26 Jul 2016

रिव्ह्यू - & जरा हट के

शहाण्या, समजूतदार मुलींची गोष्ट
--------------------------------------

मुली मुलांपेक्षा शहाण्या अन् समजूतदार असतात. किती तरी जास्त! हे मी सांगायची गरज नाही. सगळ्यांनाच ते माहिती आहे. पण खरोखर '& जरा हट के' हा नवा मराठी चित्रपट पाहताना या वाक्याचा पुनःपुन्हा प्रत्यय येत राहतो, म्हणून ते पुन्हा सांगावंसं वाटतं इतकंच.
स्त्रीच्या मनाचा थांग कुणाला लागला आहे! त्याचा शोध घेणं म्हणजे महासागराचा तळ मोजणं किंवा आकाशाची व्याप्ती मोजणं. आपण फक्त कल्पनाच करू शकतो. म्हणून तर कित्येक साहित्यिकांना, कवींना, नाटककारांना या स्त्रीमनाची सदैव भुरळ पडलेली असते. आपल्या आयुष्यात किती तरी स्त्रिया येतात. वेगवेगळ्या नात्यांनी येतात. वेगवेगळ्या रूपांत येतात. या सगळ्यांच्या वागण्याची, रीतीची सांगड घालण्याचा प्रयत्न बिचारे पुरुष सदैव करीत राहतात. अन् बहुतेक जण शेवटी तिला शरण जाऊन मोकळे होतात. काही जण मात्र अनोख्या पद्धतीनं स्त्रीचा शोध घेत राहतात.
प्रकाश कुंटे हा नवा दिग्दर्शक दुसऱ्या वर्गात जाणार, असं दिसतंय. 'कॉफी अन् बरंच काही' या त्याच्या पहिल्या चित्रपटातच त्यानं याची चुणूक दाखवली होती. प्रेमासारखा नेहमीचाच विषय; पण कॉफीसारखी भलतीच तरतरीत, पण तरीही तरल अशी मांडणी त्यानं त्या कलाकृतीत करून दाखविली होती. याचं कारण या दिग्दर्शकाला सिनेमा या माध्यमाचं नेमकं भान आहे. प्रेक्षकांच्या जाणिवेची जाण आहे. त्यामुळंच अनेकदा नेणिवेच्या पातळीवरूनच तो काही गोष्टी सांगत राहतो. एखाद्या अभिजात साहित्यकृतीचं वाचन करताना, दोन वाक्यांमधले विराम वाचताना जो अपरिमित आनंद होतो आणि आपल्याला काही तरी गवसल्याचं अलौकिक समाधान लाभतं, तोच आनंद अन् तेच समाधान या दिग्दर्शकाच्या कलाकृती पाहताना लाभतं.
'& जरा हट के' अशा 'हट के'च शीर्षकाच्या कलाकृतीतून प्रकाश कुंटे आपल्याला दोन मुलींची गोष्ट सांगतात. यातली एक मुलगी वयानं मोठी आणि दुसरी तिची मुलगी, अर्थातच अल्लड वयातली. या दोघींच्याही आयुष्यात काही तरी घडतंय आणि दोघींचंही जैव नातं असल्यानं ते दोघींवरही सारखाच परिणाम करू पाहतंय. यातली थोरली मीरा (मृणाल) हिच्या आयुष्यात घटस्फोटानंतर एक पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यात राहणारी उच्चशिक्षित, प्रोफेसर असलेली मीरा तिच्या पद्धतीनं परिस्थितीला तोंड देतेय. तिची सतरा वर्षांची मुलगी आस्था (शिवानी) मुंबईत तिच्या मावशीकडं (सोनाली खरे) राहतेय. मीराला अचानक तिचा जुना मित्र आकाश (इंद्रनील) भेटतो. काही कालावधीनंतर मीरा आकाशशी लग्न करण्याचा निर्णय घेते. हा निर्णय ती मुलीला कळवते. पण अल्लड, नवथर तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आस्थाला यावर कसं रिअॅक्ट व्हावं हे कळत नाही. आईनं सदैव खूश राहावं असं तिला वाटत असतं, पण तिचा तिच्या बाबांशी असलेला कनेक्ट कायमच असतो. अशा वेळी इंद्रनीलचा मुलगा निशांत (सिद्धार्थ) यानं आस्थाशी बोलावं असं आकाश व मीरा ठरवतात. मुंबईत दोघंही भेटतात. निशांत आणि त्याच्या बाबांचं नातं मित्रांसारखं असतं. शिवाय निशांत आस्थापेक्षा थोडा मोठा असतो. त्यामुळं तो ही परिस्थिती जास्त चांगली समजावून घेऊ शकतो.
कालांतरानं आस्था आणि निशांत पुण्यात येतात. मीरा आणि आकाश एकाच घरात राहत असतात. तिथं या चौघांच्या एकत्र राहण्यातून पुढची गोष्ट उलगडत जाते. गोष्टीत पुढं अर्थातच एक ट्विस्ट येतो. तो स्वाभाविकच आहे. फारसा धक्का देणारा नाही. पण दिग्दर्शकालाही ते अभिप्रेत नसावं. त्या धक्क्यानंतर गोष्टीतली पात्रं, विशेषतः या दोन मुली कशा रिअॅक्ट होतात, हेच त्याला सांगायचं आहे. आणि ते सांगणं अर्थातच त्या पात्रांप्रमाणेच शहाणं, समजूतदार आहे. या दिग्दर्शकाला गोष्टीत अनेक  रिकाम्या, सूचक जागा ठेवून प्रेक्षकांनी त्या भराव्यात, असं अपेक्षित असावंसं दिसतं. पण त्यामुळं प्रेक्षकही गोष्टीत गुंतून राहतो आणि योग्य जागा भरल्या गेल्या, की कोडं सुटल्याचा आनंद होत राहतो.
एखाद्या निवांत हिलस्टेशनवर जाऊन, ब्रिटिशकालीन बंगल्यात बसून, बाहेरचा पाऊस पाहत आणि हातात थोरला कॉफीचा मग घेऊन घुटक्या-घुटक्यानं एखादी क्लासिक कादंबरी वाचावी ना, तसा फील हा सिनेमा आपल्याला देतो. यातल्या पात्रांचं पर्यावरण उच्चभ्रू शहरी प्रेक्षकांच्या जगण्याशी मिळतं-जुळतं आहे. त्यामुळं असा प्रेक्षकवर्गच या गोष्टीशी रिलेट करू शकतो. यातली पात्रं उच्चशिक्षित, विचारी आहेत. आपण आयुष्यात काय करतोय याचं त्यांना नेमकं भान आहे. त्यांना नात्यांची, त्यातल्या ताण्या-बाण्यांचीही जाण आहे. प्रियजनांना न दुखवता, हळुवारपणे गोष्टी करण्याकडं त्यांचा कल आहे. हे फारच आदर्शवादी जग असलं, तरी ते प्रेक्षक म्हणून तुम्हाला खुणावणारं, हवंहवंसं वाटणारं आहे.
दिग्दर्शकानं यातल्या प्रमुख दोन मुलींसोबत इतरही स्त्री-पात्रं दाखविली आहेत. त्यात सोनाली खरेनं साकारलेली मीराची बहीण नलू आहे, स्पृहा जोशीनं भूमिका केलेली गीता आपटे ही आस्थाची मैत्रीण आहे, सुहास जोशींनी साकारलेली मीराची आई आहे, अमृता देशपांडेनं उभी केलेली निशांतची मैत्रीण आहे. या सगळ्या स्त्रिया थोड्याफार प्रमाणात दिसत राहतात. एक-दोन प्रसंगांतच त्यांचं संपूर्ण कॅरेक्टर उभं करण्याचं दिग्दर्शकाचं कसब वाखाणण्यासारखं आहे. उदा. सुहास जोशींनी साकारलेली मीराची आई अवघ्या दोन-तीन प्रसंगांतच दिसते. पण ही आजी किती 'कूल' आणि कसली गोड आहे, हे प्रेक्षकांपर्यंत विनासायास पोचतं. अर्थात यात सुहास जोशींचाही मोठा वाटा आहेच. मीराच्या भावानं अजितनं - तिच्याशी फोनवरून वैतागून बोलणं असो, की आस्था आणि आकाश यांचं रात्रीच्या वेळी अंगणात बसून तारे निरखणं असो, अशा अनेक प्रसंगांतून दिग्दर्शक थेट न सांगता बरंच काही सांगून जातो आणि ते सगळं आपल्यापर्यंत पोचतंच.
ही प्रामुख्यानं आस्था आणि मीराची गोष्ट असली, तरी निशांत आणि आकाश या व्यक्तिरेखाही त्यांच्या आयुष्यात, पर्यायानं या गोष्टीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचीही कॅरेक्टर्स पुरेपूर उभी राहतील, याची नीट काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे. चित्रपटात अनेक प्रसंगांत वसंतरावांची नाट्यपदं किंवा शास्त्रीय संगीत पार्श्वभूमीवर मंदपणे वाजताना ऐकू येतं. आपल्या पात्रांच्या जीवनशैलीशी जुळणारा हा सूर प्रेक्षकांनाही त्यात जोडून घेतो. पात्रांसभोवतीचं असं नेमकं पर्यावरण प्रेक्षकांना पात्रांची जवळून ओळख करून द्यायला उपयुक्त असतं. संपूर्ण सिनेमात दिग्दर्शकानं हे भान पाळलेलं आहे. त्यामुळंच यातला एकही प्रसंग अवाजवी किंवा ओढून-ताणून आणलाय, असं वाटत नाही.
मृणालनं यात साकारलेली मीरा पाहण्यासारखी आहे. यात तिनं प्रगल्भ अभिनयाचा परिपाठच घालून दिला आहे. ही भूमिका तिच्या वयाला साजेशी आहे. यात ती दिसलीय पण खूप छान! नवोदित शिवानी रांगोळेनं आस्था खूपच समजुतीनं उभी केली आहे. पहिलाच सिनेमा असूनही तिचा वावर गोड आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. इंद्रनील सेनगुप्ता या बंगाली अभिनेत्यानं यात आकाशचं पात्र उभं केलं आहे. त्यांनीही मृणालसोबत परिपक्व व प्रगल्भ अभिनय केला आहे. सरप्राइज पॅकेज आहे तो मात्र सिद्धार्थ मेनन. यातला निशांत त्यानं एवढ्या बारकाईनं आणि इंटेन्सली सादर केला आहे, की बस्स! दिवसेंदिवस हा अभिनेता अधिकाधिक मॅच्युअर होताना दिसतोय, ही आनंदाची गोष्ट आहे.
चित्रपटाच्या शेवटी आपल्या दोन्ही मुली एक निर्णय घेतात. तो निर्णय त्यांच्या दृष्टीनं 'जरा हट के'च असतो. कारण या मुली असतातच शहाण्या आणि समजूतदार... नात्यांना सांभाळून घेणाऱ्या आणि ते करताना दर वेळी नवं नातं निर्माण करणाऱ्या! या नात्यांना नाव नाही, गाव नाही. असतो तो फक्त समजूतदारपणाचा मंद, हळवा सूर!
चुकवू नका.
---
दर्जा - साडेतीन स्टार
---

