13 Sept 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - फाइंडिंग फॅनी

प्रेमाच्या ‘गोवा’ जावे...
---------------------------
 आयुष्यात योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले नाहीत, जेव्हा जी गोष्ट बोलायची तेव्हा ती बोलली नाही तर पुढं जन्मभर पस्तावण्याची पाळी येते. विशेषतः प्रेम व्यक्त करण्याबाबत तर हे खासच लागू आहे. दिग्दर्शक होमी अदजानिया त्याच्या ‘फाइंडिंग फॅनी’ या नव्या हिंग्लिश सिनेमातून हाच संदेश हलक्याफुलक्या मांडणीतून देतो. हिंदी चित्रपटसृष्टीतले काही दिग्गज कलाकार, गोव्याच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा आणि कथेच्या प्रवासात येणारे अनेक हसरे, प्रसन्न क्षण यामुळं ही ‘प्रेमाच्या गावा (किंवा गोवा!)’ नेणारी गोष्ट जमून आली आहे. नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया या तिघा सर्वार्थानं बड्या कलाकारांचा एकत्रित असा हा पहिलाच सिनेमा असावा. या तिघांना पडद्यावर पाहणं हीच एक ‘ट्रीट’ आहे. केवळ तेवढ्या कारणासाठीसुद्धा या सिनेमाचं तिकीट काढायला हरकत नाही. आणि हो, दीपिका पदुकोणला विसरून कसं चालेल? पडद्यावरच्या या फडफडत्या सुरमईला पाहून अनेकांचे प्राण कंठाशी (आणि... जाऊ द्या!) नाही आले, तर बोला...
‘फाइंडिंग फॅनी’ पाहताना गोव्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या अनेक सिनेमांची आठवण येते. गोव्यातला सिनेमा म्हटलं, की तिथली सुंदर बंगलीवजा घरं, त्यात राहणारी एखादी प्रेमळ मिस नॅनी किंवा फतार्डो अंकल, मदमस्त बीचेस, तिथलं नैसर्गिक (आणि मॅनमेड) अनावृत्त सौंदर्य, शेतातून जाणारे छोटेसे नागमोडी रस्ते, हिरवागार निसर्ग, चर्चेस, धबधब्याप्रमाणं वाहणारी वारुणी आणि ‘सर्वच’ बाबतींत मनमुक्त असलेली तरुणी या गोष्टी म्हणजे मस्टच. ‘फाइंडिंग फॅनी’तही हे सगळं आहे. पण फक्त एवढंच नाही. गोव्याच्या प्रेमात पडणाऱ्या सिनेमांपेक्षा तिथल्या माणसांच्या प्रेमात तो अधिक आहे. या माणसांच्या प्रेमाची भाषाही अर्थात वैश्विक आहे. त्यामुळंच वरकरणी विचित्र, अत्रंगी भासणाऱ्या गोयंकराच्या काळजातलं - शहाळ्यातल्या पाण्यासारखं - गोड प्रेम आपल्याला सहज भिडतं.
‘फाइंडिंग फॅनी’ला फार काही नाट्यमय अशी गोष्ट नाही. एका अर्थानं हा ‘रोड मूव्ही’ आहे. गोव्यातल्या (नकाशावर न सापडणाऱ्या) पोकोली गावात राहणाऱ्या रोझी (डिंपल) आणि तिची सून अँजेलिना (दीपिका) या दोघींनीही आपापले पती गमावले आहेत आणि त्यांना आता एकमेकींचाच आधार आहे. त्याच गावात राहणारा ज्येष्ठ पोस्टमन फर्डिनांड पिंटो उर्फ फर्डी (नसीर) याला एकच दुःख आहे. त्याची प्रेयसी फॅनी हिला त्यानं ४६ वर्षांपूर्वी पाठवलेलं प्रेमपत्र त्याला सापडलं आहे. हे पत्र तिच्यापर्यंत कधीच पोचू शकलेलं नाही. आता तिला शोधण्याची जबाबदारी अँजीनं घेतली आहे. तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर सॅव्हिओ (अर्जुन कपूर) याचं गॅरेज आहे. एक अवलिया चित्रकार डॉन पेद्रो (पंकज कपूर) याची एक खटारा गाडी सॅव्हिओकडं आहे. अशा काही गोष्टी घडतात, की हे सगळेच जण त्या खटाऱ्यातून फॅनीच्या शोधात निघतात. रोझीचं जीव की प्राण असलेलं मांजरही त्यांच्यासोबत असतं.
