28 Jan 2019

थ्री चीअर्स : मनोगत, प्रस्तावना, परीक्षण

अर्पणपत्रिका
-----------------------विनोदाचं अस्तर असलं, की आयुष्य दुस्तर होत नाही, हे ज्यांच्यामुळं कळलं, त्या...

पु. ल. देशपांडे यांना

सविनय समर्पित...

------

१. मनोगत 
--------------------


थ्री चीअर्स’ हे माझं एकुणात सहावं आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडून प्रकाशित होत असलेलं तिसरं पुस्तक. ‘महाराष्ट्र टाइम्स’ व अन्य काही नियतकालिकांत गेल्या तीन वर्षांत मी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. या सर्व लेखांमध्ये विनोद हा समान धागा आहे. हे असे विनोदी स्वभाव असलेले लेख लिहिण्याची प्रेरणा ज्यांच्यापासून मला मिळाली, त्या ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीत हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. 
पुलंनी महाराष्ट्राला निर्मळपणे हसायला शिकवलं. पुलंच्या आधी विनोद नव्हता, असं नाही. मात्र, पुलंनी त्यांच्या आनंदयात्रेसारख्या जगण्यातून हा विनोद नीट समजावून सांगितला. जगण्याकडं पाहण्याची एक अतिशय स्वच्छ, निरोगी दृष्टी दिली. आयुष्य भरभरून जगायला लावणारा मूलमंत्र दिला. खूप लहानपणापासून मी पु. लं.चं लेखन वाचत गेलो आणि जगणं उमगत गेलं. विनोद हा त्यांच्या जगण्यातला केवळ एक भाग होता, हेही कळलं. त्यांची संगीताची आवड, त्यांच्यातला खेळिया, अवलिया चित्रकर्मी, प्रतिभावान रंगकर्मी, कुशल दिग्दर्शक, वक्ता, दाता असे अनेक पैलू नंतर उलगडत गेले आणि या व्यक्तिमत्त्वाविषयीचा आदर वाढतच गेला. दहावीत असताना मी प्रथम कुठल्या साहित्यिकाला पत्र लिहिलं असेल तर ते पुलंना! एका महिन्यानं मला त्यांचं उत्तर आलं आणि मी हरखून गेलो. मला अक्षरश: गगन ठेंगणे झाले. त्यानंतर त्यांना मी आणखी पत्रं लिहिली. त्यांची आणखी तीन उत्तरं आली. हा सर्व १९९१-९४ चा काळ. या काळात ते तसे बऱ्यापैकी थकले होते. मात्र, त्यांनी माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या पत्राला वेळात वेळ काढून लिहिलेलं उत्तर ही आता माझ्यासाठी कायमची मर्मबंधातली ठेव झाली आहे. पुलंनी जगभरातल्या लोकांशी असं नातं जोडलं. एक माणूस आपल्या उण्यापुऱ्या ८० वर्षांच्या आयुष्यात काय काय करू शकतो, याचं पुलंचं आयुष्य हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. 
पुलंच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन माझ्यासारखी अनेक मुलं लिहिती झाली आणि याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या अतिशय नितळ, निखळ, सात्त्विक अशा लिखाणालाच आहे, यात शंका नाही. जगण्यावर विलक्षण प्रेम असल्याशिवाय आणि माणूस म्हणून संपूर्ण विकास झाल्याशिवाय असं लिखाण कुणाच्या हातून लिहून होणार नाही.
पुलंनी या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलं. जगण्याचं प्रयोजन शिकवलं, कलेचा आस्वाद कसा घ्यावा याचे धडे दिले. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं त्यांच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत जगले. पुलंचा विनोद म्हणजे केवळ शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरती करीत साधलेला विनोद नव्हता. जगण्यातली विसंगती टिपत, विसंवादातून नेमका सूर शोधण्याचं कसब त्या विनोदात होतं. त्यांचा विनोद कधीच घायाळ करीत नाही. उलट तो निर्विष असा विनोद आहे आणि तो आपल्याला स्वतःवर हसायला शिकवतो. मराठी जनांच्या मनाची मशागत करीत पु. लं.नी विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने पुलंच्या मागून विनोदाचे, आनंदाचे गाणे गात गात चालत निघाला. पुलंची ही आनंदयात्रा त्यांच्या ऐहिक अंतानंतरही सुरूच आहे. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे. 
पुलंच्या मागं निघालेल्या या प्रचंड दिंडीतला, आनंदयात्रेतला मी एक लहानसा वारकरी आहे, यात्रेकरू आहे. त्यांनी दाखविलेल्या सत्त्व व सत्याच्या निखळ मार्गानं वाट चालण्याचा प्रयत्न करतो आहे. या पुस्तकातले हे सगळे लेख म्हणजे या आनंदयात्रेत उधळलेला अबीर-गुलाल आहे. पु. ल. ज्या काळात जगले त्याहून आजचा काळ किती तरी वेगळा आहे. तंत्रज्ञानाची अफाट प्रगती आणि जगण्याचा वाढलेला वेग श्वास गुदमरवून टाकतो आहे. रुढी-परंपरांचे स्खलन आणि मूल्यांची घसरगुंडी रोजची झाली आहे. माणसा-माणसांतला संवाद वाढण्याऐवजी कमी होताना दिसतो आहे. कुटुंब संस्थेवर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत. अशा वातावरणात सकारात्मक भाव मनात ठेवून जगत राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मात्र, पुलंच्या लिखाणातून ही ऊर्जा आपल्याला सतत मिळत राहते. आयुष्याचा एवढा मंगलमय उत्सव साजरा करण्याऐवजी रडत बसू नका, असंच त्यांचे शब्द आपल्याला सतत सांगतात. जगणं साजरं करण्याची ही दृष्टी पुलंनी आपल्याला दिली, हे त्यांचे ऋण कुठलाही मराठी माणूस कधीच विसरू शकणार नाही.
स्वतःवर हसू शकणारा समाज प्रगत समजला जातो. ब्रिटिशांचं उदाहरण याबाबत देता येईल. पुलंनी त्यांच्या प्रवासवर्णनांतूनही ते सांगितलं आहेच. मराठी समाजही स्वतःवर विनोद करून हसू शकतो. ते एक प्रकारचं आत्मपरीक्षण असतं. स्वतःकडं स्वच्छ मोकळ्या नजरेनं पाहता येणं असतं. आपल्याला ही निखळ दृष्टी पुलंच्या साहित्यानं दिली. 
या पुस्तकातले लेख याच दृष्टीनं लिहिण्याच प्रयत्न केला आहे. ते वाचून वाचकांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले, तरी हा खटाटोप सार्थकी लागला असं म्हणता येईल.
आता कृतज्ञतेचे दोन शब्द...
माझ्या लेखनप्रपंचाला समजून घेणारी, सदैव माझ्यामागे आधार म्हणून उभी असलेली माझी पत्नी सौ. धनश्री, माझ्यासाठी आता जणू प्रेरणाच असलेला माझा मुलगा नील, माझे आई-वडील, इतर जिव्हाळ्याचे आप्त-कुटुंबीय, माझ्या प्रत्येक लेखनाची वाट पाहणारा माझा मित्रपरिवार, 'मटा'तील माझे सहकारी व इतर सर्व पत्रकारमित्र, माझे सर्व वाचक आणि 'लास्ट बट नॉट द लीस्ट' म्हणता येतील अशा माझ्या प्रकाशिका, 'कॉन्टिनेंटल'च्या देवयानी अभ्यंकर व तेथील सर्व कर्मचारी परिवार यांच्याविषयी मी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्वांचं प्रेम मला नवनव्या लिखाणासाठी सदैव प्रेरित करीत असतं... 
विशेष उल्लेख करायचा आहे तो ज्येष्ठ लेखिका मंगलाताई गोडबोले यांचा. विनोद आणि पुलंवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा अधिकार असलेल्या मंगलाताईंची प्रस्तावना या पुस्तकाला लाभावी, यासारखा दुग्धशर्करा योग दुसरा नाही. मंगलाताईंचं आश्वासक बोलणं सदैव आशीर्वचन उच्चारल्यासारखं भासतं. मी त्याचा एक लाभार्थी आहे, हे सांगण्यास फार आनंद वाटतो.
दुसरा उल्लेख करायचा तो रेश्मा बर्वे हिचा. या पुस्तकाचं देखणं कव्हर आणि आतील सुंदर रेखाचित्रं तिनं फार कमी वेळात करून दिली आहेत. लेखकाच्या मनात असलेलं चित्र जाणून रेखाटण्याची क्षमता असलेली रेश्मा ही एक उत्तम कलाकार आहे, यात शंकाच नाही.
आनंदाच्या प्रसंगी जल्लोष करताना, पार्टी करताना आपण 'थ्री चीअर्स' म्हणतो.
तसं आपलं जगणं सेलिब्रेट करणाऱ्या प्रत्येकाला 'थ्री चीअर्स' म्हणून मी हे माझं पुस्तक विनम्रतेनं सादर करतो आहे.
आनंद घ्या, आनंद वाटा, आनंद लुटा... थ्री चीअर्स!