24 Jul 2016

जागतिकीकरण पंचवीस वर्षे - लेख

ये कहाँ आ गए हम...
-------------------भारत. १९९१. 
राजीव गांधींच्या क्रूर हत्येनंतर नरसिंह राव यांचं सरकार केंद्रात जेमतेम बहुमतावर सत्तेत आलेलं. त्यांनी अर्थमंत्रिपदी नियुक्ती केली रिझर्व्ह बँकेच्या एका माजी गव्हर्नरची, एका जाणत्या अर्थतज्ज्ञाची. त्याचं नाव डॉ. मनमोहनसिंग. याच मनमोहनसिंगांनी २४ जुलै १९९१ रोजी लोकसभेत राव सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. देशाला एका वेगळ्या वाटेवर नेणारा, धाडसी अन् निर्णायक! 
भारतानं कोणत्या आर्थिक परिस्थितीत आर्थिक उदारीकरण स्वीकारलं याची चर्चा आणि माहिती अनेक वेळा झाली आहे. तो या लेखाचा हेतू नाही. मात्र, भारताच्या सामाजिक परिस्थितीवर या उदारीकरणानं काय परिणाम केले यावर एक ओझरती नजर टाकली तरी जावेद अख्तर यांच्या शब्दांत 'ये कहाँ आ गए हम...' असंच म्हणावंसं वाटतं.
भारतासाठी नव्हे तर एकूणच जगासाठी हा काळ फारच खळबळीचा आणि क्रांतिकारी बदलांचा होता. दोनच वर्षांपूर्वी शीतयुद्धाचं प्रतीक असलेली बर्लिनची भिंत उद्ध्वस्त झाली होती. रशियात मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वाखाली 'ग्लासनोस्त' आणि 'पेरेस्त्रोइका'चं वारं वाहू लागलं होतं. आखातात कुवेतवर सद्दाम हुसेननं आक्रमण केलं होतं आणि आपणच उभ्या केलेल्या या भस्मासुराचा नायनाट करण्यासाठी युद्धखोर अमेरिकेला अगदी निमित्तच मिळालं होतं. भारतात या वेळी अस्थिर राजकीय स्थिती होती. व्ही. पी. सिंह आणि पाठोपाठ चंद्रशेखर यांची सरकारं कार्यकाळ पूर्ण करू शकली नव्हती. देशाची तिजोरी रसातळाला गेली होती आणि सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती. देशात हिंदुत्ववादी विचारांची लाट आली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ठिकठिकाणी कारसेवा सुरू होती. वर्षापूर्वीच लालकृष्ण अडवानी यांनी राममंदिरासाठी रथयात्रा काढली होती आणि देश ढवळून टाकला होता. व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानं देशात कथित उच्चवर्णीयांमध्ये प्रचंड संताप धुमसत होता आणि सामाजिक दरी आणखी रुंदावून बसली होती. १९९० च्या विधानसभा निवडणुकांत बाळासाहेब ठाकऱ्यांच्या झंझावाती भाषणांनी महाराष्ट्र हलवून सोडला होता. रात्री उशिरापर्यंत राजकीय प्रचारसभा चालत. टी. एन. शेषन यांचा अद्याप उदय व्हायचा होता...
 १९९१ मध्ये उपग्रह वाहिन्यांना परवानगी मिळाली आणि झी ही पहिली खासगी वाहिनी केबलवरून दिसू लागली. रुपर्ट मरडॉक यांच्या स्टार समूहानं लगोलग भारतात शिरकाव केला आणि न्यूझीलंडमधील क्रिकेट सामने स्टार नेटवर्कवरून लाइव्ह दिसू लागले. याच उपग्रह वाहिन्यांनी आखाती युद्धही लाइव्ह दाखवलं आणि भारतीयांनी प्रथमच घरबसल्या 'युद्ध' पाहिलं. सचिन तेंडुलकर नावाचा तारा नुकताच उदयास येऊ लागला होता. तरी भारतीय संघात अद्याप कपिलदेव, मनोज प्रभाकर, रवी शास्त्री आदी सीनियर मंडळी खेळत होती. १९९१ पर्यंत दूरदर्शन हीच एकमेव वाहिनी दिसत होती आणि चार महानगरांतील रहिवाशांना डीडी मेट्रो ही दुसरी वाहिनी दिसत असल्यानं अन्य शहरांतील लोक त्यांच्यावर चक्क जळत होते. अमिताभ अद्याप भरात होता आणि 'जुम्मा चुम्मा दे दे'वर निम्म्या वयाच्या किमी काटकरसोबत रोमान्स करीत होता. असं असलं तरी सलमान खान, आमिर खान या खानांचा उदय झाला होता आणि १९९१ हे आणखी एका खानासाठी महत्त्वाचं वर्ष ठरणार होतं. त्याचं नाव होतं शाहरुख खान. त्याच्या 'बाजीगर'नं प्रेक्षकांना 'दिवाना' केलं होतं आणि पुढील कित्येक वर्षं या खानत्रयीचा दबदबा राहणार होता. अजय देवगण, अक्षयकुमार हे आणखी दोन 'लंबी रेस के घोडे' पुढच्याच वर्षी, म्हणजे १९९२ मध्ये रूपेरी पदार्पण करणार होते.
दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिकांचा प्रभाव होता. 'रंगोली' आवर्जून पाहिली जात होती. सुरभी हा सिद्धार्थ काक व रेणुका शहाणेचा कार्यक्रम लोकांनी तुफान लोकप्रिय केला होता. एवढा की, खास स्पर्धा पोस्ट कार्डची निर्मिती पोस्ट खात्याला करावी लागली. 
मल्टिप्लेक्स हा काय प्रकार असतो, हे माहिती नव्हतं. सिंगल स्क्रीन थिएटर हेच चित्रपट पाहण्याचं एकमेव साधन होतं. तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे, सचिन, स्मिता तळवलकर आदी मंडळींचा दबदबा होता. तरीही १९९१ हे वर्ष गाजवलं ते विजय कोंडके यांच्या 'माहेरच्या साडी'नं. कित्येक आठवडे हा चित्रपट थिएटरांत मुक्काम ठोकून होता.
