29 Apr 2018

न्यूड (चित्रा) रिव्ह्यू

नग्न सत्य...
------------

आपण सत्य व नग्नता या दोन्हीला घाबरतो; याचं कारण बहुतेकदा आपल्याच कर्मामुळं आपण या दोन्हींकडं डोळे भिडवून पाहण्याची क्षमता गमावून बसलेलो असतो. नग्नता हे एक प्रकारचं सत्य असतं आणि सत्यही अनेकदा नग्नच असतं. नग्नता आणि सत्य या दोन्ही गोष्टी नैसर्गिक असल्यामुळं स्वाभाविक असतात. आपण आयुष्यभरात नग्नतेकडून नग्नतेकडंच प्रवास करीत असलो, तरी मधल्या आयुष्यात आपण या नग्नतेकडं पूर्ण पाठ फिरवून बसतो. याचं कारण आपल्याला आपल्याच नग्नतेची भीती वाटते. नग्नतेचा संबंध सत्याशी असल्यामुळं आणि आपल्याला सत्याला डोळे भिडवायचे नसल्यामुळं आपण नग्नता दिसली, की दचकतो. आरडाओरड करतो. ‘हे काही तरी वाईट आहे, घाणेरडं आहे,’ असं बोंब ठोकून सांगू लागतो. खरी गोष्ट अशी, की आपण नग्न सत्याला घाबरतो!
आपल्या नकळत कुणी चारचौघांत आपले कपडे काढले आणि ते आपल्याला अचानक कळलं, तर जे काही होईल, ते ‘न्यूड (चित्रा)’ हा रवी जाधव दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट पाहून आपल्याला होतं. सिनेमा संपल्यानंतर येणारं एक सुन्नपण सहन करावं लागतं. एखादी कलाकृती आपल्या जाणिवांना किती खोलवर हादरा देऊ शकते, हे समजतं. आपली एकूणच जगण्याविषयीची समज, आकलन यांना कुणी तरी आव्हान दिलंय, याची खात्री पटते आणि आपण मनोमन या कलाकृतीला दाद देतो.
रवी जाधव यांनी या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या एकूणच कलाविषयक धारणांसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कला म्हणजे काय, कलेचं आपल्या आयुष्यातलं प्रयोजन काय, आपण कलेचं काही देणं लागतो का अशा अनेक प्रश्नांना हा चित्रपट हात घालतो आणि त्याची यथायोग्य उत्तरंही देतो. ही उत्तरं सोपी, गुळमुळीत, सहज नाहीत. कानाखाली कुणी तरी सण्णकन चपराक हाणावी, तशी ही उत्तरं समोर येतात आणि संवेदनशील मेंदूच्या ठिकऱ्या उडवतात. कलाकृतीशी जेव्हा प्रेक्षकांचं असं जैव नातं जडतं, तेव्हा ती कलाकृती फार उच्च दर्जा गाठते. ‘न्यूड (चित्रा)’ आपल्याला त्या प्रतीचा आनंद देतो.
वरवर पाहिलं तर ही यमुना (कल्याणी मुळे) या साध्यासुध्या बाईची गोष्ट. नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील छोट्या गावातून ही बाई आपल्या लहान्या या मुलाला (मदन देवधर) घेऊन मुंबईत मावशी चंद्राक्का (छाया कदम) हिच्याकडं येते. चंद्राक्का सर जे. जे. कला महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून काम करत असते. पण खरं तर तिथं न्यूड मॉडेल म्हणून बसून ती अधिकचे पैसे कमावत असते. यमुनाला ती हेच काम करायला सांगते. आधी हे काम करायला सपशेल नकार देणारी यमुना मुलाच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी हे काम करायला तयार होते. हे काम करताना पहिल्यांदा तिची झालेली प्रचंड घालमेल दिग्दर्शक अत्यंत संवेदनशीलतेनं चित्रित करतो. ‘तन तम्बुरा’ या गाण्याच्या सुरावटींवर यमुना आपल्या देहावरील वस्त्रांच्या कैदेतून मुक्त होते, तशी जणू वर्षानुवर्षं तिच्यावर चढलेली रुढी-परंपरांची कळकट जळमटंही धुऊन निघतात.
यमुनाचा पुढचा सगळा संघर्ष, तिला तिथं भेटलेला तरुण चित्रकार, त्यानंतर एका बड्या व वादग्रस्त चित्रकाराकडं न्यूड मॉडेल म्हणून जाण्याची मिळालेली संधी, लहान्यालाही चित्रकलेची आवड निर्माण झालेली पाहून वाटलेली धास्ती, त्याला शिकायला लांब औरंगाबादला पाठविण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आणि नंतर यमुनाची झालेली फरपट... हे सगळं उत्तरार्धात येतं. त्याच्या जोडीला शेवटाकडं येतं ते दिग्दर्शकाचं एक स्टेटमेंट! हे स्टेटमेंट काय आहे, ते पडद्यावरच पाहायला हवं. या क्लायमॅक्सच्या प्रसंगामुळं या संपूर्ण कलाकृतीला आवश्यक ती मजबूत ‘फ्रेम’ मिळाली आहे, हे नक्की.
रवी जाधव यांनी यात यमुनाची कथा सांगता सांगता अनेक कलाविषयक प्रश्नांना हात घातला आहे. एकूणच समाज म्हणून असलेली आजची विदारक स्थिती ते दाखवत राहतात. एके काळी प्रगल्भ कलाजाणिवा असलेला आपला समाज आज नग्न चित्रांच्या विरोधात निदर्शनं करतो, कलेचं मर्म समजून न घेता, मेंढरांच्या कळपासारखा प्रतिक्रिया देतो, या सगळ्यांमागची नेमकी कारणं काय असावीत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करीत राहतो. चित्रसाक्षरता, किंवा एकूणच दृश्यसाक्षरता याबाबत आपण  किती आणि का मागे आहोत, हे ‘बिटवीन द लाइन्स’ सांगत राहतो. नसीरुद्दीन शहा यांनी साकारलेली ‘मलिकसाब’ ही व्यक्तिरेखा थेट एम. एफ. हुसेन यांच्यावर बेतलेली आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून दिग्दर्शक कलावंतांची बाजू आपल्याला सांगतो. ‘कपडा जिस्म पर पहनाया जाता है और हम अपने काम में रुह खोजने की कोशिश करते हैं’ हा त्यांचा एव्हाना प्रसिद्ध झालेला संवाद याचंच निदर्शक आहे. एकूणच यमुना आणि मलिकसाब यांच्यातला तो प्रसंग आणि त्यातले संवाद जमून आले आहेत.
दिग्दर्शकासोबतच संवादलेखक सचिन कुंडलकर आणि छायाचित्रकार अमलेंदू चौधरी यांनाही या कलाकृतीचं तेवढंच श्रेय द्यायला हवं. विशेषत: अमलेंदूंच्या कॅमेऱ्यानं या कलाकृतीला आवश्यक असलेला कला आणि इतर रखरखीत जीवन यांचा विरोधाभास नेमका टिपलाय. झोपडपट्टीतील चंद्राक्कांचं घर आणि जे. जे. महाविद्यालयातील कलादालन या दोन्हींकडची त्यांची रंगसंगती पाहण्यासारखी आहे. सायली खरे यांच्या संगीताचाही उल्लेख करायला हवा.
कल्याणी मुळे या रंगभूमीवरील अभिनेत्रीचा हा दुसराच आणि मोठी भूमिका असलेला पहिलाच चित्रपट. मात्र, इथं त्यांनी यमुना जीव ओतून साकारली आहे. नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळं रडणारी-भेकणारी, गावाकडची गरीब स्त्री इथपासून मुंबईत येऊन मुलाच्या शिक्षणासाठी उभी राहणारी आत्मविश्वासू स्त्री म्हणजे अशा अनेक कष्टकरी स्त्रियांच्या जगण्याचं प्रातिनिधिक चित्रच. यमुनाच्या भूमिकेसाठी कल्याणी यांना खास दाद. दुसरी महत्त्वाची भूमिका चंद्राक्काची. छाया कदम या जाणत्या अभिनेत्रीची ताकद एव्हाना महाराष्ट्राला समजली आहे. या ताकदीला न्याय देणारी भूमिका त्यांना यात मिळाली आहे आणि त्यांनी तिचं सोनं केलं आहे. ओम भुतकर, मदन देवधर, श्रीकांत यादव, किशोर कदम यांनी छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये उत्तम साथ केली आहे.
काही कलाकृती या केवळ मनोरंजनासाठी पाहायच्या नसतात. त्या आपल्या मेंदूला खुराक देतात आणि त्या प्रक्रियेत आपल्याला समृद्ध करतात. ‘न्यूड’ हा या वर्गातला सिनेमा आहे. तो न पाहणं म्हणजे नग्न सत्य नाकारणं...
---
दर्जा - चार स्टार
---


