ये कहाँ आ गए हम...
-------------------
भारत. १९९१.
राजीव
गांधींच्या क्रूर हत्येनंतर नरसिंह राव यांचं सरकार केंद्रात जेमतेम
बहुमतावर सत्तेत आलेलं. त्यांनी अर्थमंत्रिपदी नियुक्ती केली रिझर्व्ह
बँकेच्या एका माजी गव्हर्नरची, एका जाणत्या अर्थतज्ज्ञाची. त्याचं नाव डॉ.
मनमोहनसिंग. याच मनमोहनसिंगांनी २४ जुलै १९९१ रोजी लोकसभेत राव सरकारचा
पहिला अर्थसंकल्प सादर केला. देशाला एका वेगळ्या वाटेवर नेणारा, धाडसी अन्
निर्णायक!
भारतानं
कोणत्या आर्थिक परिस्थितीत आर्थिक उदारीकरण स्वीकारलं याची चर्चा आणि
माहिती अनेक वेळा झाली आहे. तो या लेखाचा हेतू नाही. मात्र, भारताच्या
सामाजिक परिस्थितीवर या उदारीकरणानं काय परिणाम केले यावर एक ओझरती नजर
टाकली तरी जावेद अख्तर यांच्या शब्दांत 'ये कहाँ आ गए हम...' असंच म्हणावंसं
वाटतं.
भारतासाठी
नव्हे तर एकूणच जगासाठी हा काळ फारच खळबळीचा आणि क्रांतिकारी बदलांचा
होता. दोनच वर्षांपूर्वी शीतयुद्धाचं प्रतीक असलेली बर्लिनची भिंत
उद्ध्वस्त झाली होती. रशियात मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वाखाली
'ग्लासनोस्त' आणि 'पेरेस्त्रोइका'चं वारं वाहू लागलं होतं. आखातात कुवेतवर
सद्दाम हुसेननं आक्रमण केलं होतं आणि आपणच उभ्या केलेल्या या भस्मासुराचा
नायनाट करण्यासाठी युद्धखोर अमेरिकेला अगदी निमित्तच मिळालं होतं. भारतात
या वेळी अस्थिर राजकीय स्थिती होती. व्ही. पी. सिंह आणि पाठोपाठ चंद्रशेखर
यांची सरकारं कार्यकाळ पूर्ण करू शकली नव्हती. देशाची तिजोरी रसातळाला गेली
होती आणि सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती. देशात हिंदुत्ववादी विचारांची
लाट आली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ठिकठिकाणी कारसेवा
सुरू होती. वर्षापूर्वीच लालकृष्ण अडवानी यांनी राममंदिरासाठी रथयात्रा
काढली होती आणि देश ढवळून टाकला होता. व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या
शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानं देशात कथित उच्चवर्णीयांमध्ये
प्रचंड संताप धुमसत होता आणि सामाजिक दरी आणखी रुंदावून बसली होती. १९९०
च्या विधानसभा निवडणुकांत बाळासाहेब ठाकऱ्यांच्या झंझावाती भाषणांनी
महाराष्ट्र हलवून सोडला होता. रात्री उशिरापर्यंत राजकीय प्रचारसभा चालत.
टी. एन. शेषन यांचा अद्याप उदय व्हायचा होता...
१९९१
मध्ये उपग्रह वाहिन्यांना परवानगी मिळाली आणि झी ही पहिली खासगी वाहिनी
केबलवरून दिसू लागली. रुपर्ट मरडॉक यांच्या स्टार समूहानं लगोलग भारतात
शिरकाव केला आणि न्यूझीलंडमधील क्रिकेट सामने स्टार नेटवर्कवरून लाइव्ह
दिसू लागले. याच उपग्रह वाहिन्यांनी आखाती युद्धही लाइव्ह दाखवलं आणि
भारतीयांनी प्रथमच घरबसल्या 'युद्ध' पाहिलं. सचिन तेंडुलकर नावाचा तारा
नुकताच उदयास येऊ लागला होता. तरी भारतीय संघात अद्याप कपिलदेव, मनोज
प्रभाकर, रवी शास्त्री आदी सीनियर मंडळी खेळत होती. १९९१ पर्यंत दूरदर्शन
हीच एकमेव वाहिनी दिसत होती आणि चार महानगरांतील रहिवाशांना डीडी मेट्रो ही
दुसरी वाहिनी दिसत असल्यानं अन्य शहरांतील लोक त्यांच्यावर चक्क जळत होते.
