30 Dec 2019

मटा - रविवार लेख

‘२०-ट्वेंटी’ची ‘कसोटी’
--------------------------

एकविसाव्या शतकातलं दुसरं दशकही संपत आलं आणि आता आपण ‘२०२०’ या वर्षात पदार्पण करीत आहोत. आपले दिवंगत माजी राष्ट्रपती - अन् कदाचित सर्वाधिक लोकप्रियही - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘महासत्ता’ होण्यासाठी ज्या वर्षाचं लक्ष्य आपल्याला दिलं होतं, तेच हे वर्ष! आपण ‘२०२०’मध्ये महासत्ता होऊ की नाही, याचं उत्तर आता आपल्याला मिळालेलंच आहे. तरीही वर्षाच्या सुरुवातीलाच नकारात्मक विचार कशाला मनात आणायचा? याच वर्षात म्हणजे २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात ‘२०-२०’ची, अर्थात टी-२० ची विश्वचषक स्पर्धा होते आहे. ती स्पर्धा जिंकून आपण याच वर्षात ‘२०-२०’मधील महासत्ता तर नक्कीच होऊ शकतो. आपल्या संघाला त्यासाठी शुभेच्छा...
क्रिकेट संघाचं तसं बरं चाललंय. पण आपल्या ‘भारत’ नावाच्या १३७ कोटी जनतेच्या संघाचं काय? एकविसावं शतक सुरू होण्याच्या वेळी म्हणजे २००१ मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या एक अब्जाचा टप्पा ओलांडून गेली होती. त्या जनगणनेत आपली लोकसंख्या १०७ कोटी नोंदली गेली होती. ही लोकसंख्या १९ वर्षांनंतर तब्बल ३० कोटींनी वाढून १३७ कोटी झाली आहे. लोकसंख्या नियोजनाचे सर्व प्रयत्न करूनही आपली लोकसंख्या एका दशकात १५ ते २० टक्क्यांनी वाढते आहे. त्यामुळंच आपण लवकरच चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरणार आहोत. डॉ. कलाम यांच्या मनातल्या ‘महासत्ते’शी आपल्या आत्ताच्या परिस्थितीची तुलना केली तर हाती काय येतं? गेल्या दोन दशकांत आपण कुठून कुठं आलो? यापुढं कुठं जाणार? आपल्या पुढच्या पिढीच्या हाती आपण कोणता वारसा सोपवत आहोत? या गोष्टींचा धांडोळा घेण्यासाठी ‘२०२०’मध्ये पदार्पण यापेक्षा चांगला मुहूर्त नसेल.
एकविसाव्या शतकाच्या आगमनाची पहिली ग्वाही आपल्याला मिळाली ती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या भाषणांमधून. एका अनपेक्षित परिस्थितीत थेट देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारावी लागलेल्या या तरुण पंतप्रधानाच्या डोळ्यांत पुढच्या शतकाची स्वप्नं होती. ‘हमें देखना हैं’ या त्यांच्या सानुनासिक उच्चारातील भाषणांची चेष्टा खूप झाली; पण ‘इक्कसवीं सदी’ हा शब्द सतत ऐकायला मिळाला तो त्यांच्याकडूनच. मोठमोठ्या आकाराचे कम्प्युटर सगळ्या कार्यालयांत विराजमान होण्याचा तो काळ होता. काय दुर्दैवी योगायोग... एकविसाव्या शतकाचं स्वप्न दाखविणाऱ्या राजीव गांधींची १९९१ मध्ये हत्या झाली आणि तेच वर्ष आपल्या इतिहासातलं एक वेगळं वळण देणारं वर्ष ठरलं. पुढच्या दशकात आपला देश कुठं जाणार आहे त्या रस्त्याची दिशा याच वर्षी निश्चित झाली. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली झाली आणि पुढच्या दहाच वर्षांत देश एका वेगळ्या वळणावर येऊन उभा राहिला. या आर्थिक धोरणांतील बदलांची फळं आता दिसू लागली होती. देशातील तरुणांना नवनव्या संधी उपलब्ध होत होत्या आणि देशाचा चेहरामोहराच बदलत होता. केबल टीव्हीपासून ते ‘कोकाकोला’पर्यंत आणि खासगी नोकऱ्यांपासून ते घराघरांत वाढू लागलेल्या आर्थिक सुबत्तेपर्यंत हा बदललेला चेहरा स्पष्टच जाणवत होता. वीस वर्षांपूर्वी म्हणजे २००० हे वर्ष उजाडण्याच्या वेळी सगळ्या जगात एक वेगळाच जोष संचारला होता. एका महत्त्वाच्या कालखंड बदलाचे आपण साक्षीदार आहोत, असं प्रत्येकाला वाटत होतं. ‘वायटुके’ नावाच्या कम्प्युटर प्रॉब्लेमचा तेव्हा बोलबाला होता. ‘इंटरनेट’ ही ‘इन थिंग’ व्हायला सुरुवात झाली होती. महानगरांमध्ये मॉल आणि मल्टिप्लेक्स संस्कृती रुजू लागली होती आणि महामार्गांचा चेहरा जरा गुळगुळीत होऊ लागला होता. सनदशीर मार्गानं, बुद्धीचा वापर करून भरपूर पैसे मिळविता येतात आणि संपत्ती निर्माण करता येते, याचा नवमध्यमवर्गीय तरुणांना झालेला साक्षात्कार ही त्या दशकाची सर्वांत मोठी देणगी होती. पैसा आल्यानं पारंपरिक मूल्यव्यवस्थेला हादरे बसण्याचाही हाच काळ होता. थोडक्यात, भौतिक सुखाची गंगा भारतभूमीवर अवतरली आणि लवकरच या ‘गंगे’चं पात्र आसेतुहिमाचल असं विस्तारलं.
पुढच्या दोन दशकांत हाच प्रवास अधिक वेगानं, अधिकाधिक वेगानं होत गेला. नेपथ्यरचना थोडीफार बदलली, तरी मूळ नाटकाचा संच तोच होता. एकीकडं संपत्तीनिर्माणाची संधी आणि दुसरीकडं पारंपरिक मूल्यव्यवस्थेशी संघर्ष असा हा जोडप्रवास काही काळ चालू राहिला. नंतर तंत्रज्ञानातील अफाट वेगवान बदलानं जगण्याची सगळी मितीच बदलवून टाकली. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर आपल्याकडं ‘स्मार्टफोन’ आले आणि आपलं जगणं खरंच पहिलं राहिलं नाही! त्यामुळं काय काय झालं आणि काय कमावलं-गमावलं हे आपल्याला आता सगळं ठाऊक झालं आहे. आता पुढं काय, हा प्रश्न आहे.
आता लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा, की २००० मध्ये जन्मलेली मुलंही आता १९ वर्षांची झाली आहेत. प्रौढ आहेत. त्यांनी मतदानही केलेलं आहे. त्याच्या लेखी विसावं शतक म्हणजे केवळ इतिहास आहे. त्यांच्यासमोर हे सगळं शतक उभं आहे. अजून ८० वर्षं आहेत. ही मुलंच हे शतक घडवणार आहेत. (विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा शेवटी जन्मलेल्यांचाही ठसा या शतकावर असेलच!) या मुलांसाठी आपण ‘वारसा’ म्हणून काय देणार आहोत, याचा विचार करू लागलो तर मात्र काहीशी निराशा दाटून आल्याखेरीज राहत नाही. यात सगळ्यांत महत्त्वाचा असेल तो पर्यावरणाचा प्रश्न. पर्यावरणाचे घातक परिणाम पुढील पिढ्यांना भोगायला लागू शकतात. याची जाणीव आता जागतिक पातळीवर सगळीकडं होऊ लागली आहे. ऋतुचक्र बदलत चाललं आहे, हे आपणही आत्ता अनुभवतोय. निसर्गाचा समतोल ढासळला तर माणसानं बसवलेली घडी विस्कटायला अजिबात वेळ लागणार नाही. हा प्रश्न आपल्या अस्तित्वाशीच निगडित असल्यानं त्यावर पुढच्या काळात अधिकाधिक काम करावं लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक प्रगतीचा. देशासमोर बेरोजगारी, मंदी, घटलेला वृद्धिदर हे सगळंच मोठं आव्हान आहे. या तरुण पिढीच्या हाताला काम मिळालं नाही, तर त्यांच्यातील ऊर्जास्रोताला विघातक वळण मिळण्यास वेळ लागत नाही. आपण आत्ताही आजूबाजूला याची लागण झालेली पाहतोच आहोत. तेव्हा पुढच्या काळात तातडीनं या प्रश्नावर सगळ्यांनी मिळून मार्ग काढलाच पाहिजे. तिसरा प्रश्न आहे तो महानगरांमधील पायाभूत सुविधांचा. आपली खेडी ओस पडत चालली आहेत आणि शहरं अतिभयानक पद्धतीनं फुगत चालली आहेत. ही नैसर्गिक वाढ नाही. ही आपल्या फसव्या नियोजनामुळं आलेली सूज आहे. महानगरांमध्ये आत्ताच वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, महागाई आणि बेशिस्त या दुर्गुणांचा सर्वत्र संचार दिसतो. भविष्यात ही स्थिती सुधारली नाही तर रस्त्यारस्त्यावर खून पडायला वेळ लागायचा नाही. हे अराजक टाळण्यासाठी शहरांमधली गर्दी नियंत्रित केलीच पाहिजे.
सगळं जगणंच ‘टी-२०’सारखं वेगवान होत चाललेलं असताना आणि सगळ्याच प्रश्नांवर झटपट उत्तरं शोधण्याचा जमाना असताना, काही गोष्टींकडं दीर्घ पल्ल्याच्या कसोटी क्रिकेटसारखं बघितलं पाहिजे. टिकून राहणं एवढंच आव्हान केवळ पुरेसं नाही, तर टिकून राहून जगण्याचा आणि मानव्याचा दर्जा टिकवणं ही खरी ‘कसोटी’ आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २९ डिसेंबर २०१९)

---

25 Dec 2019

मटा रविवार संवाद लेख

स्वप्नांचा 'केक'वॉक
-----------------------

ख्रिसमसची चाहूल लागली, की तो शुभ्र दाढीधारी, लाल टोपीवाला सांताक्लॉज आठवतो. नाताळच्या आदल्या दिवशी रात्री हा गुपचूप घरी येऊन मुलांना भेटवस्तू ठेवून जातो. त्यासाठी घरोघरी मुलं ते सॉक्स टांगून ठेवतात. (याहून बरी वस्तू चालली असती खरं तर!) असो. तर मुलांची अशी दर वर्षी मजा मजा असते. पण आमचं म्हणणं, मोठ्यांनी काय पाप केलंय? त्यांनाही सांतानं भेटवस्तू द्याव्यात की...
आमच्या मागण्या तशा काही फार नसतात. मध्यममार्गीय विचारांची आणि मध्यमवर्गीय मनांची धाव कुठवर जाणार हो! पण पहाटे पहाटे येऊन सांताबाबानं कधीही बिल न येणारं एखादं क्रेडिट कार्ड आमच्या मोज्यात टाकलं, तर काय हरकत आहे? नोटाबंदीच्या धसक्यानंतर आम्ही शक्यतो रोख रक्कम बाळगणं बंदच केलंय. तसंही खिशात पैसे असले, की ते नाहक खर्च होतात. त्यापेक्षा ते नसलेलेच बरे. मात्र, कधीच बिल न येणारं क्रेडिट कार्ड मिळालं तर आम्ही आयुष्यभर सांताची गुलामी करायला तयार आहोत. विरक्ती ही संतांची शिकवण असली, तर आसक्ती ही सांताची शिकवण आहे. आणि आम्ही आमच्या आयुष्यात अजून आसक्ती सोडलेली नाही. आम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी करायला आवडतात. आम्हाला चांगले सिनेमे पाहायला आवडतं, नाटकं पाहायला आवडतात, सवाई गंधर्व महोत्सव सोफ्यावर बसून ऐकायचा असतो; याशिवाय बिझनेस क्लासनं इंटरनॅशनल प्रवास करायचा असतो. सगळं जग हिंडून बघायचं असतं. आणखी म्हणाल, तर अंबानींच्या मुलीच्या लग्नात (वाढपी म्हणून नव्हे) मिरवायचं असतं; प्रियांका-निकच्या लग्नात तिचा बेस्ट मॅन व्हायचं असतं (आता दुसरा पर्याय तरी कुठं ठेवलाय तिनं?); याशिवाय सहकारसम्राट, शिक्षणसम्राट, मद्यसम्राट आदी मंडळींच्या दर वर्षी नित्यनेमानं होणाऱ्या वेगवेगळ्या समारंभांना, लग्नांना-बारशांना-मुंजींना आम्हाला हेलिकॉप्टरनं जायचं असतं. फक्त बारीकशी अडचण एवढीच, की या सगळ्यांसाठी फार पैसे लागतात हो! म्हणून आम्हाला ना सांताकडून ते कधीही बिल न येणारं क्रेडिट कार्ड हवंय. (वास्तविक आपल्या देशात कधीही परत न फेडण्याची कर्जे सरकारी बँकांकडून घेऊन, मोठमोठ्या लोकांनी केवढा 'आदर्श' घालून दिला आहे. पण आम्हाला एवढी मोठी झेप काही जमायची नाही. त्यामुळं आम्हाला आपलं बिल न येणारं कार्ड पुरे!) बघा सांता, जमवा तेवढं!
आणि हो, सांता, आम्हा शहरवासीयांना अजून एक हक्काची जागा हवीय. ती द्याल का तुम्ही? आम्ही जिथं कुठं आमची दुचाकी किंवा चारचाकी घेऊन जाऊ, तिथं तिला लगेचच पार्किंग मिळेल, अशी काही तरी जादू करा ना! म्हणजे बटण दाबलं, की गाडीच्या समोर बरोबर तेवढी मोकळी जागा तयार झाली पाहिजे. अहो, आम्ही साधी भाजी आणायला गेलो, तरी पार्किंगसाठी दोन दोन, तीन तीन चकरा माराव्या लागतात आम्हाला. म्हणजे भाजी शंभर रुपयांची आणि त्यासाठी पेट्रोल जाळायचं दोनशे रुपयांचं असा आमचा उफराटा कारभार झालाय बघा. त्यामुळं आमच्या गाडीला अशी एक जादूची यंत्रणा बसवा, की ती गाडी आम्ही जिथं कुठं घुसवू तिथं आपोआप त्या गाडीच्या आकाराची जागा तयार व्हायला हवी. आजूबाजूची गर्दी अशी अवाक होऊन बघत राहिली पाहिजे. (पुण्यात हे दृश्य जमवणं तसं अवघड आहे म्हणा. इथं कितीही भारी सेलिब्रिटी शेजारून गेला, तरी आपल्या कट्ट्यावरच्या टोळीतून मान न वळवणारेच जास्त!) पण तरीही ती पार्किंगला आयती जागा मिळण्याची आमची फँटसी कायम आहे. सांताबाबा, आता अशी जादू फक्त तुमच्या पोतडीतच आहे बघा. तर विचार करा. तेवढं काम करूनच टाका...
अजून एक छोटीशी मागणी. खरं तर ही छोटीशी मागणी नाही म्हणता येणार; कारण त्या मागणीतच आम्हाला 'खूप काही' हवंय. सांता, आम्ही आता भारी भारी स्मार्टफोन वापरतो. पण त्यात कितीही जागा असली, तरी ती आम्हाला पुरत नाही. त्यामुळं आम्हाला अनलिमिटेड डेटा दिलात, तसंच अनलिमिटेड स्पेस पण द्या ना! हे म्हणजे खायला द्यायचं, पण पोट नाही द्यायचं असं झालं. असं करू नका. पोटावर मारा; पण डेटावर मारू नका. आमचं वाय-फाय, आमचं नेटवर्क कधीही बंद पडू देऊ नका. आमच्या स्मार्टफोनची बॅटरी कधीही उतरू देऊ नका. तुम्हाला तर माहितीच आहे, की हल्ली आम्ही एक वेळ न जेवता राहू (पण एक वेळच हं... रात्री मजबूत जेवू!), पण स्मार्टफोनशिवाय आम्हाला एक मिनिटही काढणं केवळ अशक्य आहे. आमच्या पोस्टवर येणाऱ्या 'लाइक'च्या संख्येवर आमचा त्या त्या वेळचा मूड असतो, हेही आता सांगायला नको. तेव्हा सांता, येताना भरपूर जीबी, टीबी भरून स्पेस घेऊन या आणि आमच्या गरिबाच्या स्मार्टफोनच्या झोळीत तेवढी टाका. हे तुम्हाला नक्की जमेल सांता... बघाच! तुम्ही हे एकदा केलंत की आमचे सगळे 'लाइक' तुम्हालाच!
सांता, आमच्या आजूबाजूला सध्या गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हे असे वेडपट लोक आम्हाला रोज रस्त्यानं जाता-येता दिसतात. काही जण भयानक धूर सोडणाऱ्या गाड्या चालवत असतात, काही जण बेदरकारपणे सिग्नल मोडून पुढं आपलं बाइकरूपी घोडं दामटत असतात, काही जण बसमधून बाहेरच्यांची पर्वा न करता पचापच थुंकत असतात, काही लोक रस्त्याच्या डाव्या बाजूला येऊन उभे राहतात आणि सिग्नल सुटला, की समोर जाणाऱ्यांना गाडी आडवी घालून उजव्या बाजूला वळतात, काही जण 'नो एंट्री'तून सरळ घुसतात आणि वर त्यांना काही म्हटलं, की बोलणाऱ्याचीच आय-माय उद्धरतात, काही महाभाग मध्यरात्री प्रचंड मोठा आवाज करीत, महागड्या गाड्या उडवीत बेफाम उद्दामपणा करतात, काही जण वाढदिवसाच्या नावाखाली वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथं फटाके उडवतात आणि अक्षरशः लाखो रुपयांचा धूर करतात, काही थोर महात्मे दारू पिऊन गाड्या चालवतात आणि स्वतःबरोबरच दुसऱ्याच्याही जीवाला धोका उत्पन्न करतात. तेव्हा सांताजी, या सगळ्यांचा मेंदू गुडघ्यातून काढून पुन्हा डोक्यात जागच्या जागी बसवणं तुम्हाला जमेल काय? ही मागणी आम्ही स्वतःसाठी नाही, तर आमच्या शहरासाठी, सगळ्या समाजासाठी करतो आहोत. तुम्हाला 'सीएसआर' म्हणून काही जबाबदारी असेलच की! त्या 'हेड'खाली एवढं काम करून टाका आणि तुम्हीही पुण्य कमवा...
याखेरीज अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ऑफिसात बॉसने न कुरकुरता हवी तेवढी रजा देणे, बायकोनं न कुरकुरता मित्रांसोबत हव्या तेवढ्या पार्ट्या करायला वा हुंदडायला जाऊ देणे, आपल्या क्रिकेट संघाने परदेशात जाऊन दर वेळीच माती न खाणे, मराठी सीरियलमध्ये डोक्यात न जाणारे (आणि डोक्याला पटणारे) प्रसंग घडविणे, वेळच्या वेळी बस/ट्रेन/विमान यांचे रिझर्व्हेशन मिळणे, फार अपेक्षा ठेवून वाचायला घेतलेले पुस्तक अगदीच टुकार न निघणे, फेसबुकवर आपण एका हेतूनं टाकलेली पोस्ट लक्षात न घेता, मूर्खासारख्या भलत्याच कमेंट करणाऱ्या लोकांना लिस्टीतून आपोआप गायब करणे अशा किती तरी गोष्टी तुम्ही सहज करू शकता, सांता... तुम्ही हे केलंत ना, तर लक्षावधी लोक तुम्हाला दुवा देतील बघा! (आमच्याकडं तर लगेच तुमचं मंदिरही बांधतील आणि वर तुमच्या धर्माच्या/जातीच्या चौकशा सुरू होतील.) असो.
आता शेवटची एकच मागणी - आमच्या राजकारण्यांना भ्रष्टाचार न करण्याची बुद्धी द्या...
अरे, अरे! असे पळून जाऊ नका हो सांता, एवढं अवघड आहे का हे? अहो, थांबा ना... असं काय करता? ओ सांता...