---- 

२. प्रस्तावना
-------------

कॉफी, चहा, सरबत आणि बरंच काही...
-----------------------------------------------------------------------------------


श्री. श्रीपाद ब्रह्मे ह्यांनी २०१५ साली ‘कॉफीशॉप’ उघडलं, नंतर ‘टी-टाइम’चं स्मरण केलं आणि आता ‘थ्री चीअर्स’ म्हणत गारेगार सरबताचा पेला वाचकांना सादर केला आहे. (शौकिनांनी पेल्यातल्या पेयाचा ब्रँड आपापल्या पसंतीचा ठेवावा. आमची मजल सरबतापर्यंतच!) अवघ्या चार वर्षांमध्ये सहावं पुस्तक हे काही खायचं (इथं, प्यायचं) काम नाही. लिहिणारी व्यक्ती स्त्री असती तर पाळण्याच्या वेगाचं कौतुक करावं लागलं असतं. पुरुष आहे म्हणून पळण्याच्या वेगाला दाद देते. ‘वेगे वेगे धावू’ म्हणून आपला स्कोअरबोर्ड सतत हलता ठेवणाऱ्या लेखकाची ही कामगिरी आहे. 
मुळामध्ये वाचनाची प्रचंड आवड, पत्रकारितेचा व्यवसाय, माणसं जोडण्याचं व्यसन आणि चौफेर निरीक्षण अशा ‘चार उंगल्या शक्कर’मध्ये असणाऱ्याला लेखक होण्याशिवाय पर्याय नसतो. ‘मौका भी है, दस्तूर भी है’ छापाच्या या परिस्थितीचा ब्रह्मेंनी पुरेपूर फायदा घेतला नसता तरच नवल. ह्यामुळेच एखाद्या आनंदाच्या प्रसंगाला, पार्टीला ‘थ्री चीअर्स’ म्हणावं तसं जगणं सेलिब्रेट करणाऱ्या प्रत्येकाला ‘थ्री चीअर्स’ करण्यासाठी त्यांनी ह्या पुस्तकाचा घाट घातलाय.
यंदा पुलंचं जन्मशताब्दी वर्ष असल्याने हे पुस्तक पुलंना अर्पण केलंय. पण तसं ते नसतं तरीही कदाचित लेखकाने अर्पणपत्रिका हीच ठेवली असती. कारण मराठीमध्ये विनोदात काही मुलूखगिरी करू बघणाऱ्याला ‘पयलं नमन गनद्येवाला’ करावंसं वाटणं अगदीच सहज स्वाभाविक आहे. पण इथे लेखकाने फक्त दुरून हे नमन केलेलं नाही तर पुलंच्या लेखनाला बरंचसं आत्मसातही केलं आहे. कसं ते सांगण्यासाठी, मला नमनावर तेल खर्च करणं थांबवून सरळ पुस्तकाकडे वळावं लागेल.
थ्री चीअर्स’च्या अनुक्रमणिकेत दाखवल्याप्रमाणे ह्या पुस्तकातले लेख तीन गटांमध्ये विभागलेले आहेत. पहिल्या भागात गणू गणपुलेच्या गोष्टी आहेत जो लेखकाचा मानसपुत्र आहे. दुसरा भाग सोशल हास्याचा आणि तिसरा पोलिटिकल हास्याचा आहे.
हा गणू गणपुले नावापासूनच सामान्य आहे. मध्यमवर्गीय आहे. दर वर्षी हिवाळा आला, की त्याला टूरवर जाण्याचे वेध लागतात. हिवाळ्यातल्या पौष्टिक खाण्याने त्याच्या देहाची तिजोरी प्रसरण पावू लागते. पुणं ‘स्मार्ट सिटी’ झाल्याची दिवास्वप्नं त्याला बघावीशी वाटतात. जुनी दिवाळीची मजा हरवत चालल्याचं जाणवून त्याला खेद होतो आणि ‘दिवाळी पहाट’मध्ये नव्या दिवाळीचा आनंद शोधावासा वाटतो. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं कर्मकांड झाल्याचं जाणवतं तरी पाय तिकडं नकळत वळतातच. विद्यार्थीदशेत स्वत: तो परीक्षांना घाबरत असतोच; पण पुढे बाप झाल्यावर मुलाचा अभ्यास घेणं हीच मोठी परीक्षा असल्याचा साक्षात्कार त्याला होतो. असं सर्वसाधारण पुणेरी-मध्यमवर्गीय - ‘पेठ’कर माणसाच्या जीवनात होऊ शकेल तरे सगळं त्याच्या जीवनात होतं, अनुभवाला येतं. त्याच्या अनुभवांमधल्या गमतीजमतीत वाचकही ओढले जातात. 
दुसऱ्या, सोशल हास्याच्या विभागामध्ये अनेक सामाजिक दु:खांची गंमतशीर हाताळणी आहे. तरुण मुली किंचित प्रौढ बाप्यांना अचानक ‘काका’ म्हणून रस्त्यात हाक मारतात, साहित्य संमेलनांमध्ये भलतीच संमेलनं भरतात, वृत्तपत्रं गंभीर विषय हाताळताना अनावधानाने नसते विनोद करतात इथपासून ते पुरुषांना दररोज दाढी घोटावी लागते इथपर्यंत नाना दु:खं झेलत आपण जगत असतो. त्या वेळी त्या त्या प्रसंगातून जाणाऱ्यांना काय यातना होत असतील ह्याबाबत इथे लेखक आपला कल्पनाविलास व्यक्त करतात. काही वेळा काही तात्कालिक कारणंही सामाजिक दु:खात भर घालतात. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन येतो तेव्हा आपल्याला रूढ योगासनं जमत नसल्याची आणि काही सक्तीची योगासनं करावी लागत असल्याची बोच लागून राहते. साहजिकच ‘काही नवी योगासने’ ह्या लेखाचा उतारा दिला जातो. ह्या सगळ्याशी जोडून घेताना वाचकाला कुठलीच अडचण येत नाही, कारण हे सगळं तोही बघत-जगत-भोगत असतोच.
पोलिटिकल हास्य ह्या विभागात पुण्याची मेट्रो, देशातली नोटबंदी, विजय मल्ल्यांसारख्याच्या ‘अनर्थलीला’, केजरीवाल ब्लॉग वगैरेंची मिश्कील उलटतपासणी केली जाते. अचानक नोटबंदी जाहीर झाल्यावर मध्यमवर्गीय आयुष्यात दिवाळीनंतर अचानक शिमगा कसा साजरा झाला, घराघरातल्या पिगी बँका कशा हळूच चाचपल्या गेल्या, गृहिणीवर्गाची ‘समांतर’ अर्थव्यवस्था कशी ढवळून निघाली याचं प्रत्ययकारी वर्णन येतं. एकदा एखादा विषय हाताळायला घेतला, की ब्रह्मे त्याचे लहानात लहान धागेदोरेही हातून सुटू देत नाहीत. त्यामुळं ‘समग्र’ म्हणतात तसं चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं.
पुल परंपरेचा वारसा घेतल्याने पुलंच्या पठडीतले विषयही येतात आणि शब्दखेळही येतात. ‘काही अनिष्ट ग्रहयोग’ ह्या पुलंच्या लेखाच्या धाटणीचे नवे योग इथे ब्रह्मे देतात. थंडीमधलं ‘आंतर्रजईगुडुप्पासन’ किंवा पत्नीबाबतचं ‘वामांगपरोक्षनतमस्तकासन’ वाचताना पुलंचे ‘द्वारघंटिकायोग’ किंवा ‘थप्पभंगिकायोग’ आठवले नाहीत तरच आश्चर्य. प्राणिजीवनावर पुलंनी लिहिलेल्या लेखाच्या जवळपास जाणारा ‘पोपट, मैना, मोती, कावळेकाका’ हा लेखही आढळतोच. आजच्या माणसाचं वर्णन ‘सोशल मीडियाच्या वृक्षाच्या फांदीवर बसलेले स्वच्छंद पक्षी’ असं होतं. पुण्याच्या झेड ब्रिजचं वर्णन ‘जो रात्री एक्स ब्रिज बनतो’ असं येतं. फावल्या वेळच्या गप्पांमध्ये आदल्या दिवशी पाहिलेल्या मालिकांबद्दल बोलणाऱ्या बायकांच्या संवादांना ‘सीरियल किलर’ संवाद असं बिरुद चिकटतं. सेल्समन हा ‘विक्रीपुरुष’ होतो, तर मुद्राराक्षसाच्या कचाट्या सापडल्यावर कोणी ‘मुरलीधर जोशी’ हा ‘मुलगीधर जोशी’ बनतो किंवा चतुर मंत्री ‘त’च्या जागी ‘च’ला उकार जोडून उल्लेखला जातो. बँकेतला काउंटर हा ‘काउंटर अॅटॅक’ करतो. असे एकूण भाषिक किंवा मिश्रभाषिक विनोद ठिकठिकाणी सापडतात.
त्यामानानाने मानसपुत्र प्रकरण ब्रह्मेंनी विशेष खुलवल्याचं मला जाणवलं नाही. एक तर तो प्रकार पेलायला अवघडच असतो. एक पुत्र आला, की ओघाओघाने त्याचा परिसर, त्याचं वातावरण, त्याच्या सवयी-लकबी, त्याच्या ताकद आणि मर्यादा या सगळ्यांची बंधनं यायला लागतात. बरं ती नकोत म्हणून या गोष्टी विचारात घेणंच टाळलं तर मग त्या व्यक्तिरेखेत पुरेसा प्राणही फुंकला जात नाही. अशा दोन्ही बाजूंनी कुचंबणा होते. साक्षात पुलंनीही ‘सोन्या बागलाणकर’ ही मानसपुत्रसदृश व्यक्तिरेखा रंगवायला घेतली होती, पण पुढे निम्म्यातच तिचं बोट सोडावं लागलं, हा इतिहास इथं सहजच स्मरण्याजोगा आहे. तेव्हा जे परात्पर गुरूंना जमलं नाही तिथे ब्रह्मे अंमळ चाचपडत असले, तर ते नक्कीच ‘काणाडोळाकरणीय’ आहे.
एवढी एक मला जाणवलेली उणीव वगळता, एरवी पुस्तक अनेक दृष्टींनी उल्लेखनीय आहे. निरीक्षण, सहज-संवादी भाषा, बारकावे टिपण्याकडे कल यामुळे पुस्तक पटकन वाचून संपतं. ‘सवडीनं कधी तरी बघू’ म्हणावं लागत नाही. आळशी नवरा, भ्रष्ट राजकारणी, लठ्ठपणा, संपादकीय कोडगेपणा असे अतिपरिचित विषय टाळले तरी चालतील. तसंच वारंवार पुणं, त्याचा इतिहास, भूगोल, त्यातल्या पेठांचं-मठांचं माहात्म्य ह्यात रमणंही फार काळ पुरणार नाही, असे काही इशारे द्यावेसे वाटतात. जमाना ‘ग्लोबल’चा आहे. आपण ‘लोकल’संदर्भात किती काळ किती अडकायचं याचा विचार प्रत्येक लेखकाला कधी ना कधी करावाच लागतो, हा अनुभवही आहे. तो घेण्याच्या टप्प्यापर्यंत आता ब्रह्मे आलेच असतील. 
हिरीरीने, सातत्याने लिहिणाऱ्या लेखकाच्या जीवनात सहसा तीन टप्पे येतात. पहिला टप्पा स्वागताचा. ब्रह्मेंच्या पहिल्याच पुस्तकाचं चांगलं स्वागत झालंय. दुसरा टप्पा स्वीकाराचाय आतापर्यंत वाचकांनी त्यांना लेखक म्हणून स्वीकारलंय. तिसरा टप्पा येतो सत्काराचा. आवड-प्रेम मिळवत मिळवत लेखक मान-सन्मानाचाही धनी व्हायला लागतो. ह्या टप्प्यावर श्रीपाद ब्रह्मे लवकर पोचोत, अशी शुभेच्छा देऊन थांबते. त्या वेळी बरेच लोक त्यांना ‘थ्री चीअर्स’ म्हणतील, त्यात एक आवाज माझाही असेल. आमेन! 