अमिताभ अद्याप भरात होता आणि 'जुम्मा चुम्मा दे दे'वर निम्म्या वयाच्या
किमी काटकरसोबत रोमान्स करीत होता. असं असलं तरी सलमान खान, आमिर खान या
खानांचा उदय झाला होता आणि १९९१ हे आणखी एका खानासाठी महत्त्वाचं वर्ष
ठरणार होतं. त्याचं नाव होतं शाहरुख खान. त्याच्या 'बाजीगर'नं प्रेक्षकांना
'दिवाना' केलं होतं आणि पुढील कित्येक वर्षं या खानत्रयीचा दबदबा राहणार
होता. अजय देवगण, अक्षयकुमार हे आणखी दोन 'लंबी रेस के घोडे' पुढच्याच
वर्षी, म्हणजे १९९२ मध्ये रूपेरी पदार्पण करणार होते.
दूरदर्शनवर
रामायण आणि महाभारत या मालिकांचा प्रभाव होता. 'रंगोली' आवर्जून पाहिली
जात होती. सुरभी हा सिद्धार्थ काक व रेणुका शहाणेचा कार्यक्रम लोकांनी
तुफान लोकप्रिय केला होता. एवढा की, खास स्पर्धा पोस्ट कार्डची निर्मिती
पोस्ट खात्याला करावी लागली.
मल्टिप्लेक्स
हा काय प्रकार असतो, हे माहिती नव्हतं. सिंगल स्क्रीन थिएटर हेच चित्रपट
पाहण्याचं एकमेव साधन होतं. तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे,
सचिन, स्मिता तळवलकर आदी मंडळींचा दबदबा होता. तरीही १९९१ हे वर्ष गाजवलं
ते विजय कोंडके यांच्या 'माहेरच्या साडी'नं. कित्येक आठवडे हा चित्रपट
थिएटरांत मुक्काम ठोकून होता.
महाराष्ट्रात
१९९० च्या निवडणुकीनंतर शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते.
राज्यात तेव्हा मुंबई (किंवा खरं तर बॉम्बे) हेच एकमेव महानगर होतं. पुणं
हे अद्याप एक शांत, निवांत शहर होतं. सांस्कृतिक वाद-चर्चा, गणेशोत्सवाची
धूम आणि सवाई गंधर्व महोत्सवाची सुरेलता यात हे सुशेगाद शहर रमलेलं होतं.
रविवारी रात्री सुरू झालेल्या शेवटच्या सत्राची भीमसेन जोशींच्या पहाडी
आवाजानं सोमवारी सकाळी सांगता होत होती. युनिव्हर्सिटी रोडवर अद्याप दोन्ही
बाजूंनी दाट झाडी होती आणि विद्यापीठ चौकातलं भलंमोठं कारजं संध्याकाळी
डोळ्यांना सुखावत होतं. झेड ब्रिज आणि नदीपात्रातला रस्ता नसल्यानं
प्रेमीजन अद्याप सारसबाग, पेशवेपार्कमध्येच प्रेमालाप करीत होते. सिंहगड
मात्र तेव्हाही फेव्हरिट होता. सिंहगडला जाणारा रोड मात्र छोटासाच, पण
दोन्ही बाजूला दाट झाडी असलेला असाच होता. एकूणच पुण्यातले बहुतेक रस्ते
लहानसेच, पण दुहेरी होते आणि तरी फारसं ट्रॅफिक जॅम होत नसे. मंडई
विद्यापीठ (पत्रकारांचं रात्री जमण्याचं ठिकाण) तेव्हा जोरात होतं. हिंजवडी
हे नावही फारसं कुणाला माहिती नव्हतं. १९९४ ला बालेवाडीत क्रीडा संकुल उभं
राहिलं आणि पुढच्या काही काळात कात्रज-देहूरोड बायपास रस्ता तयार झाला. या
रस्त्याच्या दोन्ही बाजूला बहुतांश भाग निर्जन होता आणि झाडीझुडपं वाढली
होती. नगर रोडचीही तीच स्थिती होती. गुंजन टॉकीजच्या पुढं वस्ती विरळ होत
जायची आणि वाघोली हे नगरला जाताना पुण्यानंतर येणारं एक गाव होतं.
मोबाइल
हे नावही कुणी ऐकलं नव्हतं आणि इंटरनेटचा वापर फार म्हणजे फारच मर्यादित
होता. एसटीडी बूथची चलती होती आणि गावोगावचे एसटीडी कोड क्रमांक पाठ असावे
लागत. एकूणच तंत्रज्ञान माणसाच्या आयुष्यावर स्वार झालं नव्हतं आणि
त्यामुळं त्यातून येणारी अपरिहार्य पळापळही नव्हती. उलट एसटीडी बूथ ही
तेव्हा क्रांती मानली जात होती आणि राजीव गांधी व सॅम पित्रोदा यांना
त्यांचं रास्त श्रेय देण्यात येत होतं.
महाराष्ट्राची
सांस्कृतिक श्रीमंती अद्याप अबाधित होती. कुसुमाग्रज-पुलं अद्याप
हिंडते-फिरते होते आणि एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान, मोहन
धारिया, बाळासाहेब भारदे या मंडळींचा सार्वजनिक वावर पुण्यातल्या जाहीर
कार्यक्रमांना एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊ देत नव्हता. फेसबुक नव्हतं,
तरी दिवाळी अंकांतल्या विशिष्ट लेखांची राज्यभर चर्चा व्हायची.