महाराष्ट्रात १९९० च्या निवडणुकीनंतर शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते. राज्यात तेव्हा मुंबई (किंवा खरं तर बॉम्बे) हेच एकमेव महानगर होतं. पुणं हे अद्याप एक शांत, निवांत शहर होतं. सांस्कृतिक वाद-चर्चा, गणेशोत्सवाची धूम आणि सवाई गंधर्व महोत्सवाची सुरेलता यात हे सुशेगाद शहर रमलेलं होतं. रविवारी रात्री सुरू झालेल्या शेवटच्या सत्राची भीमसेन जोशींच्या पहाडी आवाजानं सोमवारी सकाळी सांगता होत होती. युनिव्हर्सिटी रोडवर अद्याप दोन्ही बाजूंनी दाट झाडी होती आणि विद्यापीठ चौकातलं भलंमोठं कारजं संध्याकाळी डोळ्यांना सुखावत होतं. झेड ब्रिज आणि नदीपात्रातला रस्ता नसल्यानं प्रेमीजन अद्याप सारसबाग, पेशवेपार्कमध्येच प्रेमालाप करीत होते. सिंहगड मात्र तेव्हाही फेव्हरिट होता. सिंहगडला जाणारा रोड मात्र छोटासाच, पण दोन्ही बाजूला दाट झाडी असलेला असाच होता. एकूणच पुण्यातले बहुतेक रस्ते लहानसेच, पण दुहेरी होते आणि तरी फारसं ट्रॅफिक जॅम होत नसे. मंडई विद्यापीठ (पत्रकारांचं रात्री जमण्याचं ठिकाण) तेव्हा जोरात होतं. हिंजवडी हे नावही फारसं कुणाला माहिती नव्हतं. १९९४ ला बालेवाडीत क्रीडा संकुल उभं राहिलं आणि पुढच्या काही काळात कात्रज-देहूरोड बायपास रस्ता तयार झाला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बहुतांश भाग निर्जन होता आणि झाडीझुडपं वाढली होती. नगर रोडचीही तीच स्थिती होती. गुंजन टॉकीजच्या पुढं वस्ती विरळ होत जायची आणि वाघोली हे नगरला जाताना पुण्यानंतर येणारं एक गाव होतं. 
मोबाइल हे नावही कुणी ऐकलं नव्हतं आणि इंटरनेटचा वापर फार म्हणजे फारच मर्यादित होता. एसटीडी बूथची चलती होती आणि गावोगावचे एसटीडी कोड क्रमांक पाठ असावे लागत. एकूणच तंत्रज्ञान माणसाच्या आयुष्यावर स्वार झालं नव्हतं आणि त्यामुळं त्यातून येणारी अपरिहार्य पळापळही नव्हती. उलट एसटीडी बूथ ही तेव्हा क्रांती मानली जात होती आणि राजीव गांधी व सॅम पित्रोदा यांना त्यांचं रास्त श्रेय देण्यात येत होतं. 
महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती अद्याप अबाधित होती. कुसुमाग्रज-पुलं अद्याप हिंडते-फिरते होते आणि एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान, मोहन धारिया, बाळासाहेब भारदे या मंडळींचा सार्वजनिक वावर पुण्यातल्या जाहीर कार्यक्रमांना एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊ देत नव्हता. फेसबुक नव्हतं, तरी दिवाळी अंकांतल्या विशिष्ट लेखांची राज्यभर चर्चा व्हायची. 
----
काळ भराभर पुढं सरकत गेला...
मग १९९५ मध्ये देशात पहिला मोबाइल आला. १९९७ मध्ये पहिलं मल्टिप्लेक्स उभं राहिलं. त्याच काळात कधी तरी पहिला मॉल उभा राहिला. तोवर सचिन नावाचा फिनॉमिना फारच मोठा झाला होता. मग राहुल द्रविड, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे, लक्ष्मण, युवराजसिंग यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला. मॉल, मल्टिप्लेक्स आणि मेट्रो या तीन 'म'कारांनी महानगरांतलं आयुष्य आमूलाग्र बदलून गेलं. १९९९ च्या सुमारास आलेल्या वायटूके समस्येमुळं भारतातल्या बीपीओ उद्योगाला एकदमच ऊर्जितावस्था आली. अनेक आयटी कंपन्या सुरू झाल्या. पुणे, बेंगळुरू, हैदराबाद ही भारतातली नवी महानगरं उदयाला आली. या शहरांतल्या जागांच्या किमती अचानक वाढल्या. महागाई वाढली. मोबाइल तंत्रज्ञानात दर वर्षी क्रांती होत गेली. पुढच्या दशकभरात ती आणखीनच पुढं गेली. वृत्तपत्रांत पूर्वी सर्व पानं कृष्णधवल असायची. तिथं १९९९-२००० च्या सुमारास पहिलं पान रंगीत आणि नंतर पुढच्या दहा वर्षांत सर्व पानं रंगीत असा प्रवास फारच वेगानं झाला... 
एकूणच तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत भौतिक प्रगतीचा धबधबा वेगानं इथल्या समाजावर कोसळू लागला. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांची संख्या वेगानं वाढू लागली. खेड्यांतून शहरांमध्ये विस्थापन मोठ्या प्रमाणात सुरू झालं. गाव-खेड्यांतली सामाजिक, सांस्कृतिक चौकट फार वेगानं ढासळली आणि तिथं नवी सामाजिक समीकरणं आकार घेऊ लागली. शहरांमध्ये भौतिक सुखांची परमावधी झाली असली, तरी नियोजनाअभावी ही शहरं बेढब आणि कुरूप दिसू लागली. तिथल्या सोई-सुविधांचा बोजवारा उडाला आणि नवी बेशिस्त, कशालाच न जुमानणारी नागर संस्कृती उदयाला आली. ग्रामीण भागांतून भू-संपादन किंवा अन्य माध्यमांतून काही विशिष्ट वर्गाकडं पैसा आला. त्यातून वेगळ्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या.
मध्यमवर्गानं वर्षानुवर्षं जपलेली (अभावाची गौरवगाथा गाणारी) मूल्यव्यवस्था अपरिमित भौतिक सुखांच्या उपलब्धतेनंतर काचेसारखी तडकली. या लाटेचा पहिला तडाखा बसला तो एकत्र कुटुंबपद्धतीला. दोन्ही हातांनी सुखं ओरबडताना हातांतून बरंच काही रेतीसारखं निसटून गेल्याची जाणीव लोकांना फार उशिरा झाली. आपल्याला कशाच्या बदल्यात काय मिळवायचं आहे, याचा विचार पुनश्च अनेकांना सतावू लागला. जिथं काही नव्हतंच तिथं पुन्हा एकदा काहीच नाही, अशी स्थिती झाली. 
 या सर्व बदलांची किंमत समाजव्यवस्था आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर एका पिढीनं चुकविली. पुढच्या पिढ्यांची वेगळी मूल्यव्यवस्था तयार होते आहे. या नव्या पिढीचे फंडे अगदी स्पष्ट आहेत. त्यांचे विचार निश्चितच वेगळे आहेत, पण किमान ती पिढी कमी दांभिक आहे. आमच्यासारख्या चाळिशीला आलेल्या पिढीनं या बदलांचे फायदेही उपभोगले आणि तोटेही! अशा वेळी दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याची धडपड करणारी माझी पिढी मनात कुठं तरी म्हणते आहे - ये कहाँ आ गए हम... यूँही साथ चलते चलते!
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती - २४ जुलै २०१६)
----

