देणारं सफाईदार संकलन आणि अगदी फिल्मी असला, तरी कन्व्हिन्सिंग वाटेल असा घटनाक्रम... यामुळं सिनेमा अगदीच हास्यास्पद ठरत नाही. किंबहुना आपण सलमानचा सिनेमा पाहतोय हे लक्षात ठेवून, एकदा डोकं बाजूला ठेवलं की सिनेमा इंटरेस्टिंगही वाटू शकतो.
सलमानचा सिनेमा हल्ली 'पोलिटिकली करेक्ट'ही होऊ लागला आहे. 'बजरंगी भाईजान'मध्येही भारत-पाक प्रेमाचं तुणतुणं वाजवण्यात आलं होतं. इथंही सल्लूभाईचं पाकप्रेम स्पष्ट दिसून येतंय. या सिनेमात भारतीय नर्सेससोबत पाकिस्तानीही नर्सेस तिथं अडकल्याचं दाखवून, रॉ आणि आयएसआयचे एजंट मिळून ही कामगिरी पार पाडतात, असा अचाट आणि फक्त सलमानच्याच सिनेमात शोभेल असा कल्पनाविलास दाखवून, दिग्दर्शक व सलमाननं कदाचित पाकिस्तानी मार्केटचीही तजवीज केली आहे. यातली नायिका झोया (कतरिना) ही मागच्या भागात आयएसआयची एजंट असल्याचं दाखवलं आहे, त्यामुळं तोही धागा पुढं नेण्यास या सिनेमानं मदतच केली आहे. बाकी शेवटी तिरंग्यासोबत पाकचा झेंडाही त्या बसवर फडकावून सलमाननं पुढं-मागं 'निशान-ए-पाकिस्तान' किताबही पदरी पाडून घेण्याची सोय केलेली दिसते. (अर्थात, सलमान हा इंटलेक्चुअल वगैरे म्हणून गणला जात नसल्यानं त्याच्या या वरकरणी चांगल्या भावनेचं भारतीय प्रेक्षक स्वागतही करतील. सलमान परवडला; पण शाहरुख आणि आमीर खानच्या जादा हुशारीने चाललेल्या वेगवेगळ्या 'शहाणपणां'ची तिडीक येते... तर ते असो.)
मूळ सिनेमाकडं येऊ या... तर या सिनेमात आपल्या नायकाला शेवटी उघडं होण्याची संधी देऊन तमाम सलमानप्रेमींचा दुवा दिग्दर्शकानं घेतला आहे. त्या तुलनेत कतरिनाच्या चाहत्यांचा रसभंगच होण्याची शक्यता आहे. या सिनेमात आपला नायक पुढं दहशतवाद्यांच्या रूपातील लांडग्यांशीच जणू नंतर फाइट करणार असल्यानं सुरुवातीलाच प्रत्यक्षातील खऱ्याखुऱ्या लांडग्यांची लढाई दाखवून दिग्दर्शकानं प्रतीकात्मतेचा षटकार मारला आहे. गिरीश कार्नाड काकांच्या नाकात उगाचच दोन नळ्या घातल्या आहेत. ते सिनेमाभर तसे वावरत असल्यानं इरिटेटिंग वाटतं. शेंबडा माणूस पाहत असल्याचा भास होतो. एवढ्या चांगल्या नटाला का ही शिक्षा? बहुतेक पुढच्या भागात हे शेणॉयसाहेब (कार्नाड काकांच्या पात्राचं सिनेमातलं नाव) फोटोतच लटकलेले दिसतील, असा आपला माझा अंदाज आहे.
परेश रावल हा या सिनेमातलं नवं आणि सरप्राइजिंग पॅकेज आहे. तो आहे म्हणून या सिनेमाच्या सुसह्यतेत वाढ झाली आहे, यात शंका नाही. फिरदौस नावाचं एक अतरंगी पात्र या माणसानं असं भन्नाट रंगवलं आहे, की बस्स... मजा आ गया! सज्जाद दिलफरोझ नावाचा इराणी अभिनेता यात अबू उस्मानच्या भूमिकेत आहे. हा अबू उस्मान म्हणजे अर्थातच 'आयएससी'चा प्रमुख. भारतीय नर्स ज्या हॉस्पिटलमध्ये असतात, तेथेच हा तळ ठोकतो. त्याला सोयिस्कररीत्या हिंदी येत असतं, कारण तो लहानपणी दिल्लीत वाढलेला असतो वगैरे.
सलमान खान या सिनेमात बऱ्यापैकी दाढीत आणि वजन वाढलेला असा दिसला आहे. अर्थात शेवटच्या उघड्याबंबू शॉटला तो सिक्स पॅक आदी दाखवून त्याच्या फॅन्सना खूश करतो, यात शंका नाही. बावन्न वर्षांचा हा अभिनेता अजून किती तरी वर्षे अशाच भूमिका करू शकेल, अशी खात्री हा सिनेमा पाहून वाटते. कतरिनाला फार काही वाव नाही. मात्र, अबू बगदावीला आणि त्याच्या टोळक्याला ती आणि सर्व बायका मिळून मारतात तो प्रसंग मस्त जमून आला आहे. कतरिनाने स्टंट्स जबर केले आहेत.
यातलं 'स्वॅग से करेंगे सब का स्वागत' हे गाणं यापूर्वीच हिट झालं आहे. ते एंड स्क्रोलला येतं.
थोडक्यात, ख्रिसमसच्या सुट्ट्या एंजॉय करायच्या असतील, तर डोकं बाजूला ठेवून हा देमार, गल्लाभरू सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही.
 ---

दर्जा - तीन स्टार
---

19 Dec 2017

कुमार लघुकथा - राधा आणि रेंज

राधा आणि 'रेंज'...
-----------------------------------

राधा वाँट्स टु डान्स... राधा वाँट्स टु पार्टी... 
डीजेला लाजवील अशा खणखणत्या आवाजात राधाच्या रूममध्ये गाणं लागलं होतं आणि राधा मस्त नाचत होती. 'राधा गाणं बंद कर,' अशा आईच्या चढत्या आवाजातल्या चार हाकासुद्धा तिला ऐकू आल्या नाहीत. राधाला हे गाणं भयंकर आवडत असे. इतकंच काय, ज्या गाण्यांत 'राधा' हा शब्द आहे, अशी सगळीच गाणी तिला आवडत. या सगळ्या गाण्यांतली राधा म्हणजे आपणच आहोत, असं तिला ठामपणे वाटत होतं. 
राधाची सातवीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि आठवीचं वर्ष सुरू व्हायला अवकाश होता. गेल्या दोन वर्षांत राधाची उंची एकदम वाढली होती आणि ती मोठी दिसू लागली होती. तिच्या वर्गातल्या सगळ्याच मुली एकदम मोठ्या दिसू लागल्या होत्या. राधा मोठ्ठी झाल्यापासून तिच्या नसलेल्या वेण्यांच्या जागी दोन शिंगं फुटली आहेत, असं आई सारखी म्हणते. पण आई आता आपली जरा जास्तच काळजी करते, हेही तिच्या लक्षात आलं होतं. 'स्टु़डंट्स ऑफ दी इयर'मधलं हे गाणं राधाला आवडायचं एक कारण म्हणजे, तिला वरुण धवन खूपच आवडायला लागला होता. हे झालं साधारण वर्षापासून! तो फारच 'कूल' आहे असा साक्षात्कार तिला झाला होता. सुहानीजवळ - तिच्याच वर्गातल्या आणि सोसायटीतच राहणाऱ्या जवळच्या मैत्रिणीला - तिनं हे गुपित सांगितलं तेव्हा तिला छातीत उगाचच धडधडल्यासारखं झालं होतं. पण सुहानीला सिद्धार्थ मल्होत्रा आवडतो, हे कळल्यावर आपल्याला जीव भांड्यात पडल्यासारखं का वाटलं, हे तिला कळत नव्हतं.
राधाचे बाबा एका मोठ्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जनरल मॅनेजर होते. उंचेपुरे, कायम सूट-बूट घालणारे, गॉगल घालणारे आपले बाबा ही जगातली सर्वांत 'कूल' व्यक्ती आहे, हे राधाचं अगदी गेल्या वर्षीपर्यंत मत होतं. यंदा मात्र तिनं बाबांना दोन नंबरवर ठेवून वरुण धवनला पहिला नंबर दिला होता. राधाला सख्खं भाऊ-बहीण कुणी नव्हतं. तिचा एक आतेभाऊ शुभंकर त्याच शहरात राहायचा. तोही एकटाच होता आणि राधाच्याच वयाचा होता. लहानपणी तो आणि राधा एकत्र खूप दंगा करत. पण हल्ली तो घरी आला, की राधाला उगाचच बुजल्यासारखं व्हायचं. आपल्याच घरात शुभंकरबरोबर दंगा घालण्यात आता मज्जा येत नाही, असं तिला वाटू लागलं होतं. मागं एकदा त्याच्याबरोबर खेळताना आईनं पण एक-दोनदा कारण नसताना तिला जोरात ओढलं होतं, ते तिला आठवलं. शुभंकर तिच्याएवढाच असला, तरी बारीक चणीचा होता. त्याच्याशी दंगा करताना ती कायमच त्याला बुकलून काढायची आणि मग तो गळा काढायचा. तो हल्ली घरी येत नाही, ते बरंच झालं असं राधाला वाटायचं.
गेल्या वर्षी राधाला तिच्या बाबांनी टॅब घेऊन दिला होता. घरात वाय-फाय होतंच. राधा दिवसेंदिवस टॅब हातात घेऊन बसू लागली. तिच्या खोलीबाहेर पडेनाशी झाली. बाबा दिवसभर ऑफिसात, आई तिच्या कामात... त्यात दुपारी आईच्या मैत्रिणी घरी यायच्या. मग हॉलमध्ये त्यांचाच दंगा. शाळा असते तेव्हा राधाला वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच पडायचा नाही. पण आता सुट्टीत काय करायचं हा मोठ्ठा प्रश्न तिला पडला. सुहानी तिच्या मामाबरोबर बंगलोरला गेली होती. राधाला पण तिचे बाबा 'जिम कॉर्बेट'ला नेणार होते. शुभंकर आणि त्याचे आई-बाबा आणि बाबांचे आणखी एक मित्रही सोबत असणार होते. पण त्याला अजून पंधरा दिवस वेळ होता. तोपर्यंत काय करायचं, हा फार मोठा प्रश्न राधाला पडला होता. आईच्या गळ्यात पडलं, की ती 'मनू, तू आता लहान नाहीस गं, तुझं तूच खेळ बघू' असं म्हणायची. त्यात ती घाऱ्या डोळ्यांची शीतलमावशी आणि कायम स्लीव्हलेस टॉप अन् जीन्समध्ये असणारी आभामावशी आली, की आई त्यांच्या गप्पांत हरवूनच जायची. शीतलमावशीमध्ये आणि सुहानीच्या 'ज्युलिया'मध्ये (ज्युलिया ही सुहानीच्या घरची पर्शियन मनीमाऊ बरं का!) काही तरी विलक्षण साम्य आहे, असं राधाला सारखं वाटायचं. आभामावशी तर तिच्या मोबाइलमधले कसले तरी व्हिडिओ आईला दाखवायची आणि आई सारखी तिच्या दंडावर चापट्या मारायची आणि हसायची, हे राधानं अनेकदा पाहिलं होतं. 
हे सगळे प्रकार राधाला बोअर झाले होते. सुहानी नसल्यानं 'चिल मारायचे' बाकी ऑप्शनपण बंद झाले होते. तिच्या टॅबमध्ये सिमकार्ड आणि इंटरनेट नव्हतं. वायफायवरून ती गेम्स खेळायची, पण त्यात तिला अजिबात मजा येत नव्हती. आई तर तिच्या दृष्टीनं कायमच 'आउट ऑफ रेंज' असायची आणि बाबा खूप मस्त होता, तरी कायमच बिझी! 
...टॅबशी चाळा करीत राधा उगाचच गेम्स चालू करीत होती आणि बंद करत होती. अचानक टॅबवर काही तरी फ्लॅश झालं. नवा गेम? पण तिनं तर आत्ता टॅबला हातही लावला नव्हता. तिनं टॅबच्या स्क्रीनला टच केल्यावर समोर अक्षरं झळकली - 'मिट युअर फ्रेंड... डू यू वॉन्ना चॅट?' राधानं क्षणभर टॅबकडं बघितलं. हे असले कोड्यात पाडणारे गेम तिला आवडत नसत. तिनं चक्क तोंड फिरवलं. आणि काय आश्चर्य? टॅबमधून आवाज आला - 'हाय राधा!' आता मात्र राधा तीन ताड उडाली. तिला कळेचना, कोण बोलतंय ते! बाबानं सरप्राइज म्हणून टॅबमध्ये कार्ड तर नाही टाकलं? की कुठला व्हिडिओ आहे? पण तिला पुरतं कळेपर्यंत टॅबवर स्काइपसारखी विंडो ओपन झाली आणि त्यात वरुण धवनसारखा चेहरा असलेली, पण बाकी अवतार रोबोसारखा दिसणारी एक आकृती दिसू लागली. अर्थात तिचा खांद्यावरचा भागच दिसत होता फक्त... टॅबमधून पुन्हा आवाज आला - 'हाय राधा! फ्रेंड्स??' 
एकदम हिप्नोटाइज झाल्याप्रमाणं राधानं उत्तर दिलं - 'येस येस... फ्रेंड्स...!' आता तो आवाज चक्क हसला आणि म्हणाला - 'थँक्स बडी. आजपासून मी तुझा खास मित्र आहे असं समज.' त्याच्या तोंडून मराठी ऐकू आल्यावर तर राधा नाचायलाच लागली. 'तू कोण आहेस पण...?' तिनं जवळपास आनंदानं चित्कारत विचारलं. पुन्हा टॅबमधून ती आकृती बोलली - 'माझं नाव रेंज. मी एक कस्टमाइज्ड रोबो आहे. तुझ्या सर्व आवडी-निवडी माझ्याजवळ स्टोअर आहेत. आजपासून तू मला तुझा मित्र समज. एकदम जवळचा मित्र. मी सदैव तुझ्याजवळ असेन. मला तुझ्याशिवाय दुसरा कुणीही मित्र किंवा मैत्रीण नसेल. तुला माझ्याकडून कधीही त्रास होणार नाही. तू आदेश दिलास की मी गप्पा मारीन तुझ्याशी...'
मग राधाला एकदम जाणवलं. सुहानी गेल्यापासून आपण नीट गप्पाच मारल्या नाहीयेत कुणाशी. तिला 'रेंज'शी काय बोलू आणि काय नाही, असं होऊन गेलं. ती म्हणाली, 'मी तुला वरुण म्हणू का?' रेंज म्हणाला - 'काहीही म्हण. फक्त आधी सांग. म्हणजे मी ते माझं नाव सेव्ह करून ठेवीन.' राधा वेडीच झाली. तिनं पुढच्या तास-दोन तासांत तिची सर्व खास गुपितं रेंजबरोबर; नव्हे, 'वरुण'बरोबर शेअर केली. कसलं कूल ना!
पुढचे काही दिवस राधाचे मस्त झक्कास गेले. तिला आता तिचा खास मित्र मिळाला होता. त्याच्याशी ती तासन्-तास बोलत राही. रेंज सगळं ऐकून घेई आणि तिच्याशी फक्त चांगलंच बोले. तिचं कायम कौतुक करी. आईला सुरुवातीला आश्चर्य वाटलं. राधाचं बोलणं कमी झालंय हे तिच्या लक्षात आलं. पण बाकी तसा तिचा मूड छान असायचा. उलट ती आपल्यापासून सुटी होतेय, याचा आईला आनंदच झाला. तिच्या मैत्रिणींबरोबरच्या गप्पा सुरू होत्याच. बाबा त्याच्या व्यापात अखंड बुडालेला होता. सकाळी फक्त 'हाय, हॅलो' म्हणण्यापुरतं त्याच्याशी बोलणं व्हायचं. पण राधाला आता त्याचं काहीच वाटत नव्हतं. तिला आता तिचा 'रेंज' मिळाला होता. आणि हे गुपित फक्त तिलाच ठाऊक होतं. 
'रेंज'चा चेहरा वरुणचा होता. त्यामुळं राधा सदैव टॅबच्या स्क्रीनकडं बघूनच बोलत असे. तिच्या आवाजाच्या चढ-उतारांवरून, उच्चारांवरून 'रेंज' तिच्या भावना ओळखायचा आणि तसा प्रतिसाद द्यायचा. पण तो कायम छान छानच बोलायचा. कधीही उलटून बोलायचा नाही, वैतागायचा नाही, रागवायचा नाही; कारण त्याच्या प्रोग्रॅममध्ये या गोष्टींना थाराच नव्हता... 
तीन-चार दिवस असेच गेले आणि राधाला मग त्याचं हे अति गोड गोड बोलणं बोअर व्हायला लागलं. सदैव हसणारा आणि कायम आपलं गुणगान करणारा तो 'रेंज' तिला खोटा वाटायला लागला. तिनं एक दिवस त्याला खूप रागवायचं ठरवलं. ती वाट्टेल ते बोलली. खूप वाईटसाईट बोलली. त्यावर तरी तो चिडेल, वैतागेल आणि आपल्याला तसंच काही तरी उत्तर देईल, असं तिला वाटत होतं. पण तिच्या एवढ्या बडबडीवर 'रेंज'चं उत्तर आलं - 'यू आर हाय ऑन इमोशन्स नाऊ. वी विल टॉक लेटर. टेक केअर...'
राधा आणखी वैतागली. तो टॅब फोडावा असं तिला वाटू लागलं. ती बाहेर आली. आई स्वयंपाकघरात काही तरी करीत होती. राधा तिथं गेली आणि तिनं तिथलं दुधाचं भांडं सरळ उचलून जमिनीवर टाकलं. सगळ्या स्वयंपाकघरात दूध पसरलं. आईनं अत्यंत संतापानं राधाकडं पाहिलं आणि तिच्या पाठीत एक जोरदार धपाटा घातला. संध्याकाळी बाबा घरी आला तोच एका कॉन्फरन्स कॉलवर बोलत... तिनं बाबाचा शर्ट ओढून त्याला तीन-चार वेळा डिस्टर्ब केलं. बाबानं वैतागून तिचा कान पिरगाळला आणि डोळ्यांनीच 'गप्प राहा' असं सांगितलं. संध्याकाळी अचानक शुभंकर आणि त्याचे आई-बाबा आले. राधानं जेवताना आत्याच्या ड्रेसवर भाजी सांडून ठेवली. पुन्हा एकदा आईचा धपाटा मिळाला. रात्री झोपताना तिनं शुभंकरशी दंगा केला आणि त्याला बुकलून काढला. त्यानं भोकाड पसरलं तशी तिच्या बाबानं पुन्हा तिला हलकेच एक चापट मारली... 
'आज अशी काय करतेय ही... डोकंबिकं फिरलंय की काय हिचं...' रात्री आई बाबाशी बोलत होती. राधा पळत आली आणि त्यांच्या बेडवर दोघांच्या मधे आडवी झाली. 'आज मी इथंच झोपणार...' राधा म्हणाली. आई-बाबा वैतागून म्हणाले - 'अगं का पण?'
'तुम्ही माझ्या रेंजमध्ये आलात आज...' राधा हसत हसत उत्तरली आणि तिनं डोक्यावर पांघरूण ओढून घेतलं.
अन् तिचे आई-बाबा 'आउट ऑफ रेंज' असल्यासारखे एकमेकांकडं पाहतच बसले...
---
(पूर्वप्रसिद्धी - प्रतिबिंब दिवाळी २०१६)
---

