30 Nov 2017

अक्षयकुमार - साहित्य शिवार लेख

खिलाडी नं. १
-------------
अक्षयकुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक देखणा, कर्तबगार असा दिग्गज अभिनेता. नुकतीच त्याच्या कारकिर्दीला रौप्यमहोत्सवी २५ वर्षं पूर्ण झाली. एवढा काळ टिकून राहणं आणि त्यातही अव्वल स्थानावर राहणं हे यश सहज सगळ्यांना जमतंच असं नाही. पण 'अक्की'ला ते सहज जमून गेलंय. गेल्या महिन्यातच, म्हणजे ९ सप्टेंबरला त्याला वयाची ५० वर्षं पूर्ण झाली. त्याच्याकडं बघून अर्थातच हे खरं वाटत नाही. उंचापुरा, पंजाबी, रांगड्या देहयष्टीचा हा अभिनेता अजून किती तरी वर्षं नायकाच्या भूमिकेत फिट्ट बसेल, असंच वाटतं. नायकाच्या म्हणजे अगदी टिपिकल नायकाच्या नव्हे. तसा टिपिकल नायक अक्षयकुमारनं त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला रंगवला. मात्र, अलीकडच्या दहा-बारा वर्षांत त्याच्या भूमिकांमध्ये वैविध्य दिसू लागलं आहे. आपल्या वयानुरूप वेगवेगळ्या छटांच्या भूमिका तो करू लागलाय. त्यामुळंच तो इथं दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यताही वाढली आहे. अक्षयनं गेल्या २५ वर्षांत शंभरहून अधिक सिनेमांत काम केलंय आणि त्यातले बरेचसे शंभर कोटी रुपयांहून अधिक गल्ला गोळा करणारे आहेत. अलीकडंच 'रुस्तुम' या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय दोन फिल्मफेअर पुरस्कारही त्यानं मिळवले आहेत. एका पाहणीनुसार, अक्षयकुमार हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. चार वर्षांपूर्वी, म्हणजे २०१३ मध्ये झालेल्या एका पाहणीनुसार, अक्षयकुमारच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मिळविलेली रक्कम दोन हजार कोटींहून अधिक होती. तेव्हा अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय अभिनेता होता. यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पाहणीनुसार, त्याच्या चित्रपटांनी मिळविलेली रक्कम तीन हजार कोटींच्या वर गेली होती. अर्थातच तो आजच्या घडीचा हिंदीतील एक मोठा स्टार आहे, यात शंका नाही.
हिंदी सिनेमाचा हिरो म्हटलं, की लोकांच्या मनात वर्षानुवर्षं जपलेल्या काही प्रतिमा असतात. अफाट श्रीमंती, प्रासादतुल्य निवासस्थान, महागड्या गाड्यांचा ताफा, सहकलाकार नट्यांसोबतची अफेअर्स, क्वचित अंमली पदार्थांचं व्यसन इ. इ. काही हिरो म्हणजे अगदीच हस्तिदंती मनोऱ्यात राहणारे. लोकांना वर्षानुवर्षं त्यांचं नखही बाहेर दिसणार नाही; तर काही म्हणजे प्रसिद्धीच्या मागं नुसते वेडेपिसे... काहीही करून चर्चेत राहायचं एवढंच त्यांना ठाऊक. अक्षयकुमारचं सगळं करिअर बघितलं, तर तो असल्या गोष्टींपासून कटाक्षानं दूर राहिलेला दिसतो. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याचीही अनेक नट्यांसोबत अफेअर्स झाली. पूजा बात्रा ही त्याची गाजलेली पहिली प्रेयसी. रविना व शिल्पा शेट्टीबरोबरची प्रकरणं तर विशेष गंभीर होती. पण ती काही पुढं मार्गी लागलं नाही. मात्र, एकदा २००१ मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न झाल्यानंतर अक्षयनं शहाण्या नवऱ्यासारखा संसार केला आहे. (अपवाद प्रियांका चोप्रासोबतच्या अफेअरचा... पण त्यातून अक्षय लवकरच बाहेर आला...) त्याला आरव व नितारा अशी दोन मुलंही आहेत. गेल्या १५-१६ वर्षांत गैरकारणांसाठी त्याचं नाव कधीही चर्चेत आलं नाही. त्याची पत्नी ट्विंकल हीदेखील स्वतंत्र प्रज्ञेची स्त्री आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला तिनंही काही नायिकेच्या भूमिका केल्या. पण तिला फार काही यश लाभलं नाही. नंतर तिला लेखनात तिचा आनंद गवसला. विशेषतः विनोदी लेखनावर तिची हुकूमत आहे. आता तर ती एक उत्कृष्ट लेखिका म्हणून ओळखली जाते. तिची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. असं हे जोडपं आपापल्या कामांमध्ये आनंदात आहे. अक्षयकुमारची कामावरची निष्ठा अविचल आहे. आपल्या कामाचा तो पुरेपूर आनंद घेताना दिसतो. तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरही दिसतो. तो निर्व्यसनी आहे. उशिरापर्यंतच्या पार्ट्यांना तो कधीही जात नाही. शूटिंग नसेल त्या दिवशी तर तो रात्री दहा वाजता झोपतो आणि सकाळी लवकर उठून व्यायाम करतो, असं त्याचे जवळचे मित्र सांगतात. स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला त्याचं सर्वाधिक प्राधान्य असतं. असं शिस्तबद्ध जगणं असल्यामुळंच तो एक यशस्वी अभिनेता होऊ शकला आहे, यात वाद नाही. 
अक्षयकुमार हा मूळचा राजीव हरिओम भाटिया. पंजाबी पुत्तर... नऊ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतसरमध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे वडील हरिओम भाटिया लष्करात अधिकारी होते. (त्यामुळंच अक्षयला लहानपणापासून शिस्तीची सवय लागली असावी.) आई अरुणा आणि एक बहीण अलका असं हे कुटुंब. अक्षयचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिल्लीच्या डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये झालं. हे कुटुंब तेव्हा दिल्लीतील चांदणी चौक परिसरात राहत होतं. उच्च शिक्षणासाठी तो मुंबईच्या गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये आला. लहानपणापासून सुदृढ तब्येत असलेल्या अक्षयला मार्शल आर्टसची विशेष आवड होती. तायक्वोंदोमध्ये त्यानं ब्लॅक बेल्ट ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त केली आहे. या मार्शल आर्टसमधील पुढील शिक्षणासाठी त्यानं थायलंड गाठलं. बँकॉकमध्ये शिकता शिकता त्याला शेफची नोकरी मिळाली. अक्षय उत्तम कुक आहे. वडिलांप्रमाणे लष्करात किंवा नौदलात जाऊन देशसेवा करायची, असं त्याचं सर्वसामान्य तरुणाप्रमाणं एक स्वप्न होतं. सिनेमात आपण कधी जाऊ आणि हिरो होऊ, असा विचारही त्याच्या मनाला तोपर्यंत शिवला नव्हता. कामाच्या शोधात तो थायलंडवरून बांगलादेशात गेला. तिथून कोलकत्यात आला. तिथं त्यानं एका ट्रॅव्हल एजन्सीत नोकरी गेली. पण तिथं मन रमेना म्हणून तो परत मुंबईला आला. तिथं सुरुवातीला त्यानं दागिने विकण्याचा व्यवसाय केला. तिथं त्याची ओळख जयेश सेठ या नामवंत सिने फोटोग्राफरशी झाली. जयेशनं आपला पोर्टफोलिओ करावा, यासाठी अक्षयनं सुमारे वर्षभर त्याच्याकडं लाइट धरणे वगैरे असली काम फुकट वर्षभर केली. एकदा गोविंदाचे फोटो द्यायला अक्षय त्याच्या घरी गेला असता, गोविंदानं त्याच्याकडं पाहून तू सिनेमात हिरो म्हणून काम का करीत नाहीस, असं विचारलं. तेव्हापासून अक्षयच्या डोक्यात ही गोष्ट ठाण मांडून बसली आणि त्यानं सिनेमात येण्याची धडपड सुरू केली. मग १९९० मध्ये त्यानं अभिनयाचा एक कोर्स केला. नंतर त्याला एका  सिनेमात फुटकळ काम मिळालं. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्याला कळलं, की त्याच्या वाट्याला फक्त सात सेकंदाचं काम आलंय. त्या सिनेमाच्या नायकाचं नाव अक्षय होतं. त्यामुळं राजीव भाटियानं स्वतःचं नाव बदलून 'अक्षयकुमार' असं करून घेतलं. अशा रीतीनं राजीव भाटियाचा 'अक्षयकुमार' झाला...
आपला पोर्टफोलिओ घेऊन अक्षयकुमार निर्मात्यांचे उंबरठे झिजवू लागला. पण नरेंद्र नावाच्या एका मेकअपमननं त्याचा पोर्टफोलिओ पाहून त्याला एका दिग्दर्शकाकडं नेलं. इथं अक्षयकुमारचं नशीब पालटलं. त्याला एका दिवसात तीन चित्रपटांच्या ऑफर आल्या आणि सोबत ५१०० रुपयांची साइनिंग अमाउंटही मिळाली. त्या पहिल्या चित्रपटाचं नाव होतं - सौगंध. १९९१ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याला फारसे यश मिळाले नाही. पण त्यानं त्या वेळी साइन केलेला दुसरा चित्रपट होता अब्बास-मस्तान यांचा 'खिलाडी'. हा सिनेमा १९९२ मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या सिनेमानं खऱ्या अर्थानं अक्षयकुमारला चित्रपट जगतातला नामांकित 'खिलाडी' बनवलं आणि त्याचं करिअर मार्गाला लागलं. 