- मंगला गोडबोले

१२ डिसेंबर २०१८, पुणे

---

३. परीक्षण
------------

आनंदाची ऊर्जा देणारा निखळ विनोद
------------------------------------------------------------------------------


श्रीपाद ब्रह्मे यांचे ‘थ्री चीअर्स’ हे कॉन्टिनेंटल प्रकाशनाने केलेले पुस्तक हातात आले आणि वाचता वाचता वाळवंटात ‘ओअॅसिस’ दिसल्याचा भास झाला. सध्या वाचन, वाचन संस्कृतीविषयी तापलेल्या चर्चा वाचत-ऐकत असताना अचानक एक सुरेखसा हिरवळीचा कोपरा दिसला. त्या हिरव्याशार जमिनीच्या तुकड्यावर, त्या बेटावर बसून त्यांनी हसत हसत पुढे केलेला विनोदाचा आल्हाददायक पेला ‘थ्री चीअर्स’ म्हणून स्वीकारावा असेही वाटले. आजकाल आजूबाजूच्या तापलेल्या वास्तवामध्ये आपण ‘आपल्याला हसायलाही येते’ ही गोष्टच आपण विसरत चाललो आहोत की काय, असेही वाटून जाते. अशा वेळी हे पुस्तक वाचकांना सांगून जाते - ‘थ्री चीअर्स’ म्हणजे हसत जगणं, आनंदानं हसणं, समाधानी असणं, हवं ते सगळं साधणं...’ कधी कधी आपण हटवादी होतो आणि रोजच्या जगण्यातून हरवत चाललेल्या निखळ विनोदाला मुकतो; पण साध्यासुध्या आनंदातही ऊर्जेचा झरा लाभत असतो. हा आनंद कसा शोधावा, हे ‘थ्री चीअर्स’ वाचल्यावर नक्की कळून येईल. हे पुस्तक हाती घ्या, वाद-विवादांना अंमळ बाजूला सारा आणि त्यांना सांगा, ‘थांबा हो जरा! काही क्षण मस्त हसण्याची संधी प्राप्त होऊ द्यात मला. मग बघतो तुमच्याकडे! मग तुम्हीही मी हसत तुमच्यापुढे ठेवलेल्या पेल्याचा स्वीकार कराल आणि म्हणाल मला, थ्री चीअर्स!’
हो! विनोदी लेखनात इतकी ताकद आहेच, असते आणि असावी. श्रीपाद ब्रह्मे यांचे हे लेखन आपल्याला क्षणभर का होईना हा आनंद आपल्या हातात ठेवते. याचा अनुभव घ्याच तुम्ही. आणि तो घेण्यासाठी हे पुस्तकही हाती घ्या. मुळातच या पुस्तकाचे लेखक पत्रकार आहेत. त्यांना व्यसन आहे माणसं जोडण्याचं, माणसं वाचण्याचं! पुन्हा पत्रकार असल्याने सूक्ष्मशी निरीक्षणशक्ती त्यांच्या ठायी आहे. ही निरीक्षणशक्ती त्यांना समाजात, राजकीय वर्तुळात वावरताना उपयोगी पडतेच आहे. त्याचा उपयोग त्यांना या पुस्तकाच्या लेखनाला झालेला आहेच. पण आता त्यांची पावले अधिक कलात्मक, ‘स्व’तंत्र, आणि कल्पनाशक्तीचीा मदत घेत पुढे टाकली जात आहेत, ही अत्यंत अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. या पुस्तकात त्यांची निर्मिती असलेला त्यांचा मानसपुत्र ‘गणू गणपुले’ भेटतो. मध्यमवर्गीय, सामान्य माणसाचे तो प्रतिनिधित्व करतो. हिवाळ्यात सहलींना जातो, सवाई गंधर्व महोत्सवाला जातो, पुण्याची खास ‘पेठ संस्कृती’ जगतो, हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थ खाण्याचे योजतो, ‘दिवाळी पहाट’ला जाण्याचा आनंद घेतो, लहानपणी परीक्षांना घाबरणारा मोठेपणी मुलांना परीक्षांना न घाबरण्याचे धडे देतो. स्वत:ला फसवत जगण्यासाठीच्या सर्व गोष्टींना सामोरा जातो. लेखक त्याचे वर्णन फार छान करतात - ‘नाकासमोर चालणं आणि छापखान्यातल्या नोकरीसह घर-दार सांभाळणे, ही त्याची सर्वोच्च आकांक्षा! गणूनं मुळा-मुठेच्या काठी जन्मून, जन्मजात कमावलेला कुचकटपणा आणि वंशपरंपरेनं आलेली तैलबुद्धी याच दोन गोष्टी त्याच्या भाल्यातली प्रमुख अस्त्रं!’ असा हा गणू सर्वसामान्य वाचकांना आपलासा न वाटेल तरच नवल! पुस्तक वाचता वाचता आपण आपल्याला या गणूच्या ठिकाणी आपल्या नकळत ठेवायला लागतो. आणि ही भावना निर्माण करण्यात लेखक कमालीचा यशस्वी होतो, हेच या लेखनाचे यश! लेखक या यशासाठी आटापिटा करत नाही. रोजचेच अनुभव, त्यातले प्रसंग आपल्या सरळ-साध्या शब्दांत वाचकांच्या समोर ठेवतो. ही शैली अकृत्रिम असते आणि म्हणूनच ती आपल्याला भावते. आपण त्या अनुभवांशी तादात्म्य पावताना गालातल्या गालात हसू फुटावे, आपलेच चित्र आपण या गणूत बघत आहोत, असे वाटावे असा आपल्या जगण्याचा पुन:प्रत्ययाचा आनंद आपल्याला मिळतो. या लेखनात बोचरेपणा नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी आपल्या जगण्याची गोची, आपली रसिकता (?), आपल्या मनातली स्वप्नं, आपले हौसेचे सण-समारंभ, महोत्सव हे सगळं हा गणू गणपुले नामक ‘सात्त्विक पुणेकर’ आपल्यासमोर ठेवतो. ‘पुणेकर’ तोसुद्धा ‘सात्त्विक’ ही लेखकाने मारलेली कोपरखळी आपली कळी खुलवते आणि एका बैठकीत ‘गणू गणपुलेच्या गोष्टी’ वाचूनच पुस्तक बाजूला ठेवावेसे वाटते. 