11 Jul 2016

लेख - हिंदी सिनेमातील हिंसाचारावर


एवढी हिंसा कशासाठी? 
----------------------
काही काळापूर्वी 'मर्डर-२' नावाचा एक टुकार सिनेमा येऊन गेला. त्यातला विकृत खलनायक बायकांना पकडून त्यांचा अत्यंत निर्दयी पद्धतीनं खून करीत असतो. एका दृश्यात तो एका तरुण मुलीला बांधून ठेवतो आणि तिच्या डोक्यात हातोड्यानं खिळा ठोकून तिला मारतो. हे दृश्य इतकं भयंकर होतं, की मला भोवळ आली होती. अनुराग कश्यपचा 'गँग ऑफ वसेपूर' बघा. रक्ता-मांसाचा चिखल दाखवलाय त्यात. अनुष्का शर्माचा 'एनएच-१०' हा चित्रपट असाच. त्यात पळून गेलेल्या त्या मुलीला आणि तिच्या मित्राला जंगलात अत्यंत निर्घृणपणे मारलंय आणि हे सगळं सांगोपांग दाखवलंय सिनेमात. रामगोपाल वर्माचा अलीकडंच आलेला आणि पडलेला 'वीरप्पन' हा सिनेमा. वीरप्पनचं क्रौर्य आणि कसायासारखं त्याचं माणसं मारण्याचं कसब त्यातही अगदी तपशीलवार दाखवलंय. 
हे सगळे सिनेमे पाहताना प्रत्येक वेळी मला त्रास झालाय आणि अनेकांना तो होत असणार यात शंका नाही. या असल्या दृश्यांची चर्चा झाली म्हणून तर 'तितली' नावाचा अगदी अलीकडं आलेला एक चित्रपट पाहण्याचा धीर मी करूच शकलो नाही. तीच गोष्ट अनुराग कश्यपच्याच ताज्या 'रामन राघव'ची. हा सिनेमा मी पाहिला नाही. म्हणजे पाहण्याची इच्छा होती; पण पुन्हा धीर झाला नाही. पण त्याविषयी जे वाचलं, त्यावरून हा भयंकर सिनेमा अनेक जण पाहूच शकणार नाहीत, याची खात्री पटली आहे. 

