30 Nov 2019

चिंतन आदेश दिवाळी २०१९ - लेख

जीवन त्यांना कळले हो...
-----------------------------


माणूस जन्माला आल्यापासून कुणाच्या ना कुणाच्या तरी प्रभावाखाली वाढत असतो. कुणाच्याही प्रभावापासून मुक्त असा माणूस मिळणं कठीणच. आपल्यावर सगळ्यांत आधी आपल्या आईचा व नंतर वडिलांचा प्रभाव पडत असतो. अगदी सुरुवातीपासून याच दोन व्यक्ती आपल्याबरोबर असतात. हे रक्ताचं नातं असल्यानं तो प्रभाव शारीरिक व मानसिक असा दोन्ही पद्धतींनी होतो. नंतर महत्त्वाचा प्रभाव पडतो तो आपल्या भावंडांचा. त्यातही मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांचा प्रभाव जास्त पडतो. अनेकांच्या आयुष्यात आई-वडिलांच्या जोडीनं त्यांच्या मोठ्या भावाचा किंवा बहिणीचा प्रभाव महत्त्वाचा असल्याचं दिसून येतं. सचिन तेंडुलकर व त्याचा मोठा भाऊ अजित हे याचं ठळक उदाहरण सांगता येईल. सख्ख्या भावंडांनंतर मग चुलत, मामे, मावस अशी भावंडं, त्यानंतर काका, मामा, मावशी, आत्या, काकू, मामी अशी नाती येतात. हे सगळे लोक अगदी लहानपणापासून आपल्यासोबत असल्यानं त्यांच्यापैकी कु णाचा तरी प्रभाव आपल्यावर पडणं अगदी सहज शक्य असतं. यातल्या कुणाला तरी वाचनाची आवड असते, कुणाला वाद्य वाजविण्याचा छंद असतो, तर कुणाला भटकंतीचा... या सगळ्यांचा आपल्यावर कळत-नकळत प्रभाव पडत असतो. त्यानंतर आपल्या आयुष्यात येणारी महत्त्वाची प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आपले गुरू, शिक्षक. अनेकांच्या आयुष्यात शिक्षकांचा वाटा फार महत्त्वाचा असतो. शिक्षक अनेक विद्यार्थ्यांचं जीवन अक्षरशः 'घडवत' असतात. शाळेतले, महाविद्यालयांतले सर्व शिक्षक आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत असतात. याशिवाय आपण आयुष्यात ज्यांना कधीही भेटलो नाही, अशा व्यक्तींचाही प्रभाव आपल्यावर पडू शकतो. यात इतिहासातील व्यक्तिरेखा असतात, तसेच आपल्या जन्मापूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीही असतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत आणि अल्बर्ट आइन्स्टाइनपासून ते महात्मा गांधींपर्यंत हजारो व्यक्तिश्रेष्ठ येऊ शकतात. याशिवाय आपल्या काळातच वावरणाऱ्या, पण आपण त्यांना कधीही भेटू शकू अशी शक्यता नसलेल्याही व्यक्ती आपल्यावर प्रभाव पाडत असतात. यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, सुनील गावसकर अशांची नावे सांगता येतील. काही जणांचं आयुष्य अगदी वेगळं, विलक्षण असतं. अशा व्यक्तींचे अनुभव ऐकून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. तसं जगावंसं वाटतं. अशा व्यक्तींच्या जीवनशैलीचाही आपल्यावर नकळत प्रभाव पडतो.
