19 Apr 2018

संगीत देवबाभळी रिव्ह्यू

काटा रुते कुणाला... 
-----------------------

‘संगीत देवबाभळी’ या नव्या मराठी संगीत नाटकाविषयी खूप ऐकून होतो. खूप चांगली परीक्षणं आली होती. मित्र-मैत्रिणीही सांगत होते. या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याचीही फेसबुकवरून ओळख झाली. अखेर आज, गुरुवारी (१९ एप्रिल) हा योग आला. दुपारी १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा प्रयोग पाहिला. नेमका प्राजक्त आजच्या प्रयोगाला नव्हता. पण ज्योती सुभाष आणि नसीरुद्दीन शाह आले होते. त्यांच्यासोबत हा प्रयोग पाहायचं भाग्य आम्हा सर्व प्रेक्षकांना लाभलं.
‘संगीत देवबाभळी’ या नाटकाविषयी आपल्याला आधी फारसं काही माहिती नसतं. आणि खरं तर तेच योग्य ठरतं. मला खरं तर थोडीफार कल्पना होती... पण तरीही मी पाटी कोरी ठेवूनच गेलो होतो. मी शक्यतो इतरांची परीक्षणं आधी वाचत नाही. (नंतर नक्की वाचतो.) त्यामुळं माझ्या कोऱ्या पाटीवर त्या त्या कलाकृतीचं शक्यतो जास्तीत जास्त पूर्वग्रहरहित चित्र उमटतं, असं मला वाटतं. ‘संगीत देवबाभळी’बाबतही तेच झालं. हा दोन-अडीच तासांचा अनुभव घेऊन मी धन्य झालो. मला या नाटकानं एका वेगळ्याच विश्वात नेलं. रंगमंचावर त्या दोन अभिनेत्री, त्यांचे सूर, सुंदर नेपथ्य आणि प्रकाशयोजना आणि नाटककाराचे अप्रतिम शब्द यामुळं हे नाटक पाहणं हा एक निखळ आत्मिक आनंदाचा अनुभव ठरतो.
दोन स्त्रियांचा चाललेला संवाद असं या नाटकाचं एका ओळीत वर्णन करता येईल. पण हा संवाद साधासुधा नाही. कारण यातली एक स्त्री आणि आवली, म्हणजे संत तुकोबारायांची पत्नी आणि दुसरी तर साक्षात रखुमाई... विठ्ठलाची पत्नी... या दोघी एकमेकींना भेटतात. निमित्त असतं भंडारा डोंगरावर आवली गेली असताना तिच्या पायी रुतलेला देवबाभळीचा काटा... हा जो काटा रुतला आहे तोही काही साधासरळ नाही. आपल्या जाणिवा-नेणिवांचाच तो काटा आहे. आपल्या जगण्यात आपणच रुतवत असलेला हा काटा आहे. आपल्या जखमा कुरवाळत बसण्यात आपल्याला एक अहंमन्य सुख मिळत असतं. आपल्या कर्माला, आपल्या नात्यांना, आपल्या श्रद्धांना आपणच जबाबदार असतो. मात्र, तरीही काटा रुतल्यावर तो बाहेर काढण्याऐवजी त्या काट्याला दोष देण्याकडं आपली वृत्ती असते. हा आत्ममग्नतेचा काटा जेवढा खोल, तेवढा त्रास अधिक. इथं या काट्याच्या प्रतीकाविषयी आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ उलगडू शकतो. हे नाटककाराच्या लेखणीचं यश आहे. कलाकृतीतून अर्थांच्या अनेक छटा निघू शकणं हे त्या लेखनाच्या उंचीचंही एक मोजमाप म्हणायला हरकत नाही.