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २३ डिसेंबर २०१८)

---

30 Nov 2019

चिंतन आदेश दिवाळी २०१९ - लेख

जीवन त्यांना कळले हो...
-----------------------------


माणूस जन्माला आल्यापासून कुणाच्या ना कुणाच्या तरी प्रभावाखाली वाढत असतो. कुणाच्याही प्रभावापासून मुक्त असा माणूस मिळणं कठीणच. आपल्यावर सगळ्यांत आधी आपल्या आईचा व नंतर वडिलांचा प्रभाव पडत असतो. अगदी सुरुवातीपासून याच दोन व्यक्ती आपल्याबरोबर असतात. हे रक्ताचं नातं असल्यानं तो प्रभाव शारीरिक व मानसिक असा दोन्ही पद्धतींनी होतो. नंतर महत्त्वाचा प्रभाव पडतो तो आपल्या भावंडांचा. त्यातही मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांचा प्रभाव जास्त पडतो. अनेकांच्या आयुष्यात आई-वडिलांच्या जोडीनं त्यांच्या मोठ्या भावाचा किंवा बहिणीचा प्रभाव महत्त्वाचा असल्याचं दिसून येतं. सचिन तेंडुलकर व त्याचा मोठा भाऊ अजित हे याचं ठळक उदाहरण सांगता येईल. सख्ख्या भावंडांनंतर मग चुलत, मामे, मावस अशी भावंडं, त्यानंतर काका, मामा, मावशी, आत्या, काकू, मामी अशी नाती येतात. हे सगळे लोक अगदी लहानपणापासून आपल्यासोबत असल्यानं त्यांच्यापैकी कु णाचा तरी प्रभाव आपल्यावर पडणं अगदी सहज शक्य असतं. यातल्या कुणाला तरी वाचनाची आवड असते, कुणाला वाद्य वाजविण्याचा छंद असतो, तर कुणाला भटकंतीचा... या सगळ्यांचा आपल्यावर कळत-नकळत प्रभाव पडत असतो. त्यानंतर आपल्या आयुष्यात येणारी महत्त्वाची प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आपले गुरू, शिक्षक. अनेकांच्या आयुष्यात शिक्षकांचा वाटा फार महत्त्वाचा असतो. शिक्षक अनेक विद्यार्थ्यांचं जीवन अक्षरशः 'घडवत' असतात. शाळेतले, महाविद्यालयांतले सर्व शिक्षक आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत असतात. याशिवाय आपण आयुष्यात ज्यांना कधीही भेटलो नाही, अशा व्यक्तींचाही प्रभाव आपल्यावर पडू शकतो. यात इतिहासातील व्यक्तिरेखा असतात, तसेच आपल्या जन्मापूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीही असतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत आणि अल्बर्ट आइन्स्टाइनपासून ते महात्मा गांधींपर्यंत हजारो व्यक्तिश्रेष्ठ येऊ शकतात. याशिवाय आपल्या काळातच वावरणाऱ्या, पण आपण त्यांना कधीही भेटू शकू अशी शक्यता नसलेल्याही व्यक्ती आपल्यावर प्रभाव पाडत असतात. यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, सुनील गावसकर अशांची नावे सांगता येतील. काही जणांचं आयुष्य अगदी वेगळं, विलक्षण असतं. अशा व्यक्तींचे अनुभव ऐकून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. तसं जगावंसं वाटतं. अशा व्यक्तींच्या जीवनशैलीचाही आपल्यावर नकळत प्रभाव पडतो.
माझ्या आयुष्यावर वर उल्लेख केलेल्या प्रत्येक घटकाचा कमी-अधिक प्रभाव पडला आहे. आई-वडील, लहानपणीचे शिक्षक हे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे गुरू व प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती असतातच. त्यामुळे मी ते गृहीत धरूनच पुढे लिहितो. आमच्या गावी एक उत्तम दर्जाचं वाचनालय होतं. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची गोडी लागली. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं 'महाराज' हे पुस्तक वाचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी कुतूहल निर्माण झालं. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्रात होऊन गेलं, याचा अभिमान दाटून आला. पुढं महाराजांविषयी विपुल लेखन वाचण्यात आलं. या आभाळाएवढ्या माणसाबद्दलचा आदर वाढतच गेला. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एवढा विलक्षण होता, की त्यांच्या जीवनातले एकेक पैलू समजून स्तिमित व्हायला होतं. अजूनही कुठल्याही किल्ल्यावर, गडावर गेलो, की तिथल्या मातीला महाराजांचे चरणस्पर्श झाले असतील, या भावनेनं ऊर दाटून येतो. सिंधुदुर्ग किल्ल्यात महाराजांची पावलं बघून असेच डोळे भरून आले होते. मायमाउलीसारखी रयतेची काळजी घेणारा हा राजा केवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आयुष्य झुंजला, हे बघून मी सदैव नतमस्तक होतो. माणसांची अचूक पारख, जीवाला जीव देणारा दिलदार स्वभाव, प्रसंगी दोन पावलं माघार घेण्याचं चातुर्य आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आईचं स्वप्न साकार करण्यासाठी तळहातावर शिर घेऊन उभ्या आयुष्याचीच केलेली झुंज या सगळ्याच गोष्टींमुळं महाराज मोठे झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कायम आहे आणि राहील.
पुढं पुस्तकं वाचत असताना अनेक लेखकांच्या लिखाणाने प्रेरित झालो. पण माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो विनोदी वाङ्मयाचा. यात चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार अशा अनेक लेखकांचे नाव सांगता येईल.
पण त्यातही माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव कुणा एका व्यक्तीचा पडला असेल, तर तो पु. ल. देशपांडे यांचा. केवळ लेखक पुलं नव्हेत, तर पुलंच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचाच तो प्रभाव होता. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रच पुलंच्या प्रेमात होता व त्यांना 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असं बिरुदही लाभलं होतं. तेव्हा माझ्यावरचा प्रभाव फार काही वेगळा म्हणता यायचा नाही. पण हा प्रभाव कसा पडत गेला, याची थोडी चिकित्सा जरूर करता येईल.
पुलंची पुस्तकं वाचताना सर्वांत प्रथम लक्षात आली ती एक गोष्ट. त्यांचं बहुतांश लेखन हे कथा किंवा कादंबरी या स्वरूपात नव्हतं. म्हणजे एका साच्यातील काल्पनिकता त्यांच्या लिखाणात नव्हती. त्यांनी जे जे लिहिलं, त्याला वास्तव जगण्याचा एक अदृश्य धागा सदैव गुंफलेला जाणवायचा. त्यामुळंच मुंबईसारख्या शहरात किंवा चाळीत कधीही न राहिलेल्या माझ्यासारख्या मुलाला 'बटाट्याची चाळ'ही भिडली. कल्पनेच्या जगात त्यांनी नेलं, पण ते अशा स्वरूपात! 'अपूर्वाई' व 'पूर्वरंग' हा कित्येक मराठी माणसांनी केलेला पहिला परदेश प्रवास होता. त्याआधी मराठी साहित्यिक परदेशांत गेले नव्हते, असं नाही. पण पुलंनी स्वतःबरोबर आम्हाला तिथं साक्षात फिरवून आणलं. त्यामुळं सुमारे ५०-५५ वर्षांनीही पुलंच्याच या लिखाणाचे संदर्भ संबंधित देशात कुणी गेला तरी आजही लिहिले जातात. 'व्यक्ती आणि वल्ली'सारखं पुलंचं अजरामर पुस्तक फार लहान वयात वाचल्यानं माणसं समजायला मदत झाली. जगात किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात आणि त्यांच्यात किती वैविध्य असतं हे पुलंचं लिखाण वाचूनच समजलं. नंतर वय वाढत गेलं, तसं पुलंनी केलेलं गंभीर लेखनही वाचलं. त्यांचे सिनेमे पाहिले, त्यांनी लिहिलेली नाटकं पाहिली, त्यांच्या गाजलेल्या एकपात्री प्रयोगांच्या चित्रफिती नंतर पाहायला मिळाल्या. हे सगळं बघून या माणसाच्या अष्टपैलुत्वाची नव्यानं ओळख घडत गेली. सुनीताबाईंचं 'आहे मनोहर तरी...' हे पुस्तक वाचल्यावर सुरुवातीला सुनीताबाईंचा राग आला होता. पण वयाची प्रगल्भता आल्यानंतर त्या लेखनाचंही मोल कळलं.
मी दहावीत असताना याच पुलप्रेमातून त्यांना पोस्टकार्ड पाठविण्याचं धाडस मी केलं होतं. महिनाभरानं त्यांचं चक्क उत्तर आलं, तेव्हा मला गगन ठेंगणं झालं. मग मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो, तेही त्यांना कळवलं. त्यावर त्यांचं अभिनंदनाचं उत्तर आलं. आता तर मला हर्षवायूच व्हायचा बाकी राहिला होता. पुलंचे ते आशीर्वाद घेऊन मी पुण्यात पुढील शिक्षणासाठी दाखल झालो. एके दिवशी रस्त्यावरच्या फोन बूथवरून थेट त्यांच्या घरी फोन लावला. फोन सुनीताबाईंनी उचलला. 'मला भाईकाकांशी बोलायचंय' असं मी चाचरत चाचरत म्हटलं. थोड्या वेळानं साक्षात पुलं फोनवर आले. त्यांनी माझी अगदी हळुवार आवाजात चौकशी केली. मी कुठं शिकतो, काय करतो विचारलं. मी त्यांना सांगितलं, की मला तुमचं साहित्य आवडतं. त्यावर त्यांनी 'काय आवडलं नेमकं' असं विचारलं. मला उत्तर सुचेना. मग मी 'सगळंच आवडतं' असं ठोकून दिलं. एका हातात रुपयाची आणखी दोन कॉइन धरून मी उभा होतो. युनिव्हर्सिटी रोडवरच्या वर्दळीचा आवाज एका बाजूनं मोठमोठ्यानं येत होता. आणि मी रिसीव्हरला लावलेल्या कानात प्राण आणून माझ्या परमदैवताचं बोलणं ऐकत होतं. हे सगळं बोलणं मिनिटा-दीड मिनिटांचं झालं असेल. नंतर त्यांनी हळुवारपणे 'आता मी ठेवतो हं फोन' असं सांगून फोन बंद केला. त्या वेळी पुलंचं वय ७२-७३ असावं. ते खरोखर थकले होते. त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर पूर्ण थांबला होता. त्यानंतर मी पुलंना आणखी दोन पत्रं पाठवली. त्याचीही त्यांनी उत्तरं पाठविली. पण पहिल्या पत्रातला मजकूर आता हळूहळू कमी होत गेला होता. अक्षरांतील थरथर वाढली होती. माझ्या आवडत्या लेखकाची ही शारीरिक विकलता मला सहन झाली नाही. मी नंतर त्यांना पत्रं लिहिणं थांबवलं. त्यांना प्रत्यक्ष भेटायला जायची फार इच्छा होती. पण ते कधी जमलं नाही. त्या काळात ते मुळातच खूप थकले होते. सुनीताबाई अगदी मोजके, जवळचे लोक सोडले तर त्यांना बाहेरच्या कुणाला भेटूही देत नसत, असं ऐकू येई. मग त्या धास्तीपोटी कधी जाणं झालंच नाही. पुढं मी 'सकाळ'मध्ये उपसंपादक म्हणून काम करू लागलो. त्यानंतर वर्ष-दोन वर्षातच पुलंची तब्येत खूप खालावली व त्यांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुलंचे ते शेवटचे जवळपास आठ-पंधरा दिवस आम्ही काही पत्रकार रोज 'प्रयाग'ला जायचो. मी पुलंना प्रत्यक्ष असं तिथंच पाहिलं. साधारण दहा मीटर अंतरावरून... काचेपलीकडं एका कॉटवर ते झोपले होते व नाकावर ऑक्सिजन मास्क लावला होता. आयुष्यात रंगबिरंगी मुखवटे घालून जगभरातल्या मराठी रसिकांना सतत हसवत ठेवणाऱ्या या अवलियाचं ते तसं दर्शन मात्र मला अगदी असह्य झालं. काही दिवसांनी पुलं गेले. माझ्या ऑफिसमध्ये मला ही बातमी कळली. चारचौघांत रडण्याची एक मध्यमवर्गीय, घाबरट भीती मनात होती. मग ऑफिसबाहेर आलो. शनिवारवाड्याच्या कॉर्नरवरून घरी जाताना अश्रूंचा बांध फुटला. मनसोक्त रडलो. वास्तविक ते जाणार हे जवळपास स्पष्टच झालं होतं. पण तरीही 'ते आहेत' ही गोष्ट समाधान देणारी होती. आता 'ते नाहीत' ही बाब झेपत नव्हती. माझ्या घरात तोपर्यंत माझ्या आजोबांचे व आजीचे मृत्यू मी पाहिले होते. त्यानंतर एवढे अश्रू कुणासाठीही वाहिले नाहीत. ते वाहिले फक्त पुलंसाठी. पुलं शरीरानं नसले तरी त्यांच्या पुस्तकांच्या, चित्रफितींच्या किंवा चित्रपटांच्या, नाटकांच्या रूपानं आपल्यातच आहेत, याची जाणीव नंतर होऊ लागली आणि खूप दिलासा मिळाला. पुढं मी लिहायला लागलो. सदरं लिहिली, चित्रपट परीक्षणं लिहिली, पुस्तकं लिहिली. कुणी कुणी म्हणायचं, तुझ्या लिखाणावर पुलंचा प्रभाव दिसतो. मला आतून बरं वाटायचं. पण नंतर लक्षात यायचं, आपण नकळत त्यांची नक्कल करतो आहोत का? नक्कल करून आपली स्वतःची शैली विकसित होणार नाही. मग प्रयत्नपूर्वक त्या प्रभावापासून दूर जाण्याचा प्रयत्न (फक्त लेखनापुरता) करायला लागलो. मात्र, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वानं माझ्यावर घातलेली मोहिनी कायमच आहे व राहील.
पुलंनी मला काय दिलं, असा विचार करायला लागलो, तर एखाद्या कॅलिडोस्कोपमधून पाहावं तसे त्यांनी आपल्या जगण्याला दिलेले विविध रंग व आकार दिसू लागतात. मी गेल्या वर्षी लिहिलेलं 'थ्री चीअर्स' हे विनोदी लेखांचा संग्रह असलेलं पुस्तक पुलंनाच अर्पण केलंय. त्यांच्या जन्मशताब्दीत हा योग यावा, हे मला फार मोठं भाग्य वाटतं. या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात मी पुलंनी माझ्यावर केलेल्या गारूडाबद्दल लिहिलंय. त्याचा थोडा भाग इथं सांगणं औचित्याचं होईल, असं वाटतं. मी लिहिलंय -

'पुलंनी महाराष्ट्राला निर्मळपणे हसायला शिकवलं. पुलंच्या आधी विनोद नव्हता, असं नाही. मात्र, पुलंनी त्यांच्या आनंदयात्रेसारख्या जगण्यातून हा विनोद नीट समजावून सांगितला. जगण्याकडं पाहण्याची एक अतिशय स्वच्छ, निरोगी दृष्टी दिली. आयुष्य भरभरून जगायला लावणारा मूलमंत्र दिला. खूप लहानपणापासून पु. लं.चं वाचत गेलो आणि जगणं उमगत गेलं. विनोद हा त्यांच्या जगण्यातला केवळ एक भाग होता, हेही कळलं. त्यांची संगीताची आवड, त्यांच्यातला खेळिया, अवलिया चित्रकर्मी, प्रतिभावान रंगकर्मी, कुशल दिग्दर्शक, वक्ता, दाता असे अनेक पैलू नंतर उलगडत गेले आणि या व्यक्तिमत्त्वाविषयीचा आदर वाढतच गेला. एक माणूस आपल्या उण्यापुऱ्या ८० वर्षांच्या आयुष्यात काय काय करू शकतो, याचं पुलंचं आयुष्य हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. पुलंच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन माझ्यासारखी अनेक मुलं लिहिती झाली आणि याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या अतिशय नितळ, निखळ, सात्त्विक अशा लिखाणालाच आहे, यात शंका नाही. जगण्यावर विलक्षण प्रेम असल्याशिवाय आणि माणूस म्हणून संपूर्ण विकास झाल्याशिवाय असं लिखाण कुणाच्या हातून लिहून होणार नाही. पुलंनी या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलं. जगण्याचं प्रयोजन शिकवलं, कलेचा आस्वाद कसा घ्यावा याचे धडे दिले. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं त्यांच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत जगले. पुलंचा विनोद म्हणजे केवळ शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरती करीत साधलेला विनोद नव्हता. जगण्यातली विसंगती टिपत, विसंवादातून नेमका सूर शोधण्याचं कसब त्या विनोदात होतं. त्यांचा विनोद कधीच घायाळ करीत नव्हता. उलट तो निर्विष असा विनोद होता आणि आपल्याला स्वतःवर हसायला शिकवायचा. मराठी जनांच्या मनाची मशागत करीत पु. लं.नी विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने पुलंच्या मागून विनोदाचे, आनंदाचे गाणे गात गात चालत निघाला. पुलंची ही आनंदयात्रा त्यांच्या ऐहिक अंतानंतरही सुरूच आहे. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे. पुलंच्या मागं निघालेल्या या प्रचंड दिंडीतला, आनंदयात्रेतला मी एक लहानसा वारकरी आहे, यात्रेकरू आहे. त्यांनी दाखविलेल्या सत्त्व व सत्याच्या निखळ मार्गानं वाट चालण्याचा प्रयत्न करतो आहे. या पुस्तकातले हे सगळे लेख म्हणजे या आनंदयात्रेत उधळलेला अबीर-गुलाल आहे. पु. ल. ज्या काळात जगले त्याहून आजचा काळ किती तरी वेगळा आहे. तंत्रज्ञानाची अफाट प्रगती आणि जगण्याचा वाढलेला वेग श्वास गुदमरवून टाकतो आहे. रुढी-परंपरांचे स्खलन आणि मूल्यांची घसरगुंडी रोजची झाली आहे. माणसा-माणसांतला संवाद वाढण्याऐवजी कमी होताना दिसतो आहे. कुटुंब संस्थेवर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत. अशा वातावरणात सकारात्मक भाव मनात ठेवून जगत राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मात्र, पुलंच्या लिखाणातून ही ऊर्जा आपल्याला सतत मिळत राहते. आयुष्याचा एवढा मंगलमय उत्सव साजरा करण्याऐवजी रडत बसू नका, असंच त्यांचे शब्द आपल्याला सतत सांगतात. जगणं साजरं करण्याची ही दृष्टी पुलंनी आपल्याला दिली, हे त्यांचे ऋण कुठलाही मराटी माणूस कधीच विसरू शकणार नाही.'

