7 Aug 2022

‘एकदा काय झालं!!’बद्दल...

स्वीकाराची समंजस गोष्ट
-----------------------------

आपण वेगवेगळ्या भावनांवर आरूढ होऊन जगणारी माणसं आहोत. जग दिवसेंदिवस अधिकाधिक क्रूर, रुक्ष आणि संवेदनाहीन होत चाललं आहे, असं म्हणताना अगदी भाबडी, देवभोळी, साधी आणि संवेदनशील माणसंही आपल्याला भरपूर दिसतात. अशा माणसांमुळंच जग चाललं आहे, असंही वाटून जातं. दुसऱ्याच्या दु:खामुळं आपल्या डोळ्यांत पाणी येणं, खरोखर दु:ख होणं ही एक विशेष प्रकारची संवेदनशीलता आहे. अशा या संवेदनशीलतेची परीक्षा हल्ली हरघडी होत असते. आपल्या सभोवती एवढं काय काय आव्हानात्मक सगळं सुरू असताना, वेदना-दु:ख-त्रास यांनी मन घायाळ होत असताना तर या संवेदनशीलतेची कसोटीच असते. अशा वेळी आपण जे काही जगलोय, अनुभवलंय, सोसलंय, जाणलंय आणि या मिश्रणातून आपलं जे काही व्यक्तिमत्त्व तयार झालंय, त्यातून आपला प्रतिसाद ठरत असतो. आपल्या जडणघडणीचा, संस्कारांचा एक अंदाजही त्यातून येत असतो. 
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं!!’ हा नवा सिनेमा आपली अशी सगळ्या पातळ्यांवर परीक्षा घेतो. आपल्यात माणूसपण कितपत शिल्लक आहे, संवेदनांची मुळं जिवंत आहेत की थिजून गेलीयत, संस्कारांची बाळगुटी पेशींत रुजली आहे की नाही या सगळ्यांची कसून परीक्षा होते आणि शेवटी डोळ्यांतून वाहणारे अश्रू व नि:शब्द झालेलं मन आपण या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची ग्वाही देतात. आपला आपल्यावरच पुन्हा विश्वास बसतो. आपल्या आयुष्यात, आपल्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या माणसांचं मोल आपल्याला कळतं. बहिणाबाईंच्या ‘...एका श्वासाचं अंतर’ या ओळींचा अर्थ आतून उलगडतो आणि पोटात खड्डाही पडतो. त्याच वेळी आपल्या प्रियजनांना त्या एका समंजस स्वीकारासाठी तयार करण्यासाठी आपल्या जगण्याची गोष्ट पुन:पुन्हा सांगत राहिली पाहिजे, ही असोशीही वाटू लागते.
‘एकदा काय झालं!!’ ही सलीलच्या आतापर्यंतच्या जगण्यातील सर्व अनुभवांतून तयार झालेली कलाकृती आहे. आपण जे काही जगतो, ज्या धारणांसह जगतो, ज्या संवेदनांसह जगतो, ते सगळं आपल्या अभिव्यक्तीतून उतरत असतं. त्यामुळं ‘एकदा काय झालं!!’ हा सिनेमा दिग्दर्शकाला जगण्याविषयी काय आकलन झालं आहे, यावरही भाष्य करतो. एका सृजनशील कलावंताला झालेलं हे आकलन असल्यानं त्यानं ते कविता, गाणी, संवाद आणि अर्थातच गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे. हे सांगणं ‘ये हृदयीचे ते हृदयी’ असं असल्यानं प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोचतंच. (अर्थात देणाऱ्याप्रमाणे ते स्वीकारणाऱ्याची - म्हणजेच बघणाऱ्यांचीही - संवेदनांची पातळीही समान असणं आवश्यक आहे.)
सलीलसारखा कलावंत जेव्हा एखादी कलाकृती तयार करतो, तेव्हा त्याला एकच एक गोष्ट सांगायची नसते. त्या गोष्टीच्या माध्यमातून तो अव्यक्तपणेही अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडत असतो, सांगत असतो. सलीलच्या या कलाकृतीतही हे सांगणं आहे. ते आपल्या कुटुंबव्यवस्थेविषयी आहे, त्यातल्या आजी-आजोबा, आई-बाबा या  महत्त्वाच्या घटकांविषयी आहे, ते लहानपणी आजी-आजोबा आपल्याला ज्या गोष्टी सांगतात त्याविषयी आहे, कुटुंब आपल्याला काय संस्कार आणि ऊब देतं त्याविषयी आहे, आपल्या सामाजिक भानाविषयी आहे आणि आयुष्यात आकस्मिक येऊन आदळणाऱ्या कुठल्या तरी कठोर गोष्टीच्या समंजस स्वीकाराविषयीही आहे. त्यासाठी त्यानं मुलगा आणि त्याचे वडील या नात्याचा प्रमुख आधार घेतला आहे. मराठी सिनेमांत फार कमी वेळा या नात्याचं इतकं उत्कट दर्शन झालंय. इथं रूढार्थानं नायक-नायिका किंवा हिरो असं कुणी नाही. इथं येणारी विपरीत परिस्थिती,  कठीण काळ आणि त्यानुसार आपापल्या कुवतीनुसार त्याला प्रतिसाद देणारी साधी माणसं आहेत. मात्र, या माणसांकडं शिदोरी आहे ती आपल्या आजी-आजोबांनी किंवा आई-बाबांनी लहानपणी सांगितलेल्या गोष्टींची. या गोष्टींतून आपल्या अबोध मनावर तेव्हा जे काही संस्कार झालेले असतात, तेच शेवटी आपल्याला कठीण प्रसंगांत उभं करतात. एका अर्थानं ही कलाकृती म्हणजे त्या गोष्टी सांगणाऱ्या पिढीला केलेला सलाम आहे.
