नग्न सत्य...
------------
आपण सत्य व नग्नता या दोन्हीला घाबरतो; याचं कारण बहुतेकदा आपल्याच कर्मामुळं आपण या दोन्हींकडं डोळे भिडवून पाहण्याची क्षमता गमावून बसलेलो असतो. नग्नता हे एक प्रकारचं सत्य असतं आणि सत्यही अनेकदा नग्नच असतं. नग्नता आणि सत्य या दोन्ही गोष्टी नैसर्गिक असल्यामुळं स्वाभाविक असतात. आपण आयुष्यभरात नग्नतेकडून नग्नतेकडंच प्रवास करीत असलो, तरी मधल्या आयुष्यात आपण या नग्नतेकडं पूर्ण पाठ फिरवून बसतो. याचं कारण आपल्याला आपल्याच नग्नतेची भीती वाटते. नग्नतेचा संबंध सत्याशी असल्यामुळं आणि आपल्याला सत्याला डोळे भिडवायचे नसल्यामुळं आपण नग्नता दिसली, की दचकतो. आरडाओरड करतो. ‘हे काही तरी वाईट आहे, घाणेरडं आहे,’ असं बोंब ठोकून सांगू लागतो. खरी गोष्ट अशी, की आपण नग्न सत्याला घाबरतो!
आपल्या नकळत कुणी चारचौघांत आपले कपडे काढले आणि ते आपल्याला अचानक कळलं, तर जे काही होईल, ते ‘न्यूड (चित्रा)’ हा रवी जाधव दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट पाहून आपल्याला होतं. सिनेमा संपल्यानंतर येणारं एक सुन्नपण सहन करावं लागतं. एखादी कलाकृती आपल्या जाणिवांना किती खोलवर हादरा देऊ शकते, हे समजतं. आपली एकूणच जगण्याविषयीची समज, आकलन यांना कुणी तरी आव्हान दिलंय, याची खात्री पटते आणि आपण मनोमन या कलाकृतीला दाद देतो.
रवी जाधव यांनी या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या एकूणच कलाविषयक धारणांसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कला म्हणजे काय, कलेचं आपल्या आयुष्यातलं प्रयोजन काय, आपण कलेचं काही देणं लागतो का अशा अनेक प्रश्नांना हा चित्रपट हात घालतो आणि त्याची यथायोग्य उत्तरंही देतो. ही उत्तरं सोपी, गुळमुळीत, सहज नाहीत. कानाखाली कुणी तरी सण्णकन चपराक हाणावी, तशी ही उत्तरं समोर येतात आणि संवेदनशील मेंदूच्या ठिकऱ्या उडवतात. कलाकृतीशी जेव्हा प्रेक्षकांचं असं जैव नातं जडतं, तेव्हा ती कलाकृती फार उच्च दर्जा गाठते. ‘न्यूड (चित्रा)’ आपल्याला त्या प्रतीचा आनंद देतो.
वरवर पाहिलं तर ही यमुना (कल्याणी मुळे) या साध्यासुध्या बाईची गोष्ट. नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील छोट्या गावातून ही बाई आपल्या लहान्या या मुलाला (मदन देवधर) घेऊन मुंबईत मावशी चंद्राक्का (छाया कदम) हिच्याकडं येते. चंद्राक्का सर जे. जे. कला महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून काम करत असते. पण खरं तर तिथं न्यूड मॉडेल म्हणून बसून ती अधिकचे पैसे कमावत असते. यमुनाला ती हेच काम करायला सांगते. आधी हे काम करायला सपशेल नकार देणारी यमुना मुलाच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी हे काम करायला तयार होते. हे काम करताना पहिल्यांदा तिची झालेली प्रचंड घालमेल दिग्दर्शक अत्यंत संवेदनशीलतेनं चित्रित करतो. ‘तन तम्बुरा’ या गाण्याच्या सुरावटींवर यमुना आपल्या देहावरील वस्त्रांच्या कैदेतून मुक्त होते, तशी जणू वर्षानुवर्षं तिच्यावर चढलेली रुढी-परंपरांची कळकट जळमटंही धुऊन निघतात.
