स्वत:ला फसविण्याची गोष्ट
-------------------------
गणू गणपुले हा एक सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, मध्यमवयीन इसम होता. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टीही मध्यम दर्जाच्याच असत. नाकासमोर चालणं आणि छापखान्यातल्या नोकरीसह घर-दार सांभाळणं ही त्याची जगण्यातली सर्वोच्च आकांक्षा होती. गणूनं मुळा-मुठेच्या काठी जन्मून जन्मजात कमावलेला कुचकटपणा आणि वंशपरंपरेनं आलेली तैलबुद्धी याच दोन गोष्टी त्याच्या भात्यातल्या प्रमुख अस्त्र होत्या.
अशा इसमाच्या आयुष्यात एक रविवार फार विलक्षण उगवला. त्या दिवशी गणूच्या पत्रिकेतले सर्व ग्रह शुभस्थानी आले असावेत. गणू उशिरा उठला, तरी त्याच्या अर्धांगानं फारशी कटकट न करता चहा समोर ठेवला. त्याच्या आवडीचं पॅटिसही ब्रेकफास्टच्या वेळी हजर होतं. गणूला सगळे पेपर निवांत वाचायला मिळाले. त्याची मुलं सुट्टी लागल्यानं आज्जीकडे गेली होती. त्यामुळे घरी तो आणि बायको दोघंच होते. मग गणूच्या बायकोनंच बाहेर जेवायला जायचा प्रस्ताव हसतमुखानं समोर ठेवला. आता गणूला काही तरी गडबड झाल्यासारखी वाटू लागली. आत्ता कुठं गणूचं जरा आजूबाजूला लक्ष गेलं. त्याचं वाड्यातलं दोन खोल्यांचं घरही बदललं होतं. तो अचानक तीन बेडरूमच्या आलिशान फ्लॅटमध्ये आला होता. उत्तम दर्जाचं उंची फर्निचर, भलामोठा टीव्ही, होम थिएटर, एसी, झुळझुळीत पडदे, संगमरवरी फरशी असा सगळा थाट होता. गणूचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. गणू हिप्नोटाइझ झाल्यासारखा बाहेर आला. लिफ्टमध्ये २८ हा आकडा त्यानं आयुष्यात पहिल्यांदा बघितला होता. त्याच्या बायकोनं तळमजल्यावरचं बटण दाबलं आणि एका मिनिटात ती लिफ्ट सुसाट वेगात खाली आलीदेखील. त्याच्या वाड्याचं कित्येक वर्षं रखडलेलं रिडेव्हलपमेंट होऊन तिथं एक ३५ मजली उत्तुंग इमारत उभी राहिली होती. ती बघून गणूची वाचाच बसली. त्याच्या वाड्यासमोरचा बोळवजा रस्ता कुठं तरी गायब झाला होता. तिथं प्रशस्त चारपदरी रस्ता तयार झाला होता. गणूच्या बायकोनं गणूला हाताला धरून रस्त्यावर आणलं. तिथून दुसऱ्या लिफ्टनं ते शेजारच्या फूटओव्हर ब्रिजवर आले. तो ओलांडून दोघं रस्त्याच्या पलीकडं आले. तिथं मेट्रोचं स्टेशन होतं. त्या स्टेशनवर ‘शनिवारवाडा’ अशी पाटी होती. त्या स्टेशनला पुणेरी पगडीसारखा आकार देण्यात आला होता. स्टेशनच्या पलीकडं खरोखर शनिवारवाडा उभा होता. शनिवारवाडा जागच्या जागी उभा बघून गणूला आनंद झाला. गणू मेट्रोत बसला. बायकोनं पुढच्याच स्टेशनात त्याला उतरवलं. हे स्टेशन जमिनीच्या खाली होतं. तिथं ‘मंडई’ अशी पाटी दिसली. त्या स्टेशनावर सगळीकडं कांदे-बटाटे आणि टोमॅटोची सजावट असेल, असं गणूला वाटलं होतं; पण तसं काही दिसलं नाही. तो एका चकचकीत कॉरिडॉरमधून