23 Sept 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - द लंचबॉक्स


प्रेमाचं (अन् बुद्धीचंही) खाद्य...

---------------------------------------
'द लंचबॉक्स' या रितेश बत्रा दिग्दर्शित नव्या हिंदी सिनेमाची टॅगलाइन आहे - 'लव्हस्टोरी ऑफ द पीपल हू नेव्हर मेट...' नेमके शब्द हेच आहेत का, माहिती नाही, पण अशीच काही तरी ती टॅगलाइन आहे. प्रेम म्हणजे काय, ते कसं होतं, कुणाबरोबर होतं, त्यासाठी माणूस प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसण्याची गरज आहे का, तसं माणूस डोळ्यासमोर दिसत नसेल, तर जे काही होतं त्याला प्रेम म्हणायचं की आणखी काही, मग माणूस डोळ्यांसमोर असताना त्यांच्यासोबत होतं ते काय अशा अनेक बेसिक प्रश्नांना 'लंचबॉक्स' हात घालतो. विशेषतः हल्ली फेसबुक, व्हॉट्सअपच्या आणि चॅटिंगच्या आभासी जगात अर्ध्याहून अधिक जग डुंबत असताना तर हे प्रश्न अधिकच सयुक्त (रिलेव्हंट) वाटतात. 'लंचबॉक्स'चं कौतुक अशासाठी, की तो हे सगळे प्रश्न एका छानशा गोष्टीच्या वेष्टनात नीट तर मांडतोच, पण शेवटी त्याचं एक पटेल असं उत्तरही देतो. हे उत्तर आभासी जगातून आपल्याला वास्तवात आणणारं आहे. खूप प्रगल्भ आहे, मॅच्युअर आहे. म्हणूनच 'लंचबॉक्स' हे नुसतं मनोरंजनाचं आणि त्यातल्या प्रेमाचं खाद्य नाही, तर ते बुद्धीलाही दिलेलं खाद्य आहे...
'लंचबॉक्स' ही साधी-सुधी गोष्ट आहे साजन फर्नांडिस (इरफान खान) या पन्नाशीतल्या, विमा कंपनीतल्या लहान पदावरच्या अधिकाऱ्याची आणि इला (निम्रत कौर) या पस्तिशीतल्या विवाहित स्त्रीची. इलाला एक सात-आठ वर्षांची मुलगी आहे आणि तिच्या नवऱ्याचं बाहेर 'अफेअर' सुरू आहे. अशा परस्थितीत गृहिणी असलेली इला भावनिकदृष्ट्या फारच एकाकी पडली आहे. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या देशपांडे काकूंशी किचनमधूनच मारलेल्या गप्पा हाच तिचा एकमेव विरंगुळा. (या देशपांडे बाई पडद्यावर कधीच दिसत नाहीत. फक्त त्यांचा आवाज ऐकू येतो. तरीही भारती आचरेकरांनी फक्त आवाजातून हे कॅरेक्टर उभं केलं आहे. हा प्रयोग भन्नाटच आहे.) तर या इलानं नवऱ्यासाठी पाठवलेला डबा चुकून फर्नांडिसकडे जातो. फर्नांडिसला डबा आवडतो व तो चाटून-पुसून तो डबा पुन्हा पाठवून देतो. रात्री नवरा आल्यावर इलाला कळतं, की नवऱ्याला आपण दिलेला डबा पोचलेलाच नाही. पण ती काही बोलत नाही. आपला डबा आवडीनं खाणाऱ्या अनोळखी व्यक्तीविषयी कुतूहल वाटून ती एक चिठ्ठी त्या डब्यात पाठवते. फर्नांडिसची बायको मरण पावलेली असते. पन्नाशीच्या पुढं वय असलेल्या आणि स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्या फर्नांडिसच्या एकाकी जगण्यात या डब्यामुळं आणि त्यातल्या चिठ्ठीमुळं एक नवंच 'थ्रिल' येतं. तोही चिठ्ठीला उत्तरं पाठवू लागतो. फर्नांडिसच्या जागेवर नंतर काम करण्यासाठी अस्लम शेख (नवाझुद्दीन सिद्दिकी) या तरुणाची नेमणूक झालेली असते. तो फर्नांडिसकडून प्रशिक्षण घेण्यासाठी त्याला वैताग येईल, अशा पद्धतीने त्याच्याशी संवाद साधत असतो. इकडे चिठ्ठ्यांचा सिलसिला सुरूच राहतो. इलाला देशपांडे काकू आणि फर्नांडिसला शेखशिवाय आपल्या भावना शेअर करण्यासाठी कोणी नसतं. त्यामुळं या चार पात्रांत कथा फुलत राहते. इलाला एकदा वाटतं, की आता आपण या व्यक्तीला भेटलं पाहिजे... मग ते एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरवतात. इला तिथं जाऊन त्याची वाट पाहत बसते. पण कुणीच येत नाही... का? नक्की काय होतं? पुढं त्या दोघांचं काय होतं? मुळात असा कुणी फर्नांडिस असतो का? इलाचं काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत, काही नवे अनुत्तरित प्रश्न बाकी ठेवून सिनेमा संपतो. 