हा प्रवास म्हणजे या सिनेमाचा आत्मा आहे. वेगवेगळ्या स्वभावाचे पाच जीव आता नाइलाजानं एकमेकांच्या घट्ट संगतीत आलेले असतात. सिनेमातल्या गोष्टीत मग काही तरी नाट्य घडावं लागतं. तसं एका निर्जन ठिकाणी ही गाडी पेट्रोल संपल्यानं बंद पडते आणि रस्त्यावरच या सर्वांना ती रात्र काढावी लागते. फर्डी पेट्रोल आणायला म्हणून निघून जातो. इकडं अँजीच्या आयुष्यातून निघून गेलेला सॅव्ही तिला पुन्हा नव्यानं इथं भेटतो. गतआयुष्याची उजळणी होते. तू अचानक आयुष्यातून का निघून गेलीस, असं तो विचारतो. त्यावर प्रेम व्यक्त केलंच नाहीस तर मला कळणार कसं, असं तिचं उत्तर. हेही थेट फर्डी आणि फॅनीसारखंच! दुसरीकडं पेद्रो महाशय आणि रोझी यांच्यात ब्रँडीच्या साथीनं हळूहळू जवळीक निर्माण होते. सकाळ होते, तेव्हा बरंच काही घडून गेलेलं असतं. अँजी आणि सॅव्हीत शेवटी अँजीलाच पुढाकार घ्यावा लागतो. चित्रकार महोदय सकाळी रोझीला आपलं नवं मॉडेल बनवून उभं करतात. सकाळी फर्डी परत येतो आणि पुढचा प्रवास सुरू होतो. फर्डिनांडला शेवटी त्याची फॅनी भेटते का, बाकीच्या चौघांचं काय होतं, त्यांच्यात नव्यानं निर्माण झालेल्या हळुवार नात्यांचं काय होतं, हे सगळं प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं.
‘फाइंडिंग फॅनी’ प्रेमाची गोष्ट सांगत असला, तरी तो काकवीसारखा गोडगिट्ट नाही. त्यात अनेक हसरे, मजेचे क्षण आहेत. मानवी स्वभावाच्या वैशिष्ट्यांचे अनेक बारीकसारीक कंगोरे टिपत दिग्दर्शकानं हे क्षण साजरे केले आहेत. त्यामुळं ‘फॅनी’ पाहताना कंटाळा येत नाही. विशेषतः नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल या तिघांनीही कमाल केली आहे. हे तिघेही एवढे ग्रेट आहेत, की ते कुठल्याही भूमिकेत चटकन शिरू शकतात. संपूर्णपणे ती व्यक्तिरेखा आत्मसात करू शकतात. त्यामुळंच यातला फर्डी कुठंही नसीर वाटत नाही; तो फर्डीच वाटतो. हळवा, काहीसा भाबडा, फॅनीच्या आठवणीनं व्याकुळ झालेला फर्डी नसीरुद्दीन शहा यांनी ज्या पद्धतीनं साकारला आहे, ते पाहण्यासारखं आहे. तीच गोष्ट पंकज कपूरची. हा माणूस पाच मिनिटांच्या भूमिकेतही आपली छाप सोडून जातो. इथला त्याचा अवली चित्रकारही त्यानं बहारीनं ‘रंगवला’ आहे. डिंपलची ग्रेस आणि चार्म अजूनही कायम आहे. ही बाई खरोखर केवळ डोळ्यांतून बोलते. सागर जैसी आँखोवाली ही अभिनेत्री पडद्याला जिवंत करते. दीपिका पदुकोण या सिनेमात खरंच खूप छान दिसली आहे. तिनं अँजीचं काम अत्यंत सहज-सोप्या लयीत केलं आहे. अर्जुन कपूरनंही सॅव्हिओ चांगला साकारला आहे.
तांत्रिक बाजूंमध्ये अनिल मेहतांची सिनेमॅटोग्राफी गोव्याचं उत्तम दर्शन घडवते. संगीतही चांगलं आहे. कोकणी भाषेतील गीतं मजा आणतात.
थोडक्यात, तेव्हा आपलं वर्षानुर्षं हरवलेलं प्रेम शोधायचं असेल, तर ‘फाइंडिंग फॅनी’ हा सिनेमा तुमचा दीपस्तंभ आहे. त्याची मदत घ्या आणि आपलं प्रेम परत मिळवा...
--
निर्माता : दिनेश विजन
दिग्दर्शक : होमी अदजानिया
कथा-पटकथा : होमी अदजानिया, केरसी खंबाटा
सिनेमॅटोग्राफी : अनिल मेहता
संगीत : मथायस ड्युप्लेसी, सचिन-जिगर
प्रमुख कलाकार : नसीरुद्दीन शाह, दीपिका पदुकोण, पंकज कपूर, डिंपल कपाडिया, अर्जुन कपूर
कालावधी : एक तास ४३ मिनिटे
दर्जा - ***
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १३ सप्टेंबर २०१४)

No comments:

Post a Comment