भाऊमहाराज बोळातले दिवस - ३
----------------------------------------
आपल्याकडं गावं, शहरं यांच्या तोंडवळ्यात, रंगरूपांत फारसा बदल दीर्घकाळ होत नसे. तो वेग आला एकविसाव्या शतकात. त्यातही पहिलं दशक संपताना. त्यामुळं मी भाऊमहाराज बोळाविषयी १९९७ ते २००३ या काळाबद्दल लिहितो आहे त्या आठवणी अनेकांना आपल्याशा वाटत आहेत. याचं कारण १९७५-८० मध्येही कदाचित हा भाग, तो सगळा परिसर तसाच होता. थोडे फार बदल होतातच; मात्र संपूर्ण चित्रच बदलून जाईल, एवढ्या वेगाने तेव्हा बदल घडत नव्हते. एखाद्या गावात, शहरात आपण पाच-दहा वर्षांनी गेलो, तरी ते गाव वा शहर ओळखीचं वाटू शके. आता २०१० नंतर ती परिस्थिती राहिलेली नाही. आमचा भाऊमहाराज बोळही गेल्या १५-२० वर्षांत पार बदलून गेला. जुन्या इमारती, जुने वाडे पडणं, पुनर्विकास होणं या गोष्टी आपण समजूच शकतो. मात्र, त्याबरोबर पुण्याची ‘पुणे’ म्हणून जी खास ओळख आहे, ती अजिबात नाहीशी होऊ नये, असं वाटतं. मंडई परिसरात आजही गेलं, की त्या जुन्या पुण्याच्या खाणाखुणा दिसतात. अजूनही तग धरून उभ्या असलेल्या काही इमारती, काही जुने वाडे दिसतात. सर्वांच्या कुतूहलाचा विषय असलेल्या, चमत्कारिक वा विनोदी वाटतील अशा ‘पुणेरी पाट्या’ दिसतात. काही जुनी खाण्याची ठिकाणं तशीच उभी असल्याचं दिसतं तेव्हा फार बरं वाटतं.
मी १९९७ मध्ये या वाड्यात राहायला आलो, तेव्हाच्या पुण्यात हळूहळू बदल होत होते. मात्र, त्या बदलांचा वेग तसा कमी होता. गर्दी पुण्यात तेव्हाही होती. मात्र, ती गर्दी अनोळखी वाटत नसे. गणपतीचे दिवस किंवा विसर्जनाच्या दिवशी याचा प्रत्यय येत असे. तेव्हा पुण्यात फिरताना आम्हाला अजिबात परकं वाटत नसे. विसर्जनाच्या दिवशीही अलोट गर्दी असली, तरी त्या गर्दीचा चेहरा अनोळखी नसे. आता अनोळखी चेहऱ्याच्या गर्दीची भीती वाटते. पुण्यात होणारं वेगवान व वाढतं स्थलांतर आणि त्यामुळं इथल्या लोकसंख्येत नित्यानं पडणारी भर यामुळं या शहरावर आता असह्य ताण आला आहे. शिवाय स्थलांतरितांची बदललेली मानसिकता हा एक वेगळाच विषय आहे. सुदैवानं आम्ही ‘पारसी स्पिरिट’ घेऊन या शहरात आलो होतो आणि त्यांच्यासारखेच दुधात साखर मिसळावी तसे या शहरात मिसळून गेलो. आपल्याला इथंच राहायचं आहे आणि आपलं करिअर वगैरे जे काही व्हायचंय ते इथंच होणार आहे, ही धारणा पक्की होती. असो.