माझ्या आयुष्यावर वर उल्लेख केलेल्या प्रत्येक घटकाचा कमी-अधिक प्रभाव पडला आहे. आई-वडील, लहानपणीचे शिक्षक हे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे गुरू व प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती असतातच. त्यामुळे मी ते गृहीत धरूनच पुढे लिहितो. आमच्या गावी एक उत्तम दर्जाचं वाचनालय होतं. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची गोडी लागली. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं 'महाराज' हे पुस्तक वाचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी कुतूहल निर्माण झालं. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्रात होऊन गेलं, याचा अभिमान दाटून आला. पुढं महाराजांविषयी विपुल लेखन वाचण्यात आलं. या आभाळाएवढ्या माणसाबद्दलचा आदर वाढतच गेला. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एवढा विलक्षण होता, की त्यांच्या जीवनातले एकेक पैलू समजून स्तिमित व्हायला होतं. अजूनही कुठल्याही किल्ल्यावर, गडावर गेलो, की तिथल्या मातीला महाराजांचे चरणस्पर्श झाले असतील, या भावनेनं ऊर दाटून येतो. सिंधुदुर्ग किल्ल्यात महाराजांची पावलं बघून असेच डोळे भरून आले होते. मायमाउलीसारखी रयतेची काळजी घेणारा हा राजा केवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आयुष्य झुंजला, हे बघून मी सदैव नतमस्तक होतो. माणसांची अचूक पारख, जीवाला जीव देणारा दिलदार स्वभाव, प्रसंगी दोन पावलं माघार घेण्याचं चातुर्य आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आईचं स्वप्न साकार करण्यासाठी तळहातावर शिर घेऊन उभ्या आयुष्याचीच केलेली झुंज या सगळ्याच गोष्टींमुळं महाराज मोठे झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कायम आहे आणि राहील.
पुढं पुस्तकं वाचत असताना अनेक लेखकांच्या लिखाणाने प्रेरित झालो. पण माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो विनोदी वाङ्मयाचा. यात चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार अशा अनेक लेखकांचे नाव सांगता येईल.
पण त्यातही माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव कुणा एका व्यक्तीचा पडला असेल, तर तो पु. ल. देशपांडे यांचा. केवळ लेखक पुलं नव्हेत, तर पुलंच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचाच तो प्रभाव होता. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रच पुलंच्या प्रेमात होता व त्यांना 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असं बिरुदही लाभलं होतं. तेव्हा माझ्यावरचा प्रभाव फार काही वेगळा म्हणता यायचा नाही. पण हा प्रभाव कसा पडत गेला, याची थोडी चिकित्सा जरूर करता येईल.
पुलंची पुस्तकं वाचताना सर्वांत प्रथम लक्षात आली ती एक गोष्ट. त्यांचं बहुतांश लेखन हे कथा किंवा कादंबरी या स्वरूपात नव्हतं. म्हणजे एका साच्यातील काल्पनिकता त्यांच्या लिखाणात नव्हती. त्यांनी जे जे लिहिलं, त्याला वास्तव जगण्याचा एक अदृश्य धागा सदैव गुंफलेला जाणवायचा. त्यामुळंच मुंबईसारख्या शहरात किंवा चाळीत कधीही न राहिलेल्या माझ्यासारख्या मुलाला 'बटाट्याची चाळ'ही भिडली. कल्पनेच्या जगात त्यांनी नेलं, पण ते अशा स्वरूपात! 'अपूर्वाई' व 'पूर्वरंग' हा कित्येक मराठी माणसांनी केलेला पहिला परदेश प्रवास होता. त्याआधी मराठी साहित्यिक परदेशांत गेले नव्हते, असं नाही. पण पुलंनी स्वतःबरोबर आम्हाला तिथं साक्षात फिरवून आणलं. त्यामुळं सुमारे ५०-५५ वर्षांनीही पुलंच्याच या लिखाणाचे संदर्भ संबंधित देशात कुणी गेला तरी आजही लिहिले जातात. 'व्यक्ती आणि वल्ली'सारखं पुलंचं अजरामर पुस्तक फार लहान वयात वाचल्यानं माणसं समजायला मदत झाली. जगात किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात आणि त्यांच्यात किती वैविध्य असतं हे पुलंचं लिखाण वाचूनच समजलं. नंतर वय वाढत गेलं, तसं पुलंनी केलेलं गंभीर लेखनही वाचलं. त्यांचे सिनेमे पाहिले, त्यांनी लिहिलेली नाटकं पाहिली, त्यांच्या गाजलेल्या एकपात्री प्रयोगांच्या चित्रफिती नंतर पाहायला मिळाल्या. हे सगळं बघून या माणसाच्या अष्टपैलुत्वाची नव्यानं ओळख घडत गेली. सुनीताबाईंचं 'आहे मनोहर तरी...' हे पुस्तक वाचल्यावर सुरुवातीला सुनीताबाईंचा राग आला होता. पण वयाची प्रगल्भता आल्यानंतर त्या लेखनाचंही मोल कळलं.