 'लंचबॉक्स'ची हाताळणी निश्चितच वेगळी आहे. ती लोकप्रिय सिनेमाची पायवाट चोखाळणारी नाही. यात टिपिकल हिरो-हिरॉइन नाहीत, नाच-गाणी नाहीत, आयटेम गर्ल नाही... पूर्वीच्या काळात याला कदाचित 'आर्ट फिल्म' म्हटलं गेलं असतं. अत्यंत साधी कथा, सामान्य माणसांसारखी दिसणारी-वागणारी पात्रं, सामान्यांचंच जगणं चित्रित केल्यासारखी उलगडत जाणारी गोष्ट आणि सामान्यांच्याच मनातल्या प्रश्नांना उत्तरं देत होणारा शेवट अशी ही मांडणी आपण पूर्वीही बासू चटर्जी, हृषीकेश मुखर्जी, सई परांजपे, अमोल पालेकर यांच्या मध्यमवर्गी सिनेमात बघितली आहे. रितेशवर या स्कूलचा नक्कीच प्रभाव आहे. सुरुवातीच्या लोकलच्या दृश्यापासून ते जाणवतं. सिनेमाचा मूक नायक एक लंचबॉक्स असल्यानं मुंबईच्या डब्यावाल्यांचं दर्शन अपरिहार्यपणे यात घडतं. मुंबईचा पाऊस, लोकलमधील गर्दी, विमा कंपनीतलं टिपिकल वातावरण, लंचच्या वेळी कँटीनमध्ये उडणारी झुंबड, फर्नांडिसचं वांद्र्यातलं एकाकी घर, समोरच्या घरातली डिनरच्या वेळी खिडक्या लावून घेणारी मुलं, लंचच्या वेळी शेखचं फक्त फळं घेऊन येणं, इलाचं एकाकीपण, देशपांडे काकूंशी सुरू असलेला तिचा अखंड संवाद, त्या काकूंनी दोरी लावलेल्या टोपलीतून वस्तू खाली देणं, त्या टोपलीच्या हालचालीतून भावना व्यक्त करणं, इलाला नवऱ्याच्या कपड्यांच्या वासावरून (म्हणजे सेंटच्या) त्याचं अफेअर समजणं, डबेवाल्यांची धावपळ, लोकलमधील त्यांची ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात सुरू असलेली भजनं, लोकलमधील भिकारी मुलं असं सगळं नेपथ्य दाखवून रितेश आपल्या नायक-नायिकेचं एकाकीपण दाखवीत राहतो. विशेषतः 'गर्दीतला एकटा' ही फर्नांडिसची प्रतिमा फारच लखलखीतपणे समोर येते. इलाची मानसिक अवस्थाही दिग्दर्शक तिच्या कपड्यांमधून, तिच्या देहबोलीतून दाखवत राहतो. एकदा एक बाई व मुलगी एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करते, त्या वेळी हीच तर ती नसेल ना, असं वाटून फर्नांडिसला वाटणारी तडफड आणि इलाची नंतर याच घटनेवर चिठ्ठीतून व्यक्त होणारी प्रतिक्रिया, त्या वेळी सर्व दागिने काढून त्या बाईच्या जागी स्वतःला कल्पून इमारतीच्या गच्चीत जाणारी इला पाहून अंगावर काटा येतो. नंतरही एकदा एका दृश्यात इला झोपताना तिचे फक्त दागिने काढून टेबलावर ठेवते, तेव्हाही चरकायला होतं. या दोन्ही पात्रांच्या भावनिक जगात असलेली रिक्तता अशा प्रतिमांतून दिग्दर्शकानं अत्यंत तीव्रतेनं मांडली आहे. त्यामुळंच त्या चिठ्ठीतील संवादातून दोघांना मिळणारा भावनिक आधार आणि त्यातून नकळत त्या न पाहिलेल्या व्यक्तीत दोघांचंही गुंतत जाणं फार पटत जातं. इलाला फर्नांडिसनं प्रत्यक्ष पाहिलेलं नसलं, तरी