पुलंचा प्रभाव असा केवळ माझ्यासारख्या एका व्यक्तीवर नव्हे, तर सर्व समाजावर पडलेला आहे. या थोर व्यक्तिमत्त्वाकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. स्वतः पुलंना व्यक्तिपूजेचा तिटकारा होता. मात्र, एखाद्या माणसाच्या गुणांवर ते भरभरून प्रेम करीत. म्हणून तर 'गुण गाईन आवडी'सारखं पुस्तक ते लिहू शकले. महाराष्ट्रातल्या आनंद यादव, दया पवार यासारख्या कित्येक लेखकांना पुलंनी उजेडात आणलं. वैचारिक विचारसरणीनं ते समाजवादी होते. समाजातल्या तळागाळातल्या लोकांविषयी त्यांना आस्था होती. ही आस्था त्यांनी अनेकदा कृतीतून व्यक्त केली होती व लाखो रुपयांच्या देणग्या मुक्त हस्ते दिल्या. पुलं व सुनीताबाईंचं सहजीवनही हेवा वाटावं असं होतं. बोरकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम हे दोघं करीत, तेव्हा महाराष्ट्राचं अवघं सांस्कृतिक वैभव त्या रंगमंचावर अवतरलंय, असं वाटे. कुणी तरी या दोघांना 'महाराष्ट्राचं फर्स्ट कपल' म्हटलंय ते अगदी बरोबर आहे.
आपल्याला असं जगता यावं, असं मला फार थोड्या माणसांविषयी वाटलेलं आहे. पु. ल. हे त्यात अग्रस्थानी आहेत. वयाच्या पन्नाशीत त्यांनी बंगाली शिकायचा ध्यास घेतला म्हणून मीही ती भाषा गिरवण्याचा (अयशस्वी) प्रयत्न केला. पुलंचं मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित होण्यापलीकडं त्यातून अन्य काही निष्पन्न झालं नाही. पण एखाद्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर प्रभाव कसा आणि किती असू शकतो, हे सांगण्यासाठीच केवळ ही बाब इथं नमूद केली.
पुलंसारखा आणि त्यांच्याएवढा प्रभाव अद्याप कुणाचाच पडला नसला, तरी वयाच्या एका टप्प्यानंतर आणखीही काही लेखक आवडू लागले. त्यात गौरी देशपांडे व मिलिंद बोकील यांचा उल्लेख करावाच लागेल. या दोन्ही थोर स्त्री-पुरुषांचा माझ्यावर पुष्कळ प्रभाव पडला आहे, असं म्हणता येईल. या दोघांच्याही लेखनातून विशेषतः स्त्री व पुरुष नातेसंबंधांच्या अनेकानेक छटा उलगडत गेल्या. गौरीच्या बाबतीत तर तिच्या लेखनासोबतच तिच्या विलक्षण जगण्याचाही सदैव हेवा वाटत आला आहे. वयाच्या पस्तिशीनंतर मी हे दोन्ही लेखक वाचले, हे एका परीनं बरंच झालं. विशेषतः आपल्या एकारलेल्या, सरळसोट मध्यमवर्गीय जगण्यात गौरी किंवा बोकिलांनी लिहिलेले स्त्री-पुरुष येणं जवळपास दुरापास्तच. तसे अनुभवही गाठीला लाभणं दुर्मीळ. पण जग आपल्यासारखं सरळसोट किंवा एकारलेलं नसतंच. त्यामुळं ते समजून घेण्यासाठी या दोघांचं बोट धरणं गरजेचं होतं. ते वेळीच मिळालं. त्यामुळं स्त्रियांविषयीची माझी टिपिकल, पारंपरिक मतं बदलायला पुष्कळ उपयोग झाला. वयानुसार येणारी प्रगल्भता अनेकांच्या विचारांमध्ये परावर्तित होतेच असं नाही. मात्र, गौरी व बोकील वाचल्यानंतर माझ्या विचारांतही बदल झाला, हे मला मान्य करायला हवं. ते बदललेले विचार माझ्या पुढील लेखनातही आपोआप उतरले. त्यामुळं माझ्या जगण्यावर या दोघांचाही प्रभाव आहे, यात शंका नाही.
क्रिकेट हाही माझा आवडीचा खेळ. अगदी लहानपणापासून हा खेळ बघत आणि खेळत आलोय. क्रिकेटमध्ये माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो सुनील मनोहर गावसकर या 'लिटल मास्टर'चा. आमच्या लहानपणी घरी टीव्ही आला तेव्हा टीव्ही सुरू केल्यावर सर्वप्रथम दिसले ते हेच महाशय. सुनील हा आमचा बालपणातला हिरो होता. भारतीय क्रिकेटला सुनील गावसकरनं आत्मसन्मान दिला, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. हेल्मेट न घालता, विंडीजच्या तोफखान्यासमोर उभा राहणारी ही बटूमूर्ती आमच्या अभिमानाचा विषय होती. मला जरा कळायला लागेपर्यंत गावसकर निवृत्तही झाला होता, पण त्याचा थोडा खेळ तरी मी 'लाइव्ह' टीव्हीवर पाहिला आहे. नंतर त्यानं समालोचनात कारकीर्द केली, तीही जोरदार यशस्वी झाली आहे. 'केव्हा थांबावं याचा अचूक निर्णय घेणारा माणूस' म्हणूनही मला गावसकर प्रिय आहे. त्याला मराठीपणाचा अभिमान आहे. पण तरी त्याचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व हेवा करावा असं आहे. त्याच्या स्वभावात एक मिश्कीलपणा आहे, तो कॉमेंटरी करत असतानाही सदैव प्रत्ययास येतो. त्याच्या खेळाच्या ज्ञानाविषयी तर काही शंकाच नाही. त्यामुळंच आज सत्तरीतही तो 'आउटडेटेड' झालेला नाही, तर उत्साहानं जगभर फिरत मस्त क्रिकेट व जगणं एंजॉय करत असतो. हे मला फार आवडतं. आपलं म्हातारपण कुणासारखं जावं, तर ते गावसकरसारखं, असंच मला सतत वाटत असतं.
असाच काळावर विजय मिळविणारा आणखी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा माणूस म्हणजे अमिताभ बच्चन. विशेषतः 'सेकंड इनिंग'मधला अमिताभ मला विशेष आवडतो. अमिताभमधला एक कुटुंबवत्सल, सुसंस्कृत माणूस सर्वाधिक भावतो. आपण आयुष्याच्या उत्तरार्धात 'ग्रेस' टिकवून जगावं कसं, तर गावसकरप्रमाणेच अमिताभसारखं असं उत्तर माझं मन कायम देतं. अमिताभचं आयुष्यही विलक्षण चढ-उतारांनी भरलेलं आहे. त्यात वैयक्तिक आनंदाचे क्षण आहेत, तशीच दुःखंही आहेत. पण हा माणूस सगळ्या गोष्टींना हसतमुखानं सामोरा गेला आणि आजही किती तरी सहकारी कलाकारांपेक्षा जास्त बिझी आहे. अमिताभ 'आदर्श व यशस्वी भारतीय पुरुषा'चं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या उतारवयातील उत्साहासारखा उत्साह आपल्यालाही लाभावा, असं वाटतं, हे जास्त खरं आहे.
कवी बा. भ. बोरकर यांच्या शब्दांत सांगायचं, तर 'जीवन त्यांना कळले हो' असं ज्यांच्याविषयी खात्रीनं म्हणता येईल, अशा या सगळ्या मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाखाली जगताना, आपणही आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवावं आणि भविष्यात कुणी तरी आपल्यावरही 'माझ्यावर श्रीपाद ब्रह्मे यांचा प्रभाव आहे,' असं लिहिण्याइतपत आयुष्यात काही तरी करून दाखवावं, एवढीच इच्छा आहे.
प्रभावाच्या प्रभावाखाली एवढी अपेक्षा ठीकच म्हणावी ना!

