20 Sept 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - खूबसुरत

आत्माहीन सौंदर्य... 
------------------------

माणसानं नियमांच्या आणि शिस्तीच्या चौकटीत हरवून न जाता, जगण्याचा मनमुराद आनंद लुटला पाहिजे; आखीवरेखीव पण चाकोरीबद्ध आयुष्याच्या सीमारेषा लंघून विविधरंगी जगाची मौज अनुभवली पाहिजे, या तत्त्वज्ञानाला भारतातील मध्यमवर्गीयांच्या हृदयात अगदी नाजूक, खास स्थान आहे. स्वाभाविकच आहे. जी गोष्ट आपल्याला करायला जमत नाही, त्याबद्दल माणसाला एक सुप्त आकर्षण मनात असतंच. मध्यमवर्गीयांना हे तत्त्वज्ञान शिकवणारा एक सिनेमा ‘मध्यमवर्गीय सिनेमांचे मास्तर’ हृषीकेश मुखर्जी यांनी १९८० मध्ये दिग्दर्शित केला होता. त्याचं नाव ‘खूबसुरत’. तेव्हाची चुलबुली, हॉट, ‘युवा दिलों की धडकन’ रेखा हिच्या सहजसुंदर अभिनयानं आणि दीना पाठक यांनी रंगवलेल्या करड्या शिस्तीच्या गृहिणीशी होणाऱ्या तिच्या संघर्षातून कौटुंबिक जगण्याविषयीचं ‘खूबसुरत’ तत्त्वज्ञान त्या सिनेमानं प्रेक्षकांच्या हाती ठेवलं होतं. अशा या कुटुंब नावाच्या संस्थेविषयी जिव्हाळा असल्याचा दावा करणाऱ्या वॉल्ट डिस्ने फिल्म कंपनीनं जेव्हा भारतात पहिल्यांदा सिनेमा काढायचं ठरवलं, तेव्हा त्यांना या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक करावासा वाटणं अगदी स्वाभाविक होतं. दिग्दर्शक शशांक घोष यांनी रेखाच्या जागी सोनम कपूर आणि दीना पाठक यांच्या जागी त्यांचीच कन्या रत्ना पाठक-शाह यांना घेऊन काढलेला ‘खूबसुरत’ मात्र नेमका याच तत्त्वज्ञानात कमी पडतो. म्हणजे सिनेमाच्या बाह्य सौंदर्याचे सगळे नियम आणि शिस्त त्यानं पाळले आहेत; पण त्यांच्या आहारी जाऊन, सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकाला त्या गोष्टीची आंतरिक मौज सांगणारा आत्मा मात्र या सिनेमानं गमावला आहे. त्यामुळंच पूर्वार्धात काहीशा अपेक्षा उंचावणारा हा सिनेमा उत्तरार्धात भलताच कंटाळवाणा आणि एकसुरीपणाकडं झुकला आहे. किंबहुना तो कधी एकदाचा संपतो, असं आपल्याला होऊन जातं आणि हे नव्या ‘खूबसुरत’चं मोठंच अपयश आहे.
जुन्या ‘खूबसुरत’चा हा अगदी ‘फ्रेम टु फ्रेम’ रिमेक नाही आणि त्या सिनेमाचं फक्त मर्म या नव्या सिनेमानं घेतलं आहे, असं वरकरणी दिसतं. त्यामुळंच आजच्या काळानुरूप सिनेमात बदलही भरपूर करण्यात आले आहेत. पुण्यातली साधी मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुख असलेली निर्मला गुप्ता ही कडक गृहिणी इथं थेट राजस्थानातील संभलगड संस्थानाची महाराणी झाली आहे. तिथं अशोककुमार यांनी साकारलेला प्रेमळ, पण पत्नीच्या धाकात राहणारा कुटुंबप्रमुख हे त्या सिनेमातलं एक महत्त्वाचं पात्र होतं. इथं त्या पात्राला तुलनेत दुय्यम स्थान आहे. तिथं नायिकेचं मंजू हे नाव इथल्या नायिकेच्या आईला मिळालं आहे, तर राणीसांचं कुटुंबही काळानुसार कमी झालं आहे. याउलट मंजूच्या घरचा नोकर अश्रफी इथंही कायम राहिला आहे, पण दुय्यम रूपातच. त्या सिनेमातल्या मंजूला आई नसतेच, तर इथं आई व वडील दोन्ही आहेत व आई जास्त प्रभावी आहे. अर्थात हे सर्व बदल करायलाही हरकत नाही. पण हे सर्व तसे बाह्य, किंवा कॉस्मेटिक बदल आहेत. कुटुंबप्रमुख आईच्या दराऱ्याखाली व शिस्तीखाली दबल्या गेलेल्या कुटुंबांत बाहेरून एक ‘हॅपी गो लकी’ मुलगी येते आणि सर्व सदस्यांना आपापल्या जगण्याचा सूर पुन्हा मिळवून देते, आयुष्य ‘खूबसुरत’ आहे, हे सांगते, हे त्या कथेचं मध्यवर्ती मर्म! तेच नव्या ‘खूबसुरत’मध्ये दबल्यासारखं झालं आहे. सिनेमानं धारण केलेलं नवं पर्यावरणही या मध्यवर्ती सूत्राला पूरक नाहीय. शिवाय कुटुंब व त्यांतील नातेसंबंध काहीसे बाजूला पडून, या नव्या सिनेमानं उत्तरार्धात पकडलेला प्रेमकथेचा ट्रॅक हाही त्या मर्मावर घाव घालणाराच ठरला आहे.
