29 May 2018

परमाणू रिव्ह्यू

‘विस्फोटक’ थरार...
------------------------


भारतानं ११ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये तीन अणुचाचण्या केल्या आणि सगळं जग हादरलं. मी त्या वेळी नुकतीच ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून कामाला सुरुवात केली होती. तेव्हा भारतात राजकीयदृष्ट्या विलक्षण अस्थिरता होती. दोन वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांना १३ दिवसांच्या सत्तेनंतर बहुमताअभावी राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल या दोघांची पंतप्रधानपदाची अल्प कारकीर्द पार पडल्यानंतर १९ मार्च १९९८ रोजी पुन्हा वाजपेयी पंतप्रधान झाले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आत भारताने ‘पोखरण-२’ घडवून आपल्या आण्विक सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवलं होतं. वाजपेयी यांच्या कणखर नेतृत्वाची तेव्हा देशभरात प्रशंसा झाली होती. भारतानं पहिली अणुचाचणी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९७४ मध्ये पोखरणमध्ये केली होती, त्याला २४ वर्षं झाली होती. ‘आणि बुद्ध हसला’ या सांकेतिक नावाखाली पार पडलेली ती चाचणी होती. तेव्हा त्याला शांततामय विस्फोट म्हटलं गेलं होतं. मात्र, मधल्या काळात जगाची संरचना बदलून गेली होती. सोविएत युनियन लयाला गेलं होतं आणि जगावर अमेरिकेची एकछत्री सत्ता प्रस्थापित झाली होती. अमेरिकेला आव्हान देण्यासाठी चीन आपलं सामर्थ्य वाढवू लागला होता. अमेरिकेकडून पाकिस्तानला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यामुळं एकीकडं चीन, तर दुसरीकडं पाकिस्तान अशा कोंडीत देश सापडला होता. त्यात १९९० पासून काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या मार्गाने पाकिस्ताननं अघोषित युद्ध पुकारलं होतं. यात भरीस भर म्हणून राजीव गांधींच्या हत्येनंतर देशाला राजकीय अस्थिरतेनं घेरलं होतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वाजपेयींनी बहुमत मिळविताच अणुचाचण्या का घेतल्या, याचं उत्तर मिळू शकेल. या चाचण्यांना नुकतीच वीस वर्षं पूर्ण झाली. आता या वीस वर्षांतही पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. तेव्हा आता त्या घटनेकडं आपण पुन्हा एकदा काहीशा तटस्थतेनं पाहू शकतो. अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘परमाणू  - द स्टोरी
ऑफ पोखरण’ पाहताना आधी अशीच काहीशी भावना होती. मात्र, प्रत्यक्ष सिनेमा पाहताना देशप्रेमाच्या विलक्षण भावनेनं मन भरून जातं. राजकीय निर्णयांची वस्तुनिष्ठ चिकित्सा वगैरे गोष्टी, सिनेमात अणुचाचण्या झाल्यानंतर जवानांनी फडकवलेला तिरंगा पाहताना अश्रूंमध्ये वाहून जातात. काही गोष्टींना खरंच पर्याय नसतो. आपल्या देशावर आपलं सगळ्यांचं असलेलं प्रेम ही गोष्ट अशीच आहे. प्रसंग पडला, तर आपण एक देश म्हणून काय करू शकतो, याची फक्त एक किंचित झलक हा सिनेमा दाखवतो. ती झलक पाहताना मन देशाप्रती असलेल्या प्रेमाच्या, निष्ठेच्या, त्यागाच्या भावनेनं ओथंबून जातं. दिग्दर्शक म्हणून अभिषेक शर्माचं हे निखालस यश होय.
‘परमाणू’मध्ये ‘पोखरण-२’ चाचण्या भारतानं नक्की कुठल्या परिस्थितीत पार पाडल्या, याचा एखाद्या माहितीपटासारखा आढावा पाहायला मिळतो. मात्र, त्याच वेळी हा सिनेमा भावनांकावरही कमी पडत नाही. भय, निराशा, उत्सुकता, जिद्द, दु:ख, आनंद या सर्व मूलभूत मानवी भावना तो उत्कटतेनं दाखवतो. तेव्हाच्या परिस्थितीतला थरार नेमका टिपतो.