मी दहावीत असताना याच पुलप्रेमातून त्यांना पोस्टकार्ड पाठविण्याचं धाडस मी केलं होतं. महिनाभरानं त्यांचं चक्क उत्तर आलं, तेव्हा मला गगन ठेंगणं झालं. मग मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो, तेही त्यांना कळवलं. त्यावर त्यांचं अभिनंदनाचं उत्तर आलं. आता तर मला हर्षवायूच व्हायचा बाकी राहिला होता. पुलंचे ते आशीर्वाद घेऊन मी पुण्यात पुढील शिक्षणासाठी दाखल झालो. एके दिवशी रस्त्यावरच्या फोन बूथवरून थेट त्यांच्या घरी फोन लावला. फोन सुनीताबाईंनी उचलला. 'मला भाईकाकांशी बोलायचंय' असं मी चाचरत चाचरत म्हटलं. थोड्या वेळानं साक्षात पुलं फोनवर आले. त्यांनी माझी अगदी हळुवार आवाजात चौकशी केली. मी कुठं शिकतो, काय करतो विचारलं. मी त्यांना सांगितलं, की मला तुमचं साहित्य आवडतं. त्यावर त्यांनी 'काय आवडलं नेमकं' असं विचारलं. मला उत्तर सुचेना. मग मी 'सगळंच आवडतं' असं ठोकून दिलं. एका हातात रुपयाची आणखी दोन कॉइन धरून मी उभा होतो. युनिव्हर्सिटी रोडवरच्या वर्दळीचा आवाज एका बाजूनं मोठमोठ्यानं येत होता. आणि मी रिसीव्हरला लावलेल्या कानात प्राण आणून माझ्या परमदैवताचं बोलणं ऐकत होतं. हे सगळं बोलणं मिनिटा-दीड मिनिटांचं झालं असेल. नंतर त्यांनी हळुवारपणे 'आता मी ठेवतो हं फोन' असं सांगून फोन बंद केला. त्या वेळी पुलंचं वय ७२-७३ असावं. ते खरोखर थकले होते. त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर पूर्ण थांबला होता. त्यानंतर मी पुलंना आणखी दोन पत्रं पाठवली. त्याचीही त्यांनी उत्तरं पाठविली. पण पहिल्या पत्रातला मजकूर आता हळूहळू कमी होत गेला होता. अक्षरांतील थरथर वाढली होती. माझ्या आवडत्या लेखकाची ही शारीरिक विकलता मला सहन झाली नाही. मी नंतर त्यांना पत्रं लिहिणं थांबवलं. त्यांना प्रत्यक्ष भेटायला जायची फार इच्छा होती. पण ते कधी जमलं नाही. त्या काळात ते मुळातच खूप थकले होते. सुनीताबाई अगदी मोजके, जवळचे लोक सोडले तर त्यांना बाहेरच्या कुणाला भेटूही देत नसत, असं ऐकू येई. मग त्या धास्तीपोटी कधी जाणं झालंच नाही. पुढं मी 'सकाळ'मध्ये उपसंपादक म्हणून काम करू लागलो. त्यानंतर वर्ष-दोन वर्षातच पुलंची तब्येत खूप खालावली व त्यांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुलंचे ते शेवटचे जवळपास आठ-पंधरा दिवस आम्ही काही पत्रकार रोज 'प्रयाग'ला जायचो. मी पुलंना प्रत्यक्ष असं तिथंच पाहिलं. साधारण दहा मीटर अंतरावरून... काचेपलीकडं एका कॉटवर ते झोपले होते व नाकावर ऑक्सिजन मास्क लावला होता. आयुष्यात रंगबिरंगी मुखवटे घालून जगभरातल्या मराठी रसिकांना सतत हसवत ठेवणाऱ्या या अवलियाचं ते तसं दर्शन मात्र