10 Jul 2016

आत्मानंदाची वारी

आत्मानंदाची वारी
-----------------------

पंढरीची वारी मी पहिल्यांदा केव्हा पाहिली, ते आठवत नाही. लहानपणी पेपरमध्ये माउलींची पालखी दिवेघाट चढतानाचे मोठमोठे फोटो यायचे. तेच वारीचं पहिलं दर्शन असावं. पुढं पुण्यात पत्रकारिता करू लागलो, तेव्हा वारीचा जवळून संबंध आला. वारी पुण्यात आली, की त्या वातावरणाच्या बातम्या करायचं काम सुरुवातीला केलं. ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पुण्यात आल्या, की या चैतन्यदायी शहराचं वातावरण कसं बदलून जातं हे पाहिलं. वारीविषयी कुतूहल वाढलं. पण ते कित्येक वर्षं कुतूहलाच्या पातळीवरच राहिलं. ऐहिक सुखाची परमावधी झाल्याशिवाय पारलौकिक सुखाची ओढ लागत नसावी. त्यामुळं तरुणपणाची कित्येक वर्षं संसाराचं बस्तान बसवण्यातच गेली आणि वारी फक्त बातम्या छापण्यापुरती अन् त्या वाचण्यापुरतीच आयुष्यात राहिली. 
पुण्यात 'मटा'त आल्यापासून गेली सहा वर्षं ओळीनं आमच्या फर्ग्युसन रोडवरच्या ऑफिससमोरून दोन्ही पालख्या जाताना पाहत आलो. तेव्हा वारीची ओढ अधिकच जाणवू लागली असावी. संसारातल्या ऐहिक सुखांच्या पलीकडची दृश्यं नजरेच्या टप्प्यात येण्याचा आयुष्यातलाही काळ आता आला होता. तेही एक कारण असावं. पाऊस सुरू झाला, पेरण्या आटोपल्या, की महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांतली, शहरांतली हजारो संसारी माणसं सगळं घरदार टाकून त्या सावळ्या परब्रह्माच्या ओढीनं अडीचशे-तीनशे किलोमीटर पायपीट करीत का निघतात, हे जाणून घेण्याची अनिवार ओढ कुठं तरी मनात लागून राहिली होती. ते असं काय आहे, ज्याच्या ओढीनं माणसं सगळं विसरून, शारीरिक पीडा सहन करून एवढ्या लांब पायी चालत निघतात, हे तसं एका वारीच्या खेपेत कळणं अवघडच. पण या वेळी किमान सुरुवात करू या, असा निर्धार केला. कुटुंबातल्या सदस्यांनीही साथ दिली आणि श्वशुरगृहीच्या काही मंडळींसह आम्ही सात जण 'हम सात साथ है' म्हणत वारीच्या वाटेवर निघालो. 
पुण्यात खरं तर बाराही महिने उत्तम वातावरण असतं; पण जून-जुलैत पाऊस पडून गेला, की ते आणखी खास बनतं. अशा पावसाळी वातावरणात सकाळी सकाळी बाहेर पडून फिरण्यासारखं सुख नाही. वारीसाठी हाच काळ का निवडला गेला असावा, हे कळण्यासाठी हे वातावरण अनुभवायला हवं. सकाळी लवकर निघून आम्ही आळंदीच्या रस्त्यापर्यंत साडेसात वाजता पोचलो. भोसरीकडून पुणे-आळंदी रस्त्याला मिळणाऱ्या चौकाला मॅगझिन चौक असं नाव आहे. सहाआसनी रिक्षानं आम्हाला तिथं सोडलं. समोर डाव्या बाजूला आळंदी आणि उजव्या बाजूला पुण्याकडं जाणारा रस्ता वारकऱ्यांनी फुलून गेला होता. प्रत्यक्ष पालखी अजून गांधीवाड्यातून निघाली नव्हती. पण आळंदीत जमलेल्या हजारो वारकऱ्यांनी सकाळी आपापली आन्हिकं उरकताच पुण्याकडं प्रस्थान ठेवलं होतं. आम्ही थोडा विचार केला आणि या लोकांसोबतच पुण्याकडं निघायचं ठरवलं. आळंदीकडून पुण्याला येणारा रस्ता वाहतुकीसाठी पहाटेपासूनच बंद असतो. त्यामुळं हा रस्ता पूर्णपणे वारकऱ्यांसाठी मोकळा असतो. आम्ही थोडंसं खाऊन चालायला सुरुवात केली. अनेक लोक झपाझप चालत होते. पुण्यातून अनेक लोक आळंदी ते पुणे एवढी वारी करण्यासाठी येत असतात. हे लोक आणि मूळचे वारकरी लोक यांत फरक स्पष्ट दिसत होता. आमच्यासारख्या नवोदित वारकऱ्यांकडं पाठीला सॅक, पाण्याची बाटली, खाऊचे