31 Jul 2022

रोहन मैफल - ‘पेन’गोष्टी - भाग १ व २

भाग १
-----------

सर्जनाचे ‘स्थळ’
-------------------

रात्रीची वेळ आहे... सगळा आसमंत शांत झोपला आहे... आपल्या श्वासाचं संगीत तेवढं ऐकू येतं आहे... आत शांत शांत वाटतं आहे... अशा वेळी शेजारचं आवडतं पुस्तक हाती घ्यावं... आधी त्यावरून हात फिरवून माया करावी... पानं चाळून जरा गुदगुल्या कराव्यात... मग एकदम मधलं कुठलं तरी पान उघडून खोलवर वास घ्यावा... त्या धुंदीत पुस्तक वाचायला सुरुवात करावी... आपल्या मन:चक्षूंसमोर त्या पुस्तकातलं सगळं पर्यावरण उभं राहतं. कोकणाचं वर्णन असेल, तर समुद्राची गाज ऐकू यायला लागते. हिमालयाचा उल्लेख असेल, तर त्या विराट भव्यतेच्या जाणिवेनं रोमांच उभे राहतात... भय असेल तर अंगावर काटा फुलतो, प्रणय असेल तर शिरशिरी दाटून येते... दु:ख असेल तर डोळे झरू लागतात, आनंद असेल तर चित्तवृत्ती फुलून येतात... बघता बघता काळाचं भान हरपतं. आपण कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेत हरवून जातो... पहाटे कधी तरी पुस्तक संपतं आणि ते तसंच छातीवर ठेवून आपला डोळा लागतो...
अस्संच होतं ना अगदी! पुस्तकांचा आणि आपला रोमान्स हा असाच आहे. त्या छापील शब्दांनी आपलं जगणं समृद्ध केलंय. आपल्या प्रत्येक भावनेची चौकट शब्दांच्या महिरपीनं सजवली आहे. आपल्या जाणिवांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. आपल्या दहा बाय दहाच्या खोलीत आपण जगाचे राजे असल्याचा फील दिलाय. स्मरणाच्या मखमली पेटीत जपून ठेवायला किती तरी आठवणी दिल्या आहेत. पुस्तकांनी आपल्याला शब्दांची श्रीमंती दिली, जाणिवांमधून येणारी शहाणीव दिली, अनुभवांची शिदोरी दिली,  भोवतालाची जाण दिली आणि समष्टीचं भान दिलं.
सध्या दृकश्राव्य माध्यमांची विपुलता आहे. माणसाला दृकश्राव्य माध्यमांतून कुठल्याही कलेचं ग्रहण किंवा आस्वादन स्वाभाविकच सोपं जातं. माणसाचा कल साहजिकच सोप्या गोष्टींकडं असतो. त्यामुळं पुस्तकं वाचण्याऐवजी सिनेमा किंवा वेबसीरीज बघणं सहजसोपं वाटतं. मात्र, पुस्तकं मूकपणे आपल्याशी जो संवाद साधत असतात, तो प्रत्यय दृकश्राव्य माध्यमांतून येत नाही. पुस्तकाचं वाचन एकट्यानं करावं लागत असल्यानं हा एक वैयक्तिक सोहळाच होतो. आपल्या मनाची झेप फार मोठी असल्यानं हवा तेवढा मोठा कॅनव्हास मनाला निर्माण करता येतो आणि शब्दांच्या रूपानं दिसणारी चित्रं आपल्या