 या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दिकी एका दांपत्याचा निर्दयपणे खून करतो असं दृश्य आहे. त्यानंतर या जोडप्याच्या पाच ते सहा वर्षांच्या मुलाला तो एका खुर्चीला बांधून ठेवतो आणि त्याच्यासमोरच बिर्याणी आणि चिकन शिजवून खातो. त्यानंतर तो त्या मुलालाही मारतो, हे सांगायला नकोच. मला प्रश्न पडला आहे, की ही अशी दृश्यं पडद्यावर दाखवून हे सगळे दिग्दर्शक नक्की काय साध्य करीत आहेत? जास्तीत जास्त विकृती कोण पडद्यावर दाखवतो, याची त्यांच्या-त्यांच्यात तर शर्यत लागलेली नाही ना! 
जगात अनेक प्रकारचे सिनेमे बनत असतात. प्रत्येकाचा प्रेक्षकवर्गही वेगवेगळा असतो. जगात जपानी आणि कोरियन चित्रपट अशा हिंसक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. तिथला समाज या गोष्टीची किंमत मोजतो आहे. दोन्ही देशांत रेल्वेत किंवा सार्वजनिक ठिकाणी हिंसेचे अनेक प्रकार घडले आहेत. अमेरिकेत तर ठायी ठायी हे प्रकार होताना आपण बघतो. पश्चिम आशियात तर अनेक दशकांपासून वांशिक हिंसाचार सुरू आहे. सिनेमाचा कळत-नकळत पडणारा प्रभाव यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सिनेमा हे मोठ्या जनमानसावर प्रचंड प्रभाव टाकू शकणारं माध्यम आहे. या माध्यमातून एवढी टोकाची आणि किळसवाणी हिंसा दाखवण्यामागं नेमका काय हेतू असू शकतो? टोकाच्या भीतीतून किंवा टोकाच्या न्यूनगंडातूनही माणूस हिंसाचार करू शकतो. मानसशास्त्रज्ञ सांगतात, की सिनेमासारखं माध्यम कळत-नकळत आपल्या अबोध मनावर मोठा प्रभाव टाकत असतं. अशा प्रभावाखाली येऊन अनेक गुन्हे घडल्याची उदाहरणं आपल्यासमोरच आहेत. मग पुन्हा हा विकृत हिंसेचा डोस कशासाठी? 
यावर कुणी म्हणेल, की समाजात जे घडतं तेच सिनेमात दाखवलं जातं. सिनेमा हा समाजाचाच आरसा आहे. तेव्हा समाजात विकृती फोफावली असेल, किंवा एवढ्या टोकाची हिंसा प्रत्यक्ष घडत असेल, तर ती सिनेमात दाखवायची नाही का? यावर उत्तर असं, की आपल्याकडं अनेक प्रतिभाशाली दिग्दर्शक होऊन गेले. जगभरातलीही उदाहरणं आहेत. मानवी जीवनातला प्रत्येक रस त्यांनी दाखवला. प्रेम दाखवलं, तसा द्वेषही दाखविला. करुणरस दाखविला, तसाच हास्यरसही प्रकट केला. शांतिरस दाखविला, तशीच हिंसाही दाखविली. पण हे करताना त्यांनी सिनेमा माध्यमाची खरी ताकद वापरली. हिचकॉकचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. त्याचे अनेक सिनेमे तर कृष्णधवल आहेत. तरीही रक्ताचा एक थेंबही न दाखवता तो प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणत असे. 'बँडिट क्वीन' या चित्रपटातही फूलनदेवीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं दृश्य असंच कुठलाही थेट प्रसंग न दाखवता शेखर कपूरनं प्रत्ययकारकरीत्या दाखवलं होतं. तेव्हा इच्छा असेल, तर हवा ते इफेक्ट साधता येतो हे नक्की. चित्र, ध्वनी आणि प्रकाश या माध्यमांचा वापर करून प्रतिभाशाली दिग्दर्शकांनी निर्जीव पडद्यावर अनेक चमत्कार घडविले आहेत. रक्तामांसाचा चिखल दाखवूनच आपण वेगळे दिग्दर्शक ठरतो, असा त्यांचा भ्रम नसावा.
मुद्दा म्हातारी मेल्याचा नसून, काळ सोकावत जातो याचा आहे. हल्ली अशा अनेक सिनेमांना यू-ए प्रमाणपत्र असतं. मग कित्येक कोवळी मुलं हे सिनेमे पाहतच असतात. त्यात दाखविली जाणारी हिंसा तेही पाहत असतात. मग कुणाच्या तरी डोक्यात दगड घालणं, मानेत स्क्रू-ड्रायव्हर खुपसणं, डोक्यात लोखंडी रॉड घालणं किंवा हात-पाय तोडणं या प्रकारांचं त्यांना काहीच वाटेनासं होतं. हल्लीच मराठवाड्यात उदगीरमध्ये एका टीनएजर मुलानं आपल्या मित्राला सुपारी देऊन आपल्या सख्ख्या आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलं कशामुळं एवढी हिंसक झाली? असल्या सिनेमांचा प्रभाव हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे, असं अनेक पोलिस अधिकारीही सांगतात. हल्ली तर हे प्रकार काही प्रेक्षक एंजॉय करतात, असं एक निरीक्षण आहे. म्हणजे दाखवणारा आणि पाहणारा या दोघांच्या पातळीवर विकृतीचं असं अद्वैत झालं आहे. असं असेल तर आपण समाज म्हणून पुढं कुठं जाणार आहोत?
या विकृतीत अनुराग कश्यप आणि त्याचे शिष्योत्तम, महेश भट कॅम्प आदी मंडळी आघाडीवर आहेत. असं काही तरी दाखवून आपण नक्की काय साध्य करतो आहोत, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. सिनेमा ही धंदेवाइक कला आहे. इथं जे पिकतं तेच विकलं जातं. त्यामुळं मुळात प्रेक्षकांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि अशा सिनेमांना जाणं टाळलं, तर या मंडळींचं फिरलेलं डोकं नक्कीच ताळ्यावर येईल. (अर्थात अतिगोडगोड सिनेमे दाखवणं हीसुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे, असं मी मानतो.) तेव्हा या मंडळींना असं सांगावंसं वाटतं, की सिनेमा माध्यमाची खरी ताकद वापरा आणि व्यक्त व्हा. वास्तविक रामगोपाल र्मा आणि अनुराग कश्यप यांच्याकडं ते कसब आहेच. सुरुवातीच्या त्यांच्या अनेक सिनेमांतून त्यांनी ते छान दाखवलं आहे आणि म्हणूनच ते प्रेक्षकांचे लाडके दिग्दर्शक आहेत. मलाही हे दोघेही आवडतात. पण याचा अर्थ त्यांनी वाट्टेल ते दाखवावं आणि प्रेक्षकांनी खपवून घ्यावं असा होत नाही. गरज नसताना विकृत हिंसा सांगोपांग दाखवू नये आणि दाखवायची असेल तर त्यामागे ठोस कारण उभं असलं पाहिजे, एवढी अपेक्षा अवाजवी नसावी.
---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ जुलै २०१६)
---