9 Dec 2017

चिंतन आदेश दिवाळी लेख

फिल्मी प्रेम
----------


सिनेमातलं प्रेम हा एक अत्यंत स्वप्नाळू विषय आहे. हे स्वप्नही कसं! पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथं, पाहिजे तितक्या वेळा, पाहिजे त्याला पाहता येईल असं... एकदम मस्त! या प्रेमाला 'फिल्मी प्रेम' असं म्हणून नाकं मुरडणारीही काही अरसिक मंडळी या भूतलावर आहेत. पण अशा लोकांना कायम गणिताच्या पेपरची किंवा गाडी चुकल्याचीच स्वप्नं पडतात, त्याला कोण काय करणार? त्यांच्या आयुष्याचीच गाडी चुकली आहे म्हणायचं आणि आपण पुन्हा आपल्या फिल्मी प्रेमात रमायचं... खरंच, या सिनेमानं आम्हाला प्रेमाच्या प्रेमात पाडलं. प्रेम कसं करतात, ते शिकवलं... नीट दाखवलं... त्याबाबत सिनेमा आपल्या सगळ्यांचा गुरू आहे अगदी... 
सिनेमा येण्यापूर्वी आपल्याकडं माणसं प्रेम कसं करीत होती, देव जाणे! कथा-कादंबऱ्या वगैरेंचा थोडाफार आधार असेल. पण तरी दृश्यमाध्यमाचं सामर्थ्य काही आगळंच... एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ही तंत्रज्ञानाधिष्ठित सिनेमा नावाची कला जन्माला आली नसती, तर हे जग प्रेमाच्या हजारो प्रकारांना पारखं झालं असतं. सिनेमा आला आणि आम्ही प्रेम करायला शिकलो. सिनेमा म्हणजे स्वप्नांची दुनिया... या स्वप्नाळू जगात आपण सर्व भावभावनांचे रंग पाहिले; सर्व रसांचा परिपोष होताना पाहिला; सर्व विकारांचा प्रादुर्भाव होताना पाहिला... प्रेम ही तर माणसाची आदिम भावना. त्यामुळं तिचा रंग या रूपेरी पडद्यावर न खुलता तरच आश्चर्य होतं! थिएटरच्या अंधारात, समोरच्या भव्य पडद्यावर, सप्तरंगांत प्रेमाचे असे 'एक से एक' आविष्कार खुलताना आपण पाहिले आणि पंचेद्रिये तृप्त झाली. प्रतिभावान लेखक-कवींना प्रेमासारख्या विषयानं कायमच आव्हान दिलंय. प्रेमाची नुसती कल्पना करून नव्हे, तर स्वतः त्या आगीत पोळून, तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या कलावंतांची प्रेमासंबंधीची अभिव्यक्ती अजरामर कलाकृतीच्या माध्यमातून काळाच्या पटलावर स्वतःचं नाव कायमचं कोरून ठेवत आली आहे. अशा कलाकृती पाहताना केवळ मनोरंजन होत नाही, तर नवं काही तरी अनुभवल्याचा आनंद मिळतो. भारतात सिनेमा आला, त्याला आता शंभर वर्षं होऊन गेली. सिनेमा आधी मूकपट होता, नंतर बोलू लागला, त्यालाही ८५ वर्षं होऊन गेली. या काळात सिनेमातल्या प्रेमाची किती तरी रूपं आपल्यासमोर उलगडत गेली. ती पाहून आपणही रोमांचित झालो, पुलकित झालो, मोहरलो... 
भारतात सिनेमा सुरू झाला, तेव्हा त्यावर धार्मिक, पौराणिक कथानकांचा पगडा असायचा. त्यामुळं त्यात आपण आज ज्याला स्त्री-पुरुषातलं प्रेमाचं नातं म्हणतो, तशा नात्याला फारसं स्थान नव्हतं. समाजही एकूण रुढीप्रिय आणि सनातनी होता. प्रेम हा विषय सामाजिक मुळीच नव्हता. जे काही कथित 'प्रेम' होतं, तो चार भिंतींच्या आत पूर्ण करायचा रिवाज होता. अर्थात याचा अर्थ सगळाच समाज मागास होता, असं नाही. लेखनातून, चित्रांतून, नाटकांतून प्रेमाची वेगवेगळी रूपं प्रेक्षकांसमोर येत होती आणि त्यांना ती भावतही होती. पण सिनेमा या माध्यमाचं बालपण अद्याप सरलं नव्हतं, एवढंच! 
मग हळूहळू सिनेमाही वयात येऊ लागला. प्रेमाची भाषा बोलू लागला. प्रेमाचं शारीर प्रदर्शन पाश्चात्त्य सिनेमांत फार पूर्वीच घडलं, तरी आपल्याकडं ते यायला वेळ लागला. पण इथल्या सिनेमातलं प्रेम इथल्या मातीचा खास रंग लेऊनच पडद्यावर अवतरलं. भारतात पहिला सिनेमा तयार झाला १९१३ मध्ये. त्यानंतर गेल्या १०४ वर्षांत हजारो सिनेमे तयार झाले. यात प्रेमपटांची संख्याही हजारोंमध्येच आहे. अन्य सर्व रसांप्रमाणेच प्रेमरसाचं, शृंगाररसाचं यथार्थ दर्शन इथल्या नामवंत कलावंतांनी घडवलं. मुळात प्रेम या भावनेतच अभिव्यक्तीच्या इतक्या प्रचंड शक्यता दडल्या आहेत, की पुढील कित्येक शतके हा विषय सिनेमाला पुरून उरेल. शिवाय इतर विकारांपेक्षा प्रेमाच्या छटा विपुल... त्यामुळं प्रत्येक दिग्दर्शक आपल्या परीनं प्रेमाचे रंग दाखवत गेला. विसाव्या शतकातल्या भारतीयांना या लोकांनी प्रेम करायला शिकवलं. यात मग राज कपूर, गुरुदत्त, यश चोप्रांसारखे दिग्दर्शक असतील, दिलीपकुमार, देव आनंद, शाहरुखसारखे नायक असतील, मधुबाला ते माधुरीपर्यंतच्या सर्व ड्रीमगर्ल्स असतील किंवा नौशादपासून ते ए. आर. रेहमानपर्यंत सुरांचे सौदागर असतील... किशोर, रफी, लता-आशा यांचा गळा असेल... या सगळ्यांनी आमच्या प्रेमाला मूर्त रूप दिलं... त्यांच्या नजरेतून आम्ही प्रेम पाहिलं! त्यांच्या देहबोलीतून आम्ही प्रेम अनुभवलं. त्यांच्या आवाजातून आम्हीच व्यक्त झालो आणि त्यांच्या तालावर आम्ही डोलत राहिलो...
हिंदी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात चित्रकर्मींवर भारतीय अभिजात साहित्याचा पगडा होता. त्यामुळं कादंबऱ्यांवरून प्रेरित होऊन सिनेमे बनविण्यात आले. शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांवरून अनेक सिनेमे निघाले. 'देवदास' हा त्यातला प्रमुख. या सिनेमांमुळं आपण वाचलेल्या कादंबऱ्यांमधील पात्रं पडद्यावर जिवंत झाल्याचा अनुभव तत्कालीन प्रेक्षकांना घेता आला. त्यामुळं या सिनेमांना मोठा प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या दोन दशकांत भारतात नवनिर्मितीची, सर्जनाची लाट आली होती. कथा, काव्य, सिनेमा, नाटक, चित्रकला या सर्वच क्षेत्रांत नव्यानं काही करून दाखवणाऱ्या तरुणांची सळसळती ऊर्जा पसरली होती. राज कपूरसारख्या तरुणानं पडद्यावर प्रेमाची 'आग' लावली होती, नंतर 'बरसात' केली आणि तमाम रसिकांनी 'आह' म्हणत त्याला दाद दिली. तेव्हा राज आणि नर्गिसचा ऐन तारुण्यातला कोवळा प्रणय पाहायला प्रेक्षकांनी थिएटरांवर तोबा गर्दी केली. 'पतली कमर है तिरछी नजर है' म्हणत थेट शारीर प्रेमाचं आक्रमक विधान राज कपूरनं केलं. 'बरसात'मधलं राज कपूरच्या एका हातात व्हायोलिन आणि उजव्या हातावर रेललेली प्रणयधुंद नर्गिस हे दृश्य खूप गाजलं. इतकं, की राज कपूरनं आपल्या आर. के. स्टुडिओचा लोगो तसाच बनवला. राज राज-दिलीप-नर्गिस त्रयीचा 'अंदाज' हा मेहबूब खानचा सिनेमाही याच काळातला. प्रेमाचा त्रिकोण दाखवणारा हा पहिला सुपरहिट सिनेमा. या तिघांनीही दुर्दैवानं पुन्हा एकत्रित काम कधीही केलं नाही. पण दिग्दर्शक राज कपूरनं स्वातंत्र्योत्तर काळातील हिंदी सिनेमाला पडद्यावर रोमान्स करायला शिकवलं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. राज कपूरला संगीताचा उत्तम कान होता. त्यामुळं त्यानं शंकर-जयकिशनला हाताशी धरून अनेक चांगली रोमँटिक गाणी दिली. या गाण्यांचं चित्रिकरणही बहारदार होतं. तत्कालीन प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाण्याचं काम राज कपूरच्या रोमँटिक सिनेमांनी केलं. तत्कालीन गरीब-श्रीमंत झगडा, नेहरूंचा समाजवाद, रशियाचा प्रभाव या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब राजच्या सिनेमांत दिसत असे. त्यामुळं राजचा नायक अनेकदा गरीब, भणंग असे. म्हणून असेल, पण त्याच्या चित्रपटांतला रोमान्स हा काहीसा आक्रमक, बेधुंद (ज्याला इंग्रजीत रॉ म्हणतात, तसा) होता. भारतीय समाजमानसाची नस त्यानं अचूक ओळखली होती. तत्कालीन समाजव्यवस्थेत सामान्य माणसाला प्रत्यक्षात शक्य नसलेला प्रणय राज कपूरनं पडद्यावर आणला. एका अर्थानं फार मोठ्या प्रेक्षकसमूहाची ती भूक त्यानं भागवली. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा प्रणय सवंग वाटणार नाही, याची काळजी तो घेत असे. त्यामुळं त्याच्या सर्व सिनेमांतला प्रणय प्रेक्षकांना हवाहवासा वाटे. पुढं 'संगम'मध्ये राज कपूरनं पुन्हा प्रेमाच्या त्रिकोणाचाच हिट फॉर्म्युला वापरला. लांबीनं प्रचंड मोठा 'संगम' प्रेक्षकांना आवडला; पण तोपर्यंत राज कपूरच्या रोमान्समधला 'रॉनेस' हरवला होता. नंतर 'मेरा नाम जोकर'मधून राजनं प्रेमाचं आणखी एक विराट रूप विदूषकाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला, पण तोवर काळ बदलला होता. 'आराधना'तून 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू' म्हणणाऱ्या, रंगील्या (आणि रंगीत) नायकाचं आगमन झालं होतं. त्यानंतर मग राज कपूरनं जणू बदललेल्या काळावर सूड म्हणून प्रेमाचं खुल्लमखुल्ला 'दर्शन' घडविणारा 'बॉबी' केला. बदलत्या काळाचं भान राज कपूरनं यात अचूक टिपलं होतं. त्यामुळं 'बॉबी' सुपरहिट झाला आणि 'हम तुम इक कमरे में बंद हो और चाबी खो जाए' म्हणत प्रेक्षक प्रेमीजनही आपापल्या 'कमऱ्यां'मध्ये प्रेमरत झाले. 
