4 Mar 2018

श्रीदेवी लेख

फँटसीपलीकडची ‘श्री’शिल्लक!
------------------------------------------------------------------

गेल्या रविवारची सकाळ भीषण होती. जाग आल्यानंतर पहिली बातमी श्रीदेवीच्या मृत्यूची समजली. एक क्षण काही समजलंच नाही. नंतर अनेक मेसेज आणि बातम्या पाहिल्यावर काय ते कळू लागलं. अचानक पोटात खड्डा पडला. आपल्यातलं काही तरी निसटून, हरवून, संपून गेल्याची ती कळ होती. श्रीदेवी आता या जगात नाही, म्हणजे आपल्या भावविश्वातलंच काही तरी संपल्याची ती जाणीव होती. श्रीदेवीचा हिंदी सिनेमातला सुपरस्टारपदाकडं वाटचाल सुरू होण्याचा काळ आणि आमच्या पिढीतलं टीनएजमधलं पदार्पण जोडीजोडीनं झालं. ‘नगीना’मधला सगळा खेळ बालसुलभ मनाला मोहित करणारा होता, पण त्यानंतर आलेल्या ‘मि. इंडिया’तलं ‘कांटे नहीं कटते ये दिन ये रात...’ म्हणणारी निळ्या साडीतली ओलेती श्रीदेवी कुठं तरी आत काही तरी उसळवून गेली. त्यानंतर ती आमच्या संपूर्ण पिढीची फँटसी झाली. आमच्या वह्यांमध्ये, दप्तरांमध्ये, खोल्यांमध्ये, कपाटांमध्ये वस्तीला आली. त्याआधी आलेल्या ‘हिंमतवाला’नं तिला ‘थंडर थाइज’चा ‘गौरव’ बहाल केला होताच; पण पुढच्या काही वर्षांत आमच्या पिढीला ती संपूर्ण, सदेह आवडू लागली. दोनच वर्षांत ‘चाँदनी’ आला. त्यात स्वित्झर्लंडच्या बर्फाळ डोंगरांवर, पिवळ्या शिफॉन अन् स्लिव्हलेसमधली ती ‘तेरे मेरे होठों पें’ म्हणत ‘अंगडाइयाँ’ घेऊ लागली, तसा आमच्या काळजाचा ठोका चुकत गेला. ‘आपल्याला बायको हवी तर अशी’ हे पेटंट स्वप्न आमच्या पिढीनं ‘श्री’च्या त्या रूपात पाहिलं. ‘चालबाज’मध्ये ती ‘मुहोब्बत में नाम कर जा, तू मेरा नाम लेके मर जा’ म्हणताना, आम्ही खरोखर तिचं नाव घेऊन मरायला तयार झालो होतो. 
श्रीदेवीला तोवर कुठलंही आव्हान नव्हतं. ती निर्विवाद सम्राज्ञी होती. ती अमिताभ किंवा विनोद खन्नासारखी अभिनेत्रींम‌धली ‘सुपरस्टार’ होती. तिच्याआधी थोड्या फार प्रमाणात हेमामालिनीनं हे स्थान मिळवलं होतं; पण ‘श्री’सारखं दुसरं कुणीच नव्हतं. मात्र, १९८८ मध्ये ‘तेजाब’मधून ‘एक दो तीन’ करत एक मुलगी नाचत आली आणि तिनं बघता बघता तो भव्य रूपेरी पडदा व्यापून टाकला. पडद्यासोबतच आमच्या पिढीतल्या बऱ्याच जणांचं मनही काबीज केलं. मग श्रीदेवी थोडी बाजूला पडली. तोवर आमची वयंही वाढली होती. अर्थात नटीमधली ‘स्त्री’ वगैरे कळण्याएवढी प्रगल्भता यायचीच होती. आम्ही पंचविशीत येताना ‘श्री’नं लग्न करून संसारही थाटला होता. नंतर तर ती विस्मरणातच जाऊ लागली. एकविसावं शतक उजाडताना माधुरी अद्याप रूपेरी पडदा गाजवत होती आणि आमची पहिली-वहिली फँटसी दोन मुलींच्या जन्मांनंतर आईपण अनुभवत होती. तेव्हाही तिची ती स्थिती, मनोवस्था वगैरे काही कळण्याचं वय नव्हतंच. खरी ‘श्री’ कळायला अजून बारा वर्षं जावी लागणार