अश्वत्थ रैना (जॉन अब्राहम) या आयएएस ऑफिसरच्या नजरेतून हा सर्व सिनेमा आपल्याला पाहायला मिळतो. चीननं १९९५ मध्ये ४३ वी अणुचाचणी केल्यानंतर आता भारतानंही मागे न हटता, अणुचाचणी केली पाहिजे असं अश्वत्थचं मत असतं. त्यासाठी त्याच्याकडं एक गुप्त कार्यक्रमही ‘फ्लॉपी’मध्ये तयार असतो. मात्र, ‘नॉर्थ ब्लॉक’मधले नोकरशहा ज्युनिअर असलेल्या अश्वत्थची खिल्ली उडवतात. त्याच्या फ्लॉपीचा चहाचा कप ठेवण्यासाठी वापर करतात. त्यातून व्हायचं तेच होतं. अणुचाचणी करायचा निर्णय तर घेतला जातो, मात्र अश्वत्थची योजना समजावून न घेता, घाईनं चाचणीचा निर्णय घेतल्यानं अमेरिकेला हे कळतं आणि त्या देशाच्या दबावाखाली या चाचण्या रद्द करण्याची नामुष्की देशावर ओढवते. सर्व घटनाक्रमाची चौकशी होते आणि दोषी नसतानाही अश्वत्थवर सगळं खापर फुटतं व त्याला निलंबित केलं जातं.
मग बायको व मुलाला घेऊन तो मसुरीला निघून जातो आणि यूपीएससीचे क्लास घेत बसतो. तेव्हाच दिल्लीत सत्तांतर होतं आणि वाजपेयी पंतप्रधान होतात. हिमांशू शुक्ला (बोमन इराणी) पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून सूत्रे हाती घेतात. त्यानंतर अचानक सगळी सूत्रे फिरतात आणि अणुचाचणीचा विषय पुढं येतो. शुक्लाजी अश्वत्थला पाचारण करतात. आधी नाराज असलेला अश्वत्थ देशासाठी पुन्हा एकदा ही मोहीम हाती घ्यायला तयार होतो.
त्यानंतर सुरू होते ती या चाचणीची तयारी. इथून ते अखेर चाचण्या होईपर्यंतचा सर्व प्रवास म्हणजे भावभावनांची एक ‘रोलर कोस्टर’ राइड आहे. या मोहिमेतला सर्वांत मोठा धोका असतो, तो अमेरिकी उपग्रहांचा. त्यांना फसवून या चाचणीची तयारी करायची असते. जेव्हा या चाचण्या झाल्या, तेव्हा अमेरिकेनेही आपण याचा शोध घेण्यात कमी पडल्याची कबुली दिली होती. तेव्हा सगळ्या बातम्यांचा फोकस हाच होता, हेही मला आठवतंय. या सिनेमातही याच बाबीवर सगळा फोकस केंद्रित आहे. अश्वत्थ त्याची टीम कशी तयार करतो, मग ही टीम स्फोटांची सगळी तयारी कशी करते आणि त्यानंतर त्यांच्यासमोर काय काय अडथळे येत जातात, हे सगळं मध्यंतरापर्यंत येतं.
त्यानंतर घटना अधिकच वेगवान व्हायला लागतात. काही कारणांनी या चाचण्यांची तारीख अलीकडं आणावी लागते. चाचण्या होतात की नाही, अशीही एक वेळ येते. त्यात जॉनला घरच्या आघाडीवरही लढावं लागतं. शिवाय पोखरणमध्ये तळ ठोकून असलेल्या सीआयए आणि आयएसआयच्या दोन एजंटांना या गुप्त मोहिमेची कुणकुण लागते. त्यानंतर तर गोष्टी अधिकच जटिल होतात. त्यावर अश्वत्थ आणि त्याची टीम कशी मात करते, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं.