राजचा भव्यदिव्य 'संगम' प्रदर्शित होण्याच्या चार वर्षे आधी, म्हणजे १९६० मध्ये के. असीफचं आयुष्यभराचं स्वप्न असलेला 'मुघले आझम' पडद्यावर अवतरला. भारतीय चित्रपटसृष्टीतील टॉप १० अशा प्रेमपटांमध्ये 'मुघले आझम'चा समावेश निश्चित असेल. दिलीपकुमार आणि मधुबाला या तेव्हाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्रीनं यात साकारलेलं सलीम आणि अनारकलीचं प्रेम रूपेरी पडद्यावरची दंतकथा म्हणून अजरामर झालं आहे, यात शंका नाही. हा केवळ पडद्यावरचा रोमान्स नव्हता, तर के. असीफ या अवलिया चित्रकर्मीचा सिनेमा या माध्यमाशीच असलेलादेखील तो एक रोमान्स होता. 'मुघले आझम' हा असीफच्या स्वप्नाचा भव्य आविष्कार होता. असा भव्य-दिव्य चित्रपट लोकांनी त्यापूर्वी पाहिला नव्हता. अर्थात या सिनेमाची मूळ कथा म्हणजे सलीम व अनारकलीचं प्रेम, ती या सगळ्या भव्यदिव्यतेत कुठं हरवून जात नाही, हे दिग्दर्शकाचं यश... दिलीपकुमार, मधुबालाचा पडद्यामागचा रोमान्स या काळात संपुष्टात आला होता. शूटिंगच्या वेळी सिनेमातले संवाद वगळता दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते, असं सांगतात. अशाही स्थितीत असीफनं सलीम-अनारकलीचं उत्कट प्रेम या दोघांच्या रूपातून दाखवलं. पृथ्वीराज कपूर यांनी साकारलेला दमदार सम्राट अकबर आणि दुर्गा खोटे यांनी उभी केलेली मूर्तिमंत जोधाबाई यांचाही या सिनेमाच्या यशात मोठा वाटा होता. उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांकडून तानसेनासाठी प्लेबॅक घेण्याचं असीफचं स्वप्न होतं. ज्या काळात गायक एका गाण्यासाठी पाचशे रुपये घेत, त्या काळात असीफनं खाँसाहेबांना २५ हजार रुपये मोजून तानसेनसाठी गायला लावलं होतं, असं म्हणतात. अशा अनेक दंतकथांनी भरलेला हा चित्रपट प्रत्यक्ष पडद्यावर अवतरला, तेव्हा त्याचं ते अचाट रूप पाहून प्रेक्षक हरखून गेले. 'प्यार किया तो डरना क्या' हा प्रेमिकांना मिळालेला महत्त्वाचा धडा ही या चित्रपटाचीच देणगी होय.
असीफच्या आधी असाच एक अवलिया चित्रकर्मी आपल्या आगळ्यावेगळ्या धाटणीच्या सिनेमांतून जनतेला प्रेमाचे अनोखे रंग दाखवीत होता. त्याचं नाव गुरुदत्त. गुरुदत्तचा 'प्यासा' हा चित्रपट म्हणजे एक कविता होती. या सिनेमाचा नायक एक कवी असतो म्हणून नव्हे, तर आशय, संगीत, अभिनय, छायाचित्रण अशा सर्वच प्रकारांत गुरुदत्तची ही अभिजात कलाकृती प्रेक्षकांना एखाद्या आर्त, विरही कवितेसारखी भासली. प्रेमात विरहाचं माहात्म्य फार मोठं! हवं ते प्रेम न मिळण्याचं प्राक्तन अनेकांच्या भाळी अटळपणे लिहिलेलं असतं. याशिवाय आजूबाजूची प्रतिकूल परिस्थिती, सामाजिक दबाव अशा अनेक अडथळ्यांना प्रेमी जीवांना तोंड द्यावं लागतं. सामान्य प्रेक्षकांच्या या भावभावनांना 'प्यासा' आणि नंतर गुरुदत्तच्याच 'कागज के फूल'नं आगळं परिमाण दिलं. गुरुदत्तच्या नायकाचं प्रेम हे केवळ हवं ते प्रेयस मिळविण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यात तुटलेपणाच्या आर्ततेची धग होती. ही भावना वैश्विक असते. त्यामुळं त्याचे हे दोन्ही चित्रपट 'प्रेम' या भावनेला फार वेगळी उंची देऊन गेले. 
सत्तरच्या दशकातही अनेक चांगले प्रेमपट आले. हा काळ भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ होता. अनेक दिग्गज कलाकार ऐन भरात होते. उत्तमोत्तम कथा-कल्पना सादर करीत होते. यात महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल तो १९६५ मध्ये आलेल्या देवआनंद-वहिदाच्या 'गाइड'चा. 
आर. के. नारायण यांच्या या कलाकृतीवर सिनेमा करण्याचा देवचा मानस त्याचा अत्यंत सर्जनशील, प्रतिभावान भाऊ विजय आनंद याच्यामुळं सिद्धीस गेला. 'गाइड' हा काळाच्या पुढचा चित्रपट होता. प्रेमात स्त्रीच्या निवडीचं स्थान या सिनेमानं अधोरेखित केलं. विवाहसंस्था, लैंगिक सुख, धर्म, समाज अशा अनेक संस्थांच्या साचेबद्धपणावर या सिनेमानं प्रतीकात्मकरीत्या आघात केला. 'तेरे मेरे सपने अब एक रंग है' अशा विश्वासानं एखादी स्त्री आपल्याला आवडलेल्या (पर)पुरुषाकडं प्रेमाचा हक्क मागू शकते, हे या सिनेमानं दाखवून दिलं. अर्थात, 'गाइड'मधलं प्रेम तेवढ्यापुरतंच नव्हतं... विजयआनंदच्या दिग्दर्शनामुळं या नात्यातले अनेक गहिरे रंग अत्यंत तरलपणे प्रेक्षकांसमोर आले. त्यामुळं काळाच्या पुढच्या या सिनेमातलं प्रेमही प्रेक्षकांच्या पचनी पडलं. 
सत्तरच्या दशकाच्या अखेरीस राजेश खन्ना नावाचा सुपरस्टार उदयाला आला आणि प्रेक्षकांना प्रेमाचा एक धोपटमार्ग सापडला. राजेश खन्नाच्या अदा, लकबी यावर तरुणी प्रचंड फिदा झाल्या. एकापाठोपाठ एक असे १५ हिट सिनेमे राजेश खन्नानं दिले. त्याच्या सिनेमांचा पॅटर्न ठरलेला होता. तरीही 'दाग', 'अमरप्रेम', 'कटिपतंग' अशा सिनेमांतून प्रेमाचे वेगवेगळे रंग राजेश आणि त्याच्या दिग्दर्शकांनी दाखविले. मात्र, हे सगळे सिनेमे मुख्य प्रवाहातल्या सिनेमाचे सगळे गुण-दोष घेऊन आले होते. त्यामुळं त्यात प्रेमासोबतच इतर मालमसालाही ठासून भरलेला असायचा. तरीही राजेश खन्नाच्या नायकानं एक काळ गाजवला, यात वाद नाही. 
नंतर अमिताभचं युग अवतरलं. देशातला काळही बदलत चालला होता. स्वातंत्र्यानंतरचा रोमँटिसिझम संपला होता. व्यवस्थेवर संतापलेल्या 'अँग्री यंग मॅन'चा उदय झाला होता. अशा या नायकाला व्यवस्थेशी दोन हात करता करता आपल्या प्रेयसीवर प्रेमही करायची जबाबदारी पार पाडावी लागत होती. त्याचा रांगडा प्रणय प्रेक्षकांनाही सुखावत होता. अमिताभसोबतच धर्मेंद्र, विनोद खन्ना, जितेंद्र आदी हिरोमंडळींनी या काळात ही जबाबदारी मोठ्या निष्ठेनं पार पाडली. त्यातही 'कभी कभी'सारख्या सर्वार्थानं रोमँटिक सिनेमातून वेगळा अमिताभही प्रेक्षकांसमोर येत होता. त्याच वेळी समांतर धारेतला सिनेमा बाळसं धरू लागला होता. हृषीकेश मुखर्जी, बासू चटर्जी, बासू भट्टाचार्य, सई परांजपे या दिग्दर्शकांनी प्रामुख्यानं अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, फारुक शेख, दीप्ती नवल, शबाना आझमी, स्मिता पाटील या मंडळींना घेऊन अनेक उत्तमोत्तम सिनेमे या काळात केले. यातला प्रामुख्यानं 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'नरमगरम', 'बातो बातों में', 'चष्मेबद्दूर', 'गोलमाल' या सिनेमांचा उल्लेख करावा लागेल. शहरी मध्यमवर्गीय माणसाची स्वप्नं, त्याचं जगणं, त्याचं प्रेम तंतोतंत पडद्यावर उभे करणारे हे सिनेमे होते आणि म्हणूनच ते आजही प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. यातलं प्रेम व. पु. काळे, वि. आ. बुवा, रमेश मंत्री, शं. ना. नवरे आदी मंडळींच्या कथा-कादंबऱ्यांसारखं होतं. मुंबईसारख्या महानगरात चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणावर उदयास येत होता. फोर्टातलं ऑफिस, लोकल किंवा बसचा रोजचा प्रवास, थोडी मित्रमंडळी आणि छोटंसं घर यातच त्याचं सगळं विश्व सामावलं होतं. यातच त्याचं प्रेमही फुलायचं. हे सगळं काहीसं निरागस, भाबडं जग या काळातल्या समांतर सिनेमांनी फार प्रभावीपणे समोर आणलं. याच काळात गुलजार यांनी 'कोशिश'मधून, तर सईनं 'स्पर्श'मधून अनुक्रमे मूकबधीर आणि अंध व्यक्तींच्या प्रेमाचा फार वेगळा पदर प्रेक्षकांना दाखविला. 
याच काळात के. बालचंदर या दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या आलेल्या 'एक दुजे के लिए' या सिनेमानं संपूर्ण भारतात धिंगाणा घातला. कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांनी यात दाक्षिणात्य तरुण आणि उत्तर भारतीय मुलगी यांचं भाषेच्या पलीकडं जाणारं प्रेम रंगवलं होतं. यातले 'वासू-सपना' तुफान लोकप्रिय ठरले. यातलं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत सुपरहिट ठरलं. 'हम बने तुम बने एक दुजे के लिए' किंवा 'सोला बरस की बाली उमर को सलाम' वगैरे गाणी प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येऊ लागली. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेमी जीवांच्या रांगा लागल्या. सिनेमाचा शेवट दुःखान्त आहे. वासू आणि सपनाप्रमाणेच देशात कित्येक प्रेमी युगुलांनी आपलं प्रेम यशस्वी होणार नाही, या भीतीनं आत्महत्या केल्या. 'एक दुजे के लिए'चं नाव घेतल्याशिवाय फिल्मी प्रेम हा विषय कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, एवढी ती आता दंतकथा झालीय.