'खिलाडी'च 'खिलाडी'
'खिलाडी' हा एक सस्पेन्स चित्रपट होता. अब्बास-मस्तान यांची ती खासियत होती. हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर 'खिलाडी' नाव आणि अक्षयकुमार असं एक समीकरणच झालं. यानंतर अक्षयनं 'मैं खिलाडी तू अनाडी', 'खिलाडियों का खिलाडी', 'इंटरनॅशनल खिलाडी', 'सब से बडा खिलाडी', 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', 'खिलाडी ४२०' आणि 'खिलाडी ७८६' अशा तब्बल सात 'खिलाडी'पटांत काम केलं. एक अॅक्शन हिरो म्हणून अक्षयकुमार ओळखला जाऊ लागला. त्याच काळात आमीर, शाहरुख व सलमान चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले होते. अजय देवगणनंही १९९२ मध्ये 'फूल और काँटे'मधून चित्रपदार्पण केलं होतं. हे पाचही जण पुढील २५ वर्षं चित्रपटसृष्टीवर राज्य करत राहतील, असं तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं. विशेषतः अक्षयकुमारच्या बाबतीत तर नक्कीच... सुरुवातीचे त्याचे चित्रपट सर्वसामान्य, अॅक्शनपट होते. मात्र, १९९४ मध्ये आलेल्या 'मोहरा' या चित्रपटानं अक्षयकुमारला देशभर नाव मिळवून दिलं. या चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' या गाण्यानं देशात एकच धूम उडवली. अक्षयकुमार आणि रवीना यांचं अफेअर याच काळातलं. पुढची काही वर्षं अक्षयसाठी भरपूर सिनेमांची गेली. दर वर्षी त्याचे तीन-चार, तीन-चार सिनेमे येत गेले. यात 'खिलाडी'पट होते, तसेच 'सुहाग', 'संघर्ष', 'आरजू', 'जानवर' असे काही उल्लेखनीय चित्रपटही होते. मात्र, तरीही अक्षयची अॅक्शन हिरो ही एकच इमेज कायम होती. यश चोप्रांच्या 'दिल तो पागल हैं' या १९९७ मध्ये आलेल्या चित्रपटातलं अक्षयचं पाहुण्या कलाकाराच्या रूपात येणं सुखावह होतं. 

'हेराफेरी' अन् विनोदपट
यानंतर २००० मध्ये आला प्रियदर्शनचा 'हेराफेरी'. हा एका तमिळ सिनेमाचा रिमेक होता. यात परेश रावल, तब्बूसह अक्षय आणि सुनील शेट्टीनं धुमाकूळ घातला. 'हेराफेरी' सुपरहिट ठरला. या सिनेमानं अक्षयनं उत्तम विनोदी भूमिका करता येतात, याचा साक्षात्कार फिल्म इंडस्ट्रीला झाला. याच वर्षी आलेल्या 'धडकन'नं अक्षयला अॅक्शनसोबतच रोमँटिक हिरो म्हणूनही प्रस्थापित केलं. आता अॅक्शन, विनोद आणि रोमान्स या सर्व शैलींमध्ये त्याला प्रेक्षक स्वीकारू लागले होते आणि दिग्दर्शकही त्याला तशा प्रकारच्या भूमिका देऊ लागले होते. या यशानंतर अक्षयकुमारनं एक महत्त्वाची गोष्ट केली. लग्न केलं. ट्विंकलसोबत त्याचं प्रणयाराधन सुरू असताना लग्नाचा त्याचा फारसा विचार नव्हता. मात्र, ट्विंकलची आई डिंपल कपाडियानं त्याला लग्नाचा आग्रहच केला आणि १७ जानेवारी २००१ रोजी दोघांचं लग्न झालं. 
त्या वर्षीच आलेल्या अब्बास-मस्तान यांच्या 'अजनबी'मध्ये अक्षयनं पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका रंगविली. विक्रमच्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळाला. 
'हेराफेरी'नंतर अक्षयकुमारनं केलेल्या विनोदी चित्रपटांत 'मुझसे शादी करोगी?', 'गरम मसाला', 'भागमभाग', 'सिंग इज किंग' आदी चित्रपटांचा समावेश होता. या काळातच डेव्हिड धवनच्या 'मुझसे शादी करोगी?' या रोमँटिक विनोदी चित्रपटात अक्षयसोबत सलमान खान आणि प्रियांका चोप्रा हे दोघं झळकले होते. यानंतर अक्षयनं 'अंदाज', 'आँखे', 'खाकी', 'आन : मेन अॅट वर्क', 'ऐतराज' असे महत्त्वाचे चित्रपट केले. यात 'आँखे'मध्ये त्यानं अंध तरुणाची भूमिका साकारली होती, तर मधुर भांडारकरच्या 'आन'मध्ये तो पोलिस अधिकारी होता. 'ऐतराज'मध्ये त्यानं लेडी बॉसकडून लैंगिक शोषण होत असलेल्या तरुणाची भूमिका साकारली होती. यात त्या बॉसची भूमिका प्रियांका चोप्रानं केली होती, तर त्याच्या पत्नीची भूमिका करिना कपूरनं केली होती. या चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेची खूप तारीफ झाली. हा अक्षय व प्रियांकाचा एकमेकांसोबतचा तिसरा चित्रपट होता. या काळातच लग्नानंतरचं अक्षयचं (कदाचित एकमेव) अफेअर प्रियांकासोबत सुरू झाल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र, ट्विंकलनं परिस्थिती खंबीरपणे हाताळली. यापुढं प्रियांकासोबत एकही सिनेमा करायचा नाही, असं वचनच तिनं अक्षयकडून घेतलं. ते अक्षयनं आजवर तरी पाळलं आहे. 
अक्षयनं २००७ या वर्षात चार यशस्वी चित्रपट दिले. यात 'वेलकम', 'भूलभुलैया', 'हे बेबी' आणि 'नमस्ते लंडन' या चित्रपटांचा समावेश होता. यातील 'भूलभुलैया' आणि 'हे बेबी'मध्ये विद्या बालन त्याची नायिका होती. 'नमस्ते लंडन'मध्ये कतरिना कैफबरोबर त्यानं काम केलं होतं. पुढच्या वर्षी आलेला अक्षय-कतरिना जोडीचा 'सिंग इज किंग' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. याच वर्षी, म्हणजे २००८ मध्ये अक्षयनं हरिओम एंटरटेन्मेंट ही कंपनी सुरू केली आणि टीव्हीवरचा 'खतरों के खिलाडी' हा रिअॅलिटी शोदेखील सुरू केला. अक्षयकुमारला २००९ मध्ये केंद्र सरकारतर्फे 'पद्मश्री' देऊन गौरवण्यात आलं. 