तिनं तयार केलेल्या अन्नाला त्याचा रोज स्पर्श होत असतो. त्या अर्थानं दोन्ही पात्रांमध्ये आपोआप एक जैव संबंध निर्माण होतो. कुणाच्याशी मनात अन्य कुणाविषयी तरी अशी प्रेमाची, जिव्हाळ्याची, आपुलकीची भावना तयार होण्यासाठी असा काही तरी जैव धागा लागतो. इलाच्या हातच्या सुंदर जेवणातून फर्नांडिसच्या जिव्हातृप्तीपर्यंत हा धागा जोडला जातो. हा अनुभव आपण सर्वांनीच कधी ना कधी घेतलेला असतो. त्यामुळं फर्नांडिस आणि इलामधलं अनोखं नातं प्रेक्षक म्हणून आपण सहज समजून घेऊ शकतो. पस्तिशी आणि त्यापुढल्या टप्प्यावर विवाहित असो वा अविवाहित; कुणाही व्यक्तीच्या भावनिक गरजा बदलतात. वाढत्या वयाबरोबर आपल्यावर मनःपूत प्रेम करणारं कुणी तरी असावं, ही भावना वाढू लागते. दर वेळी या भावनेला लैंगिक सुखाचा संदर्भ असतोच असं नाही. किंबहुना नसतोच. पण तरीही विरुद्ध लिंगी व्यक्ती आपल्यावर असं प्रेम करू लागली, तर या भावनेला प्रबळ खतपाणी मिळतं, हे नक्की. या वयातल्या अशा 'शेअरिंग'ला नक्की काय म्हणायचं, हा मोठा प्रश्न आहे. प्रेम हा शब्द तसा खूप व्यापक आहे. तो बऱ्याचदा आपण फार संकुचित अर्थानं वापरतो. मैत्री हीदेखील खूप वेगळी संकल्पना आहे. मला वाटतं, मैत्रीच्या पुढचं आणि शारीर प्रेमाच्या अलीकडचं असं कुठलं तरी हे नातं आहे. ते नक्कीच आभासी आहे; पण खूप गोड आहे. कुणाला हे नातं गवसलं, तर या नात्याच्या अमर्याद शक्यता लक्षात येतात आणि त्याच वेळी आपल्या प्रचंड मर्यादाही! अशा वेळी जीवाची जी काही तडफड होते, ती ज्याला हे नातं गवसलंय त्यालाच कळू शकेल. 'लंचबॉक्स' नक्कीच या नात्यापर्यंत पोचतो आणि सुरुवातीला म्हटलं, तसं सिनेमाचा क्लायमॅक्स या नात्याच्या भविष्यावर नेमकं भाष्य करतो आणि तूर्त तरी तेच योग्य आहे, असं वाटतं. (भविष्यात कदाचित अशा नात्याचे काही नवे पैलू लक्षात येतील आणि एक वेगळा सिनेमा त्यातून आकार घेईल...) असो.


इरफान खान या अभिनेत्याविषयी काय बोलावं? अत्यंत ताकदीच्या अशा या अभिनेत्यानं साजन फर्नांडिस फार समजून-उमजून उभा केला आहे. त्याचं सुरुवातीचं कोरडं वागणं, इलाचा डबा मिळाल्यानंतर त्याच्या वागण्यात होणारा बदल, त्याचा इलाला दिला जाणारा प्रतिसाद, क्लायमॅक्सच्या वेळचं त्याचं अत्यंत प्रगल्भ वागणं हे सगळं इरफाननं जबरदस्त साकारलं आहे. तीच गोष्ट निम्रत कौरची. या अभिनेत्रीचा हा पहिलाच सिनेमा आहे, हे पटत नाही, एवढी तिनं यातली इला सुंदर साकारली आहे. पतीच्या अफेअरविषयी तिचं गप्प राहणं फारसं पटत नाही; पण ते ठीक आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीनं नेहमीच्या शैलीत शेख उभा केला आहे. त्याच्या अस्तित्वामुळं प्रत्येक प्रसंगात जान येते.