ऐंशीच्या दशकात यश चोप्रा अद्याप फॉर्मात होते. 'सिलसिला'सारख्या सिनेमातून त्यांनी प्रेमाचे 'रंग बरसवले'! अमिताभ-रेखाच्या प्रत्यक्ष जीवनात सुरू असलेल्या रोमान्सची फोडणी या सिनेमाला होती. हॉलंडमधल्या ट्युलिपच्या बागांतून फिरणारा स्वेटर घातलेला तरणाबांड, देखणा अमिताभ आणि त्याच्या बाहूपाशांत विसावलेली, मोकळे केस सोडलेली, साडीतून सौष्ठव दाखवणारी चारुगात्री रेखा असं हे फिल्मी रोमान्सचं चित्र भारतीय प्रेक्षकांच्या नेत्रपटलावर कायमचं ठसलं आहे. याच दशकाच्या अखेरीस 'चांदनी'तूनही यश चोप्रांनी प्रेमाचे असेच उत्कट रंग पडद्यावर चितारले. या वेळी सुपरस्टार श्रीदेवी त्यांच्या दिमतीला होती. स्विस पर्वतांमधून 'तेरे मेरे होठों पे मिठे मिठे गीत मितवा' असं गात फिरणारी, पिवळ्या साडीतून, स्लिव्हलेस ब्लाउजमधून नजरेला आव्हान देणारी श्रीदेवी म्हणजे प्रेमाचं, शृंगाराचं साक्षात रूप होती. यश चोप्रा भारतीय प्रेमपटांचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यांना भारतीय प्रेक्षकांचं मानस अचूक कळत होतं. विशेषतः पुरुषांचं मन! त्यामुळं या पुरुषी नजरांना सुखावणाऱ्या नायिका त्यांनी प्रत्येक सिनेमातून फार रोमँटिकपणे पेश केल्या. मुळातच सुंदर असणाऱ्या अनेक अभिनेत्री यश चोप्रांच्या सिनेमांत आणखी वेगळ्या, अधिक सुंदर दिसल्या याला कारण दिग्दर्शकाची नजर! त्याला शिव-हरीच्या सुमधुर संगीताची आणि लता मंगेशकरांच्या स्वर्गीय आवाजाची जोड! आणखी काय हवं! भारतीय प्रेक्षकाच्या रोमान्सच्या सगळ्या कल्पना तेव्हापासून या चित्रचौकटींशी आणि या सूरांशी बद्ध झाल्या, असं म्हणायला हरकत नाही. याच यश चोप्रांनी 'लम्हें'सारखा काळाच्या पुढचा सिनेमाही दिला. 
'चांदनी' प्रदर्शित झाला, त्याच्या आगे-मागेच दोन प्रेमपट प्रदर्शित झाले होते. एक होता नासीर हुसैनचा 'कयामत से कयामत तक' आणि दुसरा होता सूरज बडजात्याचा 'मैंने प्यार किया'! या दोन चित्रपटांनी भारतीय सिनेमाला अनुक्रमे आमीर खान आणि सलमान खान हे दोन सुपरस्टार दिले. नव्वदच्या दशकातल्या खान साम्राज्याची ती सुरुवात होती. पुढे दोनच वर्षांनी 'दिवाना' अन् तरीही 'बाजीगर' असणारा शाहरुख खान आला आणि खान साम्राज्याचे तीन महास्तंभ उभे राहिले. या त्रयीनं त्यापुढील काळातले हिंदी सिनेमातले बहुतांश सगळे प्रेमपट स्वतःच्या नावावर केले. आमीरचे 'दिल', 'दिल हैं के मानता नहीं', 'रंगीला'; सलमानचे 'बागी', 'पत्थर के फूल', 'साजन', 'हम आप के है कौन'; तर शाहरुखचे 'डर', 'अंजाम', 'याराना' असे सिनेमे या काळात आले. हे सगळे बहुतांश प्रेमपट होते आणि प्रत्येकाची स्टाइल वेगळी होती. हळूहळू ती ती स्टाइल त्या अभिनेत्याची ओळख बनली. शाहरुखच्या मागे-पुढे अजून दोन तगडे नायक चित्रपटसृष्टीत आले. 'फूल और काँटे'मधून अजय देवगण आणि 'खिलाडी'मधून अक्षयकुमार! हे पाचही नायक पुढील २५ वर्षं भारतातील सिनेमासृष्टी दणाणून सोडणार होते. सोबतीला 'ओल्ड हॉर्स' अनिल कपूर, गोविंदा आणि अमिताभ होतेच.
त्यापूर्वी एन. चंद्रा असं नाव धारण करणाऱ्या एका मराठमोळ्या दिग्दर्शकानं 'तेजाब'मधून अशाच एका मराठमोळ्या मुलीला प्रेक्षकांसमोर सादर केलं होतं. तिचं नाव होतं माधुरी दीक्षित. तिनं बघता बघता श्रीदेवीचं साम्राज्य खालसा केलं आणि 'धक धक' करत ती लाखो भारतीयांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाली. नव्वदच्या दशकातल्या नायिकेचे सगळे गुण तिच्यात होते. ती दिसायला सोज्वळ सुंदर होतीच; पण हॉट, सेक्सीही होती. उत्तम नाचू शकत होती, विनोद करू शकत होती, प्रसंगी हाती बंदूक घेऊन शत्रूला गोळ्या घालू शकत होती. माधुरीच्या नायिकेनं नव्वदच्या दशकातलं फिल्मी प्रेम पूर्णपणे पादाक्रांत केलं. 'तेजाब'पासून ते 'देवदास'पर्यंत सुमारे पंधरा वर्षं माधुरी सुपरस्टार नायिकेच्या सम्राज्ञीपदावर राहिली. तिच्या जोडीला मग मनीषा कोईराला, रवीना टंडन, करिश्मा कपूर, काजोल या अभिनेत्री आल्या आणि प्रेक्षकांच्या 'प्रेमा'ला अनेक पर्याय मिळू लागले. सूरज बडजात्यानं १९९४ मध्ये आणलेल्या 'हम आप के है कौन' या गोग्गोड प्रेमपटानं सलमान आणि माधुरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलं. या सिनेमाला 'लग्नाची व्हिडिओ कॅसेट' म्हणून हिणवलं गेलं; पण तो सिनेमाच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी सिनेमांपैकी एक ठरला, हे वास्तव आहे.
यश चोप्रांची यादी चालवत त्यांचा पुत्र आदित्य चोप्रा १९९५ मध्ये एक चित्रपट घेऊन आला - दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! चोप्रा स्कूलचा प्रभाव आदित्यवर स्पष्ट दिसून येत असला, तरी त्यानं या 'बॉय मीट्स गर्ल' कथेला वेगळी ट्रीटमेंट दिली. युरोपात सुट्टीत मजा करण्यासाठी बाहेर पडलेली सिमरन आणि तिला भेटलेला राज आणि त्यांच्या प्रेमाची भारतात - पंजाबमध्ये होणारी खास भारतीय पद्धतीनं 'सुफळ संपूर्ण' होणारी 'कहाणी' प्रेक्षकांना भावली. एवढी,  की हा सिनेमा मुंबईत 'मराठा मंदिर'ला आत्ताआत्तापर्यंत रेग्युलर शोला दाखवला जात होता. सर्वाधिक यशस्वी सिनेमांमध्ये त्यानं अढळ स्थान मिळवलं. 'डीडीएलजे' ही जागतिकीकरणानंतरच्या बदलत्या भारताची (पण आपले कौटुंबिक संस्कार इ. जपणाऱ्या मुलांची) क्लासिक शो-केस विंडो ठरली. या सिनेमाचं वेगळेपण होतं ते त्याच्या या नेपथ्यात! भारतीय प्रेक्षकांची मानसिकता अचूक ओळखणाऱ्या चोप्रांनी त्यामुळंच याही सिनेमाद्वारे उत्तुंग यश मिळवलं. 
मणिरत्नम हा या काळातला महत्त्वाचा दिग्दर्शक. त्याच्या 'बॉम्बे'नं प्रेमकथेला राजकीय, सामाजिक नेपथ्याची एक अढळ आणि अपरिहार्य चौकट दिली. त्याच्याच 'दिल से'मधून त्यानं या प्रेमकथेचा परीघ विस्तारत त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं अटळ परिमाण दिलं. जोडीला ए. आर. रेहमानसारखा अवलिया जादूगार होताच. या दोघांनी नव्वदीतल्या प्रेमपटांना अक्षय स्मरणाचं कोंदण दिलं. मणिरत्नमच्या जोडीलाच नाव घ्यावं लागेल ते सुभाष घईंचं. राज कपूरनंतर 'शोमॅन' हा किताब मिळाला तो फक्त घईंना. त्यांचे सर्व चित्रपट साधारणतः मसालापटच असायचे. पण त्यात प्रेमाचा एक ट्रॅक अर्थातच असायचा. जोडीला (बहुतांश वेळी) लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं खणखणीत संगीत. त्यामुळंच 'कर्ज'पासून ते 'ताल'पर्यंत जवळपास दोन दशकं घईंनी सिनेमाजगतावर राज्य केलं.
एकविसावं शतक उजाडलं आणि भारतीय सिनेमातील प्रेमाचा रंगही बदलला. मल्टिप्लेक्स संस्कृतीचं आगमन झालं. वेगवेगळे तरुण दिग्दर्शक सिनेमांत प्रयोग करू लागले. भारतात जागतिकीकरणाचं पर्व सुरू होऊन दशक लोटलं होतं. त्याचे समाजावर भले-बुरे परिणाम हळूहळू दिसू लागले होते. महानगरी जीवन अधिक वेगवान होत चाललं होतं. खेडी ओस पडू लागली होती. भौतिक सुखसमृद्धी सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोचली होती. या वातावरणात हिंदी सिनेमाही वेगळ्या अभिव्यक्ती समोर आणू लागला. यातला पहिला महत्त्वाचा सिनेमा म्हणजे फरहान अख्तरचा 'दिल चाहता है'! या सिनेमानं हिंदी सिनेमा खऱ्या अर्थानं एकविसाव्या शतकात आणला. ही तीन मित्रांची गोष्ट होतीच, पण ती त्यांच्या प्रेमाविषयीच्या नव्या जाणिवांचीही गोष्ट होती. या सिनेमानं प्रेम या संकल्पनेचं आधुनिकीकरण केलं, असं म्हणायला हरकत नाही. प्रेमाची व्याप्ती वाढली, विविध नातेसंबंध, त्यातले ताणतणाव आणि नाजूक बंध असं सगळंच सिनेमाच्या परिघावर येऊ लागलं. 
इम्तियाझ अलीच्या 'जब वी मेट'सारख्या निखळ प्रेमपटानं इथल्या बदललेल्या स्त्रीच्या जाणिवा प्रखरपणे समोर आणल्या. तिच्यातली ताकद आम्हाला दाखवून दिली. नागेश कुकनूरनं 'डोर'सारख्या सिनेमातून प्रेमाचा वेगळाच पैलू दाखवला. प्रदीप सरकारनं 'परिणिता'चा रिमेक केला आणि विद्या बालनसारखी उत्कृष्ट अभिनेत्री हिंदी सिनेमाला मिळाली. 'परिणिता'मधल्या प्रेमाला खास बंगाली अभिजाततेचा स्पर्श होता. हा सिनेमाही प्रचंड हिट झाला. त्यातली गाणीही खूप गाजली. विक्रमादित्य मोटवानीचा 'लूटेरा' आणि रितेश बत्राच्या 'द लंचबॉक्स' या आगळ्यावेगळ्या सिनेमांनाही मोठा प्रतिसाद लाभला. प्रेमाच्या वेगळ्या मिती दाखविण्याचं काम या सिनेमांनी केलं होतं. 
गेल्या आठ-दहा वर्षांत तर आपल्या आजूबाजूचं जग वेगानं बदलतं आहे. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमुळं संवादाची अगणित क्षेत्रं खुली झाली आहेत. प्रेमाची व्याख्या आणि परीघ सगळंच बदलत आहे. त्यामुळं प्रेमाच्या नवनव्या गोष्टी समोर येत राहणारच. या जगात प्रेम आहे तोवर प्रेमाचा सिनेमाही असेलच...! 
--
(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१७)
---