या नव्या सिनेमाची नायिका डॉ. मृणालिनी चक्रवर्ती उर्फ मिली (सोनम कपूर) आयपीएलच्या खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्याचं काम करत असते. ती संभलगडच्या राजघराण्यात फिजिओथेरपिस्ट म्हणून जाते तीच मुळी राजघराण्याच्या आमंत्रणावरून. शेखरसिंह राजेसाहेबांचे (आमिर रझा हुसेन) पाय गुडघ्यापासून खाली पांगळे झाले आहेत, ते दुरुस्त करण्याचं काम मिलीवर आलं आहे. इथं त्या आघाताचीही एक वेगळी कहाणी आहे. राणीसाहेबांचा (रत्ना पाठक-शाह) दरारा सुरुवातीलाच जाणवतो, परंतु नंतर त्या दराऱ्यामागचं सूत्र मात्र हरवत जातं. युवराज विक्रमसिंह राठोड (फवाद खान) आणि मिलीची सुरुवातीला चकमक उडते आणि नंतर हळूहळू त्यांची गाडी योग्य त्या (प्रेमाच्या) ट्रॅकवर जातेच. पण हा सगळा प्रवास साकारताना मिलीला त्या घरातील शिस्तीखाली दबलेलं वातावरण हलकं करण्यासाठीचं प्रयोजन देण्यात दिग्दर्शक कमी पडला आहे. म्हणजे नव्या काळातील मुलगी म्हणून तिचं आधुनिक रूप दाखवण्याच्या नादात ती मुळात एक फिजिओ डॉक्टर आहे, याचाच दिग्दर्शकाला विसर पडलाय की काय, असं वाटतं. मिलीच्या आईचं पात्रही काहीसं डोईजड झालं आहे. एकुणात, यातल्या एका वेगळ्या जीवनशैलीतल्या मुलीमुळं एका बंदिस्त कुटुंबात होणारा कायापालट हा प्रवास काहीसा बाजूला राहतो आणि नायक-नायिकेच्या प्रेमकहाणीलाच अधिक महत्त्व येतं. त्यातच नायिकेचं अपहरण होण्याचा एक प्रसंग तर सिनेमात अक्षरशः ठिगळ चिकटवल्यासारखा येतो. तो मूळ कथानकाशी किंवा प्रवाहाशी मुळीच ‘इन सिंक’ नाही. उत्तरार्धातही सूरजगडच्या राजाकडं या दोघांचं जाणं, तिथं राजेसाहेबांसह तिघांनीही टल्ली होऊन पडणं, नंतर मिलीच्या आई-वडिलांचं संभलगडला येणं वगैरे भाग अति ताणल्यासारखा झाला आहे. शिवाय विक्रमच्या प्रेयसीचा - किआराचा - एक मुंबईतला ट्रॅक आहे. तोही फार अर्धवट आणि ठिगळ लावल्यासारखा आला आहे. थोडक्यात, सिनेमाच्या पटकथेत आणि संकलनातही बरीच गडबड झाली आहे. विशेषतः उत्तरार्ध सांधता सांधता दिग्दर्शकाची बरीच पंचाईत झालेली दिसून येते. त्यामुळंच प्रेक्षकही जांभया देऊ लागतो आणि शेवटाची वाट पाहू लागतो.
