नॉकआउट पंच...!
----------------------
भारताची अव्वल दर्जाची बॉक्सर मेरी कोम हिच्या
आयुष्यावर दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी काढलेला मेरी कोम हा नवा हिंदी
सिनेमा म्हणजे एक जबरदस्त नॉकआउट पंच आहे. प्रियांका चोप्रानं कायाप्रवेश
करून साकारलेली मेरी कोम केवळ अप्रतिम. खास तिच्यासाठी हा सिनेमा पाहायला
हवाच; पण मणिपूरसारख्या ईशान्येकडील राज्यातून आलेल्या आणि आपल्या देशावर
अत्यंत प्रेम करणाऱ्या मेरीसारख्या अनेक खेळाडूंसाठी तो पाहायला हवा,
बॉक्सिंगसारख्या खेळात तब्बल सहा वेळा जागतिक विजेतेपद मिळविणाऱ्या
मेरीच्या अफाट मेहनतीसाठी पाहायला हवा, लग्न आणि दोन मुलं झाल्यावर कमबॅक
करताना सर्व अडथळ्यांवर मात करण्याच्या तिच्या जिद्दीसाठी पाहायला हवा,
मेरीनं विजेतेपद मिळवल्यानंतर भारताचा ध्वज उंच जाताना आणि राष्ट्रगीत सुरू
झाल्यावर सर्व प्रेक्षागृह उठून उभे राहत मेरीच्या संघर्षाला आणि तिच्या
यशाला दाद देतानाचा अनुभव घेण्यासाठीही तो पाहायला हवा...!
एक सिनेमा, एक कलाकृती म्हणून स्वतंत्रपणे
विचार केल्यास मेरी कोम हा काही सर्वोत्तम झालेला सिनेमा नाही. त्यात
त्रुटी नक्कीच आहेत. पण त्यापलीकडं जाऊन सिनेमातल्या प्रमुख पात्रानं
भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांशी एवढं घट्ट नातं जोडणं फार क्वचित घडतं. ते
मेरीच्या बाबतीत होतं. त्यामुळंच तिची ही यशोगाथा आपल्याला केवळ तटस्थपणे
पाहता येत नाही, तर सिनेमातल्या गोष्टीत घुसून तिच्याबरोबर तिचं हसणं, तिचं
रडणं, तिचं दुःख, तिचा संघर्ष यात आपल्याला बरोबरीचा भागीदार व्हायला
सांगते. तसं झाल्यानंतर मेरीनं खाल्लेला जोरदार पंच आपल्याही चेहऱ्यावर
बसतो आणि तिनं समोरच्या प्रतिस्पर्ध्याला मारलेला नॉकआउट पंच आपल्याच
पंजातून गेल्याप्रमाणं तिथं रक्त सळसळतं... हे असं होतं याचं कारण मेरीच्या
गोष्टीतला अस्सल भारतीयपणा... तिच्या गोष्टीत सदैव असलेला एक भावनिक
धागा...
एरवी एखाद्या मोठ्या व्यक्तीवर चरित्रपट
बनविताना त्यातल्या तपशिलाच्या अचूकपणाचं व्यवधान सांभाळण्यात दिग्दर्शकाची
निम्मी एनर्जी संपते. मेरी कोम या सिनेमाच्या सुदैवानं (आणि खऱ्या मेरी
कोमच्या, किंबहुना आपल्या दुर्दैवानं) तिच्या आयुष्याविषयी फार सखोल माहिती
प्रेक्षकांना नाही. तिचं नाव वृत्तपत्रांतून माहिती असण्यापलीकडं या
खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यातला संघर्ष जाणून घेण्यात हा सिनेमा
येण्यापूर्वी किती लोकांनी रस दाखवला असेल, हा प्रश्नच आहे. मात्र, या
वस्तुस्थितीचा सिनेमाला प्रत्यक्षात फायदाच झाला आहे. दिग्दर्शकानं अचूक
डिटेलिंग केलं असलं, तरी ते सारखं क्रॉस-चेक करण्याकडं प्रेक्षकांचं लक्ष
गुंतत नाही आणि तो समोर दाखविल्या जात असलेल्याच गोष्टीत नेमका खिळून
राहतो. सिनेमाची सुरुवात फार काही आकर्षक नाही आणि त्यामुळं पुढचा प्रवास
कसा होणार या चिंतेत आपण पडतो. सुदैवानं पहिले दोन पंच खाल्ल्यानंतर
बॉक्सरनं सावरावं आणि नंतर एकामागून एक पंचेस मारून प्रतिस्पर्ध्याला घायाळ
करावं, तसं या ओमंग कुमारचं झालं आहे. विशेषतः उत्तरार्धातलं मेरीचं लग्न
आणि मुलांनंतरचं कमबॅक आणि अचाट मेहनत करून तिनं मिळवलेलं यश हा भाग चढत्या
श्रेणीनं रंगलाय. यातल्या ‘सलाम इंडिया...’ या एकाच गाण्यात मेरी आणि तिचे
प्रशिक्षक मनालीच्या कॅम्पमध्ये घेत असलेलं अत्यंत कष्टप्रद ट्रेनिंग
दाखवलं आहे. ते गाणं म्हणजे अॅड्रेनलिनचा धबधबाच आहे. कोमातला माणूसही उठून