यमुनाचा पुढचा सगळा संघर्ष, तिला तिथं भेटलेला तरुण चित्रकार, त्यानंतर एका बड्या व वादग्रस्त चित्रकाराकडं न्यूड मॉडेल म्हणून जाण्याची मिळालेली संधी, लहान्यालाही चित्रकलेची आवड निर्माण झालेली पाहून वाटलेली धास्ती, त्याला शिकायला लांब औरंगाबादला पाठविण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आणि नंतर यमुनाची झालेली फरपट... हे सगळं उत्तरार्धात येतं. त्याच्या जोडीला शेवटाकडं येतं ते दिग्दर्शकाचं एक स्टेटमेंट! हे स्टेटमेंट काय आहे, ते पडद्यावरच पाहायला हवं. या क्लायमॅक्सच्या प्रसंगामुळं या संपूर्ण कलाकृतीला आवश्यक ती मजबूत ‘फ्रेम’ मिळाली आहे, हे नक्की.
रवी जाधव यांनी यात यमुनाची कथा सांगता सांगता अनेक कलाविषयक प्रश्नांना हात घातला आहे. एकूणच समाज म्हणून असलेली आजची विदारक स्थिती ते दाखवत राहतात. एके काळी प्रगल्भ कलाजाणिवा असलेला आपला समाज आज नग्न चित्रांच्या विरोधात निदर्शनं करतो, कलेचं मर्म समजून न घेता, मेंढरांच्या कळपासारखा प्रतिक्रिया देतो, या सगळ्यांमागची नेमकी कारणं काय असावीत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करीत राहतो. चित्रसाक्षरता, किंवा एकूणच दृश्यसाक्षरता याबाबत आपण किती आणि का मागे आहोत, हे ‘बिटवीन द लाइन्स’ सांगत राहतो. नसीरुद्दीन शहा यांनी साकारलेली ‘मलिकसाब’ ही व्यक्तिरेखा थेट एम. एफ. हुसेन यांच्यावर बेतलेली आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून दिग्दर्शक कलावंतांची बाजू आपल्याला सांगतो. ‘कपडा जिस्म पर पहनाया जाता है और हम अपने काम में रुह खोजने की कोशिश करते हैं’ हा त्यांचा एव्हाना प्रसिद्ध झालेला संवाद याचंच निदर्शक आहे. एकूणच यमुना आणि मलिकसाब यांच्यातला तो प्रसंग आणि त्यातले संवाद जमून आले आहेत.
दिग्दर्शकासोबतच संवादलेखक सचिन कुंडलकर आणि छायाचित्रकार अमलेंदू चौधरी यांनाही या कलाकृतीचं तेवढंच श्रेय द्यायला हवं. विशेषत: अमलेंदूंच्या कॅमेऱ्यानं या कलाकृतीला आवश्यक असलेला कला आणि इतर रखरखीत जीवन यांचा विरोधाभास नेमका टिपलाय. झोपडपट्टीतील चंद्राक्कांचं घर आणि जे. जे. महाविद्यालयातील कलादालन या दोन्हींकडची त्यांची रंगसंगती पाहण्यासारखी आहे. सायली खरे यांच्या संगीताचाही उल्लेख करायला हवा.
कल्याणी मुळे या रंगभूमीवरील अभिनेत्रीचा हा दुसराच आणि मोठी भूमिका असलेला पहिलाच चित्रपट. मात्र, इथं त्यांनी यमुना जीव ओतून साकारली आहे. नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळं रडणारी-भेकणारी, गावाकडची गरीब स्त्री इथपासून मुंबईत येऊन मुलाच्या शिक्षणासाठी उभी राहणारी आत्मविश्वासू स्त्री म्हणजे अशा अनेक कष्टकरी स्त्रियांच्या जगण्याचं प्रातिनिधिक चित्रच. यमुनाच्या भूमिकेसाठी कल्याणी यांना खास दाद. दुसरी महत्त्वाची भूमिका चंद्राक्काची. छाया कदम या जाणत्या अभिनेत्रीची ताकद एव्हाना महाराष्ट्राला समजली आहे. या ताकदीला न्याय देणारी भूमिका त्यांना यात मिळाली आहे आणि त्यांनी तिचं सोनं केलं आहे. ओम भुतकर, मदन देवधर, श्रीकांत यादव, किशोर कदम यांनी छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये उत्तम साथ केली आहे.
काही कलाकृती या केवळ मनोरंजनासाठी पाहायच्या नसतात. त्या आपल्या मेंदूला खुराक देतात आणि त्या प्रक्रियेत आपल्याला समृद्ध करतात. ‘न्यूड’ हा या वर्गातला सिनेमा आहे. तो न पाहणं म्हणजे नग्न सत्य नाकारणं...
---
दर्जा - चार स्टार

No comments:
Post a Comment