चिंतन (अर्जुन पूर्णपात्रे) आणि त्याचे बाबा किरण (सुमीत राघवन) या दोघांची ही गोष्ट आहे. किरणची ‘नंदनवन’ ही वेगळ्या धर्तीवरची शाळा आहे. मुलांना रूढ पद्धतीने शिकविण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकवण्यावर त्याचा भर आहे. चिंतन आणि बाबा यांचं एक घट्ट बाँडिंग आहे. लहानग्या चिंतनसाठी बाबाच त्याचा सर्व काही आहे. तोच त्याचा ‘हिरो’ आहे. चिंतनच्या घरात त्याची आई (ऊर्मिला कोठारे) आणि आजी-आजोबाही (सुहास जोशी व डॉ. मोहन आगाशे) आहेत. या घरात अचानक एक भयंकर वादळ येतं आणि सगळ्यांच्याच भावनांची कसोटी लागते. चिंतन या सगळ्या परिस्थितीला कसं तोंड देतो, त्याचे बाबा काय करतात, घरातली मंडळी कशी प्रतिसाद देतात आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे चिंतनने ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्याचा कसा उपयोग होतो या सगळ्यांची ही गोष्ट आहे.
सिनेमा पाहिल्यानंतर पहिल्यांदा तर मला वाटलं, आपण खरोखर यावर काही लिहू शकत नाही. इमोशनली हा खूप जास्त डोस झाला, असंही मला प्रथम वाटलं. माझ्यासोबत सिनेमा पाहणारे सगळेच नि:शब्द झाले होते. भिजलेले डोळे हीच खरी दाद होती. अर्थात नंतर तो भर ओसरल्यावर सिनेमाबद्दल लिहायलाच हवं असंही वाटलं. सलीलची सर्जक दृष्टी, सुमीत राघवननं साकारलेली अप्रतिम भूमिका, शंकर महादेवन यांचं गायन, सलीलचं संगीत, संदीप खरे-समीर सामंत यांचे शब्द या सगळ्यांच्या मेहनतीतून ही कलाकृती आकाराला आली आहे. (मी कोव्हिडपूर्व काळात या सिनेमाचं चित्रीकरण बघायला एक दिवस गेलो होतो. शूटिंग हे एकूणच किती कंटाळवाणं आणि सर्वांच्या संयमाची परीक्षा बघणारं काम आहे, हे माझं मत त्यानंतर आणखी घट्ट झालं.) 
या सिनेमातल्या गाण्यांचा खास उल्लेख केला पाहिजे. शंकर महादेवन यांच्या आवाजातलं ‘रे क्षणा’ हे गाणं आणि सुनिधी चौहाननं गायलेली अंगाई अगदी जमून आली आहे. ‘भीमरूपी महारुद्रा’ या गाण्यानं सिनेमाची सुरुवात होते आणि ‘मी आहे श्याम, मित्र माझा राम’ हे आणखी एक गाणं यात आहे. ही दोन्ही गाणी सलीलनं आधीच तयार केली होती. त्याचा या सिनेमात चपखल वापर करण्यात आला आहे. रस्त्यावरच्या गरीब मुलाचा आणि पुष्कर श्रोत्रीचा असे दोन छोटे ट्रॅक सिनेमात आहेत. सिनेमा पूर्वार्धात काही ठिकाणी थोडा रेंगाळतो. मात्र, एकूण तो आपली पकड फारशी सोडत नाही. संदीप यादव यांच्या छायांकनाला दाद द्यायला हवी. लहान मुलांच्या नजरेचा ‘अँगल’ त्यांनी अजूक पकडला आहे.
सुमीतसोबतच ऊर्मिला, सुहास जोशी, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री यांच्या भूमिका आहेत आणि त्यांनी त्या व्यावसायिक सफाईनं केल्या आहेत. छोट्या, पण महत्त्वाच्या भूमिकेत मुक्ता बर्वेचं दर्शन सुखकर आहे. चिंतन झालेला अर्जुन पूर्णपात्रे हा मुलगा गोड आहे. त्याची भूमिका अवघड होती. विशेषत: शेवटचा प्रसंग. मात्र, तो त्यानं उत्तम केला आहे. (चाळीसगावची पूर्णपात्रे फॅमिली आपल्याला ‘सोनाली’ सिंहिणीमुळं माहिती आहे. अर्जुन याच घरातला!) 
काही सिनेमे आपल्याला रडायला लावणारे म्हणून अजिबात आवडत नाहीत. ‘एकदा काय झालं!!’ हा याला अपवाद ठरावा. दुसरं म्हणजे हा काही लहान मुलांचा चित्रपट नाही. लहान मुलं असलेला हा मोठ्यांचाच चित्रपट आहे. आपल्यातल्या लहान मुलाची आणि निरागस संवेदनशीलतेची समंजस गोष्ट सांगणारी ही कलाकृती एकदा तरी अनुभवावीच.