---

(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१९)
---

18 Nov 2019

चपराक दिवाळी अंक २०१९ - लेख

'रानडे'तले दिवस
---------------------



पुण्यातला फर्ग्युसन रस्ता म्हणजे तुरेवाला कोंबडाच. हा आरवल्याशिवाय गावात उजाडत नाही. आम्ही त्याला प्रेमानं एफसी रोड म्हणतो. (तसंही निम्मं वाक्य इंग्लिशमध्ये बोलल्याशिवाय या रस्त्याचं नागरिकत्व मिळत नाही.) अशा या महान रस्त्यावर रूपाली, वैशाली आणि तुलनेत नव्यानं झालेलं वाडेश्वर अशी तीन तीर्थक्षेत्रं (डेक्कनकडून आलं, की) उजव्या बाजूला आहेत. डाव्या बाजूची सगळी कसर आमच्या रानडे इन्स्टिट्यूटनं भरून काढलेली आहे. आधी पुणे शहर जगात भारी, त्यात फर्ग्युसन रस्ता पुण्यात भारी आणि त्यात हे चार धाम एफसी रोडवर भारी! अशा या चार धामांपैकी एक असलेल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मला शिकायला मिळालं हे माझं खरोखर भाग्य... पत्रकारितेतलं ते एक वर्ष म्हणजे आयुष्यातलं एक संस्मरणीय वर्ष होतं, यात शंका नाही.
बरोबर दोन दशकं उलटली. जुलै १९९९ मध्ये मी या संस्थेत प्रवेश घेतला. तेव्हा माझं सगळं उलटंच चालू होतं. अपयशी इंजिनीअरिंगनंतर मी १९९४ मध्ये अचानक नगरच्या 'लोकसत्ता'त प्रूफरीडर म्हणून काम करू लागलो होतो. नंतर सप्टेंबर १९९७ मध्ये पुण्यात 'सकाळ'मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. सहा महिन्यांत उपसंपादक आणि दीड वर्षांत कायम झालो. उपसंपादक म्हणून जवळपास दोन वर्षं काम केल्यानंतर मी पत्रकारितेचे मूळ धडे गिरवायला निघालो होतो. माझ्यासोबतच 'सकाळ'मध्ये रुजू झालेला मंदार कुलकर्णीही होता. आम्ही तेव्हाचे संपादक विजय कुवळेकर सरांची परवानगी घेतली आणि बी. सी. जे.चा अर्ज भरला. तेव्हा हा एकच वर्षाचा कोर्स होता आणि त्याला बी. सी. जे. (बॅचलर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) असं म्हणत. प्रवेशाची अट किमान पदवी ही होती. माझं सगळंच अर्धवट झाल्यानं मी नगरला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी. ए. ला प्रवेश घेतला होता. पुण्यात नोकरी आणि वीकएंडला नगरला क्लासेस अशी कसरत चालू होती. पण फर्स्ट क्लासमध्ये बी. ए. झालो आणि बी. सी. जे. ला प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. तेव्हा या कोर्सच्या शेवटी दिल्लीला जी स्टडी टूर नेली जायची, त्याचं मला अत्यंत आकर्षण वाटत होतं. तोवर मी दिल्ली पाहिली नव्हती. या कोर्सच्या निमित्ताने दिल्लीदर्शन होईल, असा एक हेतू मनात होताच. तेव्हा मी आणि मंदारनं या कोर्सची प्रवेश परीक्षा दिली. आम्ही ऑलरेडी वृत्तपत्रांत काम करीत असल्यानं आम्हाला ती परीक्षा फारच सोपी गेली. वस्तुनिष्ठ प्रश्न वगैरे तर आम्ही किरकोळीत उडवले. त्यामुळं प्रवेशाच्या लिस्टमध्ये आमचं नाव आलं होतं. नंतरचा टप्पा हा मुलाखतीचा होता. तेव्हा अरुण साधू सर या विभागाचे प्रमुख होते. साधू सर, उज्ज्वला बर्वे मॅडम आणि अजून कुणी तरी एक पाहुणे अशा तिघांनी माझी मुलाखत घेतली. साधू सरांनी एवढंच विचारलं, की तुम्ही ऑलरेडी नोकरी करतच आहात, तर मग हा कोर्स कशाला करताय? मग त्यांना सांगितलं, की पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण व पदवी हवी आहे. त्यानंतर आम्ही हा कोर्स मधेच सोडून जाऊ आणि त्यांची एक सीट वाया जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अजिबात मधेच सोडून जाणार नाही, अशी हमी दिल्यावर माझा प्रवेश निश्चित झाला.
रानडे इन्स्टिट्यूटचा परिसर रम्य आहे. गुडलक चौक ओलांडला, की डाव्या बाजूला आर्यभूषण मुद्रणालयाची जुनी इमारत लागते. तिथं कोपऱ्यावरच नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांचा पुतळा आहे. त्यानंतर लगेच आमची रानडे इन्स्टिट्यूट. वास्तविक हा पुणे विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग. पण तो ज्या इमारतीत भरतो, तिथं पूर्वी रानडे इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट होती. ती १९१० मध्ये स्थापन झाली होती. नंतर ती बंद पडली असावी. मात्र, १९६४ मध्ये याच इमारतीत पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू झाला. नंतर समोर नव्या इमारतीत विद्यापीठाचा परकीय भाषा विभागही सुरू झाला. फर्ग्युसन रस्त्यावर मोक्याच्या जागेवर ही संस्था वसली असल्यानं वृत्तपत्रविद्या विभाग इथून दुसरीकडं जायला सगळ्यांचाच विरोध आहे. मी या ठिकाणी प्रवेश घेतला, तेव्हा म्हणजे १९९९ मध्ये फर्ग्युसन रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक चालायची. मध्ये चांगला मोठा डिव्हायडर व त्यावर सोडियम व्हेपरचे लखलखीत दिवे होते. समोर 'वाडेश्वर'ही नव्हतं. तिथं छोटी छोटी दुकानं लागलेली असायची, असं आठवतंय. शेजारचं 'जोशी वडेवाले'ही नव्हतं. तिथं 'मयुरी' नावाचं एक छोटंसं रेस्टॉरंट होतं. त्याला एक पोटमाळा होता. लपून सिगारेट ओढण्यासाठी मुलांची (आणि मुलींचीही) ती फेव्हरिट जागा होती. ‘त्रिवेणी’ मात्र तेव्हाही होतं. तेव्हा तिथं आत बसायला दोन बाकडी होती. तिथं दाटीवाटीत बसून कित्येकदा मित्रांसोबत चहा-क्रीमरोल हाणले आहेत. अलीकडं झालेलं 'वेस्टसाइड'ही नव्हतं. तिथं एक छोटासा बंगला होता, असं आठवतंय. तोवर मी 'सकाळ'मध्ये सायकलच वापरत होतो. पुण्यात कुठंही रिपोर्टिंगला जायचं असेल, तरी सायकलवरूनच जायचो. तेव्हा सायकली बऱ्यापैकी वापरल्या जात होत्या. आमच्या ऑफिसात रीतसर भलंमोठं सायकल स्टँड होतं. जिथं रिपोर्टिंगला जायचो, त्या संस्थांमध्येही सायकल स्टँड असायचेच. मात्र, 'रानडे'त प्रवेश घेतल्यानंतर मला तिथं सायकलवर जायची लाज वाटायला लागली. नवी गाडी घेण्याची ऐपत नव्हती. सुदैवानं माझा जीवलग मित्र नीलेश नगरकर यानं तेव्हा नवी बाइक घेतली आणि त्याची 'एम-८०' मी विकत घेतली. आता मी त्या ग्रे कलरच्या 'एम-८०'वरून ऐटीत कॉलेजमध्ये येऊ लागलो.
लवकरच कॉलेज सुरू झालं आणि नवे मित्र-मैत्रिणी मिळाले. पुणे विद्यापीठाचा लौकिक मोठा असल्यानं इथं देशभरातून विद्यार्थी येत असतात. आमच्याही वर्गात दिल्ली, इंदूर इथून आलेल्या मुली होत्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेली मुलं होती. अशा वर्गात आपोआपच काही गट पडतात. मुलं आणि मुली हे तर अगदी ढोबळ गट झाले. पण ‘सिटी’तले आणि ‘बाहेरचे’ असे दोन गट पडले. ‘इंग्लिश मीडियमवाले’ आणि ‘मराठी मीडियमवाले’ असा एक गट पडला. (आम्हाला उत्तरपत्रिका मराठी किंवा इंग्लिशमधून लिहिण्याची मुभा होती. वर्षाच्या सुरुवातीलाच हा चॉइस सांगावा लागे. मी स्वाभाविकच मराठी निवडलं.) याशिवाय मराठी आणि अमराठी असाही एक गट पडला. जातीवरून गट पडल्याचं मला तरी आठवत नाही. तेव्हा ते वारं नसावं. (नंतर मात्र हे फार वेगानं वाढलं, असं निरीक्षण आहे.) आमच्या वर्गात मी, मंदार, सिद्धार्थ केळकर, संतोष देशपांडे, गणेश देवकर, गजेंद्र बडे, सुमित शहाणे, श्रीरंग गायकवाड, दीपक चव्हाण, विनोद पाटील, जय अभ्यंकर, अभियान हुमणे, अर्जुन भागचंद, मठपती आदी मुलं होती, तर जया जोस, कल्याणी चांदोरकर, गौरी कानेटकर, मानसी सराफ, उमा कर्वे, वैशाली भुते, अर्चना माळवे, वैशाली चिटणीस, प्रियंवदा कौशिक, प्रियांका डांगवाल, अस्मिता वैद्य, मीरा कौप, कस्तुरी डांगे, कल्पना पडघन, प्रिया कोठारी, सादिया समदानी, लिनेट थाइपरंबिल आदी मुली होत्या. यातले बहुसंख्य मित्र-मैत्रिणी आजही संपर्कात आहेत. (आमच्या वर्गाचा व्हॉट्सअप ग्रुपही तयार झालाय, हे सांगायला नकोच!) विशेष म्हणजे बरेच जण आजही पत्रकारितेत सक्रिय आहेत.
साधू सर आमचे एचओडी होते. त्यामुळं आम्ही अगदी भाग्यवान ठरलो. साधू सर नियमित लेक्चर घेत नसत; पण एखाद्या ऑफ तासाला वर्गात येत आणि त्यांचा मूड लागला, तर कुठल्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांवरचं खास ‘साधू शैली’तलं विवेचन आम्हाला ऐकायला मिळे. साधू सरांचा मित्रपरिवार व गोतावळा मोठा होता. त्यांच्यामुळं महाराष्ट्रातल्या बऱ्याच नामवंतांचे पाय आमच्या इन्स्टिट्यूटला लागत. कधी काही काम असेल, तर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये जायचो. सर अनेकदा त्यांच्या आवडत्या ‘विल्स’चे झुरके घेत बसलेले असत. आम्हा विद्यार्थ्यांशी ते कायमच मैत्रीच्या नात्यानं वागले. आमच्या काही सहकाऱ्यांना तर ते सिगारेटही ऑफर करायचे म्हणे. (हे त्या सहकाऱ्यांनीच आम्हाला सांगितलं. साधू सरांना विचारायची हिंमतच नव्हती.) पण सरांचा मोकळा स्वभाव बघता हे शक्य होतं.
इतर विषयांना प्रा. उज्ज्वला बर्वे, प्रा. केवलकुमार, किरण ठाकूर सर, प्रा. प्रसन्नकुमार अकलूजकर सर, प्रा. जयदेव डोळे सर नियमित शिकवायचे. विठ्ठल माविनकुर्वे सर, श्रीकांत परांजपे सर, आशा चौधरी मॅडम, त्रिवेणी माथूर मॅडम वेगवेगळे विषय शिकवायला यायचे. अकलूजकर सरांचा मराठीचा तास सोडला, तर इतर सर्व विषय इंग्लिशमधून शिकवले जायचे. नंतरची चर्चा (आणि वाद-विवाद) बहुतांश मराठीतूनच चालायची. आम्ही सुरुवातीला मराठी मीडियमवाले दबकून असायचो. पण त्यातही मंदार व मी ऑलरेडी ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत असल्यानं आम्ही उगाचच सीनिऑरिटी गाजवायचो. इतर मुलंही आम्हाला जरा दबकून वागायचे. नंतर आम्ही इंग्लिश मीडियम ग्रुपशी मैत्री केली. त्यातल्या कल्याणी, प्रियंवदा, उमा यांच्याशी चांगली मैत्री झाली व ती आजतागायत टिकून आहे. गौरी, मानसी, अर्चना या तर ‘मराठी’वाल्याच होत्या. कल्याणीनं आणि मी असं ठरवलं होतं, की मी तिच्याशी कायम इंग्लिशमध्ये बोलणार आणि ती माझ्याशी कायम मराठीतून बोलणार... ती मराठीच होती, त्यामुळं तिला काही प्रॉब्लेमच नव्हता. मी मात्र माझ्या मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये तिच्याशी अफाट गप्पा मारायचो. पण ती कायम शांतपणे ऐकून घ्यायची. काही चुकलं तर सांगायची.
काही शिक्षक आपोआप लाडके होतात. उज्ज्वला बर्वे मॅडमचा तास आम्हाला सगळ्यांनाच आवडायचा. किरण ठाकूर सर गमतीजमतीत मस्त रिपोर्टिंग शिकवायचे. त्यांनी आम्हाला एक भन्नाट असाइनमेंट दिली होती. ती अजूनही लक्षात आहे. ‘रावणानं सीतेला पळवून नेलं,’ ही घटना आजच्या काळात घडली असती, तर तुम्ही तिची बातमी कशी लिहिली असती, अशी ती असाइनमेंट लिहिली होती. त्या वेळी माझ्या प्रतिभेला धुमारे फुटले आणि मी अगदी रंगवून ती बातमी लिहिल्याचं मला आठवतंय. तो कागदही बरीच वर्षं जपून ठेवला होता. बाहेर एखादा महत्त्वाचा कार्यक्रम किंवा समारंभ असेल, तर त्याचंही वार्तांकन करायला जावं लागायचं. पुणे विद्यापीठात तेव्हा म्हणजे जानेवारी २००० मध्ये सायन्स काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा आमचं सगळं डिपार्टमेंट कामाला लागलं होतं. आम्ही ‘वृत्तविद्या’चा खास अंक तेव्हा काढला होता.
‘वृत्तविद्या’ म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचा पेपर. हा टॅब्लॉइड, चार पानी किंवा आठ पानी पेपर दर महिन्यातून एकदा काढणं हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग होता. ‘वृत्तविद्या’साठी रीतसर टीम पाडल्या जायच्या. संपादक, वृत्तसंपादक नेमले जायचे. आमच्या टीमचा नंबर आला, तेव्हा विनोद पाटील संपादक झाला होता, असं मला आठवतंय. मी संतोष सिवनच्या ‘टेररिस्ट’ नावाच्या चित्रपटाचं परीक्षण लिहिलं होतं. (चित्रपट परीक्षणाची ही हौस तेव्हापासून... नंतर मी दीर्घकाळ माझ्या वृत्तपत्रासाठी हे काम करणार आहे, हे तेव्हा ठाऊक नव्हतं!) तेव्हा ‘बिनधास्त’ हा सिनेमा जोरदार चालू होता. मी तर त्या सिनेमाच्या प्रेमात पडलो होतो. वेळ मिळेल तेव्हा प्रभात चित्रपटगृहात जाऊन मी या सिनेमाला बसायचो. तब्बल १४ वेळा मी हा सिनेमा पाहिला, तोही दर वेळी वेगळ्या व्यक्तीला सोबत घेऊन! या रहस्यप्रधान चित्रपटातील ‘खून कोणी केला?’ हे रहस्य शेवटी उलगडतं. सोबत नेलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर ते रहस्य उलगडतानाचं आश्चर्य पाहत बसायला मला आवडे. ‘प्रभात’मध्ये एवढ्या वेळेला जाऊन तिथले मेहेंदळे काका, भिडेकाका, वाघकाका ही सगळी मंडळी ओळखीची झाली. नंतर आम्हाला एका वेगळ्या व्यवसायातील माणसाची मुलाखत घेऊन या, अशी असाइनमेंट देण्यात आली, तेव्हा मी डोअरकीपरचं काम अनेक वर्षं करणाऱ्या मेहेंदळेकाकांचीच मुलाखत घेतली. ‘प्रभातनगरीचा द्वारपाल’ असं शीर्षक त्या मुलाखतीला दिल्याचं मला अजून आठवतं. ‘बिनधास्त’ गर्ल शर्वरी जमेनीस हिची पहिली मुलाखतही मी या ‘वृत्तविद्या’साठी घेतली. ‘सकाळ’मध्ये कामाला असल्यानं त्यांच्या घरची दारं माझ्यासाठी उघडली. शर्वरीशी मस्त गप्पा झाल्या. मुलाखत छापली. “बिनधास्त’ अभिनय अन् अथक कथक’ असं त्या मुलाखतीचं शीर्षक होतं. ‘वृत्तविद्या’चा अंक काढणं हा खूप धमाल अनुभव असे. या कामासाठी रात्री उशिरापर्यंत डिपार्टमेंटमध्ये थांबण्याची परवानगी असे. मग बाहेरच सगळ्यांनी मिळून काही तरी भेळ वगैरे अबरचबर खाणं, सतत चहा-सिगारेटी असं सगळं चाललेलं असायचं. आपला अंक इतरांपेक्षा चांगला व्हावा, अशी धडपड चालायची. ताज्यातली ताजी बातमी घ्यायचा हट्ट असायचा. तेव्हा ‘गुगल’ नुकतंच सुरू झालं होतं. सकाळची ‘ई-सकाळ’ही वेबसाइटही नुकतीच सुरू झाली होती. डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये बहुतेक एकच इंटरनेट कनेक्शन होतं आणि त्याचा स्पीड अतिमंद होता. फोटो डाउनलोड करणे हा काही तासांचा कार्यक्रम असायचा. आमचे नेर्लेकर सर या कामात सगळ्यांना मदत करायचे. भोपळ‌े बाई कायम मदतीला तत्पर असायच्या. शिंदे म्हणून शिपाई होते, (मला वाटतं, प्रसिद्ध बाबू टांगेवाले यांचे ते चिरंजीव होते...) तेही कायम हसतमुखानं मदत करायचे.
या डिपार्टमेंटमध्ये मागच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये कँटीन होतं. हे रमेशचं कँटीन. या डिपार्टमेंटच्या मांडवाखालून गेलेल्या तमाम पत्रकारांच्या भावविश्वातला आजही हळवा कोपरा असलेलं हे कँटीन! तिथं किती चहा घेतले, किती वडा-पाव, किती समोसे, किती ब्रेड-पॅटिस आणि किती पोहे खाल्ले याची गणतीच नाही. किती तरी आनंदाच्या प्रसंगी इथंच खिदळलो. मित्र-मैत्रिणींसोबत दंगा केला. कधी दु:खी झालो, कधी रडलो... ते सगळं या कँटीनच्या साक्षीनंच! (नंतर डिपार्टमेंटमधे शिकवायला जायची, पेपर तपासायला जायची संधी मिळाली, तेव्हाही याच कँटीनची साथ होती.) खरं तर या कँटीनवर वेगळा लेख होऊ शकतो. एवढ्या तिथल्या आठवणी आहेत!
मुळात आमचं शैक्षणिक वर्ष मोठं विलक्षण होतं. १९९९-२००० असं आमचं हे बी. सी. जे. चं वर्ष होतं. एक शतक कूस बदलताना आम्ही पाहत होतो. देशात तीन वर्षं राजकीय अस्थैर्य आणि अशांततेत गेल्यानंतर वाजपेयींचं पूर्ण बहुमताचं सरकार अखेर स्थापन झालं होतं. सचिन तेंडुलकरची महान खेळाडू होण्याकडं दमदार वाटचाल सुरू होती. सुभाष घईंच्या ‘ताल’च्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. शतक बदलताना जगभराच्या संगणकांना वर्ष बदलण्याचा मोठा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येणार होता आणि तो सोडवू शकणाऱ्या भारतीय इंजीनीअर्सना जगभरातून मागणी येत होती. ‘वायटूके’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या या प्रॉब्लेममुळं भारतात ‘डॉट कॉम’ कंपन्यांचं पेव फुटलं होतं. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात अचानक वाढ झाली होती. आमचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आसपास ‘कारगिल’चं युद्ध झालं होतं आणि पुढचा काळ काही भारत-पाकिस्तान संबंधांत विलक्षण तणाव निर्माण झाला होता. बाळासाहेब ठाकरे साहित्यिकांना ‘बैल’ म्हणत होते आणि मनोहर जोशींना काढून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदावर बसवत होते. त्याच वर्षात त्यांची सत्ता गेली आणि विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. छगन भुजबळांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं. आम्ही हे सगळे बदल बघत होतो. ऑफिसात त्याच्या बातम्या लिहीत होतो आणि ‘रानडेत’ वर्गात येऊन परत त्यावर वेगळी चर्चा करीत होतो. रात्री उशिरा ‘मंडई विद्यापीठा’त ज्येष्ठ पत्रकारांसोबत रंगणारी मैफल आम्हाला नवनवे गॉसिप पुरवायची. ती दुसऱ्या दिवशी वर्गात शायनिंग मारायला उपयोगी पडायची. तेव्हा ऑफिसव्यतिरिक्त इतर अनेक कार्यक्रमांना, मुलाखतींना, महोत्सवांना, प्रदर्शनांना किंवा संमेलनांना जाऊन बसायची आम्हाला फार हौस होती. मी आणि मंदार, मी आणि संतोष असे आम्ही किती तरी कार्यक्रम एकत्र पाहिले, अनुभवले. कुठल्याही गोष्टीचा मुळी कंटाळा यायचाच नाही. कितीही काम असू दे किंवा कितीही अभ्यास असू दे! मुळात तेव्हा सगळे बॅचलर होतो आणि स्वत: कमावत होतो. सगळ्या गोष्टी आपल्या चॉइसनं करण्याची ती गंमत होती. सगळी मज्जाच!
‘वृत्तविद्या’चे अंक अशा विलक्षण धुंदीतच आम्ही काढले. सायन्स काँग्रेस संपली आणि फेब्रुवारीत आम्हाला गॅदरिंगचे वेध लागले. तेव्हा मराठी आणि इंग्लिश असे दोन डिप्लोमाही सकाळीच्या वेळी चालत. मराठी डिप्लोमाला आमचे काही मित्र-मैत्रिणी होते. तीन विभागांचं एकत्रित स्नेहसंमेलन म्हणून ‘त्रिवेणी’ असं नाव या गॅदरिंगला होतं. मी या गॅदरिंगमध्ये ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ सादर केलं. मंदारनं ‘हसवाफसवी’मधले ‘कृष्णराव हेरंबकर’ सादर केले. मी त्याची मुलाखत घेतली. संतोष देशपांडेनं डोनाल्ड डकचे अप्रतिम आवाज काढले. डिप्लोमाच्या माधवी कुलकर्णीनं म्हटलेलं ‘त्याची धून झंकारली रोमारोमांत’ अजूनही लक्षात आहे. गॅदरिंगची धमाल संपली आणि आम्हाला वेध लागले ते दिल्ली ट्रिपचे...
मार्चमध्ये आम्ही दिल्लीला गेलो. स्वत: अरुण साधू सर आणि बर्वे मॅडम आमच्याबरोबर होत्या. गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसनं आम्ही जाणार होतो. ती गाडी पहाटे चार वाजता पुण्यात येते. आम्ही सगळे रात्री बारा वाजताच स्टेशनला पोचलो. गाडी वेळेत आली. रात्रभर जागूनही कुणालाच कंटाळा आलेला नव्हता. आम्ही अखंड बडबडत होतो. आम्हा मुलांची रिझर्व्हेशन्स जनरल स्लिपर डब्यात होती, तर साधू सर एसी डब्यात होते. प्रसिद्ध पत्रकार प्रफुल्ल बिडवई हेही त्यांच्यासोबत होते, असं आठवतंय. संतोष, मी, सिद्धार्थ आणि मंदार अशी आमची चौकडी जमली होती. गणेश, रंगा हेही दंगा करायला सोबत असायचेच सतत! मला आदल्या दिवाळीत माझ्या थोरल्या मेव्हण्यांनी ‘सोनी’चा वॉकमन भेट दिला होता. तो मोबाइलपूर्व काळ असल्यानं हा वॉकमन मला अत्यंत प्रिय होता. मी त्याचे भरपूर सेल सोबत घेऊन ठेवले होते. तेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिगारेट विकायला नुकतीच बंदी आली होती. आमच्यापैकी अनेकांची त्यामुळं गैरसोय होणार होती. मात्र, मुलांनी सिगारेटची पाकिटं सोबत आणली होती. त्यामुळं मुलं आणि सिगारेट ओढणाऱ्या काही मुली असे सगळेच खूश झाले. मग रेल्वेतल्या टॉयलेटजवळच्या जागेत जाऊन दोघं-दोघं, तिघं-तिघं सिगारेट ओढून यायचो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भोपाळच्या अलीकडं बुधनीच्या घाटात रेल्वे आली तेव्हा मी ‘ताल’ची कॅसेट ऐकत उभा राहिलो. ‘रमता जोगी’ हे गाणं, हलती रेल्वेगाडी आणि समोरचा सूर्यास्त हे दृश्य माझ्या स्मरणात कायमचं कोरलं गेलंय. (पुढे दोन-तीन वर्षांत अजून दोनदा याच मार्गानं दिल्लीला जाण्याची संधी मिळाली, तेव्हा मी या घाटात आलो की ‘ताल’ची कॅसेट काढून ऐकायचो.) तिसऱ्या दिवशी पहाटे आम्ही निजामुद्दीनला पोचलो. तोवर मला निजामुद्दीन हे एका स्टेशनचं नाव आहे हेही ठाऊक नव्हतं. निजामुद्दीनच्या आधी ओखला स्टेशन लागतं. मी पहाटेच गाडीच्या दरवाजावर येऊन बाहेर बघत होतो. तिथली जाणवणारी थंडी, शेजारी मोठमोठ्या कारखान्यांची धुराडी, तिथल्या हायमास्ट सोडियम व्हेपरच्या पिवळ्या दिव्यांचा झगमगाट आणि मला आधी ‘कोहरा’ वाटलेली, पण प्रत्यक्षात दिल्लीतली अतिशय प्रदूषित असलेली हवा आणि त्यामुळं दिसणारा धुरकट आसमंत... हे दृश्य आजही डोळ्यांसमोर आहे.
आमची राहण्याची सोय नवी दिल्लीतील चाणक्यपुरीमधील यूथ होस्टेलमध्ये करण्यात आली होती. नवी दिल्ली मला प्रथमदर्शनीच आवडली. दिल्लीतले पुढचे आमचे पाच-सहा दिवस अगदी स्वप्नवत होते. कॉलेजमधले माझे दिवस मला फारसे काही नीट एंजॉय करता आले नव्हते. ती सगळी कसर इथं भरून निघाली. दिल्लीत आम्ही तेव्हाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना नॉर्थ ब्लॉकमधल्या कार्यालयात भेटलो. साधू सर सोबत असल्याने सत्तेचे सगळे दरवाजे आमच्यासाठी सहज उघडले जात होते. अडवाणींनी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. ‘ही ल्युटन्स दिल्ली कधी स्थापन झाली,’ असा प्रश्न त्यांनी विचारला होता. मी नुकतंच वाचलेलं असल्यानं मी १९२९ असं उत्तर दिलं. पुण्यात परराज्यांतले अनेक विद्यार्थी शिकायला येतात; तुमच्यापैकी किती जण परराज्यांतील आहेत, असंही त्यांनी विचारलं. जिलेबी, ढोकळा वगैरे पदार्थ समोर होते. चहा झाला. एकूण ही भेट संस्मरणीय होती. नंतर शास्त्री भवनला पीआयबीचं ऑफिस बघितलं आणि  तिथंच तत्कालीन पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनाही आम्ही भेटलो. नाईकांनीही आम्हाला चांगला वेळ दिला आणि गप्पा मारल्या. नंतर एकेका दिवशी आम्ही तत्कालीन अवजड उद्योग मंत्री मनोहर जोशी, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांनाही भेटलो. ‘बीबीसी’चे प्रसिद्ध वार्ताहर मार्क टुली यांनाही निजामुद्दीन परिसरातील त्यांच्या घरी जाऊन भेटलो. टुली यांनी अस्खलित हिंदीतून आमच्याशी गप्पा मारल्या. संगमा यांच्या घरीही खूप मजा आली. जोशींचा बंगला मोठा होता. सकाळी त्यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या लॉनवर बसून आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. नंतर आम्ही एनडीटीव्हीच्या ‘ग्रेटर कैलाश’मधील ऑफिसमध्ये गेलो. तिथं राजदीप सरदेसाई भेटले. ‘मी या क्षेत्रात जास्तीत जास्त अजून पाच वर्षं राहीन,’ असं ते आम्हाला तेव्हा म्हणाले होते. या खासगी वृत्तवाहिन्यांना तेव्हा भारतातून अपलिंकिंगची परवानगी नव्हती. तेव्हा सिंगापूर की हाँगकाँगवरून एनडीटीव्हीचं अपलिंकिंग व्हायचं. त्याला पाच मिनिटं वेळ लागायचा. त्यामुळं तिथली स्टुडिओतली सगळी घड्याळं पाच मिनिटं पुढं लावलेली होती, हे बघून आश्चर्य वाटलं. नंतर आम्ही ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ऑफिसातही गेलो. मात्र, ‘आकाशवाणी’तली भेट मला विशेष आवडली. ‘दिल्ली आकाशवाणी’ची गोलाकार इमारत छान आहे. तिथं आम्हाला प्रत्यक्ष बातम्या प्रक्षेपित होताना पाहता आल्या. ‘बोरून हलदार’ हे नाव अनेक वर्षं ऐकून माहिती होतं. ते त्या दिवशी बातम्या द्यायला होते. आम्ही काचेपलीकडून ब्रॉडकास्ट बघत होतो. समोरचा दिवा लागला आणि ‘धिस इज ऑल इंडिया रेडिओ. द न्यूज, रेड बाय बोरून हलदार’ असे खर्जातले, चिरपरिचित शब्द कानावर पडल्यावर थरारून जायला झालं.  बातम्या देऊन ते बाहेर आले, तेव्हा मी त्यांना सहज विचारलं, ‘आम्ही खूप लहानपणापासून तुमचा आवाज ऐकतो आहोत. तुम्ही किती वर्षं हे काम करताय?’ त्यावर, ‘आय अॅम वर्किंग हिअर फॉर लास्ट हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स’ असं म्हणून गडगडाटी हसत ते निघून गेले.
नंतर समोरच असलेल्या ‘पीटीआय’च्या ऑफिसलाही आम्ही भेट दिली. ‘यूएनआय’चं कँटीन फेमस आहे. तिथं जाऊन इडली, ‘सुजी हलवा’ आदी पदार्थ खाल्ल्याचं आठवतंय. याच वेळी मी आणि सिद्धार्थ साधू सरांसोबत जॉर्ज फर्नांडिसांना भेटायला त्यांच्या कृष्ण मेनन मार्गावर असलेल्या बंगल्यात गेलो. फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते. आम्ही आत गेलो आणि त्यांची अँबेसिडर समोरूनच आली. फर्नांडिस समोरच ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. काच खाली करून ते साधूंशी बोलले. साधूंच्या ‘मुंबई दिनांक’मधलं डिकास्टा हे पात्र जॉर्ज यांच्यावरच बेतलेलं आहे, असं ऐकलं होतं. इथं लेखक व ‘डिकास्टा’ यांना साक्षात भेटताना आम्ही बघत होतो. फर्नांडिस यांनी आम्हाला नंतरची एक वेळ दिली; मात्र तेव्हा ती भेट झालीच नाही.
प्रमुख भेटी-गाठी संपल्यावर आम्ही एक दिवस दिल्लीतील ‘स्थलदर्शन’ केलं. कुतुबमिनार, लोटस टेंपल, हुमायून कबर आदी ठिकाणी फिरलो. नंतर आम्ही एक वेगळी बस करून आग्र्यालाही गेलो. ताजमहाल बघून आलो. रोज संध्याकाळी दिल्लीत भटकंती आणि तिथलं खाणं-पिणं असं भरपूर एंजॉय केलं. ‘मशिन का ठंडा पानी’ बघून मजा वाटायची. तिथल्या फेमस पालिकाबाजारमध्ये शॉपिंग केलं. आईला साडी आणि दोन्ही बहिणींना ड्रेस घेतल्याचं आठवतंय. तेव्हा दिल्लीत मेट्रो यायची होती. अक्षरधाम मंदिरही बहुतेक व्हायचं होतं. अखेर आठवडाभरानं त्याच ‘निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस’नं पुण्याला परतलो.
परतल्यानंतर बर्वे मॅडमनी आम्हाला दिल्ली ट्रिपचा वृत्तांत लिहिण्याची असाइनमेंट दिली. मी ती जरा ललित शैलीत, हलक्याफुलक्या भाषेत लिहिली. ती त्यांनाही आवडली. मी असं लिहू शकतो, याचा विश्वास त्यांना वाटला. ही असाइनमेंटही मी बरेच दिवस जपून ठेवली होती.
दिल्ली ट्रिपवरून परतलो आणि पुण्यात कडक उन्हाळा सुरू झाला. अभ्यासाचे दिवस सुरू झाले. राहिलेल्या असाइनमेंट पूर्ण करण्याची घाई-गडबड सुरू झाली. कमी हजेरी भरलेली मुलं साधू सरांकडं चकरा मारू लागली. डिपार्टमेंटचं वातावरणच बदललं. रमेशच्या कँटीनमध्ये पडीक असलेली पोरं पटापटा घर, होस्टेल, रूम गाठू लागली. कधी नाही ते चार पुस्तकं उघडून वाचू लागली. मी आणि संतोष देशपांडे बऱ्याचदा एकत्र अभ्यास करायचो. तेव्हा संतोषचं प्रेमप्रकरण सुरू होतं. (वर्गात नव्हे!) मधूनच तो त्याच्या कविता ऐकवायचा. मे महिन्यात आमची परीक्षा होती. मॉडर्न कॉलेजमध्ये आमचे नंबर आले होते. मी आणि संतोष बरोबरच पेपरला जायचो. जाताना डेक्कनला ‘अपना घर’मध्ये साबुदाणा खिचडी आणि तिथलं मधुर ताक पिऊन आम्ही पुढं जायचो. एकाही पेपरला हा क्रम चुकला नाही. परीक्षा संपल्या आणि डिपार्टमेंटमधलं आमचं वर्षही संपलं... दोन-तीन महिन्यांनी निकाल लागला. मला फर्स्ट क्लास मिळाला होता. हा कोर्स केल्याचं सार्थक झालं. मार्कांपेक्षाही वर्षभर तिथं जे शिकायला मिळालं, ती शिदोरी अजूनही पुरते आहे. नंतरही डिपार्टमेंटशी संबंध राहिलाच. पेपर तपासायला जाण्याच्या निमित्तानं डिपार्टमेंटला पाय लागत राहिले. नंतर तिथं तीन वर्षं शिकवायचीही संधी मिळाली. जिथं आपण शिकलो, त्याच वर्गात शिकवायला मिळणं यापेक्षा अधिक भाग्य ते कुठलं!
नंतर मी ‘मटा’त आलो आणि डिपार्टमेंट हाकेच्या अंतरावर आलं. अगदी संध्याकाळच्या चहालाही रमेशच्या कँटीनला जाऊ लागलो. व्हॉट्सअप सुरू झाल्यानंतर पुन्हा सगळे मित्र एकत्र आले. ग्रुप तयार झाला. सगळ्यांची ख्यालीखुशाली कळू लागली. बहुतेक जण पत्रकारितेत सक्रिय आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. छान वाटतं! आता वीस वर्षांत भरपूर गोष्टी बदलल्या आहेत. काही चांगलं घडलंय, तर काही वाईट! पण बदल होत राहणारच. आज मागे वळून पाहिलं, तर लक्षात येतं, की डिपार्टमेंटनं आपल्याला काय दिलं? विद्यार्थिवृत्ती कायम ठेवण्याची दीक्षा दिली, मोठमोठ्या लोकांकडून शिकण्याची संधी दिली, सदैव पाय जमिनीवर ठेवण्याची शिकवण दिली आणि भरपूर मित्रपरिवार दिला. या सर्व गोष्टींसाठी मी ‘रानडे’तल्या त्या सुंदर दिवसांशी कायम कृतज्ञ राहीन!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य चपराक दिवाळी अंक २०१९)

---

31 Oct 2019

मनशक्ती दिवाळी २०१९ - कथा

स्वप्न
------

डोंगर. उंचच उंच डोंगरांची रांग... हिरवागार निसर्ग आणि जणू हिरवाईचा शालू नेसलेली धरती... मधूनच आपलं विमान उडतंय. खरं तर ते विमान पण नाहीय. आपल्यालाच पंख फुटलेयत. खालचा भव्य पसारा डोळ्यांत मावत नाहीय. शेतं, त्यातून पळणाऱ्या चिमुकल्या नद्या, छोटी छोटी गावं, त्यातून जाणारे लहानशा रेषेसारखे रस्ते... मेंदूतून एकापाठोपाठ एक घोषणा होताहेत - समुद्रसपाटीपासून आपण आत्ता २५ हजार फुटांवर आहोत. बाहेरचं तापमान उणे १२ अंश सेल्सिअस आहे... वगैरे. पण या घोषणा नुसत्याच ऐकू येताहेत. शरीराला कसलीच जाण नाही. हां, थोडीशी थंडी वाजतेय जरूर; पण अंगावरचं पांघरूण ओढलं, की मस्त ऊबदार वाटतं. हलकीशी गुंगीही येतेय... एरवी रोजच्या जगण्यातले असह्य ताण पाठीवर घेऊन-वाहून अक्षरशः बाक आलाय अंगाला... आता हे ओझं वाटत नाहीय. एकदम हलकं हलकं वाटतंय... या उंचीचं एक अनाम आकर्षण वाटत आलेलं आहे. भीती नाही वाटत कधी. उलट अजून उंच उंच जावंसं वाटतं. इतकं उंच, की तिथून पृथ्वीची ती निळीशार सुंदर कडा दिसली पाहिजे. मग असंच अजून थोडं वर... अजून थोडं... पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची कक्षा भेदून एकदम पार निघून जावं... ते 'व्हॉयेजर' की असंच कुठलं तरी यान सोडलं होतं ना, तसं! दूर दूर निघून जावं सगळ्या गुरुत्वाकर्षणांच्या कक्षा ओलांडून... चंद्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून... सगळ्यांना टाटा-बाय बाय करत, अजून दूर... आपल्या आकाशगंगेच्याही पार... काय असेल तिथं? कुठलं विश्व नांदत असेल? आपलं वय काय असेल तिथं? तिथून चुकूनमाकून परत आलोच पृथ्वीवर, तर काय दिसेल? शतकं ओलांडली असतील का पृथ्वीनं? की सगळं आहे तसंच असेल? लेक ओळखेल का आपल्याला??