सरकत्या जिन्यानं वर आला. तिथं समोरच त्याला आपली नेहमीची मंडई दिसली. इमारत जुनीच असली, तरी तिचा ‘लूक’ पूर्णपणे बदलला होता. एखाद्या मॉलमध्ये शिरत असल्याचा फील त्याला आला. आतमध्ये एसी गाळे होते. दोन्ही बाजूला कांदे-बटाटे विकणारे लोक एकदम पॉश केबिनमध्ये बसले होते. तिथं एकदम शांतता होती. ‘हे काही खरं नाही’ असा विचार गणूच्या मनात यायला आणि तिथल्या स्पीकरवरून सूचना ऐकू यायला एकच गाठ पडली. ‘आग लागल्यावर काय करावे,’ अशा अर्थाची ती सूचना ऐकून गणूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ही सगळी शांतता आरडाओरडा करून पेटवून द्यावी, असा विचार त्याच्या मनात आला; पण शेजारी बायको असल्यानं तो राग त्यानं नेहमीप्रमाणं मनातल्या मनात गिळून टाकला. त्या एसी मंडईत त्याला भयंकर थंडी वाजू लागली. कधी एकदा तिथून बाहेर पडतो, असं त्याला झालं. बायकोनं त्याला अजून एका भुयारी मार्गाकडं नेलं. सरकत्या जिन्यानं खाली गेल्यावर गणूनं डोळेच विस्फारले. दिल्लीतल्या ‘पालिका बाजार’सारखी खाली वेगवेगळ्या दुकानांची प्रचंड झगमगती दुनिया त्याला दिसली. ‘मी आलेच हं’ म्हणत बायको त्या दुकानांच्या गर्दीत नाहीशी झाली, तेव्हा गणूची ट्यूब पेटली. आख्खी तुळशीबाग जमिनीच्या खाली नव्यानं उभी राहिली होती. शेजारच्या एका दुकानात छोटीशी रांग दिसली. तेव्हा परवाच्या दिवशी सकाळी मिळणाऱ्या मिसळची कुपन्स घ्यायला लोक तिथं थांबले आहेत, असं कुणी तरी त्याला सांगितलं. वास्तविक सगळं जग आता ऑनलाइन व्यवहार करीत होतं; पण या दुकानदारानं अजून लोकांना आपल्या दुकानासमोरच रांग लावण्याची सवय मोडली नव्हती, हे बघून गणूला बरं वाटलं. काही गोष्टी जगाच्या अंतापर्यंत बदलणार नाहीत, यावर त्याचा पुन्हा एकदा विश्वास बसला. ही तुळशीबाग असल्यानं आणि बायको ‘पाच मिंटात येते’ असं सांगून गेल्यानं ती आता किमान दोन तास तरी येणार नाही, याची त्याला खात्री पटली. समोर त्याला विश्रांती कक्ष अशी पाटी दिसली. त्या एसी कंपार्टमेंटमध्ये लोकांना विश्रांती घेण्याची सोय होती. गणू आत गेला, तेव्हा तिथं असलेले ज्येष्ठ नागरिक मोबाइलवर काही ना काही करण्यात मग्न झालेले दिसले. तिथं फ्री वायफायची सुविधा होती, हे ओघानं आलंच. गणू शांतपणे तिथं बसला. तिथं एका जायंट स्क्रीनवर शहरातल्या बातम्या सांगत होते. सोबत दाखवीत असलेली दृश्यं आपल्याच शहरातील आहेत, यावर गणूचा विश्वास बसत नव्हता. त्या उत्तुंग इमारती, फ्लायओव्हर, आठपदरी रस्त्यांचं जाळं आणि शिस्तबद्ध वाहतूक पाहून गणू हरखून गेला. त्यानं शेजारच्या माणसाला विचारलं, तेव्हा त्यानं शंकास्पद नजरेनं त्याच्याकडं पाहिलं. ‘बालेवाडीत ऑलिम्पिक भरणार आहे ना, त्याचीच ही सगळी नाटकं सुरू आहेत,’ असं तो माणूस म्हणाला तेव्हा गणू बेशुद्धच पडायचा बाकी राहिला.