आवडीच्या रंगांत रंगवून भव्य करून पाहता येतात. शब्दांमध्ये मूलत:च एक चित्र दडलेलं असतं. ते चित्र आपल्या मनाला हवं तसं रंगवता येतं. वर्णनातून येणारे तपशील त्या चित्रांत भरता येतात. लेखकासोबतच वाचकाच्याही सर्जनाला वाव असतो. म्हणूनच एका अर्थानं तो रोमान्स असतो. शब्दांशी असा रोमान्स करता येण्यासाठी वाचक म्हणून आपल्यातही एक प्रगल्भता असावी, अशी जरा पूर्वअट असते. ज्या भाषेत पुस्तक लिहिलंय ती भाषा आपल्याला अवगत असणं ही तर अगदी प्राथमिक पूर्वअट झाली; पण त्या पुस्तकांच्या दोन ओळींमध्ये न लिहिलेलाही आशय वाचता यायला हवा. त्यासाठीच ही प्रगल्भता लागते. महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं वाचूनच ही प्रगल्भता आणि ही किमान पात्रता आपल्या अंगी येत असते. म्हणून तर आपण जसजसे प्रौढ होत जातो किंवा प्रगल्भ होत जातो तसतशी आपली वाचनाची आवडही बदलते. (किंवा, बदलायला हवी, असं म्हणू या!) आपली ग्रहणशक्ती वाढली, आकलन वाढलं, की मग मुरलेल्या लोणच्यासारखा हा रोमान्सही चवदार होतो. आपल्याला माणूस म्हणून घडवण्यात पुस्तकांचा असा जैव वाटा असतो. पुस्तकाचं कव्हर, बाइंडिंग, रूप, गंध या सर्वांसकट पुस्तक आवडावं लागतं. अगदी शब्दांचा फाँट किंवा टाइपही आपल्या ‘टाइप’चा नसेल, तर ते ‘स्थळ’ आपोआप नाकारलं जातं. पुस्तक आधी डोळ्यांना आवडावं लागतं, मग मनाला!
उत्तम बांधणी, उत्कृष्ट दर्जाचा कागद, सुबक छपाई आणि दर्जेदार मुद्रितशोधन असलं, की पुस्तक हातात घ्यावंसं वाटतं. मग ते आपोआप वाचलं जातं. नीट जपून ठेवलं जातं... अगदी बुकमार्कसह! पुस्तकवाचन ही एका अर्थानं नशाच आहे. एखादं चांगलं पुस्तक वाचून झालं, की कित्येक दिवस दुसरं काहीच वाचू नये, बघू नये असं वाटतं. त्याचं कारण आपल्याला त्यातलं अक्षर न् अक्षर आपल्यात मुरवून घ्यायचं असतं. मेंदूत गिरवून घ्यायचं असतं. एकदा का ती मेंदूतली छपाई पूर्ण झाली, की मग ते पुस्तक आपल्या स्मरणाच्या मखमली पेटीत रेशमी बांधणीत जाऊन बसतं. आयुष्यभर त्यातली वाक्यं सुविचारांसारखी आठवू लागतात. त्यातले शब्द, चित्रं, फाँट सगळं सगळं मेंदूच्या मेमरीकार्डमध्ये कायमचं सेव्ह होतं.
चला, या सदरातून आपल्या पुस्तकप्रेमाला उजाळा देऊ या. पुस्तकांविषयी, साहित्याविषयी, साहित्यिकांविषयी, साहित्य जगतातल्या घडामोडींविषयी गप्पा मारू या... बोलू या... ही ‘पासोडी’* तुम्हाला आवडेल, अशी आशा आहे.