---

1 Aug 2022

रोहन मैफल - ‘पेन’गोष्टी - भाग ३ व ४

भाग ३
-------

लेख झाला का?
-----------------

दिवाळी अंकासाठी लेख लिहिणं हा तुम्ही लेखक आहात, या घटनेच्या असंख्य पुराव्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा असतो. दिवाळी अंकात लेख लिहिणं ही लेखक म्हणून ओळख होण्यातली एक कसोटी असेल, तर दिवाळी अंकासाठी तुमच्याकडे प्रकाशकाने लेख मागणं, हा लेखक म्हणून प्रस्थापित होण्यातला महत्त्वाचा मानदंड असतो. साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात. त्यांच्या मनातल्या अंकाचा मोर एकदम थुईथुई नाचायला लागतो. (आमच्या एका प्रकाशक मित्राने फेब्रुवारीतच दिवाळी अंकाचा लेख मागितला होता. तेव्हा चालू दिवाळी अंक वाचून संपले, की लिहितो, असं कळवलं होतं.) बाकी ‘या आठवड्यात वाचून टाकू’ म्हणून बाजूला ठेवलेले दिवाळी अंक पुढील ५२ आठवड्यांतही वाचले जात नाहीत, ते वेगळं. दिवाळी अंकात लिहिण्याची एक खास वेळ असते. ती वेळच तुम्हाला हाकारे घालते. गणपती संपले, पितृपंधरवडा सुरू झाला, की हवा बदलते. हीच खरी लेखकाची दिवाळी अंकातले लेख पाडण्याची वेळ असते. काही धोरणी लेखक जानेवारीपासूनच ‘स्टॉक’ करीत जातात. काही हुकमी लेखक विषयाबरहुकूम लेख लिहून ठेवतात. ‘मागणी तसा पुरवठा’ असं त्यांचं तत्त्व असतं. आमच्या एका विनोदी लेखक मित्रानं तर एका पावसाळ्यात ५० लेख लिहून टाकले होते. त्या वर्षी मुठेऐवजी त्याच्या पेनातल्या शाईलाच पूर आला होता, असं वाटून गेलं. आठ-दहा लेख समजू शकतो, अगदी १५ देखील ओकेच; पण पन्नास? त्याच्या या बहुप्रसवा लेखणीनं मला तर भयंकर न्यूनगंड आला होता. सुरुवातीला मी कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या धोरणानुसार ‘एक या दो... बस्स’ म्हणून थांबत असे. ते एक किंवा दोन लेख लिहितानाही पुरेशी दमछाक होई. मात्र, हळूहळू मागणी वाढू लागली. आपल्यासारख्या लेखकाला मागणी वाढली, म्हणजे दिवाळी अंकांची संख्या तरी वाढली असावी किंवा त्यांचा दर्जा तरी घसरला असावा, अशी प्रामाणिक भावना मनात येऊन गेली होती. मात्र, दिवाळी अंक लेखकाला भावना आदी गोष्टींचा फार विचार करून चालत नाही. मृग नक्षत्र उलटलं, की ‘लेख झाला का?’ असे धमकीवजा संदेश संपादक मंडळींकडून येऊ लागतात. ‘अहो, काय घाई आहे? देतो पुढच्या महिन्यात...’ असं उत्तर दिलं, की ‘सगळा अंक लावून तयार आहे, फक्त तुमचाच लेख यायचाच राहिला आहे,’ असं धादांत असत्य उत्तर तुमच्या तोंडावर फेकून ही मंडळी मोकळी होतात. खरं काय ते दोघांनाही माहिती असतं. काही संपादक मंडळी अगदी टोक गाठतात. (पूर्वी संपादक मंडळी लेखकाच्या लेखाला टोक वगैरे आहे का, हे तपासत असत. नसेल तर काढून देत असत. आता ती ‘मौज’ संपली. आता हे दुसरं टोक!) मग, पंधरा ऑगस्टच्या आत लेख आला पाहिजे, अशी प्रेमळ धमकी येते. बहुतेक संपादक-प्रकाशकांची ही आवडती, लाडकी डेडलाइन आहे. लेखकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्यासाठी त्यांना ‘१५ ऑगस्ट’ हाच दिवस सुचावा? या काळात फोन वाजला किंवा मेसेजची रिंग वाजली, तरी धडकी भरते. ‘लेख झाला का?’ हा प्रश्न हृदय भेदून जातो. लेख झालेला नसतोच. मग ‘झालाच आहे, एकदा परत वाचतो आणि पाठवतो,’ अशी काही तरी पळवाट काढावी लागते. लेख युनिकोडमध्ये हवा, मेलवर हवा, सोबत फोटोही तुम्हीच जोडा, या आणि अशाच अनेक अटी-शर्तींची पूर्तता करावी लागते. कशीबशी ही डेडलाइन गाठून आपण ‘हुश्श’ केलं, की आणखी एका संपादकाची मेल इनबॉक्सात येऊन पडलेली असते.
काही मंडळी दर वर्षी अंक काढतात. मात्र, गणपती जाईपर्यंत यंदा अंक काढायचा की नाही, हेच यांचं निश्चित झालेलं नसतं. सगळं ऐन वेळी ठरतं. मग अचानक लेखाची मागणी येते. ‘तुम्हाला आवडेल त्या विषयावर द्या,’ असा संदेश आला, की समजायचं, आपल्या मजकुराचं महत्त्व दोन जाहिरातींच्या मध्ये लावायचा काही तरी मजकूर इतकंच आहे. अशा मंडळींनाही मग सस्त्यातले (अर्थात आधी कुठं तरी छापून आलेले किंवा ब्लॉगवरचे) तयार लेखच पाठवले जातात, हे सांगणे न लगे!
काही संपादक वा प्रकाशकांना एखाद्या विषयाला वाहिलेला अंक काढायची खोड असते. अत्यंत विवक्षित व नेमका विषय देण्यात ही मंडळी पटाईत असतात. उदा. चित्रपटसृष्टी असा ढोबळ विषय न देता ‘विसाव्या शतकातील सातव्या दशकातील सिंधी चित्रपटांतील स्वयंपाकघरे’ असा अतिनेमका विषय देतील. आता सांगा, ढोबळ विषयात लेखकाला जशी चौफेर फलंदाजी करता येते, तशी या नेमक्या विषयात करता येईल का? उगाच अभ्यास वगैरे नाही का करावा लागणार? अशा बाउन्सी विकेटवर खेळण्यापेक्षा ‘यंदा मी फार बिझी आहे हो’ असे सांगून चेंडू सोडून देणे फार सोपे! मग काही हौशा-नवशा-गवशा मंडळींचेही फोन सुरू होतात. त्यांना टाळता टाळता नाकी नऊ येतात. अखेर दिवाळी येते. आपण लेख लिहिलेले अंक बाजारात येतात. आपण प्रतिसादाची आणि मानधनाची वाट बघत राहतो. कुठून तरी महाराष्ट्रातल्या आडगावातून एखादे दिवशी फोन येतो आणि लेख आवडल्याचं समोरची व्यक्ती सांगते, तेव्हा तो लेख लिहिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. मानधनाची मात्र वाटच बघायची असते. तोवर आपण पुन्हा मान खाली खालून पुढच्या फोनची वाट बघत राहतो...