10 Jul 2016

आत्मानंदाची वारी

आत्मानंदाची वारी
-----------------------

पंढरीची वारी मी पहिल्यांदा केव्हा पाहिली, ते आठवत नाही. लहानपणी पेपरमध्ये माउलींची पालखी दिवेघाट चढतानाचे मोठमोठे फोटो यायचे. तेच वारीचं पहिलं दर्शन असावं. पुढं पुण्यात पत्रकारिता करू लागलो, तेव्हा वारीचा जवळून संबंध आला. वारी पुण्यात आली, की त्या वातावरणाच्या बातम्या करायचं काम सुरुवातीला केलं. ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पुण्यात आल्या, की या चैतन्यदायी शहराचं वातावरण कसं बदलून जातं हे पाहिलं. वारीविषयी कुतूहल वाढलं. पण ते कित्येक वर्षं कुतूहलाच्या पातळीवरच राहिलं. ऐहिक सुखाची परमावधी झाल्याशिवाय पारलौकिक सुखाची ओढ लागत नसावी. त्यामुळं तरुणपणाची कित्येक वर्षं संसाराचं बस्तान बसवण्यातच गेली आणि वारी फक्त बातम्या छापण्यापुरती अन् त्या वाचण्यापुरतीच आयुष्यात राहिली. 
पुण्यात 'मटा'त आल्यापासून गेली सहा वर्षं ओळीनं आमच्या फर्ग्युसन रोडवरच्या ऑफिससमोरून दोन्ही पालख्या जाताना पाहत आलो. तेव्हा वारीची ओढ अधिकच जाणवू लागली असावी. संसारातल्या ऐहिक सुखांच्या पलीकडची दृश्यं नजरेच्या टप्प्यात येण्याचा आयुष्यातलाही काळ आता आला होता. तेही एक कारण असावं. पाऊस सुरू झाला, पेरण्या आटोपल्या, की महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांतली, शहरांतली हजारो संसारी माणसं सगळं घरदार टाकून त्या सावळ्या परब्रह्माच्या ओढीनं अडीचशे-तीनशे किलोमीटर पायपीट करीत का निघतात, हे जाणून घेण्याची अनिवार ओढ कुठं तरी मनात लागून राहिली होती. ते असं काय आहे, ज्याच्या ओढीनं माणसं सगळं विसरून, शारीरिक पीडा सहन करून एवढ्या लांब पायी चालत निघतात, हे तसं एका वारीच्या खेपेत कळणं अवघडच. पण या वेळी किमान सुरुवात करू या, असा निर्धार केला. कुटुंबातल्या सदस्यांनीही साथ दिली आणि श्वशुरगृहीच्या काही मंडळींसह आम्ही सात जण 'हम सात साथ है' म्हणत वारीच्या वाटेवर निघालो. 
पुण्यात खरं तर बाराही महिने उत्तम वातावरण असतं; पण जून-जुलैत पाऊस पडून गेला, की ते आणखी खास बनतं. अशा पावसाळी वातावरणात सकाळी सकाळी बाहेर पडून फिरण्यासारखं सुख नाही. वारीसाठी हाच काळ का निवडला गेला असावा, हे कळण्यासाठी हे वातावरण अनुभवायला हवं. सकाळी लवकर निघून आम्ही आळंदीच्या रस्त्यापर्यंत साडेसात वाजता पोचलो. भोसरीकडून पुणे-आळंदी रस्त्याला मिळणाऱ्या चौकाला मॅगझिन चौक असं नाव आहे. सहाआसनी रिक्षानं आम्हाला तिथं सोडलं. समोर डाव्या बाजूला आळंदी आणि उजव्या बाजूला पुण्याकडं जाणारा रस्ता वारकऱ्यांनी फुलून गेला होता. प्रत्यक्ष पालखी अजून गांधीवाड्यातून निघाली नव्हती. पण आळंदीत जमलेल्या हजारो वारकऱ्यांनी सकाळी आपापली आन्हिकं उरकताच पुण्याकडं प्रस्थान ठेवलं होतं. आम्ही थोडा विचार केला आणि या लोकांसोबतच पुण्याकडं निघायचं ठरवलं. आळंदीकडून पुण्याला येणारा रस्ता वाहतुकीसाठी पहाटेपासूनच बंद असतो. त्यामुळं हा रस्ता पूर्णपणे वारकऱ्यांसाठी मोकळा असतो. आम्ही थोडंसं खाऊन चालायला सुरुवात केली. अनेक लोक झपाझप चालत होते. पुण्यातून अनेक लोक आळंदी ते पुणे एवढी वारी करण्यासाठी येत असतात. हे लोक आणि मूळचे वारकरी लोक यांत फरक स्पष्ट दिसत होता. आमच्यासारख्या नवोदित वारकऱ्यांकडं पाठीला सॅक, पाण्याची बाटली, खाऊचे पुडे, पायी स्पोर्ट शूज, हातात स्मार्ट फोन असा जामानिमा होता, तर इतर 'ओरिजनल' वारकऱ्यांकडं एखादी शबनमसारखी पिशवी, कुणाकडं भगवा ध्वज, कुणाकडं टाळ, तर कुणाकडं मृदंग असा फरक दिसत होता. हे वारकरी बहुतांश गटागटानं चालत होते. मोबाइल फोन मात्र जवळपास सगळ्यांकडं होते. भले ते अगदी साधे असतील; पण होते! अगदी एखाद्या वृद्ध आजीसुद्धा याला अपवाद नव्हत्या. दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या पायी कुठली ना कुठली वहाण होती. पूर्वी अनेक वारकऱ्यांकडं चपलाही नसायच्या आणि पुण्यातल्या काही स्वयंसेवी संस्था वारकऱ्यांना चप्पलवाटप करायच्या हे चांगलं आठवतंय. सुदैवानं आता तशी परिस्थिती दिसली नाही. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांत किमान आर्थिक सुबत्ता पोचल्याचं ते लक्षण होतं आणि त्यामुळं मला छानच वाटलं. 