...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

कानाचे पडदे भेदून जाणारा तो कर्णकर्णश आवाज आला आणि प्रियंवदा खाडकन जागी झाली. तिनं आजूबाजूला पाहिलं. बेडरूममध्ये एसीचा हलका आवाज येत होता. खिडकीतून उन्हाची तिरीप येत होती. तिनं घड्याळात पाहिलं. सव्वासात वाजले होते. ती स्वप्नातून आता मात्र पूर्ण जागी झाली. इतका वेळ त्या उंचच उंच डोंगरांवरून विहरताना तिचं भान हरपलं होतं. पण आता ती वास्तव जगात आली होती. तिला सकाळी करायच्या शंभर गोष्टींची यादी डोळ्यांसमोर आली. दूध तापवायचं, सगळ्यांचा चहा करायचा, मुलीचा-नवऱ्याचा आणि स्वतःचा डबा करायचा... पळत कॅब गाठायची. दीड तास प्रवास करून ऑफिस गाठायचं... तिथं मान मोडेपर्यंत काम करायचं, दीड-दोनला कसं तरी घाईत सँडविच-कॉफी नामक लंच संपवायचं, पुन्हा मीटिंग, मग प्रेझेंटेशन्स, मग मीटिंग... पुन्हा कॅब, पुन्हा दीड-दोन तास प्रवास... घरी यायचं. यंत्रवत जेवण करायचं. मुलीशी थोडं-फार बोलायचं! नवऱ्याशी दोन ठरलेली वाक्यं बोलायची आणि पुन्हा आपल्या बेडरूममधल्या ऊबदार दुलईत शिरून झोपायचं... दिवसभर एवढा शीण झालेला असतो, की मग कधी झोप लागते ते कळतच नाही.

...


समुद्र. निळाशार अथांग समुद्र. वर मोठमोठी जहाजं संथगतीनं मार्गक्रमण करताहेत. आपण त्या स्कुबा डायव्हरसारखा पोशाख करून आपल्या जहाजाच्या डेकवरून थेट समुद्रात उडी मारतोय... खोल खोल समुद्रात शिरतोय... वर अफाट, अथांग पाण्याचा पसारा आणि त्याखालच्या अलौकिक दुनियेत आपण! किती तरी प्रकारचे मासे... रंगीबिरंगी... याशिवाय बाकी किती तरी चित्र-विचित्र प्राणी. आत्तापर्यंत डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरच बघितलेले. पाणसर्प, ऑक्टोपस, कासवं आणि नावं माहिती नसलेले किती तरी! याशिवाय प्रवाळांची ती अद्भुत सृष्टी. केवढे त्यांचे रंग आणि केवढे त्यांचे आकार! आपण संथपणे पाण्यात विहरतोय. इथं कुणीही कुणाला त्रास देत नाहीय. जो तो आपल्या विश्वात मग्न. इथली शांतताही एकदम अजब. त्या शांततेचाही आवाज ऐकू येतो. तो आवाज स्वर्गीय असतो. आपल्या रोजच्या जगण्यातले सगळे कर्कश कोलाहल इथं पूर्णपणे विसरायला होतं. या शांततेचा डोह विलक्षण आकर्षक आहे. पण हे 'फेटल अॅट्रॅक्शन' आहे. या डोहाला थांग नाही. त्यात उडी मारली, की गडप व्हायचं. कुठं, कसं माहिती नाही. पण त्या अज्ञाताची भीती वाटते. एकीकडं विलक्षण ओढही वाटते. पूर्वी उंचीवर गेलं, की आपल्याला असं व्हायचं. एकदम त्या कड्यावरून खाली झोकून द्यावंसं वाटायचं. का, ते माहिती नाही. कुठं तरी खोलवर आत दडून बसलेली त्या अज्ञाताची ओढ त्या क्षणी एकदम अनावर व्हायची. कितीदा तरी पाय मागं घेतले. पण पुढच्या वेळी पाऊल मागं पडेलच याची शाश्वती नाही. आताही त्या समुद्रात सात-आठ किलोमीटर खोल उतरल्यावर तिथंही एक आणखी खोल दरी दिसतेय. गर्ता म्हणतात हिला! आता हिची ओढ का लागावी? माणूस खूप दुःखात असला, की दुःखाच्या गर्तेत लोटला असं म्हणतो आपण... ती हीच का? पण ही तर विलक्षण देखणी आहे. तिथं आत आत काय असेल, याची ओढ लागलीय केव्हाची. समुद्राच्या प्रचंड पाण्याचा दाब डोक्यावर आणि त्यात ही मनाची आणखी खोल खोल जाण्याची वेडी घालमेल... काय करावं? मारावीच का उडी? मागं सरकून अंदाज घ्यावा... एक-दोन-तीन म्हणावं आणि घ्यावी सरळ उडी. काय होईल ते होईल. बघू या... एक... दोन...

...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

प्रियंवदाला पुन्हा खाडकन जाग आली. कुठून तरी उंचावरून आपण दाणकन गादीवर आपटलो आहोत, असं तिला वाटून गेलं. बेडरूममध्ये सगळीकडं निळा प्रकाश पसरला होता. आपण अजूनही समुद्राच्या तळाशी आहोत की काय, असं प्रियंवदाला क्षणभर वाटलं. पण तो बेडरूममधल्या निळ्या एलईडीचा प्रकाश होता. उन्हाची तिरीप डोकावतच होती. घड्याळात सात वीस झाले होते. कालच्यापेक्षा पाच मिनिटं उशीर. पुन्हा कालचाच सगळा क्रम... फक्त आज नवरा सकाळीच टूरला निघून गेला होता, म्हणून त्याचा डबा नव्हता, इतकंच! मुलीला शाळेत निघायला उशीर झाला. तिची खूपच पळापळ झाली. कसंबसं आवरलं. कालच्या मीटिंगच्या नोट्स काढायच्या होत्या. कॅबमध्ये ते काम करू म्हणून ती तशीच निघाली. ब्रेकफास्ट राहिलाच. पुन्हा ऑफिस, चहा, प्रचंड काम, काम, क्लाएंटस्, फोन, आरडाओरडा, काहींची बेशिस्त, मग चिडचिड... तसाच घाईत दुपारचा बर्गर-कॉफीचा लंचब्रेक, पुन्हा मीटिंग, काम, क्लाएंट्स, मीटिंग, काम... कधी तरी ऑफिस संपलं. पुन्हा कॅबचा दीड-दोन प्रवास. ऑफिसमधल्या मैत्रिणींसोबत थोडा टीपी, थोडं गॉसिप. गालावर हलकेच उमटलेली स्मितरेषा... आज नवरा घरी नव्हता. लेकीचा अभ्यास घ्यायचा, काही तरी खायचं आणि झोपायचं. तासाभरात संपणारं काम... ती पुन्हा बेडरूममधल्या त्या निळाईत शिरली... हलकेच डोळे कधी मिटले कळलं नाही.

...

मग एके दिवशी ती हिमालयात विहरून आली. तिथल्या पांढऱ्याशुभ्र रंगानं तिला वेड लावलं. फार पूर्वी कधी तरी ती आई-वडिलांसोबत मसुरीला आली होती; पण मनसोक्त बर्फ खेळायला मिळालाच नव्हता. किती तरी चित्रपटांतून तिनं नायक-नायिका ते बर्फाचे गोळे एकमेकांना मारतात, ते बघितलं होतं. तिला एकदा तरी तसं करायचं होतं. बाकी हिमालयाची भव्यता पाहून तिला पुन्हा एकदा ते सर्वस्व झोकून देऊन समर्पित व्हायचं फीलिंग आलं. लोकांना हिमालयाची पुनःपुन्हा ओढ का लागते, हे तिला समजावून घ्यायचं होतं. तिला चालत, ट्रेक करत तो सगळा भूभाग पालथा घालायचा होता. तिला त्या शुभ्र वर्णात हरवून जायचं होतं. सांताक्लॉजसारखी पांढरी दाढी असणारे किंवा आपल्या ऋषी-मुनींसारखे दिसणारे एखादे प्रेमळ आजोबा त्यांच्या मांडीवर खेळायला बोलवत आहेत, असं तिला वाटे. तिला त्या डोंगरांवरून घसरत यायचं होतं, स्कीइंग करायचं होतं. गोंडोलात बसायचं होतं. तिनं बेडरूममधल्या एसीचं टेंपरेचर दहावर खाली आणलं. एकदम हुडहुडी भरून आली. तिनं दोन जाड रजया अंगावर घेतल्या आणि ती ‘हिमालयाच्या सफरी’वर निघाली. इथंही तिला पंख फुटले. एव्हरेस्ट, कांचनजुंगा, ल्होत्से अशा सर्व शिखरांच्या वरून ती उडत निघाली. मानसरोवरापर्यंत पोचली. तिथल्या थंडगार पाण्याचा हलकासा शिपका तिनं तोंडावर मारला... आणि....

... 

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

तिला जाग आली!

....

असे खूप दिवस गेले, खूप रात्री गेल्या. प्रियंवदाची स्वप्नं अफाट होती, अचाट होती. जवळपास रोज रात्री तिनं स्वप्नात तिच्या जवळपास सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. कधी तरी तिच्या आईच्या कुशीत शिरावंसं वाटायचं. तेव्हा ती पाय पोटाजवळ घेऊन गर्भावस्थेतल्या बाळासारखी झोपून राहायची. पण तिच्या आईचा गर्भ आपोआप तिच्या सभोवती साकारायचा आणि तिला ऊब द्यायचा. हजारो रक्तपेशींचा रक्तवर्ण तिच्या सभोवती तयार व्हायचा. कधी तिला तिचं गाव आठवायचं. गावातलं शेत, तिथली विहीर आठवायची. फ्रॉकमध्ये वेचलेल्या चिंचा, बोरं आठवायची. कधी तिला कॉलेजात असताना सह्याद्रीत तुफान पावसात केलेली भटकंती आठवायची. हे सगळं ती पुनःपुन्हा जगायची. रोज रात्री...

आणि एक दिवस...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

गजर झाला. वाजतच राहिला. तिला जाग आलीच नाही...

...

आणि लांब तिकडं, आकाशगंगेच्या पलीकडं, कुणी तरी दोन्ही हातांची ओंजळ करून कुणाला तरी अलगद हातात घेत होतं...
हे मात्र स्वप्न होतं की नव्हतं, याचं रहस्य त्या गूढगर्भ ब्रह्मांडालाच ठाऊक होतं!

---

14 Oct 2019

वाचन प्रेरणा दिन - मटा लेख

वाचन आणि ‘प्रज्वलित मन’
--------------------------


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून १५ ऑक्टोबर हा आता ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. पुस्तक वाचनातून आपल्याला नक्की काय मिळू शकतं आणि वाचन केलं नाही तर आपण काय गमावू शकतो याचा यानिमित्त घेतलेला वेध...

----

आपण दूर कुठं तरी डोंगराच्या माथ्यावर, गर्द जंगलाच्या मध्यावर, नितळ पाण्याच्या लाटेवर, अनाघ्रात-अनवट वाटेवर, विलक्षण शांततेच्या कुशीत असावं; स्वत:च स्वत:मध्ये असण्याच्या या आगळ्या प्रवासाची अनुभूती घेत स्वत:मधल्या अजूनही न सापडलेल्या गोष्टींचा शोध घेत राहावं; एकाच वेळी बाह्य जगाशी हळूहळू संपर्क तोडत असताना, आतल्या संवादाची ऊर्मी वाढवत जावं... कुठे तरी ती तार झंकारावी आणि एका अलौकिक आनंदानं अंतर्मन लख्ख उजळून निघावं...
खरं सांगू का? हे एक स्वप्न आहे, स्वप्न! हे असलं स्वप्न आपण कित्येकदा पाहिलं असेल, वाचलंही असेल. पण प्रत्यक्षात आपल्या बाबतीत यातली एकही गोष्ट घडत नाही, हीच वस्तुस्थिती! रोजच्या ट्रॅफिक जॅममधून, प्रचाराच्या कर्ण्यांच्या कर्णकर्कश आवाजातून, सततच्या कलहाच्या उच्चरवातून जिथं आपला बाह्य आवाज आपल्याला ऐकू येत नाही, तिथं अंतर्मनाचा वगैरे आवाज कुठून ऐकू यायला! तेव्हा जवळपास अप्राप्य अशा या स्वप्नाची भरपाई करणार तरी कोण? अशा वेळी एकच करावं. आपल्या उशाशी असलेलं आपलं आवडतं पुस्तक घ्यावं आणि त्यात डोकं घालून हरवून जावं... वाचनानं मला काय दिलं, असा प्रश्न कुणी विचारला, तर हेच उत्तर आपोआप समोर येईल. केवळ स्वप्नांमध्येच आपण जगू शकतो, अशा अलौकिक आनंदाची अनुभूती आपल्याला वाचन देतं. 
वाचन म्हणजे पुस्तकाचं वाचन. छापील शब्दांचं वाचन. हे वाचन आपल्याला आयुष्यभराचं मैत्र देतं. ते शब्द लिहिणाऱ्या व्यक्तीच्या एकूण जगण्याच्या आकलनाचा काही वाटाही आपल्याला देतं. लेखकाच्या भावविश्वाचा भाग होण्याची संधी देतं. आपल्या स्वत:च्या भावविश्वाची निर्मिती करण्याची प्रेरणा देतं. या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या जगण्यावर निश्चित परिणाम घडवतं.... आणि हा परिणाम सकारात्मकच असतो, हे नक्की! खूप लहानपणापासून वाचनाची आवड असलेली व्यक्ती आणि अजिबात वाचनाची आवड नसलेली व्यक्ती यांची जडणघडण सरळच वेगळ्या पद्धतीनं होते. अर्थात आपण काय वाचतो, हेही यासाठी महत्त्वाचं आहे. चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, असं आपण म्हणतो, तेव्हा त्यातल्या आशयाचा, विचारांचा मुद्दा येतो. आपण ज्या पद्धतीचा आशय वाचतो, जो विचार वाचतो त्याचाच पगडा पुढंही आपल्या आयुष्यावर दीर्घकाळ राहतो. पुस्तकं वाचणं आणि सतत वाचत राहणं ही पुस्तकप्रेमी माणसासाठी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असल्यानं आपण काय वाचत राहिलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे याविषयी त्याची समजही वाढत जाते. विशेष म्हणजे पुस्तकं वाचूनच त्याची ही समज वाढते. पुस्तक वाचन आपल्याला समृद्ध करतं ते अशा रीतीने! 
लहानपणीच या वाचनाची गोडी लागली, की आपोआप काही गुण आपल्या अंगी येऊ लागतात. एका जागी शांतपणे एखादी गोष्ट मन लावून करीत बसणे हाही आजच्या काळात तसा मोठाच गुण म्हणायचा. पुस्तकं वाचणाऱ्या माणसात सहजच हा गुण रुजतो. फार तर तो वाचनाच्या जागा बदलेल; पण त्यापलीकडे त्याच्या हातून वावगे काही घडायचे नाही. वाचन करणाऱ्या माणसाची स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वर्धिष्णू होऊ लागते. वाचनातील एखादी गोष्ट समजली नाही, तर ती समजेपर्यंत चैन पडत नाही. त्यामुळं नव्या गोष्टी समजतात, हे ओघानं आलंच. वाचनातून नवरसांचा परिपोष होत असल्यानं आपलं भावनिक कुपोषण होत नाही. जगात किती प्रकारचे लोक किती वेगवेगळ्या प्रकाराने आपल्या जगण्यातल्या भावभावना व्यक्त करतात, हे पाहूनच आपण थक्क होतो. आपल्या परिघापलीकडचं जग पाहण्याची दिव्य दृष्टी केवळ वाचनातूनच आपल्याला लाभू शकते. वाचनामुळं लक्ष एकाग्र करण्याची सवय अंगी जडते. पुस्तकात संपूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपण त्या लेखनाचा आनंद घेऊ शकत नाही, हे स्पष्टच आहे. आजच्या काळात आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता दिवसेंदिवस चिंताजनकरीत्या कमी होत चालली असताना, पुस्तक वाचनातून आपण ती क्षमता इतरांपेक्षा अधिक राखू शकतो, हा मोठाच फायदा आहे. भाषेच्या दृष्टीने पुस्तक वाचनाचा फायदा तर फारच मोठा आहे. छापील अक्षरे म्हणजे कुठल्याही भाषेतील अचूक, प्रमाण अशी अक्षरे! आपण सतत उत्तम दर्जाची छापील अक्षरे पाहत राहिलो, त्या अक्षरांपासून तयार झालेले अचूक शब्द वाचत राहिलो, त्या शब्दांच्या समूहाद्वारे तयार झालेले अर्थपूर्ण वाक्य समजून घेत राहिलो, त्या वाक्यांच्या समुच्चयातून तयार झालेला लेख पाहत, मेंदूत मुरवत वाचत राहिलो तर आपल्या मेंदूमध्ये त्या प्रमाण, अचूक शब्दांची ‘छायास्मृती’ (फोटो मेमरी) तयार होते. त्यामुळं नंतर कधीही चुकीचे किंवा अप्रमाणित शब्द वाचले, की ते खटकायला लागतात. अचूक शब्दांचा मेंदूचा हा आग्रह आपल्याला उत्तम भाषाज्ञानाकडं घेऊन जातो. प्रत्येकानं त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करायला पाहिजे, असं नाही. केवळ उत्तम दर्जाची पुस्तकं वाचली, तरी पुष्कळ काम होऊ शकेल. पुस्तकं राहिली, तर भाषा राहील आणि भाषा टिकली तर त्या भाषेतली पुस्तकं येतील, असं हे गणित आहे. त्यामुळं वाचनाची आवड आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. छापील शब्दांचं हे प्रेम आपल्याला माणूस म्हणून उन्नत करीत राहतं; जगभरात आपल्याहून किती तरी थोर माणसं होऊन गेली आहेत आणि आपल्याला अजून भरपूर काही शिकायचंय या भावनेतून आपल्याला विनम्र ठेवतं. आजच्या सभोवतालात हे विशेषच महत्त्वाचं!
वाचनाचे हे फायदे तर झालेच; पण वाचनाच्या या सवयीचा सर्वांत मोठा व महत्त्वाचा परिणाम होतो तो आपल्या मनावर. जन्मल्यापासून आपला पिंड संस्कृती, परंपरा, रुढी, प्रथा, रिवाज अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून घडत असतो. आपल्याला कसं घडवायचं याचे निर्णय आपल्याला पुरेशी समज यायच्या आधी आपल्या वतीनं दुसरंच कोणी तरी घेत असतं. आपले आई-वडील हे त्यातले प्रमुख; पण बहुतांश वेळा किमान त्यांचा हेतू तरी स्वच्छ असतो किंवा भाबडा तरी असतो. मात्र, समाज नावाचा मोठा गाडा चालविणारे वेगळेच कुणी असतात. त्यांची इथे वा तिथे सत्ता असते. ती दर वेळी राजकीय असतेच असं नाही. ती सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे धार्मिक असू शकते; नव्हे, असतेच! ही सत्ता राखणारे आपल्या सोयीने आपल्याला घडवत असतात. त्यासाठी त्यांच्या सोयीच्या गोष्टींची बाळगुटी आपल्याला लहानपणापासून चाटविली जाते. आपण पुस्तकं वाचली नाहीत किंवा जगात कोणी काय म्हणून ठेवलंय, काय विचार केला आहे हे जाणून घेतलं नाही, तर याच बाळगुटीचं बाळसं आपल्या अंगावर चढतं आणि आपण या सत्ताधीशांना हवे तसे नागरिक म्हणून आपसूक घडत राहतो. वाचनामुळं आपल्या मेंदूला विचार करायची शिस्त लागू शकते आणि हीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळं करणारी ताकदही असू शकते. विचार करणाऱ्या मेंदूला प्रश्न पडू लागतात; विचारायला अवघड असे प्रश्न पडू शकतात. प्रश्न विचारणारे मेंदू जास्त संख्येनं तयार होणं ही कोणत्याही सत्ताधीशासाठी धोक्याची घंटा असते. अर्थात, हे ज्ञानही आपल्याला पुस्तकं वाचूनच मिळू शकतं. 
मेंढ्यांचा कळप असतो आणि वाघ जंगलात एकटा, सार्वभौम सत्ताधीश म्हणून राज्य करतो. आपल्याला कळप म्हणून जगायचंय की प्रश्न विचारणारा सार्वभौम, विचारी माणूस व्हायचंय हे आपल्या पुस्तक वाचनाच्या आवडीवरून ठरू शकतं. निर्णय आपल्याच हाती!
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती; १३ ऑक्टोबर २०१९)