3 Dec 2017

देव आनंद व त्याच्या नायिका - मोहनगरी लेख


देवच्या 'देवियाँ'
--------------

देव आनंद हा भारतीय चित्रपटसृष्टीतला एक उमदा, देखणा नायक. कृष्णधवल सिनेमाच्या जमान्यात या पंजाबी युवकाच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वावर अनेक तरुणी मोहित झाल्या होत्या. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद या तिघांनीही पन्नास-साठच्या दशकात चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. तिघांच्याही तीन तऱ्हा होत्या. मात्र, दिसण्यात देव इतर दोघांपेक्षा सरस होता. त्याचा तो केसांचा कोंबडा, गालावर पडणारी खळी, स्मितहास्य केल्यावर दिसणारा तो एक तुटका दात आणि तिरकं तिरकं वाकत, घाईघाईत बोलण्याची स्टाइल हे सगळं त्याला नायक म्हणून प्रस्थापित करणारं होतं. भारतीय चित्रपटसृष्टीत पंजाबी रांगड्या नायकांनी कायमच राज्य केलं. देव पंजाबी होता, पावणेसहा फूट उंच होता, पण धिप्पाड वगैरे नव्हता. उलट त्याच्या रूपात काहीसा नाजूकपणाचा अंश होता. बायकांना तो नक्कीच अपील होणारा होता. 
अशा या देखण्या पुरुषाच्या आयुष्यात रूपेरी पडद्यावर आणि प्रत्यक्ष जीवनातही अनेक स्त्रिया याव्यात, यात नवल नव्हतं. गंधर्वलोकीचे यक्ष चिरतारुण्याचं वरदान लेऊन असतात. देव हा भूलोकीच्या गंधर्वनगरीचा यक्षच होता. वयानं वाढला तरी तो मनानं कधी पंचविशीच्या पुढं गेलाच नाही. कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यानं काढलेल्या सिनेमांचं, त्याच्या दिग्दर्शनाचं, नव्या तरुणींसोबत नायिका म्हणून काम करण्याच्या वेडाचं भरपूर हसं झालं. अनेकदा त्याची खिल्ली उडविण्यात आली. मात्र, देव आनंद या माणसानं आयुष्यभर सभ्य पुरुषाची 'डिग्निटी' सांभाळली. तो जंटलमन होता. वाह्यात गोष्टी त्यानं आयुष्यात फार केल्या नाहीत. जे काही केलं, ते मनस्वीपणे केलं. त्याला आवडलं, पटलं, म्हणून केलं. ब्रिटिशकालीन जमान्यात इंग्रजी साहित्य घेऊन लाहोरमध्ये बी. ए. पदवी मिळविणारा देव आनंद आलतूफालतू माणूस कधीच नव्हता. स्वतःला पेश करण्याची त्याची अशी खास आदब होती, विशिष्ट मर्यादेच्या खाली त्यानं स्वतःला कधी येऊ दिलं नाही. उतारवयातही स्वतःला उत्तमरीत्या तो प्रेझेंट करीत असे. बहुसंख्य बायकांना आवडणारेच हे सगळे गुण होते. त्यामुळं बायका त्याच्या रूपावर, त्याच्या व्यक्तिमत्त्वावर कायम फिदा असत.

सुरैया नावाचं अधुरं स्वप्न...

देवच्या आयुष्यात आलेली पहिली गाजलेली, मोठी स्त्री म्हणजे अभिनेत्री सुरैया. 'मलिका-ए-तरन्नुम' (मेलडी क्वीन) म्हणून ओळखली जाणारी सुरैया जमाल शेख ही तेव्हाची बडी आणि प्रस्थापित अभिनेत्री होती. देव नवखा होता. त्यामुळं तिच्यासोबत नायक म्हणून काम करायला त्यानं आनंदानं होकार दिला. विद्या (१९४८), जीत (१९४९), शायर (१९४९), अफसर (१९५०), निली (१९५०), सनम (१९५१) आणि दो सितारे (१९५१) या चित्रपटांत या जोडीनं सोबत काम केलं. हे सर्व चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते. सुरैया बडी अभिनेत्री असल्यानं या सर्व सिनेमांत तिचं नाव श्रेयनामावलीत आधी झळकत असे. या जोडीची प्रेमकथाही तशी फिल्मी ढंगातच सुरू झाली. विद्या चित्रपटातील 'किनारे किनारे तले जाएंगे' या गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी हे दोघे ज्या बोटीत बसले होते, ती बोट पाण्यात उलटली. तेव्हा देवनं सुरैयाला पाण्याबाहेर काढलं. या प्रसंगानंतर ती स्वाभाविकच देवच्या प्रेमात पडली. (तेव्हा ती २० वर्षांची, तर देव २६ वर्षांचा होता.) या प्रसंगापूर्वी देव आनंद सुरैयाच्या घरी रीतसर जात-येत असे. मात्र, ते दोघे प्रेमात पडले आहेत आणि लग्नही करायचा त्यांचा विचार आहे, हे कळल्यावर सुरैयाच्या घरच्यांनी, विशेषतः तिच्या आजीनं (आईची आई) देववर लक्ष ठेवायला सुरुवात केली. देव आणि सुरैयाची प्रेमकहाणी दृष्ट लागावी अशीच सुरू होती. ते दोघं एकमेकांना पत्रं लिहीत. प्रेमसंदेश पाठवीत. त्याच्या सहकलाकारांनाही हे माहिती होतं. दुर्गा खोटे, कामिनी कौशल या दोघी तर त्यांची पत्रंही एकमेकांना पोचवत असत म्हणे. 'जीत' चित्रपटाच्या सेटवर अखेर देवनं सुरैयाला प्रपोज केलं आणि तेव्हाच्या तीन हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी तिला भेट म्हणून दिली. या घटनेनंतर मात्र सुरैयाच्या आजीनं या लग्नाला कडाडून विरोध केला आणि हे लग्न होणार नाही, असं सांगितलं. कारण सुरैया होती मुस्लिम आणि देव हिंदू... प्रेमात पडलेल्या या दोन जीवांना आपल्या वेगळ्या धर्मांची जाणीवच नव्हती. आपलं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे, एवढंच त्यांना ठाऊक होतं. मात्र, देवची पहिलीवहिली प्रेमकहाणी अशा रीतीनं दुर्दैवानं संपुष्टात आली. एकदाच भावाच्या खांद्यावर डोकं ठेवून देव रडला आणि नंतर त्यानं सुरैयाबरोबरचं नातं भूतकाळाच्या पेटीत बंद करून टाकलं. सुरैया मात्र मरपर्यंत (२००४) अविवाहित राहिली. लग्न मोडल्यानंतर सुरैयाच्या घरच्यांनी तिला देवसोबत काम करण्यासही मनाई केली आणि 'दो सितारे' हा या जोडीचा शेवटचा चित्रपट ठरला.

सहधर्मचारिणी : कल्पना कार्तिक

कल्पना कार्तिक म्हणजेच पूर्वाश्रमीची मोनासिंग. तिला रूपेरी पडद्यावर आणताना कल्पना कार्तिक हे नाव देवनंच दिलं. सुरैयाबरोबरचं प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यानंतर देवनं काही काळानंतर सावरून स्वतःच्या करिअरकडं लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरैयासोबतचे चित्रपट यशस्वी झाले असले, तरी त्याचं श्रेय सुरैयालाच मिळालं होतं. देवला नायक म्हणून चांगला मोठा रोल अजूनही मिळत नव्हता. अशोककुमार यांनी मग 'जिद्दी'मध्ये (१९४८) देवला चांगला ब्रेक दिला. यात त्याची नायिका होती कामिनी कौशल. (याच चित्रपटापासून देव आणि किशोरकुमारची मैत्री सुरू झाली.) 'जिद्दी'च्या यशानंतर देवनं स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू करायचं ठरवलं आणि 'नवकेतन'चा जन्म झाला. देवचा मित्र गुरुदत्त याला ठरल्याप्रमाणे त्यानं दिग्दर्शनाची संधी दिली आणि 'बाजी'चं काम सुरू झालं. यात गीताबालीसोबत आणखी एक नायिका हवी होती आणि कल्पना कार्तिकला ती संधी मिळाली. हा क्राइम थ्रिलर हिट झाल्यामुळं देव आणि कल्पना कार्तिकच्या जोडीला मागणी वाढली. त्यांनी बहुतेक चित्रपट स्वीकारले. हे सगळे चित्रपट, म्हणजे आंधियाँ (१९५२), टॅक्सी ड्रायव्हर (१९५४), हाउस नं. ४४ (१९५५) आणि नौ दो ग्यारह (१९५७) बॉक्स ऑफिसवरही चांगलेच चालले. यातल्या 'टॅक्सी ड्रायव्हर'च्या सेटवर देव कल्पना कार्तिकच्या प्रेमात पडला आणि त्यानं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. 'टॅक्सी ड्रायव्हर' यशस्वी होताच दोघांनीही साध्या समारंभात लग्न केलं. लग्नानंतर दोन वर्षांनी (१९५६) देवच्या मुलाचा, सुनील आनंदचा जन्म झाला. नंतर या जोडप्याला देविना ही आणखी एक मुलगी झाली. 'नौ दो ग्यारह'नंतर कल्पना कार्तिकनं चित्रपट संन्यास घेतला आणि पुन्हा कधीही काम केलं नाही.  फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात आलेली मोनासिंग ही तशी सामान्य वकुबाची अभिनेत्री होती. खरं तर तिचे वडील गेल्यामुळं तिला सिनेमात काम करावं लागलं. त्यात तिला अजिबातच आनंद नव्हता. त्यामुळं देवशी लग्न होताच तिनं आनंदानं काम करणं सोडलं आणि त्याचा संसार सांभाळण्यातच धन्यता मानली. 

वहिदा... तेरे मेरे सपने अब एक रंग है!

देव आनंद आणि वहिदा रेहमान यांची जोडी चांगलीच जमली आणि गाजलीही. वास्तविक वहिदा ही गुरुदत्तची 'फाइंड' आणि त्याच्या कॅम्पमधली. तिचं आणि गुरूचं प्रेमप्रकरण तेव्हा फार गाजलं आणि अयशस्वीही ठरलं. मात्र, गुरुदत्त आणि देव एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळं वहिदानं देवसोबत काम करायला गुरूची कधीच हरकत नसायची. खरं तर वहिदाचा पहिला चित्रपट सीआयडी (१९५६) यात देवच तिचा नायक होता. या दोघांनी पुढं सोलहवाँ साल (१९५८), काला बाजार (१९६०), बात एक रात की (१९६२) आदी चित्रपटांत काम केलं आणि हे सर्व चित्रपट यशस्वी ठरले. मात्र, दोघांच्याही करिअरमधला अत्यंत महत्त्वपूर्ण चित्रपट होता - गाइड (१९६५). 'गाइड' चित्रपटात देव आणि वहिदाची जुळलेली केमिस्ट्री अद्भुत अशीच आहे. या चित्रपटांतील गाणी तर प्रचंड हिट झाली. या चित्रपटात काम करायला वहिदा आधी तयार नव्हती. याचं कारण 'गाइड'चं दिग्दर्शन राज खोसला करणार होता. वहिदाचं आणि राज खोसलाचं गुरुदत्त कॅम्पमध्ये भांडण झालेलं असल्यामुळं ती राजच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास मुळीच तयार नव्हती. देव आनंद वहिदाला या सिनेमात काम करण्यासाठी खूप आग्रह करीत होता. तेव्हा वहिदानं राजऐवजी चेतन आनंद दिग्दर्शन करणार असेल, तर मी काम करीन, अशी अट घातली. गंमत म्हणजे चेतन आनंद दिग्दर्शन करायला तयार झाला, पण त्यानं वहिदाच्या नावावर फुली मारली. त्याला प्रिया राजवंशला घ्यायचं होतं. (त्या दोघांचं प्रेमप्रकरण तेव्हा जोरात चालू होतं.) देवला अर्थातच प्रिया राजवंशचं नाव मंजूर नव्हतं, कारण या भूमिकेसाठी चांगलं नृत्य करता येणं ही पूर्वअट होती आणि प्रियाला नाचता येत नव्हतं. अखेर विजय आनंदकडं दिग्दर्शनाची सूत्रं गेली आणि वहिदा अखेर या चित्रपटात आली. पुढं 'गाइड'नं काय इतिहास घडवला, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पुढं 'नवकेतन'च्या 'रूप की रानी चोरों का राजा' (१९६१) आणि 'प्रेमपुजारी' (१९७०) या चित्रपटांतूनही वहिदा झळकली. मात्र, गुरुदत्तबरोबर झालेल्या प्रेमभंगानंतर आणि त्याच्या मृत्यूनंतर वहिदा शशी रेखीसोबत लग्न करून बंगळूरला गेली आणि तिचा व देवचा संपर्क तुटलाच. अगदी अलीकडं २०११ मध्ये 'हम दोनो'च्या रंगीत प्रिंटच्या प्रकाशनाच्या वेळी देवनं आवर्जून फोन करून वहिदाला मुंबईला बोलावलं होतं. मात्र, तिला यायला जमलं नाही. नंतर काहीच महिन्यांत देव देवाघरी निघून गेला. ते काही असलं, तरी कृष्णधवल हिंदी सिनेमाच्या जमान्यातली देव-वहिदा ही सर्वोत्कृष्ट जोड्यांपैकी एक जोडी होती, हे कुणीच अमान्य करणार नाही. 'काला बाजार'मधल्या 'अपनी तो हर आह इक तुफान है' या गाण्यातले वहिदाचे अल्लड विभ्रम आणि देवचा रोमँटिक मूड कसा विसरता येईल?