अशा थरारपटांमध्ये दोन गोष्टी असतात. एकात आपल्याला शेवटी काय घडतंय, हे माहिती नसतं. दुसऱ्यात आपल्याला शेवटी काय होणार हे नक्की माहिती असतं. ‘परमाणू’ हा दुसऱ्या वर्गातला सिनेमा आहे. अणुचाचण्या होऊन गेल्या आहेत. त्यामुळं या सिनेमात शेवटी काय घडणार, हे आपल्याला माहितीच असतं. अशा वेळी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणं आणि ‘आता काय होणार’ असं वाटायला लावणं ही खरी कसोटी असते. ‘परमाणू’ या कसोटीला पुरेपूर उतरतो. इतका, की अमेरिकेच्या व पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून एकदाचा तो महाप्रचंड, भयंकर असा अणुस्फोट होतो, तेव्हा प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात.
‘मद्रास कॅफे’नंतर ‘परमाणू’ हा जॉन अब्राहमचा हा आणखी एक मास्टरस्ट्रोक ठरला आहे. अशा प्रकारच्या भूमिकांवर सध्या फक्त अक्षयकुमारचीच छाप दिसून येते. मात्र, जॉननं इथं आपलं स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित केलं आहे. त्यानं अश्वस्थची भूमिका फार समरसून केली आहे. डायना पेंटी आणि त्याच्या टीममधल्या इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे. जॉनच्या पत्नीच्या भूमिकेत अनुजा साठेनं प्रभावी काम केलं आहे. बोमन इराणी नेहमीप्रमाणेच झकास!
भारताच्या अगदी नजीकच्या इतिहासाकडं पुन्हा नजर टाकण्याचा ‘झी स्टुडिओज’चा प्रयत्न राजकीय हेतूंनी प्रेरित नसेलच, असं म्हणता येत नाही. पण फक्त कलाकृती म्हणून विचार करता, ती उत्तम झाली आहे. त्यामुळं आपण तिचा आनंद लुटायला हरकत नाही. बाकी भारतीय जनता सुज्ञ आहेच!
---
दर्जा - चार स्टार
---

27 May 2018

बकेट लिस्ट रिव्ह्यू

‘श्रेयस’ची थाळी
-------------------

फर्स्ट थिंग फर्स्ट. माधुरीला ‘बकेट लिस्ट’मध्ये मधुरा साने म्हणून पाहणं हा एक सुखद, प्रेक्षणीय अनुभव आहे. किंबहुना ती अशी पडद्यावर तिचा खळाळता चेहरा घेऊन वावरते, तेव्हा सगळं काही विसरायला होतं. माधुरीचं वय आज ५१ आहे. यात तिनं ४१ वर्षांच्या गृहिणीची भूमिका साकारली आहे. फेअर इनफ! ती चाळिशीचीच दिसते, वाटते. अगदी अपवादात्मक प्रसंगांत तिचं वय दिसतं, जाणवतं. पण तेवढं थोडं नजरेआड केलं, तर तिला या मराठी चित्रपटात वावरताना पाहणं ही ‘ट्रीट’ आहे, यात शंका नाही.
माधुरी दीक्षितच्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला, तर ती प्रेक्षकांना एवढी का आवडते, हे सहज लक्षात येतं. नृत्यनिपुणता आणि कमालीचं सेक्स अपील यामुळं ती सर्वांना, विशेषत: पुरुष प्रेक्षकांना भावायची. या दोन गोष्टींपलीकडं विचार करू शकणाऱ्यांना तिचं खळाळतं, निर्मळ हसू मोहवायचं. अभिनयसम्राज्ञी वगैरे ती कधीच नव्हती. ती स्वत:ही असा दावा करणार नाही. माधुरी म्हणजे स्मिता किंवा दीप्ती नवल, गेला बाजार शबाना आझमी किंवा अगदी सोनाली कुलकर्णीही नव्हे. आपल्याला लोक आपल्या अभिनयासाठी ओळखत नाहीत, हे तिला नीटच माहिती आहे. आणि स्वत:च्या मर्यादांची जाणीव असणारे लोकच अपंरपार यश मिळवू शकतात, यात वाद नाही.