 अभिनयात सोनम कपूरनं बाजी मारली आहे. ती भारतातली सर्वश्रेष्ठ फॅशन आयकॉन आहे, यात शंकाच नाही. तिची ही भूमिका तिच्या या प्रतिमेला साजेशी आहे. तिनं खूप मनापासून एंजॉय केलेली मिली आपल्यालाही भावते. पण तिला कथेकडून नीट सपोर्ट मिळालेला नाही. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानही खूप अवघडल्यासारखा वावरला आहे. त्याच्या भूमिकेतही तसंच काहीसं अपेक्षित असलं, तरी जिथं खुलायला हवं तिथंही हे पात्र खुलताना दिसत नाही. एकूणच अत्यंत अनकम्फर्टेबल असा वावर फवादला पदार्पणात फार काही टाळ्या मिळवून देऊ शकणार नाही. रत्ना पाठक-शाह यांनी राणीसांचा तोरा ठसक्यात दाखवला आहे. पण विशेष म्हणजे ही भूमिकाही अर्धीकच्चीच वाटते. त्याउलट किरण खेर यांनी मंजूच्या भूमिकेत धमाल उडवली आहे. पण त्याही कधी कधी पात्राच्या बाहेर घेऊन लाफ्टर घेतायत की काय, असं वाटतं. असो.
सिनेमाला स्नेहा खानवलकर यांचं संगीत आहे. ‘एंजन की सिट्टी’ आणि ‘मेरी माँ का फोन’ ही गाणी मस्त जमली आहेत. बाकीची गाणीही चांगली आहेत, पण लक्षात राहत नाहीत.
तेव्हा ‘ब्यूटी विदाउट सोल’ म्हणजे काय, याचा अनुभव घ्यायचा असेल, तर ‘खूबसुरत’ नक्की पाहा; अन्यथा जुन्या खूबसूरतची डीव्हीडी केव्हाही चांगली.
---
निर्माता : वॉल्ट डिस्ने, अनिल कपूर फिल्म कंपनी, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक : शशांक घोष
कथा : इंदिरा बिश्त
संगीत : स्नेहा खानवलकर
प्रमुख भूमिका : सोनम कपूर, फवाद खान, रत्ना पाठक-शाह, किरण खेर, आमिर रझा हुसेन, प्रसन्नजित चॅटर्जी
कालावधी : दोन तास दहा मिनिटे
दर्जा : ** 
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २० सप्टेंबर २०१४)
----

13 Sept 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - फाइंडिंग फॅनी

प्रेमाच्या ‘गोवा’ जावे...
---------------------------
 आयुष्यात योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले नाहीत, जेव्हा जी गोष्ट बोलायची तेव्हा ती बोलली नाही तर पुढं जन्मभर पस्तावण्याची पाळी येते. विशेषतः प्रेम व्यक्त करण्याबाबत तर हे खासच लागू आहे. दिग्दर्शक होमी अदजानिया त्याच्या ‘फाइंडिंग फॅनी’ या नव्या हिंग्लिश सिनेमातून हाच संदेश हलक्याफुलक्या मांडणीतून देतो. हिंदी चित्रपटसृष्टीतले काही दिग्गज कलाकार, गोव्याच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा आणि कथेच्या प्रवासात येणारे अनेक हसरे, प्रसन्न क्षण यामुळं ही ‘प्रेमाच्या गावा (किंवा गोवा!)’ नेणारी गोष्ट जमून आली आहे. नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया या तिघा सर्वार्थानं बड्या कलाकारांचा एकत्रित असा हा पहिलाच सिनेमा असावा. या तिघांना पडद्यावर पाहणं हीच एक ‘ट्रीट’ आहे. केवळ तेवढ्या कारणासाठीसुद्धा या सिनेमाचं तिकीट काढायला हरकत नाही. आणि हो, दीपिका पदुकोणला विसरून कसं चालेल? पडद्यावरच्या या फडफडत्या सुरमईला पाहून अनेकांचे प्राण कंठाशी (आणि... जाऊ द्या!) नाही आले, तर बोला...
