‘पोलिटिकली इनकरेक्ट’
आपल्या देशात सध्याच्या काळात राजकीय कारकीर्द
म्हणजे पाच वर्षांत आपली गुंतवणूक दामदुपटीने, नव्हे दसपटीने वसूल करण्याची
संधी मानली जाते. अशी संधी साधणे, त्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सर्व
मार्गांचा वापर करणे म्हणजे पोलिटिकली करेक्ट गोष्ट मानली जाते.
लोककल्याणकारी राज्य, जनता मालक व सरकार तिचे चाकर, राष्ट्रीय चारित्र्य,
परंपरेने आलेल्या मूल्यांची जपणूक, सत्य, अहिंसा, बंधुभाव या सर्व गोष्टी
म्हणजे त्रासदायक - ‘पोलिटिकली इनकरेक्ट’... पण जेव्हा सर्वच गोष्टी
‘इनकरेक्ट’ घडत जातात, तेव्हा काट्याने काटा काढण्यासारखं पोलिटिकली
इनकरेक्टच वागावं लागतं. सत्याचा आग्रह आणि कुठल्याही तडजोडीविना मानवी
मूल्यांशी बांधिलकी या गोष्टी पोलिटिकली इनकरेक्ट असतील, तर त्याच गोष्टी
करून आपला देश वाचवता येईल, असा प्रभावी संदेश प्रकाश झा दिग्दर्शित
‘सत्याग्रह’ हा नवा हिंदी चित्रपट आपल्याला देतो.
अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या लोकपाल
विधेयकासाठीच्या आंदोलनाला देशभर मिळालेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळं
एकविसाव्या शतकात प्रथमच आपल्या देशात जनआंदोलनांचं वारं पुन्हा सुरू झालं.
यातून काही तरी सकारात्मक घडेल, अशी आशा लागून राहिलेली असतानाच, हे
आंदोलन काही चुकांमुळं थंडावलं. आपला सिनेमा अण्णांच्या आंदोलनावर बेतलेला
नाही, असं झा यांनी स्पष्ट केलं असलं, तरी या आंदोलनाची प्रेरणा सिनेमात
स्पष्टपणे जाणवत राहते. एवढंच नाही, तर केवळ अशा आंदोलनाची चित्रकथा
मांडण्यापेक्षा अशी आंदोलनं का फसतात, याचं एक उत्तर शोधण्याचाही प्रयत्न
झा यांनी या सिनेमात यशस्वीपणे केला आहे आणि तीच गोष्ट या सिनेमाला उंचीवर
घेऊन जाते.
प्रकाश झा यांचा हा सिनेमा आपल्यावर ठसतो याचं
कारण म्हणजे अतिशय बंदिस्त पटकथा, अवांतर फाफटपसाऱ्याला दिलेली रजा आणि
आपल्याला काय सांगायचंय याचं दिग्दर्शकाला असलेलं भान. याच्या जोडीला
परफेक्ट कास्टिंग आणि मांडणीतील नाट्यमयता या बाबींमुळं ‘सत्याग्रह’ एक
जमून आलेली चित्रकथा ठरते. गेल्या काही वर्षांपासून प्रकाश झा राजकीय
चित्रपटांची त्यांच्या खास शैलीतून हाताळणी करीत आहेत. स्वतःचे वैयक्तिक
विचार बाजूला ठेवून तटस्थपणे, एखाद्या रिपोर्ताजसारखी कुठल्याही राजकीय
विषयाची आणि त्यातल्या गुंतागुंतीची सफाईनं मांडणी करणं त्यांना जमतं.
सध्या देशातील तरुणाईसमोर असलेला आयडेंटिटी क्रायसिस, राजकीय व्यवस्थेला
व्यवस्थेत राहून सुधारायचं की व्यवस्थाच बदलायची हा ‘टू बी ऑर नॉट टू
बी’सारखा चाललेला अविरत संघर्ष, बदलत्या अर्थव्यवस्थेबरोबर आलेली नवी
मूल्यव्यवस्था, आधीच्या मूल्यांची फेरमांडणी करायची, ती संपूर्ण टाकून
द्यायची की त्यालाच चिकटून राहायचं, प्रगतीसाठी मूल्यांशी तडजोड करायची की
नाही, कितपत तडजोड म्हणजे नेमकी तडजोड आणि समाजाच्या वाढत्या आकांक्षा आणि
त्याची प्रगतीची वाढती भूक याला समर्थपणे पेलणारं
राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण आपण त्याला उपलब्ध करून देणार आहोत की
नाही, आणि त्यासाठी नक्की कुणाला आणि किती किंमत मोजावी लागणार आहे या सर्व
मूलभूत मुद्द्यांचा वेध प्रकाश झा यांनी ‘सत्याग्रह’मध्ये घेतलाय. अजिबात
आक्रस्ताळी भूमिका न घेता, ‘पोलिटिकली इनकरेक्ट’ राहून त्यांनी हा पेच
आपल्यासमोर टाकलाय. त्यातून आपल्याला येत असलेली अस्वस्थता ही त्यांना
मिळालेली दाद!
