6 Jul 2016

सुलतान रिव्ह्यू

लांबलेला डाव...
------------------
 

सलमान खानचा नवा चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. 'ईद'च्या मुहूर्तावर जवळपास दर वर्षी त्याचा एक नवा सिनेमा प्रदर्शित होत असतो आणि चाहतेही त्याची उत्सुकतेनं वाट बघत असतात.  मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज असं हल्ली सलमानच्या सिनेमांचं स्वरूप असतं. 'सुलतान'ही त्याला अपवाद नाही. पण तब्बल दोन तास ५० मिनिटांचा हा चित्रपट म्हणजे सलमाननं रंगविलेल्या 'सुलतान'पेक्षा प्रेक्षकांचीच स्वत:शी चाललेली लढाई वाटते. अत्यंत विस्कळित पटकथा, बांधणीचा अभाव असलेली कथा आणि अत्यंत प्रेडिक्टेबल मांडणी यामुळं अली अब्बास जफर दिग्दर्शित 'सुलतान'चा डाव रंगण्याऐवजी लांबलाच आहे.
या चित्रपटात सलमाननं हरियाणवी मुस्लिम कुस्तीगीर रंगवला आहे. कुस्तीगीर तरुणीच्या प्रेमाखातर पहिल्यांदाच आखाड्यात उतरून सुलतान त्या खेळावर अगदी लंडन अॉलिम्पिकमधे सुवर्णपदक मिळविण्याइतपत प्रभुत्व मिळवतो. त्याआधी तो त्या तरुणीचं - आरफाचं (अनुष्का शर्मा) - हृदय जिंकून तिच्याशी विवाहबद्धही झालेला असतो. मात्र, तो लंडनहून परतल्यावर अशी एक घटना घडते, की त्यामुळं त्याचं आयुष्यच बदलून जातं. सुलतान कुस्ती सोडतो. पण मग आठ वर्षांनंतर त्याच्यासमोर एक संधी चालून येते. एका परीनं ही त्याची स्वतःशीच लढाई असते. ती लढाई लढण्यास सुलतान सज्ज होतो आणि त्यातूनच सिनेमाचा (तुलनेनं आकर्षक असा) उत्तरार्ध उलगडत जातो.
सिनेमाचे दोन्ही भाग जवळपास दीड तासाचे आहेत. पूर्वार्ध अत्यंत विस्कळित आहे. त्यामुळं सुरुवातीपासूनच आपण गोष्टीत तल्लीन होत नाही. अनेकदा अशा सिनेमांत पूर्वार्ध हलका-फुलका आणि पुढच्या संघर्षाचा, लढाईचा पाया पक्का करणारा असतो. इथं सगळे प्रसंग सुटे सुटे समोर येतात. सलमान पतंग पकडायला धावतो हा प्रसंग त्याच्यातल्या चपळपणाची साक्ष देत असला, तरी तो पुष्कळच लांबला आहे. सुरुवातीचा हा सगळा भाग मग सुलतानचं कुस्तीच्या आखाड्यात शिरणं आणि एक अव्वल दर्जाचा कुस्तीगीर बनणं, मग त्याचा रोमान्स आणि लंडन अॉलिम्पिकपर्यंतचा प्रवास यानं व्यापला आहे. हा सगळा प्रवास एकात्म अनुभव देत नाही. तो विखंडित वाटतो. मध्यंतरातला धक्का कुस्तीशी संबंधित नसतो; तर कौटुंबिक असतो. तसा तो असायलाही हरकत नाही. पण त्या भावनिक आघाडीवरही सिनेमा निराशाच करतो. नायकाचं दुःख, त्याचं तुटलेपण, त्याची वेदना आपल्यापर्यंत त्या आवेगानं पोचतच नाही.