तेव्हा वेगळं काही पाहायची आवड आणि तशी अभिरुची असल्यास लंचबॉक्सला नक्की जा... अन्यांसाठी ग्रँड मस्ती सुरू आहेच!
---
निर्मिती - यूटीव्ही, दार मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - रितेश बत्रा
प्रमुख भूमिका - इरफान खान, निम्रत कौर, नवाझुद्दीन सिद्दिकी, भारती आचरेकर (आवाज)
दर्जा - ****
---

2 Sept 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - सत्याग्रह

‘पोलिटिकली इनकरेक्ट’ 

आपल्या देशात सध्याच्या काळात राजकीय कारकीर्द म्हणजे पाच वर्षांत आपली गुंतवणूक दामदुपटीने, नव्हे दसपटीने वसूल करण्याची संधी मानली जाते. अशी संधी साधणे, त्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सर्व मार्गांचा वापर करणे म्हणजे पोलिटिकली करेक्ट गोष्ट मानली जाते. लोककल्याणकारी राज्य, जनता मालक व सरकार तिचे चाकर, राष्ट्रीय चारित्र्य, परंपरेने आलेल्या मूल्यांची जपणूक, सत्य, अहिंसा, बंधुभाव या सर्व गोष्टी म्हणजे त्रासदायक - ‘पोलिटिकली इनकरेक्ट’... पण जेव्हा सर्वच गोष्टी ‘इनकरेक्ट’ घडत जातात, तेव्हा काट्याने काटा काढण्यासारखं पोलिटिकली इनकरेक्टच वागावं लागतं. सत्याचा आग्रह आणि कुठल्याही तडजोडीविना मानवी मूल्यांशी बांधिलकी या गोष्टी पोलिटिकली इनकरेक्ट असतील, तर त्याच गोष्टी करून आपला देश वाचवता येईल, असा प्रभावी संदेश प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’ हा नवा हिंदी चित्रपट आपल्याला देतो.
अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या लोकपाल विधेयकासाठीच्या आंदोलनाला देशभर मिळालेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळं एकविसाव्या शतकात प्रथमच आपल्या देशात जनआंदोलनांचं वारं पुन्हा सुरू झालं. यातून काही तरी सकारात्मक घडेल, अशी आशा लागून राहिलेली असतानाच, हे आंदोलन काही चुकांमुळं थंडावलं. आपला सिनेमा अण्णांच्या आंदोलनावर बेतलेला नाही, असं झा यांनी स्पष्ट केलं असलं, तरी या आंदोलनाची प्रेरणा सिनेमात स्पष्टपणे जाणवत राहते. एवढंच नाही, तर केवळ अशा आंदोलनाची चित्रकथा मांडण्यापेक्षा अशी आंदोलनं का फसतात, याचं एक उत्तर शोधण्याचाही प्रयत्न झा यांनी या सिनेमात यशस्वीपणे केला आहे आणि तीच गोष्ट या सिनेमाला उंचीवर घेऊन जाते. 


प्रकाश झा यांचा हा सिनेमा आपल्यावर ठसतो याचं कारण म्हणजे अतिशय बंदिस्त पटकथा, अवांतर फाफटपसाऱ्याला दिलेली रजा आणि आपल्याला काय सांगायचंय याचं दिग्दर्शकाला असलेलं भान. याच्या जोडीला परफेक्ट कास्टिंग आणि मांडणीतील नाट्यमयता या बाबींमुळं ‘सत्याग्रह’ एक जमून आलेली चित्रकथा ठरते. गेल्या काही वर्षांपासून प्रकाश झा राजकीय चित्रपटांची त्यांच्या खास शैलीतून हाताळणी करीत आहेत. स्वतःचे वैयक्तिक विचार बाजूला ठेवून तटस्थपणे, एखाद्या रिपोर्ताजसारखी कुठल्याही राजकीय विषयाची आणि त्यातल्या गुंतागुंतीची सफाईनं मांडणी करणं त्यांना जमतं. सध्या देशातील तरुणाईसमोर असलेला आयडेंटिटी क्रायसिस, राजकीय व्यवस्थेला व्यवस्थेत राहून सुधारायचं की व्यवस्थाच बदलायची हा ‘टू बी ऑर नॉट टू बी’सारखा चाललेला अविरत संघर्ष, बदलत्या अर्थव्यवस्थेबरोबर आलेली नवी मूल्यव्यवस्था, आधीच्या मूल्यांची फेरमांडणी करायची, ती संपूर्ण टाकून द्यायची की त्यालाच चिकटून राहायचं, प्रगतीसाठी मूल्यांशी तडजोड करायची की नाही, कितपत तडजोड म्हणजे नेमकी तडजोड आणि समाजाच्या वाढत्या आकांक्षा आणि त्याची प्रगतीची वाढती भूक याला समर्थपणे पेलणारं राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण आपण त्याला उपलब्ध करून देणार आहोत की नाही, आणि त्यासाठी नक्की कुणाला आणि किती किंमत मोजावी लागणार आहे या सर्व मूलभूत मुद्द्यांचा वेध प्रकाश झा यांनी ‘सत्याग्रह’मध्ये घेतलाय. अजिबात आक्रस्ताळी भूमिका न घेता, ‘पोलिटिकली इनकरेक्ट’ राहून त्यांनी हा पेच आपल्यासमोर टाकलाय. त्यातून आपल्याला येत असलेली अस्वस्थता ही त्यांना मिळालेली दाद!