त्यामुळं मराठी चित्रपटात पदार्पण करताना तिनं पुण्यातल्या प्रभात रोडवर टुमदार बंगल्यात राहणाऱ्या सान्यांच्या सुनेची भूमिका स्वीकारावी, हे एकूण तिच्या आत्तापर्यंतच्या लौकिकाला साजेसंच झालं. एकदा का माधुरीची म्हणून ही जी चौकट आहे, ती मान्य केली, की मग पुढं तिच्याबाबत, तिच्या चित्रपटाबाबत, तिच्या अभिनयाबाबत, तिच्या नृत्याबाबत, तिच्या वयाबाबत (म्हणजे वयावर केलेली मात अशा अर्थानं) चर्चा करता येते.
‘बकेट लिस्ट’ हा तेजस प्रभा विजय देऊस्कर या तरुण दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला चित्रपट निवडताना माधुरीनं अत्यंत हुशारीनं भूमिकेची निवड केली आहे, हे जाणवतं. म्हणजे मराठीत पहिल्यांदाच भूमिका करताना, तीही ५१ व्या वर्षी, तिनं अगदी सेफ सेफ खेळी खेळली आहे. प्रभात रोडवर राहणाऱ्या उच्चवर्गीय सान्यांची सून साकारणं म्हणजे माधुरीला वेगळं काहीच करायचं नव्हतं. ती जशी आहे, तसंच दिसायचं, राहायचं, बोलायचं होतं. ते तिनं यात सहजतेनं केलंय. याशिवाय दुसरा भाग म्हणजे या सिनेमाची कथा तरुणाईशी जोडून घेणारी आहे. माधुरी हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार होती, तो काळ ‘तेजाब’ ते ‘पुकार’ (म्हणजे १९८८ ते २०००) असा धरला, तर २००० मध्ये जन्मलेली पिढी आज प्रौढ झाली आहे. त्यांच्यासाठी माधुरी म्हणजे इतिहासातील एक स्टार आहे. अशा पिढीशी जोडून घेणारी कथा निवडणं हे माधुरीनं जाणीवपूर्वकच उचललेलं पाऊल असावं. ते तसं असेल, तर तिच्या हुशारीला सलाम!
तिसरी गोष्ट म्हणजे यात ती ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करताना माधुरीला थोडा फार अभिनयाला वाव आणि बरंचसं भावखाऊ, टाळ्याखाऊ असं फुटेज मिळालं आहे. हार्ले डेव्हिडसन चालवण्यापासून ते पबमध्ये दारू पिऊन आऊट होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तिला यात करायला मिळाल्या आहेत. त्या तिनं तिच्या नेहमीच्या ढंगात, जोरदारपणे सादर केल्या आहेत, यात वाद नाही. तिच्यातल्या नृत्यनिपुण अभिनेत्रीला वाव देण्यासाठी यात नृत्याचीही योजना आहे, तसंच हिरोबरोबर परदेशी लोकेशनवर शूट झालेलं, आणि वीस वर्षांपूर्वीच्या माधुरीची किंचित झलक दाखवणारं एक रोमँटिक इ. इ. गाणंही यात आहे. थोडक्यात, ही ‘बकेट लिस्ट’ म्हणजे ‘श्रेयस’ची थाळी आहे. ती आपल्याला आवडतेच. पण आता (आपलं!) वय वाढल्यामुळं आपण ती पूर्वीसारखी रेमटून खाऊ शकत नाही.
चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग असली, तरी यापूर्वी पडद्यावर आलीच नाही, असं नाही. या त्या त्या स्वरूपात आपण ती पूर्वी पाहिलेली आहे. माधुरीचं चित्रपटात होणारं पहिलंच दर्शन ऑपरेशन थिएटरमधलं व अगदीच नॉन-ग्लॅमरस आहे. त्याऐवजी दुसऱ्या एखाद्या प्रसंगानं तिची एंट्री झाली असती, तर बरं झालं असतं, असं वाटत राहतं. चित्रपटात माधुरी सहजतेनं वावरली आहे. तिचं मराठी काही काही वेळा किंचित कृत्रिम वाटतं, हे मात्र खरंय. मात्र, ज्या ज्या वेळी ती साध्या साडीत वावरलीय तेव्हा ती फार सुंदर दिसली आहे. एकदा ती नऊवारी आणि नथ वगैरे घालून येते, तेव्हा तर अप्रतिम दिसली आहे. तिच्या मुलीबरोबरचा एक ट्रॅक अनावश्यक मोठा झाला आहे. रात्री अचानक ती तोंडात बोटं घालून शिट्टी मारते, तो प्रसंग जमलेला आहे. बॉयफ्रेंडला किस करण्याचा प्रसंगही धमाल... त्याचबरोबर पबमधला प्रसंग ‘ओव्हर द टॉप’ झाला असूनही फार खुलत नाही. या दृश्यात तर साक्षात रणबीर कपूर आहे, तरीही!