आम्ही चालत निघालो तेव्हा पहिला मुद्दा होता, की आपल्याच्यानं एवढं अंतर चालवेल का? पण एकदा तुम्ही समूहाचा भाग झालात, की या गोष्टींची जाणीव हळूहळू नष्ट व्हायला लागते. मला रोज चालायची सवय असली, तरी एका सलग टप्प्यात एवढं अंतर काटण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. पण खरोखर त्या गोष्टीची जाणीवही नंतर लगेच झाली नाही. सुरुवातीला भोसरी परिसरात मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी फ्लेक्स लावून वारकऱ्यांचं 'स्वागत' केलं होतं. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत रस्ताही चांगला मोठा होता. त्यामुळं मोकळं चालता येत होतं. हवा कुंद होती. पण पाऊस पडत नव्हता. सकाळच्या वातावरणातला आल्हाददायकपणा सर्वत्र भरून राहिला होता. सोबतचे वारकरी भजनं म्हणत होते, गात होते, नाचत होते... मला असं वाटलं, की हे सगळे मस्त सहलीला निघाले आहेत. यांच्या रोजच्या रुटीन आयुष्यात असे नाचायचे, उड्या मारायचे, खेळण्याचे प्रसंग किती येत असतील? पुरुषमंडळी शेतात राबत असतात आणि बायका घरात... कंबर मोडेपर्यंत काम करायचं आणि तसंच गोधडीवर आडवं व्हायचं. असे कित्येक दिवस आणि रात्री निघून जात असतील. मग वारी येते आणि या सगळ्या चक्रातून पांडुरंगच तुमची सुटका करतो. त्यामुळं रोज शाळेत जाणाऱ्या मुलांना एखादे वेळी सहलीला नेलं, की जसा आनंद होतो तोच आनंद मला या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शिवाय हा सगळा हौसेचा आणि श्रद्धेचा मामला! इथं कुणीही तुम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवून बोलवत नाही. तुम्ही येता ते तुमच्या इच्छेनं... त्यामुळंच सगळा आनंदाचा आणि उत्साहाचा माहौल असतो.
आम्ही बघता बघता दिघीत पोचलो. हा सगळा लष्कराचा परिसर. डाव्या बाजूला आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि उजवीकडं पूर्वीच्या व्हीएसएनएलचे टॉवर. मोकळी जमीन बरीच. त्यामुळं वारकरी आडोसा शोधून शोधून निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला जात होते. वारीत ही नेहमीचीच समस्या आणि वारकऱ्यांनी त्यावर त्यांच्या पद्धतीनं काढलेला हा तोडगा! अर्थात एकदा शरीराचे लाड बंद करायचे ठरवले की मग कुठलीच अडचण येत नसते. मग रस्त्याच्या कडेला उभे केलेल्या टँकरच्या नळाखाली आंघोळ करण्याचा संकोच वाटत नाही आणि आंघोळीनंतर ओली अंतर्वस्त्रे एका हातावर घेऊन सर्वांसमक्ष चालत निघण्याचाही! आणि याला पुरुष आणि स्त्रिया दोघांचाही अपवाद नाही. कारण एकदा तुम्ही वारीत शिरलात, की इथं सगळेच 'माउली'... आणि आईसमोर कसली लाज!
पुढं दिघीत एका ठिकाणी वारकरी मंडळी गोल रिंगण करून भजनं म्हणत बसली होती. मग आम्ही जरा तिथं टेकलो. लोकप्रिय सिनेमा गीतांच्या चालींवर वेगवेगळे अभंग, भजनं म्हणणे ही काही वारकऱ्यांची खासियत दिसली. एकूण ती सगळी मंडळी आनंद लुटत होती. आम्ही पुढं निघालो. दिघीच्या हद्दीत रस्ता छोटा आहे. त्यातच मागून पुढं जाणारे वारकऱ्यांचे मोठमोठे ट्रक आणि उलट्या बाजूनं घुसणारे दुचाकीस्वार यामुळं रस्ता अपुरा पडू लागला. अर्ध्याच रस्त्यातून चालता येत होतं. त्यात पावसामुळं उरलेल्या जागेत सगळा चिखल झालेला. दिघीपासून ते कळसपर्यंतचा हा प्रवास असाच कष्टात झाला. कळसजवळ पुन्हा थोडा वेळ थांबलो. कळस-धानोरीच्या डाव्या हाताला लोहगावचा विमानतळ आहे. तिथून सुखोई विमानांचं उड्डाण सुरू होतं. काही वेळानं लष्करी वाहनांचा ताफाही शेजारून गेला. एका बाजूला वारकरी आणि एका बाजूला जवान असं हे दृश्य मोठं सुखावणारं होतं. 
कळसनंतर येते विश्रांतवाडी. माउलींची पालखी पूर्वापार इथं जरा विश्रांतीला टेकते, म्हणून या गावाचं नाव विश्रांतवाडी. आम्हीही इथं चहाला थांबलो. विश्रांतवाडीत नवा स्कायवॉक केला आहे. तिथं जाऊन वरून वारीचं दृश्य डोळे भरून पाहिलं. खाली उतरून पुढं चालू लागलो. पुण्यात आल्याबरोबर वातावरण बदललं. वारकऱ्यांसाठी सर्व शहर जणू स्तब्ध झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक सेवाभावी संस्था, पोलिस, राजकीय संघटना आदींनी मोठमोठे मंडप टाकून वारकऱ्यांच्या स्वागताची सोय केलेली होती. काही जण पोह्यांचं मोफत वाटप करीत होते, तर कुणी केळ्यांचे घडच्या घड आणून वारकऱ्यांसाठी देत होतं. वातावरणातला भक्तिभाव कळसाला पोचला होता...
आता मात्र आमचे पाय 'बोलू' लागले होते. मग डेक्कन कॉलेजच्या आधीच आम्ही वारीतून बाजूला झालो आणि बसनं घरी परतलो. वारकऱ्यांसोबत १५ किलोमीटर चालताना मिळालेला एक अनामिक, अवर्णनीय आनंद आता वर्षभरासाठी आम्हाला पुरणार होता. मला या वारीतून काय मिळालं? असं वाटलं, की आपल्या संसारातून, व्याप-तापांतून, कमालीच्या सुखासीनतेतून, टोकाच्या उदासीनतेतून काही क्षण बाहेर यायला जमलं पाहिजे. संसारात राहून ही सकारात्मक विरक्ती अंगी बाणवता आली पाहिजे. सकारात्मक विरक्ती म्हणजे सगळ्यांत असून कशातच नसण्याची स्थिती! कुठलेही मोह नकोत, पाश नकोत, गुंतवणारे चिवट धागे नकोत. या सगळ्यांतून आपल्याला प्रसंगी चटकन बाहेर पडता आलं पाहिजे. असं बाहेर पडता आलं, तर 'झिरो ग्रॅव्हिटी'च्या पोकळीत तरंगत असल्याचा अनुभव येऊ शकतो. कुठलंच आकर्षण आपल्याला खाली खेचू शकत नाही. या स्थितीतून थोडं वर गेलं, की मग ते 'परब्रह्म' वगैरे भेटत असावं. पण सध्या तरी आपली यत्ता हीच... त्या पोकळीत तरंगण्याची! म्हणून माझी ही छोटी, साधी वारीच; पण आत्मानंदाची वारी! 
----