28 Sept 2019

रिव्ह्यू - छिछोरे

थ्री चीअर्स फॉर ‘लूजर्स’
---------------------------



यश म्हणजे नक्की काय? एखाद्या प्रवेश परीक्षेत नंबर लागणे? दहा लाख मुलांमध्ये पहिला नंबर मिळविणे? जन्मल्यापासून शक्य त्या सर्व स्पर्धांमध्ये धावून दर वेळी पहिला क्रमांक मिळविण्याचे अशक्यप्राय काम करीत राहणे? यशस्वी होणं कशाला म्हणायचं? आणि मुळात हे यश मिळवायचं ते कशाची किंमत मोजून? आयुष्य महत्त्वाचं की आयुष्यातलं कथित ध्येय? आयुष्यच नसेल तर या सगळ्याला काय अर्थ?
अशा काही मूलभूत प्रश्नांना हात घालणारा, आजच्या पिढीसोबत पालक पिढीच्याही संघर्षाचं दर्शन घडविणारा ‘छिछोरे’ (शब्दश: अर्थ पोकळ, अर्थहीन) हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात धाव धाव धावणाऱ्या सगळ्या पालकांच्या डोळ्यांत घातलेलं झणझणीत अंजनच म्हणावं लागेल. नीतेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट आपल्याला आवडतो, याचं कारण आज चाळिशीत असलेल्या पिढीच्या तारुण्याचंही तो दर्शन घडवतो आणि आज या पिढीला त्यांच्या मुलांच्या पिढीबाबत पडत असलेल्या प्रश्नांनाही तो हात घालतो.

SPOILER ALERT

या चित्रपटाचे सरळ दोन भाग आहेत. एक आहे तो आजच्या काळातला आणि दुसरा आहे तो फ्लॅशबॅकमधला. आपला नायक अनिरुद्ध पाठक (सुशांतसिंह राजपूत) आणि माया (श्रद्धा कपूर) या जोडप्याचा मुलगा राघव जेईईमध्ये नंबर येईल की नाही, या चिंतेत आहे. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे आणि राघव वडिलांकडे राहतो आहे. प्रचंड ताणात असलेल्या राघवची मन:स्थिती वडिलांच्या लक्षात येत नाही. जीईईत नंबर न आल्यानं अत्यंत घाबरलेला राघव आत्महत्येचा प्रयत्न करतो आणि त्याच्या आई-वडिलांचे डोळे खाडकन उघडतात. आपल्या मुलाला आपण सदैव ‘लूजर’ होण्याचा ताण देत होतो, हे त्यांच्या लक्षात येतं. राघव रुग्णालयात मृत्युशय्येवर पडलेला असतो आणि त्याच्या वडिलांना त्यांचं तरुणपण आठवतं. त्या कॉलेजमधले एकेक अवली मित्र आठवतात आणि ही सगळी गोष्ट मुलाला सांगण्याचं ते ठरवतात. तिथून फ्लॅशबॅक सुरू होतो. अनिरुद्ध ऊर्फ अनीच्या कॉलेजच्या दिवसांची धमाल गोष्ट सुरू होते. इथले त्याचे ‘सेक्सा’, ‘अॅसिड’, ‘मम्मी’, ‘बेवडा’ अशा अत्रंगी नावाचे मित्र आणि डेरेक हा आणखी एक मित्र त्याला आठवतात. त्याच्या सांगण्यावरून ते थेट हॉस्पिटलमध्येच येतात आणि मित्राच्या अल्बमच्या माध्यमातून त्यांच्या कॉलेज दिवसांच्या धमाल आठवणींत रमतात. या आठवणी सांगण्याचा मुख्य उद्देश काय असतो, हे आपल्या लक्षात येतंच.
अनी आणि त्याचे हे मित्र कॉलेजमध्ये ‘लूजर्स’ म्हणून प्रसिद्ध असतात. त्यांच्या ‘एच - ४’ या बदनाम होस्टेलची आणि तिथल्या एक से एक मित्रांची ओळख आपल्याला व्हायला लागते. दिग्दर्शकानं या फ्लॅशबॅकमध्ये टिपलेलं ‘नाइन्टीज’चं वातावरण आज चाळिशीत असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना नॉस्टॅल्जिक करणारं आहे. हाच सिनेमातला सगळ्यांत धमाल आणि हास्यस्फोटक भाग आहे. होस्टेलवरचं रॅगिंग, एकेका मित्राची होत जाणारी ‘ओळख’, इतर होस्टेलबरोबर असलेली दुश्मनी आणि सगळ्यांत शेवटी स्पोर्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी केलेली प्रचंड धडपड... हा सगळाच भाग जमून आला आहे. या सर्व ‘लूजर्स’ची होणारी मैत्री आणि त्यातून त्यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी प्राणपणाने केलेली मेहनत, त्यांच्या आवडत्या गोष्टींचा त्याग या सगळ्या गोष्टी पाहायला मजा येते. हा भाग पाहताना अनेकांना आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कॉलेजमध्ये, मित्रांमध्ये बोलली जाणारी टपोरी भाषा यात ऐकायला मिळतेच; पण सेन्सॉरमुळे आता काही ठिकाणी, काही शिव्यांचा ‘बीप’चं जे बूच बसलंय ते आता हास्यास्पद वाटतं. वेबसीरीज पाहायला चटावलेल्या माझ्यासारख्या प्रेक्षकाला त्या शिव्या सहजी ओळखी येतातच. पण इथं त्यांचं ‘म्यूट’ होणं रसभंग करणारं वाटतं. अर्थात चित्रपटाचं हे एवढंच आकर्षण नाहीय.
चिल्लर पार्टी, भूतनाथ रिटर्न्स, दंगल यासारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक नीतेश तिवारीला, आपल्याला या सिनेमातून काय सांगायचंय हे नेमकं ठाऊक आहे. आजच्या पिढीवरचे ताण आणि त्यातून येणारी एकारलेली मानसिकता या सगळ्यांवर दिग्दर्शक भाष्य करू इच्छितो. आता कॉलेजवयीन मुलाचा पालक झालेला अनिरुद्ध एकदा म्हणतो, ‘जीईईला दहा लाख मुलं बसतात. त्यातले दहा हजार यशस्वी होतात. उरलेल्या नऊ लाख नव्वद हजार मुलांचं काय? आपण त्यांना तुम्ही परीक्षेत अयशस्वी झाल्यानंतर काय करायचं असतं, हे कधी सांगतच नाही. त्यामुळं त्या मुलांना वाटू लागतं, की आपण या परीक्षेत अयशस्वी झालो, म्हणजे आयुष्यातच अयशस्वी झालो. तसं नसतं हे त्यांना कोण सांगणार?’ अनिरुद्धच्या या सवालावर या चित्रपटाचा सग‌ळा फोकस आहे. खुद्द अनिरुद्धनं त्याच्या कॉलेजमधल्या दिवसांत त्यांनी नक्की काय केलं होतं, हे मुलाला आधी कधी सांगितलेलं नसतं. मुलगा जेव्हा रुग्णालयात मृत्युशय्येवर पडतो तेव्हाच त्याला मुलाला हे सांगावंसं वाटतं. त्याचं आणि मायाचं नातं का तुटलं, हे चित्रपटात नीटसं समजत नाही. मात्र, त्याचं सतत कामात असणं दिग्दर्शकानं सूचित केलंंय.
आपण आयुष्यात नक्की काय करायचंय, आपले प्राधान्यक्रम कोणते, पैसा किती आणि कसा मिळवायचा, कुटुंबाचं स्थान/महत्त्व किती या सगळ्यांचाच पुन्हा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतनं अनिरुद्धची मुख्य भूमिका केली आहे. प्रौढ पालक झालेला अनिरुद्ध आणि कॉलेजमधला टपोरी अनी ही दोन्ही रूपं त्यानं चांगली दाखविली. श्रद्धा कपूर ही एकमेव अभिनेत्री या चित्रपटात आहे. (अगदी कॉलेजमध्येही तिला एकही मैत्रीण वगैरे दाखववलेली नाही. इंजिनीअरिंग कॉलेजमधला मुलींचा तुटवडा हा संदर्भ एकदा येतो.) तिनंही मायाचं काम व्यवस्थित केलंय. मात्र, ती कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाची आई वाटत नाही, हेही खरं. सगळ्यांत धमाल आणली आहे, ती अनीच्या अवली मित्रांची कामं करणाऱ्या कलाकारांनी. वरुण शर्मा (सेक्सा), तुषार पांडे (मम्मी), नवीन पोलिशेट्टी (अॅसिड), सहर्षकुमार शुक्ला (बेवडा), ताहीर राज भसीन (डेरेक) हे सगळे कलाकार धमाल काम करतात. व्हिलन रॅगीचं काम प्रतीक बब्बरनं केलंय.
इतर छोट्या-मोठ्या भूमिकांतले कलाकारही लक्षात राहतात. उदा. होस्टेलच्या क्लार्कची भूमिका करणारा सानंद वर्मा.
उत्तरार्धात चित्रपट ठरावीक वळणं घेत अपेक्षित शेवट गाठतो. शिवाय लांबी थोडी कमी असती, तरी चाललं असतं, असं वाटतं. नव्वदच्या दशकातले इतर काही रेफरन्स (उदा. क्रिकेट, गाणी, सिनेमे) पटकथेत आली असती तरी अजून मजा आली असती, असंही वाटून गेलं. पण तरीही हा सिनेमा मनोरंजनाची एक विशिष्ट पातळी कायम राखतो. कंटाळा येत नाही, हे महत्त्वाचं. चित्रपटाला संगीत प्रीतमचं आहे. गाणी सिनेमात ऐकायला बरी वाटली, पण नंतर लक्षात राहिली नाहीत. एंड स्क्रोलला येणारं गाणं व त्यात दोन्ही पिढ्यांतली पात्रं एकत्र नाचतात, ही कल्पना छान होती.
तेव्हा आजच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपल्या मुलांबाबत नक्की कोणते निर्णय घ्यायचे, लादायचे हे ठरविण्यापूर्वी मुलांसह एकदा हा चित्रपट जरूर पाहा. कदाचित आपल्यात बदल झालेला असेल.

---

दर्जा - साडेतीन स्टार
---






2 Sept 2019

अनिल अवचट पंचाहत्तरी - मटा लेख

मस्त कलंदर
-----------


अनिल अवचट ऊर्फ बाबा या माणसाचं वर्णन करण्यासाठी कलंदर किंवा अवलिया हेच शब्द वापरावे लागतात. लेखक, पत्रकार, संपादक, (प्रॅक्टिस न करणारा) डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, अभ्यासक, चित्रकार, शिल्पकार, गायक, ओरिगामी तज्ज्ञ, बासरीवादक, नवनव्या गोष्टी शिकण्याची मनस्वी आवड असणारा विद्यार्थी, दोन मुलींचा उत्तम पालक... एका माणसात किती गोष्टी असाव्यात! अवचटांचं आयुष्य अशा विविधरंगी गोष्टींनी फुललेलं आहे. सर्व ऋतूंत बहरणारं हे वेगळंच ‘झाड’ आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचे ते डोळस साक्षीदार आहेत. त्यांनी आयुष्यात जे जे पाहिलं, अनुभवलं, ते ते लहान मुलाच्या कुतूहलानं पाहिलं व अनुभवलं. लोकांना सांगताना मात्र एखाद्या जाणत्या माणसानं लहान मुलांना सांगावं, तशा समजुतीनं, नीट सांगितलं. जगण्याचे विविध अनुभव घेतले; अगदी मनस्वीपणे घेतले. स्वत:चं मध्यमवर्गीय विश्व कधी लपवलं नाही, पण त्याचा अनाठायी बडेजावही केला नाही. उलट शक्य होईल तेव्हा मध्यमवर्गीय असण्याची बंधनं तोडण्याचाच प्रयत्न केला. कधी जमला, कधी नाही जमला! मात्र, अवचट कशात अडकून पडले नाहीत. पुढं चालत राहिले. एका वयात सामाजिक क्रांती करण्याचं वेड त्यांच्या अंगात होतं. मात्र, ते प्रकृतीला झेपत नाही असं लक्षात आल्यावर शांतपणे बाजूला झाले. हा काही तरी आयुष्यात मोठा पराभव झाला आहे, असा भाव कधी ठेवला नाही. नंतर बराच काळ शोधपत्रकारितेत रमले. जे काम करायचं, ते व्यवस्थितच अशी वृत्ती असल्यानं आणि मूळ स्वभाव सर्व गोष्टींविषयी जात्याच कुतूहल बाळगणारा असल्यानं ही शोधपत्रकारिताही त्यांनी गाजविली. महाराष्ट्राला तोवर फारसा माहिती नसलेला ‘रिपोर्ताज’ प्रकार त्यांनी हाताळला. नंतर लोक त्यालाच ‘अवचट शैली’ म्हणू लागले. ‘मी मुद्दाम असं काही लिहिलं नाही, जे भिडलं, आतून लिहावंसं वाटलं ते लिहीत गेलो,’ असं त्यांनी नंतर अनेक मुलाखतींतून सांगितलं. मात्र, काही विशिष्ट गुण किंवा प्रतिभा असल्याशिवाय कुणालाही असं लिखाण करता येत नाही. अवचटांच्या ‘मनोहर’ किंवा ‘साधने’तल्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य असं, की त्यांनी मुंबई किंवा पुण्याच्या बाहेर पसरलेला विस्तृत, पण बेदखल असा महाराष्ट्र आपल्या लेखणीतून सगळ्या समाजासमोर आणला. ‘संभ्रम’ किंवा ‘कोंडमारा’मधले त्यांचे लेख वाचले, की याची प्रचिती येते. अवचटांना समाजातल्या शेवटच्या घटकाविषयी ममत्व आहे. कथित कनिष्ठ जातींतले, कथित अस्पृश्य आणि नाडलेले, गांजलेले असे अनेक व्यक्तिसमूह त्यांच्या लेखनाचा विषय झाले. ‘माणसं’ हे त्यांचं पुस्तक आलं, तेव्हा ते वाचून महाराष्ट्र हादरून गेला. आपल्याभोवती छोट्याशा सुखाचा कोष विणून आत्मरत असलेल्या मध्यमवर्गाला त्यांनी आपल्या लेखणीतून दाहक सामाजिक वास्तवाचे चटके दिले. तत्कालीन मध्यमवर्गीयांत संस्कारांमधली संवेदनशीलता टिकून असल्यानं त्यांनीही हे लिखाण वाचलं आणि स्वीकारलं. महाराष्ट्रात गेली शंभर-दीडशे वर्षं कथित पुरोगामी आणि कथित सनातनी असे दोन वर्ग कायमचे पडलेले आहेत. कुणी कुठल्या वर्गात असायचं, याचे संकेतही ठरलेले आहेत. अवचट यांच्या लेखणीची जादू अशी, की तिने हे संकेत मोडून काढले. अवचट दोन्ही वर्गांना आपलेसे वाटले. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लेखक म्हणून असलेला त्यांचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा! 
आपल्याकडं अनेकदा प्रामाणिकपणा हा जणू कमावलेला गुण असल्यासारखा मिरवला जातो. काहींचा साधेपणा हा भाबडेपणाकडं, तर क्वचित बावळटपणाकडं झुकतो. याचं कारण आपल्या समाजाची पूर्वापार चालत आलेली दांभिक वृत्ती. अवचट मात्र याला अपवाद ठरले. याचं कारण त्यांच्यातला लेखक आणि त्यांच्यातला माणूस हे वेगळे कधीच नव्हते. ते जसं जगले, तसं लिहीत गेले. त्यांच्या अनेक लेखांची नावे ‘घडले तसे’, ‘दिसले तसे’ अशी आहेत. त्यामुळं अवचटांमधला प्रामाणिकपणा वाचकांना पटला, भावला. त्यांच्यातला साधेपणा अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि सगळ्यांना सांगितला. त्यामुळंच कथा-कादंबरी, कविता किंवा विनोदी साहित्य अशा कुठल्याही पठडीत त्यांचं साहित्य रूढार्थानं बसत नसतानाही ते लेखक म्हणून अमाप लोकप्रिय झाले. त्यांची सुरुवातीच्या काळातली सगळीच पुस्तकं ‘नॉन-फिक्शन’ प्रकारातली होती आणि तत्कालीन इतर लेखकांच्या मानानं निराळी होती. तरीही तेव्हाच्या वाचकांनी ती उचलून धरली. अवचटांच्या व्यक्तिमत्त्वातल्या पारदर्शकतेचाचा हा परिणाम होता. त्यांनी घेतलेले काही अनुभव केवळ सर्वसाधारण वाचकांच्याच नव्हे, तर सर्वसाधारण लेखकांच्याही परिघाच्या बाहेरचे होते. अवचट ओतूरसारख्या छोट्या गावातून आले. त्यांचा जन्म १९४४ चा. स्वातंत्र्यानंतरचा बदलता देश आणि बदलता महाराष्ट्र बघत त्यांची पिढी मोठी झाली. सत्तरच्या दशकातला स्वप्नाळूपणा आणि बंडखोरी अशा दोन्ही गोष्टी या पिढीनं अनुभवल्या. अवचट यांचे वडील डॉक्टर व घराणं गावातलं प्रतिष्ठित. त्यामुळं तत्कालीन परंपरेप्रमाणं त्यांनाही डॉक्टर होणं भागच होतं. त्याप्रमाणे ते बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये गेलेही. मात्र, त्यांचा कल पहिल्यापासूनच डॉक्टरकी न करण्याकडंच राहिला. एकच एक गोष्ट आयुष्यभर करत बसणं त्यांच्यातल्या कलंदर माणसाला आवडणं शक्यच नव्हतं. मात्र, या कॉलेजात अवचटांना ‘सुनंदा’ भेटली. सुनंदा ऊर्फ अनिता अवचट यांच्या आयुष्यात येण्यानं अवचटांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. ‘तुला हवं ते कर, मी घर सांभाळते’ असं बिनधास्त सांगणारी जीवनसाथी मिळणं हे अवचटांचं भाग्य होतं. सुनंदाताईंच्या पाठबळावर अवचटांनी पुढं आयुष्यात पुष्कळ ‘उद्योग’ केले. बहुसंख्य मराठी माणसासाठी चौकटीतलं जगणं हेच प्राक्तन असताना अवचटांना निराळं आयुष्य जगायची संधी मिळाली. त्यांच्या अंगातल्या कलंदरपणामुळं त्यांनी ती पुरेपूर उपभोगली. त्यांचे अनुभव ऐकून, वाचून चौकटबद्ध मराठी वाचकांना एका वेगळ्याच ‘फँटसी’ची अनुभूती मिळाली. आपण सहसा करू शकत नाही त्या गोष्टी सहजी करणाऱ्या लेखकांचं, व्यक्तिश्रेष्ठांचं वाचकांना आकर्षण असतंच. गौरी देशपांडेंचं लेखन वाचताना त्या आकर्षणाची प्रचिती येते. अवचटांच्या लेखनातूनही वेगळ्या पद्धतीची ‘फँटसी’ मराठी वाचकांचं समाधान करून गेली. अवचट लेखक म्हणून लोकप्रिय होण्यात या घटकाचा वाटा दुर्लक्षिता येण्यासारखा नाही. 
काळ बदलला तसे अवचटही बदलत गेले. त्यांनी कधी स्वत:ला ‘स्टीरिओटाइप’ केलं नाही. ‘गर्द’च्या व्यसनाचा अभ्यास करताना त्यांना या महाभयंकर समस्येचं अक्राळविक्राळ स्वरूप समजलं. या व्यसनाधीन लोकांसाठी काही तरी केलं पाहिजे, असं त्यांनी व अनिता अवचट यांनी ठरवलं. त्यातून पु. ल. देशपांडे दाम्पत्याच्या मदतीतून ‘मुक्तांगण’ची सुरुवात झाली. काळाच्या पुढचा विचार त्यामागं होता. आज मोबाइलपासून सुटका होण्यासाठी या केंद्रात उपचारांची सोय झाली आहे, याला द्रष्टेपणच म्हणायचं नाही तर काय! नव्वदमध्ये अवचटांनी लिहिलेलं ‘स्वत:विषयी’ हे एक आगळं-वेगळं पुस्तक आलं आणि अवचटांच्या चाहत्यांत मोठी भर पडली. हा अवलिया बाबा एक मुलगा म्हणून, विद्यार्थी म्हणून, मित्र म्हणून, प्रियकर म्हणून, नवरा म्हणून, पालक म्हणून कसा होता; त्याची जडणघडण कशी झाली हे मराठी वाचकांना या पुस्तकातून कळलं. पु. ल. आणि सुनीताबाईंना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ म्हटलं जातं. त्यांचा तो मान अबाधित ठेवून अनिल व सुनंदा या दाम्पत्याला ‘महाराष्ट्राचं दुसरं लाडकं दाम्पत्य’ म्हणता येईल, एवढी लोकप्रियता या पुस्तकाला आणि पर्यायानं अवचट दाम्पत्याला लाभली. मात्र, पुढच्या काही वर्षांतच, १९९७ मध्ये सुनंदा यांचं कर्करोगानं आकस्मिक निधन झालं. हा धक्का मोठा होता. अवचट पूर्वीचे राहिले नाहीत. मात्र, मुक्ता व यशोदा या अवचटांच्या दोन गुणी मुलींनी ‘बाबा’ला हळुहळू पुन्हा पूर्वपदावर आणलं. यानंतरच्या काळातले लेखक अवचट वेगळे होते. त्यांना आता ‘मस्त मस्त उतार’ सापडला होता. आता हा बाबा मुलाबाळांत अधिक रमू लागला. ओरिगामी, बासरी, काष्ठशिल्पं यात जीव रमवू लागला. लेखांचेही विषय बदलले. लेखनातला आक्रमकपणा लुप्त झाला. माया, जिव्हाळा, वात्सल्य या भावना वरचढ झाल्या. लहान मुलासारखी निरागसता आणि कुतूहल हे मात्र सदैव कायम राहिलं. 
सध्या बुवाबाजीचं थोतांड पुन्हा वाढलंय. अवचटांनी आयुष्यभर त्याचा विरोध केला. मात्र, ज्याच्या लेखनाबाबत ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ म्हणावं, असा हा आवडता लेखक आहे.  
लौकिकार्थानं बाबाला अनेक पुरस्कार मिळाले. मान-सन्मान मिळाले. मात्र, त्यानं पुस्तकातून जोडलेले वाचक आणि प्रत्यक्ष जीवनात जोडलेली अक्षरश: शेकडो लहान-थोर माणसं हाच त्याचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. बाबानं मागच्या सोमवारी (२६ ऑगस्ट) वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. मात्र, त्याच्या नजरेतलं मूलपण आजही कायम आहे आणि हे निरागस मूलपण हाच आजच्या ‘बाबा’चा सर्वांत सुंदर दागिना आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, १ सप्टेंबर २०१९)