मला अगदी असह्य झालं. काही दिवसांनी पुलं गेले. माझ्या ऑफिसमध्ये मला ही बातमी कळली. चारचौघांत रडण्याची एक मध्यमवर्गीय, घाबरट भीती मनात होती. मग ऑफिसबाहेर आलो. शनिवारवाड्याच्या कॉर्नरवरून घरी जाताना अश्रूंचा बांध फुटला. मनसोक्त रडलो. वास्तविक ते जाणार हे जवळपास स्पष्टच झालं होतं. पण तरीही 'ते आहेत' ही गोष्ट समाधान देणारी होती. आता 'ते नाहीत' ही बाब झेपत नव्हती. माझ्या घरात तोपर्यंत माझ्या आजोबांचे व आजीचे मृत्यू मी पाहिले होते. त्यानंतर एवढे अश्रू कुणासाठीही वाहिले नाहीत. ते वाहिले फक्त पुलंसाठी. पुलं शरीरानं नसले तरी त्यांच्या पुस्तकांच्या, चित्रफितींच्या किंवा चित्रपटांच्या, नाटकांच्या रूपानं आपल्यातच आहेत, याची जाणीव नंतर होऊ लागली आणि खूप दिलासा मिळाला. पुढं मी लिहायला लागलो. सदरं लिहिली, चित्रपट परीक्षणं लिहिली, पुस्तकं लिहिली. कुणी कुणी म्हणायचं, तुझ्या लिखाणावर पुलंचा प्रभाव दिसतो. मला आतून बरं वाटायचं. पण नंतर लक्षात यायचं, आपण नकळत त्यांची नक्कल करतो आहोत का? नक्कल करून आपली स्वतःची शैली विकसित होणार नाही. मग प्रयत्नपूर्वक त्या प्रभावापासून दूर जाण्याचा प्रयत्न (फक्त लेखनापुरता) करायला लागलो. मात्र, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वानं माझ्यावर घातलेली मोहिनी कायमच आहे व राहील.
पुलंनी मला काय दिलं, असा विचार करायला लागलो, तर एखाद्या कॅलिडोस्कोपमधून पाहावं तसे त्यांनी आपल्या जगण्याला दिलेले विविध रंग व आकार दिसू लागतात. मी गेल्या वर्षी लिहिलेलं 'थ्री चीअर्स' हे विनोदी लेखांचा संग्रह असलेलं पुस्तक पुलंनाच अर्पण केलंय. त्यांच्या जन्मशताब्दीत हा योग यावा, हे मला फार मोठं भाग्य वाटतं. या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात मी पुलंनी माझ्यावर केलेल्या गारूडाबद्दल लिहिलंय. त्याचा थोडा भाग इथं सांगणं औचित्याचं होईल, असं वाटतं. मी लिहिलंय -

'पुलंनी महाराष्ट्राला निर्मळपणे हसायला शिकवलं. पुलंच्या आधी विनोद नव्हता, असं नाही. मात्र, पुलंनी त्यांच्या आनंदयात्रेसारख्या जगण्यातून हा विनोद नीट समजावून सांगितला. जगण्याकडं पाहण्याची एक अतिशय स्वच्छ, निरोगी दृष्टी दिली. आयुष्य भरभरून जगायला लावणारा मूलमंत्र दिला. खूप लहानपणापासून पु. लं.