शंभर कोटी क्लब
या काळात हिंदी सिनेमात हळूहळू शंभर कोटी क्लबची चर्चा चांगलीच जोर धरू लागली होती. सलमान, आमीर व शाहरुख यांचे सिनेमे येणार, म्हणजे बॉक्स ऑफिसवर त्यांचीच चलती असणार हे गृहीतक मांडलं जाऊ लागलं. आमीरनं दर वर्षी एकच चित्रपट करायचा आणि तो डिसेंबरमध्ये प्रदर्शित करायचा पायंडा पाडला. 'तारें जमीं पर' (२००७), 'गझनी' (२००८) आणि 'थ्री इडियट्स' (२००९) या आमीरच्या चित्रपटांनी चढत्या भाजणीनं यश मिळवलं. दर वर्षी ईदला सलमानचा चित्रपट प्रदर्शित होण्याचा ट्रेंड 'वाँटेड'पासून (२००९) सुरू झाला. शाहरुखनंही २००७ च्या 'ओम शांती ओम'पासून दिवाळीचा मुहूर्त पक्का करून घेतला. याच काळात अक्षयकुमारचं करिअर काहीसं अडखळू लागलं होतं. 'चांदनी चौक टु चायना', 'तसवीर ८ बाय १०', 'कंबख्त इश्क', 'ब्लू' हे त्याचे २००९ मध्ये सगळे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. त्यानंतर २०१० मध्येही तीच कथा कायम राहिली. 'हाउसफुल'नं काहीसं यश मिळवलं असलं, तरी 'खट्टा मीठा', 'अॅक्शन रिप्ले', 'तीसमार खान' हे त्याचे चित्रपट फार काही चालले नाहीत. तीच कथा २०११ मध्ये आलेल्या 'पतियाळा हाउस', 'थँक्यू' आणि 'देसी बॉइज' या सिनेमांची! अखेर अक्षयला हात दिला तो २०१२ मध्ये आलेल्या 'रौडी राठोड' आणि 'हाउसफुल्ल २' या सिनेमांनी. हे दोन्ही सिनेमे शंभर कोटी क्लबमध्ये दाखल झाले आणि अक्षयकुमारच्या चाहत्यांनी निःश्वास सोडला. याच वर्षी आलेल्या विजय कृष्ण यादवच्या 'ओह माय गॉड' या सिनेमाचंही समीक्षक व रसिक दोघांकडूनही कौतुक झालं. मात्र, त्याच वर्षी आलेला शिरीष कुंदेरचा 'जोकर' हा चित्रपट साफ आपटला. या सिनेमाच्या आधीच शिरीष व अक्षयमध्ये मतभेद झाले होते आणि अक्षयनं या सिनेमाचं प्रमोशनही केलं नाही.
अक्षयकुमारच्या कारकिर्दीत असे चढ-उतार सदैव पाहायला मिळतात. पण तो अपयशानं खचून न जाता टिकून राहिला, हे महत्त्वाचं. किंबहुना २०१२ नंतर म्हणजे त्याच्या वयाच्या ४५ व्या वर्षानंतर त्यानं एक से एक जबरदस्त हिट सिनेमे किंवा वेगळे सिनेमे दिल्याचं दिसतं. यात २०१३ च्या सुरुवातीला आलेला 'स्पेशल छब्बीस'सारखा सिनेमा होता. नीरज पांडेचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा मुंबईतील एका चोरीच्या सत्यघटनेवर आधारित होता. त्याच वर्षी आलेल्या मिलन लुथरियाच्या 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या चित्रपटात त्यानं दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली. पुढच्या वर्षी, म्हणजे २०१४ मध्ये ए. मुरुगदास दिग्दर्शित 'हॉलिडे' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवलं. यात अक्षयबरोबर सोनाक्षी सिन्हा होती. अक्षयकुमारचा यातील लूक आणि लष्करी अधिकाऱ्याची भूमिका दोन्ही प्रेक्षकांना आवडलं. या चित्रपटानंतर २०१५ मध्ये अक्षयनं नीरज पांडेच्या 'बेबी' या आणखी एका थरारकपटात काम केलं. याही चित्रपटानं जोरदार यश मिळवलं. मात्र, त्या वर्षी आलेल्या त्याच्या 'गब्बर इज बॅक' किंवा 'सिंग इज ब्लिंग' वगैरे चित्रपटांना अपेक्षित यश मिळालं नाही. आमीर किंवा शाहरुखसारखं वर्षाला एकच सिनेमा न करता तीन-चार चित्रपट करायची अक्षयची वृत्ती आहे. याचं कारण तो भराभर काम करतो. यामुळं काही सिनेमांच्या त्याच्या निवडीही चुकतात. एकाच वेळी एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट तो देतो, त्याच वेळी एक अत्यंत रद्दी सिनेमाही तो देऊ शकतो. मात्र, त्याच्या कामात कधीही ढिलाई दिसत नाही. अत्यंत व्यावसायिक सफाईनं तो सर्व सिनेमांत वावरताना दिसतो. या काळात अॅक्शनबरोबरच कॉमेडीपटांतही तो दिसतो. तुलनेनं अगदी प्युअर रोमँटिक अशा कथा असलेल्या सिनेमांत तो कमी दिसू लागला आहे. 
गेल्या वर्षी अक्षयचे तीन चित्रपट आले. 'एअरलिफ्ट', 'हाउसफुल्ल ३' आणि 'रुस्तुम' या तिन्ही चित्रपटांत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित 'एअरलिफ्ट'मध्ये १९९१ च्या आखाती युद्धाच्या वेळी कुवेतमधून भारतीयांना मायदेशी परत आणणाऱ्या मॅथ्युनी मॅथ्यूज या अधिकाऱ्याच्या जीवनातील खऱ्या घटनांचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. अक्षयनं यातील रणजित कात्याल या उद्योजकाची भूमिका जोरदार केली. 'हाउसफुल्ल ३'मध्ये त्याच्या नेहमीच्या शैलीतील विनोदी भूमिका होती. 'रुस्तुम' हा टिनू देसाई दिग्दर्शित चित्रपट प्रख्यात के. एम. नानावटी खटल्यावर आधारित होता. यात अक्षयकुमारनं प्रेम आहुजा ही नौदल अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत उत्कृष्ट केली होती. या चित्रपटासाठीच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. यंदाही त्यानं 'टॉयलेट : एक प्रेमकथा' हा वेगळा चित्रपट करून, सरकारी मोहिमेला हातभार लावला आहे. 
अक्षयचे आगामी चित्रपटही असेच वेगळे आहेत. महिलांसाठी परवडणाऱ्या किमतीतील सॅनिटरी नॅपकिन बनविणारे अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित 'पॅडमॅन' हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की तयार करीत आहेत. यात मुरुगनाथम यांची भूमिका अक्षय करतो आहे. 'टॉयलेट' या सिनेमाद्वारे त्यानं खेड्यापाड्यांत महिलांन अद्याप उघड्यावर शौचास जावं लागतं, या समस्येचा वेध घेतला होता. 'पॅडमॅन' ही अरुणाचलम यांची अत्यंत प्रेरणादायी कहाणी आहे. हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रजनीकांतच्या अत्यंत गाजलेल्या 'रोबो' या चित्रपटाचा दुसरा भाग '२.०' पुढच्याच वर्षी येतो आहे. त्यात अक्षयनं रिचर्ड ही खलनायक रोबोची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक शंकर भव्यदिव्य सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळंच या चित्रपटाविषयी आणि त्यातल्या अक्षयच्या भूमिकेविषयी सर्वांनाच अत्यंत उत्सुकता लागून राहिली आहे.
चित्रपटसृष्टीसारख्या मोहमयी दुनियेत राहूनही प्रामाणिकपणे, कष्टानं काम करून आपलं करिअर घडविणाऱ्या, शिस्तबद्ध स्वभावाच्या आणि नवनवे प्रयोग करण्याची आवड असलेल्या अक्षयकुमारला यापुढंही अशाच चांगल्या चांगल्या भूमिका मिळोत आणि आपल्याला त्यांचा आनंद लाभो!
---