पुस्तकातला दुसरा भाग आहे ‘सोशल हास्या’वर आधारित. यातल्या ‘पोपट, मैना आणि कावळेकाकांची गोष्ट...’, ‘नस्ती कटकट’, ‘काही नवी योगासने’, ‘ओ काका...’, ‘संमेलन : एक घेणे’, ‘वृत्तपत्रीय विनोद’ आणि ‘ई-धोबीघाट’ या सर्व लेखांमधून हे ‘सोशल हास्य’ प्रकटते. हे सर्व लेखक स्वत: पत्रकार असल्याने त्याचे ‘होमपिच’च आहे, असे म्हणावेसे वाटते. ‘काही नवी योगासने’मध्ये लेखक कालोचित आणि समयोचित नवी आसने वाचकांना सुचवू बघतो. उदा. ‘अधोमुखासन’, ‘अंगुलीनर्तनासन’ ही मोबाइलच्या वापरासंबंधाने अस्तित्वात आलेली आहेत. ‘खुर्चीबूडघट्टचिकटासन’ हे लोकप्रिय आणि आजच्या काळात जास्त प्रचलित असे आसन! ‘चलनप्रियासन’ हे आसन आवडणाऱ्या लोकांना कागदी नोटा खाव्याशा वाटतात. ‘गलितगात्रासन’ हे आसन आजकाल ‘नावडते’, पण अनेकांवर लादले गेलेले आसन आहे. या सर्व आसनांचे खुमासदार वर्णन करून लेखक एक टिप्पणी जोडतो - ‘ही सर्व आसनं दूर करून प्रेमानं खरीखुरी योगासनं करायला मिळतील, तो दिवस माझ्या दृष्टीनं खराखुरा आंतरराष्ट्रीय योग दिवसअलेल. हा दिवस पाहण्याचा ‘योग’ कधी येतो, ते पाहू!’ एकंदरीत काय, पुस्तकाच्या या भागात एका पत्रकाराची ‘काकदृष्टी’ सर्व समाजावर सावधपणे फिरत समाजपिंडाला हलक्याशा टोची मारते आहे, हे जाणवून जातेच!
या पुस्तकात तिसरा भाग आहे ‘पोलिटिकल हास्या’वर आधारित. ‘तारीख पे तारीख’ देणारा मेट्रो प्रकल्प, नोटाबंदीचे आख्यान, केजरीवाल स्वत: ब्लॉग लिहीत आहेत असे कल्पून लिहिलेला ब्लॉग, विजय मल्ल्यावरचा ‘किंग ऑफ गुड होप’ हा लेख या सर्व लेखांतून लेखकाने त्या त्या राजकीय परिस्थितीवर, राजकीय हेतूने जाहीर होणाऱ्या योजनांवर आणि राजकीय नेत्यांवर भाष्य केले आहे. ‘मेट्रो आली रे अंगणी’ या लेखात लेखक म्हणतो, ‘पाच वर्षांनंतरचं चित्र आम्हाला लख्ख दिसतंय. एक जानेवारी २०२२... आम्ही शिवाजीनगर मेट्रो जंक्शनला उभे आहोत... महापालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. (त्याचा लाइव्ह वृत्तान्त आमच्या मोबाइलवर आम्ही बघत आहोत!) पालिकेत आता नवीन प्रस्ताव आला आहे... आत्ता बांधलेले दोन्ही मेट्रोचे मार्ग काढून बीआरटी मेट्रो करायची... सध्या नदीकाठानं मेट्रो जाते, पण नदीच्या पृष्ठभागावरची बरीचशी जागा वाया जाते... तेव्ही तिथं मेट्रोची बीआरटी करा... दोन्ही बाजूंनी मेट्रो जातील, मध्ये पीएमपीचा बसचा ट्रॅक टाका... आणि खाली नदीत फास्ट क्रूझ सर्व्हिस द्या... क्रूझमधला माणूस ‘रोप वे’नं बसमध्ये बसेल... बसमधून उतरला, की त्याचं मेट्रोत पाऊल पडेल... तेवढ्यात दुसरे महाशय उठले आणि म्हणाले, ‘अहो, पण क्रूझ चालवण्याएवढं नदीत पाणी नाही, त्याचं काय करायचं?’ त्यावर पहिले महाशय म्हणाले, ‘माझी मिनरल वॉटरची फॅक्टरी आहे. टेंडर काढा... पाहिजे तेवढं मिनरल वॉटर नदीत ओतू...’ आणि अचानक पालिका सभेत पूर आला... सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं...’ या टिप्पणीवरून लेखकानं साधलेलं सर्व राजकीय परिस्थितीवरचं ‘शरसंधान’ किती अचूक आहे, याची कल्पना येईलच! सुज्ञांस सांगणे न लगे! तर असे हे ‘थ्री चीअर्स’.... वरवर विनोदी, पण त्याला वास्तवावर हलक्याशा केलेल्या कोपरखळ्यांचे अस्तर. दिवाळीतल्या लवंगी फटाक्याच्या लडीसारखे! कोणालाही चटका बसू द्यायचा नाही, पण फटाके फोडण्यातला आनंद तर निर्विवादपणे मिळू देणारी लवंगी फटाक्यांची लड! 
याआधी ब्रह्मे यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘कॉफीशॉप’, ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’, ‘यक्षनगरी’, ‘एम. एस. धोनी : जिद्दीचा षटकार’, ‘टी-टाइम’ ही सर्वच पुस्तके चांगली आहेत. पण शेवटी ‘थ्री चीअर्स’ म्हणण्यातली मौज काही औरच! आणि काळाशी सुसंगत! ही जगण्यातली मौज कॉन्टिनेंटल प्रकाशनाने आपल्या हाती दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. या पुस्तकाला लाभलेली समर्थ लेखिका मंगला गोडबोले यांची प्रस्तावनाही महत्त्वाची आहे. आणि एक विनोदी पुस्तक वाचण्यासाठी, दुसऱ्याने गुदगुल्या करून हसविण्याचे काहीच कारण नाही. ते आपले आपल्याला वाचून आपले आपल्यालाच हसायला येते. आपले आपणच हसू शकतो, असे ‘इनोदी लेखन’ केल्याबद्दल ‘लेखकाय नमो नम:’ आणि ‘थ्री चीअर्स’!