अमिताभ बच्चन यांनी साकारलेला तत्त्वनिष्ठ माजी मुख्याध्यापक द्वारका आनंद, त्यांच्या मुलाचा मित्र आणि सर्व भल्या-बुऱ्या मार्गांचा वापर करून मोठा उद्योगपती झालेला अजय देवगणचा मानव राघवेंद्र, द्वारका आनंद यांनी पंधरा वर्षांपूर्वी गुंडगिरी करतो म्हणून शाळेतून काढून टाकलेला आणि आता अंबिकापूरचा मोठा नेता झालेला अर्जुन रामपालचा अर्जुनसिंह, दिल्लीतील बड्या न्यूज चॅनेलची स्टार रिपोर्टर असलेली करिना कपूरची यास्मिन अहमद, मनोज वाजपेयीचा पुंड गृहमंत्री बलबीरसिंह या सर्व झा यांच्या व्यक्तिरेखा विविध गटांच्या प्रतिनिधी आहेत. या सर्व गटांचे एकमेकांशी आणि त्यांत पुन्हा गटांतर्गत वैयक्तिक असे सारे संघर्ष झा यांनी अनेकविध प्रसंगांतून साकारले आहेत. या देशातील राजकीय वास्तवाचं आणि सामाजिक स्थितीचं पुरेपूर भान असल्यामुळं या व्यक्तिरेखा कुठंही बेगडी किंवा कृत्रिम वाटत नाहीत. संघर्षाचं वर्णन करण्यापेक्षा या संघर्षाची कारणं आणि त्यामागची मूल्यं यांचं कालपरत्वे सुरू झालेलं द्वंद्व रंगविण्यात झा यांना अधिक रस आहे. त्यामुळंच द्वारका आनंद जेव्हा कलेक्टरच्या श्रीमुखात भडकावतात, तेव्हा त्या व्यक्तिरेखेचा संताप आपल्याही गालाला जाणवतो. याशिवाय झा यांचं कसब असं, की हा सर्व संघर्ष रंगविताना ते त्यातल्या व्यक्तिरेखांचाही प्रवास नीट उलगडतात. त्यांच्या वैयक्तिक विश्वात डोकावतात, त्यांचं हसणं-रडणं, संतापणं, कोसळून पडणं, पुन्हा उभं राहणं हे तपशिलानं दाखवतात. त्यामुळं त्या व्यक्तीची मूल्यं किंवा अगदी त्यांचं आवेशानं बोलणं आपल्याला भिडल्याशिवाय राहत नाही.