19 Apr 2018

संगीत देवबाभळी रिव्ह्यू

काटा रुते कुणाला... 
-----------------------

‘संगीत देवबाभळी’ या नव्या मराठी संगीत नाटकाविषयी खूप ऐकून होतो. खूप चांगली परीक्षणं आली होती. मित्र-मैत्रिणीही सांगत होते. या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याचीही फेसबुकवरून ओळख झाली. अखेर आज, गुरुवारी (१९ एप्रिल) हा योग आला. दुपारी १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा प्रयोग पाहिला. नेमका प्राजक्त आजच्या प्रयोगाला नव्हता. पण ज्योती सुभाष आणि नसीरुद्दीन शाह आले होते. त्यांच्यासोबत हा प्रयोग पाहायचं भाग्य आम्हा सर्व प्रेक्षकांना लाभलं.
‘संगीत देवबाभळी’ या नाटकाविषयी आपल्याला आधी फारसं काही माहिती नसतं. आणि खरं तर तेच योग्य ठरतं. मला खरं तर थोडीफार कल्पना होती... पण तरीही मी पाटी कोरी ठेवूनच गेलो होतो. मी शक्यतो इतरांची परीक्षणं आधी वाचत नाही. (नंतर नक्की वाचतो.) त्यामुळं माझ्या कोऱ्या पाटीवर त्या त्या कलाकृतीचं शक्यतो जास्तीत जास्त पूर्वग्रहरहित चित्र उमटतं, असं मला वाटतं. ‘संगीत देवबाभळी’बाबतही तेच झालं. हा दोन-अडीच तासांचा अनुभव घेऊन मी धन्य झालो. मला या नाटकानं एका वेगळ्याच विश्वात नेलं. रंगमंचावर त्या दोन अभिनेत्री, त्यांचे सूर, सुंदर नेपथ्य आणि प्रकाशयोजना आणि नाटककाराचे अप्रतिम शब्द यामुळं हे नाटक पाहणं हा एक निखळ आत्मिक आनंदाचा अनुभव ठरतो.
दोन स्त्रियांचा चाललेला संवाद असं या नाटकाचं एका ओळीत वर्णन करता येईल. पण हा संवाद साधासुधा नाही. कारण यातली एक स्त्री आणि आवली, म्हणजे संत तुकोबारायांची पत्नी आणि दुसरी तर साक्षात रखुमाई... विठ्ठलाची पत्नी... या दोघी एकमेकींना भेटतात. निमित्त असतं भंडारा डोंगरावर आवली गेली असताना तिच्या पायी रुतलेला देवबाभळीचा काटा... हा जो काटा रुतला आहे तोही काही साधासरळ नाही. आपल्या जाणिवा-नेणिवांचाच तो काटा आहे. आपल्या जगण्यात आपणच रुतवत असलेला हा काटा आहे. आपल्या जखमा कुरवाळत बसण्यात आपल्याला एक अहंमन्य सुख मिळत असतं. आपल्या कर्माला, आपल्या नात्यांना, आपल्या श्रद्धांना आपणच जबाबदार असतो. मात्र, तरीही काटा रुतल्यावर तो बाहेर काढण्याऐवजी त्या काट्याला दोष देण्याकडं आपली वृत्ती असते. हा आत्ममग्नतेचा काटा जेवढा खोल, तेवढा त्रास अधिक. इथं या काट्याच्या प्रतीकाविषयी आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ उलगडू शकतो. हे नाटककाराच्या लेखणीचं यश आहे. कलाकृतीतून अर्थांच्या अनेक छटा निघू शकणं हे त्या लेखनाच्या उंचीचंही एक मोजमाप म्हणायला हरकत नाही.
आवली आणि तिच्याकडं लखूबाईचं रूप घेऊन आलेली रखुमाई हे सगळं प्रत्यक्ष न बोलताही, तेच सांगतात. दोघींच्याही व्यथा वेगळ्या, वेदना वेगळ्या. तरीही त्याला बाईपणाचा असा एक ‘पदर’ आहे. त्यांची दु:खं बाईपणाचीही आहेत. असं असलं, तरी दोघींच्या व्यक्तिमत्त्वात एक तीव्र विरोधाभासही आहे. आवली सामान्य संसारी स्त्री, तर रखुमाई म्हणजे सगळ्या विश्वाची आई... तरी आवलीकडं असं काही तरी आहे जे ती लखूबाईच्या रूपातल्या रखुमाईला देऊ शकते आणि रखुमाईही आवलीला बरंच काही देऊन जाते. पावसात भिजण्याचा प्रसंग या दृष्टीनं फार सुंदर झाला आहे. आवलीला त्या पावसात तिचा ‘स्व’ सापडतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आपल्याही चेहऱ्यावर परावर्तित होताना दिसतो.
नवरा विठोबाच्या भजनी लागलाय म्हटल्यावर एका सामान्य स्त्रीचा होणारा संताप आणि दुसरीकडं सगळ्या जगाची उस्तवार करणारा पांडुरंग आपल्याकडं मात्र पाहायला तयार नाही, हे बघून रुसून निघून आलेली रखुमाई... दोघीही एकमेकींशी आधी भांडणातून, मग मायेनं, मग प्रेमानं बोलू लागतात आणि बघता बघता त्यांच्यात एक नातं तयार होतं. नंतर तर संवादाचीही गरज पडू नये, एवढी मनं जुळतात. त्या संवादांतूनच दोघींना आपापल्या पतीची महती कळते आणि आपल्याला या दोघींची!
ही काल्पनिक कथा नाट्यरूपात सादर करताना नाटककार व दिग्दर्शक प्राजक्त देशमुखनं संगीत नाटकाचा फॉर्म स्वीकारलाय आणि इथंच निम्मी बाजी मारलीय. यातली सर्वच गाणी अप्रतिम आहेत आणि दोघी कलाकार त्या प्रत्यक्ष सादर करतात. समोर वाद्यवृंद असतो. फक्त तुकारामांचे अभंग (आनंद भाटे) ध्वनिमुद्रित आहेत.
या नाटकाचं नेपथ्य सुंदर आहे. डाव्या बाजूला आवलीचं स्वयंपाकघर, त्याच्या दाराची उभी चौकट, उजवीकडं तुकोबांच्या ओसरीतील (दीपस्तंभासारखा दिसणारा) खांब व त्यावरची तुकोबांची पगडी, खाली पायऱ्या आणि समोर इंद्रायणी... स्वयंपाकघरात लखूबाईनं सोबत आणलेली त्या सावळ्या परब्रह्माची गोंडस मूर्ती... दृश्यरचना आणि प्रकाशयोजनेतून आवलीचं एकाकीपण पहिल्या प्रवेशातून अधोरेखित होतं. रखुमाईचं उंच स्थान पहिल्याच दृश्यात प्रस्थापित होतं. त्यानंतर तिचं आवलीच्या पातळीवर येणं हेही सूचक. दोघींच्या व्यथा मांडणारे सगळे संवाद स्वयंपाकघरात, म्हणजेच त्या चौकटीच्या आत घडतात; तर त्या व्यथेतून मुक्ती देणारे सगळे संवाद त्या चौकटीच्या बाहेर, खळाळत्या नदीच्या साक्षीनं घडतात. ही दृश्यरचना दाद देण्याजोगी... आवलीच्या जखमेला विठ्ठलाचं रेशमी उपरणं बांधणं आणि शेवटी रखुमाईनं फक्त ते सोबत घेणं हेही खूपच सूचक!
खरं तर या नाटकात अशा अनेक जागा आहेत, की त्या फक्त अनुभवाव्यात. सगळ्याच काही शब्दांत सांगता येत नाहीत. एका गोष्टीबाबत मात्र भरभरून सांगू शकतो, आणि ती म्हणजे शुभांगी सदावर्ते (आवली) आणि मानसी जोशी (रखुमाई) या दोघींचा अभिनय. खरं सांगायचं तर या दोघींचीही नावं मी यापूर्वी कधीही ऐकली नव्हती. शिवाय नाटकाच्या मध्यंतरात अगदी दोनच मिनिटं आम्ही भेटलो. (शुभांगी नाशिकची, तर मानसी मुंबईची.) पण या दोघींनी हे नाटक खऱ्या अर्थानं पेललं आहे, असं म्हणावं लागेल. नाटककारानं कितीही सुंदर लिहिलं, नेपथ्यकारानं कितीही देखणं नेपथ्य केलं, दिग्दर्शकानं कितीही छान जागा काढून दिल्या, प्रकाशयोजनाकारानं कितीही प्रभावी लायटिंग केलं, तरी शेवटी हे सगळं ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत थेट पोचणार आहे ते कलाकारच जर चांगले नसतील, तर अनेक उत्तमोत्तम कलाकृतींची माती होण्याची शक्यता असते. याउलट कलाकार उत्कृष्ट असतील, तर ते मूळ संहितेत नसलेल्या जागाही तयार करू शकतात आणि मूळ कथानक आणखी उंचीवर नेऊ शकतात.
शुभांगी आणि मानसी या दोघींनीही नेमकं हेच केलं आहे. त्याबद्दल या दोन गुणी अभिनेत्रींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक तर अभिनय करता करता गाणं किंवा गाता गाता अभिनय करणं हे दोन्ही अतिशय कठीण आहे. त्यात आवलीच्या पायात काटा रुतलाय. त्यामुळं तिला संपूर्ण नाटकात लंगडत चालावं लागतं. त्यात ती गर्भार असते. त्यामुळं तर हे बेअरिंग आणखीनच अवघड झालं आहे. ते सांभाळत गाणं हे सोपं नाही. अनेकदा तर ती आडवी झोपूनही गाते. (नाटक संपल्यावर मानसीनं ‘अनेक जण आम्ही रेकॉर्डेड गाणी म्हणतो, असं म्हणतात,’ असं सांगून, प्रत्यक्षात आम्ही खरंच इथं गात असतो, असं सांगून शुभांगीसोबत लाइव्ह गातानाचा एक ‘डेमो’च दिला.) शुभांगीनं आवलीचा सगळा त्रागा, चिडचिड, विठ्ठलाचा रागराग आणि नवऱ्याविषयीचं आतून आतून असलेलं खोल प्रेम हे सगळं फार छान दाखवलं.
जी गोष्ट शुभांगीची, तीच मानसीची. तिनं रुसलेली रखुमाई फार ठसक्यात सादर केली. तिचा आवाज, शब्दोच्चार सगळंच अव्वल दर्जाचं आहे. दोघींचेही आवाज फार उत्तम आणि तयारीचे वाटले. साथसंगतही जमून आलेली!
आणि आता प्राजक्तबद्दल. या तरुण दिग्दर्शकाला मी प्रत्यक्ष भेटलो नसलो, तरी आज तो त्याच्या कलाकृतीतून मला व सर्वच प्रेक्षकांना कडकडून भेटला. या कलाकाराला ‘बाई’ कळली आहे, तिची सुख-दु:खं समजली आहेत, असं नक्कीच म्हणू शकतो. यातले अनेक संवाद दाद देण्यासारखे आहेत. त्याच्या लिखाणाला एक प्रसन्न अशी लय आहे. ती नाटक सादर होत असतानाही जाणवते. या नव्या दिग्दर्शकाकडून आता आणखी चांगल्या नाटकांची अपेक्षा नक्कीच करू शकतो.
थोडक्यात, न चुकता घ्यावा, असा हा प्रसन्न संगीत अनुभव आहे.
नक्की पाहा.