पुडे, पायी स्पोर्ट शूज, हातात स्मार्ट फोन असा जामानिमा होता, तर इतर 'ओरिजनल' वारकऱ्यांकडं एखादी शबनमसारखी पिशवी, कुणाकडं भगवा ध्वज, कुणाकडं टाळ, तर कुणाकडं मृदंग असा फरक दिसत होता. हे वारकरी बहुतांश गटागटानं चालत होते. मोबाइल फोन मात्र जवळपास सगळ्यांकडं होते. भले ते अगदी साधे असतील; पण होते! अगदी एखाद्या वृद्ध आजीसुद्धा याला अपवाद नव्हत्या. दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या पायी कुठली ना कुठली वहाण होती. पूर्वी अनेक वारकऱ्यांकडं चपलाही नसायच्या आणि पुण्यातल्या काही स्वयंसेवी संस्था वारकऱ्यांना चप्पलवाटप करायच्या हे चांगलं आठवतंय. सुदैवानं आता तशी परिस्थिती दिसली नाही. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांत किमान आर्थिक सुबत्ता पोचल्याचं ते लक्षण होतं आणि त्यामुळं मला छानच वाटलं. 
आम्ही चालत निघालो तेव्हा पहिला मुद्दा होता, की आपल्याच्यानं एवढं अंतर चालवेल का? पण एकदा तुम्ही समूहाचा भाग झालात, की या गोष्टींची जाणीव हळूहळू नष्ट व्हायला लागते. मला रोज चालायची सवय असली, तरी एका सलग टप्प्यात एवढं अंतर काटण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. पण खरोखर त्या गोष्टीची जाणीवही नंतर लगेच झाली नाही. सुरुवातीला भोसरी परिसरात मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी फ्लेक्स लावून वारकऱ्यांचं 'स्वागत' केलं होतं. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत रस्ताही चांगला मोठा होता. त्यामुळं मोकळं चालता येत होतं. हवा कुंद होती. पण पाऊस पडत नव्हता. सकाळच्या वातावरणातला आल्हाददायकपणा सर्वत्र भरून राहिला होता. सोबतचे वारकरी भजनं म्हणत होते, गात होते, नाचत होते... मला असं वाटलं, की हे सगळे मस्त सहलीला निघाले आहेत. यांच्या रोजच्या रुटीन आयुष्यात असे नाचायचे, उड्या मारायचे, खेळण्याचे प्रसंग किती येत असतील? पुरुषमंडळी शेतात राबत असतात आणि बायका घरात... कंबर मोडेपर्यंत काम करायचं आणि तसंच गोधडीवर आडवं व्हायचं. असे कित्येक दिवस आणि रात्री निघून जात असतील. मग वारी येते आणि या सगळ्या चक्रातून पांडुरंगच तुमची सुटका करतो. त्यामुळं रोज शाळेत जाणाऱ्या मुलांना एखादे वेळी सहलीला नेलं, की जसा आनंद होतो तोच आनंद मला या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शिवाय हा सगळा हौसेचा आणि श्रद्धेचा मामला! इथं कुणीही तुम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवून बोलवत नाही. तुम्ही येता ते तुमच्या इच्छेनं... त्यामुळंच सगळा आनंदाचा आणि उत्साहाचा माहौल असतो.
आम्ही बघता बघता दिघीत पोचलो. हा सगळा लष्कराचा परिसर. डाव्या बाजूला आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि उजवीकडं पूर्वीच्या व्हीएसएनएलचे टॉवर. मोकळी जमीन बरीच. त्यामुळं वारकरी आडोसा शोधून शोधून निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला जात होते. वारीत ही नेहमीचीच समस्या आणि वारकऱ्यांनी त्यावर त्यांच्या पद्धतीनं काढलेला हा तोडगा! अर्थात एकदा शरीराचे लाड बंद करायचे ठरवले की मग कुठलीच अडचण येत नसते. मग रस्त्याच्या कडेला उभे केलेल्या टँकरच्या नळाखाली आंघोळ करण्याचा संकोच वाटत नाही आणि आंघोळीनंतर ओली अंतर्वस्त्रे एका हातावर घेऊन सर्वांसमक्ष चालत निघण्याचाही! आणि याला पुरुष आणि स्त्रिया दोघांचाही अपवाद नाही. कारण एकदा तुम्ही वारीत शिरलात, की इथं सगळेच 'माउली'... आणि आईसमोर कसली लाज!