माझं रुटीन इतरांपेक्षा वेगळं होतं, हे आधी सांगितलंच आहे. मी बहुतांश वेळेस संध्याकाळी ऑफिसला जायचो. संध्याकाळी सहा ते रात्री साडेबारा अशी ड्युटी असायची. त्यामुळं दिवसाचा तोपर्यंतचा वेळ मी वाड्यातच असे. माझी रूम नंतरच्या काळात वाड्याच्या पुढं, मधल्या चौकातच असल्यानं वाड्यात येणारा-जाणारा प्रत्येक माणूस दिसत असे. आमच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला प्रकाश शहा यांची ‘डायमंड अॅडव्हर्टायझिंग कंपनी’ होती. त्यांना मी ‘सकाळ’मध्ये आहे हे कळल्यावर आमची अल्पकाळ चांगली मैत्री झाली होती. मी काही वेळा त्या ऑफिसमध्ये जाऊन बसत असे. भाऊमहाराज बोळातून चिंचेच्या तालमीकडं जायला लागलं, की पुढं डाव्या हाताचा तात्या थोरातांचा वाडा होता. हे तात्या थोरात म्हणजे मंडईचे एके काळचे अनभिषिक्त सम्राटच. त्यांचा दरारा होता. संध्याकाळी ते त्या वाड्याच्या दारात बसलेले दिसत. तेव्हा ते थकलेले होते. मी शिकाऊ का होईना, पत्रकार असलो आणि मला तात्या थोरात ही काय चीज आहे हे चांगलंच ठाऊक असलं तरी (किंबहुना त्यामुळंच) त्यांच्याशी सहज जाऊन बोलायचा धीर कधी झाला नाही. एकदा तर ते कुणावर तरी चिडले होते, तेव्हा अस्सल ‘मंडई’तल्या शिव्याही त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या आणि कान धन्य झाले! तात्या थोरात आणि ‘दगडूशेठ’चे प्रतापराव गोडसे हे दोघेही तेव्हा पुण्यातलं मोठं प्रस्थ होतं. तेव्हा ‘दगडूशेठ’ची आजसारखी क्रेझ नव्हती. गर्दी व्हायची, पण ती देखावा बघायला असायची. आम्हाला त्यांचा ‘गुढीपाडवा ते रामनवमी’ या काळात होणारा संगीत उत्सव अधिक आवडायचा. (त्याचं वर्णन पहिल्या भागात आलंच आहे.) त्या काळात माझा शेवाळे म्हणून एक मित्र झाला होता. तो या दगडूशेठ मंडळाचा कार्यकर्ता होता. त्याच्यामुळं मला एके काळी त्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बसायला मिळायचं. प्रचंड संख्येने आलेले नारळ पोत्यांत भरायचे आणि तिथं असलेल्या एका खोलीत ती पोती ठेवायची आणि त्यावर लक्ष ठेवायचं हे काम शेवाळे करायचा. मीही त्याच्याबरोबर तिथं बसायचो.
मुळात रूमवर आम्ही फारसे नसायचोच. तो संपूर्ण परिसर तर आम्ही फिरायचोच, पण इकडं कॅम्पपासून ते रेसकोर्सपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला विद्यापीठापासून ते पाषाण तलावापर्यंत सगळीकडं भटकंती करायचो. कधी सायकलवर, तर कधी बसनं... क्वचित रिक्षानं फिरायचो.
मी जर्नालिझमला प्रवेश घेतला आणि संतोष देशपांडेशी माझी मैत्री झाली. तो नारायण पेठेत कबीर मठात राहायचा. त्यानं एकदा असं फर्मान काढलं, की आपण रोज सकाळी पर्वतीवर जायचं. मुळात मी रात्री उशिरा रूममवर यायचो. सकाळी उठायचो ते नऊ-दहा वाजता. त्यामुळं संतोषची ही आयडिया मी लगेच झटकून टाकली. मात्र, त्यानं चिकाटी सोडली नाही. पर्वतीवरून आल्यावर परत झोप, असं तो म्हणायचा. मग शेवटी मी त्याच्याबरोबर पर्वतीला जायला लागलो. सायकलनं (आणि नंतर एम-८० नं) पर्वती पायथ्याला जायचं, पर्वती चढायची, थोडा वेळ बसून लगेच खाली उतरायचं आणि खाली पोहे खायचे असा नेम आम्ही बरेच दिवस केला. मला वाटतं, सहा महिने आमचा हा उपक्रम चालला असेल. नंतर (बहुतेक पावसाळा सुरू झाल्यावर) तो आपोआप बंद पडला. मात्र, पुणेकर होण्याची आणखी एक ‘अट’ मी त्यानिमित्तानं पूर्ण केली होती, हे नक्की. जर्नालिझमचं ते एक वर्ष (१९९९-२०००) खासच होतं. (त्यावर मी ‘‘रानडे’तले दिवस’ नावाचा स्वतंत्र ब्लॉग लिहिला आहे. तो जिज्ञासूंनी जरूर पाहावा. त्यामुळं इथं पुनरुक्ती करत नाही.)