होती. गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’मधून तिनं जोरदार पुनरागमन केलं आणि पुन्हा तिच्या प्रेमात पडायला झालं. या सिनेमातली ‘शशी गोडबोले’ तिनं किती लोभस, गोड साकारली होती! आता ‘श्री’च्या भूमिकांमधली खोली, तिचा विचार, तिचं स्त्रीत्व, तिच्या अभिनयातले बारकावे हळूहळू समजू लागले होते; कारण आमची पिढीही पस्तिशीत आली होती. संसारात पडून आम्हालाही आठ-दहा वर्षं झाली होती. तेवढे टक्केटोणपे खाल्ल्यावर, तेवढा संसार केल्यावर ‘शशी’ची घुसमट थोडीफार कळू शकत होती. ही भूमिका करताना श्रीदेवी ४९ वर्षांची होती. तिच्यातली परिपक्व, समृद्ध स्त्री या सिनेमातल्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसत होती... श्रीदेवी नावाची जादू १५ वर्षांनंतरही संपलेली नाही, हे तिनं दाखवून दिलं...
मग ‘फ्लॅशबॅक’मध्ये दिसली अवघ्या विशीत असताना तिनं साकारलेली ‘सदमा’मधली ती अचाट भूमिका! वयाच्या चौथ्या वर्षापासून कॅमेऱ्याला सामोरी गेलेल्या ‘श्री’साठी अभिनय ही नवी गोष्ट नव्हती; पण ‘सदमा’तल्या भूमिकेतला प्रौढ समंजसपणा तिनं त्या वयात कुठून आणला असेल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ‘नगीना’सारख्या आता निव्वळ हास्यास्पद वाटू शकणाऱ्या चित्रपटात तिनं ती ‘इच्छाधारी नागीण’ किती कन्व्हिक्शननं साकारली होती! अमरीश पुरीची ती बीन सुरू होताना साडीतली ‘श्री’ त्या दरवाजाजवळ उभी राहून आणि नंतर त्या लांबलचक बेडवर पडून तिच्या ‘अंगात येत असलेली’ नागीण ज्या पद्धतीनं दाखवते ते थक्क करणारं होतं... नंतरचं तिचं ते नृत्य तर अफलातूनच. केवळ त्या गाण्यासाठी वारंवार हा सिनेमा पाहणारे लोक होते. ‘मि. इंडिया’तली तिची रिपोर्टर नायिका सीमा तिनं धमाल साकारली. यातल्या पॅरडी गाण्यातला तिचा अभिनय, शेवटी ते घुमणं आणि फुटबॉल पळवल्यावरची तिची ती डरकाळी... 
तिचे आणि अन्नू कपूरचे कित्येक प्रसंग, चॅप्लिनसदृश धमाल आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ‘कांटे नहीं कटते’मधला तिचा अदृश्य नायकासोबतचा ओलेता रोमान्स! आणि हो, तिची ‘हवाहवाई’... ते गाणं विसरणं अशक्यच! ‘श्री’ने या गाण्यात मादकता आणि काहीसा विनोद यांचं असं काही अफलातून मिश्रण सादर केलं आहे, की बस्स! 
‘चालबाज’ तर तिचाच होता. तोवर तिच्या नावाची ब्रँड व्हॅल्यू एवढी वाढली होती, की लोक तिला आता ‘लेडी सुपरस्टार’ म्हणू लागले होते. ‘सीता और गीता’चा रिमेक करण्याचं धाडस केवळ तिच्यामुळं करण्यात आलं होतं. आणि तिनं ते व्यवस्थित पेललं. एवढंच नाही, तर अंजू आणि मंजूवर स्वत:चा स्टॅम्प उमटवला. ‘चालबाज’ प्रचंड हिट झाला. आणि हो, श्रीदेवीसोबत या सिनेमात सनी देओल आणि रजनीकांत असे दोन नायक होते! ‘श्री’ची जादू अफाट होती. म्हणून तर पडत्या काळात मेगास्टार अमिताभलाही