‘फाइंडिंग फॅनी’ पाहताना गोव्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या अनेक सिनेमांची आठवण येते. गोव्यातला सिनेमा म्हटलं, की तिथली सुंदर बंगलीवजा घरं, त्यात राहणारी एखादी प्रेमळ मिस नॅनी किंवा फतार्डो अंकल, मदमस्त बीचेस, तिथलं नैसर्गिक (आणि मॅनमेड) अनावृत्त सौंदर्य, शेतातून जाणारे छोटेसे नागमोडी रस्ते, हिरवागार निसर्ग, चर्चेस, धबधब्याप्रमाणं वाहणारी वारुणी आणि ‘सर्वच’ बाबतींत मनमुक्त असलेली तरुणी या गोष्टी म्हणजे मस्टच. ‘फाइंडिंग फॅनी’तही हे सगळं आहे. पण फक्त एवढंच नाही. गोव्याच्या प्रेमात पडणाऱ्या सिनेमांपेक्षा तिथल्या माणसांच्या प्रेमात तो अधिक आहे. या माणसांच्या प्रेमाची भाषाही अर्थात वैश्विक आहे. त्यामुळंच वरकरणी विचित्र, अत्रंगी भासणाऱ्या गोयंकराच्या काळजातलं - शहाळ्यातल्या पाण्यासारखं - गोड प्रेम आपल्याला सहज भिडतं.
‘फाइंडिंग फॅनी’ला फार काही नाट्यमय अशी गोष्ट नाही. एका अर्थानं हा ‘रोड मूव्ही’ आहे. गोव्यातल्या (नकाशावर न सापडणाऱ्या) पोकोली गावात राहणाऱ्या रोझी (डिंपल) आणि तिची सून अँजेलिना (दीपिका) या दोघींनीही आपापले पती गमावले आहेत आणि त्यांना आता एकमेकींचाच आधार आहे. त्याच गावात राहणारा ज्येष्ठ पोस्टमन फर्डिनांड पिंटो उर्फ फर्डी (नसीर) याला एकच दुःख आहे. त्याची प्रेयसी फॅनी हिला त्यानं ४६ वर्षांपूर्वी पाठवलेलं प्रेमपत्र त्याला सापडलं आहे. हे पत्र तिच्यापर्यंत कधीच पोचू शकलेलं नाही. आता तिला शोधण्याची जबाबदारी अँजीनं घेतली आहे. तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर सॅव्हिओ (अर्जुन कपूर) याचं गॅरेज आहे. एक अवलिया चित्रकार डॉन पेद्रो (पंकज कपूर) याची एक खटारा गाडी सॅव्हिओकडं आहे. अशा काही गोष्टी घडतात, की हे सगळेच जण त्या खटाऱ्यातून फॅनीच्या शोधात निघतात. रोझीचं जीव की प्राण असलेलं मांजरही त्यांच्यासोबत असतं.
हा प्रवास म्हणजे या सिनेमाचा आत्मा आहे. वेगवेगळ्या स्वभावाचे पाच जीव आता नाइलाजानं एकमेकांच्या घट्ट संगतीत आलेले असतात. सिनेमातल्या गोष्टीत मग काही तरी नाट्य घडावं लागतं. तसं एका निर्जन ठिकाणी ही गाडी पेट्रोल संपल्यानं बंद पडते आणि रस्त्यावरच या सर्वांना ती रात्र काढावी लागते. फर्डी पेट्रोल आणायला म्हणून निघून जातो. इकडं अँजीच्या आयुष्यातून निघून गेलेला सॅव्ही तिला पुन्हा नव्यानं इथं भेटतो. गतआयुष्याची उजळणी होते. तू अचानक आयुष्यातून का निघून गेलीस, असं तो विचारतो. त्यावर प्रेम व्यक्त केलंच नाहीस तर मला कळणार कसं, असं तिचं उत्तर. हेही थेट फर्डी आणि फॅनीसारखंच! दुसरीकडं पेद्रो महाशय आणि रोझी यांच्यात ब्रँडीच्या साथीनं हळूहळू जवळीक निर्माण होते. सकाळ होते, तेव्हा बरंच काही घडून गेलेलं असतं. अँजी आणि सॅव्हीत शेवटी अँजीलाच पुढाकार घ्यावा लागतो. चित्रकार महोदय सकाळी रोझीला आपलं नवं मॉडेल बनवून उभं करतात. सकाळी फर्डी परत येतो आणि पुढचा प्रवास सुरू होतो. फर्डिनांडला शेवटी त्याची फॅनी भेटते का, बाकीच्या चौघांचं काय होतं, त्यांच्यात नव्यानं निर्माण झालेल्या हळुवार नात्यांचं काय होतं, हे सगळं प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं.