---

3 Aug 2019

मराठी व्याकरण - भाग ७ ते १२

मराठी व्याकरण
---------------
भाग ७
---------

आज एकेका सुट्या शब्दांऐवजी नेहमी घोळ होणाऱ्या शब्दांचे, अचूक लिहिण्यासाठीचे साधे-सोपे नियम पाहू या. हे नियम लक्षात राहिले, की मग ते शब्द कधीच चुकणार नाहीत.

१. जाऊन, खाऊन, जेवून, ठेवून...
या शब्दांमध्ये मधले अक्षर ऊ लिहायचे, की वू लिहायचे याबाबत अनेकांचा गोंधळ होतो. त्यामुळे जावून, खावून, जेऊन, ठेऊन, देवून, घेवून अशी चुकीची रूपे लिहिलेली आढळतात.
कुठल्या शब्दात ‘ऊ’ लिहायचे आणि कुठल्या शब्दात 'वू’ याबाबत सोपा नियम असा, की त्या शब्दाचे मूळ क्रियापद पाहायचे. त्यात व असेल तरच वू लिहायचे. व नसेल तर ऊ लिहायचे. जाऊन या शब्दामध्ये मूळ क्रियापद जाणे असे आहे. त्यात व नाही. त्यामुळे हा शब्द ‘जाऊन’ असा लिहिला जाईल. ठेवून या शब्दात मूळ क्रियापद ठेवणे असे आहे. त्यात ‘व’ असल्याचे तो शब्द ‘ठेवून’ असा लिहिला जाईल. त्याचप्रमाणे जेवणे - जेवून, खाणे - खाऊन, जाणे - जाऊन, घेणे - घेऊन असे शब्द योग्य पद्धतीने लिहावेत.
२. खानावळ नव्हे; खाणावळ
जसे जेवण - जेवणावळ तसेच खाणे - खाणावळ. त्यामुळे हा शब्द ‘खानाव‌‌ळ’ असा लिहिणे अयोग्य. चित्रपटसृष्टीतील खान मंडळींच्या चलतीला उद्देशून कुणी तरी गमतीने ‘खानावळ’ शब्द वापरला तर तो योग्य; अन्यथा जेवण्याच्या ठिकाणासाठी ‘खाणावळ’ असेच लिहायला हवे. तोच प्रकार 'काणाडोळा' या शब्दाचा. हा शब्द 'कानाडोळा' असा चुकीचा लिहिला जातो. एखाद्या गोष्टीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे म्हणजे तिकडे डोळा 'काणा' (तिरका) करणे. इथे 'काना'चा काहीही संबंध नाही. मात्र, कुणी हा शब्द 'कानाडोळा' असा लिहिल्यास तिकडे 'काणाडोळा' करू नये. ती चूक संबंधितांच्या लक्षात आणून द्यावी.
३. ‘द’ कुठे आणि ‘दी’ कुठे?
आपण अनेकदा इंग्रजी शब्द देवनागरी लिपीतून लिहितो. उदा. अनेक संस्थांची नावे इंग्लिशमध्ये असतात. ती देवनागरीतून लिहिताना ‘The’ हा शब्द कधी ‘द’, तर कधी ‘दी’ असा लिहिला जातो. याबाबत सोपा नियम असा, की इंग्लिशमध्ये जो शब्द किंवा शब्दसमूह स्वरांनी (A, E, I, O, U) सुरू होतात, त्या शब्दांआधी येणारा ‘The’ ‘दी’ असा लिहावा, तर जे शब्द किंवा शब्दसमूह व्यंजनांनी सुरू होतात, त्या शब्दांआधी येणारा ‘The’ हा ‘द’ असा लिहावा. ‘द सन’ आणि ‘दी अर्थ’ हे याचे लक्षात ठेवायला सोपे उदाहरण आहे. ‘द पूना मर्चंट्स चेंबर’ आणि ‘दी असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स’ असे लिहिणे योग्य.
४. इंग्रजी अक्षरे दीर्घच
इंग्रजीमधील सर्व वर्णमाला देवनागरीतून लिहिताना सर्व अक्षरे दीर्घ लिहावीत. म्हणजे बी, सी, डी, ई, यू अशीच लिहावीत. बि, सि, डि, इ, यु अशी लिहू नयेत. जेव्हा ही अक्षरे जशी आहेत तशी म्हणूनच लिहायची असतात तेव्हासाठीच हा नियम आहे. उदा. लघुरूप असेल तेव्हा. U B Kulkarni हे यू. बी. कुलकर्णी असेच लिहावे. मात्र, कधी कधी मराठी लघुरूप असेल तर ते मूळ शब्दाप्रमाणेच लिहावे. उदा. यु. म. पठाण. यांचे नाव मराठीत लिहिताना ‘युसूफ’ असल्याने ‘यु.’ असेच लिहिले जाईल. तेच हे नाव इंग्रजीत U M Pathan असे होत असल्याने ते इंग्रजी अक्षराच्या नियमाप्रमाणे यू. एम. पठाण असेच लिहावे. त्याचप्रमाणे ही अक्षरे इंग्रजी नावांत येतात तेव्हाही त्यांचे लिखाण वेगळे होईल. उदा. United हा शब्द लिहिताना ‘युनायटेड’ (यु ऱ्हस्व) लिहिला जाईल. तिथे ‘इंग्रजी अक्षरे कायम दीर्घ’ हा नियम लागू होणार नाही.
५. कायम पहिली वेलांटी
इंग्रजीत ing प्रत्यय लागलेला प्रत्येक शब्द मराठीत लिहिताना पहिली वेलांटी देऊनच लिहावा. उदा. coming - कमिंग, going - गोइंग, Building - बिल्डिंग, Marking - मार्किंग इ.
---
----
भाग ८
--------

१. द्ध आणि ध्द, द्व आणि व्द
प्रसिद्ध, श्रद्धा, बुद्धी अशा शब्दांमध्ये येणारे ‘द्ध’ हे जोडाक्षर ‘ध्द’ असे लिहिणे अयोग्य. मराठीत आपल्या उच्चारणाचा आणि लेखनाचा क्रम सारखाच असतो. हे जोडाक्षर जेव्हा ‘द्ध’ असे लिहिले जाते, तेव्हा त्याची फोड ‘द् + ध’ अशी असते. हे अक्षर उच्चारतानाही आपण आधी ‘द्’ आणि मग ‘ध’ अशाच योग्य क्रमाने उच्चारतो. त्यामुळे त्याचे लेखन कायम ‘द्ध’ असेच करावे. ‘ध्द’ हा उच्चार मराठीत बहुतेक कुठेच वापरला जात नाही, हे आपल्या लक्षात येईल. तीच गोष्ट द्वार, द्वादशी या शब्दांची. यातही आधी ‘द्’ आणि मग ‘व’ ही अक्षरे येतात, हे उच्चार केल्यास लक्षात येते. त्यामुळे हे शब्दही ‘व्दार’, ‘व्दादशी’ असे न लिहिता द्वार, द्वादशी असेच लिहावेत. ‘व्द’ हे अक्षरही मराठीत फारसे उच्चारले जातच नाही.
२. किंमत-किमतीला, रक्कम-रकमेला
किंमत या शब्दाचे सामान्यरूप होताना ‘कि’वरचा अनुस्वार जातो आणि तो शब्द ‘किमतीला’ असा लिहिला जातो. ‘किंमतीला’ असे लिहिणे अयोग्य. ‘हिंमत’चेही याचप्रमाणे ‘हिमतीला’ असे सामान्यरूप होईल. अन्य उदाहरण : गंमत - गमतीने.
‘रक्कम’ या शब्दाचे सामान्यरूप होताना ‘क’चे द्वित्व जाते आणि तो शब्द ‘रकमेला’ असा लिहिला जातो. बाकी उदाहरणे : अक्कल - अकलेची, मुद्दल - मुदलात, जिन्नस - जिनसांची, शिल्लक - शिलकेची, डुक्कर - डुकरांची, थप्पड - थपडेची, टक्कर - टकरेची, चप्पल - चपलेची, नक्कल - नकलेची, पक्कड - पकडेची, बक्कल - बकलाची, छप्पर - छपरावर इ.
३. पाऊस-पावसात, देऊळ-देवळात...
पाऊस, देऊळ अशा शब्दांचे सामान्यरूप होताना ती ‘पावसात’, ‘देवळात’ अशी होतात. थोडक्यात ‘ऊ’ची जागा ‘व’ हे अक्षर घेते. ‘पाऊसात’, ‘देऊळात’ असे लिहिणे चूक. ‘पाऊल’चे सामान्यरूपही ‘पावलात’ असेच होते. अराकान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूपे होताना, खाटीक - खाटकाचा, कापूस - कापसाला, चाबूक - चाबकाची, ढेकूण - ढेकणाची, तांदूळ - तांदळाची, बेडूक - बेडकाची, माणूस - माणसाची अशी रूपे होतात.
अकारान्त स्त्रीलिंगी नामांची सामान्यरूपे पुढीलप्रमाणे : खारीक : खारकेची, तारीख - तारखेची, बाभूळ - बाभळीची, बेरीज - बेरजेची.
४. आरसा - आरशाने, ससा - सशाने
आकारान्ती शब्दांचे सामान्यरूप होताना ‘सा’चा ‘शा’ होतो. उदा. आरसा - आरशाने, ससा - सशाने, पैसा - पैशाने, घसा - घशाने, मासा - माशाने.
(मासा आणि माशी यांचे अनेकवचन किंवा सामान्यरूप होताना वेगवेगळे होते, याचे कारण मुळात हे दोन वेगळे शब्द आहेत. ‘मासा’चे माशाने असे होते, तर ‘माशी’ या शब्दात मुळातच ‘श’ असल्याने त्याचे सामान्यरूप ‘माश्यांनी’ असे होते. ‘जाळ्यात पकडल्यावर माशांची तडफड सुरू होती’ आणि ‘हलवायाच्या दुकानात माश्या घोंघावत होत्या’ ही वाक्यरचना बरोबर. या दोन शब्दांत नेहमी गोंधळ होतो. त्यामुळे मूळ शब्द लक्षात ठेवावा.)
५. राजकीय पक्ष व उडणारे पक्षी
राजकीय पक्ष असतात त्यांच्याबाबत जेव्हा उल्लेख असेल, तेव्हा ‘पक्षांनी’ असेच सामान्यरूप होईल. मात्र, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांबाबत उल्लेख असेल, तेव्हा ‘क्ष’ला ‘य’ जोडून ‘पक्ष्यांनी’ असेच सामान्यरूप होईल. या दोन्हींमध्ये अनेकदा गल्लत होते. ‘राजकीय पक्ष्यांनी’ असे लिहिणे चूक, तसेच ‘पक्षांचा थवा उडत होता’ असे लिहिणेही चूकच.
---
---

भाग ९
--------

१. रफार कुठे द्यायचा?
आपल्याकडे एखाद्या शब्दात रफार नेमका कुठे द्यायचा, याबाबत अनेकांचा गोंधळ असल्याचे जाणवते. त्यामुळेच ‘पुनर्रचना’ हा शब्द ‘पुर्नरचना’ असा चुकीचा लिहिलेला आढळतो. मराठीत आपण जसे अक्षरांचे उच्चार करतो, तसेच म्हणजे त्याच क्रमाने लिहितो. पुनर्रचना हा शब्द उच्चारताना आपण पु-न-र-र-च-ना असा उच्चारतो.
पाय मोडलेला म्हणजेच ज्यात स्वर मिसळलेला नाही अशा र् च्या नंतर व्यंजन आल्याने त्याचा रफार होतो. त्यामुळे रफार कुठे द्यावा, याची शंका असल्यास तो शब्द सावकाश उच्चारून पाहावा. ‘र’चा उच्चार जेथे संपतो, त्यानंतर येणाऱ्या अक्षरावर रफार द्यावा. अन्य उदाहरणे : पुनर्जन्म, पुनर्स्थापना, पुनर्विचार, पुनर्विवाह, पुनर्भेट, इ.
(येथे मुळात पुन: + पुढील व्यंजन अशी रचना आहे. संधी होताना विसर्ग जाऊन त्या जागी ‘र’ येतो. या ‘र’साठी पुढील रफार येतो, हे लक्षात असू द्यावे. काही काही शब्द ‘पुन:’ हा उपसर्ग जसा आहे तसाच ठेवून लिहिले जातात. उदा. पुन:प्रत्यय. हा शब्द पुनर्प्रत्यय असा लिहिला जात नाही. तसा लिहिला तरी तो चूक मात्र नाही. मात्र, रूढ नाही.)
२. आणखी रफार...
संधी नसलेल्या अनेक तत्सम शब्दांत आपण रफार देतोच. उदा. समर्पण, अर्पण, दर्पण इ. हे शब्द इथे दिले आहेत तसेच लिहिणे योग्य. (मराठीतील सरपण हा शब्द मात्र ‘सर्पण’ असा लिहू नये. कारण त्यातील र स्वरासहित आहे )
३. गावाच्या नावात ‘पूर’ असेल तर...
हा नियम मराठी साहित्य महामंडळाच्या नियमावलीत आहे. एखाद्या गावाच्या नावात ‘पूर’ असेल तर ‘पू’ला दुसरा उकार द्यावा. उदा. कोल्हापूर, सोलापूर, श्रीरामपूर. मात्र, ‘कोल्हापुरात’ लिहिताना ‘पु’ला पहिला उकार द्यावा. कोल्हापूर - कोल्हापूरला - कोल्हापूरमध्ये - कोल्हापुरात हे योग्य. ‘कोल्हापूरात’, ‘सोलापूरात’ असे लिहिणे चुकीचे, हे लक्षात ठेवावे.
४. देशातील काही प्रमुख शहरांची नावे
तिरुअनंतपुरम - केरळची राजधानी. या शहराचे इंग्रजांच्या काळात रूढ झालेले ‘त्रिवेंद्रम’ हे नाव बदलून ‘तिरुअनंतपुरम’ करण्यात आले आहे. ते अनेक लोक थिरुअनंतपूरम, थिरूअनंतपूरम, तिरुवअनंतपुरम अशा वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचं लिहितात. दाक्षिणात्य भाषांत ‘तिरु’ याचा अर्थ ‘श्री’. तिरुपती याचा अर्थ श्रीपती. श्रीअनंतपूर अशा अर्थाचे हे गावाचे नाव. दक्षिणेत तिरुअनंतपुरम असे लिहिले जाते. शेवटी ‘पूर’चे संस्कृत ‘पुरम’ झाल्यामुळे ‘पु’ला पहिला उकार येतो, हे लक्षात ठेवावे.
चंडीगड - उत्तरेकडे हिंदीत ‘गड’ हा शब्द ‘गढ’ असा लिहिला जातो. त्यामुळे तेथे ज्या ज्या शहरांच्या शेवटी ‘गढ’ आहे ते सर्व शब्द मराठीत ‘गड’ असे लिहिण्याचा वृत्तपत्रीय संकेत आहे. त्यामुळे चंडीगड असे लिहिणे योग्य. त्याचप्रमाणे अलिगड, चित्तोडगड, राजगड अशी नावे लिहिणे योग्य.
लखनौ - हे नाव हिंदीत ‘लखनऊ’ असे लिहिले जात असले, तरी मराठीत ते ‘लखनौ’ असे लिहिण्याचा प्रघात आहे.
आग्रा - हे नाव हिंदीत ‘आगरा’ असे लिहिले जात असले, तरी मराठीत ते ‘आग्रा’ असेच लिहिण्याचा प्रघात आहे.
(जाता जाता... चेन्नई, कोलकाता व मुंबई या शहरांची नावे आता बदलली असली, तरी तेथील उच्च न्यायालयांची नावे अद्याप बदललेली नाहीत. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय असेच लिहावे. मात्र, मुंबईपुरता मराठी वृत्तपत्रांनी अपवाद केला आहे. आपण मराठीत बॉम्बे उच्च न्यायालय न म्हणता, मुंबई उच्च न्यायालयच म्हणतो.)
५. महाराष्ट्रातील गावे....
पूर - पुरात हा उल्लेख वर आलाच आहे. पूर्वी ज्या गावांच्या नावात ‘गाव’ आहे ते लिहिताना ‘गांव’ असं ‘गा’वर अनुस्वार देऊन लिहिण्याची पद्धत होती. मात्र, महामंडळाने बदललेल्या नियमांनुसार आता हा अनुच्चारित अनुस्वार काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ‘जळगांव’, ‘चाळीसगांव’, ‘कोपरगांव’, ‘तळेगांव’ असे न लिहिता ‘जळगाव’, ‘चाळीसगाव’, ‘कोपरगाव’, ‘तळेगाव’ असेच लिहावे. पूर्वी छोट्या गावांमध्ये खुर्द व बुद्रुक असत. एकाच नावाच्या दोन गावांमधले मोठे गाव म्हणजे बुद्रुक, तर (शक्यतो नदीपलीकडले) छोटे गाव म्हणजे खुर्द. अजूनही अनेक गावांसमोर खुर्द व बुद्रुक लिहिलेले असते. पूर्वी ‘खु।।‘ अशा पद्धतीने दोन दंड देऊन लिहिण्याची पद्धत होती. आता शक्यतो पूर्ण खुर्द व बुद्रुक लिहावे, असा संकेत आहे.
---
---

भाग १०
----------

१. ‘ऋ’ या स्वराबद्दल...
व्यंजनात हा स्वर मिसळून झालेले व्यंजनाचे रूप आपण अनेक शब्दांत वापरत असतो.
उदा. क् + ऋ = कृ (कृपा, कृती इ.)
ग् + ऋ = गृ (गृह, जागृती इ.)
स्वर मिसळून तयार झालेली अक्षरे -
क् + ऋ = कृपा
त् +ऋ = तृप्ती
स् + ऋ = सृष्टी
ब् + ऋ = बृहस्पती
व्यंजन जोडून तयार झालेली अक्षरे -
क् + रू = क्रूर
त् + रू = त्रुटी
श् + रू = अश्रू
‘ऋ’ आणि ‘ऊ’ या स्वरांच्या उच्चारांमध्ये फरक आहे. ‘उ/ऊ’चा उच्चार स्वच्छ, खणखणीत होतो. ‘ऋ’चा उच्चार मात्र ‘उ’ आणि ‘इ’ यांच्या मध्ये कुठे तरी असतो. किंबहुना तो ‘इ’च्या दिशेलाच अधिक झुकलेला असतो. बोलीभाषांमध्ये त्याचे जे रूप होते, त्यावरून हे स्पष्ट होते. तिथे ‘शृंग’चे ‘शिंग’ असे होते; ‘शुंग’ होत नाही. ‘शृंगार’चे ‘शिणगार’ किंवा ‘शिंगार’ होते; ‘शुणगार’ होत नाही. ‘कृपा’चे किरपा होते; ‘कुरपा’ होत नाही.