आवली आणि तिच्याकडं लखूबाईचं रूप घेऊन आलेली रखुमाई हे सगळं प्रत्यक्ष न बोलताही, तेच सांगतात. दोघींच्याही व्यथा वेगळ्या, वेदना वेगळ्या. तरीही त्याला बाईपणाचा असा एक ‘पदर’ आहे. त्यांची दु:खं बाईपणाचीही आहेत. असं असलं, तरी दोघींच्या व्यक्तिमत्त्वात एक तीव्र विरोधाभासही आहे. आवली सामान्य संसारी स्त्री, तर रखुमाई म्हणजे सगळ्या विश्वाची आई... तरी आवलीकडं असं काही तरी आहे जे ती लखूबाईच्या रूपातल्या रखुमाईला देऊ शकते आणि रखुमाईही आवलीला बरंच काही देऊन जाते. पावसात भिजण्याचा प्रसंग या दृष्टीनं फार सुंदर झाला आहे. आवलीला त्या पावसात तिचा ‘स्व’ सापडतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आपल्याही चेहऱ्यावर परावर्तित होताना दिसतो.
नवरा विठोबाच्या भजनी लागलाय म्हटल्यावर एका सामान्य स्त्रीचा होणारा संताप आणि दुसरीकडं सगळ्या जगाची उस्तवार करणारा पांडुरंग आपल्याकडं मात्र पाहायला तयार नाही, हे बघून रुसून निघून आलेली रखुमाई... दोघीही एकमेकींशी आधी भांडणातून, मग मायेनं, मग प्रेमानं बोलू लागतात आणि बघता बघता त्यांच्यात एक नातं तयार होतं. नंतर तर संवादाचीही गरज पडू नये, एवढी मनं जुळतात. त्या संवादांतूनच दोघींना आपापल्या पतीची महती कळते आणि आपल्याला या दोघींची!
ही काल्पनिक कथा नाट्यरूपात सादर करताना नाटककार व दिग्दर्शक प्राजक्त देशमुखनं संगीत नाटकाचा फॉर्म स्वीकारलाय आणि इथंच निम्मी बाजी मारलीय. यातली सर्वच गाणी अप्रतिम आहेत आणि दोघी कलाकार त्या प्रत्यक्ष सादर करतात. समोर वाद्यवृंद असतो. फक्त तुकारामांचे अभंग (आनंद भाटे) ध्वनिमुद्रित आहेत.
या नाटकाचं नेपथ्य सुंदर आहे. डाव्या बाजूला आवलीचं स्वयंपाकघर, त्याच्या दाराची उभी चौकट, उजवीकडं तुकोबांच्या ओसरीतील (दीपस्तंभासारखा दिसणारा) खांब व त्यावरची तुकोबांची पगडी, खाली पायऱ्या आणि समोर इंद्रायणी... स्वयंपाकघरात लखूबाईनं सोबत आणलेली त्या सावळ्या परब्रह्माची गोंडस मूर्ती... दृश्यरचना आणि प्रकाशयोजनेतून आवलीचं एकाकीपण पहिल्या प्रवेशातून अधोरेखित होतं. रखुमाईचं उंच स्थान पहिल्याच दृश्यात प्रस्थापित होतं. त्यानंतर तिचं आवलीच्या पातळीवर येणं हेही सूचक. दोघींच्या व्यथा मांडणारे सगळे संवाद स्वयंपाकघरात, म्हणजेच त्या चौकटीच्या आत घडतात; तर त्या व्यथेतून मुक्ती देणारे सगळे संवाद त्या चौकटीच्या बाहेर, खळाळत्या नदीच्या साक्षीनं घडतात. ही दृश्यरचना दाद देण्याजोगी... आवलीच्या जखमेला विठ्ठलाचं रेशमी उपरणं बांधणं आणि शेवटी रखुमाईनं फक्त ते सोबत घेणं हेही खूपच सूचक!