----
काळ भराभर पुढं सरकत गेला...
मग
१९९५ मध्ये देशात पहिला मोबाइल आला. १९९७ मध्ये पहिलं मल्टिप्लेक्स उभं
राहिलं. त्याच काळात कधी तरी पहिला मॉल उभा राहिला. तोवर सचिन नावाचा
फिनॉमिना फारच मोठा झाला होता. मग राहुल द्रविड, सौरभ गांगुली, अनिल
कुंबळे, लक्ष्मण, युवराजसिंग यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला. मॉल,
मल्टिप्लेक्स आणि मेट्रो या तीन 'म'कारांनी महानगरांतलं आयुष्य आमूलाग्र
बदलून गेलं. १९९९ च्या सुमारास आलेल्या वायटूके समस्येमुळं भारतातल्या
बीपीओ उद्योगाला एकदमच ऊर्जितावस्था आली. अनेक आयटी कंपन्या सुरू झाल्या.
पुणे, बेंगळुरू, हैदराबाद ही भारतातली नवी महानगरं उदयाला आली. या
शहरांतल्या जागांच्या किमती अचानक वाढल्या. महागाई वाढली. मोबाइल
तंत्रज्ञानात दर वर्षी क्रांती होत गेली. पुढच्या दशकभरात ती आणखीनच पुढं
गेली. वृत्तपत्रांत पूर्वी सर्व पानं कृष्णधवल असायची. तिथं
१९९९-२००० च्या सुमारास पहिलं पान रंगीत आणि नंतर पुढच्या दहा वर्षांत सर्व
पानं रंगीत असा प्रवास फारच वेगानं झाला...
एकूणच तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत भौतिक
प्रगतीचा धबधबा वेगानं इथल्या समाजावर कोसळू लागला. दहा लाखांहून अधिक
लोकसंख्या असलेल्या महानगरांची संख्या वेगानं वाढू लागली. खेड्यांतून
शहरांमध्ये विस्थापन मोठ्या प्रमाणात सुरू झालं. गाव-खेड्यांतली सामाजिक,
सांस्कृतिक चौकट फार वेगानं ढासळली आणि तिथं नवी सामाजिक समीकरणं आकार घेऊ
लागली. शहरांमध्ये भौतिक सुखांची परमावधी झाली असली, तरी नियोजनाअभावी ही
शहरं बेढब आणि कुरूप दिसू लागली. तिथल्या सोई-सुविधांचा बोजवारा उडाला आणि
नवी बेशिस्त, कशालाच न जुमानणारी नागर संस्कृती उदयाला आली. ग्रामीण
भागांतून भू-संपादन किंवा अन्य माध्यमांतून काही विशिष्ट वर्गाकडं पैसा
आला. त्यातून वेगळ्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या.
मध्यमवर्गानं वर्षानुवर्षं जपलेली (अभावाची
गौरवगाथा गाणारी) मूल्यव्यवस्था अपरिमित भौतिक सुखांच्या उपलब्धतेनंतर
काचेसारखी तडकली. या लाटेचा पहिला तडाखा बसला तो एकत्र कुटुंबपद्धतीला.
दोन्ही हातांनी सुखं ओरबडताना हातांतून बरंच काही रेतीसारखं निसटून
गेल्याची जाणीव लोकांना फार उशिरा झाली. आपल्याला कशाच्या बदल्यात काय
मिळवायचं आहे, याचा विचार पुनश्च अनेकांना सतावू लागला. जिथं काही नव्हतंच
तिथं पुन्हा एकदा काहीच नाही, अशी स्थिती झाली.
या सर्व बदलांची किंमत समाजव्यवस्था आणि
वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर एका पिढीनं चुकविली. पुढच्या पिढ्यांची
वेगळी मूल्यव्यवस्था तयार होते आहे. या नव्या पिढीचे फंडे अगदी स्पष्ट
आहेत. त्यांचे विचार निश्चितच वेगळे आहेत, पण किमान ती पिढी कमी दांभिक
आहे. आमच्यासारख्या चाळिशीला आलेल्या पिढीनं या बदलांचे फायदेही उपभोगले
आणि तोटेही! अशा वेळी दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याची धडपड करणारी माझी पिढी
मनात कुठं तरी म्हणते आहे - ये कहाँ आ गए हम... यूँही साथ चलते चलते!
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती - २४ जुलै २०१६)
----
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती - २४ जुलै २०१६)
----
लेखातून 25वर्षाचा कालखंड जिवंत उभा केलाय. आमच्या वेळी असे नव्हते असा सूर न लावता वस्तूस् तिथिचा स्वीकार करणारा अतिशय सकारात्मक लेख!
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteउत्तम वर्णन .....
ReplyDeleteधन्यवाद सौरभ...
Delete