‘फाइंडिंग फॅनी’ प्रेमाची गोष्ट सांगत असला, तरी तो काकवीसारखा गोडगिट्ट नाही. त्यात अनेक हसरे, मजेचे क्षण आहेत. मानवी स्वभावाच्या वैशिष्ट्यांचे अनेक बारीकसारीक कंगोरे टिपत दिग्दर्शकानं हे क्षण साजरे केले आहेत. त्यामुळं ‘फॅनी’ पाहताना कंटाळा येत नाही. विशेषतः नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल या तिघांनीही कमाल केली आहे. हे तिघेही एवढे ग्रेट आहेत, की ते कुठल्याही भूमिकेत चटकन शिरू शकतात. संपूर्णपणे ती व्यक्तिरेखा आत्मसात करू शकतात. त्यामुळंच यातला फर्डी कुठंही नसीर वाटत नाही; तो फर्डीच वाटतो. हळवा, काहीसा भाबडा, फॅनीच्या आठवणीनं व्याकुळ झालेला फर्डी नसीरुद्दीन शहा यांनी ज्या पद्धतीनं साकारला आहे, ते पाहण्यासारखं आहे. तीच गोष्ट पंकज कपूरची. हा माणूस पाच मिनिटांच्या भूमिकेतही आपली छाप सोडून जातो. इथला त्याचा अवली चित्रकारही त्यानं बहारीनं ‘रंगवला’ आहे. डिंपलची ग्रेस आणि चार्म अजूनही कायम आहे. ही बाई खरोखर केवळ डोळ्यांतून बोलते. सागर जैसी आँखोवाली ही अभिनेत्री पडद्याला जिवंत करते. दीपिका पदुकोण या सिनेमात खरंच खूप छान दिसली आहे. तिनं अँजीचं काम अत्यंत सहज-सोप्या लयीत केलं आहे. अर्जुन कपूरनंही सॅव्हिओ चांगला साकारला आहे.
तांत्रिक बाजूंमध्ये अनिल मेहतांची सिनेमॅटोग्राफी गोव्याचं उत्तम दर्शन घडवते. संगीतही चांगलं आहे. कोकणी भाषेतील गीतं मजा आणतात.
थोडक्यात, तेव्हा आपलं वर्षानुर्षं हरवलेलं प्रेम शोधायचं असेल, तर ‘फाइंडिंग फॅनी’ हा सिनेमा तुमचा दीपस्तंभ आहे. त्याची मदत घ्या आणि आपलं प्रेम परत मिळवा...
--
निर्माता : दिनेश विजन
दिग्दर्शक : होमी अदजानिया
कथा-पटकथा : होमी अदजानिया, केरसी खंबाटा
सिनेमॅटोग्राफी : अनिल मेहता
संगीत : मथायस ड्युप्लेसी, सचिन-जिगर
प्रमुख कलाकार : नसीरुद्दीन शाह, दीपिका पदुकोण, पंकज कपूर, डिंपल कपाडिया, अर्जुन कपूर
कालावधी : एक तास ४३ मिनिटे
दर्जा - ***
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १३ सप्टेंबर २०१४)

6 Sept 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - मेरी कोम

नॉकआउट पंच...!
----------------------
 भारताची अव्वल दर्जाची बॉक्सर मेरी कोम हिच्या आयुष्यावर दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी काढलेला मेरी कोम हा नवा हिंदी सिनेमा म्हणजे एक जबरदस्त नॉकआउट पंच आहे. प्रियांका चोप्रानं कायाप्रवेश करून साकारलेली मेरी कोम केवळ अप्रतिम. खास तिच्यासाठी हा सिनेमा पाहायला हवाच; पण मणिपूरसारख्या ईशान्येकडील राज्यातून आलेल्या आणि आपल्या देशावर अत्यंत प्रेम करणाऱ्या मेरीसारख्या अनेक खेळाडूंसाठी तो पाहायला हवा, बॉक्सिंगसारख्या खेळात तब्बल सहा वेळा जागतिक विजेतेपद मिळविणाऱ्या मेरीच्या अफाट मेहनतीसाठी पाहायला हवा, लग्न आणि दोन मुलं झाल्यावर कमबॅक करताना सर्व अडथळ्यांवर मात करण्याच्या तिच्या जिद्दीसाठी पाहायला हवा, मेरीनं विजेतेपद मिळवल्यानंतर भारताचा ध्वज उंच जाताना आणि राष्ट्रगीत सुरू झाल्यावर सर्व प्रेक्षागृह उठून उभे राहत मेरीच्या संघर्षाला आणि तिच्या यशाला दाद देतानाचा अनुभव घेण्यासाठीही तो पाहायला हवा...!