‘‘रानडे’तले दिवस’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
‘सकाळ’मध्ये माझ्याबरोबर मंदार कुलकर्णी होता आणि दीड वर्षानं, म्हणजे १९९९ मध्ये अभिजित पेंढारकर आला. या दोघांशी माझी चांगली मैत्री जुळली व ती आजतागायत टिकून आहे. जर्नालिझमच्या वर्गामुळं संतोष देशपांडे, सिद्धार्थ केळकर, श्रीरंग गायकवाड, दीपक चव्हाण हे मित्र झाले. त्यापैकी संतोष व सिद्धार्थ नंतर अनुक्रमे ‘सकाळ’ व ‘मटा’मध्ये सहकारीही झाले. आमच्या आवडी-निवडी समान होत्या. सिनेमा-नाटकं बघण्याची रुचीही सारखीच होती. अर्थात, म्हणूनच मैत्र जुळलं म्हणा. त्यामुळं आम्ही कुणी ना कुणी सतत एकमेकांसोबत नाटकं, सिनेमांंना जात असू. मला आणि मंदारला गाण्यांच्या कार्यक्रमांचीही खूप आवड होती. तेव्हा पुण्यात मराठी भावगीतं, ऑर्केस्ट्रा आदींना खूप मागणी होती. अपर्णा संत, मुकुंद फणसळकर, अनुराधा मराठे आदी गायक असायचे. अरुण नूलकर बहुसंख्या कार्यक्रमांना निवेदनाला असायचे. डॉ. राजेंद्र दूरकर तबल्यावर असायचे. ते आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांच्यावर ‘दूरकर इकडच्या आणि तिकडच्या मात्रा अजिबात चुकत नाहीत,’ ही कोटीही नूलकर न कंटाळता दर कार्यक्रमात करायचे. हे दूरकर पंडितजींच्या ‘भावसरगम’लाही असायचे. आणखी एक पाटकर नावाचे ढोलकीवाले असायचे. ‘गंगेचे पाणी पाटाला...’ किंवा अशीच कुठली तरी ओळ म्हणून पंडितजी त्यांना खूण करायचे आणि मग ते जबरदस्त ढोलकी वाजवायचे. गाण्यांचे बहुसंख्य कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरात व्हायचे. तेथे ‘वातानुकूलन यंत्रणा अंशत: सुरू राहील’ अशी पाटी कायमस्वरूपी लावलेली असायची. (अजूनही असेल.) तिथली बाल्कनी एवढी उंच आहे, की आणखी थोडं चढलं, तर पर्वतीची उंची सहज गाठू असं वाटायचं. मला तिथं जायला आवडायचं नाही; पण काय करता? बहुसंख्य गाण्यांचे कार्यक्रम तिथंच असायचे. मी ‘सकाळ’मध्ये ‘झलक’ नावाचं सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती देणारं सदर सुरुवातीपासून बघत असल्यामुळं मला अशा कार्यक्रमांचे पास काही वेळा मिळायचे. मग संध्याकाळी वेळ मिळालाच तर मंदार आणि मी तो कार्यक्रम बघायला जायचो. आणखी असाच एक कार्यक्रम मी सहसा चुकवायचो नाही, तो म्हणजे १२ मार्चला यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी रामदास फुटाणे आणि इतर कवींचं होणारं कविसंमेलन. हाही कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरातच व्हायचा आणि फार मस्त रंगायचा. महाराष्ट्रातले अनेक कवी एकगठ्ठा ऐकायला मिळायचे आणि फुटाणे व फ. मुं. शिंदे यांची तुफान टोलेबाजी हे म्हणजे ‘आइसिंग ऑन द केक’ असायचं.
सवाई गंधर्व महोत्सव तेव्हा रमणबागेत भरायचा. तेव्हा रात्री दहाची मर्यादा नव्हती. पहाटेपर्यंत गाणी चालत. आम्ही ऑफिसचं काम संपवून अनेकदा तिथं जात असू. तेव्हा तर दारावर कुणी तिकीटही विचारायचं नाही. आम्ही थेट आत जाऊन बसायचो. पं. भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, गंगूबाई हनगल, पं. फिरोज दस्तूर, मालिनीबाई राजूरकर असे मोठमोठे कलावंत सहज दिसायचे. आमचे अशोक रानडे सर रात्रीच महोत्सवाचं परीक्षण लिहून पाठवायचे. कुणी तरी ऑफिस बॉय ते घ्यायला यायचा. मग ते कागद ऑफिसात जाऊन, तो मजकूर कंपोझ करून, मुद्रितशोधन होऊन पानांत लागायचा. अनेकदा पहाटे चार वाजता छापलेल्या ताज्या अंकाच्या प्रती तिथं यायच्या. त्यात काहीच तासांपूर्वी झालेल्या गाण्यावर रानडेंनी लिहिलेलं अभ्यासपूर्ण समीक्षण पहाटे त्याच मंडपात वाचायला मिळायचं. फार मजा यायची तेव्हा!
याच काळात म्हणजे १९९९ मध्ये शिवउद्योग सेनेतर्फे राज ठाकरे यांनी गणेश कला-क्रीडा मंच येथे नामवंतांची व्याख्याने आयोजित केली होती. तेव्हा सुनील गावसकरचं व्याख्यान प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला होता. एकूण तो सर्व काळ मी व माझ्या मित्रांनी भरपूर एंजॉय केला. चांगलं वाचलं, चांगलं बघितलं, चांगलं ऐकलं. आपल्या अवतीभवती असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वातावरणातून आपला पिंड घडत जातो... माझ्या सुदैवानं या काळात मला सगळं काही भरभरून अनुभवता आलं, साठवून ठेवता आलं आणि त्या संचितावर आपलं पुढचं जगणं सुसह्य व आनंददायी करता आलं. त्यासाठी मी त्या काळाचा आणि भाऊमहाराज बोळातील वास्तव्याचा कायमचा ऋणी आहे.
(समाप्त)
---




