चं वाचत गेलो आणि जगणं उमगत गेलं. विनोद हा त्यांच्या जगण्यातला केवळ एक भाग होता, हेही कळलं. त्यांची संगीताची आवड, त्यांच्यातला खेळिया, अवलिया चित्रकर्मी, प्रतिभावान रंगकर्मी, कुशल दिग्दर्शक, वक्ता, दाता असे अनेक पैलू नंतर उलगडत गेले आणि या व्यक्तिमत्त्वाविषयीचा आदर वाढतच गेला. एक माणूस आपल्या उण्यापुऱ्या ८० वर्षांच्या आयुष्यात काय काय करू शकतो, याचं पुलंचं आयुष्य हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. पुलंच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन माझ्यासारखी अनेक मुलं लिहिती झाली आणि याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या अतिशय नितळ, निखळ, सात्त्विक अशा लिखाणालाच आहे, यात शंका नाही. जगण्यावर विलक्षण प्रेम असल्याशिवाय आणि माणूस म्हणून संपूर्ण विकास झाल्याशिवाय असं लिखाण कुणाच्या हातून लिहून होणार नाही. पुलंनी या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलं. जगण्याचं प्रयोजन शिकवलं, कलेचा आस्वाद कसा घ्यावा याचे धडे दिले. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं त्यांच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत जगले. पुलंचा विनोद म्हणजे केवळ शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरती करीत साधलेला विनोद नव्हता. जगण्यातली विसंगती टिपत, विसंवादातून नेमका सूर शोधण्याचं कसब त्या विनोदात होतं. त्यांचा विनोद कधीच घायाळ करीत नव्हता. उलट तो निर्विष असा विनोद होता आणि आपल्याला स्वतःवर हसायला शिकवायचा. मराठी जनांच्या मनाची मशागत करीत पु. लं.नी विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने पुलंच्या मागून विनोदाचे, आनंदाचे गाणे गात गात चालत निघाला. पुलंची ही आनंदयात्रा त्यांच्या ऐहिक अंतानंतरही सुरूच आहे. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे. पुलंच्या मागं निघालेल्या या प्रचंड दिंडीतला, आनंदयात्रेतला मी एक लहानसा वारकरी आहे, यात्रेकरू आहे. त्यांनी दाखविलेल्या सत्त्व व सत्याच्या निखळ मार्गानं वाट चालण्याचा प्रयत्न करतो आहे. या पुस्तकातले हे सगळे लेख म्हणजे या आनंदयात्रेत उधळलेला अबीर-गुलाल आहे. पु. ल. ज्या काळात जगले त्याहून आजचा काळ किती तरी वेगळा आहे. तंत्रज्ञानाची अफाट प्रगती आणि जगण्याचा वाढलेला वेग श्वास गुदमरवून टाकतो आहे. रुढी-परंपरांचे स्खलन आणि मूल्यांची घसरगुंडी रोजची झाली आहे. माणसा-माणसांतला संवाद वाढण्याऐवजी कमी होताना दिसतो आहे. कुटुंब संस्थेवर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत. अशा वातावरणात सकारात्मक भाव मनात ठेवून जगत राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मात्र, पुलंच्या लिखाणातून ही ऊर्जा आपल्याला सतत मिळत राहते. आयुष्याचा एवढा मंगलमय उत्सव साजरा करण्याऐवजी रडत बसू नका, असंच त्यांचे शब्द आपल्याला सतत सांगतात. जगणं साजरं करण्याची ही दृष्टी पुलंनी आपल्याला दिली, हे त्यांचे ऋण कुठलाही मराटी माणूस कधीच विसरू शकणार नाही.'