(पूर्वप्रसिद्धी - साहित्य शिवार दिवाळी अंक २०१७)
---

21 Nov 2017

हंपी - रिव्ह्यू

डोण्ट वरी, बी हम्पी..
------------------------

हंपी या नव्या चित्रपटाचा लूक अत्यंत फ्रेश आहे, तो आजच्या तरुणाईची गोष्ट सांगतो आणि गोष्ट सांगताना 'बिटवीन द लाइन्स' बऱ्याच गोष्टी सांगतो, हे सगळं सांगण्याऐवजी हा 'प्रकाश कुंटेचा नवा सिनेमा आहे,' एवढं सांगितलं, तरी चालेल एवढी आता या दिग्दर्शकाची शैली परिचित झाली आहे. हा त्याचा तिसराच चित्रपट. 'कॉफी आणि बरंच काही...' आणि '& जरा हट के' या त्याच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांवर मी लिहिलं आहे. त्यात हेच मुद्दे आले आहेत. त्यामुळं आता 'हंपी'विषयी वेगळं काही तरी लिहायचं तर ते काय, असा सुरुवातीला मला प्रश्न पडला. या दिग्दर्शकानं थोड्याच अवधीत स्वतःची तयार केलेली शैली म्हणून त्याचं कौतुक करावं, की आता त्यानं तातडीनं काही तरी वेगळं केलं पाहिजे, असा इशारा द्यावा?
मला तरी त्याचे हे तीन चित्रपट म्हणजे एक वेगळ्या प्रकारची ट्रायोलॉजी वाटते. आजच्या काळाचं, आजच्या तरुणाईचं, आजच्या मराठी समाजाचं दर्शन घडवणारे त्याचे हे तीन सिनेमे आहेत, असं मला वाटतं. आपल्याला काय मांडायचं आहे त्या अवकाशाचं पुरेपूर भान असलेला हा दिग्दर्शक आहे. तिन्ही चित्रपटांत त्यानं हे दाखवून दिलं आहे. 'कॉफी' एक तरुण व एका तरुणीच्या प्रेमाविषयी बोलणारा होता, तर '& जरा हट के'मध्ये पालक आणि मुलांच्या नात्यावर भाष्य होतं. 'हंपी' त्याच्या एक पाऊल पुढं जातो आणि आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेल्या तरुणीच्या मनाची घालमेल मांडू पाहतो. आजच्या काळातलं प्रस्थापित नात्यांचं तुटलेपण आणि त्यातून सुटून नवे बंध जोडू पाहणारी आजची तरुण पिढी यांची तगमग हा सिनेमा आपल्यासमोर मांडतो. इतर चार सिनेमांसारखी एका सरळ रेषेत चालणारी गोष्ट यात नाही. पण तरीही तो प्रथमदर्शनी आपल्याला भिडतो, याचं कारण त्यांच्या मांडणीतील वेगळेपण आणि या गोष्टीला असलेलं हंपी या ऐतिहासिक शहराचं नेपथ्य!
हंपी आपल्याला ईशा (सोनाली) या तरुणीची गोष्ट सांगतो. सिनेमाच्या सुरुवातीला एक छोटी मिनीबस रस्त्याच्या उतारावरून चढावर येताना दिसते आणि त्या चढावरून वर वर येत असलेल्या बससोबतच 'हंपी' हे सिनेमाचं शीर्षक वर वर येतं. या दृश्यापासूनच हा सिनेमा आपल्या मनाची दृश्यात्मकरीत्या पकड घेतो. हंपीचं नेपथ्य वापरण्याची कल्पना एकदम अफलातून. मराठी सिनेमात न दिसणारी दृश्यं त्यानिमित्तानं दिसली, हे एक कारण आणि दुसरं कारण म्हणजे मानववंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या नायिकेची सध्याची मनःस्थिती. एके काळी नांदतं-गाजतं असलेलं हंपी आता पार विखुरलं आहे. एके काळच्या वैभवाचे आता नुसतेच अवशेष उरले आहेत. नायिकेच्या आई-वडिलांचं एके काळी बहरलेलं नातं आता असंच विखुरलं आहे. हंपीमधल्या देवळांमध्ये, वैभवशाली साम्राज्याच्या अवशेषांमध्ये नायिकाही अशीच विस्कटलेल्या स्थितीत भिरभिरते आहे. माणसाच्या नात्यांवरचा, प्रेमावरचा तिचा विश्वास पार उडाला आहे. अशा वेळी ती या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरात आली आहे. 
यानंतरचा तिचा हंपीमधला प्रवास, तिला भेटलेला ग्लोबल दिल नावाचा रिक्षावाला (प्रियदर्शन जाधव) आणि कबीर (ललित प्रभाकर) या दोघांच्या मदतीनं सुरू होतो. (अंतर्वस्त्रं वाळत टाकताना नायिका आणि नायक एकमेकांना प्रथम पाहतात, हे दृश्य लक्षणीय आहे.  एकदम इनर सोल की काय म्हणतात, तसं!) यानंतर कबीर व तिची एकदम दोस्ती होते, हे सांगायला नकोच. कबीरचं एकदम हॅपी गो लकी, स्वच्छंदी असणं हेही तसं आवश्यकच. मध्यंतरात ईशाची मैत्रीण गिरीजा (प्राजक्ता माळी) येते आणि गोष्टीत एक अकारण त्रिकोण निर्माण होतो.
यानंतरचा सिनेमाचा प्रवास कसा होणार, हे वर्षानुवर्षे सिनेमे पाहणाऱ्यांना सांगावे लागू नये. तर ते जसं व्हायचं तस्संच होतं आणि सिनेमा संपतो. 
पावणेदोन तासांचा हा सिनेमा संपल्यानंतर आपल्या लक्षात काय राहतं, तर अमलेंदू चौधरीच्या अप्रतिम कॅमेरानं टिपलेली अत्यंत सुंदर अशी हंपी आणि नरेंद्र भिडे व आदित्य बेडेकर यांनी संगीत दिलेली अपने ही रंग में (राहुल देशपांडे) आणि मुरुगेरा ओ राघवा (रूपाली मोघे) ही गाणी. 
मग सिनेमाचं काय?
मला वाटतं, की हा सिनेमा सर्वांनाच भिडेल, आवडेल असं नाही. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. विजय निकम व छाया कदमचा ट्रॅक अकारण मोठा झाला आहे, असं वाटतं. विशेषतः विजय निकमचं पात्र तर अनावश्यक वाटलं. दुसरं, मैत्रिणीचं अचानक येणं आणि त्यानंतर तिनं गंमत म्हणून कबीरच्या मागं लागणं हेही उगाचच आलं आहे. ईशा आणि कबीर यांचं एकत्र येणं निश्चित असताना, शेवटी तो उगाचच गायब का केलाय, याचंही नीट उत्तर मिळत नाही. 
आदिती मोघे यांनी लिहिलेल्या पटकथेत असे अनेक कच्चे दुवे राहिले आहेत. त्यामुळं सिनेमाचा एकसंधपणा लोप पावला आहे. मुख्य पात्रांच्या मनोव्यापारांकडं अधिक लक्ष द्यायला हवं होतं. ईशा जेवढी कळते, तेवढा कबीर कळत नाही. सिनेमात अनेकदा सतत तत्त्वज्ञान ऐकू येतं. ईशा एकदा म्हणतेही, की सगळे बोलायला लागले की एकदम तत्त्वज्ञान का ऐकवतात? खरंच! का ऐकवतात? नायिका सोनाली असल्यामुळं की काय, तिच्या नृत्यकौशल्याला वाव देणारं एक दृश्यही यात घालण्यात आलंय. अशा काही गोष्टींमुळं सिनेमा पाहताना प्रेक्षकाचं मन गुंतून पडण्याऐवजी ते विचलितच जास्त होतं. असो.
तरीही मला हा दिग्दर्शक आवडतो. त्याचा हा प्रयत्नही प्रामाणिक आहे आणि नक्की एकदा बघावा असा आहे.
सोनाली यात वेगळ्या गेटअपमध्ये आणि छान दिसलीय. तिनं कामही समजून-उमजून केलंय. ललित प्रभाकर हा धमाल अभिनेता आहे. त्यानं यात कबीरची भूमिका छान केली आहे. प्रियदर्शन जाधव रिक्षावाल्याच्या भूमिकेत मजा आणतो. या एरवी गंभीर सिनेमातला तो एक महत्त्वपूर्ण स्ट्रेसबस्टर आहे. 
 ---
दर्जा - तीन स्टार
---