-----

( *पासोडी म्हणजे काय?

दासोपंतांची पासोडी प्रसिद्ध आहे. पासोडी म्हणजे एक प्रकारचे कापड. सुमारे ४० फूट लांब आणि चार फूट रुंद अशा या कापडावर दासोपंतांनी विशिष्ट चित्रमय शैलीत लिहिलेले काव्य म्हणजे दासोपंतांची पासोडी.
आपणही वेबसाइटच्या ‘कापडा’वर चित्रमय शैलीत साहित्य जगतातल्या घडामोडी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणून सदराला ‘पासोडी’ हे नाव!)

(वि. सू. आधी या सदराचं नाव मी ‘पासोडी’ असं ठेवलं होतं. मात्र, या नावाचं एक पुस्तक असल्याचं प्रकाशकांनी सांगितल्यावर मी नंतर नाव बदलून ‘पेन’गोष्टी (‘कानगोष्टी’सारखं) ठेवलं. पण हा पहिला मूळ लेखाबरहुकूम इथे प्रसिद्ध करायचा असल्याने वरील नोंद तशीच ठेवली आहे.)

----

भाग २
-----------

बोल्ड अँड हँडसम
----------------------

मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, की पूर्वी इतर सर्व उद्योगांसोबत हवी तेवढी पुस्तकं मनसोक्त वाचण्याचा एक कार्यक्रम असे. लायब्ररीतून सकाळी आणलेलं पुस्तक संध्याकाळी बदलून आणायला जायचो. ग्रंथपालकाका हसून विचारायचे, की अरे, खरंच वाचून झालंय का? पण पुस्तक एवढं आवडीचं असायचं, की ते खरोखर दिवसभरात वाचून व्हायचं. कधी दुसरं पुस्तक आणतो, असं होऊन जायचं. अगदी लहानपणापासून थरारक गुप्तहेरकथा वाचायला आवडायचं. सुधाकर प्रभू हे आवडते लेखक होते. त्यांनी लहान मुलांसाठी अनेक पुस्तकं लिहिली. मात्र, ‘डिटेक्टिव्ह डीटी’च्या कथा सर्वाधिक आवडायच्या. हा आपल्याच वयाचा लहान मुलगा काय काय उद्योग करतो, हे बघून चकित व्हायला व्हायचं. भा. रा. भागवतांचा ‘फास्टर फेणे’ विसरणं अशक्यच. हा थेट रूढार्थाने गुप्तहेर नसला, तरी त्याच्या थरारक करामती खिळवून ठेवायच्या, यात वाद नाही. तेव्हा ‘दूरदर्शन’वर आलेली ‘फास्टर फेणे’ची मालिकाही आवडीनं बघितली होती. सुमीत राघवननं साकारलेल्या ‘फेणे’नं मनातल्या फेणेच्या प्रतिमेला धक्का दिला नाही. उलट मनातलं पात्र समोर सगुण साकार झाल्याचा आनंद दिला. त्याच काळात ‘दूरदर्शन’वर ‘अॅगाथा ख्रिस्तीज पायरो’ ही इंग्लिश मालिका सुरू झाली. त्या वेळी अॅगाथा ख्रिस्तीचं नाव पहिल्यांदा ऐकलं. परदेशी गुप्तहेर कथांची तो पहिली ओळख होती. त्यानंतर ओघानंच सर ऑर्थर कॉनन डायल यांच्या जेम्स बाँडची भेट होणं अपरिहार्य होतं. (अर्थात बाँडचे सिनेमे लहानपणी कुणी बघू दिले नसतेच, तो भाग वेगळा!) सिनेमातला बाँड हा अर्थातच ‘लार्जर दॅन लाइफ’ असल्यानं जबरदस्त प्रभावशाली वाटायचा. गुप्तहेरांचं जग नेमकं कसं असतं, याची झलक मिळाली ती बाँडपटांमुळंच. (त्या काळात प्रसिद्ध साहित्यिक रमेश मंत्री यांनी ‘जेम्स बाँड’वरून साकारलेलं जनू बांडे हे पात्र आणि त्याबाबतचं त्यांचं विनोदी लिखाणही एका नियतकालिकात अधूनमधून वाचल्याचं आठवतं...) हिचकॉकचे सिनेमे हेरपट नव्हते, तरी हेरपटांतला गूढ व थरारकतेचा अँगल त्यात असायचा. कधी कधी वाटायचं, हिचकॉकच्या सिनेमांतली रहस्यं शोधायला बाँडने यावं. (आता नव्या पिढीत कुणी तरी हा प्रयोग करायला हरकत नाही.) रत्नाकर मतकरी हे मराठी साहित्यातलं मोठं नाव. त्यांच्या गूढकथा वाचूनही अगदी असंच वाटायचं.