यात माधुरीचा नायक म्हणून झळकला आहे सुमीत राघवन. सुमीतनं त्याचं काम उत्तमच केलंय, पण काही झालं तरी तो माधुरीचा नायक म्हणून पटत नाही. निदान मला तरी पटला नाही. (त्याच्या जागी कोण असतं, तर चाललं असतं, याचा फार विचार करूनही उत्तर सापडलं नाही. फार तर सचिन खेडेकर शोभला असता. तर ते असो.)
बाकी वंदना गुप्ते, रेणुका शहाणे, प्रदीप वेलणकर, ईला भाटे आदींनी आपापली कामं चांगली केली आहेत. रेणुका शहाणेच्या मुलाचं काम करणाऱ्या मुलानं तो एक नकारात्मक ॲटिट्यूड चांगला दाखवला आहे.
सगळ्यांत बेस्ट काम केलंय ते शुभा खोटे यांनी. शुभा खोटेंच्या पणजीनं जबरदस्त हशे वसूल केले आहेत. एक नंबर!
बाकी संगीत चांगलं आहे, पण लक्षात राहत नाही.
तेव्हा माधुरीसाठी एकदा तरी ही ‘श्रेयसची थाळी’ चाखायला हरकत नाही.
---

दर्जा - साडेतीन स्टार
---

13 May 2018

मटा पुणे संवाद - रस लेख

रस नोहे डोंगा...
---------------


मार्च महिना सुरू झाला, की वातावरणात हलके हलके गरमपणा येत जायचा. याच धामधुमीत परीक्षा असायच्या. बाहेरचा रखरखाट, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि पाणी पाणी होत असल्याच्या त्या अवस्थेत कसेबसे पेपर संपायचे. मग आम्ही सगळे मित्र धाव घ्यायचो ते आमच्या गावच्या बाजारतळावर. तिथं रसवंतिगृहं सुरू झालेली असायची. तिथं जाऊन पन्नास पैशांना मिळणारा रस प्यायलो, की पोटात कसं गार वाटायचं! एका ग्लासानं मन भरायचंच नाही. मग आणखी एक तेवढाच पूर्ण ग्लास भरून पुन्हा रस मागवायचा. पहिला ग्लास अत्यंत घाईघाईनं संपवलेला असायचा. त्या ग्लासानं जठराग्नी शांत झालेला असायचा. मग दुसरा ग्लास शांतपणे, निवांत हळूहळू प्यायचा. तोंडात अलवारपणे तो रस घोळवायचा. आतल्या प्रत्येक दाताला, हिरडीला, टाळूला, पडजीभेला त्या थंडगार द्रवाचा स्पर्श होऊ द्यायचा. कुठल्याही पदार्थांचा आस्वाद घेताना पंचेद्रियांनी घ्यावा, असं म्हणतात. म्हणजे रूप, रस, रंग, गंध, स्पर्श व चव अशा सर्व अंगांनी त्या पदार्थाचा आस्वाद घ्यावा. रस पिताना हे सर्व प्रकार होतात. आधी तो अप्रतिम हिरवट, पिवळसर आणि वर पांढरास्वच्छ फेस आलेला ग्लास पाहूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. मग तो ग्लास नाकाशी नेल्याबरोबर त्यातल्या साखरेचा आणि त्यात मिसळलेल्या आलं, लिंबू व मिठाचा एक संमिश्र गोडसर वास येतो. त्या वासानं मुखरस जमा व्हायला सुरुवात होते. मग अलगद आधी त्या ग्लासाच्या कडेचा ओठांना होणारा गार गार स्पर्श! नंतर थेट तो अद्वितीय अमृततुल्य रस हळूहळू जिभेवर व मग अन्ननलिकेतून आत आत आतड्यांत उतरेपर्यंत त्या रसाचा स्पर्श अगदी जाणवत राहतो. पोट एकदम थंडगार होतं. मेंदू तरतरीत होतो, चित्तवृत्ती उल्हसित होते...