पुढं दिघीत एका ठिकाणी वारकरी मंडळी गोल रिंगण करून भजनं म्हणत बसली होती. मग आम्ही जरा तिथं टेकलो. लोकप्रिय सिनेमा गीतांच्या चालींवर वेगवेगळे अभंग, भजनं म्हणणे ही काही वारकऱ्यांची खासियत दिसली. एकूण ती सगळी मंडळी आनंद लुटत होती. आम्ही पुढं निघालो. दिघीच्या हद्दीत रस्ता छोटा आहे. त्यातच मागून पुढं जाणारे वारकऱ्यांचे मोठमोठे ट्रक आणि उलट्या बाजूनं घुसणारे दुचाकीस्वार यामुळं रस्ता अपुरा पडू लागला. अर्ध्याच रस्त्यातून चालता येत होतं. त्यात पावसामुळं उरलेल्या जागेत सगळा चिखल झालेला. दिघीपासून ते कळसपर्यंतचा हा प्रवास असाच कष्टात झाला. कळसजवळ पुन्हा थोडा वेळ थांबलो. कळस-धानोरीच्या डाव्या हाताला लोहगावचा विमानतळ आहे. तिथून सुखोई विमानांचं उड्डाण सुरू होतं. काही वेळानं लष्करी वाहनांचा ताफाही शेजारून गेला. एका बाजूला वारकरी आणि एका बाजूला जवान असं हे दृश्य मोठं सुखावणारं होतं. 
कळसनंतर येते विश्रांतवाडी. माउलींची पालखी पूर्वापार इथं जरा विश्रांतीला टेकते, म्हणून या गावाचं नाव विश्रांतवाडी. आम्हीही इथं चहाला थांबलो. विश्रांतवाडीत नवा स्कायवॉक केला आहे. तिथं जाऊन वरून वारीचं दृश्य डोळे भरून पाहिलं. खाली उतरून पुढं चालू लागलो. पुण्यात आल्याबरोबर वातावरण बदललं. वारकऱ्यांसाठी सर्व शहर जणू स्तब्ध झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक सेवाभावी संस्था, पोलिस, राजकीय संघटना आदींनी मोठमोठे मंडप टाकून वारकऱ्यांच्या स्वागताची सोय केलेली होती. काही जण पोह्यांचं मोफत वाटप करीत होते, तर कुणी केळ्यांचे घडच्या घड आणून वारकऱ्यांसाठी देत होतं. वातावरणातला भक्तिभाव कळसाला पोचला होता...
आता मात्र आमचे पाय 'बोलू' लागले होते. मग डेक्कन कॉलेजच्या आधीच आम्ही वारीतून बाजूला झालो आणि बसनं घरी परतलो. वारकऱ्यांसोबत १५ किलोमीटर चालताना मिळालेला एक अनामिक, अवर्णनीय आनंद आता वर्षभरासाठी आम्हाला पुरणार होता. मला या वारीतून काय मिळालं? असं वाटलं, की आपल्या संसारातून, व्याप-तापांतून, कमालीच्या सुखासीनतेतून, टोकाच्या उदासीनतेतून काही क्षण बाहेर यायला जमलं पाहिजे. संसारात राहून ही सकारात्मक विरक्ती अंगी बाणवता आली पाहिजे. सकारात्मक विरक्ती म्हणजे सगळ्यांत असून कशातच नसण्याची स्थिती! कुठलेही मोह नकोत, पाश नकोत, गुंतवणारे चिवट धागे नकोत. या सगळ्यांतून आपल्याला प्रसंगी चटकन बाहेर पडता आलं पाहिजे. असं बाहेर पडता आलं, तर 'झिरो ग्रॅव्हिटी'च्या पोकळीत तरंगत असल्याचा अनुभव येऊ शकतो. कुठलंच आकर्षण आपल्याला खाली खेचू शकत नाही. या स्थितीतून थोडं वर गेलं, की मग ते 'परब्रह्म' वगैरे भेटत असावं. पण सध्या तरी आपली यत्ता हीच... त्या पोकळीत तरंगण्याची! म्हणून माझी ही छोटी, साधी वारीच; पण आत्मानंदाची वारी! 
----

(पूर्वप्रसिद्धी : 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संवाद पुरवणीत १० जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा..)

1 comment:

  1. सुंदर अनुभव कथन ...वारीत सहभागी झाल्यासारखे वाटले ...शेवटी लिहिलेले जीवनाचे सार समर्पक ... खरचं वारीत सामील होण्याचा अनुभव घेतलाच पाहिजे ..धन्यवाद👌👍🙏

    ReplyDelete