16 Nov 2017

न्यूड वाद - मटा लेख

अभिव्यक्तीचं ‘न्यूड’ सत्य
-------------------------------------------------
माहिती व प्रसारण खात्याला सदैव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचं कुठलं अॅवॉर्ड असेल तर ते तातडीनं दिलं पाहिजे. सध्याचं ताजं कारण आहे ते न्यूड व एस. दुर्गा (पूर्वीचं नाव सेक्सी दुर्गा) हे दोन चित्रपट भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) काढून टाकण्याचं. रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाला महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ होण्याचा मान मिळाला होता. याशिवाय यंदा इंडियन पॅनोरमा या विभागात एक तृतीयांश, म्हणजे २६ पैकी नऊ चित्रपट मराठी आहेत. यामुळं मराठी चित्रपटसृष्टीत उत्साहाची लाट पसरली होती. मात्र, ‘न्यूड’ची संतापजनक हकालपट्टी झाल्यानं चित्रकर्मींमध्ये अत्यंत अस्वस्थता आहे. महोत्सवावर बहिष्कार घालण्याची चर्चा सुरू आहे. काही कलाकारांना मात्र महोत्सवात सहभागी होऊनच आपण निषेध नोंदवला पाहिजे, असं वाटत आहे.
मूळ मुद्दा या चित्रपटांची महोत्सवातून हकालपट्टी होण्याचा आहे आणि तो सर्वांत महत्त्वाचा आणि गंभीर आहे. मुळात या आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांची निवड चित्रपट क्षेत्रातील जाणकारांकडून केली जाते आणि त्यात सरकारी यंत्रणांचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. चित्रपटांची निवड झाल्यानंतर ही यादी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे जाते आणि त्यांच्याकडून ती घोषित होते. यंदाही ही यादी घोषित झाली. त्यात ‘न्यूड’ व ‘दुर्गा’ हे दोन्ही चित्रपट होते. ‘न्यूड’ला तर उद्-घाटनाचा चित्रपट होण्याचा मान मिळाला होता. असं असताना नंतर काय चक्रं फिरली सरकार जाणे... हे दोन्ही चित्रपट काढून टाकण्यात आले. हा सरकारी हस्तक्षेप संबंधित सिनेमांवर अन्याय करणारा आहे. ‘न्यूड’ हा चित्रपट तर सेन्सॉरनंही संमत केला आहे. सध्या चित्रपटगृहांत त्याचं ट्रेलरही दाखवण्यात येत आहे. (काही काही ठिकाणी हे ट्रेलरही न दाखवण्याचा मूर्खपणा सुरू आहे.) असं असताना सरकारला या सिनेमांची अशी कोणती भीती वाटली, की त्यामुळं हे चित्रपटच महोत्सवातून काढून टाकले? आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडलेले चित्रपट असे अचानक काढून टाकून आपण कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहोत, हे सरकारला कळत नसेल? आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणारे चित्रपट त्या त्या देशाचा आरसा दाखवत असतात. तेथील समाजजीवन, कलासंस्कृतीचं दर्शन घडवत असतात. आपण आता जगाला काय दाखवणार आहोत? आपला फुटका आरसा? आपल्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हे ‘न्यूड’ सत्य बघून जगातील तमाम चित्रपटप्रेमींना लाज वाटल्याशिवाय राहणार नाही.
कलाकाराला आपली कला सादर करण्याचं स्वातंत्र्य (अर्थात घटनेच्या, देशहिताच्या मर्यादेत) असतं, ही बाब आपल्याकडं सरकारच्या फार पचनी पडताना दिसत नाही. विशेषतः पूर्वीची परिस्थिती बरी म्हणायची वेळ आता आली आहे. कलाबाह्य कारणांनी कलाकृतींवर बंदी घालणं, त्यांना विरोध करणं, त्यांची मुस्कटदाबी करणं या गोष्टी बोकाळू लागल्या आहेत. ‘न्यूड’ हा चित्रपट मी पाहिलेला नाही. मात्र, त्याच्या ट्रेलरवरून सिनेमाच्या आशयाची पुरेशी कल्पना येते. चित्रकला महाविद्यालयांमध्ये किंवा कला संस्थांमध्ये माणसाचं न्यूड पोर्ट्रेट काढता येणं हा कलाशिक्षणाचा महत्त्वाचा भाग असतो. यासाठी स्त्री किंवा पुरुष मॉडेलना समोर बसवून अनेक विद्यार्थी हे पोर्ट्रेट काढत असतात. चित्रकलेच्या दुनियेशी संबंध असलेल्या लोकांना याविषयी अधिक माहिती आहे. असं नग्न मॉडेल म्हणून बसण्यासाठी संबंधित संस्थेकडून मोबदला मिळतो. जगभरात आणि भारतातही गेली कित्येक वर्षं ही प्रथा आहे. पूर्वी आणि आताही या कामासाठी सहजी माणसं मिळत नसत. विशेषतः स्त्रियांसाठी हे कठीण. अशाच एका स्त्रीच्या भावजीवनाचा प्रवास (स्वतः जे. जे. कला महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेले) रवी जाधव यांनी या सिनेमात चितारला असावा, असं प्रोमोजवरून जाणवतं. ‘न्यूड’ हा शब्द सर्वसामान्यांना काहीसा दचकवणारा असला, तरी कलाजगतात हाच शब्द प्रचलित असल्यानं सिनेमाचं शीर्षक म्हणूनही तोच योग्य आहे. (शिवाय मूळ मार्केटिंग व जाहिरात क्षेत्रात असलेल्या जाधवांना या शीर्षकाची ‘मार्केट व्हॅल्यू’ही चांगलीच माहिती असणार!) तर असा हा सिनेमा आशयात्मकदृष्ट्या कसा आहे, हे तो पाहिल्यावरच कळेल. पण तो लोकांना पाहूच द्यायचा नाही, हा माहिती व प्रसारण खात्याचा निर्णय मूर्खपणाचा आहे. शिवाय ‘इफ्फी’मधून काढला याचा अर्थ तो पुढेही प्रसारित होणार की नाही, की तिथंही सरकार काही आडकाठी आणणार हा प्रश्न उरलाच आहे.