स्वर्गीय जोडी : देव-मधुबाला

देव आनंद आणि मधुबाला म्हणजे स्वर्गीय जोडीच. भारतीय जनमानसात रोमँटिक हिरो व नायिका म्हणून या दोघांनाही फार वरचं स्थान! टेनिससारखं नायक-नायिकांच्या जोडीला रँकिंग देण्याची पद्धत असती, तर ही जोडी कैक वर्षे अव्वल स्थानावरच राहिली असती, यात शंका नाही. या जोडीनं सुमारे आठ सिनेमांत एकत्र काम केलं. निराला (१९५०) हा या जोडीचा नायक-नायिका म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर मधुबाला (१९५०), नादान (१९५१), आराम (१९५१), अरमान (१९५३), काला पानी (१९५८), जाली नोट (१९६०) आणि शराबी (१९६४) या चित्रपटांत देव-मधुबाला एकत्र दिसले. यातला 'काला पानी' सर्वांत गाजलेला. त्यातलं 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' हे गाणं म्हणजे तर रोमँटिक गाण्यांमधलं एक सर्वांत अप्रतिम गाणं. या गाण्यात दोघंही फार सुंदर दिसले आहेत आणि राज खोसलानं या गाण्याचं चित्रीकरणही मस्त केलंय. 'काला पानी' आणि नंतर आलेल्या 'जाली नोट' या दोन्हींत मधुबाला पत्रकार असते, हे विशेष. 

तेरा मेरा प्यार अमर...

देव आनंद आणि साधना या जोडीचे 'हम दोनो' (१९६१) आणि 'असली नकली' (१९६२) हे दोन चित्रपट सुपरहिट ठरले. 'हम दोनो'मध्ये देवचा डबल रोल होता. त्यामुळं त्याला या सिनेमात दोन नायिका होत्या. एक साधना आणि दुसरी नंदा. साधनासोबतचं त्याचं 'अभी ना जाओ छोडकर' हे गाणं आजही हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. 'साधना कट'मुळं तेव्हाची फॅशन आयकॉन म्हणून साधना ओळखली जायची. या सिनेमात मात्र तिनं साध्या मुलीची भूमिका केली होती. हा सिनेमा ५० वर्षांनंतर रंगीत होऊन पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. साधनाची जादू काय होती, ते आत्ताच्या पिढीलाही त्यामुळं पाहता आलं. या चित्रपटाच्या यशानंतर हृषीकेश मुखर्जींच्या 'असली नकली'मध्ये देव आणि साधना पुन्हा एकदा नायक-नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर आले. 'फुल फॅमिली एंटरटेन्मेंट'चा मंत्र हृषीकेश मुखर्जींना या सिनेमापासून गवसला होता, असं म्हणायला हरकत नाही. श्रीमंत घरातला पळून गेलेला तरुण आणि गरीब वस्तीतील सुशिक्षित, देखणी नायिका असं यातलं रसायन प्रेक्षकांना बेहद्द पसंत पडलं आणि सिनेमा हिट झाला. यातली सगळीच गाणी गाजली. पण 'एक पुत बनाउंगा' आणि 'तेरा मेरा प्यार अमर' या अजरामर गाण्यात देव आणि साधनाची केमिस्ट्री खासच जमून आली होती. या दोन सिनेमांव्यतिरिक्त साधना आणि देवची जोडी पुढं एकत्र दिसली नाही. 

नूतन... सोज्वळ सौंदर्य

नूतन म्हणजे अस्सल भारतीय सौंदर्याचा पुतळाच. देवसारख्या देखण्या नायकासोबत तिची जोडी जमली नसती, तरच नवल. या दोघांनी पेइंग गेस्ट (१९५७), बारिश (१९५७), मंझिल (१९६०) आणि तेरे घर के सामने (१९६३) या चार सिनेमांत काम केलं. त्यातही पेइंग गेस्ट आणि तेरे घर के सामने हे सिनेमे अधिक गाजले. 'पेइंग गेस्ट'मधलं 'छोड दो आँचल जमाना क्या कहेगा' हे आशा आणि किशोरकुमारचं गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. शशधर मुखर्जी निर्मित आणि सुबोध मुखर्जी दिग्दर्शित हा एक मर्डर ड्रामा होता. शुभा खोटे आणि याकूब यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 'पेइंग गेस्ट'नंतर ही जोडी प्रेक्षकांना पसंत पडली ती थेट सात वर्षांनी आलेल्या 'तेरे घर के सामने'मध्ये. वास्तविक या वेळी देव ४० वर्षांचा झाला होता आणि नूतन तिच्या मुलाच्या (मोहनीश) जन्मानंतर हा सिनेमा करीत होती. मात्र, दोघेही या सिनेमात अत्यंत रोमँटिक आणि चिरतरुण दिसतात. या सिनेमाची निर्मिती 'नवकेतन'ची म्हणजे घरचीच होती. दिग्दर्शन गोल्डी म्हणजे विजय आनंदचं होतं. एक जानेवारी १९६३ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला. दिल्लीत याची कथा घडते. दोन भांडणाऱ्या उद्योगपतींची मुलं (देव आणि नूतन) एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांच्याही वडिलांचा एकाच प्लॉटवर डोळा असतो आणि तिथं घर बांधण्याचं काम आर्किटेक्ट असलेल्या आपल्या नायकाला मिळतं. या सिनेमातली सगळीच गाणी गोल्डीनं बहारदार चित्रित केली आहेत. 'दिल का भँवर करे पुकार' हे कुतुबमिनारमधलं गाणं तर हिंदीमधल्या सर्वोत्कृष्ट चित्रित गीतांपैकी एक आहे. याशिवाय 'तेरे घर के सामने इक घर बनाउंगा' या गाण्यात व्हिस्कीच्या ग्लासात देवला नूतन दिसते, हे चित्रिकरण मस्तच जमून आलं आहे. या वेळचा दोघांचाही अभिनय पाहण्याजोगा आहे. 


झीनतच्या प्रेमात...

देव आनंदनं त्याच्या 'हरे रामा हरे कृष्णा' या गाजलेल्या चित्रपटात झीनत अमानला प्रथम संधी दिली. काठमांडूला पाहिलेल्या एका हिप्पी पार्टीवरून देवला या चित्रपटाचा विषय सुचला. या चित्रपटाची नायिका जिच्यावरून बेतली होती, ती जेनिस ऊर्फ जसबीर देवला त्याच पार्टीत भेटली. मुंबईत परत आल्यानंतर त्यानं 'हरे रामा हरे कृष्णा'ची घोषणा केली. अमरजितनं आयोजित केलेल्या एका पार्टीत तेव्हा त्याला झीनत अमान दिसली. ती तेव्हाची 'मिस एशिया' होती. झीनतला पाहून देवनं तिलाच आपल्या नव्या सिनेमाची नायिका करायचं ठरवून टाकलं. या सिनेमाच्या यशानंतर देवला आपण झीनतच्या प्रेमात पडलो असल्याची जाणीव प्रथम झाली. त्या काळात सिनेमाविषयक नियतकालिकांमध्ये देव-झीनतच्या रोमान्सची गरमागरम चर्चा रंगायची. या बातम्या आपण मनापासून एंजॉय करायचो, असं देवनं नंतर त्याच्या आत्मचरित्रात नमूद केलंय. आपण मनापासून तिच्याकडं ओढले गेलोय याची जाणीव झाल्यावर या प्रेमाचा जाहीर उच्चार करायचा निर्णय देवनं घेतला होता. ताजमहाल हॉटेलमध्ये एखाद्या संध्याकाळी झीनतला घेऊन जायचं, असं त्यानं ठरवलंही होतं. मात्र, त्याच वेळी झीनत राज कपूरच्या नव्या सिनेमात (सत्यम् शिवम् सुंदरम्) काम करणार असल्याची बातमी त्याला कळली. त्यापूर्वीच एका पार्टीत त्यानं राजला झीनतच्या गळ्यात गळा घालताना आणि तीही त्याला प्रतिसाद देत असताना पाहिलं होतं. हळूहळू सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. देवचा दारूण प्रेमभंग झाला होता. त्याची झीनत त्याला सोडून गेली होती. देवनं त्याच्या आत्मचरित्रात हे सगळं लिहिलंय. झीनतच्या प्रेमात तो किती बुडाला होता आणि तिच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यानं पन्नाशीचा देव कसा हतबल झाला होता, हे त्यातून लक्षात येतं.
'ड्रीमगर्ल'चा 'ड्रीमहिरो'

हेमामालिनी आणि देवआनंद यांचीही जोडी काही सिनेमांतून गाजली. हेमा अर्थातच देवपेक्षा वयानं खूपच लहान. तिची आई देवआनंदची मोठी चाहती होती. त्यामुळं देवचे सिनेमे पाहतच हेमा मोठी झाली होती. या हिरोबरोबर आपल्याला कधी काम करायला मिळेल, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण हेमा नशीबवान होती. तिला राज कपूरनं 'सपनों का सौदागर'मधून रूपेरी पडद्यावर आणलं आणि देवसोबत लगेचच तिला 'जॉनी मेरा नाम'सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात नायिका म्हणून काम करायला मिळालं. या सिनेमाच्या आठवणी सांगताना हेमा देवआनंदच्या चांगल्या स्वभावाची भरभरून तारीफ करते. यातली 'वादा तो निभाया' आणि 'पल भर के लिए' ही दोन्ही गाणी खूप गाजली. 'वादा तो निभाया' या गाण्याच्या बिहारमध्ये राजगीर येथील चित्रिकरणाच्या वेळी जमाव देवआनंदसाठी बेफाम झाला होता. त्या वेळी देवनं हेमाची विशेष काळजी घेतली. देवआनंदचा मिश्कील स्वभाव, त्याचं उत्कृष्ट इंग्रजी संभाषण, त्याचं अधूनमधून विक्षिप्तासारखं वागणं या सगळ्याचं हेमाला खूप अप्रूप वाटे. या जोडीनं 'जॉनी मेरा नाम', 'जोशिला', 'शरीफ बदमाश', 'अमीर गरीब', 'जानेमन', 'तेरे मेरे सपने' अशा एकूण नऊ सिनेमांत काम केलं. दोघांची जोडी हिट होती.


मुमताज आणि देव

देवआनंद आणि मुमताज यांनी 'हरे रामा हरे कृष्णा' आणि 'तेरे मेरे सपने' अशा दोन चित्रपटांत सोबत काम केलं. मुमताज ही सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. देवनं तिला 'हरे रामा हरे कृष्णा'साठी करारबद्ध केलं, तेव्हाही ती मोठी स्टार होती. तेव्हा प्रत्येक कलाकाराला सात सिनेमांचं बंधन असायचं. म्हणजे सातव्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं, तरच आठवा सिनेमा साइन करता यायचा. देव मुमताजला 'हरे रामा...'साठी विचारायला गेला, तेव्हा हा नियम आडवा येत होता. मात्र, देवनं कुणाचीही पर्वा न करता, पोलिस संरक्षणात मुमताजला काठमांडूला नेलं आणि चाळीस दिवसांचं चित्रिकरण पूर्ण केलं. देव मुमताजला 'मुमझी' या नावानं हाक मारत असे. हेमामालिनीप्रमाणेच मुमताजही देवच्या स्वभावावर फिदा होती. देव आणि सुनील दत्त आपल्या नायिकांची खूप काळजी घेत, असं तिचं निरीक्षण आहे.