दर्जा - चार स्टार
----

17 Apr 2018

ऑक्टोबर - रिव्ह्यू

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल...
-------------------------------------------------------------------------------------


प्रेम या भावनेविषयी बोलू तेवढं कमी आहे. माणसाचं आयुष्य संपलं, तरी प्रेमाच्या सर्व परी त्याला माहिती होतीलच असं नाही. आपल्या चिमुकल्या आयुष्यात माणूस जमेल तसं प्रेमाची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. आपापल्या वकुबानुसार, कुवतीनुसार त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रेम तरीही दशांगुळे उरतं... प्रेमाच्या या अचाट ताकदीकडं आपण फक्त स्तिमित होऊन पाहत राहतो. ‘ऑक्टोबर’ या नव्या हिंदी चित्रपटात दिग्दर्शक शुजित सरकारनं प्रेमाचा असाच एक उत्कट भाव उलगडून दाखवला आहे. तो पाहताना आपल्यालाही प्रेमाचा एक नवाच पैलू गवसतो. आपल्या प्रिय व्यक्तींविषयी पोटात खूप काही दाटून येतं... डोळे पाणावतात... मन कुठल्याशा पवित्र भावनेनं आटोकाट भरून येतं...
तसं म्हटलं तर ही रूढार्थानं प्रेमकथाही नाही. हिंदी चित्रपटांच्या प्रेमकथांच्या व्याख्येत बसेल असंही यात फार काही नाही. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणारा दानिश ऊर्फ डॅन (वरुण धवन) हा तरुण आणि त्याच्याचसोबत काम करणारी शिऊली (वनिता संधू) यांची ही गोष्ट. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात असंही नाही. एकदा शिऊली हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून अपघात होऊन खाली पडते आणि गंभीर जखमी होते. नंतर कोमात जाते. पडण्यापूर्वी तिनं आपली चौकशी केली होती, एवढंच डॅनला समजतं. तो रोज तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायला लागतो. तिच्या कुटुंबीयांशी त्याची ओळख होते. तिची आई भेटते. या सगळ्यांना डॅन शिऊलीसाठी एवढा का तळमळतोय हे कळत नसतं. खुद्द डॅनलाही ते कळत नसतं. मात्र, तिनं पडण्यापूर्वी आपलीच आठवण का काढली असावी, हा एकच प्रश्न त्याला सतावत असतो. मग तो या प्रश्नाचा नकळत शोध घेऊ लागतो. शिऊलीचं पुढं काय होतं, डॅनला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं का, शिऊलीला डॅनविषयी नक्की काय वाटत असतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात. ती पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे.
शुजित सरकारनं या चित्रपटाद्वारे प्रेमाची ही अबोध रीत शोधण्याचा फार अप्रतिम प्रयत्न केला आहे. प्रेम अनेकदा व्यक्त केलं जात नाही. बोलून दाखवलं जात नाही. एखाद्यावर आपलं प्रेम असेल, तरी ते त्याला कळतंच असंही नाही. प्रेम करणारी व्यक्ती कधी ते बोलून दाखवू शकतेच असं नाही. तरीही प्रेम असतंच. ती भावना कायम असतेच. या अशा तरल, अबोध भावनेचा शोध म्हणजे रेशमाची लड उलगण्यासारखा नाजूक प्रकार. या चित्रपटात नायक असा शोध घेऊ लागतो आणि त्याच्या जोडीला आपणही!
कुठल्याही कलाकृतीत कथावस्तूतील मुख्य पात्राशी प्रेक्षकांना असं तादात्म्य साधता आलं, की त्या कलाकृतीच्या आस्वादनाची पातळी स्वाभाविकच उंचावते. ‘ऑक्टोबर’मध्येही नेमकं हे होतं. दिग्दर्शक, संगीतकार, कॅमेरामन आणि प्रमुख अभिनेते यांच्यामुळं हे शक्य झालंं आहे.
वरुण धवननं यात साकारलेला नायक पाहण्यासारखा आहे. त्याच्या कारकिर्दीला दहा वर्षं होत असताना, त्यानं असा चित्रपट करावा, हे त्याच्यातला अभिनेता प्रगल्भ होत चालल्याचं लक्षण आहे. या अभिनेत्याकडून येत्या काळात आणखी चांगल्या कामाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बनिता संधू या नवोदित अभिनेत्रीनं शिऊलीचं काम केलं आहे. चित्रपटातील बहुसंख्य भागांत ती बेडवर आणि नाका-तोंडात नळ्या घातलेल्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीतही केवळ डोळ्यांतून भावप्रदर्शन करण्याचं आव्हान तिनं पेललं आहे. आणखी एक उल्लेख करायचा म्हणजे गीतांजली राव यांचा. नायिकेच्या आईची भूमिका त्यांनी समजून-उमजून केली आहे. चित्रपटाच्या पार्श्वसंगीताचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शंतनू मोईत्रा या गुणी संगीतकारानं दिलेल्या संगीत व पार्श्वसंगीतामुळं या चित्रपटाला विशेष परिमाण लाभलं आहे.
या चित्रपटाच्या शीर्षकात एक प्राजक्ताचं फूल दाखवलं आहे. ऑक्टोबर महिन्याचा आणि या फुलाचा चित्रपटाच्या कथावस्तूशी काहीएक जैव संबंध आहे. त्यामुळंच चित्रपटाचं नाव आणि हे फूल लक्षात राहतं. प्राजक्ताच्या फुलांचा सुवास मन मोहून टाकणारा असतो. सकाळी प्राजक्ताच्या झाडाखाली उभं राहिलं, की खाली सर्वत्र या प्राजक्ताच्या नाजूक फुलांचा सडा पाहायला मिळतो. प्राजक्ताच्या फुलांचं आयुष्यही अगदी कमी असतं. मात्र, तेवढ्या छोट्याशा आयुष्यातही ते फूल आपल्याला सुवासाच्या रूपानं अपरिमित आनंद देऊन जातं. या गोष्टीतल्या कोमात गेलेल्या नायिकेसाठी हे प्रतीक अगदी चपखल आहे. तिचं अव्यक्त प्रेम आणि आता कदाचित ती ते कधीच बोलू शकणार नसल्याचं वास्तव या दोन्ही दृष्टीनं प्राजक्ताच्या फुलाचं प्रतीक इथं बरंच काही व्यक्त करून जातं.
आपण आपल्या आयुष्यात अनेकदा या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. आपल्याला तेव्हा त्या घटनांची उकल नीटशी होत नाही. मात्र, काही काळानंतर, अनुभवांचे घण सोसून मन घट्ट झालं की, कदाचित पूर्वीच्या अनुभवांची नव्यानं ओळख पटू लागते. आपण काही तरी गमावलंय ही भावनाही मनात घर करून बसते. तेव्हा उपयोग नसतो. प्रेम करता यावं लागतं हे खरं, पण कुणी करत असलेलं प्रेम जाणून घेता यावं लागतं हेही तेवढंच खरं. आपल्याला कुणाचं प्रेम समजू शकलं नाही, तर त्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही. प्रेम समजण्यासाठी प्रेम करता यावं लागतं असा हा तिढा आहे. ‘ऑक्टोबर’ आपल्याला दोन्ही गोष्टी शिकवतो.
या सिनेमात अशा ‘बिटवीन द लाइन्स’ सांगितल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. दिग्दर्शक दृश्यांच्या रचनेतून, संवादांतून, तर कधी पार्श्वसंगीतातून त्या गोष्टी आपल्याला कानात गुज सांगितल्यासारख्या हळुवारपणे सांगत राहतो. यातल्या नायकाची तडफड त्यामुळं आपल्यापर्यंत नीट पोचते. कोमात गेलेल्या आणि नंतर केवळ डोळ्यांनी प्रतिसाद देणाऱ्या नायिकेचा श्वास आपल्या कानांना ऐकू येतो. मुलीची ही स्थिती बघून काळीज तुटत असलेल्या तिच्या आईची वेदना आपल्याही काळजापर्यंत पोचते...
आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या कर्कश आवाजांमध्ये आपण हे असे तरल, नाजूक आवाज ऐकायला विसरत चाललो आहोत. सगळ्या भावभावनाही ठळक अन् बटबटीत होत चालल्या आहेत. काही भावना तर सततचे आघात झेलून पूर्ण बधीर झाल्या आहेत. प्रेमासारख्या विश्वव्यापी भावनेला आपण आपल्या आकलनाच्या छोट्याशा कुपीत बंदिस्त करून मेंदूतल्या कपाटात बंद करून ठेवलंय.
पण कधी तरी समोर अशी कलाकृती येते आणि आपल्याला अंतर्बाह्य हादरवून टाकते. आपल्या जाणिवांना आतून आतून धक्के मारते आणि गदागदा हलवून जागं करते. प्रेमाच्या या नव्या परीचं हे रूप पाहून आपण अवाक होतो. आपण कधी असं प्रेम करू शकू का, या विचारानं अंतर्मुखही होतो. आतून आतून तुटतं काही तरी... मग सुरेश भटांच्या ‘मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल...’ या कवितेतली आर्तता अचानक जाणवू लागते. समजू लागते...
आपण अशा कलाकृतींचं देणं लागतो, ते यासाठीच!
---
दर्जा - चार स्टार
---11 Apr 2018