माझं लहानपण जामखेडला गेलं. तेव्हा म्हणजे साधारणतः २५-३० वर्षांपूर्वी आमच्या गावच्या बाजारतळावरची रसवंतिगृहं अत्यंत आकर्षक असायची. (म्हणजे अजूनही आहेत.) साधारणतः मार्च उजाडला, की बाजारतळावर मोकळ्या जागेत ही रसवंतिगृहं सुरू व्हायची. सगळीकडं बांबू रोवून तंबूचं कापड चारी बाजूला लावून, वर पत्रे टाकून हे दुकान सजायचं. या सर्व दुकानांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं लाकडी चरकच असतो आणि बैलाला जुंपूनच तिथं रस काढला जातो. लाकडी चरकाचा रस हा यंत्राच्या रसापेक्षा चवीला किती तरी सरस असतो. या दुकानांत वेगवेगळे विभाग करून टेबलं व प्लास्टिकच्या खुर्च्या मांडल्या जायच्या. एकाच वेळी पंधरा ते वीस माणसं सहज बसू शकायची. जमीन शेणानं स्वच्छ सारवलेली असायची. त्यामुळं साधारण चारच्या सुमारास या रसवंतिगृहात गेलं, की आत शिरल्या शिरल्या त्या सारवणाच्या वासाबरोबरच गार वाटायला सुरुवात व्हायची. चरकाला एक बैल जुंपलेला असायचा, तर दुसरा बाजूला बांधलेला असायचा. प्रत्यक्ष रस काढण्याची क्रिया तिथं उभं राहून पाहायची सगळ्याच मुलांना हौस असते. मीही फार लहानपणापासून त्या चरकासमोर उभं राहून सगळं पाहत असे. ओळखीच्या रसवाल्यांकडं कधी कधी ऊस त्या चरकात घालायचं भाग्यही लाभे. मला बैल या प्राण्याविषयी फार लहानपणापासून ममत्व आहे. रस काढताना गोल गोल फिरणाऱ्या बैलाकडं मी टक लावून पाहत असे. बैलाचे डोळे मला विलक्षण बोलके वाटतात. अनेकदा मला त्यात करुणभाव दिसायचा. एखादा ग्लास रस त्या बैलालाही द्यावा, असं मला फार मनापासून वाटे. 
गावाकडच्या या रसवंतिगृहांची ख्याती पंचक्रोशीत पसरलेली आहे. त्यामुळं शनिवारच्या बाजाराला किंवा एरवी कापडचोपड घ्यायला आलेली इतर गावची मंडळी इथं टेकून रस पिऊनच जाणार. सगळ्या रसवंतिगृहांतला लाकडी चरक सतत फिरत असायचा. दहा-बारा तरी दुकानं असायची. शिवाय त्या बैलांच्या गळ्यांत बांधलेल्या घुंगरांचा एक लयबद्ध नाद त्या वातावरणात सतत घुमत असायचा. त्या तंबूच्या कनातींमध्ये सिनेमा नट-नट्यांची पोस्टर लावलेली असायची. मग अनिल कपूर अन् माधुरीला साक्षी ठेवून आम्ही दोन दोन ग्लास रस प्यायचो.
त्यानंतर पुढं नगरला आणि नंतर पुण्यात राहायला आलो. इथले आणि इतर शहरांतले वेगवेगळ्या ठिकाणचे, चवीचे अनेक रस प्यायलो. अर्थात अजूनही गावच्या त्या लाकडी चरकातून निघालेल्या रसाची चव काही औरच होती, असंच मन सांगतं. याचं कारण त्या चवीसोबत संपूर्ण बालपण गुंफलेलं असतं. बालपण परत आणता येत नाही, पण निदान त्या काळातला आजही अस्तित्वात असलेला हा एक तरी घटक पुनश्च अनुभवू शकतो, याचाच तो खरा आनंद असावा. 