तिच्यासोबत ‘खुदा गवाह’ करावासा वाटला. यात ही दक्षिण भारतीय असलेली स्त्री अफगाणी तरुणी म्हणून शोभली, हे विशेष. यातल्या तिच्या दुहेरी भूमिकेनंतर नंतर आला यश चोप्रांचा ‘लम्हें’...! काळाच्या पुढचा असलेला हा चित्रपट ‘श्री’च्या कारकिर्दीतला महत्त्वाचा चित्रपट. यातही तिला दुहेरी भूमिका होती. यातली गाणी, श्रीदेवीची नृत्य आणि अभिनय या सगळ्यांचंच कौतुक झालं. नंतर ‘गुमराह’, ‘लाडला’ आणि ‘जुदाई’सारखे काही गाजलेले चित्रपट केल्यानंतर ‘श्री’नं लग्न करून चित्रपटसंन्यासच घेतला. खरं तर तेव्हा ती फक्त पस्तिशीत होती. आपल्याकडचा सिनेमा बदलायला त्याच काळात सुरुवात झाली होती. ‘दिल चाहता है’ हा त्या बदलांची नांदी गाणारा पहिला चित्रपट. त्यानंतर मल्टिप्लेक्सच्या आगमनानं हिंदी सिनेमानिर्मितीची परिमाणंच बदलली. कित्येक प्रयोगशील दिग्दर्शक पुढं आले. किती तरी वेगळे सिनेमे तयार झाले. मात्र, ‘श्री’ यात कुठंच नव्हती. ती तिच्या जुन्या प्रतिमेच्या कैदेतच अडकली होती का? की आपल्या दर्जाला, कुवतीला साजेसं काही मिळणारच नाही, अशी (अनाठायीच) भीती तिला वाटत होती? अमिताभने आपली दुसरी इनिंग ज्या झोकात सुरू केली आणि जी अजूनही सुरू आहे, तसं ‘श्री’ला का नाही करावंसं वाटलं? अखेर ती २०१२ मध्ये आलीच; आणि ज्या पद्धतीनं आली, ते पाहता तिनं त्यापूर्वीची पाच ते सात वर्षं दवडली, असंच वाटतं. आणि आता तर ती ५४ व्या वर्षी हे जग सोडून गेल्यावर तर फारच तीव्रतेनं हे जाणवतंय. खरं तर तिच्यासाठी भूमिका लिहिल्या गेल्या असत्या, एवढं तिचं स्थान मोठं होतं. पण ते तिनं का केलं नाही, या प्रश्नाचं उत्तर आता कधीच मिळणार नाही. या ‘जर-तर’ला आता काही अर्थ नाही, हेही खरंच.
‘श्री’ मोठी अभिनेत्री होती. तिच्यातलं स्त्रीत्व आव्हान दिल्यासारखं सदैव चेतलेलं दिसे. आपल्या या बलस्थानाची तिला पुरेपूर जाणीव होती. तिच्या ऐन भरातले चित्रपट पाहिले, की हे लक्षात येतं. पण तिनं या स्त्रीत्वाचा आबही राखला. कधीही एका विशिष्ट मर्यादेपेक्षा खाली ती उतरली नाही. ‘सदमा’मध्ये सिल्क स्मिताही आहे. या दोघींचा पुढचा प्रवास पाहिला, तर ‘श्री’मधल्या प्रगल्भतेची साक्ष पटेल. ‘थंडर थाइज’पासून ते ‘वंडर वाइफ’पर्यंतचा ‘श्री’चा प्रवास हा एका अत्यंत बुद्धिमान, प्रगल्भ आणि समंजस स्त्रीचा प्रवास होता, हे पुन:पुन्हा जाणवत राहतं. 
म्हणूनच, मनातल्या ‘चाँदनी’ची फँटसी कधी विरली आणि तिथं या ‘देवी’ची आदरपूर्वक स्थापना झाली, हे गेल्या तीस वर्षांत कधी कळलंच नाही... आणि आता तर ते शरीरही गेलं; उरलाय तो फक्त तिच्या अस्तित्वाचा रातराणीसारखा मनभर दरवळणारा सुगंध...!
---
('महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ४ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)
---

No comments:

Post a Comment