---

भाग ४
--------

दिवाळी अंकांची धूम
-------------------------

दिवाळीची चाहूल दोन गोष्टींनी लागते. एक तर पावसाळा संपून हवेत हलका गारवा यायला लागलेला असतो, आणि दोन, दिवाळी अंकांच्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला लागलेल्या असतात. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून मराठी माणसाची दिवाळी या खास खास दिवाळी अंकांनी खरोखर समृद्ध होत आलेली आहे. मराठी माणसाच्या काही खास, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. त्यात दिवाळी अंक ही महत्त्वाची. दिवाळी हा मुळातच वर्षातला सर्वांत मोठा सण असल्यानं या काळात हात सैल सोडून खरेदी होत असतेच. त्यात आवडीचे दिवाळी अंक आणि सोबत पुस्तकांचीही खरेदी होतेच. बहुसंख्य सुशिक्षित मराठी कुटुंबांमध्ये ही परंपरा दीर्घकाळ चालत आलेली आहे. दिवाळीच्या सुट्टीत या अंकांचं वाचन हा फार मोठा आनंदसोहळा असायचा. अलीकडच्या २०-२५ वर्षांत त्यात ‘दिवाळी पहाट’ नावाच्या उपक्रमाची भर पडली आहे. अशा एखाद्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावायची, नंतर चविष्ट फराळाचा फन्ना उडवायचा आणि मग आवडता दिवाळी अंक वाचत दुपारी लोळत पडायचं, हा अनेकांचा आजही दिवाळातला ठरलेला कार्यक्रम आहे.
मराठीत विपुल प्रमाणात दिवाळी अंक निघतात. नामवंत आणि वर्षानुवर्षं प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची संख्या साडेतीनशे ते चारशेच्या आसपास आहे. याशिवाय गावोगावी निघणारे अंक धरले तर ही संख्या दीड-दोन हजारांच्या घरात सहज जाईल. नियमित निघणारे नेहमीचे अंक म्हटले, तरी वर्षानुवर्षं हे अंक निघत आलेले आहेत, यातलं सातत्य वाखाखण्याजोगं आहे. या दिवाळी अंकांमधून दर्जेदार कथा, कविता आणि कादंबऱ्याही वाचकांना वाचायला मिळाल्या आहेत. अनेक मोठमोठ्या लेखकांची सुरुवात दिवाळी अंकांतून लेख लिहूनच झाली आहे. मराठीत कवींचं उदंड पीक बारमाही येत असतं, त्याला कारण त्यांच्या कविता प्रसिद्ध करणारे असे शेकडो अंक निघत असतात. माझ्या लहानपणी लायब्ररीतूनच दिवाळी अंक आणून वाचायची पद्धत होती. फारच थोडे अंक विकत घेतले जात. त्यातही ‘आवाज’सारख्या विनोदी अंकावर वाचकांच्या उड्या पडत. त्यातल्या त्या चावट ‘खिडक्यां’चं आकर्षण बरेच दिवस होतं. विनोदी अंकांखालोखाल मागणी असायची ती भविष्यविषयक दिवाळी अंकांना. त्यानंतर मग दैनिकांनी काढलेले दिवाळी अंक आणि नंतर विशिष्ट विषयांना वाहिलेल्या अंकांचा नंबर लागत असे. या दिवाळी अंकांना पुढंही जवळपास सहा महिने भरपूर मागणी असे. त्यानंतर मग जुन्या झालेल्या अंकांचीही मित्रमंडळींत देवाणघेवाण चाले.