पुलंचा प्रभाव असा केवळ माझ्यासारख्या एका व्यक्तीवर नव्हे, तर सर्व समाजावर पडलेला आहे. या थोर व्यक्तिमत्त्वाकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. स्वतः पुलंना व्यक्तिपूजेचा तिटकारा होता. मात्र, एखाद्या माणसाच्या गुणांवर ते भरभरून प्रेम करीत. म्हणून तर 'गुण गाईन आवडी'सारखं पुस्तक ते लिहू शकले. महाराष्ट्रातल्या आनंद यादव, दया पवार यासारख्या कित्येक लेखकांना पुलंनी उजेडात आणलं. वैचारिक विचारसरणीनं ते समाजवादी होते. समाजातल्या तळागाळातल्या लोकांविषयी त्यांना आस्था होती. ही आस्था त्यांनी अनेकदा कृतीतून व्यक्त केली होती व लाखो रुपयांच्या देणग्या मुक्त हस्ते दिल्या. पुलं व सुनीताबाईंचं सहजीवनही हेवा वाटावं असं होतं. बोरकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम हे दोघं करीत, तेव्हा महाराष्ट्राचं अवघं सांस्कृतिक वैभव त्या रंगमंचावर अवतरलंय, असं वाटे. कुणी तरी या दोघांना 'महाराष्ट्राचं फर्स्ट कपल' म्हटलंय ते अगदी बरोबर आहे.
आपल्याला असं जगता यावं, असं मला फार थोड्या माणसांविषयी वाटलेलं आहे. पु. ल. हे त्यात अग्रस्थानी आहेत. वयाच्या पन्नाशीत त्यांनी बंगाली शिकायचा ध्यास घेतला म्हणून मीही ती भाषा गिरवण्याचा (अयशस्वी) प्रयत्न केला. पुलंचं मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित होण्यापलीकडं त्यातून अन्य काही निष्पन्न झालं नाही. पण एखाद्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर प्रभाव कसा आणि किती असू शकतो, हे सांगण्यासाठीच केवळ ही बाब इथं नमूद केली.
पुलंसारखा आणि त्यांच्याएवढा प्रभाव अद्याप कुणाचाच पडला नसला, तरी वयाच्या एका टप्प्यानंतर आणखीही काही लेखक आवडू लागले. त्यात गौरी देशपांडे व मिलिंद बोकील यांचा उल्लेख करावाच लागेल. या दोन्ही थोर स्त्री-पुरुषांचा माझ्यावर पुष्कळ प्रभाव पडला आहे, असं म्हणता येईल. या दोघांच्याही लेखनातून विशेषतः स्त्री व पुरुष नातेसंबंधांच्या अनेकानेक छटा उलगडत गेल्या. गौरीच्या बाबतीत तर तिच्या लेखनासोबतच तिच्या विलक्षण जगण्याचाही सदैव हेवा वाटत आला आहे. वयाच्या पस्तिशीनंतर मी हे दोन्ही लेखक वाचले, हे एका परीनं बरंच झालं. विशेषतः आपल्या एकारलेल्या, सरळसोट मध्यमवर्गीय जगण्यात गौरी किंवा बोकिलांनी लिहिलेले स्त्री-पुरुष येणं जवळपास दुरापास्तच. तसे अनुभवही गाठीला लाभणं दुर्मीळ. पण जग आपल्यासारखं सरळसोट किंवा एकारलेलं नसतंच. त्यामुळं ते समजून घेण्यासाठी या दोघांचं बोट धरणं गरजेचं होतं. ते वेळीच मिळालं. त्यामुळं स्त्रियांविषयीची माझी टिपिकल, पारंपरिक मतं बदलायला पुष्कळ उपयोग झाला. वयानुसार येणारी प्रगल्भता अनेकांच्या विचारांमध्ये परावर्तित होतेच असं नाही. मात्र, गौरी व बोकील वाचल्यानंतर माझ्या विचारांतही बदल झाला, हे मला मान्य करायला हवं. ते बदललेले विचार माझ्या पुढील लेखनातही आपोआप उतरले. त्यामुळं माझ्या जगण्यावर या दोघांचाही प्रभाव आहे, यात शंका नाही.