हिचकी, बागी - २, रेड, ब्लॅकमेल

चार सिनेमे, चार नोट्स
----------------------------

१. हिचकी
----------------------

मुलांना जरूर दाखवा...
----------------------------------
काही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. आजपासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. तीन आठवड्यांपूर्वी आलेला ‘हिचकी’ आज पाहिला. अतिशय साधा, सरळ असा हा सुंदर सिनेमा आहे. राणी मुखर्जीनं साकारलेली यातली नैना माथूर या शिक्षिकेची भूमिका पाहण्यासारखी आहे. तिला ‘टोरेट सिंड्रोम’नं लहानपणापासून ग्रासलेलं असतं. ‘टोरेट सिंड्रोम’ म्हणजे एक प्रकारची उचकी. ही न थांबणारी उचकी आहे. या उचकीमुळं नायिकेला लहानपणापासून अतोनात शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. तिला शिक्षिकाच व्हायचं आहे, पण या त्रासामुळं तिला ती नोकरी मिळत नाही. अखेर तिच्याच शाळेत तिला काही काळापुरती नोकरी मिळते. तीही ‘राइट टु एज्युकेशन’मुळं त्या उच्चभ्रू शाळेत वाढविलेल्या ‘नववी फ’च्या वर्गावरची. (इथं ‘दहावी फ’ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.) ही झोपडपट्टीतली मुलं असतात. त्यांचा आणि नैनाचा सामना झाल्यावर पुढं काय होतं, नैनाची नोकरी टिकते का, या मुलांचं भवितव्य बदलतं का आदी सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं अगदी स्वाभाविक आहेत. त्यात नवं काही नाही. त्यामुळं अशा सिनेमात जे जे होईल, असं आपल्याला वाटतं ते घडतं आणि सिनेमा संपतो. पण या सिनेमाचं वेगळेपण आहे ते या साधेपणातच. अगदी एकरेषीय पद्धतीनं या सिनेमाचं कथानक पुढं सरकतं. पण तरीही ते कुठंही कंटाळवाणं वाटत नाही. याचं कारण दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रानं कुठलेही विचित्र प्रयोग करणं टाळून स्वीकारलेला ’कीप इट सिंपल’ हा मंत्र आणि राणी मुखर्जी. राणीनं यातली नैना फार समरसून साकारली आहे. तिचं हे मोठ्या पडद्यावरचं पुनरागमन सुखावणारं आहे. चित्रपटातले सगळे प्रसंग जमून आले आहेत. सचिन व सुप्रियानं यात राणीच्या आई-वडिलांची भूमिका केली आहे. मुख्याध्यापकाच्या भूमिकेत शिव सुब्रह्मण्यम आणि नीरज कबी यांनी रंगविलेली काहीशी खलनायकी भूमिका याही गोष्टी जमून आल्या आहेत. सध्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. आपल्या टीन-एज मुलांना तर आवर्जून दाखवा, असंच मी म्हणीन.

दर्जा - साडेतीन स्टार

(8.4.18)
----

२. बागी - २
--------------

अक्शी(न) मणोरंजण...
--------------------------------
काही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. कालपासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. काल ‘हिचकी’ पाहिला, तर आज दोन आठवड्यांपूर्वी आलेला ‘बागी -२’ पाहिला. एखाद्या उंटाला मानवी चेहरा लाभला असता, तर तो जसा दिसला असता, तशा तोंडाच्या, थोडक्यात, ‘उष्ट्रमुखी’ (हा शब्द प्रथम शिरीष कणेकरांच्या लेखनात मी वाचला. त्यांनी तो दिलीपकुमारसाठी वापरला होता. नंतर कुणी तरी युक्ता मुखीसाठी... तर ते असो.) अशा, पण नाव ‘टायगर’ असलेल्या जॅकीपुत्राचा सिनेमा मी कधी पाहीन, असं वाटलं नव्हतं. पण ‘सुट्टीत टाइमपास करणे’ या एकाच ध्येयानं सध्या माझा मुलगा आणि (त्याच्यामुळं) मी प्रेरित झालो आहोत. त्यामुळं हा ‘बागी’ पाह्यचा निर्णय झाला. आणि हा निर्णय किती योग्य होता, हे मला अडीच तासांनंतर नीटच कळून आलं. कुठलीही कलाकृती, कुठल्याही कारणानं तुम्हाला आनंद देत असेल, तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत असेल, तर ती उत्तम कलाकृती मानायला हरकत नसते. ‘बागी- २’ या अॅक्शनपटानं मला तोच आनंद दिला. हा सिनेमा पाहताना मी मनमुराद हसलो. या चित्रपटानं किती तरी शास्त्रांना दिवसाढवळ्या थड लावला आहे. त्यातही भौतिकशास्त्रावर दिग्दर्शक अहमद खानचं प्रेम अधिक असावं. त्यामुळं गुरुत्वाकर्षण, बल, प्रतिबल, वस्तुमान, ऊर्जा आणि त्यांचे सिद्धान्त या सगळ्यांना त्यानं अक्षरश: एकाच ‘शॉट’मध्ये गोळ्या घालून ठार मारलं आहे. त्या दृष्टीनं यातला टायगरचा शेवटचा हेलिकॉप्टरमध्ये उडी मारण्याचा किंवा दोराला लटकून मशिनगन चालवण्याचा सीन पाहण्यासारखा आहे. (खरं तर कशाला पाहता?) यातले गंभीर सीन विनोदी वाटतात, तर विनोदी सीन हास्यास्पद... अॅक्शनदृश्यं सर्कशीसारखे वाटतात, तर कथित सस्पेन्स पुन्हा विनोदी... पण एक आहे. मनोरंजन करण्याचा वसा मात्र या सिनेमानं सोडलेला नाही. टायगर श्रॉफ हा वास्तविक काहीसा ठेंगणाच नट दिसतो. मात्र, यात त्याला ‘लार्जर दॅन लाइफ’ करण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शकानं त्याचा शर्ट एवढा मोठा शिवला आहे, की त्यात दोन-पाच अमिताभ, तीन-चार स्टॅलन, एक-दोन अरनॉल्ड श्वार्झनेग्गर, पाच-सात धर्मेंद्र, आठ-दहा सनी देओल आणि पाच-पंधरा अजय देवगण सहज बसावेत. आणि दुर्दैव म्हणजे सलमानप्रमाणे शेवटच्या दृश्यात त्याचा हा भलामोठा शर्ट काढून त्याला अक्षरश: उघड्यावर आणला आहे. या टायगरची ड्वायलॉक डिलिव्हरी म्हणजे एक अचाट प्रकार आहे. तो शांत वगैरे असताना आपल्याला त्याचं एखादं वाक्य कदाचित नीट कळू शकतं. पण तो संतापून, किंंवा दु:खाने किंवा उद्वेगाने किंवा चिडून काही बोलू लागला, तर साधारणत: पन्नास चिंचुंद्र्यांच्या शेपटाला कर्कटक टोचल्यावर त्या जशा ओरडतील, तशा आवाजात या ‘टायगर’चा आवाज फुटतो. आणि तो ऐकून आपणही हसून हसून फुटतो.
बाकी सिनेमाबाबत न बोललेलंच बरं. मनोज वाजपेयी, रणदीप हुडा आदी दिग्गज मंडळींनाही वाया घालवलं आहे. दिशा पटणी नामक गुडिया बरी दिसते. पण ते तेवढंच. स्मिताच्या लेकराला (प्रतीक बब्बर) यात गर्दुल्ल्याची दुय्यम-तिय्यम भूमिका करताना पाहून वाईट वाटतं.
असो. बाकी कुठल्या का कारणानं होईना, आपलं मनोरंजन झालं, याच आनंदात आपण घरी परत येतो... हेच या चित्रपटाचं सर्वांत मोठं यश होय....
--
दर्जा - दोन स्टार

(9.4.18)
---

३. रेड
-------

छाप पडतेच...
--------------------
काही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. परवापासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. परवा ‘हिचकी’ पाहिला, काल ‘बागी-२’ पाहिला, तर चार आठवड्यांपूर्वी आलेला ‘रेड’ आज पाहिला. अजय देवगण, इलियाना डिक्रूझ आणि सौरभ शुक्ला यांची प्रमुख भूमिका असलेला, राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट १९८१ मध्ये उत्तर प्रदेशात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. मला असे पीरियड ड्रामा पाह्यला नेहमीच आवडतात. नजीकचा भूतकाळ आणि त्यातले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बदल हा माझ्या आवडीचा, अभ्यासाचा विषय आहे. ‘रेड’चं कथानक या साच्यात परफेक्ट बसणारं आहे. अमेय पटनाईक (अजय देवगण) या कर्तव्यदक्ष, इमानदार प्राप्तिकर उपायुक्ताची आणि त्यानं रामेश्वरसिंह (सौरभ शुक्ला) या स्थानिक बड्या राजकारण्याच्या आलिशान प्रासादवजा बंगल्यावर घातलेल्या छाप्याची ही गोष्ट आहे. दिग्दर्शक आणि कथालेखक रितेश शहा दोघेही आपल्या प्रतिपाद्य विषयाशी प्रामाणिक राहिले आहेत. कथा इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे त्यांनी त्या कथेवरच फोकस केला आहे आणि त्यामुळं चित्रपट पाहण्यातली उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. चित्रपटातले संवाद खटकेबाज आहेत. छाप्यादरम्यान उघड होणाऱ्या एकेक गोष्टी आणि त्यातून संबंधित माणसांचे बदलणारे पवित्रे दिग्दर्शकाने नेमके टिपले आहेत. उत्तर प्रदेशातल्या ‘बाहुबली’ राजकारण्यांची जीवनशैली आणि त्यांचा एकूणच व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातून दिग्दर्शकानं स्वच्छ टिपला आहे. अजय देवगणनं यात साकारलेला अधिकारी ही त्याची हातखंडा भूमिका आहे. अजय आपल्या डोळ्यांतून अनेकदा व्यक्त होतो. संबंधित पात्राचं कन्व्हिक्शन त्याच्या देहबोलीतून प्रकट होत असतं. खालच्या आवाजातले त्याचे धारदार संवाद चित्रपटात अनेकदा दाद मिळवून जातात. सौरभ शुक्लानंही यातल्या ‘ताउजीं’ना न्याय दिला आहे. बघितल्याबरोबर डोक्यात सणक जावी, असा हा टिपिकल राजकारणी सौरभ शुक्लानं जबरदस्त साकारला आहे. सुटकेसाठी थेट दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटणारा आणि त्यांना सूचक धमकी देणारा हा बेडर ताऊजी म्हणजे सौरभ शुक्लाच्या कारकिर्दीतली एक महत्त्वाची भूमिका ठरावी. इलियाना डिक्रूझ साडीत छान दिसते. यात पतीच्या कर्तव्यदक्षतेविषयी मनातून अभिमान असणारी, त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी त्याची पत्नी मालिनी तिनं व्यवस्थित साकारली आहे. याशिवाय यात लल्लन नावाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याची भूमिका अमित सियाल या अभिनेत्यानं चांगली केली आहे. अमित त्रिवेदीचं संगीतही श्रवणीय.
पटनाईकला या छाप्याची टिप कुणी तरी देत असतं. ते कोण असतं, हा या चित्रपटातला चिमुकला सस्पेन्स आहे. तो कायम ठेवणंच इष्ट. एकदा नक्कीच बघावा असा हा चित्रपट. तो पाहिल्यानंतर गेल्या ३७ वर्षांत देश काळ्या पैशांच्या साठवणुकीबाबत कुठून कुठं गेला आहे, याचीही एक झलक मिळते. थोडक्यात, ज्याची छाप आपल्यावर पडते, असा हा छाप्याबाबतचा सिनेमा पाहायलाच हवा.
दर्जा - साडेतीन स्टार