दिवाळीत मित्रांकडं फराळाला जाणं हा एक सोहळा असायचा. यात रंगणाऱ्या गप्पांमध्येही यंदाच्या दिवाळी अंकांत कुणी काय बरं लिहिलं आहे, याच्या चर्चा रंगत असत. हल्ली या चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतात. काळ बदलला आहे, तसं तंत्रज्ञानही बदललं. ई-पुस्तकांप्रमाणे आता डिजिटल दिवाळी अंकही निघू लागले आहेत आणि ते व्हॉट्सअपवर जोरदार फॉरवर्डही होत असतात. गेल्या वर्षी करोनामुळं निर्माण झालेल्या अतिबिकट परिस्थितीत काही दिवाळी अंक निघू शकले नाहीत. मात्र, बहुतेकांनी जिद्दीनं आपापले अंक काढलेच. काहींनी केवळ ऑनलाइन अंक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. वाचकांना हा बदल स्वीकारणं जड केलं असलं, तरी दिवाळी अंक आले याचंच अनेकांना कौतुक वाटलं. प्रकाशकांच्या मागे काही कमी व्याप नसतात. लेख गोळा करणं, त्यांचं उत्तम संपादन करणं, नंतर आर्टिस्टकडून ती पानं लावून घेणं, चांगलं मुखपृष्ठ निवडणं, आतली पानं कलात्मक पद्धतीनं सजवणं हे सगळं वेळखाऊ काम आहे. मुळात अंगी किडाच असायला लागतो. त्याशिवाय हे काम उरकत नाही. आपल्याकडं अशा हौशी मंडळींची मुळीच कमतरता नाही, ही फार चांगली गोष्ट आहे.
यंदा तुलनेनं करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं सर्व काही पूर्ववत सुरू होताना दिसतं आहे. त्यामुळं यंदा पूर्वीप्रमाणेच जोरदार सर्व अंक बाजारात येणार याची खात्री वाटते. मराठीच्या साहित्य व्यवहारात जसं साहित्य संमेलनाचं एक महत्त्व आहे, तसंच महत्त्व या दिवाळी अंकाचंही आहे. या काळात होणारी आर्थिक उलाढाल मराठी प्रकाशन व्यवसायासाठी प्राणवायूसारखीच मोलाची असते. यानिमित्ताने होतकरू लेखक मंडळींनाही मानधनाच्या रूपाने चार पैसे मिळतात. (अनेकांना केवळ ‘मान’ मिळतो; ‘धन की बात’ मनातच ठेवावी लागते, हीदेखील वस्तुस्थिती आहेच.) मात्र, बहुतेक नामवंत प्रकाशक आपल्या लेखकांना यथोचित मानधन देतात. अंकातील जाहिराती आणि मजकूर यांचं संतुलनही त्यांनी राखलेलं असतं. त्यामुळं हे अंक वाचताना मजा येते.
या साहित्य व्यवहारातून अनेक चांगल्या निर्मितीची बीजं रोवली जातात. नवे लेखक मिळतात. प्रकाशकही चांगल्या आशयाकडं लक्ष ठेवून असतात. एखाद्या नव्या पुस्तकापेक्षाही एखाद्या लोकप्रिय दिवाळी अंकाचा प्रसार किती तरी जास्त असतो. अशा अंकात लिहिलेल्या लेखावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद येतो, असा अनुभव आहे. महाराष्ट्राबाहेरही जिथं जिथं मराठी माणूस वस्ती करून आहे, त्या शहरांतूनही या अंकांना मागणी असते. तिथले वाचकही आवर्जून प्रतिसाद कळवत असतात. एकूणच मराठी माणसाच्या अनेक उत्साही, हौशी गोष्टींपैकी दिवाळी अंक ही एक ठळक गोष्ट आहे. आता दिवाळीत पुन्हा एकदा हौसेनं दिवाळी अंकांची चळत आणायची आहे, याची खूणगाठ अनेकांनी बांधली असेल. त्या खरेदीसाठी शुभेच्छा! दिवाळीप्रमाणेच दिवाळी अंकांचे वाचनही शुभदायी ठरो!

---