एक सिनेमा, एक कलाकृती म्हणून स्वतंत्रपणे विचार केल्यास मेरी कोम हा काही सर्वोत्तम झालेला सिनेमा नाही. त्यात त्रुटी नक्कीच आहेत. पण त्यापलीकडं जाऊन सिनेमातल्या प्रमुख पात्रानं भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांशी एवढं घट्ट नातं जोडणं फार क्वचित घडतं. ते मेरीच्या बाबतीत होतं. त्यामुळंच तिची ही यशोगाथा आपल्याला केवळ तटस्थपणे पाहता येत नाही, तर सिनेमातल्या गोष्टीत घुसून तिच्याबरोबर तिचं हसणं, तिचं रडणं, तिचं दुःख, तिचा संघर्ष यात आपल्याला बरोबरीचा भागीदार व्हायला सांगते. तसं झाल्यानंतर मेरीनं खाल्लेला जोरदार पंच आपल्याही चेहऱ्यावर बसतो आणि तिनं समोरच्या प्रतिस्पर्ध्याला मारलेला नॉकआउट पंच आपल्याच पंजातून गेल्याप्रमाणं तिथं रक्त सळसळतं... हे असं होतं याचं कारण मेरीच्या गोष्टीतला अस्सल भारतीयपणा... तिच्या गोष्टीत सदैव असलेला एक भावनिक धागा...
एरवी एखाद्या मोठ्या व्यक्तीवर चरित्रपट बनविताना त्यातल्या तपशिलाच्या अचूकपणाचं व्यवधान सांभाळण्यात दिग्दर्शकाची निम्मी एनर्जी संपते. मेरी कोम या सिनेमाच्या सुदैवानं (आणि खऱ्या मेरी कोमच्या, किंबहुना आपल्या दुर्दैवानं) तिच्या आयुष्याविषयी फार सखोल माहिती प्रेक्षकांना नाही. तिचं नाव वृत्तपत्रांतून माहिती असण्यापलीकडं या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यातला संघर्ष जाणून घेण्यात हा सिनेमा येण्यापूर्वी किती लोकांनी रस दाखवला असेल, हा प्रश्नच आहे. मात्र, या वस्तुस्थितीचा सिनेमाला प्रत्यक्षात फायदाच झाला आहे. दिग्दर्शकानं अचूक डिटेलिंग केलं असलं, तरी ते सारखं क्रॉस-चेक करण्याकडं प्रेक्षकांचं लक्ष गुंतत नाही आणि तो समोर दाखविल्या जात असलेल्याच गोष्टीत नेमका खिळून राहतो. सिनेमाची सुरुवात फार काही आकर्षक नाही आणि त्यामुळं पुढचा प्रवास कसा होणार या चिंतेत आपण पडतो. सुदैवानं पहिले दोन पंच खाल्ल्यानंतर बॉक्सरनं सावरावं आणि नंतर एकामागून एक पंचेस मारून प्रतिस्पर्ध्याला घायाळ करावं, तसं या ओमंग कुमारचं झालं आहे. विशेषतः उत्तरार्धातलं मेरीचं लग्न आणि मुलांनंतरचं कमबॅक आणि अचाट मेहनत करून तिनं मिळवलेलं यश हा भाग चढत्या श्रेणीनं रंगलाय. यातल्या ‘सलाम इंडिया...’ या एकाच गाण्यात मेरी आणि तिचे प्रशिक्षक मनालीच्या कॅम्पमध्ये घेत असलेलं अत्यंत कष्टप्रद ट्रेनिंग दाखवलं आहे. ते गाणं म्हणजे अॅड्रेनलिनचा धबधबाच आहे. कोमातला माणूसही उठून रिंगमध्ये येईल, एवढं हे चित्रिकरण प्रभावी झालं आहे. यातल्या वर्कआउटसाठी प्रियांकाला खरोखर सलाम! याशिवाय मेरी तिच्या आयुष्यात सदैव बॉक्सिंगच जगत असते, हे दाखवणे काही प्रसंग आणि बारकावेही मस्त जमले आहेत. एकदा मणिपुरी पद्धतीचं नृत्य करतानाही प्रियांका बॉक्सिंग खेळल्यासारखे हवेत ठोसे मारते, तो प्रसंग किंवा चीनमधील स्पर्धेच्या आधी ती नखांवर नेलपॉलिशनं तिरंगा रंगवीत असल्याचा प्रसंग... अशा छोट्या गोष्टींतून मेरीचं बॉक्सिंग आणि देशावरचं