क्रिकेट हाही माझा आवडीचा खेळ. अगदी लहानपणापासून हा खेळ बघत आणि खेळत आलोय. क्रिकेटमध्ये माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो सुनील मनोहर गावसकर या 'लिटल मास्टर'चा. आमच्या लहानपणी घरी टीव्ही आला तेव्हा टीव्ही सुरू केल्यावर सर्वप्रथम दिसले ते हेच महाशय. सुनील हा आमचा बालपणातला हिरो होता. भारतीय क्रिकेटला सुनील गावसकरनं आत्मसन्मान दिला, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. हेल्मेट न घालता, विंडीजच्या तोफखान्यासमोर उभा राहणारी ही बटूमूर्ती आमच्या अभिमानाचा विषय होती. मला जरा कळायला लागेपर्यंत गावसकर निवृत्तही झाला होता, पण त्याचा थोडा खेळ तरी मी 'लाइव्ह' टीव्हीवर पाहिला आहे. नंतर त्यानं समालोचनात कारकीर्द केली, तीही जोरदार यशस्वी झाली आहे. 'केव्हा थांबावं याचा अचूक निर्णय घेणारा माणूस' म्हणूनही मला गावसकर प्रिय आहे. त्याला मराठीपणाचा अभिमान आहे. पण तरी त्याचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व हेवा करावा असं आहे. त्याच्या स्वभावात एक मिश्कीलपणा आहे, तो कॉमेंटरी करत असतानाही सदैव प्रत्ययास येतो. त्याच्या खेळाच्या ज्ञानाविषयी तर काही शंकाच नाही. त्यामुळंच आज सत्तरीतही तो 'आउटडेटेड' झालेला नाही, तर उत्साहानं जगभर फिरत मस्त क्रिकेट व जगणं एंजॉय करत असतो. हे मला फार आवडतं. आपलं म्हातारपण कुणासारखं जावं, तर ते गावसकरसारखं, असंच मला सतत वाटत असतं.
असाच काळावर विजय मिळविणारा आणखी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा माणूस म्हणजे अमिताभ बच्चन. विशेषतः 'सेकंड इनिंग'मधला अमिताभ मला विशेष आवडतो. अमिताभमधला एक कुटुंबवत्सल, सुसंस्कृत माणूस सर्वाधिक भावतो. आपण आयुष्याच्या उत्तरार्धात 'ग्रेस' टिकवून जगावं कसं, तर गावसकरप्रमाणेच अमिताभसारखं असं उत्तर माझं मन कायम देतं. अमिताभचं आयुष्यही विलक्षण चढ-उतारांनी भरलेलं आहे. त्यात वैयक्तिक आनंदाचे क्षण आहेत, तशीच दुःखंही आहेत. पण हा माणूस सगळ्या गोष्टींना हसतमुखानं सामोरा गेला आणि आजही किती तरी सहकारी कलाकारांपेक्षा जास्त बिझी आहे. अमिताभ 'आदर्श व यशस्वी भारतीय पुरुषा'चं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या उतारवयातील उत्साहासारखा उत्साह आपल्यालाही लाभावा, असं वाटतं, हे जास्त खरं आहे.
कवी बा. भ. बोरकर यांच्या शब्दांत सांगायचं, तर 'जीवन त्यांना कळले हो' असं ज्यांच्याविषयी खात्रीनं म्हणता येईल, अशा या सगळ्या मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाखाली जगताना, आपणही आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवावं आणि भविष्यात कुणी तरी आपल्यावरही 'माझ्यावर श्रीपाद ब्रह्मे यांचा प्रभाव आहे,' असं लिहिण्याइतपत आयुष्यात काही तरी करून दाखवावं, एवढीच इच्छा आहे.
प्रभावाच्या प्रभावाखाली एवढी अपेक्षा ठीकच म्हणावी ना!

---

(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१९)
---

No comments:

Post a Comment