मधे बराच काळ लोटल्यानंतर मुलासाठी म्हणून रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘फेलुदा’चा संच घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित राय यांनी साकार केलेलं हे बंगाली गुप्तहेराचं पात्र. मला तोवर या पुस्तकांचा व या पात्राचा पत्ताच नव्हता. मात्र, ज्येष्ठ पत्रकार, संपादक व अनुवादक अशोक जैन यांनी अतिशय ओघवत्या भाषेत मराठीत अनुवादित केलेले ‘फेलुदा’चे काही भाग वाचले आणि एक नवाच खजिना गवसल्याचा आनंद झाला. अर्थात ही पुस्तकं कुमारवयीन मुलांसाठी होती. मोठ्यांसाठी असं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या हेरकथा असाव्यात, ही इच्छा ‘रोहन’च्याच ‘अगस्ती’नं पूर्ण केली. अगदी अलीकडं वाचायला मिळालेला हा तीन पुस्तकांचा संच. प्रसिद्ध पत्रकार, लेखक, स्तंभलेखक श्रीकांत बोजेवार यांनी ‘अगस्ती’ हा नवा मराठी गुप्तहेर हिरो जन्माला घातलाय. यातल्या ‘हरवलेलं दीड वर्ष’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग @ १९’ तिन्ही गोष्टी खास जमल्या आहेत. प्रत्येक पुस्तक साधारण शंभर पानांचं आहे. हल्ली वाढलेल्या स्क्रीन टाइममुळं वाचनाचा वेळ आणि वेग दोन्ही घटले आहेत. असा वाचकवर्ग मोठा आहे. त्याला हे शंभर पानी पुस्तक सहज वाचून पूर्ण होईल, असा विश्वास देणारं आहे. मुळात पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर आपण त्या कथेत एवढे खिळून जातो, की मध्येच पुस्तक हातातून खाली ठेवणं अवघड जाईल. या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत म्हटलंय - ‘मराठी साहित्यात हेरकथांची सुरुवात १८९०-९२ साली ह. ना. आपटे यांच्या ‘चाणाक्षपणाचा कळस’ या दीर्घकथेपासून झाली, असं मराठी विश्वकोश सांगतो. वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं. मराठीत त्याची सुरुवात करून देणाऱ्या, ‘चाणाक्षपणाचा कळस’ या १३० वर्षं जुन्या कथेस  आजच्या काळातील ही हेरकथा...’
लेखकाने म्हटल्याप्रमाणे, मराठी साहित्याला हेरकथांची १३० वर्षांची परंपरा आहे. त्या मानाने हा साहित्यप्रकार आपल्याकडे काही अपवाद वगळता, फार फुलला नाही, असंच म्हणावं लागेल. जे काही प्रयत्न झाले, ते पाश्चात्त्य कथाबीजांचं अनुकरण करणारे असेच होते. बोजेवार यांचा अगस्ती मात्र आजच्या काळातला आहे. तो अर्थातच टेक्नोसॅव्ही आहे, सुंदर बायकांचा उपभोग घ्यायला त्याला आवडते, त्याला चांगलंचुंगलं खाण्याचीही आवड आहे आणि तो दिसायलाही देखणा आहे. थोडक्यात, एक उत्तम हेर असण्याच्या बहुसंख्य वाचकांच्या मनातील सर्व अपेक्षा हा ‘अगस्ती’ पूर्ण करतो. त्याचा बेस मुंबईत असला, तरी कामानिमित्त तो जगभरात अनेक ठिकाणी संचार करतो. ‘रोडमास्टर’ ही त्याची आवडती बाइक आहे. त्याच्या काही विशिष्ट आवडीनिवडी, सवयी, लकबी आहेत. वाचकांना तिन्ही पुस्तकं वाचताना हे जाणवतं राहतं आणि तो कथानकात गुंतून राहतो.
कुठलंही नवं पात्र वाचकांच्या मनात प्रस्थापित करणं हे तसं जिकिरीचं व चिकाटीचं काम आहे. बोजेवार यांनी ‘अगस्ती’च्या रूपानं असा यशस्वी प्रयत्न केला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
आता ‘अगस्ती’चे पुढील भाग लवकर येवोत आणि त्या निमित्ताने वाचकांना नव्या, उत्तम हेरकथा वाचायला मिळोत, हीच अपेक्षा!