रिंगमध्ये येईल, एवढं हे चित्रिकरण प्रभावी झालं आहे. यातल्या वर्कआउटसाठी
प्रियांकाला खरोखर सलाम! याशिवाय मेरी तिच्या आयुष्यात सदैव बॉक्सिंगच जगत
असते, हे दाखवणे काही प्रसंग आणि बारकावेही मस्त जमले आहेत. एकदा मणिपुरी
पद्धतीचं नृत्य करतानाही प्रियांका बॉक्सिंग खेळल्यासारखे हवेत ठोसे मारते,
तो प्रसंग किंवा चीनमधील स्पर्धेच्या आधी ती नखांवर नेलपॉलिशनं तिरंगा
रंगवीत असल्याचा प्रसंग... अशा छोट्या गोष्टींतून मेरीचं बॉक्सिंग आणि
देशावरचं प्रेम दिसत राहतं. मणिपूरमधील कांगाथेई येथील गरीब तांदूळ उत्पादक
शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेल्या मांगते चुंगनेईजांग मेरी कोम या मुलीचा
वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरी कोम या जगविख्यात खेळाडूपर्यंतचा प्रवास
दिग्दर्शकानं मोजक्याच, पण प्रभावी प्रसंगांतून दाखवला आहे. बॉक्सिंग
फेडरेशनच्या पदाधिकाऱ्याची मस्ती, त्याच्याशी मेरीनं घेतलेला पंगा, नंतर
एकदा एका स्पर्धेनंतर मेरीनं त्याच्या दिशेनं खुर्ची फेकून मारण्याचा
प्रसंग, नंतर तिला मागावी लागलेली माफी, त्या वेळी पदाधिकाऱ्यानं केलेला
अपमान, नंतर परदेश दौऱ्यावर याच पदाधिकाऱ्याला मेरी आणि तिच्या मैत्रिणींना
सुनावण्याचा प्रसंग या सर्व मालिकेतून दिग्दर्शक खेळातलं राजकारणही
दाखवतो. हे सर्वच प्रसंग जमले आहेत आणि त्यातला मेरीचा संघर्ष पुरेशा
तीव्रतेनं समोर येतो.
प्रियांका चोप्रानं साकारलेली मेरी खरोखरच खूपच
कमाल आहे. तिनं या भूमिकेसाठी घेतलेले कष्ट अफाट आहेत. मेरीच्या
टीनएजपासून ते दोन मुलांची आई होण्यापर्यंतचा प्रवास तिनं दाखवला आहे. एका
बॉक्सरची देहबोली तिनं अचूक दाखविली आहे. बॉक्सिंग रिंगमधले तिचे सर्वच सीन
अगदी ‘ऑथेंटिक’ झाले आहेत. त्यासाठी दिग्दर्शकानं घेतलेली खास मेहनत
जाणवते. एम. नरजितसिंग या तिच्या कोचच्या भूमिकेत सुनील थापा आणि पती
ऑन्लरच्या भूमिकेत दर्शनकुमार यांनीही तिला चांगली साथ दिली आहे.
निर्मात्याच्या भूमिकेत असलेल्या ‘दिग्दर्शक’ संजय लीला भन्साळींचा टच अनेक
ठिकाणी जाणवल्याशिवाय राहत नाही.
सिनेमात काही गाणीही आहेत आणि ती त्या त्या
वेळेला ऐकण्यापुरती चांगली वाटतात. हल्ली अनेक सिनेमांत बऱ्याच
उत्पादनांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिराती केल्या जातात. याही सिनेमात
काही उत्पादनांच्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. मात्र या कथेसाठी त्या
हास्यास्पद ठरल्या आहेत.
मणिपूर म्हटलं, की अजूनही अनेकांना ते आपल्या
देशात नक्की कुठं आहे किंवा मुळात ते आपल्या देशात आहे का, असे प्रश्न
पडतात. या पार्श्वभूमीवर याच राज्यातून आलेल्या आणि सहा वेळा हौशी
मुष्टियुद्ध स्पर्धेचं विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या या महान खेळाडूची ही
प्रेरक कथा मोठ्या पडद्यावर नक्की पाहाच. आपण अधिक भारतीय झाल्याचा फील
येईल शेवटी...
---
निर्माता : संजय लीला भन्साळी, व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : ओमंग कुमार
कथा-पटकथा : सैविन क्वाड्रास
संवाद : करणसिंह राठोड, रामेंद्र वशिष्ठ
सिनेमॅटोग्राफी : कैको नाकाहारा
संगीत : शशी-शिवम्
प्रमुख भूमिका : प्रियांका चोप्रा, सुनील थापा, दर्शनकुमार, रॉबिन दास
कालावधी : दोन तास तीन मिनिटे
दर्जा - *** १/२
---
(पू्र्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, ६ सप्टेंबर २०१४)
---
No comments:
Post a Comment