अमिताभ बच्चन या महानायकाविषयी काय बोलावं? त्यांनी साकारलेला द्वारका आनंद म्हणजे कॅरेक्टरमध्ये घुसणं म्हणजे काय, याचा आदर्श वस्तुपाठ आहे. सत्तरीतल्या या थोर अभिनेत्याविषयी कितीही बोललं तरी ते अपुरंच पडेल. अमिताभच्या कारकिर्दीतील द्वारका आनंद ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा ठरावी. अजय देवगणचंही खूप कौतुक. हा अभिनेता खरंच ग्रेट आहे. त्यामानानं त्याचं फार कमी कौतुक झालं. मात्र, यातली मानवची त्यानं साकारलेली भूमिका आणि त्याचे अगदी बारीक कंगोरे त्यानं ज्या पद्धतीनं उलगडून दाखवले आहेत, ते खरोखर मस्त. मनोज वाजपेयीचा बलबीरसिंहही भाव खाऊन जातो. या नटाचा अगदी दोन सेकंदाचा ‘स्क्रीन प्रेझेन्स’देखील भलताच प्रभावी असतो. अर्जुन रामपालला त्यामानाने फार काही ग्रेट करायला मिळालेलं नाही. उलट अमृता रावची साधीसुधी सुमित्रा लक्षात राहते. करिना कपूरनं यास्मिनची ग्लॅमरस भूमिका तिच्या नेहमीच्या टेचात केली आहे. आपली मिताली जगताप-वराडकर एक-दोन दृश्यांतच आहे; पण बच्चनसमोर ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री ठसक्यात उभी राहिली आहे. मनोज कोल्हटकरच्या वाट्याला आलेली छोटी भूमिका त्याने व्यवस्थित केली आहे.
सलीम-सुलेमान यांचं संगीतही छान. ‘रसके भरे तोरे नैना’ (शफकत अमानत अली- अर्पिता चक्रवर्ती) हे एक अजय-करिनावर चित्रित झालेलं शास्त्रीय गाणं मस्त आहे.
तेव्हा नक्कीच या सत्याग्रहात सामील व्हा आणि एक वेगळा सिनेमा पाहिल्याचं समाधान मिळवा.
---
निर्मिती : यूटीव्ही आणि प्रकाश झा प्रॉडक्शन्स
दिग्दर्शक : प्रकाश झा
लेखक : अंजुम राजबाली, प्रकाश झा, ऋत्विक ओझा
सिनेमॅटोग्राफी : सचिन कृष्णन
संगीत : सलीम-सुलेमान
कालावधी : दोन तास ३२ मिनिटे (यूए)
प्रमुख भूमिका : अमिताभ बच्चन, अजय देवगण, मनोज वाजपेयी, अर्जुन रामपाल, करिना कपूर, अमृता राव, इंद्रनील चॅटर्जी, विनय आपटे, मिताली जगताप-वराडकर, मनोज कोल्हटकर आदी.
दर्जा : ***१/२
--- 
(पूर्वप्रसिद्धी - ३१ ऑगस्ट १३, महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्ती)
---

फर्स्ट डे फर्स्ट शो - मद्रास कॅफे


वेदनादायी भूतकाळाचा अस्वस्थ अनुभव
मद्रास कॅफेहा सुजित सरकार दिग्दर्शित नवा हिंदी सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर एकच प्रश्न मनात येतो - विक्रमसिंहला फक्त काही सेकंद आधी घटनास्थळी पोचता आलं असतं तर?.... तर... तर या देशाचा इतिहास आणि आजचं वर्तमान कदाचित पूर्ण वेगळं झालं असतं! प्रेक्षकाच्या मनात अशी तीव्र भावना निर्माण करण्यात मिळवलेलं यश या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातं.
यातली तीघटना अर्थातच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येची. तमिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर इथं २१ मे १९९१ रोजी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी मानवी बॉम्बच्या साह्यानं राजीव गांधींना मारण्यात आलं. श्रीलंकेतील एलटीटीई या तमिळ दहशतवादी संघटनेवर संशयाची सुई रोखली गेली. नंतर या घटनेत एलटीटीईचा म्होरक्या वेलुपिल्लई प्रभाकरनचा हात स्पष्टच झाला. या सर्व घटनाक्रमाची सुरुवात भारतानं श्रीलंकेत पाठविलेल्या शांतिसेनेपासून झाली. राजीव गांधींचा हा राजकीय निर्णय आणि त्याचे त्यांना आणि देशाला भोगावे लागलेले भयानक परिणाम सर्वांनीच पाहिले आहेत. मात्र, हा सर्व अस्वस्थ कालखंड हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आला नव्हता. विकी डोनरहा आगळावेगळा सिनेमा देणाऱ्या सुजित सरकारनं मद्रास कॅफेमधून प्रथमच हा विषय मांडण्याचं धाडस केलं आहे. विषयाची प्रामाणिक हाताळणी, बंदिस्त पटकथा आणि प्रमुख कलाकारांचा दमदार अभिनय यामुळं मद्रास कॅफेहा एक अस्वस्थ करणारा, पण नक्की पाहावा असा सिनेमा ठरतो.