- डॉ. माधवी वैद्य

---

(महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत २० जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित परीक्षणाचा मूळ तर्जुमा)

----

25 Jan 2019

ठाकरे - रिव्ह्यू

आहेत ‘साहेब’ तरीही...
----------------------


मला अभिजित पानसे या दिग्दर्शकाचं काम आवडतं. त्यामुळं ‘ठाकरे’ या चरित्रपटाचं दिग्दर्शन तो करणार म्हटल्यावर बऱ्यापैकी आशा तयार झाल्या. नवाजुद्दीन सिद्दिकी बाळासाहेबांचं काम करणार, म्हटल्यावर तर हा सिनेमा पाहणं अगदी ‘मस्ट’ झालं. त्यानुसार खूप उत्सुकतेनं आज पहिल्याच दिवशी (२५ जानेवारी) हा सिनेमा (मराठी आवृत्ती) पाहिला. सिनेमा पाहिल्यावर माझ्या मनात संमिश्र भावना तयार झाल्या. सिनेमात काही गोष्टी उत्तम जमल्या आहेत, तर काही गोष्टींबाबत भ्रमनिरास झाला. 
आधी जमलेल्या गोष्टींबाबत. या चित्रपटानं ‘ठाकरे’ नावाच्या व्यक्तिरेखेची जडणघडण अगदी बारकाईनं, सर्व तपशिलात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना महाराष्ट्राचा, मुंबईचा इतिहास माहिती आहे, ज्यांनी हा काळ बघितला आहे, त्यांना हा चित्रपट स्मरणरंजनाच्या दुनियेत घेऊन जाईल. मुंबईत मराठी माणसांवर होणारा अन्याय ‘कार्टून’च्या रूपात दाखविण्याची कल्पना फारच आवडली. त्यानंतर बाळासाहेबांकडं कामं घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या वाढते, हे दाखविण्यासाठी केलेला दृश्यांचा कोलाजही आवडला. चित्रपटाचा स्वभाव गंभीर आहे. तो आशयाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. चरित्रनायकाच्या वैयक्तिक आयुष्यातील हळवे क्षणही टिपण्यावर भर देतो. सिनेमाचा पूर्वार्ध संथपणे, वेळ घेत, ‘बाळ ठाकरे’ ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब’ हा प्रवास दाखवतो. नवाजुद्दीनचा अभिनय, त्यानं बाळासाहेब साकारण्यासाठी घेतलेली मेहनत, अंगिकारलेली देहबोली स्तुत्य आहे. (पण बाळासाहेब वर्णानं गोरे होते. यात ते काळे दिसतात.) प्रबोधनकार, श्रीकांत ठाकरे, प्रमोद नवलकर, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई या व्यक्तिरेखा जमल्या आहेत. विशेषत: प्रबोधनकारांचे काम करणारा कलाकार हुबेहूब त्यांच्यासारखा दिसतो. पूर्वार्धातील अनेक प्रसंग मुंबईतील गेल्या ५० वर्षांच्या इतिहासाची उजळणी करणारे आहेत. ते प्रसंग व तेव्हाचे कलादिग्दर्शन प्रशंसनीय.
आता त्रुटींबाबत. हा चित्रपट युतीच्या १९९५ मधील विजयापर्यंत येऊन थांबतो व शेवटी  ‘टू बी कंटिन्यूड’ अशी पाटी येते. हा सिनेमाचा पूर्वार्ध आहे, हे चित्रकर्त्यांनी आधी स्पष्ट केलेले नाही. ‘भाई’ चित्रपटाप्रमाणे प्रेक्षकांना विश्वासात घेऊन हा पहिला भाग आहे, हे सांगायला हवे होते. याशिवाय चित्रपटाच्या संकलनात काही त्रुटी जाणवतात. लखनौच्या कोर्टात बाळासाहेब अयोध्या खटल्यात साक्षीला जातात, त्या प्रसंगापासून चित्रपटाची सुरुवात होते व तिथेच शेवट होतो. त्यांच्या निवेदनाच्या मध्ये पेरलेल्या प्रसंगांतून, फ्लॅशबॅक तंत्राने कथा पुढे जाते. मात्र, १९६९ ची घटना आधी येते व नंतर १९६६ ची येते. घटना कालक्रमानुसार येत नाहीत. युती सरकारमध्ये मनोहर जोशींचा शपथविधी १९९५ मध्ये झाला. जर बाळासाहेबांची साक्ष १९९४ मध्ये चालली आहे, तर त्या काळाच्या मागील घटनाच फ्लॅशबॅकमध्ये यायला हव्यात. त्याऐवजी १९९५ ची घटनाही सिनेमात दाखविली जाते. आणखी खटकणारी बाब म्हणजे अमृता रावनं साकारलेल्या मीनाताई. मराठी आवृत्तीतील संवादांचे डबिंगही अमृतानंच केलं असावं. मात्र, तिचे कृत्रिम मराठी उच्चार खूप खटकतात. माँसाहेबांची ही व्यक्तिरेखा ठसत नाही. तीच गोष्ट संदीप खरेंनी साकारलेल्या मनोहर जोशींची. प्रवीण तरडे यांनी साकारलेले दत्ताजी साळवीही अनेकदा ‘ओव्हर द बोर्ड’ जातात. आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे, मुंबईच्या आयुष्यातील गिरणी संपासारखी महत्त्वाची गोष्ट हा चित्रपट बायपास करून पुढं जातो. त्याऐवजी कृष्णा देसाईंची हत्या, आणीबाणी व ठाकरे-इंदिरा भेट अशा गोष्टी जास्त तपशिलात दाखविल्या जातात. बाळासाहेब जातिधर्म मानणारे नव्हते, ही बाब खरीच. पण तरीही त्यांच्या घरात एक मुस्लिम नमाज पढतो आहे, हे दृश्य आवर्जून दाखवण्यामागचा उद्देश लपत नाही. 
‘ठाकरे’ या चित्रपटाबाबत सर्वांत चर्चा झाली ती बाळासाहेबांच्या आवाजाची. सचिन खेडेकर यांचा आवाज बदलून निर्मात्यांनी चेतन सशीतल यांचा आवाज वापरला, ते फार बरे झाले. प्रेक्षकांना बाळासाहेब ही व्यक्तिरेखा विश्वसनीय वाटण्यात या आवाजाचा फार मोठा वाटा आहे. 
अर्थात, हा चित्रपट पाहताना या चित्रपटाची ‘कथा’ संजय राऊत यांची आहे, हे लक्षात ठेवलेले बरे. ठाकरे यांचे उत्तरार्धातील आयुष्य खूप जवळून पाहिलेले ते पत्रकार व नंतर त्यांचे विश्वासू सैनिक असल्यानं चित्रपट अधिकाधिक ‘ऑथेंटिक’ करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले आहेत, हे जाणवतं.
पण तरीही हा चित्रपट एक उत्तम चरित्रपट पाहिल्याचं समाधान देत नाही. काही तरी राहून गेल्यासारखं वाटतं. मी सिनेमा पाहताना संपूर्ण भरलेल्या थिएटरमधून एकदाही टाळी, शिट्टी आली नाही, हे जरा जास्तच जाणवलं. (‘उरी’च्या तुलनेत तर ते फारच जाणवलं.) अर्थात, हा बाळासाहेबांचा संपूर्ण चरित्रपट नाहीच, हे शेवटी समजलंच. त्यामुळं काहीसं असमाधान घेऊन पुढच्या भागाची वाट पाहायची.
बाळासाहेबांनी स्वत: हा चित्रपट पाहिला असता, तर ते कदाचित चेतन सशीतल यांना म्हणाले होते, तसंच संजय राऊत यांना म्हणाले असते का? - ‘चांगलंय. परत काढू नकोस!’