थोड्या वेळानं बायको ट्रॉली घेऊन आली. तुळशीबागेत ट्रॉली पाहून आता गणूला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. त्या माणसाच्या तोंडून ‘नाटक’ हा शब्द ऐकून गणूनं संध्याकाळचा कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानं बायकोला रात्री नाटकाला जायचा बेत सांगितला. तेव्हा तिनं झटकन मोबाइल काढून कुठल्या तरी नाटकाची दोन तिकिटं बुक केली. गणू आणि त्याची बायको सरकत्या जिन्यानं बाहेर आले. वर असलेल्या एका पॉश रेस्टॉरंटमध्ये त्यांनी दुपारचं जेवण घेतलं. खाली असलेल्या फेमस मिठाईच्या दुकानामुळं गणूला तो चौक ओळखू आला. ते दुकान आणि समोरची दगडी बँक सोडून तिथं बाकी सगळं बदललं होतं. त्या दुकानाबाहेरची ‘१ ते ४ बंद’ ही पाटी पाहायला गणू अगदी आतुर होता. खाली आल्यानंतर त्यानं त्या दुकानाबाहेर निरखून पाहिलं आणि एका कोपऱ्यात ती पाटी पाहून त्याला परमानंद झाला. समोरच्या बँकेतही काही बदललं नसणार, याबद्दल आता त्याला खात्री वाटली. त्या भव्य रस्त्याच्या शेजारी भलामोठा पदपथ होता. त्या पदपथावरून अनेक लोक निर्धास्तपणे हिंडत होते. गणूला बायकोसह त्या पदपथावरून फिरण्याची लहर आली. तो चालत चालत बराच पुढे गेला. शेवटी नदीवरचा पूल आला. तो पूल पाहून गणूनं ‘आ’ वासला. चक्क झुलता पूल? लंडन ब्रिजची आठवण करून देणारा तो जबरदस्त पूल आणि खाली नदीत विहरणाऱ्या मोठमोठ्या क्रूझ पाहून त्यानं तोंडातच बोट घातलं. बायको म्हणाली, आता आपण नाट्यगृहापाशीच आलो आहोत. चला. तिकडंच जाऊ.
त्यानंतर एका लांबलचक स्कायवॉकवरून बरंच अंतर चालल्यावर ते एका भव्य दगडी इमारतीपाशी आले. ब्रिटिश स्थापत्यशैलीची आठवण करून देणाऱ्या त्या इमारतीबाहेर ‘बालगंधर्व रंगमंदिर’ हा फलक पाहून गणू खाली पडायचाच बाकी राहिला. आत एक भव्य ऑपेरा हाउस, चार मिनी थिएटर, एक अँफी थिएटर आणि तालमीचे चार हॉल बघून नाट्यवेड्या गणूला अश्रू आवरेनात. डोळ्यांतलं पाणी पुसता पुसता त्यानं बायकोचा पदर हातात घेतला. त्याबरोबर त्याच्या हातावर कुणी तरी जोरदार फटका मारला. ‘उठा लवकर... सोमवार उजाडला. सुट्टी असल्यासारखे दहा-दहा वाजेपर्यंत लोळताय.... उठा जरा... मला कोपऱ्यावरून इडलीचं पीठ आणून द्या...’ ही चिरपरिचित गर्जना ऐकू येताच गणू अक्षरश: स्वप्नातून जागा झाल्यासारखा जागा झाला. एकदम त्याच्या लक्षात आलं. एक एप्रिल कालच संपला. आज सोमवार उजाडला.
स्वत:ला फसविण्याची एका दिवसाची गोष्ट पुन्हा एकदा मस्तपैकी फसवून संपली!
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, १ एप्रिल २०१८)
----
Ha..Ha.. nice one.
ReplyDelete