(10.4.18)
---

४. ब्लॅकमेल
---------------

लफडा नै करने का...!
-------------------------------
काही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. रविवारपासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. त्या दिवशी ‘हिचकी’ पाहिला, सोमवारी ‘बागी-२’ पाहिला, काल ‘रेड’ पाहिला, तर आज याच आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘ब्लॅकमेल’ पाहिला. अभिनय देव दिग्दर्शित हा सिनेमा ब्लॅक कॉमेडीच्या अंगानं जात, सव्वादोन तास चांगला खिळवून ठेवतो. ‘दिल्ली बेली’एवढी नसली, तरी हा चित्रपट आणि त्यातली पात्रं पुरेशी अत्रंगी आहेत. 
आपल्या नायकाला त्याच्या बायकोनं फसवलं आहे. तिचं तिच्या जुन्या मित्रासोबत अफेअर आहे. ते लक्षात आल्यावर नायक तिच्या मित्राला ब्लॅकमेल करायचं ठरवतो. त्यातून ब्लॅकमेलिंगची मालिकाच सुरू होते. ज्याला ज्याला हे रहस्य कळलंय तो पैशांच्या बदल्यात ते रहस्य लपवायची तयारी दाखवतो. यात नायकाचा ऑफिसमधला एक मित्र आणि आणखी एक मुलगीही असते. त्यात मधेच या मुलीचा अपघाती मृत्यू की खून असं काही तरी होतं. मग त्यातून आणखी गुंतागुंत... अखेर सगळ्या संकटांतून पार पडत आपला नायक हा कॉम्प्लिकेटेड गेम जिंकतो...
या चित्रपटाची सगळी गंमत त्यात तयार होणाऱ्या सिच्युएशन्समध्ये आहे. त्या दृष्टीनं पटकथा जमली आहे. उत्तरार्धात काही वेळा किंचित कंटाळा येतो. मात्र, त्या मुलीच्या मृत्यूनंतर घटना वेग घेतात आणि शेवटही व्यवस्थित होतो. नायक ‘टॉयलेट पेपर’चा सेल्समन आहे. तरी ‘दिल्ली बेली’च्या मानानं टॉयलेट जोक कमी आहेत. अर्थात एक मात्रा वाढविली आहे. पुरुषाचे ‘एक हाताने करता येण्याजोगे’ सगळे विनोद अभिनयनं यात इरफानकडून करवून घेतले आहेत. (इथं ‘असे विनोद म्हणजे इरफानच्या डाव्या हातचा मळ...’ असं काही म्हणवत नाही. मळमळतं...) त्यातही ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या बायकांचे फोटो समोर ठेवून हे चाललेलं असतं. असो.
अशा चित्रपटांत कलाकारांची कामं महत्त्वाची ठरतात. इथं मुख्य भूमिकेत इरफानला घेऊन दिग्दर्शकानं निम्मी बाजी मारली आहे. इरफाननं नेहमीप्रमाणे इथं देव कौशलच्या भूमिकेत कमाल केली आहे. अत्यंत थंड डोक्यानं तो सगळ्या गोष्टी कशा प्लॅन करतो आणि यशस्वी करतो, हे बघण्यासारखं आहे. कीर्ती कुलहारी, अरुणोदयसिंह, ओमी वैद्य यांनीही चांगली कामं केली आहेत. दिव्या दत्ता डॉली म्हणून शोभली नाही. तिच्या खुनाचा प्रसंगही किळसवाणा चित्रित केलाय. असो.
एकदा पाह्यला हरकत नाही.

दर्जा - तीन स्टार

(11.4.18)
----


8 Apr 2018

#सम्याआणिगौरीच्यागोष्टी #सीझन ३

सम्या आणि गौरीच्या गोष्टी
--------------------------------

सीझन ३
----------

२१
----

सिलेक्टेड प्रेम...
------------------

समीर : हाय गौरी...
गौरी : हाय सम्या....
समीर : सुट्टीतला कंटाळा अजून जात नाहीये...
गौरी : हो ना, सुट्टी पटकन अंगात मुरते.... तापासारखी... त्याउलट कामाचा दिवस अंगी मुरता मुरत नाही...
समीर : मग? काय फलित सुट्टीचं?
गौरी : हेच की, कामाशिवाय आपल्या जगण्यात काही राम नाही. काम करीत राहिलं पाहिजे. जिथं काम तिथं राम!
समीर : अर्थात! भरपूर काम केलं, की मग सुट्टीची खरी मजा... जो कामातही टंगळमंगळ करतो त्याला सुट्टीचं काय कौतुक असणार!
गौरी : म्हणून तर मी मनापासून काम करते, आवडीचं काम करते आणि मग त्यात थोडा बदल हवा, रिफ्रेश व्हायला हवं, म्हणून मग सुट्टी घेते. तीही फार नाही. जास्तीत जास्त एखादा आठवडा...
समीर : पण आपल्या भेटीला बरेच दिवस झाले आता... 
गौरी : हा ब्रेक जास्त झाला खरा, पण एखादी व्यक्ती आपल्याला कधी भेटणार याची हुरहुर लागणार असेल ना, तर नंतर होणारी भेट फार म्हणजे फारच गोड असते...
समीर : हो, एवढी गोड की, त्या भेटीनंतर शुगर वगैरे होणारच एखाद्याला... आणि ती भेटही मग अशी काही घट्ट...
गौरी : बास बास... पुढचं वर्णन नको... कळलं...
समीर : बरं बाई... पण मला नेहमी ना एका गोष्टीची गंमत वाटते. माणूस सदैव कशाच्या ना कशाच्या शोधात असतो. त्याला समाधान असं नसतं. आता सुट्टीचंच बघ ना... ज्या सुट्टीसाठी मी एवढी तडफड केली, ती सुट्टी सुरू झाल्यावर काही दिवसांतच मला बोअर व्हायला लागली. 
गौरी : याचं कारण आहे सम्या. आपण ना, आपल्याला जे हवं असतं, तेवढंच त्या गोष्टीत बघतो. पण हे पॅकेज असतं. हव्या त्या एका गोष्टीबरोबर नको असलेल्या दहा गोष्टी येतात. तुला सुट्टीतला निवांतपणा किंवा मोकळी संध्याकाळ तेवढी हवी असते. पण मग त्याबरोबर संध्याकाळचं ट्रॅफिक जॅम आणि इतर सर्व मित्र-मैत्रिणी त्यांच्या व्यापात बिझी हे लक्षात आल्यावर तुला बोअर व्हायला लागतं.
समीर : खरंय. आपण फार सिलेक्टेड झालो आहोत सगळ्या बाबतीत...
गौरी : अगदी प्रेमाच्याही बाबतीत. प्रेमही आपल्याला असंच सिलेक्टेड हवं असतं. विशिष्ट वेळी, विशिष्ट व्यक्तीकडून, विशिष्ट पद्धतीचं प्रेम आपल्याला अपेक्षित असतं. एवढं स्वार्थी नको ना व्हायला...
समीर : आता प्रेमावर कुठं घसरलीस एकदम... 
गौरी : विषय तिथं येणारच होता... मी आधीच सांगून टाकलं...
समीर (हसत) : छान... आलं लक्षात... सुट्टी संपली... माझा क्लास सुरू झाला...
गौरी (गळ्यात पडत) : असा गोड विद्यार्थी हवाच आहे मला रोज नवे धडे शिकवायला....
समीर : हम तैय्यार है....

---

२२
----

गौरीची 'व्याजोक्ती'
----------------------------

समीर : गौरी, गुंता झालाय सगळा... 
गौरी : आता काय झालं?
समीर : माणसं का गुंततात एकमेकांमध्ये? तीही एकाच वेळी अनेकांमध्ये?
गौरी : कुणाचं सांगतोयस? आणि कशासाठी?
समीर : सगळेच गं... आय मीन, एकच एक असं उदाहरण असं नाहीय माझ्यासमोर... पण मी पाहतोय आजूबाजूला...
गौरी : आपलाही अपवाद करायचं कारण नाही. सगळेच अडकलो आहोत.
समीर : पण का? काय गरज याची?
गौरी : माणूस हा फार बिलंदर प्राणी आहे सम्या. जोवर एखादी गोष्ट त्याच्या आवाक्यात नसते ना तोवर ती गोष्ट जणू अस्तित्वातच नसते. पण एकदा का ती वस्तू प्राप्य आहे असं दिसलं की त्याला ती लगेच हवीशी वाटू लागते. या कथित प्रेमाचं आणि भावनिक गुंतवणुकीचं तसंच असतं.
समीर : एवढा उथळ दृष्टिकोन? 
गौरी : सगळ्यांचा नसावा. आजकाल काय झालंय, भौतिक समृद्धी भरपूर आली असली तरी भावनेचा दुष्काळ पडलाय. जवळच्यांना समजून घ्यायला वेळ नाही किंवा ते फार गृहीत धरताहेत नात्यांना... 
समीर : पण म्हणून थेट दुसऱ्या बँकेत अकाउंट?
गौरी : तुम्हाला तुमच्या खातेदारांत 'इंटरेस्ट' नसेल तर तो जाणारच ना दुसऱ्या बँकेकडं?
समीर : हे अती होतंय हं. गुंतवणूकही आम्हीच करा, इंटरेस्टही आम्हीच दाखवा... खातेदाराला मात्र बँकेची बांधिलकी नको... वा रे वा!
गौरी : एक मिनिट, आम्ही सांगितलं होतं का बँक सुरू करायला? खातेदार येत-जात राहणारच... बँकेनं त्यांच्यात भावनिक गुंतवणूक करू नये. व्याज जर मुद्दलाच्या प्रेमात पडलं तर बँकेचं दिवाळं वाजलंच म्हणून समज.
समीर : म्हणजे आपल्या कोणी कितीही प्रेमात पडलं तरी आपण त्यांच्या प्रेमात पडायचं नाही?
गौरी : अगदी बरोबर! असं केल्यासच तुझ्या संसाराचं 'लोकमङगल' होईल...
समीर : 'लोकमङगल' म्हणजे?
गौरी : म्हणजे जी सहनही होत नाही आणि सोडताही येत नाही, ती - आपली.... - बँक - रे सोन्या!!