---

(पूर्वप्रसिद्धी : रोहन मैफल डिजिटल)

----


6 Jul 2022

प्रिय भाई, एक कविता हवी आहे... रसग्रहण

 कवितेवरची ‘कविता’
--------------------------


काही काही कार्यक्रम असे असतात, की त्याविषयी काही लिहू नये, बोलू नये... केवळ असीम शांततेत त्यांचा आठव मनात आणावा आणि तृप्त मनाने ते क्षण पुन:पुन्हा जगावेत. काही लिहू नये, याचं दुसरं एक कारण असं, की अशा अनुभूतीचं शब्दांकन कायमच तोकडं, थिटं वाटतं. जे अलौकिक अनुभवलंय ते शब्दांच्या चौकटींनी बद्ध करणं म्हणजे वेडेपणा आहे, असं मन सारखं सांगत असतं. त्यामुळं या वाटेला जाऊ नये, असा विचारच योग्य असतो. पण मग तरीही का लिहायचं? ते एवढ्यासाठीच, की जे काही मोडकंतोडकं सांगितलं जाईल, ते वाचून निदान तो संपूर्ण अनुभव घेण्यासाठी कुणी उद्युक्त व्हावं, प्रेरित व्हावं... कारण हा मंचीय कार्यक्रम असल्यानं त्याची पुन:पुन्हा अनुभूती घेता येणं शक्य आहे. आपणही घ्यावी आणि तोच आनंद दुसऱ्यांनाही मिळू द्यावा एवढाच या शब्दच्छलाचा मर्यादित हेतू!
नमनाला घडाभर तेल खर्च केल्यावर सांगतो, की मी हे ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे...’ या अप्रतिम कार्यक्रमाविषयी हे बोलतो आहे. कविता म्हणजे काय, कवितेत जगणं म्हणजं काय, जगण्याची कविता होते म्हणजे काय, कविता आणि जगणं हेच अभिन्न होतं म्हणजे काय... या आणि अशा कित्येक प्रश्नांची उकल हा कार्यक्रम पाहिल्यावर होते. एक तर कविता प्रिय, त्यात कार्यक्रमाचे नायक-नायिका साक्षात पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई आणि त्यांच्यासोबत येणारे बोरकरांपासून कुसुमाग्रजांपर्यंतचे एक से एक कवी... आनंदानं जीव कुडीत मावेनासा होणे म्हणजे काय याचा प्रत्यय पडदा उघडल्यापासूनच येऊ लागतो. सुरेख नेपथ्य... मंचाच्या दोन्ही बाजूंना पु. ल. आणि सुनीताबाई या ‘महाराष्ट्राच्या फर्स्ट कपल’च्या देखण्या चित्रांच्या स्टँडी, मागे व्हिडिओद्वारे पडद्यावर साकार होणारी मिलिंद मुळीक यांची - कविताच होऊन उतरलेली - देखणी चित्रं आणि मधोमध अमित वझे, मानसी वझे, मुक्ता बर्वे, अपर्णा केळकर, जयदीप वैद्य व निनाद सोलापूरकर ही जीव ओवाळून टाकावीशी वाटणारी गुणी कलावंत मंडळी... अमितच्या कमालीच्या पकड घेणाऱ्या आवाजातून निवेदन सुरू झालं आणि अक्षरश: दुसऱ्या मिनिटांपासून डोळ्यांतून धारा वाहायला लागल्या. काही तरी अफाट आणि केवळ अद्भुत असं काही तरी आपल्यासमोर साकार होतं आहे, याचा तो निखळ आनंद होता. हल्ली डोळ्यांतील उष्ण, खारट पाण्यानं दोन्ही गालांना अर्घ्य देण्याचे प्रसंग फार कमी झाले आहेत. या कार्यक्रमानं माझे दोन्ही गाल आनंदानं भिजवून टाकले. मी ते पुसायचेही कष्ट घेतले नाहीत, याचं कारण सभागृहातील तमाम मंडळींची अवस्था जवळपास तीच झाली होती. 
खरं तर पुण्यात असे कवितांचे, अभिवाचनाचे कार्यक्रम भरपूर होतात. खूप गुणवंत मंडळी ते सादर करतात. पु. ल. देशपांडे आवडते हे खरं, पण त्यांच्यावरचेही अनेक कार्यक्रम सादर होतातच की. पण कुठल्याच कार्यक्रमानं एवढा, पोटात मावेनासा आनंद दिल्याचं आठवत नाही. सहज विचार केल्यावर लक्षात आलं, की या कार्यक्रमाचा आत्मा कविता आहे. कविता हा माणसाच्या अभिव्यक्तीचा प्युअरेस्ट फॉर्म समजला जातो. इतका, की कवीच्या मनात आलेला शब्द पेनाच्या साह्यानं कागदावर टेकला, तरी त्याच्या शुद्धतेत न्यून आलं असं मानलं जातं. (मनात आधी उमटते तीच सर्वांत शुद्ध अभिव्यक्ती! हे जरा पावसासारखं झालं... पावसाचा थेंब म्हणजे पाण्याचा प्युअरेस्ट फॉर्म मानला जातो... तो थेंब जमिनीवर पडेपर्यंत!) अर्थात अगदी शुद्ध सोन्याचेही दागिने होऊ शकत नाहीत, त्यात थोडा का होईना, इतर कुठला तरी धातू मिसळावा लागतो, तितपतच हे शुद्धतेतलं न्यून... पावसाचा थेंब थेट पिण्यासाठी चातकाचीच चोच हवी. आपलं तेवढं कुठलं भाग्य असायला! पण हे किंचित न्यून ल्यायलेली अभिव्यक्तीही एवढी देखणी, की तिच्या आस्वादासाठी तरी चातकाचं भाग्य आपल्या ललाटी यावं...

डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाची रंगावृत्ती लिहिली आहे. पुलंच्या अखेरच्या काळात, म्हणजे १९९८ मध्ये डॉ. कुलकर्णी आणि पु. ल. व सुनीताबाई यांच्यात घडलेल्या एका प्रसंगाचा धागा हा या कार्यक्रमाचा पाया आहे. (या प्रसंगावर आधारित ‘तप:स्वाध्याय’ हा डॉ. कुलकर्णी यांचा ललितबंध ‘अनुभव’ मासिकात प्रसिद्ध झाला होता.) डॉ. कुलकर्णी यांच्या एका भित्तिपत्रकासाठी त्यांना रवींद्रनाथांची एक कविता हवी असते. ती पु.लं.कडे मिळेल, या भावनेनं ते काहीसे चाचरतच सुनीताबाईंकडं विचारणा करतात. आयुष्याच्या सांध्यपर्वात, समृद्ध जगण्यातून तेजाळून उठलेली ही दोन शरीरानं थकलेली वृद्ध, पण मनानं चिरतरुण माणसं पुढील काही दिवस त्या एका कवितेच्या शोधासाठी काय काय करतात, याचा कवितेच्याच माध्यमातून अवतरलेला प्रवास म्हणजे हा कार्यक्रम. अर्थात हेही या कार्यक्रमाचं पूर्ण वर्णन नाहीच. त्यात सुनीताबाई साकारणाऱ्या मुक्ताचे संवाद आहेत, स्वगत आहे, कवितावाचन आहे, निनादचं पुलंची आठवण करून देणारं पेटीवादन आहे, अपर्णा व जयदीप यांची कवितेच्या हातात हात घालून गुंफलेली सुरेल गाणी आहेत आणि मानसी व अमित यांचं या साऱ्याला मोगऱ्याच्या गजऱ्यासारखं एका सूत्रात ओवणारं नेटकं, धीरगंभीर निवेदन आहे. हे सगळं मिळून जे काही समोर येतं ते केवळ थक्क करणारं आहे. आपल्या मनातलं कविताप्रेम आणि पु. ल. - सुनीताबाईंविषयीचा उमाळा किती आहे, यावर विशेषणांची तीव्रता कमी-जास्त होऊ शकेल. माझ्यासाठी तरी सगळ्या सुपरलेटिव्ह्जच्या पलीकडं नेणारा हा अनुभव होता, यात वाद नाही.
आपण मोठे होत जातो, तसे अधिकाधिक रुक्ष, कोरडे होत जातो, ही जगरहाटी आहे. तरीही कुठं तरी आत ओल शिल्लक असेल, तर त्या आधारावर बाहेरच्या सगळ्या दुष्काळावर मात करीत एक तरी शुद्ध सर्जनाचा कोंब तरारतोच! आपल्यात हे जिवंतपण शिल्लक आहे, याची जाणीव असे कार्यक्रम करून देत असतात. म्हणून कृतज्ञतेनं, समाधानानं, आनंदानं डोळे झरतात आणि आपल्या जिवंतपणाची पावती देतात. आपल्या जगण्यातल्या प्रत्येक क्षणाला या