पुण्यातल्या रसाच्या आठवणीही रसदार अन् चवदार आहेत. पुण्यातला रस म्हटलं, की मला आजही आठवतो तो कॅम्पातला जम्बो ग्लासातला रस. मोलेदिना रोडकडून कमिशनर ऑफिसकडं जायला लागलं, की त्या रस्त्यावर बहुतेक डाव्या बाजूला हा रसवाला होता. त्या काळात, म्हणजे साधारणतः १९९१ च्या आसपास तो एक रुपयाला जम्बो ग्लास भरून रस द्यायचा. शिवाय हा रस बिगरबर्फाचा असायचा. हा रस प्यायला तिथं तोबा गर्दी उडालेली असायची एवढंच आठवतं. आता हा रसवाला आहे की नाही, माहिती नाही. बहुतेक नसावा. पण एके काळी या जम्बो ग्लासची फार क्रेझ होती, हे नक्की. 
नंतर मी भाऊमहाराज बोळात राहायला गेलो, तेव्हा शनिपाराच्या कोपऱ्यावरच्या मुरलीधर व इंद्रायणी या दोन्ही रसवंतिगृहांशी गट्टी जमली. इंद्रायणी हे तर प्रॉपर हॉटेलसारखं मोठं दुकान आहे. तिथला रस अप्रतिम असतो. मुरलीधर रसवंतीची जागा थोडी लहान आहे, पण हाही उत्कृष्ट रस आहे. याशिवाय खजिना विहिरीजवळचे शैलेश रसवंतिगृह प्रसिद्ध आहे. इथं रसासोबतच काकवी वगैरे गुळाची उत्पादनंही विकायला असतात. शैलेश रसवंतिगृहाचा व्यवसाय पिढीजात सुरू आहे, असं दिसतं. याशिवाय अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयासमोर एक रसवाला आहे. त्याचं नाव मला आठवत नाही. पण तिथल्या पाट्या आठवतात. त्या टिपिकल पुणेरी पाट्यांसोबतच रसाचं आयुर्वेदिक माहात्म्य व रस डायबेटिसलाही कसा चालतो, वगैरे पाटी भारी आहे. बहुदा समोरच्या आयुर्वेदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेतली असावी.  
पुण्यातल्या कृषी महाविद्यालयातला रसही प्रसिद्ध होता. आता तिथं समोर उड्डाणपूल झालाय. पूर्वी हा पूल नव्हता, तेव्हा कृषी महाविद्यालयाच्या कमानीलगतच सुरू असलेलं त्यांचं रसवंतिगृह दिसायचं. कधीही या रस्त्यानं गेलो आणि तिथला रस प्यायलो नाही, असं कधी झालंच नाही. हा रस सेंद्रिय उसापासून काढलेला वगैरे असायचा. म्हणून त्याची किंमत जास्त असायची. बाकी ठिकाणी एक रुपयाला असेल, तर इथं दोन रुपये ग्लास अशी किंमत असायची. पण त्या रसाची चव वेगळी आणि छान असायची, यात वाद नाही. खूप लोक इथून पार्सल घेऊन जाताना पाहिली आहेत.
याशिवाय गावोगावच्या बसस्टँडवर असलेली 'नवनाथ', 'कानिफनाथ' आदी नाथपंथीय नावे असलेल्या रसवंतिगृहांतला रस आपण बहुतेक सगळ्यांनी प्यायला आहेच. चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे - ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा... का रे भुललासी वरलिया रंगा... तद्वत रस म्हणजे (कुठल्याही गोष्टीचे) अंतर्याम... शुद्ध, स्वच्छ, नैसर्गिक... तो पिऊन आपणही थोडे तसे होऊ या...
थोडक्यात काय, हा रस आहे, तर जीवनात 'रस' आहे! 
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स पुणे, संवाद पुरवणी, १३ मे २०१८)
---