----

२३
---

‘रामबाण’
------------

समीर : गौरे, हा घे सुंठवडा... रामजन्म झाला...
गौरी : कुठं उंडारत असतोस रे उन्हातान्हाचा...?
समीर : अगं, रामरायाचा जन्मच भर दुपारी १२ वाजता झाला, त्याला काय करायचं?
गौरी : तू कधीपासून एवढी रामाचा हनुमान झालायस?
समीर : अगं, आपल्या आपटेकाकू भेटल्या होत्या गं रस्त्यात. त्यांनी दिला. मग नाही कसं म्हणायचं? बाकी मी फार देव देव करणाऱ्यातला नाही, हे तुला माहितीय.
गौरी : माझी या विषयावरची मतं तर तुला माहितीच आहेत...
समीर : हो अगदी. पण सुंठवडा खा... प्रकृतीला बरा असतो.
गौरी : बाकी तुझा हा राम मला अगदीच करुण देव वाटतो... खरं तर तो माणसाची सगळी लक्षणं दाखवतो. त्याला तुम्ही उगाच ‘मर्यादापुरुषोत्तम’ वगैरे करून मखरात बसवलाय...
समीर : माणसाची लक्षणं म्हणजे? 
गौरी : सीतेसारख्या बायकोला अग्निपरीक्षा करायला लावली, इथंच तो माझ्या डोक्यात गेलाय. आणि दुसरा एक बारीक मुद्दा म्हणजे, वाली-सुग्रीव युद्धात तुमच्या रामभाऊंनी चीटिंग केलंय. सुग्रीवाला गळ्यात हार घालायला लावून, वालीला लपून बाण मारलाय.
समीर : काही तरी कारण घडलं असेल ना! युद्धात सारं काही क्षम्य असतं, असं मानलेलं आहे. दुसरं म्हणजे देव होता तो... 
गौरी : देव नव्हता रे उलट. माणूस म्हणशील तर उलट त्याचं हे स्खलनशील असणं पटू शकतं... पण देव म्हणून कसं काय पटवून घ्यायचं?
समीर : आपल्या थोर पूर्वजांनी या कहाण्या मुळात कशा लिहिल्या होत्या आणि त्यात काय काय बदल होत नक्की कोणतं व्हर्जन आत्ता आपण ऐकतोय हे सांगणं शक्य आहे का? त्यामुळं या पुराणकथांमध्ये शंकांना नेहमीच वाव राहणार.
गौरी : मी काहीच म्हणत नाहीय. माझा मुळात यावर विश्वासच नाहीय. तू आणि तुझा राम...आनंदात राहा...
समीर (चिडवत) : आता माझ्यात काही ‘राम राहिलेला नाही’ असं म्हणू नकोस गौरे...
गौरी (हसत) : ते म्हणून कसं चालेल? तुला ‘एकगौरीव्रत’ पाळावंच लागेल सम्या... नाही तर मी बाण काढलाच म्हणून समज... आणि तो एकदम ‘रामबाण’ आहे...
समीर (हसत) : सुंठवडा घ्या सीतामाई...
गौरी (उशी फेकत) : सम्या, तू मेलास आज...

---

२४
---

सोशल आणि प्रायव्हेट...
-------------------------------------

गौरी : सम्या, या बातम्या वाचल्या का? फेसबुक आणि ती कुठली तरी कंपनी... यांनी आपल्या प्रायव्हसीची वाट लावलीय. सगळंच बोंबललंय...
समीर : हे आज ना उद्या होणारच होतं... आपण स्वत:हून सगळं त्यांच्या स्वाधीन केलंय... आपल्याला सगळे अॅप हवेत, सगळ्या सेवा-सुविधा हव्यात, मग ते फुकट थोडंच मिळणार?
गौरी : पॉइंट आहे. पण मला भीती वाटतेय याची...
समीर : भीती वाटण्यासारखंच आहे हे अगं... हे लोक डेटा गोळा करून स्वस्थ बसलेले नाहीत. तो डेटा प्रोसेस करण्याचं काम तिकडं अव्याहत सुरू आहे. 
गौरी : आणि ते करून काय करणार?
समीर : हा डेटा म्हणजे त्यांच्यासाठी अलिबाबाची गुहा आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे प्रचंड पैसे मिळवून देणारी... 
गौरी : मला तर आपण कळसूत्री बाहुल्या असल्यासारखं वाटतंय रे...
समीर : आपण झालो आहोत नकळत... ‘मार्केट ड्रिव्हन’ झालो आहोत. कुणी तरी आपल्याला खेळवतंय आणि क्षणिक आनंदापायी आपण दीर्घकालीन गुलामगिरीच्या तयारीला लागलो आहोत.
गौरी : ती कृत्रिम बुद्धिमत्ता की काय म्हणतात ती आपल्यावर राज्य करणार तर...
समीर : माहिती नाही, नक्की कशा स्वरूपात हे पुढं अजून वाढेल ते... पण हो, एक गोष्ट नक्की... आपण जोवर हा सोशल मीडिया वापरत आहोत आणि त्यांच्या सर्व अटी-शर्ती डोळे मिटून ‘अॅक्सेप्टेड’ म्हणत आहोत, तोवर आपल्यावर कुणी ना कुणी नकळत राज्य करत राहणार हे नक्की...
गौरी : मी माझ्या स्वत:च्या मनानं विचार न करता, दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यानुसार विचार करते आहे; माझे विचार कुणी तरी नियंत्रित करीत आहे ही किती भयावह कल्पना आहे रे!
समीर : अगदीच... खरं तर ही प्रक्रिया आत्ताही सुरू झालीच आहे. तू पाहा ना! तू कुठं जातेस, काय खातेस, काय पितेस, काय खरेदी करतेस, काय सर्च करतेस या सगळ्यांवर त्यांचं लक्ष आहे बघ... तुला लगेच नोटिफिकेशन येतात बघ...
गौरी : हो, तुम्ही आत्ता हे घेतलंत, आता हे ट्राय करा... तुम्ही आत्ता हे पाहिलं, आता ते नक्की पाहा, तुम्हाला आवडेल... असे मेसेज येत असतात खरं...
समीर : तेच... सोशल मीडिया आपल्यावर राज्य करतोय... पुढेही करणार...
गौरी : गंमत बघ... प्रेमात आपण दुसऱ्याचा एवढा विचार करतो, त्याच्या विचारानं आपलं मन व्यापून जातं... तिथं आपल्याला गुलामगिरीचं फीलिंग येत नाही. पण इथं हे वेगळंच आहे.
समीर : याचं कारण तिथं आपण समजून-उमजून हे करीत असतो. इथं तसं नसतं. इथं उलट तुमच्या नकळत सगळं सुरू असतं... प्रेमाची आणि सोशल मीडियाची तुलना कशी होणार? दोन टोकं आहेत ही...
गौरी : हो रे... म्हणूनच मला आपलं प्रेमच छान वाटतं... आणि ती आपली खरी प्रायव्हेट गोष्ट आहे...
समीर (हसत) : हो ना... मग आता हा संवाद थांबवू या... आणि मुक्यानं संवाद साधू या...
गौरी (हसत) : कोटीबहाद्दरा, ‘लिप सर्व्हिस’ पुरे झाली... आता प्रत्यक्ष काम करू या...  

---

२५
----

गंजल्या ओठांस माझ्या...
----------------------------------

गौरी : सम्या, काय रे? काय झालं? डोळ्यांत पाणी?
समीर : काही नाही अगं... आत्ता ते गाणं ऐकत होतो ना, ‘गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे...’ ते ऐकता ऐकता एकदम पाणीच आलं डोळ्यांतून... एरवी हे गाणं कधी रडवत नाही. पण आज आलं पाणी... सुरेश भटांचे शब्द, बाळासाहेबांची चाल आणि बुवांचा एकदम मनावर पकड घेणारा घनगंभीर स्वर... सगळंच जमून आलंय...
गौरी : अरे हो! ‘उंबरठा’मधलं ना हे गाणं... मलाही खूप आवडतं... पण खूप दिवसांत ऐकलं नाही... 
समीर : ती सुलभा महाजन अशी टांग्यातून चाललेली असते. तो रस्ताही असा एकाकी वगैरे भासतो उगाच... ही सगळी स्वप्नं डोळ्यांत घेऊन निघलीय त्या अनोळखी बदलीच्या गावी... तिचे डोळे पाहा या गाण्यात... स्मिताच करू जाणे हे...
गौरी : किती भरभरून बोलतोयस अरे... पण आज अचानक या गाण्यानं का रडवलं बरं माझ्या राजाला?
समीर : आत कुठं तरी, काही तरी हललं असणार... प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद घेताना आपण स्वत:शी ती सतत रिलेट करत असतो. हे मुद्दाम होतं असं नाही. पण काही तरी त्यातलं एकदम आपलंसं वाटून जातं... मी जेव्हा विशीत होतो आणि माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं ना, तेव्हा हे गाणं माझ्या सोबतीला होतं.
गौरी : खरं सांगतोस? किती छान...! तू कधी बोलला नाहीस हे मला सम्या?
समीर : अगं, मुद्दाम बोललो नाही असं नाही. कधी कधी काही आठवणी काळाच्या उदरात गडप होऊन जातात. पण काही तरी ट्रिगर मिळाला, की त्या फसफसून वर येतात. आज हे गाणं ऐकताना तसं झालं असावं...
गौरी : अगदी खरंय... प्रत्येक गाण्याशी, त्यातल्या स्वरांशी, सूरांच्या हिंदोळ्याशी, प्रत्येक वाक्याशी, शब्दाशी आपला जीव कसा, कधी गुंतलेला असेल सांगता येत नाही हं...
समीर : यातलं शेवटचं जे कडवं आहे ना, ‘लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु, तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे’ हे जणू माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे बघ. त्या अडचणीच्या दिवसांत या शब्दांनीच आधार दिला होता. त्यामुळंच अडचणी आल्या, तरी चुकीच्या गोष्टी करण्याकडं कधी मन गेलं नाही.
गौरी : आई ग्ग... सम्या....
समीर : खरंच अगं... आणि हे कधीही तुटू नये...
गौरी (गळ्यात पडत) : मला माहितीय हे डार्लिंग... मला तू खूप खूप खूप आवडतोस यासाठीच... आणि आज रडलास ना माझ्यासमोर... हे असं रडणं, मोकळं होणं मला फार आवडतं. लोक अनेकदा आपल्या या खऱ्या भावना दडपून टाकतात आणि मुखवटे लावून जगतात. पण असं करू नये. हे असं मोकळं रडणं ही तुमच्यातल्या सच्च्या माणूसपणाची खूण असते, असं मला वाटतं बघ. आणि तू तसा आहेस, म्हणूनच मला आवडतोस. लव्ह यू!!
समीर (हसत) : आणि तू सोबत आहेस म्हणूनच माझी मैफल सुनी सुनी नाहीय गौरे... 
गौरी (चिडवत) : आणि म्हणूनच मी तुला कधी ‘उंबरठा’ही ओलांडू देत नाही...