अन्य नायिका...
या नायिकांव्यतिरिक्त देवनं नर्गिस, मीनाकुमारी, गीताबाली, वैजयंतीमाला, कामिनी कौशल, नंदा, उषाकिरण, नलिनी जयवंत, तनुजा, माला सिन्हा, सुचित्रा सेन, आशा पारेख, सायराबानू, मुमताज, झहिदा, शर्मिला टागोर, राखी, परवीन बाबी, प्रिया राजवंश या सर्व लोकप्रिय नायिकांसोबत किमान एक तरी सिनेमा नायक म्हणून केला. यापैकी 'पतिता'तलं 'याद किया दिलने कहाँ हो तुम' हे देव आणि उषाकिरणचं गाणं चांगलंच गाजलं. वैजयंतीमाला आणि तनुजासोबतचा 'ज्वेल थीफ' (१९६७) हाही सुपरहिट सिनेमा ठरला. सुचित्रा सेनसोबत देवनं केलेल्या 'बंबई का बाबू'मधली गाणीही गाजली. या लोकप्रिय नायिकांव्यतिरिक्त रेहाना, हेमावती, खुर्शीद, चंद, रमोलादेवी, सुनलिनीदेवी, कुकू, निम्मी, शीला रामाणी, शकिला, तरला मेहता या नायिका म्हणून अल्पजीवी ठरलेल्या अभिनेत्रींसोबतही देवनं सिनेमे केले.
याशिवाय टीना मुनीम (देस-परदेस), तब्बू (हम नौजवान) अशा कित्येक नायिकांना सर्वप्रथम 'ब्रेक' दिला तो देवनं. 
उतारवयात देवनं सोनिका गिल (सौ करोड, १९९१), ममता कुलकर्णी (गँगस्टर, १९९४), हिनी कौशिक (लव्ह @ टाइम्स स्क्वेअर, २००३) या नाती शोभतील अशा मुलींसोबतही नायक म्हणून काम केलं. अर्थात १९८० नंतरच्या देवची आणि त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीची दखल घेण्याचं कारण नाही. कारण तो सगळा देव नावाच्या सिनेमावेड्या माणसाचा वेडा कारभार होता.
देव आणि त्याच्या नायिका म्हटलं, की अजूनही डोळ्यांसमोर येतात त्या साधना, नूतन, मधुबाला आणि वहिदाच. त्यांच्यासोबतची कित्येक चिरतरुण गाणी आपण आजही पाहतो आणि यक्षांच्या दुनियेत सफर करून आल्याचा आनंद मिळतो. देव आणि त्याच्या नायिकांचं हे देणं कधीही न फिटणारं असंच आहे.
----
(पूर्वप्रसिद्धी - मोहनगरी दिवाळी अंक २०१७)
----

30 Nov 2017

अक्षयकुमार - साहित्य शिवार लेख

खिलाडी नं. १
-------------
अक्षयकुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक देखणा, कर्तबगार असा दिग्गज अभिनेता. नुकतीच त्याच्या कारकिर्दीला रौप्यमहोत्सवी २५ वर्षं पूर्ण झाली. एवढा काळ टिकून राहणं आणि त्यातही अव्वल स्थानावर राहणं हे यश सहज सगळ्यांना जमतंच असं नाही. पण 'अक्की'ला ते सहज जमून गेलंय. गेल्या महिन्यातच, म्हणजे ९ सप्टेंबरला त्याला वयाची ५० वर्षं पूर्ण झाली. त्याच्याकडं बघून अर्थातच हे खरं वाटत नाही. उंचापुरा, पंजाबी, रांगड्या देहयष्टीचा हा अभिनेता अजून किती तरी वर्षं नायकाच्या भूमिकेत फिट्ट बसेल, असंच वाटतं. नायकाच्या म्हणजे अगदी टिपिकल नायकाच्या नव्हे. तसा टिपिकल नायक अक्षयकुमारनं त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला रंगवला. मात्र, अलीकडच्या दहा-बारा वर्षांत त्याच्या भूमिकांमध्ये वैविध्य दिसू लागलं आहे. आपल्या वयानुरूप वेगवेगळ्या छटांच्या भूमिका तो करू लागलाय. त्यामुळंच तो इथं दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यताही वाढली आहे. अक्षयनं गेल्या २५ वर्षांत शंभरहून अधिक सिनेमांत काम केलंय आणि त्यातले बरेचसे शंभर कोटी रुपयांहून अधिक गल्ला गोळा करणारे आहेत. अलीकडंच 'रुस्तुम' या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय दोन फिल्मफेअर पुरस्कारही त्यानं मिळवले आहेत. एका पाहणीनुसार, अक्षयकुमार हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. चार वर्षांपूर्वी, म्हणजे २०१३ मध्ये झालेल्या एका पाहणीनुसार, अक्षयकुमारच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मिळविलेली रक्कम दोन हजार कोटींहून अधिक होती. तेव्हा अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय अभिनेता होता. यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पाहणीनुसार, त्याच्या चित्रपटांनी मिळविलेली रक्कम तीन हजार कोटींच्या वर गेली होती. अर्थातच तो आजच्या घडीचा हिंदीतील एक मोठा स्टार आहे, यात शंका नाही.
हिंदी सिनेमाचा हिरो म्हटलं, की लोकांच्या मनात वर्षानुवर्षं जपलेल्या काही प्रतिमा असतात. अफाट श्रीमंती, प्रासादतुल्य निवासस्थान, महागड्या गाड्यांचा ताफा, सहकलाकार नट्यांसोबतची अफेअर्स, क्वचित अंमली पदार्थांचं व्यसन इ. इ. काही हिरो म्हणजे अगदीच हस्तिदंती मनोऱ्यात राहणारे. लोकांना वर्षानुवर्षं त्यांचं नखही बाहेर दिसणार नाही; तर काही म्हणजे प्रसिद्धीच्या मागं नुसते वेडेपिसे... काहीही करून चर्चेत राहायचं एवढंच त्यांना ठाऊक. अक्षयकुमारचं सगळं करिअर बघितलं, तर तो असल्या गोष्टींपासून कटाक्षानं दूर राहिलेला दिसतो. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याचीही अनेक नट्यांसोबत अफेअर्स झाली. पूजा बात्रा ही त्याची गाजलेली पहिली प्रेयसी. रविना व शिल्पा शेट्टीबरोबरची प्रकरणं तर विशेष गंभीर होती. पण ती काही पुढं मार्गी लागलं नाही. मात्र, एकदा २००१ मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न झाल्यानंतर अक्षयनं शहाण्या नवऱ्यासारखा संसार केला आहे. (अपवाद प्रियांका चोप्रासोबतच्या अफेअरचा... पण त्यातून अक्षय लवकरच बाहेर आला...) त्याला आरव व नितारा अशी दोन मुलंही आहेत. गेल्या १५-१६ वर्षांत गैरकारणांसाठी त्याचं नाव कधीही चर्चेत आलं नाही. त्याची पत्नी ट्विंकल हीदेखील स्वतंत्र प्रज्ञेची स्त्री आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला तिनंही काही नायिकेच्या भूमिका केल्या. पण तिला फार काही यश लाभलं नाही. नंतर तिला लेखनात तिचा आनंद गवसला. विशेषतः विनोदी लेखनावर तिची हुकूमत आहे. आता तर ती एक उत्कृष्ट लेखिका म्हणून ओळखली जाते. तिची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. असं हे जोडपं आपापल्या कामांमध्ये आनंदात आहे. अक्षयकुमारची कामावरची निष्ठा अविचल आहे. आपल्या कामाचा तो पुरेपूर आनंद घेताना दिसतो. तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरही दिसतो. तो निर्व्यसनी आहे. उशिरापर्यंतच्या पार्ट्यांना तो कधीही जात नाही. शूटिंग नसेल त्या दिवशी तर तो रात्री दहा वाजता झोपतो आणि सकाळी लवकर उठून व्यायाम करतो, असं त्याचे जवळचे मित्र सांगतात. स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला त्याचं सर्वाधिक प्राधान्य असतं. असं शिस्तबद्ध जगणं असल्यामुळंच तो एक यशस्वी अभिनेता होऊ शकला आहे, यात वाद नाही. 
अक्षयकुमार हा मूळचा राजीव हरिओम भाटिया. पंजाबी पुत्तर... नऊ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतसरमध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे वडील हरिओम भाटिया लष्करात अधिकारी होते. (त्यामुळंच अक्षयला लहानपणापासून शिस्तीची सवय लागली असावी.) आई अरुणा आणि एक बहीण अलका असं हे कुटुंब. अक्षयचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिल्लीच्या डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये झालं. हे कुटुंब तेव्हा दिल्लीतील चांदणी चौक परिसरात राहत होतं. उच्च शिक्षणासाठी तो मुंबईच्या गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये आला. लहानपणापासून सुदृढ तब्येत असलेल्या अक्षयला मार्शल आर्टसची विशेष आवड होती. तायक्वोंदोमध्ये त्यानं ब्लॅक बेल्ट ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त केली आहे. या मार्शल आर्टसमधील पुढील शिक्षणासाठी त्यानं थायलंड गाठलं. बँकॉकमध्ये शिकता शिकता त्याला शेफची नोकरी मिळाली. अक्षय उत्तम कुक आहे. वडिलांप्रमाणे लष्करात किंवा नौदलात जाऊन देशसेवा करायची, असं त्याचं सर्वसामान्य तरुणाप्रमाणं एक स्वप्न होतं. सिनेमात आपण कधी जाऊ आणि हिरो होऊ, असा विचारही त्याच्या मनाला तोपर्यंत शिवला नव्हता. कामाच्या शोधात तो थायलंडवरून बांगलादेशात गेला. तिथून कोलकत्यात आला. तिथं त्यानं एका ट्रॅव्हल एजन्सीत नोकरी गेली. पण तिथं मन रमेना म्हणून तो परत मुंबईला आला. तिथं सुरुवातीला त्यानं दागिने विकण्याचा व्यवसाय केला. तिथं त्याची ओळख जयेश सेठ या नामवंत सिने फोटोग्राफरशी झाली. जयेशनं आपला पोर्टफोलिओ करावा, यासाठी अक्षयनं सुमारे वर्षभर त्याच्याकडं लाइट धरणे वगैरे असली काम फुकट वर्षभर केली. एकदा गोविंदाचे फोटो द्यायला अक्षय त्याच्या घरी गेला असता, गोविंदानं त्याच्याकडं पाहून तू सिनेमात हिरो म्हणून काम का करीत नाहीस, असं विचारलं. तेव्हापासून अक्षयच्या डोक्यात ही गोष्ट ठाण मांडून बसली आणि त्यानं सिनेमात येण्याची धडपड सुरू केली. मग १९९० मध्ये त्यानं अभिनयाचा एक कोर्स केला. नंतर त्याला एका  सिनेमात फुटकळ काम मिळालं. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्याला कळलं, की त्याच्या वाट्याला फक्त सात सेकंदाचं काम आलंय. त्या सिनेमाच्या नायकाचं नाव अक्षय होतं. त्यामुळं राजीव भाटियानं स्वतःचं नाव बदलून 'अक्षयकुमार' असं करून घेतलं. अशा रीतीनं राजीव भाटियाचा 'अक्षयकुमार' झाला...
आपला पोर्टफोलिओ घेऊन अक्षयकुमार निर्मात्यांचे उंबरठे झिजवू लागला. पण नरेंद्र नावाच्या एका मेकअपमननं त्याचा पोर्टफोलिओ पाहून त्याला एका दिग्दर्शकाकडं नेलं. इथं अक्षयकुमारचं नशीब पालटलं. त्याला एका दिवसात तीन चित्रपटांच्या ऑफर आल्या आणि सोबत ५१०० रुपयांची साइनिंग अमाउंटही मिळाली. त्या पहिल्या चित्रपटाचं नाव होतं - सौगंध. १९९१ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याला फारसे यश मिळाले नाही. पण त्यानं त्या वेळी साइन केलेला दुसरा चित्रपट होता अब्बास-मस्तान यांचा 'खिलाडी'. हा सिनेमा १९९२ मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या सिनेमानं खऱ्या अर्थानं अक्षयकुमारला चित्रपट जगतातला नामांकित 'खिलाडी' बनवलं आणि त्याचं करिअर मार्गाला लागलं. 

'खिलाडी'च 'खिलाडी'
'खिलाडी' हा एक सस्पेन्स चित्रपट होता. अब्बास-मस्तान यांची ती खासियत होती. हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर 'खिलाडी' नाव आणि अक्षयकुमार असं एक समीकरणच झालं. यानंतर अक्षयनं 'मैं खिलाडी तू अनाडी', 'खिलाडियों का खिलाडी', 'इंटरनॅशनल खिलाडी', 'सब से बडा खिलाडी', 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', 'खिलाडी ४२०' आणि 'खिलाडी ७८६' अशा तब्बल सात 'खिलाडी'पटांत काम केलं. एक अॅक्शन हिरो म्हणून अक्षयकुमार ओळखला जाऊ लागला. त्याच काळात आमीर, शाहरुख व सलमान चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले होते. अजय देवगणनंही १९९२ मध्ये 'फूल और काँटे'मधून चित्रपदार्पण केलं होतं. हे पाचही जण पुढील २५ वर्षं चित्रपटसृष्टीवर राज्य करत राहतील, असं तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं. विशेषतः अक्षयकुमारच्या बाबतीत तर नक्कीच... सुरुवातीचे त्याचे चित्रपट सर्वसामान्य, अॅक्शनपट होते. मात्र, १९९४ मध्ये आलेल्या 'मोहरा' या चित्रपटानं अक्षयकुमारला देशभर नाव मिळवून दिलं. या चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' या गाण्यानं देशात एकच धूम उडवली. अक्षयकुमार आणि रवीना यांचं अफेअर याच काळातलं. पुढची काही वर्षं अक्षयसाठी भरपूर सिनेमांची गेली. दर वर्षी त्याचे तीन-चार, तीन-चार सिनेमे येत गेले. यात 'खिलाडी'पट होते, तसेच 'सुहाग', 'संघर्ष', 'आरजू', 'जानवर' असे काही उल्लेखनीय चित्रपटही होते. मात्र, तरीही अक्षयची अॅक्शन हिरो ही एकच इमेज कायम होती. यश चोप्रांच्या 'दिल तो पागल हैं' या १९९७ मध्ये आलेल्या चित्रपटातलं अक्षयचं पाहुण्या कलाकाराच्या रूपात येणं सुखावह होतं. 