खरं तर या नाटकात अशा अनेक जागा आहेत, की त्या फक्त अनुभवाव्यात. सगळ्याच काही शब्दांत सांगता येत नाहीत. एका गोष्टीबाबत मात्र भरभरून सांगू शकतो, आणि ती म्हणजे शुभांगी सदावर्ते (आवली) आणि मानसी जोशी (रखुमाई) या दोघींचा अभिनय. खरं सांगायचं तर या दोघींचीही नावं मी यापूर्वी कधीही ऐकली नव्हती. शिवाय नाटकाच्या मध्यंतरात अगदी दोनच मिनिटं आम्ही भेटलो. (शुभांगी नाशिकची, तर मानसी मुंबईची.) पण या दोघींनी हे नाटक खऱ्या अर्थानं पेललं आहे, असं म्हणावं लागेल. नाटककारानं कितीही सुंदर लिहिलं, नेपथ्यकारानं कितीही देखणं नेपथ्य केलं, दिग्दर्शकानं कितीही छान जागा काढून दिल्या, प्रकाशयोजनाकारानं कितीही प्रभावी लायटिंग केलं, तरी शेवटी हे सगळं ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत थेट पोचणार आहे ते कलाकारच जर चांगले नसतील, तर अनेक उत्तमोत्तम कलाकृतींची माती होण्याची शक्यता असते. याउलट कलाकार उत्कृष्ट असतील, तर ते मूळ संहितेत नसलेल्या जागाही तयार करू शकतात आणि मूळ कथानक आणखी उंचीवर नेऊ शकतात.
शुभांगी आणि मानसी या दोघींनीही नेमकं हेच केलं आहे. त्याबद्दल या दोन गुणी अभिनेत्रींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक तर अभिनय करता करता गाणं किंवा गाता गाता अभिनय करणं हे दोन्ही अतिशय कठीण आहे. त्यात आवलीच्या पायात काटा रुतलाय. त्यामुळं तिला संपूर्ण नाटकात लंगडत चालावं लागतं. त्यात ती गर्भार असते. त्यामुळं तर हे बेअरिंग आणखीनच अवघड झालं आहे. ते सांभाळत गाणं हे सोपं नाही. अनेकदा तर ती आडवी झोपूनही गाते. (नाटक संपल्यावर मानसीनं ‘अनेक जण आम्ही रेकॉर्डेड गाणी म्हणतो, असं म्हणतात,’ असं सांगून, प्रत्यक्षात आम्ही खरंच इथं गात असतो, असं सांगून शुभांगीसोबत लाइव्ह गातानाचा एक ‘डेमो’च दिला.) शुभांगीनं आवलीचा सगळा त्रागा, चिडचिड, विठ्ठलाचा रागराग आणि नवऱ्याविषयीचं आतून आतून असलेलं खोल प्रेम हे सगळं फार छान दाखवलं.
जी गोष्ट शुभांगीची, तीच मानसीची. तिनं रुसलेली रखुमाई फार ठसक्यात सादर केली. तिचा आवाज, शब्दोच्चार सगळंच अव्वल दर्जाचं आहे. दोघींचेही आवाज फार उत्तम आणि तयारीचे वाटले. साथसंगतही जमून आलेली!
आणि आता प्राजक्तबद्दल. या तरुण दिग्दर्शकाला मी प्रत्यक्ष भेटलो नसलो, तरी आज तो त्याच्या कलाकृतीतून मला व सर्वच प्रेक्षकांना कडकडून भेटला. या कलाकाराला ‘बाई’ कळली आहे, तिची सुख-दु:खं समजली आहेत, असं नक्कीच म्हणू शकतो. यातले अनेक संवाद दाद देण्यासारखे आहेत. त्याच्या लिखाणाला एक प्रसन्न अशी लय आहे. ती नाटक सादर होत असतानाही जाणवते. या नव्या दिग्दर्शकाकडून आता आणखी चांगल्या नाटकांची अपेक्षा नक्कीच करू शकतो.
थोडक्यात, न चुकता घ्यावा, असा हा प्रसन्न संगीत अनुभव आहे.
नक्की पाहा.

दर्जा - चार स्टार
----

No comments:

Post a Comment