जी गोष्ट ‘न्यूड’ची, तीच मल्याळी दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन यांच्या ‘एस. दुर्गा’ची. यात दुर्गा नामक एका उत्तर भारतीय तरुणीची आणि कबीर या केरळी तरुणाची गोष्ट दाखविण्यात आली आहे. दुर्गा पळून आलेली असते आणि कबीरसोबत पळून जात असताना दोन गुंडांशी त्यांची गाठ पडते. ते गुंड या दोघांना मदत करण्याची तयारी दाखवतात. त्यानंतर या दोघांना त्या रात्री जगाचं जे दर्शन घडतं, जे भयानक अनुभव येतात त्याचं चित्रण म्हणजे हा सिनेमा. हाही सिनेमा अद्याप मी पाहिलेला नाही. मात्र, ‘इफ्फी’साठी नियुक्त आंतरराष्ट्रीय ज्यूरींनी तो संमत करून निवडला होता, याचा अर्थ तो काही टाकाऊ सिनेमा नक्कीच नसणार. या सिनेमाचं नाव आधी ‘सेक्सी दुर्गा’ असं होतं. मात्र, त्यावरून मोठा गदारोळ उडाल्यानंतर शशिधरननं हे नाव ‘एस. दुर्गा’ असं केलं. त्यानंतरही या सिनेमाच्या मागं लागलेलं शुक्लकाष्ठ टळलेलं नाही. आता ‘इफ्फी’तून हकालपट्टी होण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर आली आहे.
‘न्यूड’ काय किंवा ‘दुर्गा’ काय, हे सिनेमे म्हणून नक्की कसे आहेत, हे माहिती नाही. त्यांची नावं काहीशी प्रक्षोभक आणि लक्ष वेधून घेणारी आहेत हेही खरं. मात्र, केवळ या कारणांवरून ते काढून टाकले असावेत असं वाटत नाही. ‘न्यूड’मध्ये एम. एफ. हुसेन यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनाचा संदर्भ आहे, तर केरळमधील धर्मवादी राजकारण व तिथं केंद्राच्या विरोधातलं सरकार यांचा या गोष्टीशी संबंध नसेलच असं म्हणता येत नाही. शशिधरन यांनी तर केरळ हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून काय निष्पन्न होतं हे पाहायचं. मात्र, मल्याळी चित्रपटसृष्टीनं शशिधरन यांच्या प्रकरणात बाळगलेलं मौन त्यांना अधिक त्रासदायक वाटतं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत मात्र तुलनेनं बरं चित्र आहे. रवी जाधव हे चित्रपटसृष्टीतील मोठं नाव असल्यानं त्यांच्या समर्थनार्थ अनेक कलाकार पुढं आले आहेत. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यानं सरकारी फतव्याविरोधात सोशल मीडियावर उघड मोहीम सुरू केली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. एकूण जनभावना सरकारी निर्णयाच्या विरोधातच आहे, यात शंका नाही.
यंदा कधी नव्हे, ते तब्बल नऊ मराठी सिनेमे इंडियन पॅनोरमा या विभागात दाखल झाल्यानं त्या सर्वांनी आता महोत्सवावर बहिष्कार टाकावा, अशीही जोरदार चर्चा एका वर्तुळातून पसरवली जात आहे. मात्र, पहिल्यांदाच निवड झालेले काही निर्माते व दिग्दर्शक नक्की काय करायचं याबद्दल बुचकळ्यात पडले आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचाही या नऊ सिनेमांत समावेश असून, विशेष म्हणजे त्यात प्रमुख भूमिकेत रवी जाधव आहे. त्यामुळं रवी जाधव दिग्दर्शित सिनेमासाठी रवी जाधव अभिनित सिनेमा मागे घ्यायचा का, असा यक्षप्रश्न प्रसाद ओकसमोर निर्माण झाला असून, तो त्यानं जाहीरपणे मांडला आहे. पुण्यातले जुनेजाणते नाट्यकर्मी योगेश सोमण यांचा ‘भिरभिरं’ हा पहिलावहिला सिनेमाही ‘पॅनोरमा’त निवडला गेला आहे. ‘प्रथमच चित्रपट निवडला गेला आहे, तर अशी संधी वाया घालवावी का,’ असा प्रश्न त्यांनाही पडला असून, त्यांनी महोत्सवात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असे दिसते. अर्थात हा त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असून, काय करायचं याचं त्यांचं स्वातंत्र्य अबाधित आहेच.
एक मात्र खरं, की ‘इफ्फी’वर बहिष्कार घालून तसा काही फार उद्देश सफल होणार नाही. नऊ सिनेमे नसले, तर सरकार पुढचे नऊ सिनेमे ‘पॅनोरमा’त सहभागी करून घेईल आणि महोत्सव या सिनेमांविना पार पडेल. जगभरातल्या नामांकित चित्रकर्मींसमोर, रसिकांसमोर आपली कलाकृती सादर न करून मराठी दिग्दर्शकांना काय मिळणार? त्यांच्या बहिष्कारामुळं ‘न्यूड’ पुन्हा महोत्सवात सामील होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं या कलावंतांनी जरूर गोव्याला जावं आणि शक्य त्या मंचांवरून आपला निषेध नोंदवावा. मराठी कलावंतांची कलेशी असलेली बांधिलकी त्यातून जगाला समजेल.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तसं दुधारी शस्त्र आहे. आपण आपल्या समाजात वावरताना अनेकदा दांभिक भूमिका घेत असतो. आपला न्याय सोयिस्कर असतो आणि बहुतेकदा स्वतःच्या फायद्याचाच असतो. दुसऱ्याच्या हक्कासाठी लढणारे तसे फारच कमी. शिवाय आपल्या विचारांवर आयुष्यभर ठाम राहणारे तर त्याहूनही कमी. आपला समाज जसा आहे, तसलंच सरकार आपल्याला मिळालं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज लावताना वास्तवातलं हे ‘न्यूड’ सत्यही जाणून घेऊ या.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; १६ नोव्हेंबर २०१७)
----