'हेराफेरी' अन् विनोदपट
यानंतर २००० मध्ये आला प्रियदर्शनचा 'हेराफेरी'. हा एका तमिळ सिनेमाचा रिमेक होता. यात परेश रावल, तब्बूसह अक्षय आणि सुनील शेट्टीनं धुमाकूळ घातला. 'हेराफेरी' सुपरहिट ठरला. या सिनेमानं अक्षयनं उत्तम विनोदी भूमिका करता येतात, याचा साक्षात्कार फिल्म इंडस्ट्रीला झाला. याच वर्षी आलेल्या 'धडकन'नं अक्षयला अॅक्शनसोबतच रोमँटिक हिरो म्हणूनही प्रस्थापित केलं. आता अॅक्शन, विनोद आणि रोमान्स या सर्व शैलींमध्ये त्याला प्रेक्षक स्वीकारू लागले होते आणि दिग्दर्शकही त्याला तशा प्रकारच्या भूमिका देऊ लागले होते. या यशानंतर अक्षयकुमारनं एक महत्त्वाची गोष्ट केली. लग्न केलं. ट्विंकलसोबत त्याचं प्रणयाराधन सुरू असताना लग्नाचा त्याचा फारसा विचार नव्हता. मात्र, ट्विंकलची आई डिंपल कपाडियानं त्याला लग्नाचा आग्रहच केला आणि १७ जानेवारी २००१ रोजी दोघांचं लग्न झालं. 
त्या वर्षीच आलेल्या अब्बास-मस्तान यांच्या 'अजनबी'मध्ये अक्षयनं पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका रंगविली. विक्रमच्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळाला. 
'हेराफेरी'नंतर अक्षयकुमारनं केलेल्या विनोदी चित्रपटांत 'मुझसे शादी करोगी?', 'गरम मसाला', 'भागमभाग', 'सिंग इज किंग' आदी चित्रपटांचा समावेश होता. या काळातच डेव्हिड धवनच्या 'मुझसे शादी करोगी?' या रोमँटिक विनोदी चित्रपटात अक्षयसोबत सलमान खान आणि प्रियांका चोप्रा हे दोघं झळकले होते. यानंतर अक्षयनं 'अंदाज', 'आँखे', 'खाकी', 'आन : मेन अॅट वर्क', 'ऐतराज' असे महत्त्वाचे चित्रपट केले. यात 'आँखे'मध्ये त्यानं अंध तरुणाची भूमिका साकारली होती, तर मधुर भांडारकरच्या 'आन'मध्ये तो पोलिस अधिकारी होता. 'ऐतराज'मध्ये त्यानं लेडी बॉसकडून लैंगिक शोषण होत असलेल्या तरुणाची भूमिका साकारली होती. यात त्या बॉसची भूमिका प्रियांका चोप्रानं केली होती, तर त्याच्या पत्नीची भूमिका करिना कपूरनं केली होती. या चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेची खूप तारीफ झाली. हा अक्षय व प्रियांकाचा एकमेकांसोबतचा तिसरा चित्रपट होता. या काळातच लग्नानंतरचं अक्षयचं (कदाचित एकमेव) अफेअर प्रियांकासोबत सुरू झाल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र, ट्विंकलनं परिस्थिती खंबीरपणे हाताळली. यापुढं प्रियांकासोबत एकही सिनेमा करायचा नाही, असं वचनच तिनं अक्षयकडून घेतलं. ते अक्षयनं आजवर तरी पाळलं आहे. 
अक्षयनं २००७ या वर्षात चार यशस्वी चित्रपट दिले. यात 'वेलकम', 'भूलभुलैया', 'हे बेबी' आणि 'नमस्ते लंडन' या चित्रपटांचा समावेश होता. यातील 'भूलभुलैया' आणि 'हे बेबी'मध्ये विद्या बालन त्याची नायिका होती. 'नमस्ते लंडन'मध्ये कतरिना कैफबरोबर त्यानं काम केलं होतं. पुढच्या वर्षी आलेला अक्षय-कतरिना जोडीचा 'सिंग इज किंग' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. याच वर्षी, म्हणजे २००८ मध्ये अक्षयनं हरिओम एंटरटेन्मेंट ही कंपनी सुरू केली आणि टीव्हीवरचा 'खतरों के खिलाडी' हा रिअॅलिटी शोदेखील सुरू केला. अक्षयकुमारला २००९ मध्ये केंद्र सरकारतर्फे 'पद्मश्री' देऊन गौरवण्यात आलं. 

शंभर कोटी क्लब
या काळात हिंदी सिनेमात हळूहळू शंभर कोटी क्लबची चर्चा चांगलीच जोर धरू लागली होती. सलमान, आमीर व शाहरुख यांचे सिनेमे येणार, म्हणजे बॉक्स ऑफिसवर त्यांचीच चलती असणार हे गृहीतक मांडलं जाऊ लागलं. आमीरनं दर वर्षी एकच चित्रपट करायचा आणि तो डिसेंबरमध्ये प्रदर्शित करायचा पायंडा पाडला. 'तारें जमीं पर' (२००७), 'गझनी' (२००८) आणि 'थ्री इडियट्स' (२००९) या आमीरच्या चित्रपटांनी चढत्या भाजणीनं यश मिळवलं. दर वर्षी ईदला सलमानचा चित्रपट प्रदर्शित होण्याचा ट्रेंड 'वाँटेड'पासून (२००९) सुरू झाला. शाहरुखनंही २००७ च्या 'ओम शांती ओम'पासून दिवाळीचा मुहूर्त पक्का करून घेतला. याच काळात अक्षयकुमारचं करिअर काहीसं अडखळू लागलं होतं. 'चांदनी चौक टु चायना', 'तसवीर ८ बाय १०', 'कंबख्त इश्क', 'ब्लू' हे त्याचे २००९ मध्ये सगळे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. त्यानंतर २०१० मध्येही तीच कथा कायम राहिली. 'हाउसफुल'नं काहीसं यश मिळवलं असलं, तरी 'खट्टा मीठा', 'अॅक्शन रिप्ले', 'तीसमार खान' हे त्याचे चित्रपट फार काही चालले नाहीत. तीच कथा २०११ मध्ये आलेल्या 'पतियाळा हाउस', 'थँक्यू' आणि 'देसी बॉइज' या सिनेमांची! अखेर अक्षयला हात दिला तो २०१२ मध्ये आलेल्या 'रौडी राठोड' आणि 'हाउसफुल्ल २' या सिनेमांनी. हे दोन्ही सिनेमे शंभर कोटी क्लबमध्ये दाखल झाले आणि अक्षयकुमारच्या चाहत्यांनी निःश्वास सोडला. याच वर्षी आलेल्या विजय कृष्ण यादवच्या 'ओह माय गॉड' या सिनेमाचंही समीक्षक व रसिक दोघांकडूनही कौतुक झालं. मात्र, त्याच वर्षी आलेला शिरीष कुंदेरचा 'जोकर' हा चित्रपट साफ आपटला. या सिनेमाच्या आधीच शिरीष व अक्षयमध्ये मतभेद झाले होते आणि अक्षयनं या सिनेमाचं प्रमोशनही केलं नाही.
अक्षयकुमारच्या कारकिर्दीत असे चढ-उतार सदैव पाहायला मिळतात. पण तो अपयशानं खचून न जाता टिकून राहिला, हे महत्त्वाचं. किंबहुना २०१२ नंतर म्हणजे त्याच्या वयाच्या ४५ व्या वर्षानंतर त्यानं एक से एक जबरदस्त हिट सिनेमे किंवा वेगळे सिनेमे दिल्याचं दिसतं. यात २०१३ च्या सुरुवातीला आलेला 'स्पेशल छब्बीस'सारखा सिनेमा होता. नीरज पांडेचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा मुंबईतील एका चोरीच्या सत्यघटनेवर आधारित होता. त्याच वर्षी आलेल्या मिलन लुथरियाच्या 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या चित्रपटात त्यानं दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली. पुढच्या वर्षी, म्हणजे २०१४ मध्ये ए. मुरुगदास दिग्दर्शित 'हॉलिडे' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवलं. यात अक्षयबरोबर सोनाक्षी सिन्हा होती. अक्षयकुमारचा यातील लूक आणि लष्करी अधिकाऱ्याची भूमिका दोन्ही प्रेक्षकांना आवडलं. या चित्रपटानंतर २०१५ मध्ये अक्षयनं नीरज पांडेच्या 'बेबी' या आणखी एका थरारकपटात काम केलं. याही चित्रपटानं जोरदार यश मिळवलं. मात्र, त्या वर्षी आलेल्या त्याच्या 'गब्बर इज बॅक' किंवा 'सिंग इज ब्लिंग' वगैरे चित्रपटांना अपेक्षित यश मिळालं नाही. आमीर किंवा शाहरुखसारखं वर्षाला एकच सिनेमा न करता तीन-चार चित्रपट करायची अक्षयची वृत्ती आहे. याचं कारण तो भराभर काम करतो. यामुळं काही सिनेमांच्या त्याच्या निवडीही चुकतात. एकाच वेळी एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट तो देतो, त्याच वेळी एक अत्यंत रद्दी सिनेमाही तो देऊ शकतो. मात्र, त्याच्या कामात कधीही ढिलाई दिसत नाही. अत्यंत व्यावसायिक सफाईनं तो सर्व सिनेमांत वावरताना दिसतो. या काळात अॅक्शनबरोबरच कॉमेडीपटांतही तो दिसतो. तुलनेनं अगदी प्युअर रोमँटिक अशा कथा असलेल्या सिनेमांत तो कमी दिसू लागला आहे. 
गेल्या वर्षी अक्षयचे तीन चित्रपट आले. 'एअरलिफ्ट', 'हाउसफुल्ल ३' आणि 'रुस्तुम' या तिन्ही चित्रपटांत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित 'एअरलिफ्ट'मध्ये १९९१ च्या आखाती युद्धाच्या वेळी कुवेतमधून भारतीयांना मायदेशी परत आणणाऱ्या मॅथ्युनी मॅथ्यूज या अधिकाऱ्याच्या जीवनातील खऱ्या घटनांचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. अक्षयनं यातील रणजित कात्याल या उद्योजकाची भूमिका जोरदार केली. 'हाउसफुल्ल ३'मध्ये त्याच्या नेहमीच्या शैलीतील विनोदी भूमिका होती. 'रुस्तुम' हा टिनू देसाई दिग्दर्शित चित्रपट प्रख्यात के. एम. नानावटी खटल्यावर आधारित होता. यात अक्षयकुमारनं प्रेम आहुजा ही नौदल अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत उत्कृष्ट केली होती. या चित्रपटासाठीच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. यंदाही त्यानं 'टॉयलेट : एक प्रेमकथा' हा वेगळा चित्रपट करून, सरकारी मोहिमेला हातभार लावला आहे. 
अक्षयचे आगामी चित्रपटही असेच वेगळे आहेत. महिलांसाठी परवडणाऱ्या किमतीतील सॅनिटरी नॅपकिन बनविणारे अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित 'पॅडमॅन' हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की तयार करीत आहेत. यात मुरुगनाथम यांची भूमिका अक्षय करतो आहे. 'टॉयलेट' या सिनेमाद्वारे त्यानं खेड्यापाड्यांत महिलांन अद्याप उघड्यावर शौचास जावं लागतं, या समस्येचा वेध घेतला होता. 'पॅडमॅन' ही अरुणाचलम यांची अत्यंत प्रेरणादायी कहाणी आहे. हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रजनीकांतच्या अत्यंत गाजलेल्या 'रोबो' या चित्रपटाचा दुसरा भाग '२.०' पुढच्याच वर्षी येतो आहे. त्यात अक्षयनं रिचर्ड ही खलनायक रोबोची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक शंकर भव्यदिव्य सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळंच या चित्रपटाविषयी आणि त्यातल्या अक्षयच्या भूमिकेविषयी सर्वांनाच अत्यंत उत्सुकता लागून राहिली आहे.
चित्रपटसृष्टीसारख्या मोहमयी दुनियेत राहूनही प्रामाणिकपणे, कष्टानं काम करून आपलं करिअर घडविणाऱ्या, शिस्तबद्ध स्वभावाच्या आणि नवनवे प्रयोग करण्याची आवड असलेल्या अक्षयकुमारला यापुढंही अशाच चांगल्या चांगल्या भूमिका मिळोत आणि आपल्याला त्यांचा आनंद लाभो!
---

(पूर्वप्रसिद्धी - साहित्य शिवार दिवाळी अंक २०१७)
---