दर्जा : तीन स्टार

---

24 Jan 2019

उरी - द सर्जिकल स्ट्राइक - रिव्ह्यू

‘उरी’ अभिमानच, पण...
-----------------------

‘उरी - द सर्जिकल स्ट्राइक’ हा नवा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासून खूप चर्चेत आहे. अनेकांना तो अफाट आवडलाय, तर अनेकांना त्याचं या वेळी प्रदर्शित होणं फार सूचक वाटतंय. हा सिनेमा पाहायला मला दोन आठवडे जमलंच नाही. अखेर आज, गुरुवारी (२४ जानेवारी) मी तो पाहिला. मला सिनेमा आवडला. युद्धपट पाहायला मला आवडतात. ‘उरी’ हा भारतीय लष्कराच्या अतुलनीय कामगिरीवर आधारित सिनेमा असल्यानं तो पाहताना अजूनच जास्त छान वाटतं. आपल्या लष्करी अधिकाऱ्यांबद्दल, जवानांबद्दल विलक्षण अभिमान आपल्या उरी दाटून येतो. ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांना शिकवलेला मोठाच धडा आहे, यात वाद नाही. अशी मोहीम राबविताना पंतप्रधानांपासून सर्वच उच्चपदस्थ सहभागी असतात. अशी धाडसी मोहीम कशी राबविली जाते, ती प्रत्यक्षात कशी आणली जाते, हे सगळं पाहणं आपल्याला आवडतं. ‘उरी’ आपल्या बहुतांश अपेक्षा पूर्ण करतो. 
अनुराग कश्यपनं त्याच्या गाजलेल्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमाची रचना ‘चॅप्टर १’, ‘चॅप्टर २’ अशी पुस्तकासारखी केली होती. ‘उरी’ही तशीच रचना सादर करतो. पहिल्या चॅप्टरमध्ये मणिपूर, नागालँड येथे भारतीय लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, अनेक जवानांचं वीरमरण आणि नंतर आपल्या जवानांनी म्यानमारच्या सीमेत घुसून घेतलेला त्याचा बदला हा भाग येतो. खऱ्या अर्थाने आत्ताच्या सरकारच्या काळातला हा पहिला सर्जिकल स्ट्राइक होता. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानच्या बाजूने होणारी घुसखोरी आणि दहशतवाद्यांकडून आपल्या तळांवर होणारे हल्ले थांबले नाहीत. उरी येथे झालेला हल्ला असाच भीषण आणि आपल्या सुरक्षा यंत्रणांसाठी लज्जास्पद होता. आपल्याच लष्कराचा गणवेश घालून चार पाकिस्तानी दहशतवादी थेट उरी येथील लष्करी तळात शिरतात आणि झोपलेल्या नि:शस्त्र जवानांना क्रूरपणे गोळ्या घालून संपवतात, ही घटनाच अत्यंत संतापजनक होती. पडद्यावरही ती दृश्ये पाहताना कानशिले गरम झाली होती. अशा या मानहानीकारक हल्ल्यात आपले अनेक जवान मारले गेले. याला चोख प्रत्युत्तर म्हणून ‘पाकव्याप्त काश्मीर’मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करायचा आणि तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचे, अशी योजना ठरली. 
चित्रपटात पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार गोविंद भारद्वाज (परेश रावल) (अजित डोवल यांच्यावर बेतलेले पात्र) ही योजना आखतात आणि तडीस नेतात. मेजर विहान शेरगिल (विकी कौशल) हा धाडसी व शूर अधिकारी ही योजना प्रामुख्याने प्रत्यक्ष राबवतो आणि यशस्वी करतो. चित्रपटात हा सगळा भाग थरारकपणे समोर येतो. सुमारे दोन तास २० मिनिटांच्या या चित्रपटात आपण बहुतांश काळ खुर्चीला खिळून राहतो.
चित्रपटात विहानची अल्झायमरने त्रस्त आई, त्याची बहीण, लष्करातच अधिकारी असलेला त्याचा मेव्हणा अशी सगळी कथाही समांतरपणे येते. विहानचा मेव्हणा उरी हल्ल्यात बळी पडतो. त्यामुळं या सर्जिकल स्ट्राइकमध्ये आपण सहभागी व्हायचंच याबद्दलचा विहानचा निश्चय पक्का होतो. त्यानंतर तो या योजनेत कसा सहभागी होतो, आर्मी इंटेलिजन्सच्या मदतीने ही योजना कशी आखतो आणि प्रत्यक्षात कशी पार पाडतो, हा सगळा थरारक भाग उत्तरार्धात येतो. 
‘हाऊ इज द जोश?’ असं विचारणारा विकी कौशलचा नायक आपल्याला आवडतो. या सिनेमातला त्याचा वावर अत्यंत उमदा, जोशपूर्ण असाच आहे. त्यानं घेतलेली मेहनत जाणवते. तुलनेनं यामी गौतम व कीर्ती कुलहारी यांना फार स्थान नाही. परेश रावल यांनी अजित डोवाल यांच्यावर बेतलेल्या गोविंद भारद्वाज या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भूमिका केली आहे. रजित कपूर यांनी मोदींची भूमिका केली आहे, मात्र ते अजिबात ‘मोदी’ वाटत नाहीत. मनोहर पर्रीकरांच्या भूमिकेत योगेश सोमण चपखल बसले आहेत. मात्र, त्यांनाही फार वाव नाही. 
या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स सगळं उच्च प्रतीचं आहे. एलओसी व पाकव्याप्त काश्मीरमधील गावं हे सगळं चित्रिकरण युरोपातील सर्बिया देशात झालेलं आहे. त्यामुळं तिथली चकचकीत खेडी लगेच ओळखू येतात. ती पाकव्याप्त काश्मीरमधील वाटत नाहीत. गरूड पक्ष्याच्या ड्रोनची कल्पना भारी आहे. प्रत्यक्षात असं काही झालं होतं का, माहिती नाही. चकमकीचे प्रसंग खरे वाटतात. गोळीबाराचे आवाज आणि साहसदृश्ये जमून आली आहेत. मात्र, शेवटी विकी कौशल आणि दहशतवाद्यांचा कमांडर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतात, हे जरा अती वाटतं. लष्करी मोहिमा कशा राबविल्या जातात, याची सखोल माहिती असलेल्यांना कदाचित हा सिनेमा भाबडा व हास्यास्पद वाटू शकेल. पण सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी शत्रूच्या घरात घुसून मारणारा आपला लष्करी जवान व अधिकारी टाळ्या-शिट्ट्यांचेच धनी आहेत, यात वाद नाही.
अर्थात, हे सगळं चांगलं असलं, तरी हा सिनेमा आत्ता प्रदर्शित करण्यामागची सूचक वेळ लक्षात येते आणि आपल्या लष्कराच्या कामगिरीचा सत्ताधारी पक्ष आपल्या प्रचारासाठी वापर करून घेत नाहीय ना, अशी शंकाही येते. या सिनेमात काही वेळा ‘यह नया हिंदुस्थान है’ असा जरा मुद्दाम होत असलेला उल्लेख पाहिला, की या शंकेला पुष्टी मिळते. काय वाट्टेल ते झालं, तरी लष्कराच्या कामगिरीचा राजकारणाशी संबंध जोडला जाऊ नये. भारतीय लष्कर पूर्वीपासूनच चांगली कामगिरी करीत आलेलं आहे. सध्या सत्तेवर कोण आहे, याच्याशी त्याच्या कर्तृत्वाचा संबंध जोडता कामा नये.
हा सिनेमा पाहावा तो आपल्या लष्करासाठीच! कारण सिनेमा संपताना वाटतं, की आपण इकडं किती सुरक्षित आयुष्य जगतो! आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला लष्करी शिक्षण व प्रशिक्षण सक्तीचं करायला पाहिजे. तेव्हाच या लष्कराच्या बलिदानाची किंमत आपल्याला कळेल. तोवर ‘उरी’ जखमा होतच राहतील.... 