अर्थात हा सर्व वादाचा विषय असल्यामुळं दिग्दर्शकानं हे काल्पनिक कथानक आहे, असं सुरुवातीलाच जाहीर करून सर्व वादांतून स्वतःची सुटका करून घेतली आहे. शिवाय राजीव गांधी, प्रभाकरन यांचे थेट उल्लेखही नाहीत. पण त्यामुळं फारसं काही बिघडत नाही. समोर पडद्यावर चाललेल्या नाट्याचा निखळ आनंद घेण्यापासून हे अडथळे आपल्याला वंचित करू शकत नाहीत.
गुप्तचर संघटना, गुप्तहेर आणि त्यांचे देश-परदेशांत चालणारे कारनामे यांचं एक वेगळंच विश्व आहे. आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे आणि आणि आपले वर्षानुवर्षांचे प्रेमाचे संबंध पाहता, या देशांनी आपल्याकडे आणि आपण त्यांच्याकडे पाठविलेले गुप्तहेर आणि त्यांच्या माध्यमातून घडविले जाणारे घातपात, कटकारस्थानं, देवाणघेवाण, राजकीय निर्णयांचा अंमल, फंदफितुरी हे सर्व कुठल्याही सिनेमासाठी एक आकर्षकपॅकेजआहे. सुजितनं या सर्व आकर्षक वेष्टनाचा यथायोग्य वापर करून त्याच्या गोष्टीतलं नाट्य खुलवलं आहे. शिवाय काल्पनिक कथा असं वर्णन केलं असलं, तरी आपण भारतीय उपखंडाच्या इतिहासातल्या एका अत्यंत भयानक, क्रूर आणि उद्वेगजनक अशा वांशिक संघर्षाविषयी टिप्पणी करीत आहोत, याचं भान सुजितनं कुठंही सोडलेलं नाही. त्यामुळंच एखाद्या लाइव्ह रिपोर्ताजसारखी मांडणी करून त्यानं ही गोष्ट सांगितली आहे. नव्वदच्या दशकात श्रीलंकेत उसळलेला सिंहली-तमिळी संघर्ष, त्यात हस्तक्षेप करण्याचा भारताचा निर्णय, शांतिसेना पाठविण्याचा निर्णय, या शांतिसेनेचा एलटीफ (सिनेमातलं एलटीटीईचं नाव) या अण्णा भास्करनच्या (म्हणजे प्रभाकरन) संघटनेशी झालेला घनघोर संघर्ष, त्यात मारले गेलेले भारतीय जवान आणि या राजकीय निर्णयाची दोन्ही देशांतील सर्वसामान्य लोकांना मोजावी लागलेली जबर किंमत... या सर्व पार्श्वभूमीवर या सर्व घटनाक्रमात थेट सहभागी झालेला आणि माजी पंतप्रधानांची हत्या रोखण्यापासून केवळ काही सेकंद अंतर दूर राहिलेला आपला नायक विक्रमसिंह याचा प्रवास म्हणजे सुजितचा मद्रास कॅफे.
कुठल्याही सिनेमाच्या यशस्वितेमध्ये महत्त्वाचा वाटा असतो तो पटकथेचा. इथं सोमनाथ डे आणि शुभेंदू भट्टाचार्य या जोडीनं लिहिलेली पटकथा निम्मी बाजी मारते. दोन देशांतला व्यापक राजकीय संघर्ष, आपली गुप्तचर संघटना व परदेशातील दहशतवादी संघटना यांच्यात रंगणारे डाव-प्रतिडाव आणि या सर्वांत एक महत्त्वाचा मोहरा असलेला रॉने पाठविलेला गुप्तचर लष्करी अधिकारी विक्रमसिंह व त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर या सर्व घटना-घडामोडींचा होणारा परिणाम अशा तीन स्तरांवर त्यांनी ही पटकथा गुंफली आहे. सिनेमात वांशिक संघर्ष असला, तरी दिग्दर्शकानं तो फार रक्तरंजित किंवा क्रूरपणे न दाखवता केवळ काही छायाचित्रांतूनच त्यांची भीषणता स्पष्ट केली आहे. विक्रमसिंह आणि त्याचा वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर चाललेला संघर्ष याचा सखोल वेध घेण्यावर दिग्दर्शकानं सर्व फोकस ठेवला आहे.