---

२६
----

वेदनेचा गाव...
----------------------

गौरी : काय सम्या, काय वाचतोयस एवढं मोबाइलमध्ये डोकं खुपसून?
समीर : अगं, हा एक मेसेज आलाय. त्यात एक खूप छान उल्लेख आहे. पण वाचताना एकदम काटाच आला अंगावर...
गौरी : काय रे मेसेज? वाच ना...
समीर : तुझ्या आनंदात, सुखात मला वाटेकरी नाही होता आलं, तरी चालेल; पण कधी दु:खी झालास तर त्या ओल्या पापण्यांत मला थोडा निवारा असू दे... 
गौरी (संशयानं) : तुला कुणी पाठवला हा मेसेज पण?
समीर : अगं फॉरवर्ड आहे. माहिती नाही कुणाचा आहे, पण मला आवडला. पहिली ओवी कुणी लिहिली, पहिली शिवी कुणी दिली हे शोधणं जसं अशक्य आहे, तसंच व्हॉट्सअपवर पहिला मेसेज कोण फॉरवर्ड करतं हे सापडणं कठीण... एरवी मी लगेच डिलीट करत असतो. पण यात मला एकदम काही तरी टोचलं...
गौरी : हं खरंय. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतात असं नाही. पण प्रेम उरतंच. मग ते असं व्यक्त होतं. प्रेमाच्या किती या परी असतात... प्रेम लपत नाहीच. प्रेम संपत तर मुळीच नाही. आयुष्य संपतं, सगळे भोग भोगून संपतात, पण तरी प्रेम दशांगुळे उरतंच...
समीर : आपल्याला तरी काही अशा प्रेमाचा अनुभव नाही बुवा. ज्यांना असं प्रेम लाभलं, ते भाग्यवानच म्हणायचे. 
गौरी : सम्या, प्रेम ही फक्त घेण्याची गोष्ट नाही रे मुला. ती द्यायचीही गोष्ट आहे. इन फॅक्ट, द्यायचीच जास्त आहे. तू असं प्रेम देऊन तर बघ. तुलाही मग असा अनुभव येईल.
समीर : मला तरी प्रेमाचा हा प्रवास खडतरच जास्त वाटतो. हल्ली कुठे वेळआहे अगं कुणाला कुणासाठी एवढा? जो तो आपापल्या मर्यादेत, मर्यादित वकुबात या प्रेम नावाच्या अथांग भावनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं. 
गौरी : एवढं तरी कळतंच ना तुला. अरे, प्रेमाचा प्रवास म्हणजे वेदनेच्या गावाकडं जाणारा प्रवास आहे. पण ही वेदनासुद्धा कशी, गोड आहे. त्यात अनामिक आनंद आहे, हुरहुर आहे, रोमांच आहे.
समीर : पुलंचे पेस्तनकाका म्हणतात, तसं गॉड इज सफरिंग... त्या चालीवर म्हणावंसं वाटतं, की लव्ह इज सफरिंग... त्याची वेदना तर अपार असते, पण ती आपल्यावर कुणी तरी प्रेम करतंय या भावनेची स्निग्धताही सोबत घेऊन येते...
गौरी (हसत) : अगं बाई, छानच विश्लेषण चाललंय की... 
समीर : अगं, सहज सुचलं हे एकदम. खरं सांगू का, प्रेम काय किंवा डोळ्यांत काल ते गाणं ऐकताना आलेले अश्रू काय, या सर्व भावना विश्लेषणाच्या पलीकडच्या आहेत. त्या जशा आहेत तशाच जगाव्यात....
गौरी : हो रे राजा, पण कधी कधी या भावनांचं व्यवस्थापन करावं लागतं. ते जमलं पाहिजे.
समीर : उत्कटता आणि व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत जात नाहीत, गौरी.... अवघड आहे ते...
गौरी : म्हणूनच मी त्याला वेदनेच्या गावाकडं जाणारा प्रवास म्हणते... सोपा नाहीच. पण एव्हरेस्ट सर करणंही सोपं नसतंच ना...
समीर (हसत) : मला माझीच एक जुनी ओळ आठवली - तुझ्यासोबतच माझ्या ध्येयावरही मला प्रेम करायचं आहे...

---

२७
----

सरबराई अन् एप्रिल फूल
----------------------------------

समीर : आला, आला... वीकएंड आला... नाचू या, गाऊ या, आनंदे खेळू या...
गौरी (वैतागून) : अय, शांत हो, त्रस्त समंधा... हे सरबत पी वाळ्याचं...
समीर (सरबत घेत) : अहा, गौरे, काय चव आहे गं तुझ्या हाताला... एकच नं.
गौरी : हूं... माझ्या हाताला वगैरे काही नाही. विकत आणलंय ते. हल्ली सगळी सरबतं मिळतात बाजारात...
समीर : हो, माहितीय गं... पण तू जेव्हा तुझ्या हातानं साधं लिंबू-सरबतसुद्धा करून देतेस ना तेव्हा ते अमृततुल्य लागतं...
गौरी : मला तू असं आयतं हातात सरबत कधी देशील रे सोन्या?
समीर : देईन गं... या सुट्टीत मी तुझी सगळी सरबताई, आपलं, सरबराई करीन. मग तर झालं?
गौरी : उगाच कोट्या करू नकोस रे... कामं कर माझी एक-दोन...
समीर : अगं, एवढी तापू नकोस बये. आधीच बाहेर काय कमी तापलंय का ऊन? पण एक सांगू, आता खरंच पुढचे दोन महिने डोकं, म्हणजे एकूणच शरीर आणि मन थंड ठेवावं लागणार आहे बघ.
गौरी : हं... शरीराचा थंडावा मिळेलही; मनाच्या गारव्याचं काय करणार महाराज?
समीर : हो गं. खरंय. एकूणच मानसिक ‘ग्लोबल वॉर्मिंग’ सुरू आहे बघ सगळीकडं... जाऊ दे. फार गंभीर चर्चा करण्याचा माझा मूड नाहीय आज. आणि तू पण उगाच डोस देऊ नकोस. मला आत्तापासूनच वीकएंडचे डोहाळे लागलेयत.
गौरी : वा, वा... म्हणजे मी रोज डोस देते काय रे तुला? तू काय कमी आहेस का? कोट्या करतोस आणि मधूनच बोचकारे काढतोसच की...
समीर : ते जाऊ दे. ऐक ना... उद्या आपण रात्री मस्तपैकी वॉकला जाऊ या? आपल्या कोपऱ्यावर तो नवा आइस्क्रीमवाला आहे बघ नवा... तिकडं हल्ली गर्दी असते. त्याच्याकडं जाऊन मस्त आइस्क्रीम खाऊ या?
गौरी : हं... बघू... माझा मूड कसा असेल उद्या, त्यावर आहे.
समीर (वैतागून) : काय गं हे? मी एवढ्या उत्साहानं बोलतोय आणि तू त्यावर गार पाणी ओतते आहेस.
गौरी (हसत) : सम्या, अरे उन्हाळा वाढलाय. म्हणून गार पाणी ओततेय... 
समीर : अगं, गार पाण्यावरून आठवलं... एक एप्रिलपासून रोज गार पाण्यानं अंघोळ माझी...
गौरी (चिडवत) : अंघोळच न करता, एप्रिल फूल करू नकोस म्हणजे झालं...
---