सिनेमाचा उत्तरार्ध तुलनेनं वेगवान आहे. पूर्वार्धातलं गावाकडचं वातावरण सोडून सिनेमा दिल्लीत येतो. इथं प्रो-टेकडाउन नावाची डब्ल्यूडब्ल्यूएफ सदृश लीग भरलेली आहे. गेली दोन वर्षं ही लीग तोट्यात आहे आणि तिच्या एका मालकाला आता ही लीग लोकप्रिय करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी त्याच्या वडिलांच्या सूचनेनुसार तोे सुलतानला दिल्लीत घेऊन येतो. इथं सिनेमाचा लूक आणि एकूणच सगळी मांडणी बदलते. या स्पर्धेतल्या सुलतानच्या एकेक लढाया आणि त्याच्या आगेमागे त्याचा त्याच्या पत्नीशी पुन्हा जुळविण्याचा होत असलेला प्रयत्न अशा दोन गोष्टी समांतरपणे समोर येत राहतात. हा भाग नक्कीच प्रेक्षणीय आणि उत्कंठावर्धक आहे. विशेषतः सलमानचं शब्दशः 'बल'स्थान असलेली अॅक्शन दृश्ये या भागात येतात आणि ती खिळवून ठेवतात. अॅड्रनलिन पंप करणारीच ही सगळी दृश्यमालिका आहे, यात शंका नाही. पण सलमानच्या सिनेमात त्याच्या चाहत्यांना हे अगदी अपेक्षितच असतं. त्यामुळं पुढं हे हे असं असं होणार, हे अगदी सहज लक्षात येतं. त्यात कुठलाही धक्का नाही, की ट्विस्ट नाही. इथं सलमानचा प्रशिक्षक म्हणून एक पात्र येतं. रणदीप हुडानं ती भूमिका केलीय. गेस्ट अॅपिअरन्स म्हणे. पण या भूमिकेला काहीच शेंडा ना बुडखा! सलमानकडून गुरासारखी मेहनत करून घेण्याचं काम फक्त त्यानं इमानेइतबारे केलंय.
सलमाननं सुलतानची भूमिका चांगली केलीय, पण त्याच्यासाठी आता या अशा भूमिका म्हणजे हातखंडा आहेत. शिवाय त्याच्या सुजलेल्या चेहऱ्यावरून त्याचं वय चांगलंच जाणवतं. इमोशनल प्रसंगांत तो उणा पडतो आणि अॅक्शन दृश्यांत आता त्याचं कौतुक वाटत नाही. शिवाय यात पहिलवानाचीच भूमिका केली असल्यानं, सुरुवातीपासूनच तो शर्टलेस - उघडाच समोर येतो. त्यामुळे ते एक जे अॅट्रॅक्शन असतं बायकांच्या पब्लिकला, तेही इथं नाही. (अर्थात सतत बंब्या पाहण्याचं कथित नयनसुख मात्र त्यांना आहे.) असो. 
अनुष्काला काहीच काम नाही. ती कुस्तीगीर महिला म्हणून मुळीच शोभत नाही. तिची आणि सलमानची केमिस्ट्रीही जुळलेली नाही. (पीकेमध्ये आमीरबरोबर ती जुळलेली वाटली होती.) तिन्ही खानांसोबत सिनेमे करण्याचा तिचा एक 'केआरए' पूर्ण झाला एवढाच या भूमिकेचा अर्थ. आकाशच्या भूमिकेत अमित साढ यानं चांगलं काम केलं आहे. सलमानचा मित्र झालेला कलाकारही चांगलं काम करून गेलाय. संगीत फार काही लक्षात राहणारं नाही. हॅमरिंगमुळं एक-दोन गाणी सतत ऐकू येतात, ती सिनेमात ऐकू आल्यावर थोडी परिचयाची वाटतात, एवढंच.
तेव्हा हा लांबलेला डाव सलमानचे चाहते आवडीनं पाहतीलही कदाचित; पण इतरांसाठी मात्र तो कंटाळ्याचाच डाव ठरला आहे.

---
दर्जा - अडीच स्टार
---

No comments:

Post a Comment