13 Nov 2017

मटा संवाद लेख

टूर निरागस हो... 
--------------------

भटकायला जायला आपल्याकडं हिवाळ्यासारखा उत्तम ऋतू नाही. पावसाची कचकच संपली, दिवाळीची लखलख संपली, की थंडीची लगबग सुरू होते. वातावरणात सुखद असा गारवा पसरतो आणि चित्तवृत्ती की काय म्हणतात, त्या एकदम प्रफुल्लित होऊन जातात. ऑफिस किंवा व्यवसायाच्या कामाच्या रुटीनमध्ये अडकलेलं मन त्यातून बाहेर पडायला धडपडू लागतं. या काळात पुण्यात पडणाऱ्या थंडीला कविमंडळींनी ‘गुलाबी थंडी’ असं म्हणून आधीच रोमँटिकपणाची दुलई पांघरली आहे. त्यामुळं एखाद्या रुक्ष जीवाचा स्वभावही अगदी लोण्यासारखा मऊ होऊन जातो. अशाच अवचित क्षणी मग एखाद्या सहलीचा बेत आखला जातो.
अचानक ‘कुठं तरी गेलं पाहिजे’ ही भावना फारच जोर धरायला लागते. वास्तविक आपण आपल्या आजूबाजूची बहुतेक सगळी ठिकाणं ‘य’ वेळा पालथी घातलेली असतात. त्यामुळं पुनःपुन्हा तिथंच काय जायचं, या विचारानं मन जरा खट्टू होतं. पण पर्यटनाची उबळ तशी जोरदार असते. खिसा बऱ्यापैकी हलका केल्याखेरीज ती थांबत नाही. मग साधारण दिवाळीतली सुट्टी ते नाताळची सुट्टी अशी दोन टोकं धरून या काळात किंवा याच्या अधल्यामधल्या काळात सुट्टीचं नियोजन केलं जातं. अचानक आपलं भौगोलिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक भान जागृत होतं आणि यंदा आपली ट्रिप ही ‘हट के’ झाली पाहिजे, अशा जिद्दीनं आपण पेटून उठतो.
अशा वेळी घरचे किंवा जीवाचे जीवलग जेवढे उपयोगी पडत नाहीत, तेवढं फेसबुक किंवा गुगल किंवा यूट्यूब उपयोगी पडतं. मी आपला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलेल्या लोकांच्या पोस्टी आवडीनं पाहू लागतो. काही लोक सासवड किंवा शिरूरला जावं तितक्या सहजपणे न्यूयॉर्क, लंडन, सिडनी, टोकियो, गेलाबाजार हाँगकाँग, बँकॉक, सिंगापूर अशा ठिकाणी जाताना दिसतात. अशा लोकांविषयी मला मनातून भयंकर असूया, हेवा, मत्सर इ. इ. काय काय वाटत असतं. पण प्रत्यक्षात मीही माझं रोजचंच तिकडं येणं-जाणं असल्याच्या थाटात त्यांना काहीबाही सूचना करीत असतो. यू-ट्यूबच्या महिम्यामुळं जगातली बहुतेक ठिकाणं घरबसल्या बघायला मिळतात. ते ज्ञान पाजळून अशा लोकांना कॉम्प्लेक्स आणण्यात भारी मौज असते. विशेषतः सिडनीला गेलेल्या लोकांना ‘अंटार्क्टिका खंड नाही पाहिला अजून?’ असं, तर युरोपात गेलेल्यांना ग्रीनलँडची भेट चुकविल्याबद्दल खिजवून अपरिमित आनंद लुटता येतो. सिंगापुरात पहिल्यांच गेलेले लोक त्या मरलॉन की मर्लिऑनच्या पुतळ्यासमोर आणि दुबईला पहिल्यांदाच गेलेले लोक ‘बुर्ज खलिफा’समोर किंवा टॉप फ्लोअरवर जाऊन वेडीवाकडी तोंडं करून फोटो काढतात आणि पोस्टतात. अशा लोकांना आपण तिथं गेलो नसलो, तरी ‘ही फॅशन आता आउटडेटेड झाली’ असं सांगावं. लोक परदेशातून परत येईपर्यंत सोशल मीडियात एखादी फॅशन कालबाह्य होणं हे अगदीच शक्य आहे. त्यामुळं संबंधितांचा आपल्या सांगण्यावर (एकदाच) विश्वास बसतो. पण हा प्रयोग वारंवार करू नये. बँकॉकला पहिल्यांदाच जाणारे लोक शक्यतो आल्यानंतरच आपण जाऊन आल्याचं सांगतात. त्यामुळं त्यांना खिजवण्याची भयंकर सुंदर संधी असते. थोडक्यात, परदेशाचा विचार हा पोस्टपुरताच मर्यादित राहतो.
काही लोक भारतातल्या भारतातच प्रवास करतात, पण एकदम वेगळीच ठिकाणं शोधून काढतात. सर्वसाधारण प्रवासी कंपन्यांसोबत जाणाऱ्या लोकांची धाव काश्मीर, केरळ, राजस्थान, उत्तर कर्नाटक, मध्य प्रदेश अशी ठळक ठळकच असते. पण काही लोक एकदम अनवट ठिकाणी जातात आणि फोटो टाकतात. अंदमानातलं कुठलंसं दुर्गम बेट, हिमालयातली आदिम गुहा, सह्याद्रीतली एखादी अनाघ्रात घळ, दंडकारण्यातला कुठलासा धबधबा या किंवा अशाच ठिकाणी ही मंडळी जातात कशी, याचं विलक्षण आश्चर्य वाटतं; कौतुकही वाटतं. सुंदरबन, भीतरकणिका, कच्छ, लक्षद्वीप, भीमबेटका, मदुमलाई, स्पिती असली ठिकाणं हिंडणाऱ्यांची वेगळी जातकुळी असते. यांना कॉम्प्लेक्स आणणं अवघड असतं, पण यांचं वारेमाप कौतुक करून आपल्याला त्या ठिकाणी जाण्यात कसा रस नाही, हे शेवटी सांगावं. परिणाम साधारण तोच साधतो.
महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फिरून फोटो टाकणारेही काही कमी नसतात. पण कुणी कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांचं कौतुक सुरू केलं, की आपण अजिंठा-वेरूळचा पत्ता टाकावा. कुणी गोव्यातल्या माशांचं रसभरीत वर्णन केलं असलं, की त्याला सोलापुरी चटणी कशी श्रेष्ठ असते, हे पटवून द्यावं. कुणी मुंबईतल्या मॉलमधला फोटो टाकला, की आपण आनंदवन किंवा हेमलकशाच्या आठवणींचे कढ आणावेत. आपण उगाच फोटो टाकले, असं संबंधित पर्यटनप्राण्याला वाटेपर्यंत हे करीत राहावं.
एवढं झाल्यावर फेसबुकचा नाद सोडावा. आता व्हॉट्सअॅपवर जावं. मित्रांच्या ग्रुपमध्ये हळूच चर्चेचं पिल्लू सोडून द्यावं. घमासान चर्चा होते. पण शेवटी ग्रुपमधील माणसं, सगळ्यांच्या सुट्ट्या, सर्वांचं आवडीचं ठिकाण हे कधीही जुळत नाही आणि या चर्चेचा शेवट ‘यंदा जमत नाही, पुढल्या वर्षी नक्की जाऊ’ या वाक्यानंच होतो. हे वाक्य ‘आज रोख, उद्या उधार’सारखंच असतं. त्यातला ‘उद्या’ आणि ‘पुढचं वर्ष’ कधीही उगवत नसतं.
एवढं सगळं झाल्यावर आपण आपलेच ट्रिपला जाऊ, असा फंडा निघतो. त्यातच थंडी असली, तरी रजा आणि सुट्ट्यांसाठीचा हा ‘हॉट सीझन’ असल्यानं तीही खिंड ऑफिसात लढवावी लागते. नवसानं मिळालेली रजा सत्कारणी लावण्यासाठी जवळपास कुठं तरी जाऊन येऊ, असा एकदाचा निर्णय होतो. दिवाळीच्या सुट्टीत अशा रिसॉर्टची चौकशी करायची वेळ फार कमी वेळा येते. पण चुकून ती केलीच, तर आपण तिथं सुट्टी घालवायला जातोय की ते रिसॉर्ट विकत मागतोय असाच प्रश्न त्यांचे दर ऐकून पडतो. एका रिसॉर्टचं पॅकेज ऐकून तर तिथं सोन्याच्या थाळीत जेवायला देतात का, अशी शंका आली. तेव्हा तोही प्रश्न निकाली निघतो. आता फार थोडे पर्याय शिल्लक उरलेले असतात. पर्यटनाच्या त्याच त्या लोकप्रिय ठिकाणी जायचं नाही, ही आपली अट कायम असते. 
बाकी गड-किल्ल्यांच्या सहली काढायची हौस अनेक जणांना असते. एरवी गड-किल्ले चढणं म्हणजे घाम निघायचं काम! थंडीत तुलनेनं हे प्रकरण थोड्या-फार ‘हाशहुशी’त जमून जातं. व्यायामाचा अभाव आणि बैठ्या जीवनशैलीला सोकावलेला आपला देह, गडावर पोचताच महाराजांना त्रिवार लोटांगण घालण्यासाठी खरोखर आडवा होतो. किल्ल्यांवर जायला मात्र आपल्याला मनापासून आवडतं. वर माथ्यावर सह्याद्रीचा भर्रार वारा आणि इतिहासात रमू पाहणारं मन यांची मस्त जोडी जमते. शरीराला शीण झाला, तरी मन ताजंतवानं होतं. त्यामुळंच की काय, गड उतरून येताना काहीसं उदास वाटतं खरं...
कधी कधी हेही जमत नाही आणि आपल्याच शहरात दिवस घालवावा, असा पर्याय पुढं येतो. आपल्या गावातलं एकूण एक स्थळ आपण केव्हाच पाहिलेलं असल्यानं कुठल्याही ठिकाणी गेलं तरी ती पुनर्भेटच असते. मग एखादा नवा झालेला मॉल किंवा मल्टिप्लेक्स यांच्या तावडीत आपण सापडतो. एकीकडं जुनं होत चाललेलं आणि दुसरीकडं रोज नवनवा आकार घेणारं शहर पाहून अचंबित व्हायला होतं. बदलांचा हा वेग आपल्याला हळवं करतो आणि वय झाल्याची जाणीवही करून देतो. सगळं करून झाल्यावर ‘झालं एकदाचं पर्यटन’ एवढंच काय ते समाधान मिळतं...
पण नशीब कधी तरी फारच मेहेरबान होतं. अचानक ऑफिसला दांडी मारायची हुक्की येते. निवांत उशिरा उठता येतं. दिवाळी अंक किंवा आवडतं पुस्तक घेऊन दुपारपर्यंत लोळत पडता येतं. अशा वेळी बाहेरून काही तरी डिश मागवून दुपारचं जेवण करायचं, मग पुन्हा ताणून द्यायची, संध्याकाळी सुंदर थंडीत बाहेर पडायचं, मनाला येईल त्या रस्त्याला गाडी हाणायची, सूर्यास्त होत आला की गाडी रस्त्याच्या कडेला थांबवायची, अनिमिष डोळ्यांनी तो केशरी सोहळा डोळ्यांत साठवून घ्यायचा... परत घरट्यात परतायचं... संध्याकाळी जिवाला जीव देणारा मित्र बोलवावा, सुख-दुःखाच्या गप्पा मारीत साग्रसंगीत भोजन व्हावं, रात्री जमल्यास एखादा पिक्चर टाकावा किंवा गाण्याची मैफल ऐकावी... निवांत झोपावं... अहाहा!
दुसऱ्या दिवशी रुटीन जगायला आपण परत सिद्ध होतो, तेव्हा लक्षात येतं, की काल काय मस्त पर्यटन झालं आपलं! 
 ---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे; १२ नोव्हेंबर २०१७)
---