दर्जा : साडेतीन स्टार

----

4 Jan 2019

रिव्ह्यू - भाई : व्यक्ती की वल्ली

पुतळा चैतन्याचा...
----------------------

सध्या मराठीत बायोपिकची चलती आहे. बालगंधर्वांपासून ते डॉ. काशिनाथ घाणेकरापर्यंत अनेकांवरचे चित्रपट निघाले आहेत. ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ असलेले पु. ल. देशपांडे तरी याला कसे अपवाद ठरतील? त्यात सध्या पुलंची जन्मशताब्दी सुरू आहे. त्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी पुलंवरील बायोपिक ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ तयार केला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, त्यातील पूर्वार्ध आज, ४ जानेवारीला सर्वत्र झळकला आहे.
पुलंच्या लेखनावर (उदा. म्हैस) चित्रपट काढण्याचे आधीचे प्रयत्न वाईट फसले होते. स्वत: पु. ल. उत्तम परफॉर्मर असल्याने त्यांच्या कलाकृतींना बाकी कुणी हातच लावू नये, असं वाटायचं. पण इथं त्यांच्या कुठल्या पुस्तकावर वा व्यक्तिरेखेवर हा चित्रपट नसून, त्यांचा जीवनपटच आहे. त्यामुळं कशाशी तुलना होण्याचा प्रश्न आधीच निकालात निघाला. आता प्रश्न, की हा जीवनपट कसा झाला आहे? तर याचं उत्तर ‘उत्तम’, ‘अप्रतिम’ असं असून, पुलंवर, मराठी भाषेवर व संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट ताबडतोब जाऊन पाहिला पाहिजे, असं आवर्जून सांगावंसं वाटतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडं एवढा मोठा लेखक व माणूस होऊन गेला, याची माहिती आज चाळिशीत वा त्यापुढे असलेल्या पिढीला असली, तरी नव्या पिढीला ती होणं अगदी महत्त्वाचं आहे. आणि सिनेमा हे माध्यम नव्या पिढीपासून ते सर्वांपर्यंत सहज पोचत असल्यानं या सिनेमाद्वारे पु. ल. नावाचं रसायन नक्की काय होतं, याची माहिती आता खूप जास्त लोकांपर्यंत पोचणार आहे. महेश मांजरेकर यांनी हे फार महत्त्वाचं काम केलं असल्यामुळं त्यांचं आणि पटकथा लेखक गणेश मतकरी यांचं अभिनंदन करायला हवं.
पुलंचं एक (व कदाचित एकमेव) चरित्र प्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले यांनी ‘पुलं : चांदणे स्मरणाचे’ या नावानं लिहिलं आहे व ते नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की हे पुस्तक वाचून हा सिनेमा बघितला तर दुधात साखर! याचं कारण सिनेमा त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना, सगळा कालक्रम दाखवू शकत नाही. मात्र, पुस्तकातून तो आपल्याला नीट कळतो. तो माहिती असेल, तर या सिनेमातल्या लहानसहान जागांचा, संदर्भांचा, पुलंच्या व इतर पात्रांच्या बोलण्याचा आनंद अधिक लुटता येईल.
आता या सिनेमाविषयी! हा सिनेमा अगदी पहिल्या फ्रेमपासून आपल्या मनाची पकड घेतो. पुलंचं आयुष्य एवढं विविधरंगी, विविधढंगी होतं, की ते रूपेरी पडद्यावर अगदी दोन भागांत बसवायचं म्हटलं, तरी ते ‘घागरीत सागर’ सामावण्याएवढं कठीण. त्यामुळं लेखक व दिग्दर्शकासमोर त्यांच्या आयुष्यातल्या निवडक घटनाच घेण्याचं व दाखवण्याचं आव्हान होतं. इथं ती गोष्ट जमून गेल्यानं प्रेक्षक पुलंच्या या चरित्रपटात सुरुवातीपासून रमून जातो.
पु. ल. पुण्यात ‘प्रयाग’ला शेवटी ॲडमिट होते, तिथून या फ्लॅशबॅकनं ही चरित्रकथा सुरू होते. त्याहीआधी पुलंच्या वल्लीपणाची झलक दाखवणारा, न. चिं. केळकर यांना मुंबईतील व्याख्यानानंतर विचारलेल्या ‘पुण्यात अंजिरांचा भाव काय आहे हो?’ या प्रश्नाचा प्रसंग सुरुवातीला येतो. मात्र, चित्रपटाच्या उपशीर्षकात वर्णन केल्याप्रमाणे ‘व्यक्ती की वल्ली’ यापैकी पुलंच्या ‘व्यक्ती’ या अंगाचं अधिक दर्शन या चित्रपटात होतं आणि ते अगदी मनोज्ञ आहे.
पुलंच्या व्यक्तिगत आयुष्यातले, पण कदाचित लोकांना फारसे माहिती नसलेले अनेक प्रसंग या चित्रपटात तपशीलवार पद्धतीनं येतात. त्यात त्यांच्या आईची - लक्ष्मीबाईंची - व्यक्तिरेखा, आबांचं (वडील) पुलंच्या कलागुणांवरील प्रेम व प्रोत्साहन, त्यांचं अकाली जाणं, पुण्यातील दिवाडकर कुटुंबातील सुंदर या मुलीसोबत पुलंचा झालेला विवाह व अवघ्या आठवड्यात त्या नववधूचं टायफॉइडमुळं झालेलं निधन, सुनीताबाईंची व पुलंची पहिली भेट, प्रेम, रत्नागिरीत अगदी साधेपणानं झालेलं लग्न, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी यांच्याशी असलेलं मैत्र आदी गोष्टी येतात. आता या गोष्टी सांगताना दोन बाबी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे यातली पात्रं आणि दुसरी म्हणजे त्या प्रसंगांची मांडणी.... ‘भाई’ दोन्ही बाबींमध्ये उजवा ठरतो. यातली पात्रनिवड चांगली जमली आहे. पुलंचे वडील लक्ष्मणराव (मांजरेकरांचे लाडके) सचिन खेडेकर यांनी साकारले आहेत, तर आईची भूमिका अश्विनी गिरी यांनी केली आहे. अजय पूरकर भीमसेन जोशी, पद्मनाभ बिंड वसंतराव देशपांडे, तर स्वानंद किरकिरे कुमार गंधर्वांच्या भूमिकेत आहेत. अर्थात सिनेमात या सगळ्यांच्या भूमिकेची लांबी फार नाही. मात्र, त्यांचं दिसणं कन्व्हिन्सिंग असणं प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचं होतं. या कसोटीवर हा सिनेमा अगदी पूर्ण उतरतो. (अर्थात जब्बार पटेलांच्या छोटेखानी भूमिकेत सुनील बर्वे शोभत नाही, पण ती भूमिका अगदी काही मिनिटांचीच आहे. त्यामुळं दुर्लक्ष करण्याजोगी!) बाकी महत्त्वाच्या पात्रांची निवड अचूक असल्यानं हा सिनेमा पहिल्या फ्रेमपासून आपल्याला त्या काळात घेऊन जातो. या चित्रपटाचे संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत. रत्नाकर मतकरींनी तो सगळा काळ पाहिलेला असल्यानं त्यांच्या संवादलेखनात आपोआप ती ‘ऑथेंटिसिटी’ आली आहे. त्याचा या सिनेमाला फायदाच झालेला दिसतो.