प्रेम दिसत राहतं. मणिपूरमधील कांगाथेई येथील गरीब तांदूळ उत्पादक शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेल्या मांगते चुंगनेईजांग मेरी कोम या मुलीचा वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरी कोम या जगविख्यात खेळाडूपर्यंतचा प्रवास दिग्दर्शकानं मोजक्याच, पण प्रभावी प्रसंगांतून दाखवला आहे. बॉक्सिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्याची मस्ती, त्याच्याशी मेरीनं घेतलेला पंगा, नंतर एकदा एका स्पर्धेनंतर मेरीनं त्याच्या दिशेनं खुर्ची फेकून मारण्याचा प्रसंग, नंतर तिला मागावी लागलेली माफी, त्या वेळी पदाधिकाऱ्यानं केलेला अपमान, नंतर परदेश दौऱ्यावर याच पदाधिकाऱ्याला मेरी आणि तिच्या मैत्रिणींना सुनावण्याचा प्रसंग या सर्व मालिकेतून दिग्दर्शक खेळातलं राजकारणही दाखवतो. हे सर्वच प्रसंग जमले आहेत आणि त्यातला मेरीचा संघर्ष पुरेशा तीव्रतेनं समोर येतो.
प्रियांका चोप्रानं साकारलेली मेरी खरोखरच खूपच कमाल आहे. तिनं या भूमिकेसाठी घेतलेले कष्ट अफाट आहेत. मेरीच्या टीनएजपासून ते दोन मुलांची आई होण्यापर्यंतचा प्रवास तिनं दाखवला आहे. एका बॉक्सरची देहबोली तिनं अचूक दाखविली आहे. बॉक्सिंग रिंगमधले तिचे सर्वच सीन अगदी ‘ऑथेंटिक’ झाले आहेत. त्यासाठी दिग्दर्शकानं घेतलेली खास मेहनत जाणवते. एम. नरजितसिंग या तिच्या कोचच्या भूमिकेत सुनील थापा आणि पती ऑन्लरच्या भूमिकेत दर्शनकुमार यांनीही तिला चांगली साथ दिली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत असलेल्या ‘दिग्दर्शक’ संजय लीला भन्साळींचा टच अनेक ठिकाणी जाणवल्याशिवाय राहत नाही.
सिनेमात काही गाणीही आहेत आणि ती त्या त्या वेळेला ऐकण्यापुरती चांगली वाटतात. हल्ली अनेक सिनेमांत बऱ्याच उत्पादनांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिराती केल्या जातात. याही सिनेमात काही उत्पादनांच्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. मात्र या कथेसाठी त्या हास्यास्पद ठरल्या आहेत.
मणिपूर म्हटलं, की अजूनही अनेकांना ते आपल्या देशात नक्की कुठं आहे किंवा मुळात ते आपल्या देशात आहे का, असे प्रश्न पडतात. या पार्श्वभूमीवर याच राज्यातून आलेल्या आणि सहा वेळा हौशी मुष्टियुद्ध स्पर्धेचं विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या या महान खेळाडूची ही प्रेरक कथा मोठ्या पडद्यावर नक्की पाहाच. आपण अधिक भारतीय झाल्याचा फील येईल शेवटी...
---
निर्माता : संजय लीला भन्साळी, व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : ओमंग कुमार
कथा-पटकथा : सैविन क्वाड्रास
संवाद : करणसिंह राठोड, रामेंद्र वशिष्ठ
सिनेमॅटोग्राफी : कैको नाकाहारा
संगीत : शशी-शिवम्
प्रमुख भूमिका : प्रियांका चोप्रा, सुनील थापा, दर्शनकुमार, रॉबिन दास
कालावधी : दोन तास तीन मिनिटे
दर्जा - *** १/२
---
(पू्र्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, ६ सप्टेंबर २०१४)
---