शांतिसेना तैनात केल्यानंतर श्रीलंकेतील स्थानिक निवडणुका घेण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन पंतप्रधान श्रीलंकेला देतात. एलटीएफमध्ये फूट पाडून यशस्वीपणे निवडणुका घेण्याच्या कामी विक्रमसिंहची (जॉन अब्राहम) नियुक्ती होते. श्रीलंकेत शिरताना त्याची ओळख जया (नर्गिस फाकरी) या पत्रकार तरुणीशी होते. (हे पात्र प्रभाकरनची पहिल्यांदा मुलाखत घेणाऱ्या पत्रकार अनिता प्रताप यांच्यावर बेतलेलं आहे, असं म्हणतात!) तेथून पुढे चेन्नईतील एका बॉसच्या सहकार्यानं विक्रमचं मिशन सुरू होतं. मात्र, पुढं त्याला अनेक धक्कादायक सत्यांचा सामना करावा लागतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही आघात होतात. एका संघर्षात अण्णा भास्करन (अजय रत्नम) मरण पावल्याचं जाहीर होतं आणि जखमी विक्रमच्या दृष्टीनं मिशन संपतं. पण अण्णा भास्करन जिवंत असल्याचं लवकरच समजतं. आता त्यानं त्याचे उरलेसुरले अंतर्गत विरोधकही संपविलेले असतात. त्याचं लक्ष्य एकच असतं - भारताचे माजी पंतप्रधान. पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची खबर विक्रमला जयाकडून समजते. आपल्याच संघटनेतील काही वरिष्ठांची फितुरीही त्याच्या लक्षात येते. आता त्याला दुहेरी धोक्यातून वाट काढीत माजी पंतप्रधानांना वाचवायचं असतं. दिल्लीतील त्याचे टॉप बॉस रॉबिन दत्त (सिद्धार्थ बसू) त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. तेही माजी पंतप्रधानांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र, शेवटी दैवाचे फासे असे काही पडतात, की विक्रमला यट निअर... यट सो फारअसं म्हणायची वेळ येते. मानसिकदृष्ट्या खचलेल्या अवस्थेत तो कसौलीला निघून जातो. तेथे एका चर्चमध्ये फादरना ही सर्व हकीगत सांगतो आणि फ्लॅशबॅक तंत्रानं गोष्ट आपल्यापुढं उलगडत जाते.
सुजित सरकारनं पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत या सिनेमातील प्रतिपाद्य विषयाचं एक गांभीर्य कायम ठेवलं आहे. त्यामुळंच हा आपल्या वेदनादायी भूतकाळाचा एक अस्वस्थ करणारा अनुभव ठरतो. सुजितला सर्वच कलाकारांनी मनापासून साथ दिली आहे. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो जॉन अब्राहमचा. त्यानं मोठ्या मेहनतीनं यातला विक्रम साकारला आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका ठरावी. नर्गिस फाकरी, जॉनच्या पत्नीचं काम करणारी राशी खन्ना आणि सिद्धार्थ बसू यांनीही आपापली कामं जीव ओतून केली आहेत. बालाचं काम करणारा प्रकाश बेलवडी आणि अण्णा भास्करनचं काम करणारा अजय रत्नम हे दक्षिणेतले नटही लक्षात राहतात. राजीव गांधींची हत्या करणारी धनू, शिवरासन आदी मंडळीही जशीच्या तशीसाकारण्यात वेषभूषाकारांनी यश मिळवलं आहे. सिनेमाचं संगीत व पार्श्वसंगीत शंतनू मोईत्रा यांचं आहे. त्या आघाडीवरही सिनेमानं जबरदस्त कामगिरी केली आहे.
थोडक्यात, अजिबात वेळ न दवडता जाऊन पाहावी अशी ही कलाकृती आहे.
--- 

निर्मिती : व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स, जेए एंटरटेन्मेंट
दिग्दर्शक : सुजित सरकार
पटकथा : सोमनाथ डे, शुभेंदू भट्टाचार्य
संगीत : शंतनू मोईत्रा
कालावधी : दोन तास दहा मिनिटे (यू/ए)
प्रमुख भूमिका : जॉन अब्राहम, नर्गिस फाकरी, सिद्धार्थ बसू, राशी खन्ना, प्रकाश बेलवडी, अजय रत्नम
दर्जा : ****
---
(पूर्वप्रसिद्धी - २४ ऑगस्ट १३, महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्ती)