आता यातली सर्वांत महत्त्वाची दोन पात्रं म्हणजे सुनीताबाई व खुद्द पु. ल.! पैकी सुनीताबाईंच्या तरुणपणीच्या भूमिकेत इरावती हर्षे आहे आणि वयस्कर भूमिकेत शुभांगीताई दामले आहेत. शुभांगीताईंनी चांगलं काम केलं आहे आणि सुनीताबाईंच्या नजरेतला करारीपणा नेमका दाखवला आहे. इरावती हर्षेनंही सुनीताबाई चांगल्या उभ्या केल्या आहेत. मात्र, काही वेळा मेकअप जाणवतो. सगळ्यांत बाजी मारून गेला आहे तो पुलंच्या भूमिकेतील सागर देशमुख. सागरवर या सर्व सिनेमाचा डोलारा उभा होता. मात्र, त्यानं उभे केलेले ‘भाई’ अगदी शंभर टक्के नसले, तरी खूपसे कन्व्हिन्सिंग वाटतात. (कितीही मोठा कलाकार असला, तरी ज्यांनी पुलंना लाइव्ह बघितलं आहे, त्यांच्यासाठी कुणीच ही भूमिका शंभर टक्के अचूक साकारू शकेल, असं वाटत नाही.) सागरनं तरुण वयातले पु. ल. नेमके उभे केले आहेत. पुलंचे सशासारखे पुढचे दात त्यांच्या चेहऱ्याला व एकूणच व्यक्तिमत्त्वाला एक मिश्कीलपणा, भाबडेपणा व निरागसपणा मिळवून देतात. सागरच्या चेहऱ्यावर मुळातच तो निरागस व भाबडा भाव आहे. त्यामुळं त्याला फक्त कृत्रिम दात बसविले, की काम होऊन गेलं... चित्रपट सुरू होताना पुलंचं पात्र ज्या ज्या प्रसंगात येतं, तेथे तेथे शाब्दिक विनोद, कोट्या करतानाच दिसतं. त्यामुळं पुलंचं पात्र एकदम ‘कॅरिकेचर’कडं झुकतंय की काय, अशी भीती वाटायला लागली. मात्र, सुदैवानं दिग्दर्शक, लेखक व अभिनेत्यानं हा सोस वेळीच कमी केला व भूमिका संतुलित झाली. विशेषत: सुनीताबाईंकडं ‘गुड न्यूज’ असताना आपल्याच धुंदीत रमलेले पु. ल. आणि त्यांचा हा अवतार पाहून नंतर सुनीताबाईंनी घेतलेला ‘तो’ निर्णय व त्यावर पुलंची व त्यांच्या आईची झालेली हळवी प्रतिक्रिया हा सगळा काहीसा गंभीर भाग खूप संयतपणे आणि नेमकेपणानं येतो. पुलंचं साधं ‘माणूस’ असणंच त्यातून अधोरेखित होतं. त्या दृष्टीनं हा प्रसंग महत्त्वाचा ठरतो.
या चित्रपटात पुलंच्या अजरामर पात्रांपैकी नाथा कामत व अंतू बर्वा वेगळ्या नावांनी येतात. मात्र, पुलंच्या पात्रांचं नाट्यीकरण झालं, की (म्हणजे पुलंव्यक्तिरिक्त अन्य कोणी ते केलं की) जो अनुभव येतो, तोच इथंही येतो. इथला नाथा कामत फारसा आवडत नाही, की इथला अण्णा कर्वे फारसा भिडत नाही. (विद्याधर जोशींनी काम मात्र चांगलं केलंय.) अगदी शेवटी राम गबाले, माडगूळकर व रावसाहेब ही पात्रंही अवतीर्ण होतात. यापैकी रावसाहेबांचं पात्र हृषीकेश जोशीनं धमाल रंगवलं आहे. (अर्थात पुन्हा, यात हृषीकेशनं त्या पात्राला अर्कचित्राचा जो टोन दिलाय, तो मूळ व्यक्तीवर अन्याय करणारा आहे. पण तरी सिनेमात हे पात्र थोडाच वेळ येत असल्यानं तेवढं खपून जातं, असं म्हणायला हरकत नाही.)
या सिनेमातला सर्वांत रंगलेला व टाळ्या घेणारा प्रसंग म्हणजे अर्थातच पु. ल., भीमसेन व वसंतराव हिराबाई बडोदेकरांकडं (सिनेमात चंपूताई असा घरचा उल्लेख आहे...) जातात व तिथं आधीच उपस्थित असलेल्या कुमार गंधर्वांसह मैफल रंगवतात तो! यातलं ‘सावरे ऐजैयो’ व ‘कानडा राजा पंढरीचा’ ही गाणी ऑलरेडी सुपरहिट झाली आहेत. मला वाटतं, पुल या माणसाचं व या सिनेमाचंही सगळं सार या मैफलीत दडलेलं आहे. गाण्यात रमलेला, उत्तम कलागुण असलेला, सुंदर पेटी वाजवणारा, उत्कृष्ट आस्वादक असलेला आणि दाद देणारा असा एक खेळिया, कलंदर माणूस पुलंच्या रूपानं यात दिसतो. तेव्हाच्या महाराष्ट्राची संस्कृतीही दिसते. आपण त्या काळी का नव्हतो, आपण त्या मैफलीत का नव्हतो याची खंत वाटावी असं सादरीकरण म्हणजे त्या काळाला, त्या माणसांना व अर्थातच त्या कलाकृतीला दिलेली दाद असते. त्यामुळंच या गाण्यानंतर थिएटरमध्ये कडाडून टाळी पडते. हा सिनेमा आवडल्याचीही ती पावती असते. त्या गाण्यात म्हटल्याप्रमाणं ‘पुतळा चैतन्याचा’ हे वर्णन विठ्ठलाचं असलं, तरी ते पुलंनाही चपखल लागू होतं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचा तो विठ्ठलच होता... त्यानं सुरू केलेल्या आनंदयात्रेत आपण सगळे वारकरी अजूनही न्हाऊन निघत आहोत... ‘भाई’ हा सिनेमा हेच सत्य पुन्हा अधोरेखित करताना डोळ्यांच्या कडाही ओलावतो...
दोन तासांत सिनेमाचा पूर्वार्ध संपल्यावर वाटतं, की अरे, पुढचे दोन तासही आपण सहज बसलो असतो! पण आता पुढच्या भागाची ८ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करणं आलं...
(पुढच्या भागात पुलंची दूरदर्शनमधील कामगिरी, बटाट्याची चाळ व इतर एकपात्री प्रयोगांचा धमाल काळ, बाबा आमटेंशी स्नेह आदी गोष्टी असणार आहेत व त्याची झलक या सिनेमाच्या शेवटी पाहायला मिळते.)
तेव्हा पुलप्रेमींनी व अन्य रसिकांनीही चुकवू नये, असाच हा चित्रपट आहे!
---
दर्जा : चार स्टार
----