२८
----

'विवेक' आणि 'श्रद्धा'
-------------------

गौरी : काय रे सम्या, कुठं होतास एवढे दिवस? 
समीर : अगं, काही नाही. वीक-एंडची कामं... आठवडा कसा जातो, तेच कळत नाही. मग शनिवार-रविवार जरा कंटाळाच येतो सगळ्या गोष्टींचा... पण बाकी कामं करायला हेच दोन दिवस असतात. 
गौरी : मला वाटलं, कुठं सिद्धिविनायकाच्या किंवा 'दगडूशेठ'च्या लायनीत वगैरे थांबला होतास की काय?
समीर : एवढे दिवस?
गौरी : काही सांगता येत नाही बाबा... देवाच्या दारापुढची रांग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळं तीन दिवस रांगेत थांबलो होतो, असं उद्या कुणी सांगितलं तर मला आश्चर्य वाटायचं नाही मुळीच.
समीर : देव आणि श्रद्धा हा फारच वैयक्तिक विषय झाला, गौरी. आपण त्यावर न बोललेलं बरं.
गौरी : अरे, हो की! मी कुठं काय म्हणतेय? आणि लोकांचं सोड, तुला मात्र म्हणूच शकते बरं का...
समीर हे बघ, मी काही नास्तिक नाही. श्रद्धाळू आहे. गणपतीवर तर आहेच श्रद्धा माझी...
गौरी नुसता श्रद्धाळू नाहीस, तर देवताळा आहेस तू अगदी... मला सगळं माहितीय. 
समीर : हे बघ, कर्मकांडांवर माझाही विश्वास नाही. पण गणपतीवर खूप श्रद्धा आहे. मला सणावाराला, किंवा एरवीही गणपतीच्या मंदिरात जाऊन बसायला छान वाटतं. मला तिथं 'सुकून' की काय म्हणतात, तो मिळतो.
गौरी : हे बघ, आपली श्रद्धा आपल्यापाशी असावी. लोकांना त्याचा त्रास होता कामा नये, एवढंच मला म्हणायचंय. आपल्याकडं काय होतं, लोक आपल्या या भावना, श्रद्धा दुसऱ्यांवर लादतात ना, त्याची मला चीड येते. म्हणजे लोकांची गैरसोय करून, रस्ते बंद करून तुम्ही देव-देव कसले करता? मनात पवित्र भावना असली, म्हणजे झालं. पण गणपतीच्या रांगेत नारळ-फुलं घेऊन उभं राहायचं आणि नजर सगळी गर्दीतल्या देखण्या बायकांवर ठेवायची, याला काय अर्थ आहे?
समीर : तुझं म्हणणं शंभर टक्के खरं आहे गौरी. पण विवेक आणि श्रद्धा या गोष्टी एकमेकांसोबत जात नाहीत. 
गौरी : न जायला काय झालं? चांगल्या स्वयंपाकात कसं अचूक प्रमाण लागतं सगळं, तसं आयुष्यातही या विवेकाचं आणि श्रद्धेचं स्थान व प्रमाण नेमकं असलं पाहिजे. मग आपोआप सगळं नीट होतं.
समीर : पण हे प्रमाण ठरवायचं कुणी? 
गौरी : आपणच. साधी कसोटी आहे. दुसऱ्याला त्रास होऊ नये, असं शिकवतो तो विवेक आणि स्वतःला त्रास होऊ नये, असं शिकवते ती श्रद्धा. एवढं कळलं तरी पुरेसं आहे, माझ्या राजा...
समीर (हसत) तुम्हाला माझा नमस्कार आहे बाईसाहेब... चला, भक्ताला नेहमीचा प्रसाद द्या...
गौरी (चिडवत) : अरे, उपास आहे ना तुझा... उगाच श्रद्धा दुखवायची रे तुझी...
समीर : एक काम करू. तू तुझ्या विवेकावर श्रद्धा ठेव... मी माझी श्रद्धा विवेकानं वापरतो...
गौरी (हसत) : गुड बॉय... आता प्रसाद द्यावाच लागेल... 

----

२९
----

‘हम साथ साथ हैं...’
---------------------------

गौरी : हा हा हा हा... ही ही ही.. हू हू हू... हे हे हे...
समीर : काय गं! बरी आहेस ना... एवढी का हसते आहेस?
गौरी : अरे, काही नाही... हे व्हॉट्सअपवरचे विनोद कमाल असतात काही काही... काय डोकं लावतात बघ ना... आता हे ‘हम साथ साथ है’चं पोस्टर पाठवलंय कुणी तरी... फक्त त्यातला सलमान गायब करून... शिवाय बाकी काळवीट या शब्दावर श्लेष करणारे विनोद यायला सुरुवात झालीच आहे.
समीर : पण ‘वीट’ शब्दावर पुलंनी जी कोटी केली आहे, ती अजरामर आहे.
गौरी : हो रे... एका हातात घरची आणि एका हातात बाजारची... अशा विटा घेऊन हिंडत होतो... एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला ‘वीट’ येणं का म्हणतात हे त्या दिवशी मला कळलं... हा हा हा... मी मरते दर वेळी ते ऐकून...
समीर : म्हणूनच तो विनोद श्रेष्ठ. एवढ्या वर्षांनंतरही आपल्या लक्षात राहिलाय.. बाकी हे विनोद एका दिवसाचे धनी... दुसऱ्या दिवशी दुसरा विषय आला, की हे विस्मरणात जातात.
गौरी : असू दे ना. काही गोष्टींचं आयुष्य तेवढंच असतं. त्याची मजा तेवढ्यापुरतीच असते. प्रत्येक गोष्ट अजरामर व्हायचा वसा घेऊन बसली तर अवघड व्हायचं. मुंगीचं आयुष्य मुंगीएवढं... कासवाचं कासवाएवढं... दोघंही किती जगले यापेक्षा कसे जगले हे महत्त्वाचं... 
समीर : खरंय. आपल्या जगण्याचं प्रयोजन कळलं, की जगणं अर्थपूर्ण होतं. अनेकांना ते मरेपर्यंत कळत नाही.
गौरी : नुसतं प्रयोजन कळून पण उपयोग नसतो रे सम्या. त्या प्रयोजनासाठी वाट्टेल ते कष्ट घेऊन जगण्याची तयारी असावी लागते. परत पुलंच्या भाषेत सांगायचं तर ही ‘खुशीची फकिरी’... आणि ती खरंच अजब असते. एखाद्या रावसाहेबांनाच जमते. सब के बस की बात नहीं!
समीर : हे मान्य आहे. मी फक्त विनोदाच्या दर्जाबद्दल बोलत होतो. विनोद अल्पायुषी असायला हरकत नाही. पण अल्पमती नसावा.
गौरी : हे बघ. जग केवढं, तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढं...तू कशाला एवढा लोड घेतो आहेस? हे सलमानवर आज जोक टाकून त्याची खिल्ली उडवणारे लोक उद्या त्याचा सिनेमा रीलीज झाला की बघायला रांगेत सगळ्यांत पुढे असतील की नाही बघ. तत्त्व ही सोपी गोष्ट नाही राजा. ती नुसती बोलायची गोष्ट नसते. पाळता यावी लागते.
समीर : सलमान काय किंवा संजय दत्त काय, ‘या देशाचा कायदा पाळू या’ एवढं एक साधं तत्त्व त्यांनी पाळलं असतं, तरी ही वेळ आली नसती.
गौरी : याबाबत हे सेलिब्रिटी आणि सामान्य लोक यांच्यातही काही फरक नाही. ते मोठे आहेत म्हणून चर्चा होते आणि सामान्य माणसाची होत नाही, एवढंच काय ते!
समीर : खरंय. याबाबत आपलं एकमत झालंय कधी नाही ते...
गौरी (हसत) : हो रे... याबाबत ‘हम साथ साथ है...’ 

---

३०
---

साई सुट्ट्यो ऽऽ...
---------------------

समीर : काय गं गौरी, काय बघतेयस खाली?
गौरी अरे, मुलांचा दंगा सुरू झाला बघ सोसायटीतल्या... सुट्ट्या सुरू झाल्या वाटतं...
समीर हो, एवढा गोंधळ म्हणजे नक्कीच सुट्ट्या लागल्या. आता सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सुरू होणार... 
गौरी : अरे, नेमकी ती या लोकांच्या दुपारच्या झोपेची वेळ असते आणि ही मुलं दंगा करत बसतात. त्यामुळं सगळ्या आजी-आजोबा मंडळींची चिडचिड होते. हे अगदी समजण्यासारखं आहे. आपल्याकडं आधीच एवढं ध्वनिप्रदूषण आहे, की सगळ्यांची चिडचिड लेव्हल प्रचंड वाढली आहे.
समीर : अगं हो, पण मुलांनी खेळायचं कुठं? जागा तरी आहे का? त्यात हल्ली सिंगल चाइल्ड असतात बहुतेकांचे... त्यांना भावंडं नसतात. एरवी एकटीच आपापल्या घरात असतात ही मुलं... सुट्टीत जरा मित्रांबरोबर धांगडधिंगा करणारच...
गौरी अरे हो... हा मुलांचा प्रश्न नाहीच. हा त्यांच्या पालकांचा प्रश्न आहे. आता सुट्टीत आई-बाबांना वाटतं, की हा किंवा ही दिवसभर घरी बसून राहू नये. मग एक तर ही मुलं असा दंगा करीत सोसायटीतच फिरतात नाही तर वेगवेगळ्या क्लासना, सुट्टीतल्या शिबिरांना तरी जातात.
समीर : ते मला माहितीय गं... आमच्या लहानपणी...
गौरी (अडवत, चिडवत) : बास... बास... तुझ्या लहानपणीच्या कथा सुरू करू नकोस. हज्जारदा ऐकल्या आहेत. आणि तुझं लहानपण तुझ्याबरोबरच संपलं. आताच्या मुलांसोबत त्याची तुलनाच करू नकोस. उगाच नॉस्टॅल्जिक कढ काढायचे... आमच्या गावाला असं होतं अन् आमच्या वाड्यात तसं होतं... होतं तर होतं! आता नाहीये ना... मग बास...
समीर : अगं, एवढा त्रागा का करतेयस? आपलं बालपण आणि विशेषतः बालपणी घालविलेल्या सुट्ट्या हा प्रत्येकाच्या मनातला एक हळवा कोपरा असतो.
गौरी मग तो तुमचा कोपरा कोपऱ्यातच ठेवा. आम्हाला आता तुमची ती जुनी टेप ऐकण्यात मुळीच रस नाही. आत्ताच्या मुलांसाठी काही करू शकतोस का? बोल... तू बरा लिहितोस. मग लिही काही तरी या मुलांसाठी... नाही तर त्यांना छान काही तरी वाचून दाखव... किंवा फिरायला ने कुठं तरी...
समीर थोडक्यात, आपलंच शिबिर सुरू करायचं म्हण की...
गौरी (हसत) हो, कर सुरू... सगळ्यांत आधी मी येईन तुझ्या शिबिराला...
समीर (चिडवत) : मग दोघांचंच करू या की शिबिर... (डोळा मारत) भरपूर योगासने...
गौरी (उशी फेकत) : तू लवकरच शवासनात जाणार आहेस, सम्या...  

---

#सम्याआणिगौरीच्यागोष्टी #सीझन ३

------------