कवितेनं सुंदर शब्दांची आरास केली आहे. आपल्या अनेक भावनांना कवितेनंच शब्दरूप दिलंय. बा. भ. बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, अनिल असतील, पद्माताई असतील, शान्ताबाई असतील, पाडगावकर असतील, महानोर असतील, ग्रेस असतील किंवा आरती प्रभू असतील. या साऱ्यांचं आपल्या घडण्यात, आपल्या जगण्यात किती मोलाचं स्थान आहे, हे सांगायला नको. यांच्या शब्दांचंच बोट धरून आपण जगण्याच्या वाटेवर चालू लागलो. या सर्व प्रवासात पु. ल. आणि सुनीताबाई आपल्यासोबत होतेच. जगण्याचा उत्सव कसा साजरा करावा, आयुष्य भरभरून कसं जगावं, दाद कशी द्यावी, आस्वाद कसा घ्यावा हे सगळं तर त्यांनीच आपल्याला शिकवलं. त्यांनी या मंडळींच्या कविता वाचल्या आणि मग आपणही त्या कवितांच्या प्रेमात पडलो, असंही अनेकांच्या बाबतीत झालं असेल. 
रवींद्रनाथांची कविता शोधण्याच्या निमित्तानं ‘संधीप्रकाशात अजून जो सोने’ असण्याच्या काळात या देखण्या दाम्पत्यानं ते काही दिवस जे काही अनुभवलं, ते खरं जगणं असं वाटून जातं. आपण नुसतेच जन्माला येतो. पण जगण्याचं प्रयोजन आपल्याला कितीसं कळतं? कळलं तरी तसं जगता येतं? पु. ल. आणि सुनीताबाईंना हे प्रयोजनही समजलं होतं आणि त्यांनी तसं जगूनही दाखवलं. म्हणून तर सर्व ऐहिकाची ओढ कायम असली तरी जडाचा मोह त्यांना कधीही नव्हता. श्वास सोडावा तितक्या सहजतेनं त्यांनी दानधर्म केला. ऐहिक गोष्टींत कधी अडकले नाहीत. एक पेटी, एक कविता आणि आसमंतातले सात सूर यांच्या आधारे शेवटपर्यंत जगले. या गोष्टींचं मोल त्यांना कळलं होतं. आपल्याला ते जाणवू लागतं आणि मग आपल्या आतापर्यंतच्या जगण्यातलं वैयर्थ जाणवून हुंदका दाटून येतो. हा एक काहीसा वेदनेचा हुंदका आणि त्यांच्या जगण्याचीच झालेली कविता पाहून येणारा विलक्षण आनंदाचा हुंदका असा अनोखा संगम दोन्ही डोळ्यांत साजरा झाल्याशिवाय राहत नाही.
आपल्यातलं जगणं सार्थ करायचं असेल, जगण्याचं प्रयोजन शोधायचं असेल, मनातली कविता पुन्हा जागवायची असेल, तर ‘प्रिय भाई...’ हा कार्यक्रम अनुभवण्यास पर्याय नाही. 

---