अमिताभ बच्चन यांनी साकारलेला तत्त्वनिष्ठ माजी
मुख्याध्यापक द्वारका आनंद, त्यांच्या मुलाचा मित्र आणि सर्व भल्या-बुऱ्या
मार्गांचा वापर करून मोठा उद्योगपती झालेला अजय देवगणचा मानव राघवेंद्र,
द्वारका आनंद यांनी पंधरा वर्षांपूर्वी गुंडगिरी करतो म्हणून शाळेतून काढून
टाकलेला आणि आता अंबिकापूरचा मोठा नेता झालेला अर्जुन रामपालचा
अर्जुनसिंह, दिल्लीतील बड्या न्यूज चॅनेलची स्टार रिपोर्टर असलेली करिना
कपूरची यास्मिन अहमद, मनोज वाजपेयीचा पुंड गृहमंत्री बलबीरसिंह या सर्व झा
यांच्या व्यक्तिरेखा विविध गटांच्या प्रतिनिधी आहेत. या सर्व गटांचे
एकमेकांशी आणि त्यांत पुन्हा गटांतर्गत वैयक्तिक असे सारे संघर्ष झा यांनी
अनेकविध प्रसंगांतून साकारले आहेत. या देशातील राजकीय वास्तवाचं आणि
सामाजिक स्थितीचं पुरेपूर भान असल्यामुळं या व्यक्तिरेखा कुठंही बेगडी
किंवा कृत्रिम वाटत नाहीत. संघर्षाचं वर्णन करण्यापेक्षा या संघर्षाची
कारणं आणि त्यामागची मूल्यं यांचं कालपरत्वे सुरू झालेलं द्वंद्व
रंगविण्यात झा यांना अधिक रस आहे. त्यामुळंच द्वारका आनंद जेव्हा
कलेक्टरच्या श्रीमुखात भडकावतात, तेव्हा त्या व्यक्तिरेखेचा संताप आपल्याही
गालाला जाणवतो. याशिवाय झा यांचं कसब असं, की हा सर्व संघर्ष रंगविताना ते
त्यातल्या व्यक्तिरेखांचाही प्रवास नीट उलगडतात. त्यांच्या वैयक्तिक
विश्वात डोकावतात, त्यांचं हसणं-रडणं, संतापणं, कोसळून पडणं, पुन्हा उभं
राहणं हे तपशिलानं दाखवतात. त्यामुळं त्या व्यक्तीची मूल्यं किंवा अगदी
त्यांचं आवेशानं बोलणं आपल्याला भिडल्याशिवाय राहत नाही.
अमिताभ बच्चन या महानायकाविषयी काय बोलावं?
त्यांनी साकारलेला द्वारका आनंद म्हणजे कॅरेक्टरमध्ये घुसणं म्हणजे काय,
याचा आदर्श वस्तुपाठ आहे. सत्तरीतल्या या थोर अभिनेत्याविषयी कितीही बोललं
तरी ते अपुरंच पडेल. अमिताभच्या कारकिर्दीतील द्वारका आनंद ही एक
महत्त्वाची व्यक्तिरेखा ठरावी. अजय देवगणचंही खूप कौतुक. हा अभिनेता खरंच
ग्रेट आहे. त्यामानानं त्याचं फार कमी कौतुक झालं. मात्र, यातली मानवची
त्यानं साकारलेली भूमिका आणि त्याचे अगदी बारीक कंगोरे त्यानं ज्या
पद्धतीनं उलगडून दाखवले आहेत, ते खरोखर मस्त. मनोज वाजपेयीचा बलबीरसिंहही
भाव खाऊन जातो. या नटाचा अगदी दोन सेकंदाचा ‘स्क्रीन प्रेझेन्स’देखील भलताच
प्रभावी असतो. अर्जुन रामपालला त्यामानाने फार काही ग्रेट करायला मिळालेलं
नाही. उलट अमृता रावची साधीसुधी सुमित्रा लक्षात राहते. करिना कपूरनं
यास्मिनची ग्लॅमरस भूमिका तिच्या नेहमीच्या टेचात केली आहे. आपली मिताली
जगताप-वराडकर एक-दोन दृश्यांतच आहे; पण बच्चनसमोर ही राष्ट्रीय पुरस्कार
विजेती अभिनेत्री ठसक्यात उभी राहिली आहे. मनोज कोल्हटकरच्या वाट्याला
आलेली छोटी भूमिका त्याने व्यवस्थित केली आहे.
सलीम-सुलेमान यांचं संगीतही छान. ‘रसके भरे
तोरे नैना’ (शफकत अमानत अली- अर्पिता चक्रवर्ती) हे एक अजय-करिनावर चित्रित
झालेलं शास्त्रीय गाणं मस्त आहे.
तेव्हा नक्कीच या सत्याग्रहात सामील व्हा आणि एक वेगळा सिनेमा पाहिल्याचं समाधान मिळवा.
---
निर्मिती : यूटीव्ही आणि प्रकाश झा प्रॉडक्शन्स
दिग्दर्शक : प्रकाश झा
लेखक : अंजुम राजबाली, प्रकाश झा, ऋत्विक ओझा
सिनेमॅटोग्राफी : सचिन कृष्णन
संगीत : सलीम-सुलेमान
कालावधी : दोन तास ३२ मिनिटे (यूए)
प्रमुख भूमिका : अमिताभ बच्चन, अजय देवगण, मनोज
वाजपेयी, अर्जुन रामपाल, करिना कपूर, अमृता राव, इंद्रनील चॅटर्जी, विनय
आपटे, मिताली जगताप-वराडकर, मनोज कोल्हटकर आदी.
दर्जा : ***१/२
---
(पूर्वप्रसिद्धी - ३१ ऑगस्ट १३, महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्ती)
---
Vicharanchi mandani farach apratim..
ReplyDeleteThanx a lot...
DeleteThanx a lot...
Delete