(पूर्वप्रसिद्धी : 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संवाद पुरवणीत १० जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा..)

6 Jul 2016

सुलतान रिव्ह्यू

लांबलेला डाव...
------------------
 

सलमान खानचा नवा चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. 'ईद'च्या मुहूर्तावर जवळपास दर वर्षी त्याचा एक नवा सिनेमा प्रदर्शित होत असतो आणि चाहतेही त्याची उत्सुकतेनं वाट बघत असतात.  मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज असं हल्ली सलमानच्या सिनेमांचं स्वरूप असतं. 'सुलतान'ही त्याला अपवाद नाही. पण तब्बल दोन तास ५० मिनिटांचा हा चित्रपट म्हणजे सलमाननं रंगविलेल्या 'सुलतान'पेक्षा प्रेक्षकांचीच स्वत:शी चाललेली लढाई वाटते. अत्यंत विस्कळित पटकथा, बांधणीचा अभाव असलेली कथा आणि अत्यंत प्रेडिक्टेबल मांडणी यामुळं अली अब्बास जफर दिग्दर्शित 'सुलतान'चा डाव रंगण्याऐवजी लांबलाच आहे.
या चित्रपटात सलमाननं हरियाणवी मुस्लिम कुस्तीगीर रंगवला आहे. कुस्तीगीर तरुणीच्या प्रेमाखातर पहिल्यांदाच आखाड्यात उतरून सुलतान त्या खेळावर अगदी लंडन अॉलिम्पिकमधे सुवर्णपदक मिळविण्याइतपत प्रभुत्व मिळवतो. त्याआधी तो त्या तरुणीचं - आरफाचं (अनुष्का शर्मा) - हृदय जिंकून तिच्याशी विवाहबद्धही झालेला असतो. मात्र, तो लंडनहून परतल्यावर अशी एक घटना घडते, की त्यामुळं त्याचं आयुष्यच बदलून जातं. सुलतान कुस्ती सोडतो. पण मग आठ वर्षांनंतर त्याच्यासमोर एक संधी चालून येते. एका परीनं ही त्याची स्वतःशीच लढाई असते. ती लढाई लढण्यास सुलतान सज्ज होतो आणि त्यातूनच सिनेमाचा (तुलनेनं आकर्षक असा) उत्तरार्ध उलगडत जातो.
सिनेमाचे दोन्ही भाग जवळपास दीड तासाचे आहेत. पूर्वार्ध अत्यंत विस्कळित आहे. त्यामुळं सुरुवातीपासूनच आपण गोष्टीत तल्लीन होत नाही. अनेकदा अशा सिनेमांत पूर्वार्ध हलका-फुलका आणि पुढच्या संघर्षाचा, लढाईचा पाया पक्का करणारा असतो. इथं सगळे प्रसंग सुटे सुटे समोर येतात. सलमान पतंग पकडायला धावतो हा प्रसंग त्याच्यातल्या चपळपणाची साक्ष देत असला, तरी तो पुष्कळच लांबला आहे. सुरुवातीचा हा सगळा भाग मग सुलतानचं कुस्तीच्या आखाड्यात शिरणं आणि एक अव्वल दर्जाचा कुस्तीगीर बनणं, मग त्याचा रोमान्स आणि लंडन अॉलिम्पिकपर्यंतचा प्रवास यानं व्यापला आहे. हा सगळा प्रवास एकात्म अनुभव देत नाही. तो विखंडित वाटतो. मध्यंतरातला धक्का कुस्तीशी संबंधित नसतो; तर कौटुंबिक असतो. तसा तो असायलाही हरकत नाही. पण त्या भावनिक आघाडीवरही सिनेमा निराशाच करतो. नायकाचं दुःख, त्याचं तुटलेपण, त्याची वेदना आपल्यापर्यंत त्या आवेगानं पोचतच नाही.
सिनेमाचा उत्तरार्ध तुलनेनं वेगवान आहे. पूर्वार्धातलं गावाकडचं वातावरण सोडून सिनेमा दिल्लीत येतो. इथं प्रो-टेकडाउन नावाची डब्ल्यूडब्ल्यूएफ सदृश लीग भरलेली आहे. गेली दोन वर्षं ही लीग तोट्यात आहे आणि तिच्या एका मालकाला आता ही लीग लोकप्रिय करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी त्याच्या वडिलांच्या सूचनेनुसार तोे सुलतानला दिल्लीत घेऊन येतो. इथं सिनेमाचा लूक आणि एकूणच सगळी मांडणी बदलते. या स्पर्धेतल्या सुलतानच्या एकेक लढाया आणि त्याच्या आगेमागे त्याचा त्याच्या पत्नीशी पुन्हा जुळविण्याचा होत असलेला प्रयत्न अशा दोन गोष्टी समांतरपणे समोर येत राहतात. हा भाग नक्कीच प्रेक्षणीय आणि उत्कंठावर्धक आहे. विशेषतः सलमानचं शब्दशः 'बल'स्थान असलेली अॅक्शन दृश्ये या भागात येतात आणि ती खिळवून ठेवतात. अॅड्रनलिन पंप करणारीच ही सगळी दृश्यमालिका आहे, यात शंका नाही. पण सलमानच्या सिनेमात त्याच्या चाहत्यांना हे अगदी अपेक्षितच असतं. त्यामुळं पुढं हे हे असं असं होणार, हे अगदी सहज लक्षात येतं. त्यात कुठलाही धक्का नाही, की ट्विस्ट नाही. इथं सलमानचा प्रशिक्षक म्हणून एक पात्र येतं. रणदीप हुडानं ती भूमिका केलीय. गेस्ट अॅपिअरन्स म्हणे. पण या भूमिकेला काहीच शेंडा ना बुडखा! सलमानकडून गुरासारखी मेहनत करून घेण्याचं काम फक्त त्यानं इमानेइतबारे केलंय.
सलमाननं सुलतानची भूमिका चांगली केलीय, पण त्याच्यासाठी आता या अशा भूमिका म्हणजे हातखंडा आहेत. शिवाय त्याच्या सुजलेल्या चेहऱ्यावरून त्याचं वय चांगलंच जाणवतं. इमोशनल प्रसंगांत तो उणा पडतो आणि अॅक्शन दृश्यांत आता त्याचं कौतुक वाटत नाही. शिवाय यात पहिलवानाचीच भूमिका केली असल्यानं, सुरुवातीपासूनच तो शर्टलेस - उघडाच समोर येतो. त्यामुळे ते एक जे अॅट्रॅक्शन असतं बायकांच्या पब्लिकला, तेही इथं नाही. (अर्थात सतत बंब्या पाहण्याचं कथित नयनसुख मात्र त्यांना आहे.) असो. 
अनुष्काला काहीच काम नाही. ती कुस्तीगीर महिला म्हणून मुळीच शोभत नाही. तिची आणि सलमानची केमिस्ट्रीही जुळलेली नाही. (पीकेमध्ये आमीरबरोबर ती जुळलेली वाटली होती.) तिन्ही खानांसोबत सिनेमे करण्याचा तिचा एक 'केआरए' पूर्ण झाला एवढाच या भूमिकेचा अर्थ. आकाशच्या भूमिकेत अमित साढ यानं चांगलं काम केलं आहे. सलमानचा मित्र झालेला कलाकारही चांगलं काम करून गेलाय. संगीत फार काही लक्षात राहणारं नाही. हॅमरिंगमुळं एक-दोन गाणी सतत ऐकू येतात, ती सिनेमात ऐकू आल्यावर थोडी परिचयाची वाटतात, एवढंच.
तेव्हा हा लांबलेला डाव सलमानचे चाहते आवडीनं पाहतीलही कदाचित; पण इतरांसाठी मात्र तो कंटाळ्याचाच डाव ठरला आहे.

---
दर्जा - अडीच स्टार
---