२. ऐ आणि औ : मराठी उच्चार आणि हिंदी उच्चार
‘ऐ’ या स्वराच्या उच्चाराची फोड अ + इ अशी होते.
उदा. ‘बैल’ हा शब्द मराठीत आपण ब + इ + ल असा उच्चारतो.
‘औ’ या स्वराच्या उच्चाराची फोड अ + उ अशी होते.
उदा. ‘गौरी’ हा शब्द आपण मराठीत ग + उ + री असा उच्चारतो.
त्यामुळे हिंदीप्रमाणे बॅल, गॉरी असे उच्चार करू नयेत. लेखन योग्य केले आणि त्या शब्दांची फोड नीट लक्षात घेतली, की उच्चारही चुकत नाहीत, हे लक्षात ठेवावे.

३. माझी मदत कर... मी तुझे धन्यवाद करतो
मराठीवर हिंदीचा प्रभाव वाढत चालल्याचे मालिकांमधील संवादांमधून स्पष्टपणे लक्षात येते. ‘तू माझी मदत करशील का?’ असे वाक्य अनेकदा कानावर येते. मराठी व्याकरणाच्या दृष्टीने हे वाक्य सपशेल चुकीचे आहे. मराठीत ‘तू मला मदत कर’ असे म्हणतात. ‘माझी मदत कर’ हे ‘मेरी मदद करो’ या हिंदी वाक्याचे सरळसरळ रूपांतर आहे. हिंदी वाक्य बरोबर असले, तरी त्याचे हे शब्दश: भाषांतर मात्र बरोबर नाही. तिथे ‘तू मला मदत कर’ असेच म्हणायला हवे. त्याचप्रमाणे ‘तू माझी मदत केल्याबद्दल तुझे धन्यवाद’ हेही चूकच. ‘मला मदत केल्याबद्दल तुला धन्यवाद’ असे ते वाक्य हवे. खरं तर नुसते ‘धन्यवाद’ही पुरेसे आहेत.
याबरोबरच ‘कार्यक्रम संपन्न झाला’ अशी वाक्यरचना अनेकदा आढळते. मराठीत ‘संपन्न’ याचा अर्थ ‘समृद्ध’ असा होतो. त्यामुळे ‘कार्यक्रम झाला’ किंवा पार पडला एवढेचे पुरेसे आहे.

४. हिंदी/इंग्रजी शब्दांना पर्याय
इतर भाषांमधून आलेले शब्द घेत घेतच कुठलीही भाषा वाढत असते. म्हणूनच भाषेला नेहमी नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. असे असले, तरी आपल्या भाषेत योग्य शब्द असतानाही केवळ ते माहिती नाहीत, म्हणून इतर भाषांमधले शब्द उसने घेऊन वापरणे हे म्हणजे आपले घर धनधान्याने भरलेले असतानाही शेजारच्यांकडे जाऊन जेवण्यासारखे आहे.
हिंदी किंवा इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून नेहमी वापरता येण्यासारखे मराठी शब्द -
मौका - संधी, आयाम/ डायमेन्शन - मिती, टेन्शन - तणाव, मौसम - हवामान, हमेशा - नेहमी, बोअर - कंटाळा, समारोह - सोहळा किंवा समारंभ, विमोचन - प्रकाशन इ.

५. नेहमी चुकणारे आणखी काही शब्द
शीला व कोनशिला - पहिला शब्द शीला हे एक विशेषनाम आहे व ते शील या संस्कृत शब्दापासून तयार झाले आहे.
‘कोनशिला बसविली’ असे आपण नेहमी बातम्यांमध्ये वाचतो. यात ‘शिला’ हा वेगळा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ शिळा (मोठा दगड) असा होतो. त्यामुळे ‘कोनशिला’ या शब्दात ‘श’ला पहिली वेलांटी देणे योग्य, हे लक्षात ठेवावे.
शीर व शिर -
पहिला शब्द ‘शीर’ याचा अर्थ नस किंवा शरीरातील रक्तवाहिनी. ‘त्याला शिरेतून इंजेक्शन दिले’ असे वाक्य आपण वाचले असेल. यातल्या ‘श’ला कायम दुसरी वेलांटी असते.
‘शिर’ या शब्दाचा अर्थ मस्तक, डोके असा होतो. ‘खून झालेल्या व्यक्तीचे शिर जागेवर नव्हते’ असा उल्लेख बातम्यांत आपण वाचतो. तेथे ‘शिर’ असाच शब्द लिहिणे अपेक्षित आहे. यात ‘श’ला कायम पहिली वेलांटी असते हे लक्षात ठेवावे.
‘ईश’ प्रत्यय लागून तयार होणारी विशेषनामे
उदा. गिरीश, रमेश, हरीश, सुरेश इ.
यात शेवटचे अक्षर कायम शहामृगामधला ‘श’ असते, हे लक्षात ठेवावे. गिरीश हे शंकराचे नाव. गिरी + ईश = गिरीश. रमेश हे विष्णूचे नाव. रमा + ईश = रमेश. यात ‘ईश’ हा शब्द असल्याने व त्यात ‘श’ शहामृगाचा असल्याने या सर्व शब्दांच्या शेवटी ‘श’ येते; ‘ष’ नव्हे, हे लक्षात ठेवावे.
विशेष नोंद - शिरीष या शब्दात शेवटी षटकोनातील ‘ष’ येतो. याचे कारण तो शब्द ‘ईश’ प्रत्यय लागून तयार झालेला शब्द नसून, स्वतंत्र शब्द आहे. शिरीष हे एका वृक्षाचे नाव आहे. ते स्त्री व पुरुष अशा दोघांनाही ठेवले जाते.
उदा. शिरीष पै (आचार्य अत्रे यांच्या कन्या) व शिरीष कणेकर (प्रसिद्ध लेखक).
सुहास, किरण ही अशीच आणखी काही उदाहरणे.
---
---

भाग ११
----------

विरामचिन्हे

मराठीत किंवा कुठल्याही भाषेत वाक्यांमधील विविध भाव, अर्थ, ठेहराव आदी दर्शविण्यासाठी विरामचिन्हे वापरतात. विरामचिन्हांना व्याकरणकर्त्यांनी भाषेचे दागिने म्हटलं आहे. अंगावर दागिने नसलेल्या स्त्रीपेक्षा सालंकृत स्त्री सुंदर दिसते. त्याचप्रमाणे योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करून लिहिलेला मजकूर केवळ नीटनेटका दिसतो, असं नाही, तर तो वाचकाला त्या मजकुराचा अर्थ समजण्यासाठी मदत करतो.
विरामचिन्हे नसलेले वाक्य पाहा -
आवडले का तुला हे पुस्तक हो जेवल्यावर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे नील म्हणाला वडील म्हणाले रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक
विरामचिन्हे असलेले वाक्य पाहा -
“आवडले का तुला हे पुस्तक?“
“हो! जेवल्यावर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,” नील म्हणाला.
वडील म्हणाले, “रामायण कुणी लिहिले, आहे का तुला ठाऊक?”
वरील दोन्ही वाक्ये वाचल्यानंतर विरामचिन्हांचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.
मराठीत आपण एकूण नऊ विरामचिन्हे वापरतो.
१. पूर्णविराम (.) - अ) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्णविराम वापरतात. उदाहरण - तो घरी गेला.
आ) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी. उदाहरण - य. गो. जोशी
२. अर्धविराम { ; } - दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडायची असतील, तेव्हा हे चिन्ह वापरतात. हल्ली या चिन्हाचा वापर फार कमी होताना दिसतो. मात्र, वाक्यांतून नेमका अर्थ पोचविण्यासाठी हे चिन्ह जरूर वापरावे.
उदाहरण - ढग खूप गर्जत होते; पण पाऊस पडला नाही.
३. स्वल्पविराम (,) - अ) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. उदाहरण - हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात.
आ) संबोधन दर्शविताना स्वल्पविराम वापरतात. उदाहरण - नील, इकडे ये.
स्वल्पविराम चुकीच्या ठिकाणी देण्याने भलते गोंधळ होऊ शकतात. याबाबतचे विनोदही प्रसिद्ध आहेत. जिज्ञासूंनी ’गुगल’ करून पाहावेत.
४. अपूर्ण विराम किंवा उपपूर्णविराम { : } - वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण - पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले : १, ८, १४, २७, ४०.
{ : } हे चिन्ह विसर्गाचेही चिन्ह आहे. दोन्ही चिन्हे एकच आहेत. मात्र, अपूर्ण विराम म्हणून या चिन्हाचा वापर केवळ वरील उदाहरणात दिली तशी माहिती द्यायची असेल, तरच करावा.
५. प्रश्नचिन्ह (?) - प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरण - तू केव्हा आलास?
महत्त्वाचे म्हणजे हे प्रश्नचिन्ह अक्षराला जोडूनच देतात. मध्ये स्पेस देऊन पुढे प्रश्नचिन्ह देऊ नये.
बातमी लिहिताना अनेकदा ‘मग पाच वर्षांचा हिशेब तुम्ही केव्हा देणार? असा सवाल करून...’ अशी वाक्यरचना दिसते. ती चुकीची आहे. पुढे ‘असा सवाल करून’ असे म्हटले असेल, तर त्याआधी प्रश्नचिन्ह न येता, स्वल्पविराम द्यायला हवा. त्यामुळे हे वाक्य ‘मग पाच वर्षांचा हिशेब तुम्ही केव्हा देणार, असा सवाल करून...’ असे लिहिणे योग्य. कधी कधी वाक्यात एकापाठोपाठ एक प्रश्न असतात. त्यात शेवटी पुन्हा ‘असे प्रश्न उपस्थित करून...’ असे लिहिले असेल, तरीही त्या प्रत्येक प्रश्नासमोर प्रश्नचिन्ह न येता, स्वल्पविरामच देणे योग्य. मात्र, शेवटी ‘असा सवाल करून’ किंवा ‘असे प्रश्न उपस्थित करून’ अशा शब्दांत वर्णन नसेल व वाक्य प्रश्नार्थक संपत असेल, तर तिथे प्रश्नचिन्ह द्यायला हवे.
उदाहरण - ‘शहरात सगळीकडे खड्डे पडले आहेत,’ अशी टीका करून ते म्हणाले, ‘यावर दाद मागण्यासाठी नागरिकांनी जायचे कुठे?’
इथे ‘कुठे’च्या समोर प्रश्नचिन्ह देणे योग्य होय.
बातमीव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या लेखनालाही हेच नियम लागू होतात.
६. उद्गारचिन्ह (!) - उत्कट भावना दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह देण्याची पद्धत आहे. उदाहरण -
अ) अरेरे! तो नापास झाला. आ) शाब्बास! छान खेळलास. इ) वाहव्वा‌! काय तान घेतलीय!
हल्ली उठसूठ उद्गारचिन्ह टाकून मजकूर लिहिण्याची सवय अनेकांना असते. आपले वैयक्तिक लेखन करताना किती उत्कटपणा दाखवावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी बातमी किंवा अन्य माहितीपर प्रमाणलेखन करताना नियमानुसारच हे चिन्ह वापरावे. हा ‘दागिना’ मोजक्याच ठिकाणी खुलून दिसतो, हे लक्षात ठेवावे. प्रश्नचिन्हाप्रमाणेच उद्गारचिन्हही अक्षराला जोडूनच लिहावे. मध्ये स्पेस देऊन लिहू नये.
७. अवतरणचिन्हे (“ ”) - अ) दुहेरी अवतरणचिन्ह - बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी त्या वाक्याच्या दोन्ही बाजूस दुहेरी अवतरण देतात. उदाहरण - तो म्हणाला, “मी गाण्याच्या कार्यक्रमाला येईन.”
महत्त्वाचे - एखादे वाक्य अपूर्ण असेल, तर आधी स्वल्पविराम येतो व मग दुहेरी अवतरणचिन्ह येते, हे लक्षात ठेवावे.
उदाहरण - “देव वरून पाहतोय,” असे म्हणून संदेश त्राग्याने म्हणाला, “सगळ्याचा हिशेब देवाकडे द्यावा लागेल.”
आ) एकेरी अवतरणचिन्ह - एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण वापरतात. एखाद्या शब्दातून वेगळा अर्थ ध्वनित करायचा असेल, तरीही एकेरी अवतरणचिन्ह वापरतात.
उदाहरण - अ) पुणे ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. आ) ‘भारतीयांची परदेशांतील वागणूक लज्जास्पद असते,’ असे मत मध्यंतरी टीव्हीवरील चर्चेत ऐकायला मिळाले होते. इ) संध्याकाळी वाहतूक कोंडीच्या वेळी दुचाकीचालकांची ‘सर्कस’ चालू असते.
८. संयोगचिन्ह (-) - अ) दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरतात. उदाहरण - विद्यार्थि-मंडळ, वधू-वर, आदान-प्रदान इ.
आ) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह देतात. उदाहरण - आजचा कार्यक्रम शाळे-
पुढील पटांगणावर होईल.
(विशेष नोंद - पूर्वी खिळेजुळणीच्या काळी हे चिन्ह देण्याची गरज भासत असे. आता संगणकावर टंकलेखन होत असल्याने या चिन्हाची आवश्यकता पडत नाही. इथे केवळ माहितीस्तव उदाहरण दिले आहे.)
९. अपसारणचिन्ह (-) (डॅश) (स्पष्टीकरण चिन्ह) - अ) बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण - मी तेथे गेलो, पण -
आ) वाक्यादरम्यान स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरण - तो मुलगा - ज्याने बक्षीस मिळविले - आपल्या शाळेत आहे.
---
(माहितीस्रोत : मो. रा. वाळंबे लिखित ‘सुगम मराठी व्याकरण लेखन’, नितीन प्रकाशन, पुणे)
---

भाग १२
----------

१. अनुस्वार
अ) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो, त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा.
थोडक्यात, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ : आंबा, तंतू, घंटा, हिंग, सुंठ, गंमत, करंजी, गुलकंद, गंगा, कुंकू, तंटा, चिंच, उंट, निबंध, अलंकार
आ) संस्कृतमध्ये मराठीत जसेच्या तसे आलेल्या (तत्सम) शब्दांतील अनुस्वार पर-सवर्णाने (म्हणजे पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने *) लिहायला हरकत नाही.
उदाहरणार्थ : कुंज - कुञ्ज, घंटा - घण्टा, अंत - अन्त, चंपक - चम्पक, शंख - शंङ्ख, पंचम - पञ्चम, चंड - चण्ड, छंद - छन्द, अंबुज - अम्बुज
(* पंचमवर्ण -
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
वरील पाच गटांत ‘क ख ग घ’ या व्यंजन गटासाठी ङ हा पंचमवर्ण आहे व याप्रमाणे अन्य)
इ) य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल संस्कृतातल्याप्रमाणे केवळ शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ -
संयम, संरक्षण, संलग्न, संवाद, संशय, संसार, सिंंह, अंश, संस्कार, मांस, संस्था, संहार, संयुक्त, कंस इ.
ई) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
एकवचन - मुलास, घरात, त्याचा, देशासाठी
अनेकवचन - मुलांस, घरांत, त्यांचा, देशांसाठी
उ) वरील नियमांव्यक्तिरिक्त आता कुठेही अनुस्वार देऊ नयेत. अनुच्चारित अनुस्वार पूर्वीच्या प्रमाणात देत असत, हे आता देऊ नयेत.
उदा. पहांट, केंस, झोंप, लांकूड, नांव, पांच, कांटा, सांवळा, केंळे, तिनें, घरांत, जेथें, तेव्हां असे लिहू नये. त्याऐवजी पहाट, केस, झोप, लाकूड, नाव, पाच, काटा, सावळा, केळे, तिने, घरात, जेथे, तेव्हा असे लिहिणे योग्य.

२) इतर नियम
अ) एकारान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त करावे.
उदा. करणे - करण्यासाठी, पाहणे - पाहण्यास, भावे - भाव्यांचा, फडके - फडक्यांना
(करणेसाठी, पाहणेस, भावेंचा, फडकेंना अशी रूपे लिहू नयेत.)
बातमी लिहिताना काही गावांबाबत असे चुकीचे लेखन केले जाते. अकोले, शिवणे, बांबवडे, नेवासे अशी एकारान्त गावे चुकीच्या सामान्यरूपाला बळी पडली आहेत. त्यामुळे अनेकदा ‘अकोलेत जोरदार पाऊस’, ‘शिवणेत उद्या मोर्चा’, ‘बांबवडेत रस्ता खचला’, ‘नेवासेत दर्शनाला गर्दी’ अशी शीर्षके पाहायला मिळतात. ती चूक आहेत. आपण ‘पुणेत जोरदार पाऊस’, ‘ठाणेत वाहतूक कोंडी’ असं लिहितो का? नाही ना! ‘पुण्यात जोरदार पाऊस’, ‘ठाण्यात वाहतूक कोंडी’ असेच लिहितो ना! मग तोच न्याय अकोले, शिवणे, बांबवडे, नेवासे या गावांनाही लावावा. ‘अकोल्यात जोरदार पाऊस’, ‘शिवण्यात उद्या मोर्चा’, ‘बांबवड्यात रस्ता खचला’, ‘नेवाशात दर्शनाला गर्दी’ अशा पद्धतीनेच ही शीर्षके दिली पाहिजेत.
आ) एखादा, कोणता अशी रूपे वापरावीत. एकादा, कोणचा असे लिहू नये.
इ) राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे लिहावीत. रहाणे-राहाणे, पहाणे-पाहाणे, वहाणे-वाहाणे अशी रूपे लिहू नयेत.
मात्र, आज्ञार्थी रूपे लिहिताना ‘राहा, पाहा, वाहा’ यांबरोबरच ‘रहा, पहा, वहा’ ही रूपे लिहिण्यास हरकत नाही.
ई) ‘ही’ हे शब्दयोगी अव्यय दीर्घान्त लिहावे. ‘आणि’ हे शब्दयोगी अव्यय ऱ्हस्वान्त लिहावे.

३) नेहमी चुकणारे आणखी काही शब्द
आधी चुकीचे लेखन व समोर अचूक लेखन या क्रमाने वाचावे.
मंदीर - मंदिर,
रविंद्र - रवींद्र,
सुशिला सुशीला,
नाविन्य - नावीन्य,
प्राविण्य - प्रावीण्य,
प्रतिक्षा - प्रतीक्षा,
उहापोह - ऊहापोह,
उर्मी - ऊर्मी,
अंध:कार - अंधकार,
घन:श्याम - घनश्याम,
धि:कार - धिक्कार,
निस्पृह - नि:स्पृह,
पृथ:करण - पृथक्करण,
मातोश्री - मातु:श्री,
मनस्थिती - मन:स्थिती,
हाहा:कार - हाहाकार,
विषद - विशद,
सुश्रुषा - शुश्रूषा,
विशिष्ठ - विशिष्ट,
अलिकडे - अलीकडे,
औद्योगीकरण - उद्योगीकरण,
अश्या - अशा,
सहाय्यक - सहायक,
आधीन - अधीन,
ईयत्ता - इयत्ता,
ऊग्र - उग्र,
दुर्वा - दूर्वा

४) हिंदीच्या प्रभावाने वापरले जाणारे शब्द
‘व्यस्त’ हा हिंदी शब्द आपल्याकडे एखादा माणूस बिझी आहे, अशा अर्थानं वापरला जातो. ते चूक आहे. त्यासाठी ‘व्यग्र’ असा शब्द आहे. ‘मी कामात व्यस्त आहे,’ असे लिहिण्याऐवजी ‘मी कामात व्यग्र आहे,’ असेच लिहावे. ‘व्यस्त’ या शब्दाचा मराठीतील अर्थ आहे उलट प्रमाण. व्यस्त गुणोत्तर असा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल.
---
---